Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतीचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून पोलिसांनी पत्नीसह सासू, सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प‌ीडित पतीने १३ फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण नामदेव गायकवाड (वय २६) या तरुणाचा २०१३ मध्ये विवाह झाला. मात्र, विवाहानंतर पत्नी राखी हिच्यासह सासरा नवनाथ हजारे, सासू सुमन हजारे, शालक अभिजीत हजारे आणि अन्य दोघांनी मिळून किरणचा मानसिक छळ सुरू केला. त्यातच काही दिवसापासून राखी सासरी निघून गेली होती. तिला आणण्यासाठी गेलेल्या किरणला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या कारणामुळे किरणने देवळाली परिसरातील रेणुकानगर येथील घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत किरणचे वडील नामदेव गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी संशयितांविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केला.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अन्य एका गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांनी दोघाजणाविरोधात गुन्हा दाखल केला. घारपुरे घाटाजवळील एका घरातील नोकरावर चोरीचा आळ आल्याने त्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. साहेबराव पगार असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिचे नाव आहे. साहेबराव पगार संशयित आरोपींच्या पाईपच्या गोदामावर वॉचमन म्हणून काम पाहत होते. याठिकाणी झालेली चोरी पगार यांनीच केल्याचा आरोप करीत संशयित आरोपींनी पगार यांचा मानसिक छळ केला. पोलिसांकडे देण्याची धमकी दिली. या भितीने पगार यांनी आत्महत्या केली. पगार यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी घारपुरे घाट येथील बंगल्यात राहणाऱ्या दोघा भावाविरोधात गुन्हा दाखल केला.

दुचाकीस्वार ठार

नाशिक : कन्नमवार पुलाखालील रस्त्याने तपोवनाकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरील तिघेजण नदीपात्रात कोसळले. यातील एकजण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डीगाव परिसरात राहणारे बुध्दराज शर्मा (३०), हिरा वीरेंद्र शर्मा आणि मनोज सुदर्शन शर्मा (३६) हे तिघे शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पंचवटी कॉलेजकडून कन्नमवार पुलाखालून तपोवनाकडे जात होते. सिर्व्हिसरोडकडून तपोवनाकडे जाण्याच्या ठिकाणी दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले. तसेच रस्त्यावरील उतारामुळे तिघांसह दुचाकी थेट नदीतील पाण्यात कोसळली. सुदैवाने आडगाव पोलिस या भागात गस्तीवर होते. त्यामुळे त्यांनी तातडीने मदत कार्याला सुरुवात केली. पोलिसांनी पाण्यात पडलेल्या बुध्दराज, हिरा आणि मनोज शर्मा यांना बाहेर काढले. मात्र, मनोज शर्मा पाण्यात पडून मृत्युमुखी पडला. जखमी झालेल्या इतर दोघांना सिव्ह‌िलमध्ये दाखल केले. फर्निचरचा व्यवसाय करणारे तिघे शर्मा एवढ्या रात्री कुठे चालले होते ? दुचाकी चालक कोण होता ? याचा शोध पोलिस घेत आहेत.


५२९ प्रकरणांमध्ये ३ कोटींची तडजोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी व राष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील खटले निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई)च्या आदेशान्वये जिल्हाभरात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी ५२९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून सुमारे तीन कोटी सहा लाख रुपयांची तडजोड करण्यात आली.

नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने शनिवारी जिल्हाभरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायाधीश, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पॅनलसमोर लोकअदालतीचे कामकाज चालले. या अदालतीमध्ये जिल्ह्यातील बँकिंग संलग्न दिवाणी स्वरूपातील ११६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ११ प्रकरणांचा निपटारा लावण्यात आला. एनआय अक्ट कलम १३८ ची फौजदारी अपिले स्वरूपातील एकूण ११ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील दोन प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तर एनआय अक्ट कलम १३८ अन्वये १ हजार २0 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

५ हजार ४३३ बँकांची दाखलपूर्व प्रकरणांपैकी २८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६ हजार ५८0 प्रकरणांपैकी ५२९ प्रकरणे निकाली निघाली. त्यापोटी ३ कोटी ६ लाख १६ हजार ६९१ रुपयांची तडजोड झाल्याचे सचिव राजेश पटारे यांनी कळविले.

अण्णांना मिळणार ‘शेकाप’चे बळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या भूसंपादन आणि पुनर्वसन कायद्याच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २४ मार्च रोजी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाला भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णांच्या आंदोलनाच्या दिवशी शेकापच्या वतीने राज्यातील सर्व तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन केली जाणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आणि आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रीय प्रकल्पाच्या नावाखाली महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नेणाऱ्या दमनगंगा-पिंजाळ प्रकल्पाला शेकापचा विरोध असून, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी पळविल्यास राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नवीन असून, त्यांनी या प्रकल्पाचा अभ्यास करून राज्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, असा सल्लाही दिला आहे. नाशिकमध्ये पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना पाटील यांनी केंद्र सरकारकडून भूसंपादन आणि पूनर्वसन कायद्यात करण्यात आलेल्या बदलावर टीका केली.

मोदींनी सत्तेत येताच शेतकरीविरोधी धोरण अवलंबविले आहे. शेतकऱ्यांचे अहित बघण्यातच ते व्यस्त असून मोठ्या उद्योगपतींचे हीत जपण्यात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात शेकापही मैदानात उतरणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जंतरमंतरवरील २४ मार्च रोजी होणाऱ्या उपोषणाला शेकापने पाठिंबा देण्याचा निर्णय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. शेकापच्या वतीने या दिवशी राज्यात सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करीत पाठिंबा दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेकापच्या मध्यवर्ती समितीची रविवारी नाशिकमध्ये बैठक झाली. या बैठकीत दमणगंगा-पिंजाळ आणि नारपार प्रकल्पातून गुजरातला पाणी देण्याच्या करारालाही विरोध करण्यात आला असून, या विरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दिल्यास या भागातील दुष्काळ नाहीसा होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या हक्काचे १८३ टीएमसी पाणी गुजरातला पळविण्याचा गुजरातचा डाव आहे. मात्र, शेकापचा याला विरोध आहे. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली राज्याचे नेते या प्रकल्पाविरोधात बोलायला तयार नाहीत. मोदी पंतप्रधान होण्याऐवजी गुजरातचे सीईओ असल्यासारखे वागत आहेत. सध्याच्या कराला विधीमंडळाची परवानगी नसल्याने तो अंतिम स्वरूपात नाही. तरीही गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर शेकाप रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करेला असा इशारा त्यांनी दिला आहे.

दमणगंगाची ब्ल्यू प्रिंट मुख्यमंत्र्यांना देणार

कोकणचे पाणी कृष्णा खोऱ्यात नेता येते, मग दमणगंगा पिंजाळ पाणी का नाही असा सवाल पाटील यांनी केला आहे. हक्काचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेण्यासाठी ७० ते ८० हजार कोटीचा खर्च येणार आहे. या सर्व प्रकल्पाची आणि खर्च कसा उपलब्ध होईल याची 'ब्ल्यू प्रिंट' शेकापकडे तयार आहे. ती मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांना दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नैसर्गिक परिस्थितीमुळे दमणगंगा-पिंजाळचे पाणी उचलणे शक्य नसल्याचा दावा करणाऱ्या जलसंपदा मंत्र्यांनी अभ्यास करून बोलावे असे सांगत, कोकणच्या प्रकल्पाचा अभ्यास असा सल्ला दिला. दरवर्षी दुष्काळावर सात ते आठ हजार कोटी खर्च करण्यापेक्षा या प्रकल्पाच्या उभारणीवर खर्च केला तरी राज्यातील दुष्काळ कमी होईल, असा दावा पाटील यांनी केला आहे.

यात्रेतून लाखभर मालाची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरात प्रसिध्द असलेल्या उपनगर येथील बाळ येशू यात्रे दरम्यान चोरट्यांनी तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात सहा मोबाइल तसेच एक तोळा वजनाच्या सोन्याच्या चेनचा समावेश आहे. दरम्यान एका संशयिताचा पाठलाग करताना वाहतूक विभागाचा कॉन्स्टेबल जखमी​ झाला. जखमी कर्मचाऱ्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बाळ येशू यात्रेसाठी देशभरातील भाविक उपनगर येथील चर्चमध्ये दाखल होतात. गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे सक्रीय होतात. मोबाइल, पाकिटे, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरी करतात. यंदाच्या यात्रेदरम्यान चोरट्यांनी सहा मोबाइल तसेच एक सोन्याची चेन चोरी केल्याची नोंद उपनगर पोलिसांकडे आहे. यात अॅपल कंपनीचे दोन, नोकिया, पॅनोसोनिक, सॅमसंग तसेच एचटीसी कंपनीच्या प्रत्येकी एका मोबाइलचा समावेश आहे. याबरोबर चोरट्यांनी एक तोळे वजनाची सोन्याची चेन देखील लंपास केली. या सर्व मुद्देमालाची किंमत एक लाख रुपयांच्या पुढे असून वैयक्तिक फिर्यादीनुसार पोलिसांनी एकत्रित गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे चेन स्नॅचिंगच्या घटनांना मात्र आळा बसला.

वाहतूक पोलिसच झाला जखमी

बाळ येशू यात्रेदरम्यान कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे चोरटा जेरबंद झाला. एस. आर. ठाकरे असे वाहतूक पोलिसाचे नाव असून शनिवारी ते बाळ येशू यात्रेदरम्यान कर्तव्यावर होते. यावेळी एक संशयित गर्दीतून जात असल्याचे ठाकरे यांनी पाहिले. त्यांनी हटकले असता चोरट्याने पळण्यास सुरुवात केली. ठाकरेंनी लगेचच पाठलाग सुरू केला. काही अंतरानंतर ठाकरे यांनी झेप घेऊन चोरट्याला जेरबंद केले. झटापटीत ठाकरे यांच्या डोक्याला मार लागला. उपस्थित नागरिक व इतर पोलिसांच्या मदतीने चोरट्याला पकडून ठेवण्यात आले. तर, ठाकरे यांना तातडीने सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे पोलिस चौकशी करीत आहे.

१५ ह‌जार वेतन द्या; अन्यथा आंदोलन करू

$
0
0

म. टा.वृत्तसेवा, लासलगाव

संगणक परिचालक कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत नियुक्त करून प्रती महा १५ हजार रुपयांचे वेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष विशाल चिखलीकर यांनी केली आहे.

निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे आयोजित राज्य संगणक संघटनेच्या पहिल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष सिद्धेश्वर मुंढे, सचिव मयूर कांबळे, जिल्हाध्यक्ष राकेश देशमुख, विकास गहिले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. संगणक परिचालाकांना चार हजार रुपये पगारमध्ये कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. त्यांना शासन सेवेत कायम करून सर्व शासकीय सेवांचा लाभ द्यावा, अशी प्रमुख मागणीही यावेळी त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास ३१ मार्चपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा चिखलीकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा नाशिक जिल्ह्यातील पहिला मेळावा निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळ्याव्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे १२०० संगणक परिचालक उपस्थिती होते. महाऑनलाइन करार रद्द करावा, तसेच हक्क मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करू, असे मत राज्य उपाध्यक्ष सिद्धेश्वर मुंढे यांनी व्यक्त केले. पालघरचे जिल्हाध्यक्ष हेमंत खरात, धनेश्वर भोये, सांगलीचे सतीश पाटील, एन्टीकरप्शन युनियन निफाड तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.

कांद्याची आवक टिकून; भावात सुधारणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर नवीन लाल कांद्याची आवक टिकून होती तर, बाजारभावात सुधारणा झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब आदी राज्यात तसेच परदेशात मागणी चांगली होती. सप्ताहात कांदा आवक ६७ हजार ४७४ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान ७००, कमाल १ हजार ६५१ तर सरासरी १ हजार ५०० रुपयांपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ४३ हजार १५१ क्विंटल झाली. कांद्याचे बाजारभाव किमान ७००, कमाल १ हजार ६५० तर सरासरी १ हजार ५०० रुपयांपर्यंत होते. सध्या लाल कांद्याची आवक वाढली आहे. मात्र, बाजारभावात वाढ होत असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीत कांदा आवकेत वाढ झाली आहे .

अवैध वाळू उपसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्याचे मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोसम खो-यातील मोसम नदीपात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आगामी काळात जलसाठा व भूजल पातळी घटून शेती सिंचनासह तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याचा प्रसंग मोसम खो-यातील शेतकरी व जनतेवर येण्याची भिती व्यक्त होत आहे.

मोसम नदी बागलाण तालुक्यातील मोसम खो-याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या स्त्रोतामुळे विहिरीला पाणी असते. परिणामी शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डाळिंब, ऊस, कांदा, लसूण, मका, द्राक्षे, आदी नगदी पिके घेतात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. त्यास शेतकरी व ग्रामस्थांनी वारंवार विरोध करूनही पुन्हा वाळूचा उपसा अवैधरित्या चढ्या दराने राजरोसपणे होत आहे. हा प्रकार प्रशासनापासून लपलेला नाही. हे सर्व माहित असताना प्रशासकीय कर्मचारी या उपशाविरुद्ध कडक कारवाई करीत नसल्याने त्यांची मुकसंमती असल्याचे म्हटले जात आहे.

शासकीय विकासकामे करण्याच्या नावाखाली वाळूचा प्रचंड उपसा होत आहे. वास्तविक ठेकेदार निविदा भरताना शासकीय दराने वाळूचे दर निविदेत सादर करतो. तरीही अनधिकृतपणे नदीपात्रातील वाळू शासकीय कामासाठी वापरून शासनाची फसवणूक केली जाते. वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल विभाग व पोलिस प्रशासन डोळेझाक करीत असल्याने अवैध वाळू उपसा करणा-यांची चांदी झाली आहे. यामुळे वैध वाहतूक करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

शिखरेवाडी मैदानाला झळाळी

$
0
0

बारीक मुरुम, रोलिंगमुळे

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शिक्रेवाडी येथील मैदानावर बारीक मुरुमाचा थर पसरविण्यात आला आहे. पाणी मारुन रोलिंग केल्याने मैदान खेळण्यायोग्य झाले आहे.

या मैदानावर जागिंग ट्रॅक, बॅडमिन्टन हाल, स्केटिंग ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे नुकतीच राज्यस्तरीय फुटबाल स्पर्धा झाली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये कार्यक्रम झाला. त्यासाठी मैदानावर जाड मुरुम पसरविण्यात आला होता. त्यामुळे खेळाडू जखमी होऊ लागल्याने खेळाडू व नागरिकांनी वर्गणी गोळा करुन मैदानाची दुरुस्ती केली होती. या काळात कौटुंबिक कारणामुळे मैदानाकडे लक्ष पुरवता आले नाही, मैदानाची योग्य निगा राखण्यात येत आहे, प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी सांगितले. मैदानावरील जाड मुरुम बाजूला गोळा करण्यात आला असून पावसाळ्यात तो पसरवून मैदानाचा दर्जा आणखी उंचावणार आहे. खेळाडूंना काही सूचना करायच्या असल्यास त्यांचे स्वागत आहे, असेही ते म्हणाले.


अनोळखी तरुणाचा अपघातात मृत्यू

$
0
0

दिंडोरी : नाशिक-आग्रा महामार्गावर दहावा मैल परिसरात एका अनोळखी पादचारी युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. शरीराने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा उभट, उंची १६५ सेमी, अंगात लाल रंगाचा काळसर रेषा असलेला शर्ट असे त्याचे वर्णन आहे. या बद्दल कुणाला काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन दिंडोरी पोलिस ठाण्याचे जमादार कृष्णा वाघेरे यांनी केले आहे.

पानसरेंवरील हल्ल्याचा संघाने नोंदवला निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ कामगार आणि कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, या हल्ल्याचा संघ तीव्र शब्दात निषेध करीत असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉ. अशोकराव कुकडे यांनी मांडली.

डॉ. कुकडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, की 'राज्यातील थोर विचारवंत, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि तळागाळातील सामान्य जनतेसाठी आयुष्यभर अॅड. पानसरे यांनी संघर्ष केला आहे. त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर झालेला हा हल्ला भ्याडपणाचे लक्षण आहे. या प्रकारच्या हल्ल्याचे समर्थन संघ कधीही करीत नाही.' वैचारिक मतभेदांबद्दल बोलताना कुकडे म्हणाले, की 'पानसरेंसोबत वैचारिक मतभेद असले तरीही विचारांचा प्रतिवाद केवळ विचारांनीच करावा, अशी संघाची पूर्वीपासून भूमिका आहे व पुढेही राहील. समाजातील सज्जन शक्तीवर झालेला हा आघात आहे. तपास यंत्रणा आणि शासनाने या हल्ल्याचा तातडीने छडा लावावा व हल्लेखोरांना कठोर शासन करावे, असेही डॉ. अशोक कुकडे यांनी म्हटले आहे.

‘शिक्षण हक्क’ प्रवेशाला ऑनलाईन सुरुवात

$
0
0

५२ जणांनी केले अर्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव असलेल्या जागांची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी ५२ पालकांनी अर्ज केले आहेत. तर, १५५ पालकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले.

शिक्षण हक्क कायद्यानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता उर्वरित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पाल्यांसाठी मोफत देण्यात येतात. यंदा ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाशिकसह राज्यातील ८ शहरांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/ या वेबसाईटवर पालकांना त्यांच्या पाल्याच्या केजी व पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करायचे आहेत. पहिल्याच दिवशी १५५ पालकांनी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले आहे. तर ५५ पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज जमा केले आहेत. अर्जासोबत जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

शहरात ११ हेल्प सेंटर

ऑनलाईन प्रवेशाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेने शहरात ११ ठिकाणी हेल्प सेंटर सुरु केले आहेत. त्यात हॉलिफ्लॉवर स्कूल जेलरोड, गुरुगोविंदसिंग विद्यालय इंदिरानगर, स्वामी नारायण इंग्लिश स्कूल आडगाव नाका, स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी, महापालिका शाळा क्रमांक ११० जेतवननगर, ए. पी. पटेल विद्यालय पंचवटी, डे केअर सेंटर इंदिरानगर, ग्लोबल व्हिजन अकॅडमी अंबड रोड, होरायझन अकॅडमी गंगापूर रोड, रंगुबाई जुन्नरे विद्यालय काठे गल्ली, महापालिका शाळा क्रमांक १६ गंगापूर रोड यांचा समावेश आहे.

सिडको, सातपूरला सेंटर नाही

शहरातील सिडको आणि सातपूर या दोन्ही भागाची लोकसंख्या मोठी आहे. त्यातच या दोन्ही भागात औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे महापालिकेने या दोन्ही भागांमध्ये एकही हेल्प सेंटर न सुरू करता गंगापूर रोडसारख्या भागात अनेक सेंटर का सुरू केले, असा प्रश्न पालकांनी विचारला आहे.


जनजागृती करणार

ऑनलाईन प्रवेशाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी महापालिकातर्फे हँडबिल्सचे वाटप आणि शहराच्या दोन भागात होर्डिंग्ज लावण्यात येणार असल्याचे प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले आहे.

शिवजयंतीनिमित्त आज जेलरोडला प्रदर्शन, पोवाडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

दसक-पंचक परिसर सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने गुरुवारी (दि. १९) जेलरोड येथील शिवाजीनगर समाज मंदिराच्या आवारात गड किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत २१ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

दुर्गमित्र शाम विसपुते यांनी ही छायाचित्रे काढली आहेत. मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुनील बोराडे, उपाध्यक्ष प्रभावती महानुभाव यांनी ही माहिती दिली. चंद्रकांत चव्हाणके, वसंतराव रकिबे, सोन्याबापू हांडोरे, वसंतराव बोराडे आदी संयोजन करत आहेत.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महारांजाच्या जीवनावर पोवाडा कार्यक्रम होणार आहे. शिवशाहीर राजेंद्र कांबळे सायंकाळी सहाला भीमनगर येथे पोवाडा सादर करणार असल्याची माहिती शशी उन्हवणे यांनी दिली.

प्रेस कामगारांतर्फे अभिवादन

डॉ. बी. आर. आंबेडकर फाऊंडेशनतर्फे भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारासमोर शिवप्रतिमेचे पूजन प्रेस कामगारांनी केले. मुद्रणालयाचे उपहाप्रबंधक के. के. मुजुमदार, एम्पलाईज सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष माधवराव लहाणगे, मजदूर संघाचे सरचिटणीस रामभाऊ जगताप, वर्क्स कमिटीचे उपाध्यक्ष उल्हास भालेराव, मागासवर्गीय असोसिएशनचे सचिव प्रकाश पगारे, अनिल थोरात, विजय जाधव, फाऊंडेशनेचे सुधीर गायकवाड, कार्याध्यक्ष विजय चंद्रमोरे, मुकुंद पवार, रवी लोहारकर, प्रवीण निर्मल, असिफ पठाण, जयेंद्र खराटे, विकास बर्वे, सुरेश निकम, राजू जगताप आदी उपस्थित होते.

वेतन अनुदाना अभावी रखडले पगार

$
0
0

ना‌शिक : महापालिका शिक्षण मंडळाच्या 985 शिक्षकांचे वेतन हे शिक्षण उपसंचालका कडून अनुदान वेतन न मिळाल्याने रखडल्याचा दावा महापालिकेन केला आहे.फेब्रुवारी महीना अर्धा लोटला तरी,शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील शिक्षकांचे वेतन झालेले नाही.त्यांसदर्भात आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी लक्ष घालत,वेतनासंदर्भातील प्रक्रिया तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश दिलेत.त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांच्याकडून या शिक्षकांचे वेतन अनुदान प्राप्त झाले नसल्याने वेतन रखडल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.या शिक्षकांचे वेतन अनुदान हे पन्नास टक्के शासन तर पन्नास टक्के शिक्षण मंडळाकडून दिले जाते.

सॉक्स खरेदीही वादात

$
0
0

प्रशासकीय मान्यता न घेता २६ लाखाची खरेदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण मंडळामार्फत करण्यात आलेली गणवेश खरेदी वादात सापडली असतांनाच आता २६ लाख रुपयांची सॉक्स खरेदीही प्रशासकीय मान्यता न घेता करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. आयुक्तांनी अपक्ष गटनेता संजय चव्हाण यांना दिलेल्या उत्तरात महासभेची मान्यता न घेताच ही खरेदी करण्यात आल्याचे मान्य केले असून या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती दिली आहे.

गणवेश खरेदी, शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या, बेकायदेशीर निलबंन यासह अनेक मुद्यांमुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ वादग्रस्त बनले आहे. प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांच्यावर नगरेसवकांसह अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यासह अपक्ष गटनेता संजय चव्हाण यांनी आयुक्तांकडे शिक्षण मंडळासदर्भात काही प्रश्न विचारले होते. त्याला आता आयुक्तांनी उत्तर दिले असून शिक्षण मंडळाकडून झालेल्या बेकायदेशीर कामांची कबुलीच दिली आहे. महासभेन शिक्षण मंडळाला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शुज खरेदीसाठी ८५ लाख पाच हजारांच्या रकमेला मान्यता दिली होती. मात्र, शिक्षण मंडळाकडून सॉक्स खरेदीचा परस्पर प्रस्ताव तयार करून एक कोटी ११ लाखाची निविदा स्थायीची मान्यता घेवून काढण्यात आली. प्रत्यक्षात सॉक्स खरेदीला महासभेची मान्यता नसतांनाही २६ लाखाची अतिरिक्त खरेदी करण्यात आल्याचे आयुक्तांनी कबूल केले आहे. वाढीव रकमेला मान्यता न घेतल्याबद्दल संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. संबंधिताकडून खुलासा आल्यानंतर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता गणवेशापाठोपाठ सॉक्स खरेदीही वादात सापडली असून शिक्षण मडंळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

प्रशासन अधिकाऱ्यांकडून सभागृहाची दिशाभूल

गेल्या महासभेत प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांनी ९१२० विद्यार्थ्यांना गणवेश दिल्याची माहीती सभागृहात दिली होती. मात्र, या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश दिला नसल्याचा खुलासा आयुक्तांनी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना दिलेल्या उत्तरात केला आहे. गोंधळात त्याना स्पष्टीकरण देता आले नसल्याचे सांगून दुसरीकडे त्यांचा बचावही करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. यामुळे कुंवर यांनी सभागृहाला दिशाभूल करणारी माहिती दिली असून आयुक्तांची माहिती खरी की कुंवर यांची याचा सोक्षमोक्ष आता सभागृहातच करण्यात येईल. अशी माहिती बडगुजर यांनी दिली आहे.

जागतिकीकरणामुळे समाजाला मिळाली दिशा

$
0
0

केव्हीएन नाईक कॉलेज - जागतिकीकरणाने अनेक समस्यांबरोबर अनेक संधी इंग्रजी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. भाषा, संस्कृती, साहित्य, शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये संशोधनास यानिमित्ताने भरपूर वाव निर्माण झाला आहे. जागतिकीकरणाने जगण्याचे पैलू बदलून समाजाला एक नवी दिशा दिली आहे, असे मनोगत गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. के. एस. भट यांनी व्यक्त केले.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजच्या इंग्रजी विभागांतर्गत 'इंग्लिश लँग्वेज अँण्ड ग्लोबलायझेशन' विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन व शोधनिबंधाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी प्रा. भट बोलत होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. बजरंग कोरडे व संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड उपस्थित होते. या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये देशभरातून एकूण ४५ प्राध्यापकांनी पाठवलेल्या शोध निबंधांपैकी २८ चे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील व बाहेरील विद्यापीठाचे एकूण ७० प्राध्यापक, ४० संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रा. भट व डॉ. कोरडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, विश्‍वस्त धर्माजी बोडके, बाळासाहेब गामणे, दामोदर मानकर, संचालक माणिकराव सोनवणे, महेश आव्हाड, महेंद्र आव्हाड, कचरू पाटील आव्हाड, शरदराव बोडके आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर यांनी स्वागत केले. डॉ. संजय सानप यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय, प्रा. आनंद सानप यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. दिलीप कुटे यांनी आभार मानले.


१८१ जणांचे रक्तदान

$
0
0

निर्मिती ग्रुपच्या शिबिरात रक्तदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनकल्याण रक्तपेढी आणि निर्मिती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबिरात १८१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते शिबिरात उद‌्घाटन झाले. कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सातपूर येथील निर्मीती ग्रुपच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाही शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह हितचिंतकांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली उदघाटन प्रसंगी महापौर मुर्तडक म्हणाले, की औद्योगिक अस्थापनांनी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब आहे. शहरातील औद्योगिक वसाहतीतीतल सर्वच कंपन्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास रक्तांचे संकलन करण्यात रक्तपेढ्यांची ओढाताण होणार नाही. कंपनीचे संचालक विवेक कुलकर्णी व स्वाती कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रितीश गोडांबे, अविनाश मराठे, राजीव मालपाठक, राजेंद्र काळे, विलास करंडे, बाळ पाटील, विजय अॅनिकिव्ही, प्रभाकर बोडके आदी उपस्थित होते.

‘एकत्र कुटुंब पद्धतीचे श्रेय महिलांना’

$
0
0

कळवण कॉलेज - हजारो वर्षापासून सुरू असलेली विवाहसंस्था, कुटुंबसंस्था धोक्यात आली आहे. कुठलाही राजकीय पक्ष नव्हे तर एकत्र कुटुंबपद्धती ही भारताची खरी ताकद आहे. ही पद्धत टिकविण्याचे ९९ टक्के श्रेय महिलांना जाते, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. कळवण कॉलेजमध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

नायगावकर म्हणाले, की सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील ग्लोबल होण्याची गरज असून तरुणांनी विध्वंसतेमागे न धावता रचनात्मक कार्य करून स्वतःची प्रतिमा समाजात निष्कलंक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काँक्रीटच्या जंगलात गुदमरल्यासारखे होत असल्याने निसर्गाच्या जास्तीत जास्त सानिध्यात जाण्याची गरज आहे. माणसाच्या मनावर स्वच्छतेचे संस्कार व्हायला हवेत, असा सल्लाही नायगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. कवी नायगावकर यांनी यावेळी वृद्धाश्रम, टीव्हीवरील जाहिराती अशा विविध विषयांवर आपल्या खास शैलीत मिश्किली सादर केली. स्वेच्छानिवृत्तीवर भाष्य करणाऱ्या 'निवृत्त नोकरांचे बघा काय हाल झाले, काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले' या नायगावकरांच्या मिश्कीलीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

कला, क्रीडा क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आला. उत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्कार अनिता देवरे, आदर्श विद्यार्थी पुरस्कार कुणाल रौंदळ, उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धेक पुरस्कार गायत्री सोनवणे, रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार पूनम बच्छाव यांना देण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, सरचिटणीस बेबिलाल संचेती, पुणे विद्यापीठाचे नाशिक विभाग समन्वयक डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्या डॉ. उषा शिंदे, विश्वस्त सुमन देवरे, राफियोद्दिन शेख, व्ही. के. व्यवहारे उपस्थित होते. अनिता देवरे हिने सूत्रसंचालन केले. प्रा.कच्छवा यांनी वार्षिक अहवाल वाचन तर कुणाल रौंदळ याने जिमखाना अहवाल वाचन केले.

स्वाइन फ्ल्यूने दोघांचा मृत्यू

$
0
0

नाशिक : शहरात स्वाइन फ्ल्यूचा प्रभाव वाढतच आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मालेगाव येथील एक पुरुष, तर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामटवाडे येथील एका महिलेचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची माहिती सिव्हिल हॉस्प‌िटलतर्फे देण्यात आली.

शहरातील एका खासगी हॉस्प‌िटलमध्ये मालेगाव तालुक्यातील शाम म‌च्छिंद्र शेलार (वय ३५, येसगाव) दाखल होते. त्यांचा शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. तर सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमध्ये शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास दाखल झालेल्या दीपिका अजय मल्लीक (वय ३५, डीजीपीनगर कामटवाडे) यांचा सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला. दिपीका मल्लीक यांना दुपारी सिव्ह‌िलमध्ये आणण्यात आले होते. सिव्ह‌िलमध्ये स्वाइन फ्ल्यू विभागात १३ रुग्ण असून, त्यातील ४ रूग्ण पॉझिटिव्ह आहेत तर इतर रुग्णांचे ‌तपासणी अहवाल येणे बाकी आहे. यातील पाच रुग्ण शनिवारी दाखल झाले आहेत.

दिवेश आवारेला आजपर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रवींद्र बोरसे हत्याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी अटक केलेल्या दिवेश आवारेला कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी संशयित आवारेला शहर परिसरातूनच अटक केली होती. बोरसे हत्याप्रकरणात यापूर्वी दोघा संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांनाही २२ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

हत्येच्या घटनेनंतर पसार झालेला दिवेश शिर्डी येथे लपला होता. पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यास गेले असता तेथून गुंगारा देऊन आवारे पुन्हा शहरात दाखल झाला. मात्र, पोलिसांनी तपास सुरूच ठेऊन त्याला अटक केली. कोर्टासमोर हजर केल्यानंतर आवारेला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी भुषण थोरात आणि आकाश निगळ या दोघांना अटक केली होती. त्यांनाही कोर्टाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आयुक्तालयाचे ‘मौनातच’ उद्‌घाटन

$
0
0

कायदा सुव्यवस्था, सीसीटीव्ही, इमारतीच्या बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांची चुप्पी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अखेर श‌निवारी नुतन पोलिस आयुक्तालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. कायदा सुव्यवस्था, सीसीटीव्ही, इमारतीचे बांधकाम अशा अनेक प्रश्नांना बगल देत मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.

नवीन पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाल्यापासून उद्‌घाटनच्या प्रतीक्षा श‌निवारी संपली. याच महिन्याच्या सुरूवातीला उद्‌घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे रद्द करण्यात आला होता. रद्द झालेला हा कार्यक्रम आज पार पडला. मात्र, उद्‌घाटन कार्यक्रमावर क्रॉमेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री फडणवीस नेहमीपेक्षा वेगळ्याच 'टेन्शन'मध्ये आयुक्तालयात दाखल झाले. काही बोलण्यापूर्वीच त्यांनी उद्‌घाटनाचा कार्यक्रम आटोपला. यानंतर त्यांनी सर्व इमारतीची पाहणी केली. तसेच काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कार्यक्रमासाठी काढता पाय घेतला. शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवणे, कायदा व सुव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण प्रश्नावर चर्चा करण्याचे त्यांनी टाळले. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरूप पटनायक, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक नवल बजाज, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, ना​शिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण सांळुके यांच्यासह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हजर होते. गंगापूररोडवरील नुतन इमारतीमध्ये ऑक्टोबर २०१४ पासून कामकाज सुरू झाले आहे. तेव्हांपासून ही उद्‌घाटनच्या प्रतीक्षेत होती. पोलिस आयुक्तालयाच्या नुतन वास्तुसाठी २० नोव्हेंबर २०१२ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते.

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images