Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

साईबाबांची आरती पैठणीवर

0
0

येवल्यातील साईनाथ मंदिरात केली प्रदान

म. टा. वृत्तसेवा, येवला

काठाकाठात अन् प्रत्येक इंच इंचात विविधतेने नटलेल्या येवल्यातील भरजरी जरतारी पैठणीची कलाच न्यारी. देशासह अगदी सातासमुद्रापार स्त्रीमनाला मोठी भुरळ घालत जगविख्यात ठरलेल्या या येवल्यातील नक्षीदार पैठणीचं अन् अनेक दिवस डोळयात तेल घालून ती हातमागावर खुलविणाऱ्या येथील हातमाग विणकर व कारागिरांच कौतुक करावे तितके थोडेच. अशाच या येवल्यातील किरण देहाडे या पैठणी उत्पादक कारागिराने साईबाबांच्या अपार श्रद्धेपोटी चक्क साईची आरती असलेली पैठणी विणली आहे.

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।

चरणरजातली । द्यावा दाता विसांवा ।

अशी संपूर्णच साईंची आरती असलेली ही पैठणी किरण देहाडे यांनी नुकतीच येवला शहरातील साईनाथ मंदिरात साईला प्रदान केली. यावेळी किरण देहाडे यांचा साईनाथ मंदिराचे अध्यक्ष महेश काबरा, श्रीनिवास सोनी, सुनील लक्कडकोट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


शिखरेवाडीसाठी खास तरतूद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड येथील शिखरेवाडी क्रीडांगणाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. महापालिका प्रशासनही येत्या दोन आठवड्यात विविध सुविधा विकसित करणार आहेत.

जॉ‌गिंग ट्रॅक, स्केटिंग आदी सुविधा असलेल्या शिखरेवाडी मैदानाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र टाइम्समध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. समस्या सुटणार असल्याने खेळाडू व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासमवेत शिक्षणमंत्री तावडे यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली. मंत्री तावडे यांनी विशेष बाब म्हणून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे मान्य केले आहे.

या मैदानावरील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शहर अभियंता सुनील खुने, कार्यकारी अभियंता सतीश हिरे, उपअभियंता निलेश साळी यांनी क्रीडांगणाला भेट देऊन पाहणी केली. सर्व समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली. बॅडमिंटन हॉलमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वाशरुम, क्रीडांगणावरील महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, व्हॉलीबालचे मैदान नव्याने करणे, ग्रीन जीमची दुरुस्ती, सिंगल बार लावणे आदी कामे दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आश्वासन खुने यांनी दिले. यावेळी विजया कंकरेज, प्रभा पारगावकर, कांता वराडे, सुहास अडसूळ, नाना पाटील आदी नागरिक उपस्थित होते.

मवीकासेचे रविवारी अधिवेशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मनसे वीज कामगार सेनेचे पहिले राज्यस्तरीय द्विवार्षिक अधिवेशन रविवारी (ता.१) सकाळी दहाला जेलरोड येथील शिवाजीनगरच्या समाजमंदिरात सकाळी दहाला होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होईल. मनसे वीज सेनेचे अध्यक्ष शिरीष सावंत अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती उपाध्यक्ष प्रशांत शेंडे यांनी दिली.

महापौर अशोक मुतर्डक, स्थायीचे सभापती राहुल ढिकले, मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे, जिल्हा संघटक डॉ. प्रदीप पवार, सभागृह नेते शशिकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती असेल. वीज कर्मचारी अधिकारी यांच्या पाल्यांना भरतीत आरक्षण ठेवावे, रिक्त पदे त्वरित भरावीत, भरतीत मराठी भूपुत्रांना ८० टक्के राखीव जागा ठेवाव्यात, वीज कंपन्यांचे खासगीकरण थांबवावे, कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे, पात्र यंत्रचालक व तंत्रज्ज्ञांना अभियंता पदावर बढती द्यावी आदी मागण्यांसाठी अधिवेशन आहे.

उर्जेच्या तुटवड्यावर उतारा

0
0

नाश‌िकमधील उद्योजक अभ‌ियंत्याचा यशस्वी प्रयोग

जितेंद्र तरटे, नाशिक

शेतमालाच्या उपयोगापासून गॅसीफायर चालविण्याची अन् उर्जेची निकड भागविण्याची संकल्पना नवी नसली तरीही या प्रक्रीयेत येणाऱ्या असंख्य अडचणींवर शहरातील एका तरुण उद्योजक अभियंत्याने मात केली आहे. आयआयटी पवईमधून इंजिनीअर झालेल्या अश्विनकुमार शेजवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी संशोधनातून तयार केलेला युनिक गॅसीफायरने कमी दरात अन् इकोफ्रेण्डली उर्जेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

शेतीमध्ये कचऱ्याच्या स्वरूपात वाया जाणारे घटकच या गॅसीफायरचे इंधन बनले आहेत. आजवर बाजारात उपलब्ध असणाऱ्या गॅसीफायरमध्ये उर्जानिर्मितीसाठी शेतीतून ‌निघणाऱ्या कचऱ्यातील केवळ एकच घटक उपयोगात आणला जात होता. मात्र, शेजवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्मिलेल्या एकाच गॅसीफायरमध्ये तब्बल १६ प्रकारचे कृषी प्रक्रियेत वाया जाणाऱ्या घटकांचा उपयोग केला जाणार आहे. हेच या गॅसीफायरचे प्रमुख वैशिष्ट्य ठरल्याची माहिती अश्विनकुमार शेजवलकर यांनी दिली. या गॅसीफायरचा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट नुकताच नाशिकमध्ये सुरू झाला आहे.

अश्विनकुमार यांसह प्रदीपकुमार पोदाल आणि देवेंद्र पारीख यांनी २०१० मध्ये नाशिकचे सुमारे १० लाख रुपये खर्च करून या प्रकल्पाची पायाभरणी केली. अगोदर उपलब्ध असणाऱ्या गॅसीफायर्समध्ये सुरक्षा, इंधनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या मालाच्या वापरावर येणाऱ्या मर्यादा आणि मनुष्यबळाची कमतरता अशी आव्हाने होती. या सर्व आव्हानांवर मात करीत त्यांनी बनविलेला गॅसीफायर कमी दरात इंधन पुरवठा उपलब्ध करून देऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होणारा एलपीजी गॅस या गॅसीफायरच्या माध्यमातून अवघ्या दोनशे रुपयातच उपलब्ध होत असल्याचा अश्विनकुमार यांचा दावा आहे. सामान्यत: मोठ्या प्रमाणावरील स्वयंपाक, औद्योगिक हेतू, पेंट दुकाने आणि बॉयलर आदी ठिकाणी हे गॅसीफायर उपयुक्त ठरू शकणार आहे.

कचऱ्यातून गॅसीपायरचा पुनर्वापर

राज्याच्या काही ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर होणारा विजेचा तुडवडा अन् त्यामुळे उद्भविणाऱ्या समस्यांवर या संकल्पनेच्या आधारे पॉवर जनरेशन युनिट उभारणेही शक्य आहे. शेतीतून वाया जाणाऱ्या १६ प्रकारच्या कचऱ्याचा या गॅसीफायरमध्ये पुनर्वापर होणार असून अत्यल्प दरात सुरक्षित इंधनाचा पर्याय होणार आहे. या धर्तीवर तामिळनाडूमध्ये काही प्रयोग सुरू आहेत. उर्जेच्या पुर्नवापरासंदर्भातील जर्मनीतील अभ्यास दौऱ्यात भारतातून सहा सदस्यीय समिती सरकारच्या माध्यमातून पाठविण्यात आली होती. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) माध्यमातून आयोजित हा समितीत नाशिकचे उद्योजक व युनिक गॅसीफायरचे फाऊंडर अश्विनकुमार यांचाही समावेश होता.

'भूसंपादन'विरोधात रस्त्यावर उतरा

0
0

उद्योगमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राचा प्रस्तावित भूसंपादन कायदा हा शेतकरी विरोधी असून, शिवसेनेचा या कायद्याला तीव्र विरोध आहे. हा कायदा शेतकऱ्यांवर दडपशाही करणारा आहे. शिवसैनिकांनी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. शिवसेना सत्तेत असली या कायद्याविरोधात भांडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. शुक्रवारी देसाई यांच्या उपस्थितीत दिंडोरी, निफाड, सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी २०१४ विधासभा निवडणुकीच्या जय पराजयाची कारणे जाणून घेतली. त्याचप्रमाणे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा तसेच, शिवसेना संघटनेच्या संघटनात्मक रचनेसंदर्भात आढावा घेतला. आगामी काळातील शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी विविध सामाजिक व विधायक कामे करण्यासाठी मार्गदर्शन केले. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या वेळी शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, शामला दीक्षित, नगरसेवक सूर्यकांत लवटे, विनायक पांडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिरांना मिळेना निधी

0
0

पुरातत्व विभागाच्या प्रस्तावाला केराची टोपली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना सिहस्‍थांतर्गत अनेक प्रस्तावित कामे रखडलेली आहेत. सिंहस्थासाठी जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांच्या डागडूजी संबंधी पुरातत्त्व विभागाने सुचविलेली कामेही निधीअभावी रखडली असल्याने यातून राज्य तथा केंद्र शासनाची उदासीनता प्रकर्षाने दिसून येत आहे.

पुरातत्व विभागाकडून या कामांकरिता राज्य सरकारकडे दोन कोटींची मागणी केली होती. मात्र, हा निधी विभागाला अद्यापही न मिळाल्याने जिल्ह्यातील मंदिरांच्या जिर्णोद्धाराशी संबंधित कामे रखडून पडली आहेत. पुरातत्व विभागाला सिंहस्थाच्या अंतिम टप्प्यात निधी मिळाल्यास हे काम पूर्ण होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे. देशातील विविध आखाडे, साधू-संत, पर्यटक, जगभरातील नागरिक यांची सिंहस्थ पर्वणीनिमित्त गोदावरीच्या काठावरील विविध प्राचीन मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होणार आहे. त्यामुळे याअनुषंगाने पुरातत्त्व विभागाने गोदाकाठ तसेच शहरातील विविध प्राचीन मंदिरांची डागडूजी करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये या विविध मंदिरांचे रासायनिक पद्धतीने जतन प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेचा यामध्ये समावेश आहे. पालकमंत्री तसेच सिंहस्थासाठीच्या विविध समित्यांनीही त्यास मान्यता दिली आहे. तरीही या निधी उपलब्धतेसाठी राज्य शासनाने पुरातत्व विभागाला ठेंगा दाखवल्यामुळे ही कामे रखडली आहे. या कामांसाठी लागणाऱ्या निविदा केंद्र सरकारकडून तयार करण्यात आल्या. त्यामध्ये दोन कोटींवरून या निधीची रक्कम एक कोटी ३२ लाखांवर आली आहे. सिंहस्थापूर्वीच जिल्ह्यातील पडझड झालेल्या विविध मंदिरांचा जिर्णोद्धाराचा विषय राज्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनासाठी प्राथमिक पातळीवर मार्गी लागणे अपेक्षित होते.

मंदिरांची प्रत्यक्षातील दुरवस्था पाहणे, त्‍याबाबत निट सर्वेक्षण करणे, तेथील आसपासच्या लोकांशी चर्चा करणे आदी प्राथमिक स्वरुपाची कामे या अधिकाऱ्यांकडून होत नाही. शासनाकडे केवळ निधीचा तगादा लावायचा. पण तो निधी आपण का आणि कशासाठी मागत आहे याचं ठोस उत्तर या अधिका-यांना केंद्र तथा राज्य प्रशासनाकडे मांडता येत नाही. त्यामुळे हा निधी मिळवण्यात या मंडळीना नेहमी अडचणी येतात.

- सतीश शुक्ल,

अध्यक्ष, ना‌शिक पुरोहित संघ

८,८११ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

0
0

कडवा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ५३.३६ कोटी निधी मंजूूर

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत कडवा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ५३.३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुहे ८८११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ही माहिती सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिन्‍नर तालुक्याच्या दृष्टीने वरदान असलेले कडवा धरण १९७८ साली पूर्ण झाले. त्यावर ८८ कि. मी. चा कालवा काढण्यात आला. त्यात इगतपुरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर तालुक्यासह ११ हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची व्यवस्‍था करण्यात आली. मात्र, प्रकल्पाच्या कॅनॉल व चाऱ्यांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी गळती, पाणी चोरी यामुळे जवळजवळ ८० टक्के पाण्याचा अपव्यय होत होता. ११ हजार हेक्टरपैकी फक्त दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आले होते. त्यामुळे पाण्याची गळती थांबवावी व पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे यासाठी संपूर्ण कॅनॉल व चाऱ्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी सदर प्रकल्पास तत्काळ निधी उपलब्ध करून दिला असल्याची आमदार वाजे यांनी सांगितले. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत निधी - २० अंतर्गत कडवा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ५३.३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीचे पत्र यावेळी त्यांनी सादर केले. सदरचा पायलट प्रकल्प म्हणून पुढील दोन वर्षाच्या काळात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कामाची वैशिष्टे

पाण्याची गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती करणे, भरावा टाकणे, नवीन बांधकाम करणे, तसेच सिमेंटची रिपेरिंगचे काम अगोदर करून नंतर मातीकाम केले जाईल. सर्व मुख्य वितरिका दुरुस्त करण्यात येतील. वितरिकांच्या तोंडाजवळ पाणी मापन यंत्रणा बसवून घनमीटर पद्धतीने पाणी वापर संस्थांना पाणी वितरीत केले जाईल. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वितरिकेच्या शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळाल्याची खात्री झाल्यावरच पाणी वापर संस्थेकडे पाण्याचे नियोजन हस्तांतरित केले जाईल. पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल.

कडवा कॅनॉलच्या गळतीमुळे हजारो हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान होत होते. त्याचबरोबर ८० टक्के पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे सदरच्या कामाचा निधी उपलब्ध झाला असल्याने हे काम रखडणार नाही. तीस वर्षानंतर प्रथमच येवढा निधी या प्रकल्पासाठी मिळाला असल्याने व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे काम मंजूर झाल्याचा आनंद वाटतो.

- राजाभाऊ वाजे, आमदार

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय कामकाजात आमूलाग्र बदल

0
0

नीलिमा पवार यांचे सूतोवाच; विद्यार्थी आत्महत्येचे पडसाद

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील मराठा इंग्लिश स्कूल व जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची कोंडी दूर करण्यासाठी शालेय कामकाजात आमुलाग्र बदल करण्याचे स्पष्ट करीत मराठा इंग्लिश स्कूलसाठी नव्याने मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक देण्याची घोषणा मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केली.

लोकनेते पं. धं. पाटील हायस्कूलमधील सातवीतील विद्यार्थी प्रसाद लोखंडे याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. यामुळे पालक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, उपसभापती नानाजी दळवी, संचालक भरत कापडणीस, तुषार शेवाळे, डॉ. विश्राम निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक, पालक व शालेय समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या प्रसंगी नीलिमा पवार म्हणाल्या की, विद्यालयातील प्रकार अत्यंत गंभीर असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.या प्रसंगी पालकांच्या वतीने ज्ञानदेव धोंडगे, आर. के. खैरनार, शरद सोनवणे, मनोहर देवरे, ज. ल. पाटील, प्रवीण पवार, किशोर कदम, बाळासाहेब सूर्यवंशी यांनी विविध सूचना व विषयांची मांडणी केली.

या बैठकीस माजी नगराध्यक्षा उत्तरा सोनवणे, यशवंत अहिरे, मनोहर देवरे, शैलेश सूर्यवंशी, मुन्ना सोनवणे, जनार्दन सोनवणे, भिका सोनवणे, राजेंद्र सोनवणे, किरण सोनवणे, यशवंत येवला आदींसह शिक्षक, पालक उपस्थित होते.

नीलिमा पवार यांच्या सूचना

पालक, विद्यार्थी व शिक्षकांच्या समुपदेशनासाठी प्रयत्न करण्यात येतील. शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल. वर्ग निहाय पालक मेळाव्याचे घेऊन विद्यार्थी गटनिहाय पालकत्व देण्याची संकल्पना राबविण्यात येईल. शालेय दप्तर तपासणी करणे, शाळेत मोबाइल बंदी करणे, मुलींसाठी स्वतंत्र शालेय बस सुरू करणे, विद्यार्थी पालकांकडे निकाल पत्र देणे, या सारख्या योजनांना तत्काळ मंजुरी देण्यात आली. तसेच, शाळेतील स्कूल कमेटी बदलण्याची पालकांची मागणी मान्य करून सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना त्यात सामावून घेण्याची तयारी दर्शविण्यात आली. विद्यालयाबाहेरील परिसरात गुटखा विक्री बंद करण्यासोबतच मुलांची गर्दी कमी करण्यासाठी वेळप्रसंगी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाईल.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२ कोटी २८ लाख मदतनिधी पडून

0
0

बँक खात्यांअभावी येवला तालुक्यातील स्थिती

म. टा. वृत्तसेवा, येवला

बँक खाते, नावे, स्थलांतर यासह इतर करणांमुळे येवला तालुक्यातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांचे १२ कोटी २८ लाख रुपये वाटप होण्याचे रखडले आहे. आता यासाठी पुन्हा तलाठी पातळीवर असलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे.

येवला तालुक्यात खरीप हंगामाची अपुऱ्या पावसाने वाट लावली. पाऊसच न पडल्याने या १२४ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याने शेतकऱ्यांना ३८ कोटी ७८ लाखांची मदत शासनाकडून मिळाली आहे. परंतु, अनेक लाभार्थींनी चुकीचे खाते नंबर व बँक खात्याची माहिती न दिल्यामुळे १४ कोटी ३९ लाख रुपये अद्याप पडून आहेत. तालुक्यातील १२४ गावांत खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या शेतकऱ्यांच्या महसूल नोंदीप्रमाणे सुमारे ५० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. यापैकी ३८ कोटी ७८ लाख रुपये येवला तहसील कार्यालयाला मिळाले आहेत. इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे प्राधान्यक्रम लावून गावांना मदतीची रक्कम शेतकऱ्यांची खाती असलेल्या बँकेत वर्ग केली. तालुक्यात ४३ हजार १८८ अल्पभूधारक शेतकरी व १० हजार ८१८ बहुभूधारक असे एकूण ५४ हजार ६ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. जिरायत पिकासाठी चार हजार ५०० रुपये, बागायती पिकासाठी नऊ हजार व फळ पिकासाठी १२ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. यापैकी सुमारे ४४ हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात अली आहे. तर, मदत मिळण्यासाठी उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते नंबर आपल्या तलाठी कार्यालयात बिनचूक द्यावा. त्यामुळे संबधित मदतीचा धनादेश त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे सोयीचे होणार आहे.

तलाठ्यांमार्फत गावागावातील शेतकऱ्यांचा बँक खाते क्रमांक मिळविण्यात आले आहेत. आतापर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. एकापेक्षा जास्त सदस्यांच्या नावे शेती असणे, कुटुंबातील एकाच सदस्याचे बँक खाते असणे, कागदपत्रे नसल्याने बँक खाते उघडण्यास येणाऱ्या अडचणी, खाते उघडण्यासाठी बँकेत किमान रक्कम ठेवण्याची सक्‍ती आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे बँकेत खाते नाही.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीची साडेसाती संपता संपेना..!

0
0

टीम मटा

गत वर्षाप्रमाणेच अवकाळी पावसाने थैैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे मुश्किल झाले आहे. अवकाळीची ही साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार दिसत नाही. यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.

सटाणा शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांसह द्राक्ष, आंबा, डाळिंब, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. सलग चार वेळा अवकाळी पाऊस झाल्याने आधीच कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी एक संकट उभे ठाकले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मागील अवकाळी पावसाच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना हातात रक्कम मिळण्याआधीच पुन्हा या पावसामुळे हातातोंडाशी आलेली रब्बी पिके वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गहू, हरभरा, कांदा ही

पिके शेतात आडवी झाली आहेत. यामुळे रब्बी हंगामातही अवकाळी पडल्याने शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळणे अशक्य झालेले आहे.

गेल्या दोन दिवसात रात्रभर पावसाने संततधार सुरूच ठेवली होती. परिमाणी सर्वत्र पाण्याचे डबके, व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने साथींच्या आजारांनी डोकेवर काढले आहेत. द दरम्यान, अद्यापपर्यंत पंचनामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्वरित पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होऊ लागली आहे.

सरसकट कर्जमाफी द्या

बागलाण तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांसह द्राक्ष, कांदा, डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व वीजबिलासह कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना देण्यात आले.

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोडांशी आलेल्या रब्बी पिके गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, तसेच द्राक्ष, डाळिंब, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात असलेली पिके वाचविणे अशक्य झाले आहे. तरी शासनाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसह संपूर्णपणे कर्जमाफी व वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवदेनावर राष्ट्रवादीचे शहरप्रमुख राजेंद्र सोनवणे, किसान सेलचे खेमराज कोर, केदा परशराम जाधव, रवींद्र पवार, वामनराव धिवरे, प्रल्हाद अहिरे, शेतकरी उपस्थित होते.

पावसामुळे ठिकठिकाणच्या फिडरचे इन्सुलेटर खराब झाले होते. तसेच, जवळपास सर्वच ठिकाणी पतंगाचे धागे व कामट्या अडकून असल्याने वीजप्रवाह सुरू केला की लगेच उपकेंदातून तो खंडित होत होता. यामुळे आम्ही सर्वांनी रात्री एक वाजेपर्यंत शक्य तितक्या भागातील या कामट्या, धागे काढले.

- मंगेश नागरे, सहाय्यक अभियंता, महावितरण, येवला

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात थंडीचा कडाका

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसात संततधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, आता थंडीचा कहर वाढला आहे. एेन उन्हाळ्यात पावसाळा आणि हिवाळा असे दोनही ऋतूचा अनुभव सध्या नागरिक घेत असून या विपरीत वातावरणाने मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.

शनिवारी दुपारनंतर शहर व तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी व संततधार दोन दिवस कायम होती तर सोमवारी दुपारपर्यंत सूर्यनारायनाचे दर्शनच झाले नव्हते. अवकळी पाऊस, थंडीमुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्यातच गारपीट व वादळी पावसांच्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच गेल्या दोन दिवसात पुन्हा अवकळी पाऊस झाल्याने आणि थंडीचा कहर वाढल्याने वातावरण बिघडले आहे. काढणीस आलेला लाल कांदा, लागवड झालेला उन्हाळी कांदा व गहू, हरभरा या पिकांची मोठी हानी झाली आहे. दरम्यान पाऊस थांबला असला तरी तापमानात खूप घाट झाली असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. आधीच शहरात स्वाइन फ्लूसारख्या आजारांचे थैमान असून, आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा पाण्याची ठेकेदाराकडून लूट

0
0

नगरसेवकासह प्रशासनाचे पाठबळ असल्याचा संशय

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेचे बांधकाम करतांना खाजगी ठेकेदाराकडून महापालिकेच्याच पाण्याची लूट केली जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे संबधित ठेकेदाराला पाण्याच्या या उधळपट्टीसाठी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची मूक संमती आहे की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेची सर्रासपणे होत असलेली पाण्याची लूट थांबविण्याची मागणी केली जात आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे सातपूच्या अग्निशमन केंद्राच्या बाजूला सुलभ इंटरनॅशनलच्या माध्यमातून शौचालय उभारले जात आहे. महापालिकेच्या क्वाटर्समध्ये राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी शौचालय उभारणीस विरोध केला होता. मात्र, सिंहस्थाचे कामात अडथळा आणू नये, या भावनेने रहिवाशांनी नंतर शौचालय उभारणीस परवानगी दिली. परंतु, शौचालयाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बांधकामासाठी लागणारे पाणी महापालिकेच्या २४ तास चालणाऱ्या जलवाहिनीतून थेट घेतले आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराने महापालिकेची परवानगी घेतली आहे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच महापालिकेच्या पाण्याची लुटणाऱ्या ठेकेदाराला नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांची मूक संमती असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे.

वीज चोरीचाही ठेकेदाराचा प्रयत्न

शौचालयाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने याच ठिकाणी असलेल्या अग्निशमन केंद्राच्या विद्युत मीटरमधून वीज चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत अभियंतांनी ठेकेदारास कुणाच्या परवानगीने वीज जोडणी केल्याचे थेट विचारले. त्यावर ठेकेदाराने 'जाधव साहेबांनी सांगितले' असे उत्तर मिळाले. परंतु, विद्युत विभागात कुणीही जाधव साहेब नसल्याने सांगत ठेकेदारास तत्काळ विजेची वायर काढण्यास सांगण्यात आले. तसेच तासाभरात विजेची वायर काढली नाही तर वीज कर्मचारीच वायर काढून टाकतील असे दामटवल्यानंतर संबंधित ठेकेदाराने वायर काढली.

महापालिकेचे बांधकाम करतांना सबंधित खाजगी ठेकेदारानेच लागणारी वीज, पाणी व कामगारांसाठीचे टेंट आणणे अपेक्षित असते. मात्र, अग्निशमन दलाजवळ शौचालय उभारणी करतांना ठेकेदाराकडून महापालिकेच्याच पाण्याची लूट केली जात आहे. महापालिकेने याप्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे.

- रुपेश नेरपगार, रहिवाशी

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशी करा तक्रार

0
0

>>दत्ता शेळके

ग्राहकाचे वास्तव्य कोठेही असले तरी त्याने आपली तक्रार जिल्हा मंच, राज्य आयोगाकडे करताना पुढील बाबींचा विचार करून मगच तक्रार करावी. ज्याच्या विरुद्ध तक्रार असेल अशी व्यक्ती, संस्था ज्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये असेल वा उद्योग चालवत असेल तेथील मंचाकडे, आयोगाकडे तक्रार दाखल करावी. तसेच ज्या वस्तू अगर सेवेसंदर्भात तक्रार करायची असेल तिचे मूल्य व मागितलेली नुकसान भरपाई मिळून होणारी रक्कम २० लाख रुपयांहून कमी असल्यास जिल्हा मंचाकडे, २० लाख ते १ कोटी रुपयापर्यंत राज्य आयोगाकडे, १ कोटी रुपयांपासून पुढे रक्कम असल्यास राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल करावी.

याशिवाय जिल्हा मंचाच्या निर्णयाविरुद्ध राज्य आयोगाकडे दाद मागता येते. राज्य आयोगाच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागता येते. तसेच राष्ट्रीय आयोगाच्या निर्ण्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद या कायद्यात केलेली आहे. तक्रार दाखल करण्यासाठी किंवा बाजू मांडण्यासाठी तक्रारदाराला वकील देण्याची आवश्यकता नाही. तक्रारदाराने करावयाची तक्रार ही कायद्याच्या परिभाषेत करावयाची नसल्याने वकिलांची गरज नाही. तक्रारदाराने त्याचे संपूर्ण नाव व पत्ता, ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याचे नाव व पत्ता, तक्रारीचा तपशील, तक्रार कोठे व केव्हा निर्माण झाली याचा स्पष्ट उल्लेख केलेला असावा. तसेच तक्रारीचे निवारण कशा पद्धतीने केले जावे याबाबतची अपेक्षा या मुद्यांसोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. तक्रारदार स्वतः किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधीसुद्धा तक्रारदारातर्फे बाजू मांडू शकतो. व्यापारी आणि उत्पादक यांच्यावरही वकील देण्याचे बंधन नाही. एखाद्या दाव्यात कायद्याचा महत्त्वाचा अथवा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होत असेल तर वकिलाची मदत घेणे योग्य ठरेल. त्याचप्रमाणे तक्रार दाखल करण्यापूर्वी ग्राहक संघटनेकडून मार्गदर्शन घेणे हे ग्राहकाच्या हिताचे ठरेल.

कागदावर एकाच बाजूस सुवाच्य अक्षरात तक्रार लिहिलेली असावी अथवा मजकूर टाईप केलेला असावा. जिल्हामंच अथवा राज्य आयोगाकडे तक्रार करताना तक्रार अर्जाच्या चार प्रती कराव्यात. राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार करताना त्याच्या सहा प्रती पाठवाव्यात. ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, अशा व्यक्ती/संस्था एकाहून अधिक असल्यास त्याप्रमाणात प्रती पाठवाव्यात.

तक्रार अर्ज व्यक्तिशः दाखल करून त्यावेळी तक्रारदाराने तक्रारीची पोहोच स्वतःच्या प्रतीवर घेणे इष्ट आहे. तक्रारअर्ज रजिस्टर पोस्टाने पाठविला तरीही चालतो. तक्रार अर्जासोबत तक्रारीच्या स्वरूपाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये डिमांड ड्राफ्टने आवश्यक असणारी रक्कम भरावी लागते. तक्रारीच्या निकालाची प्रत ग्राहकाला पोस्टाने घरपोहोच मोफत पाठवली जाते.

तक्रारीची दखल कशी घेतली जाते?

तक्रारदाराचा अर्ज तक्रार निवारण यंत्रणेपुढे आल्यास ती तक्रार मंचाच्या/आयोगाच्या कार्यक्षेत्रात येते किंवा नाही हे पाहिले जाते. त्याचप्रमाणे तक्रारीचे स्वरूप तक्रार या शब्दाच्या व्याख्यात बसते किंवा नाही हे पहिले जाते. तसेच, तक्रार करणारी व्यक्ती/संस्था ही ग्राहक सरंक्षण कायद्यानुसार तक्रार करण्यास पात्र/सक्षम आहे किंवा नाही हेसुध्दा पडताळून पाहण्यात येते.

प्रत्यक्ष तक्रारीचे निवारण

तक्रार दाखल करून घेतल्यावर त्याची एक प्रत विरुध्द पक्षाला पाठविण्यात येते. त्यावर तीस दिवसांच्या आत त्यांचा त्यासंबंधीचा खुलासा मागविला जातो. विरुद्ध पक्षाने त्या संदर्भात जो खुलासा केलेला असेल त्याची एक प्रत ग्राहकाला घरपोहोच पाठवायची असते. पाठविलेल्या खुलाशासंदर्भात ग्राहकाला त्याबाबत काही मुद्दे उपस्थित करावयाचे असल्यास विशिष्ट मुदतीत आपली बाजू विरुद्ध पक्षास व मंचास/आयोगास लेखी काळवावयाची असते. जर तक्रारी केलेले तक्रारदाराचे आरोप विरुद्ध पक्षाने अमान्य केले किंवा विहित वेळेत आपली बाजू मांडण्याचे टाळले तर तक्रारीचे निवारण

करण्याच्यादृष्टीने उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार सुनावणी केली जाते. अशा सुनावणीस उपस्थित राहणे तक्रारदार व विरुद्ध पक्ष यांच्यावर बंधनकारक असते. तक्रारदार किंवा विरुद्धपक्ष उपस्थित न राहिल्यास मंच/आयोग एकतर्फी सुनावणी करून तक्रारीवर निर्णय देऊ शकतात.

ज्या तक्रारीत एखाद्या वस्तूच्या सदोषतेचा प्रश्न असतो आणि सदोषता प्रयोगशाळेतील चाचणीशिवाय ठरविता येत नाही, अशा वास्तूंचा नमुना मंचाकडून प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविला जातो. सदर तपासणीचा अहवाल ४५ दिवसांच्या आत मंचाकडे पाठविण्याचे बंधन प्रयोग शाळांवर आहे. सदर चाचणीसाठी लागणारी फी ही तक्रारदारांना मंचाकडे सुरवातीला भरावी लागते. अहवालाच्या गुणवत्तेबद्दल, योग्य/आयोगतेबद्दल तक्रारदार अथवा विरुद्ध पक्षाच्या हरकती आल्यास त्याचाही विचार केला जातो. त्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मंच योग्य तो आदेश देऊन मूळ तक्रारींचे निवारण करतो.

(लेखक महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक आहेत.)

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यातून आर्थिक साक्षरतेचा संदेश

0
0

जी. पी. गर्ग यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामायणासारख्या चिरंतन साहित्यास अनेक पैलू आहेत. पैकी आर्थिक साक्षरतेचा या साहित्यातून मिळणारा संदेश हा देखील महत्त्वाचा पैलू आहे. प्रभू रामचंद्र या प्रतिमेने मर्यादापालनाचा उभारलेला आदर्श आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचे प्रबंधक जी. पी. गर्ग यांनी मांडले.

सीएचएमई सोसायटी संचलित डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट, सेन्ट्रल डीपॉजिटरी सर्विसेस लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'फिनांशिअल इंजिनीअरिंग व मार्केट्स' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळचे उदघाटन गर्ग यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून इन्व्हेस्टर प्रोटेक्टर फंडचे वरिष्ठ अधिकारी सी. वासुदेवन आणि अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह दिलीप बेलगावकर होते. ह्यावेळी 'फिनांशिअल इंजिनीअरिंग व मार्केट्सची सद्यस्थिती' या विषयावर जी. पी. गर्ग यांचे बीजभाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नारायण दीक्षित व संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी केले.

'आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी आपल्याकडे एखादी सुरचित योजना उपलब्ध असून, तिची राष्ट्रीय पातळीवर सर्व सामाजिक थरांमध्ये अंमलबजावणी करण्याची गरज आहे', असे मत व्यक्त केले. याबाबत कार्य करणा-या सरकार , वित्तीय संस्था आणि शिक्षण संस्थांसोबत सहकार्य करून ही गोष्ट घडवून आणण्याची गरज आता निर्माण झाली आहे. प्रमुख पाहुणे सी. वासुदेवन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, आर्थिक नियोजन करताना गरजवंत आणि भविष्यातील ग्राहक आणि गुंतवणूकदार यांच्यापर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे. सर्वांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवण्यासाठी लोक ज्या विविध मार्गांनी शिकतात, त्या मार्गांनी शिक्षण देणे व सर्वांचा सहभाग घडवून आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. दिवसभरात झालेल्या विविध सत्रात करियरच्या संधी नितीन टिके यांनी व गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन आर्थिक क्षेत्रातील जाणकार तज्ज्ञ अजित मंजुरे, सागर शिंदे, फायनान्शियल प्लानिंग या विषयासाठी दत्तात्रय काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कुलकर्णी यांनी केले तर समन्वयक म्हणून प्रा. दिपाली चांडक यांनी काम पाहिले.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून (३ मार्च) उत्तर महाराष्ट्रासह राज्यात प्रारंभ होत आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी एकूण १ लाख ८६ हजार ५१० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यंदा त्यात २० हजार ३८३ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून यंदा एकूण २ लाख ६ हजार ८९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

दहावी परीक्षा कालावधीत विद्यार्थी व पालकांना विविध अडचणी असतात. परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी कोणती कार्यवाही करावी, आउट ऑफ टर्न प्रात्यक्षिक परिक्षा, परीक्षेसंबंधी अन्य माहिती तसेच परीक्षा कालावधीत नैसर्गिक व आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडीअडचणींबाबत माहिती उपलब्ध होणे आवश्यक असते. त्यासाठीच मंडळाने मदतवाहिनी सुरू केली असून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ०२५३-२५९२१४३ या क्रमांकावार संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

हॉल तिकीटचा दिलासा

हॉल तिकीट हरवल्याने विद्यार्थ्यांवर परीक्षेचे मोठं दडपण येत असल्यानेच मंडळाने ऑनलाईन हॉल तिकिटाचा उपक्रम पहिल्यांदाच सुरू केला आहे. मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर कॉलेजला ऑनलाइन हॉलतिकीट लॉगीन करण्याची सोय आहे. त्यासाठी प्रत्येक प्रत्येक कॉलेजला युजरनेम आणि पासवर्ड देण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्याचे हॉलतिकीट हरवले आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधून हॉलतिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर हॉलतिकिटावर प्राचार्यांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे. परीक्षा काळात हॉलतिकीट हरवल्यास काळजी करू नये. हॉलतिकीट कॉलेजमधून परत काढता येईल. तसेच, मंडळाच्या

कार्यालयातूनही ते मिळवता येईल, असे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले आहे.

आजचा पेपर

प्रथम भाषा (मराठी, हिंदी, उर्दु, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)

(वेळ - सकाळी ११ ते दुपारी २)

हे लक्षात ठेवा

विद्यार्थ्यांचा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश - सकाळी १०.३०

उत्तरपत्रिकांचे वाटप : सकाळी १०.४०

प्रश्नपत्रिकेचे वाटप : सकाळी १०.५०

परीक्षेला प्रारंभ : सकाळी ११.००





दहावीलाही १० मिनिटे

प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून १० मिनीटे आधीच प्रश्नपत्रिका देण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याचा विद्यार्थ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेत दहावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांना १० मिनीटे प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील कुठल्याही परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रकार घडत असेल तर मंडळाच्या ०२५३-२५९९९५४ या क्रमांकावर थेट तक्रार करावी. तातडीने कारवाई केली जाईल.

- दत्तात्रय जगताप, विभागीय अध्यक्ष

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा धोका वाढला

0
0

पावसामुळे `फ्लू`च्या विषाणूस पोषक वातावरण

नाशिककरांनी दक्षता घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'स्वाइन फ्लू'ने नाशिककरांना हैराण केले आहे. त्यातच पावसाची भर पडल्याने स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा धोका वाढण्याची भीती वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गर्दीत टाळण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून, वैद्यकीय सल्ल्यानेच औषधे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी शहरात सात स्वाइन फ्लूचे रूग्ण आढळले आहेत.

नाशिक जिल्ह्यात जानेवारीपासून स्वाइन फ्लूने सुमारे सतराजणांचे बळी घेतले आहेत. त्यातच ढगाळ वातावरणामुळे फ्लूचा संसर्ग दरम्यान वाढला होता. गेल्या आठवड्यात कडक ऊन पडल्याने स्वाइनचा धोका कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हे वातावरण 'स्वाइन फ्लू'च्या विषाणूंना पोषक ठरते आहे. या काळात स्वाइनच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काय करावे आणि काय करु नये

आपले नाक व तोंड रुमालाने झाकावे. शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर झाल्यावर टिशू नष्ट करावा.

आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धूवावेत.

आपल्या डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे. आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी.

तुम्हाला सर्दी, खोकला या पैकी काही लक्षणे आढळल्यास प्रवास टाळा.

गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

ज्यांना श्वसनाचे आजार आहे त्यांच्याशी संपर्क टाळावा.

भरपूर झोप घ्या आणि द्रव्य पदार्थाचे जास्तीत-जास्त सेवन करा आणि पौष्टिक आहार घ्या.

आपण आजारी असाल तर घरीच रहावे. जर शक्य असेल तर आपल्या शाळा,व्यवसाय यांपासून दुर रहावे.

रुग्णाच्या संपर्कानंतर हात साबणांने स्वच्छ धुवावेत.

घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी. त्या साठी खिडक्या उघडया ठेवाव्यात.

आरोग्यदायी सवयीचं कटाक्षानं पालन करावे.

स्वाइन फ्लूमुळे कोणाला व कोणता धोका असू शकतो?

स्वाइन फ्लूचा तीव्र प्रभाव झालेल्या व्यक्तींना खाली नमूद केल्याप्रमाणे धोका असू शकतो.

मोठ्या कालावधीसाठी फूफ्फूसाचे विकार उद्भवतात. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दम्यावर उपचार घेतले आहेत अशांनाही हा त्रास उद्भवतो.

तीव्र हृदयविकार.

तीव्र मुत्रपिंडाचे विकार.

तीव्र यकृताचे विकार.

तीव्र न्युरॉलॉजिकल विकार.

एच १ एन १ पासून बचाव करण्यासाठी

खोकला किंवा शिंक आल्यास नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा. वापरून झाल्यावर टिश्यू पेपर फेकून द्यावा.

खोकला, शिंक आल्यावर नाक पुसून हात साबणाने स्वच्छ धुवा.

डोळे, नाक, तोंड यांना सतत हात लाऊ नये.

आजारी व्यक्तीच्या संपर्कात फार काळ राहू नये.

फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा. त्यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही.

खबरदारी घेण्याच्यासंदर्भात आरोग्य खाते वेळोवेळी ज्या सूचना करेल किंवा आदेश देईल त्याचे पालन करा.

डॉक्टरांच्या मते मास्क पेक्षा स्वच्छ हातरुमालाचा वापर फायदेशीर ठरतो.

विशेष

जे सतत परदेशी प्रवास करतात अशा लोकांना लक्षणे जाणवल्यास त्वरित तपासणी करुन घ्यावी. सतत आजारी असणा-यांच्या संपर्कात वारंवार राहू नये.

............................
आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे चांगला आहार व फळे खा. तापाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा संपर्क साधावा. खासगी हॉस्प‌िटलमध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण असल्यास तातडीने सिव्ह‌िलला कळवावे.

- मंगेश थेटे

उपाध्यक्ष, आयएमए

पावसामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे, जावेच लागले तर मास्कचा वापर करावा. निलगिरीचे तेल रुमालावर दोन थेंब ठाकून त्याचा वास घ्यावा. ताजी फळे व भाज्याच आहारात घ्याव्यात. फास्ट फूड व बाहेरील पदार्थ टाळावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

- डॉ. विनोद गुजराथी, आयुर्वेद तज्ज्ञ

गर्भवती महिलांनी या वातावरणात स्वत:ची अधिक काळजी घ्यायला हवी. साधा ताप जरी असल तरी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यांने उपचार घ्यावेत. सर्दी व ताप होऊ नये म्हणून गर्भवती महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. चांगला आहार घ्यावा. एखाद्या गर्भवतीस स्वाइन झाला असेल तर त्याचा धोका बाळालाही होऊ शकतो.

- डॉ. निवेदिता पवार, स्त्री रोगतज्ज्ञ







मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन नाशिक क्लिन नाशिक

0
0

>>पियुष सोमाणी

गेल्या काही वर्षांमध्ये नाशिकची वाढ खूप झपाट्याने झाली आहे. येत्या काही वर्षात सुद्धा नाशिकची वाढ अशीच वेगाने होणार आहे. नाशिक महानगरपालिकेस नुकताच भारतातील वेगाने विकसीत होणारे शहर, "मोस्ट प्रोमिसिंग सिटी" असा पुरस्कारही मिळाला आहे. पण याचबरोबर आपली परिस्थिती सुद्धा दिल्ली किंवा मुंबईसारखी व्हायला नको. म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.

ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे लोकसंख्येसोबत वाढत जाणाऱ्या समस्या आणि प्रदूषण. दिल्लीमध्ये असणाऱ्या इतर देशांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी "ऐयर फिल्टर्स" यंत्रणा बसवण्याच्या सक्तीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा रद्द झालेला आग्रा दौरा किंवा दिल्ली शहरामध्ये सुद्धा त्यांनी खूप कमी केलेला प्रवास, ह्याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीत असणारे प्रदूषण आणि अशा प्रदूषित वातावरणात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष राहू शकत नाही, खूप दिवस जगू शकत नाही. अशा वातावरणात राहिल्याने कमी होणारे आयुर्मान, प्रतिकारशक्ती, प्रदूषणामुळे होणारे आजार अशा विविध गोष्टी हा चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे, आपण मात्र अशा वातावरणातच जगात आहोत. भौतिक विकासाबरोबरच आपण निसर्गाची सुध्दा प्राधान्याने काळजी घेणे व निसर्गाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपण प्रत्येकवेळी प्रत्येक काम हे महानगरपालिकेने, राज्य किंवा केंद्र शासनाने केले पाहिजे ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

नागरिकांनी सुध्दा याकामी हातभार लावणे ही काळाची गरज आहे.

आपल्या कार्यालयाचे, घराचे क्षेत्रफळ जर एक एकर असेल तर साधारणपणे २० झाडे आपण लावली पाहिजे व त्यांचे व्यवस्थित संगोपन करून ती जगवली पाहिजे. अर्धा एकर असेल तर १० झाडे लावणे अत्यंत आवश्यक आहे. नाशिक महानगरपालिकेस जसे उच्च न्यायालयाने दिलेला आदेश की, १७ हजार झाडे लावून त्यांची २० फुटांपर्यंत वाढ होईस्तोवर जुनी झाडे तोडण्यास परवानगी मिळणार नाही. ही काही फक्त नाशिक महापालिकेची जबाबदारी नव्हे, आपण सर्व नागरिकांनी सुद्धा ह्या कामासाठी हातभार लावला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून ते व्यवस्थितपणे जगवले पाहिजे. आज आपल्या नाशिकची शुध्द हवा आहे, येथील वातावरण खूप चांगले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नाशिक परिसरात आणि शहराच्या बाहेर असणारी विस्तीर्ण हिरवाई. उन्हाळ्यात भर दुपारी जेव्हा आपल्याकडील तापमान ४० अंशापुढे जाते तेव्हा आपल्याच जवळ असण्याऱ्या तुंगलदाराच्या डोंगराजवळील जंगलामुळे सायंकाळी ते लवकर खूप गार सुद्धा होते. तर ह्याचे कारण म्हणजे महिंद्रा कंपनीने तेथे लावलेली १० लाख हून अधिक झाडे.

जेव्हा आपल्याकडील तापमान ४० पर्यंत पोहोचते तेव्हा तुंगलदार परिसरात साधारण तापमान ३० अंश एवढे असते. सायंकाळी तेथून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे आपल्याकडील वातावरण आल्हाददायक

होते. गेल्या २६ वर्षांपासून मी पाहतो आहे की, नाशिकचे तापमान गेल्या ५-६ वर्षांपासून ४० अंशापुढे पुढे जात आहे. त्याआधी कधी एवढी तापमानात वाढ होत नव्हती. त्याचे कारण म्हणजे पर्यावारणात होणारे बदल, वृक्षतोड, निसर्गाचा होणारा ऱ्हास आदी. केवळ महापालिकेवर विसंबून न राहता आपण स्वतः आपली जबाबदारी समजून शक्य तेव्हढी निसर्गाची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. महापालिकेला मदत करण्यासाठी आपण एक पोर्टल निर्माण करू शकतो, यामध्ये आपण आपल्या घर, ऑफिस आणि परिसरात झाडे लावणाऱ्या नागरिकांची माहिती आणि फोटो शेअर करू शकतो.

दर सहा महिन्यांनी आपण त्याची वस्तुस्थिती व फोटो पुन्हा त्याच पोर्टल मध्ये अपलोड करू शकतो.

ही सुविधा मोफत देण्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे. जेणे करून मनपाला कुठलाही नवीन खर्च होणार नाही आणि झाडांची वाढ, निगा व संगोपन नाशिकमध्ये व्यवस्थितपणे होत आहे, असे उदाहरण आपण निर्माण करून संपूर्ण देशाला पटवून देवू शकतो. आपसातील सहयोगाने लोकांनी किती झाडे लावली, किती जगवलीत याचे एक चांगले आदर्श आपण ठेवू शकतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सामाजिक बांधिलकीने आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण नाशिकला एक चांगले सुंदर, स्वच्छ, हिरवेगार शहर बनवणे फार आवश्यक आहे. येत्या काळात आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा खूप फायदाच होणार आहे. मुंबईची एक सॅटेलाईट सिटी, जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट वातावरण, आणि राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून पर्याय निर्माण होईल. पर्यटन वाढ होवून नाशिकचा विकास होईल, मुंबईचा भार देखील कमी होवून नाशिक शहराची आर्थिक, सामाजिक प्रगती होईल आणि पर्यायाने नाशिक खूप पुढे निघून जाईल. येत्या काळात आपण सर्वांनी मिळून नाशिकला एक चांगले सुंदर, स्वच्छ, हिरवेगार शहर बनवूया.

(लेखक प्रसिद्ध उद्योजक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी

0
0

एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण;
मदतीसंदर्भात घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकार मदतीसदंर्भात गंभीर आहे. अवकाळीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे देण्यात आले असून शिवसेना सत्तेत असली तरी, मदतीसंदर्भात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर याबाबत गुरूवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मंत्र्यांना गावात फिरू न देण्याची भाषा करणाऱ्या शिंदेना सत्ता चांगलीच मानवली असून आपल्या मवाळपणाचे दर्शन त्यांनी घडविले. अवकाळीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसह युती संदर्भात बोलण्याचे त्यांनी यावेळी टाळले.

नाशिक जिल्ह्यात गेल्या शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी सय्यद पिंप्री, ओझर, दिक्षी, दातेन, कसबे-सुकने, कोकणगाव इत्यादी गावाच्या पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतीच्या नुकसानीची शिंदे भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याकडे आपल्या व्यथा माडंल्या. पेस्ट‌िसाईड कंपन्यासह अवकाळीची अद्याप मदत मिळाली नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी शिंदेसमोर मांडली.

पत्रकांराशी बोलताना शिंदे म्हणाले,'मंगळावारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील अवकाळीच्या नुकसानीवर चर्चा झाली. यंत्रणेला वस्तुनिष्ठ पंचनामे सादर करण्याचे तसेच तातडीने मदत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.' गतवेळेच्या अवकाळीची मदत मिळाली नसल्याची आठवण पत्रकारांनी करून देताच, शिंदेची बोबडी वळाली. शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात उद्याच मुख्यंमत्र्यांची भेट घेणार असल्याचे उत्तर देउन त्यानी वेळ मारून नेली. सुरक्षित शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असून त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलिथिनवरचा आयात कर रद्द करणेबाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना सबसिडी व अन्य सवलती देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बी-बीयाणे व औषधे रसायने लागू असलेल्या करांमध्ये सूट देण्याबाबतचा विचार करण्यात येईल. पॉलिहाऊस उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सोबतच ब्रिटीशकालीन आणेवारीची पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळी सांगीतले.

पाटीलवरही कारवाई करू

ओझर विमानतळावर झालेल्या पार्टीप्रकरणी अभियंता आर. टी. पाटील यांच्यावरही कारवाई करू असे आश्वासन शिंदे यांनी दिले. छोट्यावंर कारवाई आणि मोठ्यांची बदली असे धोरण चालणार नसून सुटलेल्यांवरही कारवाई करू असे त्यांनी सांगीतले.

फास्ट ट्रॅक खटला चालवा

ठाण्यात काल रिक्षाचालकाने केलेल्या कृत्याची गंभीर दखल घेण्यात आली असून ही केस फास्ट ट्रॅक खटल्यात चालवा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिंदेनी यावेळी सांगीतले.



मंत्रीच वेटिंगवर

नुकसान ग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना अधिकाऱ्यांनी वेटिंगवर ठेवल्याची घटना घडली. शिंदे ३ वाजता शासकीय विश्रामगृहावर येणार असल्याचा निरोप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला देण्यात आला होता. जिल्हा कृषी अधिक्षक मधुकर पन्हाळे यांना मंत्र्यांसोबत राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शिंदेचे विश्रामगृहावर आगमन झाल्यानंतर एकही अधिकारी त्यांच्या स्वागताला हजर नव्हता. पन्हाळेही ऐनवेळी गायब झाले. त्यामुळे शिंदेच्या पीएकडून जिल्हाधिकाऱ्यांना निरोप सोडण्यात आला. तब्बल अर्धा तासाच्या वेटिंगनंतर निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते आणि प्रांत विश्रामगृहावर दाखल झाले. त्यानंतर घाईघाईने त्यांना नुकसानीचे ब्रिफींग करण्यात आले. त्यानंतर पाऊण तासांनी नुकसानीच्या दौऱ्याला सुरूवात झाली. शिवसेनेतील आक्रमक स्वभावाच्या शिंदे यांनाच अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीचा सामना करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या पर्यटनाला चालना

0
0

`तान`तर्फे १३ ते १६ मार्चदरम्यान आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्यात होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक आणि परिसरातील पर्यटन स्थळांची ओळख टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातूद देश व विदेशात पोहचावी, या उद्देशाने टूरिझम कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन (तान) यांच्यावतीने टूरिझम कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ते १६ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत हॉटेल एक्सप्रेस इन येथे हा उपक्रम होणार आहे.

दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल एक्सप्रेस इन येथे या उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उपक्रमाचे समन्वयक संतोष मंडलेचा व `तान`चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेंद्र शर्मा, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी कॉनक्लेव्ह ही संकल्पना मराठवाडा आणि कोकणात राबविण्यात आली होती. आता नाशिकमध्ये ही संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी सुमारे आठशे टूर ऑपरेटर्स येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशभरातून चारशे टूर ऑपरेटर्सने नोंदणी केली आहे. यात दिल्लीसह चेन्नई, कलकत्ता, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नाशिकच्या पर्यटन क्षेत्रावर प्रकाश टाकणारी शॉर्ट फिल्मही या सोहळ्यात बनविण्यात येणार आहे. नाशिकच्या ब्रॅण्डिंगला पाठबळ देण्यासाठी नाशिक महापालिकेसह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, क्रेडाई, निमा, आयमा, हॉटेल ऑनर्स असोसिएशन,ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशन, पंचवटी हॉटेल, हॉटेल एक्सप्रेस इन, कारडा कन्स्ट्रक्शन आदी संघटना व उद्योगांनी या उपक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला असल्याची माहिती संतोष मंडलेचा व दत्ता भालेराव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला बाइकर्णींनो, घेऊया नवी भरारी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठल्याच क्षेत्रातील महिला आता बाइक चालवण्यात मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. यात बाइक चालवण्यातही महिला मोठ्या प्रमाणात आहेत. 'जागतिक महिलादिना'निमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे रविवारी (८ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या 'विमेन्स बाइक रॅली'मध्ये सहभागी होण्याची उत्सुकता सर्वच बाइकर्णींना आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर यासाठी नावनोंदणी झाली असून, तुम्ही अजूनही नाव नोंदवले नसेल तर आजच आपले नाव यासाठी नोंदवा.

तुम्हीही व्हा बाइकर्णी!

नियम पाळून बाइक चालवण्याला माझा जोरदार पाठिंबा आहे. या बाइक रॅलीच्या निमित्ताने एक वेगळा संदेश तुम्ही पोहोचवणार आहात. मात्र, सर्व नियम पाळून ही रॅली पूर्ण करा. या बाइक रॅलीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही यामध्ये नक्की सहभागी व्हा.

मोक्षदा पाटील, सहपोलिस अधीक्षक

सक्षमीकरणाचा द्या संदेश

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्याचे चित्र आहे. मात्र तरीही समाजाची मानसिकता बदलणे आजची गरज आहे. जोपर्यंत महिला पुढे येत नाही तोपर्यंत त्यांचा विकास आणि सक्षमीकरण होऊ शकणार नाही. मी स्वतः गीअर बाइक चालवते. महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या या विमेन्स बाइक रॅलीमध्ये तुम्हीही सहभागी व्हा आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश या माध्यमातून द्या!

दीपा आगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह

हे आहे गरजेचं

बाइक रॅलीसाठी ना कुठला ड्रेसकोड ना कुठली अट आहे. यामध्ये तुम्ही गीअर बाइक किंवा मोपेड बाइकही चालवू शकता. पण यासाठी तुमच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील महिला या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतील.

लगेच करा नावनोंदणी

नाव नोंदणीसाठी http://womenbikerally.mtonline.in या वेबसाइटला भेट द्या किंवा मोबाइलवर mtccNSK स्पेस तुमचं नाव टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा. किंवा ०२५३-६६३७९३७/३९ या क्रमांकावर तुम्ही नावनोंदणी करू शकतात. नावनोंदणी याच क्रमांकावर केली जाणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images