Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भविष्यनिर्वाह सभासदांचे खाते झाले अपडेट

$
0
0

नाशिकसह पाच जिल्ह्यांतील १५ लाख खातेधारकांना लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने सभासदांचे खाते अवघ्या साडेसहा तासांत अद्ययावत झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१४-१५ च्या व्याजासह ही खाती अपडेट करण्यात आली आहे. ई-गव्हर्नन्सच्या जोरावर ही किमया साध्य होऊ शकली आहे.

कर्मचारी भविष्य निधी उपक्षेत्रीय नाशिकच्या नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुबारस्थित ७ हजार ५१७ आस्थापनांच्या पंधरा लाखांहून अधिक सभासदांना त्याचा लाभ होणार आहे. या सभासदांना आपल्या खात्यात व्याजासह २०१४-१५ च्या अखेरची जमा भविष्य निधी रक्कम पाहता येणार आहे. एक एप्रिल रोजीच सर्व सभासदांची खाती अपडेट करण्यात आली आहेत.

यापूर्वी खाती अपडेट करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागत होता; पण यंदा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हाला हे काम संपवता आले, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी उपक्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त जगदीश तांबे यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्स व इतर प्रगत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून सभासदांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पीएफ कार्यालयामार्फत केला जात आहे. देशभरातील पीएफ खातेधारकांची खाती अपडेट करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

सभासदांची खाती अवघ्या साडेसहा तासांत अपडेट होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मागील दोन-तीन वर्षांत ई-गव्हर्नन्सच्या दिशेने टाकलेली पावले व त्याबरोबरच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे हे साध्य होऊ शकले आहे.

- जगदीश तांबे, आयुक्त, कर्मचारी भविष्य निधी उपक्षेत्रीय कार्यालय, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरगावला हवी पोलिस चौकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील विरगाव येथे गेल्या पंधरवाड्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, व्यापारी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विरगाव येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करावी, या मागणीचे निवदेन विरगांव येथील ग्रामस्थांनी बागलाणचे पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे यांना दिले आहे.

विरगाव हे सटाणा शहरापासून ९ कि.मी. अंतरावर असून, येथे ज्वेलर्स, कापड, किराणा, शेती औजारे यासारखे मोठे मोठे व्यवसायिक व्यवसाय करतात. तसेच, येथे राष्ट्रीयकृत बँका असून, परिसरात गेल्या महिन्यात अनेक छोटे मोठ्या चोऱ्या झाल्या. गेल्या आठवड्यात येथील जयंवत ज्वेलर्स हे दुकान फोडले. शेजारील नागरिकाने प्रतिकार केल्याने त्यास मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, काशिनाथ बोरसे यांचे देखील वेल्डिंग वर्क्सशॉपमध्ये चोरी केली. उध्दव दंडगव्हाळ यांच्या घरात देखील चोरी करण्यात आली. यामुळे गावातील व्यापारी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा धाक शिल्लक राहिला की नाही अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.

पोलिस विभागाकडून अद्यापपर्यंत एकाही घटनेचा शोध लागलेला नाही. यामुळे गावात मंजूर असलेली पोलिस चौकी कार्यान्वित करून संरक्षण मिळावे व मागील गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करावी, अशी मागणी निवदेनात करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, उपसरपंच संजय बच्छाव, साईनाथ देवरे, पप्पू ठाकरे, दीपक कोठावदे यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामांवर आज पुन्हा चर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे आज साधू-महंत, सिंहस्थ नागरी समिती, नगरपरिषद सदस्य, नागरिक व शासन अधिकारी यांची संयुक्त बैठक होत आहे. नगरपरिषदेने या बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी १२ वाजता देवस्थान संस्थानच्या शिवप्रसाद या इमारतीत होत असलेल्या बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात, असे अपेक्षित आहे.

शहरामध्ये सुरू असलेल्या खोदकामांनी नागरी जीवन त्रस्त झाले आहे. या कामांमध्ये सुसूत्रता व नियेजानाचा आभाव असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून वारंवार ध्वनीत झाले आहे. याचा सर्वप्रथम थेट परिणाम म्हणजे बसस्थानक शहराबाहेर हलविण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा तसेच शहरात भाविकांचा वाढलेला ओघ पाहता एक किलोमीटर अंतरावर हलविण्यात आलेले बसस्थानक सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. शहरात गावाबाहेरून येण्यारे तीन रस्ते आहेत. तरी देखील रस्त्यांच्या कामांचे निमित्त करून बसस्थानक बाहेर पाठविल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशाच प्रकारे शहरांतर्गत रस्त्यांच्या बाबतीत धरसोड करीत काम सुरू असल्याने नागरिकांना आपत्कालात मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. अवघ्या दोन महिन्यांवर सिंहस्थ पर्वकाल आलेला असतांना कामे प्रगतीपथावर या शिर्षकाखाली रेंगाळत आहेत. नव्याने मंजुरी मिळालेली कामांची परिस्थती काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी, असे नागरिक म्हणत आहेत. सिंहस्थ पूर्वनियोजनात नागरिकांचा सहभाग खरोखरच म्हत्वाचा ठरतो.

मात्र, त्यास आता उशीर झाला आहे. किमान काही महिने अगोदर अनुभवी नागरिकांचा सल्ला घेतला असता तर आज ही वेळ निश्चितच आली नसती. आजच्या बैठकीत काय निष्पन्न होणार याकडे त्र्यंबक नगरीचे लक्ष लागले आहे. यामध्ये नागरी जीवनाची झालेली कोंडी दूर होणार की केवळ शाल श्रीफळ आणि सत्कार असे या बैठकीचे स्वरूप राहणार अशीच चर्चा शहरात होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘येमको’ बँकेसाठी ६५.४४ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या येवला मर्चंटस् को ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ६५.४४ टक्के मतदान झाले. बँकेच्या विविध गटातील एकूण १५ जागांवर निवडणूक रिंगणात असलेल्या ३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. आज, (दि.६) मतमोजणी होणार आहे.

जनसेवा व परिवर्तन या दोन पॅनल बरोबरच इतर उमेदवारांकडून प्रचाराची मोठी रणधुमाळी गाजताना रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी मतदानाला प्रारंभ होताना शहरातील विंचूर रोडवरील जनता विद्यालयाच्या इमारतीबाहेर दोनही पॅनलचे नेते, उमेदवार व पाठीराखे यांची मोठी गर्दी दिसत होती. मतदान संपेपर्यंत उमेदवार मतदारांना हात जोडत मतदानासाठी साद घालत होते. पहिल्या दोन तासात मतदानाच्या झालेल्या एकूण आकडेवारीवर नजर टाकता ती बरीच कमी दिसत होती. मात्र १० ते १२ व त्यानंतर देखील मतदानात प्रत्येक तासागणिक वाढ होत गेली. दुपारी १२ नंतर तर मतदारांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना अनेक मतदार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकूण १४ हजार २०५ मतदारांपैकी ९ हजार २९७ मतदारांनी हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी दिली.

चोख व्यवस्था अन् बंदोबस्त

'येमको' बँकेच्या रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी सहकार विभागाने २१ मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांना त्यांच्या आडनावाच्या इंग्रजी वर्णमालेनुसार स्लिपा देण्यासाठी खास टेबल लावतांना जवळपास एकूण १९० च्या वर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. बरोबरच चार पोलिस अधिकाऱ्यांसह तब्बल ३५ पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त देखील तैनात केला गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगाव बाजार समिती आजपासून गजबजणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

मार्चएण्ड व सलग नऊ दिवसांच्या सुटीनंतर अखेर आजपासून लासलगाव बाजार समितीत शेतमालाच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून बाजार समिती बंद राहिल्याने लासलगाव व परिसरात कमालीची शांतता पहावयास मिळाली होती. त्यात बँकाचेही कामकाज मार्चएण्ड, गुड फ्रायडे व साप्ताहिक सुटीमुळे बंद राहिल्याने येथील व्यवसाय ठप्प पडल्याचे चित्र दिसत होते.

एरव्ही ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या इथल्या बाजारपेठेत बंदमुळे मोठा शुकशुकाट निर्माण झाला होता. गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान तयार झाल्याने कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यात नऊ दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत आणखीनच भर पडल्याचे दिसत होते.

सध्या तालुक्यात अंतिम टप्प्यात आलेला लाल कांदा व अर्ली उन्हाळ कांदा काढणीला वेग आला आहे. त्यामुळे कधी एकदा बाजार समिती सुरू होते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. बाजार समित्या बंद होण्यापूर्वी लाल कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली होती. मार्च महिन्यात येथील बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे ३ लाख २५ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर, लाल कांद्याला १ हजार ५८७ रुपयांचा उच्चांकी व १ हजार २६४ रुपयांचा सरासरी भाव मिळाला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आवक वाढल्याने दीड हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या कांद्याच्या दरात सुमारे चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत घसरण झाली होती.

या घसरत्या बाजारभावामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यातही आता येत्या काही दिवसात उन्हाळ कांद्याची मोठी आवक सुरू होणार असल्याने भाव घसरणीची भीतीही कांदा उत्पादकांना सतावत आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर निफाड तालुक्यात ढगाळ हवामान तयार झाले होते. तर, रविवारी सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक गावांमधील शेतशिवारांवर धुक्याची चादर तयार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. नेमके कशामुळे असे झाले याबाबत तर्कवितर्क काढले जात होते.

लिलावासाठी नंबर

नवीन आर्थिक वर्षात आजपासून बाजार समितीचे लिलाव पुन्हा सुरू होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी होणाऱ्या लिलावासाठी रविवारी सकाळपासूनच लासलगाव बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नंबर लावण्यास मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपालिका निवडणुकीवर बहिष्कार

$
0
0

नगरपरिषदेचा आदेश प्राप्त न झाल्याने सर्वपक्षीय बैठकीत निषेध

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

राज्य सरकारने राज्यातील सर्व तालुका मुख्यालय नगरपंचायत/नगरपरिषद करण्याचा अध्यादेश काढला. मात्र, याबाबत दिंडोरी ग्रामपालिकेला आदेश प्राप्त न झाल्याने सर्वपक्षीय पदा‌धिकाऱ्यांनी ग्रामपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आज ग्रामपालिकेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

राज्य सरकारने दहा मार्चला राज्यातील सर्व तालुका मुख्यालये नगरपंचायत/ नगरपरिषद करण्याचा निर्णय घेत तहसीलदारांना प्रशासक म्हणून काम पाहण्याचे आदेश काढले. मात्र, अद्याप दिंडोरीच्या तहसीलदारांना संबंधित आदेश प्राप्त न झाल्याने पुढील कार्यवाही झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार-जिल्हाधिकारी यांना निवेदन देत ग्रामपालिका निवडणुकीऐवजी नगरपरिषद करावी, अशी मागणी केली होती. अद्यापही आदेश प्राप्त न झाल्याने जनतेत संभ्रम असून, उद्या ग्रामपालिकेचे अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. याबाबत रविवारी सकाळी दिंडोरी येथील रामेश्वर मंदिर येथे सर्वपक्षीय बैठक होऊन कुणीही ग्रामपालिका निवडणुकीचे फॉर्म न भरता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी आमदार रामदास चारोस्कर, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, माजी सरपंच शिवाजी पिंगळ, भाऊसाहेब बोरस्ते, प्रमोद देशमुख आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रामपालिका निवडणुकीबाबत विचारविनिमय झाला. शासनाने तालुक्याच्या ठिकाणाचा विकास होण्याचे दृष्टीने नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला. त्याचे सर्वांनी स्वागत केले. मात्र, नगरविकास व ग्रामविकास या खात्यातील असमन्वयामुळे इतर सर्व नगरपंचायत अधिसूचना निघून तेथील ग्रामपालिका निवडणूक स्थगित झालेली असताना दिंडोरीत मात्र अधिसूचना प्राप्त झाली नाही. येथे ग्रामपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कदाचित केव्हाही सदर अधिसूचना येऊन ग्रामपालिका बरखास्त होऊ शकते, अशा परिस्थितीत निवडणूक झाली तर शासकीय यंत्रणेसह इच्छुक उमेदवारांचाही खर्च वाया जाणार आहे. त्यामुळे सदर निवडणुकीत कुणीही फॉर्म न भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, वार्डनिहाय समन्वय समिती स्थापन करण्यात येऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांचेही अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आज (दि. ६) पुन्हा सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशी असावी शिक्षण प्रणाली

$
0
0

>> प्राचार्य डॉ. हरिष आडके

देशाचे उच्च शिक्षण २०१५ चे धोरण ठरविण्याचे काम सुरू झाले आहे. नुकतेच २१ मार्चला त्याचा मसुदा (ड्राफ्ट) तयार झाला. त्याचे वेळापत्रक स्थानिक, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर २१ मार्च २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ दरम्यान निश्चित केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात रिबोटींग (पुनर्स्थापना) करणे हे मोठे आव्हान असते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ते यशस्वीपणे स्वीकारले आहे.

टेक्नोपॅक २०१३ च्या पाहणी अहवालानुसार उच्च शिक्षणात देशात आज ८ लाख १० हजार प्राध्यापक सेवेत आहेत. प्रत्यक्षात ही संख्या ११ लाख ६० हजार हवी. २०२० सालापर्यंत एकूण १३ लाख ८० हजार प्राध्यापकांची आवश्यकता भासणार आहे. शेवटच्या रांगेतील व्यक्तीलाही दर्जेदार उच्च शिक्षण मिळण्यासाठी हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी कौशल्यावर आधारित पदवीका ते पदवी यात पूल बांधणे महत्त्वाचे आहे. संस्कृती व भाषा यांच्यात समन्वय साधण्यासाठी उच्च शिक्षणाच्या नव्या धोरणात थीम तयार करताना वीस गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्यात शिक्षणचा दर्जा, विद्यापीठाचे रॅँकींग, कायदा व नियमात आमूलाग्र बदल, विद्यापीठांचे नियंत्रण, स्वायत्ता व दर्जा, त्यात लोकांचा सहभाग, पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशीप, तांत्रिक कौशल्याच्या संधी, प्रादेशिक क्षमता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक दरी कमी करणे, उच्च शिक्षकांना प्रशिक्षण व त्यांच्या दर्जा आणि कौशल्यात वाढ, सांस्कृतिक विकास, खासगी क्षेत्राबरोबर भागीदारी, विद्यापीठाचे अनुदान, शिक्षक-विद्यार्थी यांचा दर्जा सुधारण्यासाठी अनुदान, संशोधनसाठी मदत, रोजगार निर्मिती व जागतिक विद्यापीठांच्या तुलनेत बरोबरी आदी गोष्टींचा समावेश आहे. याबाबत शिक्षण तज्ञ आणि समाजातील मान्यवरांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आठ हजारावर लोकांनी आपली मते नोंदवली आहेत.

भारतात आजच्या घडीला ३६ राज्ये, ६४० जिल्हे, पावणे आठ हजार शहरे आणि सुमारे सहा लाख खेडी आहेत. या सर्वांच्या विकासासाठी २०१० पासून प्राथमिक शिक्षणात राईट टू एज्युकेशन (शिक्षणाचा हक्क) याचा समावेश करण्यात आला. या सर्व गोष्टींचा गांभिर्याने विचार करून उच्च शिक्षणाबरोबरच माध्यमिक शिक्षणाचीही पुनर्रचना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता काय यावरुनच माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षणात टीईटी (टीचर इलिजीब्लीटी टेस्ट) व सेंट्रल टीचर इलिजिब्लिटी टेस्ट (सीटीईटी) यांची सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात टीचर इलिजिब्लिटीचा रिझल्ट पाच टक्क्यांच्या आतच आहे. माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, आरोग्य, कौशल्य, खेळ आदी अवगत करुन देणे आणि त्यांचा (पर्यायाने विद्यार्थ्यांचा) सर्वांगीण विकास साधने म्हणजे शिक्षण. त्याबरोबरच हुशारी, परिस्थितीचा अंदाज, निर्णय क्षमता हे देखील अवगत हवे. या सर्वांचा समावेश नवीन धोरणात करण्यात आला आहे.

माणसाने कसे वागावे याबाबत एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक म्हातारा बाप होता. त्याच्याकडे सतरा घोडे होते. त्याला तीन मुले होती. त्या सर्वांची लग्ने झालेली होती. वय झाल्याने म्हाताऱ्याने काशीला जाण्याचे ठरविले. जाताना मुलांना सांगितले की, तुम्ही गुण्या-गोविंद्याने रहा. नाहीच पटले तर माझ्या मित्राची मदत घ्या. आपल्या घोड्यांचे वाटप कसे करायचे हे तो सांगेल. म्हातारा काशीला रवाना झाल्यानंतर दोन महिन्यांतच घरातील बायांमध्ये नेहमीप्रमाणे कुरुबुरी सुरू झाल्या. त्या वाढतच गेल्याने भाऊही वैतागले. शेवटी त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे तिघेजण वडिलांच्या मित्राच्या वस्तीवर गेले. तिघांना पाहताच वडिलांचा मित्र म्हणाला, मला वाटलेच होते की तुमचे जमणार नाही. तुमच्या वडिलांनी मोठ्याला एक द्वितीयांश, मधल्या मुलाला एक तृतीयांश आणि धाकट्याला एक नऊमांश अशा पद्धतीने घोड्यांचे वाटप करण्यास मला सांगितले होते. यावर तिघांनी आश्चर्य व्यक्त करीत घोड्यांचे भाग कसे करता येईल असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा वडिलांचा मित्र म्हणाला, की यासाठीच तर माझ्याकडे येण्याचा सल्ला तुमच्या वडिलांनी दिला आहे. मी सकाळी येतो आणि वाटप करून देतो. दुसऱ्या दिवशी हा मित्र आपल्या तबेल्यातील घोडा घेऊन या तिन्ही भावांकडे गेला आणि घोड्याचे वाटप सुरू केले. तिघा भावांचे सतरा आणि आपला एक, असे अठरा घोडे एकत्र केले. मोठ्याला एक द्वितीयांश म्हणजे नऊ, मधल्याला एक तृतीयांश म्हणजे सहा आणि धाकट्याला एक नऊमांश म्हणजे दोन असे सतरा घोड्यांचे वाटप करुन स्वतःच्या घोड्यावर टांग मारली आणि गुडबाय करुन निघून गेला.

तात्पर्य- आपण दुसऱ्याला मदत जरुर करावी, सल्लाही द्यावा पण आपले नुकसान मात्र कदापी होऊ देऊ नये. देशाची शिक्षण प्रणालीदेखील अशाच प्रकारची असायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागमार मामांचे कार्य पुढे न्यावे

$
0
0

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हुकूमचंद बागमार ऊर्फ मामांनी कायमच मानवतेचा दृष्टिकोनातून काम केले असून, त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. सामाजिक क्षेत्रात देखील आपल्या कामाचा बागमार मामांनी ठसा उमटवला आहे. त्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल, असा सूर हुकूमचंद बागमार यांच्या शोकसभेत व्यक्त झाला.

नाशिक शहरातील सहकार क्षेत्रातील अग्रणी हुकूमचंद बागमार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यासाठी गंगापूर रोडच्या चोपडा लॉन्स येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी आमदार, सहकार क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, की व्यापाराबरोबरच शेतकरी व व्यापाऱ्यांना विधायक मार्गदर्शन करुन मामांनी मोठे वलय निर्माण केले. आपल्या ७७ वर्षाच्या सेवाभावी जीवनात अनेक गोष्टींवर मामांनी मात केली. अनेक अडथळे आले प्रसंगाला तोंड देत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. नाशिक मर्चंट बॅँकेच्या जडणघडणीत मामांचा वाटा मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही. सीमा हिरे म्हणाल्या, की त्यांचे कार्य मानवतेला धरून होते. त्यांनी सहकाराबरोबरच महावीर दवाखाना, कॅन्सर हॉस्पिटल अशी सामाजिक कार्ये करून महाराष्ट्रातील सहकारी बॅँकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आमदार बाळासाहेब सानप म्हणाले, की बागमार मामांचे कार्य जनताभिमुख होते. त्यांनी सचोटीने काम करून कुणाचीही पर्वा केली नाही. बॅँकेवर सरकारने प्रशासक नेमले तरी त्यांनी न डगमगता धिराने तोंड दिले. त्यांचे कार्य पुढे ठेवणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल. यावेळी बागमार कुटुंबीयांसोबतच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पदाधिकारी, अ‍ॅपेक्स बँक, अर्बन बँक्स् फेडरेशन, राज्य सहकारी बँक व जिल्हा बँकेचे पदाधिकारी, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच नाशिक मनपाचे नगरसेवक उपस्थित होते.

प्रिती सुधाजी शिक्षण फंड, जैन धमार्थ दवाखाना, नाशिक धान्य किराणा, घाऊक व्यापारी संघटना, पृथ्वीराज निमाणी मंगल कार्यालय, जैन बोर्डींग, स्थानकवासी जैन श्रावक संघ, नामको चॅरिटेबल ट्रस्ट, कॅन्सर हॉस्पिटलचे पदाधिकारी, नागरी बँक असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. जयप्रकाश जातेगावकर व गौतम सुराणा यांनी सूत्रसंचलन केले. हुकूमचंद बागमार यांच्या शोकसभेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेश येथील काही संस्थांचे पदाधिकारी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यसेवा पूर्व परीक्षेला २,७२७ जणांची दांडी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत वर्ग एकच्या पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेला २ हजार ७२७ परीक्षार्थींनी दांडी मारली. १० हजार ३८८ परीक्षार्थींपैकी ७ हजार ६६१ जण या परीक्षेला सामोरे गेले. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली.

रविवारी (दि. ५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी गट अ साठी नऊ जागा होत्या. सहायक पोलिस आयुक्त पदासाठी (१३), सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी (३), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पदाच्या २१ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. अशा एकूण ४६ जागांसाठी जिल्हाभरातून १० हजार ४४० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी २ हजार ७२७ जणांनी परीक्षेला दांडी मारली.

शहरातील ३० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ९२१ अधिकारी कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लावली. त्यामध्ये सहा समन्वय अधिकारी, ३० उपकेंद्र प्रमुख, १२५ पर्यवेक्षक, ४६० समवेक्षक, ६० लिपीक, १५० शिपायांचा समावेश होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रनिहाय ६० पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला गुन्हेगारी पुन्हा बळावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कामगार वस्तीचा भाग म्हणून परिचित असलेल्या सातपूर भागात गुन्हेगारी पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली आहे. गँगवारमधून हत्या झालेल्या अमोल मोहिते खून प्रकणातील आरोपी अद्यापही फरारच आहेत. यामध्ये सातपूर भागात किरकोळ व भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे पोलिसांवर नागरिकांची सुरक्षा व चोरट्यांवर आळा बसविण्याचे आवाहन उभे राहिले आहे. पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी नगरसेवक तसेच नागरिकांनी केली आहे.

सातपूर भागात अनेक महिन्यांपासून गुन्हागारीचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अशोकनगर व श्रमिकनगरच्या काही भागात छोटे, मोठे गुन्हे व चोऱ्या नेहमीच होत असतात. चारच दिवसांपूर्वी झालेल्या मोहिते हत्या प्रकरणामुळे गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढले आहेत. यात चार वर्षांपूर्वी झालेल्या अजय मांगटे हत्या प्रकरणातील आरोपी मोहिते याचा खून झाल्याने अशोकनगर भागातील गँगवारने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातच मोहिते हत्या प्रकरणातील सर्रात असलेले संशयित आरोपी रोशन काकड, दिपक भालेराव, बाळू नागरे यांचा अद्यापही तपाल पोलिस लावू शकलेले नाहीत. भविष्यात मोहितेच्या हत्येनंतर पुन्हा गँगवार होणार नाही, याची दक्षता पोलिसांनाच घ्यावी लागणार आहे.

तो मृतदेह राजू गुप्ताचा

वासाळी रस्त्यावर शनिवारी (दि. ४) तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खडबळ उडाली होती. यात पोलिसांनी चौकशी केली असता, तो मृतदेह राजू गुप्ता या तरुणाचा असल्याचे सांगितेल. संबधित तरुणाचा पोहतांना मृत्यू झाल्याचे समजले. राजू श्रमिकनगरमध्ये राहत होता. पोहण्यासाठी पाण्यात उडी मारल्याने दगड लागला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना वासाळी रस्त्यावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. परंतु, गुप्ताच्या कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

अशोकनगर, श्रमिकनगरला रोजच चोऱ्या

राज्यातून नव्हे तर देशभरातून कामाच्या निमित्ताने अशोकनगर व श्रमिकनगर भागात नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु, येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तो रोजच होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांचा. यात स्थानिक पातळीवर राजकीय किंवा वजनदार व्यक्ती नसल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच श्रमिकनगर भागात पुन्हा घरफोडी झाली. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी चोऱ्या करणारे परिसरातील टवाळखोर असल्याचे पोलिसांना सांगितले होते. तसेच पेट्रोलिंग करतांना पोलिसांनी खाजगी वाहन वापरण्याची विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहास स्मारकात म्हसोबाचे ‘कारण’

$
0
0

गंगापूररोडवरच्या जुन्या पंपिंग स्टेशनमधील प्रकार; महापालिका अनभिज्ञ

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

गंगापूररोडवरील प्रस्तावित इतिहास स्मारकात रविवारी म्हसोबाच्या कारणाखाली मटणपार्टी पार पडली. दिवसभर 'कारणाची' लगभग सुरू होती. विशेष म्हणजे याबाबत महापालिका अधिकारी अनभिज्ञ होते. भविष्यात येथे कुणी 'ओल्या पार्टी'चे आयोजन केल्यास सर्वसामान्यांना नवल वाटणार नाही.

गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनच्या परिसरात महापालिकेने इतिहास स्मारक करण्याचे नियोजन आखले आहे. मात्र, हे काम अद्यापपर्यंत पूर्णत्वास गेलेले नाही. त्यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येथेच तयार करण्याची मागणी शिवसेनेने मध्यंतरी केली. काही शिवसैनिकांनी इतिहास स्मारकाच्या जागी 'बाळासाहेब ठाकरे स्मारक ऐतिहासिक संग्रहालय' असा बोर्डही चढवून दिला. शिवसेना आणि मनसे या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक दिवस वाकयुध्द रंगले होते. मात्र, राजकारणाव्यतिरिक्त पक्षांनी काहीच ठोस भूमिका घेतली नाही. रविवारी दुपारच्या सुमारास शीतपेयाच्या बॉटल्या, मद्याच्या बाटल्या तसेच इतर खाद्य पदार्थांची पाकिटे इतस्थ आढळून आली. स्मारकात म्हसोबाचे कारण म्हणून मटण शिजवण्यात आले. मटणावर तब्बल ५० पेक्षा जास्त लोकांनी ताव मारला. स्मारकाच्या आत गेल्यानंतर समोरच तयार करण्यात आलेल्या चौथऱ्यावर महिलांनी भाकरी थापल्या. या ठिकाणी सुरक्षारक्षकही आढळून आला नाही. 'कारणा'च्या कारणासाठी महापालिका जागेचा वापर नि:शुल्क करून देते की शुल्क आकारते, याविषयाची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना सांगता आली नाही. महापालिकेचे अनेक प्रकल्प 'असून अडचण नसून खोळंबा' या प्रकारात मोडतात. त्यातच स्मारकाच्या जागेत जेवणाच्या पंगती उठत असतील तर उद्या सार्वजनिक उद्यानांमध्ये लग्नाचेही कार्यक्रम सहज पार पडू शकतील, अशी टीका परिसरातील नागरिकांनी केली.

मद्यपार्ट्या नित्याच्याच

गेल्या अनेक महिन्यांपासून याठिकाणी रात्रीच्या सुमारास मद्यपार्ट्या झोडल्या जातात. रविवारी दुपारच्या सुमारास शीतपेयाच्या बॉटल्या, मद्याच्या बाटल्या तसेच इतर खाद्य पदार्थांची पाकीटे इतस्थ आढळून आली. तिथे स्वच्छतेचा अभाव असून, अनेकदा गैरकृत्यांसाठी या जागेचा वापर होतो, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदारांना वेतन द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेवर कोट्यवधींचा खर्च करण्यऐवजी स्वस्त धान्य दुकानदारांना वेतन द्यावे, अशी मागणी ना‌शिक जिल्हा रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात संघटनेची बैठक झाली. या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांची उपस्थित होत्या. गोरगरीब तसेच सामान्य नागरिकांना धान्य मिळायला हवे असेच स्वस्त धान्य दुकानदारांना वाटते. परंतु, त्यासाठी सरकारकडून धान्याचा पुरेसा आणि वेळेत पुरवठा व्हायला हवा अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून विक्रेते अल्प कमिशनवर काम करीत आहेत. ही कमिशन पध्दती बंद करून त्याऐवजी सरकारने आम्हाला दरमहा २५ हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशी ग्वाही उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिली. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे, दिलीप मोरे, अशोक बोराडे, लक्ष्मण नवले, राजेंद्र घोडके, रवी काळे, स्वप्नील जैन आदी उपस्थित होते.

रेशनकार्ड अर्जामध्ये असंख्य चुका

काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक कार्डधारकाचा आधारकार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक संकलित केला जातो आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अर्जांमध्ये अनेक त्रूटी आहेत. त्यामुळे हे काम रेंगाळण्याची चिन्हे आहेत. अर्जावरील रकाने छोटे असून त्यावर क्रमांक लिहिणेही शक्य होत नाही. ज्या दुकानदारांकडे दोन तीनशे कार्डधारक आहेत. त्यांच्याकडे दीड दोन हजार अर्ज देण्यात आले आहेत. या त्रूटी दूर व्हाव्यात, अशी दुकानदारांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विल्होळीत गौण खनिजांची चोरी

$
0
0

पाच जणांना अटक; पोलिस व तहसीलची संयुक्त कारवाई

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

विल्होळी परिसरातील गट नंबर १५२ मधून गौण खनिजांची चोरी करणाऱ्या पाच जणांना नाशिक तालुका पोलिसांनी अटक केली. पोलिस आणि तहसील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे रविवारी दुपारी छापा टाकला. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन ट्रक, ब्लास्टिंग मशिन, एक जेसीपी मशिन व दोन डंपर जप्त केले असून, तीन वाहनमालक फरार झाले आहेत.

विल्होळी परिसरातील दगडाच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची तस्करी होत असल्याची माहिती तहसीलदार गणेश राठोड यांना मिळाली होती. मात्र, अनेकदा छापे मारूनही संशयित आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरले होते. आज, दुपारी तहसीलदार राठोड व पोलिसांना पक्की खबर मिळाली. त्यानंतर दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास संयुक्तपणे छापा मारला. यावेळी सुरेश गुरूप्रसाद जल्ली (चालक), राजू गायकवाड (चालक), आण्णा लष्करे (चालक व मालक), मदन रसाळ (चालक) आणि बाळ बद्रे (चालक) यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. त्यांच्याकडील दोन ट्रक, ब्लास्टिंग मशिन, एक जेसीपी मशिन व दोन डंपर जप्त करण्यात आले. या वाहनांच्या मालकांपैकी दिलीप पाटील, मोहन वामन भावनाथ तसेच राजू बद्रे फरार झाले आहेत. सातपूर परिसरातील दिलीप पाटील वगळता इतर सर्व संशयित विल्होळी परिसरातील रहिवाशी आहेत.

संशयित केव्हापासून खनिजांची तस्करी करीत होते, याचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी कलम ३७९, ५११ व महाराष्ट्र गौण ​खनिज कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. कारवाईत पोलिस ​उपनिरीक्षक राजकुमार उपासे, एएआय ढुमसे, तहसीलदार गणेश राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानपीठराव, संबळ अन् गिरणा गौरव

$
0
0

>> अशांत किरकिरकर

ज्ञानपीठराव ठरलेले प्रा. भालचंद्र नेमाडे इतक्या मोठ्या उंचीचे झाले असताना गिरणा गौरवसारखा मातीतला पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार का? असा प्रश्न समस्त नाशिककर एकमेकांना विचारीत असताना संबळाच्या गजरात नेमाडे यांचे कालिदासला आगमन झाले. नेमाडेंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ज्ञानपीठ जाहीर झालेला नसताना त्यांनी गिरणा प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी येण्याचा शब्द दिला. ते आले, त्यांनी अत्यंत नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारला व मोबदल्यात प्रचंड अशा उंचीचे विचारही दिले. साहित्य संमेलनासाठी घुमानला रेड कार्पेट अंथरलेले असताना हा माणूस नाशिकला येत नाही म्हटले तरी (त्यांच्या मानाने) हा छोटा जीवनगौरव स्वीकारतो म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या गतीपर्यंत येऊन पोहोचलेला तो वाटत रहातो.

भालचंद्र नेमाडे हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले व्यक्तिमत्त्व. विशेष म्हणजे हे वादग्रस्तपण त्यांनी कधीही नाकारलेले नाही. संशोधनामध्ये काठोकाठ बुडून गेलेला हा माणूस सामान्यांच्या पातळीवर येऊन त्यांच्याशी त्यांच्यासारखेच बोलतो. रोजच्या जगण्याला सुसह्य करणारे काहीतरी नवीन सांगतो म्हणजे नक्कीच त्याच्यातला दम आपण मानला पाहिजे. त्यांचा नम्रपणा कधी जाहीर होतो तर त्यांना पुरस्कार देणारा शेतातला एक साधा शेतकरी, भास्कर गुंजाळ त्यांना लवून नमस्कार करतो, तर नेमाडे त्यांच्या पायाला हात लावून त्यांना पुन: नमस्कार करतात. यात त्यांचा नम्रपणा आहे. संबळ वाजवून श्रोत्यांमध्ये चैतन्य भरणारा कृष्णा साबळे त्यांना एका तालात संबळ वाजवून दाखवतो तेव्हा ते अत्यंत प्रामणिकपणे त्याच्या जवळ जात त्याच्या पाठीवर हात ठेवतात व त्याचा सत्कार करतात. यात त्यांचा नम्रपणा आहे. मागील श्रोते जेव्हा आवाज येत नाही हो म्हणून मोठ्याने बोंब ठोकतात तेव्हा माझा आवाज बंद करू का? असे विनोदी स्वरात विचारतात तेव्हा त्याचा नम्रपणा जाहीर होतो. नेमाडे खऱ्या अर्थाने असे मोठे वाटत रहातात. नेमाडे म्हणतात, गावाबाहेर कशाला मोठेपणा शोधायचा, त्यासाठी मुंबई, दिल्ली कशाला जायचे? येथेच, आपल्या गावात मोठेपणा आहे. तळाशी रहायला शिका, तळात माती असते, तळात गवत असते, छोटी रोपटे असतात. शिखरावर बर्फ असतो तेथे जाऊ नका. तेथे ऑक्सिजन नाही, तेथे माणूस बेशुध्द पडतो. किती साधे सोपे तत्त्वज्ञान. आता शेतकऱ्यांनीच बंड करून उठले पाहिजे हे जितक्या साधेपणाने ते सांगतात तितक्याच साधेपणाने ज्ञानेश्वर पहिला बंडखोर नाहीये हो, तो आपल्याला माहीत असलेला बंडखोर आहे. त्याच्याआधी शेकडो होऊन गेले, विशेष म्हणजे ते सगळे गोदावरी व तापी खोऱ्यातले होते. त्याच्या आधी १२०० वर्षे प्राकृत भाषा होती. तिला जपण्याची वेळ आता आली आहे. आपली मराठी भाषा ज्यापासून उत्पन्न झाली ती प्राकृत काळाच्या उदरात गडप होत चालली आहे, तिला वाचवा असा टाहोही ते फोडतात. जैन लोक डोंगरावर जाऊन खाली असलेल्या समाजाविषयी चर्चा का करतात? असा प्रश्न एकाला विचारला असता त्याने जैनांबद्दल अनुद्गार काढले त्याला समज देताना पाश्चात्यातील एक विद्वान म्हणतो की, जैन धर्म खूप आधीचा आहे. अगदी बुध्दांनाही जैनांनी अहिंसा शिकवली होती येथपर्यंत नेमाडे सांगतात. शेवटी ते म्हणतात की, आपली नवता आपण आपल्या परंपरेतून शोधले पाहिजे. सतीची चाल अकबराने बंद केली होती, नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी पुन्हा आपल्या धर्मात घेतले होते याचा विचार करा व आजची पाऊले टाका असा उपदेशही ते देऊन जातात. त्यांचे हे विचार ऐकल्यावर कळते की नेमाडे ज्ञानपीठराव का आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतारा ठरताहेत धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पवननगर प्रभाग क्रमांक ४६ मधील आनंदनगर, लोकहिताय चौक, दत्तचौक तसेच प्रभाग क्रमांक ४३ येथील परिसरात विद्युत तारांचे मोठे जाळे पसरले आहे. या विद्युत तारा रहिवाशांच्या घरालगत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे विद्युत तारा भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी लोकहिताय संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

सिडकोतील बहुतांश भागात विद्युततारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक भागात विद्युत तारा घरांना लागूनच आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी दहा वर्षाय मुलीचा पोलवरील उघड्या विद्युत तारांच्या वीज प्रवाहामुळे मृत्यू झाला होता. त्यांनतर विद्युत कंपनीने सिडकोतील अनेक भागात विद्युत तारा भूमिगत केल्या. परंतु, पवननगर प्रभाग क्रमांक ४६ मधील आनंदनगर, लोकहिताय चौक, दत्तचौक तसेच प्रभाग क्रमांक ४३ येथील परिसरातील तारा पूर्णतः विद्युत तारांनी व्यापलेला असतानाही वीज कंपनीचे याकडे लक्ष नाही. गेल्या महिन्यात समता चौकात विद्युततारा तुटून फार मोठा अपघात झाला होता. असाच अपघात इतरही होण्याची दाट शक्यता आहे.

अनेक भागात विद्युत तारा घरांच्या गॅलरीला लागूनच आहेत. सिडकोच्या घरांचे बांधकामव उंचा वाढविल्यामुळे विद्युत तारा घराला लागूनच आहेत. यामुळे अपघातातच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

समितीच्या मागण्या

पवननगर प्रभाग क्रमांक ४६ मधील आनंदनगर, लोकहिताय चौक, दत्तचौक तसेच प्रभाग क्रमांक ४३ येथील परिसरातील विद्युत तारा भूमिगत कराव्यात.

लोकहिताय चौकामधील महापालिकेच्या शाळेलगर असलेले विद्युत जनित्र इतरत्र हल‌विण्यात यावे.

वीजतारांना सेफ्टीपाईप बसविण्यासाठी घेतलेले एक ते दोन हजार रुपये वीज कंपनीने परत करावते.

वीज बिल ग्राहकांना किमान पंधरा दिवस आधी मिळावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूमाफियांचा अधिकाऱ्यांवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, जळगाव

वाळूमाफियांची दहशत पुन्हा वाढली असून, शिरसोली- मोहाडी रस्त्यावर गौणखनिजांची चोरी रोखण्यासाठी पेट्रोलिंग करीत असलेल्या मंडल अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांवर डम्पर नेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. डम्पर तहसील कार्यालयात जमा करण्याचे सांगितल्याचा राग आल्याने अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली- म्हसावद भागात गौणखनिजांची चोरी रोखण्यासाठी महसूल अधिकारी व तलाठी यांच्या पेट्रो‌लिंगच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीपासून मंडल अधिकारी राहुल मधुकर नाईक, तलाठी घनश्याम लांबोळे, तलाठी आर. टी. वंजारी व तलाठी के. एम. बागूल आय टेन कारमधून पेट्रोलिंग करीत होते. शिरसोली, म्हसावद, लमांजन भागात पाहणी केल्यानतंर ते अनुभूती शाळेजवळील शिरसोली- मोहाडी रस्त्यावर आले. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता त्यांना वाळू भरलेला डम्पर (एमएच १९/ झेड ४७३६) त्यांनी थांबविला. चालक राजू आत्माराम कोळी (वय ३०, रा. वडगाव) याला खाली उतरवले. त्याच्यासोबत डम्परमालकाचा पुतण्या धनराज कोळी खाली उतरला. डम्परचालकाकडे पावती नसल्याने, तसेच रात्री वाहतुकीस बंदी असल्याने त्यांना डम्पर तहसील कार्यालयात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अधिकारी थोडक्यात बचावले!

चालक माहिती देत असताना सोबत असलेल्या धनराजने, अधिकाऱ्यांना डम्पर कुठेच नेणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मंडल अधिकारी राहुल नाईक यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्कीही केली. चालक राजू याच्याकडून डम्परची किल्ली हिसकावून त्याने डम्पर सुरू केला. डम्पर रिव्हर्स घेऊन त्याने वाळू रिकामी केली. त्यानंतर डम्पर पुन्हा सुरू करून तो रस्त्यावर थांबलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव आणला. त्यातून बचाव करीत अधिकारी आपल्या कारमध्ये बसले आणि कार रोडवरून खाली नेत स्वतःचा बचाव केला. त्यानंतर धनराज डम्परसह फरारी झाला. अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन चालक राजूला त्यांच्या ताब्यात दिले.

गुन्हा दाखल

या प्रकरणी मंडल अधिकारी राहुल नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पो‌लिसांत संशयित राजू कोळी व धनराज कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे तपास करीत आहेत. संशयित चालकास घेऊन पोलिसांनी आज दुपारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. फरारी धनराज यांचा शोध सुरू आहे.

..तर वाचलो नसतो!

या घटनेबाबत माहिती देताना अधिकारी राहुल नाईक, तलाठी घनशाम लांबोळे, आर. टी. वंजारी व के. एम. बागूल यांनी, हटलो नसतो, तर आम्ही वाचलोच नसतो, अशी प्रतिक्रिया 'मटा'शी बोलताना दिली. छोट्याशा रस्त्यावर उभे असताना डम्पर रिव्हर्स घेऊन खूप अंतरावर वाळू रिकामी करण्यासाठी गेलेल्या धनराजने डम्पर भरधाव आमच्याकडे आणत असताना क्षणातच आम्ही कारमध्ये बसून गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यामुळे थोडक्यात बचावल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्याची ५९ दुकाने पडली बंद!

$
0
0

२९ रमिट रूम, १६ बियर शॉप बंद

अरविंद जाधव, ना​शिक

गेल्या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील मद्याची ५९ दुकाने परवाना नूतनीकरण केला नाही म्हणून बंद करण्यात आली. यात २९ परमिट रूम, १६ बियर शॉपी आणि एका देशी-विदेशी मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे.

साधारणतः हमखास पैसा जमा होणारा व्यवसाय म्हणून मद्य विक्रीचे दुकान किंवा परमिट रूम सुरू केले जाते. परमिट रूम, वाइन शॉप, बियर शॉपच्या परवान्यासाठी अशरक्षः मारामार होते. मात्र, परवाना शुल्क व नंतर येणारा खर्च यामुळे मद्य व्यवसाय सहजतेने सुरू होत नाही. तसेच, झाला तरी परवानाधारकास वर्षानंतर 'लायसन्स फी' भरून परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. याबाबत माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, लोकसंख्या व ठिकाण यानुसार ही लायसन्स फी आकारली जाते. शहरातील मद्य विक्रीच्या दुकानासाठी हे शुल्क जवळपास ७ लाख ६२ हजार इतके आहे. तेच परमिट रूमसाठी ४ लाख ६७ हजार तर बियरशॉपसाठी १ लाख ८७ हजार रुपये इतके आहे. मद्य विक्रीचे दुकान सुरू ठेवणे तुलनेत परमिट रूमपेक्षा सोपे आहे. परमिट रूमसाठी मालकास चांगली सेवा पुरवावी लागते. त्यावरच ग्राहकांची संख्याही अवलंबून असते. काही कारणांमुळे ग्राहकांची संख्या रोडवल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. मग, वार्षिक परवान्याचे शुल्कही जमा होत नाही. त्यामुळे परमिट रूम बंद करण्याशिवाय पर्याय नसतो, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गत आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल २९ परमीट रूम बंद झाले. बियर शॉपीबाबत देखील तिच ओरड असून, वर्षभरात १६ बियर शॉपी मालकांना दुकानांना ताळे ठोकण्याची वेळ आली. तर, एक मद्य विक्रीचे दुकान परवाना नूतीनकरण न केल्यामुळे बंद झाले. आगामी काळात यातील काही व्यावसायिक परवाना नूतनीकरण करण्यासाठी पुन्हा येऊ शकतात. अशावेळी शुल्क व त्यावरील व्याज आकारून परवान्याचे नूतनीकरण करून देता येते. मात्र, तोपर्यंत संबंधित दुकान किंवा हॉटेल बंदच ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

महसुलातही घट

गत आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलातही घट झाल्याचे समोर आले आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात नाशिक विभागाला १ हजार ४३७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात वर्षाअखेर १ हजार २४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न २०१३-१४ या वर्षापेक्षाही कमी आले. या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला १ हजार २९३ कोटी रुपयांचे उत्पन्न हाती आले होते. मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी फिरवलेली पाठ, हे महसूल घटण्यामागचे मुख्य कारण ठरले. गत आर्थिक वर्षात मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दोन महत्वाचे प्लांट दुसरीकडे हलवण्यात आल्याचे, या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुके नव्हे, धूळच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात रविवारी पहाटेपासून धुळकट वातावरण झाल्याने वातारणात धुळ आहे की धुके याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले. अनेकांनी एकमेकांना फोन करुन व व्हॉट्सअपद्वारे विचारपूस करीत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

अवकाळी पावसाचा तडाका ओसरल्यानंतर उन्हाचा तडाका वाढू लागला. रविवारी सकाळी मात्र वातावरणात अचानक कमालीचा बदल झाल्याने निरभ्र आकाशाची जागा धुळीच्या साम्राज्याने घेतली. सकाळी सुरू झालेले धुळीचे वादळ सायंकाळी शांत होताना दिसले.

शनिवारी आकाश निरभ्र असताना रविवारी पहाटे अचानक अकाशात धुळीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे रविवारी सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांना काही वेळात पाऊस पडणार असे वाटले. मात्र, दुपार होऊनही वातावरणात बदल न झाल्याने मैदानावर व लांबवरून धुळीचे लोट येताना दिसले. इमारतींच्या गच्चीवरुन नजर टाकली असता रोज दिसणारी पांडवलेणी, चामरलेणी, रामशेजचा किल्ला दिसेनासा झाला. या ठिकाणी फक्त धुळीचे लोट दिसत होते.

दम्याचे आजार असलेल्यांना या वातावरणाचा त्रास झाला अनेकांना बोलतांना खोकल्याची उबळ येत होती तर लहान मुलांना देखील या वातावरणाने त्रास होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे होते. धुळेचे लोट दिसत असले तरी त्याचे अस्तित्व जाणवले नाही. अखाती देशांमध्ये आलेल्या धुळीच्या वादळाचे हे परिणाम असू शकतील असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले. या अगोदरही दोन वर्षापूर्वी वातावरणात बदल झाल्याने असे वातावरण तयार झाले होते; मात्र त्यावेळी धुळीचे अस्तित्व जाणवत होते. यावेळी धुळीचे अस्तित्व दिसत नसल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला. नाशिक शहरातील म्हसरुळ परिसरात धुळीचे लोट येताना दिसत होते शहरातील मोकळ्या परिसरात याचे प्रकर्षाने अस्तित्व जाणवले.

वातावरणातील धुळीने आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे विषाणूंची वाढ होणार असून अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे डोकेदुखी, त्वचाविकार वाढणार आहे. धुलीकण डोळ्यात गेल्याने चूरचूर वाढणार असून इजा होण्याची शक्यता आहे त्याच प्रमाणे दमा असल्याने याची काळजी घ्यावी.

- डॉ. दिपाली देसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरपाईपोटी हवेत आणखी ७२ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सप्टेंबर ते मार्चदरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून सुमारे ७२ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. नुकसानभरपाईची ही रक्कम मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर म‌हिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ५५ कोटी रुपये प्राप्त झाले. पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असले तरी नुकसानग्रस्तांना अजून मदत प्राप्त होऊ शकलेली नाही. नोव्हेंबरपूर्वी झालेल्या पावसाबाबत तसेच जानेवारीनंतर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून निधी मिळू शकलेला नाही.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे ५६२ गावे बाधित झाली होती. तेथील ९४ हजार ६५९ शेतकऱ्यांचे ३९३४४.१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सप्टेंबरमध्ये १०१६ शेतकऱ्यांच्या १८०.१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये १९४१ शेतकऱ्यांचे ९९६.९४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. फेब्रुवारी २०१५ मध्ये २० हजार ८५९ शेतकऱ्यांचे १९५५.४७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसला. तर मार्चमध्ये सर्वाधिक १५ हजार ५२२ शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांची ६०३१ हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्‌ध्वस्त झाली. १० ते १४ मार्च या कालावधीत बेमोसमी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे ३०१८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. मात्र, शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत प्राप्त झालेली नाही. ही मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी भाषेवर बंदी आणा

$
0
0

भालचंद्र नेमाडे यांचे प्रतिपादन; गिरणागौरव पुरस्काराचे वितरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंग्रजी शाळांचे आक्रमण ही चिंतेची बाब आहे. साम, दाम, दंड, भेद वापरा परंतु इंग्रजीचे हे वर्चस्व झुगारून द्या. आपल्या मुलांना मराठी शाळेत घाला, इंग्रजी शाळेत घालून त्यांचे प्राण घेऊ नका, अफूवर जशी बंदी घालण्यात आली आहे. तशी आपण एकजूट करून इंग्रजीवर बंदी आणण्यासाठी चळवळ उभी करा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार घोषित, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पहिला जीवनगौरव पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अत्यंत वेगळ्या पध्दतीने विसापूर (ता. कळवण) येथील शेतकरी दाम्पत्य भास्कर गुंजाळ व सरस्वती गुंजाळ यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पुरस्काराला उत्तर देताना नेमाडे म्हणाले, की इंग्रजी ही भाषा म्हणून शिकण्यासाठी हरकत नाही; परंतु तिचा दबाव घेण्याचे कारण नाही. आपण जगाचे जितके आकलन आपल्या मातृभाषेतून करू शकतो तितके इतर कोणत्याच भाषेतून करून शकत नाही. दीडशे वर्षे ज्यांनी आपल्यावर राज्य केले त्यांचा पगडा सोडायलाच आपण तयार नाही. अगदी झोपडपट्टी इंटरनॅशनल स्कूल नावाने इंग्रजी शाळा सुरू झाली तर त्यात आपल्या पाल्याचे अॅडमिशन घ्यायला आपण मागेपुढे पहाणार नाही, असेही नेमाडे म्हणाले.

नेमाडे म्हणाले, की शहरी माणूस हा आयते खाणार असतो त्यामुळे त्याने आता शेतकऱ्यांसाठी टॅक्स देण्याची गरज आहे. त्याला शेतकरी टॅक्स असेच संबोधण्यात यावे. त्यासाठी मी आता चळवळ उभारण्याच्या तयारीत आहे. अडाणी, असंस्कृत लोकांनीच आतापर्यंत संस्कृती टिकवली आहे. ते आतापर्यंत वहात असलेला संस्कृतीचा भार आता आपण आपल्या खांद्यावर घ्यायला हवा. नवता ही परंपरेतच असते, बाहेर कोठेही नसते हे समजून घ्यावे असा सल्लाही नेमाडे यांनी यावेळी दिला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आनंद अॅग्रोचे उध्दव आहेर, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार यांची उपस्थिती होती. दीपक चव्हाण लिखित 'बांधावरचा उद्योजक' या पुस्तकाचे व सुगंधदान या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उध्दव आहेर म्हणाले, की गारपीटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून सावरायला हवे, आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायला हवा. आत्महत्या करण्यापेक्षा उभारी घेऊन दाखवावी, त्यातच शेतकरी राजाचे कल्याण सामावलेले आहे.

याप्रसंगी सुरेश खानापूरकर, संजय पाटील, विजय हाके, विलास पाटील, दीप्ती राऊत, सुभाष नंदन, डॉ. दिग्विजय शहा, स्मिता तांबे, कृष्णा बच्छाव, अभिमन जाधव, सुनीता पाटील अविनाश भामरे, प्रतिभा होळकर, व कवी कमलाकर देसले यांचा गिरणा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पूरस्कारमूर्तींच्या वतीने स्मिता तांबे व कमलाकर देसले यांनी छोटेखानी भाषण केले.

वैशाली आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पवार व दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन तर नेमाडे यांचा दीपक करंज‌ीकर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. पुरस्कार स्विकारताना संबळ वाजविण्याची विलक्षण कल्पना यावेळी राबविण्यात आली. ते वाजविणारे कृष्णा साबळे व पार्टीचा सत्कार यावेळी नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

डोळ्यांना सुखावणारे नेपथ्य

कलादिर्ग्शक अरुण रहाणे यांनी संपूर्ण कालिदास कलामंदिराचा वापर करून डोळ्यांना सुखावणारे नेपथ्य तयार केले होते. यात कलामंदिराच्या मेनगेटवर चंद्रमौळी झोपडीसारखे साकारण्यात आले होते. मेनगेटमधून आत येताच वडाच्या झाडाचा चौथरा व त्यावर स्थापित ग्रामदेवता अशी रचना करण्यात आली होती तर स्टेजवर आदिमाया सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराची कमान व प्रतिमा ठेवण्यात आली होती.

पुढचे साहित्य संमेलन काश्मिरमध्ये

अगदी मराठीचा वास जेथे येईल तेथे साहित्य संमेलन भरविण्याची प्रथा साहित्य परिषद पाडत आहे. त्यामुळे पुढील संमेलन जम्मू-काश्मिरमध्ये भरवले गेले तर त्याचे नवल वाटायला नको अशी कोपरखळी भालचंद्र नेमाडे यांनी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images