Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पर्यटकांनी बहरले नाशिक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय सुट्यांमुळे शहरातील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून, रामकुंड तसेच शहरातील पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली आहे. आगामी सिंहस्थामुळे यावर्षी पर्यटकांचे प्रमाण जास्त असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

मुलांना शाळेला सुट्या लागल्याने शहरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पंचवटी व शहरातील प्रमुख हॉटेल व लॉज १५ जूनपर्यंत आरक्षित झाले आहेत. नाशिक बरोबरच नाशिकरोड, वणी, देवळाली कॅम्पचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला असून, हॉटेल व्यवसायाला हुरूप आला आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर बहुसंख्य नागरिक उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटनासाठी बाहेर पडतात. नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्याने असल्याने अनेक भाविकांचा ओढा नाशिककडे असतो. नाशिक हे थंड हवेचे ठिकाण असल्याने देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद नागरिकांना लुटता येतो. त्यामुळे सध्या पर्यटकांची नाशिकला पसंती आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे बाजारात नवचैतन्याचे वातावरण आहे. महाराष्ट्राबरोबरच परराज्यातून चांगली गर्दी होत आहे. छत्तीसगढ, उत्तरांचल, गुजरात, आसाम या राज्यातून भाविक पंचवटीतील काळाराम मंदिर, सितागुंफा, कपालेश्वर येथे भेटीसाठी येत आहेत. परराज्याबरोबरच परदेशी पर्यटकांचा वावर वाढला आहे.

पार्किंग अपुरे

परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी महापालिकेने गोदाघाटावरील म्हसोबा पटांगण येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे. परंतु, या ठिकाणीही गर्दी होत असल्याने पार्किंगची जागा अपुरी पडू लागली आहे. काही यात्रेकरूंनी महापालिकेचे पार्किंग सोडून अन्यत्र पार्किंगला प्राधान्य दिले आहे.

नाशिकरोडला गर्दी

रेल्वेस्टेशनपासून मुक्तीधाम जवळ असल्याने बाहेरून आलेले भाविक मुक्तीधाम किंवा आसपासच्या लॉजमध्ये राहून नाशिक दर्शनाला पसंती देत असतात. यामुळे नाशिकरोडची हॉटेल्सही फुल्ल होण्याच्या मार्गावर असून मुक्तीधामच्या बाजूला असलेले भोजनालये, खानावळी, हॉटेल, यात्रेकरूंच्या गर्दीमुळे भरले आहेत.

मुक्तीधाम परिसरातल्या ट्रॅव्हल व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले आहेत. या भागातून वणी त्र्यंबकेश्वर, शिर्डीला जाण्यासाठी गाड्यांना चांगली मागणी आहे. मुक्तीधाम परिसरातले पार्किंग अनेक दिवसांपासून फूल झाले आहे. वाहनचालकांना गाड्या अनेकवेळेस शाळा क्रमांक १२५ च्या ग्राऊंडलगत उभी करावी लागत आहेत.

मुक्तीधाम परिसरात असलेले गोकूळ वृंदावन, मथुरा, आयोध्या, गोवर्धन, चित्रकुट निवास संकुलातील १६२ सदनिका फूल आहेत. मुंबईतील पर्यटकांनी देवळाली कॅम्प परिसरातील गेस्ट हाऊस, हॉटेल्सला जास्त पसंती दिली आहे. खंडोबा टेकडी, सावरकर जन्मस्थान, कावनाईच्या पुरातन मंदिर बघण्यासाठी नाशिकरोडहून जात

आहे. तसेच नाशिकच्या धार्मिक स्थळाबरोबरच देवळाली कॅम्पच्या आर्टीलरी सेंटरचे वस्तू संग्रहालय बघण्यासाठी नागरिक जात आहेत. नाशिकरोड हे प्रवासाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने या भागात वास्तव्यासाठी पर्यटक पसंती देत आहे.

गंगाघाटावर रिक्षाचालकांकडून लूट

नाशिक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्थानिक रिक्षाचालकांकडून लूट होत असून, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहेत. म्हसोबा पटांगणावर आलेल्या भाविकांना कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सितागुंफा, तपोवन अशी ठराविक ठिकाणे दाखवून चारशे ते पाचशे रुपयांची आकारणी केली जात आहे. भाविकांची लूट होऊ नये यासाठी येथे पर्यटन विभागाच्यावतीने सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटन अभ्यासक्रमाची विद्यापीठांना अॅलर्जी

0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

पर्यटन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्या तरी राज्यातील विद्यापीठांच्या नाकर्तेपणामुळे या क्षेत्राला आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती होत नसल्याची बाब समोर आली आहे. केवळ डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध करून विद्यापीठ समाधान मानत असले तरी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील पदवी मिळविण्यासाठी परराज्यातील विद्यापीठांचा रस्ता शोधावा लागत आहे.

हॉटेलची एक रूम तयार झाली तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दहा जणांना रोजगार मिळतो आणि एका पर्यटकामुळे किमान तीन ते चार जणांना त्याचा लाभ होतो, असे सूत्र वारंवार सांगितले जाते. त्यामुळेच केंद्र सरकारने इन्क्रेडेबल इंडिया या घोषवाक्याखाली जोरदार पर्यटनाचे ब्रँडिंग सुरू केले आहे. महाराष्ट्र सरकारही विविध प्रकारच्या घोषणा करून पर्यटनाला चालना देण्याची ग्वाही देत असते. मात्र, या क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार होत नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अपवाद वगळता राज्यात एकाही विद्यापीठाने पर्यटनाचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला नाही. मराठवाडा विद्यापीठातही पदवीसाठी मोजक्याच जागा असल्याने विद्यार्थ्यांना परराज्यातील विद्यापीठांचा रस्ता धरावा लागत आहे. राज्यातील विद्यापीठांनी डिप्लोमानंतर थेट पदव्युत्तर शिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड होत आहे. परिणामी, पर्यटनाचे शिक्षण न घेण्याचा कलही वाढत आहे. ही बाब मात्र, पर्यटन उद्योग आणि व्यवसायावर परिणाम करणारी ठरत आहे. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात हजारोच्या संख्येने पर्यटक येणार असले तरी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींची (गाईड) मोठी वानवा असल्याचे दिसून येत आहे.

'मुक्त'कडून आशा

शिक्षणापासून वंचित असलेल्यांसाठी कार्य करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आता कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी मोठा पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाकडे सध्या पर्यटनाचा अभ्यासक्रम नसल्याने तो उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना मोठी आशा आहे.

पर्यटन हा उद्योग असून, तो दुर्लक्षितच आहे. व्यासायिक दृष्टिकोनातून त्याकडे पहायला हवे. पैसा आणि रोजगाराच्या मोठ्या संधी असल्या तरी विद्यापीठांनी उत्तम असे अभ्यासक्रम या क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिलेले नाहीत. - दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

पर्यटनाचे विविध अभ्यासक्रम होणे गरजेचे आहे. तरुणांना या क्षेत्राबद्दल मोठे आकर्षण आहे. अभ्यासक्रम उपलब्ध झाले तर या क्षेत्राला आवश्यक ते कुशल मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात मिळेल.

- प्रा. महेश पठारे, पर्यटन विभाग, एचपीटी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचारावर पडदा!

0
0

जिल्हा बँकेच्या सत्तेच्या मलिद्यासाठी सहकारीच बनले विरोधक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'विना सहकार, नाही उध्दार' हा मंत्र जपणाऱ्या जिल्हा बँकेवरील जुन्याच पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पॅनल निर्मिती करीत नव्या चुली मांडल्या आहेत. या चुली मांडताना तीनही पॅनलच्या अजेंड्यावर आगामी काळातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भर दिला जात आहे. मात्र, बँकेच्या भूतकाळाविषयी अद्याप एकाही पॅनलने भाष्य केलेले नाही. परिणामी, आपसात विरोधात असणाऱ्या तीनही पॅनलमधून जिल्हा बँकेच्या गत वादग्रस्त कारभारावर पडदा टाकण्याचेच धोरण प्रतिस्पर्ध्यांनी स्वीकारले आहे का? अशी चर्चा सभासदांमध्ये झडू लागली आहे.

जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणून जिल्हा बँक परिचित आहे. काही वर्षांपासून बँकेच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे बँक चांगलीच चर्चेत आली. सहकार आयुक्त, मंत्री आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे बँकेच्या कारभाराची तक्रार झाल्यानंतर सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली. आता पुढील पंचवार्षिक कालावधीसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी आता तीन पॅनल रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांची वर्गवारी सभासद करताहेत.

या पूर्वीच्या कालावधीत हातात हात घालून बँकेची सूत्र सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीच स्वतंत्र पॅनल निर्मितीला चालना दिल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. बँकेच्या कारभारावर नाराज संचालकांनी बोट ठेवत न्याय मागण्यासाठी घेतलेल्या भूमिकेनंतर बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांवर विविध आरोप झाले. तर, अध्यक्षांना पाठीशी घालण्याचे काम काही संचालकांनी केले. तत्कालीन आमदार आणि बँकेचे संचालक माणिकराव कोकाटे यांच्यासह काही संचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे बँकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. कॉम्प्युटर खरेदी, फर्निचर आणि इतर सोयी-सुविधांद्वारे पैशांची उधळपट्टी करण्याचे प्रकार बँकेच्या वर्तुळात वादग्रस्त ठरले. हा सारा प्रकार घडूनही सध्या सुरू असलेल्या निवडणुकीचे यासंदर्भात अद्याप अवाक्षरही काढण्यात आलेले नाही. ही बाब सभासदांना अचंबित करणारीच आहे.

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अव्दय हिरे यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे पॅनल निर्माण केल्यानंतर पाठोपाठ डॉ. सुनील ढिकले यांनी भूमिका स्पष्ट करीत त्यांच्या विरोधात दिवंगत उत्तमराव ढिकले पॅनलची ‌निर्मिती केली. यामुळे त्यांनी जुन्याच सहकाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. या पाठोपाठ कोकाटे यांच्यासह माजी खासदार देविदास पिंगळे यांनी शेतकरी विकास पॅनलची मोट बांधली आहे.

तीनही पॅनलमध्ये सत्ताधारी सदस्य

भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर झालेल्या आरोपांमधील प्रत्येकी काही संचालकच या तीनही पॅनलमध्ये आहेत. या विरोधाभासामुळे उध्दारासाठी सहकाराऐवजी असहकाराचा उलटमंत्र आता हेच नेते जपू लागल्याचे चित्र तिहेरी पॅनलच्या निर्मितीने स्पष्ट झाले आहे. बँकेचा वादग्रस्त कारभार यंदाच्या निवडणुकीत राहणारच नाही का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीट्सने आनंदाला उधाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वॉव... वंडरफुल... फॅन्टास्टिक... इटस डिफरन्ट... पुन्हा भेटू पुढच्या रविवारी... या आणि अशा कितीतरी उदगारांनी नाशिककरांची रविवारची सकाळ धम्माल करणारी ठरली. 'महाराष्ट्र टाइम्स' च्या वतीने कॉलेजरोडवर आयोजित 'हॅपी स्ट्रीट्स'ला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद देत हॅपी संडे साजरा केला.

रविवारची सकाळ आणि 'हॅपी स्ट्रीट्स'ची धम्माल असे समीकरण गेल्या काही दिवसांपासून नाशकात रूढ झाले आहे. टेन्शन फ्री लाईफची मजा लुटण्यासाठी पप्पा, मम्मी, दीदी, आजी आजोबा, चाचू असे सगळेच सकाळी डॉट सातला कॉलेजरोडवर हजर झाले. गेले दोन रविवार 'हॅपी स्ट्रीट्स' नाशिकरोडला झाल्यामुळे पुन्हा कॉलेजरोडला आयोजन होत असल्याने सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे रविवारी पहाटे नाशिककरांनी गर्दी केली. धमाकेदारम्युझिक सुरू झाल्यानंतर सगळ्यांच्याच पावलांनी ठेका धरला. वय विसरून अबालवृध्द डान्स, म्युझिक, मस्ती, गेममध्ये रममाण झाले. हरवलेले बालपण कुणाला सापडलं तर कुणाचे टेन्शन खल्लास झाले.

रस्ता म्हणजे केवळ वाहतूक किंवा अपघात नव्हे तर धम्माल मजा ही संकल्पना घेऊन आलेल्या या 'हॅपी स्ट्रीट्स'ला लोकांनी शब्दश: डोक्यावर घेतले. आपण टेन्शन फ्री व्हावं आणि दुसऱ्याचंही टेन्शन दूर करावं, मोबाईलचे, आफिसचे फॉर्मल लाईफ यांना थोडं बाजूला सारुन मजा करावी, स्वतःला एक्सप्रेस करावं या उद्देशाने 'मटा'ने ही संकल्पना मांडली. त्यामुळे नाशिकरांनी ही रविवारची सकाळी खऱ्या अर्थाने फूल टू एन्जॉय केली. हे सगळं एन्जॉय करता करता घड्याळामध्ये साडे नऊवर काटा कधी आला ते कळलंच नाही. गिटार बँड, पेटींग, मिमिक्री, संवाद, कविता सादरीकरण, सामाजिक मुद्द्यांवरील भाष्य, ज्युदो कराटे, बॅडमिंटन, स्केटींग, रोड पेंटिंग, टॅटू अशा विविध उपक्रमांनी मज्जा रंगतच गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठीतील तरुणाची अमेरिकेत धाव

0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

नाशिकच्या तरुण धावपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीची मोहर उमटवली आहे. मात्र, वयाची साठी पार केलेल्या दिलीप राठी यांनी जगातल्या अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत नाशिकचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा सराव असून येत्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची ते तयारी करीत आहे.

राठी यांना लहानपणापासून खेळाची आवड. रुंग्ठा हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना धावण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळवली. कालांतराने वकिलीचे शिक्षण घेताना धावणे थोडे मागे पडले, मात्र ओढ तीच. कॉलेज जीवनातही राठी यांनी बॅडमिंटन, चेस, सायकलिंगमध्ये विद्यापीठ स्तरावर पारितोषिक मिळविली. १९८१ पासून त्यांनी नाशिक न्यायालयात वकिली व्यवसायास सुरवात केली. यानंतर त्यांनी आपल्या आवडीला प्राधान्य देत गोल्फ क्लब येथे नियमित सराव सुरू केला. २०११ पासून २१ किलोमीटर मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत मित्र व महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांच्यासह प्रथम सहभागी झाले. या मॅरेथॉनमध्ये निर्धारित अंतर पार करण्यासाठी त्यांना ३ तास ३ मिनिटे लागलीत. पुढील वर्षी मात्र आपण निश्चित धावण्याचे टायमिंग कमी करू शकतो असा आत्मविश्वास यावेळी आला. सन २०१५ मध्ये अनवाणी पायांनी (बेअर फुट) २ तास ४ मिनिट वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. सन २०११ मधील मॅरेथॉनमध्ये गोल्फ क्लब ग्रुपमधून ते व यू. बी. पवार सहभागी झाले. नंतर मात्र त्यात दरवर्षी वाढ होवून सन २०१५ मध्ये महिला व पुरुष मिळून ७० जणांनी सहभाग घेवून यशस्वीरित्या मॅरेथॉन पूर्ण केली. सन २०१४ मध्ये दुबईत झालेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. तसेच २१ किलोमीटर झेंडूरन्स (सुला) मॅरेथॉन, ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन, मविप्र मॅरेथॉन देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या. सप्टेंबर २०१५ मध्ये सातारा येथे होणाऱ्या २१ किलोमीटर सातारा हिल मॅरेथॉनची नोंदणी केली असून त्याची तयारी सुरू आहे.

राठी ३५ वर्षांपासून बाराही महिने जॉगिंग व स्विमिंगही करतात. तसेच हिमालयातील एव्हरेस्ट व कालापत्थर, ओमपर्वत, कांचन गंगा, रुपकुंड, कैलास मानस, अमरनाथ, केदारनाथ यासारखे ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. जबलपूर युथ होस्टेलतर्फे आयोजित पंचमढी व पेंच ट्रेकमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच रतनगड, हरिश्चंद्रगड, कळसुबाई, रामशेज, राजमाची, ढाकभैरी, मार्कंडेय, माऊली वगैरे अनेक स्थानिक ट्रेक अनेकवेळा यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.

जून २०१५ मध्ये नेपाळ येथे होणाऱ्या अन्नपूर्णा सर्कीट ट्रेकसाठी त्यांचा सराव सुरू आहे. नाशिक ते पंढरपूर (दोन वेळा), शेगांव, कोटमगांव, सापुतारा, ठाणे सायकलवर प्रवास केला आहे. या पूर्वी कोणीही केली नाही अशी ब्रह्मगिरी सायकल प्रद‌क्षिणा पूर्ण केली. नोव्हेंबर २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानसाठी नाशिक ते गोवा (७०० किलोमीटर) सायकलवर प्रवास पूर्ण केल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे हस्ते पणजीत सत्कार झाला.

गेल्या ४० वर्षांपासून धावण्याच्या स्पर्धेत सहभाग होऊन इतरांनीही सहभागासाठी प्रोत्साहित करतो. धावणे हे सर्व व्याधींवर औषध आहे. धावणे हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मला जगातल्या अनेक प्रतिष्ठित‌ मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धांमध्ये माझ्यासह अधिका‌धिक नाशिककरांना सहभागी करून घेण्याचा मानस आहे.- दिलीप राठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी कर्नलला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या कर्नल विनोद सहानी याला नाशिकरोड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवार सुटीचा दिवस असूनही कर्नलला न्यायालयात हजर करण्यात आले.

देवळालीच्या संसरी लेन येथे राहणाऱ्या सहानी याने ३० एप्रिल रोजी मतिमंद मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला होता. १ मे रोजी पीडीत मुलीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून सहानी यांस देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. जिल्हा रुग्णालयात पीडित मुलगी तसेच कर्नल सहानी याच्या वैद्यकीय चाचण्यानंतर बलात्कार झाल्याचे निष्पन झाले. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी पोलिसांनी कर्नल सहानी यांच्या घराची तपासणी केली.

मुस्लिम बांधवांचे निवेदन

देवळालीच्या मुस्लिम बांधवांनी कर्नल सहानी यास कठोर शासन करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन सहायक पोलिस आयुक्त अतुलकुमार झेंडे यांना दिले. देवळाली कॅम्प शहर हे सर्वधर्म समभावाने नांदणारे शहर आहे. या शहरात लष्कराच्या जबाबदार अधिकाऱ्याकडून समाजाची शांती बिघडवणारे कृत्य घडले आहे. त्यामुळे समाजात संदेश जाईल असे शासन आरोपीला करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीसीचा सरकारलाही गंडा

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

राज्यातील लाखो गरीबांचे कोट्यवधी रुपये गिळून त्यांचे शिव्या-शाप घेणाऱ्या केबीसीने सरकारलाही चुना लावला आहे. सेवा करापोटी २७ लाख व त्यावरील व्याज आणि दंड मिळून सुमारे ५० लाख बाकी असल्याने केबीसीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रक्कम भरली नाही तर कंपनीची मालमत्ता जप्त करून वसुली केली जाणार आहे.

सहायक/उपायुक्त सेवाकर कार्यालयाच्या अतिरिक्त आयुक्त पंकजा ठाकूर यांच्या सहीने सेवाकर अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष केबीसीच्या गेटवर सहा पानांची नोटीस चिकटवली. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने डिसेंबर २०१३ मध्ये व्हॉलन्टरी कम्पलायन्स डिसक्लोजर स्कीम जाहीर केली होती. २००८ ते २०१२ या काळात ज्यांनी सेवा कर चुकवला, त्यांनी एक वर्षात म्हणजे डिसेंबर २०१४ पर्यंत तो भरला तर त्यांना दंड आणि व्याज माफी होती. केबीसीने विविध योजनांद्वारे ठेवीदारांकडून सुमारे एकवीशे कोटी जमा केले. त्यावर सेवाकर भरलाच नाही. आपल्याकडे २६ लाख, ९८ हजार ९७० रुपयांचा सेवाकर बाकी असल्याचे केबीसीने डिसेंबर २०१३मध्ये जाहीर केले. पैकी १५ लाखांची रक्कम ७ जानेवारी २०१४ ला (चलन क्र. ०००८) भरली. उर्वरित रक्कम भरण्याची आणि कंपनी बंद पडण्याची वेळ एकच आली. लाखो ठेवीदार तसेच सरकारला गंडा घालून कंपनीचा प्रवर्तक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती सिंगापूरला पळून गेले.

पहिला दावा सरकारचाच

केबीसीची जत्रा हॉटेल चौकात मोठी इमारत आहे. घोटी येथे अर्धवट बांधलेले रिसोर्ट आहे. या सर्व मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. केबीसीने राज्यभरातील आठ लाख सभासदांना सुमारे २१०० कोटींना गंडा घातला आहे. कंपनीची प्रापर्टी दोनशे ते अडीचशे कोटींची आहे. प्रापर्टीचा लिलाव केला तरी सर्व ठेवीदारांना पैसे मिळणार नाहीत. आता केंद्रीय वित्त मंत्रालय वाटेकरी झाले आहे. मालमत्ता विकून ते पैसे वसूल करणार आहेत. पहिला दावा सरकारचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही ठेवीदरांनी आत्महत्या केल्या आहेत. केद्र सरकारची जप्ती आली तर कायदेशीर प्रक्रियेत अडकून आत्महत्या करण्याची वेळ उर्वरित ठेवीदारांवर येणार आहे.

आता पुढे काय?

सेंट्रल एक्साईज, कस्टमस अॅन्ड सर्व्हिस टॅक्सच्या मुख्य कार्यालयाने कन्फर्मेशन दिल्यानंतर वित्त मंत्रालय मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करेल. तिला सहा महिन्याचा कालावधी लागेल. जत्रा हॉटेल चौकातील मालमत्ता जप्त करूनही थकबाकी राहिली तर घोटीतील रिसोर्टचा लिलाव केला जाईल.

महापालिकेचे काय? - केबीसी कार्यालयाने महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच अकृषिक करही भरला नसल्याचे समजते. सेवाकर कार्यालयाने जी तत्परता दाखवली ती महापालिका व संबंधित विभागाने दाखवलेली नाही. केबीसीचे कार्यालय सताड उघडे असून, तेथील साहित्य लोकांनी लुटायला सुरवात केली आहे. सगळं गेल्यावर इतर खाती जागी होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकाची दुरवस्था

0
0


अमोघ पोंक्षे, नाशिक

आपण ५५वा महाराष्ट्र दिन दिमाखात साजरा केला. अनेक ठिकाणी महाराष्ट्र क्रांती युध्दातील हुतात्म्याचे स्मरण करत त्यांच्या स्मृती जागविण्यात आल्या. महाराष्ट्र दिनाच्या सोनेरी दिवशी या सर्वांचे स्मरण आपण करत असताना मराठी वीर योध्‍दांच्या पाऊलखुणा शोधत पानिपतच्या युध्द स्मारकावर पोहोचल्यावर एक भीषण वास्तव समोर आले. पेशव्यांनी एकेकाळी गाजवलेल्या याच भूमीवर आज मराठी लोक आणि त्यांचा गौरवशाली इतिहास स्मारकाच्या रूपात शेवटच्या घटका मोजत आहे.

पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठ्यांचा पराक्रम पाहून मराठे 'हार कर भी जित गए' असे वर्णन अनेक इतिहासकार करतात. हाच मराठी पेशव्यांचा युद्धभूमीवरील इतिहास जागवण्यासाठी मोजके पर्यटक उत्तरेत दिल्लीजवळ असलेल्या पानिपत येथील युध्दभूमीवरील स्मारकाला भेट द्यायला येतात. १ नोव्हेंबर १७६० ते १४ जानेवारी १७६१ या दरम्यान अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांमध्ये दिल्लीजवळील पानिपत भागात तुंबळ युध्द झाले. विविध कालखंडात याच जागी एकूण तीन युध्द झाल्याची नोंद आहे. त्यातील तिसरे व शेवटचे युध्द म्हणजे अब्दाली विरुद्ध मराठ्यांचं १७६१ मध्ये झालेले युध्द. या तीन ही युध्दांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हरयाणा सरकारच्या पुरातत्व विभागाने या युद्धभूमीवर एक ऐतिहासिक स्मारक बांधले आहे. परंतु, यासंबंधी योग्य माहिती पर्यटकांपर्यंत पोचत नाही ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. तसेच, जे लोक या स्मारकाला आवर्जून भेट देतात त्यांची घोर निराशा होते. एक माहिती फलक आणि एका स्मृतीस्थळाचा चौथरा सोडला तर बाकी येथे काहीही नाही. दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील स्थळांचे चित्र प्रदर्शन येथे आहे. मात्र, त्या प्रदर्शन वास्तूचे वर्णन न करणेच योग्य इतकी वाईट अवस्था झालेली पहायला मिळते. झाडांच्या सुकलेल्या पानांचा ढीग आणि स्वच्छतागृहांची वाईट अवस्था या गोष्टींमधून हे स्मारक किती दुर्लक्षित झाले आहे, याची कल्पना येते.

सद्यस्थिती

पालापाचोळ्यांचे ढीग साचले आहेत. स्वच्छतागृहांची वाईट अवस्था झाली आहे. सिक्युरिटी गार्डच्या प्रवेशद्वारावरील केबीनला कुलूप लावले आहे. योग्य माहिती देण्यासाठी गाइडची सोय नाही. चित्र प्रदर्शनाची दुरवस्था झाली आहे. बकाल व भकास वातावरण निर्मितीमुळे पर्यटकांकडून दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


LBT भरण्यासाठी २९ जूनची मुदत

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेमुळे एलबीटी रिटर्न्स भरण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे एलबीटी रिटर्न्स भरण्यासाठी महापालिकेन व्यापाऱ्यांना २९ जूनचा अल्टीमेटम दिला आहे.

महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था विभागाने शहरातील व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून २९ जूनच्या आत रिटर्न्स भरण्याचे आवाहन केले होते. ऑगस्टपर्यंत एलबीटी वसुलीचे टार्गेट अडीचशे कोटींपर्यंत ठेवण्यात आले होते. दरम्यान, गेल्या वर्षी रिटर्न्स न भरणाऱ्या ८५० व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमानुसार तीन महिन्याच्या आत महापालिकेकडे रिटर्न्स भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील ३१ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यात विक्रीकर विभागाने दिलेल्या १४ हजार व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. या व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षी एलबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पालिकेला जेरीस आणले होते. व्यापाऱ्यांनी एलबीटी रिटर्न्स भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे व्यापारी आणि पालिका आमनेसामने आले होते. जवळपास पाच हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांची बँकखाती सील करण्याची कारवाई सुरू केली होती. जवळपास ८५० बँक खाती सील करण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी दंडासह रिटर्न भरल्यानंतरही खाती उघडण्यात आली होती.

राज्य सरकारने एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा एलबीटी रिटर्न भरण्यास प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्टनंतर एलबीटीची कटकट राहणार नसल्याने महापालिका कारवाई करणार नाही, अशा संभ्रम व्यापाऱ्यांमध्ये आहे. मात्र, आयुक्तांनी एलबीटी रिटर्न कोणत्याही परिस्थित भरावेच लागेल असे फर्मान सोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. शहरातील ३१ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा काढून २९ जूनची मुदत दिली आहे. २९ जूननंतर रिटर्न्स आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ऑगस्टपर्यंत अडीचशे कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांचा शोध सुरूच

विक्रीकर विभागाने दिलेल्या १४ हजार व्यापाऱ्यांच्या लिस्टमधून पाच हजार व्यापाऱ्यांचा पत्ताच सापडत नाही. त्यामुळे सन २०१३-१४ पासून पाच हजार व्यापाऱ्यांनी रिटर्न भरलेले नाही. सन २०१४-१५ मध्यही हीच स्थिती असून, या पाच हजार व्यापाऱ्यांबद्दल महापालिका आणि विक्रीकर विभागामध्ये संघर्ष सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक बँकेवर ‌हिरे गटाची पकड

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा महिला विकास बँकेवर हिरे गटाने वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत महिला विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले आहेत. बँकेच्या संस्थापिका व माजीमंत्री पुष्पाताई हिरे, लता गोंदकर, माजी मंत्री प्रशांत हिरे, सपना निकम, आमदार अपूर्व हिरे, अव्दय हिरे यांच्या नेत्वृत्वाखाली महिला ‌विकास पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. या पॅनलच्या ओबीसी गटातून डॉ. योगिता हिरे, एससी व एसटी गटातून अल्का आखाडे, व्हीजे एनटी गटातून ताई सोनवणे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. संपूर्ण कार्यकारी मंडळ बिनविरोध करण्याचा प्रयत्न अव्दय हिरे यांनी केला होता. मात्र, विरोधी गटातील दोन उमेदवारांच्या भूमिकेने नंतरच्या टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खैरनार यांनी सारडा कन्या विद्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यावेळी जाहीर केलेला निकाल असा : ओबीसी गट : डॉ. योगिता हिरे, अल्का आखाडे, व्हीजेएनटी गट : ताई सोनवणे, शांताबाई आहेर, अंजली काकड, सुनंदा घडवजे, जयश्री घोडके, सरोज धुमणे, अनिता बच्छाव, प्रेरणा बेळे, शीतल भामरे, रोहिणी मराठे, कविता धुमणे या या विजयी झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक दिवस मजुरांसोबत’चा फज्जा

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आयोजिलेल्या 'एक दिवस अधिकारी मजुरांसोबत' या उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे पहावयास मिळाले. सिन्नरसह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांनी मजुरांसोबत संपूर्ण दिवस थांबून त्यांचे प्रबोधन न करता दीड दोन तास थांबून केवळ साजरे करण्याचे काम केले. उन्हाच्या झळांपासून बचावासाठीच अधिकाऱ्यांनी हा उपक्रम गुंडाळल्याची चर्चा रंगली आहे.

मजुरांना त्यांच्या हक्काविषयी जाणीव व्हावी, या योजनेची अधिक पारदर्शीपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ग्राम रोजगार दिनाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी संपूर्ण एक दिवस मजूरांसोबत घालवायचा असतो. त्यांना विविध योजनांची माहिती देणे आवश्यक आहे. तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी, काही कर्मचारी, मजूर पदाधिकारी संपूर्ण दिवस एकत्र येऊन मजुरांसमवेत वेळ घालवितात. त्यांच्या समस्या जाणून घेतानाच त्यांना जल व मृद विषयक सल्ला देणे, जलसंधारणाच्या कामांविषयी माहिती, विमा विषयक मार्गदर्शन, सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, मजुरांची आरोग्य तपासणी करणे, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र, वयाचे व उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सातबारा उतारे, वृक्ष लागवड, पशु आरोग्य व देखभाल विषयक मार्गदर्शन, महिला व बाल आरोग्य विषयक सल्ला तसेच वैयक्तिक व परिसर स्वच्छता विषयक सल्ला देणे अशी कामे केली जातात.

अवघी तासभर हजेरी

सिन्नरसह पेठ, त्र्यंबकेश्वर, निफाड, चांदवड, येवला, सुरगाणा, कळवण, नांदगाव या तालुक्यांमध्ये पूर्ण दिवस न थांबता अवघ्या तासाभरात हा कार्यक्रम उरकून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर उपक्रम आटोपणेच पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन यंत्रणेलाच हवी मदत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

विविध शासकीय कार्यालयात वेळेप्रसंगी आग लागल्यास महत्त्वाचे दस्तऐवज आगीत खाक होण्याची शक्यता असते. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यालयात प्राथमिक अग्निशमन यंत्र (फायर कन्ट्रोलर) असावे, असे आदेश शासनाने सन २००६ मध्ये निर्गमित केले. त्यानुसार कळवण तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळेत, शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रे लावण्यात आली. परंतु, ही यंत्रे धूळखात पडली आहेत.

वर्षातून एकदा या यंत्राची हायड्रोलिक चाचणी घेणे गरजेचे असतानाही होत नाही. यामुळे हे यंत्र जणू कुचकामी ठरत आहेत. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, यासह शासकीय कार्यालयात वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय आदेशान्वये अग्निशमन यंत्र लावण्यात आले. या यंत्रांचे फायर ऑडिट वर्षातून दोन वेळा करणे गरजेचे आहे. ऑडिट करण्याचे अधिकार यंत्र विक्री करणाऱ्या परवानाधारक खासगी कंपन्यांना शासनाने दिले आहेत. ऑडिट केल्यानंतर ना हरकत दाखला अग्निशमन विभागाला मिळाल्यास त्यांच्याकडूनही यंत्र बसविण्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. अग्निशमन यंत्र बसविल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना या यंत्राचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असते. यंत्राची हायड्रोलिक चाचणी वर्षातून एकदा करावी लागते.

विविध ठिकाणी पाहणी केली परंतु, काही शासकीय कार्यालयात बघायलाही मिळाले नाही. अनेक शाळांमध्ये पाहणी केली असता काही यंत्रे नाहीत तर काही ठिकाणी आहेत ती धूळखात पडली आहेत. काही कार्यालयांच्या बाहेरील भिंतीवर अग्निशमन यंत्र आढळले. परंतु, यंत्रांची हायड्रोलिक चाचणी केल्याचे आढळून आले नाही. या यंत्रांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

शासकीय कार्यालयात फायर ऑडिट, यंत्रांची हायड्रोलिक चाचणी व गॅस रिफिलिंगही आवश्यक आहे. परंतु, अनेक शासकीय कार्यालय या यंत्राकडे दुर्लक्ष करतात. त्यांना सूचना देऊनही ते फायर ऑडिट करीत नाही, ही दुर्भाग्याची बाब आहे. अग्निशमन विभागाला शाळा किंवा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे पत्र प्राप्त झाल्यास त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यावेळी त्यांना आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येते. अनेक शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयात प्राथमिक अग्निशमन यंत्रच नाहीत.

असे असते फायर कन्ट्रोलर

प्राथमिक अग्निशमन यंत्रात स्टोअर प्रेशर, वन टाईम यूझ, स्टोअर प्रेशर व सिओटू असे प्रकार आहेत. यामध्ये अग्निविरोधक पावडर व गॅस काटरेज असते. ही पावडर थंड असते. त्यामुळे लागलेली आग तत्काळ विझविण्यास मदत होते. अग्निशमन यंत्र हे एक ते दहा किलोपर्यंत येतात. यापैकी ५ किलोचे यंत्र चार तर दहा किलो वजानाच्या यंत्राचा आठ मिनिटपर्यंत आग विझविण्यासाठी वापर होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरावाडी डासांमुळे हैराण

0
0



म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधील हिरावाडीला लागून दिंडोरी व पेठरोड लगत पाण्याचा मोठा कालवा आहे. एरवी पावळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या या कालव्याच्या दोन्ही बाजुला सध्या प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. या तुंबलेल्या घाण पाणी असलेल्या कालव्यात डासांची उत्पत्ती केंद्र निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कालव्यात घाण पाणी साचत असल्याने वेळोवेळी यासंदर्भात पाटबंधारे विभागासह महापालिका व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे कैफियत मांडूनही या समस्येकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढतच आहे आणि त्यामुळे नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. निदान महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष घालून महिन्यातून एकदा तरी साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशी नागरिकांनी केली आहे.

काट्या मारुती चौकाकडून हिरावाडीकडे येणाऱ्या तसेच हिरवाडीकडून कालव्याच्या बाजूने दिंडोरी व पेठ रोडकडे आणि विविध विस्तारित नगराकडे ये-जा करणाऱ्या सर्वांनाच येथील वाढत्या दुर्गंधीमुळे नाक दाबून जावे लागते. कालव्याच्या रस्त्याच्या दोनीही बाजूला उघड्यावर शौचाला बसणाऱ्यावर दंडात्मककारवाई केल्यास घाणीचे साम्राज्य कमी होईल. डासांचे प्रमाण वाढले आहे.

कठडे बनले असुरक्षित

कालव्यावरील पुलाची खूपच दुर्दशा झाली आहे. लोखंडी कठडे अनेक वर्षापासून तुटले आहेत. रस्त्यावरून जाताना वाहनचालकांची कसरत होते. रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे. शेजारीच तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. कॉलेज युवक व युवतींना येथील टार्गेट मुलांचा त्रास होतो.

निव्वळ आश्वासनच

कालव्याची वेळोवेळी साफसफाई झाल्यास दुर्गंधी कमी होईल आणि रहिवाशी नागरिकांचे आरोग्य नीट राहणेस मदत होईल. निवडणुकात आश्वासन दिले जाते त्यानंतर फिरूनही पाहिले जात नाही, असा आरोपही येथील नागरिक करीत आहेत. महापालिका पाटबंधारे विभाग एकमेकांची जबाबदारी टाळत असल्याने नागरिकांची कोंडी होते आहे. दोन्ही विभागांच्या अधिकारी वर्गाने एकत्र येवून विचार करावा अशी रास्त अपेक्षाही नागरिकांनी केली आहे. 'स्वच्छ नाशिक, हरित नाशिक' यालाच म्हणावे का असाही सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

NCPची नवी टीम १५ मे नंतरच

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने राष्ट्रवादीची राज्यातील नवी टीम आता १५ मे नंतरच जाहीर होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाली असली, तरी राजकीय डावपेचचा भाग म्हणून तूर्तास पक्षश्रेष्ठींनी राज्यातील ५५ जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नावाची घोषणा थांबवली आहे. जिल्हा बँकेत नाराजांमुळे दगाफटका होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतरच नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सर्वसाधारण जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाते. मात्र, अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदासाठी अनेक दावेदार निर्माण झाल्याने वाद निर्माण झाले. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांची निवड ही जिल्हा पातळीवर न राहता थेट प्रदेश पातळीवर सोपवण्यात आली. तटकरे यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपद मिळणार याबद्दलच वरिष्ठ पातळीवर संभ्रम होता. त्यामुळे निवड प्रक्रिया थांबली. तटकरे यांची निवड झाली असली तरी, राज्यात सध्या जिल्हा बँकाच्या निवडणुका सुरू आहेत. १५ मे पर्यत ही निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचा दबदबा आहे. त्यामुळे आताच जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदाच्या नावांची घोषणा केली तर, नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. पक्षात गटतट वाढण्याची शक्यता होती. त्याचा थेट फटका पक्षाला निवडणुकीत होण्याची शक्यता होती. त्यामुळे जिल्हा बँकाच्या निवडणुकांनंतरच जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिकची निवड २० मे नंतर

राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडीला १५ मे चा मुहूर्त असला तरी, नाशिकच्या नियुक्या या २० में नंतरच होणार आहेत. नाशिक जिल्हा बँकेची निवडणूक ही २० मे ला आहे. त्यामुळे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष या दोन्ही पदांची निवड २० मे नंतरच जाहीर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास म्हणजे सर्वोत्तम नियोजन

0
0

>> अविनाश शिसोदे

विकास या विषयावर जेव्हा जेव्हा विचार करून सांगण्याची वेळ येते तेव्हा डोळ्यापुढे असंख्य गोष्टींचा नुसता कोलाज दिसायला लागतो. विकास म्हणजे विलासी, विनाशकारी कामांचा सपाटा नव्हे. विविधांगी कार्मिक किंवा कार्यिक सर्वसमावेशकता म्हणजे विकास असं ढोबळ पद्धतीनं म्हणता येईल. विकास हा जिवंत गोष्टींसाठी जिवंत गोष्टींचा स्थायिभाव आहे. झाड, माणूस, प्राणी यांच्यातील नैसर्गिक वृद्धी हा सुद्धा विकासच आहे. नैसर्गिक विकासाला माणसानं स्वत:ची बुद्धी वापरून स्वत:चं जगणं सुसह्य करण्यासाठी दिलेली जोड हा विकासाचा पुढचा टप्पा. विकास हा साचलेला नसतो. तो स्थिर असतच नाही. स्थिर असणं म्हणजे अधोगती. Reverse Growth. म्हणजे आपण एकतर विकासाकडे वाटचाल करीत असतो किंवा विनाशाकडे. येथे मधलं असं काही नसतं.

विकास अथवा डेवलपमेंट हा शब्द ऐकला तरी डोळ्यापुढे चकचकीत, लखलखित, भव्य दिव्य असं काही उभं राहू लागतं. आपण ज्या विकासासंदर्भात इथे पुढील काही दिवसात मांडणार आहोत, तो विकास म्हणजे सर्वांगिण विकास. सर्वसमावेशक विकास. ज्यात सातत्य आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण वाटत जाणारा आणि पुन्हा त्यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यास उद्युक्त करणारा ! शहरांचा विकास असाच होत जातो. नाशिकच्याबाबतीत सांगायचं, तर परिपूर्ण विकासाची अत्यंत सुंदर अशी नैसर्गिक संधी देणारं हे शहर आहे. पण त्या संधीकडे योग्य आणि डोळसपणे बघणारी, त्या दिशेनं विकास करणारी यंत्रणा मिळणं ही निसर्गापेक्षाही unpredictable बाब आहे. माणूस जन्माला आला तेव्हा या पृथ्वीवर निसर्गानं त्याच्या पुढील जगण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा आधीच सुसज्ज करून ठेवली होती.

आज काय करतो आहोत आपण? शहरविकासाचा विचार करताना ठराविक गोष्टी समोर येतात. बांधकाम, पर्यावरण, उद्योग, दळणवळण, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक रितीरिवाज, प्रशासन इत्यादी क्षेत्रांमिळून शहराच्या विकासाचा विचार करावा लागतो. मूलभूत गरजा पुरवण्यालाही आपण विकास समजतो आहोत. आठ डब्याची रेल्वे आता बारा डब्यांची केली की त्यालाही आपण विकास म्हणतोय. चार पदरी रस्ता सहा पदरी करण्यालाही आपण विकास म्हणतोय. संकट येऊ लागलं की सोल्यूशन काढून उपाय करणं म्हणजे विकास का? युद्ध जिंकणं म्हणजे पण विकास का? मोकळ्या मैदानावर म्हणता म्हणता टोलेजंग बिल्डींग उभी राहते. हा विकास का? म्हणता म्हणता बगीचा तयार होतो. २५ मुलं खेळू लागतात. मग पाच वर्षांनी मुलांची संख्या ५० होते. गार्डन तेच असतं. मग पाच वर्षापूर्वीचा विकास आज तोकडा पडून अविकासात का बदलतोय? हाच तणाव रस्त्यावर, रेल्वेवर, सार्वजनिक सेवांवर येतोय. मग पुन्हा ताण पडतो नि आपण पुन्हा बदल करायला धावतो. मग आपण विकास करताना पुढच्या ५०/१०० वर्षांचं प्लॅनिंग का करत नाहीत?

योगायोगानं या शहराला परंपरेनं सिंहस्थाच्या रूपानं दर १२ वर्षांनी विकासाच्या संधीची देणगी दिली आहे.

तिचा कितीसा फायदा उचलतोय आपण? पुढचे चार कुंभमेळे डोळ्यापुढे ठेवून प्लॅनिंग केले तर ५० वर्षांचा वेध घेता येऊ शकतो. पण ती दृष्टीच नाही. आपण फक्त छोट्या छोट्या बदलांची अपेक्षा करतो आणि ते झाले, की टाळ्या वाजवतो. आजही वृक्षारोपण हा बातमीचा विषय होतो. रस्ता दुरूस्तीचं, डांबरीकरणाचं उदघाटन हा बातमीचा विषय होतो. रेल्वेला दोन नवे डबे जोडले हाही बातमीचा विषय ठरतो. म्हणजे गरजांची तात्पुरती पूर्तता हा आजही आपल्या शहरासाठी आश्चर्याचा विषय आहे ! प्रत्येका शहराचा एक बाज असतो. स्वभाव असतो. नैसर्गिक वेग असतो. तो नीट ओळखून आगामी ५० वर्षांचं प्लॅनिंग केलं की चित्र स्पष्ट होईल असं वाटतं.

(लेखक हे इ अँड जी ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील अंगुलगाव ये‌थे आठ दिवसात दरोडेखोरांनी दुसरा दरोडा घालत हजारो रुपये लुटून नेले. लांडखोर परिसरात हा दरोडा घालण्यात आला असून, दरोडेखोरांनी एका शेतकऱ्याला पलंगाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेमुळे पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.

अंगुलगावच्‍या लांडखोर परिसरातील दत्तू जाधव यांनी मका, कांदा विकून आलेल्या पैशांवर विहिरीचे काम सुरू केले. विहीर कामगारांना मंगळवारी सुमारे साठ हजार रुपये देण्याचा वायदा केला होता. रात्री सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान हा दरोडा पडला. पाच ते सहा दरोडेखोरांनी जाधव या वस्तीवरील घरात दरोडा टाकून दत्तू जाधव यांच्या घरातील सुमारे ६० हजारावर रोख रक्कमेवर डल्ला मारला. दत्तू जाधव यांना पलंगाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. घरातील इतर सदस्य लग्नानिमित्ताने बाहेरगावी गेल्याने मोठा अनर्थ टळला. आठ दिवसात अंगुलगाव येथे दरोडेखोरांनी घातलेला हा दुसरा दरोडा आहे.

गेल्या २७ एप्रिल रोजी रविवारी मध्यरात्री सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्यांनी पाच ठिकाणी दरोडा टाकून सुमारे ११ तोळे सोन्यासह हजारोंचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणातील दरोडेखोरोंचा अद्याप पोलिसांपा थांगपत्ता लागलेेला नाही. वाढत्या दरोड्याच्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले असून, पोलिस गस्त वाढविण्याची मागणीही वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

0
0

कळवण तालुक्यातील देवळीकराड ग्रामस्थ संतप्त; टँकरची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

मे महिना सुरू होताच पहिल्याच आठवड्यात कळवण तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वडाळे (हा) ग्रुप ग्रामपंचायतीमधील देवळीकराड या गावातील महिला व नागरिकांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कळवण तहसीलवर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

कळवण तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात वडाळे (हा) ग्रुप ग्रामपंचायतीतील देवळीकराड हे गाव असून, या गावाला दोन महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावात आदिवासी उपाययोजनांतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचा पूर्णतः बोजवारा उडाला असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गेल्या दहा वर्षांपासून येथील पाणीप्रश्न प्रलंबित असताना प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गत आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र झाल्याने येथील महिला व ग्रामस्थांनी तहसील कचेरीवर हंडा मोर्चा आणत जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे. पी. गावित हे तहसील कार्यालात आले. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना बोलवून घेत कडक शब्दात समाचार घेत ११ मे पर्यंत देवळीकराड येथे दोन पाण्याच्या टाक्या बसवून स्थानिक विहिरी व बोर अधिग्रहण करून तशा नोटिसा द्या, असे आदेश दिले. पाणीपट्टी भरली नाही म्हणून शिक्षणासाठी मुलांना ग्रामपंचायतीमधून रहिवासी दाखले दिले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. सरपंच व ग्रामसेवक मिलीजुली करून पाणीप्रश्न प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप केला. आमदार गावित यांनी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना फटकारत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी कुचराई करीत असेल तर त्याची हयगय केली जाणार नाही, असे सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मिरींना हवा भारत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असे काश्मीरमध्ये म्हणणारे ८० टक्के लोक आहेत. ८० टक्के काश्मिरींना भारत हवाय. १५ टक्के काश्मिरींना आझाद काश्मीर हवे आहे, तर पाच टक्केच काश्मिरींना पाकिस्तान हवे आहे, से प्रतिपादन सरहद संघटनेचे प्रशांत तळणीकर यांनी केले.

गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या ९४ व्या वसंत व्याख्यानमालेत 'सत्ता बदलानंतरचे काश्मीर' या विषयावर ते बोलत होते. हे व्याख्यान अॅड.द. तू. जायभावे यांच्या स्मृतीला अर्पण होते. तळणीकर पुढे म्हणाले की, आपल्यापुढे वेगळे चित्र निर्माण केले जात आहे. ते चित्र समजून घेण्याची आज खरी गरज आहे.

पाकिस्तानलाही कश्मीर नकोच आहे तर, भारत आंतरराष्ट्रीय जगज्जेता बनू पहात आहे, त्याचे लक्ष कोठेतरी केंद्रित करून ठेवायचे म्हणून कश्मीर प्रश्न चिघळत ठेवण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

तळणीकर पुढे म्हणाले की, घुमान संमेलन सरहद संस्थेने भरवले. सरहद देश जोडण्याचे काम करीत आहे. देशात जेथे कोठेही समस्या दिसेल तेथे सरहद काम करणार आहे. मोदींकडून देशाला खूप अपेक्षा आहे. आता काहीतरी सकारात्मक होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आजचे व्याख्यान

विषय : २१ व्या शतकातील महिला सबलीकरण

वेळ : सायंकाळी ७ वाजता

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टंचाई पाचवीला पुजलेली

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जुने नाशिक परिसरातील नागरिक सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या पाणीटंचाईचे संकट सध्या तरी सुटण्याची चिन्हे दिसत नाही. कारण जुने नाशिकला उच्च दाबाने व पुरेशा पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणारे अधिक क्षमतेचे जलकुंभ महापालिका प्रशासनाच्या लालफितीत अडकले आहे.

महापालिकेकडून प्रस्तावित जलकुंभ तयार होत नाही तोपर्यंत तरी जुने नाशिकचा पिण्याचा पाणीचा ज्वलंत प्रश्न सुटणार नाही, असे महापालिका प्रशासनकडूनच ठामपणे सांगितले जात आहे. याप्रश्नी स्थानिक नगरसेवकही आग्रहीपणे ठाम भूमिका मांडत नसल्याने पाणी प्रश्न सुटण्याऐवजी तो रेंगाळण्याची शक्य अधिक गडद झाल्याची स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी आहेत. दरम्यान, शहराला ३९ जलकुंभातून ४०० एमएलडी पाणी पुरवठा होतो. तर सुमारे साडेचार ते पाच लाख लोकसंख्या असलेल्या जुने नाशिकला अवघ्या तीन मुख्य जलकुंभातून पाणी पुरवठा होतो. या जलकुंभांची साठवणक्षमता व उंची कमी असल्याने उच्च दाबाने व पुरेशा प्रमाणात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही हेच मुख्य कारण जुने नाशिकच्या कमी दाबाने पाणी पुरवठाला कारणीभूत मानले जात आहे. वर्षातील बाराही महिने उंचावरील भागातील ‌रहिवाशांच्या घरातील नळांना पाणीच येत नाही.

जुने नाशिकच्या कुंभारवाडा, काझीगढी, चव्हाटा, पिंजारघाट, जोगवाडा, खडकाळीच्या गैबनशहा नगर,, बागवानपुरा, काझीपुरा कोठ, संजरीनगर, इगतपुरीवाला चाळ, रेणुकानगर, वडाळारोड, रहेमुनानगर, आदी प्रमुख भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. तर येथील काही भागात नळांना कमी दाबाने पाणी येते त्यामुळे नळांना लावलेल्या विजेच्या मोटारींमुळे पाणीच येत नसल्याने पाणीसाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रभाग २९ मधील नानावली परिसरात तर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे तर याच भागात काही नागरिकांना पाण्याच्या टँकरसाठी पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार प्रभागाच्या नगरसेविका रंजना पवार यांनीच केली आहे, हे विशेष.

जुने नाशिकला पाणी पुरवठा करणारे तिन्ही प्रमुख जलकुंभांची उंची व साठवण क्षमता अधिक नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सर्व्हे नंबर ४०५ व ४०६ मध्ये अमरधाम रोड परिसरात २० मीटर उंची व २० दशलक्ष अधिक जल क्षमतेचे जलकुंभ प्रस्तावित आहेत. ते उभारल्यानंतर जुने नाशिकचा पाणी प्रश्न सुटू शकेल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

- उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञानाच्या सफरीत रमले चिमुकले विद्यार्थी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विज्ञान प्रबोधिनीतर्फे 'सायन्स फेस्टिव्हल २०१५' या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर गुरमीत बग्गा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कार्बाइड तोफेचा धमाका करून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली.

नाशिक महापालिकेच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण तारांगण येथे आयोजित करण्यात आले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांना ऐरोमा डेलिंगची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. रवी शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना विमानाचे विविध भाग व त्यांचे कार्य याबद्दल माहिती दिली व कॅटापुल्ट प्लेन, रेडिओ कंट्रोल्ड प्लेन अशा काही विमानांची प्रात्यक्षिके दाखविली.

यात अँड्रॉइड अॅप्स कसे विकसित करावे या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिकचाच छोटा प्रोग्रामर इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी निलय कुलकर्णी याने एकट्याने ही कार्यशाळा घेतली आणि अँड्रॉर्इड अॅप डेव्हलपमेंट शिकण्यासाठी आलेले बहुतेक सर्वच विद्यार्थी त्याच्यापेक्षा वयाने व शिक्षणाने मोठे होते. कल्पना युथ फाउंडेशनद्वारे चांद्र वसाहती व अंतराळ निरीक्षण आणि त्यासाठी उपयोगी अॅप्स या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कल्पना युथ फाऊंडेशनतर्फे अपूर्वा जाखडी यांनी मार्गदर्शन केले.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनविलेले हॉटेल रोबोट, पाण्यावर चालणारी सायकल, डोरेमॉन सोप, बबल मशिन, केन, हवेच्या दाबावर उडणारे रॉकेट, 'जलदूत' पिण्याचे पाणी वाटणारा रोबोट तसेच ज्वालामुखी, हायड्रॉलिक जे. सी. बी., सोलर कार, जल विद्युतनिर्मिती, व्ही. टाइप इंजिन, हवामान वेधशाळेतील उपकरणे, सौरमाला, न्यूटन्स कॅडल, स्लाइम फॉर्मेशन, एलेफंट टुथपेस्ट, अंधारात चमकणारे पाणी फुले व कपडे व इतर विविध मॉडेल्स मांडण्यात आले.

वॉटर सायकलचे आकर्षण

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वॉटर सायकल, पाण्यावर तरंगणाऱ्या सायकलची प्रात्यक्षिके रामकुंड, गोदावरी नदी येथे दाखविण्यात आली. २५ लिटर क्षमतेच्या पाण्याच्या १२ बाटल्यांच्या सहाय्याने ही सायकल पाण्यावर तरंगते. मागच्या चाकाच्या स्पोक्समध्ये लावलेल्या छोट्या प्रोपेलरच्या सहाय्याने ही सायकल पाण्यात पुढे सरकते. स्वप्निल राजगुरू, नील जैन, हर्षवर्धन मुंदडा, श्रेणिक मानकर, करण ओस्तवाल, रोहित तादलापुरे या विद्यार्थ्यांनी ही सायकल बनविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images