Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

त्र्यंबकला वीस दिवसात पूर्ण होणार पाइपलाइन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पिंपळद येथे जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर नगराच्या पाइपलाइनचे भूमीपूजन करण्यात आले. या योजनेस दि. ५ मार्च २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ४४.४८ लाख रुपये खर्चाची ही योजना २५ मे २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते आणि सुमेरू काशीमठाचे शंकराचार्य नरेंद्रानंद महाराज, जुना आखाड्याचे राष्ट्रीय संरक्षक श्रीमहंत हरिगिरी महाराज, श्रीमहंत उमाशंकर भारती आदी साधू, महंतांच्या उपस्थितीत भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला. पिंपळद येथील महामंडलेश्वर नगरपर्यंत रस्ता तयार होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी त्र्यंबकेश्वर बिल्वतीर्थ जलशुध्दीकरण प्रक्रिया केंद्र ते महामंडलेश्वर नगर स्वतंत्र पाइपलाइनची लांबी ३८५० मीटर आणि व्यास ११० मिलीमीटर आहे. या योजनेच्या भूमीपूजनप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेचे उपअभियंता डी. व्ही. सोनवणे, एस. आर. चौरे, पगार, मोरे आदींसह ठेकेदार एस. आय. घोलप उपस्थित होते.

या सिंहस्थात प्रथमच त्र्यंबकेश्वरपासून तीन किमी अंतरावर असलेल्या पिंपळद येथे जुना आखाड्याच्या ७० एकर जमिनीवर महामंडलेश्वर नगर तयार करण्यात आले आहे. येथे सिंहस्थ पर्वकालात जुना आखाड्याचे साधू, महंत, आचार्य, महामंडलेश्वर यांचा निवास राहणार आहे. जुना आखाड्याची साधुंची संख्या सर्वाधिक असून, सन्यांशींची संख्या देखील मोठी आहे.

महिला संन्याशिनींना माईवाडा म्हणून स्वतंत्र निवास व्यवस्था करण्यात आली आहे. निलपर्वत टेकडीवर आणि इतरत्र आठ धर्मशाळा बांधण्यात आल्या आहेत. साधू, महंत भाविक भक्त यांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही याकरिता आखाड्याचे श्री महंत हरिगिरी महाराज आणि सहकारी अथक प्रयत्न करीत आहेत. निवाराशेड, पाणीपुरवठा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच भाविकांना स्नानासाठी घाटकामांचे काम वेगाने सुरू आहे. पावसाला सुरुवात झाल्यास सर्व कामांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.



गौतमी बेझे योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेचे उपअभियंता डी. व्ही. सोनवणे यांनी त्र्यंबक शहरासाठी असलेली गौतमी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर शहरामध्ये सध्या अहिल्या धरण जलकुंभास गौतमी बेझे धरणाचे पाणी पोहचविण्यात आले असून, त्याचा नियमित पुरवठा सुरू झाला आहे. गेल्या कही दिवसांपूर्वीच गौतमी बेझे पाणीपुरवठा योजनेची चाचणी घेण्यात आली होती. अथक प्रयत्नांनंतर ही योजना मार्गी लागली. येत्या आठवडाभरात बिल्वतीर्थ जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहरास गौतमी बेझे धरणाचे पाणी पुरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहेबाच्या डोक्यात माठ फोडायचा का?

$
0
0

पाणीटंचाईमुळे त्रासलेल्या समतानगर परिसरातील संतप्त महिलांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

''लाख वेळा सांगूनही साहेबांना आमचा पाणीप्रश्न सोडवता येत नसेल तर आम्ही काय त्यांच्या डोक्यात माठ फोडायचा का?'', असा संतप्त सवाल टाकळीतील पाणीटंचाईग्रस्त महिलांनी महापालिका प्रशासनातील संवेदनाशुन्य अधिकाऱ्यांना केला आहे. टाकळीत चार महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

समतानगर आणि आगरटाकळी येथे समस्या गंभीर आहे. टँकर आल्यावर बाया बापड्या हातातील कामे सोडून तर चिल्ले-पिल्ले खेळणं सोडून टँकरभोवती गर्दी करतात. पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभाग ३१ चे नगरसेवक राहुल दिवे यांनी स्थायी समितीच्या सभेत महापालिका अधिकाऱ्यांना माठ भेट देत गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविला होता. पाणीपुरवठा विभागापासून आयुक्तांपर्यंत सर्वांना निवेदने देऊन झाली. दीडशे महिलांचे शिष्टमंडळ नेलं, पण एवढं करूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने समस्या कायम असल्याचे राहुल दिवे यांनी मटाशी बोलताना सांगितले.

अकार्यक्षमता हीच समस्या

समतानगर आणि आगरटाकळी येथे दोन वर्षापासून पाईपलाईनचे काम मंजूर आहे. पाठपुरावा करून वर्कआर्डर निघाली पण ऑडिट विभागाने ती रिकॉल केली. डॉकेट पाठवावे लागते पण आयुक्त कार्यवाहीच करत नाही, असे नगरसेवक दिवे यांनी सांगितले. आठ इंची पाईपलाईन टाकली तर ड्रीमनगरपासून समतानगरपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढू शकते. २० वर्षांपूर्वीची पाईपलाईन माती, कचरा यामुळे तुंबली आहे. जेट मशिनच्या मदतीने ती स्वच्छ करण्याची गरज आहे.

पाणीप्रश्नावरून समतानगरमधील रहिवाशी संतप्त झाले आहेत. या मुद्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक निवेदने दिली. आक्रमक होत आंदोलनेही केली. मात्र, महापालिकेकडून दखल घेण्यात आलेली नाही. पाणीपुरवठा अभियंता पाटोळे हे फोनच उचलत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.



सारी भिस्त टॅँकरवरच

महापालिकेतर्फे गांधीनगर फिल्टर प्लॅन्टमधून पाच व दहा हजार लिटरचे दोन टँकर भरून ते समतानगर व आगरटाकळी येथे पाठवले जातात. देवळाली कॅम्प येथील खासगी टँकर मालकाशी करार केल्याचे समजते. याशिवाय काही नागरिक विहिरींवरही पाणी शेंदायला जातात. माया पवार, स्वाती बागुल, निर्मला जाधव, कल्पना सोनवणे, बिजलाबाई घोलप, सुनीता जादव, शायना शेख आदींनी पाणीप्रश्नी तीव्र नाराजी व्यक्त केली.

धंदा चौपट कर दिया

पाण्यासाठी नेहमी धावपळ करावी लागत असल्याने लोकांना हातची कामे सोडून घरीच थांबावे लागते. पाण्याकरिता दोन वेळच्या अन्नासाठी कमविणे थांबले आहे. याबाबत किरकोळ व्यावसायिक असलेल्या नसीम शेख यांनी प्रतिक्रिया अंजन घालणारी ठरतेय. 'मैं दिंडोरी, वणी, ओझर और जहॉ हप्ते का बाजार लगता हे, वहाँ जाता हूँ, तब घर में दो वक्त की रोटी आती है. पर ये टँकर कभी भी आता है. सारा धंदा चौपट हो गया' असे सांगून पाण्यासाठी होत असलेली व्यथा मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलनाक्यावर पुन्हा मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोलनाक्यावर वाहनधारकांना मारहाण करण्याचा सिलसिला सुरूच आहे. मंगळवारी रात्री बारा वाजता टोलनाक्यावरील काही सुरक्षारक्षकांनी पिंपळगाव बसवंत येथील एका तरुणास विनाकारण बेदम मारहाण केली. या प्रकरण विक्रांत विष्णूपंत जगताप यांच्या फिर्यादीनुसार टोलनाक्यावरील तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांविरोधात पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव बसवंत येथील प्रगतशील शेतकरी विष्णूपंत जगताप यांचे चिरंजीव पुण्याहून विवाह समारंभासाठी पिंपळगावी येत होते. रात्री बारा वाजता टोलनाक्यावर आले असता त्यांनी नियमाप्रमाणे रिर्टनसाठीची टोल फी महिला कर्मचारीकडे दिली. महिला कर्मचारीने रक्कमही घेतली मात्र पावती दिली नाही. उलट अर्धा तास थांबून घ्या, असे सांगत टोल कॅबिनची खिडकी लावून घेतली. या प्रकारामुळे गोंधळलेल्या विक्रांतने कार बाजूला घेतली. जवळच उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांना थांबण्याचे कारण विचारत बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे विक्रांत घाबरून गेले. त्यांनी तातडीने पोलिसस्टेशन गाठले. वडील विष्णु पत जगताप, मामा विश्वास माधवराव मोर, अरुण मोरे यांना फोन केला. सुरक्षारक्षकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

यापूर्वी आमदार अनिल कदम यांनीही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीवर बोट ठेवले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी बसचालकालाही मारहाण करण्यात आली होती. यामुळे बसचालकांनी टोलनाक्यावरच बस उभ्या करून वाहतूक बंद केली होती. असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत.

टोलनाक्यावरील तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल. तसेच, सातत्याने वाहनधारकांना मारहाण करण्याचे प्रकार होत असल्याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. - दिलीपराव भागवत, पोलिस निरीक्षक

वाहनधारकांशी नम्रतेने व सौजन्याने वागण्याच्या सर्वच कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मंगळवारी रात्री झालेला प्रकार खेदजनक आहे. वाहनधारकांना मनस्ताप झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असे प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. - सुधीर डांगळे, अध्यक्ष, टोल कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंभळेंविरुध्दचे अपील फेटाळले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार देविदास पिंगळे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. थकबाकीदार संस्थेचे सभासद म्हणून चुंभळे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचे अपील जिल्हा बँकेनंतर आता उच्च न्यायालयानेही फेटाळल्याने पिंगळेना मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा बँकेत देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे एकमेकांविरोधात लढत आहेत. त्यामुळे चुंभळेंना निवडणुकीतून बाद करण्यासाठी पिंगळेंनी वेगवेगळे मार्ग स्वीकारायला सुरुवात केली आहे. आनंद ग्रेप या संस्थेचे काही काळ चुंभळे सदस्य होते. सन २००७ मध्ये या संस्थेने ७० लाखांचे कर्ज घेतले. मात्र, कालांतराने ही संस्थाच डिफॉल्टर झाली. त्यापूर्वीच चुंभळेंनी सभासदत्व सोडले. त्या संदर्भातील दाखला पिंगळेंनीच चुंभळे यांना दिला. मात्र, पिंगळेंनी पुन्हा चुंभळेंना थकबाकीदार दाखवून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचे अपील जिल्हा बँकेत दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे अपील फेटाळून लावले होते. या विरोधात उच्च न्यायालयात २९ एप्रिल रोजी अपील दाखल करीत चुंभळेंचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी केली. या अर्जावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी खोट्या सह्यांच्या आधारावर पिंगळेंनी थकबाकीदार दाखवल्याचे पुरावे चुंभळेंनी न्यायालयात दाखल केले.

माझ्या खोट्या सह्या करून कर्ज काढण्यात आले आहे. माझी सही ही शिवाजी चुंभळे ऐवजी चुंबळे अशी केली आहे. त्यामुळे मी पिंगळेंच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह बदनामीचाही खटला दाखल करणार आहे.

- शिवाजी चुंभळे, उमेदवार, जिल्हा बँक

भ चा झाला ब

संबंधित संस्थेत कर्ज काढताना शिवाजी चुंभळेंची सही ही शिवाजी चुंबळे अशी करण्यात आली आहे. त्यामुळे चुंभळे आपण बँकेत करीत असलेल्या सह्याच उच्च न्यायालयात सादर केल्या. पिंगळेंनी भ ऐवजी ब शब्द वापल्यानेच त्यांची खोटेगिरी उघड झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्या चुकीमुळेच ते उघडे पडल्याचा दावा चुंभळेंनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅट नोंदणी आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विक्रीकर कार्यालयात स्वतः हजर राहून व्यापाऱ्यांना व्हॅट नोंदणी दाखला घ्यावा लागत होता. यासाठी व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाया जात होता. विक्रीकर विभागाने व्यापाऱ्यांची गरज ओळखून त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी नोंदणी दाखला ऑनलाइन देण्याची व्यवस्था केली आहे.

विक्रीकर विभागाची ऑनलाइन प्रणाली आजपासून (७ मे) लागू होणार असून, ही माहिती समजावी यासाठी विक्रीकर विभागाने परिपत्रक वितरीत केले आहे. या नवीन पध्दतीनुसार संपूर्ण अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराने पूर्वीचा टीन क्रमांकाची निवड न करण्याची काळजी घ्यायची आहे.

त्याचप्रमाणे नोंदणीसाठी परिपत्रकात नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करायच्या आहेत. या प्रती अपलोड केल्यानंतर अर्जदारास एक पोहचपावती मिळणार आहे. नोंदणीसाठी अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट पोस्टाने अथवा कुरिअरने सात दिवसाच्या आत विभागाकडे पाठवायचा आहे. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अधिकारी कागदपत्र विश्वसनीय असल्याची खात्री करून घेतील व व्यापाऱ्यास इमेलद्वारे नोंदणी क्रमांक कळवणार आहेत. त्याचप्रमाणे नोंदणी दाखल्याची प्रत पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती विक्रीकर विभागाच्या www.mahavat.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांची गरज ओळखून आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये याचा आम्ही अधिक विचार करीत आहोत. ऑनलाइन आणि पेपरलेस कामकाज पद्धतीद्वारेच नोंदणी दाखला ऑनलाइन देण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्याचा नक्कीच ग्राहकांना फायदा होईल.

- सुमेरकुमार काले, सहआयुक्त, विक्रीकर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाडांसह नऊ अर्जांवरील सुनावणी पूर्ण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थकबाकीदारांसह विविध कारणांनी फेटाळण्यात आलेल्या नऊ उमेदवारांच्या अर्जावर बुधवारी अपील अधिकारी राजेंद्र सुरावसे यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडून युक्तीवाद साडेपाच तास चालला. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर सुरावसे यांनी निकाल राखून ठेवला. या अपिलावर आता गुरुवारी निकाल जाहीर होणार असून, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासह कमलाकर पवार, नामदेव शिंदे, उषा जेजुरे, चंद्रकात राजे यांच्यासह नऊ जणांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्वांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले. औरंगाबाद विभागाचे सहनिबंधक राजेंद्र सुरावसे यांच्यापुढे बुधवारी सुनावणी झाली. नाशिकचे विभागीय अधिकारी बनसोडे रजेवर गेल्याने सुरावसे यांना सुनावणी घेण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार जिल्हा बँकेत तब्बल साडेपाच तास सुनावणी चालली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केले. आपल्यावर झालेल्या अन्यायाचे पुरावेही कोंडाजी मामा आव्हाडांसह सर्वच उमेदवारांनी सादर केले. सुरावसे यांनी दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर त्यावरील निकाल मात्र राखून ठेवला आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी आता त्‍यांच्या अपील अर्जावरील निकाल सुनावला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग देवीचे दर्शन होणार सुलभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळ्वण

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या आदिशक्ती सप्तशृंग गडाचा कायापालट होऊन विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यातच देशातील महत्त्वाकांक्षी अशा प्रथमच साकारणाऱ्या बीओटी तत्वावरील फनिक्युलर ट्रॉली सिस्टीम ही येत्या दिवाळीपर्यंत कार्यान्वित होणार आहे. ही माहिती आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवणचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

सप्तशृंगी निवासनी देवीचे मंदिर डोंगरकड्याच्या मध्यभागी असून, पायथ्यापासून १०० मिटर उंचीवर आहे. सध्या भाविकांना दर्शनासाठी ५५० पायऱ्यां चढाव्या लागतात. भाविकांना दर्शनाचा जलद व सुखकर लाभ घेता यावा यासाठी पायथ्यापासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत खासगीकरणाच्या माध्यमातून फनिक्युलर ट्रॉलीचे काम प्रगतीपथावर आहे. सदर फनिक्युलर ट्रॉलीचे बांधकाम ३० जून २०१५ अखेर पूर्ण होणार आहे.

डोंगरकडेच्या कपारीतून दगड-धोंडे पडू नये म्हणून दरड प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहे. यासंबंधी सप्तशृंग गड ट्रस्टने जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केला. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकामी तांत्रिक सल्लागार म्हणून आयआयटी पवई यांची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक सल्लागारच्या अहवालानुसार प्रदक्षिणा मार्गावरील दरडी प्रतीबंधात्मक उपाययोजना करण्याकामी विविध बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत.

सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांपैकी साधारणत: २० टक्के भाविक मार्कंडेय ऋषी मंदिरास भेट देतात. सप्तशृंग गड व मार्कंडेय डोंगर या दरम्यान मोठी दरी असून, सध्यस्थितीत भाविकांना या दरीतून खाली उतरून मार्कंडेय डोंगरावर जाण्यासाठी अवघड कसरत करावी लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन

सप्तशृंग गड ते मार्कंडेय डोंगर दरम्यान रोपवे मार्ग बांधल्यास भाविकांना सुलभ व सोयीचे होणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे आकर्षण होऊन पर्यटनातदेखील वाढ होणार आहे. तसेच, काही प्रमाणात स्थानिक जनतेला रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.

सदर प्रकल्प कार्यान्वित करणे व देखभाल दुरुस्ती करण्याकामी प्रतिवर्ष ७५.६२ लाख इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने खासगीकरण अंतर्गत ८.३० कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पात ७६७ मीटर लांबीचा मोनोकेबल प्रकारचा रोप वे बांधण्यात येणार आहे. या रोपवेची प्रवाशी क्षमता ३५० व्यक्ती प्रती तास आहे. सदर प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या तीन वर्षांसाठी तिकीट दर प्रौढांकरिता ५० रुपये तर मुले / जेष्ठ नागरिकांसाठी २५ रुपये प्रतिव्यक्ती असा राहणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम साधारणत: दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात किंबहुना उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच रोपवे उभारला जाणार आहे.

या सुविधाही मिळणार

प्रथम वर्षासाठी प्रौढ व्यक्तींकरिता तिकीट दर ८० रुपये तर ३ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांना तसेच ७५ वर्षांवरील व्यक्तीस व अपंग व्यक्तीस ४० रुपये प्रतिव्यक्ती इतका राहणार आहे. यात इतर सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे. प्रवाशी प्रतीक्षालय, बुकिंग ऑफिस, स्टाफ रूम, वेटिंग प्लॅटफार्म, पार्किंग यार्ड, व्हीआयपी व सर्वसाधारण निवासव्यवस्था, ६० खोल्या, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा आहेत. यामुळे सप्तशृंग गडावरील सुविधांमध्ये वाढ होणार असून भाविकांना लाभ होणार आहे.

अशी असेल फनिक्युलर ट्रॉली

>फनिक्युलर ट्रॉलीची क्षमता ६० व्यक्ती

>ट्रॅकची लांबी १७६ मीटर

>ट्रॉलीद्वारे प्रवास कालावधी तीन मिनिट

>ट्रॉलीची वाहन क्षमता १२०० व्यक्ती प्रती तास

सप्तशृंग गड येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. बीओटी तत्त्वावरील फनिक्युलर ट्रॉलीचे बांधकाम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. साधरणतः सर्व चाचणी पूर्ण करून या वर्षी दिवाळीपर्यंत हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - विजय पाटील, कार्यकारी अभियंता, कळवण सार्वजनिक बांधकाम विभाग

गेल्या आठ महिन्यांपासून ट्रस्टचे काम करीत असून या काळात मंदिर परिसर, शिवालय तलाव आदी ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करीत कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. फनिक्युलर ट्रॉलीचे बांधकाम याआधी खूप रेंगाळले आहे. आता, लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन अपंग, वृध्द या सर्वांना याचा लाभ मिळेल, असा विश्वास वाटतो. - सुदर्शन दहातोंडे, ट्रस्ट व्यवस्थापक, सप्तशृंग गड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कारांमुळेच माणूस सुंदर होतो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महागडे कपडे, बूट, घड्याळ घालून आणि उंची वस्तू वापरून माणूस देखणा होत नाही तर संस्काराने सुंदर होतो. मुलांना कळायला लागल्यावर संस्कार केले पाहिजे. तसे केले तर आयुष्य हे सुंगधी उटण्याप्रमाणे सुंदर होते, असे प्रतिपादन अमोल शेवडे यांनी केले.

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक आणि महापालिकेच्या व्याख्यानमालेत सुंदर मी होणार सुंदर यावर त्यांनी व्याख्यान दिले. बँकेचे अध्यक्ष डा. दत्तात्रय पेखळे अध्यक्षस्थानी होते. शेवडे म्हणाले की, विद्या सहजासहजी मिळत नाही. ‌तिचे सोंग आणता येत नाही. ती मेहनतीने कमवावी लागते. ती आधी घोकायची व नंतर ओकायची असते. आज मुलांना उच्चार नीट करता येत नाही. पाढे पाठ नसलेला मुलगा स्मार्ट फोन वापरतो. पालकांना त्याचे कौतुक वाटते. परिस्थितीकडे पाहिल्यावर पूर्वीची मूल्य शिक्षणपद्धत रुजवण्याची वेळ आली आहे. कामावरून थकून भागून आलेला बाप घरी येतो तेव्हा मुले मित्रांसमवेत घरात बसलेली असतात. त्यावेळी वडिलांना येथे बसू का असे विचारावे लागते. त्यामुळे विलक्षण त्रास होतो. श्रद्धा, सबुरी याचा अर्थ कळाला तर देवळात जायची गरज नाही.

शिक्षकांच्याप्रती विद्यार्थ्यांनी प्रेमाचे व आदराचे नाते तयार करावे. शिक्षकांनी पूर्ण समरसून ज्ञानदान केल्यास विद्यार्थ्यांना विषय चांगला अवगत होईल आणि त्यांचा दर्जा सुधारेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६२४ विद्यार्थी वंचित

$
0
0

प्रवेशाबाबत शाळांची मनमानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क प्रवेशाचा कायदा करण्यात आला असला तरी शहरातील ६२४ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. खासगी विनाअनुदानित शाळांच्या मनमानीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, याची गंभीर दखल घेत सरकारने या शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी होत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. या २५ टक्के जागांसाठी यंदा ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार १२९० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेशित करण्यात आले. मात्र, गेल्या महिन्याभरापासून शाळांनी हे प्रवेश देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. आरटीई प्रवेशाला यापूर्वीच महापालिका शिक्षण मंडळाने दोनदा मुदतवाढ दिली. त्याकडेही शाळांनी दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात लोकक्षोभ उसळण्याचीही चिन्हे आहेत. याची दखल घेत शिक्षण मंडळाने शहरातील खासगी विनाअनुदानित शाळांची बैठक घेतली. प्रभारी प्रशासनाधिकारी वसुधा कुरणावळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खासगी शाळांचे जवळपास १०० प्रतिनिधी उपस्थित होते. १२९० पैकी केवळ ४५७ विद्यार्थ्यांनाच शाळांनी प्रवेश दिल्याची बाब या बैठकीत समोर आली. तर, १६० अर्ज नाकारण्यात आले असून ५९७ विद्यार्थ्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, ४७९ पालकांनी प्रवेशाची कुठलीही चौकशी केलेली नाही, असे बैठकीत स्पष्ट झाले. तर, ४४ शाळांनी अद्याप आरटीईचा एकही प्रवेश दिला नसल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल शिक्षण मंडळाने घेतली आहे.

पुणे महापालिका क्षेत्रातील १२६ शाळांनी आरटीईचे प्रवेश न दिल्याबद्दल त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव तेथील शिक्षण मंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याची आठवण या बैठकीत करुन देण्यात आली. त्यामुळेच २ मे पर्यंत आरटीईचे सर्व प्रवेश देण्यात यावेत. अन्यथा शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोनवरून तिकीट बुकिंगचा भुर्दंड

$
0
0

प्रत्येक तिकिटामागे रसिकांना आकारतात १० रुपये; फेर‌विचाराची गरज

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

थिएटरला चांगले नाटक आलेय परंतु, कामाच्या रहाटगाड्यातून आपल्याला तिकीट आणायला जमले नाही तर...! आपण लगेचच फोन उचलून तिकिटे बूक करायला सांगतो व नाटकाचा मनमुराद आनंद लुटतो. नाशिकमध्ये नाटक पहायचे असेल व तुम्ही फोनवरून तिकीट बूक करणार असाल तर, तुमच्याकडून चक्क त्यासाठी वेगळे पैसे आकारले जातील. वाचून आश्चर्य वाटले ना? परंतु, सध्या नाशिकमध्ये असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.

शहरात महाकवी कालिदास कलामंदिरात हे एकच थिएटर व्यावसायिक नाटक आणण्यासारखे आहे. तेथेही नाटकाला प्रेक्षक येण्यासाठी प्रचंड मारामार असताना अशातच याठिकाणी नाटकाचे तिकीट फोनवरून बुकिंग करण्यासाठी १० रुपये प्रत्येक तिकीट इतकी रक्कम आकारण्यात येत आहे. खासगी व्यवस्थापकाने घेतलेला हा निर्णय रसिकांच्या खिशाला चाट देणारा ठरत असून, त्यापेक्षा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहाणे परवडले अशा प्रतिक्रिया रसिकवर्गातून उमटत आहेत. नाट्य व्यवस्थापकांनी विचार करून असे निर्णय घ्यावेत, नाटकांना गर्दी कशी होईल ते पहावे. नवनवीन नाटके आणून नाटकाची संस्कृती कशी रूजवावी या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असताना तिकिटांना १० रुपयांचा भुर्दंड देणे व्यावहारिकतेत बसत नसून या निर्णयाचा फेरविचार व्यवस्थापकांनी करावा, असेही काही रसिकांनी सांगितले.

बूक माय शोवरून किंवा मल्टिप्लेक्सला तिकिट बुकिंग करताना एका तिकिटामागे इंटरनेटचा खर्च आकारताना १३ रुपये त्यापोटी घेतले जातात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नाटकासाठी ही रक्कम आकारली जात असल्याची चर्चा आहे.

मल्टिप्लेक्सला जो वर्ग चित्रपट बघण्यासाठी येतो त्याला हे १३ रुपये देणे काही विशेष नाही परंतु, नाटकाला जाणाऱ्या वर्गाला दोन तिकिटांसाठी २० रुपये देणे जीवावर येत आहे.

तिकिटामागे १० रुपये म्हणजे जोडप्याने नाटक पहायचे तर २० रुपये तो खर्च होतो. इन्टरव्हलमध्ये काहीबाही खायला लागते म्हणजे हे सर्व गणित सात-आठशे रुपयांच्या घरात जाते. तसे असेल तर नाटक न पाहिलेलेच बरे.

- कांचन रहाणे, रसिक

नाटक पाहण्याची प्रचंड इच्छा असते. परंतु, आधीच नाटकाचे तिकीट महाग त्यात फोनवर बुकिंग करण्याचे वेगळे पैसे आकारले जाणार असेल तर इतके पैसे खर्च करणे परवडण्यासारखे अजिबात नाही. मी एका चांगल्या नाटकाला त्यामुळे मुकणार असलो तरी शेवटी हा तत्त्वाचा प्रश्न आहे.

- सुहास निकम, रसिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगटाची भाजी ग्राहकांच्या घरी

$
0
0

महावीर कॉलेजच्या विद्यार्थिनींकडून वेबसाईटची निर्मिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बचतगटाच्या भाजी विक्रीला प्राधान्य देण्यासाठी महावीर एज्युकेशनच्या विद्यार्थिनींनी ऑनलाइन भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी वेबसाईटची निर्मिती केली आहे. या वेबसाईटद्वारे ग्राहकांना बचतगटाच्या माध्यमातून विक्री केलेला भाजीपाला थेट दारात मिळणार आहे.

नाशिक हे मुंबई पुण्यापाठोपाठ गोल्डन ट्रँगलमधील तिसरे डेस्टीनेशन आहे. नाशिकमधील लोकांचेही रहाणीमान व्यस्त होत चालले आहे. या व्यस्त जीवनपध्दतीमुळे बाजारात जाऊन भाजी घेणे सध्या घरातील दोघांनाही दुरापास्त झाले आहे. शहराचे होणारे विस्तारीकरण, नोकरदार वर्गाची वाढती संख्या आणि नोकरीचे व्यस्त वेळापत्रक यामुळे आता नाशिककरांना घरबसल्या किंवा ऑफिसमधून ऑनलाइन भाजीपाला खरेदीची गरज निर्माण झाली होती. ही गरज ओळखून श्री महावीर एजुकेशन सोसायटीच्या महावीर तंत्रनिकेतन मधील तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीरिंगमध्ये शिकणाऱ्या प्रियंका मालुंजकर, निकिता माळी, श्रद्धा चव्हाण, शिवानी शेलार या विद्यार्थिनींनी नाशिककरांना घरबसल्या भाजीपाला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑनलाइन भाजीपाला वेबसाईटची निर्मिती केली आहे. या वेबसाईटवर बचतगटांनी रजिस्टेशन केल्यानंतर महिला बचत गटांना आपला माल ग्राहकांना विकता येणार आहे. वेबसाईटवरून ऑर्डर दिल्यानंतर ग्राहक भाजीपाला घरपोच मिळाल्यानंतर पैसे देऊ शकणार आहे. तसेच क्रेडीटकार्डवरूनही पैसे देऊ करू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

KBC मालमत्तेवर ठेवीदारांचा दावा

$
0
0

उशिराने करवसुली होत असल्याबद्दल ठेवीदारांमध्ये संताप

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

केबीसीच्या मालमत्तेवर पहिला दावा ठेवीदारांचा आहे. सरकार इतके दिवस झोपले होते का? करांची वसुली सुरू होती म्हणजेच सरकारची केबीसीला परवानगी होती, अशा कंपन्यांना परवानगी दिली जातेच कशी? सरकार फसवणुकीला जबाबदार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया ठेवीदार व्यक्त करत आहेत.

केबीसीला केंद्रीय वित्त मंत्रालयाने सेवाकराच्या ५० लाखाच्या वसुलीसाठी नोटीस बजावली. रक्कम भरली नाही तर मालमत्ता जप्त केली जाणार आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली आहे. सरकारला केबीसीची प्रापर्टी कोठे आहे हे देखील माहित नव्हते, ती ठेवीदारांनी दाखवली. लढा अंतिम टप्प्यात आला असताना सरकार वसुलीसाठी दावा करू लागल्याने ठेविदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अशी आहे केबीसीची प्रॉपर्टी

केबीसीचे जत्रा चौकात अर्धा एकरात दुमजली कार्यालय, घोटीत साडेसात एकरात अर्धवट रिसार्ट, पंचवटी-हिरावाडीत तीन रो हाऊस, तपोवनात दोन एकर जागा, त्र्यंबकरोडला फार्म हाऊस, भाऊसाहेब चव्हाण याची हरनूल (ता. चांदवड) गावात वीस एकर जागा, राहुडबारीत ४२ एकर जागा, शिर्डीत जागा. चव्हाणच्या लॉकरमधून ८८ कोटींची रोकड व सोने जप्त. केबीसीचा प्रवर्तक भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या सग्या सोयऱ्यांच्या नावे विविध ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे. नातेवाईकांपैकी ११ जण अटकेत आहे. चव्हाण पत्नीसह फरार आहे. केबीसीने ठेवीदारांकडून सुमारे २१०० कोटी रुपये जमा केले. नेते, बिल्डर, सरकारी अधिकारी यांचा काळापैसा अडकला आहे. ते समोर आले तर फसवणुकीची रक्कम दुप्पट होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सरकारच जबाबदार

केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष करण गायकर म्हणाले, की मोठा सेवाकर मिळतो म्हणून केबीसीसारख्या कंपन्यांना सरकारी अधिकारी, नेते कमिशन घेऊन परवाने देतात. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीला तेच जबाबदार आहेत. सरकारी परवाना दाखवून भाऊसाहेब चव्हाणने लोकांना जाळ्यात ओढले. केबीसीला बँक सुरू करण्याचे लायन्ससही मिळाले होते. त्याचे शेअर्स घेण्यास चव्हाणने भाग पाडले, अशीही माहिती गायकर यांनी दिली.

प्रॉपर्टी सिल नाहीच

केबीसीची प्राॅपर्टीचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली होती. तशी कारवाई सुरू झाली आहे. परंतु, प्राॅपर्टी सिलच केलेली नाही. जत्रा चौकातील मुख्य कार्यालयाचे दोन्ही दरवाजे, वरच्या मजल्यावरील दरवाजे उघडे आहेत. मशिनने ग्रील कापून किंमती वस्तू चोरण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे. ठेवीदारांनी चारवेळा स्वतःचे कुलुप आणून लावले.

खरेदी विक्रीवर निर्बंध

भाऊसाहेब चव्हाण, त्याचा भाऊ, बहिण, मेव्हणा, मेव्हण्या, मामा आदींची प्राॅपर्टी केबीसीच्या फसवणुकीच्या पैशातूनच घेतल्याची माहिती देत केबीसी संघर्ष समितीने प्राॅपर्टीच्या खरेदी विक्रीवर निर्बंधांची मागणी केली होती. दुय्यम निबंधकांच्या ठक्करबाजार आणि नाशिकरोड कार्यालयाने या सर्वांच्या प्राॅपर्टीची यादीच लावली असून खरेदी-विक्रीवर निर्बंध घातल्याची माहिती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिली.

साब, मेरा पैसा मिलेगा ना!

केबीसीच्या मुख्य कार्यालयाच्या भिंतीला लागून आझाद शेख यांची पत्र्याची खाणावळ आहे. भाऊसाहेब चव्हाण व त्याचा भाऊ तेथे यायचा, फुकट जेवण झोडायचा. त्याने शेख यांना मेहनतीचे सहा लाख रुपये केबीसीत गुंतवायला भाग पाडले. शेख यांना प्राॅपर्टी सिल होणार असल्याचे समजल्यावर त्यांनी 'साब मेरा पैसा मिलेगा ना! बहोत मेहनतसे कमाया था', असा प्रातिनिधिक प्रश्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेसाठी साबरमती पॅटर्न

$
0
0

यांत्रिक बोटींच्या सहाय्याने स्वच्छतेचा प्रस्ताव; चार संस्थांकडून प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छतेचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असल्याने आणि न्यायालयाचाही दबाव वाढल्याने प्रशासनाने गोदावरीच्या स्वच्छतेसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. साबरमतीच्या धर्तीवर आता गोदावरीच्या धर्तीसाठी यांत्रिकीकरणाची मदत घेतली जाणार आहे. यांत्रिक बोटींच्या सहाय्याने गोदावरीचे प्रदूषण कमी केले जाणार आहे. यासाठी साबरमतीच्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या चार कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात महापालिकेत सादरीकरण केले जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून थेट उच्च न्यायालयानेच महापालिकेसह राज्य सरकारचेही कान उपटले आहेत. त्यामुळे महापालिका स्वच्छतेसाठी सक्रीय झाली असून दंडात्मक कारवाई सह पोलीस कारवाईही सुरू झाली आहे. नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी अडविण्यासाठी तब्बल १९ नालेही बंदिस्त करण्यात आले आहे. मात्र, तरीही नदीत सांडपाणी सोडले जात आहे. तर दुसरीकडे नदीपात्रात कचरा आणि निर्माल्य टाकला जात आहे. नदीजवळ निर्माल्य कलश ठेवले तरी भाविकांकडून कचरा व निर्माल्य नदीपात्रातच टाकला जात आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावरच कचरा जमा होता. सध्याच्या यंत्रणेद्वारे हा कचरा उचलणे महापालिकेला शक्य होत नाही. तर नदीपात्रात खाली गेलेला हा कचरा उचलणे शक्य होत नाही. त्यामुळे पाण्यावरील तरंगता कचऱ्यासह तळाशी गेलेला कचरा उचलण्यासाठी यांत्रिक बोटीची मदत साबरमतीच्या स्वच्छतेसाठी घेतली जाते. त्याच धर्तीवर आता गोदावरीच्या स्वच्छता केली जाणार आहे.

पुढील आठवड्यात सादरीकरण

तांत्रिक व यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने गोदावरीचे प्रदूषण रोखले जाणार आहे. यांत्रिक बोटींच्या मदतीने तरगंत्या कचऱ्यासह तळाशी गेलेला कचराही आता काढता येणार आहे. यासाठी महापालिकेन चाचपणी सुरू केली असून काही कंपन्याना आवाहन केले आहे. त्यामुळे साबरमतीच्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या चार कंपन्याही या कामासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात या कंपन्याकडून आयुक्तांकडे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.

रामघाटावरील विधी स्थलांतरीत करणार ?

गोदावरीच्या प्रदूषणाला रामघाटावर होणारे वेगवेगळे विधी आणि निर्माल्य कारणीभूत आहे. यासाठी साधू महंताशी महापालिकेची चर्चा सुरू असून पर्यायी ठिकाणी या विधी कराव्यात अशी सूचना महापालिकेला केली आहे. मात्र, या सूचनेला पुरोहित संघाचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएचडीसाठी सिडनीत घ्या भरारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात वैद्यकीय विषयाची पीएचडी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सिडनी विद्यापीठ यांच्यात झालेल्या संशोधनात्मक कार्यासाठीच्या सामंजस्य करारातून विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. त्यासाठीचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सिडनी विद्यापीठातील सिडनी मेडिकल स्कूल यांच्यात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आदी विविध विषयांवर गेल्या सप्टेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएचडीची संधी निर्माण झाली आहे. कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, युनिर्व्हसिटी ऑफ सिडनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मायकेल स्पेन्स, सिडनी मेडिकल स्कूलचे डीन प्रा. ब्रुस रॉबिनसन यांच्या उपस्थित हा सामंजस्य करार झाला होता. या दोन्ही विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एचपीव्ही यातील संशोधन, डोके आणि मानेचा कर्करोग, कॅर्सिनोमा सर्विस आदी विविध विषयांवरील संशोधनाला प्राधान्य देणार

आहे. सद्यस्थितीत याबाबतचे संशोधन कार्य मर्यादित स्वरूपाचे असल्याचे यावर विशेषत्वाने संशोधन करण्यात येणार आहे. या कराराअंतर्गत युनिर्व्हसिटी ऑफ सिडनी, ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे विद्यार्थी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी ऑस्ट्रेलियात जाऊन या विषयावरील संशोधन करणार आहेत. या एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत पाठविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ती निवड केली जाणार आहे. त्यासाठी एज्युकेशन कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट यांची मान्यताही घेण्यात आली आहे.

सिडनी मेडिकल स्कूलमध्ये दहा विद्यार्थ्यांना फेलोशिप करता येणार आहे. भारतामध्ये संशोधन कार्यासाठी अब्दुल कलाम रिसर्च फेलोशिप सारख्या विविध प्रकारच्या फेलोशिप दिल्या जातात. मात्र, याचा लाभ घेणारे विद्यार्थी संख्या कमी असतात. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ग्लोबल हेल्थ फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन हा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून विद्यार्थी आणि फॅकल्टी यांना सध्याच्या अस्तित्वात असलेल्या फेलोशिपचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. आता या कराराद्वारेच विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्य़ात आले आहेत. येत्या ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://www.muhs.ac.in/ या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिडनीत वैद्यकीय विषयाची पीएचडी करण्याची संधी निर्माण झाली आहे. या शिक्षणासाठीचा सर्व खर्च केला जाणार असून, या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.

डॉ. अरुण जामकर, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादूटोणाप्रकरणी तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर जादूटोणा केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मांत्रिक फरार झाला आहे.

संतोष राजेंद्र पिल्ले (३६, रा. गणेश व्हॅली, सिन्नरफाटा) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, की मोहन राहूमल लालवानी, जीतू पहेलाज आहुजा, चंदू पहेलाज आहुजा व अनोळखी मांत्रिक यांनी पिल्ले यांच्या जेलरोड, त्रिवेणी पार्क येथील निर्मल डेव्हलपर्स या कार्यालयाच्या बाहेर राख, हाडे, लिंबू, हळद-कुंकू टाकूण जादूटोणा केला. मार्च ते मे दरम्यान असे प्रकार वेळोवेळी घडले. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली. महाराष्ट्र नरबळी व अघोरी जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्ह दाखल झाला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर त्याअंतर्गत पहिला गुन्हाही नाशिक जिल्ह्यातच नोंदवला गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दामूची धमाल अन श्रीमंतांचा आदर

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

संध्याकाळी प्रकटणारे श्रीमंत... दामूचा लोभस स्वभाव.... धम्माल उडवून देणारे गणपतराव... मोहन शिंदेच्या गायन प्रसंगात पोट धरुन हसणारे प्रेक्षक... असा सारा नजारा 'श्रीमंत दामोदरपंत' नाटकाप्रसंगी होता. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांसाठी बुधवारी रात्री कालिदास कलामंदिरात 'श्रीमंत दामोदरपंत' या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

उन्हाळ्याच्या सुट्या आनंदी जाव्यात यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे वाचकांसाठी खास सवलतीच्या दरात नाटकाची तिकिटे उपलब्ध करुन दिली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केदार शिंदे दिग्दर्शित आणि भरत जाधव एन्टरटेन्मेंट निर्मित 'श्रीमंत दामोदरपंत' हे नाटक बुधवारी रात्री झाले. या नाटकात भरत जाधव आणि जनार्दन लवंगारे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. अतिशय शांत असणारा दामू आणि संध्याकाळच्या सुमारास दामूचे होणारे श्रीमंत दामोदरपंत प्रेक्षकांची दाद देणारे होते.

नाटकाचे संवाद आणि सर्वांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणाराच होता. माई, विजय, सुमन, नयना, शृंगारपुरे या साऱ्यांच्याच कलेला टाळ्यांच्या कडकडाटाची दाद प्रेक्षकांकडून वेळोवेळी मिळत होती. मोहन शिंदे या सुमनवर प्रेम करणाऱ्या युवकाचा घरातील प्रवेश आणि श्रीमंतांचे जागे होणे या प्रसंगाने तर प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरुन हसविले.

लोभस दामू आणि कणखर श्रीमंत अशा दोन्ही भूमिका भरत जाधवने अतिशय अप्रतिमरित्या वठविल्याने प्रेक्षकांच्या मनात भरतची उंची कित्येक पटीने वाढते. मध्यांतरानंतर नाटकातला जिवंतपणा अधिकच वाढतो आणि शेवटच्या क्षणी नव्या पाहुण्याच्या आगमनातूनच श्रीमंतांच्या बदली रुपाचा साक्षात्कारही यावेळी होतो. एकंदरीतच सर्वांना खिळवून ठेवतानाच धीरगंभीर प्रसंगानंतरही हास्याची कारंजी फुलवत ठेवणाऱ्या या नाटकाचा नाशिककररांनी आस्वाद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगा तुमचा ‘फ्लेव्हर ए मँगो’

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

उन्हाळ्याचा सीझन आंब्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आंबायुक्त पदार्थांना या सीझनमध्ये उधाणच आलेले असते. म्हणूनच आंब्याच्या या खास मूडला सेलिब्रेट करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत 'फ्लेव्हर ए मँगो' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आंब्याशिवाय ज्यांचा उन्हाळा जात असेल असं घर भारतात शोधूनही आपल्याला सापडणार नाही. पन्ह्यापासून आंब्याच्या विविध चटणी, लोणच्यांपर्यंतचे अनेक प्रकार आपल्या घरांमध्ये सुरू असतात. त्यातच अनेक महिला आंब्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनविण्यात गुंतलेल्या असतात. आंबावडीपासून आंब्याच्या सूपपर्यंत अनेक रेसिपीजमध्ये या महिला आपली शक्कल लढवत असतात. याच महिलांसाठी 'मटा'मार्फत खास या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्यक्षरित्या कोणतीही रेसिपी बनवून दाखवावी लागणार नाही. आंब्यपासून बनविल्या जाणाऱ्या कोणत्याही तिखट किंवा गोड पदार्थाची रेसिपी तुम्हाला आमच्याकडे लिहून पाठवायची आहे. रेसिपी पाठवताना स्वत:चे नाव, फोन नंबर हे लिहून पाठवणे गरजेचे आहे. या रेसिपीज तुम्ही events.mata@gmail.com या इमेल आयडीवर पाठवू शकता. तसेच 'मटा'च्या कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीतील काठियावाड शोरुम समोरच्या ऑफिसमध्येही तुम्ही आपल्या रेसिपीज पाठवू शकता. चला तर मग पाठवा तुमचा फ्लेव्हर ए मँगो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मूव्ह ईट २०१५’

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

मोहित जैन डान्स इन्स्टिट्यूटमार्फत 'मूव्ह ईट २०१५' या भव्य डान्स शोचे आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आले होते. इन्स्टिट्यूटतर्फे ही १५ दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. यात ३ ते २५ वयोगटातील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेमध्ये हिप हॉप, लॉकींग पॉपींग, फ्री स्टाईल, बॉलीवूड, कंटेंपररी या नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेचा समारोप म्हणून या भव्य शो चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पालकांनी व रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संचालक मोहित जैन यांच्याबरोबरच झरना पंजवानी, भावना कटारे, नेहा पाटील, सलोनी जोशी व इतर सहकाऱ्यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या डान्स शो चे संयोजन स्पंदन एव्हेंट्सचे आनंद ओक यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगणार साहसपटांचा उत्सव

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

जगभरातील साहसविरांच्या अजोड कामगिरीचे दर्शन घडविणाऱ्या आणि खऱ्याखुऱ्या साहसपटांचा सहभाग असलेला 'बाफ माऊन्टन फिल्म फेस्टिव्हल' नाशिकमध्ये रविवारी (१० मे) आयोजित करण्यात आला आहे. 'हिमालयन क्लब'च्या मान्यतेने 'वैनतेय गिर्यारोहण संस्थे'ने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

एक पाय गमावलेला असूनही कुणी स्किईंग करतो, कुणाचे अत्यंत लहान वयात अवघड प्रस्तारोहण सुरू आहे, कुणी सुळक्याच्या कुशीत सायकलींग करतंय, कुणी अफगणिस्थानातल्या दुर्गम भागात सायकलवरुन शोधकार्य करतोय, अशा अनेक साहसविरांच्या चाललेल्या जगावेगळ्या साहसी उद्योगांच्या शॉर्ट फिल्मस् एकत्रितरित्या पहाण्याचा योग नाशिककरांना या निमित्ताने मिळणार आहे. जगातील सर्वोत्तम अशा माऊन्ट फिल्मसचा हा उत्सव नाशिककरांसाठी उपलब्ध झाला आहे.

जगात दरवर्षी साहसी खेळात सर्वोच्च कामगिरी करणारे साहसवीर, त्यांचे प्रत्यक्ष शूटिंग करणारे साहसी कॅमेरामन, त्यांचे दिग्दर्शक व निर्मिती चमू आपले सर्वोत्तम चित्रपट तसेच लघुपट बाफ चित्रपट महोत्सवाकरता पाठवतात. अशा सुमारे तीनशे प्रवेशिकांमधून निवड समिती २५ चित्रपटांची निवड वर्ल्ड टूर करता करत असते. गिर्यारोहण, स्किईंग, कयाकिंग, सायकलिंग, बेसजंम्पिंग, स्नो बोर्डिंग यासारख्या साहसी विषयांचा या चित्रपटांमध्ये अंतर्भाव असतो. भारतात गेल्या ५ वर्षापासून फक्त मुंबईमध्ये 'हिमालयन क्लब' या संस्थेच्यावतीने हा उत्सव होत होता. परंतु या वर्षीपासून नाशिकसह इतरही शहरांमध्ये हा फिल्मोत्सव अनुभवायला मिळणार आहे.

यंदाच्या उत्सवामध्ये एकूण १३ फिल्मसचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने साहसी तरुण वर्गाला मोठे प्रोत्साहन मिळेल. यापासून प्रेरणा घेऊन तरुणांनी साहसी खेळात जागतिक दर्जाची कामगिरी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत हा या महोत्सवाचा हेतू आहे. नाशिकमध्ये या महोत्सवाची जबाबदारी 'वैनतेय' या गिर्यारोहण क्षेत्रातील संस्थेकडे देण्यात आली आहे. नाशिकमधील गिर्यारोहण सायकलिंग व अन्य साहसी क्रीडा संस्थांच्या उदंड प्रतिसादामुळे एकाच दिवसात याचे दोन खेळ आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी १ ते ५ व सायंकाळी ५.३० ते ९.३० असे दोन खेळ होणार आहेत. या अनोख्या फिल्म महोत्सवाचा आनंद नाशिककरांनी घ्यावा. प्रवेशाकरिता टकले बंधू सराफ (सराफ बाजार), साई स्पोर्ट्स, कॅनडा कॉर्नर, देशपांडेज ऑप्टीव्ह्यू, मित्र विहार कॉम्प्लेक्स येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

'पर्यावरणाशी जवळीक साधत साहसवीर काय करतात याचे रोमहर्षक चित्रण या फिल्मसमध्ये करण्यात आले आहे. लहान मुले, पर्यवरण प्रेमी, सायकलिस्ट अशा सर्वांनी याचा आनंद घ्यावा.'- प्रशांत परदेशी

'जगातील सर्वोत्तम अशा साहसी फिल्म पहाण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या फिल्म पाहाव्यात असा वैनतेयचा उद्देश आहे. यामध्ये जागतिक दर्जाच्या फिल्मस् पाहायला मिळणार आहते.'- राहुल सोनवणे





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी लगीनघाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कामांबाबत प्रशासन हातघाईवर आले आहे. शहरातील जवळपास सर्व रस्ते एकाच वेळेस खोदले आणि एकही काम पूर्ण नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना येत्या २४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकनगरीत येण्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख रस्ता शाही मार्ग असलेला मेनरोड आणि कुशावर्त तीर्थ परिसरात रखडलेले काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. महंत शंकरानंद सरस्वती यांनी मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि तसेच कुशावर्त तीर्थावर साधू महंतांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. मेनरोड रस्त्यांचे खोदकाम रात्रपाळीत करण्यात येत आहे. दिवसरात्र जेसीबी यंत्र कामाला जुंपली असतांनाही कामांमध्ये प्रगती दिसत नाही. दैनंदिन कामाकाजाला खीळ बसली आहे. कामांबाबत सुसुत्रता नसल्याने अशी परिस्थिती उदभवली आहे. नगरपालिका प्रशासनाचे दोन इंजिनीअर, वास्तुविशारद कंपनीचे चार इंजिनीअर सिंहस्थ कामांकसाठी अन्य एक इंजिनीअर असा मोठा फौजफाटा तैनात असतांना कामांची स्थिती चिंताजनक आहे.

ताळमेळाचा अभाव

शहरात रस्ता चार वेळा खोदण्यात आला आहे. प्रारंभी पाणी पुरवठ्यानंतर वीज महावितरण नंतर पथदीप आणि शेवटी गटारीसाठी रस्ता खोदण्यात आला. नव्याने टाकेल्या पाईपलाईनला ठिकठिकाणी पंक्चर झाल्याने ठिगळांचे लेपन करण्यात आले आहे. वीज वाहिन्यांची तीच परिस्थिती आहे. ठेकेदार आपल्या सवडीप्रमाणे कामांना पसंती देत आहेत. रेती ऐवजी सर्रास कच पावडरचा वापर झाल्याने आताच काही ठिकाणी रस्त्यांना तडे गेले आहेत. कामांची लगीनघाई असल्याने व जिल्हा प्रशसनाचा तगादा लागल्याने घाईगडबडीचा फायदा ठेकेदार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा ताळमेळ नसल्याचे वारंवार जाणवत आहे. मेनरोड बाजारपेठेत रस्त्यावर असलेल्या हातगाड्यांनी कामास अडथळा होतो म्हणून नगरपालिका या व्यवसायिकांना अतिक्रमित ठरवून हातगाडे जमा करत आहे.

वाढत्या वाहनांमुळे कामाचा खोळंबा

शहरात वाहने आल्याने कामास अडथळा होत आहे. प्रवासी वाहने अडविण्याची नगरपालिकेने मागणी केल्यानंतर पोलिसांनी काही तास एकही वाहन शहरात सोडले नाही. अगदी बांधकामासाठी रेडी मिक्स काँक्रिटचे ट्रक देखील बंद केल्याने श्हारातील सर्व कामे काही तास ठप्प झाली. यामुळे ठेकेदार हवालदिल झाले. अर्थात काही वेळाने पुन्हा वाहने सोडण्यात आली व सर्व काही सुरळीत झाले. दरम्यान, काही महिन्यांपासून रस्त्याच्या कामांच्या नावाने बस स्थानक गावाबाहेर हलविण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक त्रास भाविकांसह विद्यार्थ्यांना होत आहे. बस वाहतूक थांबवून कामे होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

पंतप्रधानांना आमंत्रण

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा संपन्न होत असून, १४ जुलैला रामकुंडावर सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी आमंत्रण देण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात मोदी यांची गुरुवारी भेट घेत त्यांना आमंत्रण पत्र दिले.

बिल गेटस फाउंडेशनची मदत

कुंभमेळ्यात स्वच्छता टिकून राहावी यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. कुंभमेळ्यात अस्वच्छता राहू नये तसेच, भाविकांची सोय व्हावी यासाठी बायो टॉयलेट्स बनवण्यात येणार आहे. या कामासाठी बिल गेट्स व मेलिंडा गेट्स फाउंडेशनला आपण स्वतः आग्रह केला असून, फाऊंडेशन मदत करणार असल्याचे आश्वासन मोदींनी या वेळी शिष्टमंडळाला दिले. सोबतच सिंहस्थात परिसर अस्वच्छ राहणार याची काळजी घ्या, अशा सूचना मोंदीनी शिष्टमंडळाला या वेळी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images