Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘अन्यथा हंडा मोर्चा काढू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याने प्रभागातील अश्वमेध नगर, विठाई नगर, गजवक्र नगर, ओमनगर, पवार मळा भागातील रहिवाशी नागरिक त्रस्त झाले आहेत‌. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास पंचवटी विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिला शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मी ताठे यांनी दिला आहे.

प्रभागातील विविध भागात जलवाहिनी न टाकल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नीट व वेळेत पुरेसा होत नाही. त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. दररोज अर्धा किलोमीटरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. हॉटेल जत्रामागील श्री स्वामी समर्थ नगरात सुद्धा जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. निवडणुका आल्या की आश्वासन दिले जाते आणि नंतर बिचाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणीप्रश्नाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीना वेळोवेळी निवेदन दिले मात्र, काही उपयोग होत नाही. उलट दिवसेंदिवस पाणीप्रश्न बिकट होत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

ऐन सुटीच्या काळात पाण्यासाठी फिरावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास व पाणी पुरवठा तत्काळ सुरळीत न केल्यास हंडामोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. शिवसेनेचे पंचवटी विभागप्रमुख हरिभाऊ काळे, निलेश मोरे, दिलीप मोरे, मल्हारी मते, संजय थोरवे, शैलेश सूर्यवंशी, गणेश थेटे, शोभा दिवे, संतोष पेलमहाले, सचिन परदेशी यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

जलवाहिनी टाकण्याची मागणी पाठपुरावा करूनही अद्याप मान्य करण्यात आलोली नाही. सर्व कर वेळेवर भरूनही सुविधा मिळत नाही.

- रमेश अहिरे, नागरिक

पाण्यासाठी आमची वणवण अद्याप थांबलेली नाही. अनेकवेळा महपालिकेकडे निवेदनही दिले पण कायम कानाडोळा केला जातो. पाणी पुरवठा सुरळीत करावा.

- लक्ष्मी ताठे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांची बैठकीला दांडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण स्वरूप असल्याने पंचायत समितीच्या मासिक बैठकीत यावर गांभीर्याने चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी गैरहजर होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही बैठकीला दांडी मारल्याने उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा निषेध केला.

चिंचलेखैरे या गावासह अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, निवेदन स्वीकारायला व शिष्टमंडळाशी चर्चा करायला सक्षम अधिकारी नसल्याने सहाय्यक व प्रभारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या हंडा मोर्चेकरांना समाधान मानावे लागले. श्रमजीवी संघटनेनेही या खेदजनक बाबीचा निषेध व्यक्त केला.

इगतपुरी तालुक्यात अनेक गावांना पाणीटंचाईचे भीषण स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावांनी गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठ्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. मात्र, दीड महिना उलटूनही याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. हे प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून आहेत. तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाकडून याबाबत पाठपुरावा होत नसल्यानेच पाणी टँकरला विलंब होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत याबाबत गांभीर्याने चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनीच या बैठकीकडे पाठ फिरविल्याने पाणीपुरवठ्याच्या चर्चेवरच पाणी फिरले. त्यातच गटविकास अधिकारी व तहसीलदारही तालुक्याबाहेर असल्याने पाण्याने व्याकूळ जनतेने पाणी मागायचे कुणाकडे? असा सवाल व्यक्त केला आहे.

पाण्यासाठी हंडा मोर्चा

टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वखाली हंडा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु, स्थानिक प्रशासनाधिकारीच बैठकीला उपस्थित नसल्याने या शिष्टमंडळाने सहाय्यक अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तालुक्यातील चिंचलेखैरे, तळोघ, धानोशी, मांजरगाव या गावांना व वाड्यांना तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरावठा करावा, अशी मागणी भगवान मधे यांनी केली आहे. चिंचलेखैरे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी चक्क तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमधील मातब्बरांकडे लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले असून, जिल्ह्यातील मातब्बर बँकेत शिरकाव करण्यासाठी वेगवेगळ्या गटातील प्रवेशव्दारात उभे ठाकले आहेत. यातील कोणत्या नेत्यांना बँकेत प्रवेश मिळतो आणि कोणासाठी दरवाजे बंद होतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेवर गैरव्यवहार, बेकायदेशीर कर्जवाटप, बँकेचा वाढलेला एनपीए या कारणांमुळे दोन वर्षापूर्वी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. प्रशासक नेमण्याचा हेतू कितपत यशस्वी झाला हा जरी वादाचा मुद्दा असला तरी बँकेची निवडणूक घोषीत झाल्याने अनेक नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. वनवास संपल्याचा आनंद नेत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

गेल्या संचालक मंडळातील काही जागा कमी झाल्या असून, आगामी संचालक मंडळ हे २१ सदस्यांचे असणार आहे. यात सोसायटी अ गटातून १५ संचालक, ब गटातून पाच संचालक तर क गटातून एका संचालकाला संधी मिळणार आहे. यातील सोसायटी अ गटातून पाच संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सोळा जागांसाठी मतदान होणार आहे. दि. ११ मे रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. अजूनही दोन तीन संचालक बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. गेल्या संचालक मंडळात निफाड तालुक्यातील पाच संचालक होते. या निवडणुकीत निफाडमधील संचालकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

निफाडमधील सोसायटी अ गटातून दिलीप बनकर यांच्याबरोबरच आमदार अनिल कदम, भास्करराव बनकर, राजेंद्र डोखळे, जयदत्त होळकर आदी मातब्बरांचे उमेदवारी अर्ज असले तरी आमदार अनिल कदम व राजेंद्र डोखळे या दोघांनीही इतर मागासवर्ग ब गटातून आपली उमेदवारी निश्चित करून प्रचारास सुरुवात केली आहे. अ गटासाठी त्यांचा विषय संपला आहे. जयदत्त होळकर यांच्या वहिनी व मुकुंद होळकर यांच्या पत्नी प्रतिभा होळकर यांची महिला गटातून उमेदवारी निश्चित झाल्याने जयदत्त होळकर हे सुध्दा अ गटातून थांबण्याची शक्यता आहे. यामुळे अ गटात दिलीप बनकर यांच्यासमोर भास्कर बनकर हे एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे. तरी सोसायटी गटातील मतांच गणित जुळत नसल्याने भास्करराव बनकरांची माघार निश्चित मानली जात आहे. यामुळे दिलीप बनकरांचा बँकेतील प्रवेश बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यामुळे निफाडमधील अ गटातील चुरशीची निवड यावेळी दिसण्याची शक्यता धुसर आहे.

इतर मागासवर्ग ब गटातील आमदार अनिल कदम, राजेंद्र डोखळे व वसंत गिते यांची लढत लक्षवेधी व रंगतदार ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत आमदार अनिल कदम व राजेंद्र डोखळे हे दोघेही ढिकले गटाचे संचालक होते. विधानसभा निवडणुकीत डोखळेंनी कदमांना मदत केली होती.े. यामुळे ब गटात गिते-कदम-डोखळे अशी रंगतदार लढत होणार आहे.

सोसायटी अ गटातून आपण उमेदवारी करणारच. आमच्या गटाकडे विजयाचे गणित जुळवण्याइतके मते असून, ‌माणिकराव बोरस्ते, आमदार कदम, जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे आदी नेत्यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणार आहे.

- भास्करराव बन‌कर, सोसायटी अ गट इच्छुक

आमदार अनिल कदम हे प्रमुख नेते असून, त्यांनी अ गटातून दिलीप बनकर यांच्यासमोर उमेदवारी करावी. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना मदत केली होती. यामुळे बँक निवडणुकीत त्यांनी मला मदत करायला हवी होती. मतदार मला न्याय देतीलच.

- राजेंद्र डोखळे, ब गट उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-सिन्नर रस्ता दृष्टीक्षेपात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-सिन्नर रस्त्याचे काम सिंहस्थापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असून, या कामातील अडथळे दूर करण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाला यश येत आहे. आतापर्यंत सुमारे ८० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होऊ शकणार आहे. काम करणाऱ्या संस्थेला ३० एप्रिल रोजी ताबा देण्यात आला असून, त्या कामाची वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

भूसंपादनासह अन्य कारणांनी रखडलेल्या नाशिक-सिन्नर मार्गाच्या कामासाठी ८० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच, सिन्नर शहर वळण रस्त्याचे भूसंपादन जवळपास पूर्ण होत असल्याने या मार्गाच्या कामाचा प्रारंभ दृष्टीक्षेपात आहे. या रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यासाठी ८० टक्के भूसंपादनाची आवश्यकता होती. सदर काम चेतक एंटरप्रायजेस कंपनी करणार आहे. या मार्गासाठी सुमारे ४३० शेतकऱ्यांची जमीन संपादित होत असून, जादा दरासाठी यातील ८० टक्के शेतकऱ्यांनी लवादाकडे अपील केले आहे. भूसंपादनासाठी शासनाने ३५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत काही जमीन मालकांना रकमेचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी कमी दराअभावी अद्यापही मोबदला स्वीकारला नाही. ज्यांनी मोबदला स्वीकारला त्यांनीही अटी-शर्ती कायम ठेवल्या आहेत.

सिन्नर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरदवाडीच्या बाजूने सुमारे ९.५ कि.मी. लांबीचा वळण रस्ता करण्यात येणार आहे. त्यापैकी बहुतांश मार्गाचे चर खोदून भूसंपादन पूर्ण झाले आहे. तर, काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची कापणी झाल्यानंतर येथे चर खोदून हद्द कायम करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामास माळेगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर नगरपालिकेच्या जलवाहिन्यांचा अडथळा आहे. तसेच, वीज वितरणची लाइनही येत असल्याने त्या इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी काम सुरू असून, ही तीनही कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. शिंदेगावचा अपवाद वगळता इतरत्र भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे इतर ठिकाणचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचे प्रवेशव्दार बनले भकास

$
0
0

द्वारका परिसर असुविधांच्या गर्तेत; नाशिकचे नाव धुळीस मिळण्याची चिन्हे

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

आगामी सिंहस्थानिमित्त शहरात विविध विकासकामे सुरू असली तरी शहराचे प्रवेशद्वार मानला जाणारा द्वारका परिसर बकाल व भकास अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे परगावाहून नाशिकमध्ये ये-जा करणारे हजारो प्रवासी, पर्यटकांना नाशिकचे अनपेक्षित मात्र भ्रमनिरास करणारे दर्शन घडत असून यामुळे शहराचे नाव देशपातळीवर धुळीस मिळण्याची दाट चिन्हे आहेत.

शहराचे प्रवेशद्वार म्हणून जुने नाशिकमधील द्वारका परिसर परिचित आहे. त्यामुळेच या भागातून आजही शहरातील गणेश विसर्जन, शिवजयंती आणि अन्य महत्त्वाच्या सण उत्सवांच्या मिरवणुका निघतात. मात्र, एकेकाळी नाशिकची वेस असलेल्या या भागात सिंहस्थाच्या पार्श्वभूमिवर कोणतिही कामे होत नसल्याचे निराशजनक चित्र आहे. नाशिकच्या या प्रवेशद्वाराला अतिक्रमणाचा विळखा तर आहेच शिवाय द्वारका परिसरात बेसुमार अनधिकृत गॅरेज निर्माण झाल्याने व चारही बाजुंनी होणारी वाहतूक कोंडीमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून जुने नाशिक परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला गेला आहे.

भुयारी मार्गात भय अधिक

द्वारका परिसरात पादचाऱ्यांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग बनविण्यात आला. मात्र, नागरिकांकडून त्याचा विशेष उपयोग केला जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा भूयारी मार्ग वापराविना पडून आहे. या मार्गाचा वापर करण्याचे पादचाऱ्यांनी धाडस केले तरी भुयारी मार्गातील दिवे बंद असतात. त्यामुळे अंधाराची भीतीमुळे पादचाऱ्यांना माघारी फिरावे लागते. द्वारका येथे एसटीचा थांबा आहे. याच थांब्यावर बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिक भर पडते.

दुभाजकातील जाळ्यांची चोरी

मुख्य रस्त्यालगतच नागसेन नगर व संत कबीरनगर या दाट वस्तीच्या झोपडपट्टी आहेत. यामुळे येथून जातांना शहरातून नव्हे तर ग्रामीण भागातून जात असल्याचा भास नागरिकांना होतो. नाशिक-पुणे या मुख्य रस्त्याच्या द्वारका ते सारडा सर्कल या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर लोखंडी जाळ्या टाकून झाडे लावण्यात आली होती. मात्र, देखभाली अभावी ही झाडे जगली नाहीच उलट गर्दुले व चोरट्यांनी या लोखंडी जाळ्या चोरुन नेल्या. जुने नाशिकची पुरती शोभा झाली.

वाहतूक बेटांची दुरवस्था

वडाळानाका परिसरातील मुख्य रस्त्यावरील गरुडाचे शिल्प असलेल्या एकमेव वाहतूक बेटाची दुरावस्था झाली आहे. तसेच अहल्याबाई होळकर यांना बांधलेल्या ऐतिहासिक वाकडी बारव कारंजा नामशेषच्या मार्गावर आहे. या कारंजाच्या लोखंडी जाळ्या चोरीला गेल्या आहेत. सारडा सर्कल येथील कारंजातून पाण्याचे फवारे उडाल्याचे स्थानिकांना आठवतच नाही.

सुशोभीकरणाची आशा फोल

नाशिकच्या प्रवेशद्वारावरील सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक बाबी गायब झाल्या आहेत. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमिवर या भागात विकासकामे होऊन या भागाला सुशोभित केले जाईल अशी आशा आता फोल ठरू लागली आहे. त्यामुळे याच परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा पार पडला तर निश्चितच देशपातळीवर 'हरीत नाशिक, सुंदर नाशिक'चे असे नावलौकिक मिरवणाऱ्या शहराचे नाव धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा संतप्त प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुफी संतांची शिकवण आचरणात आणा

$
0
0

राज्यस्तरीय परिषदेत मुस्लिम धर्मगुरुंचे आवाहन

म.टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

समाजात बळावत चाललेल्या वाईट प्रथा व प्रवृत्ती हद्दपार करून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी सुफी संतांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणल्याशिवाय सुसंस्कृत समाज व एक सच्चा मुसलमान घडणे अशक्य आहे. सुफी संतांनी दाखवलेले सत्याच्या मार्गानुसार व त्यांनी दिलेली इस्लाम धर्माची शिकवणींचा ठेवा सदैव सोबत बाळगल्यास जिवनातील अनंत अडचणी दूर होतील, असे असे प्रतिपादन ज्येष्ठ सुन्नी मुस्लिम धर्मगुरु हजरत सय्यदअली अशरफ जिलानी यांनी केले.

अल अशरफ फाउंडेशनच्या वतीने शहरातील पखाल रोडवरील अशरफ नगर येथे झालेल्या जश्ने इमामुल औलिया, उर्स-ए- गरीब नवाज, व सरकारे कलाँ या एक दिवसीय राज्यस्तरीय धार्मिक परिषदेच्या अध्यक्षपदावरुन ज्येष्ठ धर्मगुरु हजरत सय्यदअली अशरफ जिलानी परिषदेत मागदर्शन करताना बोलत होते. परिषदेत देशभरातील अन्य मुस्लिम धर्मगुरुंनी उपस्थिती राहून धार्मिक व सामाजिक मार्गदर्शन केले. फैजाबाद उत्तर प्रदेशचे मौलाना मुफ्ती मोईनोद्दीन अशरफ यांनी इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांचे जावई हजरत अली रजिअल्लाहताअला अन्हु यांच्या सत्याच्या मार्गवरील जिवनाचा आढावा सादर करीत प्रवचन दिले.

मालेगावचे मौलाना इफ्तेखार जामी अशरफी, हाफीज साजीद इस्माईल, मौलाना मुफ्ती साहिल परवेझ अशरफ, सुरतचे हाफीज गुलाम मोईनोद्दीन, हाफीज उबेद रझा आदी प्रमुख धर्मगुरुंनी धार्मिक परिषदेत विविध विषयावरील धार्मिक प्रवचन देत मार्गदर्शन केले. सायंकाळी धजारोहण, नात व मन्कबत व मगरीबच्या नमाज पठणानंतर धर्मगुरुंचे धार्मिक प्रवचनास सुरवात झाली. जश्ने इमामुल आलिया परिषदेस शहरातील मुस्लिम बांधवांसह राज्यातील अन्य सुन्नी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनलक्ष्मी बँकेसाठी रविवारी मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनलक्ष्मी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. दोघांची बिनविरोध निवड झाली असून, बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांनी समृध्दी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. या पॅनलला विरोध दर्शवित विविध गटातून पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

समृध्दी पॅनलच्या उमेदवारांची घोषणा बँकेचे संस्थापक माधवराव पाटील आणि उत्तमराव कांबळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. सर्वसाधारण गटातून समृध्दी पॅनलच्या वतीने माधवराव पाटील, उत्तम कांबळे, जयंत जानी, रामरतन करवा, श्रीकांत रहाळकर, संजय चव्हाण, संदीप नाटकर, रवींद्र अमृतकर, सतीश सोनवणे, भालचंद्र पाटील, तर महिला राखीव गटातून अनुराधा केळकर, स्वप्ना निंबाळकर आणि अनुसूचित गटातून शरद गांगुर्डे हे निवडणूक लढवित आहेत. रमेश चांदवडकर आणि उत्तम उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता करवसुली १२ कोटींवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ताधारकासांठी महापालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच टक्के सवलतीसोबत मे महिन्यात सुरू असलेल्या तीन टक्के सवलतीलाही जोरदार प्रतिसाद मिळत असून, सहा दिवसात अडीच कोटीची वसुली झाली आहे. आतापर्यंत एकूण १२ कोटी २७ लाख रुपये महापालिकेकडे जमा झाले आहेत.

आगाऊ मालमत्ता कर भरण्यासाठी मिळकतधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने पाच, तीन व दोन टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यात एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मे म‌हिन्यात भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यात भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास बिलात पाच टक्के सवलत दिली जाणार असल्याने नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. ३० एप्रिलपर्यंत शहरातील ४१ हजार ४४३ मिळकतधारकांनी १० कोटी ७६ लाख ९६ हजार ६४७ रुपये महापालिकेच्या तिजोरीत भरले आहेत.

सहा दिवसात अडीच कोटी

मे मध्ये असलेल्या तीन टक्के सवलतीलाही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सहा दिवसात महापालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. मंगळवारी ३८ लाख आणि बुधवारी ४० लाख रुपयांची रक्कम तिजोरीत जमा झाली आहे. त्यामुळे सवलत योजनेतून महापालिकेला आतापर्यंत १२ कोटी २७ लाख रुपये मिळाले आहे. अजून दोन महिने ही योजना असल्याने महापालिका चालू वर्षाचे १३० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करेल, अशी स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाला धोरण: पोलिसांचा अहवाल प्राप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या फेरीवाला झोन निर्मितीसाठी आवश्यक हरकतींचा अहवाल पोलिस आयुक्तांनी महापालिकडे सुपूर्द केला आहे. त्यात नो पार्किंग झोन, वाहनांची प्रवेश बंदी आणि सायलेन्स झोन संदर्भातील माहिती सादर करण्यात आली आहे. हा अहवाल शहर फेरीवाला समितीकडे अंतिम प्रस्तावासाठी सादर केल्यानंतर महासभेसमोर ठेवला जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने फेरीवाला धोरण निश्चित करण्यात आले असून, शहरात जवळपास अडीचशेच्या वर फेरीवाल्यासांठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागांच्या निश्चितीसाठी पोलिसांची परवानगी आणि त्यांना वाहतुकीच्या दृष्टीने अडचण येणाऱ्या ठिकाणांबाबत अहवाल देण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली होती. फेरीवाला धोरणांतर्गत निश्चित करण्यात येणाऱ्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा आल्यास वाहतुकीवर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे यावर पोलिसांचा अभिप्राय महत्त्वाचा होता. पोलिस आयुक्तांनी आपला अहवाल पालिकेला सादर केला आहे. त्यात नो पार्किंग झोन ५१, वाहनांना प्रवेशबंदी २४ ठिकाणी आणि १९ ठिकाणी सायलेन्स झोन असल्याचा अहवाल पोलिसांनी दिली आहे. या अहवालाची महापालिका पडताळणी करणार असून, त्यानंतर तो शहर फेरीवाला समितीपुढे ठेवला जाणार आहे. समितीने हा अहवाल मंजूर केल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी महासभेसमोर सादर केला जाणार आहे. त्यामुळे फेरीवाला धोरण निश्चितीचा मार्ग मोकळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय चव्हाणांची सभापतीपदी वर्णी?

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीपदी महाआघाडीच्या वतीने संजय चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सभागृह नेत्याऐ‍वजी शिक्षण समितीचे सभापतीपद देऊन चव्हाणांची मनधरणी करण्यात आली आहे. मनसेकडूनही चव्हाण यांना बाय मिळाल्याने चव्हाणांचीच उमेदवारी अंतिम राहण्याची शक्यता आहे.

शिवेसना-भाजपनेही उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. शिक्षण समितीच्या सोळा सदस्यांच्या निवडीनंतर सभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तांकडे निवडीचा प्रस्तावही सादर केला आहे. महाआघाडीकडे बहुमत असल्याने सभापती महाआघाडीचाच होणार आहे. त्यासाठी संजय चव्हाण यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. महाआघाडीच्या करारानुसार चव्हाण यांना सभागृहनेते पद दिले जाणार होते. मात्र, ते पद मिळाले नसल्याने चव्हाण नाराज होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांमुळे अधिकारी बेजार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माघारीची प्रक्रिया सुरू असतानाच एकमेकांना शह देण्यासाठी दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. या दबावाच्या राजकारणात थेट मंत्र्यांनीच हस्तक्षेप केल्याने अधिकारी हवालदिल झाले असून, दोन अपिलीय अधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे थेट पुण्याहून औरंगाबादच्या विभागीय सहनिबंधकांना अचानक नाशिकला अपिलावरील सुनावणींसाठी पाठविण्यात आल्याची चर्चा सहकार विभागात रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, ११ मे पर्यंत माघार होणार आहेत. त्यापूर्वीच काही बड्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र हे तांत्रिक कारणाने फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास नऊ उमेदवारांवर टांगती तलवार आहे. कमलाकर पवार, कोडांजी मामा आव्हाड, चंद्रकात राजे यांच्यासह दिग्गज उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या उमेदवारांचे अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपिलासाठी अर्ज दाखल केले. या अर्जांवर ६ मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली. मात्र, या सुनावणीपूर्वीच युतीतल्याच बड्या मंत्र्यांनी हस्तक्षेप करीत आपला समर्थक कायम ठेवण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. फेटाळलेला अर्ज कायम करा अशा आदेशच त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. समोरच्या उमेदवारांनेही आपल्याच खात्याच्या मंत्र्यांना साकडे घालत शह-काटशहचे राजकारण केले.

या दोन मंत्र्यांच्या वादात आपण भरडले जाण्याची शक्यता असल्याने विभागीय सहनिबंधक एम. ए. आरीफ अचानक वैद्यकीय रजेवर निघून गेले. त्यांनी आपला पदभार जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांच्याकडे सोपविला. मात्र, त्यांनीही संबंधित धोका लक्षात घेत या सुनावणीपासून लांब राहणेच पसंत केले. त्यांनीही रजा टाकून सुनावणीस येण्याचे टाळले. त्यामुळे अखेरीस औरंगाबाद विभागाचे सहनिबंधक राजेंद्र सुरावसे यांच्या नियुक्तीचा आदेश पुण्याहून काढण्यात आला. त्यांच्या नियुक्तीची बातमी खुद्द नाशिकच्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांनाही नव्हती. सुरावसे यांनी रितसर सुनावणी घेतल्यानंतर लगेच निर्णय देणे अपेक्षित होते. काही उमेदवारांना न्यायालयात जाण्याची संधीच मिळू नये, असे आदेशच असल्याने सुनावणी लांबल्याची चर्चा सहकार विभागात सुरू आहे.

मालेगावची ताकद वाढू न देण्याची फि‌ल्डिंग

मालेगाव केंद्रित एका पॅनलचे वर्चस्व जिल्हा बँकेवर वाढू नये यासाठी काही मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांवर थेट दबाव टाकला जात आहे. यासाठी आपले मंत्रीपद उपयोगात आणले जात असून, विरोधकांनीही थेट कॅबिनेट मंत्र्याची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युतीतीलच दोन मंत्र्यांच्या वादात अधिकारी भरडले जात आहेत. त्यामुळे स्थानिक अधिकारी कंटाळले असून, बाहेरच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्यांकांच्या विकासाकडे लक्ष

$
0
0

मोहम्मद हुसेन खान यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सच्चर समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी १५ कलमी कार्यक्रम राज्य सरकारने स्वीकारला आहे. त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची ग्वाही राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी दिली.

गेल्या ६५ वर्षात काँग्रेसने अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी जेवढे काम केले नाही तेवढे काम राज्यातील भाजप सरकारने सहा महिन्यात केल्याचा दावा हुसेन यांनी केला आहे. काँग्रेसने अल्पसंख्यांकांचा वापर केल्याचा आरोप करीत एमआयएमचाही आम्ही विचारही करीत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत खान यांनी भाजप-सेना सरकारच्या वतीने अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

राज्यातील ९० टक्के मुस्लिमांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यांचा आर्थिक विकास करण्यासह शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मदरशांमध्ये संगणकांचेही प्रशिक्षण दिले जात आहे. अल्पसंख्यांकांसाठी पॉलिटेक्निकल कॉलेजेस, मुस्लिमबहुल शहरांसाठी प्रत्येकी २५ कोटींचे पॅकेज राज्य सरकारने दिले आहे. अल्पसंख्यांक आयोगासाठी राज्य सरकारने १५० कोटींची तरतूद केली आहे. याआधी कधीच एवढी रक्कम मिळालेली नाही. सच्चर समितीने सुचविलेल्या १५ कलमी शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वीकारलेल्या १५ कलमी कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव

नाशिक जिल्ह्यापासून मालेगाव स्वतंत्र जिल्हा तयार करण्याच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे मोहम्मद हुसेन खान यांनी नमूद केले. आयोगाच्या वतीने मालेगावला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा. मालेगावातील उद्योगांना राज्य सरकारने भरघोस मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यात ७३ जीवघेणे अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्ते रूंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या निर्मितीनंतरही शहरात अपघातांचे सत्र कायम असल्याचे दिसते. चालू वर्षातील पहिल्या चार महिन्यातच तब्बल ७३ जीवघेण्या अपघाताची नोंद झाली असून, यात ८० नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

नाशिक शहर परिसरातून मुंबई आग्रा, नाशिक पुणे, नाशिक औरंगाबाद, नाशिक डहाणूरोड, नाशिक दिंडोरी रोड, नाशिक पेठरोड यासारखे प्रमुख मार्ग गेले असून, त्यावर शेकडो वाहनांची वर्दळ असते. त्यात मुख्य शहरातील पंचवटी, नाशिकरोड, आडगाव, उपनगर, अंबड, भद्रकाली या प्रमुख भागांचा समावेश आहे. त्यामुळे शहर आणि हायवे अशा दोन्ही ठिकाणी वाहनचालकांचा जीव टांगणीलाच असतो. जानेवारी ते मार्च २०१४ या कालावधीत शहरात ३६ जीवघेणे अपघात झाले होते. यात ३८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तेच जानेवारी ते मार्च २०१५ या दरम्यान ५० जीवघेणे अपघात झाले. यात ५५ नागरिक मृत्यमुखी पडले. एप्रिल ते ७ मे २०१५ पर्यंत झालेल्या २३ जीवघेण्या अपघातात तब्बल २५ नागरिकांचा मृत्यू झाला.

शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा हायवे व त्याच्या लगतच्या रस्त्यावर सर्वाधिक अपघात होतात. अपघातात जखमी झालेल्यांची संख्याही मोठी आहे. शहरात दर दिवसाला एका नागरिकाला रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागत असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अपघातप्रवण क्षेत्र

आडगाव : हॉटेल जत्रा चौफुली, अमृतधाम, रासबिहारी चौक, नांदूर नाका

पंचवटी : दिंडोरी जकात नाका, रासबिहारी चौफुली, के. के. वाघ कॉलेज

नाशिकरोड : चेहडी, बंगाली बाबा दर्गा परिसर, एकलहरा रोड आणि लॅमरोड

उपनगर : उपनगर चौफुली, फेम थिएटर जवळील चौफुली आणि पंक्चर असलेले सर्व ठिकाणे

अंबड : हॉटेल प्रकाश जवळ, पाथर्डी फाटा आणि अंबड लिंकरोड

भद्रकाली​ : द्वारका परिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई अंतर्गत प्रवेशास टाळाटाळ

$
0
0

दोषी शाळांवरील कारवाईसाठी पालकांचे विद्यार्थ्यांसह आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फी च्या नावाखाली केल्या जाणाऱ्या नफेखोरीच्या हव्यासापोटी शहरातील काही शैक्षणिक संस्था आरटीई अंतर्गत प्रवेशास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे शिक्षण हक्क कायद्याचे हेतूपुरस्सर उल्लंघन केले जात असून, दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी मनपा शिक्षण मंडळास गुरुवारी धारेवर धरले.

आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारून मनमानी करू पाहणाऱ्या शाळांना वेळीच चाप लावावा, अशी मागणी कारताना पालक वर्ग आक्रमक झाला होता. पंडित कॉलनीतील मनपा शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर पालकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाधिकारी कार्यालयाकडे आर्थिक दुर्बल घटकातील पालकांनी कैफियत मांडली. आरटीई २००९ या कायद्यानुसार खासगी शाळांमध्येही २५ टक्के आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेस २५ मार्च २०१५ पासून सुरुवातही झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत काही खासगी शाळांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उंबरठाही ओलांडू ‌दिलेला नाही. यामुळे सुमारे ४० ते ४५ दिवसांपासून हे सर्व पालक शिक्षण मंडळासह, शिक्षण उपसंचालक व शिक्षणमंत्र्यांकडे विनवण्या करताहेत. आता, मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने पालकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदतही संपत आली आहे. या टप्प्यातही खासगी शाळांनी नियमानुसार या विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास शिक्षण मंडळच कारणीभूत राहील. मंडळाने या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास व दोषी शाळांवर कारवाई न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही चांगल्या दर्जाच्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी आरटीईचा कायदा आहे. मात्र, खासगी शाळा स्वत:च्या सोयीनुसार या कायद्याचा उपयोग करीत आहेत. शाळांच्या या मनमानीला रोख लावायला हवी.

- नीलेश भोळे, पालक

खासगी शाळांचे धोरण हे नफेखोरीचे आहे. कायदाच धाब्यावर बसविण्याची धमक या शाळांमध्ये असेल तर सरकारही या कायद्यांचा देखावा कशासाठी करते? आरटीई नाकारणाऱ्या शाळांना धडा शिकवावा. पालकांनीही या मुद्द्यासाठी पुढाकार घ्यावा.

- गणेश पवार, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘स्पॉटर’

$
0
0

परराज्यातील पोलिसांच्या सहकार्यासाठी गृह विभाग सक्रिय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यासाठी देशभरातील लाखो भाविक शहर तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतील. भक्तांच्या मांदियाळीत चोर-भामटे यांचाही भरणा मोठा असू शकतो. गर्दीत मिसळलेल्या परराज्यातील भामट्यांना रोखण्यासाठी काही कर्मचारी तसेच अधिकारी अर्थात स्पॉटर नियुक्त करण्यासंदर्भात राज्य गृह विभागाकडून परराज्यातील पोलिसांशी पत्रव्यवहार सुरू आहे.

कुंभमेळ्यासाठी शहरात किमान ५० लाख भाविक तसेच साधू-महंत हजर राहण्याची शक्यता आहे. या प्रचंड गर्दीत भामट्यांची 'पर्वणी' होऊ शकते. चोऱ्या, लुटमार किंवा फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात येणार आहे. स्थानिक पोलिसांना स्थानिक गुन्हेगारांची काम करण्याची पध्दत, त्यांचे वर्णन माहित असते. मात्र, कुंभमेळ्यासाठी राज्यासह परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक येणार आहेत. यातील भाविक व समाजकंटक असा फरक करताना पोलिसांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून इतर राज्यातील पोलिस दलास पर्वणी काळात क्राइम ब्रांच किंवा तत्सम विभागातील कर्मचारी पाठवण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाणार आहे. 'स्पॉटर' म्हणून ओळखले जाणारे हे कर्मचारी आपआपल्या भागातील संशयितांची माहिती स्थानिक पोलिसांना देतील.

याबाबत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सांगितले, की कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करताना प्रचंड बंदोबस्त तैनात करावा लागतो. शहराची कक्षा रुंदावली असून त्यादृष्टीने १५ ते १६ हजार पोलिसांचा 'पॉईंट'निहाय बंदोबस्त लावण्याचे नियोजन पूर्णत्वास गेले आहे. कुंभमेळ्यासाठी परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत चोर भामट्यांचाही समावेश असू शकतो. त्यामुळे परराज्यातील पोलिसांना पाचारण करण्यात येणार आहे. भाविकांना आर्थिक व मानसिक त्रास होऊ न देणे एवढे उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पर्वणी दरम्यान परराज्यातील पोलिसांची उपस्थिती लाभदायक ठरू शकते. या व्यतिरिक्त काही स्वंयसेवी संघटना, परराज्यातून येणाऱ्या प्रमुख समाजाचे स्थानिक नातेवाईक यांचीही मदत घेतली जाणार आहे. यामुळे परराज्यातील भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. तसेच परराज्यातील समाजकंटकांवर अंकुश निर्माण होऊ शकेल.

- एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

जून अखेर सीसीटीव्ही कार्यान्वित

सीसीटीव्ही बसवण्याचे काम जून महिन्याअखेरपर्यंत पूर्णत्वास जाईल, अशी माहिती जगन्नाथन यांनी दिली. तात्पुरत्या स्वरूपात बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींचे काम नुकतेच हाती घेण्यात आले असून जूनच्या शेवटापर्यंत सीसीटीव्ही बसवण्यासह त्याचे परीक्षणही पूर्ण केले जाईल. सीसीटीव्हीमुळे वाहतुकीसह इतर घटनांवर पोलिसांना सहजतेने लक्ष केंद्रीत करता येऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेचर क्लबचे बिबट्यासाठी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांदवड तालुक्यातील कोंबडेवाडी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेतर्फे गडकरी चौक येथे गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कोंबडेवाडी परिसरात राजेंद्र कासलीवाल यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला. या बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वनविभागाच्या या ऑपरेशनमधील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून वनविभागाने चौकशी समिती नेमावी व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी नेचर कल्बने केली आहे. बिबट्याच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, नेहरू उद्यानाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, पक्षी अभयारण्याचे कार्यालय नांदूर मधमेश्वरला स्थलांतरीत करावे. नाशिकला रेस्क्यू सेंटरची स्थपना करा. बिबट्यांना वाचवण्यासाठी योजना तयार करा, वन्यजीव पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करा. रेस्क्यू व्हॅनला वाहनचालक द्या, मृत बिबट्याप्रश्नी चौकशी करा, जखमी साप, पक्षी यांच्या आश्रयाची व्यवस्था करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान मोदींना निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत असून १४ जुलैला रामकुंडावर सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी निमंत्रण देण्यात आले.

खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात मोदी यांची भेट घेत त्यांना आमंत्रण पत्र दिले. नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी १४ जुलै रोजी सकाळी सहा वाजून १६ मिनिटांनी रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळा होणार आहे. शंकराचार्य, विविध आखाड्यांचे प्रमुख तसेच साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. साधुग्राममध्ये १४ आॅगस्ट रोजी सर्व आखाड्यांचे ध्वजारोहण होईल. २९ आगस्ट रोजी पहिले, १३ सप्टेंबरला दुसरे आणि १८ सप्टेंबरला तिसरे शाहीस्नान होईल. या शुभप्रसंगी आपण उपस्थिती रहावे, अशी विनंती करणारे पत्र मोदी यांना देण्यात आले.

स्वच्छतेसाठी मदत

कुंभमेळ्यात स्वच्छता टिकून राहावी यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. कुंभमेळ्यात अस्वच्छता राहू नये तसेच, भाविकांची सोय व्हावी यासाठी बायो टॉयलेट्स बनवण्यात येणार आहे. या कामासाठी बिल गेट्स व मेलिंडा गेट्स फाउंडेशनला आपण स्वतः आग्रह केला असून फाऊंडेशन मदत करणार असल्याचे आश्वासन मोदींनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपर्कप्रमुख दाखवा,बक्षिस मिळवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख, आमदार अजय चौधरी हे नियुक्तीपासून मागील तीन महिन्यांत एकदाही नाशिकमध्ये फिरकलेले नाहीत. शहराप्रमाणेच ग्रामीणचीही तीच अवस्था आहे. दिंडोरीचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनीही लक्ष दिलेले नाही. संपर्कप्रमुखपद कागदारवरच असल्याने शिवसैनिक सैरभैर झाले असून, संघटनेलाही मरगळ आली आहे. संघटनेला वाली उरला नसल्याचे चित्र आहे. संपर्कप्रमुख दाखवा अन् बक्षिस मिळवा, अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करता आली नाही. जिल्ह्यातील १५ पैकी केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले. यापैकी देवळालीची जागा तर बबन घोलप यांच्या वैयक्तिक करिश्म्यावर जिंकलेली मानली जाते. विधानसभा निवडणुकीत अनेक पदाधिऱ्यांनी पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम केले. खुद्द महानगरप्रमुखांनाही त्याचा फटका बसला. अनेक नगरसेवकांनी तर पक्षालाही जुमानले नाही. त्यामुळे संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि वादविवाद थंड करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर जिल्ह्यातील संपर्कप्रमुख बदलले. पूर्वीचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्याऐवजी नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख दिले. नाशिकची जबाबदारी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे, तर दिंडोरीची जबाबदारी सुहास सामंत यांच्याकडे देण्यात आली. नियुक्तीनंतर चौधरी यांना दुसऱ्याच दिवशी अपघात झाला. त्यामुळे त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. मात्र, बरे झाल्यावरही चौधरींनी नाशिककडे ढुंकूनही बघितले नाही. मागील तीन महिन्यांत नाशिकभेटीचे सोडाच, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी साधी फोनवरही विचारपूस केली नसल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत त्यांनी लक्ष घातले नाही. तसेच, सध्या सुरू असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडेही त्यांनी दुर्लक्ष केले.

संघटनेवर वरिष्ठांचाच वचक न राहिल्याने पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही सैरभैर झाले आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच स्थायी समिती निवडणुकीत आला. शैलेश ढगे यांना स्थायी समिती घेतल्यानंतर नाशिकरोड येथील पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिकेत येऊन गोंधळ घातल्याने पक्षाची नाचक्की झाली. वरिष्ठांनी दखल न घेतल्याने हा वाद मिटवणे पक्षाला शक्य झाले नाही.

महापालिकेतील शिवसेनेचे विरोधीपक्षनेते पद काढून घेतल्यानंतर पक्षाकडून फारसा प्रतिसाद झाला नाही. विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यात पक्ष कमी पडत आहे. अशा गंभीर स्थितीत पक्ष अडकला असतांना संपर्कप्रमुख मात्र गायब आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यथा ऐकायलाच कुणी उरलेला नाही. महापालिका निवडणुका तोंडावर असतांना संघटनेतील मरगळ पक्षासाठी धोकेदायक आहे. चौधरी यांच्या नियुक्तीबाबत पक्षात उलटसुलट चर्चा होत आहेत.

सामंतही चार हात दूर!

दिंडोरीच्या संपर्कप्रमुखांचीही गत वेगळी नाही. सामंत यांनी दिंडोरीत दोन वेळा हजेरी लावली असली तरी ती वरिष्ठांच्या उपस्थितीतच ते आले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी ना वन-टू-वन चर्चा केली नाही, ना कार्यकर्त्यांचे दुःखही जाणून घेतले. सोबतच संघटनेचा साधा कानोसाही त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे नाशिकप्रमाणेच आम्हीही वाऱ्यावर असल्याची भावना दिंडोरीतील शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यराणी आता सीएसटीपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मनमाडहून सुटणारी राज्यराणी एक्सप्रेस छत्रपटी शिवाजी टर्मिनन्सपर्यंत (सीएसटी) नेण्याची प्रवाशांची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वे बोर्डाने याबाबत हिरवा कंदील दाखविण्याची तयारी दर्शविली आहे.

राज्यराणी एक्सप्रेस सुरू केल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली. व्यापारी, नोकरदार या गाडीतून प्रवास करतात. मात्र, ही गाडी सध्या लोकमान्य टिळक टर्मिनन्सपर्यंतच (एलटीटी) धावत असल्याने प्रवाशांना लोकलने शेवटचे टोक गाठावे लागते. ही गाडी दादर किंवा छत्रपती टर्मिनन्सपर्यंत सोडल्यास सर्वांची सोय होईल, प्रवाशांची संख्या वाढून रेल्वेला मोठा महसूल मिळेल असे गणित प्रवाशांनी मांडले. खासदार हेमंत गोडसे, भुसावळ रेल्वे सुरक्षा समितीचे सदस्य राजेश फोकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यराणी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनन्सपर्यंत कशी नेता येईल याचा तांत्रिक आराखडा सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद पथदीपांना लावले कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर परिसरातील पथदीप अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे अपघात होत असून सोनसाखली चोरीचे प्रमाणही वाढले आहे. महापालिकेला अनेकदा निवेदन देऊनही पथदीप सुरू होत नसल्यामुळे युगान्तर फाऊंडेशनतर्फे पथदीपांना कंदील लावण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले.

उपनगरमधील अनेक नागरी वसाहतींमध्ये पथदीप बंदच असतात. मातोश्री नगरमधील शांतीपार्क येथील पथदीप सहा महिन्यांपासून बंद आहेत. दोन दिवसांपूर्वी येथे रात्री एका महिलेला दुचाकीस्वाराने धडक देऊन गंभीर जखमी केले होते. अंधाराचा फायदा घेऊन चोरांनी सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरण्यास सुरुवात केली आहे. युवतींच्या छेडछाडीचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांनी नगरसेवक तसेच महापालिकेकडे तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे त्यांनी युगान्तर फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी पगारे यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी पथदीपाला कंदील लावला. ज्येष्ठ महिलेच्या हस्ते कंदील प्रज्ज्वलित करण्यात आला. यावेळी बबन फडोळ, मोहन पवार, प्रवीण नवले, नितीन जाधव, सौरव वाणी, शैलेश पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images