Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाझिम ठरली ‘गोल्डन गर्ल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी नाझिम अल्मस सैय्यद हिने एक, दोन नव्हे तर तब्बल १० सुवर्ण पदके आणि १ मेरिट स्कॉलरशीप पटकावली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नाझिमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पदवीदान सोहळ्यात नाझिमला डॉ. दयानंद डोणगावकर सुवर्ण पदक, व्यंकटेश जामकर सुवर्ण पदक, राजाबहाद्दूर हार्ट फाऊंडेशन सुवर्ण पदक, क्रांतीज्योती डॉ. रखमाबाई सुवर्णपदक, श्रीराम कुशाबा बकरे सुवर्णपदक, डॉ. कांतीलाल देशमुख सुवर्णपदक, गोजरबाई भामरे सुवर्णपदक, डॉ. शिरीष भन्साळी सुवर्णपदक, नानासाहेब चौधरी सुवर्ण पदक आणि डॉ. अंजनेयलू सुवर्ण पदक अशा एकूण १० पदकांनी गौरविण्यात आले. तर, जॉन्सन अँड जॉन्सनची रोख दहा हजार रुपयांची स्कॉलरशीपही यावेळी तिला प्रदान करण्यात आली. पदवीदान सोहळ्यानंतर 'मटा'शी बोलताना नाझिम म्हणाली, की आवड असली तर आपण स्वतःहून खुप गोष्टी जाणून घेतो. आपण अभ्यास करुन तो एन्जॉय करू शकतो.

इंटर्नशीप आधी एण्ट्रन्स घ्या

एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात साडेपाच वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक वर्ष इंटर्नशीप करावी लागते. मात्र, ही इंटर्नशीप संपल्यानंतर पहिल्यावर्षापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेल्या एकूण १९ विषयांची एण्ट्रन्स द्यावी लागते. विद्यार्थी एण्ट्रन्सचा अभ्यास करताना त्यांच्याकडून इंटर्नशीला योग्य न्याय देता येत नाही. आयुष्यातील वाटचालीत इंटर्नशीप मोलाची आहे. त्यात विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होते. इंटर्नशीप एवढीच एण्ट्रन्सही महत्त्वाची आहे. म्हणून ही सिस्टीम बदलायला हवी. त्यासाठी इंटर्नशीपच्या आधी एण्ट्रन्स घ्यावी, अशी विनंती नाझिमने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना प्रतीक्षा निकालाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बीकॉमचा निकाल केटीएचएम कॉलेजने निकाल जाहीर केला असला तरी उर्वरित सर्वच शाखांचे निकाल लागणे अद्याप बाकी आहे. एफवाय बीकॉमची परिक्षा ६ एप्रिल रोजी झाली होती. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे ४५ दिवसांत केटीएचएम कॉलेजचा निकाल जाहीर केला. मात्र शहरातील इतर कॉलेजमधील निकाल अद्याप लावले गेले नसल्याने व त्यासंबंधित कोणतीही नोटीसदेखील जाहिर करण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

पदवी परीक्षेचे निकाल वेळेवरे न लागणे, लागले तरी मार्क्सबाबतीत असलेल्या चुका या अडचणींना दुर्दैवाने विद्यार्थ्यांना दरवर्षीच सामोरे जावे लागत असते. विद्यापीठाच्या नियमानुसार ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे गरजेचे असले तरी हा नियम कॉलेजेसकडून पाळला जात आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर प्रथम वर्षाच्या सर्व शाखांच्या परिक्षा संपल्या असून त्यानुसार काही दिवसातच पंचेचाळीस दिवस पूर्ण होतील. तरीदेखील निकालाबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. एफवायच्या सर्व शाखांच्या निकालाची जबाबदारी ही कॉलेजचे प्राचार्य आणि कॉलेजच्या प्रशासनावर आहे. एफवायबीए, एफवायबीकॉम, एफवायबीएससी, बीसीएस या सर्व परिक्षा २४ मार्च रोजी सुरू झाल्या होत्या. एफवायबीएची परिक्षा ४ एप्रिल, बीकॉम ६ एप्रिल, तर बीसीएस, बीएस्सीची लेखी परिक्षा ६ एप्रिल तर प्रत्यक्षिके १६ एप्रिलपर्यंत संपल्या होत्या. ४ एप्रिलपासून २० मे पर्यंत किमान ४५ दिवस झाले असले तरीही विद्यापीठाचा नियम मानत कॉलेज प्रशासनाचे यावर नोटीस जाहिर करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

याबाबत विद्यार्थ्यांनी कॉलेज स्टाफकडे विचारणा केली असता विद्यार्थ्यांना योग्य उत्तरे मिळत नसल्याचे समजते आहे. 'निकाल लागेल तेव्हा समजेल, अजून आला नाही', अशी उत्तरे कॉलेज प्रशासन देत असल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली आहे. पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरही निकालासंबंधित कोणतेही अपडेट्स नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दिसत आहे. निकालाची आशा करत, ज्या दिवशी निकाल लागेल तो खरा अशी मानायची वेळ आली आहे.

एफवायचा निकाल आणि परिक्षा ही कॉलेजच्या माध्यमातून घेतली जाते. निकाल ४५ दिवसात लावणे आवश्यक आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी कॉलेजची असते. विद्यार्थ्यांना योग्य नोटीस आणि निकाल या बाबतची माहिती कॉलेजने देणे गरजेचे आहे.

- डॉ. रावसाहेब शिंदे, समन्वयक, पुणे विद्यापीठ

एफवायबीएचा निकाल येत्या दोन दिवसांत लावण्यात येईल. निकालाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून ४५ दिवसात निकाल देण्याच्या विद्यापीठाच्या निर्देशानुसारच आम्ही एफवाय बीकॉम आणि बीएस्सीचा निकाल जाहीर केला.

- डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य, केटीएचएम कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी अधिकाऱ्यांनाही ‘केआरए’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काम व दामाशी सांगड घालणारी आणि कॉर्पोरेट जगतात वापरण्यात येत असलेली 'की रिझल्ट एरिया' अर्थात 'केआरए' ही प्रणाली सरकारी अधिकाऱ्यांसाठीही लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खासगी संस्था आणि कार्यालयांमध्ये प्रभावी ठरत असलेली केआरएची प्रणाली लागू करण्यामुळे राज्य सरकारचे जे व्हीजन आहे ते पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनीही यास संमती दर्शविली आहे. शिवाय अधिकाऱ्यांनी काही सुधारणा सुचविल्या. काहींनी त्यांचे उद्दिष्ट्यही वाढवून मागितले. त्यामुळे आम्ही या सर्व बाबींचे स्वागत करून केआरए राबविण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काळासाठीचा रोडमॅप सरकार आणि अधिकारी यांनी तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. अधिक कार्यक्षम अधिकारी यातून दिसून येईल. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता जोखतानाच केआरएद्वारे सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजना पोहचण्यातही मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

बोगस डॉक्टरांचा राज्यात सुळसुळाट असल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, की सरकार याबाबत गंभीर आहे. बोगस डॉक्टरांची शोधमोहिम सुरूच आहे. मात्र, या मोहिमेला बळ देण्यासाठी कायद्यात आणि सरकारी परिपत्रकांमध्ये काही बदल आवश्यक असतील तर ते केले जातील, असे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांकडून चौकशी

सुरगाणा धान्य घोटाळाप्रकरणी नाशिकच्या सात तहसीलदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी नाशिकचे विभागीय आयुक्त करणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तहसीलदार दोषी नसतील तर कारवाई मागेही घेतली जाईल. तसेच, आयुक्तांनी दिलेल्या अहवालात तथ्य नसेल तर स्वतंत्र यंत्रणेकडून या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी बाबूंनाही ‘काम तसे दाम’

$
0
0

कॉपोरेटमधील 'केआरए' प्रणाली लागू होणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी कारभाराची गुणवत्ता सुधारावी यासाठी 'काम तसे दाम' देणारी घालणारी कॉर्पोरेट जगतातील 'की रिझल्ट एरिया' (केआरए) प्रणाली सरकारी अधिकाऱ्यांनाही लागू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे ही माहिती दिली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

'केआरए' प्रणाली लागू करण्यामुळे राज्य सरकारचे व्हिजन पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनीही यास संमती दर्शविली आहे. अधिकाऱ्यांनी काही सुधारणा सुचविल्या, काहींनी त्यांचे उद्दीष्टही वाढवून मागितले. जो अधिकारी अधिक कार्यक्षम असेल ते या प्रणालीतून दिसून येईल. तसेच, सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यातही 'केआरए'ची मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कामगार कायदेही बदलणार

सध्याचे कामगार कायदे वेळकाढूपणाचे असून, ते उद्योग आणि कामगारांनाही संरक्षण देणारे नसल्याने तेही बदलण्याचे आपल्या सरकारने ठरवले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्याकडे कामगार कायदे बदलणे म्हणजे फाशीला जाण्यासारखे असल्याची खंतही व्यक्त करतानाच, लेबर प्रॅक्टिसची गरज भासणार नाही, असे कायदे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिल्लीची ऐट आजही कायम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

राजधानी म्हणून आपण दिल्लीकडे पहातो. परंतु, दिल्ली हे राजकारणाचे महत्त्वपूर्ण शहर आहे. दिल्ली सत्तेचे रंग उधळणारी मायानगरी आहे. दिल्लीत अनेक राजवटी आल्या, अनेक सलतनी दिल्लीने पहिल्या पण, दिल्लीची ऐट कायम राहिली आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केले.

गंगा घाटावरील यशवंत महाराज पटांगणावर ९४ व्या 'वसंत व्याख्यानमालेच्या' २१ व्या पुष्पात 'राजकारणाचे रंग 'कार्यक्रमात सुरेश भटेवरा हे जेष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी व अनंत बागाईतदार यांच्याशी चर्चा करताना बोलत होते. प्रारंभी स्व. अण्णासाहेब वैशंपायन यांच्या कार्याबद्दल श्रीकांत येवले यांनी माहिती देऊन आदरांजली वाहिली. सुरेश भटेवरा म्हणाले की, दिल्लीची पत्रकारिता करणे मोठे आव्हान आहे. पत्रकारिता करताना संपूर्ण देश कसा चालतो याचा पत्रकाराला आवाका असणे गरजेचे असते. यानंतर दिल्ली राजधानीत पत्रकारिता करताना आपल्याला कोणते महत्वपूर्ण अनुभव आले, याबाबत केसरी व बागाइतदार यांच्‍याशी मनमोकळ्या गप्पा गोदाकाठी रंगल्या होत्या. यावेळी दिल्ली विषयीचे आकर्षण व दिल्लीतील महत्वपूर्ण घटना, त्यांचा उलगडा आणि विश्लेषण करताना केसरी व बागाइतदार यांनी विविध अनुभव सांगितले.

यावेळी सर्व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर सुरेश भटेवरा यांना 'आचार्य अत्रे पुरस्कार' मिळाल्याबद्दल तमाम नाशिककरांच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी उपमहापौर गुरुमीत बग्गा, अण्णा झेंडे, गजानन बेणी, शेखर शहा, संगीता बाफना आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावध ऐका, रक्तदाबाच्या हाका...

$
0
0

>> डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी

उच्च रक्तदाब हलक्या पावलाने कधी शरीरात प्रवेश करतो ते कळत नाही आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा बऱ्याचदा वेळ निघून गेलेली असते. असे होऊ नये म्हणून प्रत्येकाने त्याच्या लक्षणांबाबत सतर्क असणे गरजेचे आहे. आजकाल त्याबाबत बऱ्यापैकी जागरूकता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. निरोगी आरोग्य हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यासाठीच लक्षणांचा अभ्यास उपयुक्त ठरतो.

काही संवेदनशील व्यक्तींमध्ये थोडा जरी रक्तदाब वाढला तरी त्यांचे डोके दुखते अथवा जड होते. डोकेदुखी निवारणासाठी तत्काळ गोळी घेतली जाते. पण तेही चुकीचेच आहे. त्यामागे उच्च रक्तदाब हे कारण असू शकते. वाढलेल्या रक्तदाबामुळे रक्ताभिसरण सुरळीत चालू ठेवण्याकरता हृदयावर भार पडतो. तसे झाल्याने छाती दुखते अथवा छाती भरून आल्यासारखे वाटत. फुफुसे ताठर होतात कारण फुफुसांच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त पाझरण्यास सुरूवात होते. श्वास घेण्यास कष्ट पडतात. दम लागल्यासारखे वाटत राहते. दैनंदिन कार्ये उरकण्यास अडथळा निर्माण होतो. पाणी छोट्या श्वसनलिकांमध्ये जमा झाल्यास खोकला येतो आणि त्यातून रक्तही पडू शकते. अर्थात रक्तदाब जास्त प्रमाणात वाढल्यानंरतच ही लक्षणे जाणवतात.

रक्तदाब वाढला की हृदयाचे ठोके जास्त ताकदीने पडतात मग छातीत धडधड सुरू होते. कारण ह्दयाच्या रक्तवाहिनीवर ताण उत्पन्न झालेला असतो. क्वचित त्या प्रसरण पावतात तेव्हा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटू शकते आणि मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव कमी प्रमाणात असेल तर त्वरित आराम पडतो. परंतु, जास्त प्रमाणात असेल तर अर्धांगवायू म्हणजेच पक्षाघात अथवा पॅरालिसिस होतो. अशाच प्रकारचा रक्तस्त्राव आतड्यांमध्ये होऊ शकतो. रक्तदाब अचानक वाढल्यामुळे रोहिणीच्या आतल्या अस्तराला इजा होऊ शकते. ती जखम भरण्यासाठी पेशीचे प्रजनन होऊन त्यांची संख्या वाढते. ही प्रक्रिया अशीच वाढत गेल्यास रक्ताच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. तसेच, त्या अस्तराला जखमेवर लघुपेशी जमा होऊन रक्ताची गाठ तयार होऊ शकते. ही गाठ वाढत जाऊन रक्तवाहिनी पूर्ण बंद होण्याचा धोका संभवतो.

ह्दय, मेंदू आणि मूत्रपिंड यांना होणारी इजा ही कायमस्वरूपी असते आणि रूग्णाला ती सदैव साथसोबत करते. म्हणूनच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे अनिवार्य आहे. उच्च रक्तदाबामुळे ह्दयावर दाब येतो. उच्च रक्तदाब हा ह्दयासाठी जणू काही 'वेटलिफ्टींग' सारखे आहे. जसे की वेटलिफ्टींग मुळे आपल्या दंडाच्या स्नायूंचे आकारमान वाढते तसेच ह्दयाचेही आकारमान वाढत जाते. अतिरिक्त रक्तपुरवठा होऊ शकतो कारण दंडामध्ये नवीन नवीन रक्तवाहिन्यांचे जाळे निर्माण झालेले असते. ह्दयात मात्र नवीन रक्तवाहिन्या तयार होत नाही आणि आहे त्याच पुरवठा व्यवस्थेवर ताण पडतो. रक्तपुरवठा कमी पडल्यास दोन महत्वाचे परिणाम दिसून येतात. स्नायूंना प्राणवायू व पोषण द्रव्ये पुरेशा प्रमाणात न मिळाल्यामुळे ते थकत जातात. वाढलेले आकारमान व त्यामुळे वाढलेली प्राणवायूची आवश्यकता आणि त्यातुलनेत पुरवठा व्यवस्थेत न होणारी वाढ यामु‍ळे ह्दयाची एकंदरितच कार्यक्षमता कमी होते. त्याची पंपिंग क्षमता कमी झाली की प्रत्येक ठोक्याबरोबर शरीराला मिळणाऱ्या शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी होत जातो. पंपिंग क्षमता सरासरी पंचावन्न टक्क्यांच्या पुढे असते. ह्दय प्रसरण पावते तेव्हा त्यात सरासरी १२० ते १५० मिली रक्त असते. त्यातील ७० ते ९० मिली रक्त प्रत्येक आकुंचनाबरोबर शरीरात ढकलले जाते. म्हणजेच ह्दयाची स्पंदन क्षमता ५५ ते ६० टक्के इतकी असते.

परिणामत: शरीराच्या प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता कमी होत जाते. मूत्रपिंडाची शरीरातील रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याची क्षमता कमी होते तर आतड्यांची पचनशक्ती क्षीण होते. यकृताला सूज येऊन त्याचीही क्रिया कमी होते. सुप्रीम कमांडर असलेला आपला 'मेंदू' काहीसा सुस्तावतो अर्थातच त्याचा तल्लखपणा कमी होतो. स्नायूंची ताकद कमी झाल्यासारखे वाटत राहते आणि परिणामत: थकवा येतो.

उच्चरक्तदाबाची केवळ दहा टक्के कारणे आपल्याला ज्ञात आहेत. उरलेल्या ९० टक्के रूग्णांमध्ये रक्तदाब का वाढतो हे आपल्यालाच काय तर विज्ञानाला देखील ठाऊक नाही. कधी तो आनुवंशिक असतो तर कधी इतर विकारांमुळे तो येतो तेव्हा त्याला आपण 'प्राथमिक कारणे' म्हणतो. रक्तदाब नियंत्रणात मूत्रपिंडाची भूमिका मध्यवर्ती असते. मूत्रपिंडाला अडथळ्यांमुळे कमी रक्तपुरवठा होत गेला तरी त्याला वाटते की शरीराचाच रक्तदाब कमी झाला. त्यामुळे ते रक्तदाब वाढविणाऱ्या संप्रेरकाचा स्त्राव वाढवते परिणामी रक्तदाब अधिकच वाढतो. रक्तवाहिनीतील अडथळा दूर झाल्यास रक्तदाब पूर्वपदावर येण्यास सुरूवात होते. विशेषत: महारोहिणीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यात जन्मत: असलेला दोष ज्यात डाव्या हाताच्या उपवाहिनीनंतर महारोहिणीची वाढ कमी झालेली असते किंवा विषाणू संसर्गामुळे महारोहिणीला आतून आलेली सूज आदि कारणे असू शकतात. सूज आल्यामुळे ती अरूंद होते. यात सहसा पोटाचा भाग, किडनी आणि आतड्यांच्या रक्तवाहिन्यांचा समावेश असतो. वरीलप्रमाणे आपण उच्चरक्तदाबाची लक्षणे अभ्यासली आहेत. वेळीच आरोग्यभान जागृत ठेवा. आज जर आपण फिटनेससाठी वेळ काढू शकलो नाही तर आजचा वाचविलेला वेळ उद्याच्या आपल्या आजारपणासाठी आहे हे नक्की लक्षात ठेवा. फिट रहा. आरोग्य संपन्न व्हा.

(लेखक प्रख्यात ह्दयरोगतज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय निकाल तातडीने जाहीर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) सर्व ट्रेडचे निकाल अद्याप लागू शकलेले नाहीत. तरी सर्व 'आयटीआय'ने या तातडीने निकाल जाहीर करावे, असे आदेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.

तांत्रिक त्रुटींमुळे राज्यभरातील आयटीआयमधील सर्व ट्रेडचे निकाल जाहीर झाले नसल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने नुकतेच प्रसिद्ध केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या सहसंचालकांनी याची दखल घेतली आहे. यंदापासून आयटीआयचे ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

मात्र, विद्यार्थ्याच्या माहितीसोबत सत्रगुण संबंधित आयटीआयनेच रोजगार व स्वयंरोजगार महानिदेशनलायाच्या (डीजीइटी) 'एमआयएस' या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. परंतु, बहुतांश आयटीआयने अशी माहिती भरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल लागू शकलेला नाही. ज्या ट्रेडचे गुण तसेच अन्य माहिती 'एमआयएस' पोर्टलवर व्यवस्थित भरले आहे त्या ट्रेडचा निकाल लागला आहे.

आयटीआयसाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्रासाठी परीक्षा झाली होती. १२ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधील घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ३० दिवसात लागणे अपेक्षित होते. मात्र, हा निकाल अद्याप लागू शकेला नाही. विशेष म्हणजे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची पुढील महिनाभरात नवीन सत्राची परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, जुन्या सत्राचा निकालच हाती न पडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

त्रुटींची माहिती मागविली

'डीजीइटी'च्या एमआयएस पोर्टलवर सत्रगुणांची माहिती न भरल्यामुळे रखडलेले निकाल स्वतंत्रपणे तयार करण्याचेही सहसंचालकांनी आदेश दिले आहेत. तसेच कोणत्या विद्यार्थ्याचा कोणत्या कारणामुळे निकाल जाहीर करण्यात आलेला नाही याची माहिती ५ जूनपर्यंत प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश प्रत्येक आयटीआयला देण्यात आले आहेत. अशी माहिती एकत्रित करून प्रादेशिक कार्यालयांनी ८ जूनपर्यंत संचालनालयाकडे पाठवावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकारी अधिकाऱ्यांची ‍नियुक्ती कागदावरच!

$
0
0

म टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात नियुक्ती जाहीर झालेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड कागदावरच राहिली आहे. यादीत नावे असलेल्या अनेकांना वर्ष उलटूनही प्रत्यक्षात या पदावर काम करण्याची संधीच मिळाली नाही. नवे गडी नवे राज्य आल्यामुळे आघाडी सरकारने केलेल्या नियुक्त्या बासनात गुंडाळल्या गेल्याचा आरोप होऊ लागला आहे.

राज्य सरकारने २० जून २०१४ रोजी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची यादी जाहीर केली होती. नाशिकमधील १७० जणांच्या नावांचा समावेश होता. मात्र, वर्ष उलटत आले तरी यादीतील बहुतांश जणांना प्रत्यक्षात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कामच करावयास मिळाले नसल्याचा दावा केला जात आहे. कागदपत्रे साक्षांकनासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची मोठी मदत होत असली तरी या पदावर कोण आहे, हेच माहीत नसल्याने नागरिक विशेषत: विद्यार्थी वर्गाला स्थानिक नगरसेवकांकडेच धाव घ्यावी लागत आहे.

या पदासाठी अर्जदार व्यक्ती किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशासनाने उच्च शिक्षितांना प्राधान्य देत अशा काही इच्छुकांची यादी कार्यवाहीसाठी पाठविली होती. राज्यात त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली. सत्ताबदल झाल्याने नवीन पालकमंत्री सुचवतील त्यांचीच विशेष कार्यकारी अधिकारीपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी देखील अजून नावे न सुचविली नसल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुक्ते पॅटर्नवर कृती समितीचा प्रभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नगररचना विकास विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी महाराष्ट्रासाठी रोल माडेल ठरेल असा नाशिकचा विकास आराखडा रविवारी सादर केला. भुक्ते पॅटर्नवर शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृति समितीचा चांगलाच प्रभाव पडला आहे. समितीने या आराखड्याचे स्वागत केले असून हा आराखडा सर्वांना न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

विकास आराखड्यामुळे बाधीत होणारे मिळकतेधारक आणि शेतकरी यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी निवृत्ती अरिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन झाली आहे. समितीने भुक्ते यांना आरक्षणे कशी चुकीची आहेत ते पटवून दिले. त्यांना साईट व्हिजीटवर नेऊन अन्याय दाखवून देत अभ्यासपूर्ण अहवालही सादर केला. अरिंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना भुक्ते यांचे आभारही मानले. समितीचे सदस्य वास्तू अभियंता उन्मेष गायधनी, गजानन शेलार, मधुकर गायकवाड, अॅड. सुनील बोराडे, मुकुंद आढाव, नगरसेवक दामोदर मानकर, दिनकर आढाव, हरपालसिंग बाजवा आदी उपस्थित होते.

गायधनी म्हणाले, की कृती समितीच्या प्रस्तावापैकी ९५ टक्के सूचना भुक्ते यांनी मान्य केल्या आहेत. सोमेश्वर मंदिरावर शंभर फुटी रस्त्याचे आणि जयराम हॉस्पिटवरील रस्त्याचे आरक्षण रद्द झाले आहे. चेहेडीतील नदीकाठचा खत प्रकल्प आणि वाढीव ट्रक टर्मिनन्स रद्द झाला आहे. विहितगावच्या सर्वे नंबरच्या हद्दी दुरुस्त झाल्या आहेत. आगरटाकळी, चुंचाळे, पिंपळगाव खांब, चाडेगाव येथे १००२ आरक्षणे होती. आता फक्त ४८२ राहिली. कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन वाचवली आहे. मखमलाबाद व चेहडीतील महापालिकेच्या शेवटच्या टोकाची आरक्षण रद्द झाली आहेत. दसक-पंचक ते व्दारका यांना जोडणारा मार्ग होणार आहे. डेडएन्ड असणारे रस्ते जोडले जाणार आहेत. दसक पंचकमधील शिव हद्द दुरुस्ती तर महापालिका व कॅन्टोन्मेन्ट बोर्डमधील शिव हद्द रद्द केली आहे. अशोकनगरचा रस्ता छोटा करण्यात आला आहे. पंचकची मनपा गार्डनची जागा बिल्डरच्या तावडीतून वाचली आहे. विकास आराखड्यात पारंपारिक गाव रस्त्यांचा समावेश झाला आहे. म्हसरुळच्या टेकडीच्या उतारावर खेळाचे, पार्किंगचे आरक्षण होते ते रद्द झाले आहे.

प्रस्तावित सामनागाव रस्ता आरक्षणातून वगळला आहे. रेल्वे स्टेशनशेजारी आरक्षण होते. रेल्वेला ते नको असल्याने वगळले. जेलच्या विस्तारीकरणासाठी आरक्षण होते. तेथे रो हाऊस प्रस्तावित होते. ते आरक्षण वगळले. गावठाण विकासासाठी चार पट चटई क्षेत्र मंजूर झाले आहे. इतर शहरात गावठाण विकास नाही.

हॅटस टू गायधनी

गायधनींची शेती नाही. त्यांना आरक्षणाचा फटका बसलेला नाही. पण शेतकरी व बाधित मिळकतधारकांना न्याय देण्यासाठी त्यांनी दीड वर्षे व्यवसाय बंद ठेवला, रात्रंदिवस पायपीट केली. नाशिक विकास आराखडा चिंता आणि चिंतन हे आराखड्यावरील महाराष्ट्रातील पहिले पुस्तक लिहिले. त्याचे साफ्टवेअरही विकसित केले. पुस्तकाला प्रस्तावना लिहिणारे अमेरिकचे प्रसिद्ध वास्तुविशारद ख्रिस्तोफर चार्ल्स बेनींजर यांना या पुस्तकातील व समितीच्या ९५ टक्के सूचनांचा विचार आराखड्यासाठी झाल्याचे सांगितल्यावर ख्रिस्तोफर यांनी जगातील ही पहिली घटना असल्याचे सांगितले. गायधनी यांनी समितीच्या सभासदांसमेवत बसून रोड नेटवर्क प्लॅन तयार केला. भुक्ते यांनी या नकाशातील बहुतांश तरतूद नवीन आराखड्यात समाविष्ट केल्या आहेत.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचा हा आराखडा महाराष्ट्रासाठी रोल माडेल ठरून जनतेला न्याय देईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आणि सामान्यांना घरे देण्याचा उद्देश आराखड्यामागे आहे. भविष्यात नाशिक शहर हे उत्कृष्ट नियोजन असलेले शहर म्हणून उदयास येणार आहे.आरक्षणांची संख्या कमी करण्यात आली असून आवश्यकच आरक्षणे कायम ठेवली आहे. - प्रकाश भुक्ते, सहसंचालक नगरविकास विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची वाटचाल स्मार्टसिटीकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन प्रारुप विकास आराखड्यात टीडीआर आणि एफएसआय धोरण लवचिक करण्यात आल्याने शहरातील घरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. वाढीव टीडीआर आणि एफएसआयमुळे शहरातील ११५१ हेक्टरने रहिवाशी क्षेत्र कमी झाले आहे. तर औद्योगिक क्षेत्रात मोठी वाढ करण्यात आली आहे. शहरातील ५० फ्लॅटच्या इमारतींना आता सौरउर्जेचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. कपबर्ड, जीने, पाळणाघर, जिम्नॅशियम आदी एफएसआयमध्ये समाविष्ट केल्या आहेत. पार्किंग वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. भविष्यकालीन नगर योजनेसाठी ४४२ हेक्टर आरक्षण ठेवण्यात आल्याने नाशिकची वाटचाल स्मार्टसीटीकडे होणार आहे.

नगररचना विकास विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी नाशिकचा विकास आराखडा रविवारी सादर केला. १९९३ ला विकास आराखडा तयार झाल्यानंतर २० वर्षांनी हा आराखडा सादर होत आहे. एक वर्षे पाच महिने या रेकार्ड वेळेत तो तयार केला आहे. हरकती व सूचनांसाठी साठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्या आल्यावर चार तज्ज्ञांची समितीपुढे सुनावणी होईल. त्यांचा अहवाल सहसंचालकांकडे सादर होईल. त्यावर अंतिम निर्णय होऊन तो शासनाला सादर केला जाईल. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकचा हा आराखडा महाराष्ट्रासाठी रोल माडेल ठरून आणि जनतेलाही न्याय देणारा असलल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. या आराखड्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आणि सामान्यांना घरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, सहकारी बँक, तारांकित हॉटेल, शासकीय इमारती, पोलिस विभागाच्या इमारती, धार्मिक इमारती, बायोटेक्नॉलॉजी पार्क, माहिती तंत्रज्ञान बाबीसांठी अतिरिक्त चटईक्षेत्र देण्यात येणार आहे.

एखादा जमीनधारक त्याच्या भूखंडावरती ५० चौरसमीटर पर्यंतच्या सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्याची योजना राबवित असेल तर त्याला मूळ चटईक्षेत्र २ देण्यात येणार आहे. यामुळे गरिबांना परवडणारी घरे जास्त उपलब्ध होवून झोपडपट्टांची संख्या कमी होणार आहे. सोबतच झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी झोपडपट्टी पुर्नविकास योजना नियमावली तयार करण्यात आली असून विकासकांना तीन एफएसआय मिळणार आहे. तर शहरातील पार्किंगसाठीही लवचिक धोरण स्वीकारण्यात आले असून स्वतःच्या जागेवर पार्किंग उभारल्यास संबधीला टीडीआर देण्यात येणार आहे. गावठाणाचा विकास क्लस्टर डेव्हलपमेन्टच्या माध्यमातून करण्यासाठी ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात आला आहे. त्यामुळे गावठाणाचाही विकास होणार आहे.

ऐपतीइतकीच आरक्षणे

महापालिकेचे क्षेत्र २६७.४८ चौरस किलोमीटर आहे. पूर्वीच्या आराखड्यात ते चुकलेले होते. २०१६ ते २०३६ असा नव्या आराखड्याचा २० वर्षांचा कालावधी आहे. २०२६ ला नाशिकची लोकसंख्या २४ लाख ५० हजार तर २०३६ साली ३४ लाख असेल. त्याचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे. उत्कृष्ट शहर म्हणून नाशिक उदयास यावे हा दृष्टीकोन आराखडा तयार करताना ठेवला आहे. त्यासाठी तेरा उद्दिष्ठे ठेवण्यात आली आहेत. त्याकरिता स्वतंत्र धोरण आखले आहे. महापालिकेची ऐपती ऐवढीच आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यामध्ये मैदाने, गार्डन, मलनिसारण, अग्नीशमन, स्मशानभूमी आदींचा समावेश आहे. ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी दिलेली आहे तेथे नवीन आरक्षण टाकलेले नाही.

विकास नियंत्रण प्रोत्साहन

नियमावली तयार करण्यात आली आहे. विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या नवीन बाबी टाकल्या आहेत. मोठे रस्ते विकसित करण्यावर भर दिलेला आहे. त्यासाठी जादा एफएसआय दिलेला आहे. १८ मीटर रस्त्यांसाठी १.१ तर २४ मीटर रस्त्यासाठी १.२ एफएसआय राहील. पब्लिक ट्रान्सपोर्ट यशस्वी करण्यासाठी मोठ्या रस्त्यांवर गर्दी कशी होईल हे पाहिले आहे. रस्त्यांचे जाळे वाढविण्यावर भर आहे. कपबर्ड, जीने, पाळणाघर, जिम्नॅशियम आदी गोष्टी एफएसआयमध्ये समाविष्ट केल्या आहेत. टीडीआरची मर्यादा वाढवली आहे. आतापर्यंत एकपट टीडीआर मिळत होता. तो दुप्पट केला आहे. त्याचा वापर करण्याचा फार्म्युला दिला आहे. गरिबांसाठी घरे बांधण्यास विकसकांना प्रोत्साहन मिळणार आहे. ३२३ चौरस फूटापर्यंत ४० टक्के घरे बांधली आणि ५३६ चौरस फुटापर्यंत ६० घरे बांधली तर बेसीकच्या दोन एफएसआय मिळणार आहे.

सांडपाण्याचा पुनर्वापर

नव्या विकास आराखड्यात सौरऊर्जा आणि पाण्याच्या पूनर्वापराला प्राधान्य देण्यात आले आहे. यापुढे ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या बांधकाम योजनेत गरम पाण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तर १० हजार चौरसमीटर पेक्षा जास्त क्षेत्राच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी सांडपाण्याच्या पूनर्वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सौर ऊर्जा वाढीसह पाण्याच्या पूनर्वापरालाही लना मिळणार आहे.

स्वतंत्र सायकल ट्रॅक

नव्या विकास आराखड्यात शहरात स्वंतत्र सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. यासाठी १४ कोटीचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा सायकल ट्रॅक अस्तित्वात आल्यास शहरात सायकलधारकांची संख्या वाढणार आहे.

टीडीआरचे उदारीकरण

नगररचना विभागाने नऊ मीटरच्या आत टीडीआर देण्यास बंदी केली असली तरी, नव्या प्रारूप विकास आराखड्यात सहा, साडेसात आणि नऊ मीटरच्या रस्त्यांवरही टीडीआर देण्यात आला आहे. नव्या नियमावलीमुळे शहरातील घरांची संख्या वाढणार असली तरी, घरांच्या किमंतीवर नियंत्रण मात्र विकासकांचेच राहणार आहे.

नाशिकची लोकसंख्या ३४ लाख

नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी एक वर्ष पाच महिने लागले असून हा आराखडा २०१६ ते २०३६ पर्यंत कार्यन्वित राहणार आहे. या विकास आराखड्यात २०२६ पर्यंत नाशिकची लोकसंख्या ही २४ लाख ५० हजार गृहीत धरण्यात आली आहे. तर २०३६ मध्ये नाशिकची लोकसंख्या ३४ लाखांपर्यत जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेवरील ताणा वाढणार असून पायाभुत गरजांची शहराला गरज वाढणार आहे.

आराखड्यातील वैशिष्टये :

विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली तयार

१८ मीटर रस्त्यांसाठी १.१ एफएसआय

२४ मीटर रस्त्यासाठी १.२ एफएसआय

कपबर्ड, जीने, पाळणाघर, जिम्नॅशियम आता एफएसआयमध्ये

टीडीआरची मर्यादा वाढवली आहे

एफएसआय एकवरून दोनवर नेला

शहरातील ग्रीनबेल्ट पुन्हा वाढला

बिल्डरांची येलो आरक्षणे जैसे थे

आरक्षित जमिनीपोटी अडीचपट टीडीआर मिळणार

गावठाण विकासासाठी ४ एफएसआयची तरतूद

विकासकामांसाठी वाढीव एफएसआय मिळणार

ट्रक टर्मिनल्ससाठी विभागवार आरक्षण

सोमेश्वर मंदिरावरचे आरक्षण हटले

जयराम हॉस्पिटलवरचा रस्ता हटवला

आरक्षणांची संख्या १००२ वरून आता ४८२ वर

थीम पार्कची सर्व आरक्षणे रद्द

रोडनेटवर्क प्लॅन वापरून रस्त्यांचा विकास

अशोक नगरचा रस्ता पुन्हा ३६ मीटर केला

दसक ते द्वारका नवीन रस्ता प्रस्तावित

चेहेडी खत प्रकल्प रद्द

सातपूर एसटीपी प्लॅन्टचे सर्व्हे नंबर दुरुस्त

दसक-पंचकची वादग्रस्त शीव हद्द रद्द

अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा

एस. टी. डेपोची प्रस्तावीत आरक्षणे वगळली

सर्व आरक्षणे सार्वजनिक सुविधे अंतर्गत येणार

साधूग्रामसाठी ३५२ एकर जागा आरक्षित

पार्किंगची आरक्षणे वाढवली

रिव्हरफ्रन्ट विकास कार्यक्रम रद्द

सायकल ट्रॅकची तरतूद

पाथर्डी खत प्रकल्पाचा विस्तार वाढवला

शिवार वाईज फायर ब्रिगेड आरक्षण

सौरउर्जेचा वापर वाढण्यासाठी प्रयत्न

बिल्डरांना पाण्याचा पुनर्वापर करावा लागणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा अन् मंत्री अवाक्

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जलयुक्त ‌शिवार योजनेची कामे मे अखेरीस यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह जलसंपदाचे मंत्री दिवसरात्र मेहनत घेत असताना जिल्ह्यातील अधिकारी परदेश सहलीसाठी गेले आहेत. अभियंतापदावरील अधिकाऱ्यांना कामांच्या सद्यस्थितीची मा‌हितीच नसल्याचे पाहून जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना कपाळावर हात मारून घेतला. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे चांगल्या योजनांची वाट लागते अशा कठोर शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली.

‌जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी शिवतारे शनिवारी नाशिकमध्ये आले होते. शासकीय विश्रामगृह त्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांसह जलसंधारण, वन, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. शिवतारे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यास सांगितले. ही माहिती संदिग्ध असल्याचे लक्षात येताच शिवतारे यांनी संबंधित अधिकाऱ्याची कानउघाडणी केली. कार्यकारी अभियंत्यासारख्या अधिकाऱ्याला योजनेबद्दल अपुरी माहिती असेल तर मग योजनेची वाट का लागणार नाही, असे म्हणत शिवतारे यांनी कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. कृषी वि‌भागाचे अधीक्षक टी. एन. जगताप या बैठकीला हजर नव्हते. ते सुटी घेऊन अमेरि‌केत गेल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तर वन विभागाच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील आणि के. प्रदीपा या देखील रजेवर गेल्या. ही महत्त्वकांक्षी योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्याची जबाबदारी असताना अधिकारी सुटीवर गेल्याबद्दल शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित मंत्र्यांशी याबाबत चर्चा करून बेजबाबदारपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

शेतकरी तुमचा मालक

शेतामध्ये राबणारा फाटका शेतकरी तुमचा मालक आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला गलेलठ्ठ पगार मिळतो. याची जाणीव ठेऊन कामे करा, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आले. ३ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे इटेंडरिंग करावे लागते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील ३२३ कामे प्रत्येकी २.९९ लाख रुपये खर्चाची असल्याची मा‌हिती सादर केली. त्यावर आपण यापूर्वीच आक्षेप नोंदविल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी कुशवाह यांनी याबाबतचा नवीन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. इ टेंडरींगच्या प्रक्रियेत पडावे लागू नये तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खाबुगिरीसाठी कुरण मिळणार असल्यानेच हा खटाटोप सुरू असल्याची शक्यता शिवतारे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमवर रंगणार आयपीएलची फायनल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) फायनल कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रंगणार असली तरी नाशिककरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच 'ईडन गार्डन' ठरणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये रविवारी होणारी आयपीएलच्या विजेतेपदासाठीची लढत नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर रविवारी रात्री आठ वाजता ३० बाय २३ फुटी एलईडी स्क्रीनवर विनामूल्य दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही फायनल प्रचंड उत्सुकतेची ठरणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी रविवारी रात्री आठपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. ही माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विनोद शहा यांनी 'मटा'ला दिली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पेप्सीच्या सहकार्याने फॅन पार्कची योजना आखली असून, यात देशभरातील १५ शहरांची निवड केली आहे. यात नाशिकची आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी निवड झाली आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर हा सामना 'याचि देही याची डोळा' अनुभवण्यासाठी बीसीसीआयतर्फे जय्यत तयारी सुरू असून, महात्मा गांधी रोडच्या बाजूने ३० बाय २३ फुटांचा एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार आहे.

बॉल मशीनद्वारे खेळा क्रिकेट!

सामना सहा ते सात तास रंगणार असल्याने या दरम्यान शिवाजी स्टेडियमवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक सुविधा बीसीसीआय उपलब्ध करून देणार आहे. यात बॉल मशीनचेही विशेष आकर्षण असेल. नेटमध्ये बॉल मशीनची व्यवस्था करण्यात आली असून, मुलांना खेळण्यासाठी ते उपलब्ध असेल. त्यामुळे कुटुंबासह सामन्याचा आनंद मनसोक्त लुटता येणार आहे. याशिवाय ग्राऊंडवर ज्या पद्धतीने खेळाडूंसाठी ड्रिंक वॉटर, कोल्ड्रिंक्सची व्यवस्था करण्यात येते त्या पद्धतीने पेप्सीची गाडी ग्राऊंडवर येईल. शिवाजी स्टेडियमचे संपूर्ण वातावरण ईडन गार्डनमय करण्याचा आभास निर्माण केला जाणार आहे.

हुकली असती संधी!

मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचल्याने नाशिककर लकी ठरले; अन्यथा फॅन पार्क योजनेत नाशिकची संधी हुकली असती. फायनलमध्ये जो संघ आधी फायनलमध्ये पोहोचेल, त्या संघाच्या शहराजवळचे शहर फॅन पार्कसाठी निवडले जाते. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून चेन्नईच्या आधी फायनलमध्ये प्रवेश केल्याने नाशिकची फॅन पार्कसाठी निवड झाली. जर मुंबई पराभूत झाली असती तर हैदराबादजवळील शहराची निवड झाली असती. म्हणूनच नाशिककरांचा पाठिंबा मुंबई इंडियन्सला अधिक असेल यात शंका नाही.

पाच हजार प्रेक्षकांची अपेक्षा

यजमान नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना बीसीसीआयसोबत को-ऑर्डिनेटरचे काम पाहत आहे. शिवाजी स्टेडियमची संपूर्ण व्यवस्था बीसीसीआयच पाहणार आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमची क्षमता सहा हजार प्रेक्षकांची आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्टेडियमवर रविवारी रात्री नऊपर्यंतच प्रवेश दिला जाईल. त्यानंतर प्रवेश बंद केला जाणार आहे. प्रत्येक प्रेक्षकाला विशिष्ट प्रकारचे बँड बांधले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर जाताना आणि येताना अडचण येणार नाही. कारण हे बँडच प्रेक्षकांची ओळख पटवून देऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंबिवलीची ‘मुखवटे’ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने आयोजित केलेल्या कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत डोंबिवलीच्या मैनी कलामंच संस्थेच्या 'मुखवटे' या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला तर, डोंबिवलीच्या 'तो पाऊस आणि टाफेटा' या अश्व थिएटर्सच्या एकांकिकेला द्वितीय क्रमांक मिळाला. सोलापूरच्या अस्तित्व मेकर्स संस्थेच्या 'ब्रेन' या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला.

कालिदास कला मंदिरात सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते पार पडला. प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेला १५ हजार, द्वितीय क्रमांकाच्या एकांकिकेला १० हजार तर, तृतीय क्रमांकाच्या एकांकिकेला ७ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मोहन जोशा म्हणाले की, अभिनय हा शिबिरात शिकून येत नसतो. अभिनय ही स्‍वतः आत्मसात करण्याची कला आहे. आपण ज्या ठिकाणी असतो तेथील माणसांचे संवाद, त्यांची बोलण्याची लकब, त्यांचे हावभाव यांचे ऑब्जर्व्हेवेशन करण्याची गरज आहे. यातूनच अभिनय शिकता येतो. सध्याच्या पालकांना वाटते आपल्या मुलाला ताबडतोब अभिनय आला पाहिजे. लगेच त्यानी मालिकांमध्ये हिरोच्या भूमिका करायला पाहिजे. अशा रितीने नट घडत नसतो. नट हा दिग्दर्शकाच्या तालमीत घडत असतो. पुस्तके वाचून अभिनय येत नाही. तर तो केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी अभिनेते दीपक करंजीकर म्हणाले की, श्रवण, वाचन, मनन, चिंतन, अविष्कार अभिनय करताना सूत्रांचा जर नटाने अभ्यास केला तर त्याला निश्चित यश मिळू शकते. नाट्यपरिषदेचे नाशिक शाखेचे कार्यवाह सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले. तीन दिवसात २६ एकांकिका सादर झाल्या. समारोपाच्या शेवटच्या दिवशी जळगावच्या भूमी बहुउद्देशीय संस्थेची 'मिशन टायगर', भुसावळच्या पु. ओ. नाहटा महाविद्यालयाती 'स्मशानातील सोनं', मुंबईच्या अख्यायिका संस्थेची 'चारू आरो इत्यादी', अंमळनेरच्या प्रताप कॉलेजची 'कस्टमर केअर', सोलापूरच्या अस्तित्व मेकर्सची 'ब्रेन', मुंबईच्या अधिष्ठान थिएटर्सची 'कळसूत्री' या एकांकिका सादर झाल्या. यावेळी शफी नाईकवाडे, सतीष लोटके व मानसी राणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

परीक्षकांचा वाद विकोपाला

कोणत्या एकांकिकेला प्रथम क्रमांक द्यायचा याबाबत तीन परीक्षकांमधील वाद विकोपाला गेल्याने बक्षिस समारंभाला उशीर झाला. यामुळे बाहेर प्रेक्षकांना वाट पहावी लागली. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी मध्यस्थी करून एक निर्णय घ्यावा व लवकर जाहीर करावा अशी विनंती केल्यावर तीनही परीक्षकांनी निर्णय जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलस्त्रोतांचे मॅपिंग करा

$
0
0

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आदेश

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

१९७२ नंतरच्या दुष्काळानंतर अनेक ठिकाण ओढे, वळण बंधारे, पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली. मात्र, अजून या जागांचे अधिग्रहण झालेले नाही. याबाबत उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत या जागांचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. पाझर तलाव व तत्सम जलसाठ्यांचे मॅपिंग सुरू करा, असे आदेश जलसंपदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी दिले.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी ते म्हणाले, की १९७२ ते १९८० या काळात मोठ्या प्रमाणावर वळण बंधारे, पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली. मात्र, त्यांचे भूसंपादन अद्याप झालेले नाही. अशाच एका पुण्यातील खटल्याचा निकाल देताना उच्च न्यायालयाने अशी लोकोपयोगी कामे सरकारी खर्चातून झाली असतील तर त्या जमिनी ताब्यात घ्याव्यात असे आदेश दिले होते. याच आदेशाचा आधार घेत ओढे, नाले, वळण बंधारे, पाझर तलावांची यादी तयार करून त्यांचे मॅपिंग करावे असे आदेश शिवतारे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नियोजनानुसार जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही १७ दिवसांचा कालावधी आहे. आतापर्यंत २२९ गावांमधील २०३९ पैकी ११९८ कामे पूर्ण झाली आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:ला झोकून दिले तर उर्वरित कामे मुदतीत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण करतांना गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. तसे होऊ नये यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कामांसाठीचा किती निधी कोठून घ्यायचा याबाबत अजून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. नवीन योजना असल्याने राज्यात अशी परिस्थिती असून त्यात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वन विभागाने वनतळ्यऐवजी अन्य उपाययोजना कराव्यात. त्यांना देणार असलेल्या १० कोटी रुपयांच्या निधीतील पाच कोटी रुपये बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला द्या असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

राज्यमंत्री भुसे यांची नाराजी

जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याबद्दल सहकार राज्यमंत्री भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी अडविणारे आणि ते साठविणाऱ्या तालुक्यातील १२ प्रकल्पांची ८० टक्के कामे होऊनही उर्वरित २० टक्के कामे गेल्या १५ वर्षांत होऊ शकली नाहीत याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अशी कामे पूर्ण झाली तर कमीत कमी खर्चात लगेचच सुविधा उपलब्ध होणार असल्याने निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही ‌शिवतारे यांनी दिली.

उद्योजकांकडून थंड प्रतिसाद

नाशिकमध्ये उद्योजकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे शिवतारे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अशा उद्योगांची बैठक बोलावून त्यांना निधी देण्यासाठी प्रोत्साहित करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. योजनेवर जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो आहे. त्यामुळे यातून होणाऱ्या कामांचा लाभ जनसामान्यांना व्हायलाच हवा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉशमध्ये यंदा मोठी भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑटोमोबाइल क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बॉशने यंदा भारतात मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल ३२०० जणांना रोजगार प्राप्त होणार असून, कंपनीच्या वाटचालीलाही त्यामुळे मोठी मदत होणार आहे.

बहुराष्ट्रीय कंपनी असलेली बॉश ही सध्या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल कंपन्यांपैकी एक आहे. सद्यस्थितीत बॉशकडे २६ हजार असोसिएटस कार्यरत आहेत. ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आगामी वाटचाल पाहता नवीन ३२०० असोसिएटस भरण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या भरतीत महिलांची संख्या ३० टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास कंपनीला आहे. अंदाजे दोन ते अडीच हजार असोसिएटस हे बंगळुरू आणि कोईमतूर येथे कार्यरत होणार असल्याची माहिती रॉबर्ट बॉश इंजिनिअ‌रििंग अँड बिझनेस सोल्यूशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि अध्यक्ष विजय रत्नपारखे यांनी दिली. विविध कॉलेजमध्ये मुलाखती घेऊन आम्ही नवीन असोसिएटस भरणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. भारतात प्रशिक्षित पदवीधारकांना मोठ्या संधी आहेत. कुठलाही अनुभव नसणाऱ्या आणि करिअरला सुरुवात करणाऱ्या युवकांना आम्ही संधी देत असल्याचेही ते म्हणाले. गेल्या सात वर्षात कंपनीने जवळपास ५०० पेटंटसाठी अर्ज केले आहेत. बॉशने इंटर्नल सोशल मीडिया नेटवर्क तयार केले असून, त्याद्वारे कर्मचारी त्यांच्या प्रकल्पांची माहिती एकमेकांना देतात. त्याद्वारे त्यांना विविध प्रकारचे इनपुट प्राप्त होतात. बॉशच्या या भरतीकडे देशातील तरुणांच्या नजरा लागल्या आहेत.

सुमारे दोन ते अडीच हजार असोसिएटस हे बंगळुरू आणि कोईमतूर येथे कार्यरत होतील. यासाठी विविध महाविद्यालयत मुलाखती घेतल्या जातील.

- विजय रत्नपारखे, मॅनेजिंग डायरेक्टर आणि अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकांची नजर शोधतेय नंदिनीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरदिवसा घराच्या अंगणातून अपहरण करण्यात आलेल्या नंदिनी शर्मा या चार वर्षीय बालिकेचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नाही. मानसिक आणि आर्थिक परिस्थितीने खचलेल्या शर्मा कुटुंबावरील शोककळा कायम असून, आज ना उद्या नंदिनी परत येईल, या अपेक्षेवर त्यांच्या नजरा पोलिस तपासाकडे लागल्या आहेत.

सातपूर-अंबड लिंकरोडवरील इस्सार पेट्रोलपंपानजीक राहणाऱ्या एका महेंद्र शर्मा यांच्या चार वर्षीय नंदिनीचे १५ मे रोजी सकाळच्या सुमारास अपहरण करण्यात आले. एका व्हाईट कलरच्या कारमधून आलेल्या अपहरणकर्त्याने अंगणात खेळणाऱ्या नंदिनीला तिची बहिणी अंजली व भाऊ कृष्णा यांच्या नजेरसमारून उचलून नेले. या घटनेमुळे सहा वर्षीय अंजली व इतर भावंडे दहशतीच्या वातावरणात आहेत. याबाबत माहिती देताना महेंद्र शर्मा यांनी सांगितले की, अपहरणच्या दिवसापासून सर्वांची मानसिक स्थिती ढासळली आहे. आपल्यासोबत अंगणात हसत-खेळत असलेली नंदिनी अचानक दिसेनाशी का झाली, असा प्रश्न चिमुकल्यांना पडला आहे. नंदिनीला सकाळी ८ वाजून ८ मिनिटांच्या सुमारास वाहनात घालून अपहरणकर्ता फरार झाला. यानंतर पुढील पाचच मिनिटांत पोलिसांना खबर दिली. नाकेबंदी व इतर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, आजवर काहीच सकारत्मक बातमी मिळाली नाही. पोलिसांना विचारले असता तपास सुरू असल्याचे ते सांगतात. त्यांना काही विचारायची हिंमत होत नाही. दिवस-दिवस पोलिस स्टेशनमध्ये जातो. हातावरचे काम असल्याने आर्थिक परि​स्थिती ढासळत असून, दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे महेंद्र शर्मा यांनी सांगितले. पोलिस त्यांचे काम करतील. मात्र, मुलीला शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. उधार उसणवारीतून घेतलेल्या पैशांच्या सहाय्याने काही पत्रक छापले असून, ते चौघा जणांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी चिटकवण्याचे काम सुरू आहे. पोटचा गोळा गेल्याचे दु:ख पैशांपुढे काहीच नाही. मात्र, नंदिनी परत आली पाहिजे. आज नऊ दिवस झाले असून, पोलिसांनी नंदिनीचा तपास लावण्याची मागणी शर्मा यांनी केली आहे.

नऊ दिवसापासून तपास सुरूच

नंदिनीच्या अपहरणाबाबत बोलताना सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, क्राईम ब्रँचच्या तिन्ही युनिटचे अधिकारी या तपासात गुंतले आहेत. सातपूर पोलिस स्टेशनचे पथक देखील अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत. सध्या परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरेचे व्हिडीओ फुटेज हाती लागले असून, यातून काही स्पष्ट होते का हे तपासले जात असल्याचे झेंडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा पराभव स्वकीयांकडूनच!

$
0
0

संपर्कप्रमुखांचे खडेबोल; महापालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्याचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शिवसेनेला हरविण्याची ताकद विरोधी पक्षात नाही. आपल्यातील गटबाजी आणि हेवेदाव्यामुळे आपणच आपला पराभव करून घेतो. साडेचार वर्ष एकत्र राहतो आणि निवडणुकीच्या वेळी एकमेकांचे वैरी बनतो. मात्र, आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. हे चित्र बदला अशी तंबी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांनी दिली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख अजय चौधरी शुक्रवारपासून (दि. २२) नाशिक दौऱ्यावर आले आहेत. ते विधानसभा मतदारसंघ निहाय संघटनेचा आढावा घेत आहेत. त्यांनी शनिवारी नाशिक शहरातील तीन मतदासंघांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सत्याभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकवरील भगवा उतरून पाच सहा कलरच्या चिठ्ठ्या असलेला झेंडा फडकत आहे. हे शिवसैनिकांसाठी भूषणावह नाही. महापालिकेवर फडकणारा मनसेचा कलरबाज झेंडा उतरवून तिथे शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन चौधरी यांनी यावेळी केले. नाशिक महापालिकेवर मन‌सेची सत्ता असण्यामागे आपल्याच चुका आहेत. आपण एकमेकांना पाडतो. त्यामुळे चुकीचे लोक निवडून येतात. यापुढे गटतट, टीकाटिप्पणी खपवून घेतले जाणार नाहीत. पक्ष खराब करणाऱ्यांना यापुढे पक्षात स्थान नाही. शिवसेना सोडून इतर घरे फिरून येणाऱ्यांना पक्षात मान मिळणार नाही. पदासाठी पक्ष सोडणाऱ्यांनी आताच चालते व्हावे, असा दम देत आपल्याला खरा निष्ठांवत सैनिक हवा असल्याचे सांगितले.

माझा स्वतःचा गट

संपर्कमंत्री पद मिळाल्यानंतर मला एकाने सांगितले, की नाशिक शिवसेनेत दोन गट आहेत. त्यात एक गट संपर्कप्रमुखाला मानणारा आणि दुसरा न मानणारा. मात्र, कोणतीही गटबाजी खपवून घेणार नाही. गटातटाच्य़ा राजकारणात माझ्याकडे स्वतःचा गट उभी करण्याची ताकद आहे. रण कसे पेटवायचे आणि विझवायचे मला चांगलेच माहित आहे. त्यामुळे गटबाजी विसरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा चौधरी यांनी दिला.

त्रिसूत्रीतून नाशिकमध्ये भगवा

नाशिकमध्ये आपण यापुढे नव्या त्रिसूत्रीने काम करणार आहोत. संघटन कौशल्य, जनआंदोलने आणि लोकाभिमुख कार्यक्रम हाती घेवून शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देणार आहे. या त्रिसूत्रीतून आपण नाशिक महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. यासाठी शिवसैनिकांचे सहकार्य लागणार आहे. सर्व जणांनी एकत्रित येवून मला सहकार्य केले तर नाशिकचा भगवा कोणीच उतरवणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५० एमआयडीसींचा ई सर्व्हे!

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

राज्यातील उद्योगांना घेराव घालणाऱ्या समस्यांचे ट्रॅकिंग एका ई-सर्व्हेच्या माध्यमातून लवकरच केले जाणार आहे. यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) ने एक उपक्रमही हाती घेतला आहे. येत्या जुलै अखेर राज्यभरातील ४५० एमआयडीसींच्या समान समस्यांचे प्रतिबिंब या सर्व्हेच्या माध्यमातून मांडले जाईल. यातील प्राधान्याच्या दहा मुद्द्यांवर उत्तरे मिळविण्यासाठी पुढील टप्प्यात सीआयआय पाठपुरावा करणार आहे.

आर्थिक विकास गतिमान करण्यासाठी उद्योगांची शिखर संघटना असलेल्या भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) या संघटनेने एमआयडीसींमधील उद्योगांना सतावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर, कुशल मनुष्यबळ आणि जागेची तूट यासारख्या समान मुद्द्यांशी लढताना उद्योगांचे हरविणारे बळ एमआयडीसीला पुन्हा मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. राज्यभरातील उद्योगांच्या प्रमुख समस्या सोडविताना असमतोल होऊ नये यासाठी चंद्रपूर ते कोल्हापूर ही प्रक्रिया राबविण्यात येईल. यासाठी क्रीसल कंपनीकडे सीआयआयने या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. राज्यातील सुमारे ४५० एमआयडीसीमधील समस्यांचे प्रतिबिंब यात उमटणार आहे. एक प्रश्नावली बनविण्यात येत असून, प्रत्येक एमआयडीसीमधील किमान २० टक्के उद्योजकांचा सहभाग या प्रश्नावलीत असेल.

सद्यस्थितीत एमआयडीसींना प्रामुख्याने रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज, रिक्रीएशन सेंटर्स यासारख्या प्राथमिक स्तरावरील समस्या सतावत आहेत. या समस्यांना सामोरे जाताना ठिकठिकाणच्या उद्योजकांच्याही नाकीनऊ आले आहेत. या मुलभूत समस्यांपैकी बहुतांशी महापालिकेशी निगडीत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसीला वारंवार अवलंबून रहावे लागते आहे. परिणामी, एकीकडे मंदीचे सावट तर दुसरीकडे मुलभूत सुविधांचा असणारा अभाव अशा कात्रीतून उद्योग सांभाळताना उद्योजकांची मोठी शक्ती खर्च होत आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून अस्तित्व टिकवू पाहणाऱ्या उद्योगांना गती देण्यासाठी हा प्रकल्प सीआयआयने हाती घेतला असल्याची भूमिका संस्थेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे नूतन अध्यक्ष सुधीर मुतालीक यांनी मांडली.

राज्यातील एमआयडीसी क्षेत्रातील बहुतांश समस्या सारख्याच आहेत. येत्या जुलै अखेरीपर्यंत एमआयडीसींचे ई सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येईल. या मंथनातून हाती येणाऱ्या शंभरावरील समस्यांच्या चाळणीतून प्राधान्याचे दहा प्रश्न पहिल्या टप्प्यात सोडविण्यासाठी आमची संघटना पाठपुरावा करणार आहे.

सुधीर मुतालिक, उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद अध्यक्ष, सीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्तची ‘पेट’ लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पीएचडीची प्रवेश परीक्षा (पेट) अचानक आदल्या दिवशी रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. राज्यभरातून १५०० अर्ज आल्यानंतर विद्यापीठाला या परीक्षेचे नियोजन करण्यात अपयश आले असून, आता परीक्षेचे वेळापत्रक १ जून रोजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

या परीक्षेसाठी राज्यभरातून १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी ही प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्याचे विद्यापीठाने घोषित केले आहे. येत्या १ जूनला परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी सांगितले आहे.

विद्यार्थी बेहाल

परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विद्यार्थी हॉल तिकीटाच्या चिंतेत होते. त्यामुळेच विद्यापीठात राज्यभरातून विद्यार्थ्यांचे फोन येत होते. विद्यापीठाकडून परीक्षेचे योग्य नियोजन न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय उशिरा कळविल्याने अनेक विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात शनिवारीच दाखल झाले होते. परीक्षा पुढे ढकलल्याचे समजताच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर तीव्र नाराजी प्रकट केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीची आरक्षणमुक्ती!

$
0
0

५४ टक्के आरक्षणे वगळली; २५ मजल्यांना परवानगी, अडीचपट टीडीआर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील दोन वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला नाशिकचा शहर प्रारूप विकास आराखडा अखेर शनिवारी जनतेच्या माहितीसाठी खुला झाला. नव्या आराखड्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक, मिळकतधारक आणि विकासकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत वादग्रस्त आराखड्यातील अन्यायकारक आरक्षणे रद्द करून १००२ आरक्षणांची संख्या ४८२ वर कमी करण्यात आली आहे.

शहरातील ५४ टक्के आरक्षणे हटली आहेत. ग्रामीण भागातील `यलो बेल्ट` कमी होवून तो पुन्हा `ग्रीन बेल्ट` झाला आहे. तर आरक्षणबाधितांना आता अडीचपट टीडीआर आणि गावठाणच्या विकासासाठी चार एफएसआय देण्यात येणार आहे. शहरात ७० मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी देण्यात आली असल्याने २५ मजल्याच्या इमारती उभ्या राहण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी नवीन शहर विकास आराखडा प्रसिद्ध केला. हा आराखडा पाहण्यासाठी महापालिकेसह नगररचना कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. भुक्तेंनी अथक परिश्रम करीत नवा आराखडा तयार केला आहे. दोन महिने या आराखड्यावर नागरिकांकडून हरकती घेतल्या जाणार आहेत. नव्या आराखड्यात केवळ अत्यावश्यक बाबींचे आरक्षण कायम ठेवण्यात आरक्षणे ४८२ वर आणण्यात आली आहेत. आगरटाकळी, सातपूर, पिंपळगाव बहुला, चुंचाळे, चाडेगाव, दसकपंचक, मखमलाबाद, चेहेडी आदी भागातील आरक्षणे कमी करण्यात आली आहेत. तर साडेसहा हजार शेतकऱ्यांना अल्पभूधारक असल्याचे प्रमाणपत्र दिले आहेत. थीम पार्कची आरक्षणेही कमी झाली आहेत. महापालिकेने विविध हेडखाली टाकण्यात आलेली आरक्षणे आता सार्वजनिक सुविधा या एकाच हेडखाली येणार आहेत.

काय आहे आराखड्यात...

- साधुग्रामसाठी ३५२ एकर कायमस्वरूपी आरक्षण

- गावठाणमध्ये चारपर्यंत एफएसआय, रस्त्यांच्या विकासासाठीही वाढीव एफएसआय

- ७० मीटरपर्यंतच्या इमारतींना परवानगी

- जागेवर आरक्षण पडल्यास अडीचपट टीडीआर जागा मालकाला

- चेहेडीचा प्रस्तावित खत प्रकल्प रद्द

- सोमेश्वर मंदिर व जयराम हॉस्पिटल्सवरील आरक्षण हटविले

- शहराचा विकास हॉरिझोन्टलसोबतच व्हर्टीकलही होणार

- बिल्डरांनी गरिबांना परवडणारी घरे द्यावी यासाठी बिल्डरांना एफएसआय देण्याची तरतूद

मेट्रोकडे दुर्लक्ष

नव्या विकास आराखड्यात मेट्रोकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. २०३६ मध्ये शहराची लोकसंख्या ३४ लाख गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे एवढ्या गर्दीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर जोर देण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झालेले नाही. २० लाखांच्यावर लोकसंख्या गेल्यास केंद्राच्या नियमाप्रमाणे मेट्रो आवश्यक आहे. मात्र, त्याचा उल्लेख या आराखड्यात नाही.

वाढीव क्षेत्रफळाचा वाद कायम

आराखड्यात महापालिकेचे क्षेत्रफळ हे २६७.४८ चौरसमीटर धरण्यात आले आहे. तर महापालिकेच्या दप्तरी शहराचे क्षेत्रफळ २५९.१२ चौरसमीटर धरण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रफळाचा वाद कायम असून, यावरून महापालिका आणि नगररचना विकास विभाग पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images