Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एम. फार्म सीईटीचा आज निकाल

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म)च्या प्रवेश परीक्षेनंतर आता मास्टर ऑफ फॉर्मसी (एम. फार्म) या या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षाकक्षेचा निकाल बुधवारी (२७ मे) जाहीर होणार आहे.

बी. फार्मसी उत्तीर्ण तसेच शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थी एम. फार्म सीईटीसाठी पात्र होते. एम. फार्मसी अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ही परीक्षा १७ मेला घेण्यात आली. आता या परीक्षेचा निकाल बुधवारी (२७ मे) जाह‌ीर होणार आहे. www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

त्यांना थेट प्रवेश

एआयसीटीईतर्फे घेण्यात आलेल्या ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट (जी पॅट) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एम फार्मला थेट प्रवेश मिळणार आहे. नाशिकमधील ४० हून अधिक विद्यार्थी जी-पॅट उत्तीर्ण आहेत. या विद्यार्थ्यांना एम. फार्मसी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना एआयसीटीईकडून प्रति महिना १२ हजार ४०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेची सिंहस्थ कामे पूर्णत्वाकडे

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामांनी वेग घेतला असून, येत्या महिन्यात ही कामे पूर्ण होतील, असा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

आगामी सिंहस्थासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर अनेक विकासात्मक कामे करण्यात येत आहेत. ही कामे निधीअभावी सुरू करण्यास उशीर झाल्याने ही कामे वेळेत पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड रेल्वे स्टेशवर करण्यात येणाऱ्या कामांचा वेग वाढवला आहे. ही कामे तीन टप्प्यात करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात तांत्रिक कामे, दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ ची निर्मिती करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून, प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चारच्या निर्मितीने वेग घेतला आहे. काही दिवसातच हा प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्यात करण्यात येणारा परिसराचा विकास काहीसा मंदावला असून, तो लवकर व्हावा अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.

भुसावळ विभाग व नाशिक विभागातील तांत्रिक कर्मचारी या कामावर देखरेख ठेवत आहेत. सिन्नरफाट्याकडून येणाऱ्या मार्गावर तांत्रिक कामासाठी व शेडच्या निर्मितीसाठी १ कोटी ६३ लाख ४९ हजार ६३० रुपयांची कामे करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ च्या कामासाठी २ कोटी ५० लाख, ४५ हजार ५०० रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यात शौचालय, पाण्याचे स्टॅँड, बैठक व्यवस्था, इत्यादी कामांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात स्टेशन परिसराचा विकास करण्यावर भर दिला जाणार असून, स्टेशनवर येणाऱ्या अॅप्रोच रोडचा विकास करण्यात येणार आहे.

सध्या असलेली जुनी बांधकामे उद्ध्वस्त करणे, मुरूम टाकणे, पाण्याची पाइपलाइन टाकणे, ड्रेनेज लाइन टाकणे, स्टोअर रूमची निर्मिती करणे, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ऑफिसेसची निर्मिती करणे, सिन्नर फाट्याकडून आरसीसी बॉण्‍ड्री कंपाउंड वॉल बांधणे, प्रतीक्षालय व बुकिंग ऑफिसची निर्मिती करणे या कामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या कामासाठी २ कोटी ११ लाख ५९ हजार १२० रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातील काही कामे झाली आहेत काही कामे बाकी आहे. या कामांना वेग येण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिल्व्हर ओक’ जागेचा वाद चव्हाट्यावर

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ख्रिस्ती समाजाच्या जागेवर सिल्व्हर ओक शाळा व्यवस्थापनाने कब्जा केला असून, ही जागा ख्रिस्ती समाजास परत द्यावी, या मागणीसाठी तिमथी विश्वास दहातोंडे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलिस, शाळा व्यवस्थापनाला सहकार्य करीत असल्याचा आरोप ख्रिस्ती समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या शाळेच्या मागे असलेल्या मैदानावर अनधिकृतरित्या कंपाऊंड घातले असून, परिसरातील मुलांना खेळापासून वंचित ठेवले आहे. शाळा आणि ख्रिस्ती समाज यांच्यातील वादाबाबत तत्कालीन पोलिस अधिकारी गणेश शिंदे यांनीही मध्यस्थी केली होती. कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, अशा प्रकारचे कृत्य करणार नसल्याचे पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत दोघांकडून लिहून घेतले होते. मात्र, शाळा व्यवस्थापनाने ख्रिस्ती समाजाची दिशाभूल करून पोलिस बंदोबस्तात रातोरात कंपाऊंड वॉलचे काम पूर्ण केले.

ही जागा नाशिक डायोसेशन कॉन्सिलने सिल्हर ओक शाळेच्या ग्रेग फाऊंडेशनला दोन रूमसाठी भाडे तत्त्वावर दिली होती. यावेळी या जागेत ज्युनिअर केजी व सिनिअर केजीचे वर्ग घेण्यात येत होते. ही जागा फक्त तीन वर्ष कराराने देण्यात आली होती. या शाळेने भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत अनधिकृत बांधकाम केले म्हणून नाशिक डायोसेशन कॉन्सिलचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश बलकुंदी यांनी न्यायालयाकडून शाळा पाडण्याचे आदेश देखील आणले होते. मात्र त्यावर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. या शाळेकडे बांधकामाची परवानगी नसताना पक्के अतिक्रमण केले असून, ही बाब महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहित असूनही अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याचे दहातोंडे यांचे म्हणणे आहे.

या शाळेच्या दादागिरी विरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अनेकदा तक्रार दाखल केली मात्र, याबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट दहातोंडे यांच्याकडून खोटे जबाब लिहून देण्यास भाग पाडले. त्यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनाविरोधात दहातोंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दहातोंडे हे उद्या सकाळी पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहन करणार आहे. नाशिक शहरात डायोसेशन कॉन्सिलच्या अनेक जागा आहेत या जागेवर आजही ख्रिस्ती समाजाचा अधिकार आहे. मोक्याच्या जागेवर बिल्डरांचा डोळा असून गोरगरीब ख्रिस्ती समाजाच्या नागरिकांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न बिल्डर लॉबीकडून पोलिसांच्या मदतीने होत आहे. नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत असून समाजाच्या जागा धनधांडग्याच्या घशात जात आहे. या जागा तातडीने समाजाला परत मिळाव्यात नाहीतर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा उशाराही दहातोंडे यानी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभ्रमित शेतकरी आज घेणार शेट्टींची भेट

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकलहरा ते गुळवंच या मार्गावर इंडिया बुल्ससह एमआयडीसीच्या जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून सुरू असलेले रेल्वेलाइनचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी आज (दि.२६) खासदार राजू शेट्टी यांची भेट घेणार आहेत. या विषयाशी संबंधित अधिग्रहणासंदर्भात केवळ संवादाअभावी संभ्रमात असल्याचे बहुसंख्य शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या मार्गावरील जमीन अधिग्रहणासंदर्भात प्रशासकीय स्तरावरून सुरू असलेल्या कार्यवाहीला सिन्नर तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दाखविला. स्वखुशीने जमीन देण्यास इच्छुक असलेल्यांवर कुठल्याही मताची सक्ती नाही मात्र, अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय मोजणीदेखील करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

या मागणीसाठी गेल्या पंधरवड्यात संघटनेच्या वतीने रेलरोको आंदोलन करण्यात आले होते. यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोरही संघटनेने उग्र निदर्शने केली होती. यानंतरही गावांमध्ये मोजणीसाठी गेलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी कोंडले होते. यानंतर अद्यापपर्यंत येथे अधिकारी फिरकले नसल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

दरम्यान, शेतकरीहिताच्या मुद्द्यावर भांडणारे खासदार शेट्टी आज नाशिकमध्ये येत असल्याने हा प्रश्नही आज त्यांच्या पुढ्यात मांडण्यात येणार आहे. भूसंपादनासह कांदाचाळ अनुदान आणि कांदाभाव आदी मुद्द्यांवरही पांगरी (ता. सिन्नर) येथे होणाऱ्या सभेत खा. शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत. संघटनेच्या वतीने छेडलेल्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज खा. शेट्टी यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. तोपर्यंत पुढील कुठलाही निर्णय घेतला जाणार नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले.

सिन्नर परिसरातील शेतकरी खासगी कंपनीच्या रेल्वेलाईनकरिता जमिनी देण्यास तयार नाहीत. तरीही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जमिनी हिसकण्याचा धाक दाखविला जात असल्याची संघटनेची तक्रार आहे. गुळवंच येथे सेझ कायद्यानुसार जमिनी संपादीत करण्यात आल्या, मात्र खासगी रेल्वे लाईनसाठी एमआयडीसी कायदा का लावण्यात आला? असाही सवाल उपस्थित होत आहे. सिन्नर तालुक्यातील या रेल्वेलाईनच्या मार्गावरून सोनांबे, कोनांबे, खापराळे, हरसुले, पारले, शिवके या शिवारातील भूसंपादन रद्द करण्याचीही शेतक-यांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विकास आराखडा बिल्डर धार्जिणा’

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नव्या विकास आराखड्यामुळे सर्वसामान्यांना घरे मिळणे सोपे होणार असून, त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारा हा नवा आराखडा असल्याचा सूर मोहन रानडे, उन्मेष गायधनी व अविनाश शिरोडे या तिघा वक्त्यांकडून व्यक्त होत असतानाच उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी मात्र हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप केला.

गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या ९४ व्या वसंत व्याख्यानमालेत 'नवा विकास आराखडा' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. २६ वे हे पुष्प वि. चिं. तथा दादासाहेब पवार यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. परिसंवादात माजी कार्यकारी अभियंता मोहन रानडे, विकासक अविनाश शिरोडे, वास्तुविशारद उन्मेष गायधनी व उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी सहभाग घेतला. यावेळी मोहन रानडे म्हणाले की, नागरिकांनी जागरूकतेने विकास आराखड्याकडे पाहिले पाहिजे. ३० एप्रिलला जे नवे धोरण जाहीर झाले आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करून काही त्रुटी जाणवल्यास ३० मे पर्यंत त्याच्या हरकती नोंदविल्या पाहिजेत असे त्यांनी नमूद केले.

अविनाश शिरोडे म्हणाले की, पूर्वी नाशकात पाच मजली इमारत पहायला मिळायच्या. आता २४ मजली बिल्डिंग पहायला मिळणार असून मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिक कोठेही कमी दिसणार नाही. उन्मेष गायधनी म्हणाले की, मागील प्रारूप आराखडा वादग्रस्त असल्याने नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सर्वसामान्यांचेही मत लक्षात घेण्यात आले आहे. अन्याय निवारण कृती समितीच्या माध्यमातून सकारात्मक प्रदर्शन केल्याने आराखड्यातील पान नंबर १२ वर कृती समितीची दखल घेण्यात आली आहे.यावेळी गुरुमीत बग्गा म्हणाले की, पैशांअभावी विकास आराखडा राबवला जाणार नसेल तर काय करावे यावर अडून न बसता आता गॅझेट रिपेअर करण्याचा विचार पुढे आला पाहिजे. आराखड्यात आठ किलोमीटरचा नसलेला एरिया दाखविण्यात आला आहे, जर असा एरिया होता तर आठ वर्षांची घरपट्टी कुणी बुडवली याचा शोध घेतला पाहिजेश्‍ असेही बग्गा म्हणाले. वि. चिं. तथा दादासाहेब पवार यांच्या स्मृती भूषण काळे यांनी जागवल्या. वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

'तुम्ही बिल्डरांचे दलाल आहात'

नव्या विकास आराखड्याचा परिसंवाद रंगात आलेला असताना व उपमहापौर गुरुमीत बग्गा बोलत असताना एका वृध्द श्रोत्याने उठून व्यासपीठाकडे पहात 'तुम्ही बिल्डरांचे दलाल आहात' असा घणाघाती आरोप केला. त्यावर काही काळ बराच गोंधळ माजला. त्यानंतर श्रीकांत बेणी यांनी मध्यस्थी करीत श्रोत्यांना नंतर प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे, नंतर बोला' असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वर्षात ११ कोटी घरे कशी?

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना स्वतःचा निवारा प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. देशातील ११ कोटी लोकांना अवघ्या सहा वर्षात घरे कशी उपलब्ध होऊ शकतील, असा प्रश्न क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष गीतांबर आनंद यांनी उपस्थित केला आहे. या मोहिमेसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांना सरकारने सोबत घेणे आवश्यक आहे आणि बांधकाम व्यवसायाच्या अडचणी दूर करायला हव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

नाशिक क्रेडाईच्या स्थापनादिनानिमित्त हॉटेल ताज येथे झालेल्या कार्यक्रमाला आनंद यांच्यासह क्रेडाई राष्ट्रीयचे पदाधिकारी, महाराष्ट्र पदाधिकारी तसेच नाशिक क्रेडाईचे सदस्य यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार परिषदेत आनंद यांनी माहिती दिली. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून, भरकटलेल्या जहाजाला योग्य दिशेकडे नेण्याचा मोदी यांचा प्रयत्न आहे. अचानक यू टर्न घेणे जहाजाला जसे शक्य नाही. तसेच अचानक अच्छे दिन येऊ शकत नाहीत. तरी येत्या दीड ते दोन वर्षात अच्छे दिन येतील, अशी आम्हाला आशा असल्याचे आनंद म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारांनी बांधकाम व्यवसायाकडे गांभीर्याने पहायला हवे. त्यासाठीच एफएसआय वाढवून देणे, पर्यावरण परवाना सक्तीचा नसणे, सिंगल विंडो यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे मत आनंद यांनी व्यक्त केले. याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत सरोदे, उपाध्यक्ष रोहित मोदी, माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर, जितेंद्र ठक्कर, नाशिक क्रेडाई अध्यक्ष जयेश ठक्कर आदी उपस्थित होते.

सीएसआर राबविणार

आगामी दोन वर्षे राष्ट्रीय पातळीवर क्रेडाईच्यावतीने सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) राबविली जाणार आहे. यासाठीच स्कील डेव्हलपमेंट, शहर स्वच्छता आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य केले जाणार आहे. प्रत्येक शहर स्वच्छ असावे यासाठी क्रेडाईच्यावतीने मोहीम राबविली जाईल, असेही गीतांबर आनंद यांनी नमूद केले. या उपक्रमांचे निश्चितच स्वागत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यादेशाआड संशयितांची लूट

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाआड काही पोलिस स्टेशनमध्ये संशयितांची सर्रास लूट केली जात आहे. अध्यादेशानुसार संशयितासह फिर्यादीची माहिती प्रसिध्द करण्यास कायदेशीर बंधन आहेत. मात्र, तुमची नावे वृत्तपत्रात प्रसिध्दीसाठी देणार नाही, असे परस्पर सांगत कधी फिर्यादीकडून तर, कधी संशयितांकडून सर्रासपणे पैसे उकळले जात आहेत.

बलात्कार तसेच विनयंभगसारख्या संवेदनशील प्रकरणात फिर्यादीची माहिती प्रसिध्द करू नये, याबाबत काही संकेत पाळले जातात. सामाजिक संकेतांचे सर्वच स्थरांवर पालन होत असताना काही महिन्यापूर्वी गृहविभागाने एक अध्यादेश पुढे आणला. या अद्यादेशानुसार फिर्यादीसह संशयिताचे नाव मीडियाला प्रसिध्दीस देऊ नये, असे सांगण्यात आले. यात कोणत्या गुन्ह्यांबाबत हे आदेश आहेत याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला. गृहविभाग वर्षभरात असे अनेक अध्यादेश काढत असते. मात्र, प्रत्येकाची काटेकोर अंमलबजावणी होतेच असे नाही. मुख्यालय विभागाचा पदभार आयुक्तालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्याकडेच सोपवावे, असा साधारणतः‍ २०१२ च्या सुमारास गृहविभागाने अध्यादेश काढला होता. हा आदेश येऊनही तत्कालीन उपायुक्त सुनील फुलारी यांनी पदभार सोडलाच नव्हता. त्याकाळात सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून साहेबराव पाटील यांच्याकडे पदभार देणे अपेक्षित होते. मात्र, या अध्यादेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. याप्रमाणे तक्रार दाखल करण्याबाबतचे कोणतेही निकष पोलिस स्टेशनमध्ये पाळलेच जात नाही. असे एक ना अनेक उदाहरणे सापडतील. सुप्रीम कोर्ट, मानवी हक्क आयोग, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने देखील तक्रार दाखल करण्यात येणाऱ्या टाळाटाळीच्या मुद्द्यावरून वेळोवळी पोलिस विभागाचे कान उपटले आहेत.

असे कितीतरी अध्यादेशांचे सर्रास उल्लंघन होत असताना फिर्यादी तसेच संशयितांची माहिती न देण्याच्या आदेशाचे शहर पोलिसांकडून काटेकोर पालन होते आहे. याबाबत माहिती घेता असे समोर आले की, या अध्यादेशाआड बऱ्याचदा संशयितांना लुबाडण्याचा प्रकार केला जात आहे. कौटुंबिक हिंसाचार, हाणामारी, रॅश ड्रायव्हिंग, विनयभंग यासारख्या केसेसमध्ये ताब्यात घेतलेल्या संशयितांना मीडियाचा धाक दाखवला जातो. मुला-मुलीचे नावे प्रसिध्द होऊ द्यायचे नसेल आर्थिक जोडतोड करण्याचा सल्ला पोलिस स्टेशनमध्ये दिला जातो.

या आदेशाबाबत अनभिज्ञ असलेले नागरिक पैसे देण्यास तयार होतात. आद्यदेशाच्या आड पोलिस स्टेशनमध्ये चाललेल्या या प्रकरणाकडे वरिष्ठ डोळेझाक करीत आहेत. थत्तेनगर येथील स्पामधील अनैतिक व्यवसायाची केस मिटवताना अशीच पध्दत अवलंबण्यात आली होती. कमी जास्त प्रमाणात सर्वच पोलिस स्टेशनमध्ये हे उद्योग सुरू असून, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी साक्षात पोलिस स्टेशनमध्ये चाललेल्या लुटीच्या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली जाते आहे. दरम्यान, याबाबत पोलिस आयुक्तालयात चर्चा झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटीचा प्लॅन पोलिसांनी केला उघड

0
0



म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यात वीस दिवसांपूर्वी घडलेल्या बँकेच्या पन्नास लाख रुपये लुटीच्या घटनेतील सहाही संश‌यितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालेगाव विभागचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने, मनमाड उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक नरेश मेघराजानी यांनी लुटीच्या तपासाबाबत माहिती दिली.

संशयित शंकर काशिनाथ धनगे याचे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंदरसूल शाखेत नेहमीच येणे जाणे असते. त्यास बँकेच्या शाखेत येणाऱ्या कॅशची संपूर्ण माहिती होती. त्यानुसार आरोपी नंदकिशोर किसन धनगे (वय ३१) याने शंकर काशिनाथ धनगे (वय ४४) तौसिक शकील शेख (वय २४), अजित रामदास कोल्हे (वय २७), सोन्या ऊर्फ संतोष गोरख वल्टे (वय २१) व शंकर उर्फ भंबू भगवान मिसाळ (वय २६) या सर्वांच्या मदतीने लुटीचा कट रचला. नियोजनानुसार नंदकिशोर धनगे याने गुन्ह्यासाठी लागणारी मिरचीची भुकटी (पुड), तोंडास बांधण्यासाठी रुमाल, मारण्यासाठी लाकडी बांबुचा दांडा अशी साधने दिली. नंतर शंकर उर्फ भंबू भगवान मिसाळ याने गावातीलच मित्राची काळया रंगाची पल्सर मोटरसायकल आणून अजित रामदास कोल्हे व तौसिक शकील शेख यांना देत त्या दोघांना लुटीसाठी रवाना केले. यांनतर त्यांनी लूट केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीपीवर बिल्डर-दलालांचा प्रभाव

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराचा नुकताच जाहीर झालल्या प्रारूप विकास आराखड्यावर शहरातील बिल्डर, भांडवलदार आणि दलालांचा प्रभाव असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. महापालिकेतील ३३ नगरसेवक दलालीचे काम करीत असून, अधिकारी आणि दलालांनी सहाय्यक संचालक प्रकाश भुक्ते यांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहरातील बिल्डरांच्या जागांवरील आरक्षणे हटवण्यात आली असून, वाढीव टीडीआर आणि एफएसआय हे बिल्डरांसाठीच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पाटील यांनी पत्रकारपरिषद घेवून या आराखड्यातील त्रुटींवर बोट ठेवले. या आराखड्यात अनेक ठिकाणची बिल्डर्सची आरक्षणे वगळण्यात आली आहेत. गंगापूर रोडवरील आर्किटेक्चर कॉलेजचे आरक्षण काढण्यात आले आहे. तर, पीटीसी समोरील प्रादेशिक कार्यालयांच्या जागेचे आरक्षण बदलण्यात आले आहे. भाभानगर येथील औद्योगिक झोनचे आरक्षण बदलण्यात आले आहे. तर चिंत्रमंदिर समोरचे लोकप्रतिनिधींच्या जागेवरील पार्किंगचे आरक्षण हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक ठिकाणी बिल्डराच्या जागेवरील आरक्षण काढून ते महापालिकेच्या जागांवर टाकण्यात आले आहे. नागरी सुविधांच्या नावाखाली आराखड्यात पळवाट काढण्यात आली आहे. याच बिल्डरांनाच फायदा होणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बिल्डरांच्या जागांसाठी वनजमिनीवर आरक्षणे टाकल्याचा गौप्यस्फोट त्यांनी पुराव्यानिशी केला आहे.

पाटील उवाच...

वाढवलेले टीडीआर आणि एफएसआय फसवा

पीटीसीसमोरील प्रादेशिक कार्यालयांच्या जागेचे आरक्षण बदलले

नगरसेवक-अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा

डीपीविरोधात आंदोलन उभे करणार

साधुग्रामच्या जागेवर `येलो झोन`

नव्या विकास आराखड्यात साधुग्रामची १०५ एकर बिल्डर लॉबीच्या दबावाखाली यलो झोनमध्ये टाकल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. १९९३ च्या डीपीत २७३, २७४, २७५, २७६, २८५ या जागेवर साधुग्रामचे आरक्षण होते. मात्र, या जागा बिल्डरांनी शेतकऱ्यांकडून घेतल्यानंतर बिल्डरांच्या दबावाखाली त्या येलो झोनमध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे पारदर्शक डीपी केल्याचा भुक्तेंचा दावा खोटा असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इरकॉन, ‘सोमा’ला ७ कोटींचा दंड

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव ते धुळेदरम्यानच्या लेअर टाकण्यास उशीर करणाऱ्या इरकॉन आणि सोमा टोलवे कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तब्बल सात कोटीचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या खात्यातून ही रक्कम वळती करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर कंपन्यांनीही नमते घेत आठ दिवसांत लेअरचे टाकण्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मालेगावजवळ प्लांन्टचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

गेले वर्षभरात या मार्गावर सव्वाशे अपघात झाले असून, ठेकेदार प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे वृत्त मंगळवारी `मटा`त प्रसिद्ध झाले. हायवे अॅथॉरिटीने संबंधित वृत्ताची गंभीर दखल घेत कंपनीला पुन्हा समज दिली आहे. सोबतच कामाला उशीर केला म्हणून संबंधित कंपनीवर प्रती दिवस ३ लाख १७ हजाराचा दंड वसूल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१४ ते २०१५ पर्यंत संबंधित ठेकेदार कंपनीकडून सात कोटी रुपये वसुल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीच्या खात्यातून ही रक्कम परस्पर वळती केली जाणार आहे.

`मटा`च्या वृत्तानंतर प्राधिकरणाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे कंपनीनेही झुकते घेतले असून आठ दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. मालेगाव जवळील चिखलओव्होळ आणि वाके या गावाजवळ डांबरचा प्लॅन्ट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत रस्त्यावर लेअर टाकण्याच्या कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे जूनपासून या रस्त्याच्या लेअर टाकण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामे मेरीच्या रडारवर

0
0



विनोद पाटील, नाशिक

निकृष्ट कामांच्या गुणवत्तेमुळे वादग्रस्त ठरलेली सिंहस्थ कुंभमेळ्याची महापालिकेच्या अधिकार क्षेत्रातील १११९ कोटीच्या कामांची गुणवत्ता आणि दर्जा आता मेरी तपासणार आहे. कामांच्या तपासणीबाबत जलसंपदा विभागाच्या सचिवांनी महापालिकेच्या आयुक्तांना होकार कळविला असून, तपासणीची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही यासंदर्भातले पत्र महापालिकेला दिले आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वीच सिंहस्थ कामांच्या चौकशांचा सिलसिला सुरू होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्यसरकारने २३७८ कोटीचा सिंहस्थ आराखडा मंजूर केला आहे. त्यात महापालिकेचा वाटा १११९ कोटींचा असून, या कामांच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत लोकप्रतिनिधींसह शिखर समितीनेही आक्षेप घेतला आहे. साधूग्रामसह सिंहस्थातील रस्त्यांच्या कामांबाबत ओरड होत असल्याने महापालिका आयुक्तांनी या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासणीचा निर्णय घेतला होता. मार्च महिन्यात संदर्भात आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मेरीसह आयआयटी पवई, के. के. वाघ इंजिनिअरिंग संस्था, मुंबई तंत्रनिकेतन, व्हीएनआयटी नागपूर, शासकीय तंत्रनिकेतन पुणे, शासकीय तंत्रनिकेशन नाशिक यासह सात संस्थाना पत्र पाठवून विचारणा केली होती. मात्र यातील एकाही संस्थेनकडून महापालिकेला प्रतिसाद मिळाला नाही. ठेकेदारांचे राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधामुळे खाजगी संस्थानी या तपासणीकडे पाठ फिरवली होती.

सातही संस्थानी पाठ फिरवल्याने जिल्हाधिकारी डॉ. दीपेन्द्रसिंह कुशवाह आणि आयुक्त डॉ. गेडाम यांनी अखेर मेरीला गळ घातली. जलसंपदाच्या सचिवांसह मंत्र्यांनाही विनंती केल्यानंतर आता, मेरीने या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासून देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भातील होकार मेरीनेही जिल्हाधिकाऱ्यांना कळविला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला यासंदर्भातील पत्र पाठविले आहे. तर जलसंपदा सचिवांनीही आयुक्तांना यासंदर्भातील होकार दर्शवला आहे. मेरीतर्फे एक महिन्याच्या आता तपासणीचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारामार्फत करण्यात आलेली सर्व कामे आता तपासणीच्या रडारखाली आली आहे. आयुक्तांनी यांसदर्भातील सर्व कामांची बिले स्थगीत केली आहेत. जोपर्यंत तपासणी होत नाही, तोपर्यंत बिले अदा केली जाणार नाहीत. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह त्यात सामिल असलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सिंहस्थापूर्वीच चौकशीचा सिलसिला

सिंहस्थाची सर्व कामे घाईत करण्यात आली असून, अनेक कामांची गुणवत्ता ही निकृष्ट दर्जाची आहेत, तर अनेक कामांची ब‌िले ही अव्वाच्या सव्वा लावण्यात आली आहेत. यात काही कामे तर, महापालिकेतील लोकप्रतिनिधींनीच दुसऱ्यांच्या नावावर घेतले आहेत. काही अधिकाऱ्यांनीही ठेक्यांमध्ये आपले हात ओले करून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे तपासणीत हे ठेकेदारांसह अधिकारीही अडकणार असल्याने मेरीच्या तपासणी अहवाल काय सांगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कामांची होणार चौकशी

रस्ते - ४६२ कोटी

पाणीपुरवठा - १३९ कोटी

साधुग्राम - ८२.७ कोटी

पूल - २४ कोटी

टॉयलेट आणि पार्किंग- ५५ कोटी

मलनिस्सारण केंद्र - ३४.४६ कोटी

वैद्यकीय सुविधा - ३१.५८ कोटी

आरोग्य आणि स्वच्छता - २० कोटी

इलेक्ट्र‌िसिटी - २७.३५ कोटी

रेल्वे बफर झोन - १.५८ कोटी

अग्निशमन - २४ कोटी

दिशादर्शक फलक - १५ कोटी

भूसंपादन - २०० कोटी

एकूण - १११९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवर सिंहस्थ पेजेसचा `मेळा`

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याकडे शहरवासियांबरोबरच जगभरातील भाविक, संशोधक, पर्यटकांचे लक्ष लागले आहे. धार्मिक व आध्यात्मिक किनार असलेल्या या सोहळ्याला सोशल मीडियाचीही प्रशस्त किनार लाभल्याचे दिसत आहे. सोशल मीडियातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या फेसबुकवर तर कुंभमेळ्याची असंख्य पेजेस असल्याचे दिसून येत आहे.

काळाशी सुसंगत रहावे, यासाठी अबालवृद्धांपर्यंत सर्वचजण सोशल मीडियाचा वापर करतात. केवळ छंद किंवा आवड म्हणून नव्हे तर माहितीचे साधन म्हणून याकडे बघितले जात आहे. हीच बाब कुंभमेळ्याविषयी माहिती मिळविण्यासाठीही दिसून येत आहे. 'कुंभमेळा २०१५ नाशिक', 'सिंहस्थ कुंभमेळा २०१५', 'कुंभमेळा महापर्व', 'कुंभकॅम्प इंडिया', कुंभमेळा २०१५ (नाशिक त्र्यंबकेश्वर) याचबरोबर 'कुंभमेळा' या एकाच नावाचे शेकडो पेजेस फेसबुकवर दिसून येतात. याच नावाचे ग्रुप, कम्युनिटीही तयार केल्याचेही फेसबुकवर आढळून येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी वेगळी काही माहिती मिळेल, यासाठी नेटीझन्सही धडाधड लाईक करुन या पेजेसशी कनेक्ट होत आहेत. कुंभमेळ्याचा केंद्रबिंदू असलेले साधू-महंत, कमंडलू, तुळशीच्या-रुद्राक्षाच्या माळा, वाढलेल्या जटा असेच चित्र फेसबुक पेजचे कव्हर बनले आहेत.

या पेजेसमधील महत्त्वाची बाब म्हणजे अनेक पेजेस आपोआप तयार झाले आहेत. फेसबुकवर असलेल्या प्रोफाईलमध्ये लाईक्स या ऑप्शनवर आपण कुंभमेळा असे टाकले की हे पेजेस तयार होतात. त्यामुळे या पेजेसची संख्या सातत्याने वाढते आहे. मात्र या आपोआप तयार झालेल्या पानांवर कसलीही वेगळी माहिती दिसून येत नाही. जे पेजेस तयार केली गेली आहेत, त्यावर मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याबरोबरच शहराची विस्तृत माहिती दिली आहे. शहराचा इतिहास, कुंभमेळ्याचा इतिहास, फोटो, देवस्थानांची माहिती, मागील कुंभमेळ्याच्या आठवणी, गोदावरी नदीचे माहात्म्य, उगम अशी महत्त्वपूर्ण माहिती या पेजेसमार्फत मिळते आहे. याबरोबरच प्रशासनाकडून कुंभमेळ्यासाठी कोणती महत्त्वाची कामगिरी बजावली जात आहे, त्यात सामाजिक संस्थांची भूमिका, त्यांचा सहभाग याबाबतही वेळोवेळी माहिती दिली जात आहे.

प्रशासनही झाले गतिमान

प्रशासनासाठीही कुंभमेळ्यात देशातील नागरिकांचा प्रतिसाद, पर्यटकांची अंदाजे संख्या याचा अभ्यास या पेजेसवरील प्रतिसादावरुनही करणे सोपे जात आहे. सामाजिक बांधिलकीच्या हेतूने अॅम्बुलन्स, अग्निशामक दल, वाहतूक, कार्यक्रम, हॉटेल्स, इमर्जन्सी आदींविषयी माहिती या पेजेसवर दिली जात आहे. प्रशासनामार्फत घेतले जाणारे निर्णयही या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले जात आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचा जोरदार इफेक्ट सोशल मीडियावरही झालेला होऊन त्याचे प्रतिबिंब या सोहळ्यावर उमटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गाण्यामधून आभार वेगळी संकल्पना’

0
0



नाशिक टाइम्स टीम

'कृतज्ञता या विषयावर लिखाण करणं तसं अवघड आहे. सहसा या विषयाला हात घातला नाही. मात्र गाण्यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यासाठी गीत आणि संगीताचा वापर हा वेगळा विचार आहे', असे मत क्रीडा मानसतज्ज्ञ डॉ. भीष्मराज बाम 'मी आभारी आहे' या अल्बमच्या प्रकाशनावेळी व्यक्त केले.

गायक आणि संगीत समुपदेशक संजय गीते यांनी या अल्बमधील गाणी लिहिली आहेत. बुधवारी डॉ. भीष्मराज बाम यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. आज समाजात वाढत असलेली असुरक्षितता, उणेपणाची भावना यामुळे नैराश्य वाढत चालले आहे. कृतज्ञता हा भाव व्यक्तीला प्रेम, विश्वास याकडे घेऊन जातो. यासाठी संगीतच्या माध्यमातून साध्या सोप्या गाण्यांमधून हा भाव आपल्या अंतर्मनात रुजवता यावा यासाठी ही गाणी लिहिण्यात आली आहेत. मनातील विचारांच्या परिवर्तनासाठी मार्गदर्शन, व्याख्यान, प्रबोधन होत असते. मात्र संगीताचा मनावर प्रभाव जास्त असतो. यासाठीच ही संकल्पना वापरली गेली आहे.

संजय गीते यांनी ही गाणी लिहिली असून संगीत आणि गायनही त्यांचेच आहे. चार गाण्यांचा यामध्ये समावेश आहे. अनुराधा मटकरी यांनी यामध्ये निवेदन केले आहे. सोनू समीर यांनी संगीत संयोजन केले आहे. आज्ञा तुपलोंढे यांनी सहगायन केले आहे.या अल्बम प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, अविनाश सरोदे, मानसतज्ज्ञ डॉ. जयंत ढाके आणि लेखक विजय निपाणीकर हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्याचेही अॅप

0
0



एमटीडीसी गुंतविले ५ लाख रुपये

नाशिक टाइम्स टीम

नाशिकची महत्त्वाची ओळख असलेल्या कुंभमेळ्याला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) एक एक्सक्लुझिव्ह मोबाइल अॅप्लिकेशन तयार करत आहे. जून महिन्यात हे अॅप लाँच केले जाणार असून हे डेव्हलप करण्यासाठी 'एमटीडीसी'मार्फत ५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यादरम्यान नाशिकला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना तसेच पर्यटकांना या कुंभमेळ्याची सर्व माहिती देण्याचा या अॅपचा मुख्य उद्देश असल्याचे 'एमटीडीसी'मार्फत सांगितले जात आहे. याचबरोबर या अॅपमध्ये ऑफलाईन मॅपची सुविधाही पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यामुळे इंटरनेट व्यतिरीक्तही मॅप पाहणे शक्य होणार आहे. तसेच कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या पर्यटकांसाठी १५ जूनपर्यंत गंगापूर डॅमवर बोट क्लब कार्यान्वित केला जाणार आहे. बोटिंग, सायकलिंग, ट्रेकिंग यासारख्या संधी देणारा हा बोट क्लब कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे 'एमटीडीसी'चे मत आहे.

नाशिकसोबतच आसपासच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी 'एमटीडीसी'मार्फत शहरातील काही लोकल टूर ऑपरेटर असोसिएशन्सशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. तसेच नाशिकपासून ३ ते ४ तासांच्या अंतरावर असलेल्या स्थळांबाबतचे माहितीपुस्तकही लाँच करण्यात आले आहे. 'एमटीडीसी'मार्फत नाशिकच्या जवळपासचे शंभरपेक्षाही जास्त ट्रेकिंग रुट्स शोधून काढण्यात आले आहे. या ट्रेकिंग रुट्सवर गाईड करण्यासाठी शहरातील काही ट्रेकिंग असोसिएशन्सशी टाय अप केला जाणार असल्याची माहितीही 'एमटीडीसी'मार्फत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवर सफर नाशिकची

0
0



सौरव बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

फेसबुकवर मस्ती, धमाल, इमोशनल सर्वच प्रकारच्या पोस्ट अपलोड करुन त्याला लाइक मिळवण्याचा फंडा आता जुना होऊ लागलाय. आता नवखा प्रकार असा की, नाशिकच्या सान्निध्यात असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन फोटोग्राफी किंवा पोर्टफोलिओ तयार करायचा आणि तो फेसबुकवर अपलोड करायचा. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून सध्या नाशिकची आणि नाशिककरांच्या कलात्मकतेची सफर घडतेय.

नाशिकशी संबंधित विविध विषयांची पेजेस तुम्हाला सध्या फेसबुकवर पाहायला मिळतील. नाशिकच्या कॉलेजियन्सचा रिव्हरसाईड कट्टा असण्याऱ्या बापू ब्रिजची अनेक पेजेस यामध्ये आहेत. काही पेजेस ही केवळ फोटोंसाठी आहेत. नाशिकच्या मुलांचे आणि मुलींचे खास पोजमधली फोटोही या पेजेसवर अपलोड केले जातात. यामध्ये ज्या फोटोला सर्वाधिक लाइक मिळतील तो फोटो त्या पेजचा डीपी ठेवला जाण्याचा प्रकार सध्या फेसबुकवर पाहायला मिळतोय. अनेकांनी आपल्या परिसराच्या किंवा कॉलेजच्या नावाने पेजेस तयार करुन त्यात कॉलेज तसेच कॅम्पसमधील फोटो शूट अपलोड केले आहे. विशेष म्हणजे सेल्फीसाठीही एक विशेष पेज यामध्ये आहे.

नाशिक सेल्फी

आपण काढलेला छानसा सेल्फी या पेजच्या मेसेज विंडोमध्ये सेंड करायचा असतो. चांगले सेल्फीज या पेजवर अपलोड केले जातात. मुलामुलींचे म्हणजेच दोघांचेही अनेक सेल्फी तुम्हाला या पेजवर पाहायला मिळतील. ग्रुप तसेच सोलो सेल्फीज इथे आहेत. ही पेजेस फक्त नशिकच्या सेल्फीसाठी आहेत. नाशिक सेल्फी नावाने दोन ते तीन पेजेस आहेत.

बापू पूल

बापू पूल या विषयावर बापू पूल, बापू पूल कन्फेशन, आसाराम बापू ब्रिज अशी तीन पेजेस फेसबुकवर आहेत. या सर्व पेजेसवर नाशिकच्या बापू ब्रिज परिसरातील फोटोशूट अपलोड केले जाते. बापू पुलावर होणाऱ्या स्टंट्सचे फोटो आणि व्हिडीओज इथे अपलोड केले जातात. बापू ब्रिजवर शनिवार आणि रविवारी होणाऱ्या गर्दीचे फोटोही इथे असतात. नाशकातील अनेक जुन्या किंवा महागड्या गाड्यांची चक्कर बापू ब्रिजवर होत असते. त्याचेही फोटो आणि व्हिडीओ या पेजवर असतात.

एम.एच.१५ नाशिकची कहर करणारी मुले आणि मुली

एम. एच. १५ या पेजवर नाशिकच्या मुलांच्या फोटोग्राफीला टक्कर देत मुलींनीही आपले विविध पोजमधील फोटो अपलोड केले आहेत. या पेजचीही भरपूर क्रेझ नाशिकच्या तरुणाईमध्ये दिसून येते. ग्रुपसोबतचे आणि कॉलेजमधले धमाल करतानाचे फोटो इथे अधिक प्रमाणात आहेत.

बॉईज ऑफ नाशिक

या पेजवर फक्त नशिकच्या मुलांचे फोटो अपलोड केले जातात. या पेजवर अपलोड केलेल्या फोटोंमध्ये नवनवीन पोज आणि शहरातील विविध ठिकाणे दिसून येत आहेत. केवळ मुलांसाठी असलेल्या या पेजवर फोटो अपलोड करण्यात जणू एक स्पर्धाच असल्याचे दिसून येते.

नाशिकची फाडू पोरं आणि झक्कास पोरी

नाशिकच्या मुलांसाठी आणी मुलींसाठी आपले खास फोटो अपलोड करण्याचे एक चांगले पेज असे या पेजच्या माहितीमध्ये लिहिले आहे. किलर आणि चांगली पोज असलेले फोटो या पेजच्या मेसेज विंडोमध्ये सेंड केल्यावर त्यातील काही सिलेक्टेड फोटो पेजवर अपलोड केले जातात. इथे तुम्हाला फोटोसोबतच फोटोसाठीचे एक चांगले कॅप्शनदेखील पाठवायचे असते. त्या कॅप्शनसोबत तुमचा फोटो या पेजवर अपलोड केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थाच्या रम्य आठवणी

0
0



रमेश पडवळ, नाशिक

प्राचीन काळापासून चालत आलेली एक अनोखी परंपरा म्हणजे सिंहस्थ. न कोणती निमंत्रणपत्रिका असते ना कोणता पाहुणचार. येणारा प्रत्येक जण फक्त या प्रवाहात स्वत:ला झोकून देतो अन् श्रद्धा आणि समाधानासाठी सुरू असलेली ही वारी वर्षभरात पूर्ण होते. गेल्या असंख्य सिंहस्थात असेच सुरू आहे. पण कालांतराने अनेक गोष्टी बदलल्या त्या पैलूंवर आठवणींतून एक नजर...

प्राचीन काळापासून सिंहस्थ कसा साजरा होत असेल याबाबत फार पुरावे मिळत नाहीत. जे मिळतात ते पोथ्या, पुराणांमध्ये मिळतात. पण ते समाजजीवन दाखवायला कमी पडतात. त्यात धर्मशास्त्र व सिंहस्थासंदर्भातील विधींची माहिती अधिक आहे. पेशवाईपूर्वी सिंहस्थ कसा होता याचेही काहीच पुरावे उपलब्ध नाहीत. पेशवाई आल्यावर मात्र सिंहस्थाच्या नोंदी आवर्जून केलेल्या दिसतात. पुण्यातील पेशवाई दप्तरात सिंहस्थाबद्दल असंख्य रूमाल (कागदपत्रांचे गठ्ठे) आहेत. हे गठ्ठे आता मोकळे करून त्यातील इतिहास पुस्तकांतून नोंदविला गेला पाहिजे. याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. नाशिकच्या मेनरोडवरील गायधनी वाड्यात जयंत गायधनींकडील काही कागदपत्रांवरून नाशिकचा सिंहस्थ पूर्वी कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. पेशवाईत प्रथमच नाशिकमध्ये वाडेसंस्कृतीचा उदय झाला. १७०० ते १८१८ पर्यंत नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात असंख्य वाडे बांधले गेले. याकाळात देशभरातून येणारे भाविक सिंहस्थासाठी नाशिकमध्ये येऊ लागले. तेव्हा ते विधींसाठी पुरोहितांच्या घरी थांबत. पूर्वी म्हणजे पेशवाईत धर्मशाळाजवळपास नव्हत्याच. ज्या काही होत्या त्या पेशव्यांनी भाविकांच्या सोयीसाठी सुरू केल्या होत्या. त्यानंतर शहरात शंभरहून अधिक धर्मशाळा उभ्या राहिल्या. मात्र भाविकांचे पुरोहितांच्या घरी थांबण्याची पद्धत सुरूच होती. गायधनींकडे मिळालेल्या एका कागदावरून गायधनीवाड्यात १९०९ च्या सुमारास झालेल्या सिंहस्थ विधीत नाशिकमधील ४५० ब्राह्मणांनी हजेरी लावली होती, असा उल्लेख सापडतो. तर १८२० च्या सुमारास गोपाळभट गायधनी यांनी सिंहस्थ पद्धती ही संस्कृतमधील धर्मशास्त्रावरील पोथी लिहिल्याच्या नोंदी येथे मिळतात. ही पोथी आजही गायधनींकडे उपलब्ध आहे. १९१४ मध्ये तिवंध्यातील ज्योतिषाचार्य पुरूषोत्तम गणेश गायधनींकडे साईबाबा तीन दिवस रा‌हिल्याचा उल्लेखही सापडतो. त्यानंतर नाशिकमध्ये धर्मशाळा ही परंपरा वेगाने वाढली, पण गेल्या काही वर्षांत धर्मशाळांची संख्या कमी झाली आहे. आता अगदी बोटावर मोजण्याइतक्यात धर्मशाळा शहरात आहेत.

१८९६-९७ च्या सिंहस्थामध्ये एक लाख यात्रेकरू सिंहस्थासाठी आल्याचा उल्लेख पेशव्यांच्या दप्तरी आढळतो. पूर्वी कुंभपर्वानिमित्त साधुमहंतांचे डेरे नाशिकजवळील कश्यपी संगमावर व सध्या गंगापूर धरण असलेल्या परिसरात लागत. १९५६ पासून सिंहस्थाचे डेरे तपोवनात भरू लागले. १९४४ चा सिंहस्थ हा ४२ च्या क्रांती युगातला म्हटला जातो. १९५६ चा सिंहस्थ हा स्वतंत्र भारतातील पहिला सिंहस्थ होता. १९५० साली नाशिकला काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्यावेळेस नाशिकरोडला पूल नव्हता. फाटक होते. ती अडचण लक्षात घेऊन या सिंहस्थात रेल्वेवर व नाशिक शहरात रामसेतू व गाडगे महाराज पूल बांधले गेले. पूर्वी देवीचा सांडवा व नारोशंकराचा सांडवा असे म्हणत. त्यावेळचा सिंहस्थ किरकोळ सुधारणासह चांगल्यारीतीने झाल्याचे म्हटले जाते. असा उल्लेख कृष्णराव प्र. वाईकर यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यावर लिहिलेल्या स्मरणिकेत केला आहे. १९७९ चा सिंहस्थ स्वामीनारायणनगर येथील पडीक जागेवर पार पडला. त्यावेळी नाशिक महापालिकेने तेथे दिवाबत्ती व पाण्याची सोय केल्याने तेव्हापासून कागदोपत्री साधुग्राम असे नाव पडले.

१९९०-९१ च्या सिंहस्थात रामकुंडाशेजारी मोठी इमारत बांधण्यात आली. तसेच गाडगे महाराज पुलास पंचवटीच्या बाजूने उतरण्याकरिता जिना केला व तपोवनात तात्पुरत्या सुधारणा करून तेथे साधूंची सोय केली. पण याकाळात वाहतूक व आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. २००३ चा सिंहस्थ महापालिका लोकनियुक्त प्रतिनिधींचा पहिला सिंहस्थ म्हणता येईल. या सिंहस्थात शहराचा व तपोवनाचा चेहरामोहरा बदलला. पण २००३-०४ च्या सिंहस्थात सरदार चौकात शाही मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३३ भाविकांचा बळी गेला. २०१५-१६ च्या सिंहस्थात अशी चेंगराचेंगरी होऊ नये या उद्देशाने शाही मार्ग बदलण्यात आला आहे. हा बदल पेशवाईनंतर पहिल्यांदाच झाला आहे. अशा असंख्य आठवणी सिंहस्थाबरोबर आहेत. मात्र त्यांच्या नोंदी होणे गरजेचे आहे. (समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तात्पुरत्या निवारा शेडसवर भाविकांचा भार

0
0



नाशिकरोड विभागाची कुंभ तयारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे हायवेवरून येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनातर्फे दोन तात्पुरते निवारा शेडस उभे केले जाणार आहेत. नाशिकरोड भागात येणाऱ्या भाविकांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी कितपत जागा उपलब्ध होईल, याबाबत शंका असून प्रशासनाकडून उभारल्या जाणाऱ्या शेडसवर भाविकांचा भार पडणार आहे.

रामकुंडापासून किमान ८ किलोमीटर दूर असलेल्या नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर सिंहस्थासाठी ११ विशेष रेल्वे दाखल होणार आहेत. याशिवाय नियमीतपणे दिवसभरातील ५६ रेल्वेही सुरूच राहणार आहेत. रेल्वेने सुमारे ४ ते ५ लाख भाविक येऊ शकतात. याव्यतिरिक्त नाशिक-पुणे हायवेवरूनही मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता आहे. शाही मिरवणुकीपूर्वी रेल्वेने दाखल होणाऱ्या भाविकांनीच नाशिकरोड परिसर गर्दीने खच्चाखच भरेल. भाविकांना एक रात्र काढण्यासाठी जागा शोधताना धावपळ उडेल. या दृष्टिकोनातून प्रशासनाने शिंदे-पळसे जवळील बंगाली बाब दर्गाजवळ तसेच चेहडी जकात नाका येथे तात्पुरते शेड उभे करण्याच्या कामास सुरूवात केली आहे. या शेडसमध्ये किमान २० ते २५ हजार भाविकांना आसरा मिळेल. विशेष म्हणजे चिंचोली फाटा येथील बाह्य पार्किंगमधून सुटणाऱ्या एसटी बसेस तात्पुरत्या निवारा शेडसवरील भाविकांना घेऊन अंतर्गत बाह्य पार्किंगपर्यंत म्हणजे सिन्नर फाटा येथे पोहचेल. तेथून शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना दसक घाटावर सोडण्यात येईल. त्यानंतर भाविकांना हवे असल्यास ते रामकुंडावर स्नानासाठी पोहचू शकतील. अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणून नाशिकरोड सेक्टरकडे पाहिले जाते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नाशिकरोड परिसरातील कंट्रोल रूममधून सर्व परिस्थितीवर देखरेख ठेवली जाणार आहे.

नाशिकरोड कुंभमेळा नियोजन

> पार्किंग सुविधा > रस्त्याचा वापर करणारे भाविक - प​श्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेश > रेल्वे मार्गाचा वापर करणारे भाविक- उत्तर भारतातील भाविक

बाह्य पार्किंग- चिंचोली-मोहगाव

> पार्किंग क्षेत्र- ३० हेक्टर > बाह्य ते अंतर्गत पार्किंगपर्यंतचे अंतर- ११ किलोमीटर > अंतर्गत पार्किंगचे ठिकाण- सिन्नर फाटा, सामनगावरोड

भाविकांचे नियोजन

> अंतर्गत पार्किंगपासून घाटापर्यंतचे अंतर- ५.७६ किलोमीटर > घाटाचे ठिकाण- दसक घाट > परतीच्या प्रवासाचे अंतर- ५. ७६ > तात्पुरत्या निवारा शेडसची संख्या- दोन > तात्पुरत्या निवारा शेडसचा फायदा- सुमारे २५ हजार भाविकांना > निवारा शेडची जागा- बंगाली बाबा दर्गाजवळ तसेच चेहडी जकात नाका > सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी

नाशिकरोड सेक्टरसाठी सीसीटीव्ही कॅमेरे- ३२

> कॅमेऱ्यांचे प्रकार- पॅनो​रॅमीक, फिक्सड, पीटीझेड, एएनपीआर > लाऊडस्पीकरची संख्या-१७८ > पोलिस चौकींची संख्या-१५ > वॉच टॉवर- ३ > कंट्रोल रूम- नाशिकरोड परिसरातच > आपत्कालीन परिस्थितीतील घाटाचे ठिकाण- कन्नमवार घाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिऊताईचं घर पुठ्ठ्याचं....

0
0



म. टा. वृत्तसेवा, येवला

उन्हाळा म्हटलं की मनुष्यासह सर्वांसमोर संकट उभे राहते ते पाण्याचे. उन्हाच्या झळांनी जनजीवन चांगलंच विस्कळीत होतं. पशुपक्षी व प्राणीही त्याला अपवाद ठरत नाहीत. यंदाही उन्हाच्या तीव्र झळा सोसताना मनुष्याच्या नाकीनऊ आल्याचं दिसत आहे. अशातही चिऊताई अर्थातच चिमण्यांना उन्हाळ्यातही मोठा दिलासा मिळतोय तो येवला शहरातील एका छोटेखानी हॉटेलात... हो सध्याच्या उन्हाळ्यातच नव्हे तर गेली तब्बल १० वर्षे चिऊताईंना हा आसरा देण्याचं काम येवल्यातील एका हॉटेल मालकाकडून होतंय...

हॉटेलच्या शेडमध्ये ठिकठिकाणी चिमण्यांसाठी केलेले पुठ्ठ्यांचे घरटे... जागोजागी दाणापाण्याची केलेली खास सोय अन् कागदी खोक्यात गवताच्या काड्या जमा करीत अनेक चिऊताईंनी चिवचिव करणाऱ्या आपल्या चिमुकल्यांसह थाटलेले संसार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. येवला शहरात नाश्ता, चहा असा स्वतःच्या जागेत छोठेखानी हॉटेल व्यवसाय करणाऱ्या नागपुरे बंधुंनी हा वसा गेल्या दहा वर्षांपासून चालविला आहे. या हॉटेलमालक व त्यांच्या मुलांनी हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये चिमण्यांसाठी जागोजागी घरटे करतांनाच या चिमण्यांसाठी ठिकठिकाणी दाणापाण्याची आगळीवेगळी सोय निर्माण केलेली असून, सध्याच्या रणरणत्या भर उन्हाळ्यात चिऊताई व तिच्या पिल्लांना अगदी मोठा दिलासा मिळत आहे.

हॉटेलच्या पुढील भागातील पत्र्याच्या शेडमध्ये तसेच आतील व हॉटेलच्या मागील भागात तब्बल १८ ते १९ घरटी चिमण्यांसाठी मोठा आसरा ठरले आहेत. कागदी खोके, फोटो प्रिंटसाठी वापरले जाणारे रिकामे गोल बॉक्स आदीपासून केलेल्या या घरट्यांमध्ये चिमण्यांनी गवत आणून आपल्या पिल्लांसह संसार थाटला आहे. गेली अनेक वर्षे या हॉटेलमधील कागदी घरट्यात येणाऱ्या चिऊताई अंडी देत पिल्लांना जन्म देतात. अन् मग पिल्ले मोठी होत आकाशात भरारी घेत उडून जातात. ही घरटी, चिमण्या व त्यांचा चिवचिवाट याकडे सर्वांच्याच कायम नजरा वेधल्या जातात. नव्हे तर येथील चिमणी जग सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून चिमण्यांसाठी खास घरटी तयार करत चिऊताईंवर मुरलीधर नागपुरे यांची राजेंद्र व शेखर ही दोन्ही मुले जिवापाड परम करतांना दिसतात. मुरलीधर नागपुरे हे उतार वयात थकल्यामुळे राजेंद्र व शेखर हे व्यवसाय बघत आहेत. हॉटेलमधील झाडाच्या कुंड्यांच्या आल्हाददायक वातावरणात नागपुरे यांनी जागोजागी प्लास्टिकच्या अर्धगोलाकार पाईपमधे दाण्यासाठी सोय केली आहे. त्यात नागपुरे हे तांदुळ, पापडी, शेव, हॉटेलमधील वडे, भजी यांचा चुरा टाकत असतात.

पूर्वी हॉटेलचे शटर लावता उघडतांना अथवा आतील साफसफाई करताना शटरमधील घरटे खाली पडतांना चिमण्यांनी घातलेली अंडी फुटत असत. ही बाब लक्षात आल्यावर आम्ही हॉटेलमधे जागोजागी कागदी खोक्यापासून घरटी बनवली. बरोबरच त्यांच्या दाणापाण्याची सोयही केली आहे. चिऊताईंचा दिवसभराचा चिवचिवाट आम्हाला काम करताना प्रोत्साहित करत असतो. - मुरलीधर नागपुरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी प्रवाशांना लुटले

0
0



मनमाड : मनमाड- शिर्डी म्हैसूर एक्सप्रेसमध्ये आरक्षित डब्यातील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून तब्बल ४ लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटून नेले. चितळी-पुणतांबादरम्यान ही घटना घडली असून, श्रीरामपूर रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल करून हा गुन्हा शून्य क्रमांकाने मनमाड लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. मनमाड रेल्वे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या जबरी चोरीच्या गुन्ह्यात तीन पुरुषांसह एका महिलेचा समावेश असून, या चोरीचा तपास करणे हे मोठे आव्हान आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता लुटीची घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणे, गोदावरी स्वच्छता मोहीम!

0
0



त्र्यंबकेश्वरला गोदावरी आहेच कुठे?; आज राबविणार विशेष अभियान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हरितकुंभ अंतर्गत प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी स्वच्छता मोहीम आयोजित केली असली तरी प्रत्यक्षात त्र्यंबकला गोदावरी कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनानेच विकासकामांच्या नावाखाली गोदावरीला काँक्रीटमध्ये बंदिस्त केले आहे तर त्र्यंबकला गोदावरी लुप्त झाल्याचा भाकडकथा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे त्र्यंबकला गोदा स्वच्छता होणार कशी, याबाबत उत्सुकता आहे.

त्र्यंबकेश्वर येथे येत्या गुरूवारी (२८ मे) गोदावरी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, त्र्यंबकेश्वर नगरपालिका आणि विविध स्वयंसेवी तसेच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम होणार आहे. मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी साधू-महंत, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस अधीक्षक संजय मोहिते आदी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी स्वचछता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि जुन्या बस स्टँडजवळ २८ मे रोजी सकाळी ७ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र, ही मोहिम खरोखरच यशस्वी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेल्या गोदावरीची त्र्यंबक शहरात अत्यंत दयनीय अवस्था आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. २००३, १९९१ आणि त्यापूर्वीच्या सिंहस्थासाठी त्र्यंबकेश्वरला लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. यंदाच्या सिंहस्थातही किमान ५०० कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत. म्हणजेच, आजवर कोट्यवधी रुपये खर्चून याठिकाणी केवळ काँक्रिटचाच वरवंटा फिरविण्यात आल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले असले तरी त्याचा विशेष फायदा होत असल्याचे कुठेही दिसून येत नाही. परिणामी, लाखोंचा निधी काँक्रिटमध्येच ओतण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

गोदावरी नदी लुप्त झाल्याचा कांगावा त्र्यंबक नगरीत केला जात असतानाच प्रत्यक्षात गोदावरीच्या पात्रावर सरसकटपणे काँक्रिटीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. निलगंगा आणि गोदावरी यांच्या संगमापासून पुढे मंदिराच्या बाजूने जाणारी गोदावरी ही नालाच आहे. केवळ त्यावर काँक्रिटचे आवरण असल्याने तिचे हे रुप लक्षात येत नाही. याच काँक्रिटीकरणावर आता चक्क बाजार भरत आहे. काही भागात तर याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. म्हणजेच, ज्या नदीच्या दर्शनासाठी आणि पावनस्थळी भाविक, पर्यटक येतात. त्याच नदीला बंदीस्त करुन नदीचे गोडवे गाणारी विविध पुस्तके, गाण्याच्या सीडी आणि इतर वस्तू सर्रास विक्री केल्या जात आहेत. नील पर्वतावर उगम पावणारी निलगंगा ही नदी त्र्यंबक शहरात येवून गोदावरीला मिळते. शहरात ज्याठिकाणी ती प्रवेश करते त्या तेली गल्लीच्या प्रारंभीच या नदीचा गळा घोटण्यात आला आहे. नदीपण जावून तिला गटारीचे स्वरुप आले असून ठिकठिकाणी सांडपाणी त्यात मिसळत आहे.

सिंहस्थ निधीतून या नदीच्या पात्रावर स्लॅब टाकण्यात आला तो थेट तिच्या संगमापर्यंत. त्यामुळेच या दरम्यान सिमेंटचा स्लॅब आणि त्यावर होणारी वाहतूक हेच निदर्शनास येते. ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावलेली नदी लुप्त होऊन थेट कुशावर्तात प्रकट होत असल्याची अख्यायिका सांगितली जाते. अशा परिस्थितीत प्रशासनाने गोदावरी स्वच्छतेचे आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images