Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाणी सोडून प्रदूषण हटवणार!

0
0

गोदा प्रदूषणावर प्रशासनाचा अजब दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न थेट हायकोर्टात गेला असला आणि सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला असताना प्रशासनाने प्रदूषणाचा हा प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याचा पर्याय शोधला आहे. शाहीस्नानावेळी गंगापूर धरणातून ५०० क्युसेस पाणी गोदावरीत सोडून गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचा ध्यास जिल्हा प्रशासनाने बोलून दाखविला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या अजब युक्तीला राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही होकार दर्शवला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नद‌ीतील प्रदूषण कमी होण्याची शक्यता मावळली आहे. प्रशासनाने सर्व उपाययोजनांना बगल देत हात वर केले असून, पर्वणी अगोदर धरणातील पाणी सोडून प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्याचा 'डाव' प्रशासनाने आखला आहे. प्रशासनाच्या या कचखाऊ भूमिकेमुळे नदी प्रदुषणाचा प्रश्न कुंभमेळ्यातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोदावरी नदीपात्रात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले असून, पाण्यातील बायो-केमिकल ऑक्सिजन डिमांडचे (बीओडी) प्रमाण ३० पेक्षा अधिक आहे. नदीपात्रातील पाण्यात बीओडीचे प्रमाण ५ ते ७ इतके असणे आवश्यक आहे. यापेक्षा बीओडीचे प्रमाण जास्त असल्याने प्रदूषण पातळी धोकादायक आहे. यापार्श्वभूमीवर गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाच्या सदस्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून, प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने वेळोवळी फक्त प्रतिज्ञापत्रे सादर झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी ही बाब जाहीर कबूल केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एका महिन्यात गोदावरी स्वच्छ करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. प्रशासन आणि मंत्री दावे-प्रतिदावे करीत असताना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांच्यासमोरच विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी गोदावरीतील प्रदूषण कायम राहणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत पाणी सोडून प्रदूषण हटविणार असल्याची कल्पना मांडली व क्षत्रीय यांनीही त्याला होकार दर्शवला. वेगात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील केरकचरा अस्वच्छता कमी होईल. तसेच पुढील दोन दिवस पाणी सोडण्याचे काम सुरू राहिले, असेही त्यांनी सांगितले. गोदा प्रदूषण कमी करणे आणि भाविकांच्या स्नानासाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्ष‌ित करण्यात आला आहे.

याकडे दुर्लक्षच

- गंगापूर गावाजवळील रखडलेले सिव्हेज ट्रिटमेंट प्लांटचे काम

- दसक तसेच आगारटाकळी येथील संथगतीने सुरू असलेले एसटीपीचे काम

- औद्योग‌िक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया

- छोट्या नाल्यांमधील प्रदुषीत पाण्याचे प्रमाण

- नैसर्गिक जलस्त्रोत बंद झाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्तेची संधी सेवा सुधारणांसाठी

0
0

>> अरुण कुकडे

ग्रामीण भागांत आजतरी सहकारी बँकाच अर्थवाहिन्यांचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. त्यामुळे राजकारणात पुढे पाऊल ठेवण्यात, टाकण्यात व प्रसंगी कुरघोडी करण्यासाठी या बँका हातात व हाताशी असल्या की सत्तास्पर्धेचे व स्वार्थाचे राजकारण बऱ्यापैकी करता येते.

नुकत्याच जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका पार पडल्या. काही सन्माननीय अपवाद वगळता साऱ्या सहकारी नेत्यांनी आपापले सत्तागड शाबूत राखले आहेत. त्यांचे अभिनंदन. पण हे करतांना यापुढे, सुधारणा व व्यवस्थित कारभार केला जाईल अशी मतदारांची, शेतकऱ्यांची व ग्रामीण जनतेची अपेक्षा आहे, हे लक्षात घेतले व ठेवले जायला पाहिजे.

सध्या तीन जिल्हा बँका आर्थिक अडचणीत आहेत. पाच बँकांचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे. पंधरा-सो‍ळा जिल्हा बँका त्रासात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या बँकींग सेवा पुरवण्याची क्षमता बोटावर मोजता येईल एवढ्याच जिल्हा बँकांमध्ये आहे. पण तरीही सत्तेसाठी काही जिल्ह्यात निवडणुका ईर्षेने व अटीतटीने लढल्या गेल्या. याचे कारण ग्रामीण भागांत आजतरी याच बँका अर्थवाहिन्यांचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. त्यामुळे राजकारणात पुढे पाऊल ठेवण्यात, टाकण्यात व प्रसंगी कुरघोडी करण्यासाठी या बँका हातात व हाताशी असल्या की सत्तास्पर्धेचे व स्वार्थाचे राजकारण बऱ्यापैकी करता येते.

या बँका शेतकऱ्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व टिकवून आहेत. राष्ट्रीयकृत बँकांनी भले कृषीक्षेत्राला त्यांच्या एकूण कर्जापैकी १८ ते १९ टक्के कर्जे दिली असतील व त्यांनी अपेक्षित १६ टक्के मर्यादा लक्ष्य साधले असेल व खाजगी बँकाही कृषी क्षेत्राला वित्तसहाय्य देण्याचे म्हणत असतील, तरी कृषी कर्ज व्यवहारांचा भार खऱ्या अर्थाने, मुख्यत्वे जिल्हा सहकारी बँकांनीच उचलला व पेलला आहे. यामुळे आगामी काही वर्षे तरी कृषीक्षेत्र शेतीपूरक व्यवसाय व ग्रामीण कारागीर यांना व्यवस्थित वेळेवर व पुरेसा कर्जपुरवठा करण्यासाठी जिल्हा बँकांचेच काम सुधारले व वाढले पाहिजे. या ठिकाणी हेही नमूद करणे ठीक होईल की, जिल्हा सहकारी बँका या त्यांचे नेते, आधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत ग्रामीण जीवनात चांगल्यापैकी जोडले गेले आहेत. तरी, या बँकांची कर्ज वितरण व्यवस्था (क्रेडीट डिलिव्हरी सिस्टीम ) ही बरीचशी पूर्वापार चाललेल्या पद्धतीनुसार राहिली आहे. का‍ळानुसार थोडेफार बदल, सुधारणा झाल्या आहेत, पण त्या पुरेशा नाहीत. ही कर्जवितरण व्यवस्था त्रिस्तरीय (थ्री-टायर) आहे. राज्य सहकारी बँकेकडून जिल्हा सहाकरी बँक व जिल्हा सहकारी बँकेकडून प्रायमरी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व या सोसायटीकडून शेतकऱ्यांना कर्ज दिली जातात. मर्यादित प्रत्येक टप्प्यावर संबंधीत संस्था बँक व संस्थेच्या सेवेपोटी काही रक्कम वाढवतात, पर्यायाने खर्च वाढत जातात. शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने कृषीकर्ज मिळते हे बरोबर असले तरी किमान तरी खर्च होतात व वाढतात. मध्यस्थ तज्ज्ञ असले तरी त्यांची हाताळणी, मंजुरी वाढते. यामध्ये वेळही जातो. हा अपव्यय कमी करण्याचा विचार केला पाहिजे.

दुसरा एक प्रकार म्हणजे मंजूर रकमेतून केली जाणारी शेअर कपात. संस्थेचे भांडवल वाढावे व ते ही सभासदांच्या पैशातून. हे तत्त्व व उद्देश पूर्वी चांगले होते पण सर्रास सर्वकाळ ते लागू करणे,चालू ठेवणे योग्य म्हणता येत नाही. काही वेळा तर ठेव घेतली जाते, ती तरी घेऊ नये. यामुळे कर्ज कमी पडते हे एक व व्याज पूर्ण रकमेवर भरावे लागते हे दुसरे. अजून एक पद्धत म्हणजे नवेजुने करून घेणे, व्याज भरून घेणे व त्यासाठी मुद्दल व व्याज जमा करणे (रिसीव्हड) व कर्ज वितरित करणे (पेड). यात कर्ज वाढले,वाढविले तर कर्जदारांत वाढलेली रक्कम, उणे व्याज व शेअर्सची रक्कम उणे करून मिळते. यात कर्जदाराला पैसे उणे करूण भरण्यासाठी भुर्दंड पडतो. त्याऐवजी एकतर कर्ज एकदम शक्य नसेल तर सवलत द्यावी किंवा कारणांचा विचर करुन, मुदत कर्जात रुपांतरित करावे. हे नुतनीकरण कर्जदार थकबाकीत जाऊ नये व एनपीए होऊन अनुदान बंद होऊ नये यासाठी केले जाते. पण यापेक्षा आहे ते मान्य करत सवलत देणे उचित होइल. कर्जदार, सोसायटी थकबाकीत जाऊ नये, एनपीए होऊ नये यासाठी आधीच नीट देखभाल आणि तरीही हाताबाहेरील आपत्तीने थकबाकी झाली, एनपीए झाले तर सवलतीने सांभाळून घ्यावे.

मुख्य म्हणजे जिल्हा बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचे पूर्ण कवच संरक्षण द्यावे. सरकार करील तेव्हा करील, बँकांनी प्रिमिअम जास्त लागला तरी, नैसर्गिक आपत्तीसह जोखिमेसाठी विम्याचे संरक्षण कवच व्यवस्थित पुरवावे. कर्ज द्यायचे तर सर्वसाधारण उत्पन्नाची, व त्या उत्पादनाला भावहमी व त्यातून उत्पन्न हमी व कमतरता झाली तर पुरेशी विम्याच्या रकमेची हमी दिली तर शेतकरी व बँका यांचे बरेच प्रश्न मार्गी लागतील.

पीक कर्ज मध्यम मुदत व दीर्घ मुदत अशी कर्ज दिली जातात.पण अवर्षण, दुष्काळ, अवकाळी गारपीट यांच्या फेऱ्यामुळे परतफेडीची क्षमता निघून जाते. अशावेळी विम्याचा लाभ हाताशी नसेल तर अशा शेतकऱ्यांना आपोआप मुदतवाढ, वसुली स्थगिती, दंडव्याज नाही व परतफेडीची पुनर्रचना अशा सवलती बँकांनी आणाव्यात. शेतीकर्ज देतांना व वसूल करतांना गैरप्रकार, गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी नियंत्रण व देखभाल व्यवस्थित केली जावी. सरकारी अनुदानाची रक्कम वसुलीसाठी घेतली तर लाभार्थींना पुढील कर्जपुरवठा पुरेसा व व्यवस्थित करावा. आगामी खरीप व रब्बी पीके घेण्यासाठी यापूर्वी प्रामाणिक परतफेड करणाऱ्यांना यावर्षी अडचणी आहेत, त्यांना कर्जपुरवठा करण्याचे काम बँकांना करावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या जीवाशी खेळ!

0
0

>> अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे कधी नव्हे ते रिक्षा चालकांकडे लक्ष गेले आहे. फ्रंट सिट, कागदपत्रे नसणे, गणवेश नसणे अशा नेहमीच्या कारणांवरून कारवाई करताना पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यंना तीन रिक्षांबाबत संदेह निर्माण झाला. अधिक चौकशी केल्यानंतर अधिकारी देखील चक्रावले. कारण, कालमर्यादा संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने अक्षरशः तीन तुकडे करून मालकाच्या हातात दिलेली रिक्षा वेल्डिंग करून पुन्हा रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या जीवाशी चाललेल्या या खेळाची दखल प्रशासनासह रिक्षा संघटनांनी वेळीच घेणे आवश्यक आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान एसटी महामंडळाच्या बहुतांश बसेस बाह्य पार्किंग ते अंतर्गत पार्किंग असा प्रवास करतील. त्यामुळे शहरार्तंगत प्रवासाचा मोठा भार खासगी वाहनांवर अर्थात रिक्षा व्यावसायिकांवर पडू शकतो. त्यामुळे विनापरवाना तसेच विना गणवेश बेधूंदपणे रिक्षा हाकणाऱ्या शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्तीचा धडा देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिक्षा चालकांना गणवेश, ओळखपत्र सक्तीचे करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकाच्या बाजूस प्रवासी बसवू नये यासाठी दस्तूरखुद्द रिक्षा संघटनेमार्फत रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात काही बैठका पार पडल्या. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार रिक्षाचालकांना पितळी बिल्ल्याऐवजी ओळखपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांनी स्वत:चा परवाना व बिल्ला कार्यालयात आणून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार आहे. भविष्यात पितळी बिल्ल्याऐवजी ओळखपत्र छातीच्या उजल्या बाजूला लावणे आवश्यक राहील. चालकांना एक जूनपूर्वी आपले ओळखपत्र तयार करून घ्यावे लागणार आहे. मात्र, सरळमार्गी काम करतील ते रिक्षा चालक कसे? परिणामी, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलिसांनी रिक्षाचालकांना रडारवर घेतले आहे. गस्ती पथक नेमून रिक्षांची कागदपत्रे तपासली जात आहेत. नुकतेच एका तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना तीन ​संशयित रिक्षा आढळून आल्यात. नियमानुसार कालमर्यादा संपलेल्या रिक्षा जप्त करून आरटीओतर्फे त्यांचे शब्दशः कटींग केले जाते. मात्र, संबंधित रिक्षा मालकांनी या रिक्षा वे‌‌ल्डिंग करून पुन्हा रस्त्यावर उतरवल्या. इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्याच्या कामात सुध्दा असाच हलगर्जीपणा करण्यात आला होता. आरटीओकडून वर्षा-दोनवर्षातून जाहीर होणारे दरपत्रक रिक्षा चालकांकडून लागलीच इतिहास जमा होते. आजही शहरात रिक्षाचालकाला वाटेल त्याच पध्दतीने प्रवाशांना भाडे द्यावे लागते. त्यामुळे रिक्षाचालकांना चांगल्या वर्तणुकीचे धडे देताना प्रशासनाने सिंहस्था आगोदर आर्थिक लुटमारीचे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखणे आवश्यक आहे. शहरात ११ हजार ७०० परवानाधारक रिक्षा आहे. अनधिकृत आणि अधिकृत अशा रिक्षांची संख्या २५ हजारांच्या पुढे आहे. २००६ मध्ये शहरातील रिक्षा संघटनांनी २४० अधिकृत थांबे द्यावेत यासाठी वाहतूक पोलिस, आरटीओ आणि महापालिकेकडे यादी दिली होती, ती तत्कालीन पोलिस आयुक्तांनी मान्य करत त्यापैकी तत्काळ ६४ थांब्यांना मान्यताही दिली होती. इतर थांब्यांना आजतागायत मान्यता मिळालेली नाही. सहा वर्षात ही गरज वाढून ५०० थांब्यांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, अधिकृत रिक्षा थांबेच अस्तित्वात नसल्याने प्रवाशी मिळेल तिथे रिक्षा उभ्या केल्या जातात. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीच्या गरजा बदलल्या आहेत. रसर्व बसस्थानकांच्या परिसरात रिक्षांचे अधिकृत थांबे आहेत. मात्र, ते सोडून रिक्षा अन्यत्र उभ्या राहतात. यामुळे प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवरील वाहतुकीचा श्वास कोंडतो. या बेशिस्तीतही विनापरवानाधारक रिक्षांची संख्या मोठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार जाधव यांचे तळ्यात-मळ्यात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी आमदार जयंत जाधव यांची नियुक्ती झाली असली तरी जाधव हे जबाबदारी स्वीकारण्याबाबत तळ्यात मळ्यात असल्याचे चित्र आहे. माजीमंत्री छगन भुजबळ यांच्याशी अंतिम चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहराध्यक्षपदाचा तिढा नियुक्तीनंतरही सुटला नसल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारी नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी आमदार जयंत जाधव यांची नियुक्ती केली होती. शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत नसतानाही प्रदेश पातळीवरून त्यांची नियुक्ती झाली होती. दिलीप खैरे, अर्जून टिळे, देवांग जानी, संजय खैरनार, महेश भामरेंसह सहा जण या पदासाठी इच्छुक होते. त्यामुळे प्रदेशपातळीवर हा वाद पोहचला होता. अखेर प्रदेशाने हा वाद टाळत आमदार जाधव यांच्यावर शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली. मात्र, जाधव यांनी या पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. नियुक्ती झाली असली तरी अद्याप त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली नाही. वरिष्ठ नेत्यांशी आपले बोलणे झाले असून त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. तरीही आपण छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार असून, त्यानंतरच जबाबदारी स्वीकारण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शहराध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडस्ट्री अन् एज्युकेशनची होणार 'युती'

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक विश्व अन् शैक्षणिक संस्था यांमध्ये निर्माण झालेली संवादाची दरी हटविण्याचे प्रयत्न नाशिकच्या औद्योगिक वर्तुळातून सुरू झाले आहेत. या दिशेने आगामी टप्प्यात भरीव काम उभारण्यासाठी सीआयआय (उद्योगांचे शिखर संघटन भारतीय उद्योग महासंघ) च्या नेतृत्वाखाली इंडस्ट्री अन् एज्युकेशन क्षेत्रांमध्ये कम्युनिकेशन ब्रिज बळकट करण्यात येणार आहे.

उद्योग विश्वाला अपेक्षित असणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि मोठ्या डिग्री बाहेर घेऊन पडणारे बहुसंख्य विद्यार्थी यांच्या ताळमेळाचा अभाव कायमच चर्चेचा विषय बनला आहे. दोन्हीही क्षेत्रांच्या केवळ संवादाच्या अभावाच्या परिणामी इंडस्ट्री कुशल मनुष्यबळापासून तर उच्चशिक्षित तरूण योग्य संधींवाचून दूर राहत असल्याचे निरीक्षण सीआयआय या संघटनेने टिपले आहे. यावर कृतिशीलतेने काम करण्यासाठी सीआयआयच्या माध्यमातून एका समितीचीही रचना करण्यात आली आहे. ही समिती लवकरच दिशा घेऊन कामास सुरुवात करेल, अशी माहिती सीआयआयचे विभागीय परिषदेचे अध्यक्ष व उद्योजक सुधीर मुतालीक यांनी दिली.

नवशिक्षित मनुष्यबळाला इंडस्ट्रीजच्या अपेक्षांचा अंदाज देण्यासाठी ही समिती कसोशीने प्रयत्न करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नाशिकमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी उद्योजक, औद्योगिक संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्था यांना एकत्रित आणून मंथन केले जाणार आहे. नंतरच्या टप्प्यात उद्योग वर्तुळातील घटक शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत संवादाचा सेतू उभारणार आहेत. नव्या मनुष्यबळाकडून असणाऱ्या उद्योग वर्तुळाच्या अपेक्षा, प्रत्यक्षात संधी मिळविण्यासाठीची पूरक कौशल्य आदी मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन करण्यात येईल. संधींच्या शोधासाठी यातील बहुतांश विद्यार्थ्यांना नाशिकच्या बाहेर पडावे लागते. नाशिकचा हा 'ब्रेन ड्रेन' रोखण्यासाठी सीआयआयच्या रडारवरचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम दोन्हीही इंडस्ट्रीजसाठी तारक सेतू ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किती धमणी काठीण्य हे..!

0
0



>> डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी

रक्ताभिसरण प्रक्रियेत ह्रदयाचे ७० ते ८० ठोके पडतात आणि एका ठोक्यात साधारण ६० ते ९० मिलिलिटर रक्त शरीरात फेकले जाते. जसे आपले शरीराच्या इतर स्नायूंच्या हालचालींवर आपले नियंत्रण असते तसे आपण ह्रदयाच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ह्रदयाच्या स्नायूंना नियमित रक्तपुरवठा ह्रदयाच्या धमण्यांद्वारे केला जातो. सदर धमण्यांच्या आत थर साचून त्या अरूंद बनतात त्या प्रक्रियेला धमणी काठिण्य असे म्हणतात.

रक्तवाहिन्यांची भिंत तीन थरांपासून बनलेली असते. सर्वात बाहेरचा थर चरबी आणि तंतूमय पदार्थांच्या मिश्रणापासुन बनलेला असतो. त्याच्या आत स्नायूंचे जाळे असते. या स्नायूंमुळे रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन किंवा प्रसरण पावण्याची क्षमता असते. म्हणजेच केवळ ह्रदयाच्या पंपिंगमुळे ह्रदयातील रक्त सर्व अवयवांपर्यंत पोहोचते असे नाही. आकुंचनाच्या लाटेमुळे रक्त पुढे पुढे लोटले जाते. ही लाट अत्यंत वेगवान असते जी सेकंदाच्या आतच रक्तवाहिनीच्या टोकापर्यंत पोचते. स्नायूंची आकुंचन क्षमता घटत गेल्यास त्या ठिकाणी रक्त वाहिनीला फुगवटा येतो. उन्हाळयात ज्याप्रमाणे सायकलच्या टयूबचे रबर कमकुवत झाल्यास त्या जागेवर फुगवटा येतो अगदी तशीच प्रक्रिया रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा होते त्याला इक्टासिया किंवा अॅनरीझम् असे संबोधतात. फुगवटयामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि त्या ठिकाणी रक्ताच्या गाठी बनण्याचा धोका संभवतो. या गाठींमुळे अचानक ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. विशेषत: तरूणांमध्ये येणाऱ्या ह्रदयविकाराचे हे अत्यंत महत्त्वाचे कारण असते. रक्तवाहिन्या ब्लॉक होतात म्हणजेच अरूंद होतात त्याच्या अगदी विरूद्ध अशी ही विकृती आहे म्हणजे यात रक्तवाहिन्यांचा व्यास वाढलेला असतो पण, याचा परिणाम तितकाच भयंकर होऊ शकतो. मुख्य म्हणजे त्यावर कुठलाही कायमस्वरूपी उपचार नसतो. ब्लॉक असल्यास बायपास किंवा अॅन्जिओप्लॅस्टी करून त्यातून सूटका करून घेऊ शकतो. परंतू रक्तवाहिन्यांमध्ये गाठ झाल्यास त्या आजारावर आयुष्यभर रक्त पातळ करणाऱ्या औषधी व्यतिरिक्त दुसरा कुठलाही इलाज नसतो. धमणीच्या सर्वांत आपल्या अस्तराच्या पेशींमधून अनेक द्रव्यांचा स्त्राव होत असतो. काही कारणाने त्या अस्तरास इजा पोहोचल्यास त्या ठिकाणी असलेल्या पेशींची अनैसर्गिक वाढ होऊन रक्तवाहिनीच्या व्यास कमी कमी होत जातो.

रक्तवाहिनी प्रसरण पावण्याची क्षमता कमी झाल्याने आवश्यकतेनुसार अधिक रक्तपुरवठा होऊ शकत नाही. लघुपेशी अस्तराजवळ जमा झाल्याने अचानक रक्तवाहिनी बंद होते आणि ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्वचेला जखम झाल्यावर ज्याप्रमाणे व्रण निर्माण होतो त्याप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये व्रण निर्माण होतो. त्या व्रणांमुळे रक्तवाहिनीतील अडथळा निर्माण होऊ शकतो. रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसरार्इडचे प्रमाण वाढल्यानंतर नदीत गाळ साचावा तसा गाळ रक्तवाहिनीत साचत जातो. काही वेळा जसा पोटाच्या अस्तराला अल्सर होतो आणि खड्डा पडतो तसेच रक्तवाहिनीला सुद्धा खड्डा पडतो. त्यावर रक्तातल्या लघुपेशीचा चिकटपणा वाढलेला असतो आणि त्याचे 'गाठीत' रूपांतर होते. रक्तातील 'होमोसिस्टीन' घटकाचे प्रमाण वाढल्यास लघुपेशींवर त्याचे आवरण तयार होते. त्या एकमेकांना लवकर आणि घट्ट चिकटतात. त्यामुळे जसे आपण कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासतो तसेच होमोसिस्टीनचे प्रमाणसुद्धा तपासले पाहिजे. ह्रदयविकाराचे ते मुख्य कारणही असू शकते.

धमणी काठीण्य व्याधीपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब आपल्या जीवनशैलीत कटाक्षाने असला पाहिजे. फास्टफूडचा अतिरेक टाळला पाहिजे. तेलाचा तूपाचा कमीत कमी वापर आहारात असला पाहिजे. स्थुलत्व वाढीस लागले की, धोक्याची घंटा वाजली असे समजायला हरकत नाही. त्यासाठी नियमित व्यायामाची शरीराला आवश्यकता असते.

(लेखक प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ३८७ विद्यार्थ्यांना संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज व रिसर्च सेंटरच्या तब्बल ३८७ विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. त्यातील दोन विद्यार्थ्यांना सात लाखांचे तर ३५ विद्यार्थ्यांना पाच लाखाचे पॅकेज मिळाले आहे. ही माहिती प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी दिली.

नोकरीच्या संधींबाबत वर्षभराचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, सुमारे पन्नास कंपन्यांनी केकेवाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात क्रॉम्प्टन ग्रीव्हज्, टीसीएस, एल अॅण्ड टी इन्फोटेक, केपीआयटी टेक्नॉलॉजी पुणे, एनव्हीडीया, पर्सिस्टन्स सिस्टीम लि., फीम आय क्यू, एरिज या कंपन्यांमार्फत कॅम्पस इंटरव्ह्यूची प्रक्रिया पार पडली होती. यांत १२५ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची आणि २६ एम.सी.ए.च्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांची सहा महिन्यांच्या इंटर्नशीपसाठी निवड झाली.

शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रात जेएसडब्ल्यू स्टील्स, आयबीएम, ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स, इन्फोसिस, व्होडाफोन, ब्रीजस्टोन, विप्रो टेक्नॉलॉजी, भारतीय सैन्य दल, ईएसडीएस, डाटामॅटिक्स, नेटविन इन्फोसोल्युशन्स, विनजित टेक्नॉलॉजी, फ्लोर डॅनिएल, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बॉश आदी कंपन्यांनी इंजिनीअरिंग, एमबीए आणि एमसीएच्या मुलांचे कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन सुमारे २७० विद्यार्थ्यांची निवड केली. असे दोन्ही सत्रात मिळून एकूण ३८७ विद्यार्थ्यांची निवड वर्षभरात कॅम्पस इंटरव्ह्यूत झाली. यांबरोबरच मॅकेनिकल आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतील काही बहुराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यू घेत असून, या शैक्षणिक वर्षात ४०० पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतील असा विश्वास प्राचार्य नांदूरकर यांनी व्यक्त केला आहे.

केपीआयटी कंपनीशी सामंजस्य करार

के. के. वाघ शिक्षणसंस्थेने पुण्याच्या केपीआयटी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना केपीआयटी कंपनीमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल व त्यातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या कराराच्या माध्यमातून प्रशिक्षण, रोजगार संधींसग संयुक्त संशोधन प्रकल्पदेखील सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना डिग्रीच्या शेवटच्या वर्षात तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

परदेशातील कंपन्यांमध्येही मिळाली संधी

के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या या वर्षीच्या निवडीमध्ये काही विद्यार्थ्यांची निवड ही थेट परदेशातील कंपन्यांमध्ये झाली आहे. त्यातील एम. सी. ए.ची प्राची काकळीज या विद्यार्थिनीची ऑस्ट्रेलियाच्या नामांकित कंपनीत निवड झाली. केमिकल शाखेतील अजिंक्य देशमुख व नीलेश पगारे या विद्यार्थ्यांची निवड दुबईच्या कन्सल्टंट कंपनीने पाच लाखांचे पॅकेज देऊन केली आहे. फ्लोर डॅनियल या कंपनीने मॅकेनिकल शाखेच्या तेज दुबे व कुणाल मोदी या विद्यार्थ्यांना साडे चार लाखाचे पॅकेज देऊ केले आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर शाखेतील अस्मिता गौतम व मुकेश भारसाखळे या विद्यार्थ्यांची एनव्हिडीया या कंपनीने सात लाखांच्या भक्कम वार्षिक पॅकेजसह केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यातील समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक शहरात येतील. गोदास्नान व आदी धार्मिक कार्यांमुळे शहराच्या आरोग्याला धोकाही निर्माण होण्याची मोठी शक्यता कुंभमेळ्यात असल्याने आतापासूनच पावले उचलणे आवश्यक आहे. या दरम्यान होणारे प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन, पाणी शुद्धीकरणांचा विविध मॉडेल्सचा वापर करणे गरजेचे आहे, असा सूर दि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनीअर्स येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रातून निघाला.

'दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स' नाशिक सेंटर आणि 'नाशिक महानगर पालिका' यांच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले.

कुंभमेळा, त्यातील समस्या, आव्हाने व त्यावरील उपाय या विषयांवर येथे चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर कुंभमेळ्यात महत्त्वाचे असलेले कम्युनिकेशनची साधने प्रभावी कशी करावी, याबाबतही येथे चर्चा करण्यात आली. यावेळी दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स नाशिक सेंटरचे अध्यक्ष नरेंद्र बिरार, सुरेशबाबू प्रजापती, अपूर्वा जाखडी, प्रा. प्रकाश कडवे, उमेश सोनवणे, प्रज्ञा ठाकूर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कायद्याच्या राज्यासाठी पोलिस कटिबध्द

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कायद्याचे राज्य असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी राज्यकर्त्यांनी चांगले काम केले पाहिजे. खरे तर पोलिसांचे काम अतिशय अवघड स्वरूपाचे असते. तरीही त्यांच्या नावाने नेहमीच ओरड होत असते. पोलिसांचा दरारा हा कायद्याचा दरारा असतो, असे प्रतिपादन माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले.

गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या ९४ व्या वसंत व्याख्यानमालेत 'महाराष्ट्र पोलिस : कार्यक्षमता' या विषयावर ते बोलत होते. हे व्याख्यान प्रभाकर टकले यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. इनामदार पुढे म्हणाले की, गुन्हेगार हा आर्टिस्ट असतो तर पोलिस क्रिटिक असतो. पोलिसांनी हे केले नाही ते केले नाही असे म्हणत बसू नका. दाभोळकरांच्या खुन्याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ३५०० जणांची विचारपूस केलेली आहे. सध्या महाराष्ट्र मोठ्या अडचणीतून जातोय परंतु, पोलिसांची विश्वसनीयता उच्च असेल तर या ही परिस्थितीतून निभावून नेता येईल, असे त्यांनी नमूद केले.

इनामदार पुढे म्हणाले की, नुकतेच १०० किलो अमली पदार्थ एका कॉन्स्टेबलच्या घरी सापडलेत. त्यातील पाच किलो तर पोलिस स्टेशनच्या कपाटात सापडली. आता काय म्हणावे? ज्यावेळी सनसनाटी केसेस होतात तेव्हा त्याचा शोध लावणे व गुन्हेगारांना जेरबंद करणे हे पोलिसांचे पहिले काम आहे. हे सांगतानाच इनामदार पुढे म्हणाले की, पोलिस बारा तास ड्युटी करून आंबून जातो. घरी आल्यावर पुन्हा दोन तासात त्याला ड्युटीवर निघायचे असते. त्यामुळे त्याच्या अडचणीही लक्षात घेतल्या पाहिजे. तो सतत एका जागी उभा असतो, याचाही विचार करण्याची गरज आहे. दरवर्षी १६०० पोलिस मरतात याचा विचार कुणी करणार आहे का असा सवालही इनामदारांनी यावेळी केला. कार्यक्रमात इनामदार यांनी कुसुमाग्रज व त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी कथन केले. तात्यासाहेबांनी 'प्राचार्य' या दिलेल्या पदवीसमोर राष्ट्रपतींनी दिलेले सर्टीफिकेटही फिके वाटते असे ते म्हणाले.

व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रभाकर टकले यांना सावळीराम तिदमे यांनी अभिवादन केले. डॉ. प्रमोद कमोद यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपीठावर चित्रकार बंधू प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, मधुकर झेंडे, अरूण शेंदुर्णीकर यांची उपस्थिती होती. अमेरिकेतील व्यापक यशाबद्दल सावंत बंधूंचा इनामदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला चित्रकार भि.रा.सावंत यांनी अरविंद इनामदार यांचे चित्र रेखाटून त्यांना भेट दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांसाठी TA-DAची पर्वणी

0
0

सिंहस्थ नियोजनासाठी ५० हजार अधिकारी येणार

अरविंद जाधव, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शहरात दाखल होणाऱ्या सुमारे ५० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष सध्या प्रवास आणि दैनंदिन भत्त्याच्या रक्कमेकडे लागले आहे. सिंहस्थासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाले असून, टीए-डीएची रक्कम किती व कशी मिळणार याची उत्सुकता सर्वांना असून त्याबाबत चर्चा झडत आहे.

कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. ​पर्वणी काळात शहरात लाखो साधु,मंहत आणि भाविक दाखल होतील. या सर्वांचा भार नियोजनात सहभागी असलेल्या पोलिस, वैद्यकीय, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा इत्यादी विभागांवर पडेल. या सर्व विभागात मुळात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. महापालिकेचा विचार केला असता आजमितीस येथे ९० पेक्षा अधिक इंजिनीअर्सची कमरतता आहे. इतर विभागातील सर्व वर्गातील किमान दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची वानवा आहे.

सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असताना आता कमतरता असलेल्या इंजिनीअरची कमी भरून काढण्यासाठी काय उपाय राबवता येतील, याविषयी चाचपणी केली जात आहे. शहर पोलिस विभागात अडीच हजारांच्या आसपास कर्मचारी काम पाहतात. ग्रामीण पोलिस दलात देखील तीच परिस्थिती आहे. इतर सर्व विभागाचे मिळून फारतर २० हजारांच्या आसपास कर्मचाऱ्यांची संख्या पोहचते.

त्यामुळे नियोजनासाठी किमान ५० हजार कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणाहून बोलवण्यात येणार आहे. हे कर्मचारी गरजेनुसार दोन महिन्यांसाठी शहरात तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये राहणार आहेत. यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर तात्पुरती नियुक्ती देता येईल का? याची चाचपणी सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी दिली. दरम्यान, प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एवढीच मोठी तरतूद राज्य सरकारला करावी लागणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडण्याची शक्यता आहे. सिंहस्थासाठी मोठी तरतूद करताना हातघाईवर आलेले सरकार कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांचा प्रश्न किती गांभीर्याने घेते, याकडे कर्मचारी संघटनांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांसाठी ११ कोटी ९५ लाखांची तरतूद

नियोजनाच्या कामासाठी शहरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार किती टीए- डीए देणार याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. विविध भत्त्यांसाठी पोलिस विभागानेच दोन महिन्यासाठी ११ कोटी ९५ लाख ४५ हजार रुपयांची तजवीज केली आहे. सध्या पोलिस महासंचालकांकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात होमगार्डचेही मानधन गृहीत असावे, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५३७ प्लॉटचे काम युद्धपातळीवर

0
0

बॉटनीकल गार्डनचा मार्ग मोकळा; सिंहस्थासाठी पालिकेला ४० कोटी प्राप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेन साधूग्रामवरील कामाचा वेग वाढवला असून, साधू-मंहताच्या व्यवस्थेसाठी १५३७ प्लॉटचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सोबतच अधीक्षक अभियंता यू. बी. पवार जखमी असल्याने साधूग्रामच्या कामाची जबाबदारी तीन उपायुक्तांकडे विभागून देण्यात आली आहे. दरम्यान, सिंहस्थासाठी शहरात ठिकठिकाणी सहा हजार शौचालये उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे. सिंहस्थ कामांसाठी शासनाकडून महापालिकेला ४० कोटीचा निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

साधूग्रामसाठी ८२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. सिंहस्थ दोन महिन्यावर येवून ठेपल्याने प्लॉट वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून साधूग्रामसाठी आणखीन २६ एकर जागा मिळाली आहे. तर १५३७ प्लॉट पाडण्यात आले आहे. त्यांची विभागणी चार सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. या प्लॉटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर यू. बी. पवार यांच्या जखमी होण्याने त्यांची जबाबदारी सेक्टरवाईज उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास दोरकुळकर, दत्तात्रय गोतीसे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच, शासनाकडून सिंहस्थ कामांपोटी ४० कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंहस्थात शहरात येणाऱ्या भाविकांसाठी सहा हजार शौचालये उभारण्यात येणार आहे. ही शौचालये थेट महापालिकेच्या ड्रेनेजला जोडण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

गार्डनचा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त

पांडव लेण्याजवळील नेहरू उद्यानातील २५ हेक्टर जागेवर बॉटनीकल गार्डन तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने वनविकास महामंडळामार्फत ही जागा महापालिकडे हस्तांतरीत करण्याचा अध्यादेश काढला असून, तो पालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता महापालिका आणि वनविकास महामंडळात करार केला जाणार आहे. त्यानंतर तो मंजुरीसाठी महापालिकेवर ठेवण्यात येणार आहे. तसेच टाटा फाऊंडेशनकडून बॉटनीकल गार्डनसंदर्भातील प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाला असून, तो मंजुरीसाठी महासभेवर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिली. त्यामुळे गार्डनचा मार्क मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारतांना दोघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/कळवण

दोन वेगवेगळ्या घटनांत अॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) समाज कल्याण खात्यातील वरिष्ठ लिपिकासह कळवणच्या सहायक गटविकास अधिकाऱ्यास लाचेची रक्कम घेताना अटक केली. दिवसभरात झालेल्या दोन केसेसमुळे समाज कल्याण विभागासह पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली.

विजय उत्तमराव कोर, असे वरिष्ठ लिपिकाचे नाव असून, तो समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात कार्यरत आहे. कोर यांनी त्यांच्याच विभागातील समाज कल्याण निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. १८ ते २२ मे या कालावधीत तक्रारदाराच्या विभागाचे लेखा परीक्षण झाले. या कालावधीत तक्रारदार रजेवर निघून गेले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केली, या कारणावरून तक्रारदारावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे. याबबत विजय कोर यांनी तक्रारदारास संपर्क करून निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव मी वरिष्ठांकडे सोपवणार असल्याचे सांगितले. कारवाई टाळावयाची असल्यास सात हजार रुपयांची मागणी कोर यांनी केली. या प्रकरणी तक्रारदाराने थेट एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी एक वाजून ४० मिनिटांच्या सुमारास समाज कल्याण कार्यालयात तडजोडीअंती ठरलेली सहा हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. एकाच विभागातील कर्मचाऱ्यास दुसऱ्या कर्मचाऱ्याने लाच घेताना पकडून देण्याची घटना घडल्याने कार्यालयातील कारभार चव्हाट्यावर आला. कोर यांच्याविरोधात यापूर्वी देखील अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, पुढील कारवाई झाली नाही. यावेळेस थेट एसीबीने कोरला अटक केल्याने त्रस्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ट्रॅपची दुसरी घटना कळवण पंचायत समितीत सकाळाच्या सुमारास घडली. कळवण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रेय सुखदेव चित्ते यांना लाच घेताना एसबीने जाळ्यात पकडले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदानित विहिरीचे मंजूर पैसे मिळावे म्हणून तक्रारदार संदीप ऊर्फ महेश पाटील यांच्याकडून चार हजाराची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यांनी चित्तेला ताब्यात घेतले.

पाटील यांनी सरकारी योजनेतंर्गत विहीर बांधण्यासाठी २००९ मध्ये प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पाटील यांना २ लाख ९० हजार रुपयांच्या अनुदानापैकी १ लाख ७० हजार रुपये मिळाले. उर्वरित रक्कम मिळावी म्हणून पाटील प्रयत्नशील असताना चित्ते सातत्याने पैशांची मागणी करीत होते. सध्याचे गटविकास अधिकारी निवृत्त होत आहे व मी प्रभारी गटविकास अधिकारी होणार आहे. तेव्हा तुझे पैसे अडकवून ठेवेल, असे सांगितल्याने पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार शनिवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास चित्ते यांना रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. पंचायत सशक्त राज अभियानांतर्गत नुकताच कळवण पंचायत समितीला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. मात्र, आजच्या घटनेमुळे पुरस्कारास गालबोट लागले असल्याची चर्चा कळवणमध्ये रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

0
0

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये त्यांनी प्रमुथ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. रविवारी ठाकरे शहरातील विविध विकासकांमाची पाहणी करणार आहेत. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस ते विविध विकासकामांची पाहणी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. चिल्ड्रन पार्क, गोदापार्क आणि सिंहस्थ रस्त्यांची ते पाहणी करणार आहेत. नेहरू गार्डनसंदर्भात टाटा फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच वर्षात ३१६ जणांवर गुन्हे

0
0

गुटखाविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अडीच वर्षात गुटखा बंदीचे उल्लंघन करणाऱ्या नाशिक विभागातील तब्बल ३१६ जणांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, सात कोटी ५४ लाख ८ हजार ९३७ रुपयांचा गुटखाही एफडीएने जप्त केला आहे.

राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घालण्याचा निर्णय २० जुलै २०१२मध्ये निर्णय घेतला. त्यानंतर २०१३ आणि २०१४ मध्ये ही बंदी पुन्हा जाह‌ीर करण्यात आली. गेल्या अडीच वर्षात नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एफडीएने गुटखाबंदी विरोधात कारवाई केली. एफडीएने विभागात एकूण ४४०० ठिकाणी तपासण्या केल्या. यातील ८१८ ठिकाणी गुटखा आढळून आला. त्यानुसार विभागातील एकूण ३१६ जणांविरोधात गेल्या अडीच वर्षात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी दिली आहे. या कारवाईत एकूण सात कोटी ५४ लाख ८ हजार ९३७ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन तो नष्ट करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. २०१२-१३ या वर्षात २०८, २०१३-१४मध्ये १३५ आणि २० जुलै २०१४ ते ३० मे २०१५ पर्यंत ३३ जणांविरोधात खटले सुरु असून, या सर्वांवर गुटखा बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणाचे सबळ पुरावे देण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्वांविरोधात कोर्टाकडून कठोर कारवाई होण्याचा विश्वास पवार यांनी बोलून दाखविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉवर नोंदवणार भाविकसंख्या

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची नेमकी संख्या मोजण्यासह गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. कुंभथॉन उपक्रमा अंतर्गत शहरातील मोबाइल टॉवर्सवर पिंग नेटवर्क बसविले जाणार असून, त्यामुळे शहराबाहेरून येणाऱ्यांच्या मोबाइलची नोंदणी झाल्याने त्यांची संख्या समजू शकणार आहे.

साधूमंहत असो वा सामान्य भाविक, प्रत्येकाजवळ संपर्कासाठी मोबाइल असल्याने शहरात दाखल होणाऱ्यांचा मोबाइल क्रमांक पिंगच्या नेटवर्मध्ये आल्यावर आपोआप नाोंदविला जाणार आहे. यामुळे भाविकांची संख्या व गर्दीचे नियंत्रणही करणे सुलभ होईल.

सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे एक कोटी भाविक आणि साधूमंहत भेट देणार असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने नेमके किती भाविक नाशिकच्या सिंहस्थाला भेट देतात हा प्रश्न सोडविण्यासाठी कुंभथॉनच्या माध्यमातून स्वतंत्र पिंग नेटवर्क तयार करण्यात आले असून, कुंभमळ्याच्या काळात पिंग शहरातील सर्व टॉवर्सवर बसविले जाणार आहे. शहराबाहेरुन येणाऱ्या भाविकाजवळ मोबाइल असेल, त्याची नोंदणी नेटवर्कवर होईल. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात जवळपास प्रत्येकाकडे मोबाइल असल्याने शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची आपोआपच नोंदणी होणार आहे. दररोज किती भाविक नाशिकमध्ये येतात व शहरातून जातात याची माहितीही नियमितपणे हाती येणार असल्याने नियोजनाच्या कामालाही मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

पिंग नेटवर्कमुळे शहरातील कोणत्या विभागात किती भाविक आहेत, याचीही माहितीही प्रशासनाला मिळणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने एखाद्या विभागात गर्दी जास्त झाल्यास थेट नियंत्रण कक्षातून परिसरातील गर्दीवर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या मोजण्यासह गर्दीच्या नियंत्रणलाही हे नेटवर्क उपयोगी पडणार आहे. याचा फायदा पोलिसांनाही होणार असून, सिंहस्थात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास पिंग नेटवर्कमुळे मदत मिळणार आहे.

सिंहस्थात या प्रणालीमुळे भाविकांच्या संख्येबाबतचा संभ्रम दूर होईल. यासाठी कुंभथॉनची मदत झाली आहे. सिंहस्थात तंत्रज्ञानाचा वापर करून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपत्कालीन परिस्थित नियंत्रण कक्ष व पोलिसांना या यंत्रणेचा चांगला उपयोग होऊ शकतो.

डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुष्ठपीडितांचा सेवेकरी ‘कृष्ण’

0
0

>> फणिंद्र मंडलिक

संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज याच्या विचाराने प्रेरीत होऊन कृष्णराव प्रल्हाद वाईकर यांनी कुष्ठ पीडितांची सेवा करण्यास सुरुवात केली. १९५० पासून प्रारंभ झालेले हे कार्य आजही ८४ व्या वर्षी अविरत सुरू आहे.

घरात लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण असल्याने वाईकर यांनीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. या काळात त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. 'सरकारी सेवेत जाऊ नका' असा संदेश महात्मा गांधींनी दिल्याने पदराशी असलेल्या अनेक सरकारी नोकऱ्यांना लाथ मारत पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने देऊ केलेली स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन देखील त्यांनी नम्रपणे नाकारली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते संत गाडगेबाबांच्या संपर्कात आल्यानंतर 'कुष्ठपीडितांसाठी काम कर' असा सल्ला गाडगेबाबांनी कृष्णराव यांना दिला. रस्त्याच्या कडेला असलेले कुष्ठपीडित पाहून त्यांचे मन हेलावून जात असे म्हणून कृष्णराव यांनी वेलोर व वर्धा येथे कुष्ठपीडितांवर उपचाराचे विशेष शिक्षण घेतले. नाशिक जिल्ह्यात कुष्ठपीडितांसंबंधी शिक्षण घेणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांनी फिजीओथेरपीचे अल्प मुदतीचा कोर्सही पूर्ण केला आणि १९५० पासून नाशिक जिल्हा कुष्ठरोग निवारण मंडळाचे कार्य सुरू केले. ३१ जुलै १९५५ साली कुष्ठपीडितांच्या निरोगी मुलांसाठी भाडे तत्वाने जागा घेऊन त्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली. आजपर्यंत ३ हजार ३४६ मुले संस्थेतून बाहेर पडली आहेत. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शुभहस्ते कुष्ठपीडितांसाठी कुष्ठधाम या वास्तुची निर्मिती केली. या दोन संतांची अखेरची भेट येथेच झाली. या संस्थेत कुष्ठपीडितांवर मेणाचा शेक, कुष्ठरोग होऊ नये यासंबंधी कोणती काळजी घ्याची याबाबतचा प्रचार, लोकशिक्षणाचे कार्य आजपर्यंत चालू आहे.

संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत ५ हजार ८८ कुष्ठपीडित उपचार घेऊन गेले आहेत. दीड हजार पेक्षा अधिक कुष्ठपीडित समाजात मानाने मुक्त जीवन जगत आहे. हा रोग होऊच नये यासाठी कुष्ठरोग लक्षणे याबाबत जनजागृती करण्यास वाईकर यांनी काम केले आहे. जिल्ह्यातील विविध शाळा ट्रेनिंग कॉलेज, दवाखाने व क्लासेस येथे शिबिरांद्वारे ८०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. तसेच १९६२ ते १९७० पर्यंत कुष्ठधाममध्ये ५०० पेक्षा अधिक कुष्ठपीडितांवर संततीनियमनाच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. संस्थेच्या कार्यासाठी संस्थेच्या आवारात शेतीद्वारे धान्य पिकवून कुष्ठपीडितांना सहाय्य करण्यास त्यांनी हातभार लावला. कुणाचीही मदत न घेता त्यांचे आजही कार्य सुरू आहे. तसेच ज्ञानेश्वरी व गिताईवर शेकडो प्रवचने व व्याख्याने दिली. १९७८ मध्ये लायन्स क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी त्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्रे प्रदान केली आहेत. सध्या कुष्ठपीडितांची संख्या कमी झाली आहे. तरीही भीक मागतांना कुष्ठपीडित दिसल्यास त्याला संस्थेत आणून त्यांच्यावर वाईकर स्वतः उपचार करतात.

गेल्या अनेक वर्षांपासून कुष्ठपीडितांवर उपचार करीत आहे. कुष्ठरोग हा अनुवंशिक नव्हे तर तो जंतुमुळे होतो. आजही कुष्ठरोग झालेल्या रुग्णांना समाज वाळीत टाकतो. तो आपल्यातीलच घटक आहे, त्याची सेवा करण्याची गरज आहे.- कृष्णराव वाईकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

भगूरचे पुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी प्रचंड योगदान दिले. त्यामुळेच त्यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी‌ मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी जाहीर केले आहे. सावरकर जयंतीच्या पार्श्वभूमिवर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमप्रसंगी त‌े बोलत होते.

सावरकर स्मारकासाठी केंद्र सरकारकडून ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसात स्मारकाच्या सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. ही वास्तू पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने त्यासाठी काही अटी शर्ती पूर्ण केल्याशिवाय निधी मिळत नाही, अशी माहितीही त्यांनी ‌यावेळी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगूर नगराध्यक्षा अनिता करंजकर या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती महाराज बिरमणी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, भगूर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, रवी येरम, दीपक बलकवडे, माजी सहायक पोलिस आयुक्त राधाकृष्ण गामणे आदी उपस्थित होते. खा. गोडसे यांचा भगूर गावच्या व सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने रमेश पवार, अनिल पवार, प्रताप पवार, तानाजी करंजकर, शाम ढगे यांचा वतीने नागरी सत्कार करण्यात आला. दीपक बलकवडे रोहन देशमुख, प्रतिक यादव, निकिता रोकडे, अशोक मोजड, जगदीश गोडसे समितीच्या वतीने यांचा सत्कार झाला. प्रशांत कापसे यांनी सूत्रसंचालन केले तर नंदू चव्हाण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक कुठे गेले

0
0

>> अशांत किरकिरकर

लेखनाची दीर्घ परंपरा असलेल्या नाशिक नगरीने महाराष्ट्राला अनेक साहित्यिक दिलेत. कुसुमाग्रज, कानेटकर, चंद्रशेखर गोऱ्हे ही दिग्गज मंडळी नाशिकचीच. परंतु, इतिहासावर किती काळ पोट भरणार असा प्रश्न उपस्थित होतोच. तात्यासाहेबांच्या रुपाने नाशिकला मिळालेला 'ज्ञानपीठ' सन्मान पहिला व शेवटचाच न ठरो, यासाठी काही उपक्रम होताहेत का याचे उत्तर नकारार्थी येते.

ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, जे चांगलं लिहिताहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, जे विस्थापित आहेत त्यांना प्र‌स्थापित करण्यासाठी आणि जे प्रस्थापित आहेत त्यांना आणखी मोकळं आभाळ मिळवून देण्यासाठी शहरात काही घडतंय का? स्वत:ला साहित्यिक म्हणवणाऱ्या संस्था लिखाणाच्या बाबतीत किती शिबिरं भरवताहेत? तात्यासाहेबांनी मिळवलेलं 'ज्ञानपीठ' पहिलं अन् शेवटचं न ठरो यासाठी काही प्रयत्न होताहेत का? या प्रश्नांची येणारी नकारार्थी उत्तरे पाहता, शहरात सिध्दहस्त लेखण्याच आहेत कुठं? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

'नाशिक ही सांस्कृतिक भूमी आहे', असं वारंवार जे म्हटलं जातं त्यामागे अनेक साहित्यिक, कलाकार यांचे श्रम आहेत. अनेक दिग्गजांचा आशीर्वाद आहे. परंतु, याच नाशकात आज लेखकु शिल्लक आहेत का? लिहिणारे अनेक आहेत; परंतु पूर्वजांच्या लेखणीची धार व तेज या लिखाणाला आहे काय? ज्यांचा त्याचा वकूब असं जरी म्हटलं तरी किमान पूर्वासुरींच्या जवळपास पोहोचणारं लिखाण दृष्टीस पडत नाही. सरकारी अखत्यारित एक संमेलन नाशिकला घेण्याचा विचार सध्या सुरू असून त्यासंदर्भात आलेल्या एका संदेशात, नाशकातील दिग्गज लेखकु सुचवा असं लिहिण्यात आलं होतं. अतिशय दुर्देवाची बाब की २०० जणांकडून मागविलेल्या प्रतिसादामध्ये नाशकातील लेखक सुचविण्याचा हा कॉलम रिकामाच आहे. नाही म्हणायला काही नावे आलीही, ती तिसऱ्या फळीतील होती.

असं का व्हावं? याबाबत केलेल्या चिंतनातून एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, की ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांच्यासाठी शहरात काय सुरू आहे. साहित्यिक घडविणे दूरच; परंतु आहेत त्यांच्यासाठी सांस्कृतिक संस्था किती झटताहेत? ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, जे चांगलं लिहिताहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, जे विस्थापित आहेत त्यांना प्र‌स्थापित करण्यासाठी आणि जे प्रस्थापित आहेत त्यांना आणखी मोकळं आभाळ मिळवून देण्यासाठी शहरात काही घडतंय का? याचे उत्तर नकारार्थी येतं. संस्थांनी काही शिष्यवृत्ती सुरू करायला हव्यात. जेणे करून लिहिण्यासाठी अनेकजण प्रवृत्त होऊ शकतील. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दोन वर्षांपूर्वी कुसुमाग्रज काव्य फेलोशिप सुरू करण्यात आलीही; परंतु एका सकारात्मक पावलाने काम भागणार नाही, सोबतीला अनेक संस्थांनी उदयाला येणाऱ्या लेखकांना हात देण्याची गरज आहे. शहरात वस्तीला आलेल्या सिध्दहस्तांची हेळसांड केल्याने, त्यांचा सहवास मिळू न शकल्याने अनेक लेखकांचं मोठं नुकसानच झालं आहे. चार-पाच वर्षांपूर्वी ज्येष्ठ कामगार कवी नारायण सुर्वे नाशकात आले; परंतु त्यांना राहण्यासाठी महापालिका साधं एक घर देऊ शकली नाही. त्याआधी कवी ग्रेस नाशकात आले होते. मात्र, येथील साहित्यातील राजकारणामुळे त्यांचंही मन रमलं नाही. सुर्वे, ग्रेस शहरात असते तर किमान त्यांच्याकडून काही पाठ नवोदितांना मिळू शकले असते. साहित्याचा उदो उदो करणाऱ्या संस्था लेखन कार्यशाळा घेणं, मुंबई-पुण्याहून काही प्रोफेशनल लेखकांना बोलावून त्यांच्याकडून धडे देणं, अशा गोष्टींमुळे लिखाणाचा श्रीगणेशा करण्याची संधी अनेकांना मिळू शकते. शेवटी लेखकांना काय एका स्पार्कची गरज असते, तो कोठून मिळेल हे सांगता येणं अवघड आहे. त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज मात्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटिसा

0
0

पोलिस आक्रमक मात्र महापालिका प्रशासन कारवाईबाबत उदासीन

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर भागात सर्वच मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या चायनिज व अंडाभुर्जीच्या गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पोलिस प्रशासनाने सुरुवात केली आहे. कायदा व सु‌व्यवस्था धोक्यात आणण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अनधिकृत विक्रेत्यांना वेसण घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी सामान्यांकडून केली जात आहे.

चायनिज, अंडाभुर्जी व अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पोलिसांनी पार पाडला असला तरी अनधिकृत ठिकाणी लागलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या हटविण्याचे काम असलेल्या महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे आहे. परंतु, महापालिका प्रशासन या अनधिकृत ‌खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्ता वसुली करण्यावरच भर देत असल्याचे खुली चर्चा आहे. त्यातच रस्त्यावरील अनधिकृत खाद्य पदार्थांची गाडी हटविणे हे पोलिसाचे नव्हे तर महापालिकेच काम असल्याने महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी सामान्यांकडून केली जात आहे.

सातपूरसह नवीन नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची लोकवस्ती आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या सातपूर भागात अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. यात सातपूरच्या सर्वच मुख्य रस्त्याला लागून अनधिकृतपणे चायनिस व अंड्डाभुर्जी गाडी चालक व्यवसाय करतांना दिसतात. विशेष म्हणजे अनधिकृत खाद्य पदार्थांच्याच गाड्यांवर टवाळखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीचेच जास्त जमा होतात. याबाबात 'मटा'ने चायनिज, अंडाभुर्जीच्या गाड्यांवर कारवाई कोण करणार? असे वृत्त प्रसिद्ध केल्यावर पोलिस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. सातपूर पोलिसांनी चायनिज आणि अंडाभुर्जी विक्रत्यांना नोटीसा बजावल्या. परंतु, अनधिकृत ठिकाणी चायनिज, अंडाभुर्जी विक्री करणाऱ्या गाड्यांचे अतिक्रमण काढण्याचे काम पोलिसांचे नसून ते महापालिकेचे असल्याने पोलिसांना कारवाई करतांना मर्यादा येत आहेत. असे असतांना महापालिकेचा अतिक्रमण विभाग अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून हप्ते वसुली करण्यावरच भर देत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. टवाळखोरांचे अड्डे बनलेल्या चायनिज व अंडाभुर्जीच्या गाड्यांवर कामयस्वरूपी कारवाई महापालिका आयुक्तांनीच लक्ष घालत करण्याची मागणी सातपूरकरांनी केली आहे.

नवीन नाशिकमध्येही कारवाईची मागणी

नवीन नाशिक सिडकोत अनधिकृत ठिकाणी लागत असलेल्या अंडाभुर्जी व चायनिजच्या गाड्यांमुळे नगरसेवक संताप व्यक्त करतात. यात नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सिडकोच्या प्रभाग बैठकित नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी महापालिकेचे अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी चायनिज व अंडाभुर्जीच्या गाडीवाल्यांकडून हप्ते वसुली करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अनधिकृत गाड्या काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे यंत्रणा असून देखील नवीन नाशिकमधील शेकडो अंडाभुर्जी व चायनिजच्या गाड्या लागत असल्याचे जायभावे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिस प्रशासन व महापालिका यांनी संयुक्त मोहीम राबवत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

गरीबांना व्यवसाय करू द्यावा यासाठी महापालिका प्रयत्न करत असतात. परंतु, अनधिकृत चायनिज व अंडाभुर्जी विक्रेत्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांवरच टवाळखोरांची अधिक गर्दी असते.

- सचिन मोरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाच्या कारला अपघात

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर रविवारी सकाळी सात वाजता नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या इनोव्हा कारला ट्रकने धडक दिली. यात दिनकर पाटलांसह त्यांचे तीन मित्र थोडक्यात बचावले. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

रविवारी सकाळी दिनकर पाटील हे इनोव्हा (एमएच १५ इपी ६४५३) कारने खासगी कामासाठी जामनेर येथे होते. पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर इनोव्हा कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नाशिकहून उत्तर प्रदेशात निघालेल्या मालट्रकने (यूपी ७८ सीटी ३५७०) धडक दिली. जोरदार धडकेमुळे इनोव्हाचा काही भाग ट्रकमध्ये अडकला. बारा चाकी लोडेड ट्रकने इनोव्हास दहा ते बारा फूट ओढत नेले. नशीब बलवत्तर असल्याने इनोव्हा टोलगेटच्या पायऱ्यांना अडकली. दिनकर पाटील यांच्या अंगरक्षकाने इनोव्हा बाहेर उडी घेऊन ट्रक थांबवली. यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images