Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दगडफेकीआड लूट

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैलेश सासे या तरूणाच्या खूनाच्या घटनेनंतर साठे चौकातील किटकॅट वाईन शॉप दुकानाजवळ दगडफेक करण्यात आली. रविवारी रात्री घडलेल्या या दंगलीचा फायदा घेत वाईन शॉपमधील साडेसात लाख रूपये लुटले. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

याप्रकरणी भद्रकाली पोलिस दिलेल्या माहितीनुसार, भोई गल्ली येथे राहणाऱ्या शैलेश सासे या तरूणाचा रविवारी रात्री तीन अज्ञात तरूणांनी चाकू हल्ला करून खून केला. मासे विक्रीचा व्यवसाय करणारा शैलेश भोई गल्ली येथे राहत होता. शैलेशवरील हल्ल्याची माहिती समजताच भोई गल्लीतील जमावाने सुरूवातीस साठे चौक व नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. दरम्यान, साठे चौक येथे दगडफेक व तोडफोडीचा प्रकार सुरू असताना भोई गल्ली येथे राहणाऱ्या सनी जालिंदर सासे व राहूल देवा ठाकरे या दोघांनी किटकॅट वाईन शॉपमध्ये घुसून गल्ल्यात ठेवलेले साडेसात लाख रूपये चोरी केले. दगडफेकीच्या घटनेने घाबरलेले वाईन शॉपचे मॅनेजर व नोकर आतल्या बाजूस लपले असताना चोरीचा प्रकार घडला. सुदैवाने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सनी व राहुलचा सहभाग असल्याचे निष्पण झाल्याने पोलिसांनी त्यांना मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रूपये जप्त करण्यात आले असून, त्यांना संध्याकाळी कोर्टासमोर हजर करण्यात आले. चोरी केलेली इतर रक्कम जप्त करण्याचे काम सुरू असल्याने सरकारी वकीलांनी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजुचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

खुनातील आरोपी फरार

दरम्यान, शैलेश सासे खून प्रकरणातील तिघा संशयिताची ओळख पटली असून, यातील एकावर पूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खुनाच्या घटनेनंतर संशयितांनी फरार झाले असून, पोलिसांचे दोन ते तीन पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. संशयितांची ओळख पटली असल्याने ते जास्त काळ चकमा देऊ शकणार नाही, असे तपासी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

लूट 'अंधारातच'

पंड‌ित कॉलनी परिसरातील ठक्करनगर येथे झालेल्या १७ लाख ७६ हजार रूपयांच्या लूट प्रकरणात पोलिसांना मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही धागेदोरे सापडलेले नाहीत. खंडू शिरसाठ या वाहनचालकाला मारहाण करीत दोन बाईकवर आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळीने रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पैसे लंपास केले होते. लुटीचे पैसे एका मद्य व्यवसायिकाचे असून, त्यांचे शहर व जिल्ह्यात मिळून तब्बल १५ वाईन शॉप्स आहेत. यातील काही वाईन शॉप्समधील पैसे घेऊन शिरसाठ मद्य व्यावसायिकाच्या घरी चालले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘क्रॉम्प्टन’ प्रश्नी आज चर्चा

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन आठवड्यांपेक्षाही अधिक कालावध‌ीपासून क्रॉम्प्टन ग्रीव्हज या आघाडीच्या कंपनीत धगधगत असलेल्या संपाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी मध्यस्थी करणार आहेत. सीटूने केलेल्या आवाहनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच मंचावर कंपनी व्यवस्थापन आणि संपकर्ते कामगार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न आज (दि.३) दुपारच्या बैठकीत करणार आहेत.

वेतनावाढीच्या कराराहून क्रॉम्प्टनमध्ये सुरू झालेला संप चिघळत चालला आहे. संपकर्त्यांचा संपच बेकायदेशीर असल्याचा दावा करीत कंपनीने नाशिकच्या औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. तर, बहुसंख्य सदस्यांचा दावा करीत सीटू प्रणित युनियनने त्यांच्याशीच पगाराच्या कराराविषयी बोलण्याचा मुद्दा अग्रणी ठेवला आहे. विशेष म्हणजे सीटू प्रणीत आणि आयटक प्रणीत या दोन्हीही समान विचारधारेच्या युनियन्समधील मतभेदांमुळे तोडगा निघणे मुश्कील झाले आहे. या संदर्भात कायद्याच्या चौकटी न ओलांडण्याची कंपनी व्यवस्थापनाची भूमिका आहे.

संप छेडल्यानंतर कंपनीकडून काही कामगारांवर हेतूपुरस्सर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा सीटू प्रणीत युनियनचा आरोप आहे. या कामगारांवरील कारवाई रद्द करावी, सीटू प्रणीत युनियनशीच पगार कराराची बोलणी करावी यासह विविध मागण्या संपकर्त्यांनी लावून धरल्या आहेत. या संपामध्ये कामगार उपायुक्तांसह स्थानिक खासदार आणि आमदारांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यास यश आलेले नाही. अंबड पोलिसांनीही कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करीत चर्चा आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या चर्चेसही व्यवस्थापनाच्या वतीने प्रतिनिधी उपस्थित राह‌िले नाहीत. यामुळे ही चर्चा बारगळली आहे.

चर्चेचे फलित काय ?

शहराच्या औद्योगिक वर्तुळातील आघाडीच्या कंपनीत सुरू झालेला संप मिटावा, ही अपेक्षा उद्योग वर्तुळाकडून करण्यात येत आहे. यासाठी औद्योगिक संघटनांसह लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासनानेही प्रयत्न केले. मात्र या तीन आठवड्यांच्या कालावधीत चर्चा घडून आलेली नाही. संपकर्त्यांच्या भूमिकेवर कायदेशीर मुद्द्यांच्या आधाराने बोट ठेवत कंपनीने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच याबाबत सुनावणीही होणार आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने या विषयावरील चर्चेत सहभागी व्हावे का, असा सवालही कंपनी व्यवस्थापना समोर असणार असल्याची चर्चा आहे. याच भूमिकेतून यापूर्वीच्या चर्चेत कंपनी व्यवस्थापन सहभागी झालेले नाही. यामुळे आज जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बोलाविलेल्या बैठकीत व्यवस्थापनाच्या वतीने कुणी उपस्थित राहणार का? असाही सवाल कामगारांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक निवडणूक

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत चुरशीच्या बनलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर बुधवारी (दि. ३) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी इच्छुकांची तयारी केली असून जिल्हाभरातील बँकेच्या सभासद आणि खातेदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

निवडणुकीसाठी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येईल. सकाळी ११ ते ११.४५ या वेळेत अर्जांची छाननी, ११.४५ ते १२ वाजेदरम्यान अर्जमाघारी झाल्यानंतर दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत मतदान होणार आहे. यानंतरच्या टप्प्यात मतमोजणी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली.

अध्यक्ष व उपाध्यक्षपद वर्षभराचे ठेवण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांसह माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या निवडणुकीत रस घेतल्याने निवडीबाबत चुरस वाढली आहे. सद्यस्थितीत अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्या दोन्हीही पॅनल्सकडे नसलेले बहुमत आणि अध्यक्षपदावरील दावेदार नावांना काही तटस्थ संचालकांचा असणारा विरोध यामुळे आजच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचे चित्र अनिश्चितच आहे. ऐनवळी सत्तेच्या सारीपाटावरील बदलणारे मोहरे आडाख्यांची दिशाही बदलून टाकण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल : सकाळी ११ ते ११.३०

अर्ज छाननी : सकाळी ११ ते ११.४५

अर्ज माघारी : सकाळी ११.४५ ते १२

मतदान : दुपारी १२ ते १२.४५

मतमोजणी : दुपारी १२.४५ पासून पुढे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत होणार फेरबदल?

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करतानांच जुन्या व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले. येत्या काळात पक्ष विस्तार करण्यासोबतच शेतकऱ्यांचा प्रश्नांवर तीव्र आंदोलन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

अॅड. पगार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत जिल्हाभर 'राष्ट्रवादी'चे संघटन उभारले असून त्यामुळेच गेल्या पंचवार्षिकमधील तीन आमदारांची संख्या मोदी लाट असतांनादेखील चारवर नेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक क्रमांकाची मते 'राष्ट्रवादी'ला मिळाली आहेत. राज्यात व केंद्रात सतांत्तर झाल्याने जिल्हाध्यक्षपदाची दुसरी इनिंग सुरू करतांना आगामी काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी भाजपा सरकारला जागे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही पगार यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी उदासीन असल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे पगार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मॅगीविरोधी मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मॅगी' या नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टवरून देशभरात उठलेल्या वादळावरून शहरातही याविरुद्ध मोहीम सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे नाशिकमध्ये या पार्श्वभूमीवर सर्व्हे करण्यात येत असून विविध ठिकाणांहून याचे नमुने गोळा केले जात आहेत. येत्या काही दिवसात हे सर्व नमुने अभ्यासून पुढे कारवाई केली जाणार आहे.

शहरातील विविध ठिकाणांहून हे नमुने गोळा करण्यात येणार आहे. या सर्व्हेमध्ये सर्व नमुन्यांची तपासणी होणार आहे. 'मॅगी'मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्यानंतर उत्तर प्रदेशातील एफएसडीए या अन्नपदार्थ नियंत्रक यंत्रणेने बाराबंकी येथील स्थानिक कोर्टात नेस्ले कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या कारवाईनंतर मॅगीने भारतातील मॅगीची सर्व पॅकेट्स परत मागवली होती. फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड‍्स ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फेही याबाबत सर्व्हे सुरू झाला आहे. तर, 'मॅगी'ची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीटी झिंटा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठीच राज्यभरात मॅगीचे नमुने अभ्यासले जाऊन त्यात आढळणाऱ्या पदार्थांवरून पुढील कारवाई केली जाणार आहे. यामध्ये मॅगीमधील एमसीजी आणि शिसे याव्यतिरिक्त इतर नमुन्यांचीही तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. केरळमध्ये मॅगीच्या विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.

तपासणी सुरूच!

महाराष्ट्र एफडीएनेही पंधरवड्यापूर्वी मुंबई, पुणे व नागपूर येथून मॅगीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या नमुन्यांची मुंबई व पुणे येथील प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू आहे. तपासणीचे निष्कर्ष अद्याप हाती आलेले नाहीत, असे एफडीएचे सहआयुक्त वंजारी यांनी सांगितले. नमुने तपासणीत नैसर्गिक घटक व रासायनिक स्रोत यांच्यासाठी वेगवेगळी प्रक्रिया करावी लागत असल्याने विलंब होत असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मॅगीचे नाशिक शहरातील नमुने जमा करून त्यांचा अभ्यास केला जाणार आहे. या मॅगीच्या नमुन्यांमधील निकष निघाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. - चंद्रकांत पवार, जॉईंट कमिशनर, अन्न व औषध प्रशासन

दिल्लीत मॅगीचे नमुने 'असुरक्षित'

मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याने देशभरात 'मॅगी'च्या नमुन्यांची तपासणी सुरू असतानाच, दिल्लीतील 'मॅगी'चे नमुने असुरक्षित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे 'मॅगी'ची निर्माती कंपनी नेस्ले इंडियाच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी दिल्ली सरकारने चालवली आहे. दिल्ली सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्याचवेळी केरळ सरकारने 'मॅगी'वर बंदी घालत राज्यभरातील दुकानांमधून 'मॅगी'ची पाकिटे जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. एकीकडे दिल्ली व केरळ सरकारने 'मॅगी' विरोधात कठोर कारवाई सुरू केली असतानाच, हरयाणा सरकारने राज्याच्या विविध भागांतून 'मॅगी'चे नमुने जमा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम बंगाल सरकारनेही या प्रकरणी आज, बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दिल्लीतील 'मॅगी'चे नमुने असुरक्षित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे 'मॅगी'ची निर्माती कंपनी 'नेस्ले इंडिया'च्या विरोधात कारवाई करण्याची तयारी दिल्ली सरकारने चालविली आहे. दिल्ली सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी स्वच्छता मोहीम

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात जय्यत तयारी सुरू असून, विविध स्तरावर लोक एकत्र येऊन शहरात स्वच्छता करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येत आहेत. नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संस्थांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार असून, यामध्ये नाशिककरांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नद्यांची स्वच्छता करण्याबरोबरच संवर्धनासाठी वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवले जाणार आहेत. नाशिकच्या जनतेसाठी गोदावरी जीवनवाहिनी असून, गोदावरी स्वच्छता मोहिमेसाठी नागरिकांनी ५ जून रोजी एकत्र यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. नाशिककर गोदावरीचे पाणी वापरतात, मात्र नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यात फारसा सहभाग नोंदविला जात नाही. नदीचे पाणी निर्मळ रहावे म्हणून नदी किनारी जाऊन स्वच्छतेसाठी योगदान देण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांना ५ जून रोजी सकाळी पावणेसात वाजता हजर राहून नदीची सेवा करण्याची चांगली संधी आहे. शहरातील अनेक नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रमुख अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहून नदी स्वच्छता अभियान राबविणार आहेत. नागरिकांनी झाडू, कचरा भरण्यासाठी गोणी, हातमोजे, आदी साहित्यासह उपस्थित राहून सेवावृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

एका व्यक्तीने दहा किलो कचरा काढल्यास पंधरा हजार मनुष्यबळ एका दिवसात १५० टन कचरा स्वच्छ करू शकेल, त्यासाठी सर्व नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे. स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था किंवा मंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ कक्षात २३१९९१५ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचा सहभाग

हरित कुंभअंतर्गत नाशिकमधील सेवाभावी संस्था तसेच प्रशासनाचा सहभाग असणार आहे. यामध्ये नासर्डी आणि वाघाडी या गोदावरी नदीला मिळणाऱ्या नद्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यामध्ये या दोन्ही नद्यांच्या उगमस्थानापासून ते गोदावरीतील संगमापर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेमध्ये विविध टप्प्यांवर कामाचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणदिनानिमित्त नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संस्थांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये वनविभाग आणि संस्था एकत्र येऊन वनमहोत्सव साजरा करणार आहे. सातपूर-गंगापूर भागातील डोंगरावर लोकसहभागातून दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला भाविकांचे काय?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रशासनाने योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. महिला संन्यास्तांसोबत भाविक महिलांना गोदावरी स्नानाची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने काही नियोजन करणे आवश्यक आहे', असे मत श्री महंत तपोमूर्ती परमहंस सद् गुरु श्री वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत त्यांनी संवाद साधला.

संन्यास घेतल्यानंतर स्त्री पुरुष असा भेद नसतो हे वेणाभारती यांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु समाजाच्यादृष्टीने मात्र हा भेद इथेही लागू केला जातो. त्यामुळे पुरुषांपेक्षा संख्येने कमी असल्या तरी आज महिला संन्यास्तांची संख्याही नोंद घेण्यासारखी आहे. विविध आखाड्यांमध्ये शाही स्नानादरम्यान त्यांची उपस्थिती असल्याचे त्या म्हणाल्या. महिला संन्यास्तांसाठी कुंभमेळ्यादरम्यान वेगळी व्यवस्था आजवर करण्यात आलेली नाही. त्याची तशी फारशी गरज नसली तरी महिला भाविकांसाठी मात्र अशी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुरुष साधुसंतांच्या स्नानाच्या वेळेनंतर काही वेळाने महिला संन्यस्तांना राखीव वेळ दिल्यास त्यांच्यासोबत महिला भाविकांनाही हा लाभ घेणे शक्य होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रशासनाच्या पातळीवर रंगरंगोटी, रस्ते, वाहतुकीच्या सेवा अशी कुंभमेळ्याची विविध कामे सुरू आहेत. परंतु कुंभमेळ्याचे अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्या दृष्टीने कोणतीच तयारी सुरू नसल्याचे मत वेणाभारती यांनी व्यक्त केले. गोदावरी नदी ही कुंभमेळ्याचे केंद्रस्थान असूनही तिच्या स्वच्छतेकडे व प्रदूषणमुक्तीकडे कानाडोळा केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आध्यात्मिक पातळीवर कुंभमेळ्याचे महत्त्व जाणून घेऊन त्यादृष्टीने तयारी होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतभरातून येणारे साधुसंत नाशिकचा भौतिक विकास पाहण्यासाठी नव्हे तर गोदीवरीमध्ये स्नान करण्यासाठी येणार असल्यामुळे गोदावरी स्वच्छता आणि कुंभमेळ्याचा मूळ हेतू प्रशासनासह नाशिककरांनीही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. शहराचा विकास गरजेचाच आहे, परंतु तो साधण्याच्या नादात कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व कमी करणे योग्य नाही असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ कोटींची अफरातफर

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदीकडे लेखा विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाभरात सुमारे १३ पतसंस्थांमध्ये सुमारे १५ कोटींच्या रकमेची अफरातफर झाल्याची आकडेवारी सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी ४३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती लेखा विभागाच्या सुत्रांनी दिली.

जिल्हास्तरीय शासकीय कृती समितीची प्रत्येक महिन्यात बैठक होते. यंदा मात्र या बैठकीला तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर मुहूर्त लागला. अप्पर जिल्हाधिकारी पालवे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील अडचणीतील नागरी बँका आणि पतसंस्था यांच्यावरील कायदेशीर कारवाईबाबत चर्चाही या बैठकीत करण्यात आली.

शासकीय लेखा परीक्षण विभागाने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रलंबित दाव्यांचे निकाल लवकर लावण्यात यावेत यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असा सूरही या बैठकीत निघाला. श्रीराम बँकेमध्ये ससुमारे ७० कोटी ६३ लाखांच्या अफरातफरीचा गुन्हा प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. झुलेलाल पतसंस्थेच्या १७ कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विनायक सहकारी पतसंस्थेवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तर कपालेश्वर पतसंस्थेच्या जप्त मालमत्ता विक्री संदर्भात पाठपुरावा करण्याचाही निश्चय यावेळी करण्यात आला. श्रीराम बँकेची कलम ८८ ची चौकशी सेवानिवृत्त होणाऱ्या लेखापरीक्षकांनीच करावी, क्रेड‌िट कॅपीटल पतसंस्थेच्या अवसायक मंडळाने चार्ज घेऊन कामकाज त्वरीत सुरू करण्यात यावे, साही निर्णय यावेळी घेण्यात आला. अग्रसेन पतसंस्थेच्या कलम ८८ ची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीसाठी अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर, समितीचे प्रभारी सचिव गोपाळराव मावळे, नाशिक प्रांत रमेश मिसाळ, शासकीय लेखा परीक्षक टी. जी. वरखेडे, विशाल ठाकूर, भूषण जाधव यांसह अधिकारी व प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

सहकार विभागाच्या विकासास मारक ठरणाऱ्या अपप्रवृत्तींवर कायदेशीर कारवाईची नितांत गरज आहे. कारवाईच्या भूमिकेतून या अपप्रवृत्तींवर वचक बसवा, या दृष्टीने दीर्घ कालावधीनंतर पार पडलेली जिल्हास्तरीय शासकीय कृती समितीची बैठक महत्वाची आहे. - पां.भा.करंजकर, अशासकीय सदस्य, जिल्हास्तरीय शासकीय कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदिरातून चंदनचोरी

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराचे ग्रामदैवत असलेल्या मुंबई नाका परिसरातील श्री कालिका माता मंदिराच्या आवारात मंगळवारी पहाटेच्या सुमाराला चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे जगदंबेच्या काकड आरतीसाठी जमत असलेल्या भाविकांना न जुमानता चंदनाचे झाड तोडून त्यांनी खोड पळवून नेले.

मंदिराच्या आवारातील चंदनाचे आठ फूट उंचीचे झाड मात्र चोरट्यांच्या नजरेत आले. पहाटे पाच वाजेच्या सुमाराला या मंदिरात काकड आरती होते. मंगळवारीही पहाटेच्या सुमाराला आरतीची लगबग सुरू असताना मंदिराच्या गेटमधून प्रवेश करीत चंदन चोरट्यांनी कुऱ्हाडीच्या सहाय्याने चंदनाच्या वृक्षावर जोराचे प्रहार केले. या चार चोरट्यांच्या प्रहाराने आठ फुटी वृक्ष काही मिनिटांतच कोसळला. हा प्रकार लक्षात येऊन भाविक व पुजाऱ्यांनी प्रतिकार करेपर्यंत चंदन वृक्षाचे खोड घेऊन या चोरट्यांनी पोबारा केला. चोरटे मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. याबाबत श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कुठे आहेत?

श्री कालिका देवी मंदिर परिसर हा शहराचा मध्यवर्ती परिसर आहे. येथून जवळच असलेले महामार्ग आणि ठक्कर बझार ही दोन्हीही बसस्थानके, मुंबई आग्रा महामार्गाकडे जाणारे मार्ग आणि शहरातील उपनगरांना जोडणारे मध्यवर्ती रस्ते यामुळे या परिसरात रात्रंदिवस प्रवासी व नागरिकांची वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकांसह मुंबई नाका परिसरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्ह्याला बळी पडणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक प्रवासी असल्याने प्रत्येक वेळी ते पोलिस ठाणे गाठत नाहीत, याचाही फायदा येथील टोळक्यांना होतो आहे. या परिसरातील चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अन् येथे गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांनी 'मटा' शी बोलताना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे विमानसेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल सहा आणि सात तास करावा लागणारा नाशिक ते पुणे प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत होणार आहे. येत्या १५ जूनपासून नाशिक ते पुणे या मार्गावरील सीप्लेनची विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे विमानसेवेबाबत असलेली नाशिककरांची तीव्र प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. शिवाय सिंहस्थ काळात नाशिककरांना सी प्लेनमधून नाशिक दर्शनचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.

ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल सज्ज आहे तर गंगापूर धरणाच्या ठिकाणी सीप्लेन सेवेची चाचणी झाली आहे. अशी स्थिती असतानाही नाशिककरांना विमानसेवेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अखेर ओझर (नाशिक) ते लोहगाव (पुणे) ही विमानसेवा येत्या १५ जूनपासून सुरू करण्याची घोषणा मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिस प्रा. लि. (मेहेर)चे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा आणि संचालक एस. के. मन यांनी मंगळवारी नाशकात केली आहे. या दोघांनीही ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक (तान)च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विमानसेवेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव, कार्याध्यक्ष सागर वाकचौरे, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, माजी अध्यक्ष जयेश तळेगावकर उपस्थित होते. नाशिकहून कुठली विमानसेवा सुरु करणे योग्य राहिल, नाशिक-मुंबई सेवेला प्रतिसाद मिळेल का, नाशिक-पुणे सेवा प्रभावी आहे का, अशा विविध बाबींवर त्यांनी चर्चा केली. त्यानुसार नाशिक ते पुणे ही सेवा सुरू करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

विमानसेवेला प्रतिसाद मिळावा यासाठी नाशिकमधील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी (५ मे) ला बैठक घेण्यात येणार आहे. त्यात येणाऱ्या विविध सूचना आणि प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. नाशिक ते औरंगाबाद तसेच इतर शहरांचीही सेवा त्यामुळे सुरु होऊ शकणार आहे. नाशिकप्रमाणे पुणे आणि मुंबई येथेही बैठका घेण्यात येणार असून त्याद्वारे तेथील प्रतिसादही विमानसेवेला मिळू शकणार आहे.

सात हजार रुपये भाडे

मेहेरकडे असलेल्या ९ आसनी विमानाद्वारे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता ओझरहून विमान निघेल ते सकाळी ९ वाजता लोहगाव येथे पोहचेल. तेथून पुन्हा ९.१५ ला निघून १०.१५ ला ते ओझर येथे येईल. अशाच प्रकारे संध्याकाळी सेवा देता येईल, अशा प्रकारची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे दिवसातून दोनदा पुण्यासाठीची विमानसेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. साधारणपणे सात हजाराच्या आसपास नाशिक-पुणे सेवेचे भाडे राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात हे भाडे कमी ठेवून त्यानंतर ते वाढविले जाणार आहे.

विमानसेवेसाठी आवश्यक त्या परवानग्या आम्ही घेतल्या आहेत. येत्या १५ जूनपासून ९ आसनी सी प्लेनची सेवा नाशिक ते पुणे देण्याचे आम्ही निश्चित केले आहे. त्यास भरघोस प्रतिसाद लाभेल, अशी आम्हाला खात्री आहे. - सिध्दार्थ वर्मा, सहसंस्थापक मेहेर

येत्या कुंभमेळ्यात नाशिककरांना आणि पर्यटकांना हवाई दर्शन करता यावे यासाठीही मेहेर कंपनीने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे नाशिक दर्शनची अनोखी संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. - दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करआकारणीतही गैरव्यवहार?

0
0

नाशिककर हैराण; महापालिका कर्मचाऱ्यांकडून सेटलमेंटची ऑफर

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेच्या सातपूर विभागातील घरपट्टी व पाणीपट्टी अनियमित येत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. यामध्ये घरपट्टी व पाणीपट्टी अनियमित येतांना अधिक येत असतांना सातपूर विभागातच काम करणारे कर्मचारी सेटलमेंटचीच भाषा करत असल्याची कैफियत नागरिक मांडत आहेत. या प्रश्नी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी लक्ष घालून सुधारणा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिकच्या वाढत्या शहरी करणात सातपूरचा चारही बाजूंनी विकास झाला आहे. यात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मोठ, मोठी संकुले सातपूर विभागात उभारली आहेत. असे असतांना मात्र घर घेणाऱ्या किंवा बांधणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय तो महापालिकेतील सातपूरच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा. दोन वर्षांपूर्वी विविध कर विभागातील एका कर्मचाऱ्याने वाढीव कर कमी करण्यासाठी पैसे मागितल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. असे असतांना देखील घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील कर्मचारी कामात सुधारणा करण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सातपूर परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, तो अनियमित आकारणी करण्यात आलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीचा. याबाबत नागरिक सातपूरच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागात माहिती घेण्यासाठी येतात. परंतु, 'साहेब बाहेर गेले आहेत, तुम्ही नंतर या' अशी उडवाउडवीची उत्तर ऐकायला मिळतात, असे नागरिकांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांनी ग्राहकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, महापालिकेचेच घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील कर्मचारी नागरिकांवर लाच मिळविण्यासाठी दबाब आणत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सातपूर विभागातील घरपट्टी व पाणीपट्टीच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची मागणी होत आहे.

मनपा कर्मचाऱ्याकडेच पैशाची मागणी

सातपूर विभागात कार्यरत असलेल्या महापालिकेच्याच कर्मचाऱ्याकडे घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वीच घराचे बांधकाम केले होते. याबाबत विभागीय अधिकारी देखील संबधित कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तक्रारदार कर्मचाऱ्याने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईचा बळी

0
0

विवाहितेचा पाणी भरताना विहिरीत पडून मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, घोटी

धरण उशाशी जनता मात्र उपाशी अशी अवस्‍था इगतपुरी तालुक्याची झाली आहे. धरणांचा तालुका अन् धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावात पाणीटंचाईचा पहिला बळी गेला. पुनर्वसित पिंपळगाव भटाटा या गावात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने संपूर्ण गाव पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर जाते. आईच्या आजारपणात आधार म्हणून माहेरी आलेल्या विवाहित महिलेला पाणी मिळविताना विहिरीत पडल्याने जीव गमवावा लागला.

वाकी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या पिंपळगाव भटाटा येथे यमुनाबाई बचू पारधी (वय ३५) या महिलेचा पाणी काढताना तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला. अन्य महिलांनी तिचा जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली. मात्र वेळीच मदत मिळू न शकल्याने तिला जीव गमवावा लागला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. इगतपुरी तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखड्यात पिंपळगाव भटाटा या गावाचा समावेश असतो. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही.

गाव पुनर्वसनात असल्याने व योजना चालू असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे या गावाची कोंडी झाली आहे. मे महिना कसाबसा निघाला मात्र पाऊस लवकर झाला नाही तर पाण्याची स्थिती आणखीनच बिकट होणार आहे.

वाकी खापरी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटू शकलेला नाही. पाणीटंचाईची ही स्थिती सोडविण्यासाठी प्रशासनाकडूनही ठोस उपाय योजण्यात आलेले नाहीत. पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरीवर पाणी भरणे अधिक धोकादायक झाले आहे. प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधीही या पुनर्वसित गावांबाबत उदासीन आहेत. यामुळे धरण उशाशी राहूनही ग्रामस्थांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. पाऊस लांबला तर आणखीच भटकंती वाढणार आहे.

पाण्यासाठी भटकंती

इगतपुरी तालुक्यात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. लहान मुलांना हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात पाण्याची वाट पहावी लागत आहे. या आदिवासी मुलांचे आईवडील मजुरीवर जात असल्याने भर उन्हात या मुलांना दुपारच्या वेळेत हातपंपावर पाण्यासाठी वेळ काढावी लागते. विशेष म्हणजे भूगर्भातील पाण्याची पातळीने तळ गाठल्याने हातपंपाला पाणी येणार कोठून? अथक प्रयत्नाने एखादा हंडा भरतो. यामुळे पालक कामावर गेल्यावर लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देईल का, असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला आहे.

पहाटे पाच वाजता घटना घडली असता ग्रामसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना कल्पना देवून देखील कोणाही घटनास्थळी पोहचले नाही. पाण्यासाठी बळी गेलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करावे. - भगवान मधे, श्रमजीवी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानसेवेला एअर स्पेसचा अडसर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकहून पुणे प्रस्तावित असलेल्या विमानसेवेला पुण्याच्या एअर स्पेसचा अडसर येण्याची चिन्हे आहेत. पुण्याची एअर स्पेस सकाळी ८ ते १० या वेळेत उपलब्ध नसल्याने नाशिकहून सकाळी सेवा केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न आहे.

पाणी आणि जमीनीवर उतरू शकणाऱ्या ९ आसनी सीप्लेनची सेवा सुरू करण्याची मेहेर कंपनी इच्छा प्रदर्शित केली आहे. सीप्लेनची विमानसेवा नाशिक ते पुणे या मार्गावर येत्या १५ जूनपासून सुरू करण्याचे कंपनीचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत नाशिक ते पुणे किंवा पुणे ते नाशिक प्रवास हा सहा ते सात तासांचा आहे. मात्र, या विमानसेवेमुळा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे या विमानसेवेबाबत नाशिककरांना मोठी उत्सुकता आहे.

सकाळी ८ वाजता ओझर विमानतळावरुन विमान निघेल ते सकाळी ९ वाजता लोहगाव येथे पोहचेल. तेथून पुन्हा ९.१५ ला निघून १०.१५ ला ते ओझर येथे येईल, अशी सेवा विचाराधीन आहे. मात्र, सकाळी ८ ते १० या वेळेत पुण्याची एअर स्पेस उपलब्ध नसते, असे हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवाई दलाच्या विमानांचे प्रात्यक्षिक या काळात सुरू राहत असल्याने या दोन तासात सध्या तेथून कुठल्याही प्रकारची प्रवासी विमानसेवा सुरू नाही. त्यामुळे नाशिकच्या प्रवासी विमानसेवेची वेळ बदलण्याची शक्यता आहे.

सकाळी सातचा मुहूर्त

ओझर विमानतळाहून सकाळी सातला सेवा सुरू केली तर हे विमान ७.४५ ला पुण्याच्या लोहगाव विमानतळावर पोहचू शकणार आहे. सकाळी ८ ते १० परवानगी नसल्याने पुण्याहून विमान सकाळी १०.१० वाजता निघेल आणि सकाळी ११ वाजता ओझर येथे पोहचेल, अशा प्रकारचा पर्याय विमानसेवेला उपलब्ध होऊ शकणार आहे.

टर्मिनलचे टेंडरच नाही

ओझर विमानतळाच्या भव्य पॅसेंजर टर्मिनलची देखभालीसाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) अद्याप टेंडर प्रसिद्ध केलेले नाही. यापूर्वी टर्मिनलची मालकी राज्य सरकारकडे होती. आता ते एचएएलकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. तरीही या टर्मिनलचे टेंडर काढण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विमानसेवेसाठी उद्या बैठक

विमानसेवेला प्रतिसाद मिळावा यासाठी नाशिकमधील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी (दि. ५) बैठक घेण्यात येणार आहे. त्यात येणाऱ्या विविध सूचना आणि प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. या बैठकीला शहरातील विविध संस्था-संघटनांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके येथे सायंकाळी चार वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मेहेर कंपनीचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा, संचालक एस. के. मन, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक (तान) चे अध्यक्ष दत्ता भालेराव व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’ मंजुरीसाठी एकजूट ठेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शेतकरी आणि मिळकतधारकांच्या अभूतपूर्व एकजुटीमुळेच शहर विकास आराखड्यातील (डीपी) अन्याय दूर झाला आहे. नवा आराखडा तयार झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. ती मिळेपर्यंत सर्वांनी एकजूट ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वास्तु अभियंता आणि शासकीय तांत्रिक सल्लागार उन्मेष गायधनी यांनी केले आहे.

शहर विकास आराखडा अन्याय निवारण समितीच्या बॅनरखाली शेतकरी आणि मिळकतधारक एकत्र आले. समितीतर्फे नाशिकरोड येथे मेळावा झाला. त्यावेळी गायधनी बोलत होते. समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, अॅड. नितीन ठाकरे, डॉ. डी. जी. पेखळे, त्र्यंबकराव गायकवाड व्यासपीठावर होते.

गायधनी म्हणाले, की आराखड्यातील अन्याय दूर झाला असला तरी अजूनही बिल्डर लॉबीचा दबाव आहे. ते धनशक्तीचा वापर करत आहेत. कोर्टात जाण्याचीही त्यांची तयारी सुरू आहे. आराखडा तयार झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे जागरुकता निर्माण करण्यासाठी समिती मेळावे घेत आहे. अरिंगळे म्हणाले, की आराखड्याच्या विरोधात खोटा प्रचार सुरू आहे. शेतकरी आणि मिळकतधारकांची बांधकाम व्यावसायिक, विकसक दिशाभूल करत आहेत. त्यांच्या दबावामुळेच प्रशासनाने चुकीचा विकास आराखडा तयार केला होता. ठाकरे म्हणाले, की न्याय देणाऱ्या आराखड्यालाच अंतिम मंजुरी मिळावी यासाठी शेतकरी आणि मिळकतधारकांनी दबाव कायम ठेवला पाहिजे. त्र्यंबकराव गायकवाड, अॅड. भास्कर निमसे, मधुकर गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

आराखड्याबाबत मंगळवारी व्याख्यान

शहर विकास आराखड्यातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी कृती समितीतर्फे मंगळवारी (दि. ९) उन्मेष गायधनी यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती निवृत्ती अरिंगळे यांनी दिली. रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी पाचला व्याख्यान होईल. हरकती नोंदविण्यासाठी मिळकतधारक व शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतीश खरे बनले २२ वे ‘संचालक’!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांनी २२ व्या संचालकाची भूमिका पार पाडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर लक्ष देण्याऐवजी माध्यमांना कसे दूर ठेवता यासाठी प्रयत्न केले.

सभागृहात संचालकांनी सर्रास नियमांची पायमल्ली केली. सभागृहात मोबाईल नेण्यास बंदी असतांनाही संचालक सर्रास सभागृहात सेटींग करतांना दिसून आले. आपल्या नेत्यांशी थेट मोबाईलवर बोलत होते. अध्यक्षपदासाठी सभागृहातच लॉबिंग सुरू होते. मात्र, या सर्व प्रक्रियेकडे लक्ष देवून हा प्रकार थांबवण्याऐवजी खरे यांनी माध्यमांचीच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उर्मटपणे व्यवहार करून 'चालते व्हा' असे फर्मानही सोडले. त्यांच्या या संशयास्पद कृतीमुळे सचांलकांना रान मोकळे होवून सभागृहाला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले. माध्यमांना चौथ्या स्तंभाचा दिलेला दर्जाच काढून घेण्याचा प्रयत्न खरे यांनी केल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

अध्यक्षपदाच्या माध्यमांतून सेवा करण्याची संधी मिळाली असून यापुढे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार आहे. सर्व संचालकांना सोबत घेवून शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबविण्यात येतील. कर्जमर्यादा वाढवणार आहे. छगन भुजबळांनी आपल्याला अध्यक्ष करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या सदस्यांना सोबत घेवून जिल्हा बँकेला पूनर्वैभव प्राप्त करून देईल.
- नरेंद्र दराडे, नवनिर्वाचित अध्यक्ष

जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच होत नाही.अध्यक्ष कोणीही असला तरी तो सर्वपक्षीय असतो. अध्यक्ष उपाध्यक्षांनी शेतकरी हिताचे काम केले तर त्यांना आमचा पाठिंबा राहील. मात्र, त्यांनी चुकीचे काम केले तर त्याला तीव्र विरोध करू.
- आ. अपूर्व हिरे, संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्ष, सांगा नेमके कुणाचे?

0
0

वर्चस्ववादाची लढाई; नरेंद्र दराडेंनाही सांगता येईना त्यांचा गट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर नरेंद्र दराडे नेमके कोणत्या गटाचे यावरून संचालकांमध्ये वर्चस्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी शेतकरी विकास पॅनलची साथ सोडणाऱ्या दराडेंनी निवडून आल्यानंतर मी सर्वपक्षीय गटाचा अध्यक्ष असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी दोन तासातच 'यू टर्न' घेत आपण शेतकरी विकास पॅनलचे अंग असल्याचे कोकाटेंच्या उपस्थितीत सांगितले. पुन्हा तासाभरात कोकाटेविरोधकांसोबत उपस्थित राहून आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत सर्वांचे अध्यक्ष असल्याचे सांगितले. दोन गटातील ओढाताणीत दराडे यांची कोंडी झाली.

जिल्हा बँकेत एकमेकांना शह देण्याच्या प्रयत्नात दराडे यांची ऐनवेळी अध्यक्षपदी वर्णी लागली. ते कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलमधून निवडून आले होते. मात्र, अध्यक्षपदासाठी त्यांनी हिरे विरोधकांशी हातमिळवणी केली. हिरे यांना विरोध असणाऱ्या आमदार अनिल कदम, शिवाजी चुंभळे, शिरीष कोतवाल, गणपतराव पाटील, नामदेव हलकंदर, परवेझ कोकणी, सचिन सावंत, केदा आहेर हे पाठीशी उभे राहिल्याने दराडे बिनविरोध निवडून आले.

निवडणुकीनंतर दराडे यांनी आपण सर्वपक्षीय संचालकाचे अध्यक्ष असल्याचे सांगून दोन्ही गटांना बरोबर घेवून बँकेचे कामकाज करणार असल्याचे सांगितले. मात्र, बँकेत आता तिसऱ्याच गटाची सत्ता आल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. तर धोबीपछाड मिळालेल्या हिरे, कोकाटे यांनी निवडणुकीनंतर काढता पाय घेतला.

दोन तासानंतर दराडे आणि कांदे यांनी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख असलेल्या कोकाटे कार्यालयावर हजेरी लावली. या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून कोकाटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आमच्याच गटाचे असल्याचे सांगितले. राजकीय खेळी खेळल्याने आमचा गटाचा अध्यक्ष झाला. आम्हीच दराडेंना दुसऱ्या गटात पाठविल्याचा दावा कोकाटेंनी केला. विशेष म्हणजे आम्हाला विचारूनच दराडे गेल्याचे त्यांनी सांगितले. तर दराडे यांनीही आपण शेतकरी विकास पॅनलचे अध्यक्ष असल्याचे सांगून आपल्याला छगन भुजबळांनी मदत केल्याचे सांगितले. आम्ही ठरवून ही खेळी केल्याचा दावा कोकाटे, दिलीप बनकर यांनी केला.

दराडेंची पुरती कोंडी

दोन गटात चाललेल्या या वर्चस्वाच्या लढाईत दराडेंची पुरती कोंडी झाली. दोन्ही गटांनी मदत केल्याने त्यांना स्पष्टीकरण देणेही अवघड जात आहे. आपण सर्वपक्षीय अध्यक्ष असल्याचे सांगता सांगता ते पुरते नाकीनऊ आले. तीन तासात त्यांना दोनदा कोलांटउड्या घ्याव्या लागल्या. सर्व संचालकांची मनधरणी करणेही त्यांना अवघड झाले.

आम्ही केलेली राजकीय खेळी यशस्वी झाली. दराडे आमच्या गटाचे असून आम्हीच त्यांना ठरवून तिकडे पाठविले. त्यामुळे सहा जण निवडून आले असतांनाही आता बँकेवर शेतकरी विकासची सत्ता आहे.
- माणिकराव कोकाटे, शेतकरी विकास पॅनल

दराडे शेतकरी विकासचे नसून ते आमच्या नव्या गटात आले आहेत. दोन्ही गटाचे उमेदवार मान्य नसल्याने आम्ही स्वतंत्र गट तयार करून ऐनवेळी दराडेंना संधी दिली आणि निवडून आणले. कोकाटेंनी चहाला बोलावून दराडेंची फसगत केली.
- आ. अनिल कदम, संचालक

कदम, कोतवालांची घालमेल

दराडे यांनी कोकाटे यांच्या कार्यालयात हजेरी लावल्याची माहिती समजताच अस्वस्थ झालेल्या आमदार अनिल कदम तसेच शिरीष कोतवाल, परवेझ कोकणी यांनी दराडे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. सोबतच कोकाटेंच्या कार्यालयातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. दराडेंच्या घरी पत्रकार परिषद घेत पुन्हा दराडे हे कोकाटे गटाचे नसल्याचा प्रयत्न कदम व कोतवाल यांनी केला. विशेष म्हणजे आपण चहा घेण्यासाठी गेल्याचा खुलासा दराडेंनी केला. त्यांना बोलावून कोकाटेंनी पत्रकार परिषद घेतली असली तरी त्यांना अंधारात ठेवल्याचा दावा कदम यांनी केला असून दराडे हे आता भुजबळ गटाचे असल्याचा दावा या सदस्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णव आखाडे करणार कुशावर्तात स्नान

0
0

अडीचशे वर्षांनंतर परंपरा होणार पुनरुज्जीवित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाहीस्नानाच्या मानाहून दोन पंथियांमध्ये झालेल्या ऐतिहासिक युध्दानंतर सुमारे अडीचशे वर्षांनंतर पहिल्यांदाच वैष्णव पंथीय आखाडे कुशावर्तातही शाहीस्नानाची पर्वणी साधणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी कुशावर्तातील शाहीस्नानाची पर्वणी साधत खंडित झालेली परंपरा यंदापासून पुनरुज्जीवित करीत असल्याची घोषणा महंत ग्यानदास यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

साधू समूहाच्या दोन पंथियांमध्ये सतराव्या शतकात वाद होऊन युध्द झाल्याची नोंद इतिहासात आहे. यातून झालेल्या हानीचा प्रकार पुन्हा उद्भवू नये यासाठी तत्कालीन राज्यकर्ते पेशव्यांनी मध्यस्थी करीत दोन्हीही पंथांना शाहीस्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून दिल्या होत्या. दोन्हीही पंथांनी हा निर्णय स्वीकारल्यानंतर सन १७५८ पासून वैष्णव पंथीय आखाडे त्र्यंबकेश्वरी कुशावर्तावर शाहीस्नानासाठी जात नसत. या गोष्टीला आता अडीचशे वर्षांचा कालखंड उलटला असून, पंचांग आणि प्रशासन यांच्या सहाय्याने पर्वणीच्या स्वतंत्र व राखीव तारखाही मिळाल्या आहेत. कुठेतरी खंडित झालेली प्रथा पुनरुज्जीवित करून श्रध्दा जपण्यास काय हरकत आहे, या भूमिकेतून आम्ही २५ सप्टेंबर २०१५ या प्रशासनाने आमच्यासाठी दिलेल्या आरक्षित दिवशी शाहीस्नानाची पर्वणी साधू, अशी भूमिकाही यावेळी महंत ग्यानदास यांनी मांडली. साधूंचा वाद सोडवून त्याबाबतच्या पेशव्यांच्या निर्णयाबाबतचे ताम्रपत्रही यावेळी महंतांनी दाखविले.

का झाली परंपरा खंडित ?

साधू समूहामध्ये वैष्णव आणि शैव पंथियांमध्ये शाहीस्नानाच्या मानाहून सन १७४६ मध्ये वाद झाले. त्यावेळी त्र्यंबक रस्त्यावरील बेजे गावानजीक कावनई आणि चक्रतीर्थ येथेही सिंहस्थाची पर्वणी होत असल्याचे काही संदर्भ आहेत. या ठिकाणी साधूंच्या वादातून मोठ्या प्रमाणावर हानी झाल्यानंतर हा तंटा पेशव्यांच्या दरबारी गेला. यावेळी गादीवर असलेल्या माधवराव पेशव्यांनी यात मध्यस्थी करीत सन १७५८ पासून दोन्ही पंथियांची शाहीस्नानाची स्वतंत्र व्यवस्था केली. तेव्हापासून हे दोन्हीही पंथ नेमून दिलेल्या ठिकाणीच पर्वणी साधत होते. तेव्हापासून कुशावर्तावर दोन्हीही पंथांनी स्नान करण्याची प्रथा खंडित झाली होती. मात्र, आता पर्वणी साधण्यासाठी दोन्हीही पंथांना स्वतंत्र वेळ मिळत असल्याने खंडित परंपरा पुनरुज्जीवित करण्यात गैर काय? असाही सवाल महंत ग्यानदान यांनी यावेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझं शाळेचं नक्की झालं’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भटक्या विमुक्त जमातीतील लेखिका विमल मोरे यांच्या 'तीन दगडांची चूल' या आत्मकथनातील एक प्रकरण बालभारतीने यंदा इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. भटक्या विमुक्त जमातीतील एका स्त्रिच्या शैक्षणिक प्रवासाच्या खडतर सुरुवातीवर प्रकाश टाकणारा हा धडा असणार आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात 'बालभारती'ने सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे. या समाजातील स्रियांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, व्यथा, त्यांची होणारी परवड, मानसिक कुचंबना याचे विदारक चित्र विमल मोरे यांनी आपल्या 'तीन दगडांची चूल' आत्मकथनातून समाजासमोर मांडले आहे. वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या या समाजात शिक्षणाविषयी मात्र फारशी जागरुकता झाली नाही. शिक्षणाचे मोल काय असते, हे त्यांना स्वातंत्रानंतर आजपर्यंत समजू शकले नाही. त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात निरक्षर राहिला. मात्र, त्याचा परिणाम या समाजातील मुलींवर झाला. या विघटनामुळे प्रगतीपासून तो अधिक दूर गेला आणि मागासलेपण आले. नेमकी हीच सद्य परिस्थिती मोरे यांनी आपल्या आत्मकथनातून समाजासमोर मांडली. 'गबाळ'चे लेखक तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेतील सहयोगी प्रा. दादासाहेब मोरे यांच्या त्या पत्नी आहेत.

इरगोंडा यांचे मार्गदर्शन

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २००५ नुसार बालभारतीने प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. या शासनमान्य अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता पाचवीचे मराठी बालभारती हे पुस्तक तयार करण्यात आले. मराठी भाषा समितीचे ज्येष्ठ सदस्य इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक साकारले आहे.

माझ्या आत्मकथनातील 'माझं शाळेचं नक्की झालं' या धड्याचा बालभारतीने पाचवीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यामुळे भटक्या विमुक्त समाजासह शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजातील मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल, अशी मला खात्री आहे.
- विमल मोरे, लेखिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाडा परिषद अध्यक्षपदावरून वाद

0
0

महंत ग्यानदास यांचा अध्यक्षपदावर दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पद हमसे है, हम पद से नही !' असे ठणकावून सांगत सन २०१३ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्षपद माझ्याचकडे आहे, असा दावा महंत ग्यानदास यांनी केला. तोंडावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील वास्तव्याकरिता त्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले. यावेळी आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदासह कुंभाशी निगडीत विविध मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा वादही आता चांगलाच पेटला आहे. या परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे असल्याचा दावा त्र्यंबकेश्वरचे महंत सागरानंद सरस्वती यांनी केला आहे. यामुळे नेमके अध्यक्षपद कुणाकडे या प्रश्नावर बोलताना महंत ग्यानदास म्हणाले, 'आजवर कित्येक अध्यक्ष आले अन् गेले. पदापेक्षा व्यक्तिचे कार्य महत्वाचे मानायला हवे. कार्य असेल तर पद चालत येते. हेच गतवर्षी हायकोर्टात आदेशाने माझ्या अध्यक्षपदाच्या बाबतीत सिध्द झाले आहे. नव्याने निवडणूक होईपर्यंत माझे पद कायम आहे,' असाही दावा यावेळी त्यांनी केला.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध संत महंतांकडून आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावे सुरू आहेत. या प्रकारामुळे कोर्टाचा अवमान होत असल्याने या दावेबाजांना आम्ही वकिलांच्या माध्यमातून कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटीस पाठविल्या आहेत. सद्यस्थितीत तरी मला या विषयी यापेक्षा अधिक बोलायचे नाही, कोर्टातला मुद्दा कोर्टातच मांडेल अशीही भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

गटारी आवरा ..!

कुंभाच्या तोंडावर गोदेला जास्त क्षमतेचे पाणी सोडून पदीचे प्रदूषण दूर करू पाहणाऱ्या जिल्हा प्रशासनाला महंत ग्यानदास यांनी नाशिक पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी टोला हाणला आहे. 'नदीचे प्रदूषण दूर करण्याचा हा तोडगा नव्हे, त्यासाठी शहरात जागोजागी नदीला जोडलेली बहुसंख्य गटारे आवरा तरच नदी प्रदूषण आटोक्यात येईल असे ते म्हणाले.

अपेक्षित कामे झालीच नाहीत

कुंभमेळ्याची कामे आटोक्यात असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरीही अपेक्षित कामे अद्याप झालेलीच नाहीत. मंदिर अन् मठांची अवस्थाही 'जैसे थे' च आहे, असे सांगत महंत ग्यानदास यांनी खेद व्यक्त केला. मागच्या वेळी आलो तेव्हा प्रशासनाला याबाबत विनंती करून गेलो. आता आलोय तर या सर्व कामांचा पाठपुरावा करण्यासाठी ठिय्याच देणार असल्याचीही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या विजेवर 'रिसेप्शन पार्टी'

0
0

बड्या उद्योजकाचा प्रताप; नागरिकांना कारवाईची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंगीबेरंगी दगडगोट्यांचा व्यवसाय करणाऱ्या शहरातील नामवंत उद्योजकाने मुलाच्या विवाह निमित्ताने आयोजित रिसेप्शन पार्टीसाठी राजरोसपणे विजेची चोरी केल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पाच-सहा कोटी रूपयांची विदेशी गाडी खरेदी केल्याने हाच उद्योजक चर्चेचा विषय ठरला होता, हेही विशेषच.

या उत्तर भारतीय उद्योजकाच्या मुलाच्या विवाहाची रिसेप्शन पार्टी नाशिकरोडला आयोजित करण्यात आली होती. या उद्योजकाच्या मुलाचा गेल्याच महिन्यात राजधानी दिल्लीत शाही विवाह झाला. केंद्र सरकार तसेच उत्तर भारतातील विविध खात्यांचे मंत्री, अभिनेते, उद्योगपती या शाही सोहळ्यासाठी उपस्थित होते. एवढ्या शाही रूबाबात वावरणाऱ्या उद्योजकाने ही चिंधीचोरी का केली, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमधील नामवंत हॉटेलमध्ये या उद्योजकाने व्हीआयपींसाठी नुकतेच रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. मंगळवारी नाशिकरोडवासीयांसाठीही महापालिकेच्या एका छोट्या बागेत पार्टी आयोजित करण्यात आली. शेजारीच असलेल्या या महाशयाचा बंगला तसेच मंडप, स्टेज, स्वागतकमानी यावर मोठ्या प्रमाणात विद्युतरोषणाई करण्यात आली होती. करमणूक म्हणून संगीतबारीचेही आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मोठे स्क्रीनही लावण्यात आले होते. या सर्वांसाठी लागणारी वीज मात्र महापालिकेचे विद्युत खांब तसेच डीपीवरून चोरण्यात आली.

रिसेप्शन पार्टी ज्या ठिकाणी होती, तेथे जवळच असलेल्या उद्योजकाच्या बंगल्यासमोरील डीपी उघडून त्यात वायर खुपसण्यात आल्या. भीमनगरकडून येणाऱ्या रस्त्यावरील स्वागत कमानी शेजारी एक डीपी तसेच विजेचा खांब आहे. त्यावरुन वीज चोरून हॅलोजन लावण्यात आले. महोदयांच्या घराशेजारील विजेच्या खांबावरूनही वायर ओढण्यात आल्या. तीन-चार ठिकाणांहून अनधिकृतपणे वीज घेण्यात आल्याचे अनेक सजग नागरिकांनी `मटा`ला कळविले.

सारेच नियम धाब्यावर...

सार्वजनिक रस्ता हा खासगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अडवू नये असे निर्देश हायकोर्टाने काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. मात्र, या कार्यक्रमासाठी रस्त्यावर भोजनाची सोय करण्यात आल्याने तो वाहतुकीस बंद करण्यात आला होता. महापालिकेच्या गार्डनमध्ये कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली की नाही, हाही वादाचाच मुद्दा आहे.

आता लक्ष कारवाईकडे

एरव्ही बील भरण्यास दोन दिवस उशीर झाला तरी वीज कंपनीचे कर्मचारी लोकांच्या घरातील वीज कनेक्शन कापतात. कुणी शेतकरी अनधिकृतपणे वीज घेताना आढळला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला थेट अटक केली जाते. मग आता या उद्योजकावरही अशी कारवाई करण्यास वीज कंपनी धजावेल काय, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. महत्त्वाचे म्हणजे रिसेप्शन पार्टीच्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर वीज कंपनीची दोन मोठी कार्यालये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images