Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पुणे-नाशिक विमानसेवेचे निम्मे सीट बुक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ते पुणे या विमानसेवेला येत्या सोमवारपासून प्रारंभ होत असून, त्यास नाशिककरांनी प्रतिसाद दिला आहे. ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाली असून, बुधवारीच निम्मे सीट बुक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच हे बुकिंग फूल होण्याची चिन्हे आहेत.

मेरीटाईम हेलि हेअर सर्व्हिसेस लि. (मेहेर) या कंपनीने येत्या १५ जूनपासून ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून पुण्यासाठीची सीप्लेन विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये मेहेरने बैठकही घेतली. तसेच, ट्रॅव्हल एजंटस् असोसिएशन ऑफ नाशिक (तान)च्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. त्यानुसार मेहेरच्या http://www.mehair.in/ या वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, तानच्या सदस्यांकडेही नाशकात बुकिंग करता येत आहे. या सेवेसंदर्भात कुठलीही माहिती हवी असल्यास १८०० २०० ५५९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मेहेरने केले आहे. ९ आसनी असलेल्या विमानाची सोमवार ते शुक्रवार पुण्यासाठीची सेवा दिली जाणार आहे.

विमानसेवा शुभारंभाच्या सेवेत खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे हे सुद्धा सहभागी होणार आहेत. बुधवारी सकाळी या सेवेसाठीचे पहिले बुकिंग उद्योजक अविनाश आव्हाड यांनी केल्याची माहिती तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी दिली. तसेच, दिवसभरात निम्म्या सीट बुक झाल्याचे त्यांनी सांगितले.

जॉय राईड

शनिवार आणि रविवार नाशिक दर्शन (जॉय राईड) राहणार असून, या सेवेसाठी २९९९ रुपये आकारले जाणार आहेज. यासाठीचे बुकिंगही सुरू झाले आहे. नाशिककरांना दहा मिनिटाची हवाई सफर याद्वारे घडणार आहे.

सेवेच्या वेळा अशा

ओझरहून निघणार - सकाळी ९.४५ आणि दुपारी ४.३०

पुण्याला पोहोचणार - सकाळी १०.३५ आणि संध्याकाळी ५.२०

पुण्याहून निघणार - सकाळी ११.०० आणि संध्याकाळी ६.००

ओझरला पोहचणार - सकाळी ११.५० आणि संध्याकाळी ६.५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचखोर लिपिकास सटाण्यात अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भूमापन क्रमांक ७६८ च्या चौकशी नोंदवहीची नक्कल मिळावी यासाठी पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सटाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयात सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गजानन शिरीष कुलकर्णी असे त्या लिपिकाचे नाव आहे. वहीची नक्कल मिळावी यासाठी तक्रारदाराने २५ मे रोजी भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार ९ जून रोजी ते वहीची नक्कल घेण्यास गेले होते. त्यावेळी कुलकर्णी यांनी पाचशे रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कळविले होते. त्यानुसार सापळा रचून कुलकर्णी यास अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलदारांबाबत गुरुवारी सुनावणी

0
0

नाशिक : सुरगाणा रेशन धान्य घोटाळ्यात निलंबित तहसीलदारांबाबत मॅटने विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. या अहवालाच्या अवलोकन करून मॅटची गुरुवारी अंतिम सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे पाच कोटींच्या रेशन धान्य घोटाळ्यात निलंबित केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सात तहसीलदारांनी राज्य सरकारला मॅटमध्ये आव्हान दिले आहे. आपण दोषी नसतानाही निलंबित केल्याचा तहसीलदारांचा दावा असून, या अन्यायाविरोधात त्यांनी मॅटकडे दाद मागितली आहे. याबाबत बुधवारी सुनावणी होणार होती. परंतु, अंतिम सुनावणी होऊ शकली नाही. तहसीलदार निलंबन प्रकरणात विभागीय आयुक्तांची चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल मॅटने मागविला असून, त्याचे अवलोकन करूनच गुरुवारी अंतिम सुनावणी होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेगाड्यांचे बदलले थांबे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नाशिकरोड स्टेशनवरून जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या थांब्याबाबत बदल केले आहेत. नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक एक वरून सुटणाऱ्या गाड्या या प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वरून सुटणार आहेत.

कुंभमेळ्यादरम्‍यान नाशिकरोड स्‍टेशनवरून काही अतिरिक्‍त गाड्या सोडण्‍यात येणार आहेत. दिनांक २५ जूनपासून कुंभमेळा संपेपर्यंत नाशिकरोड स्‍टेशनच्‍या १ नंबर प्‍लॅटफार्मवरून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व नियमित गाड्या या प्‍लॅटफार्म क्रमांक २ व ३ वर येणार जाणार आहेत. एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये, गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी विशेष गाड्या याच फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून जाणार आहेत. त्यामुळे नाशिकरोड स्थानकावरून जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

प्लटफॉर्म १ ऐवजी २ वरून सुटणाऱ्या गाड्या

गाडी क्रमांक पासून पर्यंत

५११८१ डाऊन देवळाली भुसावळ

१७६१७ डाऊन मुंबई नांदेड

५११५३ डाऊन मुंबई भुसावळ

१२०७१ डाऊन दादर औरंगाबाद

११०२६ डाऊन पुणे भुसावळ

१२११७ डाऊन लो.ति.ट. मनमाड

५१४२३ डाऊन इगतपुरी मनमाड

११४०१ डाऊन मुंबई नागपूर

२२१०१ डाऊन लो. ति. ट. मनमाड राज्यराणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेचा निकाल ठेवला राखून

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुकणे पाणीपुरवठा योजनेतील आक्षेपांवर बुधवारी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे सुनावणी पूर्ण झाली. प्रशासनाने निविदा प्रक्रियेचे समर्थन करीत स्थगिती उठवण्याची मागणी केली. या योजनेत महापालिकेचे ५० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे.

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या २६९ कोटींच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेला नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी १ जूनला स्थगिती दिली होती. या योजनेतील निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्याचा तक्रारी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह भाजपच्या आमदारांनी नगरविकास विभागाकडे केल्या होत्या. या योजनेत महापालिकेचे ५० कोटींचे नुकसान झाले असून, डीपीआर प्रोजेक्टनुसार या निविदा दिल्या नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पाटील यांनी तक्रारींचा विचार करून या योजनेच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली होती.

त्यावर आज मंत्रालयात पाटील यांच्या पुढे सुनावणी झाली. त्यात सुधाकर बडगुजर यांनी या निविदा प्रक्रियेतील त्रुटींचा गोषवारा सादर केला. डीपीआर २२० कोटीचा मंजूर असतांना आणि जिल्हा नियंत्रण दर सुचीचे दर बदलले नसतांनाही या योजनेची किमंत २२० कोटींवरून २६९ कोटी कशी झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जलशुध्दीकरण प्रकल्प २०७ एमएलडीवरून १३७ एमएलडी झाला असल्याने दर कमी व्हायला हवा होता. पाइपची साईज बदलल्याने उलट निविदा प्रक्रिया २०३ कोटींपर्यंत यायला हवी होती. मात्र, असे न होता कोणत्या आधारावर किमत २६९ कोटींपर्यंत वाढविली असा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रशासनाने आपली बाजू मांडली. पाटील यांनी प्राथमिकरित्या तक्रारीत तथ्य आढळल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पाटील यांनी निकाल राखून ठेवला आहे. लवकरच स्थगिती संदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई लटकली

0
0

नाशिक : महापालिकेन द्वारकेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिल्याने अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम महिनाभरासाठी लटकली आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने तूर्तास प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. महापालिकेच्या वतीने द्वारका चौकातील महापालिका जागेत भाडेतत्वावर असलेल्या व्यावसायिकांनी अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. महापालिकेने २८ व्यावसायिकांना दुकाने सोडण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र, या नोटिसा आठ दिवसाच्या असल्याने न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे मनपाने पुन्हा एक महिन्याच्या नोटिसा या व्यावसायिकांना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्री २:३० वाजता होतेय भारनियमन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावितरणकडून सिडको येथील सावतानगर परिसरात रोज रात्री अडीच वाजता वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या अजब कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे.

सिडको येथील सावतानगर, पवननगर, रायगड चौक, खोडे मळा, पाटीलनगर, कालिका पार्क या परिसरात रोज रात्री अडीचवाजता वीजपुरवठा खंडित होतो व साडेतीन वाजता पूर्ववत होता असा प्रकार सातत्याने तीन दिवसापासून होत आहे. अवेळी भारनियमन करण्याचा उद्देश काय आहे याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम आहे. या भारनियमनाबाबत महावितरणने कोणतीही कल्पना दिलेली नाही.

उलट तपासणी

घरातील वीज गेल्यानंतर कॉल सेंटरला फोन केल्यास ग्राहकांची उलट तपासणी करण्यात येते. काही तक्रार निवारण केंद्रावर समक्ष गेल्यास तुम्ही फोनवर तक्रार करा. आम्हाला तेथून तुमची तक्रार येईल तेव्हा आम्ही दुरुस्तीसाठी येऊ असे सांगण्यात येते. तसेच अनेक वेळा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे प्रकार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात ९ ठार, १३ जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अजमेर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हल आणि मालवाहतुक ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. त्यातच प्रवासी घेऊन जाणाऱ्या ओमनी व्हॅन या अपघातग्रस्त गाड्यांवर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार तर १३ जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मनमाड मालेगाव मार्गावरील चोंडी घाटात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेर येथे देवदर्शनासाठी गेलेले मनमाडचे तांबोळी परिवारातील ५ जणांचा मृतात समावेश असून, मालेगाव येथील ३ तर धुळे येथील एकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ९ जखमींवर मनमाड येथे तर चौघांवर मालेगाव येथे उपचार सुरु आहेत. अपघातात ओमनीचा चालक ठार झाला असून, मरण पावलेल्यात तीन बालकांचा समावेश आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरारी झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

मनमाड येथील तांबोळी परिवारातील सदस्य आणि त्यांचे नातेवाईक अजमेर येथे देवदर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हलने गेले होते. तिथून परतत असताना सोमवारी रात्री मनमाड मालेगाव मार्गावर चोंडी घाटात मनमाडहून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रकशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. त्याचवेळी मनमाडहून प्रवासी घेऊन मालेगावकडे जाणारी ओमनी व्हॅन या दोन्ही वाहनांवर जाऊन आदळली.

या भीषण अपघातात टेम्पो आणि व्हॅनमधील ९ प्रवासी ठार झाले. अतीक रमजान तांबोळी (३५) नाझ अतीक तांबोळी (१६) सायना निसार तांबोळी (८), तनवीर निसार तांबोळी (६) हसीना रशीद तांबोळी (६०), मोहम्मद आरिफ मोहम्मद फारूक (४०, मालेगाव), चालक प्रशांत सुरेश खैरनार (२४, मालेगाव), महम्मद अतीक मोहम्मद बशीर (४२, धुळे), अब्दुल कद्दुस मोहम्मद शफी (५०, मालेगाव) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात १३ जण जखमी असून, मुमताज तांबोळी, निसार तांबोळी, मोहम्मद आरिफ बशीर, नीलोफर तांबोळी, शबाना तांबोळी, सानिया तांबोळी, अन्सार तांबोळी यांच्यावर मनमाड येथे तर इतरांवर मालेगाव येथे उपचार सुरु आहेत. विशाल शेटे (धुळे), मोहम्मद अतीक मोहम्मद बशीर (धुळे) हेही या अपघातात जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण समिती स्थगिती कशासाठी?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण समितीच्या निवड प्रक्रियेला स्थगिती देणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले आहे. निवड प्रक्रिया सुरू असताना दिलेली स्थगिती ही सुडापोटी करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. त्यामुळे न्यायालयाने सरकारचा हस्तक्षेप गंभीरपणे घेतला असून, एक तर स्थगिती आदेश मागे घ्या; अन्यथा कोणत्या कलमान्वये ही स्थगिती देण्यात आली त्याचे स्पष्टीकरण सादर करा असा आदेश न्या. अभय ओक यांच्या पिठाने सरकारला दिल्या आहेत. न्यायालयाने आपले म्हणणे सादर करण्यासाठी सरकारला एक दिवसाचा अवधी दिला असून, गुरूवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीची निवड प्रक्रिया सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी समितीच्या निवड प्रक्रियेला पंधरा दिवसांपूर्वी स्थगिती दिली होती. त्या विरोधात शिक्षण समिती सदस्य संजय चव्हाण यांनी उच्च न्यायालयात मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला आव्हान देत, दिलेली स्थगिती हा राजकीय सुडापोटी देण्यात आल्याचा दावा केला होता. या याचिकेवर आज न्या. ओक यांच्या पिठासमोर सुनावणी झाली. निवड प्रक्रिया सुरू असताना स्थगिती देता येत नसल्याचा दावा चव्हाण यांच्या वक‌िलांनी केला होता. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले व स्थगिती आदेश मागे घ्यावा; अन्यथा कोणत्या कलमान्वये ही कारवाई करण्यात आली त्याचे स्पष्टीकरण सादर करा असे आदेश दिले. यावर गुरूवार पुन्हा या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयाला यात प्राथमिकदृष्टया हस्तक्षेप आढळून आल्याने आक्रमक होत थेट सरकारलाच जाब विचारल्याने राज्यसरकारच्या अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे सरकारतर्फे गुरूवारी काय बाजू मांडली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफिया उठले जीवावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

वाळू वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढतच असून सर्वसामान्यांवर त्यांची दादागिरी करण्याची वृत्ती बळावली आहे. एका वाळूच्या डम्परने एसटी बसला धडक देत पोबारा केला. मात्र एका दुचाकी चालकाच्या समय सुचकतेमुळे डम्पर पोलिसांच्या हाती सापडला. या प्रकरणी महसूल विभाग व पोलिस खाते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकहून सिन्नरकडे येणाऱ्या एस टी बसला समोरून येणाऱ्या वाळूच्या डम्परने समोरून धडक दिली. नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळील माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या फाट्यावर सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाला. सिन्नर डेपोची पुणे-नाशिक ही बस (एमएच ४० वाय ५६६३) नाशिकहून सिन्नरला प्रवाशांना घेऊन परत येत असताना समोरून येणाऱ्या वाळूच्या डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेत ड्रायव्हरच्या बाजूने बसचा पत्रा कापत डम्पर पुढे गेला. या अपघातात बसमधील तिघे किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर डम्पर चालक गाडीसह फरार झाला. सदरचा अपघात झाल्यानंतर डम्पर गाडीसह पळून जात असल्याचे एका वृद्ध दुचाकीचालकाने त्याचा पाठलाग करीत दुचाकी आडवी घातली. वाळू माफियांनी त्यास मारहाण करीत लोटून दिले. पुन्हा डम्पर चालक गाडी घेऊन फरार झाला. डम्परमधील वाळू रस्त्यात ओतून तो गाडीसह फरार झाला. सदर दुचाकी चालकाने सिन्नर पोलिस ठाणे गाठत घडलेली माहिती सिन्नर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर डम्पर ताब्यात घेतला.

या अपघाताने वाळू माफियांची दादागिरी पुन्हा सिद्ध झाली असून, त्यांच्या या दादागिरीचा एस टी बसमधील प्रवाशांना धक्का बसला. या अपघात प्रकरणी दुचाकी चालकाने तत्परता दाखवल्यामुळे डम्पर पोलिसांच्या हाती लागला. मोह शिवारातील वडझिरे गावाजवळील खडी क्रशर जवळून डम्पर पोलिसांनी जप्त केला असून, या डम्परचा क्रमांक स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळे संध्याकाळपर्यंत या डम्परचा मालक पोलिसांपुढे न आल्याने या प्रकरणी सिन्नर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सिनेस्टाइल पाठलाग

सिन्नर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून, वाळूच्या गाडीमागे एका चारचाकी वाहनातून संपर्क साधला जात होता. अपघात घडल्यानंतर दुचाकी चालक डम्परच्या मागे लागला त्यावेळी ही चारचाकीही त्यामागे पाठलाग करीत होती. या चारचाकी गाडीवरही क्रमांक नसल्याचे समजते. अतिशय नियोजापूर्वक वाळू माफिया या धंद्यात आपली दहशत पसरवत असून, या प्रकरणी महसूल विभाग व पोलिस खाते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौशीवाल्यांचा मार्ग झाला बंद!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी दोन गट पाडण्यात आले आहेत. १४ जूनला व्यावसायिक रंगकर्मींसाठी तर ८ नोव्हेंबर रोजी प्रायोगिक, हौशी रंगकर्मींसाठी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने या दोन्ही प्रकारांमध्ये नाट्य परिषदच भेद करीत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी मुंबईला कलावंत मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हौशी तसेच प्रायोगिक रंगकर्मी रवाना होत असतात. या ठिकाणी आपली कला सादर करणे म्हणजे कलावंतांसाठी गौरवाची बाब मानली जाते. त्यातूनच पुढे या कलावंतांना व्यावसायिकसाठी संधी मिळते. व्यावसायिकचे कलाकार, दिग्दर्शक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहात असल्याने त्यांच्यासमोर कला सादर करून आपल्या पदरात काही पाडून घेण्याचा हौशीवाल्यांचा विचार अगदीच गैर नाही परंतु, आता पारितोषिकांसाठीच दोन गट करण्यात आल्याने एकूण ३८ पुरस्कारांपैकी २० पुरस्कार व्यावसायिकांना १४ जून रोजी देण्यात येणार आहेत तर, उरलेले १८ पुरस्कार ८ नोव्हेंबर रोजी देण्याचा मध्यवर्ती शाखेचा विचार असल्याचे समजते. नाट्यपरिषदेने व्यावसायिक व प्रायोगिक असा भेद करून पुरस्कारांचे वाटप करू नये असे नाशिकच्या रंगकर्मींचे मत आहे.

व्यावसायिकसारखे यश मिळवावे असे हौशी व प्रायोगिकवाल्यांच्या मनात असणे स्वाभाविक असल्याने त्यांना एकत्रित पुरस्कार देणे गरजेचे आहे. त्यातून प्रोत्साहन मिळते. प्रायोगिक व व्यावसायिक रंगकर्मींचे वेगवेगळे पुरस्कार देण्यामागे नाट्यपरिषदेचा हेतू काय आहे ते कळत नाही.

- मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी

व्यावसायिक व प्रायोगिक नाट्यक्षेत्रातील पुरस्कार वेगवेगळे दिले जाणार अशी मध्यवर्तीची कल्पना आहे. परंतु व्यावसायिक पुरस्कार देताना जे वातावरण आहे तेच प्रायोगिकचे सर्व पुरस्कार देताना राहील याची काळजीही घेण्यात येणार आहे. एकाच कार्यक्रमात गोंधळ उडू नये म्हणून ही योजना करण्यात आली आहे.

- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष,

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना चिंता CCTV सुरक्षेची

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात अनूचित प्रकार टिपून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व असलेले सीसीटीव्हीच सध्या असुरक्षितता अनुभवत आहेत. सीसीटीव्हींच्या केबल तसेच अन्य सामुग्री चोरीस जात असून, असे प्रकार करणाऱ्यांचा शोध घेण्याऐवजी नागरिकांनीच अशा लोकांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सिंहस्थकाळात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हींची मदत घेण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. विप्रो कंपनीला हे सीसीटीव्ही बसविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. शहरात सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे बसविले जात आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांकडून या कामात विघ्न आणले जात आहे.

फायबरच्या केबल जाळण्याचे, चोरण्याचे प्रकार घडू लागले आहेत. कॅमेऱ्यांकरीता बसविण्यात आलेले खांब तोडून त्याचेही नुकसान केले जात आहे. विशेष म्हणजे असे प्रकार सातत्याने घडत असूनही ते रोखणे पोलिसांना शक्य होऊ शकलेले नाही. याउलट अशा प्रकारे नुकसान करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सरकारी मालमत्तेचे रक्षण पोलिस करू शकणार नसतील सामान्य नागरिकांच्या आणि त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेची हमी पोलिस कशी देणार, असा सवालही अशा प्रकारांमुळे उपस्थित झाला आहे. यामुळे पोलिसांपुढे या चोरट्यांना रोखण्याचे आवाहन निर्माण झाले आहे.

अशा घटनांची पोलिस दफ्तरी नोंद झालेली नाही. परंतु, सीसीटीव्हीच्या सामग्रीचे नुकसान केले जात असल्याच्या तक्रारी विप्रोच्या लोकांनी आमच्याकडे केल्या आहेत. असे प्रकार वाढले तर सीसीटीव्ही बसविण्याचे काम वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन केले आहे.

- श्रीकांत देवरे, पोलिस उपायुक्त, प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धे शहर अंधारात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकलहरे गावा जवळच्या डोंगरावर असलेल्या ३३ केव्हीचा टॉवर कोसळल्याने शहर व नाशिकरोडचा काही भाग मंगळवारी अंधकारमय झाला होता. सायंकाळी ७ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यास रात्रीचे १२ वाजले. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक व नाशिकरोड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पावासामुळे सोमवारी एकलहा येथील डोंगरावर असलेला टॉवर कोसळण्याच्या स्थितीत होता. हा टॉवर खाली पडत असताना नागरिकांनी पाहिले व तत्काळ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिली.

सोमवारी ही घटना घडल्यानंतर मंगळवारी तातडीने या टॉवरच्या दुरुस्तीसाठी पावले उचलण्यात आली. हा टॉवर दुरुस्त करण्यासाठी नाशिकरोड व शहराचा अर्ध्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वातावरणात असलेल्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. द्वारका, टाकळी रोड, औरंगाबादरोडचा काही भाग, जेलरोड, देवळाली कॅम्पचा काही भाग अंधकारमय झाला होता.

अघोषीत भारनियमन

वीजपुरवठ्याबाबत महावितरणशी संपर्क साधला असता पावसामुळे भूमिगत वायर्समध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित होत असून, काही ठिकाणी ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रान्सफार्मर जळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दर शनिवारी सिंहस्थाची कामे सुरू असल्याने आठवड्यातून एक वेळा दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण महावितरणने दिले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शनिवार व रविवार अशा दोनही दिवशी वीजपुरवठा अनेकदा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये महावितरणबद्दल प्रचंड असंतोष आहे.

सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे नाशिकरोड, पंचवटी तसेच द्वारका भागातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसर सायंकाळी सात वाजेपासून अंधारात होता. निमाणी, महालक्ष्मी चित्रपटगृह परिसर, नवीन आडगाव नाका, हिरावाडी, अमृतधाम अयोध्यानगरी, त्रिकोणी बंगला, टाकळी, टाकळीरोड, काठेमळा, द्वारका, शंकरनगर, उपनगर, गांधीनगर या भागांतील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता.

पावसाळ्याची रंगीत तालीम

महावितरणची सेवा कशी कुचकामी आहे, हे पहिल्या पावसाने दाखवून दिले आहे. थोड्या पावसात जर वीजपुरवठा खंडित होत असेल तर ऐन पावसाळ्यात कशी सेवा महावितरण देणार याचा प्रत्येय या दोन दिवसात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट ऑफ लिस्ट ओलांडणार नव्वदी ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी बोर्डाच्या परीक्षेत यंदा ९० टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या अन् तुल्यबळ स्पर्धेत असणारे आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी या चित्रामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या प्रवेशांसाठी कट ऑफ लिस्टचा टक्का वाढण्याची शक्यता कॉलेज कॅम्पसमधून व्यक्त होत आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष अकरावीच्या प्रवेशाकडे लागले आहेत. शहरातील कॉलेजेसमध्ये उपलब्ध जागांच्या सोबतच कट ऑफ लिस्टचे आडाखेही बांधले जात आहेत. गुरूवारी शिक्षण विभागातर्फे होणाऱ्या प्राचार्यांच्या बैठकीनंतर अकरावी प्रवेशांचे नियोजन जाहीर केले जाणार आहे.

गेल्या वर्षी शहरामध्ये प्राधान्य असणाऱ्या कॉलेजमध्ये सायन्स विद्याशाखेसाठीची पहिली कट ऑफ लिस्ट ८९ टक्क्यांवर तर अखेरची ८१ टक्क्यांवर क्लोज झाली होती. शहरातील प्राधान्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये गेल्यावर्षी ८६ टक्क्यांवर कट ऑफ लिस्ट क्लोज झाली. यंदा या केंद्रस्थानच्या कॉलेजेसमध्ये सायन्स शाखेच्या कट ऑफचा टक्का नव्वदी ओलांडून ९२ टक्क्यांवर तर कॉमर्स शाखेसाठी ८९ ते ९० च्या घरात स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा नाशिक विभागीय मंडळातील चारही जिल्ह्यांच्या निकालात वाढ झाली. एकूण निकालाच्या सोबतीलाच बेस्ट ऑफ फाईव्हसारख्या ऑप्शन्समुळे विद्यार्थ्यांचे वैयक्तिक गुणही वाढले आहेत. परिणामी, बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुल्यबळ स्पर्धा यंदा इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी होणारी आहे.

एसएससी बोर्डही तुल्यबळ स्पर्धेत

एरव्ही सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांच्या तुलनेत एकूण उत्तीर्णतेच्या संख्येत एसएससी बोर्ड कमी असल्याचा दिसते. मात्र यंदाच्या विक्रमी निकालाने हे चित्र मोडीत काढले आहे. निकालाच्या एकूण टक्केवारीसह विद्यार्थ्यांचे वैयक्तिक टक्केही वाढले आहेत. परिणामी, या तीन्ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा प्रवेशासाठी तुल्यबळ स्पर्धा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज पुनर्गठनासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

रूपांतरण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी नाबार्ड ६० टक्के कर्जपुरवठा करायला तयार आहे. मात्र, शासनाने थकहमीची जबाबदारी घ्यावी अशी अट नाबार्ड घालत आहे. यासाठी शासन अनुकूल नसले तरी मार्ग काढला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितल्याची माहिती नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली. दराडे यांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीने मुंबईत मुख्यमंत्र्याची भेट घेतली. कर्जाच्या रुपांतरणासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६८४ कोटींची गरज आहे. हा निधी दिला तर शेतकऱ्यांच्या कर्जाचे तत्काळ पुनर्गठन होईल, अशी मागणी त्यांनी केली. नरेंद्र दराडे यांच्यासह त्यांचे बंधू व बँकेचे संचालक किशोर दराडे, निफाडचे आमदार अनिल कदम, व्यवस्थापक सुभाष देसले यांनी मुंबईत मुख्यमत्र्यांची याप्रश्नी मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. सहकार राज्यमंत्री भुसे यावेळी उपस्थित होते. भुसे यांनी ओळख करून दिल्यावर `तुम्हीच का दराडे...!` असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीची आठवण काढली. राज्यात आर्थिक अडचणीत असलेल्या धुळे, नंदुरबार, जालना,

बीड, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ या जिल्हा बँकांसाठी शासन धोरण ठरवणार आहे. मात्र, नाशिक जिल्हा बँक ही नियमित तोटा सहन करीत असल्याने कर्ज रूंपातरणासाठी निधीची गरज असल्याचे यावेळी नरेंद्र दराडे, आमदार कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सांगितले. तर सहकार राज्यमंत्री दादा भुसे व आमदार कदम यांनी बँकेपुढील निधी उभारणीची अडचण सांगितली.

बँकेने शासनाकडे ६८४ कोटींच्या कर्ज रुपांतरणासाठी आवश्यक निधीची मागणी केली आहे. त्यामुळे कर्ज वाटपासाठी हा निधी देण्यात यावा अशी मागणी दराडे यांनी केली.

नाबार्ड ६० टक्के कर्जपुरवठा रूपांतरणासाठी द्यायला तयार आहे. पण यासाठी नाबार्ड शासनाकडे थकहमी मागत आहे. यापूर्वी अशी अट नव्हती मग आताच का ? त्यामुळे शासन अनुकूल नसले तरी पर्याय काढणार आहे. याशिवाय राज्य सहकारी बँक २५ टक्के व शासन १५ टक्के निधी देणार असल्याचे फडवणीस यांनी सांगितल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले.



मुंडेंकडून शुभेच्छा

नरेंद्र दराडे यांच्यासह शिष्टमंडळाने मुंबई दौऱ्यात मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची देखील भेट घेतली. मुंडे यांनी अध्यक्ष निवडीबद्दल प्रारंभी त्यांनी अभिनंदन करताना बँकेचे अध्यक्षपद म्हणजे आमदारापेक्षा मोठे पद आहे. येथे शेतकरी व सर्व सामन्यांची अनेक कामे करता येतात असे सांगत दराडे यांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेतू केंद्राअभावी दमछाक

0
0

खासगी ई-सेवा केंद्रात होतेय लूट; पालक, विद्यार्थी हवालदिल


म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा करार संपल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून हे केंद्र बंद असून, त्याअभावी विविध प्रकारचे दाखले मिळवताना नागरिक व विद्यार्थी यांची दमछाक होत आहे. त्याचा गैरफायदा घेत खासगी ई- सेवा केंद्रात मात्र, अव्वाच्या- सव्वा फी आकारली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा करार डिसेंबर २०१४ मध्ये संपला. तेव्हापासून तालुक्यातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना विविध कामांसाठी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रयोजनासाठी सध्या विविध प्रकारचे दाखले लागत आहेत. ते मिळवताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

परीक्षेनंतर दोन महिने शाळा-कॉलेजेसला सुट्टी असल्याने दाखले न मिळण्याची समस्या तेव्हा जाणवत नव्हती. आता दहावी, बारावीचे निकाल लागून गेल्यानंतर विद्यार्थी व पालकांची दाखल्यांसाठी धावपळ चालू झाली आहे. अशावेळी तहसीलमधील सेतूचे बंद केंद्र पाहून त्यांची निराशा होताना दिसत आहे. पर्यायी व्यवस्था त्यांना खासगी ई-सेवा केंद्रांचा आधार घ्यावा लागत असला तरी या केंद्रांमध्ये अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पण, त्यांच्या या तक्रारींची दखल घेणारा कुणीही नाही. त्यामुळे एकीकडे तातडीची गरज आणि दुसरीकडे आर्थिक लूट अशा कात्रीत सापडलेले विद्यार्थी व पालक हवालदिल झालेले दिसत आहेत.


खासगी ई-सेवा केंद्रांचा मनमानी पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. यापूर्वी ज्या दाखल्यांसाठी ५० रुपये खर्च येत होता, त्याच दाखल्यासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत तरीही कोणतेही कागदपत्र वेळेत मिळत नसल्याची तक्रार होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्तीधामचा कोंडला श्वास

0
0

वाहनांच्या वाढत्या कोंडीमुळे पर्यटक त्रस्त

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देशभरातील पर्यटकांचा ओघ सध्या कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या दिशेने वाढला आहे. नाशिकरोड भागातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मुक्तीधाम मंदिर परिसरात वाहनांची गर्दीवर मात्र नियंत्रण मिळविण्यास महापालिका प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिकरोड परिसरात दररोज सकाळी शिर्डी शनीशिंगणापूर भागातून मोठ्या प्रमाणावर खाजगी प्रवासी वाहनांनी शेकडो पर्यटक आणि भावित येतात. सध्या तर सुट्ट्यांचा काळ असल्याने सोमाणी उद्यान परिसरात अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह मुक्तीधाम परिसरात येतात. या भागात नागरिकांच्या वाढत्या गर्दीपेक्षा वाहनांच्या गर्दीचा त्रास वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका मुक्तीधाम परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे.

निवास व्यवस्थेसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. तसेच परिसरातून नागरी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याने ये-जा करणे अवघड जात आहे. येथील व्यावसायिक यांनी सांगितले. यामुळे सकाळी व सांयकाळी मुक्तीधाम परिसरात येणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरून येजा करतांना पर्यटकांसह सर्वसामान्यांची मात्र दमछाक होत आहे. तरी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

व्यावसायिकांचे वाढते अतिक्रमण

मुक्तीधाम परिसरात भेळपुरी सेंटर, चाट भांडार, ज्युसविक्रेत्यांसह किरकोळ विक्रेत्यांची दुकाने आहेत. यातील काही जणांनी थेट रस्त्यावरच व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक कोंडी होते. याचा परिसरातील नागरिकांसह पर्यटक, भाविकांनाही त्रास होतो. अशा अति‌क्रमणांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेसाठी मेणबत्ती आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

स्वाभिमानी संघटनेने महावितरणचे मुख्य अभियंता एस. बी. रंगारी यांच्या दालनात मेणबत्ती पेटवून अनोखे आंदोलन केले. 'वीज द्या नाही तर मेणबत्ती तरी द्या,' अशी मागणी करण्यात आली.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, प्रवक्ते हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, रतन मटाले, नितीन रोटे पाटील, सोमनाथ बोराडे, धीरज कापडणीस, विकी गायधनी, प्रफुल्ल वाघ, पारस खर्जुल, निलेश पेखळे, किरण देशमुख, बाजीराव बोडके आदींच्या उपस्थितीत नाशिकरोडच्या विद्युत भवनमध्ये हे आंदोलन करण्यात आले. सिंगल फेज योजना जिल्ह्यातील वाड्या, वस्त्या आणि गावांमध्येही राबविण्यात आली आहे. तथापी, शिवारातील शेतकरी अजूनही अंधारातच आहे.

जिल्ह्यात १९७२ पासून ओढलेल्या तारा बदलाव्यात, शेतकऱ्यांनी पैसा गोळा करून वायरमनमार्फत अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय डीपी मिळत नाही. डीपी त्वरित मिळावा, गारपीटीने त्रस्त शेतकऱ्यांना कृषी संजिवनी योजनेचा लाभ द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन श्री रंगारी यांना देण्यात आले.

आवाज दाबणार नाही

लाच घेतल्याशिवाय डीपीची दुरुस्ती केली जात नाही, वाड्या वस्त्या अंधारात आहे हे पोटतिडकीने सांगतांना वडघुले यांचा स्वर उंचावला. मुख्य अभियंत्यांनी त्यांना आवाज खाली करायला सांगितले. तेव्हा हा शेत‍कऱ्यांचा आवाज आहे, दाबू शकत नाही, असा वडघुले यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजाराचा सोमवारी निकाल

0
0

प्रकरण जिल्हा न्यायालयात; पंचवटीवासीयांचे लागले लक्ष
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीकाठी भरणारा बाजार गणेशवाडी येथील भाजी मार्केटमध्ये स्थलांतरीत करण्याप्रश्नी जिल्हा कोर्टात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल सोमवारी (दि. १५) देण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार स्थलांतरीत होणे प्रशासनासाठी आवश्यक आहे. साधारणतः २०११ पासून याप्रश्नी लढा सुरू आहे.

नाशिक महापालिकेने २००२-२००३ मध्ये सिंहस्थात गंगाघाटावरील भाजीबाजार गौरी पटांगणावर स्थलांतरित केला होता. मात्र त्यानंतर याच ठिकाणी कायम राहण्यास भाजी विक्रेत्यांनी नकार दिला होता. आधी सुसज्ज भाजीमंडई बांधा तरच स्थलांतरित होऊ, अशी भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतल्यानंतर महापालिकेने गणेशवाडी येथील नियोजित भाजी मंडईच्या जागेवरील झोपडपट्टी हटविली आणि येथे पाच ते सात कोटी रुपये खर्च करून सुसज्ज मंडई बांधून दिली. मात्र, यानंतर विक्रेते आणि महापालिकेचे बिनसत गेले. भाजी विक्रेत्यांनी कोर्टात धाव घेतली.

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून गुरूवारी त्याचा निकाल देण्यात येणार होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे हा निकाल १५ जूनपर्यंत कोर्टाने राखून ठेवला आहे. महापालिकेसह जिल्हा प्रशासन आणि पंचवटीवासीयांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजारावर भिकाऱ्यांचा कब्जा

0
0

पंचवटी : गणेशवाडीत कोट्यवधी रुपये बांधून तयार करण्यात आलेल्या भाजीमंडईचा प्रश्न कोर्टाच्या दारात लटकलेला आहे. मात्र, सद्यस्थितीत या भाजीमंडईवर भिकारी, मद्यपी आणि गुंडांचा कब्जा असल्याचे वास्तव चित्र आहे. यामुळे गणेशवाडीतून रात्री अपरा‌त्री जाण्यास नागरिक टाळत आहेत.

कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या सर्व सोयींनी युक्त अशा भाजीमंडळच्या वास्तूत ‌भाजीविक्रेत्यांना व्यवसायासाठी स्थलांतर करणे प्रशासनाचे दृष्टीने गरजेचे आहे. मात्र, या मंडईचे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. मात्र, या मंडईत भुरटे चोर, व्यसनी लोकांना दिवसादेखील वावर असतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीमंडई परिसरात कचरा साचला आहे.

दरम्यान, सध्याचा सुरू असलेला भाजी बाजार हा शाही मार्गात येत आहे. कुंभेमळ्यापूर्वी या शाही मार्गावरील भाविक व संतांची वाढती गर्दी लक्षात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा परिसर मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images