Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाण्यात २० जणांवर तडीपारीचे प्रस्ताव

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातील सुमारे २० जणांवर तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. महिनाभरात संबंधितांवर सक्त कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सटाणा पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात रमजान ईद तसेच सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ढाकणे बोलत होते. व्यासपीठावर बागलाणचे प्रांताधिकारी संजय बागडे, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, पोलिस निरीक्षक पांडूरंग पाटील उपस्थित होते. पोलिस आपल्या पद्धतीने कामकाज करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शांतता समितीच्या बैठकीस भालचंद्र बागड, बापू अमृतकर, किशोर कदम, भारत काटके, भारत खैरनार, काकाजी सोनवणे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शांतता राखण्याची हिंदू-मुस्लिमांची ग्वाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

रमजान पर्व शांततेत पार पाडण्याची ग्वाही हिंदू-मुस्लिम समाजबांधवांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली. सण काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू दिला जाणार नाही. रमजानच्या काळातच सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. सिंहस्थात पोलिस आणि हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधव स्वयंसेवकांची जबाबदारी पार पाडतील अशी ग्वाही नाशिकचे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब यांनी दिली. पोलिस आयुक्तालय व भद्रकाली पोलिस स्टेशन शांतता समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी फाळके रोड ते अब्दुल हमीद चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकांच्या जागेवर महापालिकेचे डांबरीकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूररोड रुंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित असला तरी या मार्गावरील दुभाजकांसाठी सोडण्यात आलेल्या जागेवर आता पुन्हा डांबरीकरण केले जात आहे. महापालिकेने पूर्वी या मार्गवर दुभाजकांसाठी जागा सोडली होती. मात्र, झाडे आणि पुन्हा दुभाजकांसाठी सोडलेल्या जागेतून वाट काढत वाहने चालविणे चालकांना कठीण झाले होते.

अनेक वर्षांपासून गंगापूरडोच्या रुंदीकरणाच्या समस्येबाबत रहिवाशी व वाहनचालक महापालिकेशी भांडत आहेत. रस्त्यातील वृक्षतोडीवर बंदी आल्याने गंगापूररोडचा प्रश्न अधिकच बिकट बनला होता. अशा परिस्थित महापालिकेने गंगापूररोड रस्तावर दुभाजकांसाठी जागा सोडली. मात्र, यामुळे वाहने चालविणे चालकांना कठीण झाले. त्यामुळे भिक नको, पण कुत्र आवार अशी काहीशी परिस्थित गंगापूररोडव वाहनचालकांची झाली. याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारही केली. त्याची दखल घेत महापालिकेने रस्ता दुभाजकासाठी सोडण्यात आलेल्या जागेवर पुन्हा डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही वाट बनली खडतर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

मुंबई आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा शिक्षक कॉलनी विविध सुविधांपासून वंचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कॉलनीत अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासनाने या प्रश्नी गांभीर्य दाखवित रस्त्यांचे डांबरीकरण करावे अशी मागणी केली जात आहे.

प्रत्येक महापालिका निवडणुकीत शिक्षक कॉलनीतील नागरिकांना फक्त आश्वासन दिली जातात. मात्र, ती पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. या प्रश्नी महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र, शिक्षक कॉलनीतील रहिवाशांचे जगणे काही सुकर झाले नसल्याचे सांगत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांचे खडीकरण होवून अनेक दिवस उलटले. परंतु, त्यावर डांबर टाकण्यास महापालिका प्रशासनाला काय अडचण येत आहे, असा उद्विग्न सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडल्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. तसेच पायी चालतांनाही त्रास होतो, असे स्थानिकांनी सांगितले. या प्रश्नी अनेकदा ‌कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, नगरसेवक आणि महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची त्यांची तक्रार आहे.

जलकुंभालाही गळती

शिक्षक कॉलनीजवळच महापालिकेचा जलकुंभ आहे. त्यातून सातत्याने पाण्याची गळती होत असल्याने दररोज हजारो लिटर्स पाणी वाया जात आहे. परिसरातील नागरिकांनी हि बाब संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्या वेळोवेळी ध्यानात आणून दिली; मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

वाढती अस्वच्छता

शिक्षक कॉलनीतील मोकळ्या जागेत झाडेझुडपे व कचरा वाढला आहे. ठिकठिकाणी कचराकुंड्या निर्माण झाल्याचे चित्र आहे. या वाढत्या अस्वच्छतेमुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा त्वरित हटविला नाही तर पावसाळ्यात अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमचीही गाडी असू शकते चोरीची!

0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

नाशिक पोलिसांकडून अलिकडे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महागड्या चारचाकी वाहनांची चोरी करून, त्यांची नंबर प्लेट बदलून अशी वाहने विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी अलिकडेच उघडकीस आणला. सेकंडहॅण्ड वाहने खरेदी करताना ग्राहकाने कागदपत्रांचा आग्रह धरल्यास असे प्रकार थोपविता येऊ शकतात.

वाहनचोऱ्या खूप होतात. परंतु, चोरीस गेलेले वाहन पोलिसांनी मिळवून दिले, असा सुखावह अनुभव फारसा कुणाच्या वाट्याला येत नाही. काही महिन्यांपूर्वी शहरातील क्राइम ब्रँचने कळवण येथील एका गॅरेज चालकास वाहन चोरी प्रकरणी अटक केली होती. शहरात यायचे, मोटरसायकल चोरून कळवणला घेऊन जायची. तेथे एखाद्या ग्राहकाशी मोटरसायकलचा व्यवहार करायचा. ७० टक्के रक्कम घेऊन मोटरसायकल ग्राहकाकडे सोपवायची. त्याने कागदपत्रे मागितल्यास काहीतरी कारणे सांगून वेळ मारून न्यायची. त्याने फारच तगादा लावला तर उर्वरित रक्कम देऊ नको असे सांगून पिच्छा सोडवायचा. त्याचा हा उद्योग अखेर उघडकीस आलाच.

चोरीच्या अनेक मोटरसायकली त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या. कमी किमतीत वाहन मिळाल्याने ग्राहक खूश तर कागदपत्राशिवाय वाहन कटविता आल्याने चोरटाही खूश असाच हा सर्व काहीसा प्रकार होता.

गुन्हे शाखेने अलिकडेच चोरीची १२ वाहने जप्त केली आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सानप, हवालदार जाकीर शेख आणि पथकाने सापळा रचून दिवाकर शेट्टी या संशयितास ताब्यात घेतले. नाशिक, औरंगाबाद, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांमधून १२ वाहनांची चोरी करून त्यांची विक्री केल्याची कबुली शेट्टीने दिली. त्याच्याकडून चार इनोव्हा, तीन तवेरा याखेरीज बोलेरो, इंडिगो, महिंद्र पिकअप, हुंडाई वरना, सॅन्ट्रो अशी वाहने जप्त करण्यात आली.

वाहनांची खोटी कागदपत्रं तयार करून तसेच नंबर प्लेट बदलून या वाहनांची विक्री करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. केवळ वाहनांची चोरीच नव्हे तर ती वाहने सर्वसामान्य ग्राहकांना विकून त्यांची फसवणूक केल्याचेही या प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे. संशयित आरोपी व त्याचा साथीदार वाहने चोरण्याचे काम करीत होते. जप्त वाहनांपैकी आठ वाहनमालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चार वाहनांचे चेसीज नंबर पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोऱ्हे यांचे म्हणणे आहे. या चेसीजचा क्रमांक काय होता याचा शोध आता परिक्षण केंद्रामध्ये घेतला जाणार आहे. परंतु, या सर्व प्रकरणामुळे ग्राहकही किती डोळे झाकून वाहन खरेदी करतात हे समोर आले आहे. तब्बल ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून आणखी काही चोरीची वाहने हाती लागतील असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.

पूर्वी वाहनाचा समोरासमोर व्यवहार होत असे. ग्राहक आणि विक्रेता या दोहोंच्या विश्वासातील व्यक्ती या व्यवहाराच्या केंद्रस्थानी राहात असे. व्यवहारात पारदर्शकता राहावी आणि ग्राहकाची फसवणूक होणार नाही याची हमी हा मध्यस्ती करणारा देत असे. मात्र, आता वाहनांचे व्यवहार ऑनलाइन होऊ लागले आहेत. अनेक वेबसाईट्स असे व्यवहार करून देतात. वेबसाईटसमुळे ग्राहक आणि विक्रेत्याला व्यासपीठ मिळत असले तरी त्यांच्यात विश्वासाचे नाते नसते. त्यामुळे अशा व्यवहारांमधील धोकेही वाढतात. जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा बाजार नेहमीच तेजीत राहात असला तरी तेथे विश्वासघात होण्याची शक्यता अधिक असते. समाजकंटक आणि विघ्नसंतोषी लोकांकडून गैरकृत्यासाठी अशा चोरीच्या वाहनांचा उपयोग केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच जुने वाहन खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाने कागदपत्रांसह सर्व बाबी तपासूनच व्यवहार करायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजेसना सरकारी चपराक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षात पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत कोणतेही नवीन कॉलेज, तुकडीवाढ, विषयवाढ व विद्याशाखा यांचा विस्तार होणार नाही, असे राज्य सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकातून कळविण्यात आले असल्याने या शैक्षणिक वर्षात राज्यातील कॉलेजेसला चांगलीच चपराक बसली आहे.

अनेक कॉलेजेसमधील जागा रिक्त राहत असल्याने त्या कॉलेजबरोबरच विद्यापीठांनाही अप्रत्यक्षपणे याचा फटका बसतो. हे तपासून सरकारी पातळीवर हा निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४, कलम ८२ मधील तरतुदीनुसार तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार अंतर्गत हा निर्णय घेतला गेला आहे. वेळोवेळी वाढीव तुकड्या, नवीन अभ्यासक्रम, वाढीव विषय याबाबतीत कॉलेजेसला विद्यापीठाने मान्यता दिली. मात्र, त्या अभ्यासक्रमांसाठी निश्चित केलेली विद्यार्थीसंख्याही पूर्ण होत नसल्याने राज्यातील अनेक कॉलेजांमधील जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले. याचा फटका अप्रत्यक्षपणे विद्यापीठाला बसत असल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे कॉलेजेसला कळविण्यात आले आहे. त्यामुळे आहे त्या अभ्यासक्रमांची उपयुक्तता सिद्ध करून दाखविण्याची वेळ आता राज्यातील कॉलेजेसवर आली आहे.

ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी, नक्षलग्रस्त आदी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे, या हेतूने संपूर्ण राज्यामध्ये कॉलेजचे अभ्यासपूर्ण व समतोल जाळे निर्माण होणे आवश्यक आहे. ते होण्यासाठीच विद्यापीठामार्फत शैक्षणिक बाबींना मान्यता दिली जाते. तथापि, मागील शैक्षणिक वर्षात अनेक अभ्यासक्रमांच्या जवळपास २५ टक्के जागा या रिक्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शिक्षकांची नियुक्ती, प्रयोगशाळा यांचा अतिरिक्त भार कॉलेजेस व विद्यापीठांवर येतो. असे असूनदेखील या अभ्यासक्रमांचे मूल्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तोकडेच असल्याचे दिसून आले. मागील वर्षी विद्यापीठाने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमांची पूर्तता अद्याप विद्यार्थी संख्येच्या अभावी निकाली लागलेली नाही. त्यामुळे काहीतरी ठोस उपाय करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील वर्षी विद्यार्थी संख्येची पूर्तता न झाल्याने या शैक्षणिक वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थीसंख्येअभावी अनेक जागा या रिक्तच राहिल्याने या अभ्यासक्रमांचे मूल्य तपासण्याची जबाबदारीही कॉलेजेसवर आली आहे.

- व्ही. बी. गायकवाड, संचालक, बीसीयूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शर्थीच्या प्रयत्नांनी वाचविले अनेकांचे प्राण!

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त... भाविकांची स्नानासाठी तोबा गर्दी... १३ भाविक एकाएकी बुडू लागतात. एकच गोंधळ उडतो. त्याचवेळी सत्यनाराण मंदिराच्या मागे भिंत कोसळून दोन जण गंभीर जखमी होतात. संकटे कशी एकाचवेळी प्रहार करतात अन् जीवरक्षकांपासून रुग्णवाहिका पथकापर्यंत सर्वचजण कमालीची तत्परता दाखवित भाविकांचे प्राण कसे वाचवितात याचे प्रात्यक्षिक शुक्रवारी पहावयास मिळाले.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याकरिता प्रशासनाने स्वत:च केलेली तयारी आजमावण्यासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. दुर्घटना घडताच रुग्णवाहिका दाखल झाल्या. जीवरक्षक स्वयंसेवकांनी पाण्यात बुडालेल्यांना वर काढून गंगामंदिर येथील प्राथमिक उपचार केंद्रात हलविले. प्रथमोचार सुरू होतात.

या दुर्घटनेला सामोरे जात असतानाच निलपर्वताच्या पायथ्याशी खंडेरावा मंदिरामागे आग लागली. अग्निशमन दलाच्या वाहनांनी तेथे पोहोचून लगेचच आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत एकाचा गुदमरून मृत्यू झाला तर गंभीर जखमी मुलास मोटरसायकलने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सत्यनारायण मंदिराच्यामागे भिंत कोसळल्याने भाविकांची धावपळ होऊन चेंगराचेंगरी झाली. १०८ क्रमांकाच्या पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलकुमार कुलथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीने परिस्थितीला तोंड देत उपचारांद्वारे अनेकांचे जीव वाचविले. ठिक साडेबाराला सुरू झालेल्या या थरारनाट्याने त्र्यंबकवासी भयभीत झाले. मात्र विचलीत न होता अधिकाऱ्यांनी मदतकार्य वेगाने पोहचिण्याचे काम केले. शहरात गर्दी करणाऱ्या भाविकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी ३० बसेस सोडण्याचे आदेश देण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते आदी उपस्थित होते. नाशिक येथील औद्योगिक वसाहतीतील नामवंत उद्योगसमूहाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सर्व निरक्षण नोंदविली. एनडीआरएफची ४५ जवानांची तुकडी, ग्रामिण रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाची दोन वाहने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी आदी सहभागी झाले होते.

उणिवांची माहिती

जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी नगरपालिका सभागृहात मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेल्या विविध यंत्रणाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे मत जाणून घेत काय त्रुटी राहिल्या याची माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटाच्या उतारावर रेलिंगचा पर्याय

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

कन्नमवार पुलानजीक बांधण्यात येणाऱ्या घाटाच्या उतारावर रेलिंग टाकण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली. कन्नमवार पुलानजीक भाविकांसाठी घाट बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. आता या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू झाले असून, धोकादायक रस्त्याच्या उताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कन्नमवार पुलानजीक रस्ता बांधताना थेट उताराचा प्रशासनाला सामना करावा लागला. याठिकाणी २०० ते ४०० मीटर अंतरासाठी तीव्र उतार असून, प्रशासनाने बाजूच्या ठिकाणी दगडांची भर टाकली आहे. कन्नमवार पुलानजीकच्या घाटावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भाविकांना नेण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. सध्या याठिकाणी खडीकरण करण्यात आले असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबरीकरणे केले जाणार आहे. तसेच भाविकांच्या मदतीसाठी रेलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डवले यांनी स्पष्ट केले. जिन्याला असतात त्याप्रमाणे या रेलिंग असून, भाविकांना त्यांना धरून घाटाच्या दिशेने उतरता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभय योजनेतून मिळाले ६८ लाख

0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

राज्य सरकारने थकीत एलबीटीधारकांसाठी लागू केलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्यास शहरातील व्यापारी व उद्योजक आता पुढे येवू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसात शहरातील ४८ व्यापाऱ्यांनी अभय योजनेचा लाभ घेतल्याने महापालिकेच्या तिजोरीत ६८ लाख रुपये जमा झाले आहेत.

एलबीटी बंद होण्याच्या आशेवर अनेकांनी एलबीटी भरला नव्हती. शहरात एलबीटी न भरणाऱ्या १४०० एलबीटीधारकांचे बँक खाते महापालिकेकडू सिल करून त्यांना पाच हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला होता. मात्र, तो दंड भरण्यासही व्यापारी पुढे येत नव्हते. मात्र, अभय योजनेमुळे १४०० पेकी ९०० व्यापाऱ्यांनी दंड भरून आपले खाते सुरू केले आहे. अद्यापही ५०० च्या आसपास व्यापाऱ्यांचे बँकखाते सिल असल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला होता. एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली असली, तरी मागील थकबाकी भरावीच लागेल असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. तसेच थकीत एलबीटीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकीत एलबीटीधारकांना दंडाच्या रक्कमेची सूट देण्यासाठी अभय योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत शहरातील ४८ व्यापाऱ्यांनी लाभ घेतला आहे.

अभय योजनेंतर्गत एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांना आतापर्यंत ५ लाख ३६ हजाराची सूट देण्यात आली आहे. तर, त्यांच्या माध्यमातून सुमारे ६७ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले असल्याचे स्थानिक संस्था कर विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळण योजनांमुळे धरणांची वाढणार क्षमता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी वळण योजना प्रकल्पांमुळे धरणांमध्ये वळविता येणार आहे. या पाण्यामुळे भविष्यात सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरतील. त्याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील वळण योजना प्रकल्पांची पाहणी बागडे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जीवा पांडू गावित, मेरीचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, अधीक्षक अभियंता ए. बी. कोकाटे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, गिरीश संघाने, सुरगाणा तहसीलदार यू. के. मोरे, दिंडोरी तहसीलदार एम. जी. कनोजे आदी उपस्थित होते.बागडे म्हणाले, वळण योजना प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्याचे नंदनवन होईल. शेतीला बारमाही पाण्याची गरज असून, स्थानिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल. बागडे यांनी झार्ली पाडा, गोळशी महाजे-१, गोळशी महाजे, हट्टी पाडा, मांजरपाडा वळण योजनेच्या कामांची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये मनसेला धक्का

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसापूर्वीच त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या मनसेच्या अनघा फडके यांनी शुक्रवारी चार नगरसेवकांसह आजीमाजी पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माजी आमदार वसंत गितेंच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी भाजपची वाट धरली. गितेंनी मनसेला दिलेला हा दुसरा धक्का असून, त्र्यंबकेश्वरमधून मनसेचे अस्तित्वच संपले आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मनसेच्या अनघा फडके या नाट्यमयरित्या विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपच्याच उमेदवार तृप्ती धारणे यांचा एका मताने पराभव केला होता. मनसे सोडून भाजपवासी झालेले माजी आमदार वसंत गिते यांच्या त्या समर्थक होत्या. शुक्रवारी अनघा फडके यांनी मनसेलाच जोरदार धक्का देत चार नगरसेवकांसह शुक्रवारी भाजपा कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत यशोदा अडसरे (माजी नगरध्यक्षा मनसे), आशाताई झोंबाड, अभिजीत कानव, यशवंत भोये, विजया लड्ढा (अपक्ष), मनोज थेटे (स्वीकृत) या नगरसेपकांनी भाजपात प्रवेश केला. तसेच काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मनसेचे नगरपालिकेत सहा सदस्य होते. यातील बहुतांश सदस्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झाले. वसंत गिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने मनसेचे अस्तित्वच त्र्यंबकेश्वरमध्ये संपले आहे.

प्रत्येकाचे स्वागत : महाजन

भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्ष सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी जो येईल त्याला पक्षात प्रवेश देण्याचे पक्षाचे धोरण आहे. पक्षात नवा- जुना असा कोणताही भेद नसून, बहुमताने ज्याला पक्षात घेतले त्याला स्वीकारावेच लागेल, असा दमही पालकमंत्र्यांनी भरला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा पक्षात घेतांना विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी पालकमंत्र्यांनी भाजपच्याच विरोधात लढलेल्या उमेदवाराला थेट प्रवेश दिल्याबद्दल विचारल्यावर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रवेश आधीच होणार होता असे सांगत निवडणुकीत छोट्या मोठ्या घटना होतच राहतात असे समर्थन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘छगन भुजबळांच्या चौकशीला गती’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयाच्या आदेशानुसारच विविध घोटाळ्यांप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जात नसल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. मात्र, भुजबळांच्या चौकशीला एसीबीने गती दिल्याची कबुली त्यांनी दिली.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी भ्रष्टाचार प्रकरणी छगन भुजबळांना टारगेट केले जात असल्याचा आरोप फेटाळून लावला. चौकशी ही पारदर्शक असून, निर्दोष असतील तर त्यांनी पुरावे सादर करावेत असे सांगत यापुढे चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा महाजन यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पवार, तटकरे आणि भुजबळ यांची विविध प्रकरणी चौकशी सुरू आहे. भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई होत नसली तरी त्यांच्या चौकशीला गती दिल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाऱ्याच्या चौकशी या पारदर्शी असून, दोषी असतील तर शिक्षा होईल. सोबतच त्यांनी निर्दोष असल्याचे पुरावे दिले तर, चौकशीतून सहीसलामत सुटतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे चुकीचे काम करणारा हा कोणत्याही पक्षाचा असेल, तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. भाजपने चितळे समितीला दिलेल्या पुराव्यानुसारच जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचेही लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा दावाही त्यांनी केला. चौकशीत काही तांत्रिक मुद्दे पुढे आल्याने चौकशींना अजून थोडा वेळ लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हींनाच हवी सुरक्षा

0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविले जात असले तरी त्र्यंबकेश्वरमध्ये या सीसीटीव्हींची सुरक्षितताच धोक्यात येऊ लागली आहे. सीसीटीव्हींच्या केबल चोरीस जाणे, केबल तोडून नुकसान करण्यासारखे प्रकार घडत असून, आऊटर पार्किंगच्या ‌ठिकाणचे सीसीटीव्ही ऐनवेळी बसविण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

संशयास्पद घडामोडी टिपण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणाच प्रभावी ठरू लागल्याने कुंभमेळ्यासारख्या धार्मिक उत्सवातही सीसीटीव्हींची मदत घेण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. गृह विभागाचे सचिव बक्षी यांनी अलीकडेच नाशिक शहरात बसविलेल्या सीसीटीव्हींच्या कार्यक्षमतेची यशस्वी चाचणी घेतली. त्र्यंबकेश्वरमध्ये २०५ सीसीटीव्ही बसविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सांगली येथील एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आले आहे. पोलिसांनी निश्चित केलेल्या त्र्यंबकेश्वर शहरातील बहुतांश ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, शहराबाहेर आतापासूनच सीसीटीव्ही बसविणे परवडणारे नसल्याने हे काम पुढे ढकलण्यात आले आहे.

पहिने रस्ता परिसरातून सीसीटीव्हींच्या केबलचे २० हजार रुपये किमतीचे बंडल चोरीस गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. मात्र, त्याबाबत पोलिसांना माहितच नाही. सीसीटीव्हींची साधनसामग्री महागडी असते. या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तेथे २४ तास पोलिसांचा खडा पहारा ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शहराबाहेर बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींची सुरक्षितता पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. पुरेसा पोलिस बंदोबस्त प्राप्त झाल्यानंतरच ही यंत्रणा बसविण्याचे विचाराधीन असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

ऐनवेळी बसविणार कॅमेरे

सापगाव रोड, त्र्यंबकेश्वर घोटी रोड, जव्हार रोड, तळवडे रोड, तळेगाव पगार फाटा, खंबाळेसह आऊटर पार्किंगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजित आहे. यापैकी काही ठिकाणे त्र्यंबकेश्वर शहरापासून १० ते १५ किलोमीटरवर आहेत. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असले तरी शहराबाहेरील अशा ठिकाणांवर ऐनवेळी कॅमरे बसविण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीच्या केबल चोरीस गेल्याचे माझ्या ऐकिवात नाही. पण केबल तोडल्याचा प्रकार एकदा घडला होता. त्यावेळी संबंधितास आम्ही ताब्यात घेतले होते. शहराबाहेरील आऊटर पार्किंगच्या ‌ठिकाणांवर सीसीटीव्हींच्या जागा निश्चित केल्या आहेत. परंतु, तेथे आताच सीसीटीव्ही बसविणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे आताच महागडी इक्वीपमेंटस बसविण्याऐवजी ती ऐनवेळी बसविणार आहोत.

- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहात विपश्यना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कारागृहात केवळ शिक्षा भोगण्याचे केंद्र न ठेवता आता तेथे बंदीजनांना आत्मशुद्धीचा मार्ग दाखविला जाणार आहे. कैद्यांचे आत्मचिंतन होऊन त्यांची आत्मशुद्धी व्हावी यासाठी नाशिकरोड कारागृहात खास विपश्यना सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्राची पहिली बॅच २२ जूनला सुरू होत आहे.

कारागृहात गुन्हेगारांचं एक आगळं विश्व नांदत असतं. त्यात मध्यवर्ती कारागृह म्हटलं की, कच्च्या कैद्यांसाठी, जन्मठेपवाल्यांसाठी असे वेगवेगळे सेल असतात. सर्वांत खतरनाक गुन्हेगारांसाठी खास 'अंडा सेल'ही तयार केलेला असतो. आता त्यात आगळ्यावेगळ्या विपश्यना सेलची भर पडली आहे. या सेलच्या माध्यमातून कैद्यांच्या यातना कमी करण्याबरोबरच त्यांना शिक्षा संपल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळणार आहे.

तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी लोकांना दुख:मुक्त करण्यासाठी विपश्यना विद्येचा जो मार्ग दाखवला, त्याचं आधुनिक काळात पुनरूज्जीवन करणाऱ्या आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी संत विनोबा भावे यांची 'कारागृहातील कैद्यांना या साधनेचे धडे द्या' ही सूचना प्रमाणमानून कार्य सुरू केले. त्यानुसार देश-विदेशातील अनेक कारागृहांतील कैद्यांना विपश्यना साधना शिकवली जाते. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातही हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यासाठी सुयोग्य जागा उपलब्ध नसल्याने साधनेचा उद्देश्य सफल होत नव्हता. अखेर चार वर्षांपूर्वी हा प्रयोग स्थगित करण्यात आला. अन्य कारागृहांमध्ये विपश्यना साधनेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली. आता मार्ग काढण्यात आला असून, एक बराक खास विपश्यना शिबिरासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विपश्यना काळात साधक मौनव्रताचे पालन करतात. त्यांचा अन्य जगाशी संपर्क येऊ नये याचीही काळजी घेतली जाते. त्यादृष्टीने कारागृहातील एका बाजूला असलेल्या बराकची निवड 'विपश्यना सेल'साठी करण्यात आली आहे. जेणेकरून अन्य कैद्यांशी विपश्यना साधकांचा संपर्क येऊ नये असा बंदोबस्त करण्यात आला आहे. सेलसाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तेथे आवश्यक सुविधांची उभारणीही स्वतंत्रपणे करण्यात येत आहे.

स्वतंत्र किचन व्यवस्था

इगतपुरीच्या विख्यात विपश्यना केंद्राद्वारे कारागृहात हा उपक्रम हाताळला जाणार आहे. त्यादृष्टीने या केंद्राचे पदाधिकारी कारागृहात भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या सुचनांनुसार शिबिरासाठी लागणाऱ्या जागेत आवश्यक बदल केले जातील. साधनाकाळात दिले जाणारे अन्न तयार करण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकघराचीही उभारणी केली जाईल. कारागृहात दर महिन्याला विपश्यना शिबिर होणार असून, त्यात ५० बंदीजनांना सहभागी करून घेतले जाईल. अन्य कारागृहांतील कैद्यांनाही शिबिरात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी उपाशी, समिती तुपाशी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी समाजातील कोवळी मुले कुपोषणाने तडफडत असताना, दुसरीकडे विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्य व अधिकाऱ्यांनी नाशिक दौऱ्यात काजू, बदाम आणि मणुक्यांवर यथेच्छ ताव मारला. महत्त्वाचे म्हणजे या सरबराईनंतर यथेच्छ पोट भरल्यावर महागडे काजू, बदाम आणि मणुक्यांवर थेट उष्ट्यात टाकून देण्याचा प्रताप अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला. हा प्रकार म्हणजे आदिवासी उपाशी आणि समिती तुपाशी राहत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १२ आमदारांची ही समिती नाशिक दौऱ्यावर आहे. आदिवासी लाभार्थ्यांना दिलेला योजनांचा लाभ, योजनांमधील भ्रष्टाचार, शासन निधीचा विनीयोग, नोकरभरतीतील रिक्त पदांचा अनुशेष, आरोग्य, शिक्षण व अशा महत्वाच्या विषयांवर झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांनी सदस्यांच्या सरबराईत कोणतीही कमतरता पडू दिली नाही. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर शिल्लक राहिलेले शाहीपदार्थ उष्ट्यात फेकून देण्यात आले.

सदस्यांचाच बहिष्कार

प्रथमच नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या या समितीची पुरेपुर शाही बडदास्त ठेवण्यात आली. पण, समितीला आवश्यक माहिती देण्यात अधिकाऱ्यांनी कुचराई केली. अभ्यासच नसल्याने विविध योजनांसदर्भात विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. त्यामुळे सदस्य अक्षरशः वैतागले. काही सदस्यांनी बैठकीवर थेट बहिष्कार टाकला. समितीचे कामकाज आटोपते घ्यावे लागण्याची वेळ अधिकाऱ्यांनी अध्यक्षांवरच आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे सुस्त, भाविक त्रस्त!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नाशिकच्या रेल्वे प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्याही दिवशी विस्कळीत झाली. पंचवटी एक्सप्रेस आजही इगतपुरीहून परतली, तर सेवाग्राम निफाडहून, नंदीग्राम आणि विदर्भ एक्सप्रेस नाशिकरोडहून परतल्या.

राज्यराणी, गोदावरी, जनशताब्दी या गाड्याही रद्द झाल्या. डाऊनच्या तपोवन, जनता, महानगरी, राजेंद्रनगर, रत्नागिरी, कामाख्या, भागलपूर, हालीडे हबीबगंज, हालीडे जबलपूर, गरीबरथ गाड्याही रद्द कराव्या लागल्या. अमरावती चाळीसगाव येथून रद्द झाली. पुष्पक गाडी पश्चिम रेल्वे मार्गाने तर हावडा मेल नागपूरमार्गे वळविण्यात आली. गुहावटी चार तास उशिरा धावत होती. नाशिकरोडमार्गे अप डाऊन अशा दोन्ही मिळून १३० गाड्या धावतात.

रेल्वे मुख्यालयाकडून कोणत्या गाड्या रद्द झाल्या त्याची माहिती नाशिकरोड स्थानकाला व्यवस्थित मिळत नसल्याने अधिकारी वर्गही त्रस्त झाला होता. इलेक्ट्रॉनिक फलकावर गाडी रद्द झाल्याची सूचना दाखवली जात होती, तर रेल्वेचे अधिकारी गाडी येणार असल्याचे छातीठोकपणे सांगत होते. मंगला एक्सप्रेस रद्द झाल्याचे फलकावर दाखविण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी ती येणार असल्याचे स्पष्ट केले. रेल्वेच्या स्टाफला आजही डबल ड्युटी करावी लागली. १८ जूनला ४ लाख ४६ हजारांची, तर १९ जूनला ६ लाख ९१ हजाराची रिझर्व्हेशन तिकिटे रद्द झाल्याची माहिती मुख्य आरक्षण पर्यवेक्षक एन. डी. बडगुजर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये वृक्षारोपण मोहीम

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बहुतांश सोसायट्यांनी वृक्षारोपण केले नसून, १ जुलै रोजी त्यांना विश्वासात घेऊन वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक लहान मोठ्या कंपनीने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे.

येत्या १ जुलैला होणाऱ्या वृक्षारोपणाच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जि. प.चे सीईआे सुखदेव बनकर, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, गोरक्षनाथ गाडीलकर आदी उपस्थित होते. कुशवाह म्हणाले, वृक्षारोपणासाठी आतापर्यंत शहरातील ३० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, उद्योग, विविध संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 'हरित नाशिक' साठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले. प्रदूषण कमी करण्यासाठी दुचाकीधारकांनी किमान एक झाड आणि चारचाकी वाहनधारकांनी किमान चार झाडे घराभोवती लावावीत, असे आवाहन त्यांनी केले. शहरात किमान दोन लाख झाडे लावण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हा परिषदेमार्फत जीन लाख झाडे लावण्यात येणार असून, पाच लाख बिजांचे रोपणही करणार असल्याची माहिती बनकर यांनी दिली. निमातर्फे २० हजार तर क्रेडाईतर्फे २५ हजार झाडे लावण्यात येतील. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या मोहिमेत सामावून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वृक्षारोपणासाठी रोपे तसेच जागांची काळजी करू नका, प्रशासन ते उपलब्ध करून देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सोसायट्या वृक्षारोपणाचा नियम डावलत असतील तर त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या अनामत रक्कम वाढविण्यात येईल, असा इशारा गेडाम यांनी दिला.

वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था किंवा नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कुंभमेळा कक्ष (दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३१९९१५) येथे मेळा अधिकारी रघुनाथ गावडे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये वृक्षारोपणासाठी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे (७५८८३०३३७५) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीता सरोवरकडे दुर्लक्ष

0
0


म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

काही दिवसांवर सिंहस्थ येऊन ठेपल्याने सर्वत्र कामांची लगीनघाई सुरू आहे. सर्वत्र आकर्षक रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे चालू आहेत. परंतु, प्रभू श्रीराम व माता सीतामाई यांनी जवळ जवळ एक महिना निवास केलेल्या नाशिकच्या मेरी दिंडोरी रोडवरील म्हसरूळ गावातील पवित्र अशा 'सीता सरोवराची' कोणालाही आठवण नसल्याची खंत परिसरातील भाविकांनी व्यक्त केली आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनाने त्व‌रित दुरुस्तीचे व सजावटीचे काम हाती घ्यावे व सिंहस्थापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक व भाविकांनी केली आहे.

नाशिकपासून जवळच म्हसरूळ गावाशेजारीच वरवंडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'सीता सरोवर' आहे. सीतामाई व प्रभू श्रीराम यांनी येथील भव्य व आकर्षक अशा कुंडात स्नान केल्याची आख्यायिका आहे. अशा पवित्र ठिकाणी मोठी यात्रा पूर्वी भरत असे. कालांतराने महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज या पवित्र तीर्थक्षेत्राची खूपच वाईट अवस्था झाली आहे. याच परिसरात 'माता वज्रेश्वरी देवीचे' मोठे मंदिर आहे. शेजारीच पुरातन काळातील श्री रामाचे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर आयोध्याहून खास आणलेल्या श्रीरामांच्या पादुका बसविण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे श्रीराम कुंडाच्या बाजूला श्री गणेशाच्या सोंडेतून निघालेले पिंपळाचे झाड सर्वांचे लक्ष नक्कीच वेधून घेते.

पुरातन काळातील सीता सरोवराची लवकर दुरुस्ती करावी. नाशिक परिसरातील पवित्र असे तीर्थ क्षेत्र आहे. परिसरातील भाविकांचे दैवत आहे. अनेक दिवसांची मागणी आहे आता तरी पूर्ण करावी. - वसंतराव मोराडे

नाशिक महापालिका व जिल्हा प्रशासनाने सीता सरोवराचा कायापालट करावा. सर्व सरोवराची रंगरंगोटी सिंहस्थापूर्वीच करावी. नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेवून काम करावे. - प्रकाश आभाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा नव्हे, लूट टॅक्स!

0
0


म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

नागरिकांकडून घेतला जाणाऱ्या कचरा टॅक्सबाबत प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी देवळाली कॅम्प येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत घुगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पेंद्रसिंह यांना निवेदन देण्यात आले.

यापूर्वी नागरिक घंटागाडीत किंवा कचऱ्याच्या कुंड्यांमध्ये केर टाकत होते. मात्र, आज प्रशासनाच्या वतीने डोअर टू डोअर कचरा उचलण्यासाठी हा कर नागरिकांच्या घरपट्टीमध्ये आकाराला जातो. मात्र, प्रत्यक्षात कोणताही सफाई कर्मचारी घरी अथवा दुकानात जाऊन हा कचरा उचलत नाही. प्रत्यक्ष नागरिक घंटागाडीपर्यंत येऊन कचरा देत असल्यामुळे परिस्थिती जैसे थे असताना नागरिकांनी कचरा टॅक्स का द्यावा? असा सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. देशासह देवळालीत कॅन्टोन्मेन्ट बोर्डात देखील भाजपचीच सत्ता आहे. निवेदनावर अमोद शहाणे, प्रदीप गुरव, सचिन गुळवे, सोनू सचदेव, प्रमोद शेटे, संतोष मेढे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिकतेवरच समाजाची विभागणी

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धर्म किंवा जातीपेक्षाही भारतीय समाज आज आर्थिक निकषांवर सर्वाधिकपणे विभागला जात आहे. देशापुढील जागतिक आव्हानांकडे बघताना ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत विख्यात विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली.

'एव्हरी चाईल्ड काऊंट्स' या मोहिमेंतर्गत आयोजित शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणार्पण सोहळ्यात ते बोलत होते. येस फाऊंडेशन, इस्पॅलिअर स्कूल, कामगार विभाग, मनपा शिक्षण मंडळ यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत शहरातील स्लम परिसरातून सुमारे ७०१ मुलांना नव्याने शिक्षण प्रवाहात आणण्यात आले आहेत. कामटवाडे परिसरातील इस्पॅलिअर स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वासलेकर म्हणाले, पाश्चात्य राष्ट्र आणि भारत या दोन्ही देशांमधील शिक्षण पध्दतींमध्ये तुलना होण्याची गरज आहे. त्या देशांमधील शाळेत समतेचा नियम काटेकोरपणे पाळला जातो. या धोरणाचे सामाजिक परिणाम अत्यंत सकारात्मक आहे. या उलट आपल्याकडे पालकांच्या क्रयशक्तीनुसार शाळांच्या विभागणी होतात. अन् इकॉनॉमिक क्लासनुसार शिक्षण व्यवस्था विभाजीत होते. येथेच समाजाचे विभाजन व्हायला सुरुवात झालेली असते. यामुळे या शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल आणायला हवेत. या दिशेने वाटचाल करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, शैक्ष‌णिक क्षेत्रातील घटक यांसोबतच समाजाचेही योगदान तितकेच गरजेचे आहे. यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

भारतीय व्यवस्थेत एज्युकेशनल, इथिकल आणि इगो हे तीन क्रायसिस मोठा अडसर आहेत. या तिन्हींच्या मिलाफातून इन्स्टिट्यूशनल क्रायसिस तयार होतो अन् सर्व विकासाची दिशाच तो रोखून धरतो, असेही निरीक्षण वासलेकर यांनी यावेळी मांडले. आपला समाज आत्मकेंद्रित बनत चालला आहे. मी आणि माझे या पलिकडे तो बघण्यास तयार नाही. शिक्षणातून स्पर्धेऐवजी आपसातील सौहार्द आणि सहकार्याचा भाव वाढीला लागायला हवा. सृजनात्मक विचारसरणीला चालना मिळायला हवी, अशीही अपेक्षा यावेळी वासलेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, कामगार उपायुक्त रा. सु. जाधव, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, डॉ. वसुधा कुरणावळ, प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे, इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images