Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

किल्ला अॅडव्हेंचर @ धोडप

0
0

राज्यातील पहिले साहसी खेळांचे केंद्र चांदवड तालुक्यात

फणिंद्र मंडलिक, नाशिक

राज्यातील पहिले साहसी खेळांचे केंद्र चांदवड तालुक्यात असलेल्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी साकारण्यात आले आहे. वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीतून हे केंद्र साकारले असून, त्यासाठी तब्बल अडीच कोटी रूपये खर्च झाला आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळणार आहे.

धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावात वन खात्यातर्फे साहसी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात प्रस्तरारोहणाची कृत्रिम भिंत, आवरोहण, झिप लाईन यासह विविध अथडळे असे १७ साहसी प्रकार करण्याची संधी पर्यंटकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना करता येण्यासारखेच हे प्रकार असून, याठिकाणी निवासी इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. त्याच प्रमाणे येत्या काही दिवसात येथे घरगुती पद्धतीचे भोजनही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

धेाडपच्या किल्ल्यात डाईक व व्होल्कॅनिक प्लग असे हे दुहेरी आश्चर्य पहायला मिळते. डाईक म्हणजे ज्वालामुखीय उद्रेकातून तयार झालेली लांबसडक पण कमालीची पातळ अशी डोंगराची रचना आणि प्लग म्हणजे कोणीतरी ठेऊन दिल्यासारखा असलेला भला मोठा खडक.

या प्रकल्पामुळे हट्टी गावात ठिकठिकाणचे साहसी पर्यटक येणार असून, गावाच्या विकासाला हातभार लागणार आहे. आजवर ट्रेकर मंडळी या गावात येत होती; मात्र त्यांची संख्या खुप नगण्य होती. ज्यांना कठीण श्रेणीतल्या धोडप किल्ल्यावर जायचे नसेल, अशा सर्वसामान्यांना या किल्ल्याच्या पायथ्याला मुक्कामाची व वेगवेगळे अथडळे खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी हट्टी गावावर राहणार असून, त्याचे व्यवस्थापन, देखभाल व संरक्षण हे सर्व गावालाच करावे लागणार आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून हा प्रकल्प पुढे चालवावा जाणार आहे. या प्रकल्पासाठी गावच्या काही तरूणांना प्रस्तरोहणाचे धडे दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे गावात स्वच्छता, येणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम प्रकारचेय घरगुती जेवणाची सोय गावाला करावी लागणार आहे. हट्टीच्या पर्यटनामुळे इथल्या डोंगरावर तयार होणारा दर्जेदार खवा आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचायला मदत होणार आहे.

साहसी खेळांचे केंद्रामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल. दुर्गम असा धोडपचा किल्ला पहाण्याची लोकांना संधी मिळणार आहे. यामुळे हट्टी गावचा विकास होण्यास निश्च‌ित हातभार लागणार आहे. - प्रशांत परदेशी, दुर्ग अभ्यासक

किल्ल्याच्या पायथ्याशी अॅडव्हेचर कोर्स सुरु करण्याचा पहिला मान नाशिकला मिळाला आहे. नुकतेच स्थानिक युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. - अरविंद पाटील, मुख्य वनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे विमानसेवा ६ जुलैपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून लांबणीवर पडलेली नाशिक-पुणे विमानसेवा येत्या ६ जुलैपासून टेक ऑफ घेणार आहे. त्यातही रिटर्न तिक‌िटासाठी अवघे ७४९९ रुपये आकारण्याचा निर्णय मेहेर कंपनीने घेतला आहे.

गेल्या १५ जूनला सुरु होणारी नाशिक ते पुणे ही विमानसेवा वादळी पावसामुळे लांबणीवर पडली. परिणामी मेहेर कंपनीला प्रवाशांना तिक‌िटाचे पैसे परत देण्याचीही वेळ आली. प्लेनच्या आतील आर्द्रता काढण्याचे काम आता करण्यात आले असून, येत्या ६ जुलैपासून ही सेवा सुरु करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. सेवा लांबणीवर पडल्याने तसेच सेवेचे भाडे कमी करण्याची मागणी असल्यामुळे मेहेरने रिटर्न तिक‌िट बुक करणाऱ्यांना सवलत देण्यात येणार आहे. ६ ते ३१ जुलैच्या काळात सहा हजार रुपये तिकीट आकारले जाणार आहे. मात्र, पहिल्या आठवड्यात रिटर्न तिकीटासाठी ७४९९ रुपये घेण्यात येणार आहेत. तर, रिटर्न तिकीटासाठी ८९९९ रुपये आकारले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट ऑफची भरारी ९३ टक्क्यांवर

0
0

म. टा. प्रतिनधी, नाशिक

दहावीच्या यंदा उंचावलेल्या गुणवत्तेच्या परिणामी अकरावीच्या सायन्स शाखेसाठी आरवायके कॉलेजमध्ये पहिली कट ऑफ लिस्ट ९३.८० टक्क्यांवर क्लोज झाली. बीवायके कॉमर्समध्ये ह‌ीच कट ऑफ लिस्ट ८६.६० टक्क्यांवर क्लोज झाली. ओपन कॅटेगिरीसाठी लागू असलेल्या या आकडेवारीने गतवर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी उंची गाठली आहे. शहरातील सायन्स कॉलेजेसमध्ये प्राधान्याच्या प्रवेशासाठी यंदा 'रॅट रेस' होत असल्याचेच चित्र आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्र‌िया सुरू झाल्यापासून विद्यार्थी व पालकांचे लक्ष पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले होते. सोमवारी दुपारी ४ च्या सुमाराला शहरातील कॉलेजेसच्या कॅम्पसमध्ये ही लिस्ट झळकली. यावेळी सुरू असणाऱ्या रिमझिम पावसात भ‌िजत विद्यार्थी अन् पालकांनी यादी बघण्यासाठी कॅम्पसमध्ये प्रचंड गर्दी केली होती. शहरातील मध्यवर्ती कॉलेजेसमध्ये प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचा ओढा दिसून आला. परिणामी यंदा या कॉलेजेसकडे उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांचा पाऊस पडला. या अर्जांच्या छाननीनंतर आरवायके सायन्स कॉलेजमध्ये ओपन कॅटेगिरीसाठी ९३.८० टक्क्यांवर मेरीट लिस्ट क्लोज झाली. बीवायके कॉमर्समध्ये हीच लिस्ट ८६.६० टक्क्यांवर, मविप्रच्या सायन्स मराठा हायस्कूलसाठी ८८ टक्के तर सायन्सच्या इतर कॉलेजसाठी ९१.४० टक्के, मराठा हायस्कूल कॉमर्ससाठी ७३ टक्के तर इतर कॉमर्स कॉलेजसाठी ८३.८ टक्के, भोसलाच्या सायन्स शाखेसाठी ८९.६ टक्के तर कॉमर्ससाठी ८२.४ टक्के आणि पंचवटी सायन्स कॉलेजसाठी ८३.४ टक्के, कॉमर्ससाठी ७० टक्के यानुसार पहिली मेरीट लिस्ट क्लोज झाली.

गुणवत्तेचा फुगवटा!

दरवर्षी जाहीर होणाऱ्या मेरीट लिस्टमध्ये वरच्या स्तरावर मोठ्या संख्येने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. यंदा एसएससी बोर्डाच्या यशाचा अंकही उंचावला आहे. एसएससीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांनीही सर्व प्राधान्याच्या कॉलेजसमधील पहिल्याच मेरीट लिस्टमध्ये टॉप टेन अंकात स्थान पटकाविले आहे. मात्र दुसरीकडे यंदा मेरीट लिस्टने तोडलेल्या यापूर्वीच्या उच्चांकाच्या परिणामी शहरात गुणवत्तेचा फुगवटाही दिसून येतो आहे. या फुगवट्याचा परिणामही विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशांवर दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षारोपणाऐवजी थेट डोंगरावर रस्ता?

0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गोवर्धन शिवारातील एका खाजगी कंपनीने वृक्षारोपणाच्या नावाखाली डोंगरावर जेसीबीने रस्ता तयार केला आहे. यात गोवर्धन ग्रामपंचायतीने खाजगी विकसकाला नाममात्र दराने वृक्षारोपणासाठी जागा दिल्याचे माजी सरपंच पी. के. जाधव यांनी 'मटा'ला सांगितले. परंतु, वृक्षारोपणासाठी डोंगरावर थेट रस्ता करण्याची गरज काय, याप्रश्नी महसूल विभागाने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गोवर्धन ग्रामपंचायतीने एका खाजगी विकसकाला नाममात्र दराने गायरानची जमीन वृक्षारोपणासाठी दिल्याचे ग्रामसेवक पाटील तसेच माजी सरपंच व सदस्य पी. के. जाधव यांनी सांगितले. परंतु, वृक्षारोपणासाठी डोंगरावर रस्ता करण्याचे कारणच काय असा सवाल ग्रामस्थ प्रमोद जाधव यांनी उपस्थित केला आहे. गायरानच्या जमिनीवर चुकीच्या व बेकायदेशीर कामे भविष्यात होणार असतील तर त्यास तीव्र विरोध राहील, असे जाधव यांनी सांगितले. डोंगर असलेल्या गायरानावर केलेल्या चुकीच्या कामांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकारी यांना निवेदन देखील देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान या प्रश्नी महसूल विभागाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फाशीच्या डोंगर परिसरात दहा हजार वृक्षांची लागवड करणारे वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांना विचारले असता, त्यांनीही गायरान असलेल्या डोंगरावर वृक्षारोपणासाठी रस्ता बनविण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित केला. वृक्षारोपण खड्डे खोदून केले पाहिजे. त्याशिवाय झाडे जगणार नाहीत, असेही त्यांनी सूचविले.

गोवर्धन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. तो साडविण्याऐवजी वृक्षारोपणासाठी गायरान डोंगरावर रस्ता करण्याचे काय कारण? यात चुकीचे काही असल्यास त्याविरोधात जिल्हा परिषदेचे सीइओ व पंचायत समितीचे सभापती यांना निवेदन देऊन तक्रार करणार. - प्रमोद जाधव, ग्रामस्थ, गोवर्धन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामे वेळेत पूर्ण करा, पण सोबत दर्जाही राखा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळानिमित्त नाशिकरोड रेल्वेस्थानकात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिलकुमार सूद यांनी आज केली. कामे वेळेत पूर्ण करताना दर्जा राखण्याची सूचना त्यांनी केली.

भुसावळ मंडलचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता, मुख्य अभियंता एम. ए. कांबळे, रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ए. के. सिंग, मंडलसुरक्षा आयुक्त सी. एम. मिश्रा, मुख्य अभियंता (कुंभ) नरेशकुमार ललवानी, अभियंता पवन पाटील, नाशिकरोड स्थानक प्रमुख एम. बी. सक्सेना आदी दौ-यात सहभागी झाले होते. सिन्नरफाटा भागात तिकीट आरक्षण केंद्र आणि भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्याची पाहणी सूद यांनी केली. चौथा प्लॅटफार्म, नवीन पादचारी पूल, सुभाषरोडचा नवीन मार्ग आदींची पाहणीही त्यांनी केली. नाशिकरोड स्थानकात पर्वणी काळात होणारी भाविकांची गर्दी आणि त्यांचे व्यवस्थापन याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याबाबत त्यांनी महत्वाच्या सूचना केल्या. मालधक्का, देवळाली कॅम्प आणि ओढा येथे रेल्वेगाड्या थांबविण्यात येणार आहे. त्याची माहितीही सूद यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीसाठी वीस जादा रेल्वे गाड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात अतिरिक्त वीस रेल्वे गाड्या सोडण्यास तसेच नाशिक येथून रेल्वेचे तिकीट आरक्षण बंद करण्याच्या प्रस्तावाला रेल्वेने तत्वतः मान्यता दिली आहे. रेल्वे वाहतुकीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आज महत्वाची बैठक झाली. रेल्वेची क्षमता आणि कुंभ प्रशासनाच्या अपेक्षा यावर प्रामुख्याने चर्चा झाली. विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, भुसावळ मंडलचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता, मुख्य अभियंता एम. ए. कांबळे, रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ए. के. सिंग, मंडल सुरक्षा आयुक्त सी. एम. मिश्रा, मुख्य अभियंता (कुंभ) नरेशकुमार ललवानी, अभियंता पवन पाटील, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील, नाशिकरोड स्थानक प्रमुख एम. बी. सक्सेना आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डवले म्हणाले, की रेल्वेने जास्तीत जास्त गाड्या सोडव्यात यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही होते. मात्र, नाशिकरोड स्थानकाची क्षमता लक्षात घेऊन वीस जादा गाड्या सोडण्यास रेल्वेने मान्यता दिली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकरोड स्थानकातील तिकीट आरक्षण पर्वणीकाळात बंद करण्यासही रेल्वे अधिका-यांनी तत्वतः मान्यता दिली. लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या नाशिकरोडला थांबत नाहीत, त्यांना नाशिकरोडला थांबा देण्यासही रेल्वेने अनुकूलता दर्शविली. रेल्वेगाड्यांचे ३० टक्के डबे आरक्षित ठेवले तरी चालतील. मात्र, उर्वरित ७० टक्के बोगी अनारक्षित असाव्यात, जे जादा डबे जोडण्यात येतील ते जनरलचे असावेत, असा आग्रह कुंभ प्रशासनाने धरला.

त्यालाही रेल्वेने मान्यता दिली आहे. भाविकांच्या सोयीसाठी ओढा आणि देवळाली कॅम्प येथे गाड्या थांबवण्याबाबत चर्चा झाली. रेल्वेच्या हद्दीतील दहा एकर जागेत भाविकांसाठी भव्य निवारा शेड उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला होता. तथापी, रेल्वे अधिका-यांनी तो प्रस्ताव फेटाळल्याची माहिती डवले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओढा स्थानकाच्या नामकरणाची मागणी

0
0

नाशिकरोड : ओढा रेल्वे स्थानकाचे नामकरण पंचवटी असे करावे या मागणीचे निवेदन शिवसेनेचे नगरसेवक शैलेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्था आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कुशावह यांना दिले. निवेदनावर डॉ. देवेंद्र येवले, लालजी पागेरे, निंबा कासार, भिकप्पा निळकंठ, प्रमोद प्रभुणे, निवृत्ती जुन्नरे, चारुदत्त मुळे, कांचन गावंडे, पांडुरंग गायकवाड, सचिन शिंदे, नितीन जोशी, अविनाश गोसावी, पदमाकर भालेराव गांगुर्डे, बबन जगताप आदींची नावे आहेत. ओढा स्थानकाचे नामकरण पंचवटी केल्यास ९० टक्के भाविक तेथे उतरतील आणि नाशिकरोड स्थानकाचा ताण कमी होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परजिल्ह्यातील पोलिसांना ‘ऑन फिल्ड’ प्रशिक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात दाखल होणाऱ्या १२ ते १५ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑन फिल्ड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहराची ओळख व्हावी तसेच नियोजनादरम्यान कर्मचारीच विविध रस्त्यांबाबत अनभिज्ञ राहू नये, यासाठी हा खटापोट सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी स्पष्ट केले.

पर्वणीदरम्यान स्नानासाठी ७० लाखांपेक्षा जास्त भाविक हजेरी लावण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने गृहविभागाने १५ ते २० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी १५ ऑगस्टनंतर शहरात येण्यास सुरूवात होईल. आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना लागलीच ऑन फिल्ड ट्रेनिंग देण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त पकंज डहाणे यांनी सांगितले. आतापर्यंत नाशिक शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीला तोंड कसे द्यायचे याचे विविध संस्थामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात ऑन फिल्ड प्रशिक्षणावर भर होता. बंदोबस्तासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हाच प्रशिक्षित वर्ग मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डहाणे यांनी दिली. पर्वणी काळात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने पोलिस दल सज्ज असणे अपेक्षित आहे. विविध रस्ते, त्यांचे एकमेकांचे कनेक्शन, घाटांची परिस्थिती याचे वास्तव चित्र समजल्यानंतरच त्याचे गांर्भिय स्पष्ट होईल, असे डहाणे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना पुस्तकांची भेट

बंदोबस्तासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी तयार केलेल्या पुस्तकाची भेट देण्यात येणार आहे. या पुस्तकामध्ये कुंभमेळ्याशी निगडीत माहिती असणार आहे. भाविक मार्ग, प्रशासकीय मार्ग, पोलिस स्टेशन, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीची माहिती, महत्वाचे मोबाईल नंबर्स यांचा त्यात अंतर्भाव आहे. आतापर्यंत १० हजारापेक्षा जास्त पुस्तकांची छपाई झाली असून, उर्वरित काम लवकरच संपेल, असे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

समन्वयाचा अभाव

गोपनियतेच्या नावाखाली आजवर प्रशासकीय यंत्रणेनी माहिती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा चालकांना याबाबत माहिती नाही. ही कबुलीच खुद्द जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. इतर विभागांची अवस्था सारखीच असून, अधिकाऱ्यांच्या डोक्यातील संकल्पना तसेच नियोजनाचा भाग दुसऱ्या, तिसऱ्या आ​णि चौथ्या फळीतील कर्मचाऱ्यांपर्यंत उतरवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ मंडळींकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधुग्राम पावसाच्या कचाट्यात!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा साधुग्रामच्या कामांवर परिणाम होतो आहे. ३० जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र, पावसाने कामांना खो बसत असल्याने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण होण्याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे. अर्थात, साधुग्रामची कामे कोणत्याही परिस्थितीत वेळेत पूर्ण होतील, या दाव्यावर प्रशासन ठाम आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वांत महत्वाचे काम म्हणून साधुग्रामकडे पाहिले जाते. तब्बल ३५० एकरमध्ये रस्ते तयार करणे तसेच शौचालये उभारण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. साधुग्राममधील पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिली आहे. महापालिका त्यादृष्टीने काम करीत असली तरी त्यात अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. त्यातच सतंतधार पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. आज, मंगळवारी दुपारी पावसामुळे अनेक कामे सुरूच झालेली नव्हती. साधुग्रामच्या एकूण परिसरापैकी नदीकाठच्या परिसरात नैसर्गिक उतार असून, याठिकाणी पावसाळी पाण्याचे योग्य नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. साधारणतः १५ जुलैनंतर साधु-महंत साधुग्राममध्ये येण्यास सुरूवात होईल.

याबाबत माहिती देताना महापालिकेच्या सिंहस्थ कक्षाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर जी. एम. पगारे यांनी सांगितले की, शौचालय तसेच बाथरूमचे पत्रे लावण्याचे काम संपुष्टात आले आहे. प्लंबिंगच्या कामांना पावसामुळे कोणताही अडथळा येण्याची शक्यता नाही. संततधार पाऊस पडत असला तरी त्यामुळे सध्या कोणतीही कामे खोळंबून राहिलेली नाहीत. कर्मचाऱ्यांना व्यवस्थित निवारा असून, त्यांच्या मदतीने कामे सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत सर्व कामे पूर्ण केली जातील. याशिवाय, पाण्याचा निचरा करण्यासाठी येथे क्रॉस पाईप लावण्यात येणार आहेत. तसेच, ज्या ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण वाढेल त्या ठिकाणांवर मुरूम टाकण्याचे काम हाती घेण्यात येईल. मागील आठवड्यापासून मनुष्यबळ तसेच यंत्रसामुग्रीमध्ये वाढ करण्यात आली आहे. साधु-महंतांना अडचण होणार नाही, यादृष्टीने सर्व उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे पगारे यांनी सांगितले.

पार्किंगच्या कामांना अवधी

साधुग्रामसह अंतर्गत व बाह्य पार्किंगच्या ठिकाणांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी देखील पावसाचा फटका बसतो आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. पार्किंगच्या कामांबाबत बोलताना पगारे यांनी सांगितले की, पार्किंगच्या कामांसाठी २० ऑगस्टपर्यंत अवधी आहे. पार्किंगची ठिकाणे पर्वणीच्या एक दिवस आगोदर म्हणजे २८ ऑगस्ट रोजी वापरात येणार आहे. तोपर्यंत सर्व काम पूर्ण केली जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाममंत्री घेणार सिंहस्थाचा आढावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज, दुपारी तीन ते पाच या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कुंभमेळा कामांबाबत ते आढावा बैठक घेणार आहेत.

सिंहस्थ आराखड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ६५० कोटी रूपयांच्या कामांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वरमधील अनेक रस्त्यांचे कामे संथगतीने सुरू असल्याचा आरोप सातत्याने होत असून याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज, बुधवारी सकाळी ११ वाजता सिन्नर येथील कुबेर बिल्डींग, महालक्ष्मी रोड येथील ओझर मर्चन्टस बँकेच्या सिन्नर शाखेचा उद्‌घाटन समारंभ आटोपल्यानंतर पाटील शासकीय विश्रामगृह येथे पोहचतील. दुपारी तीन ते पाच या कालावधीत पाटील बांधकाम विभागाच्या कामांसह इतर विभागांचा आढावा घेतील. यानतंर, सांयकाळी पाच ते साडेपाच या कालावधीत कालिदास कलामंदिर येथे राजर्षी शाहू महाराज नागरी पतसंस्थेच्या उद्‌घाटन समारंभ व मातंग हक्क परिषद मेळाव्यास पाटील उपस्थित राहतील. ते कॉलेजरोड येथे सदिच्छा भेट देऊन रात्री रवाना होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद काढणार ३० लाख नागरिकांचा विमा

0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

पंतप्रधान सुरक्षा विमाअंतर्गत जिल्ह्यातील ३० लाख नागरिकांचा विमा काढण्याचा ठराव मंगळवारी जळगाव जिल्हा परिषदेने मंजूर केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक पांडे यांनी हा ठराव मांडला. या योजनेंतर्गत नागरिकांचा विमा काढून देणारी देशातील पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे आदी उपस्थित होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३० लाख नागरिकांचा पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत प्रत्येकी १२ रुपयांचा विमा जिल्हा परिषदेकडून काढण्यात येणार आहे. देशातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या विम्याचा लाभ घ्यावा, यासाठी सर्वच शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

या योजनेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार देणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले. प्रत्येक सदस्य आपल्या गटातील गावांमध्ये हा उपक्रम राबविणार आहे. यापूर्वी जिल्हा बँकेनेही ३ लाख ४२ हजार सभासदांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला होता, तसेच जिल्ह्यातील जी गावे या योजनेचा शंभर टक्के लाभ घेतील, त्या गावांना जिल्हा नियोजन मंडळाकडून दहा लाख रुपये विकास निधी देण्यात येणार असल्याचे खडसे यांनी आधीच जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांच्या संरक्षणाची मागणी

0
0

धुळे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निमूर्लन सामितीच्या साक्री शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोळकर व अॅड. गोविंद पानसरे यांच्या खून तपासातील अक्षम्य दिरंगाईबददल निषेध करण्यात आला. महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना संरक्षण मिळावे, याबाबत राज्य सरकारला निवेदन देण्याबाबत अंनिसचे जिल्हाध्यक्ष ड गजेंद्र भोसले यांनी साक्री येथे बैठकीत ठराव मांडला. अंनिसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची साक्री येथे बैठक पार पडली. यावेळी विजय भोसले, ए. ओ. पाटील, पी. झेड. कुवर, बी. एम. भामरे, बाळकृष्ण तोरवणे, ए. एस. पाटील, शत्रुघ्न पाटोळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत नाशिक येथे दि.४ व ५ जुलै रोजी बार्टीतर्फे होणाऱ्या जादुटोणा विरोधी कायद्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १८ जुलै रोजी धुळे जिल्हा अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यात बनावट मद्यनिर्मिती

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सध्या मुंबईतील मालाड व मालवणी भागात विषारी दारूमुळे शंभर जणांचे बळी गेले आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यातही मध्यप्रदेश व सीमारेषेलगत असलेल्या काही गावांमध्ये बनावट मद्य तयार करून महाराष्ट्रात पाठविले जात असल्याची माहिती हाती आली आहे. धुळे तालुक्यात वन विभागाच्या पड‌िक जमिनीवर हे व्यवसाय सर्रास सुरू आहेत. यामध्ये जिल्हा पोल‌िस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना आर्थिक मिळवणी करून हे व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे यावर कारवाई नेमके कोण करणार, असा सवाल पुढे येत आहे.

मुंबईत विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूकांडात शंभर जणांचे बळी गेले आहेत. मात्र, पोल‌िस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कारवाईचे सत्र सुरू केलेले नाही. धुळे जिल्हा हा मध्यप्रदेश व गुजरात या दोन राज्यांच्या मधोमध असल्याने मध्यप्रदेशातून गुजरात व महाराष्ट्रात बनावट मद्य आणले जाते आणि ते परमीटरूम वाल्यांना देऊन लाखो रुपये कमविले जात आहेत. तालुक्यातील काही भागात तर पड‌िक वन जमिनीवर हे बनावट मद्याचे कारखाने गेल्या काही महिन्यांपासून ठाण मांडून आहेत. जिल्हा पोल‌िस प्रशासनाला लाखो रुपये मद्य व्यावसायिकांकडून दिले जात असल्याने यावर कारवाई होणे शक्य नाही. म्हणून जिल्ह्यातही बनावट मद्यामुळे अनेक जण बळी पडू शकतात.

अशी बनवली जाते नकली दारू

भंगार व्यवसायिकांकडून निरनिराळ्या ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या जमा करून त्यावर बनावट स्टिकर लावले जाते. बाटलीमध्ये विविध रसायनांच्या माध्यमातून विशिष्ट ब्रॅण्डची चव तयार केली जाते. खोक्यामध्ये पॅक करून वितरीत केले जातात. लग्नसराईमध्ये असे खोकेच्या खोके विक्रीसाठी ग्रामीण भागात दाखल होतात.

गंदा है पर धंदा है

बनावट मदयावर दीड वर्षापूर्वी जिल्हा पोल‌िस दलातील एका पथकाने कारवाई करून मद्याचा कारखाना उध्‍्वस्त केला होता. विशेष म्हणजे शहरापासून हा कारखाना २५ किमीवर होता. यासाठी अनेक तरुणांचा उपयोग करून घेतला जातो. लग्नसराईत लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून केली जात असल्याचे समजते. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातही बनावट मद्याचे कारखाने आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील देशमाने ग्रामपंचायतीच्या देशमाने खुर्द व बुद्रुक या दोनही गावांमधील घरकुलांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप गावातील संदीप दुघड यांनी केला आहे. वाटप केलेल्या गावातील घरकुलांमध्ये अनियमितता झाल्याचे दुघड यांनी म्हटले असून, तहसीलदार शरद मंडलिक यांना याबाबत निवेदन दिले आहे.

देशमाने ग्रुप ग्रामपंचायतीच्या देशमाने खुर्द व देशमाने बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये इंदिरा आवास, रमाई आंबेडकर आणि राजीव गांधी घरकुल योजना क्रमांक - २ अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप केले आहे. गावातील संदीप दुघड यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविताना येथील घरकुल योजनेच्या बाबतीत अनियमितता व गैरव्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप केले जाताना आणि त्या घरकुलांचे काम पूर्ण झालेले नसतांनाही संपूर्ण रक्कम काढली गेल्याचा आरोप दुघड यांनी केला आहे.

सधन व्यक्तींना दिला लाभ

घरकुलांचे वाटप करतांना गरजू व्यक्तींना लाभ देण्याऐवजी काही सधन व्यक्तींना लाभ दिला गेल्याचा आरोप संदीप दुघड यांनी तहसीलदारांकडे तक्रारीत केला आहे. काही घरे ही शौचालयाविनाच पूर्ण केली गेली असून, काही लाभार्थ्यांनी तर चक्क नियम डावलत शासकीय योजनेतील घरे भाडेतत्त्वावर दिल्याचे निदर्शनास येत असल्याचे दुघड यांनी या तक्रारीत म्हटले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांच्या यादीत ग्रामपंचायतीच्या एका वसुली अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या घरातीलच तीन व्यक्तींचा समावेश असल्याचे दुघड यांनी म्हटले आहे. गावातील घरकुल योजनेच्या या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी दुघड यांच्यासह आप्पासाहेब पवार, योगेश गांगुर्डे, पुंडलिक पवार, प्रवीण आरगडे, सुनील जगताप, आप्पासाहेब शिंदे, बाळकृष्ण बोरसे, आप्पासाहेब आरगडे, शिवाजी खैरनार आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेला पाऊस मंगळवारीही कायम होता. त्यात घोटी काळुस्ते मार्गावरील पुलाचे काम सुरू असताना पर्यायी मार्गावरील रस्ताच वाहून गेल्याने चौदा गावे व वाड्यांचा संपर्क दुसऱ्या दिवशीही खंडितच होता. दरम्यान, प्रशासनाने या मार्गासाठी खैरगावमार्गे पर्यायी मार्ग तत्काळ तयार केल्याची माहिती प्रभारी तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांनी दिली. जवळच्या नागरिकांसाठी पायी मार्ग म्हणून या पुलालाच दोन लाकडी शिड्या जोडण्या आल्या आहेत.

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. दारणा, भाम, वाकी नद्या मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्या आहेत. परिसरातील काळुस्ते, कांचनगाव, भरवज, निरपन, तळोघ, शेनवड, खडकवाडी, औचितवाडी, जुनवनेवाडी, आंबेवाडी, मांजरगाव, कुरुंग्वाडी, दर्याची वाडी, बोरवाडी, जामुंडे गावंडे, धामटकी, सारुक्तेवाडी, दरेवाडी, औचीतवाडी, फोडसेवाडी, ताप्याचीवाडी, आघाणवाडी आदी चौदा गावे वाड्यापाड्यातील नागरिकांचा घोटी व इगतपुरी तालुक्याशी संपर्क तुटल्याने या नागरिकांना आता अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

वैद्यकीय व वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. पर्यायी मार्गामुळे काही गावांची सोय झाली असली तरी अनेक वाड्या पाड्यांवरील नागरिकांच्या दळणवळणचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने ठेकेदाराकडून लवकरात लवकर अर्धवट पुलाचे काम मार्गी लावून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकेश्वरला पावसाचा फटका

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे तीन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने सिंहस्थ कामांना खो घातला आहे. पहिल्या टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात असून, नंतर मंजुरी मिळालेली वाढीव कामे अर्धवट अवस्थेत सापडली आहेत. पाऊस असाच कोसळत राहिला तर सिंहस्थ कामांचे काय असा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

प्रशासकीय अधिकारी उसने अवसान आणून सिंहस्थ कामे पूर्ण होत असल्याचे दाखवत आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती आलबेल नसल्याचे त्यांच्या धावपळीतून जाणवत आहे. आखाड्यांना दिलेले सर्वच शेड अद्याप पूर्ण झालेले नाहीत. स्वच्छतागृहांचा वापर ताबडतोब होऊ शकत नाही. रस्त्यांची कामे शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. गल्ली बोळातील रस्ते अद्यापही बाकी आहेत. घाटांचे काम अपूर्णावस्थेत आहे. नदीपात्रातील माती काढण्यात आलेली नाही. आता हा सर्व माती मुरूमाचा भराव नदीपात्राचे नुकसान करणारा ठरला आहे. याकडे संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे.

कचराडेपो जवळच्या घाटात ढिगारे साचले आहेत. काही दिवसांपूर्वी येथे पाहणीस आलेले राज्याचे प्रमुख सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी असे दृश्य पाहून कोण आंघोळ करणार? असा सवाल उपस्थित केला होता. त्याची शब्दाशः प्रचिती येत आहेत. नदीपात्रात बांधवयाचे बंधारे अपूर्णावस्थेत आहेत. याचबरोबर शहरात प्रवेशद्वारापासून महत्त्वाच्या रस्त्यालगतच्या गटारींची कामे झालेली नाहीत.

विद्यार्थ्यांचे हाल

त्र्यंबक शहरात चार माध्यमिक आणि दोन उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या सर्वांना बसने प्रवास करावा लागतो. हे विद्यार्थी शहराबाहेर असलेल्या दोन किलोमीटर अंतरावरील बसस्थानकापासून चालत शाळेत येतात. सध्या पाऊस सुरू झाल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत आहेत. यामध्ये महिला व वयोवृध्दांचे प्रमाण अधिक असते. त्यांची सत्त्वपरिक्षा या बसस्थानकाच्या नियोजनाने होत आहे. तसेच गत दोन महिन्यांपासून येथे मंगळवारचा बाजार भरलेला नाही. सिंहस्थ कामांच्या नावाने मेनरोड गंगास्लॅबवर भरणारा आठवडे बाजार नगरपालिका प्रशासन बसू देत नाही.

पुलाचा भराव गेला वाहून

त्र्यंबक ते पिंपळद असा गोलदरी नदीवरून रस्ता तयार करण्यात आला आहे. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नगरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या या डांबरी रस्त्यावर गोलदरी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाजवळचा भराव पावसाने वाहून गेला. रस्त्याला तडे पडले आहेत. पहिल्याच पावसात सिंहस्थ कामांची अशी दयनीय अवस्था झाली आहे. येथे जोरदार पाऊस झाल्यास नदीस पूर येत असतो. पूर्वी आजूबाजूच्या शेत आवणात पाणी विभागले जायचे. मात्र येथे जमीन विकसित करण्यात आली आहे. अत्यंत छोटा मार्ग पाण्यासाठी ठेवला असून, पुराचा धोका निर्माण झाला आहे. शाही पर्वणीच्या दरम्यान येथे जोरदार वृष्टी झाल्यास या भागाचा संपर्क तुटेल आणि याचा थेट परिणाम शाहीस्नानावर होईल याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही असे या कामाच्या दर्जावरून जाणवते.

नागरिक भोगताहेत नरकयातना

मेनरोड परिसरातील कुशावर्ताजवळील इंद्रतीर्थीतून पानवेली आणि गाळ काढण्यात आला. तो तसाच परिसरात सडत राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातील दळणवळण थांबले असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्काळ वेतन देण्याची मागणी

0
0

नाशिक : अनेक वर्षांपासून आयटीआय येथे चतुर्थ श्रेणीसेवक म्हणून कार्यरत असलेल्या सतीश जाधव यांचा मे महिन्याचा पगार संस्थेचे उपप्राचार्य आर. पी. सोनारे यांनी रोखून ठेवल्याचा आरोप जाधव यांच्या पत्नी निशा जाधव यांनी केला आहे. वैद्यकीय कारणास्तव जाधव हे मे महिन्यातील २३ दिवस रजेवर होते. त्यांची रजा उपप्राचार्य एस. एल. परदेशी यांनी मंजूर केली होती. मात्र, तरीही जाधव यांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्कर त्रास दिला जात असल्याची तक्रारही निशा जाधव यांनी केली आहे. या कार्यालयातून त्यांच्यावर सतत दबाव आणला जात असल्याने त्यांची मानसिक प्रकृती बिघडली तसेच १६ जून रोजी जाधव यांचा अपघात झाला. यात त्यांच्या डाव्या डोळ्यासह डोक्याला व मेंदूला मार लागला आहे. यासंदर्भात जाधव यांनी आयटीआयचे प्राचार्य नलावडे यांना प्रत्यक्ष भेटून थकित वेतन व फंडकर्ज रक्कम मिळण्याची मागणी केली आहे. पाच दिवसात ते न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पी. एम. वाकडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पावसाळा सुरू झाला असतानाही नाशिकरोड परिसरातील नाले व गटारींची स्वच्छता न झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाजी पुतळा, देवीचौकात मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होत असते. व्यावसायिक व रहिवाशांनी नाले सफाईची मागणी केली आहे. नाशिक जिल्हा गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष जगन गवळी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी दक्षता म्हणून प्रत्येक उन्हाळ्यात नाशिकरोड परिसरातील गटारींची साफसफाई केली जात असते. यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. स्वच्छता मोहीम सुरू असतानाही नाले सफाई न झाल्याने नाशिकरोड परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

नवले चाळीला धोका

जेलरोडची पाण्याची टाकी आणि दत्तमंदिर चौकातील नाले नाशिकरोडला रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या नाल्याला जोडलेले आहेत. हे मुख्य नाले तुंबले असून त्यांची सफाईच झालेली नाही. नाले तुंबल्यावर पावसाळ्यात शिवाजी पुतळा, नवले चाळ, चिडेमळा भागात घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरते. सिन्नरकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी खाली शिवाजी पुतळा चौकात येऊन मिळते. बिटको चौक, नाशिकरोड बसस्थानक, मुक्तीधाम चौक या भागात गटारी साफ करूनही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. व्यावसायिक व रहिवाशांचे नुकसान होते. यंदा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.

शिवाजी पुतळा, नवले चाळ, चिडे चाळ, नाशिकरोड पोलिस ठाण्यात १९ सप्टेंबर २००८ रोजी कंबरे ऐवढे पाणी साचले होते. तेव्हा आम्हाला मोठे आंदोलन करावे लागले होते. त्यानंतर महापालिकेने मोठे पाईप टाकले. तीस वर्षांपासून या परिसरात पाणी तुंबत आहे. हा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.

- जगन गवळी, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फ बोर्डाला मिळणार अध्यक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने २९ जून रोजी राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली आहे. यापूर्वी वक्फ बोर्डाला अध्यक्षपद मिळावे, यासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई तारीख पे तारीखमुळे रेंगाळली होती. या संदर्भातील वृत्तही महाराष्ट्र टाइम्सने प्रसिध्द केले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य वक्फ बोर्ड सदस्यांनी याचिका दाखल केली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी शासन नियुक्त सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारने त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र, सुनावणी तारीख पे तारीख फेऱ्यात अडकल्याने वक्फ बोर्डाला अध्यक्ष मिळण्याची आशाही धुसर होत होती. राज्य सरकाराने राज्य वक्फ बोर्डाला शासन नियुक्त सदस्यांची नियुक्त्यांच्या फेऱ्यात न पडता सध्या आहे त्या सदस्यांमधून अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करून दिली आहे. येत्या २९ जून रोजी मुंबईच्या मंत्रालयातील विस्तारीत कक्षात सकाळी अकरा वाजता सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याच सभेत राज्य वक्फ बोर्डाचे सात वर्षांपासून रिक्त असलेले अध्यक्षपद निवडणुकीच्या माध्यामातून निवडले जाईल.

राज्य वक्फ बोर्डात गेल्या सात वर्षांपासून अध्यक्षपद रिक्त होते. राज्य सराकारने अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली असून, तसे आदेश प्राप्त झाले आहेत. २९ जून रोजी मुंबईत राज्य वक्फ बोर्डचा नवीन अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यामातून निवडला जाईल.

- सय्यद एजाज हुसेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) राज्य वक्फ बोर्ड औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यातून तीनच दिवस सेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ते पुणे ही सेवा आठवड्यातून पाच दिवस घेण्याचे जाहीर करणाऱ्या मेहेर कंपनीने आता ही सेवा केवळ तीन दिवसच देण्याचे स्पष्ट केले आहे. या तीन दिवसात प्रत्येकी दोन फेऱ्या होणार असून, प्रतिसाद वाढल्यास आठवड्यातून पाच दिवस सेवा देण्याचे कंपनीने सांगितले.

नाशिक ते पुणे ही विमानसेवा सुरू करण्याचे मेरीटाईम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेस लि. (मेहेर) या कंपनीने घोषित केले आहे. येत्या ६ जुलैपासून ही सेवा ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून पुणे लोहगाव विमानतळाच्या ठिकाणी ही सेवा दिली जाणार आहे. प्रारंभीच्या काळात म्हणजेच ६ ते ३१ जुलैच्या काळात नाशिक ते पुणे सेवेसाठी सहा हजार रुपये तिकीट आकारले जाणार आहे. मात्र, सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात रिटर्न तिकिटासाठी ७४९९ रुपये घेण्यात येणार आहेत. तर, रिटर्न तिकिटासाठी ८९९९ रुपये आकारण्यात येतील, असे मेहेरचे संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी स्पष्ट केले. दि. १ ऑगस्टपासून रिटर्न तिकिटासाठी प्रवाशांना ९४९९ रुपये अदा करावे लागणार आहेत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तिन्ही दिवस प्रत्येकी दोन सेवा दिल्या जाणार आहेत. या सेवेला प्रतिसाद मिळाला तर आठवड्यातून पाच दिवस ही सेवा करण्यात येईल. बुधवारपासून (२४ जुलै) तिकीट बुकिंग सुरू होणार आहे, असेही वर्मा यांनी सांगितले.

सेवेचे वेळापत्रक असे

सेवा दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असेल

ओझरहून निघेल - सकाळी ९.४५ वाजता आणि संध्याकाळी ५.३० वाजता

लोहगाव (पुणे) पोहचेल - सकाळी १०.३५ वाजता आणि संध्याकाळी ६.२० वाजता

लोहगावहून (पुणे) निघेल - सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ६.५० वाजताओझरला पोहचेल - सकाळी ११.५० वाजता आणि संध्याकाळी ७.४० वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images