Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नंदिनीचे सांडपाणी थेट मिसळतेय नदीपात्रात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छता मोहिमेमुळे नंदिनी (नासर्डी) वाहती झाली. मात्र, तिच्यातील सांडपाण्याचे प्रमाण कमी झाले नाही. मूळ समस्या कायम राहिली असून, आता हेच पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक स्नान करणार आहेत.

गोदावरीप्रमाणेच नाशिकच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नासर्डीच्या नदीपात्रात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. महिरावणी ते आगरटाकळी या सुमारे पंचवीस किलोमीटरच्या मार्गावर अनेक गावे, वस्त्या, झोपडपट्ट्या आणि नागरी वसाहतींचे मलजल, सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळते.

पावसाळ्यात मोठा पाऊस झाला, तरच भरून वाहणाऱ्या या नदीची अवस्था एरवी नाल्यासारखीच असते. यंदा जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नासर्डी वाहती झाली. त्यापूर्वी झालेल्या स्वच्छता मोहिमेमुळे पात्र काही प्रमाणात स्वच्छ झाले होते. मात्र, सांडपाण्याची मूळ समस्या कायम राहिली​. ही नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत आगरटाकळी येथे गोदेत मिसळते. या ठिकाणाला 'टाकळी संगम' म्हटले जाते.

धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या याच संगमाच्या ठिकाणी प्रदूषणाची पातळी वाढली आहे. नासर्डीचे घाण आणि गटारीसारखे काळे फेसाळ पाणी गोदेत मिसळते आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी महापालिकेचा सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान भाविकांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रशासनाने नवीन घाटांची निर्मिती केली असून, त्यातील एक घाट याच संगमाशेजारी बांधण्यात आला आहे. प्रदूषणाचे प्रमाण असेच राहिले तर भाविकांना याच पाण्यात डुबकी मारण्याची वेळ येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यावसायिक तरुणाला हवे पोलिस संरक्षण

$
0
0

नाशिक : पोलिसात दिलेली मारहाणीची तक्रार मागे घे, अन्यथा तुला जीवे मारू असे धमकावले जात असूनही पोलिस संबंधित आरोपींवर कारवाई करीत नसल्याची कैफियत एका टेलर व्यावसायिकाने महाराष्ट्र टाइम्सकडे मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांकडून जीवितास धोका निर्माण झाला असून, पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्याने केली आहे.

दिनेश कल्पवृक्ष असे तक्रारदाराचे नाव आहे. मेनरोडवरील बिवलकर लेनमधील श्री गणेशा संकुलमध्ये त्याचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. परिसरातील एका तरुणाने ‌दिनेशच्या अंगावर तंबाखूची घाण टाकली. दिनेशने जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाला. परत येथे दिसला तर जीवे मारेन अशी धमकी संबंधित तरुणाने दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌शिकरोडला सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्पदंशामूळे कालू कचरू पवार (वय ३०, रा. अंबड) या तरुणाचा मृत्यू झाला. सापाने चावा घेतल्याने त्याला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

महिलेचा मृत्यू

स्टोव्हच्‍या भडक्यामुळे गंभीर भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ताईबाई विश्‍वनाथ दळवी (वय ५२, रा. खरशेत, ता. त्र्यंबक) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने त्या ९५ टक्के भाजल्या. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला.

विवाहितेची आत्महत्या

टागोर नगर येथील नीता रवींद्र नेरकर (वय ३१, रा. चंद्रदर्शन सोसा, टागोरनगर) यांनी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (दि.27) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पतीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. उपनगर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

लॅपटॉप चोरीस

शहर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग चोरट्याने लांबविली. ६० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरीस गेल्याची फिर्याद सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. मेळा बसस्थानक येथे शनिवारी (दि.२७) सायंकाळी पाचच्या सुमारास एक प्रवासी बसमध्ये बसले असताना त्यांचे लक्ष विचलित करून चोरट्याने लॅपटॉप चोरून नेला.

चाक चोरीस

राहत्या घराच्या पार्किंगमध्ये उभ्या मोटरसायकलचे चाक चोरट्याने चोरून नेले. गंगापूर रोड लगतच्या आकाशवाणी केंद्राजवळ हा प्रकार घडला. शनिवार (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने दुचाकी क्र. (एमएच १५ डीपी ८४२६) चे मागील चाक चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणा दिनेश अमृतकर यांनी गंगापूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

तरुणाचा मृत्यू

रंगकाम करीत असताना विजेचा धक्का लागून दत्तू सोमनाथ शिंदे (२५, रा. महादेवनगर, सातपूर) या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी (दि.२८) दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंज विहार समोरील गायत्री अपार्टमेंट जवळ रंगकाम करीत असताना ही घटना घडली. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डायल १०८’ ठरतेय महिलांसाठी वरदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरोदरपणाच्या नवव्या महिन्यातील स्त्रियांसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या डायल १०८ या येजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमधील २१२ गरोदर स्त्रियांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यात ही योजना गरोदर स्त्रियांसाठी एक वरदान ठरली आहे.

महाराष्ट्र सरकार आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या डायल १०८ सवेतर्फे विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यास उशीर केला जाऊ नये आणि लवकर मदत मिळून मातामृत्यू व अर्भक मृत्यू टाळता यावेत, हा या सेवेचा उद्देश आहे.

रोजच्या आकडेवारीनुवार ३५ ते ४० टक्के म्हणजे साधारणत ४०० ते ४५० गरोदर स्त्रियांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका मदत करीत आहेत. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यावर रुग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यास उशीर करू नये, तसेच गुंतागुंत टाळण्यासाठी रुग्णालयात वेळोवेळी तपासणी गरजेची आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून यासाठीचा पथदर्शी प्रकल्प चालवला गेला. जूनपासून हा प्रकल्प पूर्णत: सुरू केला जात आहे. मदर अॅण्‍ड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम या प्रकल्पाअंतर्गत गोळा होणारी गरोदर मातांची आकडेवारी यासाठी वापरली जाते.

राज्यात दररोज सुमारे चार हजार बाळंतपणे होत असून, त्यातील ४० ते ५० टक्के बाळंतपणे खासगी रुग्णालयात, तर ५० ते ६० टक्के शासकीय रुग्णालयात होणाऱ्या बाळंतपणापैकी २० ते २५ टक्के गरोदर स्त्रिया १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेऊन रुग्णालयात दाखल झालेल्या असतात अशी माहिती डॉ. प्रवीण साधले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार लिंकिंगला ‘ठेंगा’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनुत्साही मतदार आणि अपुरी जनजागृती यांमुळे राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण मोहीम फसल्याचे रविवारी दिसून आले. शहरातील नाशिकरोड, सातूपर, सिडको, जुने नाशिक आणि पंचवटीसारख्या परिसरात या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अनेक केंद्रांवर मतदारांपेक्षा बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) अधिक असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

मतदार याद्यांमधील नावांची पुनरावृत्ती टळावी तसेच आधार नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरात आणि जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील मतदान केंद्रावर रविवारी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मात्र, प्रत्येक केंद्रावर मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. ही मोहीम कशासाठी आहे याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट झाले. ज्या व्यक्तींची नावे दोन किंवा त्याहून अधिक ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये आढळली अशा मतदारांना जिल्हा प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. त्यांनी परिसरातील मतदान केंद्रांवर जाऊन अन्य मतदार याद्यांमधून नाव वगळून घेणे आवश्यक होते. परंतु, असे मतदार केंद्रांकडे फिरकलेच नाहीत. एकाच व्यक्तीची नावे दोन किंवा तीन ठिकाणी असल्याने आधारकार्ड मतदार ओळखपत्राशी लिकिंग करण्याचे कामही त्यामुळे होऊ शकले नाही.

कर्मचारी अधिक

सातपूर : सिडको, सातपूर परिसरातील बहुतांश केंद्रांवर या मोहिमेला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. आधार लिंकिंगसाठी फारशी गर्दी नव्हती. अनेक केंद्रांवर कर्मचारी अधिक मतदार कमी अशी परिस्थिती पहावयास मिळाली. मतदाराने मतदान कार्ड व आधारकार्डची साक्षांकित प्रत केंद्रावर जमा करणे आवश्यक होते. परंतु, याची सातपूर, सिडकोतील मतदारांना फारशी माहितीच नसल्याने मतदान केंद्रांवर अल्प प्रतिसाद होता.

कर्मचाऱ्यांचीच दांड‍ी

जुने नाशिक : जुन्या नाशकात सकाळी अकरा ते पाच या वेळेत राबविण्यात आलेल्या मोहिमेबाबत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. मतदारांच्या प्रतीक्षेतच नोंदणीचे काम संपले. काही मतदान केंद्रावर कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे नोंदणीसाठी आलेल्या मतदारांना माघारी फिरावे लागले. मतदारयादीत दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी, मृत मतदारचे नाव कमी करणे, दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या निवडणुक शाखेत अर्ज देऊनही कार्यवाही होत नसल्याने पुन्हा पुन्हा तेच का करावे अशा प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केल्या. आधार क्रमांक जोडण्यासाठी नावेच याद्यांमध्ये सापडत नसल्याचा अनुभवही नागरिकांना आला. दुबार नावे वगळण्यासाठी खटाटोप करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने बीएलओंची देखील दमछाक होत आहे. जुन्या नाशकातील नॅशनल उर्दू हायस्कूल केंद्रावर ११ हजारपैकी केवळ २० मतदारांची नोंदणी झाली. मौलाना अबुल कलाम उर्दू शाळेत पाच हजारपैकी अवघे १०० मतदारच पोहोचले. बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये साडे सहा हजारपैकी सुमारे २०० मतदारांनी हजेरी लावली.

केंद्रांवर शुकशुकाट

पंचवटी : पंचवटी परिसरात निवडणूक आयोगाचा प्रयत्न असफल झाल्याचे दिसून आले. सर्व मतदान नोंदणी केंद्रांवर शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. के. के. वाघ, विडी कामगार वसाहत, मेरी शाळा, म्हसरूळ, पेठ रोड, मखमलाबाद नाका, कोणार्क नगर, सरस्वती नगर, हिरावाडी अशा सर्वच ठिकाणी थंड प्रतिसाद होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालायला हवे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अनेकांचे मतदार कार्ड तयार असून नागरिकांनी ते अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत. १२ जुलैला या मोहिमेची शेवटची मुदत असल्याने मतदारांनी मतदार ओळखपत्र ताब्यात घ्यावे असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

मतदारांची संख्या कमी

नाशिकरोड : परिसरातील पूर्व मतदारसंघात म्हसरुळ, आडगाव, नांदूर मानूर, दसक, पंचक, इंगळेनगर, कोठारी कन्या, शिखरेवाडी, नेहरुनगर, देवळाली गाव, सिन्नरफाटा, १२५ क्रमांकाची शाळा, गोसावीवाडी येथील शाळा तसेच महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीत राबविलेल्या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

मतदारांमध्ये निरुत्साह

लासलगाव : लासलगाव परिसरात मतदार नोंदणी अभियानास अल्प प्रतिसाद मिळाला. प्रशासनातर्फे लासलगावात १२ तर पिंपळगाव (न.) मध्ये ‌तीन, वेळापूरला एक असे एकूण १६ बूथ परिसरात लावण्यात आले. लासलगावला आधारसाठी २३४ मतदारांनी नोंदणी केली. फॉर्म सहा साठी २६, फॉर्म सात साठी १०, फॉर्म आठ साठी पाच व फॉर्म आठ अ साठी आठ मतदारांनी नोंदणी केली. पिंपळगाव नजीकला आधारसाठी ११७ मतदार, फॉर्म सहासाठी सहा, फॉर्म सातसाठी १८, फॉर्म आठसाठी तीन तर आठ 'अ'साठी सात मतदारांनी नोंदणी केली. वेळापूरला आधारसाठी २२ मतदार तर फॉर्म सहासाठी पाच मतदारांनी नोंदणी केल्याची माहिती तलाठी गांगुर्डे यांनी दिली.

दसक केंद्रावर वाद

मतदारांच्या माहितीसीठी नगरसेवक शैलैश ढगे यांनी एसएमएसव्दारे जनजागृती केली होती. त्यास प्रतिसाद देत गुलाम मेहमूद या मतदाराने नगरसेवक ढगे यांच्याकडे फार्म जमा केला; परंतु त्याचे नाव मतदार यादीत आले नाही. मेहमूद हे सकाळी दसक केंद्रावर आले असता नगरसेवकाकडे फार्म का जमा केला असे विचारत तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लेखी खुलासा घेतला. तो न दिल्यास गुन्हा दाखल करू असे धमकावल्याचा आरोप नगरसेवक ढगे यांनी केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आधीच उल्हास...

बीएलओंनी मतदारांना घरोघरी जाऊन शुद्धीकरण फॉर्म वाटले. ते भरुन देण्याची विनंती केली. अनेकांनी ते दिले नाहीत. अनेक मतदार केंद्राकडे फिरकलेच नाहीत. अनेकांना अशी मोहीम असते हेच माहित नव्हते. या कामावर शिक्षकांनी बहिष्कार घातला. त्यामुळे पाटबंधारे, महापालिका, अंगणवाडी, जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बीएलओ म्हणून काम पाहिले. त्यातही अनेकांनी वैद्यकीय रजा टाकली. बीएलओंना वर्षाला पाच हजार असे तुटपुंजे मानधन मिळते हे देखील त्यामागे कारण असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राअभावी ‘नेट’करांची धावपळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्राध्यापक पदासाठीची पात्रता चाचणी व ज्युनिअर रिसर्च फेलोशिप या दोहोंसाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) रविवारी २८ जून रोजी जळगावसह पुणे, औरंगाबाद, मुंबई व नागपूर या पाच केंद्रावर झाली. त्यासाठी आदल्याच दिवशीच विद्यार्थी सेंटरसाठी रवाना झाले. पुणे, नागपूर, मुंबई व औरंगाबाद या ठिकाणी जाण्यासाठी नवीन सीबीएसवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, या परीक्षेसाठी नाशिकला सेंटर नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी धावपळ होत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय पात्रता चाचणी म्हणून वर्षातून दोनदा होत असलेल्या नेट परीक्षेसाठी महाराष्ट्रात केवळ पाचच सेंटरर्स आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिवस अगोदरच निघावे लागत आहे. त्यात दीड दिवस खर्च होत असल्याने उजळणीसाठी वेळ मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्या त्या सेंटर्सवर जाऊन राहण्याची व्यवस्था, विद्यापीठात जाऊन कागदोपत्री आलेल्या अडचणींचा खुलासा या गोष्टी कराव्या लागत असल्याने परीक्षेच्या आधीचा एक दिवस विद्यार्थी या कामात व्यग्र असतो. त्यामुळे त्याला अभ्यासाच्या हिशोबातून हे दोन दिवस वजाच करावे लागत आहे. महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी नेट परीक्षेला बसतात; मात्र संपूर्ण राज्यभरात केवळ चारच एक्झाम सेंटर असल्याने जून महिना आला की विद्यार्थ्यांची भंबेरी उडते. रिझर्व्हेशनपासून ते बसमध्ये सिट मिळेपर्यंत मनात धाकधूक असल्याने त्याचा अभ्यासावर विपरित परिणाम होत आहे.

नाशिक, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर तसेच गोंदिया या शहरांतून परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद, जळगाव किंवा पुणे यापैकी एका शहराची निवड करावी लागते. त्यातही काहीजण मुंबईचा पर्यायही स्वीकारतात. मात्र, सेंटर्ससाठी या चारच शहरांचा अट्टाहास विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) का करीत आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून नेट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असेल तर मुख्य शहरांमध्ये त्यासाठी सेंटर का नको असा पवित्रा विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे.

पेंडिंग निकालाच्या प्रतिक्षेत नवा पेपर

नेट परीक्षेसाठी जिल्हाभरातून सुमारे १० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतात. यंदाही नेटचे नोटीफिकेशन निघाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज केले; मात्र ते पेंडिंग निकालाच्या प्रतिक्षेत. या अगोदर नेट परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती. या कालावधीत आता सहा महिने पूर्ण होत आहेत. सुरुवातीच्या तीन महिन्यातच निकाल लागणे अपेक्षित होते. मात्र, दुप्पट कालावधी जाऊन निकाल लागलेला नाही. यामुळे अगोदर दिलेल्या परीक्षेत यश मिळविण्याची शाश्वती असतानाही बहुतांश विद्यार्थ्यांनी यंदाही पुन्हा परीक्षा देणेच पसंत केले आहे. गतवेळी 'नेट'चे निकाल 'यूजीसी' होते. ही प्रक्रिया आता सीबीएसईकडे देण्यात आली. यामुळे डिसेंबरमध्ये ही परीक्षा सीबीएसईने घेतली. यंत्रणेतील या बदलांच्या परिणामी मात्र विद्यार्थी भरडले जात आहेत. सीबीएसईने काही महिन्यांपासून नेट आणि जेईई मेन्स यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल अद्यापही न लावल्याने नाराजीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांसाठी पाच लाख पत्रे

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

साधुग्राममध्ये उभारल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांसाठी पाच लाखांपेक्षा अधिक पत्र्यांचा वापर केला जात आहे. स्वच्छतागृहे उभारण्याचे काम अद्याप सुरू असून, किमान सहा महिने उभे केलेल्या पत्र्यांना वादळी वारा आणि पावसाचा मार सहन करीत तग धरावा लागणार आहे.

साधुग्राममध्ये तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक साधू-महंतांच्या निवासाची सुविधा तयार करण्यात आली आहे. तपोवन परिसरातील ३५० एकर जमिनीवर साधुग्राम साकरले जात आहे. या ठिकाणी प्रशासनाने ३०० स्क्वेअर मीटरचे १ हजार ५३७ प्लॉटस तयार केले आहेत. साधुंच्या निवासासाठी मोकळी जागा सोडून प्रशासनाने स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी ९ हजार १७८ टॉयलेटस उभारले जाणार असून, ९ हजार ९३२ बाथरूम असणार आहेत. या पायाभूत सुविधा कुंभमेळ्यानंतर काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छतागृह उभारताना प्रशासनाने पत्र्यांचा वापर केला. ३ बाय ४ मीटर जागेत ४ शौचकूप बसवण्यात आले असून बाथरूमसाठी रूंदीला चार फूट व अडीच मीटर पॅसेजमध्ये पाच नळाचे टॅब देण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यासाठी प्रशासनाला सरासरी किमान ४ लाख ७६ हजार ९९६ पत्र्यांचा वापर करावा लागत आहे. ही संख्या सरासरीनुसार असून, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पिण्याचे पाणी आणि आंघोळीसाठी लागणाऱ्या पाण्याची सोय ३ हजार ९७६ नळकनेक्शनद्वारे करण्यात आली आहे. यासाठी ३७ हजार ६५९ मीटर लांबीची पाइपलाइन महापालिकेने साधुग्राम परिसरात टाकली. तेच सांडपाण्यासाठी २८ हजार २४७ मीटर लांबीची पाइपलाइन टाकून हे पाणी थेट तपोवनातील सिव्हेज ट्रिटमेंट प्लांटमध्ये नेण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, साधुग्राममधील कामे तात्पुरत्या स्वरूपाची असली तरी त्यात दर्जा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत मोठ्या स्वरूपात हे काम पूर्णत्वास जात असून, त्याची व्याप्ती प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर समोर येईल. पत्र्यांची संख्या आणखी वाढू शकते, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

वादळ, वाऱ्याचा धोका

जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे साधुग्रामधील सेक्टर क्रमांक दोनमधील स्वच्छतागृहांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते. १९ हजारापेक्षा जास्त स्वच्छता गृहांची निर्मिती करताना लाखो पत्र्यांचा वापर करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात सर्व स्ट्रक्चर असल्याने ऐन पावसाळ्यात वादळी वारा आणि जोरदार पावसाचा धोका कायम असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील वाद निवळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरी महाराज आणि पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर साधू-महंत आणि प्रशासन यांच्यातील वाद निवळला आहे. निलपर्वत येथील निलांबिका देवी मंदिरात महंत हरीगिरी महाराज आणि पालकमंत्री गिरीष महाजन तसेच, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहायक मेळाधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे आदींची सुमारे एकतास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता.

सुविधा मिळत नसल्याने जुना आखाड्याचे महंत हरीगिरी महाराज यांनी शाहीस्नानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासन हादरले होत. हरीगिरी महाराजांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांनाही भेट नाकारली होती. रविवारी पालकमंत्र्यांना महंताची समजूत काढण्यासाठी पुन्हा त्र्यंबक गाठावे लागले. चर्चेत परस्परांच्या भूमिका समजावून घेतल्या. त्यानंतर संपूर्ण निलपर्वतवरील कामांची पाहणी केली.

पालकमंत्री येणार म्हणून सकाळपासून अधिकारी उपस्थित होते. रविवार असूनही नगरपालिका कार्यालयता गजबज सुरू होती. दुपारी दोन वाजेदरम्यान पालकमंत्री महाजन यांचे आगमन झाले. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहायका मेळाधिकारी महेश पाटील तसेच जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर आयुक्त प्रशांत मोहिते आदी अधिकाऱ्यांचा ताफा होता. नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी हे देखील उपस्थित होते. स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमातही बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर निर्मल आखाडा, अटल आखाडा आणि अग्नी आखाडा या आखाड्यांमध्ये जाऊन तेथील साधुंशी चर्चा केली. तसेच कामांची पाहणी करण्यात आली. सर्वात शेवटी पालकमंत्र्यांनी निलपर्वतकडे मोर्चा वळविला. तेथे जुना आखाड्याचे श्री महंत प्रेमगिरी महाराज यांनी संतप्त होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

महंतांच्या समस्या घेतल्या जाणून

त्र्यंबक येथे पालकमंत्री बडा उदासीन आखाड्यात पोहचल्यानंतर प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी हरीगिरी महाराज यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हालचाली केल्या. पिंपळद येथे त्यांच्याशी संपर्क साधला तेथे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हरीगिरी महाराज यांचा राग निवळला असून, चर्चा करतील अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवला.

अन् चेहरे खुलले

कुटुंबात लहानमोठे वाद होत असतात व निवळतात देखील. शाहीस्नानात सहभागी व्हायचे की नाही हे तेव्हाच्या वातावरणावर अवलंबून असेल असे हरीगिरी महाराज यांनी सांगितले. त्यांची नाराजी दूर झाली हे त्यांच्या एकूण हसतमुख उत्तराने सर्वांच्या लक्षात आले. तिढा सुटल्याची जाणीव होताच अधिकाऱ्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा दरात घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

केंद्र शासनाने कांद्याच्या किमान निर्यातमूल्यात केलेल्या वाढीमुळे कांद्याचे बाजारभाव घसरत असून, याचा परिणाम सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून आला. सोमवारी लिलावाला सुरुवात होताच कांद्याचे सरासरी दर सुमारे १५० रुपयांनी घसरून १ हजार ३५० रुपयांपर्यंत खाली आले. या भाव घसरणीमुळे मात्र कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कांद्याच्या किमती सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात राहाव्या यासाठी तयार करण्यात आलेल्या केंद्राच्या कांदा विषयक धोरणामुळे कांदा उत्पादकांवर भाव घसरणीचे संकट घोंगावत आहे. केंद्र शासनाने कांद्याच्या एमईपी दरात १७५ डॉलरची वाढ करून ती ४२५ डॉलर प्रती मेट्रिक टन केल्याने भारतातून कांद्याची निर्यात महागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या वाढीव निर्यातमूल्यात कांदा खरेदी करून इतर देशांच्या तुलनेत परदेशी बाजारात स्पर्धात्मक बाजारभाव देणे निर्यातदारांना कठीण होऊन बसणार आहे. त्यांनी खरेदीमध्ये दाखविलेल्या निरुत्साहामुळे कांद्याच्या दरात सध्या मोठी घसरण होत आहे.

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे एकरी उत्पादनात झालेली घट, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ अशा परिस्थितून मार्ग काढत शेतकऱ्यांनी जो काही कांदा पिकविला त्याला सध्या मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतानाही केंद्र शासनाने निर्यातमूल्यात केलेल्या वाढीचा निर्णय चुकीचा असून, यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांदा दरात घसरण सुरू झाली आहे. त्याचा आर्थिक फटका मात्र हकनाक कष्टकरी शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे मत नाफेडचे संचालक तथा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.यंदा गारपीट झाल्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

महिनाभरातील घसरण

जूनच्या पहिल्या आठवड्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला होता. त्यानंतर आतापर्यंत त्यामध्ये सुमारे साडे तीनशे रुपयांची घसरण झाली आहे.

पिंपळगावातही घसरण

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सोमवारी सुमारे सोळा हजार क्विंटल कांदा आवक झाली. किमान भाव ११०० रुपये तर कमाल भाव १८७० रुपये होता. सरासरी भाव १५५१ रुपये होता. कांद्याच्या निर्यातमूल्यात वाढ झाल्यामुळे दीडशे ते दोनशे रुपयांनी भावात घसरण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई ठेक्यावरून कुरघोडीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात ३३०० सफाई कर्मचारी भरण्याचा खाजगी ठेका आयुक्तांनी परस्पर निश्चित केल्याने स्थायी समिती आणि आयुक्तांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. कोट्यवधीच्या ठेक्यांकडे दुर्लक्ष करत, सदस्यांनी भूमीपुत्रांवर अन्याय होईल या भावनेने सफाईचा ठेका एका दिवसासाठी अडवला आहे. सफाई ठेक्यावरून महापालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाल्याने चक्क पोलिसांनाच पाचारण करण्यात आले. मंगळवारी पुन्हा सकाळी या विषयासाठी स्थायीची बैठक आयुक्तांच्या उपस्थितीत होणार आहे.

सिंहस्थात सफाईचे कामे करण्यासाठी ३३०० सफाई कर्मचारी खाजगी ठेकेदारी पद्धतीने भरले जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून जवळपास पाच कोटीला हे काम देण्यात आले आहे. आयुक्तांनी खाजगी ठेकेदांशी चर्चा करून जास्त दराची निविदा ३९ वरून ३५ टक्क्यांवर आणली आहे. यातील जाचक अटी असल्याने मनसेचेच पदाधिकारी या ठेक्यातून बाद झाले. विशेष म्हणजे आयुक्तांनीच या ठेक्याला अंतिम रुप दिल्याने आता वाद निर्माण झाले आहेत. स्थानिक भूमीपुत्रांवर यावर अन्याय होईल असा मुद्दे पुढे करण्यात आला आहे. तर सफाईचे काम करणाऱ्या मेघवाळ समाजाने हा ठेका देण्यास विरोध दर्शवला आहे. आजच्या स्थायीच्या बैठकीत हा विषय ठेवण्यात आल्याने विरोध करणाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन करत हा विषय हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. या ठेक्यात विश्वासात न घेतल्याने नाराज सदस्यांनी या संधीचा फायदा घेतला. आयुक्तांच्या उपस्थितीसाठी बैठक तब्बल दोन तास लांबविण्यात आली. आयुक्त महापालिकेत दाखल झाले असले तरी त्यांना सभांव्य वादावादीची कल्पना काही नगरसेवकांनी दिली. त्यामुळे बैठकीपूर्वीच रामायण बंगल्यांवर सदस्यांची आयुक्त, सभापती यांच्या उपस्थितीत मिनी बैठक झाली. यानंतर आयुक्तांनी समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवत लांब राहणे पंसत केले. तर सदस्यांनी उर्वरित विषय मंजूर करत सफाई ठेक्याला खो दिला. मंगळवारी यासाठी स्वंतत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयुक्तांना घेरण्याचा प्रयत्न

स्थायीच्या बैठकीत सदस्य एकीकडे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे कौतुक करत होते तर दुसरीकडे त्यांच्यावर ठेकेदारांशी रात्री चर्चा करण्यांवरून शरसंधान करत होते. तर बाहेर काही समर्थकांना उभे करून आयुक्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला जात होता. भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्तांनी या बैठकीपासूनच लांब राहणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद बसमुळे प्रवाशी हैराण

$
0
0

सातपूर : शहराच्या वाहतूक व्यवस्थेची मुख्य जबाबदारी असलेली बस यंत्रणा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर तयार नसल्याचे सोमवारी दिसून आले. सातपूरमधील आयटीआयजवळ बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर बस सोडून त्यांना अन्य वाहनांचा पर्याय शोधावा लागला. अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या कुंभमेळ्यात बसेची अत्यंच गरज असणार आहे. परंतु, सोमवारी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आयटीआय सिग्नलवर भर रस्त्याच शहर वाहतूकची बस बंद पडली. तब्बल एक तासाहून अधिक काळ रस्त्यातच उभी असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिप्लोमाच्या जागा राहणार रिक्त?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंगच्या नाशिक विभागातील सुमारे २५ हजार जागांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीअखेर सुमारे १७ हजार अर्ज निश्चित करण्यात आले आहेत. नाशिक विभागातील डिप्लोमा प्रवेशांच्या एकूण जागांच्या तुलनेत सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांची तूट प्राथमिक टप्प्यात नजरेत पडते आहे. मात्र, अकरावी सायन्सला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास या जागा यंदाही पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

नाशिक विभागामध्ये नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्हे मिळून सुमारे २५ हजार ३२६ एकूण जागा उपलब्ध आहेत. यात नाशिक जिल्ह्यात ८ हजार ८८२६, धुळ्यामध्ये २ हजार ३१५ जागा, जळगावमध्ये ५ हजार ६८६ जागा तर नगर जिल्ह्यात ७ हजार ८२७ जागा उपलब्ध आहेत.

यंदा नाशिक विभागातून आरक्षित जागांसाठी १५ हजार ५४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर खुल्या गटातून सुमारे ५ हजार १९४ अर्ज उपलब्ध झाले. सुमारे २५ हजार जागांसाठी एकूण २० हजार ७३६ अर्ज 'डीटीई'ला (तंत्रशिक्षण संचलनालय) मिळाले. पैकी अर्ज केलेल्या मात्र कन्फर्म नसलेल्या अर्जांची संख्या १ हजार ९०४ इतकी होती. यातील २३३ अर्ज कन्फर्म होऊ शकलेले नाहीत. यानुसार प्रवेश अर्जाची मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत सोमवारी दुपारी डीटीईकडे कन्फर्म अर्जांची संख्या १७ हजार ३६० च्या घरात होती.

प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात १ जुलै रोजी सर्वसाधारण मेरीट लिस्ट जाहीर होईल. ६ जुलै रोजी मेरीट लिस्ट जाहीर होईल. डिप्लोमासाठी सुमारे १ लाख ८० हजार जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या तपशिलासाठी विद्ययार्थ्यांना www.dte.org.in/poly या वेबसाइटवर संपर्क साधता येईल.

पॉलिटेक्निक प्रवेश अन् महत्त्वाच्या तारखा

सर्वसाधारण गुणवत्ता यादी - १ जुलै

आक्षेप घेण्याची मुदत - २ ते ४ जुलै

मेरिट लिस्ट - ६ जुलै

पहिला कॅप राऊंड - ७ ते १० जुलै

प्रवेशाची पहिली यादी - १३ जुलै

दुसरा कॅप राऊंड - २१ ते २४ जुलै

दुसरी प्रवेशाची यादी - २७ जुलै

काऊन्सिलिंग राऊंड - १० ऑगस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेक्याला मुदतवाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरातील घंटागाडी ठेक्याला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने सोमवारी घेतला. तसेच महासभेच्या प्रस्तावाची नोव्हेंबर पूर्वी अमंलबजावणी करण्याचे आदेश काढत यापुढे मुदत मिळणार नाही असा इशाराही सभापतींनी दिला. सहा महिन्यांसाठी ठेकेदारांना आठ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

महासभेने तीन महिन्यांपूर्वीच शहरातील घंटागाडीचा ठेका तीन वर्षासाठी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, या प्रस्तावावर पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. शहरातील विद्यमान घटांगाडी ठेकेदारांची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा असल्याने आता विद्यमान ठेकेदारांना मुदतवाढ देण्याशिवाय पर्याय रहिलेला नव्हता. विद्यमान ठेकेदारांना सिंहस्थाच्या नावाखाली देण्याचा घाट प्रशासनासह काही लोकप्रतिनिधींनी घातला होता. विशेष म्हणजे यासाठी आठ कोटी रुपये मोजण्यात येणार आहे. या विषयावर कोणतीही चर्चा न करता तो मंजूर करण्यात आला. सर्वच सदस्यांनी एकत्रितपणे त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्यमान ठेकेदारांनाच मुदतवाढ देण्यात आली आहे. सभापतींनी ही शेवटची मुदतवाढ असल्याचे सांगून यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे आदेश दिले. महासभेच्या प्रस्तावाची नोव्हेबंरपर्यंत अमंलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यमान ठेकेदारांना शेवटची मुदतवाढ मिळणार आहे.

सिंहस्थ केरकचरासाठी ८३ लाख

विद्यमान ठेकेदांना सिंहस्थाच्या नावाखाली मुदतवाढ दिली असतांनाही स्थायी समितीने रामकुंड, गोदाघाट परिसरात सिंहस्थाच केरकचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घटांगाडी ठेकेदारालाच ८३ लाखाचा स्वंतत्र ठेका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंचवटीच्याच ठेकेदाराला हे काम देण्यात आले असून ही सगळी प्रक्रिया संशयास्पद असतांनाही सदस्यांनी मौन राहणेच पंसद केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

श्वान निर्बीजकरणाचे दर कमी का?

स्थायी समितीवर शहरातील मोकाट व भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचा ७५ लाखांचा प्रस्तावही मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. नांदेड येथील सोसायटी फॉर दि प्रिव्हेनश्न ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स या संस्थेला देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षी एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणाला ९५० रुपये दिले होते. तर चालू वर्षी हेच काम ७५० रुपयात देण्यात आल्याने दर कमी का झाले असे सांगत सदस्य राहुल दिवे यांनी चौकशीची मागणी केली. तर निर्बीजीकरण खरच होते का, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गीतांजली थांब्यासाठी अचानक आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

गीतांजली एक्सप्रेसला मनमाड येथे थांबा मिळावा म्हणून प्रवाशांनी नाशिकरोड येथे सोमवारी अचानक रेलरोको आंदोलन केले. रेल्वे सुरक्षा दलाने आठ प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली.

गीतांजली एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सकाळी दहाच्या सुमारास आली. ही गाडी नंतर थेट भुसावळला थांबते. नाशिक- मनमाड असा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गीतांजलीला मनमाड येथे थांबा मिळावा, या मागणीसाठी अचानक रुळावर उतरून आंदोलन केले. सुरक्षा दलाने आंदोलनकर्त्यांना त्वरित ताब्यात घेतले. दरम्यान, रेल्वेचा रुळ ओलांडणाऱ्या ९० प्रवाशांवरही रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्याचा झटका; पालकमंत्री ‘सावध’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील आखाड्याचे प्रमुख हरीगिरी महाराज यांनी प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवत बहिष्काराचे अस्त्र उगारल्यानंतर पालकमंत्र्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली. त्यांनी ताबोडतोब त्र्यंबकेश्वर गाठून महाराजांची नाराजी दूर केली. बहिष्कारच्या नुसत्या घोषणेमुळे सावध झालेले पालकमंत्री आज पहिल्यांदाच कुंभमेळ्याबाबत विविध लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांशी संवाद साधणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत विचार करण्यासाठी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि दुपारी तीन वाजता परशुराम सायखेडकर सभागृह येथे विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमेवत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंहस्थाचे नियोजन करताना सुक्ष्म नियोजनावर अधिक भर देण्यात येत आहे. असे नियोजन करताना लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांचा अनुभव आणि कल्पना जाणून घेत त्याचा नियेाजनात उपयोग व्हावा, यादृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री महाजन यांनी पत्राद्वारे लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

सिंहस्थाचे मूळस्थान समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनईला खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. सिंहस्थाच्या मूळस्थानाकडे शासनाने उदासीन भूमिका ठेवल्याने विकासकामांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची खंत महंत रामनारायणदास फलाहारी महाराज यांनी खासदारांकडे व्यक्त केली. दरम्यान, येथील ध्वजारोहण सोहळा व पर्वणी स्नानाबाबत यावेळी चर्चा झाली.

कावनई येथील विकासकामे संथगतीने असल्याचे नमूद करीत याबाबत दोन दिवसात स्वतः प्राधान्याने लक्ष घालून मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करू. रखडलेली विकासकामे जलदगतीने करण्याबाबत पुढाकार घेऊ असा दिलासा चव्हाण यांनी महंतांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये ‘एनी टाईम मनी’चा अभाव

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

आगामी सिंहस्थासाठी साधुग्राम परिसर सज्ज होत असला तरी या ठिकाणी यंदा ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात एटीएम सेंटरची सुविधा उपलब्ध होणार नसल्यामु‍ळे भाविकांची गैरसोय होणार आहे. गेल्या सिंहस्थात लक्ष्मीनारायण मंदिराजवळ तसेच अन्य एका ठिकाणी तात्पुरते एटीएम मशीन कार्यन्वित करण्यात आले होते. मात्र, यंदा बँकांनी त्याबाबत नियोजन केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

कुंभमेळ्यासाठी किमान ३ लाख २० हजार साधू-महंत तर ८० लाख भाविक शहरात दाखल होण्याची अपेक्षा प्रशासनला आहे. एवढ्या मोठ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रशासनाने नियोजन आखले असून, लाखो भाविकांना शहरात प्रवेश करताना बंदोबस्तामुळे नाकीनऊ येऊ शकते. शहरालगत अजूनही एटीएमसारखी सुविधा उपलब्ध नाहीत. गत कुंभमेळ्यात म्हणजे २००३ मध्ये लक्ष्मीनारायण मंदिराजवळ एक व अन्य एका ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात एटीएम उभारण्यात आले होते. यावेळेस मात्र, तात्पुरते एटीएम उभारण्यास राष्ट्रीयकृत बँकांनी रस दाखवला नाही. याबाबत बोलताना स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर बाबुलाल बंब यांनी माहिती दिली की, २००३ मध्ये एटीएमचा वापर ही नावीन्य बाब होती. एटीएम सेंटरची संख्याही कमी होती. त्यामुळे तो निर्णय झाला असावा.

आज, एसबीआयच्या शहरभरात १०० पेक्षा जास्त एटीएम सेंटर असून आडगाव, बोधलेनगर, पंचवटी आदी भागात शाखा आहेत. इतर बँकांनी आपल्यापरीने एटीएम सेंटर सुरू केले असून, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातील सेंटरचा विचार झाला नाही. राष्ट्रीयकृत बँकेच्या या भूमिकेचा फटका सिंहस्थादरम्यान भाविकांसह शहरवासीयांना बसू शकतो.

पैसे टाकण्याचे बँकांसमोर आव्हान

पर्वणीच्या एक दिवस अगोदर बॅरकेडिंग करून प्रशासन अनेक मार्गात बदल करेल. तसेच पर्वणीच्या दिवशी सर्वच बँकांना सुटी देण्यात येईल. बँकाच बंद असल्याने या दिवशी व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर एटीएमचा वापर केला जाईल. व्यवहारासाठी एटीएम हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे पर्वणीच्या दोन दिवस अगोदर एटीएममध्ये पैसे टाकण्याचे आव्हान बँकांना पेलावे लागेल. एटीएम मशीनमध्ये पैसे टाकण्याचे काम खासगी एजन्सीमार्फत केले जाते. पर्वणी काळात अनेक मार्ग बंद असल्याने ही वाहने एटीएमसेंटरपर्यंत पोहचण्याची शक्यता फारच कमी असून त्याचा फटका मात्र भाविकांना सहन करावा लागणार आहे.

पर्वणी काळात एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसणे ही एक समस्या निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने पोलिस व जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करण्यात येईल. आलेल्या भाविकांना कमीत कमी समस्यांना तोंड देता यावे, म्हणून प्रयत्न केले जातील.

- बाबुलाल बंब, रिजनल मॅनेजर, एसबीआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीतील संशयितास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात घडत असलेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सोनू अशोक शर्मा या संशयिताला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा क्रमांक एकने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक अकिल शेख यांना खबऱ्या मार्फत शर्मा याच्याबदद्ल माहिती मिळाली होती. तो निमाणी बसस्थानकाजवळ येणार असल्याने त्यांनी तेथे सापळा रचला होता. शर्मा तेथे येताच त्याला अटक करण्यात आली. आडगाव आणि पंचवटी परिसरात केलेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रासप-आप’चे नाशकात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात आम आदमी पक्षाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी झळकावलेला उपहासात्मक फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

पंकजाताई २०६ कोटींची खाल्ली चिक्की, पण काँग्रेसपेक्षा ही रक्कम फार छोटी ही गोष्ट नक्की. पुढच्या वेळेला काँग्रेसला हरवून २००० कोटी खाईल ही बात पक्की...चिक्कीताई चिक्कीताई....पंकजाताई या फलकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनात जिल्हा संयोजक जितेंद्र भावे, जगबीसिंग, स्वप्नील घीया, राजू आचार्या, अक्षय अहिरे आदी सहभागी झाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचीही उडी

एकीकडे आम आदमी पक्षातर्फे मुंडे यांच्या विरोधात असे आंदोलन होत असताना राष्ट्रीय समाज पक्षानेही मुंडे यांचे समर्थन करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधाचा निषेध केला. पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र पोथारे, कैलास हाळनोर, भागवत सापनर, सोमनाथ मोहिते, शिवाजी ढगे, निलेश हाके, हेमंत शिंदे आदी यामध्ये सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेला लागलीय साडेसाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

इगतपुरी रेल्वे यार्डाजवळ सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. बारा दिवसांपासून या ना त्या कारणाने रेल्वेचा खोळंबा होत असल्याने प्रवासी जाम वैतागले आहेत. मध्य रेल्वेला आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची झळ बसली आहे.

सायंकाळी पाचच्या सुमारास इगतपुरीजवळील रेल्वे यार्डानजिक नाशिकला येणाऱ्या मालगाडीचे आठ डबे घसरले. त्यात जीवितहानी झाली नसली तरी डब्यांचे नुकसान झाले. डाऊन लाईनवरील गाड्यांना उशीर झाला. गोदावरी अडीच तास, लखनऊ एक तास, सेवाग्राम एक तास, इगतपुरी-मनमाड पॅसेंजर एक तास, अंजनी एक तास लेट झाली. यार्डाजवळ तीन रेल्वेलाईन आहेत. अन्य दोनवरील वाहतूक सुरळीत असल्याने वाहुतकीवर फारसा परिणाम झाला नाही.

साडेसातीच, दुसरं काय

काल चर्चगेट स्थानकात लोकल फ्लॅटफार्मवरच चढली. कालच्या रविवारी कल्याणजवळ रुळाला तडा गेला. त्याच्या आधीच्या रविवारी कर्जतजवळ पावसामुळे रुळाखालील मटेरियल वाहून गेले. आज नाशिकरोड स्थानकात रेल रोको आंदोलनामुळे गीतांजली एक्स्प्रेसला उशीर झाला. २५ जूनला तांत्रिक कारणामुळे चौदा गाड्या रद्द झाल्या होत्या.

बारा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील इटारसी जंक्शनमधील डायमंड पॅनल केबिनला आग लागली. त्यामुळे मुंबईला ये-जा करणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. केबिनमधील नेटवर्किंग उभारण्याचे काम अत्यंत किचकट आहे. त्यावर सिग्नल यंत्रणा अवलंबून आहे. सातशे तंत्रज्ञ या कामाला जुंपले आहेत. या कामाला आणखी एक महिनाही लागू शकतो. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे प्रवाशांची आणखी काही दिवस गैरसोय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images