Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मूलभूत सुविधांना प्राधान्य द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील महिन्यापासून होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना वीज, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, असे निर्देश प्रभारी मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांनी सोमवारी दिले.

कुंभमेळ्याच्या तयारीची आढावा घेणारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्य सचिव बोलत होते. यावेळी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज झाले पाहिजे. साधुग्राम मध्ये वीज, पाणी, रस्ते सुविधांवर अधिक भर द्यावा. कुंभमेळ्याविषयी प्रसिद्धी करताना भाविकांना सुशोभीत केलेल्या घाटांची, स्वच्छतेची, तसेच नाशिक परिसरात असलेल्या अन्य पर्यटनस्थळांची, वाहतूक मार्गांविषयी माहिती देण्यात यावी. नाशिक जिल्ह्यातील विविध विभागांच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा कुंभमेळाकाळात उपलब्ध होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत लवकरच आदेश निर्गमीत करावेत, आदी सूचना मुख्य सचिवांनी दिल्या. १५ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात या अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा वापरता येईल. साधू-महंतांना अल्पदरात पुरविण्यात येणाऱ्या अन्न धान्याचा पुरवठा सध्या सुरू असून, तो या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावा. त्याचप्रमाणे सिन्नर-घोटी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. तातडीने रस्ता दुरुस्तीसाठी नियोजन करावे, अशा सूचनाही डॉ. मीना यांनी केल्या.

बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय, पोलिस महासंचालक संजीव दयाळ, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सीताराम कुंटे, मनीषा म्हैसकर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, दीपक कपूर, माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक आदींसह वर‌िष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अग्निशमनच्या निविदांनी घेतली कोटींची उड्डाणे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सिंहस्थाच्या धामधूमीत आपलेही हात ओले करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे ठेकेदारांशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी चाप लावला आहे. सिंहस्थात दोन रेस्क्यू व्हॅन खरेदीची निविदा या प्राकलनापेक्षा तब्बल ४५ आणि ६६ टक्के अधिकच्या आल्याचे स्थायीत उघड झाले आहे. आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांशी चर्चा केल्यानंतर प्राकलनापेक्षा ८ टक्के जास्त दरावर त्या स्थिरावल्या आहेत. तरीही हे दर जास्तीच असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

सोमवारच्या स्थायीच्या बैठकीत अग्निशमन विभागाचे दोन प्रस्ताव चर्चेसाठी आले होते. त्यात अग्निशमन विभागाने पाणी आणि जमिनीवरील रेस्क्यू व्हॅनसाठी साडेसहा कोटींचे उड्डाण केल्याचे समोर आले आहे. इमरजन्सी रेस्क्यू व्हॅन, लाईफ सर्च कॅमेरा आणि डिटेक्टर असे एकत्रित असलेली रेस्क्यू व्हॅन बांधून घेण्यासाठी मुंबईतील एका संस्थेला तीन कोटी ७८ लाख रुपये देण्यात येणार आहेत. इमरजन्सी फ्लड रेस्क्यू व्हॅनसाठी दोन कोटी ५८ लाख रुपये पुण्यातील संस्थेला देण्याचा घाट अग्निशमन विभागाने घातला आहे. विशेष म्हणजे ही कामे महापालिकेच्या प्राकलनापेक्षा आठ टक्के जास्त दराने आहे. यासंदर्भात समितीत आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला असून, दोन्ही ठेकेदारांनी दर ४५ आणि ६६ टक्के पूर्वीच भरल्याचे अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले. आयुक्तांनी ते दर आठ टक्क्यांवर आणले आहेत. आयुक्तांनी बोलणी केले नसती तर, या दोन रेस्क्यू व्हॅन दहा कोटीपर्यंत गेल्या असत्या असा आरोपही सदस्यांनी केला. सिंहस्थात सगळेच आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप संदस्यांनी केला असला तरी सिंहस्थाच्या नावाखाली या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. हा विषय पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असल्याने महापालिकेचा संबंध काय असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांचा शोध शनिवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण विभागाकडून येत्या शनिवारी (दि. ४ जुलै) शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील दहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय अधिकारी म्हणून प्रथम श्रेणीतील १०० कर्मचाऱ्यांची तर २५ जनसंपर्क अधिकाऱ्यांची तालुक्यानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मुलगा किंवा मुलगी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण केले जाणारे आहे. त्यासाठी जबाबदारी देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. प्रचारपत्रके, लाऊड स्पिकर अशा माध्यमातून शाळाबाह्य मुला-मुलींचा शोध घेतला जाणार आहे. या मुलांच्या शाळा प्रवेशाबद्दल नियोजन केले जाणार आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, नियमित शाळेत येणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे. बालकांच्या प्रश्नांसाठी कार्य करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती आदींचेही सहकार्याने घेतले जाणार आहे.

येथे होणार सर्वेक्षण

प्रत्येक घर, गजबजलेल्या वस्त्या, ग्रामीण भागातील बाजार, गुर्हाळघर, विटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नलवर-रेल्वेमध्ये फुलं व अन्य वस्तू विकणारे, भिक मागणारी मुले, तमाशा कलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती, विड्या वळणारी इत्यादी ठिकाणच्या बालमजूर, ऊसतोड, कामगारांच्या वस्त्या, मागासवर्गीय, वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील इत्यादी घटकांच्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शाळांमध्ये दाखल करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीजीइटी’ने राज्यांकडून मागितल्या सूचना

0
0

विजय महाले, नाशिक

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या महानिदेशक रोजगार व स्वयंरोजगार (डीजीइटी) विभागाने चाचपणी सुरू केली आहे. जानेवारी २०१६ पासून सुरू करावयाच्या या आधुनिक प्रणालीसाठी देशातील सर्व राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.

'आयटीआय'संदर्भात श्रम व रोजगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राने आतापर्यंत नेहमी नवनवीन प्रक्रिया राबविल्या आहेत. यातील काही प्रयोग तर देशपातळीवर कौतुकास्पद ठरलेले आहेत. महाराष्ट्रात गेल्याच वर्षी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. आताही प्रवेशप्रक्रियेप्रमाणेच निकालातही गतीशिलता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत 'डीजीइटी'चा विचार सुरू आहे. 'डीजीइटी'चे उपसंचालक डी. मल्लीक यांनी यासंदर्भात देशातील सर्व राज्यांच्या व्यवसाय व प्रशिक्षण विभागांना पत्र पाठविले आहे. यात आपापल्या राज्यांमध्ये ऑनलाइन परीक्षांबाबत विद्यार्थी अनुकूल आहेत काय? त्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य होईल काय? त्या-त्या राज्यांना ऑनलाइन परीक्षा पद्धती राबविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे काय? त्यासाठीचे आवश्यक मूलभूत साधने शासकीय आणि खासगी आयटीआयला उपलब्ध होऊ शकणार काय? या मुद्यांच्या आधारावर राज्यांची मते 'डीजीइटी'ला जाणून घ्यायची आहे. या पारदर्शी प्रक्रियेच्या माध्यमातून आयटीआय निकालांमधील प्रदीर्घ विलंब आणि गैरप्रकार टाळण्यावर डीजीइटीचा भर आहे.

'डीजीइटी'ने आयटीआयच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना मागविल्या आहेत. महाराष्ट्राने आतापर्यंत आधुनिक आणि अमूलाग्र बदलांना साथ दिली आहे. याही बाबतीत सकारात्मक विचार सुरू आहे. 'डीजीइटी'ला लवकरच प्रस्ताव पाठविले जाणार आहेत.

- योगेश पाटील, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅब’चे कार्य अभिमानास्पद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅब या संस्थेने सुरू केलेले कार्य अभिमानास्पद आहे. अंधांसाठी डी. एड., बी. एड, डिप्लोमा कोर्सेस, स्किल डेव्हलपमेंट यांसारखे शैक्षणिक कार्यक्रम संस्थेत आयोजित केल्यास रिहॅबिलिटेशन काऊन्सिल ऑफ इंडियातर्फे (आरसीआय) सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आरसीआय दिल्लीचे मेंबर सेक्रेटरी सतीश श्रीवास्तव यांनी दिले.

नॅब संस्थेत राज्यातील कर्णबधिर अंध मुलांच्या पालकांसाठी राज्यस्तरीय अॅडव्होकसी व नेटवर्क मिटींग ऑन डेफब्लाईंडनेस अवेअरनेस या कार्यक्रमात ते बोलत होते. कर्णबधिर व अंध व्यक्तींसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सेन्स इंटरनॅशनल इंडिया या संस्थेचे नेटवर्क ऑफिसर दीपक शर्म, डेफब्लाईंड प्रकल्पाचे चेअरमन अशोक बंग, आरसीआयचे उपसंचालक डॉ. सुबोध कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी संस्थेच्या कार्याची तसेच नॅबने उभारलेल्या संवेदना गार्डनची माहिती दिली.

यावेळी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व मराठी भाषा दिनाला घेण्यात आलेल्या ब्रेल निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. कर्णबधिर अंधत्वावर मात करून घेतलेले शिक्षण व आता शिक्षक म्हणून कार्यरत असलेले भारत परदेशी यांनी सांकेतिक भाषेद्वारे कर्णबधिर अंध व्यक्तींच्या समस्या मांडल्या. शरद नागपुरे यांनी शब्दांच्या माध्यमातून ते उपस्थितांपर्यंत पोहोचवल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायब्ररी डिपॉझिट बनले आयता खजिना!

0
0

सौरव बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

कॉलेजातील ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी आणि त्याचे संरक्षण व्हावे यासाठी शहरातील कॉलेजेसकडून विविध प्रकारची फी आणि डिपॉझिट घेतले जाते. २०० ते ५०० रुपयांचे लायब्ररी डिपॉझिट मात्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पदरी पडत नसून याद्वारे त्या त्या कॉलेजला लाखोंची रक्कम बिनव्याजी वापरायला मिळत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

कॉलेज प्रशासन लायब्ररीची सुविधा देण्यासाठी लायब्ररी फी आणि अतिरिक्त डिपॉझिटही विद्यार्थ्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये आकारत आहे. प्रवेश रक्कम भरतेवेळी दिल्या जाणाऱ्या रिसीटमधून याचा उलगडा होत आहे. अकरावी व बारावीसाठी तसेच एफवाय ते टीवाय या तीन वर्षांच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांकडून साधारण २०० रुपये ते ६०० रुपयांपर्यंत ही डिपॉझिट रक्कम प्रवेश फी रिसीटमध्येच आकारली जाते.

एखाद्या विद्यार्थ्याने पुस्तक घेतले पण ते परत केले नाही किंवा पुस्तकाचे काही नुकसान केले तर सिक्युरिटी डिपॉझिटमधून कपात केली जाते. हे डिपॉझिट संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कॉलेजने विद्यार्थ्यांना परत करणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली रिसीट सक्तीची केली जाते. शिवाय अकाउंट आणि लायब्ररी विभातून क्लिअरन्स सर्टीफिकेट घेऊन ते लायब्ररी विभागात सर्व ओरिजिनल पावत्यांसह दाखवावे लागते. काही कॉलेजेसमध्ये तर सर्व वर्षांचे ओळखपत्र देखील बंधनकारक करण्यात आले आहे. ही सारी प्रक्रिया केल्यानंतरच लायब्ररी डिपॉझिट विद्यार्थ्यांना सुपूर्द केले जाते. ही सारी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया टाळण्यासाठी विद्यार्थी हा डिपॉझिटवर पाणी सोडण्यास प्राधान्य देत आहेत.

विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांना तर लायब्ररी डिपॉझिटबद्दल किंवा ते परत घेण्याबद्दल कुठलीच माहिती नसल्याचेही समोर येत आहे. कॉलेजेसही सुट्ट्यांच्या काळात म्हणजे मार्च किंवा नोव्हेंबरमध्ये डिपॉझिट परत देण्याची प्रक्रिया राबवितात. त्यावेळी कॉलेजेसला सुट्ट्या असल्याने विद्यार्थी कॉलेजमध्ये येत नाहीत. यासंदर्भात कॉलेजकडून कुठलीही नोटीस लावली जात नसल्याने विद्यार्थ्यांची अनभिज्ञता कॉलेजेसच्या पथ्यावर पडत आहे. परिणामी, कॉलेजकडे जमा असलेले विद्यार्थ्यांचे लाखो रुपये लायब्ररी डिपॉझिटच्यारुपाने कॉलेजला वापरण्यास मिळत आहेत. एक वर्षात एका शाखेत किमान ६०० विद्यार्थी असतात यांच्यातील फक्त १०० विद्यार्थी किमान हे डिपॉझिट पुन्हा घेत असल्याचे दिसून येत असल्याने उर्वरित ५०० विद्यार्थ्यांची रक्कम कॉलेजकडेच राहत आहे. शहरातील सर्वच कॉलेजमध्ये असा प्रकार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचा हक्काचा पैसा कॉलेज प्रशासन मोठ्या चतुराईने स्वतःकडे वळता करून घेत असून लायब्ररी डिपॉझिटच्या नावाने विद्यार्थ्यांकडून एकप्रकारे लूट होत असल्याचा सूर विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.

आमच्याकडे सुसज्ज लायब्ररी आहे. मात्र, आम्ही केवळ लायब्ररी फी घेतो. कुठलेही लायब्ररी डिपॉझिट घेत नाहीत.

- एस. एस. मुरकुटे, ग्रंथालय विभाग, केटीएचएम कॉलेज

मार्च आणि नोव्हेंबरमध्ये डिपॉझिट परत करण्याची प्रक्रिया असते. याची सूचना आम्ही विद्यार्थ्यांना प्रवेशावेळीच देतो. सर्व ओरिजनल पावती आणि अकाउन्ट विभागाकडून क्लिअरन्स आल्यावर आम्ही डिपॉझिट देतो.

- प्रा. एस. व्ही. चंद्रात्रे, सेक्रेटरी, ग्रंथालय विभाग, एचपीटी कॉलेज

लायब्ररी डिपॉझिट मार्च वा नोव्हेंबरमध्ये आम्ही प्रत करतो. यासाठी माऊथ पब्लिसिटी केली जाते. आम्ही ओरिजनल पावती आणी क्लिअरन्स फक्त चाचपडून पाहतो आणि डिपॉझिट देतो.

- डॉ. धनेश कलाल, प्राचार्य, बीवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरफाटा येथे मद्याचा साठा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड पोलिसांनी सिन्नरफाटा येथे सोमवारी मारुती ओमनीमधून देशी दारु जप्त करण्यात आली. ही दारु व कारसह ५६ हजाराचा ऐवज ताब्यात घेण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल दीपक वाघ आणि प्रकाश खैरनार सिन्नरफाटा येथे ड्युटीवर होते. त्यांना मारुती कार (एमएच ०१ पीए ४८१०) येताना दिसली. त्यांनी ती थांबवून कारचालक दिनेश तळेकर (२५, विडी कामगारनगर, पंचवटी) व कुणाल मोरे (१९, सिन्नरफाटा) यांची चौकशी केली. दिनेशकडे वाहन परवाना नव्हता. झडती घेतली असता कारमध्ये देशी दारुच्या बाटल्या आढळल्या. पंचनामा करून त्या ताब्यात घेण्यात आल्या. मुंबईमध्ये देशी दारुमुळे शंभरपेक्षा अधिक जणांचे बळी गेल्याच्या नुकत्याच झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी वाहनांची कडक तपासणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल सिटीसाठी योगदान द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जीवनाच्या सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हे कुंभथॉनचे उद्दिष्ट आहे. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी आणि डिजिटल नाशिक - स्मार्ट नाशिकसाठी योगदान द्या, टेक्नो इनोव्हेटर व्हा, असे आवाहन अमेरिकीतील बोस्टन येथील एमआयटीचे मीडिया कल्चर हेड डॉ. रमेश रासकर यांनी विद्यार्थ्यांना केले. पुरुषोत्तम हायस्कूलमध्ये कुंभथॉनतंर्गत डॉ. रायकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुंभथॉनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, संशोधक जान वार्नर, मार्गरेट चर्च, लारा जाना, महेश गुजराथी, प्राचार्य उदय शेवतेकर, महेश दाबक, अभिषेक सूर्यवंशी व्यासपीठावर होते.

डॉ. रायकर म्हणाले, की स्मार्ट सिटी व स्मार्ट सिटिझन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने नाशिक डिजीटल बनवण्याची चळवळ आम्ही नाशिककरांच्या मदतीने सुरू केली आहे. त्यासाठी कुंभथॉन हे व्यासपीठ आहे. कुंभथॉनचे दूत बनून प्रत्येकाने एक तरी दिवस नाशिकसाठी द्यावा. आपल्या परिसरातील दुकाने, प्रशासन, महामार्ग, उद्योग, व्यवसाय आदींची माहिती विकीपीडियावर अपलोड करा. कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्यांना त्याचा लाभ होईल. नाशिकला टेक्नोसिटी कसे बनवता येईल याचा सतत विचार करा. शाळा-कॉलेजांच्या विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. कुंभमेळा फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तीस वर्षांनंतर शाळेत

पुरुषोत्तमचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. रासकर ३० वर्षांनंतर शाळेत आले ते आंतरराष्ट्रीय संशोधक बनून. शिक्षकांमुळेच हा प्रवास यशस्वी झाला. त्यांचा हेतू चांगला होता म्हणूनच मी घडलो असे भावनिक उदगार त्यांनी यावेळी काढले. त्यांच्या समेवत आलेल्या विदेशी पाहुण्यांनी कोळी व वारीच्या गीतावर विद्यार्थ्यांसमवेत मनसोक्त नृत्य केले. भारताची संपन्न संस्कृती अनुभवतांना परदेशी पाहुणे तृप्त झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


MTDC तयार करणार टुरिस्ट गाईड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यादरम्यान शहरात येणाऱ्या भाविकांना इतर ठिकाणी पर्यटनासाठी वाव आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) प्रयत्न सुरू असून, त्याचच एक भाग म्हणून एमटीडीने प्रशिक्षीत गाईड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इच्छुक तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासह भाविकांना फायदा होणार असल्याचा दावा एमटीडीसीने केला आहे.

खास कुंभमेळ्यासाठी एमटीडीसीने ही योजना आखली असून, येणाऱ्या भाविकांना नाशिक परिसरातील पर्यटनस्थळाची माहिती उपबलब्ध करून देण्याचे काम हे गाईड करतील. शहर व त्र्यंबकसह इतर भागात पर्यटनाला मोठा वाव आहे. जिल्ह्यात वर्षभर भाविकांची वर्दळ राहणार असून, प्रशिक्षित गाईडच्या अभावामुळे पर्यटकांची लुबाडणूक तसेच, फसवणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित गाईडसाठी मागणी वाढू शकते. प्रशिक्षित गाईडच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची चांगली संधी निर्माण होऊ शकते. एमटीडीसीने आयोजित केलेला पर्यटक मार्गदर्शक प्र​शिक्षण वर्ग एका आठवड्याचा असून, ५० प्रशिक्षणार्थींना प्र​शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी हा किमान ८ ते १२ वी पास असावा. तसेच तो शारीरिकदृष्ट्या सृदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीला ऐतिहासिक, सांस्कृतीक व पर्यटन विषयक माहिती व ज्ञान अवगत करण्याची कला/आवड असली पाहिजे. तसेच प्रशिक्षणार्थीला मराठी, हिंदी व इग्रंजी भाषेचे प्राथमिक ज्ञान हवे. प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, प्रशिक्षण वर्ग राबवणे व निवडीचे अधिकार महामंडळाने राखीव ठेवले आहेत. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले कागदपत्रे, दोन फोटो इत्यादी माहिती २ जुलैपर्यंत प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, प्रादेशिक कार्यालय, पर्यटन भवन, गोल्फ क्लब, शासकीय विश्रामगृह आवार, येथे समक्ष किंवा पोस्टाद्वारे पाठवण्याचे आवाहन एमटीडीसीने केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ०२५३-२५७००५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत मालगाडीचे ६ डबे घसरले

0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

येथील रेल्वेस्थानकाच्या अगदी जवळ असलेल्या इंजिन शेडजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वेचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तसेच, या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना चार तासापेक्षा अधिक उशीर झाला.

मुंबईहून दौलताबादकडे जाणारी मालगाडीचे डबे येथील इंजिन शेडजवळ रेल्वेरुळावरून घसरले. ३० पेक्षा अधिक डब्यांची असलेली ही मालगाडी होती. याप्रसंगी कुठलीही जीवितहानी झाली नाही. घसरलेले रेल्वे डबे हे अतिउच्च दाबाच्या वीजवाहक तारांच्या खांबांना धडकले. खांबावरून वीजवाहक तारा पडल्या असत्या तर मोठी दुर्घटना घडली असती, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे पोलिस अधिकारी सतीश विधाते यांनी घटनास्थळी पाहणी करून विविध प्रकारच्या तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, कशामुळे रेल्वे डबे घसरले याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, घसरलेले रेल्वे डबे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा परिणाम मध्यरेल्वेच्या अनेक रेल्वे गाड्यांवर झाला आहे. मुंबईहून येणाऱ्या विविध रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा विषयांवरून संशयाचा धूर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीत मंजूर होणाऱ्या जादा विषयांवरून सभापती शिवाजी चुंभळे यांना घेरण्याचा काही सदस्यांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. गत सभेतील कार्यवृत्ताला मंजुरी देण्यास विरोध दर्शवत महासभेप्रमाणेच स्थायीचेही रेकॉर्डिंग करण्याची मागणी सदस्यांनी केली. प्रत्यक्ष रुलिंग वेगळे आणि ठराव वेगळे होत असल्याचा आरोप करीत संपूर्ण कारभारच संशयास्पद असल्याचा टोला सभापतींना लगावला. त्यामुळे संतापलेल्या सभापतींनी मी इथे काळेगोरे करायला आलो नाही असे ठणकावत तुम्ही स्वतःला स्वच्छ तांदळासारखे समजू नका, असा प्रतिटोला लगावला. त्यामुळे स्थायीतील आर्थिक राजकारण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

स्थायी समितीची बैठक सुरू होताच राहुल दिवे, प्रा.कुणाल वाघ, शैलेश ढगे या सदस्यांनी जुने इतिवृत्त मंजूर करण्यास विरोध दर्शवला. सोबतच दिलेल्या पत्राचे वाचन करण्याची मागणी केल्याने सभापतींनी विरोध केल्याने सदस्य आणि सभापती आमने सामने आले. सभापतींनीही स्थायी समिती बैठकीत एकानेच बोलावे, असा दम भरला. सदस्यांनी आमचा विरोध नोंदवून घेत स्थायीचे रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी केली. सर्व कारभार संशयास्पद सुरू असल्याचा आरोप सदस्यांनी केल्याने सभापतींनी सदस्यांनाच ठणकावले. मी इथे काळेगोरे करायला आलो नाही, असे सांगत तुम्ही काही स्वच्छ तांदळासारखे नाहीत, असा टोला लगावला. जे विरोध करतील त्यांचा विरोध नोदवून घेत सगळ्यांना सारखे समजू नका असे सांगत सदस्यांवरच आगपाखड करायला सुरुवात केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. स्थायी समितीत होत असलेल्या अर्थकारणावरूनच सदस्य आणि सभापतीमंध्ये संघर्ष सुरू असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने खडाजंगी वाढली आहे.

कोट्यवधींचे विषय मंजूर कसे?

सफाईचा ठेका अडवणाऱ्या सदस्यांनी मात्र संशयास्पद ठरलेल्या अनेक विषयांसह कोट्यवधींचे विषय विनाचर्चाच मंजूर केले. रेस्क्यू व्हॅन, घंटागाडी, औषध खरेदी, श्वान निर्बिजीकरणाचे ठेके मिनिटात मंजूर केले. मात्र, सफाईच्या ठेक्याला खो घालण्यात आला. ठेक्यांमधील अर्थकारणामुळे सदस्यांनी एकीकडे कोट्यवधींचे विषय मंजूर केले तर, दुसरीकडे सफाईचा ठेका रोखून धरल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. सिंहस्थात प्रशासन गोलमाल करीत असल्याचा आरोप सदस्य करीत आहेत.

सभा लांबवली

स्थायीची सभा सोमवारी एक वाजता बोलावली होती. मात्र, आयुक्त - सभापती आणि सदस्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमुळे सभा तब्बल चार वाजता सुरू झाली. आयुक्तांची वाट पाहणाऱ्या सभापती आणि सदस्यांना आयुक्तांविनाच सभा पुढे चालवावी लागली. सफाई ठेक्यांवरून रंगलेल्या राजकारणामुळे सभा लांबवण्यात आल्याची चर्चा असून, आर्थिक तडजोडीतून थेट सभाच रोखण्यात आली होती. या भानगडीत अधिकाऱ्यांना तब्बल तीन तासाची वेटिंग करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या लिस्टचाही विक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या दीड टक्क्यांचा लीड तोडत तब्बल ९२.४० टक्क्यांवर आरवायके कॉलेजमध्ये सायन्स शाखेसाठी तिसरीही मेरीट लिस्ट क्लोज झाली. यंदा अकरावी प्रवेशाच्या मेरीट लिस्टने गाठलेला उच्चांक हा पहिलाच्यांदाच इतक्या उंचीवर गेल्याने हजारो विद्यार्थ्यांची प्रवेशाची समीकरणेच बदलली आहेत.

यंदा सायन्सच्या प्रवेशांसाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची स्पर्धा दिसून आली. पहिल्या आणि तिसऱ्या मेरीट लिस्टमध्ये अवघे दीड टक्क्याचे अंतर राहिल्याने हजारो विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. एरव्ही पहिल्या आणि तिसऱ्या मेरीट लिस्टमध्ये सुमारे सात ते आठ टक्क्यांचे अंतर कायम राहते. यंदा मात्र हे अंतर अवघे दीड टक्क्यांवर आले आहे.आरवायके सायन्सची ओपन कॅटेगिरीसाठीची दुसरी मेरीट लिस्ट ९२.६० टक्क्यांवर क्लोज झाली होती. तर अवघ्या २० पॉईंटने यात घसरण होत तिसरी लिस्ट जाहीर झाली आहे. केटीएचएम सायन्सची तिसरी मेरीट लिस्ट ८८.४० टक्क्यांवर, तर कॉमर्सची लिस्ट ८८.२० टक्कयांवर क्लोज झाली. बीवायके कॉमर्सची तिसरी मेरीट लिस्ट ८२.२० टक्कयांवर क्लोज झाली.

साधावा प्रवेशाचा समतोल!

यंदा गुणवत्तेचा टक्का वधारल्याने याचा थेट परिणाम प्रवेशप्रक्रियेवरच झाला आहे. प्रवेशाच्या चढाओढीत मॅनेजमेंट कोटा अन् देणग्यांचीही सांगड पडद्याआड घालण्याच्या घडामोडींनाही वेग आला आहे. दोषी कॉलेजेसची ही नफेखोरी मोडून प्रवेशाचा समतोल साधावा व विद्यार्थ्यांच्या किमान अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षाही विद्यार्थी व पालकांमधून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

B. Ed. यंदापासून २ वर्षांचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षांपासून बहुचर्चित बी. एड. अभ्यासक्रमाचा कालावधी अखेरीला एकहून दोन वर्षापर्यंत वाढविण्यात आल आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१५-१६) याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने याबाबत (एनसीटीई) अधिसूचना काढली आहे. या सूचनेनुसार प्रमाणे राज्यात शासकीय व अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित कायम अनुदानित अध्यापक महाविद्यालयातील नियमित बी. एड. अभ्यासक्रम दोन वर्षांचा करण्यात आला आहे.

२०१५-१६ शैक्षणिक वर्षासाठीच्या बी. एड. प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठीची नियमावली तयार करण्यात आली. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी (कॉमन एन्टरन्स टेस्ट) घेण्यात येणार आहे. हे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून होतील. ऑनलाइन पध्दतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. पदवीधारक खुल्या गटातील उमेदवारासाठी ५० टक्के व मागासवर्गीय संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांचा निकष या प्रवेशासाठी असणार आहे. या निकषांची पूर्ती करणारे विद्यार्थीच सीईटीसाठी पात्र ठरणार आहेत. दोन वर्षाच्या किंवा एक वर्ष अभ्यासक्रमाची पदवी धारण करणारे पदवीधारक उमेदवार बी. एड. प्रवेशास पात्र राहणार नाहीत. मात्र, मुक्त विद्यापीठातील पदवीप्राप्त उमेदवारांना ही अट लागू राहणार नाही.

मास्तरांची कसोटी !

बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी. एड.) अभ्यासक्रमाला काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. पारंपरिक ज्ञानशाखांमध्ये विद्यार्थ्यांचे वाढणारे प्रवेश आणि बी. एड. कॉलेजेसची वाढलेली संख्या यामुळे या अभ्यासक्रमाकडे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा आहे. शिक्षक भरतीच्या तांत्रिक अडसरांसोबतच, शालेय पटपडताळणीसारख्या मोहिमा, शिक्षकांच्या समायोजनाचे प्रश्न, त्यांच्यावरील अतिरिक्त जबाबदाऱ्या, मुजोर शिक्षण संस्थाचालकांची आडमुठी धोरणे आदी प्रश्नांच्या यादीत दोन वर्षांपासून टीईटीचा (टीचर्स इलिजीबिलीटी टेस्ट) निकषही वाढविण्यात आला होता. यानंतर या अभ्यासक्रमाचा कालावधी वाढण्याची चर्चा होती. आता या अभ्यासक्रमाच्या वाढीव कालावधीवर शिक्कामोर्तब झाल्याने मास्तर बनण्याच्या प्रक्रियेतील आणखी एका कठोर निकषात वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
0

म.टा.प्रतिनिधी, नाशिक

केटीएचएम कॉलेजच्या इमारतीहून उडी घेत एका बारावीला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गोंधळ उडाला होता. या घटनेनंतरही सुदैवाने ही मुलगी सुखरूप आहे. मात्र या प्रकाराचे कारण समजू शकलेले नाही.

शहरातील मविप्र संस्थेच्या केटीएचम कॉलेजमध्ये दुपारच्या सुमाराला विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू होती. याचदरम्यान एक विद्यार्थिनी इमारतीहून पडल्याची बातमी कॅम्पसमध्ये वेगाने पसरली. यानंतर ‌विद्यार्थ्यांचा मोठा जमाव संस्थेतील अॅनेक्स २ या इमारतीसमोर जमा झाला. हे वृत्त संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या कानावर जाताच त्यांनीही घटनास्थळी त्वरीत धाव घेत विद्यार्थिनीस उपचारांसाठी आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. या घटनेत तिच्या पायांना इजा झाली असून तिच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे याबाबत कुठलीही तक्रार दाखल नाही. तर संस्थेशी संपर्क साधला असता वैयक्तिक तणावातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी व्यक्त केली. या प्रकारामागे संस्थेचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. तिच्यावरील उपचारांसाठी घटना घडल्याच्या क्षणापासून संस्थेने पुढाकार घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई मला तुझ्याशी बोलायचंय...

0
0

स्वाती पाचपांडे, नाशिक

सतरा वर्षांची अनया आईला म्हणाली, 'आई आज आपण बोलू या का गं? मला माहित आहे आपण दोघी खूप व्यस्त असतो नेहमीच. पण आई आज मला बोललंच पाहिजे गं.' अनयाच्या आधुनिक आईने तिच्याकडे कौतुकाने पाहिलं. आई एक यशस्वी डॉक्टर असल्याने तिच्या जगण्याचा वेग बेफाम होता. पण काळजात लेकीला खूप वेळ दिला पाहिजे ही आस होतीच.

अनया अभ्यासात हुशार नक्कीच आहे पण आज तिला अभ्यासाविषयी आईशी बोलायचे नव्हते. आई-बाबा कामानिमित्त विदेशात जात येत असत. अनयासाठी आजी असेच. पण आईबाबा घरात नसले की ती थोडी कंटाळून जायची. वरकरणी दाखवत नसे, पण तिला काहीसे असुरक्षित वाटायचं. अनया म्हणाली, 'आई तू यावेळेस तिकडे गेल्यावर आजारी पडलीस आणि मला इकडे खूप रडायला येत होतं. तू मला खूप खूप दिवस हवी आहेस. तुला काही होऊ शकते अशी कल्पनाही मी करू शकत नाही.' अनया खूप भावनाशील झाली होती, तिने आईला घट्ट मिठी मारली. आई एकदम सजग झाली. तिकडून आल्यापासून काहीशी गप्प गप्प असणारी आपली लेक इतक्या मोठ्या दडपणाखाली असेल याची काही कल्पना आईला नव्हतीच. क्षणभर आईला अपराधी वाटले.

अनयाचं बोलणं सुरू असताना आईचा फोन सारखा खणखणत होता. एक मैत्रीण आवाज देत होती. पण आईने ठामपणे ठरवलं की लेकीचं समाधान होईपर्यंत तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं. स्वतःची व्यस्तता कमी करुन लेकीसाठी वेळ काढायचा हे सुध्दा तिने मनाशी पक्कं केलं.

पाऊस पडून गेल्यावर आकाश स्वच्छ व्हावं त्याप्रमाणे मायलेकी बोलून मोकळ्या झाल्या. आई म्हणाली, 'मला तुझे करिअर घडवायचे आहे. तुझी मुले सांभाळायची आहेत. जशी माझ्या आईने माझ्या मुलांची काळजी घेतल्याने मी बिनधास्त घराबाहेर पडू शकले अगदी तसंच तुझ्यासाठी करायचं आहे.'. त्यावर लेक खुदकन हसली.

मूल मोठे होते तशी पालकत्वाची व्याप्ती बदलते, परिघ बदलतो. पालकही नव्याने घडत जातात. त्यासाठी मात्र पालकांनी सजग झालेच पाहिजे. यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्यामुळे या क्षणापासून सजग राहायला सुरुवात करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फोर ‘पी’चे सूत्र प्रभावी

0
0

>>अविनाश ‌सिसोदे

व्यवसायाचा मूळ गाभा आहे सेल्स अॅण्ड मार्केटिंग. यात महत्त्वाच्या असलेल्या फोर 'पी' विषयी आज आपण माहिती घेऊ. प्रॉडक्ट, प्राइसेस, प्लेस, आणि प्रमोशन हे ते फोर 'पी'. मी एक उद्योजक म्हणून जेव्हा माझ्या व्यवसायाकडे बघतो, तेव्हा मी जे प्रॉडक्ट अथवा सेवा माझ्या ग्राहकाला देतोय, ते त्याची गरज पूर्ण करते का? ते आजच्या काळात सुसंगत आहे का? ते त्याला आवडतंय का? हे प्रश्न स्वत:ला अत्यंत प्रामाणिकपणे विचारावे लागतील. त्याचं विश्लेषण करावे लागेल. माझ्या स्पर्धकांचाही अभ्यास करावा लागेल.

ते कशा पद्धतीची सेवा किती दरात देतात, हे बघावे लागेल. नुसती किंमत कमी केली म्हणून व्यवसाय वाढत नसतो. माझ्या प्रॉडक्टमध्ये काही बदल करावे लागतील का, हाही विचार करावा लागेल. दुसरा महत्वाचा पी म्हणजे प्राइज. किंमत ठरवताना बरेच व्यावसायिक त्या किंमतीचं फार स्पष्टीकरण देत नाहीत. कारण उत्पादन मूल्यापेक्षा त्या प्रॉडक्टच्या विकसनामागची संकल्पना, त्यासाठीचे अथक प्रयत्नही त्यात समाविष्ट असतात. कधी किंमत वाढवून तर कधी कमी करून आपलं प्रॉडक्ट आपण विकतो. फक्त कमी भाव केला म्हणून आपण खूप मोठा व्यापार करू, असं कधी सरसकटपणे होत नसतं. आपल्या परिसरातील उद्योजक ज्या मानाने कष्ट घेतात, पिढ्यान् पिढ्या राबत असतात, त्या मानाने त्यांचा नफा फारच कमी आहे. म्हणजे पाश्चात्य देशांच्या तुलनेत. प्रॉडक्ट आणि प्राइजेससोबतचा ट्वीस्ट जो असतो तो आणणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींना जो एक मार्केटिंग सपोर्ट लागतो, तो प्रमोशनचा ! तिसरा पी ! आपण आपल्या कस्टमरला सतत ओरडून सांगत असतो, की हे माझे प्रॉडक्ट आहे. ही माझी सेवा आहे. हे सांगणं म्हणजे प्रमोशन.

तुमच्या मार्केटिंगच्या पद्धतीमध्ये साधे बदल केले, तरी खूप फरक पडू शकतो. एखादा मीडिया किंवा मार्केटिंग कन्सल्टंट घेतला, आणि त्याने साधी प्रॉडक्टची टॅगलाईन बदलली, तरी पाचशे टक्क्यांपर्यंत विक्रीचं प्रमाण वाढल्याची उदाहरणं आहेत. या सर्व कंपन्यांना हे प्रयोग सातत्यानं करणं गरजेचं असतं. ज्या प्रकारचं प्रमोशन तुम्ही आज करता आहात, ते आज चालतंय याचा अर्थ ते कायमच चालेल असं नाही. सेल्स अॅण्ड मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी कालानुरूप बदलत रहाव्या लागतात. चौथा महत्वाचा पी म्हणजे प्लेस. सेल्स अॅण्ड मार्केटिंगमधला प्लेस हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. यातही आपल्याला सिंहावलोकनाची सवय लावून घेणं गरजेचं आहे. नेमका माझा कस्टमर कुठं आहे? कोणत्या जागेवर आहे? जिथं माझा सेल्समन पोहोचू शकेल... मी हे कुठं विकणार आहे? नाशिकमध्ये की महाराष्ट्रात की उत्तराखंडात की भारतभर? हे प्रश्न स्वत;ला विचारावे लागतील. ऑनलाईन मार्केटिंग हा सध्याचा अत्यंत प्रभावी उपाय सिद्ध होतोय. हे बदल स्वीकारावे लागतील आपल्याला. कारण जगात कुठेही तुमच्या प्रॉडक्टची गरज असू शकते, पण ती नेमकी कुठे आहे, हे तुम्हाला माहित नसते. म्हणून आपण वा आपलं प्रॉडक्ट कमी खर्चात त्या कस्टमरला कसं माहित होईल, याचा विचार करायला हवा. रोज अगदी अर्धा तास काढून तो आपल्या स्वत:च्या वा स्वत:च्या व्यवसायाच्या मूल्यमापनात घालवला, तरी पुष्कळ रस्ते सापडतात. त्यातून आपल्या व्यवसायात दुपटीने प्रगती होऊ शकते. यालाच विकास म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा गुरुवारी कांदाप्रश्नी रास्ता रोको

0
0

नाशिक:

केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य वाढविल्याने कांद्याचे भाव कोसळले असून याप्रश्नी रास्ता रोको करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तशी घोषणा जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे.

कांद्याचे निर्यात मूल्य ४२५ डॉलर प्रती मे. टन करण्याचा घेतलेला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने हा निर्णय त्वरित रद्द करून कांद्यावरील किमान निर्यात मुल्य शून्य करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. येत्या गुरुवारी (२ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे पगार यांनी स्पष्ट केले आहे. मोदी सरकारने एक प्रकारे कांदा निर्यात बंदी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. गुरुवारच्या रास्ता रोकोमध्ये पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिने उशिरा वेतन

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या सहा महिन्यांपासून वेळेवर होत नसल्याने सर्वांनाच नाहक विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. वेळेवर पगार होऊन उशिरा पगार करणाऱ्या संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १५ कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयातील पगार वेळेवर होत असताना फक्त येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाकडूनच हेतूपुरस्सर पगार दोन दोन महिने उशिरा केले जात असल्याचा आरोप जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केला आहे. दोन दोन महिने उशिरा होणाऱ्या पगारामुळे वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीबरोबरीनेच मानसिक स्थितीही खालवली आहे, असे या कर्मचाऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. उशिरा पगार करणाऱ्या जबाबदार अधिकारी अन् कर्मचारी यांची चौकशी होऊन यापुढे वेळेवर पगार करण्याची मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जुन्नरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्यासह प्रतिभा भावसार, एस. आर. खैरनार, पी. बी. मेश्राम, जे. के. मंडलिक, आर. ए. गुठे, ए. एस. शिंदे, आर. के. सहाणे, जे. एस. शिंदे, आर. बी. मोरे, व्ही. आर. छाजलानी, जी. पी. अहिरे, मनीषा बागुल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति आरोग्य उपसंचालकांसह राज्याचे आरोग्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी सेनेचा रास्तारोको

0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

इगतपुरी शहर व तालुक्यातील विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील रेल्वे पुलावर सुमारे एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभारी तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे मागे घेण्यात आले.

राज्य शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनागोंदी कारभार होत असून शेतकरी, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, भूमिहीन, शेतमजूर व सामान्य माणूस यामध्ये भरडला जात आहे. तालुक्यातील जनतेला धरणे उशाशी असूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही याला जबाबदार कोण आहे. शहरात नव्याने सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम झाले. मात्र, काही ठिकाणी काम अर्धवट ठेवल्याने नागरिकांना व वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे पुलावर कामच न केल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.

या पुलावरील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास अथवा आमचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न केल्यास अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने तालुका बंद करण्याचा इशारा दि. ना उघाडे यांनी यावेळी दिला. या रास्तारोकोप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना. उघाडे, जनरल सेक्रटरी सुरेश चौधरी, नीलेश निकाळे, राहुल गोडे, संदीप शर्मा, जगन जोशी, नईम शेख, फईम शेख, रामचंद्र कर्डक, नरेश गोसावी, इंदुबाई पवार, शांताबाई पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताबा नव्या विश्वस्तांकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर विश्वस्त मंडळाच्या माजी अध्यक्षांनी नव्या अध्यक्ष व विश्वस्तांना संस्थानचा ताबा दिला आहे. पोलिस उपाधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यासमोर माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी नव्याने नियुक्त झालेल्या विश्वतांचे पत्र स्वीकारले. दरम्यान, माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी नवीन अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड आणि सचिव जयंत गोसावी यांच्याकडे चोवीस तासात सर्व उपलब्ध कागपत्र तसेच मालमत्तेच्या किल्ल्या आणि बँक खात्यासह सर्व व्यवहार सुपुर्द करण्याचे कबूल केले आहे.

कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रध्दास्थान श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचा नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांचा वाद पोलिसांनी मिटवला आहे. माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील हे नव्या विश्वस्तांची धर्मदाय आयुक्तांनी नेमणूक करूनही ताबा सोडत नसल्याने नव्या-जुन्याच्या वादात काहीसा तणाव निर्माण झाला होता. दिनांक २० मे २०१५ रोजी नेमणूक झाली व त्यानंतर काही दिवसातच नव्या विश्वस्तांनी त्र्यंबकराव गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. कार्यका‌‌रिणीही जाहीर केली. मात्र, १९९२ पासून पदावर असलेल्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी ताबा सोडला नव्हता.

जिल्हा पोलिस उपाधीक्षक प्रवीण मुंढे यांनी माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील व नवीन अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड आणि इतर सर्व विश्वस्त यांची बैठक घेतली. या बैठकीत मुरलीधर पाटील यांनी आपली वर्तमानपत्रातील बातम्यांमधून बदनामी झाली. आपणास पत्र मिळालेले नाही त्याचप्रमाणे नवीन विश्वस्त मंडळाने जाहीर केलेली विविध पदे असेलेली कार्यकारिणी घटनेप्रमाणे नाही. चेंज राईटस् झालेले नाही. अशा विविध पळवाटा काढल्या. परंतु, पोलिस प्रशासन त्यास बधले नाही. त्यांनी कणखर भूमिका घेऊन धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाप्रमाणे नवीन विश्वस्तांना ताबा द्यावा, असे सुनावले. तसेच वारकरी संप्रदायाच्या आराध्य दैवताच्या ठिकाणी असे राजकारण करू नका असे खडसावले. या प्रसंगी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर आणि त्यांचे सहकारी यांनी महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. यावेळेस विश्वस्त मंडळातील अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, ललिता शिंदे, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे, पवन भुतडा, डॉ. धनश्री हरदास, संदीप कोल्हे, संजय धोंगडे आदींसह विश्वस्त आणि मधुकर लांडे, कैलास देशमुख, अंबादास मुळाणे कार्यकर्ते हजर होते.

विश्वस्तांना नोटिसा

दरम्यान, आज (दि.१) पालखी प्रस्थान होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, शांतताभंग होऊ नये म्हणून माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील आणि सर्व नवे विश्वस्त यांना १४९ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images