Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

यूथफुल सिंहस्थ

$
0
0

अमोघ पोंक्षे / सौरव बेंडाळे कॉलेज क्लब रिपोर्टर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणादरम्यान रामकुंडावर भाविकांसोबत गर्दी पाहायला मिळत होती ती तरुणाईची. धर्मध्वजा फडकताच हा संपूर्ण घोळका आपल्या जल्लोषाने वातावरणातील उत्साह वाढवत होता.

एकीकडे अनेक शाळांनी ध्वजारोहणाच्या दिवशी खबरदारी म्हणून शाळांना सुटी दिल्याचे निदर्शनास आले तर दुसरीकडे कार्यालयांसोबत अनेक शैक्षणिक संस्थांचे कामकाज चालू होते. पण अनेकांनी कॉलेजला जाण्याचे टाळत कुंभमेळ्याचा माहोल जवळून जाणण्यासाठी गोदाघाटावर हजेरी लावल्याचे चित्र होते.

डोळस भक्ती

गोदावरीत डुबकी मारुन पुण्य कमावण्यापेक्षा गोदेची स्वच्छता करत देवाप्रती आपली श्रध्दा असल्याचे दाखवून देणे आजची तरुणाई अधिक पसंत करते. त्याचप्रमाणे इतरवेळी प्रशासन व्यवस्थेतील त्रुटी काढत रान उठवणाऱ्या तरुणाईने कुंभमेळ्याचे प्रशासनाने केलेले नियोजन पाहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे अशी आशाही व्यक्त करते. अनेकांनी स्वत:पासून याचा श्रीगणेशा केला.

रात्रीपासून कारमध्ये

सचिन आणि दुर्गेशदेखील सकाळी साडेचारला गंगाघटावर ध्वजारोहणासाठी गेले होते. रविवार कारंजावर आपली गाडी पार्क करुन तिथून ते गंगेवर पायी गेले. बारा वर्षात येणारा हा सिंहस्थ अनुभवायाचा म्हणून हे दोघे मित्रांसोबत रात्री अकरापासून कारमध्ये बसून होते.

सेल्फी...

सेल्फीची क्रेझ ध्वजारोहणादरम्यानही दिसून येत होती. अनेक ग्रुप्सनी या सेल्फीच्या माध्यमातून सोशल मीडियावरही हा सोहळा हिट केला. गौरवने त्याच्या ग्रुपसोबत काढलेले सेल्फी फेसबूक, ‌व्टिटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, हाइक सगळीकडे पोस्ट केल्याचे सांगितले. अनेकांनी या सोहळ्याचे व्हिडिओजही सोशल साईट्सवर उपलब्ध करुन दिले.

कट्ट्यावर भाव

सिंहस्थाच्या ध्वजारोहणप्रसंगी काढलेले सेल्फी, व्हिडिओ, फोटोज याचे शेअरिंग कट्ट्यांवर होत होते. 'आज मी गेलो होतो, जाम मज्जा आली. कसली भारी पुष्पवृष्टी केली राव, झक्कास...' असे संवाद तरुणाईमध्ये रंगले होते. शाही स्नानाचा अनुभव घेण्याचे प्लॅनिंगही आतापासूनच यंगर्स्टर्समध्ये सुरू झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाठ्यपुस्तक छपाईचे काम राज्यातच ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील मुद्रण व्यावसायिक सध्या प्रचंड मंद‌ीला तोंड देत असल्याने महाराष्ट्र राज्य पाठ्ययपुस्तक मंडळाचे काम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेवणे गरजेचे आहे, असे मत मुंबई मुद्रक संघ आणि महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद लिमये यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

चाळीस वर्षांपासून पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपासून पुस्तक छपाईची कामे महाराष्ट्रातील चारशे नोंदणीकृत मुद्रकांमार्फत केली जात होती. २००४ साली तत्कालीन शिक्षणमंत्री अमरिश पटेल यांच्या आदेशानुसार २००५-०६ च्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक ते नूतनीकरण शुल्क भरलेल्या मुद्रकांचा हक्क डावलून निविदा मागविल्यामुळे सर्व मुद्रकांनी तत्काल‌नि मुख्यमंत्र्याकडे दाद मागितली होती. परंतु पाठ्यपुस्तक मंडळाने अखिल भारतीय स्तरावरील मुद्रकांसाठी निविदा सूचना प्रसिद्ध केली व आजतागायत ही प्रथा कायम आहे. या निविदा देशपातळीवर न मागवता राज्य पातळीवर मागवाव्यात, अशी मागणी या मंडळाकडून केली जात आहे.

मार्च २०१५ अखेरपर्यंत पाठ्यपुस्तक मंडळाने महाराष्ट्रातील मुद्रणालयांकडे ६ कोटी ८५ लाख ८१ हजार २०० प्रतींचे व परराज्यातील मुद्रणालयांकडे २ कोटी, २३ लाख, ३२ हजार प्रतींचे काम सोपवले आहे. त्यामुळे आधीच विकलांग असलेल्या राज्यातील मुद्रण व्यवसायाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील ११ कोटी पाठ्यपुस्तक छपाईचे काम राज्यातच ठेवावे, अशा मागणीही त्यांच्या वतीने केली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालूनही त्यांनी या विषयाची दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांनी केलेल्या 'मेक इन महाराष्ट्र'ची घोषणा केवळ नावापुरतीच आहे का? अशी शंकाही यावेळी उपस्थित करण्यात आली.

पाठ्यपुस्तक मंडळाची निविदा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित ठेवली तर महाराष्ट्रातील मुद्रण व्यवसायास मदत होईल. तसेच पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांचा भारत भ्रमणावर होणारा खर्च व वेळेचीही बचत होईल. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये अनेक मुद्रकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले आहेत. पर्यायाने या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार निराधार झाले आहेत. या सर्व समस्या मिटवण्यासाठी महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तक छपाईचे काम महाराष्ट्रातच ठेवणे गरजेचे असल्याचे लिमये यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विनय तांबे व विलास सांगुर्डेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांचे ध्वजारोहण १९ ऑगस्टला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

दिगंबर अनी, निर्वाणी आणि निर्मोही या तीन आखाड्यांचे ध्वजारोहण १९ ऑगस्टला होणार असून, त्यानंतरच सिंहस्थ कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ होईल. यासाठी देशविदेशातून विविध आखाड्यांचे साधुमहंत दाखल झाले आहेत.

१९ ऑगस्टला तिन्ही आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे.ध्वजस्तंभासाठी लागणाऱ्या सुमारे ५४ फूट उंचीचा अखंड लाकूड बुधवारी दुपारी साधुग्राम येथे दाखल झाले. एक महिना आधीच ध्वजाचे लाकूड आल्याने आखाड्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दिंडोरीतास या ठिकाणाहून सुमारे ४५ ते ५१ फुट उंचीची निलगिरीची लाकडे साधुग्राम येथे आणली आहेत. या लाकडावर आकर्षक रंगरंगोटी व कलाकुसर करण्यात येणार आहे. यावेळी महंत कृष्णदास महाराज, महंत रामजनमदास महाराज, महंत

प्रेमदास महाराज, महंत नरेंद्र दास महाराज, महंत भक्तीचरन्दास महाराज आणि तिन्ही आखाड्यांचे महंत उपस्थित होते.

ध्वज असे असतील...

दिगंबर अनी, निर्मोही आणि निर्वाणी असे तीन आखाडे असून, या तिन्ही आखाड्यासमोर ध्वजारोहण केले जाईल. तिन्ही आखाड्याचा धर्मध्वजाचा आकार आयताकृती असेल. १० फूट रुंद आणि २५ फूट लांब असा असेल. तिन्ही ध्वजावर दोन्ही बाजूंनी हनुमानाचे चित्र असेल; मात्र तिन्ही ध्वजांचा रंग वेगळा असेल. दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज पंचरंगी असतो, निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असतो, तर निर्मोही आखाड्याचा ध्वज पांढरा रंगाचा असतो.

मित्र मंडळ सेवेत

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा व अन्य सुविधा देण्याची जबाबदारी पंचवटीतील शिवशंकर मित्र मंडळ व फुलेनगर मित्र मंडळांने स्वीकारली आहे. पेठ रोडकडून येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधेसह चहा, पाणी आणि नाश्ता देण्याची सोय मंडळातर्फे करण्यात आली आहे. या काळात पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून २४ तास वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती सुनील जाधव, दौलत गायकवाड, रमेश काळे, बाबा ठाकूर, अशोक गुंजाळ यांनी दिली.

शाहीस्नान झाल्यावर ध्वजावतरण...

१९ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण, त्यानंतर सर्व आखाड्यांमध्ये इष्टदेवता यांची स्थापना केली जाईल. त्यानंतर सर्व धार्मिक विधी होतील. मग तिन्ही शाहीस्नान होतील आणि त्यानंतर मुहूर्त काढून ध्वजवतरण (ध्वज उतरवणे) होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त विधानांची मोदींना झळ

$
0
0

नाशिक : घरवापसीसारख्या योजना तसेच यासंबंधी मंत्र्यांकडून होणारे वादग्रस्त वक्तव्य यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागळली जात असल्याची खंत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्त केली.

धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य ठोकणाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला तडा देत असल्याचे लक्षात घ्यावे, असे ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केले. आपल्या मतासाठी पुरावा देताना महंतानी भाजपाचे खासदार साक्षी महाराज आणि केंद्र‌ीय मंत्री निरजंन ज्योती यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. हिंदू महिलांना किमान चार मुलांना जन्म द्यावा, असे निरंजन ज्योती यांनी म्हटले होते. हिंदुत्वाच्या नावाखाली बेफाम वक्तव्य करणाऱ्यांमुळे समाजावर तसेच धर्मावर चुकीचा शिक्का बसत असल्याचे ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान, कुंभमेळ्याच्या कामांबाबत समाधानी असल्याचे स्पष्ट करीत महाराजांनी राज्य सरकारची स्तुती केली. मुख्यमंत्र्याचे अभिनंदन केल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खालसे मदतीपासून वंच‌ित

$
0
0

पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा; अस्वच्छतेचा त्रास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामसृष्टी परिसरातील मोकळ्या जागेत २५ खालशांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जागा मिळालेल्या खालशांचे साधुमहंत १२ दिवसांपासून तळ ठोकून आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप त्यांना पाणी, वीज, बाथरूम, टॉयलेट अशा कोणत्याही सुविधा पुरवलेल्या नाहीत. आखाड्यांच्या श्री महंताचेही प्रशासन ऐकत नसून लवकरात लवकर सुविधा मिळाल्या नाही निषेधाची भूमिका साधुमहंत घेण्याचा इशारा संबंधीतांनी दिला आहे.

प्रशासनाने आरक्ष‌ित जमिनीवर १ हजार ५३० प्लॉटस तयार केले. या प्लॉटसमध्ये टॉयलेट, बाथरूम, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. मात्र, यात रामसृष्टीतील मोकळ्या जागांचा समावेश नव्हता. प्रशासनाने सुविधा पुरवल्यानंतर जमिनी आखाडा परिषदेकडे सर्पुद केल्या आहेत. मात्र, आखाडा परिषदेने प्रशासनाकडून दुर्लक्षीत झालेल्या रामसृष्टीमध्ये २५ पेक्षा जास्त खालशांना जागा दिली.

आता मागील १५ दिवसांपासून संबंध‌ित खालशांचे प्रमुख पायाभूत सुविधा मिळाव्यात म्हणून तिन्ही आनी आखाड्यांच्या श्री महंताकडे तसेच प्रशासनाकडे चकरा मारत आहे. अनेकदा तक्रारी करूनही सुविधा उपलब्ध होत नसल्याचे महंत अंबिकादास यांनी सांगितले. अशीच कहाणी महंत गिरीदास महाराज (पानवालेबाबा) आणि महंत रामेश्वरदास महाराज यांनी सांगितली. गुरूपौर्णिमेनंतर भक्ताचा राबता सुरू होईल. जिथे साधुमहंताची व्यवस्था नाही, तिथे भक्तांना काय जागा देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आंघोळीसाठी गोदावरीचा आसारा मिळतो. मात्र, दैनंदिन गरजा भागवताना आसऱ्याची आवश्यकता पडते. त्यात कुंचबना होत असल्याची कैफीयत पानवालेबाबा यांनी मांडली. गुरूपौर्णिमेच्या आत सर्व व्यवस्था होणे आवश्यक आहे. तक्रारी करूनही फायदा होणार नसेल तर योग्य ती भुमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

भंडारा करायचा कसा?

साधुग्राममध्ये प्रशासनाने २४ तास पाणी पुरवठा सुरू केला आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने साधुग्राममध्ये पाइपलाईनचे जाळे पसरवले असून, त्यातील काही पाइपलाईन फुटल्या आहेत. फुटलेल्या पाइपलाईनमुळे साधुग्राममधील तपस्वी नगर नर्मदाखंड खालशा तसेच इतर ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत बोलताना खालशाचे प्रमुख महंत रामदास त्यागी (टाटम्बरी बाबा) यांनी सांगितले की, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असला तरी भंडारा करणे गरजेचे आहे. प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

कचऱ्याचा प्रश्न बिकट

साधुग्राममधील स्वच्छतेचा प्रश्न बिकट होत चालला आहे. महापालिका ठेकेदार आणि ठेका यात गुरफटत असून, साधुग्राममध्ये कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेले साधुमहंत जेवणाचे पदार्थ स्वतःच तयार करतात. यामुळे निर्माण झालेला कचरा फेकण्यासाठी जागाच उपलब्ध नसून, मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो आहे. याबाबत दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोरदास महाराज यांनी खंत व्यक्त केली. अद्याप पाऊस झालेला नाही. मात्र, एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा रामकिशोरदास महाराजांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विडी कामगारांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

विडी कामगारांना प्रतिदिन २१० रुपये किमान वेतन द्यावे, अशी मागणी सिटू कामगार संघटनेने केली आहे. या प्रकरणी शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास विडी कामगारांचे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सिटूचे नेते हरिभाऊ तांबे यांनी दिला आहे.

या प्रकरणी विडी कामगारांच्या तीव्र भावना असून, शासन मालक धार्जिणे धोरण स्वीकारत असल्याने कामगारांची गळचेपी होत असल्याची टीका हरिभाऊ तांबे यांनी केली आहे. या प्रकरणी सिन्नरसह तालुक्यातील विविध गावात सभा घेवून विडी कामगाराबाबत आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. या प्रकरणी इतर राज्यात १७४ रुपये किमान वेतन दिले जात असतांना महाराष्ट्र शासन १४० रुपये किमान वेतन निश्चित करण्याच्या तयारीत असून मालक धार्जिणे धोरणाचे समर्थन विडी कामगार संघटना करीत असल्याचा आरोप तांबे यांनी केला आहे.

या प्रकरणी विडी कामगारावर अन्याय होत असल्याने महाराष्ट्र शासनाने विडी कामगारांना प्रतिदिन २१० रुपये किमान वेतन द्यावे अशी मागणी सिटू कामगार संघटनेनी केली असून या प्रकरणी शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास विडी कामगारांचे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिटूचे नेते हरिभाऊ तांबे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात ‘प्रगती’विरुद्ध ‘शेतकरी विकास’

$
0
0

बाजार समिती निवडणुकीचा रंगला आखाडा

म. टा. वृत्तसेवा, येवला

पुलाखालच्या पाण्यागत वेगवेगळ्या वळणावरचं इकडून तिकडे व तिकडून इकडे वाहत जाणारे बेरकी रंगढंग अन् तिरक्या चालीचं राजकारण अशी ख्याती असलेल्या येवला तालुक्याच्या राजकीय पटलावर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा रंगात आले आहे.

२६ जुलै रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताना प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू झाली आहे. राज्याचे माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ प्रणित 'प्रगती' पॅनलपुढे येवला पंचायत समिती माजी सभापती संभाजी पवार व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांच्या 'शेतकरी विकास' पॅनल ने आव्हान उभे केले आहे. बाजार समिती निवडणूक निमित्ताने सर्वांचीच कसोटी पणाला लागली असून, कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता तालुकावासीयांना लागली आहे.

वयाची साठी गाठलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजवर झालेल्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुका या त्या त्या वेळच्या अनेक मुद्द्यांना हात घालत लढवल्या गेल्या. कांदा या नगदी पिकाने वर्षभर गजबजणाऱ्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार तसे दुसऱ्या पिवळ्याधमक मक्याच्या राशींनी देखील नेहमीच फुलून जाते. तशीच मोठी गजबज व धामधूम असते ती समितीच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत. जवळपास ३ कोटींच्या घरात वार्षिक उलाढाल व एकूण स्थावर मालमत्ता ११ कोटी ५४ लाख असलेल्या या येवला बाजार समितीच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात अनेकांच्या उद्या पडतात. ग्रामीण भागातील जनता जनार्दनाशी विशेषतः शेतकऱ्यांशी थेट नाळ जोडली जात असल्याने आपल्याही कपाळी संचालक पदाचा टिळा लागावा यासाठी अनेकांची धडपड असते. यावेळची निवडणूक देखील त्याला अपवाद नाही हे १८ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ५० उमेदवारांच्या यादीवर नजर टाकता म्हणावे लागेल.

येवला तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या १० वर्षांपूर्वी आपले पाऊल टाकलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तालुक्याच्या प्रत्येक निवडणुकीत स्वतः लक्ष घालताना अनेक ठिकाणी आपले राजकीय 'बळ' निर्माण केले, त्यात येवला बाजार समितीचा देखील समावेश आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारत बाजार समितीत पाच वर्षे सत्ता राहिलेल्या भुजबळांनी या वेळी देखील आपला 'प्रगती' पॅनल रिंगणात उतरवतांना मतदारांना साद घातली आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक माणिकराव शिंदे व मविप्र संचालक अंबादास बनकर हे दोघे प्रगतीच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत. तर तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे संभाजी पवार व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांनी 'शेतकरी विकास' पॅनल निवडणूक रिंगणात उतरवत भुजबळांना आव्हान दिले आहे. भुजबळांनी ५ विद्यमान संचालकांना पॅनलमध्ये संधी देतानाच जेष्ठ नेते तथा विद्यमान संचालक अंबादास बनकर यांचे पुत्र संजय बनकर यांना मैदानात उतरविले आहे. पवार-दराडे यांच्या पॅनलने अनुभवी, नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देतांना तालुक्याच्या सर्व भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

माजी आमदार मारोतराव पवार यांचा तालुक्यातील दांडगा जनसंपर्क अन् दराडे यांचे सहकारावरील सध्याचे वर्चस्व बघता बाजार समितीची ही निवडणूक भुजबळांच्या 'प्रगती'पुढे आव्हान ठरणार असून, भुजबळांची कसोटी देखील पणाला लागली आहे. माणिकराव शिंदे यांचे डावपेच व बनकर यांची साथ हिच भुजबळ यांची जमेची बाजू समजली जात आहे.पवारांची जनमाणसातील 'पॉवर' अन दराडे यांची 'रणनीती' यापुढे भुजबळांची 'प्रगती'बळ कसे चालते याकडेच तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

दृष्टीक्षेपात...

सोसायटी गटात सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्ग १, विमुक्त जाती/भटक्या जमाती १ अशा एकूण ११ जागा. १ हजार ११ मतदार करणार २४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसलाग्रामपंचायत गटात सर्वसाधारण २, आर्थिक दुर्बल घटक आणि अनुसूचित जाती जमाती प्रत्येकी १ अशा एकूण ४ जागा. ७४४ मतदार ठरविणार १२ उमेदवारांचे नशीबव्यापारी मतदारसंघात २ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात. ३२० मतदार देणार कौलमाथाडी-मापारी मतदारसंघातील एका जागेवर ७ उमेदवार. ३५२ मतदार निवडणार आपला प्रतिनिधीबाजार समितीच्या विविध १८ जागांवरील एकूण ५० उमेदवारांचे भवितव्य २४५७ मतदारांच्या हाती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपोच गॅस सिलिंडर देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर येथील एचपी ग्राहकांना सिलिंडर घरपोच मिळत नसल्याने गॅस ग्राहक संतप्त झाले आहेत. याबाबत तक्रारींचा पाढाच ग्राहकांनी वाचला आहे. गॅस एजन्सी व कर्मचारी यांच्यात पैसे ग्राहकाकडून आकारण्याबाबतचे वाद विकोपाला गेल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे ग्राहक अधिक संतप्त झालेले आहेत.

कर्मचाऱ्यांनी तहसीलदार मनोज खैरनार यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करून एजन्सीमार्फत केल्या जाणाऱ्या सक्तीच्या पोहोच वसुलीची मागणी केली जात असल्याचे निदर्शनात आणून दिले. या दोघांच्या भांडणात गॅस ग्राहक भरडला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीच्या गुदामात जावे लागत असल्याने एचपी गॅससंदर्भात तक्रारी वाढत आहेत. कर्मचाऱ्यांना एजन्सीचे चालक धीरवाणी, व्यवस्थापक जगताप विनाकारण त्रास देत आहेत. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ सुरू केला असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार थकला असून, हातावर प्रपंच असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसाराचा गाडा हाकणे अवघड बनल्याने ३० जूनपासून संप पुकारल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी संतोष कदम, अनिल देशमुख, चंद्रकांत शिंदे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

विस्कळीत झालेली वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गॅस एजन्सीने युद्धपातळीवर उपाययोजना करावी, कर्मचाऱ्यांचा संप ही एजन्सीची अंतर्गत बाब असून, त्याचा ग्राहकसेवेशी संबंध नाही. त्यामुळे एजन्सीने ग्राहकांना घरपोच सिलिंडर देण्याची व्यवस्था तातडीने करावी, असे आदेश तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी एजन्सीला दिले. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांत नाराजी असून, त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रसंगी एजन्सीवर गुन्हे दाखल करण्याची तंबीही तहसीलदारांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसहभाग मृग‘जळा’साठी!

$
0
0

येवल्यात ममदापूरमध्ये बंधारा उपक्रमासाठी राबताहेत शेकडो हात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला तालुक्यात पाण्याअभावी होत असलेल्या हरिणांच्या मृत्यूची दखल घेत नाशिकच्या युवकांनी लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ममदापूर या संरक्षित क्षेत्रात सहा बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. अनेक सामाजिक संघटनांनीही या कामात रस घेतला असून, अशा प्रकारे लोकसहभागातून वन्यजीवांसाठीचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

हरिणांच्या वास्तव्यास लागणारी भौगोलिक परिस्थिती, अत्यल्प झाडी, छोट्या टेकड्या, तुरळक शेती, कमी लोकवस्ती, ओसाड प्रदेश असे पोषक वातावरण ममदापूर येथे असल्याने वनखात्याने राज्यातील दुसरे वनक्षेत्र म्हणून येवला तालुक्यातील ममदापूरची निवड केली. येथे हरिण व काळविटांची संख्या जास्त असल्याने हे क्षेत्र वनविभागाने राखीव ठेवले.

मात्र, तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याअभावी काही हरणांचा मृत्यू झाला. काही हरिण पाण्याच्या शोधार्थ रस्त्यावर आल्याने वाहनांच्या धडकेने ठार झाले. पाण्यामुळे हरिणांची संख्या कमी होते की काय, अशी भीती निर्माण झाली. यावर उपाय म्हणून नाशिकच्या नम्रता परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वनखात्याच्या आ‍वश्यक परवानग्या घेऊन त्यांनी या ठिकाणी काम सुरू केले. सिमेंटच्या वापर न करता तेथेच असलेल्या दगड मातीच्या सहाय्याने बंधारे बांधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १० ते १५ लोकांनी हे काम पूर्ण केले.

या युवकांचे काम पाहून स्थानिक लोकांनीही मदतीचा हात पुढे केला. आजही या ठिकाणी पाण्याचा थेंब नाही; मात्र युवकांनी बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. उन्हाळ्यात बाहेरून पाणी आणून ते बंधाऱ्यात टाकण्यात आले. आता पाऊस झाल्यास ममदापूरच्या हरिणांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

हरीण सफारीचे नियोजन

युवकांचे कार्य पाहून या ठिकाणी निर्सग निर्वाचन केंद्र, डीअर सफारी, सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. येथील दुकानदारांनी गावात प्लास्टिक आणायचे नाही असा निश्चय केला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना एक पिशवी दिली जाते. त्यांनी कचरा अभयारण्यात न टाकता या पिशवीत गोळा करून आणायचा आहे. हरिणांच्या पाण्याचा प्रश्न लोकसहभागातून सुटला आहे. पूर्वी मे महिन्यात पाण्याअभावी किमान एक तरी हरिणाचा बळी जात होता. मात्र, यंदा तसे घडलेले नाही

पाणी नसल्याने हरिणांचा मृत्यू होण्याच्या घटना दुर्दैवी होत्या. हे टाळण्यासाठी आम्ही उपक्रम सुरू केले. महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग असून, आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत.

- नम्रता परदेशी,

पर्यावरण अभ्यासक

बंधारे बांधल्याने हरिण रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचे अपघातही घटले. येत्या काही दिवसांत एकही हरिण जखमी झालेले नाही. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

- अशोक काळे,

वन परिमंडळ अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मानासाठी मनसेची आज पालिकेत लक्षवेधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात सत्ताधारी मनसेच आक्रमक झाली असून, मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी शुक्रवारी महासभेत लक्षवेधी मांडली आहे. जकात बुडविणाऱ्यांना मंचावर स्थान देण्यात आले असताना शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून लांब ठेवल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केला आहे. दरम्यान नगरसेवकांची आक्रमकता पाहता पोल‌िसांनी नमते घेतल्याची चर्चा असून, पर्वणी काळात आता नगरेसवकांना पास देण्याचा प्रस्ताव पोल‌िसांनी महापालिकेला दिला आहे.

ध्वजारोहण सोहळ्यात महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांनाच मज्जाव करण्यात आला होता. विशेषता सत्ताधारी मनेसच्या पदाधिकाऱ्यांनाही अपमानजनक वागणूक मिळाल्याचा आरोप मनसेनच केला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या सन्मानासाठी थेट लक्षवेधीच सभागृहात मांडली जाणार आहे. मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी ही लक्षवेधी मांडली असून, त्याच्यावर वादळी होण्याची शक्यता आहे. महापालिकेचा सिंहस्थासाठी निधी असतानाही, नगरसेवकांना अशी वागणूक का? असा सवाल उपस्थित केला जाणार आहे. त्यामुळे सभागृहात वादळी चर्चा होणार आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनाच निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आलेले नाही. तर कार्यक्रमाला येऊ नये अशाच पद्धतीने त्यांना निमंत्रण पोहचवण्यात आले. 'महापालिकेच्या वास्तूत स्वता:ची दुकाने थाटायची आणि पदाधिकाऱ्यांचा अपमान करायचे काम पुरोहित संघाने सुरू केले आहे. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी वस्रांतरगृहच ताब्यात घ्या' अशी भूम‌िका मनसेने घेतली आहे. इतर पक्षांकडूनही आक्रमक रूप घेतले जाणार असल्याने सभागृहात वादळी चर्चा होणार आहे.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांना जास्तीचे पास देण्यात येतील, असे त्यांनी महापौरांना कळविले आहे.

गुन्हेगार मंचावर...

महापालिकेची जकात बुडविणाऱ्या उद्योजकांनाच सिंहस्थाच्या व्यासपीठावर स्थान दिल्याचा आरोप कोंबडे यांनी केला आहे. गुन्हेगारांना मंचावर स्थान दिले तर, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून सतीश शुक्ल यांनी लांब ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने वस्रातंरगृहावरच आक्षेप घेत, प्रदूषण करणारे आणि गुंडगिरी करणाऱ्या पुरोहित संघाच्या सदस्यांना वस्रातंरगृहातून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुरोहित संघ आणि मनसेतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपिला नदीच्या स्वच्छतेस सुरुवात

$
0
0

म. टा. पंचवटी, नाशिक

पंचवटीतील कपिला नदीची अवस्था नाल्यासमान झाली असून या नदीची त्वरित स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करणारी बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आणि महापालिकेच्या पंचवटी प्रभाग समिती सभापती सुनिता शिंदे यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. बांधकाम विभागाच्या कर्मचा ऱ्यांना बोलावून नदीच्या परिसरात साफसफाई करण्यात आली.

कपिला नदीच्या पाणी प्रवाहात परिसरातील काही नगरांमधून दुर्गंधीयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट सोडले जाते. त्यामुळे ही नदी प्रदुषित झाली आहे. या प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकही हैराण झाला आहे.

नदीप्रवाह वाहत असलेल्या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांबरोबरच कपिला नदी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक भाविकांचाही हिरमोड होत आहे. त्यामुळे या नदीच्या परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी केली होती.

'मटा'ने कपिला नदीच्या दुरवस्थेसह नागरिकांची मागणी मांडणारी बातमी छापली. त्याची महापालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आणि स्वच्छता अभियान सुरू केले. याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कपिला नदीचा नाला झाला आहे. नदीचे पावित्र्य काही लोक जपत नाहीत. त्यामुळे नदी प्रदूषण वाढले आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे लहान मुलांना त्रास होतो.

- दगाजी पाटील

परिसरातील सर्व समस्या ताबडतोब सोडविल्या जातील. दुर्गंधी युक्त पाण्याचा बंदोबस्त केला जाईल. नाल्याची त्वरित साफसफाई सुरू करण्यात आली आहे.

- सुनिता शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यात सुरक्षितता बाळगा

$
0
0

हॉटेल चालकांना पोलिसांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर सातपूर पोलिस ठाण्याच्या वतीने परिसरातील हॉटेलचालकांची नुकतीच बैठक झाली. यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोज करंजे यांनी कुंभमेळा काळात हॉटेलचालकांनी सुरक्षा बाळगावी, असे आवाहन केले. तसेच कुंभमेळ्यात नव्याने कामावर रूजू होणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण माहिती घेऊनच त्यांना कामावर ठेवा, अशीही सूचना केली. याप्रसंगी सातपूर परिसरातील सर्व हॉटेलचालक उपस्थित होते.

बारा वर्षांनंतर नाशिकमध्ये होऊ घातलेला महाकुंभ देशाच्या धार्मिकतेचे प्रतिक आहे. या होत असलेल्या धार्मिक उत्साहात अनुचित प्रकारामुळे गालबोट लागू नये यासाठी सातपूर पोलिस ठाण्याकडून विभागातील हॉटेलचालकांची संयुक्त बैठक सातपूर पोलिस ठाण्यात घेण्यात आली. यावेळी पोलिस निरिक्षक करंजे यांनी महाकुंभात देश, विदेशातून भाविकांचे आगमन नाशिकमध्ये होणार असल्याचे सांगितले. अशावेळी बाहेरून येणारे भाविक हॉटेलमध्ये राहण्यासाठी किंवा खाण्या-पिण्यासाठी गर्दी करणार आहेत. यासाठी हॉटेलचालकांनी किमान प्रवेशद्वारावार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजे. तसेच गर्दीच्या काळात कामगारांची देखील हॉटेलचालकांना गरज भासणार आहे. अशा वेळी कामगार व्यक्ती घेतांना त्याची पूर्ण माहिती घेतल्याखेरीज कामावर घेऊ नये असा सल्ला करंजे यांनी बैठकीत दिला. कुठल्याही प्रकारचा संशय असलेल्या व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी. सिंहस्थ काळात हॉटेलचालकांनी शक्यतो रात्री दहा वाजताच हॉटेल बंद करावे, अशी सूचना करंजे यांनी केली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टंचाईचे संकट गडद

$
0
0

जिल्ह्यात अवघा १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्याच्या सुरूवातीला काही प्रामाणात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा १७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास अनर्थ ओढावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाला, त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली आहे. काही दिवसात जिल्ह्यात पाऊस होऊन जलसाठा वाढेल असे तज्ज्ञांचे म्हणणे होते; परंतु चीनमध्ये आलेल्या वादळामुळे महाराष्ट्रातील पावसावर परिणाम झाला, त्यामुळे अपेक्षीत पाऊस पडू शकला नाही. नाशिक जिल्ह्यात २३ धरणे आहेत, त्यातील गोदावरी धरण समूह, पालखेड धरण समूह, गिरणा खोरे असी तीन विभाग पडतात. गंगापूर धरणाच्या समुहात गंगापूर, काश्यपी आणि गौतमी अशा तीन धरणांचा समावेश होतो तर पालखेड धरण समुहात १४ धरणांचा तर गिरणा धरण समुहात ६ धरणांचा समावेश होतो. नाशिक जिल्ह्यात ७ मोठे प्रकल्प, १६ मध्यम प्रकल्प असे एकूण २३ प्रकल्प आहेत. गंगापूर धरणात सध्यस्थितीला २ हजार १२५ द.ल.घ.फु साठा आहे. काश्यपी धरणात ३९९ व गौतमी मध्ये १५५ असा एकूण २ हजार ६७९ द.ल.घ.फु साठा आहे. हे प्रमाण २९ टक्के इतके आहे. पालखेड धरणसमुहाची २० हजार ४१२ द.ल.घ.फु पाणी साठवणूक करण्याची क्षमता आहे. मात्र त्या ठिकाणी आज फक्त ६६५ द.ल.घ.फु. पाणी साठा वापरता येईल, अशी परिस्थिती आहे. तर गिरणाखोऱ्यात २४ हजार ७५३ द.ल.घ.फु. पाणी साठा साठवणूकीची क्षमता आहे. मात्र सध्य परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील २३ धरणांमधून ६६ हजार ३५४ द.ल.घ.फु. पाणी साठवणुकीची क्षमता आहे.

यातील ११ हजार द.ल.घ.फु इतके पाणी वापरण्या योग्य आहे. टक्केवारीचा विचार केल्यास फक्त १७ टक्के पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दृष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळा सुरु झाला आहे. त्यासाठीही पाणी सोडले जात असून, धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमीच होते आहे. त्यात पाऊस नसल्याने प्रशासनला चिंता लागून राहिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांचा रहिवाशांना जाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल होत असलेल्या भाविकांचे शहरात स्वागत होत असले तरी नाशिकरोड रेल्वे रुळालगतचे रहिवाशी मात्र आतापासूनच वैतागले आहेत. काही भाविक रुळांलगत उघड्यावर प्रात:विधीस बसत असल्याने स्थानिकांची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिकरोड पुलाखाली प्रभाग ५६ आणि ५७ मध्ये रेल्वे रुळालगत चिडे, नेहे, दिंडे, अरिंगळे, खर्जुल यांचे मळे आहेत. त्यामध्ये मोठी लोकवस्ती आहे. आता शेजारीच नवीन वसाहतीही झाल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक आणि प्रवाशी रेल्वे रुळालगत उघड्यावर प्रात:विधीस बसतात. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आले आहे. सकाळी सकाळीत किळसवाने दर्शन रहिवाशांना घडू लागले आहे. सकाळी उग्रवास आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रहिवाशांना ये-जा करणेही अवघड होते. नाशिकरोडचे जलशुद्धीकरण केंद्र रुळापासून पन्नास मीटरवर आहे. पाऊस पडल्यावर सर्व घाण या केंद्राभोवती जमा होते. पिण्याच्या पाण्यातही ही घाण मिसळते.

रहिवाशांची रात्रपाळी

गेल्या कुंभमेळ्यात येथे डोळ्यांची तसेच डेंग्यूची साथ आली होती. त्यावेळी शौचास बसणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी रहिवाशांनी रात्री व पहाटे गस्त सुरू केली होती. त्यासाठी प्रत्येकाची ड्युटी ठरवून घेतली होती. भाविकांशी वादविवादही घातले होते. अन्यवेळी रात्री रुळालगत मद्यपी दारू पिण्यास बसतात. विद्यार्थी, महिलांना सायंकाळनंतर येथून जाणे कठीण होत आहे. या मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

फिरत्या शौचालयाची मागणी

रेल्वे प्रशासाने रेल्वे स्टेशन तर चकाक ठेवले आहे. मात्र, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पुरेश्या शौचालयांची सोय केलेली नाही. त्यामुळे भाविक रुळालगतच बसतात. पुलाखाली आणि चिडे मळ्यात या भाविकांसाठी फिरत्या शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

भाविक आणि प्रवासी रुळालगत उघड्यावर शौचास बसत असल्याने हरित कुंभ संकल्पनेलाच हरताळ फासला गेला आहे. केवळ रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेऊन उपयोग नाही तर भाविक अन्य ठिकाणी घाण करणार नाही याची दक्षता घ्यावी.- जगन गवळी

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होते. रेल्वेतर्फे पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना नाईलाजास्तव रुळालगत बसावे लागते. निदान त्यांच्यासाठी तरी फिरते शौचालये प्रशासनाने ठेऊन स्वतःची लाज राखावी.- विमल रसाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरकतींवर अंडरपासचा फैसला

$
0
0

महापौरांनी केली पाहणी; इंदिरानगर अंडरपास सुरू करण्याची नागरिकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर अंडरपास आठ दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. यानंतर तो सुरू करायचा की, कायमस्वरूपी बंद ठेवयाचा हे सर्वस्वी नागरिकांच्या हरकतींवर अवलंबून असणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. मात्र अंडरपास सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इंदिरनगर अंडरपास येथे सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याचे स्पष्ट करीत शहर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अंडरपास बंद केला. तसेच दोन्ही सर्व्हिसरोड वन वे केले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे इंदिरानगर, दिपालीनगर, राणेनगर, लेखानगर आदी भागातील शेकडो नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. इंदिरानगर अंडरपास वगळता दुसरा पर्याय जवळ नसल्याने नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण होते आहे. हा मार्ग सुरू करावा, दुचाकींसाठी मान्यता द्यावी, अशा विविध मागण्या नागरिकांकडून येत आहेत. तसा दबाव स्थानिक नगरसेवकांवर पडतो असल्याने बुधवारी माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेतली होती. यानंतर, गुरूवारी दुपारी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृहनेता सलिम शेख, गटनेता अनिल मटाले, नगरसेवक दिपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे आदींनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

अंडरपास बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी भाडेवाढ केली आहे. सायकलस्वारांना सुध्दा तीन किलोमीटरचे अंतर कापून प्रवास करावा लागतो आहे. अपेक्षित ठिकाणी पोहचणे डोकेदुखी ठरत असून हा अंडरपास त्वरीत सुरू करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर प्रशासनाने निर्णय घेतला असून ४० टक्के नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्यातर अंडरपास सुरू करता येईल, असे स्पष्टीकरण पोलिस आयुक्तांनी दिल्याची माहिती महापौर मुतर्डक यांनी दिली. हरकती नोंदवण्यासाठी अर्ज लवकरच उपलब्ध होतील, अशी माहिती नगरसेवक यशवंत निकुळे यांनी दिली.

जनह‌ित याचिकाच योग्य

हा प्लॅन तयार करणाऱ्या न्हाईच्या इंजिनअीरर्सने चूक केली. मोठी चूक केल्यानंतरही त्यांचे वेतन सुरू आहे. त्यात कोणताही फरक पडलेला नाही. आम्हाला त्रासाला सामोरे जावे लागते आहे. चुकांचा डोंगर उभा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करणे गरजेचे असल्याचे मत याप्रसंगी उपस्थित महिलांनी व्यक्त केले. प्रशासनाच्या चुकांचा भुर्दंड आम्ही का सहन करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अंडरपासचा मुद्दा नॅशनल हायवे अॅथोरटीच्या अखत्यारितील आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या पुढाकाराने सर्व्हिसरोडचे रूंदीकरण करता येणे शक्य आहे काय? याची चाचपणी केली जाईल. नागरिकांना त्रास होतो आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

- अशोक मुर्तडक, महापौर

प्रशासनाने हा एकतर्फी निर्णय घेतला असून, त्याचा मनस्ताप स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो आहे. अंडरपास बंद करणे एवढाच एक पर्याय नागरिकांना देणे चुकीचे आहे.

- दीपाली कुलकर्णी, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दंगलीचा वणवा ठाणपाड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हरसूलमध्ये मंगळवारी सुरू झालेल्या दंगलीचा वणवा गुरुवारी ठाणपाड्यापर्यंत पोहचला. ठाणपाडा येथे दंगलखोरांनी काही घरांना तसेच कार्यालयांना टार्गेट केले. दंगलीचा वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसमोर यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

तीन दिवसानंतर हरसूलमध्ये बाजारातील अनेक दुकानदारांनी व्यवसाय सुरू केले. प्रशासनाने साफसफाईचे काम सुरू केले असून दंगलीच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जीवन पूर्वपदावर येत असले तरी येथे एक प्रकाराची भीती कायम असल्याचे दिसून येते. हरसूलपासून सुमारे १० किलोमीटरवर असलेल्या ठाणपाडा येथे दंगलग्रस्तांनी उच्छाद मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा अडसर लवकरच होणार दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) अखेर विमानसेवेचा अडसर दूर करण्यासाठी सायंकाळी सातपर्यंत सेवा देण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे दुपार आणि संध्याका‍ळच्या विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

ओझर विमानतळावर दुपारी २.३० वाजेनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) तसेच इतर सेवा देण्यास यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. संरक्षणमंत्र्यांनी एचएएलच्या अध्यक्षांना निर्देश दिल्यानंतर अखेर ओझर एचएएलमध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यास एचएएलचे जनरल मॅनेजर के नारायण, डेप्युटी जनरल मॅनेजर पी. जी. शेटे, मॅनेजर व्ही. जी. देवधर, श्रीनिवास एअरलाइन्सचे हेमंत वाणी हे उपस्थित होते. त्यात सकारात्मक चर्चा झाली असून संध्याकाळी सातपर्यंत ओझर विमानतळाच्या ठिकाणी सेवा देण्यास एचएएलने सहमती दर्शविली आहे. मात्र, यासंदर्भातील लेखी आदेश अद्याप एचएएलने काढलेले नाहीत. हे आदेश येत्या एक-दोन दिवसात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीनिवास एअरलाईन्सकडे आणखी दोन विमाने येत असून येत्या २२ जुलैपासून नाशिक-पुणे तर, २५ जुलैपासून नाशिक-सूरत ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे वाणी यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधून २५ नवे सीए

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल आणि सीपीटी प्रवेश परीक्षांमध्ये नाशिकच्या एकूण २४३ विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे. यातील २५ विद्यार्थी यंदा सीए फायनल परीक्षेत पास झाले आहेत.

दोन्हीही परीक्षांसाठी १२०४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातील वेगवेगळ्या पेपर्समध्ये २४३ विद्यार्थ्यांना यश मिळविले. अखिल भारतीय स्तरावर या फायनल परीक्षेचा निकाल ८ टक्के लागला. तर नाशिकचा निकाल २५ टक्के लागला आहे. फायनल परीक्षेच्या पहिल्या ग्रुपमध्ये २९ विद्यार्थी, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये ८६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. नाशिक शाखेसही या विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला वाढला आहे. आनंद झंवर

चेअरमन, नाशिक सीए शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र कावनईत गुंजला शंखनाद

$
0
0

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सिंहस्थ ध्वजारोहणाचा रंगला सोहळा; ६ सप्टेंबरला पर्वणी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

"प्रभू श्रीरामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, भगवान कपिल मुनिकी जय, सब संतान की जय, श्रीनरेंद्रनाथ महाराज की जय, अशा जयघोषात गुरुवारी गुरू पुष्यामृतचा मुहूर्त साधत सिंहस्थाचे मूळक्षेत्र असलेल्या कावनई येथील कपिल धारातीर्थस्थानी सिंहस्थ सोहळ्याचा ध्वजारोहण सोहळा व जलपूजन साधू-संताच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणीत करणारा पर्वकाळाचा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी कपिल तीर्थस्थानी गुरू पुष्यामृताचे पवित्र स्नान केले. ६ सप्टेंबर रोजी कपिलधारातीर्थ क्षेत्री पर्वणीस्नान होणार असल्याची घोषणा आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज यांनी यावेळी केले.

गुरू आणि रवी या ग्रहाच्या सिंह राशीच्या प्रवेशाला सुरुवात झाल्यानंतर गुरु पुष्यामृतच्या शुभपर्वावर गुरुवारी श्री क्षेत्र कावनई येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज, श्रीसेवा संप्रदायाचे जगतगुरु रामानंदाचार्य, श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.

सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो भाविक, साधक सहभागी झाले होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, या भूमीत भक्तीचा सन्मान होतो. ज्ञान व वैराग्य हे भक्तीचे पुत्र असून, जो भक्तीचा साधक असेल तो ज्ञान व वैराग्याने परिपूर्ण असतो. मानवता हाच खरा धर्म असून, संप्रदाय कोणताही असो मानवतेची निष्ठापूर्वक जोपासना करा, असे आवाहन ग्यानदास महाराज यांनी यावेळी केले.

सोहळ्यास दिगंबर आखाड्याचे महंत क्रिश्नदासजी महाराज, महंत रामकिशोर दासजी महाराज, दिगंबर आखाड्याचे धर्मदासजी महाराज, निर्मोही आखाड्याचे महंत अयोध्यादासजी महाराज , चतु:संप्रदाय आखाड्याचे कृष्णचरण दासजी महाराज, आखाडा परिषदेचे प्रवक्ता श्रीमहंत भक्तीचरण दासजी महाराज, कावनई कपिलतीर्थ क्षेत्रचे रामनारायण फालहरी महाराज, महंत रामसुंदरजी महाराज, श्री वैष्णवदासजी महाराज आदी संत व साधूंच्या प्रमुख उपस्थितसह खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले आदी पदधिकारी सहभागी झाले.

सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास साधू-महंतांचे आगमन झाले. वाद्याच्या गजरात भगव्या ध्वजाची पताका डोलत व धर्माच्या घोषणा देत आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज व नरेन्द्रनाथ महाराज यांच्यासह शेकडो साधूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतकमानीपासून साधू-महंतांची मिरवणूक काढण्यात आली. ग्यानदास महाराज व नरेंद्र महाराज यांच्या हस्ते कपिलधारा तीर्थक्षेत्री विधीवत पूजन करून सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जयजयकार करून पुष्पवृष्टी केली. पाठोपाठ कपिलधारा तीर्थक्षेत्राचे विधीवत जलपूजन केले. जलपूजन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी तीर्थस्नान करण्यासाठी एकच गर्दी केली. भाविकाच्या गर्दीमुळे कावनई परिसरातील वातावरण फुलून गेले होते.



पालकमंत्री, आमदारांची अनुपस्थिती

पालकमंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक आमदार निर्मला गावित यांनी सोहळ्याकडे पाठ फिरवली. याबाबत कपिलधारा विश्वस्त समितीने नाराजी व्यक्त केली. नाशिकच्या ध्वजारोहणाला पालकमंत्री जातीने हजर होते, मग कावनई तीर्थक्षेत्राला दुय्यम वागणूक का, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.



क्षणचित्रे

सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण६ सप्टेंबर रोजी पर्वणी स्नानाचा मुहूर्त असल्याची घोषणासाधू-महंतांचे वाद्यांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजीने

शाही स्वागत

श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या साधक वर्गाकडून जयघोष व त्यांच्या नामाचा जयजयकार होत असल्याने सोहळ्याप्रसंगी श्री संप्रदायाची झालर असल्याचे जाणवत होते.

श्री संप्रदायाच्या साधकांनी विशिष्ट वेश परिधान करून या सोहळ्यात स्वयंसेवकाची सेवा दिली. महिलांनी भगव्या साड्यापरिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली.

सोहळ्याचे सूक्ष्मनियोजन कपिलधाराचे विश्वस्त महंत उडिया महाराज, कुलदीप चौधरी, दीपक मंगे, सोमनाथ सूर्यवंशी, भरत पटेल, ज्ञानेश्वर भागवत आदींनी केले.

कपिलमुनींच्या दरबारात सिंहस्थ ध्वजारोहणासाठी तालुक्यात पावसाची जोरदार सलामी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हालाही इतरांना आर्थिक बळ द्यायचंय!

$
0
0

तेजस आमलेचे 'मटा हेल्पलाइन'च्या विद्यार्थ्यांना आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती, मी रहात असलेले घर म्हणाल तर दहा बाय दहाची खोली. त्यातच स्वयंपाकघर, तेच बेड अन् तोच हॉल. दु:खात दिवस चालले असतानाच दहावीचे वर्ष आले. कसून अभ्यास केला, घरात लाईट नसल्याने घरासमोरच असलेल्या एका बांधकाम साईटवर जाऊन मी अभ्यास केला. दहावीत ८९.६४ टक्के गुण मिळवले...पण आता पुढे काय असा प्रश्न 'आ' वासून उभा राहिला. माझे तर मेकॅनिकल इंजिनीअर बनायचे स्वप्न होते. अशातच 'मटा' देवदूतासारखा धावून आला, माझी आर्थिक मदत केली. 'मटा' तुम्हालाही इतरांना मदत करण्यासाठी समर्थ बनवेन बघा!' तेजस आमले कहाणी सांगत होता.

तेजस आमले हा 'मटा हेल्पलाइन'चा पहिला विद्यार्थी. त्याच्यापासूनच हेल्पलाइन हा उपक्रम सुरू झाला. वडिलांना पगार दोन हजार रूपये...त्यातही पाचशे रूपये घराचं भाडं जाणार. घराला दहा ठिकाणी ठिगळं लावलेली...तरीही पाणी ठिबकतंच. पुस्तकासाठी शेजाऱ्यांनी मदत केलेली. घरात अठरा विश्वं दारिद्र्य पण आभाळाला गवसणी घालण्याची उमेद ठेवली तेजस आमलेनं. त्यात त्याच्या हुशारीला पारखलं 'मटा'ने. त्याला मदत करण्याचं ठरवलं आणि मग मदतीचा ओघ सुरू झाला. १ लाख ३० हजार रूपये त्याच्यासाठी जमा झाले.

सीडीओ मेरी शाळेत शिकणारा तेजस, वर्गशिक्षिका ज्योती कुलकर्णी, विभांडिक सरांच्या मार्गदर्शनाने तो येथपर्यंत पोहोचला. तेजस म्हणतो की, 'मटा'ने मला मदत केली नसती तर मी येथपर्यंत येऊच शकलो नसतो. कविता रंजवे, अक्षता पवार, सोनल लोखंडे, शुभम गांगुर्डे, मंदार रोकडे, हर्षदा भामरे, मंगेश चौधरी, सौरभ वाघ, अनुराज ढोबळे आज 'मटा'ने तुम्हा नऊजणांना निवडले. नक्कीच 'मटा' तुमचे सोने करणार, तुम्हाला हवी ती मदत केल्यानंतर तुम्ही मात्र यश मिळवायचे आहे. उद्या तुम्हीही कुणाला तरी मदत करण्याच्या पात्रतेचे व्हायचे आहे, याची जाणीव तुम्ही ठेवा.'

आर्थिक अडचणींवर जिद्दीने मात करून दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पैशांअभावी अडू नये, याकरिता 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे हेल्पलाइन उपक्रम राबविला जातो. गेल्या चार वर्षांत नाशिककरांनी या उपक्रमाला 'लाख' मोलाची मदत करीत मोठा प्रतिसाद दिला. निवडक विद्यार्थ्यांची यशोगाथा प्रसिद्ध करत आहोत. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या नावे 'क्रॉस्ड चेक' द्यावेत.

चेक स्वीकारण्यासाठी पत्ते विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावाने द्यावेत. चेक गोळा करण्यासाठी 'मटा' ने या सेंटर्सशिवाय कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

साईछत्र पान स्टॉल, हॉटेल शिल्पा डायनिंग हॉल शेजारी, वकिलवाडी कॉर्नर, एम.जी.रोड

माधवजीका बढिया चिवडा, पंचवटी कारंजा कॉर्नर, पंचवटी

भिंगे बंधू, १३६२, जुन्या सीबीएससमोर, शरणपूर रोड

गोविंद दंडे अॅण्ड सन्स, दत्तमंदिर चौक, नाशिकरोड

राजकमल पान स्टॉल, जुने बसस्थानक, देवळाली कॅम्प

निमा हाऊस, आयटीआय सिग्नलजवळ, सातपूर

अंजली प्लायवूड, नवरंग कॉम्प्लेक्स, द्वारका, नाशिक पुणे रोड

विधाते बंधू चिवडेवाले, चंद्रकांत विधाते,

त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक

सप्तश्रृंगी डेअरी, चार्वाक चौक, इंदिरानगर

भावे प्लॅस्टो, टर्ले चेंबर, शिवाजीनगर, जेलरोड

महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, काठीयावाड शो रूम समोर, डिसूझा कॉलनी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images