Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक-त्र्यंबकेश्वला चौपदरी सुरक्षा

$
0
0

दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनेनुसार तयारी सुरू

विनोद पाटील, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्रामसह शाहीमार्ग आणि रामकुंडावर अत‌िरेकी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी आता या परिसराला चौपदरी सुरक्षा देण्याची तयार केली आहे. दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत चार टप्प्यात ही सुरक्षा प्रणाली राबवली जाणार असून, त्यासाठी पंधरा हजार पोल‌िसांचे सुरक्षाकडेच तयार करण्यात आले आहे. गर्दीचे नियंत्रण आणि दक्षता यावर सुरक्षा यंत्रणाचा विशेष भर दिला जाणार आहे. पोल‌िस, सीआयडी, एटीएस, बाँम्बशोधक पथक, क्युआरटी, राज्य राखीव दलासह केंद्रीय सुरक्षा पथकांच्या जवानांचा यात समावेश आहे. नाशिकसोबतच त्र्यंबकेश्वरहीमध्येही हीच रचना ठेवण्यात येणार आहे.

सिंहस्थातील पर्वणी काळात एक कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठया प्रमाणावर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणांवर आहे. त्यासाठी आयबी, एनआयसह राज्यातील सुरक्षा एजन्सीजचे पथक नाशिकमध्ये सध्या कार्यरत असून, सुरक्षेचे इनपूट गोळा करीत आहेत. सिंहस्थ काळात साधुग्राम, रामकुंडाचा परिसर, शाही मार्ग, देवळाली कॅम्प, पोल‌िस ट्रेनिंग सेंटर यांना अतिरेकी कारवायांचा धोका आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणांचा दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजने अतंर्गत सुरक्षा पुरवण्याचे नियोजन आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात सुरक्षा कशी पुरवायची यासंदर्भातील तयारी झाली आहे. साधूग्राम, शाहीमार्ग, रामकुंडावर पहिल्या टप्प्यात पोल‌िसांचे कडे राहणार आहे. यात गर्दीच्या नियंत्रणाला प्राधान्य दिले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सशस्र रायफलधारी पोल‌िसांची पोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात क्युआरटी आणि कमांडो पथक तैनात राहणार आहेत. यासोबतच सीसीटीव्ही कॅमऱ्याचीही करडी नजर असणार आहे.

नाराजी चालेल; पण दुर्घटना नको

'रामकुंडासह साधुग्रामच्या सुरक्षेसाठी राजकीय नेत्यांची नाराजी परवडेल, पण दुर्घटना नको' अशी भूमिका पोल‌िसांनी घेतली आहे. राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारल्यावरून पोल‌िसांना दूषणे दिली जात असली तरी, या नेत्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येतो. यातून सुरक्षेत त्रुटी राहून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी कठोर उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. पर्वणी काळात

सर्वांना समान वागणूक दिली जाणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची आरडाओरड सहन करण्याची तयारी पोल‌िसांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जो हमने दास्तां...

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

'हार्मनी आर्ट गॅलरी'मार्फत वसंत पोतदार यांच्या स्मृतीनिमित्त मदन मोहन यांच्या 'जो हमने दास्तां अपनी सुनाई...' या अवीट गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (२६ जुलै) संध्याकाळी ६ वाजता गंगापूररोडवरील 'हार्मनी आर्ट गॅलरी'मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमामध्ये हार्मनी आर्ट गॅलरीचे नेहमीचे वादक आणि गायक गीते सादर करणार आहेत. खिलौना मेरे दिलसे..., लग जा गले..., तुम जो मिल गये हो..., नैना बरसे..., जरासी आहट..., नैनोंमें बदरा छाए..., रंग और नूरकी... अशी विविध ३० गाणी या कार्यक्रमामध्ये सादर केली जाणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. नाशिककर रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रा. बाळ नगरकर व राजा पाटेकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडणार वन्यप्राण्यांच्या चित्तथरारक कथा

$
0
0

अतुल धामणकर यांच्या मुलाखतीचे व स्लाईड शो चे आयोजन

नाशिक टाइम्स टीम

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाईल्ड लाईफ अभ्यासक अतुल धामणकर यांच्या मुलाखतीचे तसेच वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या स्लाईड शो चे आयोजन करण्यात आले आहे. वाईल्ड लाईफ क्षेत्रातील फोटोग्राफीमध्ये त्यांना आलेले अनेक चित्तथरारक अनुभव यामध्ये उलगडणार आहेत. शनिवारी (२५ जुलै) संध्याकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

या मुलाखतीमध्ये अतुल धामणकर त्यांना वन्यप्राण्यांबाबत आलेले अनुभव कथन करणार आहेत. वन्यप्राण्यांची फोटोग्राफी करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शनही या कार्यक्रमामधून मिळणार आहे. याचबरोबर त्यांच्या फोटोग्राफीचा स्लाईड शो पाहण्याची संधी यावेळी मिळणार असल्याने वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करु इच्छिणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. फोटोग्राफीची आवड असण्याबरोबरच तिचे तंत्र अवगत असणेही आवश्यक असते. त्यामुळेच नाशिककरांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रम मोफत तसेच सर्वांसाठी खुला असणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुमुख देशपांडे, भास भामरे व सारंग पाठक यांनी केले आहे.

अतुल धामणकर

गेल्या २५ वर्षांपासून जंगल, वन्यजीव व प्रामुख्याने वाघ या विषयांचा अतुल धामणकर अभ्यास करत आहेत. या विषयाचे असंख्य अनुभव व फोटोग्राफ्स त्यांनी अनुभव कथन, लेखमाला तसेच काही पुस्तकांमध्ये मांडले आहेत. त्यांच्या 'वाघ' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांचे हे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंथेटिक ट्रॅक पूर्णत्वाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

मुंबई आग्रा रोडवरील हिरावाडी भागातील मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या ४०० मीटर लांबीच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कविता राऊत, अंजना ठमके यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय धावपटू देणाऱ्या नाशिकच्या शिरपेचाच या ट्रॅकमुळे मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

अनेक वर्षांपासून असलेले नाशिककरांसह खेळाडूंचे स्वप्न आता पूर्णत्वाला आले आहे. केवळ देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण करणारे अनेक चमकदार खेळाडू घडू शकणार आहेत. यापूर्वी नाशिकमध्ये एकही सिंथेटिक ट्रॅक नव्हता. त्यामुळे धावपटूंना सराव करण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, ती खंत आता यानिमित्ताने भरून निघणार आहे. सिंथेटिक ट्रॅक नसतांनाही क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कविता राऊत, अंजना ठमके, दुर्गा देवरे, किसान तडवी यासारख्या अनेक खेळाडूंनी नाशिकचा झेंडा रोवला. आता तर ट्रॅक तयार झाल्याने त्यांच्यासारखे अनेक खेळाडू तयार होण्याची आशा निर्माण झाली आहे.

असा आहे सिंथेटिक ट्रॅक

सिंथेटिक ट्रॅकच्या आतील बाजूस ११० मीटर बाय ७७ मीटरचे फुटबॉलचे मैदान तयार करण्यात आले आहे. ट्रकच्या बाहेर ३००० प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ४०० मीटरचा ट्रॅक असून त्यावर ८ लेन आहेत. ऑस्ट्रेलियन सिंथेटिक ट्रॅकच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. मलेशियन तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. यासाठी मलेशियातील कामगार आणले होते. तसेच ट्रॅकच्या मार्किंगसाठी लंडनहून माहितीगार तंत्रज्ज्ञ मागविण्यात आले आहेत.

डिसेंबरनंतर लोकार्पण

सिंथेटिक ट्रॅकवर सध्या पावसाळ्यामुळे सध्या सामने नाहीत. पण पावसाळ्यानंतर सामने भरविण्यात येणार आहेत. डिसेंबरनंतर लोकार्पण सोहळा होईल असेही संबंधित जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस व अविनाश टिळे यांनी सांगितले. दरम्यान, स्टेडियम समोरचा सर्व्हिस रोडचे काम ठप्प असल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य प्रवेशदाराजवळच ड्रेनेज व विजेची धोकेदायक डीपी आहे. ती डीपी त्वरित हलविण्यात यावी, अशी मागणी खेळाडू व क्रीडाप्रेमींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सहकारी सोसायटीच्या (एनडीएसटी) पंचवार्षिक निवडणुकीत यंदा भ्रष्टाचाराचा मुद्दाच कळसाचा ठरणार असल्याची चिन्ह आहेत. उमेदवारी अर्ज माघारी झाल्यानंतर इच्छुक पॅनल्ससमोरील आव्हाने स्पष्ट झाली आहेत.

सोसायटीच्या १८ जागांसाठी मैदानात असलेले ७६ उमेदवार अन् त्यांच्या चार पॅनलकडून भ्रष्टाचाराच्या मुद्यांच्या खंडन मंडनावरच भर देण्यात येणार आहे. मतदानाअगोदरच्या कालावधीत प्रचाराच्या दृष्टीने मोर्चेबांधणीलाही आता वेग आला आहे. शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडे असणाऱ्या संख्याबळाहून पॅनल प्रमुखांच्या वतीने समीकरणे मांडली जात आहेत.

बदनामीचे भान आहे का?

सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक सदस्य संख्या असणाऱ्या एनडीएसटी सोसायटीची वसुलीही सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या सोसायटीच्या माध्यमातून कोट्यवधींचे भांडवल व कर्जवाटप करण्यात आले आहे. मात्र, सोसायटीच्या वाढत्या व्यापामुळे विविध गट तटांमध्येही वाढ होते आहे. या गट तटांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. मात्र, भ्रष्टाचार, नोकरभरती यासारख्या मुद्याहून बदनामीच्या भोवऱ्यात सापडली आहे. या संबंधी आजवर सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे दाखल झालेल्या दोन डझन तक्रारींमध्ये मात्र भ्रष्टाचाराचे दमदार पुरावे सादर करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. असे असताना सोसायटीच्या बदनामीच्या मुद्यांना मिळणाऱ्या चालनेमुळे सदस्यांमध्ये संभ्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॉकेटद्वारे नाशकात कृत्रिम पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आकाशात सिल्व्हर आयोडाईडचे रॉकेट सोडून कृत्रिम पावसाची भारतातील पहिली चाचणी नाशिकमध्ये केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर विदर्भ आणि मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे नाशिकमधील चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जूनमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण आहे. दुबार पेरणीसह पिण्याच्या पाण्याचेही संकट गडद झाले आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यासाठीच मुंबईतील इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज या संस्थेला राज्य सरकारने कृत्रिम पावसाची चाचणी करण्याचे सांगितले आहे. त्यानुसारच संस्थेचे कुलगुरु किरण नाईक आणि अमितराव यांनी गुरुवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांची भेट घेतली तसेच त्यांच्याशी चर्चा केली.

या चाचणीसाठी आवश्यक त्या परवानगी भारतीय हवामान विभाग आणि भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) यांच्याकडून घ्याव्यात, असे काकुस्ते यांनी स्पष्ट केले आहे. येत्या एक ते दोन दिवसात भारतीय हवाई दल, पोलिस अधिक्षक आणि इतर विभागांशी समन्वय करुन आवश्यक ती परवानगी दिली जाईल, असे काकुस्ते यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात कृत्रिम पावसाची चाचणी होण्याची शक्यता आहे. या चाचणीवरच विदर्भ आणि मराठवाड्यातील कृत्रिम पावसाचे भवितव्य अवलंबून आहे.

अशी असेल चाचणी

विमानाद्वारे रॉकेट बाष्पाच्या ढगांमध्ये सोडून आजवर भारतात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला आहे. मात्र, जमिनीवरुनच बाष्पाच्या ढगांमध्ये रॉकेट सोडण्याचा प्रयोग झालेला नाही. बाष्पाचे ढग, सध्याचे हवामान आणि पावसाचा वेध घेता नाशिकमध्ये चार चाचण्या करण्याचे संस्थेने निश्चित केले आहे. त्यासाठी ४ ते ५ किलोमीटरचा मोकळा परिसर सुचविण्याचे संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. आकाशात रॉकेट सोडून ही चाचणी केली जाणार आहे. या रॉकेटला इंधन म्हणून साखर वापरली जाणार आहे. तर, रॉकेटद्वारे बाष्पाच्या ढगांमध्ये २५० ग्रॅम सिल्व्हर आयोडाईड सोडले जाणार आहे. त्यामुळे बाष्पाचे रुपांतर पाण्यात होऊन पाऊस पडेल. हे रॉकेट चार किलोमीटर अंतरावर आकाशात जाणार आहे. विस्तृत अभ्यासाअंती ही चाचणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी चाचणी होणार आहे त्या परिसरातील ४०० चौरस किलोमीटर क्षेत्राला कृत्रिम पाऊस लाभू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात उर्दू शाळा सुरू करण्याचे संकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महानगर पालिकेच्या हद्दवाढीनंतर या भागातील बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम असल्याने येथील मुलांना उर्दू माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्याच्या बाबतीत शासन सकारात्मक आहे. लवकरच त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे. मालेगाव मध्यचे आमदार असिफ शेख यांनी याबाबत माहिती दिली.

आमदार शेख यांनी विधानसभेत मालेगाव शहराच्या हद्दवाढीनंतर समाविष्ट करण्यात आलेल्या भागात बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या आहे. मात्र, या भागात उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी अनेक शाळांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. येथील रमजानपुरा परिसरात नवीन उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत अद्याप त्याला मान्यता का मिळालेली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देतांना शालेय शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी उर्दू माध्यमिक शाळांना मान्यता देण्याच्या बाबतीत शासन सकारत्मक असून, ग्रामीण भागांमध्ये नवीन उर्दू माध्यमांच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यासंदर्भात माध्यमिक शाळांची गरज असणारी ठिकाणे निश्तिच करण्यात आली आहेत.

त्यानुसार अशा ठिकाणी शाळेस परवानगी मिळण्याकरिता इच्छुक असलेल्या पात्र शैक्षणिक संस्थाकडून ऑनलाइन पध्दतीत अर्ज मागविण्यात आले आहेत. शहरी भागांसाठीही उर्दू माध्यमांच्या माध्यमिक शाळांची गरज असणारी ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेसाठी उर्दू शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, उर्दू शिक्षक उत्तम मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गरज आहे तिथे उर्दू शाळा आणि उर्दू शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

ज्या ज्या भागातून उर्दू माध्यमिक शाळांसाठी प्रस्ताव आलेले आहेत त्यासोबत स्थानिक शिक्षण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहेत. सध्या राज्यातील उर्दू शाळांबाबतची माहिती पटलावर ठेवण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.मालेगाव शहरातील एकट्या रमजानपुरा भागात ७० हजाराहून अधिक लोकसंख्या असतांना केवळ ३ शाळा असल्याने मुस्लिम मुलांना शिक्षण मिळणे अवघड झाले आहे. या भागात किमान ८ शाळांची आवश्यकता आहे तेव्हा शासनाकडून याबाबत तत्काळ निर्णय व्हावा अशी मागणी आमदार असिफ शेख यांनी सभागृहात केली आहे. मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

राज्यातील मुस्लिम आरक्षण, धार्मिक मदरशातील मुलांना शाळा बाह्य ठरवणे, हरसूल दंगलीतील मुस्लिम कुटुंबियांना ५ लाख मदत निधी देणे याबाबत आमदार असिफ शेख यांच्यासह काँग्रेसचे मुस्लिम आमदार अमीन पटेल , अस्लम शेख, अब्दुल सत्तार, मुझफ्फर हुसेन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जुलै महिन्याच्या अखेरच्या पंधरवाड्यातही बागलाणमधील पाणी टंचाईची स्थिती बिकट बनली आहे. तालुक्यातील सुमारे अठरा गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा सुरूच असून, सटाणा शहरात तब्बल चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने टंचाईच्या झळा चांगल्याच बसू लागल्या आहेत.

बागलाण तालुक्यात जून महिन्याच्या सप्ताहात सुमारे ६५ मि.मी पाऊस झाल्यानंतर संपूर्ण महिनाभर पावसाने उघडीप दिली. यानंतर जुलै महिनाही कोरडाच गेल्यानंतर सोमवार दि. २० रोजी पुन्हा एकदा सुमारे ३० मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. पावसाने अद्यापही उघडीपच दिली आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमच आहे.

सद्यस्थिती बागलाण तालुक्यातील १६ गावे व २ वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, या ठिकाणी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे. या गावांमध्ये खिरमाणी, अजमीर सौंदाणे, भाक्षी, पिंपळदर, रामतीर, रातीर, चौगांव, नवेगांव, इजमाने, जोरण, डोंगरेज, आखतवाडे, तरसाळी, खमताणे, सारदे, चिराई, राहुड या गावांसह चिराईतवाडी, जामनवाडी या गावांना नामपूर, आराई, ठैगोंडा, सटाणा येथून विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आगामी काळात वरूण राजाने आपली अवकृपा कायम ठेवल्यास तालुक्यातील बहुतांश गांवाना पिण्याच्या पाण्याचाची टंचाई भासणार आहे. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठैगोंडा गिरणानदीपात्रातील पुनदचे आवर्तन आटल्याने शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्यानेशहरातील पाणी टंचाईची स्थिती भयावह झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण योजनांचे होणार मूल्यमापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असलेल्या योजनांचा लाभ सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या कितपत होतो आहे, हे तपासण्यासाठी या योजनांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय सरकार पातळीवर घेण्यात आला आहे. 'बाह्य यंत्रणेमार्फत सर्व योजनांचे मूल्यमापन करणे' ही योजना राबवून त्याअंतर्गत या विभागातील चालू योजनांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

शाळांमधील सर्व घटकांना केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची पूर्तता किती प्रमाणात केली जाते, याची शहानिशा करण्याच्या उद्देश योजनांच्या मूल्यमापनामागे आहे. चालू शैक्षणिक वर्षा (२०१५-१६)पासून शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असलेल्या शाळासंबंधित योजनांचे मूल्यमापन केले जाणार आहे. सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, पंचवार्षिक योजनांतर्गत व राज्य योजनांतर्गत आदी योजना प्रकारांचे यांत मूल्यमापन केले जाणार आहे. या योजनेत समाविष्ट असणाऱ्या खर्चाच्या बाबी योजनेच्या मूळ हेतूशी सुसंगत आहे की नाही, योजनांचा लाभ समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनुसूचित जाती / जमाती, मागासवर्ग, महिला व बालके, अपंग समाजातील इत्यादी घटकांपर्यत किती प्रमाणात पोहोचतात, एखाद्या योजनेचे लाभ समाजातील विशिष्ट घटकाला, वर्गाला, व्यक्तीच्या गटाला होणे अपेक्षित असेल तर त्यांना कितपत लाभ झाला आहे, संबंधित योजनांच्या अंमलबजावणीमुळे संबंधित लाभार्थ्यांच्या व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जीवनावर होणारा परिणाम, योजना अंमलबजावणीमध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडून होणारी कार्यवाही त्यांची कार्यक्षमता, तत्परता इत्यादींचे मूल्यमापन या योजनेंतर्गत केले जाणार आहे. या योजनांमुळे शैक्षणिक दर्जात किती प्रमाणात वाढ झाली, याचे मूल्यमापनही यातून केले जाणार आहे. मंत्रालयीन विभाग, इतर क्षेत्रिय कार्यालये तसेच विविध सामाजिक उपक्रमांशी संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्या नोंदणीकृत संस्थांची निवड मूल्यमापनासाठी केली जाणार आहे.

संस्थांसाठी निकष

ज्या संस्थेची कमीतकमी दहा वर्षांपूर्वीची असेल व अतिउत्तम असेल अशा संस्थांची निवड यासाठी केली जाणार आहे. याशिवाय या संस्थांच्या कामाचा अनुभव शासकीय व निमशासकीय यंत्रणेशी संबंधित कमीतकमी ५ वर्षांचा असणेही गरजेचे आहे. या संस्थांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ व साधन सामुग्री, मूल्यमापन करण्याकरिता उपलब्ध असावी. या संस्थांकडे शहरी व निमशहरी तसेच ग्रामीण भागामध्ये काम करण्याची संस्थेची क्षमता असणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमकेसीएल देणार मार्केटिंगचा अनुभव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अन् समाजाभिमुख कार्यावर भर देणाऱ्या एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन) ने आता एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठीही पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांना मार्केटिंगचा अनुभव मिळावा यासाठी कवाडे खुली केल्याने आता एमबीए फ्रेशर्सनाही आयटीतल्या शासकीय ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र ही संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला मुंबईत राहण्याची अट ठेवण्यात आली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात इंटर्नच्या या संधी मुंबई शहर सामोरे ठेवूनच तयार करण्यात आल्या आहेत.

एमकेसीएलची राज्यभरात सुमारे सहा हजार केंद्र कार्यरत आहेत. गेल्या दीड दशकामध्ये सुमारे ९५ लाखांवर विद्यार्थी अन् नागरिकांनी या संस्थेच्या माध्यमातून एमएस सीआयटीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. हाही जागतिक उच्चांक ठरला होता.

एमकेसीएलच्या माध्यमातून राज्यभरात ई लर्निंगचे अभ्यासक्रम आणि ई सेवांचा पुरवठा करण्यात येतो. या सेवांच्या मार्केटिंगसाठी आता एमबीएच्या विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 'मार्केटिंग इंटर्नस' या पदावर १४ महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी वयाची अन् उत्तीर्णतेचीही अट देण्यात आली आहे. यानुसार २७ वर्षांच्या आतील एमबीए उत्तीर्णांनाच ही सधी मिळणार आहे. मराठीच्या सोबतीलाच इंग्रजीमध्येही दमदार सादरीकरणावर भर देण्याची अपेक्षाही एमकेसीएलकडून करण्यात आली आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांच्या सोबतीलाच कॉर्पोरेट ऑफिसेस, एमएस सी आयटी सेंटर्स आदी ठिकाणी या एमबीए फ्रेशर्सना सादरीकरणावर भर द्यावा लागणार आहे. या चौदा महिन्यांच्या कालावधीत कामावर ठसा उमटविणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एमकेसीएलकडील रिक्त असलेल्या मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी २६ जुलैपर्यंत अगोदर www.mkcl.org/careers या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन एमकेसीएलतर्फे करण्यात आले आहे.

एमकेसीएलचे धाडसी पाऊल

गत काही वर्षांपूर्वी बाजारपेठेत मॅनेजमेंट शाखेची क्रेझ होती. या दरम्यान विविध कॉर्पोरेट ऑफिसेसमधूनही एमबीए पदवीधारकांना विशेष मागणी होती. या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्यानंतर आणि बाजारपेठेतील मंदीच्या परिस्थितीनंतर मात्र एमबीएच्या विद्यार्थ्यांना कोंडी फोडण्यासाठी नव्याने संघर्ष करावा लागतो आहे. एमबीएच्या रिक्त सीट्स भरण्यासाठी संस्थांनाही विद्यार्थ्यांचा पाठपुरावा करावा लागत असल्याचे चित्र नाशिकमध्ये आहे. बाजारपेठेतल्या मंदीचे निमित्त करून बड्या कॉर्पोरेट संस्था एमबीए फ्रेशर्सना नाकारत असल्या तरीही एमकेसीएलने याउलट राबविलेल्या धोरणाचे विद्यार्थ्यांमधून स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँटोन्मेंटही ‘पीएमआरडीए’मध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंटच्या परिसराचाही पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) समावेश करावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या परिसराच्या सर्वंकष विकासासाठी हा समावेश आवश्यक आहे, असे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी गुरुवारी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापामध्ये ते बोलत होते. पीएमआरडीएच्या हद्दीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील साडेतीन हजार चौरस किलोमीटरच्या परिसराचा समावेश आहे. त्यामध्ये साडेसहाशे किलोमीटर नागरी परिसर असून पावणेतीन हजार किलोमीटर ग्रामीण भाग आहे. या संपूर्ण परिसराच्या विकासाचे एकत्रित नियोजन करण्याच्या हेतून तिन्ही कँटोन्मेंटचा पीएमआरडीएमध्ये समावेश व्हावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पीएमआरडीच्या हद्दवाढीचाही प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे, त्याला येत्या दोन महिन्यांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पीएमआरडीचा जमीन विकास आराखडा (ईएलयू) तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तसेच, प्रामुख्याने या परिसराच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा परिसर आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असून तेथे रोजगार उपलब्ध होणे, राहणीमान सुधारणे आणि शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करणे, हा उद्देश असल्याचे झगडे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कायम

पीएमआरडीएच्या हद्दीत असलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पीएमआरडीए यांच्यात अधिकारांवरून कोणतेही वाद नाहीत. कायद्याने या सर्व संस्था आणि पीएमआरडीए यांची अधिकारकक्षा अत्यंत सुस्पष्टपणे आखलेली आहे, असे झगडे म्हणाले. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, महापालिका, पीएमआरडीए अशा सर्व संस्थांच्या विकास योजनांचा समन्वय करण्याची जबाबदारी महानगर नियोजन समितीकडे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील अॅमिनिटी स्पेसच्या वापरासह पीएमआरडीएला आवश्यक निधीसाठी वेगवेगळ्या मॉडेल्सचा अभ्यास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस योगिराज प्रभुणे या वेळी उपस्थित होते.

पीएमआरडीच्या हद्दवाढीचाही प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे, त्याला येत्या दोन महिन्यांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

- महेश झगडे,

मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या डीपींबाबत मागविला अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकमध्ये डीपी उघड्या असल्याचे वृत्त `मटा`मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या महावितरणने तातडीने कार्यवाही सुरt केली आहे. नाशिक परिमंडळातील नाशिक आणि नगर जिल्ह्यातील उघड्या डिपींचा अहवाल अभियंत्यांकडून मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डीपीवरून (ट्रान्सफार्मर) डीबीला (डिस्ट्रीब्युशन बाक्स) विजेचा सप्लाय होतो. डीबीतून ग्राहकांना वीजपुरवठा होतो. दोन्हीकडे हाय व्होल्टेज असतो. जमिनीवर असलेली डीबीची पेटी अनेकदा उघडीच असते. अनेक ठिकाणी तिची झाकणे चोरीला गेली आहेत. दुर्घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने नागरिकांनीच काही ठिकाणी डीबीला तात्पुरती झाकणे बसविली आहेत. नाशिक शहर, ग्रामीण, नगर जिल्हा येथील अभियंत्यांना गुरुवारी पत्रे रवाना करण्यात आली. डीबी आणि डीपी यांची अवस्था काय आहे, काय कार्यवाही केली, डीपींचा तुटवडा आहे का, आदी अहवाल महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी मागविला आहे.

तक्रारीसाठी टोल फ्री नंबर

आपल्या परिसरातील डीपी अथवा डीबी धोकादायक झाली असेल, डीबीला दरवाजे नसतील तर नागरिक १८००२००७३४३५ या किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधू शकतात. तक्रारदाराने प्रथम आपला वीज ग्राहक क्रमांक सांगावा. महावितरणच्या जवळच्या कार्यालयातही तक्रार नोंदवता येईल. ती प्राप्त झाल्यानंतर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे मुख्य कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिगंबर’चे खालसे जागेपासून वंचित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिगंबर आखाड्याशी निगडीत ३७ खालशांना अद्याप जागा मिळाली नसल्याची माहिती आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराजांनी दिली. गुरुपौर्णिमेनंतर खालशांचे महंत सर्व लवाजमा साधुग्राममध्ये आल्यानंतर त्यांनी बसवायचे कोठे असा प्रश्न महाराजांनी उपस्थित करीत प्रशासनावर तोंडसुख घेतले.

साधुग्रामसाठी जागा वाढविली असली तरी खालशांची संख्याही वाढली आहे. २००३ च्या कुंभमेळ्यात ३५० खालसे होते. आता ही संख्या ७५० च्या घरात पोहचली आहे. खालशांमध्येही भाविकांची मोठी रेलचेल असते. दुर्दैवाने यंदा सर्वांना छोट्या जागा मिळत आहे. त्यातच दिगंबर आखाड्याशी संबंधित ३७ खालशांना अद्याप जागाच मिळाली नाही. गुरुपौर्णिमेनंतर सर्व महंत साहित्यानिशी साधुग्राममध्ये दाखल होतील. त्यांना जागा नसल्यास अडचण निर्माण होईल. प्रशासनाने ३० जुलैपर्यंत जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर काय ते पाहू असे वैष्णवदास महाराजांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाची कामे आटोपणार तरी कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ कामांवर कधी शेवटचा हात फिरवणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून अद्यापही कामांचा पसारा तसाच पडलेला आहे. ध्वजारोहण झाले साधू आणि भाविक शहरात येऊ लागले आहेत; मात्र विकासकामांच्या नावाने शहराची अवस्था बिकट झाली ती अद्याप सुधारलेली नाही.

नव्याने झालेले रस्ते भूमिगत गटारींच्या दुरुस्तीसाठी पुन्हा खोदण्यात आले आहेत. सुमारे एक कोटींचा रस्ता बांधणाऱ्या ठेकेदारांनी रस्त्याच्या शेवटचे टोक आपल्या इस्टिमेटमध्ये नाही म्हणून अपुरे सोडले आहे. अशी स्थिती परिसरातील अनेक रस्त्यांची झाली आहे. अनेक ठकाणी प्रमुख चौकांमध्ये खड्डे खोदून ठेवले आहेत.

मध्यंतरी स्थानिक प्रशासनाने अतिक्रमण काढले त्यामुळे दर्शनी भागात तुटलेल्या भिंती, ओकेबोक्या इमारतीमुळे अवकळा आली आहे. शहराचे रूप भासत झाले आहे. देशविदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होणे दूर, किमान इतस्तता पडलेले बांधकाम साहित्य उचलण्याची गरज दिसून येत आहे.

पुरातत्व विभाग उदासीन

कुशावर्तावर ध्वजारोहण झाले. सिंह राशीत गुरूचा प्रवेश झाला आणि भाविकांनी पर्वकाल साधला आहे. दररोज भाविकांची गर्दी वाढत आहे. मात्र, कुशावर्ताबाबत एकूणच उदसिनता दिसून येते. पुरातत्व खात्यास भरभक्कम निधी मिळालेला असतांना मध्यंतरी किरकोळ डागडुजीची कामे करण्यात आली. उत्सव सुरू झाल्यानंतर आता पुरातत्व खाते जागे झाल्यासारखे काम हाती घेत आहेत. तहान लागल्यावर झरा खोदण्याचा हा प्रकार दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ये सब भूमी गोपाल की...

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

'यहाँपर कौन बरसों टिकने आया है, आज यहाँ कुंभ का मेला है यहाँपर आये, कल हरिद्वारमें होगा उधर जायेंगे, परसों कहीं और जायेंगे लेकीन एक बात है भाई, सिर्फ कुंभ होने तकही हम यहाँपर रहेंगे और फिर वृंदावन चले जाऐंगे' ही प्रतिक्रिया आहे, पहाडीबाबा नगर खालसा आखाड्यातील सर्वात तरुण संन्याशी भारद्वाज स्वामीची. तो केवळ २४ वर्षे वयाचा. प्रसिध्दीचा मोह नाही. इतका की फोटो सुध्दा काढू नये अशी त्याची इच्छा. 'उससे गोपाल को दुख पहुंचेगा' असे त्याचे म्हणणे.

वृंदावनातील मलूकपीठ येथील श्रीमद जगदगुरू मलूकपीठाधिश्वर संत राजेंद्र देवाचार्यजी महाराज यांच्या आश्रमातील हा संन्याशी. कमी वयात घरातून बाहेर पडला. कारण काहीच नाही. फक्त श्रीकृष्णाची ओढ. नाशिकला येऊन कसे वाटले? हा प्रश्न केल्यावर मात्र त्याचा चेहरा निर्विकारच होता. 'सब भूमी गोपाल की है, नाशिक क्या उसमें से अलग थोडी है। नाशिक अच्छा लगा, उज्जैन अच्छा नहीं लगा ऐसा नहीं कह सकते। हम तो वैष्णव है हमे कहींपर भी गोपालही दिखायी देते है। आज नाशिकमें दिखे तो ठहर गये।' प्रशासनाच्या व्यवस्थेविषयी काय भावना आहेत या प्रश्नावर भारद्वाज याने मोठे कोड्यात उत्तर दिले. 'उससे गोपाल को क्या फर्क पडता है? गोपाल सभी जगह है, एकसमान है। हमारी रखवाली तो गोपाल करते हैै। जिस काम से आयें है वह पुरा होने के बाद निकल जायेंगे अपने गाव।' अंगावर वृंदावनची कफनी, हातात छोटीशी बॅग गळ्यातल्या माळा सारख्या जमीनीवर काढून ठेवायची सवय. अशा अवस्थेतील हा तरुण साधू त्या सर्व साधुंच्या जथ्थ्यात वेगळाच भासला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभातील साधुंकडून नीतीमत्तेचे बोल

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

'यह हमारे जीवन का अठरावा कुंभ है! इस कुंभ के निमित्त श्रीरामजी कि नाशिक नगरीमे पाचवी बार आना हुआ! शहर काफी तो बदला है! लेकीन इन्सान की प्रवृत्तीयां पहलेसेभी खतरनाक बन चुकी है! बेटा, भलेही भौतिक सत्ता की साथ कभी छुटे, लेकीन जीवन मे नीति का हाथ कभी छोडना मत!' भल्यांच्याही मनाची मशागत करणारे हे चिंतनपर बोल आहेत ‌दिगंबर आखाड्याच्या राजाराम महाराज यांचे.

पर्वणीचा मुहूर्त जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतशी साधू संतांच्या जथ्थ्याची पावलेही नाशिक शहराकडे वळू लागली आहेत. एकमेकांच्या सुख दु:खाचे साक्षीदार बनलेले साधू महंतांचे जथ्थे तपोवनाच्या दिशेने वळत आहेत. मात्र, या जथ्थ्यांपासून अलिप्त असलेले श्वेतवस्त्रातले राजाराम महाराज नाम पुटपुटत दुखावलेल्या पावलांनी तपोवनाकडे झपझप निघाले होते.

त्यांची ओळख जाणून घेण्यासाठी केलेल्या सवालावर 'बेटा, हमारा नाम जानकर क्या करोगे? लेकीन पुछा है तो बताते है!' अशी प्रतिक्रिया होती. ते पुढे म्हणाले, 'हम राम लला के जन्मस्थान अयोध्यासे है! नाशिक तो श्रीराम जी कि कर्मभूमी है! राक्षस मारे गये! लेकीन उनकी प्रवृत्तीयाँ अभीभी मनुष्य मे हावी हो रही है! रामजी की प्रेरणासे ऊन प्रवृत्तीयो के परिवर्तन उद्देशसे यह संन्यासी वस्त्र परिधान किये! बस इतनाही इतिहास है। बाकी रामजी खदेड देते वहाँ चले जाते है ! उनकी इच्छा के अलावा इस जगत मे कुछभी नही!' या संवादानंतर मौन झालेली राजाराम महाराजांची चर्या गत कुंभाच्या आठवणीत बुडाली. भारतातील चारही ठिकाणच्या एकूण अठरा कुंभांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. १८ कुंभांचा अंक सांगताना श्रोत्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हाचे भाव ओळखून राजाराम महाराजांनी मस्तकावरील जटासंभाराची गाठ सोडत सहा फुटी जटांचे वयच सुमारे चार दशकांपेक्षाही अधिक सांगितले. बेटा, यह जटाही मेरे जीवनप्रवास की एक दृश्य साक्ष है! तुम विश्वास करो... न करो! हमे लेना देना नही ! लेकीन जो बात बतायी उसे कभी ना भुलना, दुनिया जरुर बदलेगी, लेकीन नीति का हाथ थामे तुम ना बदलना। यही संदेस लेकर हम जन्मभूसी उसकी कर्मभूमी दंडकारण्य मे आये है! या बोलांसह राजाराम महाराज पुन्हा मौनात बुडाले. तपानंतर आराध्य दैवताच्या नगरीतील बदलते समाजभान टिपणारे साधूंचे तरल अंतर्मनही विरळ नाशिककरांच्या अनुभूतीला या कुंभाच्या निमित्ताने येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्हारची यशस्वी सायकलवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक तरी वारी अनुभवावी असं म्हणतात. अवघ्या नऊ वर्षांच्या मल्हारने ही वारी सायकलने अनुभवली. रोज ३० ते ३५ किलोमीमीटर अंतर कापत तब्बल ३४४ किलोमीटरचे अंतर त्याने तीन दिवसांत पार केले. पर्यावरणाचा संदेश देत त्याने निर्धाराने ही सायकलवारी पूर्ण केली आहे. पाथर्डी येथील मल्हार तुकाराम नवले याची ही पर्यावरणाचा संदेश देणारी सायकलवारी.

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे १७ ते १९ जुलै या कालावधीत पंढरपूर सायकलवारी आयोजित करण्यात आली होती. यंदा या वारीत दोनशे नागरिकांनी सहभाग नोदवला होता. यात मल्हारसह अनेक लहान मुलेही सहभागी झाली होती. मल्हारचा रोजचा २५ ते ३० किलोमीटरचा सराव असतोच. मात्र, पंढरपपूर सायकलवारीतला हा प्रवास तब्बल ३४४ किलोमीटरचा होता. त्यामुळे त्याला किमान १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापावे लागणार होते. सोबत वडील होतेच. मल्हारचा पहिल्या दिवशीचा उत्साह पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सायकल चालवेल की नाही अशी काळजी त्याचे वडील तुकाराम नवले यांना वाटत होती. मात्र, मल्हारने दुसऱ्या दिवशीही पंढरपूरच्या वारी सुरू केली. पहिल्या दिवशी जवळपास दीडशे किलोमीटर, तर दुसऱ्या दिवशी तेवढेच अंतर त्याने कापले. कधी ३० किलोमीटरचा टप्पा, तर कधी ५० किलोमीटरचा टप्पा निश्चित करीत मल्हारची सायकलवारी सुरू होती. तिसऱ्या दिवशी पंढरपूरचा महत्त्वाचा टप्पा त्याने सर केला आणि उत्स्फूर्तपणे विठ्ठलाचा जयघोष सुरू झाला.

अनेक मोहिमा फत्ते

मल्हारने पंढरपूर वारीपूर्वी सायकलवरून अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्याचा रोजचा सराव ३० ते ३५ किलोमीटर आहे. शिवाय त्याने सायकलिस्टना अतिशय अतिशय आव्हानात्मक वाटणारा मालेगाव- राहूड घाटही पार केला आहे. या घाटात प्रचंड वारे वाहत होते. परतीच्या प्रवासात वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मल्हारने हा घाट सर केला. अंबोली घाटातली ८५ किलोमीटरची मोहीमही फत्ते केली आहे. नाशिक ते चांदवड हा १२० किलोमीटरचा प्रवासही त्याने लीलया पार केला आहे.

'सोलो राम'चे ध्येय

मल्हारने बालवयातच ३४४ किलोमीटरची पंढरपूरची वारी केल्याने त्याचा उत्साह वाढला आहे. भविष्यात त्याला अमेरिकेतली सोला राम (रेस अॅक्रॉस अमेरिका) या स्पर्धेत सहभागी होण्याचा मानस आहे. त्याला नाशिक सायकलिस्टचे हरीश बैजल, डॉ. राजेश पाटील, नाना फड, किशोर काळे, महेंद्र महाजन, हितेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

मला वाटलं होतं तो पंढरपूरची सायकलवारी पूर्ण करणार नाही. दुसऱ्या दिवशी तो थोडा थकलेला वाटला. मात्र, त्याने गाडीत बसण्यास स्पष्टपणे नकार दिला. मी ही वारी सायकलवरूनच पूर्ण करणार असा निश्चयच त्याने केला होता. त्याने ही वारी पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद आहे.- तुकाराम नवले, वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथीचे आजार रोखण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील डेंग्यू, मलेरियासह विविध साथींच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेप्रमाणेच महापालिकेतही साथ रोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापौर अशोक मुर्तडक यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक घरोघरी जावून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. साथरोगाच्या नियंत्रणासाठी मायक्रोप्लॅनिंग केले जाणार आहे.

महापालिकेत सध्या आरोग्याशी संबंधित विषय वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभाग या दोन स्वतंत्र विभागामार्फत हाताळले जातात. वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे संशयित रुग्णांची संख्या जास्त दाखवली जाते. त्यामुळे साथीच्या रोगांची तीव्रता जास्त दिसते. ग्रामीण भागात मात्र साथ रोग नियंत्रण कक्षाकडून साथीच्या आजारांचे नियंत्रण करून तपासणीही केली जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या धरतीवर नाशिक महापालिकेत साथ रोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या कक्षामार्फतच शहरातील साथींच्या रोगांचे नियंत्रण करून त्यांचे सॅम्पल्स गोळा केले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत घरोघरी जावून रोगांचे नियंत्रण आणि सर्व्हेक्षण केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आरोग्य विभागाने तत्काळ तयार करून तो आयुक्तांना सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. अशा कक्षाच्या माध्यमातून साथीचे आजार खरोखर आटोक्यात येतील काय, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आकडेवारीवर संशय

शहरातील साथीच्या रोगांची माहिती सद्यस्थितीत वैद्यकीय विभागामार्फत गोळा केली जाते. वैद्यकीय विभागाचे पथक घरोघरी जावून आण खासगी रुग्णालयांकडून ही माहीती गोळा करते. मात्र, या माहितीवर आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. खाजगी रुग्णालयातील आकडेवारी आणि प्रत्यक्ष आकडेवारीत मोठी तफावत असून, पथकाचे कर्मचारी कागदावरच साथीच्या रोगांचे नियंत्रण करतात, असे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाचा कारभार संशयाच्या भोव-यात सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरोदर महिलांसाठी मविप्रचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक दुर्बल घटकांमधील गरोदर महिलांच्या वैद्यकीय तपासण्या आणि पुरेशा औषधोपचारांभावी त्यांची होणारी हेळसांड रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मविप्रच्या मेडिकल कॉलेजने पुढाकार घेतला आहे. गरजू गरोदर महिलांच्या औषधोपचार अन् चाचण्यांसह त्यांच्या दोन प्रसूती मोफत करण्यात येणार आहेत.

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमधील स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वतीने यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्न करणार आहे. गरोदर महिलांच्या पहिल्या दोन प्रसूती, सर्व चाचण्या आणि औषधोपचारांची जबाबदारीही संस्थेने घेतली आहे. यात नॉर्मल किंवा सिझेरिअन पध्दतीने डिलिवरी करण्यात येईल. ऐनवेळी वैद्यकीय सेवेची गरज पडल्यास सामान्य अतिसामान्य कुटुंबातील गरोदर महिलांना दवाखान्यात पोहचण्यासाठी वाहनाचा प्रश्न निर्माण होतो. या महिलांचा विचार करीत मेडिकल कॉलेजने त्यांना अॅब्युलन्सही उपलब्ध करून दिली आहे. प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर गरोदर महिला किंवा नातेवाईकांनी मविप्र रुग्णालयाशी ९८२२४०२५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. या माध्यमातून रुग्णालयापर्यंत विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येईल. प्रसूतीनंतर संबंधित महिलेस घरापर्यंत परतीची वाहन व्यवस्थाही मोफत देण्यात येणार आहे.

घरी बाळंतपणाचे प्रमाण ३० टक्के

अद्यापही आर्थिक परिस्थिती व अज्ञानाच्या परिणामी ग्रामीण भागात घरीच बाळंतपण करण्याचे प्रमाणही तब्बल ३० टक्के आहे. परिणामी माता-बालकांचा मृत्यू, बालकांमध्ये जन्मजात निर्माण होणारे व्यंग अशा उदाहरणांचेही प्रमाण बरेच आहे. सुरक्षित मातृत्व आणि नवजात सुदृढ बालकांसाठी शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी- दुर्गम भागातील मातांचे बाळंतपण रुग्णालयात व्हावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून मोफत रुग्णवाहिकासेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे माता व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. याच धर्तीवर आता मविप्रच्या खाजगी मेडिकल कॉलेजनेही या विषयात पुढाकार घेतल्याने याचा लाभ गरजू गरोदर महिलांना होणार आहे.

दुहेरी लाभ मिळणार

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून जिल्ह्यात ही सेवा १२ ऑक्टोबर २०११ पासून सुरू आहे. या सेवेच्या परिणामी गत काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील गरोदर मातांचे व बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासही मदत झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात २४ तास सेवा देणाऱ्या 'संदर्भसेवा रुग्णवाहिका कॉल सेंटर'चीही स्थापना करण्यात आली आहे. यासाठी (०२५३) २२३२२२१ या क्रमांकावर रुग्णाच्या नातेवाइकांनी संपर्क साधावा. या योजनेत गरोदरपणा व प्रसूती पश्चात ४२ दिवसांपर्यंत सर्व सेवा, शस्त्रक्रिया, औषधे, उपचार व आहार मोफत दिला जातो. जिल्ह्यातील १०३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत १०१ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्या

$
0
0

सटाणा : नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. सटाणा तालुक्यातील बोढरी येथील हिराजी खैरनार यांनी विहीरीत उडी मारून तर नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळुंगीचे भाऊराव पालवे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

बोढरी येथील हिराजी रामजी खैरनार (२८) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. तहसीलदार अश्विनकुमार पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरनार यांच्या नावे बोढरी विकास सहकारी सोसायटीचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. कुटुंबाची जबाबदारी पेलताना खैरनार यांनी तीन बहिणींचे लग्न करुन दिले. तसेच सहा एकर शेतीतून फारसे उत्पन्न येत नसल्याने ते निराशाग्रस्त होते. अखेर गुरुवारी त्यांनी शेतातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या मागे आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, गंगाम्हाळुंगी येथील भाऊराव पालवे (५०) या शेतकऱ्याने खतासाठी पैसे कमी पडत असल्याच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images