Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिस महासंचालकांकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक पोलिसांकडून सुरू असलेल्या तयारीची पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली. रामकुंड येथे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, याची माहिती दयाळ यांनी देण्यात आली.

सिंहस्थानिमित्त पोलिसांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दयाळ नाशिकमध्ये आले होते. पोलिस आयुक्तालयात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सीसीटीव्हींच्या नियंत्रण कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे आणि अन्य अधिकाऱ्यांसह त्यांनी रामकुंड परिसराला भेट दिली. तेथे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही, वस्त्रांतरगृहाची यावेळी त्यांनी पाहणी केली.

रामकुंड, गांधी तलावावरील गर्दीचे नियंत्रण शाही मिरवणूकीच्या नव्या आणि जुन्या मार्गांची त्यांना माहिती देण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले बॅरीके‌डिंग, परिसरातील नो व्हेईकल झोन आदींबाबतही दयाळ यांनी माहिती घेतली. जगन्नाथनपुरी येथे घडलेल्या दुर्देवी घटेनंनतर आमच्या अधिकारी एन. अंबिका यांनी तेथील पाहणी केली. त्यांनी काही सूचना केल्या असून, त्यानुसार काही बदल करण्यात येणार असल्याचे दयाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ आयोजनाला आगम खेडाची मात्रा

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

साधुग्राममधील जागांचा घोळ अजूनही सुरूच आहे. जागांचे, सुविधांचे वाद कुंभमेळ्याच्या आयोजनाला जुळलेले असतात. यापार्श्वभूमीवर वैदिक शास्त्रावर आधारित 'आगम खेडा प्रशासना'ची स्थापना झाल्यास प्रशासनाच्या टोलवाटोलवीला पायबंद बसण्याची शक्यता आहे.

वैदीक धर्मात प्राचीन काळात 'आगम खेडा प्रशासन' ही संकल्पना होती. यात सर्व व्यवहारांना धर्माकडून बंधने घालण्यात आलेली होती. समाजातील नागरिकांच्या कर्तव्यानुसाराच समाजाची रचना असल्याने अनाचार आणि व्याभिचाराला जागा नव्हती. भारतात सध्या लोकशाही नांदते. लोकशाहीची रचना तकलादू असल्याने अनाचाराने कळस गाठला आहे. यापार्श्वभूमीवर आगम खेडा प्रशासन ही संकल्पना महत्त्वाची ठरू शकते.

किमान हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन आणि नाशिक या कुंभमेळा आयोज‌ति होणाऱ्या चार शहरांमध्ये 'आगम खेडा प्रशासन' ही संकल्पाना व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या दबंगगुरू टायगर स्वामी यांनी स्पष्ट केले. जर्मनीतून वैदिक शास्त्रावर पीएच.डी केलेल्या आणि सध्या साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या टायगर स्वामी यांना साधुग्राम ही संकल्पनाच मान्य नाही. प्राचिन काळापासून होत गेलेल्या परकीय आक्रमणांमुळे वैदीक धर्माची ओळखच बदलली. ती प्राचीन नव्याने करून देण्याची सुरूवात आगम खेडा प्रशासनापासून होणार असल्याचा दावा, टायगर स्वामींनी केला. प्राचीन वेदांमध्ये आगम खेडा प्रशासनाचा उल्लेख असून आगम म्हणजे प्रथम तर खेडा म्हणजे शेत असा त्याचा अर्थ होतो, असे टायगर स्वामींनी स्पष्ट केले.

आजही साधु महंत साधुग्रामचा 'खेत' म्हणूनच उल्लेख करतात. धन, नदी, शस्त्र यासारख्या दैंनदिन बाबींचा वापर कसा करावा, याचेही सुत्र या प्रशासनात बांधले जाते. वैदीक धर्म पध्दतीत शिक्षणाच्या अनेक शाखा असून वैदीक गणित पध्दती त्यातील एक छोटासा भाग आहे. वैदीक धर्म पध्दतीचा प्रसार करण्यासाठी आगम खेडा प्रशासनाचा उपयोग होईल, असा दावा त्यांनी केला.

संवाद ददाती ईति नारदः

मोबाइलचा शोध अलीकडे लागला. मात्र, सनातन वैदीक पध्दतीमध्ये हा प्रकार फार जुना असल्याचा दावा टायगर स्वामींनी केला. 'सुदूर नर नारायाणाम संवाद ददाति ईति संवाद:' हा श्लोक मोबाइल या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो. दूरवरून संवाद साधण्याची कला प्राचीन होती. मात्र, परकीय आक्रमणांमध्ये हे दस्ताऐवज लोप पावले. महाभारतात शेवटच्या पर्वांत मोसल हा शब्द येतो. ऋषी मोसल यांचा तो उल्लेख असून त्यांनीच मिसाईलचा शोध लावला होता. पाश्चात्यांच्या हातात ऋषी मोसल यांनी लावलेला अनमोल शोध सापडला आणि त्यांनी मिसाईलचा शोध लागल्याचा दावा केला. याबरोबर, लोहपथ गमाव्रत (रेल्वे), आमृश्या (कम्प्युटर), विमान हे शब्द आणि त्यांचे शोध वैदिक धर्मातील वैज्ञानिकांनी हजारो वर्षापूर्वी लावल्याचे टायगर स्वामी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यांऐवजी मंडळांचे ‘भाविक देव भव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या शेवटच्या पर्वणीपूर्वीच श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार असल्याने यंदा नियमांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार गणेश मंडळांनी व्यक्त केला आहे. सिंहस्थात येणाऱ्या भाविकांसाठी मदत केंद्र किंवा तत्सम सामाजिक उपक्रम राबवित गणेशाची पूजा बांधण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे.

सिंहस्थ काळातील महत्त्वाच्या तीन शाही पर्वण्यांपैकी तिसरी पर्वणी १८ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी (१७ सप्टेंबरला) गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, श्री गणेशाची ठिकठिकाणी विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शहरात आठशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मात्र यंदा सिंहस्थ काळातच हा उत्सव होत असल्याने तो साजरा करण्यावर पोलिसांनी अनेक मर्यादा आणल्या आहेत. सिंहस्थातील एका पर्वणीला देशभरातून सुमारे एक कोटी भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या भाविकांची व्यवस्था करण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. बहुतांश रस्त्यांवर भाविकांचीच गर्दी राहणार असल्याने शहरातील अनेक रस्ते नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ज्या रस्त्यांवर वाहनही उतरू शकत नाही, तेथे गणेशोत्सवाचा मांडव उभारण्याची आशा गणेश मंडळाना धुसर वाटू लागली आहे. अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सवातील देखाव्यांवर अधिक खर्च करण्याऐवजी भाविकांना सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नदान, पाणीवाटप, तात्पुरत्या निवासाची व्यवस्था, चहा, नाष्टा, औषधे वाटप मदतकेंद्र यांसारख्या माध्यमातून सेवा देण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. तर काही मंडळांनी गणेशोत्सव दरवर्षीपेक्षा यंदा छोट्या स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे आम्ही यंदा अत्यंत साध्या पध्दतीने उत्सव साजरा करणार असल्याचे मुठे गल्ली मित्र मंडळाचे रोहन मुठे यांनी सांगितले.

पोलिसांचा मंडळांशी समन्वय

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा करताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. काही पोलिस स्टेशन्सने मंडळांच्या बैठका घेऊन यंदा मांडव टाकण्याबरोबरच डीजेच्या वापरावरही बऱ्याच मर्यादा असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पंचवटी, सरकारवाडा पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिश: संपर्क साधून गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे.

मंडपामुळे रस्ता अधिक व्यापला जाऊन सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना अडथळा होईल. म्हणून आम्ही मंडपाचा आकार खूपच मर्यादीत ठेवणार आहोत. उर्वरीत जागेत भाविकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे विचाराधीन आहे. मंडपाबाहेर भाविकांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक फलक लावणार आहोत.

- सत्यम खंडाळे, मानाचा राजा अशोकस्तंभ मंडळ

आमचे मंडळ रामकुंडाजवळ असल्याने यंदा मंडप उभारूच शकत नाही. आम्ही देखाव्याऐवजी मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच सायकल वाटप, चष्मे वाटप, अनाथालयांना आर्थिक मदतीचे वाटप करणार आहोत. भाविकांसाठी आमचे मदत आणि मार्गदर्शन केंद्र असेल. भाविकांना पिण्याचे शुध्द ‌पाणी उपलब्ध करून देणार आहोत.

- विकी भोरे, सरदार चौक मित्रमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटी प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दहा स्मार्ट शहरांच्या निवडीसाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे. या समितीची बैठक मंगळवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या समितीपुढे नाशिकच्या स्मार्टसिटीचा प्रस्ताव मंगळवारी सादर केला जाणार असून, त्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी लोकप्रतिनिधींची होणारी बैठक स्थगित झाली आहे.

स्मार्टसिटीसंदर्भात ३१ जुलैपर्यंत केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. त्यापूर्वी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीपुढे २८ व २९ जुलैला महापालिकांच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून प्रस्तावाची तयारी केली जात आहे.

मंगळवारी या प्रस्तावाचे मुख्य सचिवांपुढे सादरीकरण केले जाणार आहे. यात महापालिकेच्या २० गुणांचे मानाकंन केले जाणार आहे. त्यानंतरच हा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने मंगळवारी महाकवी कालिदास मंदिरात लोकप्रतिनिधीसाठी स्मार्ट सिटीचे सादरीकरण केले जाणार होते. महापौरांसह नगरसेकांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आयुक्तांना मुंबईला बैठकीसाठी जायचे असल्याने ही बैठक स्थगित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजाबमधील हल्ल्यामुळे रेल्वेस्थानकात अलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पंजाबमधील अतिरेकी हल्ला आणि सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानक हाय अलर्ट झाले आहे. आज चारही प्लॅटफार्मबरोबरच रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक बी. डी. इप्पर यांनी मटाला दिली.

इप्पर म्हणाले की, स्फोटके हुडकून काढणारा सूर्या हा श्वान नाशिकरोडला दाखल झाला आहे. त्याच्या सहाय्याने सर्व प्लॅटफार्म, तिकीट बुकिंग कार्यालये, वाहनतळ, पार्सल विभाग आदींची कसून तपासणी करण्यात आली. कुंभमेळा संपन्न होईपर्यंत श्वानपथक नियमितपणे रेल्वेस्थानक व गाड्यांची तपासणी करणार आहे. इप्पर, श्वान पथकाचे उपनिरीक्षक महेश महाले, बाम्बशोधक पथकाचे एस. आर. सपकाळे, जे. एन. इंगळे, संजय पाटील यांनी शोधमोहीम राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या रूपाने विठ्ठलच पावला...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. गंगापूर धरण ५० टक्के भरल्याने नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तर भावली धरणानेही पाणीसाठ्याची शंभरी गाठली. जणू आषाढीला विठ्ठल पावल्याचे भावनेने शेतकऱ्यांसह प्रशासन आनंदले आहे.

नाशिककरांची सोमवारची सकाळ पावसाच्या दर्शनाने उगवली. कधी हलक्या तर कधी जोरदार सरींनी शहरवासियांना भिजविले. सकाळी साडेआठपर्यंत चार मिलीमीटर तर त्यानंतर दिवसभरात ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. कधी भुरभुर तर उघडीप असा अनुभव नाग‌‌रिक घेत होते. रविवारी रात्री शहरातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. दोन दिवसांपूर्वी ४३ टक्के असलेली गंगापूर धरणातील पाणी पातळी आता ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. सोमवारी दिवसभर केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठपर्यंत ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. येत्या ७२ तासांमध्ये नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`दहशतवाद मुकाबल्यासाठी पोलिस सतर्क`

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंजाब येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच दहशतवाद विरोधी पथकासारख्या यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी सोमवारी नाशिकमध्ये दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली तयारी आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेण्यासाठी दयाळ नाशिकमध्ये आले होते. त्यांच्यासमवेत दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिकारी रश्मी शुक्लाही होत्या. विशेष पोलिस महानिरीक्षक जयजितसिंग, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपायुक्त विजय पाटील, पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे आदी उपस्थित होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.

पंजाब येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह सर्व मोठ्या शहरांमध्ये हाय अॅलर्ट जारी केल्याची माहिती दयाळ यांनी दिली. चौकस राहा

अशा घटनांमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. चौकस आणि सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कोणत्याही अनुचित घटनांचा समाचार घेण्यासाठी पोलिस सज्ज आहेत.

संजीव दयाळ, पोलिस महासंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्थापितांची सरशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

जिल्ह्यातील नाशिकसह सहा बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये नांदगाव, चांदवड वगळता चार ठिकाणी प्रस्थापितांनी आपले गड राखले. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नाशिक बाजार समितीत माजी खासदार देविदास पिंगळे यांनी, सिन्नरमध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे, येवल्यात छगन भुजबळ आणि कळवणमध्ये धनजंय पवार यांनी आपली सत्ता कायम राखली. चांदवडमध्ये माजी आमदार शिरीष कोतवाल यांची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. सोबतच नांदगावमध्ये सुहास कांदेनी पंकज भुजबळांना धूळ चारली.

जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. नाशिक, सिन्नर, कळवण आणि येवल्यात सत्ताधाऱ्यांनी नि‌र्विवाद वर्चस्व मिळविले. तर नांदगाव व चांदवडमध्ये परिवर्तन घडले. जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत पिंगळे यांच्या आपल पॅनलने १८ पैकी १५ जागा मिळवत आपली १८ वर्षांची सत्ता कायम राखली आहे. स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी विकास पॅनलला तीन जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे जिल्हा बँकेतील पराभवाची पिंगळे यांनी परतफेड केली आहे. सिन्नरमध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाला १२, तर आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. येवल्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रगती पॅनलला १२ जागा मिळाल्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या शेतकरी विकास पॅनलला ५ जागांवरच

समाधान मानावे लागले आहे. तर कळवणमध्ये जिल्हा बँक संचालक धनंजय पवार यांनी सत्ता अबाधित राखली आहे. आमदार जे. पी. गावितांसह भाजपच्या नेत्यांनी सर्वपक्षिय पॅनलद्वारा पवारांना तगडे आव्हान दिले होते. मात्र, पवारांनी १३ जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले.

भुजबळांना धक्का

नांदगावमध्ये सुहास कांदे-संजय पवार यांच्या गटाने परिवर्तन घडवून पंकज भुजबळ-अनिल आहेर गटाला धक्का दिला. कांदे यांच्या गटाला १५, तर भुजबळ यांच्या गटाला ३ जागा मिळाल्या. सुहास कांदे यांनी जिल्हा बँकेपाठोपाठ नांदगाव बाजार समितीतही प्रवेश मिळवला आहे. चांदवडमध्ये आमदार डॉ. राहुल आहेर-डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी माजी आमदार शिरीष कोतवाल यांची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणली आहे. आहेर यांच्या गटाला १३ तर कोतवाल यांच्या गटाला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध होवून त्यात माजी आमदार दिलीप बनकर याचीच सत्ता कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलबीटी’ला उद्योजकांचा विरोधच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उलाढालीची कुठलीच मर्यादा अजिबात न ठेवता सरसकट एलबीटी (स्थानिक कर कायदा) रद्द करण्यात यावा. दि. १ ऑगस्टपासून ५० कोटींच्या आत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांचे नोंदणीपत्र शासनाने स्वतःहून रद्द करावे, असा एकमुखी सूर एलबीटी मसुद्यावरील चर्चेतून निमा हाऊस येथे निघाला. या मागणीचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना औद्योगिक संघटनांच्या वतीने देण्यात येणार आहे.

सातपूरच्या निमा हाऊस येथे राज्य शासनाच्या स्थानिक संस्था कर (सुधारणा) मसुद्यावरील चर्चेसाठी उद्योजकांची बैठक आयोजित केली होती. या मसुद्यानुसार ज्या व्यापाऱ्यांची दि. १ एप्रिल २०१५ रोजी किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये खरेदी, विक्रीची उलाढाल वर्षाकाठी ५० कोटींपेक्षा कमी नसल्यास स्थानिक संस्था करासाठी नोंदणी करणे आवश्यक राहील अशीही तरतूद आहे. हा निर्णय लघुउद्योगांसाठी स्वागतार्ह असल्याचे मानले जाते. मात्र मोठ्या उद्योगांवर याचे अनिष्ट परिणाम होणार असल्याने स्थानिक उद्योग वर्तुळच धोक्यात येण्याचा सूर या बैठकीत उमटला.

एलबीटी बाधकच

नाशिकमध्ये ४६ पेक्षाही अधिक उद्योग हे ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेले आहेत. या धोरणांमुळे मोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये विस्तार करावा की स्थलांतर करावे असाही मुद्दा यावेळी उपस्थित झाला.या बैठकीस निमातर्फे अध्यक्ष रवि वर्मा, उपाध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेष पाटणकर, खजिनदार विराल ठक्कर, माजी अध्यक्ष मनिष कोठारी, निमा कर समितीचे अध्यक्ष मनोज पिंगळे तसेच वराजेंद्र वडनेरे, किरण पाटील, संतोश मंडलेचा तसेच आयमाचे राजेंद्र अहिरे, सुरेश माळी, लघुउद्योगभारतीचे एम.जे कुलकर्णी, सीआयआयचे उत्तर महाराश्ट्र प्रमुख सुधीर मुतालिक इत्यादी औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व उद्योजक, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉम्बच्या अफवेने धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंजाब येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना शहरातही सोमवारी बेवारस वस्तुंच्या वार्तेने पोलिसांचे दूरध्वनी खणखणले. एमजी रोड आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेवारस बॅगा आढळल्या. परंतु, त्यामध्ये कोणतीही स्फोटक वस्तू नसल्याची माहिती पुढे आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

पंजाब येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे राज्यात हाय अलर्ट जारी केल्याची माहिती पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी नाशिकमध्ये सोमवारी दुपारी दिली. त्यानंतर अन्य पोलिस अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी रामकुंडाची पाहणीही केली. एकीकडे हे सर्व घडत असताना एमजी रोडवरील रेडक्रॉस सिग्नल जवळ बेवारस अवस्थेत बॅग असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाने दिली. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसह बॉम्बशोधक नाशक पथकानेही तेथे धाव घेतली. या मार्गाने होणारी सर्व प्रकारची वाहतूक तत्काळ अन्य मार्गांनी वळविण्यात आली. तब्बल अर्धा तास ही बॅग तपासण्याचे काम सुरू होते. मात्र, त्यामध्ये कपडे आढळून आल्याची माहिती पुढे आली. सिव्हिल हॉस्पिटलमधील पुरुषांच्या वॉर्डबाहेरही बेवारस अवस्थेत पिशवी आढळून आली. पोलिसांसह बॉम्बशोधक-नाशक पथकाने हॉस्पिटलकडे मोर्चा वळविला. तेथेही तपासणी केली असता पिशवीमध्ये कपडे तसेज गवंडी कामाच्या वस्तू सापडल्या. या अफवा नसून पोलिसांचे मॉकड्रील असल्याची चर्चा नाशिकमध्ये होती.

तत्काळ रिस्पॉन्स

बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात असते. नागरिकही आता अधिक सतर्कता दाखवित असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले. सिंहस्थ कुंभमेळा होऊ घातला असताना नागरिकांनी अधिकाधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्याचा प्रत्यय सोमवारी नागरिकांनी दिलेल्या घटनांवरून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात सेल्फीची ‘पर्वणी’ नाहीच!

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

अँड्रॉईड मोबाइलने लावलेले सेल्फीचे वेड सिंहस्थातील शाही मिरवणूक आणि पर्वणी काळात अप्रिय घटनेला निमंत्रण देऊ शकते. म्हणूनच 'नो सेल्फी' मो‌हीम राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याबरोबरच पर्वणी काळात विशिष्ट भाग 'नो सेल्फी झोन' जाहीर करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

सिंहस्थ निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राजमुंद्री आणि जगन्नाथपुरी येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांनंतर प्रशासनाने ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबिले आहे. ध्वजारोहण सोहळ्यात शेकडो लोक गर्दीमध्ये मिसळून सेल्फी काढत होते. काही तरूण रामकुंड, कुशावर्तावर जोखमीच्या ठिकाणांवर थांबून सेल्फी काढत होते. त्यांचे हे सेल्फी वेड त्यांच्या जिवीतास धोकादायक आहेच. परंतु, गर्दीच्यावेळी ते इतरांसाठीही धोकादायक ठरू शकते. म्हणूनच सेल्फी काढणाऱ्यांच्या जनजागृतीची गरज असल्याचे मत कुंभथॉनच्या माध्यमातून संदीप शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नोंदविले आहे. महेश गुजराथी, डॉ. सचिन पाचोरकर, निशाद हलकर्णी, समीर रावल तसेच टीसीएस, मराठा विद्या प्रसारक समाज आणि के. के वाघ महाविद्यालयाचे काही विद्यार्थी अशा ५० जणांनी ही निरीक्षणे नोंदविली आहेत.

गर्दीत कुणी सेल्फीसाठी थांबण्याचा प्रयत्न केला तरी गर्दीच्या लोंढ्यात ढकलले जाणे, खाली पडून चेंगराचेंगरीसारखी घटना घडणे यांसारखे प्रकार घडू शकतात. पोलिसांनी मात्र हा मुद्दा गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसते. सेल्फीचा मुद्दा तूर्तास आमच्या विचाराधीन नसल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

नागरिकांची सेल्फी काढण्याची सवय गर्दीच्यावेळी धोकादायक ठरू शकते. नो सल्फी मोह‌िमेच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत. तसेच, काही परिसर नो सेल्फी झोन करता येईल का याचाही विचार सुरू आहे.

दीपेन्द्र सिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंडरपासचा सोडवा फास!

$
0
0

तिढा लवकरात लवकर सोडविण्याची नागरिकांची मागणी

अजित पतकी, नाशिक

गेल्या १२ जुलै रोजी ट्रॅफिक पोलिस विभागाने इंदिरानगरचा अंडरपास कोणतीही पूर्वसूचना किंवा जनतेची मते जाणून न घेताच वटहुकूम काढल्यासारखा एकसूत्री पद्धतीने जारी केला. अर्थात पोलिस खात्यावरील वाढता ताण, स्टाफची कमतरता ह्या गोष्टींना अनुषंगूनच वरील निर्णय घेण्यात आला असणार आणि त्यासाठी जनतेची सहानभूती नसण्याचे काहीच कारण नाही, पण असा निर्णय घेण्याअगोदर सदर अधिकाऱ्यांनी खालील गोष्टी विचारात घेतल्या असत्या तर त्यांनी असे केलेच नसते.

> हा अंडरपास शहरातील मुख्य अंतर्गत रिंग रूट आहे. दोन्ही बाजूंना याची रुंदी शंभर फुटांची आहे. > इंदिरानगर तसेच गांधीनगर, नाशिकरोड येथून येणाऱ्या वाहतुकीला द्वारका चौफुली टाळण्यासाठी हा उत्तम पर्यायी मार्ग आहे. तसेच, शहराच्या बाजूने सिटीसेंटर जवळून ट्रॅफिक काढल्याने सातपूर त्रिंबकहून अंडरपासकडे जाण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्यायी मार्ग आहे. > द्वारका किंवा शहरातील इतर मार्गावरील टाळण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो. इतक्या महत्वाच्या ठिकाणी रुंद अंडरपास किंवा ओव्हरब्रिज असणे गरजेचे होते. सर्व मुख्य शहरात असे पूल आहेत. मुंबई-पुणे येथे इतक्या संवेदनशील मार्गावर अंडरब्रिज किंवा ओव्हरब्रिज आहेत. इंदिरानगर येथील जनता मध्यमवर्गीय असून, शहरातील अंतर्प्रवाहांशी त्यांची घसीट नसली तरी इथले नगरसेवक जनताभिमुख व दूरदर्शी आहेत. त्यांचा सुद्धा सल्ला पोलिसांनी घेतला नसावा.

सिंहस्थात पोलिसांची इतर ठिकाणी गरज आहे, पण त्यासाठी इतक्या महत्वाचा अंडरपास अचानक बंद करणे ह्या खात्याला सोयीचे वाटते, ह्यातच त्यांनी जनतेला गृहीत धरले आहे हे दिसते. येथील दुचाकीवरून जाणाऱ्या मुली, महिला, व जेष्ठ नागरिक यांना किती त्रास होतो ह्याची कल्पना नाही असे कसे म्हणावे. रेनकोट घातलेले वरील व्यक्ति ह्यांना डावी उजवीकडचे पहाणे किती कठीण असते ह्याची सर्वांनाच कल्पना आहे. कुठेही असे उजवी डावीकडे वळण्यासाठी लेन कटिंग करायला लागणे अतिशय धोक्याचे आहे. सिटीसेंटरकडून येताना सरळ अंडरपासने न जाता कॉलम क्रमांक १७१ ने जाणे सोयीचे असले तरी ते करण्यासाठी डावी उजवीकडे पाहून लेन पार करून पुनः लेन कटिंग करायला लागणार. असे मार्ग अपघाताला आमंत्रण देतात. तसेच इंदिरा नगर अंडरपास ऐवजी लेखानगरपर्यंत वळून जाणे म्हणजे अरूंद अशा सर्विस रोडने २-३ किमीचा फेरा पडणार. त्याशिवाय अरुंद अशा रस्त्यावरचा ट्रॅफिक वाढणार हे वेगळेच.

आता ओव्हर ब्रिज करायला सांगणे म्हणजे पुनः बारा वर्षे वाट पहाणे आले. जनता तर असे मार्ग बंद असणे सहनच करू शकत नाही. तेव्हा प्राप्त परिस्थितीत येथे तातडीने सिग्नल बसवणे हाच पर्याय उरतो. पंधरा मिनिट मुरम्ब्यात थांबणे अशक्य, पोलिसांची धावपळ सुद्धा बघवत नाही. चार-पाच असतील तरी त्यांना शक्य नाही. सिग्नल असला तर इथली सोशिक जनता तेथे दोन मिनिट आनंदाने थांबेल. पेठे नगर रास्ता जिथे सर्विस रस्त्यावर उघडतो तिथे दुचाकी मातीच्या रस्त्याने पार करतात. तिथेही छोटा पास रस्ता होऊ शकतो का, हे तपासावे. सिग्नल सुरू होईपर्यंत पुनः अंडरपास सुरू करून जनतेची सोय केल्यास जनतेचे आशीर्वाद मिळतील.

सिग्नलचाही पर्याय

ओव्हर ब्रिज करायला सांगणे म्हणजे पुनः बारा वर्षे वाट पहाणे आले. अंडरपास रुंद होवू शकत नाही कारण वरचा हायवे बांधून झाल्याने तसे करणे आता अशक्य. जनता तर असे मार्ग बंद असणे सहनच करू शकत नाही. तेव्हा प्राप्त परिस्थितीत येथे तातडीने सिग्नल बसवणे हाच पर्याय उरतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर ‘हाय अलर्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

संभाव्य घातपाती हल्ले आणि कुंभमेळा लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली आहे. बॉम्बशोधकपथक, श्वानपथक, लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक कार्यरत झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आणखी कुमक येणार आहे.

रेल्वे स्टेशनवर आरपीएफच्या कार्यालया शेजारीच सीसीटीव्हीचा अत्याधुनिक कक्ष उभारण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे महानिर्देशक आर. आर. वर्मा यांच्याहस्ते नुकतेच त्याचे उदघाटन झाले. स्थानक व परिसरात १२० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यांचे नियंत्रण या कक्षातून होते. स्टेशनवर स्कॅनरद्वारे बॅगांची तपासणी केली जात आहे. परिसरात दहा ठिकाणी मोर्चे उभारण्यात आले आहे.

हम साथ साथ है!

रेल्वे स्टेशनवर लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कार्यालय शेजारी शेजारीच आहे. कुंभमेळ्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. डी. इप्पर आणि लोहमार्गचे चंद्रशेखर भाबल यांच्या मार्गदर्शनाखाली जवान डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. नाशिकरोड ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, बॉम्बशोधक पथकाचे एस. आर. सपकाळे, जे. एन. इंगळे, संजय पाटील यांची साथ त्यांना आहे.

गस्त आणि मनोरे

चारही प्लॅटफार्म, तिकीट आरक्षण केंद्र, वाहनतळ, पार्सल विभाग येथे जवानांची गस्त वाढविण्यात आली आहे. सिन्नरफाटा प्रवेशद्वार आणि मालधक्क्याकडेही विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. मालधक्का, नाशिकरोड, सिन्नरफाटा आणि तिकीटविक्री केंद्राच्या टेरेसवर टेहाळनी मनोरे उभारण्यात आले आहे. मालधक्का येथे बॅरिकेट घालण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूंवर लक्ष ठेवले जात आहे. बेवारस वस्तूंना हात न लावण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून केले जात आहे.

भुसावळहून श्वानपथक

सूर्या हा श्वान भुसावळहून नाशिकरोडला दाखल झाला आहे. स्फोटके शोधण्यात सूर्या माहीर आहे. त्याच्या सहाय्याने सर्व प्लॅटफार्म, तिकीट बुकिंग कार्यालये, वाहनतळ, पार्सल विभाग तसेच कुंभमेळा होईपर्यंत गाड्यांची तपासणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राम जलमय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाळ्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सिंहस्थाचा जागर सुरू असलेल्या पंचवटीतील साधुग्रमची अवस्था मात्र बिकट झाली आहे. साधुग्राममध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहने चालविणेच काय तर पायी चालणेही कठीण झाले आहे.

साधुग्राम मुळातच काळ्या मातीवर वसले आहे. आता वरून मुरुमाचे थर चढविले जात आहेत. मात्र सतंतधार पावसामुळे मुरुमाची माती होत आहे. बारीक खाडी अर्थात कच टाकली असली तरी रस्ते खोल खचत चालले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे मुरूम व कच टाकण्याचे काम सुरू आहे. साधुग्राममध्ये सध्या राहायला आलेल्या साधू संतांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक ठिकाणी पत्रे नीट बसले नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये येत आहे. बरेच लाकडी खांब सैल झाले आहेत. हवा आल्यावर शेड हालत असल्याची तक्रार संत मंडळी यांनी केली आहे. पाऊस सुरू असला तरी काम मात्र बंद नाही. सफाई कामगार वेगाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे डोम उभे करण्यात अनेक अडथळे येत आहेत. गुरुपौर्णिमा जवळ आल्याने सर्वजण कामाला लागले आहेत. पावसातही अनेक भाविक ठिकठिकाणी भेट देतांना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या कलेला ग्लोबल व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धार्मिक शहर म्हणून परिचय मिळविणाऱ्या नाशिकचे कलात्मक अंगही जगासमोर यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि रुचिर आर्ट गॅलरी यांनी 'कलाकुंभ २०१५' च्या आयोजनाचा संकल्प सोडला आहे. आर्ट अंडर वन रुफ' या संकल्पनेंतर्गत शनिवार, १ ऑगस्टपासून तिडके कॉलनीतील रुचिर आर्ट गॅलरीत 'कलाकुंभ' मेळ्यास प्रारंभ होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उपस्थिती लावणाऱ्या अन् कलेत रुची असणाऱ्या जगातील रसिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

नाशिकच्या कला आणि साहित्य वर्तुळात सर्जनशील कलाकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नाशिकच्या आधुनिक आणि प्राचीन वैशिष्ट्यांची जपवणूकही आजवर या कलावंतांनी पिढ्यान पिढ्या केली आहे. चित्रकला आणि शिल्पकला या प्राधान्याच्या कलांसोबतच फाईन आर्ट, संगीत, नाट्यादी कलांचाही यात समावेश आहे. 'कला पर्यटन' या संकल्पनेंतर्गत पर्यटनाचा नवा पैलू नाशिकला भेट देणाऱ्या जगातील रसिकांसमोर कुंभमेळ्याच्या निमित्ताने मांडला जावा, असा या आयोजनामागे उद्देश आहे.

प्रदर्शनास १ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल. यानंतर प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या कलावंताचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या कलाकारांमध्ये अशोक धिवरे, कैलास ह्याळीज, प्रसाद पवार यांच्यासह विविध कलाकारांच्या कलाकृतीही समाविष्ट असणार आहेत. कलाकुंभ २०१५ या प्रदर्शनादरम्यान हेरिटेज आर्ट वॉक, लाईव्ह आर्ट डेमो, विविधांगी विषयांवरील शॉर्ट फिल्म स्क्रिनींग, चर्चासत्र आदी उपक्रमही पार पडणार आहे. रुचिर पंचाक्षरी आणि पंकज कोठावदे यांची ही संकल्पना असून तिडके कॉलनीमधील रुचिर आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

कलाप्रेमींचे प्रयत्न

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला कुंभाची पहिली पर्वणी नाशिकमध्ये पार पडणार आहे. या निमित्ताने आतापासून राज्य परराज्यांसह विदेशांमधूनही पर्यटक नाशिकमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. या शहराविषयी बाह्य पर्यटकांना असणारी उत्सुकता भागविण्यासाठी विविध स्त्रोतांकडेही ते आशावादाने बघणार आहेत. यामुळे कलेच्या अंगाने कलाकुंभ पर्याय बनू शकेल काय, या दृष्टीने नाशिकच्या कलाप्रेमींचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ तयारीवर ‘पाणी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून वादळी वाऱ्यांनी सिंहस्थ तयारीचा फज्जा उडविला आहे. पावसाळ्यात कुंभमेळा भरत असल्याने पत्र्याचे छत असलेले मंडप सर्वत्र उभारण्यात आले आहेत. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पत्रे हवेत उडाले. नया उदासी आखाड्याच्या तात्पुरत्या उभारण्यात आलेले शेड जमीनदोस्त झाले. दोन दिवसांपूर्वी निलपर्वत रस्त्यावरील शेडचीही अशीच तऱ्हा झाली हाती.

पावसाने सिंहस्थ कामांना टाईम प्लीज म्हणून थांबवले आहे. पहिल्या टप्प्यातील निवारा शेड पूर्ण झाले; मात्र उशिरा मंजुरी मिळाल्याने शेड अपूर्णच आहेत. विशेष म्हणजे त्यांचे छतावरील पत्रे बाकी राहिले आहेत. शहरातील मध्यवस्तीतील काही महत्त्वाचे अंतर्गत रस्ते अद्याप झालेले नाहीत. खोदकाम करून ठेवल्याने या परिसरातील वाहनेच काय पायी चालणेडी कठीण झाले आहे. आषाढी एकादशीनंतर भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात होते आणि गुरूपौर्णिमेनंतर देशभरातील विविध साधू-महंत आणि महाराजांचे आगमन होणार आहे. एकूणच साधू संत घरी येण्याची वेळ झाली; मात्र प्रशासनाने अद्याप कामे पूर्णात्वास नेल्याचे दिसून येत नाही.

निर्विघ्न सिंहस्थासाठी जलपूजन

संततधार पावसाने अंबोली धरण काठोकाठ भरले आहे. नगराध्यक्षा अनघा फडके, उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी अंबोली धरणावर जाऊन जलपूजन केले. सिंहस्थ कालावधीत जलस्त्रोत भरभरून वाहू दे आणि आलेले साधू संत संतुष्ट होऊन जाऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा अभियंता पूर्वा माळी, सहायक लेखापाल धनश्री पैठणकर, नगरसेवका विजया लढढा,आशा झोंबाड, माधुरी जोशी, मनोज थेटे आदी उपस्थित होते.

वीजपुरवठा अस्थिरच

त्र्यंबक येथे वीजपुरवठ्याबाबत अद्यापही स्थितरता आलेली नाही. दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडीत हातो. सिंहस्थ काळात असेच नियोजन असेल तर काय घडणार, असा प्रश्न शंकरानंद महाराज यांनी केला आहे. वारंवार सूचना देऊनही समस्यांचे निराकरण झालेले नाही. बीएसएनएलची तर रेंज नसते. सिंहस्थ पर्वकाळ सुरू झाला तरी वीज आणि टेलिफोन सेवेची कामे अद्याप बाकी आहेत. कोट्यवधी भाविक शहरात येत असतांना त्यांना असुविधांचा सामना करावा लागणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

साधू-महंतांची नाराजी

त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कामांबाबत साधू-महंतांची नाराजी वाढली आहे. कामांच्या प्रगती पाहून येथून निघून जावे असा विचार मनात येत असल्याची निराशाजनक प्रतिक्रिया आनंद आखाड्याचे सचिव स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी नियाजनाबाबत दिली आहे. अर्थात हे आपले वैयक्तिक मत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांच्या आणि इतर आखाड्यांच्या साधूंनी देखील या कामांबाबत अशीच नापसंती व्यक्त केली आहे. सततच्या बैठकांनी काहीही साध्य झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी पाण्यात फुलवली टोमॅटो शेती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

भीषण पाणीटंचाई, पावसाचा अभाव अशा स्थितीत कोणते पीक घ्यावे व कशी शेती करावी असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुंभारी येथील शेतकरी राजेंद्र निवृत्ती जाधव यांनी पाऊस पाण्याची कमतरता असतानाही जिद्द व चिकाटीच्या जोरावर टोमॅटोचे बहारदार पीक उभे केले आहे.

पालखेड-रानवड रस्त्यावर कुंभारी शिवारात हॉटेल मनपसंद समोर राजेंद्र जाधव यांनी एक एकर शेतात दहा जून रोजी टोमॅटो पिकांची लागवड केली. पावसाचा पत्ता नाही. शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे खिळलेली,

शेतीची कामे ठप्प होऊन बळीराजा चिंताग्रस्त असेच ग्रामीण भागातील चित्र आहे. असे असताना जाधव यांनी पावसाची वाट न बघता उपलब्ध पाण्यात ठिबक सिंचनचा वापर करीत व मलचिंग पेपर टाकून टोमॅटो लागवड केली. लागवडीनंतर एक गाडी शेणखत टाकले. फवारणी करीत अवघ्या ४०-४५ दिवसात आदर्श टोमॅटो प्लाट तयार केला. पाऊस नसतानाही ठिबक सिंचनाव्दारे अल्प प्रमाणातही बहरलेला व फळांनी लगडलेला प्लॉट बघून अनेक शेतकऱ्यांनी तोंडात बोटे घातली. जाधव यांच्या जिद्द व चिकाटीला सलाम केला.

महिन्याभरात या प्लॉटमधील टोमॅटो तोडणी सुरू होईल. बाजारभावाने साथ दिल्यास जाधव यांच्या मेहनतीचे सोने होईल यात शंका नाही. यशापयश हे बाजारभाव अवलंबून असले तरी पीक कसे कमवावे याचा आदर्श जाधव यांनी घालून दिला आहे. याचा इतर शेतकऱ्यांनीही आदर्श घेतल्यास शेतीचे नंदनवन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव तालुक्यात पावसाची प्रतीक्षाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी मालेगाव तालुक्यात अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसापासून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. मालेगाव शहर आणि तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने येत्या काही दिवसात पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते.

जून महिन्यात मालेगाव तालुक्यात ९० टक्के पेरणीची कामे झाली. मात्र गेल्या महिन्याभर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. दुबार पेरणीचे संकट गडद झाले होते. मात्र काही भागात हलक्या सरी कोसळल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील माळमाथा आणि काटवन भागात तर पावसाचा पत्ता नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सन २०१५-१६ या वर्षाकरिता पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी. के. कापडणीस यांनी केले आहे.

सन २०१५-१६ या वर्षात भात, ज्वारी, बाजारी, मका, नागली, उडीद, मूग, तूर, भुईमूग, सोयाबीन, कांदा या पिकासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विमा हप्त्यातून पाच टक्के राज्याचा हिस्सा व पाच टक्के केंद्राचा हिस्सा असे १० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असून, कृषी सहाय्यकाकडे अर्जाचा नमुना घेऊन पीक पाहणीसह सातबारा व विमा हप्ता अशी रक्कम कोणत्याही बँकेत भरण्याचे आवाहन डी. के. कापडणीस यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीत सांडपाण्याचे मिश्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

नाशिकमध्ये बारा वर्षांनंतर येणाऱ्या महाकुंभाची सुरुवात नुकतीच ध्वजारोहणाने झाली. पुण्यप्राप्तीच्या उद्देशाने गोदावरी नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी देशविदेशातील भावित दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गोदावरी नदीमध्ये आजही सांडपाणर मिसळले जात आहे. त्यामुळे महापालिकेने गोदावरी मिसळणारे सांडपाणी रोखण्याची व्यवस्था करावी आणि नदी प्रदूषण मुक्त करावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

देशातील पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्यांमध्ये गोदावरी नदीचे मोठे स्थान आहे. मात्र, गोदावरीला गेल्या काही काळात गटारगंगेसारखे स्वरुप प्राप्त झाले आहे. यात गोदावरी गटारीकरण विरोध मंचच्या माध्यमातून न्यायालयात गोदावरी प्रदूषण मुक्तीबाबत संघर्ष करीत आहे. गोदावरी गटारीकरण मंचच्या मागणी वरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका यांनी तब्बल आठ वेळेत गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचे सर्व्हेक्षण केले. यात गोदावरीत मिसळणारे एकूण १९ नाले पाहणी दरम्यान आढळून आले. यावर महापालिकेने उपाय शोधत दहा नाले कायमस्वरूपी बंद केल्याचा दावा केला आहे. तर उर्वरित आठ नाल्यांना तात्पुरत्या स्वरूपात नदीपात्राऐवजी अन्यत्र वळविण्यात आल्याची माहिती गोदावरी गटारीकरण मंचचे राजेश पंडित यांनी दिली. मात्र, असे असतांनाही आजही गोदावरीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळले जात आहे.

येथे मिसळले जाते सांडपाणी

गंगापूर गावातील नाल्यातून गोदापात्रात सांडपाणी सोडण्यात आले आहे. सोमेश्वर व बेंडकुळे मळा येथे असलेल्या दोन मोठ्या नाल्यांचे सांडपाणी आजही गोदा पात्रात मिसळत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नाले एमआयडीसीतून येतात. यामुळे नाल्यांमध्ये रसायनयुक्त पाणी अधिक असते. यावर महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. कुंभमेळ्यात होऊ घातलेल्या शाहीस्नानात तरी महापालिकेने गोदापात्रात मिश्रण होणारे सांडपाणी थांबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नाशिकमध्ये सिंहस्थ महाकुंभा सुरू झाला आहे. मात्र, गोदावरीची अद्यापही गटारीकरणातून सुटका झालेली नाही. या प्रश्नी महापालिकेने कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे. - जिजाबाई जाधव

गोदावरीत स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. परंतु, दिवसेंदिवस गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. - रामकृष्ण पाटील, भाविक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images