Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सायगावात पाडणार कृत्रिम पाऊस

$
0
0

आशिया खंडात प्रथमच इंधनासाठी साखरेचा वापर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला आणि नांदगाव तालुक्याच्या मध्यावर असलेल्या सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचे निश्चित झाले असून, शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आशिया खंडात पहिल्यांदा अशा प्रयोगासाठी इंधन म्हणून साखरेचा वापर केला जाणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली गतिमान केल्या होत्या. गेल्या आठवड्यात तज्ज्ञांच्या पथकाने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी देखील सुरू केली होती. येवला आणि नांदगाव तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आता जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) ने रॉकेट फायरिंगद्वारे सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी (१ ऑगस्ट) किंवा रविवारी (२ ऑगस्ट) हा प्रयोग होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी सांगितले.

येवला आणि नांदगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सायगावची या प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यात केवळ सात टक्के पाऊस पडला आहे. अंदरसूल अंतर्गत हे गाव येत असून, तेथे ५३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस न पाडताच ढग वाहून जातात. ढगांमध्ये पुरेशी आद्रता असल्यानेच या प्रयोगासाठी सायगावची निवड केल्याचे सांगण्यात आले.

असा पाडणार पाऊस

बाष्पाच्या ढगांवर रॉकेटद्वारे सिल्व्हर आयोडाईड सोडले जाणार असल्याचे आयएसपीएसचे ट्रस्टी अब्दुल रेहमान वान्नु यांनी सांगितले. प्रयोगासाठीची सर्व सामग्री शुक्रवारी येवल्यात आणण्यात येईल. त्यानंतर वातावरणाचा अंदाज घेऊन प्रयोग केला जाणार आहे. रॉकेट ढगांवर आदळण्यास काही सेकंद लागतील परंतु, त्यानंतर ५० मिनिटांनंतर पाऊस पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे. अकरा शाळांची प्राधान्य यादी प्रशासनाने बनविली असून, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शाळांमध्येच काढण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणांहून आधारकार्ड काढण्याची सक्ती करू नये, असे आदेश जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने शाळांना काढले आहेत. रुंग्ठा आणि रंगुबाई जुन्नरे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली असून, गुरुवार (‌दि.३०) पासून अन्य शाळांमध्येही सुरुवात होणार आहे.

आधारकार्डसाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडे तगादा लावल्याने पालकांचीच दमछाक होऊ लागली होती. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिध्द केले. जिल्हा प्रशासनाने शाळांमधूनच विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यासाठी १३ किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पखाल रोडवरील सावित्रीबाई फुले विद्यालय, गांधीनगर येथील जनता विद्यालय, गंगापूर रोडवरील नवरचना प्राथमिक विद्यालय तसेच निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, अभिनव बालविकास मंदिर, शालिमार येथील सागरमल मोदी स्कूल, दिंडोरी रोड येथील सीडीओ मेरी, सिडको येथील मुक्तानंद बाल विद्यालय, इंदिरानगर येथील डे केअर सेंटर, नाशिकरोड येथील जेडिसी बिटको हायस्कूल येथे गुरुवारपासून विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात होईल. ही माहिती उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी दिली. या शाळांमधील खूपच कमी विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असल्याने तेथे प्राधान्याने मोहीम हाती घेतल्याची माहिती जाधव यांनी दिली. या शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली की पुन्हा द्वितीय प्राधान्य यादी तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात ३२, ग्रामीण भागात ६५ किट्स

शहरात महापालिकेची सात प्रभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक, सिडको, सातपूर, नाशिकरोड आणि मेरी येथील सेतू उपकार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे बारा आणि शाळांमध्ये १३ अशा एकूण ३२ ठिकाणी आधारकार्ड काढता येणार आहेत. शाळांव्यतिरिक्त अन्य ठिकाणांवर जाऊन नागरिक आधारकार्ड काढू शकणार आहेत. केवळ शहरांमधीलच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढता यावेत, यासाठी जिल्ह्यात ६५ किट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी भरतीत भूमिपुत्रांवर अन्याय

$
0
0

'अग्निशमन'चा मुंबईच्या प्रशिक्षणार्थींकडे ओढा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात आपत्कालीन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या भरतीत स्थानिक प्रशिक्षित बेरोजगार तरुणांना डावलले जात आहे. मनसेच्या सत्ताकाळात भूमिपुत्रांवर हा अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन प्रशिक्षण केंद्राने नाशिकच्या ४७ तरुणांना भरती करण्याची शिफारस केली असतानाही अग्निशमन विभागाने मुंबईच्या तरुणांची भरती करण्याचा घाट घातला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नाशिकच्या तरुणांचा जास्त फायदा होणार असतानाही अग्निशमन दलाचा भर मुंबईच्या तरुणांकडे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या वतीने सिंहस्थात आपत्कालीन परिस्थितीत १३८ प्रशिक्षणार्थींची भरती केली जात आहे. यासाठी अग्निशमन सेंटर्सचे प्रशिक्षण पूर्ण केल्याची अट असून, अग्निशमन विभागाने यासाठी मुंबईतल्या कालीना येथील अग्निशमन प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थींची दोन महिन्यासाठी भरती करण्याचा घाट घातला आहे. त्यांना प्रत्येकी सहा हजार मानधन दिले जाणार आहे. सद्यस्थितीत हे कालीना केंद्राचे कर्मचारी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेत असून, त्यांनाच पुढे कार्यरत करण्यााचा अग्निशमनचा प्रयत्न आहे. दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन केंद्रातर्फे प्रशिक्षण घेतलेले नाशिकमध्ये ४७ कर्मचारी असून, त्यांना डावलले जात आहे. सिंहस्थासाठी या कर्मचाऱ्यांची भरती अग्निशमन विभागाने करावी, अशी शिफारस शासनाच्याच केंद्राने केली आहे. असे असतानाही अग्निशमन विभाग मात्र, मुंबईच्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देत आहे. आपत्कालीन परिस्थितीत नाशिकमधील कर्मचाऱ्यांचा मदतीसाठी जास्त फायदा होऊ शकतो, असा दावा अजय बोरस्ते व प्रकाश लोंढे यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना नाशिकची पूर्ण माहिती आहे. मात्र, मुंबईच्या कर्मचाऱ्यांना नाशिकची माहिती नसताना ते आपत्कालीन परिस्थितीत कशी मदत करतील, असा सवाल केला. यामुळे नाशिकच्या तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी सेनेची मागणी आहे. मनसेची सत्ता असलेल्या महापालिकेतच भूमिपुत्रांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधुरी एक कहाणी...!

$
0
0



अश्विनी पाटील, नाशिक

'आमच्या सिनिअर्सकडून डॉ. कलामांनी दिलेल्या लेक्चर्सविषयी खूप काही ऐकून होतो. आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची डॉ. अब्दुल कलामांची ही चौथी वेळ होती. त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातून येथे शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना भेटण्याची विशेष उत्सुकता होती. भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅनला अनुभवण्याचं स्वप्न गेली काही दिवस आम्ही पाहिले होते जे पूर्ण झालंच नाही.' डॉ. अब्दुल कलामांसोबत अवघे काही क्षण घालवलेला कल्पेश ब्राह्मणकर अंतःकरणाने बोलत होता.

आयआयएम शिलाँगमध्ये शिकणारा कल्पेश मूळचा नाशिकचा. डॉ. कलामांना ज्यावेळी हृदयविकाराचा झटका आला त्या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांमधील तो एक. डॉ. अब्दुल कलामांसोबतचे काही क्षण अनुभवलेला आणि त्यांचा मृत्यू आपल्या समोर का झाला? अशी खंत त्यांच्या मनात आहे. डॉ. अब्दुल कलामांनी देशाला, विद्यार्थ्यांना जवळच्या व्यक्तींना जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला, अशी व्यक्ती अगदी जवळ येऊन आपण गमावली, अशी भावना या सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

कलामांसोबत अवघे काही क्षण घालवलेला हा विद्यार्थी त्यांच्याविषयी असलेल्या भावना व्यक्त करताना भावूक झाला होता. त्या क्षणाविषयी बोलताना कल्पेश म्हणतो, भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, लेखक, माणुसकी जपणारी सुंदर मनाची व्यक्ती अशा कितीतरी ओळखी असलेल्या व्यक्तीला आम्ही प्रत्यक्षात भेटणार, अगदी काही अंतरावरून पाहणार या कल्पनेनेच आम्ही सगळे हरखून गेलो होतो. ते येणार म्हणून मॅनेजमेंटने तयारी केली होतीच पण, आम्ही वेगवेगळ्या विषयांमधील असलेल्या शंकांचं निरसन त्यांच्याकडून करून घेण्यासाठी उत्सुक होतो.

कार्यक्रम सुरू होण्याआधी विद्यार्थी आणि डॉ. कलाम यांचे छोटेसे फोटोशूट झाले. त्यानंतर मनाला उभारी देणारे, प्रेरणा देणारे शब्द ऐकण्यासाठी सर्वच लोक स्थिरावले होते. स्वागत, सत्कार, परिचय असे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि व्यासपीठावर ते बोलण्यासाठी उभे राहिले. अन् क्षणार्धात ते कोसळले. काही कळण्याच्या आतच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी विद्यार्थ्यांच्या कानावर आली. कॅम्पस बाहेर न पडण्याची सूचना देण्यात आल्याने त्यांचे दर्शनही घेता आले नाही. मात्र आपल्या कॉलेजमध्ये त्यांनी घेतलेला हा अखेरचा निरोप आमच्या मनातील ठसठसती सल असणार आहे.

कॉलेज नियमित सुरू

माझ्या निधनानंतर कुठलेही काम थांबवू नका, उलट त्यादिवशी अधिक ऊर्जेने काम करा अशी सूचना डॉ. अब्दुल कलामांनी दिलेली होती. त्यानुसार कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व विषयांची लेक्चर्स घेण्यात आली. विद्यार्थ्यांनीही त्यांनी दिलेली सूचना काटेकोर पाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय ऑनलाइन प्रवेशास मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी असून, ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान नव्याने ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहेत. ही माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक प्रमोद नाईक यांनी दिली.

यापूर्वी सादर केलेल्या अर्जाचे निश्चित शुल्क भरून त्याची तपासणी करणे, मूळ अर्जात दुरुस्ती करण्यासाठी हा कालावधी देण्यात आला आहे. ऑनलाइन पध्दतीने ४ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत नव्याने सादर केलेल्या व शुल्क भरून अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचा विचार पाचव्या कौन्सलिंग राऊंडसाठी व खासगी संस्थातील प्रवेश प्रक्रियेसाठी केला जाणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्तायादी ५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येऊन या यादीनुसारच कौन्सलिंग राऊंडमध्ये त्यांना जागांचे वाटप करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या मुदतीनुसार अर्ज सादर केले नाहीत, अर्ज निश्चित केले नाहीत वा आपल्या प्रवेश अर्जात नोंदविलेली चुकीच्या माहितीत दुरुस्त्या केलेल्या नाहीत, अशा सर्वांना ही प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यादरम्यान अर्ज सादर करणाऱ्या उमेदरावांचा विचार फक्त खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील प्रवेशासाठी करण्यात येईल, असे विभागाच्या वतीने प्रसिध्दीप्रत्रकाद्वारे कळविले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या http://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर भेट दिल्यास त्यांना याबाबत माहिती मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराशी सलगी पडली महागात

$
0
0

विद्युत विभागातील तीन अभियंते निलंबित; खातेनिहाय चौकशीचे आदेेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या विद्युत विभागातील तीन अभियंत्यांना ठेकेदाराशी असलेली सलगी चांगलीच महागात पडली आहे. पथदीप बसविण्याच्या प्रकरणात मोजमाप व नोंदणी पुस्तकात काम पूर्ण होण्याआधीच नोंदी केल्याने आयुक्तांनी एका उपअभियंत्यासह दोन कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित केले आहे.

या प्रकरणात उप अभियंता वसंतराव लाडे, कनिष्ठ अभियंता कृष्णा जगदाळे, मोहन गिते या तिघांचा त्यात समावेश असून, तिघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. यात लाडे यांच्यावर बिटको रुग्णालयातील सीसीटीव्ही अहवालात फेरफार करण्याचा अतिरिक्त ठपका ठेवला आहे. महापालिकेच्या वतीने सन २०१४ मध्ये प्रभाग क्र. ३२ व ३४ मध्ये पथदीप बसविण्याचे काम घेण्यात आले होते. प्रभाग क्रमांक ३२ मधील काम ८ लाख ९२ हजाराच्या कामाची मुदत ९० दिवसांची तर, प्रभाग क्र.३४ मधील ८ लाख ९८ हजाराच्या कामाची मुदत ६० दिवसांची होती. तिलोत्तमा इलेक्ट्रीकल्सला हे काम देण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदारांने वेळेत काम पूर्ण केले नाही. तरीही या तीन अभियंत्यांनी काम पूर्ण होण्याआधीच मोजमाप व नोंदणी पुस्तकात काम पूर्ण झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या.

ठेकेदाराचा दंड वाचवण्यासाठी त्याच्याशी संगणमत करून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. तर, पूर्णत्वपत्रावर दिनांकाचा उल्लेख टाळण्यात आला. सोबतच मोजमाप पुस्तिकेत तपास अधिकाऱ्याची स्वाक्षरी ही दिनांकीत नसल्याचे आढळून आले. वरिष्ठांना डावलून बिल परस्पर लेखा विभागाकडे

पाठविण्यात आल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला आहे. वसंतराव लाडे यांच्यावर बिटको रुग्णालयातील सीसीटीव्ही बसविण्याच्या तांत्रिक सल्लागाराच्या अहवालात फेरफार करण्याचा अतिरिक्त ठपका ठेवला आहे.

या तिघांच्या निलंबनाचे आदेश आयुक्त डॉ. गेडाम यांनी काढले असून, त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरू केली आहे. महापालिकेतील नियुक्तीनंतर पालिका आयुक्त डॉ. गेडाम यांची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांची ठेकेदाराप्रमाणेच वर्तणूक

महापालिकेच्या या अभियंत्यांची वर्तणूक ही एकाद्या ठेकेदाराप्रमाणेच असल्याचे आढळून आले. तांत्रिक सल्लागाराचा अहवाल थेट दुसऱ्या ठेकेदाकडेच बदलण्यासाठी देण्याचा आक्षेप लाडे यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. ठेकेदारांवरील कारवाई टाळण्यासाठी थेट कागदपत्रांमध्ये फेरबदल, मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड करण्याचा प्रताप या अधिकाऱ्यांनी केला आहे. यात लाडे यांच्यावर एलईडी प्रकरणात यापूर्वीच आक्षेप आहेत. या कारवाईमुळे अन्य अधिकारीही सावध झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिर्डी हा काळ्या पैशांचा बाजार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

साईबाबांचा धर्म कुणालाही माहीत नाही. तरीही त्यांचे मंदिर कसे? शिर्डीसारखी देवस्थाने ही केवळ काळ्या पैशांचा जोरावर मोठी होत असल्याची प्रखर टीका करतानाच शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी शिर्डीला अंधश्रद्धा कायदा का लागू नाही, असा संतप्त सवाल केला. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 'साई का सच' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

> मनुष्य कोणत्याही धर्माचा असो तो जर दहशतवादी असेल तर त्याला दंड दिलाच पाहिजे.

> गोदावरीचे पावित्र्य जपायला हवे.

> धर्मशिक्षण दिल्यास महिलांवरचे अत्याचार नाहीसे होतील.

> आखाडा निर्माण करताना प्रमुखांची योग्यता तर हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतून मोराची सुटका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल ७० फूट खोल विहिरीमध्ये दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोराची नाशिकच्या चार तरुणांनी सुटका केली. दोनच दिवसांपूर्वी या मोराला चांदवड तालुक्यातील वडाळीभोई परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे या मोराला सोपविण्यात आले. मृत्यूशी झुंजणाऱ्या डौलदार मोरास अखेरच्या क्षणी जीवदान मिळाल्याने वडाळीभोई गावाने आनंदोत्सव साजरा केला.

प्राणीमात्रांच्या संरक्षणासाठी नाशिकमध्ये 'आवास' (अनीमल वेल्फेअर अॅण्ड अॅन्टी हॅरिशमेंट सोसायटी) ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांना चांदवड तालुक्यातून बाबासाहेब शिंदे यांच्या फोनवरून विहिरीत दोन दिवसांपासून तडफडणाऱ्या मोराची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच संस्थेचे कार्यकर्ते अभिजीत महाले, विशाल चोडोकर, वैभव भोगले आणि गौरव क्षत्रिय या चौघांनी खाजगी गाडीने काही तासातच चांदवड तालुक्यातील भायाळे हे गाव गाठले.

परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर विहिरीतील पाण्यात मोर बुडत असल्याचे लक्षात आले. दोन दिवसांपासून अन्नाविना तडफडणाऱ्या या मोराची अवस्थाही क्षीण झाली होती. पंखही पाण्यात झडून गेले होते. अखेरीला काही मिनिटातच या तरुणांनी पाठीस दोर बांधून विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. वैभव भोगले या तरुणाला पाठीला दोर बांधत ग्रामस्थ व इतर कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरण्यास मदत केली. पाठीला बांधलेल्या पोत्यामध्ये पाण्यात पडलेल्या मोराला अलगद टाकत वैभवने पुन्हा विहिरीबाहेर येण्यास सुरुवात केली. दोरावरून निसटणाऱ्या हातांमुळे सत्तर फुटांचे अंतरही मोठे वाटत होते. यावेळी विहिरीबाहेर उभ्या असणाऱ्या ग्रामस्थांनी जोर लावत वैभवसह मोराला यशस्वीपणे बाहेर काढले.

वनविभागाचा ढिसाळपणा !

भायाळे (ता. चांदवड) येथे दोन दिवसांपासून विहिरीत मोर पडल्याचे वृत्त परिसरात पसरले होते. यावेळी काही ग्रामस्थांनी वनविभागाशीही संपर्क साधला. वनविभागाकडून याबाबत केवळ आश्वासने दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्षेनंतर काही ग्रामस्थांनी इंटरनेटच्या सहाय्याने नाशिकमधील प्राणीमित्र संघटनेशी संपर्क करण्याचा पर्याय स्वीकारला. अखेरीला वनरक्षक योगिराज निकम यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या ताब्यात मोर देण्यात आल्याची माहिती 'आवास' या संस्थेचे गौरव क्षत्रिय यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलरश‌िपसाठी आज शेवटची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेशिवाय इतर शिक्षणासाठी सरकारकडून देण्यात येत असलेल्या स्कॉलरश‌िपच्या लाभासाठी अर्ज करण्यासाठी शुक्रवारी (३१ जुलै) शेवटची संधी आहे, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी ए. ए. चव्हाण यांनी केले आहे.

२०१४-१५ या वर्षातील प्रलंबित अर्ज व त्यामधील त्रुटींची पुर्तता करुन आज (३१ जुलै) प्रकल्प कार्यालयास सादर करायचे आहेत. २०१५-१६ या वर्षात ई स्कॉलरशिपद्वारे तसेच शैक्षणिक शुल्क मिळण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करायची आहे. तसेच कॉलेजेसनी हे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे सादर करायचे आहे. या कालावधीनंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नसल्याचेही विभागातर्फे सांगण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या https://etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज तात्काळ भरायचे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञान की फसवणूक?

$
0
0

एन. डी. अग्निहोत्री, नाशिक

दीड ते दोन वर्षांपूर्वी एका नावाजलेल्या कंपनीचा टॅब्लेट त्यांच्याच शोरूममधून १७,५०० रुपयांना मी विकत घेतला. सिनीअर सिटीझन असल्याने वापर तसा कमीच आहे. काही दिवसांपूर्वी टॅब्लेट हॅग झाल्याने मी त्या कंपनीचत्या सर्व्हिस स्टेशनमध्ये दाखविण्यास गेलो. सर्व्हिस स्टेशनमध्ये बरीच गर्दी होती. एक दीड तासानंतर माझा नंबर आला.

तेथे असलेल्या मॅडमने टॅब्लेट पाहिला. बहुदा कनेक्ट खराब झाले असावे असे म्हणत इंजिनीअरला दाखविते असे सांगितले. पाचशे रुपयांच्या आत खर्च असेल तर आम्ही दुरुस्त करून देऊ; मात्र त्यापेक्षा अधिक खर्च असला तर इंजिनीअर आपल्याला फोन करून सांगतील. साधारण एक तासानंतर इंजिनीअरचा फोन आला. की आपल्याला १३,००० रुपये खर्च येईल. फोन दुरुस्त करू नका असे मी त्यांना लगेच कळविले. टॅब्लेट घेण्यासाठी मी स्टेशनमध्ये गेलो. तेथे त्यांनी मला दुरुस्ती कार्ड दाखविले त्यावर ९,६०० रुपये खर्च लिहिलेला होता.

खर्चाबाबत संशय आल्याने मी मॅनेजरला याबाबत विचारपूस केली. त्यांना हा सर्व प्रकार कळल्यावर इंजिनीअरची चूक झाली असेल असे म्हणत त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्या इंजिनीअरला माझ्यासमोर समज द्यावी असा विषय मी काढताच. त्याच्यावतीने मी तुमची माफी मागतो असे सांगत तो विषय टाळला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दावा ठोकू शकतात असेही ते यापुढे म्हणाले. ९,६०० रुपये खर्च नेमका कशाचा? हे विचारल्यावर त्यांनी याचे स्पष्टीकरण मला दिले. तुमचा टॅब्लेट डेड झाला आहे. त्याची बॅटरी आणि मदरबोर्ड बदलावा लागेल त्याशिवाय तो सुरू होणार नाही. वस्तू १७,५०० रुपयांची आणि खर्च ९,६०० रुपये हे कुणलाही पटणार नाही. त्यावर त्या मॅनेजरने तुम्हाला टॅब्लेट दुरुस्त करायचा असल्यास करा अन्यथा करू नका आम्हाला काही फरक पडत नाही. तेथे उपस्थित असलेल्या दोन तीन ग्राहकांना मी त्यांच्या अनुभवाविषयी चौकशी केली त्यांचाही अनुभव माझ्यासारखाच होता.

टॅब्लेट तसाच घरी परत घेऊन आलो. चार्जिंगला लागला आणि नंतर टॅब्लेट सुरू झाला. आजपर्यंत तो योग्य स्थितीत सुरू आहे. एवढ्या नामांकित कंपनीतील इंजिनीअरने वस्तू दुरुस्त करताना काय पाहिले असावे? हा प्रश्न मला पडला. सतर्कता न राखता जर मी तो टॅब्लेट दुरुस्तीला दिला असता तर मला १३,००० किंवा ९,६०० रुपयांचा भूर्दंड बसला असता. याला इंजिनीअरचे अज्ञान म्हणायचे की ग्राहकांची लूट करण्याचे तंत्र हे कळत नाही. बऱ्याचदा आपण विश्वासू ब्रँड म्हणून खर्च करण्यासाठी तयार होतो; मात्र तेथील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची सर्रास लूट होताना दिसते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मन जोडण्यासाठी देशभर पदयात्रा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसा-माणसातील दुजाभाव व सामाजिक दुफळी दूर करण्याच्या उद्देशाने श्री एम उर्फ मुमताज अली या योगी गुरूंनी १२ जानेवारी २०१५ या श्री स्वामी विवेकानंदाच्या जन्मदिनी कन्याकुमारी ते काश्मीर असा पदयात्रेचा संकल्प सोडला. ही पदयात्रा गेली ६ महिने सुरू असून हे महायोगी त्यांच्या काही शिष्यासह अखंड चालत आहेत. या आठवड्यात बुधवारी (दि. २९) ते नाशिक परिसरात पोहचले आहेत.

जाती, पंथ,धर्म व विविध भाषिकांच्यात संवाद साधणे हा यात्रेचा मुख्य हेतू आहे. अनेकांच्या देश, धर्म, वर्ण व मानवाप्रती भावना समजून घेणे व त्यांच्या शंकाकुशंकाचे सत्संगाद्वारे निवारण करून त्यांना आपापसात जोडण्याचे व भेदाभेद नष्ट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रोज किमान १६ ते १८ किलोमीटर अंतर जास्तीत जास्त जनतेसोबत पायी चालून, येणाऱ्या गावात मुक्काम करावा. सायंकाळी सर्वधर्मीयांचा सत्संग घ्यावा. प्रत्यक्ष संपर्कातून माणसे जोडत जावीत त्यांना समजून घेऊन आपल्या परीने योग्य असे मार्गदर्शन करावे. असा दिनक्रम रोजच सुरू आहे.

जनतेच्या आशा-अपेक्षा सरकार किंवा समाजापर्यंत पोहोचविणे हा देखील या पदयात्रेचा उद्देश आहे. प्रथमच एक योगी श्री एम यांनी पुढाकार घेऊन तळागाळातील माणसाच्या जडणघडणीसाठी हा प्रयत्न चालविला आहे. आपल्या आध्यात्मिक परिपूर्णतेचा समाजाला आणि देशाला फायदा व्हावा म्हणून हा पदयात्रेचा प्रपंच आहे. चालणे मानव उत्थानासाठी हे पदयात्रेचे ध्येय आहे.

श्री निवृत्ती महाराज यांचे समाधी स्थळ व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम, लक्ष्मण व सीतेच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले व दक्षिणवाहिनी गोदावरीच्या काठी वसलेले नाशिक क्षेत्र, ज्यांच्या कीर्तीने अकबराला त्यांच्या दर्शनासाठी येथे येण्याचा मोह आवरता आला नाही, असा भद्रकाली नाशिक येथील हजारत सय्यद सादिक शाह हुसैनी बाबा यांचा दर्गा असलेले स्थान, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मियांच्या दर्शनासाठी खुले व्हावे म्हणून आंदोलन केलेले प्रसिद्ध काळाराम मंदिर, अशा या विविध रंगी नाशकातून त्या त्या ठिकाणांना भेट देत योगी श्री एम उर्फ मुमताज अली पदयात्रा प्रवास करणार आहेत. या मानव संधान महायज्ञात आपण सर्वधर्मियांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अशा या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार होण्याचा प्रयत्न करावा. तसेच परिपूर्ण गुरू श्री यांच्या सत्संगाचाही लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते कुठे? खड्डेच खड्डे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर​ जुन्या बस स्थानक परिसरात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनधारकांना येथून ये-जा करण्यासाठी तर मार्ग शोधावा लागत आहे. पायी चालतांना तर नागरिकांना उड्या मारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रशासानाने मात्र दसऱ्यापर्यंत थांबण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

देवळालीतील रिक्षाचालक, कामानिमित्त येणारे ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी वर्गास खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात दिवसभर चालणारी विविध कामे या रस्त्यामुळे सुरळीत होत असतात; मात्र या परिसरात निर्माण झालेल्या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करतांना कसरत होत आहे. देवळालीच्या वर्दळीच्या भागात असे खड्डे निर्माण होत असल्याने प्रशासनाने केलेल्या कामाबाबत नागरिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे.

देवळाली कॅम्प परिसरात एकही रस्ता खड्ड्यांशिवाय राहिलेला नाही. सुमारे आठवडाभर झालेल्या पावसामुळे परिसरातील खड्ड्यांची दैना झाली आहे. या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अनेकांना पाठीचे आजारही जडले आहे. पावसाळ्यात तर रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. रस्त्यावरून मार्ग शोधतांना वाहनचालकांची कसरत होत आहे.

खड्ड्यात वृक्षारोपण

सिडको : अंबड एमआयडीसीतील रस्त्यांचे महापालिका डांबरीकरण करीत नसल्यामुळे युवा साम्राज्य फाऊंडेशनतर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अंबड एमआयडीसीतील सर्व अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे वाहने चालविणे कठीण झाले आहे. याप्रश्नी 'आयमा'तर्फे महापालिकेकडे नेहमी रस्ता दुरुस्तीच्या मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन करण्यात आल्याचे युवा साम्राज्य फाऊंडेशनचे नितिन अमृतकर यांनी सांगितले.

मिठाई स्ट्रीट भागातही खड्डे

देवळालीच्या बाजारपेठेचा प्रमुख रस्ता म्हणून मिठाई स्ट्रीट परिचित आहे. देवळालीत खरेदीसाठी येणारे पर्यटकांना लेव्हीट मार्केटकडे जातांना या खड्ड्यांमधून मार्ग काढीत जावे लागते आहे. तसेच कोंडवाड्याकडे जाणारा रस्ता कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, पोलिस स्टेशन, आनंदरोड, वडनेररोड यांना जोडणारा आहे. या मार्गाचाही वापर नागरिकांकडून केला जातो. तेथील खड्डे बुजविण्यासाठी नगरसेवक व प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

''देवळालीतील खड्ड्यांची समस्या दिवंसेदिवस वाढत आहे. या खड्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करणे आवश्यक होती. मात्र, प्रशासनाकडून तसे कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाही.'' - इम्रान चौहान

''पावसाळ्यामुळे सध्या रस्ते डांबरीकरण व डागडुजीची कामे थांबविली आहेत. दसऱ्यानंतर आम्ही त्वरित कामे सुरू केली जातील. तरी नागरिकांनी थोड्या दिवस सहकार्य करावे.''

- सचिन ठाकरे, उपाध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी महिलांना एकात्मिक शेतीचे धडे

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडत आता महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीची भरारी घेत आहे. काम करण्‍याची धमक आता महिलांमध्येही निर्माण झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत चाकोरे हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी खेडे दत्तक गाव म्हणून घेण्यात आले. येथील महिलांना एकात्मिक शेती पद्धतीचे नुकतेच धडे देण्यात आल्याने येथील आदिवासी महिलांमध्ये चैतन्य फुलू लागले आहे. निमित्त होते ते आदिवासी महिलांच्या अभ्यास दौऱ्याचे.

मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान टाळून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळावे, तो स्वावलंबी बनावा या हेतूने कार्यरत असलेल्या या केंद्रात केवळ राज्यातीलच नव्हे, तर अन्य राज्यांतील शेतकरीही मोठ्या प्रमाणात येतात. त्यात आता महिलाही मागे राहिल्या नाहीत. त्याही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन भक्कमपणे शेती व्यवसायाला बळ देत आहेत. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याची भूमिका बजावणाऱ्या कृषिविज्ञान केंद्राने चाकोरे येथील आदिवासी महिलांची नुकतीच शैक्षणिक सहल कोसबाड (ता. पालघर) आयोजित केली होती. या अभ्यास दौऱ्यात परसबागेतील सुधारित कोंबडीपालन, फळरोपवाटिका, भाताच्या विविध लागवड पद्धती, शेळी पालन, गांडूळखत प्रकल्प, मधुमक्षिकापालन, यासारख्या प्रकल्पांना या वेळी भेटी देण्यात आल्या.

कोसबाड येथील गृहविज्ञान विशेषज्ञ रुपाली देशमुख व कीटकशास्र तज्ज्ञ उत्तम सहाणे यांनी अभ्यास दौऱ्यादरम्यान तंत्रज्ञानाबाबत महिलांना शास्रोक्त मार्गदर्शन केले. कोसबाड भागातील आदिवासी महिलांच्या बचत गटांच्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी घेण्यात आली.

कृषि विज्ञान केंद्राने चाकोरे, ता. त्र्यंबकेश्वर गाव हे 'एकात्मिक शेती पद्धती' या पथदर्शी प्रकल्पासाठी दत्तक गाव म्हणून निवडले आहे. या प्रकल्पांतर्गत गावातील शेती व शेतीपूरक व्यवसायात शाश्वत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतानाच त्यांचे उत्पादन वाढविण्याचा या केंद्राचा प्रयत्न आहे. त्यासाठी या गावात आंबा लागवड, चारसूत्री भातशेती, भात, नागली, खुरासणी यासारख्या पिकांच्या सुधारित जातींची लागवड, माती-पाणी परीक्षण, परसातील कोंबडीपालन, शेळी वंशसुधार कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. याबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात महिला बचत गट स्थापन करून त्यांना परसबाग, फळे भाजीपाला व तृणधान्य यांच्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे, महिलांचे श्रम कमी करण्यासाठी सुलभ कोळपणी यंत्र (कोनो विडर), लक्ष्मी विळे इ. प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत.

महिलांना इतर भागातील तंत्रज्ञान अभ्यासतानाच ते आत्मसात करता यावे या उद्देशाने अभ्यास दौऱ्याच्या समन्वयक व कृषिविज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विशेषज्ञ अर्चना देशमुख यांनी आदिवासी महिलांना अद्ययावत माहिती मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेतच देणार उत्तर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सिंहस्थ आराखड्यात घुसविण्यात आलेल्या जादा विषयातील २१ कोटी २७ लाख रुपयांच्या कामांचा विषयांवर भाष्य करण्यास आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नकार दिला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात आपल्याला पडायचे नसून, या विषयाबाबत आपण महासभेतच उत्तर देवू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक कागदावर सही करताना आपण पडताळणी करतो असे सांगत, आपण चुकीचे काहीच करत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता महासभेतच हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अतिरिक्त कामांसाठी ९ जून रोजी महासभेत जादा विषयामध्ये तब्बल २१ कोटी २७ लाखांची कामे मंजुरी देण्यात आली असून, यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धुराळा उडाला आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच्या महापौरांवर खापर फोडून मोकळे झाले आहेत. हा विषय आता चांगलाच वादग्रस्त बनला असून, यावरून सत्ताधाऱ्यांकडे संशयी नजरेने पाहिले जात आहे. सत्ताधारी नगरसेवक यशवंत निकुळे आणि अनिल मटालेंच्या उपसुचनेवर जादा विषयात मंजुरी दिल्याने सत्ताधारी की, प्रशासन असा संशय निर्माण झाला आहे.

आयुक्तांनी मात्र आता या विषयात न पडण्याचा आपला पवित्रा जाहीर केला आहे. पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी या विषयावर आपल्याला जे काही सांगायचे आहे ते आपण महासभेतच मांडू अशी भूमिका घेतली आहे. आपण कोणतेही काम चुकीचे करत नसून, पडताळणी केल्यानंतरच कागदांवर सह्या करतो असे सांगत, या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा विषयावरील संशयाचे मळभ आता महासभेतच दूर होण्याची शक्यता आहे.
काम नियमानुसारच

साधुग्रामच्या स्वच्छतेच्या ठेक्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल बोलताना डॉ. गेडाम यांनी सध्या सुरू असलेले स्वच्छतेचे काम नियमानुसारच असल्याचा दावा केला आहे. पहिल्या ठेकेदारांना मूळ निवीदेतील अटी शर्तीनुसारच काम देण्यात आले आहे. त्यामुळे रामकुंड व शाही मार्गावरील कर्मचाऱ्यांना साधुग्रामचे काम देण्यात आले आहे. आपल्या ठेका देण्याचा अधिकार असून, हा न्यायालयीन वादात अडकला आहे. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर कालावधी कमी करून दुसऱ्याला ठेका देता येईल, असे त्यांनी स्पष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्काईप'द्वारे गुरूशिष्य नाते ऑनलाइन

$
0
0

फणिंद्र मंडलिक

'गुरूने दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा' असे म्हणणाऱ्या शिष्यांना आपल्या गुरूशी सतत संपर्कात रहाता यावे यासाठी नाशिकचे ज्येष्ठ तबला गुरू सुजीत काळे यांनी स्काईपद्वारे तबला शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. आधुनिक काळात गुरू शिष्य परंपरेचे हे नाते अधिक दृढ होत असून, विविध देशामध्ये त्यांचा शिष्य परिवार पसरला आहे.

गुरू शिष्यांचे नाते अनादी काळापासून वर्णले गेले आहे. प्रत्येक शिष्याला आपलाच गुरू प्रिय असतो. त्याच गुरूकडून ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी तो जीवापाड मेहनत करीत असतो. मात्र काही कारणाने दुरावलेल्या शिष्यांना गुरूची प्रतिमा समोर ठेवून पूर्वी ज्ञान प्राप्त करावे लागत असे मात्र इंटरनेटच्या युगात स्काईप हे माध्यम गुरू शिष्यांसाठी वरदान ठरत आहे. तबला गुरू सुजीत काळे हे आपल्या देश विदेशातील शिष्यांना स्काइपद्वारे तबला शिक्षण देत असून, शिष्यांपर्यंत पोहचण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरत आहे.

नाशिकमध्ये अनेक ठिकाणी सुजीत काळे यांचे तबला वादनाचे वर्ग सुरु आहेत. याच वर्गातील एका विद्यार्थ्याच्या पालकांची हैद्राबादला बदली झाली. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेले तबल्याचे शिक्षण खंड‌ित झाले. या विद्यार्थ्याला तबल्याचे शिक्षण कुठे सुरु ठेवावे असा प्रश्न निर्माण झाला. विद्यार्थ्याने हैद्राबादला गेल्यावर तेथील गुरूंकडे तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, मात्र तेथील शिकवण्याची पध्दत व काळे सरांची शिकवण्याची पध्दत यात खुपच फरक पडल्याने विशारदपर्यंत आलेले शिक्षण कसे पूर्ण करायचे असा प्रश्न विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांना पडला. अनेक वेळा फोनच्या माध्यमातून तो सोडवण्याचा देखील प्रयत्न केला गेला. तसेच दर आठवड्याला हैद्राबाद ते नाशिक प्रवास करणे शक्य नव्हते म्हणून त्या विद्यार्थ्याच्या आईने स्काइपद्वारे शिक्षण घेता येईल का? याची चाचपणी केली, तंत्रज्ञानाची जोड संगीताला मिळाल्याने हे माध्यम अत्यंत यशस्वी ठरले.

मुळचा फ्रेंच व सध्या बर्लीन येथे राहणारा निकोलस पेतीत दान हा देखील काळे यांच्याकडून स्काईपद्वारे तबल्याचे शिक्षण घेत असून, लवकरच तो गांधर्व महाविद्यालयाची विशारद ही परीक्षा पूर्ण करणार आहे. त्याचप्रमाणे हंगेरी बुडापेस्ट येथील नॉबर बॅलॉग हा तबला वादक सुजीत काळे यांच्याकडून वादनाचे धडे घेत आहे. अमे‌रिकेच्या सिएटल शहरात राहणारे मूळ भारतीय असलेले अनुज बन्सल हे देखील तबला शिक्षण

घेत आहे. कान्सास येथील निल देशपांडे यांनी विशारद पूर्ण केले असून, ते संगीतात उच्च शिक्षण घेत आहेत. शास्त्रीय तबल्याचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या विदेशातील संगीतकारांमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, स्काईप हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरत आहे.

काय आहे स्काईप

दोन कम्प्युटरला कॅमेरा आणि माईक लावलेला असतो त्याद्वारे दोघांना एकमेकांशी ऑड‌िओ व्ह‌िडीओ माध्यमातून संवाद साधता येतो. दोघांनी कम्प्युटरच्या समोर केली कृती व्हिडीओच्या माध्यमातून एकमेकांना दिसते व ऐकूही येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलासाठी केला कीडनीचा त्याग

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

नवा संसार फुलत असतानाच जीवावर बेतलेल्या प्राणसंकटाने अभयभोवती भयाचे सावट उभं राहिलं. अचानक उद्‍भवलेल्या आजारानं त्याच्या एका कीडनीचं प्रत्यारोपण करण्याची वेळ आली. तज्ज्ञ डॉक्टर्स अन् अनेक धडपड्या हितचिंतकांनी प्रयत्न करूनही कीडनी उपलब्ध झाली नाही. शेवटी माऊलीचं ह्रदय पुढं झालं अन् तारूण्यातल्या मुलाला एकाच आयुष्यात पुनर्जन्म देत झालं. आई माझा गुरू... आई कल्पतरू...सौख्याचा साखरू... या साने गुरुजींच्या ओळींची आठवण करून देणारी कहाणी आहे अभय यांची.

माऊलीरूपी गुरूच्या कृपादृष्टीच्या अनोख्या अनुभवाने अभय भारावून गेला आहे. गुरूपौर्णिमेच्या कालावधीतच त्याच्या माऊलीने त्याला नव्याने जीवदान दिलंय. यामुळे आईरूपी गुरूच्या चरणांवर नेत्राभिषेकापल्याड करण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही, अशी अभयची आईविषयी कृतज्ञतेची भावना आहे. प्राणांशी झुंजणाऱ्या काळजाच्या तुकड्याच्या पाठीशी ही माऊली खंबीरपणे उभी राहिली. अन् आईरूपी गुरूसावलीने काळालाही माघार घ्यावी लागली. मुलासाठी धडधाकट शरीरातील अवयवाचा त्याग करण्याची वृत्ती दाखवून या मातेने गुरूपौर्णिमेस भारतीय परंपरेतील दातृत्ववान दधिची ऋषिंचीच आठवण करून दिली आहे.

मेरी परिसरात राहणाऱ्या मिना अराळकर यांची अभय हा मोठा मुलगा. त्याचं गेल्याच वर्षी लग्न झालं असून, तो एबीबी कंपनीत वित्त अधिकारी पदावर नोकरीला आहे. लहानपणापासूनच त्याला पोटात दुखत असे. लग्न झाल्यानंतर जास्तच त्रास होऊ लागल्यानं त्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आलं. डावी कीडनी छोटी आणि उजवी कीडनी मोठी असल्यानं कीडनी प्रत्यारोपण करावं लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. नाशिकसह पुणे, मुंबई अशा शहरांमधल्या मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. मात्र, कीडनी बदलावीच लागेल असं या सगळ्यांच मत झालं. अखेर कीडनी प्रत्यारोपण करण्याचं ठरलं. अभयला मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

अन् कीडनी मॅच झाली...

अभयचा रक्त गट ए निगेटिव्ह असल्यानं त्याच्या रक्तगटाची कीडनीच त्याला मिळे ना. अनेक मोठ्या संस्थांशी चर्चा करूनही उपयोग झाला नाही. अखेर त्याची आईच गुरू होवून पुढे आली. डॉक्टरांच्या तपासणीत आईची कीडनी मुलाला मॅच होणारी अढळली. डॉक्टरांनी अभय व त्याच्या आईला याबाबत विचारलं. अभयचे डोळे पाणावले. आपल्या आईची कीडनी वापरून आपल्याला जिवदान नको, असंही तो म्हणू लागला. मात्र आईचंच ह्रदय ते... कोणताही विचार न करता अभयच्या आईनं तिची कीडनी १४ जुलैला अभयला दिली आणि तब्बल आठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अभयला जिवदान मिळालं. आईच त्याचा गुरू झाल्यानं त्याला दुसरा जन्मच मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीसाठी साधूंचाही टाहो!

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

टोलच्या जाच्याला कंटाळलेल्या नागरिकांची ओरड आता नवीन राहिलेली नाही. आपले उद्दिष्ट्य पूर्ण झाल्यानतंर राजकीय पक्षही याबाबत आखाडात हात घेतात. त्यामुळे 'रोजचे मरे त्याला कोण रडे', अशी टोल प्रश्नाची परिस्थिती आहे. यात आता कुंभमेळ्यासाठी दाखल झालेले साधू-महंतही सहभागी झाले असून भाजप सरकारने तातडीने टोलमुक्त धोरण अवलंबावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते आहे.

इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक टोलनाके लागले. वसुलीची पध्दत मुघल साम्रज्यापेक्षाही चिंताजनक असल्याची टीका नुकतेच हरियाणा येथून आलेल्या कमलदास महाराज यांनी केली. तर, भाजप सरकारने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भक्तांना टोलमाफी ​​जाहिर करून पुनश्चः आशीर्वाद प्राप्त करावेत, असे दिंगबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज यांनी सूचवले. अनेक वर्षांपासून सर्वसामन्यांसाठी डोकेदुखी ठरलेला टोलचा प्रश्न आता कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंताच्या मानगुटीवर बसू पाहतो आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शेकडो वाहने विविध मार्गाने शहरात दाखल होत असून कोणत्याही मार्गावरून आल्यास टोलशिवाय पर्यायच नसल्याचे कमलदास महाराजांनी स्पष्ट केले. अंतर आणि पैशांमध्ये मोठी तफावत असून देशातील इतर राज्यात वेगळी परिस्थिती असल्याचा दावा कमलदास महाराजांनी केला. आखाड्याचे मोठे ट्रक, भक्तांची वाहने टोल असलेल्या रस्त्यावरून येत असून तुघलकी वसुलीच्या या प्रकाराकडे भाजपा सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी कमलदास महाराजांनी केली. दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराजांनी सुध्दा याबाबत नाराजी व्यक्त करून कुंभमेळा हे महत्त्वाचे पर्व असल्याची आठवण करून दिली.

दुसऱ्या धर्मातील लोकांना सरकारकडून सवलतीचे वाटप होत असताना आपल्याच देशातील सर्वांत मोठ्या उत्सवासाठी पदोपदी पैसा खर्च करावा लागतो, हे खेदजनक असल्याचे मत वैष्णवदास महाराजांनी व्यक्त केले. तसेच भाजप सरकारने याची तातडीने दखल घेऊन कुंभमेळ्यासाठी दाखल होणाऱ्या साधू-महंतांना, तसेच कुंभमेळ्याच्या तयारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमुक्त करावे अशी मागणी वैष्णवदास महाराजांनी केली.

''साधू-महंतांना प्रशासनाने काही पास दिले आहेत. त्या पासची दखल कोठेच घेतली जात नाही. टोलसाठी सर्वांचे हजारो रुपये खर्ची पडत असून असा वसुलीचा प्रकार मुघल तसेच इंग्रज काळात देखील होत नव्हता. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.''

- वैष्णवदास महाराज, महामंत्री, दिगंबर आखाडा

कुरूक्षेत्र ते नाशिक असा १ हजार ६०० किलोमीटरच्या प्रवासात टोल वसुलीचा सर्वाधिक त्रास महाराष्ट्रात झाला. मध्य प्रदेशमध्ये टोल प्रशासनाने सहकार्य केले. मात्र, महाराष्ट्रात सक्तीने वसुली केली जाते. हा प्रकार त्रासदायक ठरतो आहे.

- कमलदास महाराज, दिगंबर अनी आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमे कुछ लेना देना नही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वस्त्रांतरगृह पाडा किंवा पाडू नका. याठिकाणी महिलांना वस्त्र बदलण्यासाठी पुरेशी जागा नसल्याच्या तक्रारी असल्या तरी याच्याशी आम्हाला कोणतेही घेणे देणे नसून आमच्या सूचना फक्त शाही मार्गाशी निगडीत आहेत, असे स्पष्ट करीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी गुरुवारी रामकुंडावरून काढता पाय घेतला.

नवीन शाही मार्गाची आखणी झाल्यानंतर प्रथमच तिन्ही आखाड्यांचे प्रमुख असलेले श्री महंत आणि ग्यानदास महाराजांनी संयुक्तपणे शाही मार्गाची पाहणी केली. जुना आडगाव नाका येथून सुरू झालेली पाहणी दोन तासापेक्षा अधिक वेळ चालली. पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर आलेली गोठ्याची भिंत पाडणे, बकाल ठिकाणी पडदा लावणे, गणेशवाडी येथील मुंजोबा चौकातील रस्त्यावर आलेल्या वायर काढणे, झाडाच्या फांद्या तोडणे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्यात.

या दौऱ्यात महंत ग्यानदास यांच्या समवेत दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत राम​किशोरदास महाराज, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत धरमदास महाराज यांच्यासह दिगंबर आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज, भक्तिचरणदास महाराज आदी उपस्थित होते. आखाड्यांकडून झालेल्या पाहणीनंतर समोर आलेल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) पुन्हा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचे ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केले.

रामकुंड येथे पाहणी करताना महाराजांनी विवादास्पद ठरलेली वस्त्रांतरगृहाची इमारत पाडण्याबाबत मौन धरले. महिलांना वस्त्र बदलण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्याच्याशी आम्हाला घेणे देणे नसल्याचे ग्यानदास यांनी म्हटले. हा स्थानिक प्रशासनाचा प्रश्न असून हा दौरा फक्त शाही मार्गाची पाहणीपुरता मर्यादीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गाडगे महाराज पुलावर निघणार तोडगा

शाही मिरवणूक गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाखालून रामकुंडाकडे येणार आहे. याठिकाणी सध्या भर टाकण्याचे काम सुरू असून महंत ग्यानदास यांना याठिकाणी उतार अपेक्षित होता. पुलाची उंची १९ फुट इतकी असून रथ आणि ध्वज येथून जाण्यासाठी २५ फुट इतकी जागा हवी. यामुळे ५ ते ६ फुट खोल रस्ता केल्या गेल्यास रथ जाऊ शकतात. याउलट याठिकाणी प्रशासनाने भर टाकून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू केले आहे. पाहणी दरम्यान उपस्थित झालेल्या ठेकेदाराने रस्त्याला खोली होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर सर्वच साधू-महंत संतप्त झाले. रामरथावेळी पावसाळा नसतो. त्यामुळे येथे खोली तयार करण्यात येते. मात्र, आता पावसाळा असून पाणी जमा होण्याची भीती ठेकेदाराने व्यक्त केली. त्यावर, ठेकेदाराने मांडलेले मुद्दा गौण असून अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यासाठी आल्यानंतर त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामनाम की नही रुकेगी माला!

$
0
0

ज‌ितेंद्र तरटे , नाशिक

'राम नाम वह अलौकीक नदीयां है, उसमे हर कोई नही नहाता! गुरू कृपा से यहं नाम की माला मिली! चोबीसो घंटे खडे खडे जाप करते जीवन के २७ साल कब निकल गये पताही नही चला! यहं साधना कब तक चलेगी पता नही! अब तो सासोकी माला रुकेगी... नामकी कभीभी नही!', हे उदगार आहेत उत्तर प्रदेशातील तरुण संन्यासी मुनींद्रदास यांचे. कुंभाच्या पर्वणीसाठी मुनिंद्रदासजी तथा श्री श्री योगिराज महात्यागी हे संन्यासी आले आहेत.

सेलिब्रेटी साधू महंतांच्या चर्चा जागोजागी रंगल्या असताना अन् जागेसारख्या मुद्यावरून आखाड्यांमधील वाद चव्हाट्यांवर येत असताना मितभाषी, श्वेतवश्रधारी खडे महाराजांची अपेक्षा मात्र उभं राहण्यासाठी जागेच्या पलिकडे अजिबात नाही. पोटाशी बांधलेल्या श्वेत झोळीमधील माळेवर सुरू असणाऱ्या नामजपात कुठलीही बाधा यायला नको, येवढेच त्यांच्या दिनचर्येतील ध्येय आहे. या ध्येयाच्या रक्षणासाठी २७ वर्षातील प्रत्येक रात्रही त्यांनी उभ्याने नामजप करीत काढलीय अन् शरीरानेही नामावर मन एकाग्र करावं यासाठी प्रसंगी बारा वर्षे पाण्याशिवाय राहण्याचे खडतर व्रतही यापूर्वी त्यांनी पचविले आहे. सद्यस्थितीतही नामापेक्षा अन्नाला जास्त महत्त्व नको यासाठी अल्प फलाहारा पल्याड अन्नाची वासना हा महंताकडे नाही.

उत्तर प्रदेशातील जुनागढ जिल्ह्यातील एका हनुमान मंदिरात त्यांचे सेवाकार्य अहोरात्र सुरू असते. देशकालातील सद्य सामाजिक स्थितीविषयी त्यांचे चिंतनही सखोल आहे. सत्यत्व हा सर्वात मोठा धर्म असल्याचे ते सांगतात. तर आचार अन् विचारापासून धर्मही बहुतांशी भरकटत चालल्याचे वास्तव मान्य करताना ते खंतही व्यक्त करतात. साधुत्वाची व्याख्या मांडताना, 'जो त्यागीच आहे, त्याने जगातल्या कुठल्या उणिवांबद्दल बोलावे ? कुठल्याही स्थितीत ज्याचे समाधान अन् आनंद भंगत नाही तोच साधुत्वाच्या मार्गावरचा प्रवासी आहे', असही तत्वज्ञान खडे महाराज उभ्या उभ्या पुटपुटूत जातात.

दिगंबर आखाड्याच्या परंपरेतील मुनींद्रदास यांना गुरू महामंडलेश्वर बजरंगदास त्यागी यांच्याकडून संन्यास धर्माची दीक्षा मिळाली होती. महात्यागी महाराज यांचे अयोध्या आणि ओंकारेश्वरीही आश्रम आहेत. देशात अद्यापही नाना पंथ अन् नाना संप्रदायांची निर्मिती होते आहे. माणसाची मने रंगबेरंगी निशाणांखाली दुभंगत भेदाभेद निर्माण करताहेत, यासारख्या सामाजिक निरीक्षणांपासून तर भारतातील भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरही मार्मिक बोधकथा अन् दुर्मिळ दोह्यांच्या संदर्भाने ते कठोर भाष्य करतात. भारतासमोरील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी अखंड भारताची संकल्पना या संन्यासी महाराजांना रुचते. भारतासमोरील सामाजिक आव्हानांवर त्यांना अखंड भारत हेच एकमेव उत्तर वाटते.

रामनाम के सिंवाह कुछ नही

'हमे, चिलीम भी चाहीये तो हमं मुहं से किसीको मांगते नही! अगर किसीने दिया तो जरूरत से ज्यादा लेते नही!' हे जगण्याचं तत्व ते मांडत असताना, आपको कुछ चाहीये क्या? या प्रश्नावर ते उत्तरतात, 'हमे रामनाम के सिंवाह कुछ चाहीये भी नही!' या वाक्याबरोबर त्यांच्या बाजूने थांबलेला संवाद नामाची अदृश्य धारा नकळत पकडत पुटपुटत अंतर्मुख होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटीचा आज फैसला

$
0
0

. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराच्या संभाव्य विकासाचा वेध घेणारे आणि रोजगार निर्मितीवर भर देणारे सादरीकरण गुरूवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी उच्चाधिकार समितीपुढे केले आहे. त्यामुळे स्मार्टसिटीच्या यादीत नाशिकच्या समावेशाची शक्यता बळावली आहे.

राज्यसरकारतर्फे शुक्रवारी राज्यातील दहा शहरांची निवड करून त्याची शिफारस केंद्रसरकारला केली जाणार आहे. रोजगार निर्मितीसह धार्मिक, वाईन, नैसर्गिक हवामान, साहसी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने नाशिक उपयुक्त असल्याचे सादरीकरण आयुक्तांनी या समितीपुढे केले आहे.

राज्य सरकारतर्फे केंद्राच्या स्मार्टस‌िटी योजनेसाठी राज्यातील दहा शहरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी बुधवार आणि गुरूवार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे राज्यातील २० शहराचे प्रस्ताव सादर झाले आहेत. त्यातून दहा शहरांचीच निवड केली जाणार आहे. गुरूवारी महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनी महापालिकेच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले आहे. नाशिकचा विकास हा हवामान, पर्यटन, शेती आणि उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्यामुळे या उद्योगांना चालना देण्यासह पुढील पाच वर्षात रोजगार निर्मिती आणि आयटी इंडस्ट्र‌ीजचे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सादरीकरण केले. यात पॅनसिटी प्रोजेक्ट अंतर्गत पूर्ण शहराला फायदा पोहचेल असा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पाणीपुरवठा, मलजलशुद्रीकरण प्रकल्प, सार्वजनिक परिवहन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे नेटवर्क या विषयांवर काम केले जाणार आहे. तर विभागनिहाय प्रकल्पामध्ये सर्व सोयींनी सुसज्ज अशा छोट्या शहराची निर्मिती करावयाची असल्याचे आयुक्तांनी समितीसमोर सांगितले. शुक्रवारी हे प्रस्ताव सादर करण्याची अंत‌िम मुदत होती. राज्याकडून २० पैकी १० शहरांची निवड करून ते केंद्राला सादर केले जाणार आहेत.

प्रस्तावांची केंद्राकडून होणार पडताळणी

महापालिकेतर्फे उत्पन्न वाढीचे नवे प्रकल्पही यात सादर करण्यात आले आहेत. मालमत्ता करातील त्रुटी दूर करणे, वॉटर टॅक्सचे ऑडिट, इमारतींना परवानग्या देतानाचा महसूल गृहीत धरण्यात येणार आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावावर समिती आपला विचार करून तो केंद्राला पाठवणार आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावाने समितीही प्रभावीत झाली असून, तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे नाशिकची राज्यसरकारमार्फत तरी निवड निश्चित मानली जात आहे. राज्याच्या प्रस्तावानंतर केंद्राकडून या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतरच शहरांची निवड केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images