Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गांधी तलावामध्ये उतरल्यास कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही पर्वणीसाठी रामकुंडावर येणाऱ्या भाविकांनी गांधी तलावात डुबकी मारली. यापैकी एका भाविकाचा हाकनाक बळी गेला असता. गांधी तलाव खोल असून याठिकाणी दुघर्टना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या शाही पर्वणी दरम्यान याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवून हुल्लडबाजी करणाऱ्या भाविकांवर थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा, पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी दिला.

पहिल्या शाही पर्वणीत रामघाट परिसरात स्नानादरम्यान काही विपरित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गांधी तलावत देखील भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली. गांधी तलावात दिवसभरात दोन तरुणाचा जीव धोक्यात आला. तेथे हजर असलेल्या स्वयंसेवकांनी पाण्यात बुडत असणाऱ्या तरुणांना वाचवले. गांधी तलावात आंघोळ करणाऱ्यांमध्ये तरुण मुलांची विशेष गर्दी होती. अशावेळ उत्साही असणाऱ्यांना आटोक्यात आणणे कठीण होते. तसेच नदीला पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंदाज घेता येत नाही आणि अपघाताना निमंत्रण दिले आते. अशा कारणांमुळे गांधी तलाव जीवघेणा ठरू शकतो. स्थानिक तरुणांनी गर्दी केल्यामुळे भाविकसुध्दा खोल पाण्यात उतरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांची घरवापसी सुरू

0
0

रामकुंडावर स्नान न झाल्याने नाराजीचा सूर

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या निमित्ताने देशाभरातून नाशिकमध्ये दाखल झालेल्या सुमारे २ लाख भाविकांनी रविवारी सकाळपासून आपापल्या घराकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केली. आलेल्या ६० टक्के भाविकांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि एसटीद्वारे परतीचा मार्ग धरला.

ऐन राखीपौर्णिमा सणाच्या दिवशी आलेल्या पहिल्या शाहीपर्वणीला नाशिककरांनी विशेष साधण्यासाठी देशभरातून सुमारे सव्वा दोन लाख भाविक नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यातच अनेकांचे रक्षाबंधन साजरे झाले नसल्याने किमान पोळ्यापर्यंत आपला घरी पोहचण्यासाठी पर्वणीत आलेल्या भाविकांनी आग्रह धरला आहे. ऐन रामकुंडापर्यंत केवळ जुन्या जाणत्या भाविकांना दाखल होता आले. मात्र, आता गर्दीतून वाट काढीत भाविकांची पावले रेल्वे स्टेशन आणि एसटी स्थानकाच्या दिशेने वाळू लागली आहेत. रविवारी पहाटेपासूनच ‌आपल्या गावाकडे जाण्यासाठी कोणती वाहने आहेत? त्यांच्या वेळा जाणून घेण्यासाठी भाविकांची रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकाच्या इनक्वायरी विंडोवर गर्दी दिसून आली.

वाहनांसाठी भाविकांना प्रदीर्घकाळ प्रतीक्षा

पंचवटी : कुंभमेळ्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांना प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसल्याने बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. पंचवटी परिसरातील विविध बसथांब्यांवर ताटकळत उभे रहावे लागले.

भंगारवाल्यांचीही पर्वणी

पर्वणी आटोपल्यानंतर भाविकांना सामाजिक आणि सेवाभावी संस्थांकडून ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्याचे वितरण करण्यात आले होते. या रिकाम्या झालेल्या बाटल्या गोळा करण्यासाठी रविवारी भंगार व्यवसाय करणाऱ्या मुलांनी गर्दी केली. त्यांनी गोळा केल्या या बाटल्यांमुळे परिसरात आपोआप स्वच्छताही झाली.

रामघाट नही, समशान घाट आ गये।

पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, या हेतूने प्रशासनाने शहराच्या विविध भागात प्रति रामघाट उभारले. देशभरातून आलेल्या भाविकांना रामघाटाची ओढ होती. मात्र, त्यांना गर्दीचे नियोजन म्हणून नाशिकरोडजवळील दसक तसेच टाकळी येथील घाटांवर स्नान करावे लागले. याबद्दल भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. टाळकुटेश्वर घाटावरून स्नान करून परतणाऱ्या काही भाविकांनी तर 'जाना था रामघाट, पोहचा दिया स्मशानघाट!' अशी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.

नासिकवालोने हमे फसायाँ

'कैसी रहा कुंभ की पर्वणी?' असा प्रश्न विचारल्यास अनेक भाविकांच्या तोंडातून तीव्र भावना व्यक्त करणारे शब्दात बाहेर पडले. 'नासिकवालोने हमें फसायाँ, रामघाट बताकर अलग-अलग जगह पर स्नान करवाया।' अशी उत्तरे देत त्यांनी मनातील खदखद बोलून दाखविली. काही भाविकांनी गोदावरीत स्नान करालया मिळाल्याने पदरी पुण्य पाडल्याने धन्य झाल्याचेही सांगितले. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार अशा परराज्यांसह महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेड, वाशीम, जालना, सोलापूर, बीड अशा जिल्ह्यांमधूनही भाविक आले होते. आता त्यांच्यापैकी बहुतांश जणांनी रेल्वेचा पर्याय निवडत घराची वाट धरली.

पार्किंग गजबजलेच नाही

पंचवटी : के. के. वाघ कॉलेजसमोर उभारण्यात आलेल्या पार्किंगकडे रविवारी कोणीही फिरकलेच नाही. वाहने उभी करण्यासाठी तीन भले मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. परंतु, कोणीही तेथे आले नाही. त्यामुळे या पार्किंगसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च प्रशासनाच्या माथी पडल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीस्नानासाठी कावनई सज्ज

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ कावनई येथे शाहीस्नानाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे आलेले साधू-महंत श्रीक्षेत्र कावनई येथे कपिलधारा तीर्थावर गर्दी करू लागले आहेत. येथे ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाहीस्नानाच्या नियोजनाची व पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली. आज, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

महंत हेमंतदासजी यांच्या नेतृत्वखाली आलेल्या शिष्टमंडळाने श्री क्षेत्र कपिलधारा कावनई परिसराची पाहणी केली. येथील शाहीस्नानास जगतगुरू, महंत, श्रीमहंत, महामंडलेश्वर मोठ्या संख्येने येणार असल्याने तसेच लाखो भाविकांची गर्दी होणार असल्याने सूक्ष्म नियोजनासाठी कपिलधारा ट्रस्ट, महसूल यंत्रणा व पोलिस यंत्रणा व्यस्त आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वरचे पहिले शाहीस्नान पार पाडल्याने अनेक महंत, साधू व भाविकांनी श्री क्षेत्र कावनई कपिलधारा येथे स्नानासाठी गर्दी केली आहे. त्यात उद्या श्रावणी तिसरा सोमवार असल्याने या गर्दीत मोठी वाढ होणार आहे. कावनईतील शाहीस्नानाच्या नियोजनासाठी महंत ग्यानदास महाराज यांचे शिष्य महंत हेमंतदास, महंत जगदीशदास, श्रीमंत मिश्राजी आदींच्या पथकाने शाहीमार्ग, पार्किंग व्यवस्था, तीर्थकुंड व मंदिर परिसराची इत्यंभूत माहिती घेऊन पाहणी केली.

या पथकाने कावनई कपिलधारा तीर्थाचे महंत रामनारायणदास फलाहारी महाराज यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी फलाहारी महाराज यांनी आलेल्या नियोजन पथकाचा सत्कार केला. कपिलधारा ट्रस्टचे पदधिकारी कुलदीप चौधरी, दीपक मंगे, पंकज काळे, मनोज बांगर, भरतभाई पटेल, संजय गौड, उडिया महाराज, मगनभाई पटेल, सोमनाथ सूर्यवंशी, किसनलाल कुमट, ज्ञानेश्वर भागवत आदींनी नियोजन कामी पुढाकार घेतला. आज कपिलधारावर स्नानासाठी जिल्ह्यातील शेकडो साधू व भाविक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यात राजस्थान येथील ग्यानमुनी व त्यांच्या समर्थकासह गर्दी केली होती.

पार्किंग व भोजन व्यवस्था

गेल्या दोन दिवसापासून वाढती गर्दी लक्षात घेता पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, आगामी काळातही भोजन व्यवस्था महिनाभर कायम राहणार आहे, अशी माहिती कपिलधारा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी, कुशावर्त पाण्याची होणार तपासणी

0
0

नामदेव पवार, सातपूर

सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी आटोपल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. राज्य प्र‍दूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पुढील शाही स्नानासाठी आणि आता येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गोदावरी नदीसह कुशावर्तातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याबाबतचा अहवाल येत्या पाच दिवसांत मिळणार आहे.

महाकुंभाच्या शाहीस्नानात सहभागी झालेल्या भाविकांच्या आरोग्याला पाण्यापासून आरोग्यास धोका पोहचवू नये या हेतूने 'एमपीसीबी'कडून वेळोवेळी पाण्याचे नमुने घेण्यात आले. दरम्यान शनिवारी झालेल्या पहिल्या शाही स्नानानंतर 'एमपीसीबी'ने पुन्हा त्र्यंबकेश्वरमधील तीन ठिकाणी तसेच नाशिकमधील रामकुंडासह सहा ठिकाणी जाऊन तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी घेतलेल्या तीन ठिकाणांमध्ये कुशावर्तसह आहिल्या-गोदा संगम व बडा उदासिन आखाडा या ठिकाणांचा समावेश आहे तर नाशिकमधील रामकुंड, व्हिक्टोरिया पूल, तपोवन, दसक-पंचक, संगमपूल व टाकळीघाट येथील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी घेतले असल्याचे 'एमपीसीबी'चे उप-प्रादेशिक अधिकारी रवी आंधळे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. 'एमपीसीबी'ने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची १४ घटक तपासणी केली जाणार आहे. येत्या पाच दिवसांत या पाण्यांचे अहवाल प्रयोगशाळेकडून मिळणार आहेत, असेही आंधळे यांनी सांगितले.

'एमपीसीबी'चे सचिव डॉ. पी. अलबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक अधिकारी विनायक शिंदे, उप-प्रादेशिक अधिकारी संजय भोंसले, अशोक करे यांसह १० फिल्ड ऑफिसर यांनी गंगाघाट व कुशावर्तांवर पाण्याची तपासणी केली. तसेच 'प्लास्टिक मुक्त नाशिक' या अभियानात कापडी पिशव्यांचे देखील वाटप 'एमपीसीबी'कडून भाविकांना करण्यात आले असल्याचे आंधळे यांनी सांगितले.

पहिल्या शाहीस्नान झाल्यानंतर गोदावरी नदी व कुशावर्तातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी 'एमपीसीबी'ने घेतले आहेत. यात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी लॅबमध्ये केली जाणार असून येत्या पाच दिवसांत त्यासंदर्भातील अहवाल मिळणार आहे. - रवी आंधळे, उप-प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या पदरी तरी अवहेलनाच

0
0

प्रतिक गंगेले, कॉलेज क्लब रिपोर्टर

आदेश आला त्याप्रमाणे काम झाले. एकीकडे भाविकांची श्रध्दा आणि दुसरीकडे नोकरी, यात शेवटी नोकरीलाच प्राधन्य देणे योग्य ठरले. यातून मग, भाविकांनी अनेकदा अवहेलना केली. ज्यांच्या जीवासाठी झटलो, त्यांचे हे वागणे बरे नाही. काहीशी ही त्रासिक प्रतिक्रिया आहे, दसक घाटावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस शिपायाची. अशीच भावना कर्तव्यावर असलेले कर्मचारी व्यक्त करीत असून अवहेलना झाली तरी चालेल पण भाविकांचा जीव धोक्यता जाऊ देणार नाही, असे आश्वासन सुध्दा हे कर्मचारी देत आहेत.

कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी सुमारे १५ हजार पोलिस आले आहेत. पर्वणी निमित्त आलेल्या भाविकांसाठी अनेक समाजसेवी संस्थांनी फळे आणि नाश्त्याची सोय केली होती; परंतु बरेच भाविक कचरा आणि केळ्याची सालटे तसेच रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यात फेकून जाताना आढळले. यातून एखादी अपघाताची घटना घडू नये म्हणून बऱ्याच ठिकाणी हा कचरा पोलिस कर्मचाऱ्यांना उचलावा लागला.

दसक सारख्या दूरच्या घाटांवर जेवणाची सोय नव्हती. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांचे अतोनात हाल झाले. विशेष करून महिला पोलिसांना परराज्यातून आलेल्या भाविकांकडून अधिक त्रास झाला. अरेरावी सोबत अश्लील शेराबाजी आणि बंदोबस्ता न जुमानता धक्का-बुक्कीचे प्रकार झाले. दसक घाटावर सांडपाणी वाहत असल्याने भर दुर्गंधीत त्यांना ड्युटी करावी लागत होती.

जबाबदारीची जाणीव

पहिल्या पर्वणीदरम्यान पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच सुजाण नागरिक म्हणून गोदावरीचे पात्र स्वच्छ कसे राहील याकडेही लक्ष दिले. नदीमध्ये हार, दिवे, निर्माल्य विसर्जित न करण्याची विनंती हे पोलिस भाविकांना करत होते. गौरी पटांगण परि‌सरात ड्युटीला असलेले पोलिस भाविकांच्या सुरक्षेसह पात्रातून वाहून येणारे हार प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या काठीने नदीच्या बाहेर काढत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो आश्चर्यम, गोदावरी स्वच्छ!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुणी गोदावरीत मनसोक्त डुंबण्याचा आस्वाद घेत होते तर कुणी घाटावर बसून पोथी वाचनाचा आनंद लुटत होते. कुणी बुडणाऱ्या सूर्याला अर्घ्य देत होते तर कुणी मोबाइलने फोटो काढण्यातच धन्यता मानत होते असा माहोल होता रविवारी रामकुंडाचा. पर्वणीनंतरच्या दुसऱ्या दिवशीही भाविकांचा ओघ कायम राहिला.

कोणतीही प्रशासन व्यवस्था नाही, पोलिसांचे कोणतेही संरक्षण नाही, कोठेही आडकाठी नाही अशा परिस्थितीमध्ये रविवारी हजारो भाविकांनी गोदामातेचे दर्शन घेऊन स्नान केले. पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी रामकुंड परिसर अत्यंत घाण अवस्थेत असतो अशी पूर्वपीठिका असताना रविवारी मात्र अनोखे दृश्य पहायला मिळाले. अत्यंत स्वच्छता, जागोजागी महापालिकेचे कचरा जमा करण्याचे ड्रम व निर्माल्य कलश ठेवण्यात आल्याने भाविकांनाही त्याला उत्स्फूर्त दाद देत त्यातच कचरा टाकला. त्यामुळे गोदाकाठ पर्वणीच्या दुसऱ्या दिवशीही आरशासारखा स्वच्छ दिसत होता. शनिवारी आलेले रक्षाबंधन व पर्वणी या दोन्ही गोष्टी लक्षात घेता पर्वणीला अत्यंत कमी गर्दी केलेल्या नाशिककरांनी दुसऱ्या दिवशी मात्र गोदाकाठी भरभरून गर्दी केली होती. रविवारचा दिवस पाहून भाविकांनी ही पर्वणी साधली.

सेल्फी घेणाऱ्यांची चांदी

प्रत्येकाच्या हातात मोबाइलरुपी कॅमेरा आल्याने फोटो काढण्याची हौस प्रत्येकजण भागवून घेताना दिसतो. त्यातही अँड्रॉईड फोनमधून सेल्फी काढणाऱ्यांची तर रिघच लागलेली असते. गंगेच्या किनाऱ्यावर तरुणाईचे टोळकेच्या टोळके सेल्फी काढताना दिसत होते. गंगेच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यासही सर्वांनी प्राधान्य दिले. मात्र काही ठिकाणी बॅरिकेडस अद्याप तसेच असल्याने फोटो काढण्यासाठी अनेकांना अडचण येत होती.

आज कोणतीही सुरक्षा नाही, कुणीही आडकाठी केली नाही. कोणतेही 'होल्ड अॅण्ड रिलीज' नाही; परंतु आम्ही आमच्या जबाबदारीवर गंगेवर येत स्नान केले. आम्हाला कुणीही अडवले नाही हेच काल केले असते तर कितीतरी अंशाने फरक पडला असता. - मधुकर गायकवाड, भाविक

आज आम्ही मनसोक्त अंघोळीचा आनंद लुटला कारण पोलिस प्रशासनाने आम्हाला कोठही हटकले नाही. घरापासून तर येथपर्यंत अगदी व्यवस्थित रामकुंडावर येऊन आम्ही अंघोळ करू शकलो. कालही असेच ठेवले असते तर बरे झाले असते. - पुष्पा गायकवाड, भाविक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलाई लामांनी साधली पर्वणी

0
0

तिबेटीयन धर्मगुरू त्र्यंबकेश्वरनगरीत दाखल; दोन दिवस विविध कार्यक्रम

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

पृथ्वीवरचा श्रद्धेचा सगळ्यात मोठा दृश्य सोहळा म्हणजे कुंभमेळा. त्यात सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व सर्वश्रेष्ठच. म्हणूनच नाशिक व त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री सिंहस्थातील शाहीस्नानासाठी जगभरातील भाविक दाखल होतात. यात भाविक म्हणून दाखल होत असलेल्या जगप्रसिद्ध व्यक्तींमुळे हा सोहळा अधिक नयनरम्य होतो. खुद्द तिबेटयन धर्मगुरू दलाई लामा सिंहस्थस्नानासाठी रविवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. त्यांनी डोक्यावर कुशावर्तातील पाणी शिंपडून पर्वणी साधली.

दलाई लामा कुशावर्तात उतरले अन् श्रद्धा, भक्ती अन् अध्यात्म‌िक शक्तीची अनुभूती उपस्थितांना झाली. धर्मापलिकडे जाऊन माणूसपण जपणाऱ्या अनोखा संस्कृतीचा मिलाप त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर एकजीव झाला. अर्थात गोदेच्या पवित्र अमृतात मन निर्मळ होऊन जातं हा अनुभवही लामा यांनी घेतला. कुशावर्तातून त्यांनी पावले परत फिरताना त्यांना आईच्या कुशीतून प्रसन्न होऊन निघाल्याची अनुभूती झाली असणार, असे वातावरण यावेळी येथे निर्माण झाले होते.

धर्मगुरू दलाई लामा यांचा मुक्काम श्री गुरू कार्ष्णी आश्रम येथे दोन दिवस असणार आहे. त्यांचे स्वागत श्री गुरू कार्ष्णी शरणानंद महाराज यांनी केले. त्यानंतर त्यांनी आश्रम परिसरात वृक्षारोपण केले व गाईंचे पूजन केले. त्यानंतर दलाई लामा यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. कुंभमेळयात आपण स्नान करणार आहोत अर्थात शरीरात डोके व डोक्यातील मेंदू सर्वश्रेष्ठ असतो म्हणून आपण केवळ डोक्यावर पाणी शिंपडून स्नान करणार असल्याचे त्यांनी हसत हसत सांगितले. जगात जशा चार भिन्न दिशा आहेत त्यांची नावे भिन्न आहेत; मात्र संपूर्ण विश्व एकच आहे. तद्वत विविध धर्म आहेत मात्र त्यांचे सार समान आहेत, असेही दलाई लामा यांनी सांगितले.

जाती व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले, 'भगवान बुध्दांनी जातीभेद नको म्हणून कोणत्याही वर्णातील व्यक्ती राजा होऊ शकतो याचे उदाहरण दिले आहे. अर्थात धर्मगुरूंनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाह‌िजेत. त्र्यंबकेश्वरच्या पहिल्याच भेटीत आपण प्रभावित झालो आहेत. यापूर्वी आपण आलाहाबद कुंभास भेट दिली होती तेव्हाच येथील निमंत्रण मिळाले होते. येथे आलेल्या नागा साधूंबाबत आपणास जिज्ञासापूर्ण कुतूहल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत महानच

भारत हा सर्वाधिक स्थैर्य लाभलेला देश आहे. त्यास येथील संस्कृतीची परंपरा कारणीभूत आहे. पाक‌िस्तान आणि शेजारील देशांपेक्षा भारताचा भविष्काल उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारत महानच असल्याचेही धर्मगुरू दलाई लामा म्हणाले.

मैत्रीचे अनोखे बंध

श्री गुरू कार्ष्णी शरणानंद महाराज यांच्या निमंत्रणावरून आपण त्र्यंबकेश्वरला आल्याचे दलाई लामा यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे पत्रकारांशी चर्चेच्या दरम्यान त्यांनी गुरू कार्ष्णी शरनानंद यांचे पांढऱ्या दाढीचे केस धरून वारंवार थट्टामस्करी करीत गुरू कार्ष्णी शरनानंद आणि धर्मगुरू दलाईलामा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध किती गहिरे आहेत याचे दर्शन सर्वांना घडविले. गुरू कार्ष्णी शरनानंद यांनीही त्यांच्या मैत्रीपूर्ण थट्टामस्करीला हास्यातून अनोख्या बंधाला अधिक मजबूत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर विश्व साहित्य संमेलन मॉरीशसला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसंघ प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी होणारे विश्व सावरकर साहित्य संमेलन यावर्षी ५ सप्टेंबर रोजी मॉरीशस येथे आयोजित केले आहे. ही माहिती शिवसंघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी दिली. संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रख्यात उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

यंदा संमेलनाचे पाचवे वर्ष आहे. यापूर्वीची संमेलने अंदमान (पहिले), श्रीलंका (दुसरे), नेपाळ (तिसरे) आणि थायलंड (चौथे) येथे झाली आहेत. मॉरीशस येथे होणाऱ्या संमेलनास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सावरकरप्रेमी श्याम जाजू हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. मॉरीशसचे सांस्कृतिक मंत्री सांताराम बाबू हे स्वागताध्यक्ष असतील. याशिवाय उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, मराठी भाषक युनियन मॉरीशसचे अध्यक्ष बालाजी मारूती आणि महाराष्ट्र मंडळाचे मॉरीशसचे अध्यक्ष बलराज नारू आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रमोद गायकवाड, गणेश वडवेकर, डॉ. प्रसाद पिंपळखरे, नंदकुमार अनगळ, सात्यकी सावरकर हे विशेष प्रयत्नशील आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील प्रेम आणि त्यांच्या स्फूर्तीदायी साहित्याने भारावलेले किमान ५०० सावरकरप्रेमी जगभरातून या संमेलनास उपस्थित राहणार आहेत, असे नीलेश गायकवाड यांनी सांगितले. या संमेलनात दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, कार्यक्रम नेत्रदीपक आणि देदिप्यमान करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करीत असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम मॉरीशस येथील मराठी मंडळे आणि शिवसंघ प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, तेथील मराठी भाषिक मंडळी विश्व सावरकर साहित्य संमेलनासाठी मॉरीशसला येणाऱ्या सावरकरप्रेमींची आतुरतेने वाट पाहत आहेत.

साहित्यावर होणार चर्चा

हे संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वैभवशाली साहित्यावर चर्चा, विचारमंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारण्यात आलेले नाही. शिवाय संमेलनासाठी कोणत्याही संस्था, व्यक्ती यांच्याकडून देणगी अथवा अनुदान प्रतिष्ठानने स्वीकारले नाही. सर्व सावरकरप्रेमी या संमेलनास स्वखर्चाने उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटीसाठी ‘कुंभथॉन’ तंत्र

0
0

म.टा.प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या धर्तीवर सुमारे दीड वर्षापासून सुरू असणारी कुंभथॉन चळवळ यंदाच्या कुंभमेळ्यात प्रगतीपथावर आहे. पहिल्या शाही पर्वणीनंतर कुंभथॉनच्या विविध प्रयोगातून हाती आलेल्या माहितीचे पृथ्थकरण सुरू आहे. मात्र, स्मार्ट सिटीमध्ये नाशिक शहराचा समावेश झाल्याने या शहराच्या विकास प्रक्रियेत कुंभथॉनमधील तंत्रज्ञान लाभदायी ठरू शकेल, असा विश्वास अमेरिकेच्या एमआयटी लॅबचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश रासकर यांनी व्यक्त केला.

पहिल्या पर्वणीनंतर कुंभथॉन टीमच्या निरीक्षकांनी टीम आणि पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना कुंभथॉन टीमच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरीत पर्वण्यांमध्येही कुंभथॉन टीम समोर आव्हाने आहेत. त्यादृष्टीने सकारात्मक दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मूळचे नाशिककर असलेले डॉ. रासकर यांनी नाशिक शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, या पुढील टप्प्यात नाशिकला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनण्यासाठी तंत्रज्ञानाशी सांगड घालावी लागणार आहे. तंत्रज्ञानाशी मैत्री करताना कुंभथॉनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून हाती आलेल्या काही उत्पादनांचा शहराच्या स्मार्ट प्रवासात फायदा करून घेणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्यटकांना शहराची माहिती देणारे मे‌डिट्रॅकर अॅप, गर्दीचा अंदाज देणारे क्राऊड स्टिअरिंग, इपिमेट्रीक्स यासारख्या अॅप्लिकेशन्सचा शहरातील नागरिकांपासून तर प्रशासनापर्यंतच्या प्रत्येक घटकाला होईल, असेही ते म्हणाले. यावेळी कुंभथॉन टीमच्या वतीने डॉ. रमेश रासकर यांच्यासह आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले, संदीप शिंदे, डॉ. सचिन पाचोरकर, सुभाष पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.

रोकडोबावर मोजणी

कुंभथॉनच्या प्रयोगांमध्ये क्राऊड स्टिअरिंगच्या प्रयोगांतर्गत काही ठिकाणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गर्दीची मोजदाद करण्याचा प्रयत्न टीमने केला. यात रामकुंड परिसरात परवानगी अभावी टीमला हा प्रयोग करणे पहिल्या पर्वणीत शक्य झाले नाही. मात्र, रोकडोबा घाटावर केलेल्या या प्रयोगात येथे सुमारे ७८ हजार भाविकांनी भेटी दिल्याची माहिती यावेळी कुंभथॉन टीमचे मार्गदर्शक संदीप शिंदे यांनी दिली. पुढील पर्वण्यांमध्ये रामकुंडासारख्या मुख्य ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील पर्वण्यांना गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने त्या दिवशी याचा उपयोग होण्याची आशाही टीमकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाचा सिंहस्थधडा

0
0

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : शहरापासून दूर असलेल्या बाह्य पार्किंगवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पर्यायच नसल्याने शाहीस्नान अनुभवण्यास आलेल्या भाविकांचा हिरमोड झाला. तसेच बाह्य पार्किंगवरून शहरातील इतर भागात पोहचणे शक्य नव्हते. याचा फटका भाविकांच्या संख्येवर तसेच एसटीच्या नियोजनावर झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यापासून धडा घेत पुढील पर्वणीत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही बदल व त्र्यंबकेश्वर कनेक्ट करण्यावर चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांचा 'कडक' बंदोबस्त आणि नियोजनातील तुटीमुळे भाविकांना बसलेला फटका हे लक्षात घेत बाह्य पार्किंगपासून त्र्यंबकेश्वर तसेच शहरातील प्रमुख भाग जोडण्याचा पर्यायांवर विचार सुरू झाला आहे. शहरापासून सात ते आठ किलोमीटर दूर असलेल्या बाह्य वाहनतळावरून फक्त शहरात येण्यासाठी एसटी बसेसची सुविधा होती. त्यात, त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा कोणताही विचार करण्यात आला नव्हता. राजूर बहुला वगळता सर्वच बाह्य वाहनतळावर आलेल्या बहुतांश भाविकांना त्र्यंबकेश्वरला जायचे होते. मा‌त्र शेकडो बस रिकाम्या उभ्या असतानाही फक्त रस्ता उपलब्ध नसल्याने एसटी प्रशासन हतबल झाले होते. याबाबत, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकी दरम्यान यावर चर्चा झाली. पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीस अनेक वरिष्ठ अधिकारी हजर होते. त्र्यंबकेश्वर कनेक्ट करण्याबरोबर, बाह्य वाहनतळ ते रेल्वे स्टेशन किंवा साधुग्राम अशा भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांना भेट देता यावी, म्हणून एसटी बसेस सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

एक हजार १११ फेऱ्या

शाही पर्वणीसाठी एसटी प्रशासनाने तब्बल तीन हजार बसेस तैनात केल्या होत्या. यापैकी बोटावर मोजता येईल, एवढ्या बसेसने दिवसभरात एक हजार १११ फेऱ्या मारल्या. यात, नाशिक त्र्यंबक, त्र्यंबक ते बाह्य वाहनतळे आणि बाह्य वाहनतळे ते शहराजवळील अंतर्गत पार्किंगची ठिकाणे यांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वरला शंभर राखीव बसेस ठेवण्यात आल्या होत्या. त्या माघारी येतानाच भाविकांचा दुष्काळ पडल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

दहा किमीची ड्युटी

गुजरातमधील संवेदनशील परिस्थितीमुळे येथे भाविकांचा वणवा होता. भाविकांच्या थंड प्रतिसादाअभावी अंबोली ते त्र्यंबकेश्वरमधील सागरानंद मठ या रस्त्यावर १०० पैकी अवघ्या ३० बसेस दिवसभरात धावल्या. एका चालकाने अवघा १० किलोमीटरचे अंतर कापत घर गाठले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजबजले नाशिक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हर हर महादेव व बम बम भोलेच्या गजरात नाशिक शहरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजली होती. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरात भक्तीमय वातावरण होते. ठिकठिकाणच्या मंदिरातील गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

तिसऱ्या सोमवारनिमित्त भाविकांनी रामकुंडावर स्नानासाठी गर्दी केली होती. स्नान झाल्यावर समोर असलेल्या कपालेश्वर मंदिरात ओल्या वस्त्रानिशी भाविकांनी दर्शन घेतले. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी शंकराच्या पिंडीवर हिरवे मूग वाहिले. पहाटेपासून कपालेश्वराच्या मंदिरात गर्दी होती. सकाळी ब्रह्मवृंदाच्या हस्ते पूजन करण्यात आले. कपालेश्वराला जाणाऱ्या येणाऱ्या मार्गावर पोलिसांनी वाहतुकीचे चांगले नियोजन केले होते. मालेगाव स्टँडकडून रामकुंडावर येणाऱ्या मार्गावर वाहतूक एकतर्फी करण्यात आली. तसेच, रामकुंडावरून मालवीय चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. कुंभमेळा सुरू असल्यामुळे स्नान करणाऱ्यांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली होती.

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर मंदिरातही सकाळपासूनच गर्दी होती. फुगेवाले, रहाटपाळणे, खेळणीविक्रेते व मेंहदी काढणाऱ्यांनी आपली छोटेखानी दुकाने थाटल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. मंदिरात दिवसभर सत्यनारायण पूजन व अभिषेक घालण्यात आले. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकरोड येथील मुक्तीधाममध्येही भाविकांची सकाळपासूनच रिघ होती. तसेच गोदाघाटावरील नीळकंठेश्वर, नारोशंकर मंदिर, पंचवटीतील मनकामेश्वर महादेव मंदिर, जनार्दन स्वामी मठ, तीळभांडेश्वर लेनमधील तीळभांडेश्वर मंदिर, नाशिकरोड येथील बिर्ला मंदिर, कॉलेजरोड येथील येवलेकर मळा परिसरातील सर्वेश्वर मंदिर, अशोक नगर येथील नीळकंठेश्वर मंदिर, हृदयेश्वर मंदिर आदी ठिकाणी मंदिरात ओम नम: शिवाय, बम भोलेचा जयघोष दिवसभर सुरू होता. बेल फुलांना प्रचंड मागणी होती. रविवार कारंजा व फुल बाजारात व मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला मुले-मुली आणि पुरूषही थांबले होते. केवळ बेलफुलांवर हजारोंची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांतर्फे सांगण्यात आले. सकाळी सुरू असलेली गर्दी रात्रीपर्यंत कायम होती.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेलाही भाविकांची ओहोटी

श्रावण महिन्यात नाशिक जिल्हा व परिसराचे आकर्षण व श्रद्धेचा विषय असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेला यंदा सिंहस्थ काळ असूनही भाविकांची संख्या मंदावल्याचे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार अवघ्या लाखभर लोकांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली. तिसरा श्रावणी सोमवार ऐन सिंहस्थ काळात आल्याने त्र्यंबकेश्वरला यंदा गर्दी होईल असे वाटत होते. फेरी व दर्शनासाठी साधारण पाच लाख येतील असा अंदाज होता. मात्र, पहिल्या पर्वणीप्रमाणेच भाविकांनी त्र्यंबकेश्वरच्या फेरीकडेही पाठ फिरवली. सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गर्दी होती. मात्र, प्रदक्षिणेला भाविकांनी तुलनेने अल्प प्रतिसाद दिला. दरवर्षी पेक्षा यंदा एसटी बसेसची संख्या अधिक असूनही भाविकांनी फेरीला जाण्याचे टा‍ळले. सिंहस्थाच्या नियोजनामुळे अनावश्यक पायपीट नको म्हणून शेवटचे शाहीस्नान होईपर्यंत त्र्यंबकला यायचे नाही, असा संकल्प भाविकांनी केलेला दिसतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण, मालेगावसाठी दुष्काळी उपाययोजना करा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अवकाळी पाऊस व गारपिटीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या दुखात भर म्हणून यंदाही निसर्गराजाने पाठ फिरवली. सटाणा व मालेगाव तालुक्यातही पर्जन्यमान सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याची सुद्धा वानवा आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध नाही. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांची नुकतीच खासदार भामरे यांची मुंबई येथे भेट घेऊन आपल्या निवेदनाच्या व चर्चेच्या माध्यमातून सटाणा व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा विस्तृतपणे मांडली. कमी पर्जन्यमानामुळे सटाणा व मालेगाव तालुक्यात जास्तीत जास्त गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांमधील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असे ठोस आश्वासन खासदार डॉ. सुभाष भामरे यांना दिले.

खासदार भामरेंच्या मागण्या

> खासगी विहिरी अधिग्रहित करून पाण्याची सोय करावी. > चारा छावणी सुरू करावी. > फळबागांना पुनर्जीवित करण्यासाठी पॅकेज मिळावे. > कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ठराविक आर्थिक पॅकेजची घोषणा करावी. > कर्जवसुली थांबवून वीज बिलात सवलत द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ जाहीर करा

0
0

टंचाई आढावा बैठकीत बागलाणकरांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती बघता आपद्कालीन कृती आराखडा तातडीने तयार करून आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सुसंवाद साधून समन्वय ठेवावा, असे आवाहन बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी केले.

येथील पंचायत समिती सभागृहात टंचाई उपाययोजना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार दीपिका चव्हाण बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, बागलाण तालुक्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी पिके नेस्तनाबूत झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. गावोगावी टँकर सुरू करण्याची मागणी वाढली आहे. बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आल्याचेही यावेळी आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी टंचाई आढावा बैठकीत डोंगरेज, आखतवाडे, खमताणे, आव्हाटी, नामपूर, लखमापूर, वायगांव, बोढरी, बिलपुरी, द्याने येथील सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तातडीने टँकर सुरू करणे, विहीर खोली वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, विहिरी अधिग्रहीत करणे, तसेच राष्ट्रीय पेय जल योजना मार्गी लावणे आदी मागण्या मांडल्या. दरम्यान, टंचाई आढावा बैठकीत बागलाण तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा एकमुखी ठराव यावेळी संमत करण्यात आला. बैठकीस माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, उपसभापती वसंत भामरे, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, सुनीता पाटील, प्रशांत बच्छाव, पं. स. सदस्य अहिल्या माळी, गिता सोनवणे, अशोक सावंत, मनोहर देवरे, राघो अहिरे, मायावती धिवरे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, प्रातांधिकारी संजय बागडे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, वीज वितरणचे उपविभागीय अभियंता संजय टिके आदींसह अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या सूचना

> टंचाई कृती आराखड्यात प्रत्येक गावाचा समावेश करा. > वीज वितरण कंपनीने शेतीपंपासह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये. > ग्रामसेवकांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बम बम भोले’चा निनाद

0
0

श्रावणी फेरीनिमित्त त्र्यंबक भाविकांनी गजबजले

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बम बम भोले, हर हर देवच्या गजरात लाखो शिवभक्तांनी तिसऱ्या श्रावणी सोमवारची फेरी पूर्ण केली. ठिकठिकाणी भाविकांना फराळ वाटप करण्यात येत होते. कुंभमेळा अन् श्रावणी सोमवार असा दुग्धशर्करा योग आल्याने कुशावर्ता स्नान करून भाविकांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. पहिल्या शाही पर्वणी इतकेच भाविक त्र्यंबकमध्ये दाखल झाले होते.

पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी केलेल्या अतिरिक्त सुरक्षेचा फटका श्रावणी फेरीला येणाऱ्या भाविकांनाही बसला. सुरक्षेच्या नावाने जागोजागी झालेली नाकाबंदी भाविकांच्या मनस्तापात भर घालणारी ठरली. यामुळे गतवर्षांपेक्षा यंदा श्रावणी सोमवारच्या फेरीला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट दिसून आली. अनावश्यक पायपीट नको म्हणून अनेकांनी शेवटचे शाहीस्नान होईपर्यंत त्र्यंबकला यायचे नाही, असा संकल्प केलेला दिसून येत आहे.

तिसऱ्या सोमवारच्या फेरीसाठी भाविक रविवारी दुपारपासून प्रदक्षिणा मार्गावर रवाना झाले तो ओघ सोमवारी दुपारपर्यंत सुरू होता. सोमवारी रात्री दोन वाजेदरम्यान गर्दीत वाढ झाली. त्यानंतर भाविकांची संख्या साधारण राहिली. सुरक्षेच्या कारणास्तव फराळ वाटप करणाऱ्यांची संख्या देखील कमी झालेली दिसून आली. तुरळक प्रमाणात बिस्कीट वाटप, चहा वाटप तसेच राजगिरा लाडू आदी तयार पदार्थांचे वाटप परतीच्या मार्गावर आढळले.

शहरातील मार्गांचे पोलिसांचे नियोजनाने भाविक आणि पोलिस यांच्यात वारंवार खटके उडत असून, याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत असतांना देखील पोलिस प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. कुशावर्तावर स्नानासाठी झुंबड उडाली होती. अर्थात कुंभमेळा आणि तिसऱ्या सोमवारमुळे विशेष गर्दी होईल, ही अपेक्षा फोल ठरली असून, लाख दीड लाख भाविक आले असल्याचा अंदाज आहे.

बस नियोजन ढासळले

बस नियोजन पूर्ण ढासळले होते. अवास्तव वाढविलेल्या बस गाड्या थांबवायच्या कोठे असा प्रश्न प्रशासनाला निर्माण झाला होता. त्र्यंबक-जव्हार रस्त्यावर शेकडो बस उभ्या केल्याने प्रदक्षिणेस परतीच्या मार्गावर असलेल्या प्रदक्षिणार्थींना पायी चालणेही मुश्किल झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधू-महंतही नाराज

0
0

नियोजनावर टीका; आखाड्यांची लवकरच बैठक

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शाही पर्वणीचा योग साधण्यास आलेल्या भक्तांना सुरक्षेच्या नावाने नाहक त्रास दिल्याने आखाड्यांमधील साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास प्रत्येक आखाड्यात तसेच आश्रमांमध्ये विचारमंथन होत आहे. याबाबत आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज यांनी लवकरच आखाडा परिषदेची बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले.

पहिल्या शाहीस्नानाच्या दिवशी भाविकांना दर्शनासाठी शाहीमार्गावर उभे राहण्यास मज्जाव केल्याचे भक्तांनी कळविले असून, ही बाब गंभीर असल्याचे मत महंत हरीगिरी महाराज यांनी व्यक्त केले. भाविकांच्या श्रध्देला ठेच पोहचेल, अशा प्रकारे नियोजन झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबत नियोजन करणारे अननुभवी असून, त्यांना कुंभमेळा शाही पर्वणी हा साधू-संतांच्या दर्शनाचा, त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग असतो. म्हणून भाविक देश-विदेशातून येतात. येथे मात्र त्यांनाच रोखण्यात आले. जनतेला गुमराह करण्यात आले. सहा किलोमीटर दूरवर बसमधून उतरण्यास भाग पाडले. याचा परिणाम म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले घाट व प्रयाग तीर्थासारखे तलावांवर भाविक स्नानासाठी फिरकलेच नाहीत. घाट तलाव सुशोभीत करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला. मात्र, आखाड्यांचा रस्ता आहे, तेथे प्रकाशासाठी पथदीप देताना कंजुशी दाखविली हे कसले नियोजन, अशा परखड शब्दात त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. दि. १३ ऑगस्ट २०१५ रोजी श्रावण अमावस्येच्या मुख्य पर्वणी स्नानास गर्दी होईल की नाही याबाबत सांशकता व्यक्त होत आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता पहिले व दुसरे शाहीस्नान व्रिकमी गर्दीने होतात. तिसऱ्या शाहीस्नानास तुलनेत गर्दी कमी असते.

जगदगुरूंचे पंतप्रधानांना पत्र

भाविकांच्या श्रध्देस ठेच पोहचत असून, आपण याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी जगदगुरू शंकराचार्य नरेंद्रानंद महाराज यांनी पंतप्रधानांकडे पत्राव्दारे केली आहे. सध्या सुरू असलेला नियोजनाचा प्रकार अनाकलनीय असून, असा संचारबंदीचा प्रकार प्रथमच पाहिला. भक्तांना येऊ द्यायचे नव्हते तर कशासाठी कोट्यवधींचा खर्च केला, असा सवाल उपस्थित केला आहे. गत सिंहस्थात शासनाने २९७ कोटी रुपये खर्च केले होते. यावेळेस दहा पट खर्च केला. सुरक्षेच्या नावाने केलेले नियोजन भाविकांना दुःख देणारे आहे. पर्वकाल साधण्यासाठी दूरवरून आलेल्या हजारो भाविकांना येथे येता आले नाही. कित्येकांनी दूरध्वनी करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दूध, भाजीपाला, वर्तमानपत्र यांना अडविणारा हा नियोजनाचा प्रकार प्रथमच पाहिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शनिवारी ‘आत्मस्नान’ सोहळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने येत्या शनिवारी (दि. ५) 'आत्मस्नान' आयोजित करण्यात आला आहे. ध्यानपीठाच्या वतीने तपोवनातील इंद्रायणी लॉन्स येथे महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संत परमानंद महाराज यांनी दिली.

शाहीस्नानाच्या दिवशी प्रशासनाला व भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पर्वणी सोडून शनिवारी ५ रोजी भाविकांसह ध्यानपीठाचे प्रमुख ओम गुरूदेव माऊली हे रामकुंडावर स्नान करणार आहेत. शनिवारी सकाळी अकरा वाजता सत्संग होणार असून, दुपारी तीन वाजता शोभायात्रा सुरू होणार आहे. ही शोभायात्रा शाहीमार्गाने रामकुंडावर पोहचणार आहे. या शोभायात्रेमध्ये ओम गुरूदेव माऊली सुमारे दोनशे संतांसह सजवलेल्या रथांवर आरूढ होऊन सहभागी होणार आहेत. यात झांजपथक, ढोलपथक, लेझिमपथक तसेच आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची पथके सहभागी होणार आहेत. ही शोभायात्रा सायंकाळी ७.३० वाजता रामकुंडावर पोहचणार असून, त्यानंतर स्नान होणार आहे. या शोभायात्रेमध्ये विदेशातून आलेले भाविकही सहभागही होणार आहेत. देशभरातील विविध राज्यांतून आदल्या दिवशी भाविक येणार असून, त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था ध्यानपीठाच्या वतीने करण्यात आली आहे.

आत्मस्नान म्हणजे काय?

स्नान हे शरीराच्या शुध्दतेसाठी असते. पण आंतरिक शुध्दता सर्वश्रेष्ठ आहे. आंतरीक शुध्दीसाठी ध्यानाच्या माध्यमातून हे स्नान होणार असल्यामुळे त्याला आत्मस्नान असे संबोधण्यात आल्याचे आत्मा मालिक ध्यानपीठाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या स्नानाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौजन्य अभियानाला रिक्षाचालकांचा धक्का

0
0

भाविकांच्या सेवेऐवजी साधली आर्थिक पर्वणी

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पर्वणीकाळासह सुमारे वर्षभर भाविक आणि पर्यटकांचा नाशिकमध्ये ओघ सुरू राहणार आहे. या काळात भाविकांना चांगली सेवा मिळावी आणि नाशिकचा नावलौकिक उंचावा, या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षाचालकांना सोबत घेत सौजन्य अभियान सुरू केले. मात्र, शनिवारी (दि. २९) झालेल्या पहिल्या शाहीपर्वणीला रिक्षाचालकांनी प्रवाशांची जादा भाडे आकारत यथेच्छ लुबाडणूक केली.

महाकुंभाच्या पहिल्या सिंहस्थ पर्वणीत शाहीस्नानाला सर्वच रस्ते पोलिस प्रशासनाने बंद केले होते. यात अंतर्गत मार्गाने मुख्य रस्त्याला येण्यासाठी भाविकांना रिक्षांशिवाय पर्याय नव्हता. मात्र, रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा भाविकांना फटका बसला. सिडको व सातपूरच्या विविध भागातील भाविकांना बस स्थानकापर्यंत येण्यासाठी भाविकांना पायी अथवा रिक्षांचा आधार घ्यावा लागला. परंतु, यात रिक्षाचालकांनी दुप्पट किंवा काही प्रसंगी त्यापेक्षा अधिक भाडे आकारले. यामुळे आरटीओने राबविलेल्या सौजन्य अभियानाला रिक्षाचालकांकडून धक्का देण्यात आल्याचे शहरात दिसून आले. पुढील काळात शहरात होऊ घातलेल्या अन्य दोन शाहीपर्वणी काळात तरी प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओ आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

पंचवटीत रामकुंडावर पहिल्या शाहीस्नानाला जाण्यासाठी सिडको व सातपूरमधून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, मुख्य रस्त्यांवरूनच भाविकांना बसेसची व्यवस्था असल्याने घरापासून शहर बस पकण्यासाठी भाविकांना रिक्षाचा आधार घ्यावा लागला.

रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी केली. काही ठिकाणी रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये भाडे आकारणीवरून वादही झाले. 'भाविकांशी सलोख्याने वागावे', 'अतिथी देवो भव:', असे आरटीआने सौजन्य अभियानात रिक्षाचालकांना सांगितले होते. मात्र, रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारला भाविकांना तोंड द्यावेच लागले. एक किंवा दोन किलोमीटर अंतरासाठी रिक्षाचालकांनी काही ठिकाणी ५० ते १०० रुपये भाडे घेतल्याच्या भाविकांची तक्रारी आहेत.

नवीन नाशिकमधील विजयनगरमधून मुंबई नाका येथे जाण्यासाठी ऐरवी १० रुपये रिक्षाभाडे आकारले जाते. मात्र, शनिवारी पर्वणीच्या दिवशी रिक्षाचालकांनी २० ते ३० रुपये प्रतिप्रवासी वसूल केले. - हेमलता माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंचा चार दिवस मुक्काम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळपासून (दि. १) चार दिवस नाशिकच्या दौऱ्यावर येत असून ते आपल्या दौऱ्यात साधू महंतासह विविध विकासकामांचेही उदघाटन करणार आहे. सप्तश्रृंगीगडावर जावून देवीचे दर्शन घेणार आहेत. तसेच ४ सप्टेंबर रोजी बॉटनिकल गार्डनचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होवून नव्या जबाबदाऱ्यांची घोषणा या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांना सिंहस्थ कुंभमेळ्यात ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी येण्याचे टाळले होते. आता मंगळपापासून ते नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार असून बुधवारी ते साधूग्राममधील विविध साधू महंताच्या भेटीगाठी घेवून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. राज ठाकरे हे ३ सप्टेंबर रोजी शालिमार येथील खाबीया ग्रुपच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वाहतूक बेटाचे उदघाटन करणार आहेत. त्यानंतर ते सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी सहकुटूंब जाण्याची शक्यता आहे. पांडवलेण्याजवळील बहुप्रतीक्षित बॉटनिकल गार्डनचे ४ सप्टेंबर रोजी भूमीपूजन होणार आहे. यावेळी टाटा समूहाच्या वतीने रतन टाटा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच सिंहस्थ कामांचे ब्रॅण्डींग करण्यासाठीची रणनीतीही तयार केली जाणार आहे. पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून नव्या जबाबदाऱ्यांची घोषणाही ते आपल्या दौऱ्यात करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशव्यापी संप उद्या होणारच

0
0

कामगार संघटनांचा एकमुखी निर्धार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी येत्या बुधवारी (दि. २) देशव्यापी संप यशस्वी केला जाईल, असा निर्धार कामगार संघटनांनी केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत लढा देण्याचेही संघटनांनी निश्चित केले असले तरी या संपातून भारतीय मजदूर संघाने माघार घेतली आहे.

अन्यायकारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कामगार कायद्यांमधील बदल मागे घ्यावा, समान वेतनाबरोबरच किमान वेतन मर्यादा १५ हजार रुपये करावी यासह विविध मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. संप यशस्वी करण्याचा निर्धार कामगार संघटनांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. याप्रसंगी 'माकप'चे जिल्हाध्यक्ष श्रीधर देशपांडे, 'सीटू'चे डॉ. डी. एल. कराड, 'इंटक'चे जयप्रकाश छाजेड, 'आयटक'चे राजू देसले, कामगार विकास मंचचे कैलास पगारे, विमा कर्मचारी संघटनेचे कांतीलाल तातेड, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष सुनंदा जरांदे, जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे माधव भणगे आदी उपस्थित होते. कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात सरकारशी बोलणी होत असली तरी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संप अपरिहार्य असल्याचे कराड यांनी सांगितले.

बोनसचा सर्वांना लाभ नाही

बोनस मर्यादा १० हजारावरून २१ हजार करण्याची सकारात्मकता सरकारने दर्शविली आहे. मात्र, त्याचा फायदा सर्वच कामगारांना मिळणार नाही. राज्यभरात कर्मचाऱ्यांची तब्बल सव्वा लाख पदे रिक्त आहेत. ती भरण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा दबाव आहे. त्याशिवाय पेन्शनचा प्रश्नही अत्यंत कळीचा आहे. त्यामुळे राज्य कर्मचारी सहभागी होणार असल्याचे जरांदे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या टप्प्यात एलबीटीत घट

0
0

पाच कोटींचा फटका, चार महिन्यात ३१७ कोटींची वसुली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने १ ऑगस्टपासून एलबीटी धोरणात बदल केल्याच्या फटका महापालिकेला बसला असून त्याचा परिणाम शेवटच्या महिन्यात एलबीटी वसुलीवर झाला आहे. सरासरी ६३ कोटी वसूल होणारी एलबीटी शेवटच्या महिन्यात केवळ ५७ कोटींवर आल्याने तब्बल ६ कोटीचा फटका बसला आहे.

एलबीटी बंद झाल्याने व्यापाऱ्यांनीच एलबीटी भरली नसल्याने जुलैची वसुली ५४ कोटी झाली आहे. चार महिन्यात एलबीटीमुळे महापालिकेच्या तिजोरीत ३१७ कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने 'एलबीटी'पोटी महापालिकेला ४७ कोटींचा पहिला हप्ता प्रदान केला आहे.

राज्य सकारने १ ऑगस्टपासून ५० कोटींच्या आत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी रद्द केली आहे. त्यामुळे आता एलबीटीच रद्द झाल्याने शेवटच्या महीण्यात काही व्यापाऱ्यांनी महापालिकेला टप्पा दिला आहे. जुलै महिन्याच्या वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे. जुलैमध्ये 'एलबीटी'पोटी महापालिकेच्या तिजोरीत ५४ कोटीची वसुली झाली आहे. तर स्टॅम्प ड्युटीच्या स्वरूपात चार ते पाच कोटी मिळणार आहे. मात्र, ऐरवी हीच वसुली सरासरी ६० कोटीच्या वर असायची. ती आता घटली आहे. आता आपले काहीच होणार नाही या आशेने शेवटच्या महिन्यात व्यापाऱ्यांनी एलबीटी भरलीच नाही. त्यामुळे महापालिकेला असा पाच कोटीच्यावर फटका बसला आहे.

व्यापाऱ्यांना अभय, पालिकेला तोटा

एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अभय योजनेतून महापालिकेला १५ कोटी उत्पन्न मिळाले. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात ३ कोटी १४ लाख, तर २०१४-१५ या वर्षात १२ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. दोन हजार व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, या सवलतीपोटी महापालिकेला व्याज व दंड मिळून चार कोटीची माफी द्यावी लागली आहे.

व्यापाऱ्यांसाठीच्या अभय योजनेची मुदत सोमवारी संपली. एलबीटी भरू न शकणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ३ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत ही योजना सुरू होती. ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटी चुकवली त्यांना दंड व व्याज माफ करून केवळ नियमित एलबीटी यात भरली जाणार आहे. या योजनेंतंर्गत नाशिकमध्ये जवळपास दोन हजार व्यापाऱ्यांनी लाभ घेतला. त्यात सन २०१३-१४ मध्ये ९८१ व्यापाऱ्यांनी ३ कोटी १४ लाखांची एलबीटी भरली. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये ९९४ व्यापाऱ्यांनी ११ कोटी ८८ लाख ७९ हजार रुपये एलबीटी भरली. त्यामुळे पालिकेच्या खात्यात तब्बल १५ कोटी रुपये जमा झाले. या व्यापाऱ्यांना व्याज व दंडापोटी महापालिकेला चार कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले.

विकासकामांना फटका

एप्रिलपासून जुलैपर्यंत महापालिकेला एलबीटीपोटी ३१७ कोटी रुपये मिळाले आहेत. चार महिन्यातील ही विक्रमी वसुली असून एलबीटीचा कोणताही फटका महापालिकेला बसलेला नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारने एलबीटीच्या धोरणात बदल केल्याने झालेल्या नुकसानीचा फटका बसू नये म्हणून ऑगस्टच्या 'एलबीटी'पोटी महापालिकेच्या खात्यात ४६ कोटी ८५ लाखाचा निधी जमा केला आहे. त्यामुळे महापालिकेला काहिसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे दर महिन्याला पंधरा ते वीस कोटींच्या उत्पन्नात घट होणार असल्याने त्याचा फटका विकासकामांवर बसणार आहे.

पाच हजार व्यापारी अजूनही गायब

महापालिकेला विक्रीकर विभागाने सुपूर्द केलेल्या १६ हजार व्यापाऱ्यांपैकी जवळपास ५ हजार व्यापाऱ्यांचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही. चुकीचे व खोटे पत्ते असलेली यादी विक्रीकर विभागाने महापालिकेला दिल्याने या व्यापाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरले. मात्र गायब झालेले ते पाच हजार व्यापारी शेवटपर्यंत सापडलेच नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images