Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मोबाइल नोंदणी आता एफबीद्वारे

$
0
0

एलआयसीची सुविधा; विमा हफ्त्याची देणार आठवण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विम्याचा हप्ता भरण्याची आठवण देणारा मेसेज हवा असेल तर तातडीने एलआयसीच्या फेसबुक पेजवर मोबाइल नंबर रजिस्टर करा. बदलत्या काळानुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच एलआयसीने विमा ग्राहकांना फेसबुक पेजवर सेवा उपलब्ध करून दिली आहे.

एलआयसीच्या स्थापनादिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिक विभागाचे एसडीएम प्रदीप शैणे यांनी एलआयसीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सोशल मीडिया अत्यंत प्रभावी असून, त्याचा योग्य वापर करून ग्राहकांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत आमच्याकडे २२ टक्के ग्राहकांचे मोबाइल नंबर रजिस्टर आहेत. त्यामुळे या ग्राहकांना आम्ही मोबाइलवरच विविध प्रकारचे संदेश देत आहोत. ज्यात पॉलिसीचा हप्ता, पॉलिसीची मॅच्युरिटी यासारख्या संदेशांचा समावेश आहे. विमा ग्राहकांचे मोबाइल नंबर नोंदविण्यासाठी एलआयसीच्या सर्व शाखांमध्ये सुविधा आहे. मात्र, जे ग्राहक शाखेपर्यंत येऊ शकत नाहीत. त्यांना 'एलआयसी इंडिया फॉरेव्हर' या फेसबुक पेजव्दारे मोबाइलची नोंदणी करता येईल, असे शेणै यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने १५ जुलै रोजी आदेश काढला असून, त्याद्वारे विमा ग्राहकाला एलआयसीच्या शाखेत येऊन विम्याचा हप्ता भरावा लागणार नाही. एलआयसीने स्टेट बँकेसह एकूण चार राष्ट्रीयकृत बँकांशी करार केला असून, या बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांचा विमा हप्ता एसीएसद्वारे (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) देता येणार असल्याचे शेणै म्हणाले. सद्यस्थितीत केवळ ३५ टक्के विमा ग्राहकच एलआयसीच्या शाखांमध्ये पैसे भरण्यासाठी येत आहेत. इंटरनेटद्वारे पेमेंट, चेक, इसीएस, एनईएफटी, अॅप याद्वारे पैसे भरण्याची सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉलिसी पुनरुज्जीवन संधी

एलआयसीच्या वर्धापनदिनानिमित्त पाच वर्षांपर्यंत बंद पडलेल्या विमा पॉलिसींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. व्याजात तीस टक्के सूट देण्यासह वैद्यकीय चाचणीची सक्ती काढण्यात आली आहे. त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

१०० विमा ग्रामचे उद्दिष्ट

ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या गावांना एलआयसीद्वारे विमा ग्राम घोषित केले जाणार आहे. या गावात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एलआयसीच्यावतीने एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च केला जाणार आहे. सोलर पंप, पथदिवे, स्वच्छतागृह अशा प्रकारच्या सुविधा त्या गावात दिल्या जातील. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षात १०० विमा ग्राम करण्याचे ध्येय असल्याचे शेणै यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाळून मारल्याप्रकरणी पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीला नांदविण्यास नकार देऊन दिला जाळून मारणाऱ्या पतीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भाऊराव रामनाथ गुळवे (रा. सिन्नर) असे त्याचे नाव आहे.

माया दशरथ जेडघुले (१८, रा. सिन्नर) हिच्यासमवेत भाऊराव गुळेवे याचा १३ मे २०१३ रोजी विवाह झाला होता. त्यानंतर दोनच महिन्यात तो तिच्याकडे घटस्फोट मागू लागला. १३ जुलै २०१३ रोजी माया त्याच्याकडे पुन्हा नांदायला आली. त्यावेळी तू नांदायला का आलीस, मला घटस्फोट दे असे तो तिला सांगू लागला. तिने त्यास नकार दिला. त्यानंतर माया हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला मारण्यात आले. ती पेटलेल्या अवस्थेत बाजूलाच बहिणीकडे पळत गेली.

आग विझवून तिला नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रतिभा चव्हाण यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी भाऊराव याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माहिती’चे मूल्य पाच हजार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करूनही आवश्यक ती माहिती न दिल्याप्रकरणी सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्री काळाराम मंदिर संस्थेच्या विश्वस्त नियुक्तीची माहिती देण्याचे त्यांनी टाळले होते.

अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शहराध्यक्ष हेमंत जगताप यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत श्री काळाराम मंदिर संस्थेच्या विश्वस्त नियुक्तीबाबतची माहिती अर्जाद्वारे सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षक सु. ना. गायकवाड यांच्याकडे अर्ज केला. माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज आल्यापासून ३० दिवसाच्या आत लेखी माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, गायकवाड यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे याप्रकरणी जगताप यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपिल दाखल केले. त्याची सुनावणी नुकतीच झाली.

विहित वेळेत माहिती न दिल्याप्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या सुनावणीवेळी गायकवाड यांनी सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे, की प्रकृती अस्वास्थ्य तसेच आस्था, रुग्णालय व नक्कल या तीन विभागांची जबाबदारी असल्याने विहित वेळेत माहिती सादर करता आली नाही. पण, जाणीवपूर्वक माहिती दिली गेली नसल्याची शंका जगताप यांनी उपस्थित केली.



शिस्तभंग कारवाई का करू नये?

याप्रकरणी आयोगाने गायकवाड यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावतानाच यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये याचा लेखी खुलासा आयोगापुढे १५ दिवसाच्या आत हजर राहून लेखी करण्यात यावा, असे आदेशही आयोगाने दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी जगताप यांनी समाधान व्यक्त केले असून माहितीच्या अधिकारान्वये सार्वजनिक माहिती देणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच फेरपरीक्षा उत्तीर्णांना प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत यश मिळविलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी मंगळवारी प्रवेशाची प्र्रकियाही सुरू झाली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात अकरावीच्या रिक्त असणाऱ्या जागांची संख्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आहे. परिणामी अकरावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नसल्याचा शिक्षण विभागाचा दावा आहे.

जुलै ऑगस्ट महिन्यात दहावी अनुत्तीर्णांसाठी फेरपरीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती मार्कशीटही देण्यात आले. यानंतर मंगळवारपासून या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली. फेरपरीक्षेमध्ये नाशिक शहर आणि जिल्हाभरातून सुमारे दीड हजारांवर विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

नाशिक विभागातून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात आहे. या स्थितीत एकट्या नाशिक शहर व जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजेसमध्ये सुमारे ४ हजार ३३३ जागा रिक्त आहे. आर्ट, कॉमर्स व सायन्स या तीनही शाखा मिळून ही संख्या आहे. यामुळे फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता कमी आहे.

बारावी परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

सन २०१६ मध्ये आयोजित इयत्ता बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. १७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत अद्यापही अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता आठ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना आता ८ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांसाठी ९ ते १६ ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजेसमध्ये आता आधार कार्डसक्तीचे केले आहे. त्या धर्तीवर बोर्डाने यंदा परीक्षा अर्जांमध्ये आधार कार्डच्या उल्लेखासाठीही रकाना उपलब्ध करून दिला आहे. बारावीचे अर्ज भरतेवेळी आधारकार्ड असणे सक्तीचे नसले तरीही हा आधार रकान्यामुळे विद्यार्थ्यांची पावले आधार केंद्राकडे वळत आहेत. या परीक्षा अर्जांविषयी अधिक माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

$
0
0

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंनीही फिरवली पाठ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही दिवसांपूर्वी हजारोंच्या संख्येने आरोग्य विद्यापीठाच्या विरोधात उतरलेले विद्यार्थी मंगळवारी पुन्हा संवेदनशील झाले. आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू अल्पावधीतच निवृत्त होत असल्याने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलप्रश्नी त्यांनी हेतूपुरस्सर चालढकल चालविली असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावर ठिय्या दिला.

नर्सिंगच्या अभ्यासक्रमात यंदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पध्दती आणि गुणदान पध्दतीचा मुद्दा गेल्या महिनाभरापासून आरोग्य विद्यापीठात गाजत आहे. आरोग्य विद्यापीठाने याप्रश्नी त्वरित निर्णय जाहीर करण्याची मागणी केली. याबाबत अद्याप विद्यापीठाकडून कुठलीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. अभ्यासक्रमात प्रवेश घेतेवेळी असणारी परीक्षा पध्दती वर्षअखेरीचा विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता बदलण्यात आली व परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराबाहेर गर्दी केली. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने समिती गठीत केल्याची माहिती यापूर्वी विद्यार्थ्यांना दिली होती. मात्र या माहितीत तथ्य नसून, अशी कुठलीही अधिकृत समिती विद्यापीठाने गठीत केलेली नसल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. सकाळपासून विद्यापीठाच्या प्रवेशव्दारावर उपाशीपोटी ठिय्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची दिवसभर कुलगुरूंशी भेट होऊ शकली नाही. दुपारी चार वाजेच्या सुमाराला कुलगुरू विद्यापीठात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पावित्र्यावर नाराजी व्यक्त करीत कुलगुरूंनी विद्यापीठाच्या प्रवेशव्दारापासूनच मागे वळणे पसंत केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या विद्यापीठ विचारात घेत नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे गेट काही वेळ बंद करून ठेवत घोषणाबाजी केली.

निर्णय ६ सप्टेंबरला?

यापूर्वीही अभाविपच्या वतीने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यासंदर्भात विद्यापीठाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेतली न गेल्याने या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतर विद्यापीठाने याप्रश्नी समिती गठीत केल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मात्र या माहितीत तथ्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे ‌िवद्यार्थी वैतागले आहेत. आता दिनांक ६ सप्टेंबर रोजी विद्यापीठात अॅकेडमिक कौन्सिलची बैठकर पार पडणार असून, यात या प्रश्नावर काही तोडगा निघणार का? या प्रश्नाकडे विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

रितसर मार्गाने विद्यापीठ प्रशासनाच्या भेटीगाठी, निवेदनानंतरही विद्यापीठाने चुकीची धोरणे बदललेली नाहीत. विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीचा विचार विद्यापीठ करीत नाही. पुढील टप्प्यात नाशिकपुरता मर्यादीत असलेले आंदोलन अधिक उग्र स्वरूपात राज्यभर करण्यात येईल. - अमोल गायकवाड, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा संघटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेकडून तूर्त पाणीकपात नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेन पिण्याचे पाण्याचे नियोजन सुरू केले असून गंगापूर धरण समूहातून पाणी आरक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. जलसंपदाकडे पाण्याच्या आरक्षणाबाबत मंगळवारी विचारणा करण्यात आली असून पुढील सप्टेंबरपर्यंत ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत तरी पाणीकपात केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पावसाने ओढ दिल्याने व राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होतांना दिसत असल्याने महापालिकेन आता शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. सप्टेंबर महिना लागला तरी गंगापूर धरण समूहात ५८ टक्के पाणीसाठा आहे. धरण भरण्याची शक्यता कमीच आहे.त्यामुळे या धरण समूहातून पालिकेन चार हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करावे, अशी मागणी केली आहे. पुढील वर्ष सप्टेंबरपर्यंत महापालिकेसाठी पाणी आरक्षित करावे, असे पत्र पालिकेन जलसंपदा विभागाला केले असून जिल्हाधिकाऱ्यांकडेही एवढ्याच पाण्याची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे आता जलसंपदा विभागाच्या उत्तराकडे लक्ष लागून आहे. दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी महापालिकेचा शहरात पाणीकपातीचा विचार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग विद्यापीठाला केराची टोपली!

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा प्रशासनाला पडला विसर

fanindra.mandlik

@timesgroup.com

नाशिक : नाशिकचे वातावरण योगाला पोषक असून, येथे योग विद्यापीठाची लवकरच स्थापना केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर २०१४ रोजी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या नाशिक रायझिंग कार्यक्रमात केली होती. त्याबाबत प्रशासनाला आदेशही देण्यात आले होते. या घोषणेला नऊ महिने उलटूनही प्रशासनाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

नाशिकमध्ये योग विद्यापीठ व्हावे ही जुनी मागणी आहे. त्यासाठी अनेक संस्थांकडून वेळोवेळी पाठपुरावा देखील करण्यात आला होता. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणमुळे नाशिकच्या क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिकला योगासाठी आवश्यक असलेले पोषक हवामान आहे. या विद्यापीठाला लागणारी जागाही उपलब्ध आहे. हा प्रकल्प नाशिकला झाल्यास भारताबाहेरून येणाऱ्या परदेशी पर्यटकांचा ओघ वाढून परदेशी चलन मिळण्यास मोठा हातभार लागणार आहे. या विद्यापीठाने योगाचा अभ्यासक्रम तयार करून त्याचे अनुकरण विभागीय अभ्यास केंद्राने करायचे, असा त्याचा मूळ गाभा होता. देशाच्या बाहेर योगाभ्यासाला फार महत्त्व आहे. भारतात काही बोगस संस्था योग अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मोठी कमाई करीत आहेत. त्यातून अनेक पर्यटकांची फसवणूक होते आहे. योग विद्यापिठाची स्थापना झाल्यास येथील योग साधकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.

लोकप्रतिनिधीही उदासीन

योग विद्यापीठ स्थापनेबाबत नाशिकच्या तीनही आमदारांना काही संस्थांनी अहवाल दिले आहेत. मात्र, या मंडळींनी अद्यापपर्यंत या प्रश्नावर आवाज उठवलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करून योगबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. नाशिकच्या आमदारांनी योग विद्यापीठाची मागणी रेटून नेल्यास योग विद्यापीठाला ताबडतोब मान्यता मिळेल, अशी नागरिकांची धारणा आहे. विधिमंडळात या प्रश्नी आवाज उठवावा, अशीही मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाच्या मंथनानंतर नोटांची उधळण

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्य सरकारवर टीका करीत असतांनाच, याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नव्या नियुक्तीचा आनंद नोटांची उधळण करून साजरा केला. सोबतीला फटाक्यांची आतषबाजीही केली. घडल्या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पुरती तोंडघशी पडली आहे.

राष्ट्रवादीच्या शहरातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे व नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जाहीर झाल्या. त्यापूर्वी प्रदेशच्या नेत्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवर राज्यसरकार गंभीर नसल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱ्यावरही टीकास्र डागण्यात आले. नेते दुष्काळ महत्त्वाचा असल्याचे सांगत असेल तरी ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पचनी काही पडले नाही. राष्ट्रवादी युवकच्या शहराध्यक्षपदी दिलीप खैरेंचे बंधु अंबादास खैरे, शहर कार्याध्यक्षपदी छबु नागरे यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी चक्क नोटांची उधळण केली. काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना खांद्यावर बसवून त्यांच्या समोर पाचशे व हजाराच्या नोटा उधळल्या. हा प्रकार प्रदेश नेतेही थांबवू शकले नाहीत. राज्यातील दुष्काळाचे थोडेसेही भान या पदाधिकाऱ्यांना राहिले नाही. एकीकडे सरकारवर टीका करायची आणि आपण मात्र आपल्याच थाटात रहायचे अशी स्थिती राष्ट्रवादीची झाली आहे.

नगरसेवकावर आरोप

तब्बल ३४ नोटा उधळण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. विशेष म्हणजे या नोटा एका नगरसेवकाने उधळल्याचा आरोप केला जात आहे.

माझी एकट्याची नव्हे तर इतरांच्याही नियुक्त्या तेथे झाल्या. त्यामुळे नेमक्या कोणाच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्या हे समजले नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्या नाहीत. - अंबादास खैरे शहराध्यक्ष, युवक काँग्रेस

घडला प्रकार अशोभनिय असून, त्याचे समर्थन करता येणार नाही. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ज्या मुलाने नोटा उधळल्या, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. कोणी दोषी असेल तर कारवाई करू. - जयंत जाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्राक्षबागेला आता नेट संरक्षण

$
0
0

म. टा. वत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

गत चार ते पाच वर्षांपासून सातत्याने होणारी गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कष्टाचे चीज होत नाही. यामुळे गारपीटपासून द्राक्ष बागांना वाच‌विण्यासाठी निफाड तालुक्यातील लोणवाडी येथील शेतकऱ्याने आता अडीच एकर क्षेत्रासाठी नेटचा वापर केला आहे. यामुळे द्राक्षबागाचे गारपीटपासून पूर्ण संरक्षण होणार आहे.

निवृत्ती एकनाथ दौंड यांची लोणवाडी शिवारात सतरा एकर द्राक्षशेती आहे. मात्र, दरवर्षी गारपीट व अवकाळी पावसाने दौंड परिवार हतबल झाला आहे. मात्र, द्राक्षबाग फुलवायची या जिद्दीने त्यांनी अडीच एकर क्षेत्रावर नेटचा वापर केला आहे. यासाठी लोखंडी पाइप, रबर, नेट असे साहित्य खरेदी केले. यासाठी मजुरीसह पाच लाख रुपये खर्च आला. द्राक्षबागेचा हंगाम संपल्यानंतर हे नेट काढताही येणार आहे.

गेल्या वर्षी गारपिटीचा फटक बसला होता. यंदा पुन्हा जोम्याने तयारी करीत दौंड बंधूनी तीन ऑगस्ट रोजी छाटणी केली असून, अतिशय उत्तम बहर आला आहे. ही द्राक्षबाग साधारण डिसेंबर अखेर खाली होईल. निसर्गावर मात करून हमखास चांगले उत्पादन मिळेल, अशी त्यांना खात्री आहे.

गारपीट, अवकाळी पाऊस यापासून संरक्षण म्हणून ही नेट अत्यंत उपयुक्त आहे. शासनाने नेटसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. नेट सुध्दा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावी. सामान्य शेतकऱ्याला याचा निश्चितच फायदा होऊन पिके वाचविता येतील. - निवृत्ती दौंड, द्राक्ष उत्पादक, लोणवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

$
0
0

शासकीय वसतिगृहात मिळेना प्रवेश

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या वाढवून प्रवेश देण्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाने गांभीर्याने विचार करावा. एकही विद्यार्थी शिक्षण व वसतिगृहापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कळवण प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार व जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांनी दिला.

कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह व जुनिअर कॉलेजमध्ये प्रवेशाबाबत कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थी व पालकांनी प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. निवेदन देऊन शासन यंत्रणेचे लक्ष वेधले.

जुलै महिन्यात नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शिष्टमंडळाने प्रकल्पधिकारी अविनाश चव्हाण यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासंदर्भात चर्चा केली होती. तसेच, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आदिवासी नेते काशिनाथ गायकवाड, नारायण पवार व पालकांनी या प्रश्नावर घेराव घालून शासन व प्रशासन यंत्रणेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर देखील शासकीय वसतिगृह प्रवेशापासून कळवण प्रकल्पात जवळपास १७०० विद्यार्थी वंचित आहेत.

विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांची भेट घेऊन प्रवेश मिळवून देण्याचे साकडे घातले. कळवण व सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांच्यासमवेत प्रकल्पधिकारी अविनाश चव्हाण यांची भेट घेऊन प्रवेशासंदर्भात जयश्री पवार यांनी चर्चा केली. प्रकल्प अधिकारी चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याशी चर्चा करून वसतिगृहातील वाढीव संख्या मंजुरी करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे, असे सांगून एकही विद्यार्थी वंचित रहाणार नाही असे आश्वासन दिले.

यावर्षी दहावी व बारावीचा निकाल चांगला लागला असून, विद्यार्थ्यांना कळवण तालुक्यातील शासकीय ज्युनियर कॉलेजमध्ये तसेच, वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. विविध संस्था व शासकीय आश्रमशाळांमध्ये पालकांनी पाल्याचा प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सर्व ठिकाणच्या प्रवेश मर्यादा संपल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागण्यांचे निवेदन

कळवण तालुक्यात १५ ते २० टक्के विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळालेला नाही. किमान १० टक्के विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गांमध्ये प्रवेश मिळालेला नाही. जुनिअर कॉलेजमध्ये प्रवेशापासून शेकडो विद्यार्थी वंचित आहेत. याबाबत राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना जयश्री पवार यांनी निवेदन पाठविले असून, विविध मागण्या यात नमूद केल्या आहेत.

१७०० विद्यार्थी वंचित

कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, बागलाण, मालेगाव व नांदगाव अशी सात तालुके येतात. मुलांचे १७ व मुलींचे १२ असे २९ वसतिगृह आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश मंजूर संख्या ३२०० च्या जवळपास आहे. त्यांना प्रवेश दिला असून, जवळपास १७०० विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे वसतिगृह वाढीव संख्या मंजुरीला आदिवासी विकास विभागाच्‍या मंजुरीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती विक्रेत्यांचे समंजस पाऊल

$
0
0

जेलरोडऐवजी पाटीदार भवनात असणार गणेशमूर्तींचे स्टॉल

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शहरातील गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉल लावण्याचा प्रश्न दरवर्षी गाजतो. पोलिस आणि महापालिका प्रशासनात कारवाई करण्यावरून टोलवाटोलवीही होते. मात्र, यंदा नाशिकरोडच्या गणेशमूर्ती विक्रेत्यांनी सामंजस्य दाखवत जेलरोडवर स्टॉल न लावण्याची भूमिका जाहीर केली. त्याची माहिती देणारा फलकही उभारण्यात आला आहे. यंदा पाटीदार भवन येथे स्टॉल असणार आहे.

बिटको चौकात जेलरोडवर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागतात. त्यांच्याबरोबरच सजावट विक्रेत्यांचेही स्टॉलही असतात. त्यांच्या आजूबाजूला नारळ, पान, पाट, पूजा साहित्य आदींचे किरकोळ विक्रेते असतात. यंदा कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांची स्नानाची सोय दसकच्या घाटावर करण्यात आली आहे. कुंभमेळ्यात वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून स्टॉलधारकांच्या संघटनेने सांमजस्याची भूमिका घेत मोटवानी रोडवरील पाटीदार भवन येथे स्टॉल लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

स्वप्निल सोनवणे, स्वप्निल शहाणे, निलेश सोनवणे, धनंजय डहाळे, शांताराम बोराडे, रत्नाकर शहाणे, त्र्यंबक सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, धनंजय कुकडे, जितेंद्र कल्याणी आदीं सदस्यांची बैठक घेऊन पाटीदारभवन येथे गाळे उभारण्याचा निर्णय घेतला.

आमच्या संघटनेचे सुमारे ५० सभासद आहेत. कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी संघटनेने यंदा पाटीदार भवन येथे स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला आहे. - संतोष खिलारे, अध्यक्ष, गणेश मूर्ती विक्रेता मंडळ

जेलरोडऐवजी पाटीदार भवन येथे गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्याचा विक्रेत्यांचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होईल. इतर ठिकाणच्या विक्रेत्यांनीही याचा आदर्श घ्यावा. - रवींद्र मालुंजकर, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार कार्डची पैसै घेऊन नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

कोर्टाने आधार कार्डची सक्ती नको असे आदेश दिले असतांनाही शाळांच्या आडमुठेपणामुळे पालकांना आधार नोंदणीसाठी धावपळ करावी लागत आहे. सिडको व सातपूरच्या काही भागात स्टेट बँकेच्याच ग्राहक सुविधा केंद्रांकडून अनधिकृतपणे आधार नोंदणी केली जात आहे. अशा केंद्रांवर छापा टाकून ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या महिन्यात तहसीलदारांनी सिडको भागातून अनधिकृतपणे सुरू असलेल्या आधार नोंदणी करणाऱ्यांवर थेट कारवाई केली होती. त्याच धर्तीवर सिडको, सातपूर भागात कारवाई करीत ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी केली जात आहे.

सरकारने विद्यार्थ्यांना आधार नोंदणी सक्तीची केली आहे. त्यामुळे पालकांनी नोंदणी होणाऱ्या ठिकाणी पैसे देत आधार कार्ड काढत आहेत. सिडकोतील पवननगर, त्रिमूत्तीचौक व सातपूरमध्ये केवलपार्क व चुंचाळे गावात अनधिकृत सुविधा केंद्रचालकांकडून पैसे घेऊन आधार नोंदणीचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे दोनशे ते तिनशे रुपये घेऊन ग्राहकाला टोकन दिले जाते. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी अंधार पडल्यावर आधार नोंदणीचे काम केले जाते. छुप्या मार्गाने अनधिकृतपणे चालणाऱ्या आधार नोंदणी चालकांवर कारवाईची मागणी महसूल विभागाने नेमलेल्या ई-सेवा केंद्र चालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये रुद्राक्षांचा ‘बाजार’!

$
0
0

१० रुपयांपासून २० हजारांपर्यंत दर

नाशिक : सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकमध्ये बनावट रुद्राक्षांचा बाजार खुल्या आम तेजीत आला असून यात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. खरा आणि बनावट हे दोन्ही रुद्राक्ष सारखेच दिसत असले तरी योग्य माहिती अभावी भाविकांची प्रचंड फसवणूक होत आहे. दुर्मिळ रुद्राक्षांचे मूल्य तर हजारोंच्या संख्येत असल्याचे दिसून येत आहे.

दर बारा वर्षांनी आयोजन होणाऱ्या सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकनगरीमध्ये सध्या आध्यात्मिक वातावरण आहे. याच वातावरणाचा फायदा घेत बनावट वस्तू विक्री करणाऱ्यांचाही मेळा भरला आहे. साधुग्राम परिसरात ठिकठिकाणी आणि बहुतांशी रस्त्यांच्या दोन्ही कडेला रुद्राक्षांची विक्री करणारी दुकाने थाटली आहेत. रुद्राक्षांचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन भाविक त्याच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. हीच बाब ओळखून काळ्या बाजारानेही साधुग्राममध्ये हात पाय पसरले आहेत.

भगवान शंकरांचा तिसरा डोळा अशी ख्याती असलेले रुद्राक्ष शरीरावर धारण करण्यासह त्याच्या पूजनाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. याचाच आधार घेत बनावट रुद्राक्षांचा मुबलक पुरवठा सिंहस्थातील बाजारात होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधुग्राममध्ये हजारो रुद्राक्षांची विक्री होत आहे. तपकिरी रंगाच्या या रुद्राक्षांना प्रचंड मागणी असल्याचे दिसून येत आहे. नेपाळमधून रुद्राक्ष विक्रीस आणल्याचे विक्रेते सांगत आहेत. दुर्मिळ आणि मोठ्या आकाराच्या रुद्राक्षांसाठी हजारो रुपये आकारले जात आहेत.

नाशिकमध्ये पाच तर त्र्यंबक येथे रुद्राक्षाचे एक झाड आहे. फळापासून निर्मिती होत असलेल्या रुद्राक्षाचे औषधी महत्त्व आहे. विद्युत चुंबकीय ऊर्जा हे रुद्राक्षांचे वैशिष्ट्य आहे. ज्या पद्धतीने कपॅसिटर काम करतो तसेच रुद्राक्ष करतात. गळ्यात रुद्राक्षांची माळा घातलेली असेल तर शरीरातील जास्तीची ऊर्जा शोषून घेणे. ज्यावेळी ऊर्जेची गरज असेल त्यावेळी शरीराला ऊर्जा देण्याचे काम रुद्राक्ष करतात. रक्तदाब आणि हृदयाच्या कार्यावर रुद्राक्षांचा प्रभाव राहतो.

अशी होते फसवणूक

रुद्राक्षावर नाग, महादेवाची पिंड, नागाचा फणा, भगवान शंकरांचे नयन, गणपती, त्रिशुळ अशा विविध प्रकारच्या आकृती असलेले रुद्राक्ष मोठ्या संख्येने साधुग्राममध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. रुद्राक्षाची पूजा करा, तुमचे भाग्य उजळेल, रुद्राक्ष गळ्यात घाला, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, अशा प्रकारची जाहिरात करून रुद्राक्षांची बाजारपेठे तेजीत आली आहे.

दुर्मिळ रुद्राक्ष

पंचमुखी रुद्राक्ष हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्या तुलनेत एक ते चारमुखी आणि सहा ते १४ मुखी रुद्राक्षांची संख्या अल्प असते. त्यामुळे या रुद्राक्षांची मनमानी पद्धतीने विक्री होते.

आमच्याकडे असलेल्या रुद्राक्ष झाडांपासून आजवर एक लाखाहून अधिक रुद्राक्ष प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारण दीड इंचापर्यंतचे रुद्राक्ष असतात. मात्र, एक फूट किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराचे रुद्राक्ष हे खरे असूच शकत नाहीत. - अविनाश शिरोडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रणछोडदासां’ची झाडाझडती

$
0
0

स्वयंसेवकांना पर्वणी काळात चोख भूमिका बजावण्याच्या सूचना

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवलेल्या आणि पोलिसांचे ओळखपत्र मिळाल्यानंतर रणांगण सोडून गायब झालेल्या स्वयंसेवकांना सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी बैठक घेऊन चांगलेच फैलावर घेतले. त्यांची झाडाझडती घेतानाच पुढील पर्वणीत चोख भूमिका बजावण्यासाठी प्रबोधनही केले.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात सव्वा तिनशे जणांनी कुंभमेळ्यासाठी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदणी केली. उपनगर पोलिस ठाण्यातही साधारण इतक्याच संख्येने स्वयंसेवकांची नोंद झाली आहे. कुंभमेळ्या आधी या स्वयंसेवकांची पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, अशोक भगत यांनी बैठक घेतली. त्यांना आचारसंहिता समजून सांगितली. कुंभमेळ्यात त्यांनी पोलिसांसमेवत कोणत्या पाईन्टवर उभे राहायचे, काय करायचे याची योजना आखून रंगीत तालीमही घेतली. ओळखपत्र मिळेपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांनी पोलिस ठाण्यात चकरा मारल्या. ओळखपत्र आल्यानंतर ते घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली. मात्र, पहिल्या पर्वणीला पाच टक्के देखील स्वयंसेवक हजर राहिले नाहीत. काही स्वयंसेवकांनी पास गळ्यात अडकवून तोऱ्यात मिरत होते. काहींनी तर पोलिस ओळखपत्रांचा वापर करून रामकुंडावर नातेवाईकांसह शाहीस्नान केले. काहींनी आपण अमूक नेत्याच्या जवळचे आहोत असे सांगत मार्गात आलेल्या पोलिसांशीच वाद घातला. याबाबत आयुक्तालयापर्यंत तक्रारी गेल्या. स्वयंसेवकांचे पास तयार करणाऱ्या एजन्सीचे डाटा करप्ट झाल्याने तथाकथित स्वयंसेवकांनीच घुसखोरी केली. खरे स्वयंसेवक उपेक्षित राहिले. कुंभमेळ्यात चुकामूक झालेल्या, हरविलेल्या भाविकांना हुडकून मार्गस्थ करण्यात पोलिसांना स्वयंसेवकांचे मोठे सहाय्य होते. ती भूमिका यंदाही बजवावी.

तर सत्कारही होईल

नाशिकरोडच्या पोलिस ठाण्यात स्वयंसेवकांची पुन्हा बैठक घेण्यात आली. सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांनी कामचुकार स्वयंसेवकांची चांगलीच कानउघडणी केली. काम करायची इच्छा नसेल तर ओळखपत्र जमा करा, कर्तव्यात कसूर अजिबात सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सुनावले. आम्ही ३८० पासचे वाटप केले. त्यातील पंधरा ते वीसच लोक दिसले. रणछोडदास स्वयंसेवकांचे पास परत घेतले जातील व त्यांना शांतता समितीसह कोणत्याच समितीवर घेतले जाणार नाही. प्रत्येकाने नियुक्त केलेल्या जागेवरच हजर रहावे. पोलिसांना सहकार्य करावे. बेशिस्त वागू नये. जे स्वयंसेवक चांगली सेवा देतील त्यांचा पोलिस आयुक्तांच्याहस्ते सत्कार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनी साधली `पर्वणी`

$
0
0

महिला टोळी गोदाघाटावर सक्रिय

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

सिंहस्थ कुंभपर्वात रामघाटावर स्नानासाठी आलेल्या भाविकांसोबत चोरीचे अनेक प्रकार घडत आहेत. या सर्व चोऱ्या विशिष्ट पद्धतीने होत असल्याचे दिसून आले आहे. शाही पर्वणी दिवशी घडलेल्या चोरींच्या प्रकरणात अनेकांचे मोबाइल्स, पाकिट मारले गेलेच; सोबत प्रवासी बॅग्स आणि सोनसाखळ्यांचीही चोरी करण्यात आली. नाशिकमधीलच नव्हे तर बाहेरून भाविक म्हणून आलेले भुरटे चोरही होते.

सोनसाखळी चोरीची एक विशिष्ट पद्धती दिसून येत आहे. भाविक महिला स्नानानंतर वस्त्र बदलत असताना चार-पाच महिलांचा टोळका चालत असतांना संबधित महिलेस एकत्रित घेरतो आणि त्याचवेळी सोनसाखळी खेचून घेतली जाते. यात एक महिला संबंधित महिलेचा गळा घट्ट धरते बाकी इतर साथीदार अशा काही जवळ उभ्या असतात की संबंधित महिलेला काहीच हालचाल करता येत नाही. नंतर क्षणार्धात या महिला गर्दीत नाहीशा होतात. असे अनेक प्रकार पर्वणी दिवशी घडले. अनेक महिला स्नान करते वेळी दागिने काढून न ठेवता डुबकी मारतात याचाही फायदा या चोरांकडून घेण्यात येतो. भाविक बनून हे अंघोळीसाठी पात्रात उतरतात आणि महिलेने डुबकी मारली की त्याच वेळी अलगद सोनसाखळी काढून घेतात. महिला भाविकांनी वस्त्र बदलण्यासाठी वस्त्रांतर गृहाचाच वापर करावा. वस्त्रांतर गृहात या महिला अश्या चोऱ्या करु शकत नाहीत.

भाविक स्नान करतांना आपले कपडे आणि बॅग्स पटांगणात काढून ठेवतात. यासमवेत जरी एखादा नातेवाईक बसलेला असला तरीही चोरी झाल्याचे अनेक किस्से पर्वणी दिवशी घडत होते. एखादी व्यक्ती त्या बॅग्स वा कपड्यांजवळ जाऊन बसते. सामानाजवळ असलेल्या व्यक्तीचे लक्ष विचलित झाल्याबरोबर एका वेळी फक्त एकच पँट घेऊन जाते. ही यांची पद्धत आहे. हे लोक एकावेळी एकच वस्तू उचलतात.

गर्दीचा घेताय फायदा

होल्ड अँड रिलीज पॉईंट असो किंवा रामघाटावर गर्दी इथे मोठ्या प्रमाणात पाकीट आणि मोबाइल चोरीच्या घटना घडल्या. गर्दीमध्ये अंगाला चिटकून चालणे, उगीच धक्का देणे, सिगारेट वगैरे फुंकत लक्ष विचलित करणे या पद्धतींचा अवलंब चोरी करण्यासाठी होत होता. या गोष्टी केल्याने समोरील व्यक्तीचे ध्यान विचलित होते. याच संधीचा फायदा घेत मोबाईल वा पाकिटावर हात मारला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाही पर्वणीसाठी कावनई सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

सिंहस्थाचे मूलस्थान समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कावनई येथे येत्या रविवारी, ६ सप्टेंबर रोजी शाहीस्नान होणार आहे. त्यासाठीच्या तयारीने वेग घेतला आहे. शाहीस्नानासाठी जवळपास तीन लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने बंदोबस्ताचे चोख नियोजन केल्याची माहिती घोटी पोलिस ठाण्याचे अधिकारी सुरेश मनोरे यांनी दिली.

कावनई येथे पर्वणीस्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, महसूल यंत्रणा व कपिलधारा ट्रस्ट व्यवस्थापन यांनी नियोजन केले आहे. शाहीस्नानासाठी घोटी वाडीवऱ्हे इगतपुरी येथील पोलिसांसह जिल्ह्यातून पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वतीर्थ टाकेद येथेही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, तेथेही पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. सध्या १५० पोलिस कर्मचारी बाहेरून दाखल झाले असून, त्यात २५ महिला कर्मचारी आहेत. राज्य राखीव दलाचेही २५ जवान दाखल झाले आहेत. आणखी १५० पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाची एक तुकडी दाखल होणार आहे. सद्यस्थितीत तीन ठिकाणी तात्पुरत्या पोलिस चौक्या उभारण्यात आल्या असून, घोटी वैतरना रोड-कावनई फाटा, वाहनतळ व कपिलधारा तीर्थ येथे उभारण्यात आले आहे.

विद्यार्थी बनणार स्वयंसेवक

येथील कपिलधारा पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात शाहीस्नानास येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. या कॉलेजचे ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी गाईड व स्वयंसेवकांची सेवा देणार आहेत. तीर्थस्नान, महाप्रसाद वाटप व प्राथमिक उपचार केंद्र या ठिकाणी हे विद्यार्थी मदतनीस म्हणून सहाय्य करणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन व कपिलधारा तीर्थस्थानाचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी दिली.

पार्किंग व्यवस्था

खंबाळे व वाकीच्यादरम्यान तीन किमी अंतरावर शाहीस्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ उभारण्यात आले आहे. या वाहनतळावर विद्युत पुरवठा, पोलिस मदत केंद्र, पर्यटन माहिती केंद्र, बचत गटाचे स्टॉल्स, प्राथमिक उपचार केंद्र आदि उभारण्यात आले आहे.

भाविकांची वाहने या वाहनतळावर उभी करण्यात येणार असून, तेथून बसेसच्या माध्यमातून भाविकांना कावनई-खिंड येथपर्यंत नेण्यात येईल तेथून कपिलधारापर्यंत भाविकाना पायी जावे लागणार आहे. कपिलधारा तीर्थस्थानी होणारी गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त व नियोजन करण्यात आले आहे.

वाकीजवळ पार्किंगव्यवस्था

> तीनशे पोलिस कर्मचारी दाखल > पार्किंग ते कावनईदरम्यान वाहनांना बंदी, बसेसच्या फेऱ्या चालूच राहतील > कपिलधारा पॉलिटेक्निकचे विद्यार्थी राहतील गाइड व स्वयंसेवक > राज्य राखीव दलाचे २५ जवान दाखल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीत ‘नाशिक हॅम’चा बोलबाला

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : सिंहस्थ कुंभ मेळ्यात प्रशासकीय कम्युनिकेशन व्यवस्थित व्हावे, यासाठी नाशिक हॅम्सने महत्त्वाची भूमीका बजावली. शहरात उभारण्यात आलेल्या १६ हॅम रेड‌िओ स्टेशनद्वारे पर्वणी काळात विविध विभागांतर्गत महत्त्वाचे कम्युनिकेशन करण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्यात कम्युनिकेशनची सर्व यंत्रणा कोलमडली तर हॅम रेड‌िओ हा पर्याय तयार ठेवण्यात आला होता. यासाठी नाशिकमधील हॅम रेड‌िओ लायसन्सधारकांनी एकत्र येऊन महत्त्वाचे योगदान दिले आहे. नाशिक हॅम्स ही संस्था आपत्कालीन परिस्थितीत कम्युनिकेशन करण्याचे काम करते या संस्थेद्वारे पहिल्या पर्वणीत गोपनीय कम्युनिकेशन करण्यासाठी १६ स्टेशन्स उभारण्यात आली. याद्वारे महत्त्वाचे कम्युनिकेशन करण्यात येत होते. पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेद्वारे कम्युनिकेशन केले असते तर ते सर्वांना ऐकू गेले असते त्यासाठी गोपनीय संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व निवासी जिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या प्रयत्नातून ही यंत्रणा उभारण्यात आली होती. याचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात येत होते. दुसरे नियंत्रण पंचवटी येथील मनपाच्या विभागीय कार्यालयात ठेवण्यात आले होते, रामकुंड वस्त्रांतर गृह, सिव्ह‌िल हॉस्पिटल, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, महामार्ग बसस्थानक, गंगापूर धरण, लक्ष्मीनारायण घाट, शाही मार्ग, गांधीतलाव असे १६ स्टेशन्स उभारण्यात आले होते. त्यासाठी नाशिक शहरातील ८० हॅम रेड‌िओ लायसन्सधारक काम करत होते. रेल्वे स्टेशनवर किती लोक उतरले? त्याची माह‌िती याद्वारे देण्यात येत होती. त्याच प्रमाणे महामार्ग बसस्थानकावर किती बस आल्या त्याद्वारे किती माणसे शहरात दाखल झाली. याचे स्टॅटीस्टीक रेकॉर्ड याद्वारे नियंत्रण कक्षाला देण्याचे काम नाशिक हॅम्सचे सभासद करत होते. त्याच प्रमाणे धरण क्षेत्रात पाऊस आहे की नाही, पाणी सोडण्याची आवश्यकता आहे किंवा नाही याचे कम्युनिकेशन या रेड‌िओ स्टेशनद्वारे करण्यात येत होते.

एका तासाला किती लोक शहरात येतात आणि किती लोक बाहेर पडतात त्याचे नियंत्रण याद्वारे करण्यात येत होते. ही यंत्रणा सिंहस्थ पर्वणीत कार्यान्वित करण्यासाठी नाशिक हॅम्सने कोणत्याही स्वरुपाचा मोबदला घेतला नव्हता. ही सेवा संपूर्णपणे मोफत पुरवण्यात आली होती. पर्वणीच्या १ महिना अगोदर या स्टेशन्सच्या जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. यानंतरच्या सर्व पर्वण्यांमध्ये या स्टेशन्सचा वापर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी कार्यालयाला ‘अच्छे दिन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील हायटेक कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने हाती घेतले असून, कार्यालयावरील पक्षाचे तुटलेले पक्ष चिन्हही नव्याने लावण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील घडयाळाचे एक चिन्ह चोरीला तर एक गळून पडले होते. राष्ट्रवादीच्या हायटेक कार्यालयाची दैनावस्था 'मटा'ने प्रकाशित केल्याने नेत्यांनी जाग आली असून, या हायटेक कार्यालयाची डागडूजी सुरू केली आहे.

नाशिक येथील राष्ट्रवादीचे कार्यालय हे राज्यातील एक हायटेक कार्यालय आहे. चार मजली इमारतीत सर्व सुविधा आहेत. सत्ता गेल्यानंतर या कार्यालयाचेच दिवस पलटले. इमारतीवरील पक्ष चिन्ह गायब झाले होते. तर दुसरे चिन्ह चक्क चोरीला गेले होते. राष्ट्रवादीच्या कार्यालयाची दैनावस्था 'मटा'ने 'राष्ट्रवादीने सोडली घडयाळाची साथ' या वृत्ताखाली प्रसिद्ध केली होती. त्याची गंभीर दखल नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे या कार्यालयाचीच डागडूजी हाती घेण्यात आली असून, पक्ष चिन्हही नव्याने लावण्यात आले आहे. कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात येत असून, त्याला नव्याने सजविण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे बुरे दिन संपून 'अच्छे दिन' आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी बनले पोलिसांची ढाल

$
0
0

सिंहस्थ नियोजन ही सामूहिक जबाबदारी असल्याचा निर्वाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांत फारसे सख्य नसते हे नव्याने सांगायला नको. म्हणूनच अधिकारी एकमेकांवर खापर फोडण्यातच धन्यता मानताना दिसतात. मात्र सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीनंतर पोलिसांनाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने आता जिल्हाधिकारी स्वत:च पोलिसांच्या बचावाची ढाल बनले आहेत. ही जबाबदारी केवळ पोलिसांची नव्हे तर सामुह‌िक होती असे सांगतानाच नाशिककरांनी या सोहळ्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी बुधवारी दिली.

पहिल्या पर्वणीकडे नाशिककरांनी पाठ फिरविल्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर नोंद घेतली आहे. पोलिस प्रशासनाने अतिरेकी बंदोबस्त ठेवल्याने नाशिककर या सोहळ्यापासून दूर राह‌िले अशी टीका सर्वच स्तरातून होऊ लागली आहे. पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी मात्र या आरोपांचे खंडन करीत मंगळवारी पोलिसांची पाठराखण केली. गत कुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला पोलिसांनाच जबाबदार धरले गेल्याचे शल्यही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाले.

या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी म्हणाले, कुंभमेळ्याचे नियोजन ही केवळ पोलिसांची जबाबदारी नव्हती. ती सामुह‌िक जबाबदारी असल्याने एकट्या पोलिसांना नियोजनातील त्रूटींसाठी दोषी ठरणे उचित नाही. आम्ही सामुह‌िकरित्या ही जबाबदारी स्वीकारतो. नियोजनात राहिलेल्या उणीवांचा आढावा आम्ही घेत आहोत. या उणीवा दूर करून त्यावर उपाययोजनांचाही विचार सुरू आहे.

सिंहस्थ काळात शहरांतर्गत बससेवा बंद ठेवण्यात आली. तसेच भाविकांची वाहनेही शहरात येऊ शकली नाहीत. परिणामी भाविकांनी पायपीट करण्यऐवजी घरी बसून राहणेच पसंत केले. ही लक्षणीय त्रूटी प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. बाह्य वाहनतळांमध्ये बदल करणे शक्य नसले तरी अंतर्गत वाहनतळांची संख्या वाढविण्याचा विचार प्रशासन करीत असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. शहरांतर्गत बससेवा मोफत पुरविण्याचा विचार

जास्तीत जास्त भाविकांनी सिंहस्थ पर्वणीचा लाभ घ्यावा यासाठी शहरांतर्गत बससेवा सुरूच ठेवण्यात येणार आहे. किंबहुना ही बससेवा मोफत पुरविता येईल का याचाही विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. मोफत सेवा हवी असा भाविकांचा आग्रह नाही. मात्र त्यांना माफत दरात शहरांतर्गत प्रवास करता येईल, अशी ग्वाही कुशवाह यांनी दिली आहे. शक्य झाल्यास बसेस तसेच नागरिकांची खासगी वाहनेही शहरात येऊ शकतील का यावरही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांच्या संपामुळे व्यवहार ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लाक्षणिक बंदचे हत्यार उपसून केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधणाऱ्या कामगारांनी सीबीएससारख्या वर्दळीच्या रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. सरकारी कार्यालये, बँका, विमा कंपन्या आणि काही औद्योगिक कंपन्या या संपात सहभागी झाल्याने व्यवहार ठप्प झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देताना आंदोलक आक्रमक झाल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

कामगार कायद्यातील कामगारविरोधी तसेच मालक धार्जिणे धोरण रद्द करा, सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, सरकारी खात्यांमधील तीन लाख पदे त्वरित भरा, कंत्राटी कामगारांना कायम करा, समान कामाला समान वेतन व समान भत्ते द्या, अंगणवाडी कामगार, आशा यांना कायम करा, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण व विक्री रद्द करा यासारख्या अनेक मागण्यांसाठी बुधवारी विविध सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी कामबंद आंदोलन पुकारले होते. काही कामगार प्रत्यक्ष या आंदोलनात सहभागी झाले, तर आंदोलनात सहभागी होणाऱ्या कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा राज्य सरकारने दिल्यामुळे अनेक कामगारांनी तसेच त्यांच्या संघटनांनी प्रत्यक्ष संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून त्यांना पाठिंबा दर्शविला. पशुवैद्यकीय विभाग, जिल्हा रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, विक्रीकर विभाग, राज्य मार्ग प‌रिवहन महामंडळ, बीएसएनएल, महावितरण, इंडिया सेक्युरिटी प्रेस, टपाल विभाग, पेन्शनर असोसिएशन, एचएएल, शासकीय दूध डेअरीचे कर्मचारी मोठ्या संख्येने या लाक्षणिक बंदमध्ये सहभागी झाले.

गोल्फ क्लब मैदान येथून सकाळी अकराच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. शालिमार, सांगली बँक चौक, रेड क्रॉस सिग्नल, मेहेर सिग्नल मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. तेथे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. मोर्चाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची तेथे भाषणे सुरू असतानाच काही कार्यकर्ते आक्रमक झाले. ते दुभाजक ओलांडून विरुध्द बाजूला आले. सीबीएस परिसरातील दोन्ही मुख्य रस्त्यांवर आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे जिल्हा न्यायालयापासून ते त्र्यंबक नाक्याच्या सिग्नलपर्यंत तर दुसरीकडे शालिमार आणि राजीव गांधी सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मांडला. मात्र त्यामुळे एका बाजूने सुरू असलेली वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अधिकच आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. डॉ. डी. एल कराड, श्रीधर देशपांडे, सिताराम ठोंबरे, राजू देसले, संगीता उदमले, महादेव खुटे, कांतीलाल तातेड, व्ही.डी. धनवटे, शिरीष धनक, प्रमोद भालेराव, रमाकांत गोरे यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच २० हजारांहून अधिक कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तब्बल तीन तासांहून अधिक काळ हे आंदोलन चालल्याने शहरातील वाहतुकीचा फज्जा उडाला.

शिक्षक संघटना

केंद्र सरकारच्या कामगारविषयक धोरणांविरोधात एकवटलेल्या कामगारांच्या सोबतीलाच काही शिक्षक संघटनांनीही उडी घेत निदर्शने केली. शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाही काढण्यात आला. मोर्चात माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास देवरे, गोरख सोनवणे, निमंत्रक मोहन चकोर, हेमंत पाटील, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रवींद्र जोशी, रामनाथ थेटे, भाऊसाहेब शिरसाठ, आसिफ शेख, एस. बी. शिरसाठ आदींनी सहभागी होत मोर्चा यशस्वी केला.

औद्योगिक व्यवहार ठप्प

शहरातील औद्योगिक वसाहतींमधील कामकाजही बुधवारी ठप्प राहिले. सातपूर आणि अंबड परिसरातील औद्योगिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डाव्या आघाडीच्या कामगार संघटनाही कार्यरत आहेत. या परिसरातील भाजपा व शिवसेना प्रणित संघटनांचा अपवाद वगळता इतर संघटनांच्या वतीने संपात सहभाग नोंदविण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

जिल्ह्यातील सर्व उद्योगांचे सर्वेक्षण करून सर्व कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी, कंत्राटी कामगारांना किमान वेतनासह सर्व कायदेशीर लाभ लागू करावेत, जिल्ह्यातील बंद उद्योग सुरू करावेत, बंद उद्योगांतील कायदेशीर देणी देण्याची व्यवस्था करावी, जिल्ह्यातील सर्व कामगारांना राज्य सरकारी विमा योजना लागू करावी, यंत्रमाग व विडी कामगारांना सुधारीत किमान वेतन लागू करा, सर्व आस्थापनांमधील कंत्राटी कामगारांना

कायम करा अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कुशवाह यांना भेटले. त्यावेळी जिल्हा स्तरावरील मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी डॉ. डी. एल कराड, श्रीधर देशपांडे आदींनी केली.

विविध संघटनांनी दिलेले मागण्यांचे निवेदन आम्हाला मिळाले आहे. काही मागण्या राज्य सरकारच्या पातळीवरील तर काही केंद्र सरकारच्या पातळीवरील आहेत. त्याबाबत सरकारच्या संबंधित विभागांना माहिती देऊ. सध्या कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनात प्रशासन गुंतले आहे. तीन पर्वण्या संपल्यानंतर कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. संपामध्ये किती सरकारी कर्मचारी सहभागी झाले याची माहिती मागविली आहे. सरकारकडून निर्देश आल्यास सहभागींवर कारवाई होणार की नाही, हे ठरविता येईल. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images