Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालिकेचे अधिकारीही ‘मोहजाला’त

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : कुंभमेळ्यात जाहिरातीची पर्वणी साधण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पोलिसांपाठोपाठ महापालिकेच्या आरोग्य विभागालाही मोहजालात ओढल्याचे समोर आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनीही कर विभागांना अंधारात ठेवून आपल्याच अधिकारात टचवूड कंपनीला होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली. वाच्यता झाल्यानंतर स्वतःहून परवानगीचे पत्र रद्द करण्यात आल्याने या घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपन्यांना आम्ही पालिकेची परवानगी घेण्यास सांगितले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

कुंभमेळ्यात जाहिरातीची सुवर्ण पर्वणी साधून घेण्यासाठी देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गैरमार्ग अवलंबिल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात `बड्या कंपन्यांसाठी नाशिक पोलिसांचा कायदेभंग` हे वृत्त `मटा`ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात सारवासारव करीत, ते आम्ही नव्हेच अशी भूमिका घेतली आहे. आता या कंपन्याच्या बनवाबनवीचे अनेक कांगोरे समोर येत आहेत. टचवूड मरकॉन इनिशिएटिव्ह प्रा.लि.या कंपनीने पोलिसांची परवानगी घेतल्यानंतर विविध कर संकलन विभागाला टाळून पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याकडून जाहिरात लावण्याची परवानगी एक जुलै रोजी मिळवली. एका पत्राच्या आधारावर संबंधित एजन्सीने जाहिरातींसाठी शहर मोकळे करून दिले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे डेकाटे यांनी तत्काळ परवानगीचे पत्र रद्द ठरविले.

कंपन्यांना जाहिरात लावण्याच्या परवानग्या दिल्यानंतर त्यांना आम्ही पालिकेचीही परवानगी घेण्यास सांगितले होते. तसे पत्रही आम्ही पालिकेला दिले आहे. कराचा भाग पालिकेचा आहे. त्यामुळे पुढील जबाबदारी पालिकेची आहे.

विजय पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खाओ शिलाजीत, हो जाओगे मर्द!

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : कोळसा किंवा डांबरासारखे दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या वस्तूची मोठी उलाढाल साधुग्राममध्ये होत आहे. ही वस्तू आहे शिलाजीत. औषधी गुणधर्मामुळे शिलाजीतच्या सेवनातून मर्दानगी येत असल्याचा प्रचार विक्रेत्यांकडून केला जात आहे. मात्र, हे खरे शिलाजीत आहे का, असा प्रश्न कायम आहे.

सिंहस्थानिमित्ताने बहुविध वस्तू आणि साधनांच्या विक्रीची मोठी बाजारपेठही नाशिक आणि त्र्यंबकमध्ये साकारली आहे. त्यात केवळ आध्यात्मिकच नाही तर औषधी वनस्पतींपासून चक्क बंदी असलेल्या वस्तूंच्याही खरेदी-विक्रीने वेग घेतला आहे. बनावट रुद्राक्ष, वाघनखांबरोबर साधुग्राममध्ये शिलाजीतचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. काळ्या रंगाच्या दगडासारखे असणाऱ्या या वस्तूला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अगदी पावलापावलांवर रस्त्याच्या दुतर्फा शिलाजीत विकणारे आहेत.

साधुग्रामला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते करीत आहेत. हिमालयातून आणि नेपाळमधून शिलाजीत आणण्यात आल्याचे विक्रेते सांगत आहेत. काळ्या रंगाचे, चकाकणारे आणि चिकट स्वरुपाची ही वस्तू शिलाजीतच आहे का, याबाबत मात्र संभ्रम आहे. कारण, विक्रेते ठामपणे शिलाजीतच असल्याचे सांगत असले तरी त्याचे मूल्य अवघे प्रति ग्रॅम 50 ते 100 रुपये एवढेच आहे.

शिलाजीतमध्ये औषधी गुणधर्म असून, त्याच्या सेवनाने मोठे फायदे होत असल्याचे विक्रेते सांगतात. 'खाओ शिलाजीत हो जाओगे मर्द', 'हड्डीया मांस पेशीयों की मजबुती के लिए असरदार है शिलाजीत' अशा प्रकारचा प्रचार करून शिलाजीतचा व्यापार दररोज वाढत आहे. काही विक्रेते तर शिलाजीतचा काही भाग जाळून त्याची सत्यता पटवून देत आहेत.

काय करते एफडीए?

औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाणाऱ्या शिलाजीतची मोठी विक्री होत असली तरी नाशिकचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) काय करीत आहे. बनावटी शिलाजीतच्या सेवनाने एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी कुणावर असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिलाजीतच्या नावाने डांबरी दगड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई करावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या साधुग्राममध्ये हाणामारी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

जंगलीदास महाराजांची मिरवणूक साधुग्राम परिसरातून जात असताना झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारी आणि तोडफोडीत झाले. साधुंनी हातात तलवार घेतली आणि पोलिसांची पंचाईत झाली. एरवी हाती शस्त्र घेऊन राडा करणा-याला पोलिसी इंगा दाखवून वठणीवर आणणा-या पोलिसांना कठोर कारवाई करणे अवघड झाले. अखेर कशीबशी सगळ्यांची समजूत काढून पोलिसांनी हिंसाचार थांबवला. साधुग्राममधील बंदोबस्तात वाढ करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.

साधुंच्या तीन आखाड्यांकडून होत असलेला तीव्र विरोध डावलून जंगलीदास महाराजांची मिरवणूक साधुग्राम मधून पुढे जात होती. मिरवणुकीत सुमारे दोन हजार भाविक आणि काही बस होत्या. मिरवणूक पुढे सरकत असताना विरोध करणा-या साधूंशी जंगलीदास महाराजांच्या समर्थकांचा वाद झाला. विरोधकांनी मिरवणुकीवर तलवारी घेऊन हल्ला केला. हल्लेखोरांनी मिरवणुकीतल्या वाहनांची तोडफो़ड करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वरिष्ठ पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करुन सगळ्यांची समजूत काढली. कायदा हाती घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात मिरवणूक औरंगाबाद रोडवरुन पुढे जाऊ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळांच्या नावाने मागितले पैसे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पाथर्डी

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने समीर भुजबळ असल्याचे सांगून पैसे मागितले. या प्रकरणी महंतांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पैशांशी संबंधित या प्रकरणात एका सरकारी अधिका-याचे नाव आल्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना पाथर्डीच्या प्रांताधिका-यांनी एक मोबाइल नंबर पाठवला आणि या नंबरवर समीर भुजबळांशी तातडीने संपर्क साधा असा निरोप दिला. प्रांताधिका-यांचा निरोप असल्यामुळे महंत शास्त्री यांनी तातडीने संपर्क केला असताना पलिकडून बोलणा-याने समीर भुजबळ अशी ओळख सांगून नगरजवळ अपघातामुळे अडचणीत सापडल्याचे सांगितले. तसेच महंतांकडे पैसे मागितले. महंतांना संशय आला, त्यांनी गडावरील कार्यकर्त्यांना बोलावले आणि एका मोबाइल अॅपद्वारे नंबरची पडताळणी केली. नंबर दुस-याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे पाहून महंतांनी समीर भुजबळ यांचा नंबर मिळवून थेट त्यांच्याशी संपर्क साधला. समीर भूजबळांनी आपण पैसे मागितले नसून पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची सूचना केली. अखेर महंतांनी कार्यकर्त्यांमार्फत पोलिस स्टेशनवर तक्रार नोंदवली आहे.

प्रांताधिका-यांकडे चौकशी केली असता वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या तोंडी आदेशानुसार आपण कारवाई केली असे मोघम उत्तर देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी पूर्ण केल्यानंतर सत्य उलगडेल असे सांगितले. दरम्यान भगवान गडावरील कार्यकर्त्यांनी गडाला तसेच महंत नामदेव शास्त्री यांना पुरेसे पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौघांची निर्दोष सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

पिंपळगाव बसवंत येथील युवतीवर गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी निफाड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. ज. मंत्री यांनी गुरुवारी निकाल देऊन चौघांना दहा वर्ष सश्रम कारावास व दंडची शिक्षा तर सबळ पुराव्याअभावी चौघांची निर्दोष मुक्तता केली.

सबळ पुराव्याअभावी सागर आवारे, महेंद्र पानकर, विशाल सोनवणे व सचिन वराडे या चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील अॅड. व्ही. एन. हाडपे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस वर्गणीदारांना दणका

$
0
0

मंडळाची नोंदणी बंधनकारक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रकारच्या धार्मिक उत्सव तसेच कार्यक्रमासाठी बेकायदा वर्गणी गोळा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. वर्गणी गोळा करण्यासाठी मंडळांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, अनधिकृतपणे वर्गणी गोळा करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.

विविध उत्सव व कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करण्याबाबत मंडळ किंवा सदस्यांनी धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा अर्ज कार्यालयाने उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे नागरिकांकडून सर्रास वर्गणी गोळा करणाऱ्यांना मोठा चाप बसणार आहे. वर्गणी करणाऱ्या मंडळांना नोंदणीसाठी आवश्यक त्या सर्व बाबी कार्यालयाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव, किमान एका पदाधिकाऱ्यांच्या किंवा सदस्यांच्या ओळखपत्राची साक्षांकीत प्रत, जागेबाबत जागा मालकाचे ना हरकत पत्र किंवा परवानगी पत्र, नगरसेवक किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे मंडळ सदस्यांचे ओळखीबाबत पत्र, गेल्या वर्षीच्या उत्सवाचे हिशोब, गेल्यावर्षी घेतलेल्या परवानगी पत्राची प्रमाणित प्रत आवश्यक आहे. कार्यालयाच्यावतीने संबंधित मंडळाची चौकशी करूनच विविध प्रकारच्या अटी-शर्थीद्वारे देणगी किंवा वर्गणी गोळा करण्यास परवानगी दिली जाणार आहे. वर्गणी किंवा देणगी गोळा करीत असताना तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशारा धर्मादाय उपआयुक्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांना भत्ता, पगार अन् लाभांश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

राज्यातील दुष्काळ लक्षात घेऊन नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेने सभासदांचा दोन टक्के लाभांश, सत्ताधारी गटाच्या १६ संचालकांचा एक वर्षाचा मिटींग भत्ता आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॅँकेची ५४ वी वार्षिक सभा अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पेखळे यांच्या अध्यक्षतेखाली जेलरोडच्या शाखेतील सभागृहात झाली. संचालक दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, शाम चाफळकर, मनोहर कोरडे, डॉ. प्रशांत भुतडा, हेमंत गायकवाड, रामदास सदाफुले, अशोक चोरडीया, रंजना बोराडे, श्रीराम गायकवाड, वामनराव हगवणे, बाबासाहेब पाळदे, जग्गनाथ आगळे, कमल आढाव, एकनाथ कदम आदी व्यासपीठावर होते.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने बँकेने सरकारला मदत करावी, अशी सूचना सभासदांनी केल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. कार्यकारी अधिकारी पद भरावे, खर्चावर नियंत्रण ठेवावे आदी सूचना सभासदांनी केल्या. डॉ. पेखळे म्हणाले की, बँकेचे भाग भांडवल ११ कोटी ७७ लाख तर सभासद संख्या ६२ हजार झाली आहे. बँकेकडे ३६५ रुपयांच्या ठेवी असून २९५ कोटींची कर्जे वाटली आहेत. निव्वळ नफा चार कोटी २३ लाख झाला आहे. दिवाळीपर्यंत १०.९५ या अल्पदराने गृहकर्ज देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आणखी नऊ शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. विक्रम खरोटे, सचिन हांडगे, प्रकाश गोहाड, अंबादास आडके, त्र्यंबकराव गायकवाड, पा. भा. करंजकर आदी सभासदांनी सूचना मांडल्या. सुधाकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर दुर्घटनेची चौकशी करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरच्या श्री साईश कंपनीतल्या सेफ्टी टँकमध्ये झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मेघवाळ, मेहतर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत नसल्यानेच ही स्थिती ओढावल्याचा आरोप सुरेश मारू यांनी केला आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कामगाराच्या वारसाला अनुंकपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

ड्रेनेज व सेफ्टी टँक साफ करण्यासाठी असलेल्या वाहनावर कमीत कमी चार सफाई कर्मचारी असणे आवश्यक असताना एकच कर्मचारी होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देवून करण्यात आली. महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कामगाराच्या वारसाला अनुंकपा तत्वावर नोकरी देण्यात येणार आहे. रोजंदारी कर्मचाऱ्याच्या मदतीबाबत शासन स्तरावर निर्णय होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमआयडीसीत ड्रेनेजचा अभाव

$
0
0

वादात अडकली ड्रेनेज व्यवस्था

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

नाशिक शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत छोट्या मोठ्या हजाराच्यावर कंपन्या आहेत, मात्र तरीही ड्रेनेजची चोख व्यवस्था करण्यात आलेली नाही. महापालिका व एमआयडीसी यांच्या वादात ड्रेनेज लाइन अडकून पडली आहे. शनिवारी सेप्टी टँक सफाई करताना झालेल्या दोन जणांच्या मृत्युनंतर तरी एमआयडीसीत ड्रेनेजची व्यवस्था होणार का, असा सवाल उद्योजक उपस्थित करीत आहेत.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीची उभारणी झाल्यानंतर आजतागायत कंपन्यांच्या सांडपाण्याकरिता ड्रेनेज लाइनची व्यवस्था करण्यात आलेली नाही. एमआयडीसीत ड्रेनेजची व्यवस्था करण्यात यावी यासाठी निमा, आयमा, नाईस, निवेक व लघू उद्योग भारती यांसह औद्योगिक संघटनांनी वेळोवेळी महापालिकेकडे मागणी केली. विशेष म्हणजे महापालिका सर्व प्रकारचे कर कंपन्यांकडून वसूल करीत असताना देखील ड्रेनेज करण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही उद्योजकांनी जिल्हा उद्योग मित्रच्या झुम बैठकीत केला. मात्र, महापालिकेकडून आतापर्यंत केवळ आश्वासनेच देण्यात आली.कंपनीतील शौचालयाची टाकीची सफाई करताना झालेल्या दोन जणांच्या मृत्यूनंतर तरी महापालिका व एमआयडीसी कंपन्यांसाठी ड्रेनेजची व्यवस्था करणार का, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. यावर महापालिका व एमआयडीसीने कामयस्वरुपी उपाय शोधण्याची गरज आहे.

एमआयडीसीत महापालिकेने ड्रेनेजची यंत्रणा उभी करावी, याबाबत आयमाने नेहमीच मागणी केली आहे. त्यातच सेफ्टी टँकची सफाई करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्याची गरज होती. महापालिका आयुक्तांनी घडलेल्या घटनेनंतर एमआयडीसीत ड्रेनेज लाइनी टाकल्या पाहिजे.

- विवेक पाटील, अध्यक्ष, आयमा

औद्योगिक वसाहतीत ड्रेनेजबाबतीत उद्योजकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. महापालिका कंपन्यांकडून सर्व कर वसूल करीत असताना ड्रेनेज लाइन टाकण्याबाबत टाळाटाळ का करते, हा सवालच आहे. महापालिकेने ड्रेनेजची तत्काळ व्यवस्था करायला हवी.

- पी. आर. बंडोपिया, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, नाशिक

निमासह सर्वच औद्योगिक संघटनांची एमआयडीसीत ड्रेनेजची व्यवस्था असावी म्हणून वेळोवेळी महापालिकेकडे मागणी केली आहे. परंतु, अनेक वर्षांपासूनच्या या मागणीकडे महापालिकेने लक्ष दिलेले नाही. सर्व प्रकारचे कर वसूल करीत असताना माहपालिकेने ड्रेनेजची सुविधा देणे गरजेचे आहे.

- मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेफ्टी टँकमध्ये दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सातपूर एमआयडीसीतील नाईस भागातील कंपनीतील शौचालयाची टँक साफ करतांना दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुदैवी घटना घडली. मृतांमध्ये एक महापालिकेचा सफाई कर्मचारी असून, दुसरा मजूर आहे. या घटनेमुळे एमआयडीसीतील ड्रेनेजचा मुद्या ऐरणीवर आला आहे. संतप्त जमावाने पालकमंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. त्यांनी मृताच्या वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस भागात साईश इंजिनीअरींग प्लॉट नंबर सी-१२/१ ही कंपनी आहे. या कंपनीतील खासगी शौचालयाची सफाई करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. शौचालयाची सेफ्टी टँक साफ करण्याची मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. शनिवारी कंपनीला सुटी होती. महापालिकेची व्हॅक्यूम क्लिनिंग गाडी (एमटीआर) सकाळी दहाच्या सुमारास कंपनीत आली. मात्र, या गाडीवर पुरेसे कर्मचारी नसल्याने महापालिका कर्मचाऱ्याने नाक्यावरून एका मजुराला आणले होते. शौचालयाची व्हॅक्युमने सफाई करतांना महापालिकेचे सफाई कर्मचारी विनोद माधव मारू (वय ३२) व मजूर दीपक रामचंद्र माळी (वय २५) यांनी व्हॅक्यूमचा पाइप लावत एक गाडी भरली होती. त्यानंतर दुसरी गाडी भरण्यासाठी कंपनीत आली. यावेळी माळी हे शौचालयाच्या टाकीत पाहणी करण्यासाठी उतरले. मिथेन गँसमुळे भोवळ येऊन ते टाकीत पडले. त्यांना शोधण्यासाठी मारू हे देखील टाकीत उतरले. त्यांनाही भोवळ आली. हा प्रकार कंपनीतील कर्मचारी संतोष जाधव यांच्या लक्षात आला. कमरेला दोन बांधून ते मारू व माळी यांना शोधण्यासाठी टाकीत उतरले. मात्र, ते ही बेशुध्द झाले. कंपनीच्या आवारातील काही कर्मचाऱ्यांनी सातपूर अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जाधव यांना टाकीतून बाहेर काढले. पाठोपाठ मारू व माळी यांनाही बाहेर काढले. तिघांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मारू आणि माळी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

महापालिकेच्या ताफ्यात सध्या दोनच व्हॅक्यूम एमटीआर आहेत. अशी आणखी दोन वाहने महापालिकेकडे असणे आवश्यक आहे. ही वाहने लवकरात लवकर महापालिकेच्या ताफ्यात समाविष्ट व्हावीत म्हणून प्रस्ताव तयार करावा, असे आदेश पालकमंत्री महाजन यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

अन् तणाव निवळला...

दोन कामगारांच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, कामगारांना आश्वासनांकडे पलीकडे काहीच मिळाले नसल्याचा आरोप मृतांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातलगांनी स्वीकारला. त्यामुळे तणावाचे वातावण निर्माण झाले. पालकमंत्री महाजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एकनाथ माले यांच्या दालनात त्यांनी मृतांच्या निकटवर्तीयांची समजूत काढली. मृतांच्या वारसांना न्याय मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिल्यानंतर तणाव निवळला.

ड्रेनेज लाईनचा मुद्दा ऐरणीवर

एमआयडीसीतील नाईस भागात असलेल्या कंपनीतील शौचालयाच्या टँकमध्ये दोन जणांचा मृत्यू ओढावल्याने एमआयडीसीतील ड्रेनेज लाईनीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसीमध्ये कंपन्या सुरू झाल्यापासून ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेल्या नाहीत. काही कंपन्यांच्या शौचालयाचे सांडपाणी सर्रासपणे नैसर्गिक नाल्यांद्वारे गोदावरीत मिसळत असते. या घटनेनंतर महापालिका व एमआयडीसी सांडपाण्याची व्यवस्थेसाठी ड्रेनेज लाईनी टाकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, सभागृहनेते सलिम शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सोमेश्वर येथील घटनेची पुनरावृत्ती

२६ नोव्हेंबर २०१४ रोजी गंगापूर रोडवरील सोमेश्वर गेटजवळ गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. हिरामण जानू माढे (३८, रा. वायघोळपाडा, त्र्यंबकेश्वर), गोपीनाथ धोंडीबा मोरे (४५, रा. सदिच्छानगर, वडाळा पाथर्डी रोड) या कामगारांसह जेसीबी चालक प्रशांत चिंधू चौधरी (२७, रा.पालखेड, ता. निफाड) अशी या घटनेतील मृतांची नावे होती. माढे व मोरे महापालिकेच्या ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते.

कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे सोबत नसताना सफाई कामगारांनी शौचालयाच्या टँकमध्ये उतरणे चुकीचे आहे. अशी कामे करताना कामगारांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी. सुरक्षेची साधनांशिवाय जोखीम उचलू नये.

अनिल महाजन, मुख्य अधिकारी, अग्निशमन दल

ही घटना अत्यंत र्दुदैवी असून, सुरक्षेच्या साधनांशिवाय कामगार जीव धोक्यात घालून काम करीत असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट होते. विशेष बाब म्हणून दोन्ही कामगारांच्या वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा प्रयत्न करू.

गिरीष महाजन, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सद्‍गुरूच मनुष्य रुपातील नारायण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिष्याचे ज्ञाननेत्र उघडून अनंतरुप परमात्म्याचे प्रकाशरुपात जे दर्शन करवून देतात ते सद्‍गुरू होय. जो शिष्य श्रध्दा आणि निष्ठापूर्वक समर्पण भावाने सद्‍गुरूंची सेवा करतो तो संसाररुपी सागराला सहजगत्या पार करतो. सद्‍गुरू हे मनुष्य रुपात साक्षात नारायणच असतात, असे प्रतिपादन महात्मा हरिसंतोषानंदजी यांनी शुक्रवारी सद्‍भावना शिबिरात केले.

साधुग्राममधील तिगरानिया कॉर्नरलगत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सुरू असलेल्या सद्‍भावना शिबिराच्या ज्ञानयज्ञात ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा कमलेशानंदजी, साध्वी आराधनाजी, साध्वी मैत्रेयीजी, साध्वी नितीजी आदी उपस्थित होते. सिंहस्थपर्व आणि याच कालावधीत आलेला गोकुळाष्टमीचा सोहळा यांची सुरेख गुंफण करीत हरिसंतोषानंदजी यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे नाते उलगडून सांगितले. अध्यात्माचे सविस्तर विवेचन म्हणजे भगवतगीता.

सामान्यातील सामान्य माणसाला अध्यात्म कळावे, आत्त्मज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा त्याच्या मनामध्ये वृध्दींगत व्हावी यादृष्टीने भगवतगीता प्रेरक असल्याचे हरिसंतोषानंदजी म्हणाले. ते पुढे म्हणाले, की भगवान श्रीकृष्णाकडून आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत अर्जुन हा त्याला केवळ आपला सखा समजत असे. अर्जुन आत्मज्ञानापासून अनभिज्ञ होता. श्रीकृष्णाने त्याला दिव्यनेत्र प्रदान केल्यानंतर त्याला भगवंताच्या विराट रुपाचे दर्शन झाले. श्रीकृष्णाला केवळ सखा मानणारा अर्जुन विराटरुप दर्शनानंतर श्रीकृष्णाला साक्षात परमेश्वर मानू लागला.

जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येते, अधर्म डोके वर काढू लागते तेव्हा तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी महापुरुष अवतार घेत असतात. याप्रसंगी साध्वी महाश्वेताजी, साध्वी दीप्तीजी, साध्वी सुलेखाजी यांच्या सुमधुर भक्तीगीतांचा भाविकांनी लाभ घेतला. याप्रसंगी गौतम भंदुरे, हिरामण सूर्यवंशी, विजय भंदुरे, प्रशांत काश्मिरे, विजय काठे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

$
0
0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीमधील सुरक्षेच्या अतिरेकामुळे राज्याने पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा हजारो कोटी रुपयांचा महसूल गमावल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनीही यात लक्ष घालून आगामी पर्वणी सुकर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

भुजबळ यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवास्थानी भेट घेऊन पहिल्या पर्वणीमध्ये प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे झालेल्या अक्षम्य चुकांबाबत चर्चा केली. यावेळी नो व्हेईकल झोन अर्धा ते एक किमीपेक्षा अधिक नसावा, शहरातील दूधपुरवठा, भाजीपाला, हॉटेल, रेस्टॉरंटसह सर्व दुकाने सुरळीत सुरू ठेवावी आणि रामकुंड-गोदाघाटचा परिसर वगळता इतरत्र बॅरिकेडिंग करू नये या नाशिककरांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. आगामी पर्वांचा भारतभर नव्हे तर देशभर प्रचार आणि प्रसार करावा आणि सिंहस्थामध्ये आपण स्वतः लक्ष घालण्याचे भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाशिककरांना आणि भाविकांना झालेल्या मनस्तापाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच उचलेल्या पावलांबाबत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट साहित्याची ‘पूजा’

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : साधुग्रामच्या बाजारात कुंकू, शेंदूर, शंख, मोर पिस, केसर यासह विविध प्रकारच्या बनावटी वस्तूंची मोठी चलती असल्याने ग्राहकांची प्रचंड फसवणूक होत आहे. विक्रेते कुठून हा माल आणतात आणि किती पैसे कमावतात याचे मोठेच कोडे आहे. सरकारी यंत्रणा मिग गिळून गप्प असल्याने या बाजारातील उलाढाल वाढतेच आहे.

देवाची सेवा करायची तर मोरपंख घ्या, मयूरपंखांची पूजा करा, सरस्वती प्रसन्न होईल, यासह विविध प्रकारच्या प्रचारातून साधुग्राममधील बाजारात खरेदी-विक्रीने वेग घेतला आहे. पाच ते दहा रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत मोरपंख उपलब्ध आहेत. हे पंख कुठून आणले जातात, त्यासाठी मोरांची शिकार केली जाते का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. पूजेच्या साहित्यात कुंकू आणि शेंदूर यांचे स्थान वरचे आहे. या दोन्ही वस्तू साधुग्राममध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, या दोन्ही वस्तू ख-या नाहीत. कुंकवाचे तीन ते चार प्रकार उपलब्ध असले तरी त्यांचे वेगळेपणा हे रंगच आहे. मातीपासून बनलेला हा कुंकू आणि शेंदूर यांच्यात रंगाचे पाणी मिसळविण्यात आल्याचे जाणवत असले तरी परराज्यातील प्रसिद्ध कुंकू असल्याचे सांगून ग्राहकांना फसविले जात आहे. कुंकू आणि शेंदूरच्या दहा ते वीस रुपयांच्या प्लास्टिक डब्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, हाच कुंकू पाण्यात टाकल्यानंतर त्याचे खरे रुप दिसून येत आहे.

शंखांचा मोठा बाजार साधुग्राममध्ये असून पांढ-या आणि बदामी रंगाचे शंख ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शंखाचा जितका आकार मोठा, तितकी त्याची किंमत जास्त असे समीकरण आहे. खरे आणि बनावटी शंख यांच्यातील सीमारेषा तशी धूसर आहे. त्याचाच फायदा विक्रेते घेत आहेत. दहा रुपयांपासून ते शेकडोरुपयांपर्यंत शंख विक्री केले जात आहेत.

हिमालयातून खास केशर आले असून, त्वरित नाही घेतले तर पुन्हा नाही मिळणार असे सांगणारे विक्रेते ग्राहकांना बनावटी केशर देवून गंडा घालत आहेत. शंभर रुपये प्रति ग्रॅम असलेल्या या केशरमुळे कामशक्ती वाढून तुम्ही आनंदी राहू शकता, असा दावा विक्रेते करीत आहेत. निरक्षर ग्राहक विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी पडून बनावटी वस्तू खरेदी करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून या बनावट व्यवसायाला कुठलाही चाप लावला जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात घुमणार टाळ मृदंगाचा नाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगभराचे लक्ष लागलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यात महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या सहभागाने संत तुकारामांच्या गाथेचे पारायण आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्ताने पंचवटीतील श्री कैलास मठात टाळ मृदंगाचा नाद घुमणार आहे.

श्री कैलास मठाच्या वतीने महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासाठी चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. व ज्ञानेश्वर सेवा संस्कृती मंडळाचेही सहकार्य लाभणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात भजन-कीर्तनास अनन्यसाधारण महत्त्व असल्याने हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. मराठी साहित्यातील अद्वितीय निर्मिती मानल्या जाणाऱ्या श्री संत तुकारामांच्या गाथेचे टाळ मृदंगाच्या तालावर पारायण होणार आहे. कैलास मठाचे स्वामी संविदानंदजी सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा पारायण सोहळा दि. ०७ ते १२ सप्टेंबर २०१५ या कालावधीत रोज सकाळी ७ ते दुपारी १२ यावेळेत होणार आहे. या पारायण सोहळ्याचे नेतृत्व वहाळ, पनवेल येथील श्रीमहंत रामकृष्णदास महाराज घरत हे करणार आहेत.

वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून, पारायण करणाऱ्या भाविकास गाथेची प्रत वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी ब्रिजमोहन चौधरी, अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे, श्रीधर धात्रक, बाळासाहेब काकड, लिलाबाई चांगले यांच्यासह अन्य जण परिश्रम घेत आहेत. भाविकांनी नावनोंदणीसाठी कैलास मठ, भक्तीधाम येथील चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधावा, त्यामुळे तुकाराम गाथेची प्रत उपलब्ध करून देणे सुलभ होईल, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानगीत अडकले पेशव्यांचे स्मारक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराची मुहूर्तमेढ रोवणारे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे स्मारक येथे व्हावे ही त्र्यंबकमधील जेष्ठ नागरिकांची इच्छा कुंभमेळ्याच्या निमित्ताने यावेळीही पूर्ण होणे शक्य दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकाचा प्रश्न रखडला आहे. लालफितीच्या कारभाराचा स्मारकालाही फटका बसला आहे.

सध्यस्थितीत देवस्थान संस्थानच्या कार्यालयातील ओवरीमध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा पुतळा ठेवला आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पुतळ्यासमोर दानपेट्यांची मोजदाद सुरू असते. येथे आलेले उच्चपदस्थ व व्हीआयपी हा पुतळा कोणाचा म्हणून चौकशी करतात. पेशव्यांचे स्मारक येथे असावे, अशी आज सर्वांचीच इच्छा आहे. विशेष म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा पुतळा तयार असून हे स्मारक आज शासनाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत रखडले आहे. या स्मारकाची संकल्पना सर्वप्रथम पुणे येथे वेदमहर्षी कै विनायक भट्ट घैसास गुरूजी यांनी व्यक्त केली होती. सन १९९६ मध्ये त्र्यंबकेवर येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती तयार करण्यात आली. त्यामध्ये गिरीष दीक्षित, सोमनाथशेठ भालेराव, दामोदर अडसरे आणि मुरलीधर थेटे यांचा समावेश होता. यातील आज कोणीच हयात नाही. याकरिता पुणे येथील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ लेखक वालावलकर यांच्या मागर्दशनाने नाशिकचे सुप्रसिध्द शिल्पकार मैंद बंधू यांच्याकडून अत्यंत आकर्षक असा पुतळा तयार करण्यात आला.

नानासाहेब पेशवे यांचे स्मारक मंदिरासमोर करण्याचे निश्चित करण्यात आले. तथापि, जागेअभावी हा प्रश्न रेंगाळला. २००३ मध्ये पुतळयाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तेव्हाही हे काम अधुरेच राहिले. या सिंहस्थात या स्माराकाची अपेक्षा मुरलीधर थेटे आणि त्यांचे समकालीन वयोवृध्द नागरिक यांनी व्यक्त केली आहे. पुतळ्यांबाबत शासनाचे धोरण बदलले आहे. नियमाप्रमाणे स्मारक निर्मिती व्हावी, अशी रास्त अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कावनईत आज शाहीस्नान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील सिंहस्थाचे मूळस्थान असलेल्या श्री क्षेत्र कावनई येथे आज, रविवारी सकाळी दहा वाजता शाहीस्नान सोहळा होणार आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांच्यासह जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज तसेच विविध आखाड्याचे साधूमहंतांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कपिलधारा व्यवस्थापन ट्रस्ट, पोलिस यंत्रणा, वाहतूक विभाग, महसूल विभाग व स्वयंसेवी संस्था यांनी या शाहीस्नानाची पूर्ण तयारी केली आहे.

इतिहासात व धार्मिक क्षेत्रात या शाहीस्नानाची विशेष नोंद होणार आहे. हिंदू धर्मात आस्थेचे पर्व समजले जाणाऱ्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. देशात वाराणसी, अलाहाबाद व उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो, तर नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा ओळखला जातो. या सिहंस्थ कुंभमेळ्याचे मूळस्थान समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कावनई येथे उद्या शाहीस्नान सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साधूसंतांच्या उपस्थित व भक्तगणाच्या सहवासात होणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथील तीर्थस्थळाला विशेष महत्व आहे. हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून, सिंहस्थाचे मूळस्थान म्हणून या तीर्थक्षेत्राची ओळख आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील शाहीस्नाना बरोबरच कावनई येथे पर्वणी स्नानाचे आयोजन करण्यात येत असते. श्री कपिल मुनी विश्वस्त समितीच्या वतीने या शाहीस्नान सोहळ्यासाठी साधू संताना लोक प्रतिनिधींना व भाविकांना निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र कावनई हे प्राचीन व पुरातन तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राला सिंहस्थाचे मूळस्थान ही संबोधले जाते. या तीर्थक्षेत्राचे महंत श्री रामनारायनदास फलाहारी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या तीर्थक्षेत्राचा कायापालट झाला आहे. या पर्वणीसाठी चार ते पाच लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे शाही सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

घोटी, कसारा व नाशिकहून परिवहन सेवा

या पर्वणीसाठी नाशिक विभाग तसेच इगतपुरी आगाराच्या वतीने घोटी येथून खंबाळे पार्किंग २० बसेस, खंबाळे पार्किंग ते कावनई खिंड २० बसेस, कसारा ते कावनई २० बसेस , घोटी ते सर्वतीर्थ टाकेद ५ बसेस , नाशिक ते कावनई १० बसेस असे एकूण ७० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजेपासून बसची सेवा उपलब्ध असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कोडाच्या धडकेने तरूण जागीच ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील साधुग्राममधून मिरची हॉटेलकडून नवीन टाकळी रोडने जाणाऱ्या स्कोडा वाहनाने धडक दिल्याने अलाहाबाद येथील रहिवासी विनोद लल्लू सरोज (वय ३०) हा जागीच ठार झाला.

शनिवारी सकाळी स्कोडा गाडी (एम.एच.०५-ए.ई.९९) या गाडीतून दोन तरूण हॉटेल मिरची, औरंगाबाद रोडकडून नवीन तयार झालेल्या टाकळी रस्त्याने जात असताना कुंभमेळ्यासाठी बांधण्यात येणारे तंबू बांधण्याचे काम करणारा विनोद लल्लू यास जोराची धडक दिली. यात तो जागीच ठार झाला तर गाडीतील ऋषिकेश दिनेश पाटील आणि सौरभ शांताराम पाटील दोघेजन गाडी उलटी झाल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षांपूर्वी भद्रकाली येथे व्यापाऱ्याची साडेतीन लाखाची लूट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने सात जणांना अटक केली. योगेश गांगुर्डे, हिरामण बर्वे (दोघे रा. मातोरी) इनबाल शेख (रा. वडाळा) अमीर अन्सारी, आयूब शेख (रा. नानावली) अजय वाघ (रा.शिवाजी चौक, पंचवटी) व सोमनाथ हिरामण बर्वे, रा. मातोरी अशी अटक केलेल्या सशंयितांची नावे आहेत.

सन २०१३ मध्ये जिल्हा परिषदेजवळील किटकॅट हॉटेल समोर शीतल शहा या व्यापाऱ्याला अडवून त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. त्यांच्या हातातील साडेतीन लाख रुपये असलेली बॅग हल्लेखोरांनी लांबवली होती. याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेशाखा युनिट तीनचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार व सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांच्या मागदर्शनाखाली भद्रकाली परिसरात सापळा लावला होता. यामध्ये संबंधित आरोंपींना ताब्यात घेण्यात आले. कसबे सुकेणे येथून चार किलो चांदी चोरीस गेल्याची घटना घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रायुकाँ’कडून परिपत्रकाची होळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकप्रतिनिधींसंदर्भात राज्य सरकारने काढलेले परिपत्रक हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे असून, ते त्वरित मागे घेण्याच्या मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या परिपत्रकाची होळी करण्यात आली असून, शासनाचा निषेध करण्यात आला.

शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली आडगाव नाका येथे निषेध करून आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींवरील टीका देशद्रोह ठरणार असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. त्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या विरोधात शनिवारी आंदोलन करीत या पत्रकाची होळी केली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उन्नती’चे कार्य प्रेरणादायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटी परिसरातील प्रतिकूल परिस्थिती असलेल्या मुलामुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी उन्नती एज्युकेशन सोसायटीने राबवलेले उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्र‌तिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

पंचवटीतील उन्नती एज्युकेशन सोसायटीच्या उन्नती प्राथमिक विद्यालयाच्या ई-लर्निंग वर्गाचे आणि बालमंदिराच्या नूतन वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ना. महाजन बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, मनपाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे, सुनील धामणे, गणेश कोठावदे, सुनील अमृतकर, पंडितराव ब्राह्मणकार, सुभाष मुसळे, रवी अमृतकर, रामदास अमृतकर, दिलीप पाटकर, प्रवीण अमृतकर, सुभाष कुंभारे, चंदन मेखे आदी उपस्थित होते.

यावेळी ना. महाजन म्हणाले की, अनेक ठिकाणी शिक्षण संस्थां या पैसे खाण्याची कुरणे झाली आहेत. शिक्षण संस्था इंडस्ट्री झाल्या आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण राहिले नाही याचे खरोखर वाईट वाटते. परंतु, उन्नती संस्थेसारख्या उत्तम दर्जा असलेल्या अजूनही काही आदर्श शिक्षण संस्था आहेत, याचाही अभिमान वाटतो. संस्थेला काही मदत लागली तर नक्कीच करू. शाळेतून आदर्श नागरिक व सुसंस्कारीत मुले तयार झाली पाहिजे. संस्कारक्षम पिढी घडविणे काळाची गरज आहे. यामुळे शिक्षकांचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे, असे ना. महाजन यांनी नमूद केले. आमदार बाळासोहब सानप व संस्था अध्यक्ष अशोक सोनजे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

देणगीदारांचा गौरव

प्रकाश लाड, सुनील छाजेड, सुनील अलई, प्रदीप कोठावदे, दीपक नेरकर, रोहित येवले, जितेंद्र बाविस्कर, सचिन बागड, स्मिता वाणी आदी देगणीदारांचा यावेळी गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक नंदलाल धांडे, प्रा. डॉ. सुरेश मेने, गजानन नागमोती यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून गौरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक धांडे यांनी केले. परिचय रवी अमृतकर यांनी करून दिला. अश्विनी अहिरे आणि रेश्मा वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images