Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बालिकेच्या मृत्यूचे स्थायीत पडसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

सिडकोतील गणेश चौकात घंटागाडीखाली सापडून नऊ वर्षीय बालिका नेहा ठाकरे ठार झाली. प्रभाग क्रमांक ४३ मधील या घटनेचे तीव्र पडसाद गुरूवारी स्थायी समितीवर उमटले. संबंधित घटनेला ठेकेदार, स्वच्छता निरीक्षक आणि ड्रायव्हर जबाबदार असल्याचा आरोप करीत, तिघांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली.

सदस्यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. घंटागाड्यांच्या अवस्थेवर चिंता व्यक्त करीत आणखी किती बळी देणार, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. सभापतींनी संबंधित ठेकेदार व स्वच्छता निरीक्षकावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोबत घंटागाड्यांची तपासणी केल्याशिवाय त्या उद्या बाहेर काढू नका, असे फर्मान सोडले आहे. राहुल दिवे यांनी या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करा अन्यथा कामकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी दिला. यशवंत निकुळे यांनी घंटागाड्यांची स्थिती वाईट असल्याचे सांगून त्यांची देखभाल व दुरूस्ती होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. संबंधित गाडीचा चालक हा दारू प्यायला असून, गाडीचा ब्रेकही लागला नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला. गाड्यांची देखभाल ठेकेदाराकडे असतांनाही तो दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. रत्नमाला राणे यांनी हा काळा दिवस असल्याचे सांगून अधिकारी आणि ठेकेदांराची मुलगी गेली असती तर काय केले असते, असा सवाल केला. घंटागाड्यांचे आरटीओचेही पासिंग झालेले नाही. संबंधित ड्रायव्हर हा दारू प्यायलेला होता, असाही आरोप करण्यात आला. कर्मचा-यांची टेस्ट करूनच त्यांना कामावर घ्यायला हवे, अशी मागणी सदस्यांनी केली. यावेळी सदस्यांनी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत, आरोग्य विभागालाच आरोपीच्या पिंज-यात उभे करीत या गलथान कारभाराचे आणखी किती बळी द्यायचे असा सवाल सदस्यांनी केला.

सभापती शिवाजी चुंभळे यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत आरोग्याचा खेळ बंद करा, असा आदेश देत, गाड्याबाहेर पडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. घटनादुर्दैवी असल्याचे सांगून संबंधित घटनेला ड्रायव्हर, स्वच्छता निरीक्षक व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे हे गुन्हेगार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

१५ लाखांची मदत द्या!

संबंधित घटनेला मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत. त्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावरच संकट कोसळले आहे. त्यामुळे ठेकेदार आणि महापालिकेने मुलीच्या कुटुंबीयांना १५ लाखाची आर्थिक मदत करावी, असे आदेश सभापतींनी दिले. संबंधित रक्कम प्रशासन आणि टेकेदाराने कशी द्यायची ते बघा, मात्र तात्काळ मदत करा असे आदेश सभापतींनी दिले आहेत.

मॅडम, माझी दीदी गेली हो!

अपघातात मरण पावलेली नेहा ठाकरे ही नवीन नाशिक सिडकोतील मविप्रच्या अभिनव बाल विकास मंदिर या शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. शाळेत अत्यंत हुशार असणा-या नेहाचा मृत्यू झाल्याचे कळताच शिक्षिका अर्चना आहेर व मुख्याध्यापिका जया शिंदे ह्या तिच्या घरी पोहचल्या. नेहाच्या आईने शिक्षिका आहेर यांना पाहिल्यावर `मॅडम माझी दीदी गेली हो` असा टाहो फोडला. शिक्षिका आहेर व मुख्याध्यापिका शिंदे यांनाही रडू कोसळले. अभिनव बाल विकास मंदिर शाळेत समाजदिनाच्या दिवशी नेहाने इंग्रजीत भाषण करुन सर्वांनेच मने जिंकली होती, अशी आठवण मुख्याध्यापिका सौ. शिंदे यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ तिघांना निलंबित करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ठेकेदारांना नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा ठपका ठेवत स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी आपल्या अधिकारात सहायक आरोग्य अधिकाऱ्यासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी दिले.

वॉटग्रेससह अन्य ठेकेदारांना कागदपत्रे उपलब्ध करून देणे, विभागाची माहिती पुरविण्याचा ठपका समितीने डॉ. हिरेंसह पाटोळे यांच्यावर ठेवला आहे तर मुलीच्या मृत्यूप्रकरणी सिडकोच्या स्वच्छताधिकाऱ्याला दोषी धरण्यात आले आहे. आयुक्तांसह स्थायी समितीला नोटीस पाठवणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीवर टीकास्र सोडत प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

वॉटरग्रेस कंपनीच्या वतीने बदनामी झाल्याचे सांगत, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सहाय्यक आयुक्त जीवन सोनवणे, यांच्यासह सभापती शिवाजी चुंभळेसह सर्व सदस्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदस्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराचा पाढाच वाचला. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी ठेकेदारासाठींच काम करत असल्याचा आरोप करत, घरभेदीची भूमिका निभावत असल्याचा आरोप केला. महापालिकेची माहिती व कागदपत्रे ठेकेदारांना पोहचवले जाते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी कोणासाठी काम करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. सहायक आरोग्य डॉ. सचिन हिरे, वरिष्ठ लिपिक जगदीश पाटोळे हे विभागाच्या विरोधात कामकाज करतात. वेतन महापालिकेचे घेतात आणि काम ठेकेदारांचे करतात असा आरोप खुद्द सभापतींनीच केला. या दोघांचे तत्काळ निलंबन करा. दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी आपल्या अधिकारात दिले. तर सिडकोतील घटनेत नेहाच्या मृत्यू स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे यांच्या हलगर्जीपणा मुळे झाला. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरचे अधिकार तहसीलदारांना द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी

जिल्ह्यात पाण्याची स्थिती अत्यंत बिकट असून, सरकारने शेतकऱ्यांकडून सक्तीने होणारी कर्ज वसुली थांबवावी. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, पाणीपुरवठा योजनांचे बील सरकारने भरावे, टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, अशा मागण्या जिल्ह्यातील आमदारांनी दुष्काळ आढावा बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांसह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आमदारांनी आपल्या मतदार संघातील पाण्याची परिस्थिती सांगत उपाययोजना करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले, की जिल्ह्यातील पाणीस्थिती समाधानकारक नाही. जिल्ह्यात अवघा ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात ८० टँकर सुरु असून पाऊस न झाल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते त्यांनी देखील आपल्या मतदारसंघातील परिस्थितीची माहिती दिली. अनेक ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे बंद आहेत, ती सुरू करावीत दुष्काळामुळे शेतकरी गावं सोडून स्थालांतरित होत आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा आहे. त्यासाठी कर्जमाफी करण्यात यावी. महावितरणचे अधिकारी वीज बिलासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे वीज बील माफी करण्यात यावी, आदिवासी भागात अनियमित असलेला रेशनपुरवठा सुरळीत करण्यात यावा. बंद पडलेल्या नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्य़ात आल्या. यावेळी पालकमंत्री महाजन म्हणाले, की परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने मुख्यालयात थांबावे, फेर सर्व्हेक्षण करून चारा कसा उपलब्ध होईल यासाठी नियोजन करावे स्थलांतरित होत असलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणी काम कसे उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे.

जिल्ह्यात ९ दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. तातडीने सर्व्हेक्षण करून चारा उपलब्ध करून देण्यात यावा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

आदिवासी भागात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. आदिवासी शेतकरी आत्महत्या करता आहेत. १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ आहे. वैतरणा-भंडारदऱ्याचे पाणी नाशिकला द्यायला हवे.

- हरिश्चंद्र चव्हाण, खासदार

शहरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. पाणीकपात केली तर नागरिकांची नाराजी ओढून घ्यावी लागते. एकलहरा आणि एमआयडीसीला पाणी द्यावे लागत असल्याने पाण्याची जास्त कमतरता जाणवते.

- अशोक मुर्तडक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी खोऱ्यावरील अभिप्रायासाठी मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी खोऱ्यात तयार करण्यात येत असलेल्या एकात्मिक जल आराखड्यास एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. पंधरा दिवसांत सूचना आणि अभिप्राय कळविणे शक्य नसल्याने या विषयाचे गांभीर्य ओळखून राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी त्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमान्वये राज्याचा खोरे/उपखोरेनिहाय एकात्मिक जल आराखडा (Integrated State Water Plan) तयार करण्यात येत आहे. मात्र, यासाठी जलसंपदा विभागाने उपलब्ध करून दिलेला अवधी अतिशय अल्प आहे. पंधरा दिवसांत सूचना आणि अभिप्राय कळविणे शक्य नसल्याने मुदतवाढ मिळावी म्हणून खासदार हेमंत गोडसे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना विवेदन दिले होते. माजी मंत्री व आमदार छगन भुजबळ यांनीही या जल आराखड्यावरील अभिप्राय आणि शेरे देण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवून द्यावी, अशी मागणी केली होती.

महाराष्ट्राच्या जलसंपदेची गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदा आणि पश्चिम वाहिनी नद्या अशा पाच खोऱ्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून या प्रत्येक खोरे/उपखोऱ्याचा प्रारुप जलआराखडा तयार करण्यात येत असून यासाठी अभिप्राय मागतिले आहेत. गोदावरी खोरे राज्य एकात्मिक जलसंपत्ती प्रारूप आराखड्याचा गोषवारा खंड १ आणि खंड २ मध्ये तयार करण्यात आला आहे. सदर प्रारूप आराखड्याचा गोषवारा लोकप्रतिनिधी, शासकीय संस्था, अ-शासकीय संस्था आणि सर्वसामान्य जनता यांच्याकडून अवलोकनार्थ जलसंपदा निभागाच्या संकेतस्थळावर 'जल आराखडा' उपलब्ध करण्यात आला होता.

कमी वेळात महत्त्वाच्या गोदावरी खोऱ्याचा जलआराखड्याचा अभ्यास करून त्यावर अभिप्राय कळविणे शक्य नसल्याने राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाही खासदार गोडसे यांनी निवेदन दिले. शिवतारे यांनी आराखड्याचे गांभीर्य लक्षात घेवून त्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी असे आदेश दिले.

तब्बल ४६८ पानांचे दोन खंड

गोदावरी खोऱ्याचा अहवाल हा दोन खंडात विभागण्यात आला आहे. पहिला खंड २७७ पानांचा तर दुसरा खंड हा १९१ पानांचा आहे. एवढ्या मोठ्या अहवालाचे वाचन, अवलोकन, अभ्यास करून त्यावर अभिप्राय आणि शेरे देण्यासाठी १५ दिवसांची मुदत खूपच तोकडी आहे. वास्तविक महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कायदा २००५ मध्ये संमत झाला आहे. त्याप्रमाणे हे सहा महिन्यात हे जलआराखडे पाचही महामंडळांनी तयार करणे आवश्यक आहे. परंतु, २०१४ पर्यंत हे जलआराखडे तयार झाले नाहीत. आता हायकोर्टाने निर्देश दिल्याने घाईघाईत आराखडे तयार करून १५ दिवसांच्या मुदतीवर जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्याचा फार्स करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कस्टमर केअर’ने मारली बाजी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, मुंबई आयोजित स्व. लक्ष्मणराव देशपांडे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मुंबई येथे झालेल्या महाअंतिम फेरीत नाशिकच्या नाट्यपरिषद शाखेने सादर केलेल्या दत्ता पाटील लिखित 'कस्टमर केअर' या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नाट्यपरिषदेच्या शाखांतर्गत असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून नाशिक नाट्यपरिषदेने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

प्राथमिक फेरीतून महाराष्ट्रभरातून अंतिम फेरीसाठी ८ एकांकिकांची निवड झाली. ही अंतिम फेरी बुधवारी मुंबईत माटुंग्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाली. त्यात 'कस्टमर केअर'ने सर्वच क्षेत्रात बाजी मारत निर्विवाद सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला. परिक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेते राजन भिसे, अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री रेश्मा गोखले यांनी काम पाहिले. अभिनेता निलेश सूर्यवंशी यास ज्येष्ठ निर्मात्या व नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा लता नार्वेकर यांनी एक हजार रुपये बक्षिस देऊन व्यक्तिश: गौरव केला. सर्व विजेत्यांना नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कार्यकारिणी सदस्य सुनील ढगे, ज्येष्ठ अभिनेत्री विद्या करंजीकर, ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते, आनंद म्हसवेकर आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या एकांकिकेला कुसुमाग्रज प्रतिष्ठान तसेच नाशिकच्या 'दि जिनिअस' यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रवीण काळोखे यांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी नाशिक नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष रवींद्र ढवळे, दिग्दर्शक सचिन शिंदे, प्रवीण काळोखे, प्रवीण कांबळे, रवींद्र कट्यारे उपस्थित होते.

एकांकिकेचा विषय शेतकरी तरुणाचं भीषण वास्तव दाखविणारा आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याला पुरून उरणारी अनिश्चितता, त्यातून येणाऱ्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या आणि या वास्तवापासून दूर भौतिक सुखात रमून गेलेला शहरी माणूस यांच्यातील विसंवाद या एकांकिकेतून मांडलाय. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, उपाध्यक्ष शाहू खैरे, डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व रंगकर्मींनी कलावंतांचे कौतुक केले.

अशी आहेत पारितोषिके

सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरुष गटात निलेश सूर्यवंशी याला प्रथम, सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री गटात करिश्मा देसले तृतीय, सर्वोत्कृष्ट संगीत प्रतिक नाईक प्रथम, सर्वोत्कृष्ट नेपथ्य चंद्रकांत जाडकर, गुलाब पवार प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बाळकृष्ण तिडके द्वितीय, सर्वोत्कृष्ट प्रकाश विजय रावळ व रवी रहाणे द्वितीय आणि सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दत्ता पाटील यांना देण्यात आले.

दत्ता पाटील यांना 'टोकन'!

प्रायोगिक नाट्यलेखनात सातत्याने वेगळं लिखाण करणाऱ्या नाट्यलेखक दत्ता पाटील यांचं लता नार्वेकरांनी जाहीरपणे कौतुक केलं. 'हा आजचं नाटक लिहिणारा नवा नाटककार आहे. त्याच्या लेखन शैलीने मी विलक्षण प्रभावित झाले आहे. म्हणूनच या वर्षी दत्ता पाटील यांनी माझ्या निर्मिती संस्थेसाठी नवे नाटक लिहावं,' असे आवाहन करून लताबाईंनी पाटील यांना एक हजार रुपये देत हे टोकन असल्याचे जाहीरपणे सांगितले. यावर संपूर्ण नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालरुद्रचा विश्वविक्रम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सनईचा मंगल ध्वनी ढोल आणि ताश्यांचा नाद तसेच वादकांचा उत्साह अशा भारलेल्या वातावरणात नाशिककरांच्या उपस्थितीत तालरुद्रचा पथकाने विश्वविक्रमी सलग १२ तास वादन केले. भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणुन हे वादन समर्पित करण्यात आले. १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे औचित्य साधून सलग १२ तास वादन ही त्यामागची संकल्पना होती. या विश्वविक्रमाची नोंद अमेझिंग बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली जाईल .

वादन कार्यक्रम गंगापूर रोडवरील सुयोजित विरीडीयन व्हॅली येथे आयोजित केले होते. वादनाची वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी होती. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सुयोजित ग्रुपचे अनंत राजेगावकार , को-चेअरमन अनिल जैन, मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे प्रमोद कुलकर्णी आणि नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन झाले. ढोलपथकात २५० ढोल वादक तरुण-तरुणी सहभागी झाले. विश्वविक्रमासाठी सुला विनियार्ड, सुयोजित विरीडीयन आणि मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाण्याची बचत ही काळाची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाण्याचे मूल्य सर्वाधिक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि गरजांमुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढते आहे. त्यामुळे पाण्याचे आवश्यक ते नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याची बचत हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आयआयटी मुंबईचे प्रा. एच एस शंकर यांनी केले.

इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक चॅप्टरतर्फे हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये गुरुवारी विसाव्या राष्ट्रीय प्लंबिंग परिषदेचे उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने शहरांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर पडत आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान आहे. मुंबई आयआयटीने विकसित केलेल्या अत्याधुनिक एसबीटी तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाण्यावरील प्रक्रिया करण्याचे आव्हान पेलणे शक्य असल्याचे शंकर यांनी सांगितले. याप्रसंगी वर्ल्ड प्लंबिंग कौन्सिलचे चेअरमन सुधाकरन नायर, नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष मिलिंद शेटे व्यासपीठावर उपस्थित होते.

शेटे यांनी प्रास्ताविकाद्वारे परिषदेचा उद्देश सांगितला. अध्यक्षीय भाषणाद्वारे नायर यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तीने करिअर योग्य निवडणे आवश्यक आहे. कुठलेही करिअर लहान-मोठे नसते. सातत्याने प्रयत्न आणि योग्य दिशा असेल तर यश नक्की मिळते. इंडियन प्लंबिंग असोसिएशन व आयएमओ या संस्थांनी एकत्र येऊन प्लंबिंग कोडची निर्मिती केली आहे. त्याचा वापर केला जात आहे. मात्र, केंद्र सरकारनेही प्लंबिंग व्यवसायासाठी आवश्यक ते योगदान देणे आवश्यक असल्याची मागणी नायर यांनी केली. याप्रसंगी प्लंबिंगवर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील आर्किटेक्टस, सिव्हिल इंजिनिअर्स, बिल्डर्स, विद्यार्थी आदींनी परिषदेला हजेरी लावली. दरम्यान, शुक्रवारीही परिषदेत विविध विषयांवर चर्चा केली जाणार असून दुपारच्या सुमारास परिषदेचा समारोप होणार आहे.

प्लंबिंगचे प्रदर्शन

परिषदेच्या निमित्ताने हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात प्लंबिंगचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. ग्रोहे, पॅरिवेअर, जैन इरिगेशन, किसान, हिंडवेअर, किपर, लुबी, अॅस्ट्रल, आशीर्वाद, सुप्रिम, फिनोलेक्स आदी कंपन्यांनी त्यांची प्लंबिंगशी संबंधित उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे एकाच ठिकाणी प्लंबिंगची उत्पादने पहायला मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथी फार्माकॉलॉजी अभ्यासक्रमास मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी 'सर्टीफिकेट कोर्स ईन फार्माकॉलॉजी' हा वर्षभराच्या कालावधीचा अभ्यासक्रम गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये सुरू करण्यात यावा, असा निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

विद्यापीठ मुख्यालयात शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या विद्यापरिषदेची बैठक बुधवारी पार पडली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. जामकर होते. ते म्हणाले, की सर्टीफिकेट कोर्स ईन फार्माकॉलॉजी या अभ्यासक्रमाबाबत प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक व इतर शुल्क, परीक्षा पध्दती, प्रमाणपत्र व नोंदणी याबाबत विद्या परिषदेत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती अभ्यासक्रमास मान्यता प्रदान आल्याचे ते म्हणाले. बीएचएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी सर्टीफिकेट अभ्यासक्रम वर्ष पूर्णवेळ असेल. राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांकरीता हा अभ्यासक्रम आठवड्यातून दोन दिवस याप्रमाणे वर्षभर राबविण्यात येईल.

होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना विद्यापीठातपर्फे त्यांच्या नोंदणीच्या ज्येष्ठतेनुसार या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अंतर्गत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा व एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षा घेतली जाईल. परीक्षा पध्दती, मूल्यांकन याबाबतचे नियम हे वैद्यकीय विद्याशाखेने ठरवल्याप्रमाणे असतील.

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व पदवीप्रमाणपत्र शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा आर्थिक फायदा दुष्काळग्रस्त भागातील विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजेसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छात्रशक्ती लढ्याला यश

$
0
0

इंटरनल, थिअरीसाठी कम्बाईन्ड पासिंग; आरोग्य विद्यापीठाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नर्सिंगच्या बेसीक बीएससी आणि पीबी बीएससी या अभ्यासक्रमांच्या उत्तीर्णतेसाठी इंटरनल व थिअरी मिळून कम्बाईन्ड पासिंग तर केवळ प्रॅक्टीकल परीक्षेसाठी स्वतंत्र पासींग ठेवण्याचा निर्णय गुरूवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. निर्णय जाहीर होताच विद्यापीठासमोर आंदोलनकर्त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके वाजवित जल्लोष केला.

गेल्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नर्सिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेशिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल, थिअरी आणि इंटरनल परीक्षा मिळून कम्बाईन्ड पासिंगचा निकष होता. मात्र, या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीला परीक्षेच्या तोंडावर निकष बदलत कम्बाईन्डच्या ऐवजी स्वतंत्र पासिंग पध्दती ठेवल्याने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल घटल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यापरिषदेच्या बैठकीनंतर परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निर्णयाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या हिताचा विचार करून थिअरी व इंटरनल परीक्षेसाठी कम्बाईन्ड उत्तीर्णतेचे निकष आणि केवळ प्रॅक्टिकलसाठी स्वतंत्र उत्तीर्णता असे निकष विद्यापरिषदेने मान्य केले आहेत. तर इंटरनल परीक्षेत पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुणांचा निकष असण्याबाबतचा विषय आगामी अभ्यास मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा, असा महत्त्वाचा निर्णय या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापरिषदेची बैठक विद्यापीठाच्या मुख्यालयात सुरू असताना अभाविपच्या वतीने प्रवेशव्दाराबाहेर आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात नाशिकसह पुणे, बुलढाणा, धुळे या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थी एकजुटीचा प्रत्यय

विद्यापीठाने नर्सिंगच्या अभ्यासक्रमाच्या उत्तीर्णतेबाबत पूर्वी घेतलेला निर्णय अचानक घेतला गेला होता. याचा थेट फटका पहिल्या वर्षातील बहुतां विद्यार्थ्यांना बसला. या प्रश्नी संघटनेने विद्यार्थ्यांचा प्रश्न लावून धरला. विद्यापीठाला विद्यापरिषदेच्या बैठकीत विद्यार्थी हिताचा विचार करावा लागणे हा छात्रशक्तीचा प्रत्यय आहे. या आंदोलनासाठी डॉ. आशुतोष गुप्ता, राहुल परदेशी, अनंत पवार, अभिषेक सुरडकर, अमोल नागरे, विनोद हुंबे आदी विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंच्या निर्मितीला सरकारकडूनच चाप!

$
0
0

नाशिक : सरकारने मान्यता दिलेल्या खेळांमध्ये १४ वर्षांखालील गटात पूर्वी पाचवी ते आठवी या वयोगटातील मुले खेळली जात होती. मात्र, सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने पारीत केलेल्या नवीन नियमानुसार आता सहावी ते आठवीचे विद्यार्थी या गटात खेळू शकणार आहेत. त्यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांना १४ वर्षाखाली गटात खेळण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या वयोगटात इयत्ता सहावीखालच्या इयत्तेतील खेळाडू सहभागी होऊ शकणार नाहीत, असा निर्णय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका जास्तीत जास्त उदयोन्मुख खेळाडूंना बसणार आहे. पाचवी ते आठवी हे वय मुलांच्या खेळण्याचे वय असते. त्याच वयात मुलांच्या खेळण्याला बंदी घातल्यास कसे खेळाडू निर्माण होतील, असा सवाल प्रशिक्षकांनी केला आहे. पाचवीच्या वयात त्याला नुकतीच खेळाची गोडी लागलेली असते. तो सहावी, सातवी व आठवी असा तीन वर्ष खेळतो, त्यानंतर पालक त्याच्या करीअरवर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे त्याचा खेळ सुटतो. पूर्वी १४ वर्षांखालील गटात पाचवी ते आठवीचे विद्यार्थी खेळत होते. त्याला ४ वर्षे खेळायला मिळत होती नवीन निर्णयानुसार खेळाडूला तीन वर्षेच मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या संख्येला चाप बसणार आहे.

सांघिक खेळांनाही फटका

एकीकडे जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावेत यासाठी सरकारतर्फे प्रयत्न होत असताना या निर्णयामुळे खेळाडूंची गळती होणार आहे. त्याचप्रमाणे या निर्णयाचा फटका सांघिक खेळांना बसणार असून, सर्वात जास्त फटका खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल, कबड्डी या खेळांना बसणार आहे. महाराष्ट्राचे क्रीडा खाते आणि क्रीडा मंत्री वेगवेगळ्या घोषणा करते. त्यांच्यात समन्वय नसल्याचे क्रीडा क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. पाचवीला सरकार खेळू देत नाही व आठवीला पालक खेळू देत नाहीत. त्यामुळे मुलांनी खेळायचे कधी? असा प्रश्न खेळांडूना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ कुंटुंबाचे कम्युनिटी किचन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी धडपडणाऱ्या माहेश्वरी समाजाच्या १४ कुंटुंबाने आपल्या सोसायटीच्या आवारात चक्क कम्युनिटी किचनच सुरू केले आहे. यामुळे संबंधित सर्व कुंटुबातील किचन २५ ऑगस्टपासून 'शांत' असून सामूहिक भोजनाचा आंनद सर्वांना घेतो येत आहे.

कुंभमेळ्यासाठी परगावाहून किंवा परराज्यातून येणाऱ्या नातेवाईकांना योग्य त्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिकांना पेलावी लागते. शहरीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या प्रत्येक कुंटुंबासमोर हा यक्षप्रश्न निर्माण होतोच. आलेल्या नातेवाईकांची सरबराई करताना घरातील महिलांना तर क्षणाचीही उसंत मिळत नाही. यावर पर्याय म्हणून कॅनडा कॉर्नर परिसरातील सुमती अपार्टमेंटमधील माहेश्वरी समाजाचे १४ कुंटुंब एकत्र आले. कुंभमेळ्याचे पडघम वाजण्यापूर्वी म्हणजे मे महिन्यात या कुंटुंबातील सदस्यांनी कम्युनिटी किचनची तयारी सुरू केली. २००३ मधील कुंभमेळ्यात सुध्दा त्यांनी कम्युनिटी किचनची संकल्पना राबवली होती. त्यामुळे पैसे गोळा करणे, जेवणाचा मेन्यू ठरवणे आदी प्रश्नांवर तत्काळ उत्तरे मिळालीत. २५ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत कम्युनिटी किचन सुरू राहणार असल्याची माहिती सुमती महिला मंडळातील कमलाबाई धूत, सावित्री भुतडा आणि आशाताई मालपाणी यांनी दिली.

कुंभमेळ्यासाठी अनेक नातेवाईक येतात. त्यांना स्वंयपाक करणे त्यानंतर नाशिक फिरवणे हे काम फार जिकरीचे बनते. त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला असून आमच्या नातेवाईक-मित्रमंडळींना त्याचा खूप फायदा होतो, असे कमलाबाई मणियार, निर्मला मुंदडा, विजया मुंदडा, कौशल्या मालपाणी आदींनी सांगितले. पहिल्या पर्वणीपासून आजवर हजारो समाजबांधवांनी या कम्युनिटी किचनचा लाभ घेतला. आमच्या सोसायटीतील ७० सदस्य असून २५ ऑगस्टपासून घरातील किचनमध्ये एकही पदार्थ तयार करण्यात आला नाही.

या संकल्पनेमुळे एकमेकांना देण्यासाठी वेळ मिळाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी तीन पीढ्या म्हणजे सासू, सुना आणि नातवंडे असे एकत्र काम करतो. यासाठी प्रत्येक कुंटुंबाकडून १० हजार रुपये प्रत्येकी इतके पैसे घेण्यात आल्याचे प्रेमलता नावंदर, सुमनबाई सोनी, रक्षा साबू आणि अनिता कासट यांनी स्पष्ट केले.

असे चालते किचनचे काम

गत, कुंभमेळ्यातील मेन्युकार्ड या महिलांना सापडले. मात्र, नवीन पिढीला नवीन पदार्थाची आवड असून त्यानुसार काही बदल करण्यात आले. या किचनचे तब्बल महिन्याभराचे मेन्युकार्ड तयार असून दुपारच्या सुमारास रात्रीच्या सदस्यांची तर रात्रीच्या सुमारास सकाळच्या जेवणासाठी किती सदस्य असतील याची आगावू माहिती आचाऱ्यास दिली जाते. त्यामुळे अन्नाची नासाडी होत नाही. प्रत्येक कुंटुंबास १०० पासेस दिले असून जेवणापूर्वी ते जमा केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीखाली सापडून बालिका ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिडकोतील गणेश चौकात घंटागाडीखाली सापडून नऊ वर्षीय बालिका ठार झाली. नेहा जिजाबराव ठाकरे असे तिचे नाव आहे. घंटागाडीचे मागील चाक या चिमुकलीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घंटागाडी चालक शंकर रामभाऊ आवारे (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घंटागाडी ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नेहा, तिच्या घराकडे येत असतांना एक मोकाट श्वान तिच्या अंगावर धावले. त्यामुळे ती घराकडे वेगात पळत असतानाच गल्लीतील ड्रेनेजच्या जाळीत तिचा पाय अडकला. त्याचवेळी कचरा संकलन करणारी घंटागाडी मागे येत होती. गाडीचे मागचे चाक डोक्यावरून गेल्याने नेहाचा मृत्यू झाला. सरीत शिकणा-या नेहाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेहाचे वडील जिजाबराव ठाकरे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील सातारणे गावातील रहिवाशी आहेत. रोजगाराच्या शोधात ते नाशिकला स्थायिक झाले. ते छोटा ट्रक चालवून उदरनिर्वाह करतात.

प्रभाग क्रमांक ४३ मधील या अपघाताचे तीव्र पडसाद गुरूवारी स्थायी समितीवर उमटले. संबंधित घटनेला ठेकेदार, स्वच्छता निरीक्षक आणि ड्रायव्हर जबाबदार असल्याचा आरोप करीत, तिघांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली.

घंटागाड्यांचे `आरोग्य` सुधारेल काय?

घंटागाडीचे वेळीच ब्रेक लागले नसल्याने हा अपघात घडल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेच्या निमित्ताने घंटागाड्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागानेही घंटागाड्यांची पासिंग होत नसल्याने दंडात्मक कारवाई यापूर्वी केलेली आहे.`मटा`नेही याबाबत वारंवार आवाज उठवलेला आहे. घंटागाडीचेच `आरोग्य` ठिकाणावर नसल्याने महापालिका या प्रश्नात लक्ष घालणार का, असाही सवाल केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात अटळच

$
0
0

पर्वणींनंतर शहरात एकवेळ पाणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील पाण्याच्या उधळपट्टीसह, शहरातील पाणी लिकेजच्या प्रश्नाचे तीव्र पडसाद गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सदस्यांनी शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याची एकमुखी मागणी केली. सभापती शिवाजी चुंभळे यांनी सिंहस्थ पर्वणींमुळे पाणीकपात शक्य नसल्याचे सांगून त्यानंतर २१ सप्टेंबरपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा आदेश दिला आहे.

शहराला सध्या दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गंगापूर धरण समूहात केवळ ५८ टक्के पाणी असून, पुढील ऑगस्टपर्यंत पालिकेला पाच हजार ४०० दशलक्ष पाण्याची आवश्यकता आहे. सिंहस्थामुळे सध्या धरणातून पाणी सोडले जाणार असून, धरणातील साठा अजून कमी होणार आहे. पाऊस वाढण्याची शक्यता कमी असून, धरणही पूर्ण क्षमतेने भरेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सदस्या नीलिमा आमले यांनी सभापतींना पत्र देवून एकवेळ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. साधुग्राममध्ये पाण्याची नासाडी केली जात असल्याचे यशवंत निकुळे यांनी सांगितले. सुरेखा भोसले, मेघा साळवे यांनीही पाणी लिकेजचे प्रमाण कमी करून एकवेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली. एकवेळ पाणीपुरवठा केल्यास तो पूर्ण प्रेशरने करावा अशी सूचनाही सदस्यांनी केली.

गळतीमुळे ३० टक्के नुकसान

सद्यस्थितीत पाणीपुरवठा वाहिन्यांतील त्रुटींमुळे दररोज जवळपास ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. गळती दूर झाली तर पाणी कपातीचीच वेळ येणार नाही, असा दावा सदस्यांनी केला.

प्रशासनाची अळीमिळी...

खरेतर पाणीकपातीचे नियोजन आतापासून करण्याची आवश्यकता आहे. मात्र, सिंहस्थ काळात पाणीकपातीचा निर्णय घेतला तर पुढील पर्वणींसाठी पाणी सोडण्यास लोकांकडून विरोध होऊ शकतो, या भीतीपोटीच प्रशासन पाणीकपातीवर आता बोलायला तयार नाही. दरम्यान, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात पाण्याचे संकट भीषण बनल्याची कबुली देतानाच, परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन पाणी कपात करायची की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांस विक्रीबंदीला काँग्रेसचाही विरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्युषण पर्वानिमित्त ठिकठिकाणी मांसविक्री बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेसनेही विरोध केला आहे. लोकांच्या धार्मिकतेत काँग्रेसने कधी हस्तक्षेप केला नाही असे सांगत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारने कोणावरही आपली धोरणे लादू नये असा राज्य सरकारला सल्ला दिला.

राज्य सरकारकडून अशी बंदी लादणे अपेक्षित नसल्याचे सांगत, कोणी काय खावे हे सरकारने ठरवू नये असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले. तर कॉलेजात रामायण, महाभारताचे धडे देण्याचा प्रकार म्हणजे जनतेचे मूळ समस्येवरून लक्ष विचल‌ित करण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना चव्हाण यांनी दुष्काळासह मांसबंदी, रामायण महाभारताचे धडे देण्याच्या प्रयत्नावर टीका केली. मांसबंदीच्या राजकारणावर चव्हाण म्हणाले, की काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात धार्मिक प्रश्नात हस्तक्षेप केला नाही. कोणी काय खावे असे निर्बंध लादणे हे चुकीचे आहे. त्याला काँग्रेसचाही विरोध आहे. सरकारकडून अशी परिस्थिती अपेक्षित नाही. सरकारने आपली धोरणे थेट लोकांवर लादू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आपण कोणत्या गोष्टींना अग्रकम द्यावे हे सरकारने ठरवायला हवे. रामायण, महाराभारताचे धडे देण्यास विरोध नाही. मात्र, सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच रामायण महाभारताचा आधार घेतला जात असल्याची टीका त्यांनी केली. रामायण व महाभारताचे धडे देण्याची आताच आवश्यकता का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रदूषण निर्मूलनावर अधिक भर देण्याची गरज आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

सरकार संवेदनाहीन

दुष्काळाबाबत युती सरकार सकारात्मक नाही अशी टीका करत चव्हाण यांनी दुष्काळप्रश्नी सकारात्मक पावले उचललीत तर, आम्ही सरकारसोबत राहू असे मत व्यक्त केले आहे. दुष्काळ व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युद्धपातळीवर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकारकडून केवळ पोकळ घोषणा केल्या जात आहेत. तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्यातील दोन शनिवारी बॅँका बंद

$
0
0

नाशिक : आरबीआयने केलेल्या नवीन नियमानुसार बॅँकांचे व्यवहार आता दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहणार आहे. याबाबत ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी ग्राहकांना सूचना देण्याचे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या कालावधीत बॅँका सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्थिक व्यवहार करीत होत्या. शनिवारी दुपारी तीनपर्यंत व रविवारी पूर्ण दिवस सुट्टी अशी कामकाजाची पध्दत होती. मात्र, सरकारी कार्यालयांप्रमाणे बॅँक कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केल्याने दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद रहाणार आहेत. याबाबत ग्राहकांना माहीती देण्यासाठी काही बॅँकांनी ग्राहकांना इमेल व एसएमएसद्वारे माहिती दिली आहे. मात्र, काही बँकांनी अद्यापही खातेदारांना माहिती दिलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोमवारपर्यंत महास्नानपर्व

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात श्रावण अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व असते. सूर्य, चंद्र, गुरू हे ग्रह सिंह राशीत आणि त्याच काळात अमावास्या असा दुर्मिळ योग शनिवारपासून (दि. १२) सुरू होत आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी आलेल्या भाविकांना विशेषत: नाशिक क्षेत्री निवास करणाऱ्या भाविकांनी सकाळी ९.४३ वाजेपासून महापर्व स्नानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्रातील ज्योतिषाचार्य, धर्मशास्त्राचे अभ्यासक, वैदिक विद्वान आणि श्री गंगा गोदावरी मंदिर पंचकोटी पुरोहित संघातर्फे करण्यात आले आहे.

गोदावरी दक्षिणवाहिनी वहाते तो रामकुंड ते मोदकेश्वर मंदिरापर्यंतचा भाग रामतीर्थ घाट म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण परिसरात भाविकांनी स्नान करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. साधू-महंत रविवारी (दि. १३) सकाळी शाहीस्नान करतील. सोमवारपर्यंतच्या स्नान महापर्वकाळाच्या निर्णयाला दाते पंचागकर्ते मोहन दाते, ज्योतिष्याचार्य अरविंद पंचाक्षरी, सूर्य सिध्दांत पंचागाचे अभ्यासक गौरव देशपांडे, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, धर्मशास्त्राचे अभ्यासक शांतारामशास्त्री भानोसे आदींनी संमती दिली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या भाविकांनी संपूर्ण अमावास्येचा पर्वकाळ स्नान करावे, असे आवाहन पुरोहित संघाने केले आहे. तीर्थस्नान, पर्वणीस्नान ही सामूहिक उपासना मानली जाते. मात्र, पहिल्या पर्वणीला अतिबंदोबस्तामुळे भाविकांना स्नान करता आले नव्हते. तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

अशी असेल चंद्राची अवस्था

सिंहस्थातील कुंभस्नानाचे महत्त्व पद्मपुराणात 'चंद्रश्र्चंद्र:क्षयस्तथा' अशा उल्लेखाने विशद करण्यात आले आहे. म्हणजे सूर्य, चंद्र, गुरू हे ग्रह सिंह राशीत असताना व चंद्र क्षीण असेपर्यंतचा कालावधी पर्वकाळ सांगितलेला आहे. अमावस्या संपल्यानंतर पुढे २४ तास चंद्राची ही क्षीण अवस्था असते. सिंहस्थकाळात १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४३ वाजता अमावास्या सुरू होते. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.११ वाजता अमावास्या समाप्ती आहे आणि पुढे १२ अंश म्हणजे १४ सप्टेंबरला दुपारी १२.३० पर्यंत चंद्राची क्षीण अवस्था आहे. म्हणजेच १२ ते १४ सप्टेंबर हा काळ अखंड महापर्वस्नासाठी उपयुक्त असा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना दुचाकीची मुभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा शाहीस्नान पर्वणीकाळात स्थानिक नागरिकांसाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडुन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिककर पर्वणीकाळात मोटरसायकलचा वापर करू शकणार आहेत. त्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत.

धुळेरोड, औरंगाबादरोड व आडगाव परिसरातील नागरिकांसाठी अमृतधाम चौक ते मिर्ची ढाबारोड अशा दोन्ही बाजूस नाशिकरोड, उपनगर, जयभवानी रोडवरील, आंबेडकर नगर येथे तर देवळाली परिसरातील नागरिकांसाठी श्री श्री रविशंकर रोड व अशोका शाळा समोरील मोकळ्या जागेत पार्किंग असेल. इंदिरानगर, सिडको, अंबड व सातपूर परिसरातील नागरिकांसाठी शाहजहाँनी ईदगाह मैदानात सिव्हिल हॉस्पिटलसमोर तर गंगापूर, पंचवटी पोलिस ठाणे परिसरातील नागरिकांसाठी डोंगरे वस्तीगृह मैदान गंगापूररोड येथे पार्किंग व्यवस्था आहे. पेठरोडवरील नागरिकांसाठी शरदचंद्र पवार मार्केट पेठरोड, दिंडोरीरोड परिसरातील नागरिकांसाठी मेरी ग्राऊंडवर दुचाकी वाहने पार्क करता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीसाठी व्हीआयपींची बडदास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुसरी शाही पर्वणी काही तासांवर येऊन ठेपली आहे. या पर्वणीसाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असून छत्तीसगड राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल यांचा देखील त्यात समावेश असणार आहे. पर्वणी काळात व्हीआयपी व्यक्तींनी स्नानासाठी येऊ नये, असे आजवर करण्यात आलेल्या आवाहनाचे काय झाले? असा प्रश्न यातून समोर आला आहे.

पहिल्या शाही पर्वणीसाठी ८ ते १० लाख भाविक आणि साधू महंतांनी हजेरी लावली. भाविकांची गर्दी का हटली याची कारणमिमांसा करताना दोन गट तयार झालेत. यातील एका गटाने प्रशासनाची पाठराखण केली तर दुसऱ्या गटाने नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवत फेरनियोजनाची मागणी लावून धरली. पहिल्या पर्वणी दरम्यान किती भाविक येतील याचा नेमका अंदाज कोणालाच नव्हता. त्यामुळे पर्वणीच्या दिवशी व्हीआयपींचा दर्जा असलेल्या व्यक्तींनी स्नानासाठी येऊ नये, असे आवाहनच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. या आवाहानाला पहिल्या पर्वणी दरम्यान सर्वांनीच प्रतिसाद दिला. यावेळेस मात्र, छत्तीसगड राज्याचे विधानसभा अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल यांनी या आवाहनाला छेद दिला. अग्रवाल आपल्या आठ ते दहा साथिदारांसमवेत शाहीस्नानासाठी येणार आहेत. अग्रवाल रविवारी (दि. १३) सकाळी सात वाजता रायपूर येथून निघतील. झेड सिक्युरीटी असलेले अग्रवाल साडे आठ वाजण्याच्या सुमारास ओझर विमानतळावर येतील. तेथून मोटारीने ते शासकीय विश्रामगृह येथे पोहचून साडेदहा वाजण्याच्या सुमारास रामकुंडावर येतील. विशेष म्हणजे अग्रवाल रविवारी नाशिकमध्ये मुक्काम करून सोमवारी सकाळी परत छत्तीसगडला जातील.

पोलिसांवर वाढणार ताण

सध्या तरी एकाच व्हीआयपीचा दौरा समोर आला असून शनिवारी (दि. १२) दिवसभरात त्यात किती वाढ होईल, हे सांगणे कठीण आहे. व्हीआयपींच्या दौऱ्यामुळे बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण पडू शकतो. तसेच याचा फटका सर्वसामन्य भाविकांना सुध्दा बसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीमार्गाला पावसाचा अडथळा?

$
0
0

नाशिक : राज्यात भीषण स्वरूपाचा दुष्काळ पडलेला असताना परतीचा पाऊस थोड्या फार प्रमाणात का होईना दिलासा देण्याचे काम करतो आहे. दोन दिवसांपासून शहरात अधूनमधून सरी कोसळत असून गत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पडणाऱ्या पावसाचे स्वागत केले जात असताना याच पावसामुळे शाही मार्गावर त्रेधातिरपीट उडण्याची शक्यता आहे. विशेषतः गाडगे महाराज पुलाखाली हा गोंधळ वाढू शकतो.

पहिल्या शाहीस्नाना दरम्यान पावसाने ओढ दिली. प्रचंड उष्णतेचा सामना सर्वांना करावा लागला. दुसऱ्या पर्वणीसाठी वरुण राजा हजेरी लावण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस शाही मिरवणुकी दरम्यान झाल्यास प्रशासनाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. गाडगे महाराज पुलाजवळ वाघाडी नाला येतो. या नाल्याचा प्राकृतिक मार्ग कधीतरी बदलण्यात आला. या नाल्याद्वारे दररोजचे सांडपाणी वाहते.

मात्र, मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस आल्यास नाल्यातील पाणी बाहेर पडून थेट पेशवे कुंडाकडे धाव घेते. अनेकदा याठिकाणी गुडघ्याभरापेक्षा जास्त पाणी जोरात वाहते. याशिवाय गाडगे महाराज पुलाखाली शाही मिरवणुकीसाठी मोठा खड्डा तयार करण्यात आला असून तिथेही पाणी साचते. हे पाणी वीज मोटार लावून उपसण्याचा पर्याय प्रशासनासमोर आहे. मात्र, त्यासाठी लागणारा सुरक्षित वीज पुरवठा, विद्युत मोटार याची उपलब्धता अजूनपर्यंत झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तांचीही ‘शाही पर्वणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या शाही पर्वणीसाठी नाशिकनगरी सज्ज झाली असून लाखो भाविक शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात या स्नानास मोठे महत्त्व असते. याचाच धागा पकडीत काही 'संधी-साधूं'कडून स्नानासाठी आलेल्या भक्तांना विशेष ऑफर दिली जाते आहे. रात्रीच्या वेळी मुक्काम आणि महंतासोबत स्नान यासाठी १५ ते २० रुपये भाविकांकडून 'संधी-साधू' उकळत आहेत.

पहिल्या शाही स्नानाला अवघे ४० ते ५० हजार साधू महंत शाही स्नानाला रामकुंडापर्यंत पोहचले. यात जवळपास ४ ते ५ हजार भाविकांचा समावेश होता. यातील बहुतांश भाविक उत्तर भारतातील होते. या भागात कुंभमेळ्याला आणि साधू महंतासोबतच्या स्नानाला अनन्य साधारण महत्त्व असते. याचाच फायदा घेत काही 'संधी-साधू' अशा भाविकांना स्नानासाठी सोबत घेऊन जातात. अर्थात, यासाठी भाविकांना रोख पैसे मोजावे लागतात. साधुग्राममध्ये काही ठिकाणी तर अशा परराज्यातील भाविकांसाठी राहण्याची खास व्यवस्थाच करून ठेवण्यात आली आहे. याठिकाणी राहणाऱ्या भाविकांकडून १० हजारापासून ५० हजार रुपयांपर्यंत पैसे आकरले जातात.

याबाबत एका साधुग्राममधील एका साधूने सांगितले, की आजवर भाविकांनी सिंहस्थ कुंभमेळ्याकडे पाठ फिरवली. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर खर्च करून बसलेल्या साधू महंताना झाला. भाविकांना स्नानाला सोबत घेऊन गेल्यास अथवा त्यांना मुक्कामी ठेवल्यास झालेला खर्च काही प्रमाणात भरून निघेल, असा दावा संबंधित साधूने केला.

स्वयंसेवकांना रोखणार कसे?

पोलिसांच्या मदतीसाठी सरसावलेल्या शेकडो स्वयंसेवकांना रोखणे पोलिसांनाही शक्य नसल्याचे पहिल्या पर्वणी दरम्यान समोर आले. रामकुंड वगळता इतर ठिकाणी स्वयंसेवकांची मदत उपयोगी ठरली. तर रामकुंडावर अनेक स्वंयसेवकांनी आपल्या नातेवाईकांची तसेच ओळखीच्या मित्रपरिवारांच्या स्नानाची सोय केली. बहुतांश स्वंयसेवकांची ऊर्जा यातच खर्ची पडल्याचे चित्र दिसून आले. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून रामकुंडावरील स्वंयसेवकांची संख्या मर्यादित करण्याचे सूतोवच पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले असून त्याचा कितपत फायदा होतो, हे रविवारीच (दि. १३) स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images