Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खत प्रकल्पाचे आरक्षण वगळा

$
0
0

नाशिक : पाथर्डी खत प्रकल्पासाठी नवीन विकास आराखड्यात पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले असून, ते तातडीने वगळण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. तसेच, पिंपळगाव बहुला व मखमलाबाद येथील आरक्षित जागेचा कचरा डेपोसाठी विचार करावा, अशी मागणी केली.

पाथर्डी येथील खत प्रकल्पासाठी या अगोदरच आरक्षित असलेल्या ९७ एकरपैकी २० एक जागेवरच खत प्रकल्प सुरू आहे. उर्वरित जागा पडून असतानाही नव्या विकास आराखड्यात या ठिकाणी आणखी शेतकऱ्यांच्‍या जमिनीवर अतिरिक्त आरक्षण टाकण्यात आले आहे. शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, सीमा हिरे यांच्यासह शेतकऱ्यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन हे आरक्षण हटवण्याची मागणी केली. हे आरक्षण त्वरित वगळण्यात यावे, अशी मागणी केली. इकडचे आरक्षण रद्द करून पिंपळगाव बहुला व मखमलाबाद येथील आरक्षित जागेचा कचरा डेपोसाठी विचार करावा, अशी मागणी केली. आयुक्तांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विचित्र अपघातात सातजण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार लहान मुलींसह सातजण जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अमृतधाम चौफुलीवर हा अपघात झाला. जखमींपैकी निकिता खंदारे या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिव्हिल तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईकडून मालेगावकडे चाललेल्या ट्रकचे (एम.पी.०६ - एच.सी.०९६३) ब्रेक फेल झाले. या ट्रकने पुढे जाणाऱ्या मारुतीला (एम.एच.१५- सी.डी.२९०३) धडक दिली. हा अपघात पाहिल्यानंतर तारवालानगरकडून येणारी खासगी बस (क्र. एम.एच.१५-ए.के.१२४९) अचानक रस्त्यालगतच्या संरक्षक जाळीवर चढली. बसथांब्यावर थांबलेल्या खंदारे कुटुंबीयांसह सात जणांना या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात रंजना प्रकाश खंदारे (आई) आणि तिच्या चार मुली मायावती, निकिता, आरुषी आणि प्रजावती या चौघी जखमी झाल्या. निकिता गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. रंजना यांना डोक्याला आणि पायाला मार लागला. याच अपघातात मारुती टरफले आणि पंढरीनाथ डांगे हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या महामार्गावर नेहमी अपघातात निष्पापांचे बळी जातात. संतप्त नागरिकांनी रास्तारोको केल्याने वाहतूक कोंडी झाली. या परिसरात उड्डाणपूल झालाच पाहिजे, निष्पापांचे बळी जाणे थांबलेच पाहिजे अशा घोषणा देत जमाव रस्त्यावर उतरला. जमाव आक्रमक झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अधिक कुमक मागवली. पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकत नसल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी लाठीमार करून संतप्त जमावाला बाजूला केले.

वाहतूक खोळंबली

या सर्व प्रकारामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक एक ते दीड तास खोळंबली. विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकले नाहीत. हा रस्ता ओलांडताना जेष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही खूप त्रास सहन करावा लागत असल्याने ते ही या आंदोलनात सहभागी झाले.

अन् त्यांच्यासाठी नाशिक ठरले र्दुदैवी

आम्ही परभणी जिल्ह्यातील आसेगावचे. पाच मुली आणि एक मुलगा असे माझे कुटुंब आहे. काम मिळाल्याने आम्ही कालच नाशिकमध्ये आलो. शुक्रवारी मोठ्या उत्साहाने कामावर निघालो. बसची वाट पाहत थांबलो होतो. मात्र, वाहन अंगावर आल्याने माझ्या कुटुंबातील सगळेच जखमी झाले आहेत. परमेश्वर कृपेने सर्वजण वाचले आहेत. मात्र, आमचे हातावर पोट असल्याने हॉस्पिटलचे बिल कसे भरावे याची चिंता लागली आहे. नाशिकमध्ये काम मिळाल्याचा आनंद मावळला आहे, असे सांगतानाच या कुटंबाचे प्रमुख प्रकाश खंदारे बेशुद्ध पडले.

सहायक पोलिस आयुक्तावर गुन्हा?

नागरिकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक उध्दव निमसे यांनी फिर्याद दिली. चव्हाण यांनी लाठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून तुम्हाला पाहून घेईन असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, उशिरा त्यांनी फिर्याद मागे घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी, लिपिक परीक्षा पुढे ढकलल्या

$
0
0

नाशिक : महसूल विभागातर्फे ऐन पर्वणीच्या दिवशी १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या तलाठी आणि लिपिकपदाच्या परीक्षा सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता ४ ऑक्टोबरला होणार असल्याने परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.

दुसरी शाही पर्वणी १३ सप्टेंबरला आहे. याच दिवशी महसूल खात्यातील तलाठी पदासाठी शासनाने परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले होते. कुंभमेळयाच्या नियोजनात महसूल यंत्रणा गुंतलेली असताना परीक्षा कशी घेणार आणि पर्वणीकाळातील वाहतूक नियोजनामुळे परीक्षार्थी परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहोचणार याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. तलाठी पदासाठी १३ सप्टेंबर तर लिपिकपदासाठी २० सप्टेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती. तलाठी पदाच्या ५६ जागांसाठी १४ हजार तर लिपिकपदाच्या २९ जागांसाठी सुमारे सहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, यंदा पहिल्या पर्वणीपेक्षा सुमारे पाचपट भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविल्याने वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. या दिवशी शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत परीक्षार्थींसमोर केंद्रावर पोहोचायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदातीरी श्रद्धेचा पूर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरवली असली तरी रविवारी (ता.१३) होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीसाठी नाशिक शहर व त्र्यंबकनगरीत भाविकांच्या श्रद्धेचा पूर येण्याची चिन्हे आहेत. सूर्य, चंद्र व गुरू हे सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग, पोलिसांनी धडा मिळाल्यानंतर शिथिल झालेला बंदोबस्त तसेच सिंहस्थाला येण्याचे प्रशासनाचे आवाहन या प्रमुख बाबींमुळे गर्दी वाढत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी रात्रीपर्यंत रेल्वे मार्गाने एक लाखाहून अधिक भाविक शहरात दाखल झाले आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे येणारे रस्तेही वाहनांच्या गर्दीने गजबजले आहेत. पवित्र रामकुंड आणि तीर्थराज कुशावर्त या दोन्ही ठिकाणी मिळून दिवसभरात दीड लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने दुसऱ्या पर्वणी काळात किमान दहा लाख भाविक शाहीस्नान करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, शनिवारी दुपारनंतर गर्दी वाढल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो.

सूर्य, चंद्र आणि गुरू हे सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग उद्या, शनिवार, दि. १२ सप्टेंबरपासूनच सुरू होत आहे. त्यामुळे परराज्यातील भाविकांसह नाशिककरांना सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपासूनच सिंहस्थ कुंभमेळ्यातील महापर्वस्नानाचा आनंद घेता येणार आहे. यापार्श्वभूमीवर रामकुंडावर सुमारे दीड ते दोन लाख भाविक शाहीपर्वणी अगोदर स्नान करतील, अशी अपेक्षा पोलिस प्रशासनाला आहे. याचा प्रत्यय गुरुवारी व शुक्रवारी आला आहे. पर्वणी स्नानासाठी आलेल्या भाविकांमुळे साधूग्रामसह रामकुंड परिसर भाविकांनी फुलून गेला. गंगागोदावरी मंदिरासमोर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच परिसरातील कपालेश्‍वर मंदिर, महादेव व लक्ष्मीनारायण मंदिरातही दर्शनासाठी गर्दी होती.

पोलिसांची कसोटी

पहिल्या शाही स्नानानंतर भाविकांना अडचणीच्या ठरलेल्या पोलिस नियोजनात मोठे फेरबदल करण्यात आले. या बदलानुसार भाविकांना शहराच्या आतील भागात सहज पोहचणे शक्य आहे. यामुळे एकीकडे भाविकांचा ओघ वाढत असतानाच त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांचे स्नान सुकर करण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.

दर्शनासाठी दोन किमीची रांग

त्र्यंबकेश्वर येथे कुंभस्नानाकरिता हजारो भाविक शहरात दाखल होत आहेत. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ रांगेत उभे रहावे लागत आहे. काही भाविकांना दर्शनासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागत आहे. भाविकांची गर्दी वाढल्याने रात्री साडेअकरा वाजेपर्यंत दर्शन रांगेत उभे रहावे लागत आहे. शुक्रवारी बडा उदासीन आखाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत रांग लागली होती. पेडदर्शनासाठी दोनशे रुपये देऊनही पाच तास वेळ लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौरव संधानशिव अखेर सापडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुवेतमध्ये नोकरीचे आमिष दाखवित नाशिकमधील गौरव संधानशिव या तरुणाचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला होता. मात्र हा तरूण स्वत:हून घरातून निघून गेल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. शुक्रवारी (दि.११) शहरात फिरत असताना त्याच्या शेजाऱ्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्राथमिक चौकशीत गौरवचे अपहरण किंवा धर्मांतर झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ सप्टेंबरपासून तो बेपत्ता होता. त्याच्या ठाणे येथील राहत्या खोलीची झडती घेतली असता त्यात परकीय चलन, वैद्यकीय शस्त्रक्रिया केल्याची कागदपत्रे आढळली होती. त्यांनी सरकारवाडा पोलिसात अपहरण आणि धर्मांतराची फिर्याद दिली होती. या प्रकारामुळे पोलिसांचे धाबे दणाणले होते. सिराज शेख या संशयिताला ताब्यात घेतले. गौरवने त्याच्याजवळील दोन्ही मोबाइल विकले असून त्या पैशातून तो मुंबईत फिरत असल्याची माहिती सिराजने दिली होती. तसेच तो आजारी असल्याने त्याने कुवेतमधील मित्राकडून ४१ हजार रुपये घेतले होते. वैद्यकीय कारणास्तव गौरवने शस्त्रक्रिया केल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी सकाळी तो रामकुंड परिसरात आढळून आला. त्याचे शेजारी संतोष जगताप यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हात झटकून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळताच सीसीटीव्हींच्या मदतीने त्यांनी गौरवचा शोध घेतला.

दुपारी तीनच्या सुमारास गौरवचे परिचित श्रीवास्तव यांनी त्यास अशोकस्तंभ परिसरात पकडले. संतापाच्या भरात आपण घरातून निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने मुंबईतून मनमाड, नांदेड पुन्हा मुंबई असा प्रवास केला. तसेच गुरुवारी (दि.१०) शहरात आला. रामकुंड परिसरात थांबला. रात्री रामकुंडावरच मुक्काम केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवर्षी हवीत २० हजार घरे

$
0
0

Vinod.patil@timesgroup.com

नाशिक : नाशिकचे नागरिकरण झपाट्याने वाढत असताना वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक घरांची निर्मिती होत नसल्याचे चित्र आहे. सन २०४१ पर्यंत शहराची लोकसंख्या ५१ लाखांपर्यंत जाणार आहे. एवढ्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी दरवर्षी किमान २० हजार घरांची निर्मिती होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत या विपरीत परिस्थिती असून, घरे महागल्याने नागरिकांनी हात आखाडता घेतला आहे. बिल्डरांनीही आस्ते कदम भूमिका घेतली आहे. शहरात मोठ्या घरकुल योजनांची गरज असताना स्मार्ट सिटी अनुषंगाने महापालिकेने स्वस्त घरांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबई, पुणे या दोन शहरांच्या विकासाच्या मर्यादा संपल्याने आता गुंतवणूकदारांसह उद्योगांचा ओढा नाशिकककडे वाढला आहे. सातपूर, अंबड या दोन औद्योगिक वसाहतींसह सिन्नर या पंचताराकिंत वसाहतीमुळे नाशिकमध्ये रोजगारासाठी नागरिकांचा मोठा लोंढा येत आहे. नाशिकचे भौगोलिक हवामान हे निवासासाठी चांगले असल्याने मुंबईचे नागरिक आपल्या दुसऱ्या घरासाठी नाशिकला पसंती देत आहे. सद्यस्थितीत शहरात ३ लाख ९० हजार घरे असून, यात सामूहिक घरांची संख्या कमी आहे. क्षेत्रफळाचा विचार करता नव्याने मोठ्या घरकुल योजना तयार करण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही. मध्यवर्ती भागाच्या विकासाला आता मर्यादा असल्या तरी आजबाजूच्या २२ खेड्यांमध्येही आता काँक्रिटीकरण झाले आहे. सद्यस्थितीत शहरात इमारती उभ्या राहत असल्या तरी वाढीव लोकसंख्येसाठी त्या पुरेशा नाहीत.

सद्यस्थितीत शहरातील ६० हजार कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचे घर नाही. त्यामुळे तीन लाख नागरिक आजही निवाराविनाच आहेत. दुसरीकडे शहरात अजूनही १० हजाराच्या वर सदनिका बांधून पडल्या आहेत. विविध कर, बिल्डरांना येणाऱ्या अडचणी आणि वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दुसरीकडे नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे नागिकांचा कल हा भाड्याची घरे आणि झोपडपट्ट्यांकडे वाढत आहे. स्मार्ट सिटीसाठी घरांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी क्रेडाई, म्हाडा, हुडको, सिडको, बिल्डर्स असोसिएशन, आर्किटेक्ट असोशिएशन या संस्थाच्या मदतीने महापालिकेला मोठ्या घरकुल योजनांची निर्मिती करावी लागणार आहे. विविध वित्तीय संस्थांची मदत त्यासाठी घेण्याची आवश्यकता आहे.

स्वस्तातील घरकुल योजना

स्मार्ट सिटी योजनेत झोपडपट्टी निर्मूलनाचा निकष आहे. त्यासाठी पालिकेतर्फे अगोदरच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नियोजनाअभावी या प्रयत्नांना काहीशी खीळ बसली आहे. महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत २००९ मध्ये १६ हजार घरकुले बांधण्याची योजना आखली होती. या योजनेसाठी ३३५ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले होते. यात केंद्र शासनाचा वाटा ३० टक्के, राज्य शासनाचा २० टक्के तर नाशिक महापालिकेचा वाटा ३० टक्के इतका आहे. त्यात लाभार्थ्यांकडून १० टक्के रक्कम घेतली जात असल्याने महापालिकेच्या हिश्यात केवळ २० टक्के रक्कम येत आहे. शासकीय जागांवरील ५२ झोपडपट्ट्यांचे स्थलांतर या घरकुलांमध्ये करण्यात येणार होते. यासाठी शहरातील चुंचाळे, निलगिरी बाग, पंचवटी, भीमवाडी, नाशिकरोड (चेहडी), गांधीधाम, आनंदवली, शिवाजी नगर, संजय नगर, वडाळा, गंजमाळ अशा तब्बल ३१ ठिकाणांची निवड करण्यात आली. कोट्यवधीचा व्यवहार असल्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी मोठ्या हिरारीने यात सहभाग घेतला. मात्र, घरकुलांसाठी निवडलेल्या चुकीच्या जागा, निविदा प्रक्रियेतील घोळ, जागा संपादनास लागलेला वेळ आणि ठेकेदारांच्या बेफिकीरीमुळे आता दिवसेंदिवस ही योजनेचे उद्दिष्ट कमी होत आहे. लाभार्थी मिळत नसल्याचे सांगून गेल्या वर्षी या योजनेचे उद्दिष्ट १६ हजार घरांवरून सात हजार ४६० घरांचे घरांवर आणण्यात आले आहे. घरबांधणी साहित्याच्या किमती वाढणे.

करांपासून व्हावी सुटका

सद्यस्थितीत बिल्डरांसह खरेदारांवर विविध करांचा मोठा बोझा आहे. मुंद्राक शुल्क पाच टक्के, व्हॅट, रजिष्ट्रेशन एक टक्का, सर्व्हिस टॅक्स तीन टक्के असा एकूण ११ टक्के कर भरावा लागतो. एका सदनिकेमागे कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त पाच लाखाचा कर भरावा लागतो. आता एलबीटी कमी करून मुंद्राक शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २० हजाराची वाढ होणार आहे. बिल्डरावरही असेच विविध प्रकारचे टॅक्स व परवानग्यांची झंझट आहे.

एक खिडकी योजना

शहरात सध्या मोठ्या घरकुल योजनांची गरज असताना या योजनांच्या मंजुरीसाठी बिल्डरांना दोन ते तीन वर्ष चकरा माराव्या लागतात. त्यात मोठ्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचीही परवानगी आवश्यक आहे. बिल्डरांना शासन आणि स्थानिक संस्थाच्या क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. घरबांधकामाची नियमावली सुटसुटीत झाल्यास व बांधकाम व्यवसायाला उद्योजकाचा दर्जा मिळाल्यास स्वस्तातील घरे उभारणीस चांगली मदत होणार आहे.

शहरात सर्वांना हक्काचे घर मिळावे आणि वाढत्या घरांची गरज पूर्ण करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन विकास आराखड्यात बिल्डरांना लहान घरकुलांच्या उभारणीसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांना वाढीव एफएसआय देणे, आरक्षणांची संख्या कमी करणे आदी उपाययोजना केल्या आहेत. साडेपाचशे फुटापर्यंतची घरे बिल्डरांनी बांधली तर त्यासाठी या सवलती मिळणार आहेत.

बांधकाम व्यावसायिकांवर असलेले विविध कर, खरेदीदारांवर असलेले कर कमी करण्यात यावेत. सोबतच पर्यावरण विभागाच्या क्लिष्ट परवानग्या सुलभ करून एक निश्चित अशी परवानगीची सुलभ प्रक्रिया गृहप्रकल्पांसाठी शासनाने तयार करायला हवी. सोबतच उद्योग व रोजगार वाढविल्यास खरेदीदारही पुढे येतील, असे प्रयत्न व्हायला हवेत. डिमांड वाढली तरच सप्लाय होईल.

- जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई

वाढीव घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची गरज आहे. अधिकाधिक सुविधा असलेली छोटी घरे उपलब्ध झाल्यास नागरिक त्यांना प्राधान्य देतील. आर्किटेक्ट असोशिएशन व बिल्डर्स असोशिएशनच्या मदतीने गरिबांना जास्तीत जास्त चांगली व छोटी घरे कमी किमतीत कशी उपलब्ध होतील यासाठी पालिकेने प्रयत्न करायला हवेत.

- नीलेश चव्हाण, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुलेट ट्रेन व्हाया नाशिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जपान दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून ट्विट करीत नाशिककरांना गुडन्यूज दिली आहे. भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद ही व्हाया नाशिक जावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यानंतर जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रवास व्हाया नाशिक होण्याची चिन्हे आहेत.

जागतिक पातळीवर वेगाने विकसित होणाऱ्या नाशिक शहराच्या विकासाला आता बुलेट ट्रेनचे पंख लाभणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचे स्पष्ट होत आहे. मेक इन महाराष्ट्र या मोहिमेद्वारे जपान दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना शुक्रवारी अनपेक्षित पण मोठा सुखद धक्का दिला आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद अशी साकारण्याची घोषणा यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीशी (जेआयसीए) शुक्रवारी औद्योगिक आणि पायाभूत सोयी-सुविधांशी संबंधित प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला आहे. जेआयसीए ही विविध प्रकल्पांना आर्थिक सहकार्य पुरवणार आहे. याच करारावेळी मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनबाबतही चर्चा केली. मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन नाशिक मार्गे करण्यात यावी, असा मनोदय मुख्यमंत्र्यांनी चर्चेत व्यक्त केला. त्यास जेआयसीएनेही मान्यता दिल्याने बुलेट ट्रेनच्या मार्गावर नाशिक येणार असल्याची गुडन्यूज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमध्ये हाणामारी

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

तरुणींमध्ये घडलेली फ्री स्टाइल असो वा ज्युनिअरच्या कॉलेजियन्सचा चॉपर बाळगण्याचा स्टंट असो गेल्या काही दिवसात कॉलेजरोड परिसरात मारामारीच्या अनेक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी पुन्हा याचप्रकारे तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

गंगापूर रोडवरील डिकेनगर परिसरात असलेल्या अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये 'केड्या' नावाने ओळखला जाणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली. या तरुणाची इतर तरुणांसोबत शाब्दिक चकमक या कॉलेजच्या परिसरात झाली होती. त्याला गंभीर स्वरुप प्राप्त होत दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे दोन्ही गट कॉलेजरोडवरील महाराष्ट्र बँकेजवळ समोरासमोर आले. वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. यातच एका तरुणाने 'केड्या' नामक तरुणाच्या डोक्यात दगडाचा घाव घालत त्याला जखमी केले. याचवेळी एकमेकांत भिडलेल्या दोन गटांनी एकमेकांवर तलवारीसारखे धारदार शास्त्र उगारण्याचा प्रयन्त केला. पण, वेळीच सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

जखमी तरुणाला लगेचच सुमन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. संशयितांपैकी कोणीही मिळू न शकल्याने अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

''सध्या सिंहस्थ कामात पोलिस व्यस्त असल्याने तरूण याप्रकारचे धाडस करीत आहेत. आपल्या परिसरातील वैयक्तिक भांडणाची खुसपट कॉलेज परिसरात काढली जात आहे. कॉलेजने आता सुरक्षेत वाढ केली आहे.''

- व्ही. एन. सूर्यवंशी,

प्राचार्य, आरवायके कॉलेज

''कॉलेज रोडवर सध्या होणाऱ्या सर्व गुन्ह्यांमध्ये बाहेरील विद्यार्थी आहेत. कॉलेजच्या परिसरात फिरायला येणारे विद्यार्थीच इथे भांडणे करीत आहेत.''

- धनेश कलाल, बीवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्वेलरी दुकानात चोरी; कामगारांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी येथील बाफना ज्वेलर्स या दुकानातून पावनेदोन लाख रुपयांच्या दागिन्यांच्या चोरी केल्याप्रकरणी तीन कामगारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश विजयचंद्र जैन (वय २४, रा. हिंगोली, जळगाव ), राजेंद्र भिकाजी पाटील (वय ३०, उपेंद्रनगर, नवीन नाशिक) व विलास सुभाष नाहिदे (वय ३४, रा. रायगडचौक, नवीन नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. संदीप वाघ यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बाफणा ज्वेलर्स दुकानात सोमवारी (दि.७) सकाळी दहा ते दुपारी तीनच्या दरम्यान सोन्याची अंगठी, वेढणी अशा ७० ग्रॅम दागिण्यांची चोरी झाली. दागिन्यांची किमत १ लाख ७७ हजार १८९ रुपये होती. ही चोरी कामगारांनी केल्याचे समोर आल्याने गुरुवारी सायंकाळी सात वाजता गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिला जखमी

अशोकस्तंभ जवळील शासकीय वात्सल्य महिला वसतिगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारी महिला इमारतीवरून उडी मारल्याने जखमी झाली. उज्वला भोर (वय २५) असे तिचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पळून जाण्याच्या उद्देशाने तीने इमारतीवरून संरक्षक भिंतीच्या पलीकडे उडी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममध्ये खडखडाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक ठिकाणाहून भाविक शहरात दाखल होत असताना शहरातील एटीएममध्ये शुक्रवारी व शनिवारी खडखडाट झाला. भाविकांना पैसे मिळत नसल्याने एटीएम शोधण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागली.

रविवारी शाहीस्नान असल्याने भाविकांच्या गर्दीचा ओघ बुधवार पासून सुरू झाला. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून रोज जत्थेच्या जत्थे नाशिककडे येत असल्याचे दृष्य पहायला मिळत आहे. नाशिकरोड ते नाशिक या मार्गावर एटीएमची संख्या कमी असल्याने भाविकांचे हाल होत असून, रविवारी अशीच परिस्थिती राहिली तर अर्थिक व्यवहार ठप्प होण्याची चिन्हे आहेत. हीच परिस्थिती शुक्रवारी नाशिक शहरात देखील होती. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणच्या एटीएममध्ये खडखडाट होता. त्यामुळे भाविकांना दुसरे एटीएम शोधण्यासाठी पायपीट करावी लागली. अनेक भाविकांच्या खिशातील पैसे संपल्याने सर्वच एटीएममध्ये गर्दी होती. सध्या प्रत्येक एटीएममध्ये दिवसातून एकदा भरणा करण्यात येतो. भाविकांची संख्या लक्षात घेता प्रत्येक एटीएममध्ये दिवसातून दोनदा भरणा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यातच बाहेरून आलेल्या नागरिकांना भाषेची अडचण येत असल्याने एटीएम ऑपरेट करण्यासाठी वेळ लागत होता. रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, तपोवन, अशोकस्तंभ येथे गर्दी होती. याच ठिकाणी रोज व्यवहार करणाऱ्या नागरिकांना देखील पैसे न मिळाल्याने त्यांचे हाल झाले. राष्ट्रीयकृत बॅँका आणि कॉर्पोरेट बँका सर्वच ठिकाणचे एटीएम फुल्ल झाले होते. साधुग्राममध्येही अचानक गर्दी उसळल्याने तेथील एटीएममध्येही गर्दी होती. ज्या ठिकाणी कार्डद्वारे पेमेंट करणे शक्य आहे त्या ठिकाणी करता येत होते मात्र रिक्षा, किंवा बस या ठिकाणी कॅशच द्यावी लागत होती.

आम्ही रायपूरहून आलो आहोत. सर्व ठिकाणी व्यवस्था अत्यंत चोख आहे. कुठेही अडचण भासली नाही. मात्र, काही ठिकाणी एटीएममध्ये पैसे नसल्याने शोधाशोध करावी लागली.

- अभिनंदन त्रिपाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किकवी पेयजल प्रकल्प गुंडाळल्यास जनआंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि आगामी प्रगती व भवितव्यासाठी किकवी पेयजल प्रकल्प होणे ही काळाची गरज आहे. पंरतु शासनाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाकडून हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे.

शहराच्या लोकसंख्येत होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेता गंगापूर धरणातून होणारा पाणीपुरवठा भविष्यात कमी पडणार आहे. गंगापूर धरणात गाळ साठल्यामुळे कमी झालेला १५४५ द.ल.घ. फूट पाणीसाठा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने गंगापूर धरणाच्या उर्ध्व बाजुला किकवी धरण आवश्यक आहे. २००९ मध्ये समीर भुजबळ यांनी जलसंपदा विभागामार्फत किकवी पेयजल प्रकल्पाच्या रु.२८३.५४ कोटी प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवली. या योजनेचा एकूण पाणीसाठा २४८५ द.ल.घ.फूट असून, २१२० द.ल.घ. फूट उपयुक्त साठा असणार आहे. या योजनेद्वारे १.५० मे.वॅ. विद्युत निर्मिती होणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात १७२.४६८ हेक्टर वनजमीन आणि १० गावांतील ७४०.०३२ हेक्टर खाजगी जमीन येते. शासनाने या वर्षापासून २०१८ पर्यंत १२५ ते १५० कोटी रुपये टप्प्या टप्प्याने दिले तर हा प्रकल्प निश्चितच पूर्ण होऊ शकतो. मात्र कालच जलसंपदा मंत्र्यांनी निधी कुठून आणणार असे म्हटल्यामुळे या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिककरांच्या आगामी भविष्यासाठी आणि नाशिक शहराच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याने शासनाने जर या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा भुजबळांनी इशारा दिला आहे. समीर भुजबळ यांनी पुढे असेही म्हटले आहे की, राज्याचे जलसंपदा मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांचा सकारात्मक विचार करून नाशिकचे पालकत्व निभवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारीच साधली स्थानिकांनी पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवारी होणाऱ्या पर्वणीच्या काळात गर्दीचा त्रास नको म्हणून स्थानिक नागरिकांनी पिठोरी अमावस्या सुरू होताच रामकुंडावर स्नान करणे पसंत केले.

दर अमावस्येला गंगेवर स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते, असा भाविकांचा समज आहे. त्यामुळे पोळा आणि पिठोरी अमावस्या वर्षातला महत्त्वाचा सण असल्याने शहरातल्या नागरिकांनी शनिवारीच शाहीस्नान आटोपून घेतले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना त्रास नको. आपली गर्दी झाल्याने त्यांना आंघोळ करता येणार नाही, त्याकरिता आपण पर्वणीच्या अगोदर किंवा नंतर आंघोळ केलेली बरी अशी नाशिकमधील नागरिकांची भावना होती. शहरातील जुने नाशिक पंचवटी, रविवार पेठ, भद्रकाली या भागातील नागरिक सकाळपासूनच आोघोळीकरता रामकुंडावर पोहचले होते. गर्दी नसल्याने हवा तितका वेळ त्यांना स्नान करता आले.

भोंगे वाजलेच नाही!

सिंहस्थातील शाहीस्नानासाठी येणाऱ्या भाविकांना शहरातील परिस्थिती समजावी यासाठी शहरात साडेतीन कोटी रुपये खर्च करून भोंगे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक भोंगे सुरू नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राऊड अन् सिक्युरिटी मॅनेजमेंटची कसोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडला दुसऱ्या पर्वणीच्या पूर्वसंध्येपर्यंत रेल्वे आणि पुणे रस्तामार्गे दीड लाख भाविक दाखल झाले. रविवारी (ता.१३) पर्वणीपर्यंत ही संख्या दोन लाखापर्यंत जाणे शक्य आहे. त्यामुळे रेल्वे व पोलिस प्रशासनाच्या सिक्युरिटी आणि क्राऊड मॅनेजमेंटची कसोटी लागणार आहे.

रेल्वेने आलेल्या भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्याचे (होल्ड अन्ड रिलिज) नियोजन पहिल्या पर्वणीत गर्दीमुळे कोलमडले होते. तेव्हा रेल्वेने ८० हजार भाविक आले. यावेळी दुप्पट भाविक येणार असल्याने प्रभावी नियोजन झाले आहे. येणाऱ्या गाड्या चौथ्या फ्लॅटफार्मवर तर परतणाऱ्या पहिल्या फ्लॅटफार्मवर थांबवण्यात येत आहेत.

सुरक्षाव्यवस्था कडक

नाशिकरोड, देवळाली, आणि ओढा स्थानकात रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस यांचे एक हजार जवान तैनात आहेत. नागपूर, भुसावळ, मुंबई आदी भागातून जवान आले आहेत. रायफलधारी जवान, बाम्बशोधक व दहा श्वानपथक सिन्नरफाटा, चौथा फ्लॅटफार्म, सुभाषरोड, मालधक्का, बुकिंग कार्यालय येथे गस्त घालत आहे. तपासणीसाठी बारा मेटल डिक्टेक्टर बसविण्यात आले आहेत. सव्वाशे तिकीट तपासनीस आले आहेत. पोलिस आयुक्त जगन्‍नाथन, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाप्रबंधक आर. पी. त्रिपाठी, पोलिस अधीक्षक अनंतकुमार रोकडे आदींनी कालच सुरक्षेचा आढावा घेतला.

रेल्वे अभियंत्यांचे पथक

कुंभ स्पेशल व अन्य रेल्वे गाड्यांचे इंजिन तपासण्यासाठी नऊ अभियंते, पन्‍नास कर्मचारी यांचे पथक, वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता डी. के. गजभिये, व्ही. टी. किर्तीकर आणि वरिष्ठ विभाग अभियंता एम. के. शिवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहे. भाविकांसाठी देवळाली आणि ओढा येथे २५ हजार लिटर तर नाशिकरोड स्थानक आणि चेहेडी येथे २५ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

प्रवेश फक्त मालधक्कामार्गेच

भाविकांना चार नंबर फ्लॅटफार्मवरून त्र्यंबकेश्वर आणि जेलरोडच्या तीन घाटावर सोडले जाईल. परतीच्या भाविकांना देवळालीगावातील गांधी पुतळ्यापर्यंत बसने सोडल्यानंतर मालधक्कामार्गेच रेल्वेस्थानकात प्रवेश मिळेल. नाशिक-पुणे रस्तामार्ग व रेल्वेने येणाऱ्या भाविकांना सकाळी सहानंतर मुंबई नाका महामार्ग व काठेगल्ली त्रिकोणी गार्डनपर्यंत बसने सोडले जाईल. भाविक लक्ष्मीनारायण घाटावर जातील. दसक घाटावर जाण्यासाठी पहाटे तीन ते सहापर्यंत सैलानी बाबा चौकापर्यंत बसने सोडले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस यंत्रणा सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातील दुसऱ्या शाही पर्वणीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात तब्बल १८ हजार पोलिस बंदोबस्तावर असून, शहराला छावणीचे रूप आले आहे. शाही मिरवणूक आणि शाही पर्वणीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, ठिकठिकाणी पोलिसांचा खडा पहारा पहावयास मिळत आहे.

दुसऱ्या पर्वणीत गर्दीचे नियंत्रण आणि भाविकांची सुरक्षा यांना विशेष महत्त्व आहे. गत कुंभासारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून यंदा अधिक काळजी घेतली जात आहे. या पर्वणीसाठी ५० लाखांहून अधिक भाविक येतील, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. शाही मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा बल, एनडीआरएफ, होमगार्ड, बीडीडीएस पथके यांसह १८ हजार दलांची फौज सज्ज झाली आहे.

पहिल्या पर्वणीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी बंदोबस्ताचा अतिरेक केल्याची ओरड नागरिकांकडून करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या पर्वणीत बॅरिकेडिंग शिथिल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्याचा ताण अधिक मनुष्यबळावर पडणार आहे. पोलिस आयुक्तांनी गृह विभागाकडे अतिरिक्त पोलिस मनुष्यबळ मिळावे, अशी मागणी केली होती. पहिल्या पर्वणीला सुमारे १२ हजार अतिरिक्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरात होता. या व्यतिरिक्त शहर पोलिसांकडे २९०० एवढे मनुष्यबळ आहे. असे पहिल्या पर्वणीत तब्बल १५ हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर होते. मात्र आता हीच संख्या १८ हजारांवर पोहोचली आहे. प्राप्त झालेल्या अतिरिक्त मनुष्यबळामध्ये दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राखीव दलांच्या तीन हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पहिली पर्वणी तुलनेने कमी मनुष्यबळामध्ये साजरी करण्यात आली असली तरी दुसऱ्या पर्वणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे अशी मागणी करण्यात त्याचवेळी करण्यात आली होती. ५० पोलिस निरीक्षक २ हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. महासंचालकांनी त्यांच्याकडील राखीव फोर्समधून ६०० पोलिस कर्मचारी, तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यातील ३०० शहर वाहतूक पोलिस कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल, रॅपीड अक्शन फोर्स, सीमासुरक्षा दल अशा १७ कंपन्या बंदोबस्तासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

पोलिस बंदोबस्त

पोलिस उपआयुक्त - १५

सहायक पोलिस

आयुक्त - ४५

पोलिस निरीक्षक - २२५

सहायक पोलिस निरीक्षक - ७३०

पोलिस कर्मचारी - ९ हजार ७२

बॉम्बशोधक पथके - १२

एसआरपी - १७ कंपनी

शीघ्र कृती दल - २ कंपनी

शहरातील अधिकारी व कर्मचारी - २९००

होमगार्डस : ५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राम हाऊसफुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमावस्येची पर्वणी साधण्यासाठी देशभरातील किमान ८ ते १० लाख भाविक दुपारपर्यंत शहरात दाखल झाले. साधुग्राममध्ये तर शुक्रवारी रात्रीपासूनच अडीच लाखांपेक्षा अधिक भाविक मुक्कामी थांबले असून, शनिवारी हा आकडा चार लाखांच्या पुढे सरकू शकतो. पहिल्या पर्वणीला रजा घेतलेल्या पावसाने शनिवारी दमदार हजेरी लावल्याने नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधील भाविकांची तारांबळ उडाली.

सूर्य, चंद्र आणि गुरू हे सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मीळ योग शनिवार सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपासूनच सुरू झाला. या महापर्वादरम्यान स्नान करण्यासाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये एकच गर्दी केली. शुक्रवारपासूनच भाविकांची गर्दी वाढत गेली. या दिवशी साधुग्राममध्ये तब्बल अडीच लाख भाविकांचा मुक्काम होता. यातील बहुतांश नागरिकांना रस्त्यावरच मुक्काम करावा लागला.

अचानक नो एंट्री झोन

अमावस्येच्या काळात स्नान करण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांमुळे रामकुंड परिसरात एकच गर्दी झाली. सकाळी नऊ वाजता भाविकांची संख्या प्रचंड वाढल्याने पोलिसांनी साडेनऊ वाजता नो एंट्री झोनची अंमलबजावणी सुरू केली. याबाबत अनभिज्ञ असलेल्या स्थानिक नागरिकांना याचा फटका बसला. नो व्हेइकल झोनमध्ये जाऊ देत नसाल तर पर्यायी पार्किंगचे ठिकाण सांगा, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला गेला. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना पर्यायी पार्किंगची ठिकाणे माहितीच नव्हती. अनेक ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांवर अरेरावी झाल्याच्या तक्रारी समोर आल्या.

अनपेक्षित संख्या आणि पोलिसांची तारांबळ

शुक्रवारी शहरात दाखल झालेले भाविक परत निघतील, असा प्रशासनाचा होरा चुकला. शहरात आलेल्या भाविकांनी त्र्यंबकेश्वरची वाट धरण्यास सुरुवात केली. शनिवारी सकाळी भाविकांच्या गर्दीत वाढ होत गेल्याने सकाळी रात्री १२ वाजताच बाह्य पार्किंग सुरू करण्यात आले. पार्किंगची सर्व ठिकाणे दुपारपर्यंत ७० टक्क्यापेक्षा जास्त भरली होती. या भाविकांना घेऊन येणाऱ्या बसेस आणि शहरातंर्गत वाहतूक यामुळे द्वारका, मुंबई नाका, पंचवटी, औरंगाबाद हायवे, तपोवन, जुने नाशिक आदी भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाही पर्वणीवर पर्जन्य संकट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दक्षिण गंगा अर्थात गोदावरीच्या तिरावर आज, रविवारी कुंभमेळ्याची दुसरी शाही पर्वणी पार पडणार आहे. या पर्वणीचा योग साधत पावसानेही शनिवारी शहरासह जिल्हाभरात दमदार हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहेत. मात्र पावसामुळे साधुग्राममध्ये पाणी साचल्याने साधूंसह भाविकांचे हाल झाले. यामुळे शाही पर्वणीवर पर्जन्य संकट निर्माण झाल्याचे चित्र साधुग्राममध्ये होते.

सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी पिठोरी अमावास्येची पर्वणी साधत देश-विदेशातून नाशकात दाखल झालेल्या हजारों भाविकांनी पवित्र रामकुंडात स्नान केले. पहिल्या पर्वणीचे अनुभव गाठीशी असल्याने पोलिसांकडून भाविकांप्रती यावेळी शिथिलता अनुभवण्यास मिळाली. पहिल्या पर्वणीचे अतिरेकी नियोजन यावेळच्या पर्वणीत पुरते बदलण्यात आले असून, जागोजागी भाविकांना रामकुंडापर्यंत तसेच लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास पावसामुळे प्रशासनासह भाविकांची त्रेधातिरपीट उडाली.

त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तावरही असेच वातावरण अनुभवायला मिळाले. दोन्ही ठिकाणी मिळून रविवारी होणारा हा १३ आखाड्यांच्या शाहीस्नानाचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणाही चोखपणे कर्तव्य बजावत आहे. शुक्रवारी सायंकाळपासूनच रामकुंडात स्नानासाठी हळूहळू गर्दी वाढली होती. शनिवारी दुपारनंतर ती अधिकच वाढली. 'सियावर रामचंद्र की जय' अशा जयघोषात लोक गोदावरीत डुबक्या मारत होते. आज, रविवारी सकाळी सहा वाजेपासून आखाड्यांच्या मिरवणुका आणि त्यांच्या शाहीस्नानाचा आखाडा रंगणार आहे. लाखो भाविक शाहीस्नानासाठी नाशिकमध्ये दाखल झाला आहेत.

आज पहिला मान निर्मोहीला

शाहीस्नानादरम्यान कोणत्याही चकमकी होऊ नये, वाद उदभवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने आखाड्यांची क्रमवारी ठरवून दिलेली आहे. त्यानुसारच हे स्नान होणार आहे. दुसऱ्या शाही पर्वणीत निर्मोही आखाडा पहिल्या क्रमांकावर स्नान करणार असून, त्यांची मिरवणूक साधुग्रामपासून सहा वाजता निघणार आहे. त्यांना रामकुंडावर सात वाजता त्यांना स्नानाची वेळ देण्यात आलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिगंबर आखाडा असून, त्यांची मिरवणूक साडे सहा वाजता निघणार आहे. त्यांना साडे सात वाजता शाहीस्नानाची वेळ दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर निर्वाणी आखाडा स्नान करणार असून त्यांची मिरवणूक सात वाजता साधूग्राम येथून निघणार आहे. आठ वाजता त्यांनी रामकुंडावर पोहोचत स्नानाची वेळ साधायची आहे. या शाही मिरवणुका लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू होणार असून, प्रत्येक आखाड्यांना शाहीस्नानासाठी तीस मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. सर्व आखाड्यांचे शाहीस्नान सकाळी १0 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, त्यानंतर भाविकांसाठी रामकुंड खुले केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणातील पाणी विसर्ग थांबवला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुसऱ्या शाही पर्वणीदरम्यान स्नान करण्यासाठी शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक दाखल झाले. त्यातच दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग काही तास कोसळलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाला तत्काळ थांबवावा लागला. पाऊस आणि गर्दी यामुळे नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनावर दबाव वाढल्याचे चित्र शनिवारी संध्याकाळी निर्माण झाले.

अमावस्येच्या महापर्वाचा लाभ घेण्यासाठी शुक्रवारपासून चार ते पाच लाख भाविक शहरात दाखल झाले. यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणखी वाढ झाली. एकीकडे गर्दीचा महापूर वाहत असताना दुपारी तीन वाजता मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले. साधुग्राम, शाहीमार्ग तसेच रामकुंड परिसरातील भाविकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊससमोर, राजीव गांधी भवन, गाडगे महाराज पूल आदी ठिकाणी मोठ्या स्वरुपात पाणी साचले. गाडगे महाराज पुलाखालील शाहीमार्गावर वाघाडी नाल्याचे प्रचंड पाणी वाहत होते. शाही मिरवणुकीदरम्यान असाच पाऊस कोसळल्यास मिरवणुकीचा बोजवारा उडू शकतो.

साधुग्राममध्ये पाणीच पाणी

दुपारी तीन वाजेपर्यंत शहरात ऊन पडलेले होते. रात्रीपासूनच भाविकांची तुफान गर्दी झालेल्या साधुग्राममध्ये भाविकांना उभे राहण्यास सुध्दा जागा नव्हती. त्यातच दुपारी तीन वाजेच्या सुमारास गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे साधुग्राममध्ये एकच धांदल उडाली. साधुग्राममधील सखल भागात पाणी साचल्याने साधू-महंतासह भाविकांना त्रास सहन करावा लागला. अशीच परिस्थिती रामकुंड परिसरात पाहण्यास मिळाली. सकाळपासून सुरू झालेली भाविकांची रिघ पावसामुळे कमी झाली.

पावसामुळे उडाली तारांबळ

भाविकांच्या राहण्याची सोय नसल्याने फजिती.

पावसाच्या तडाख्यानंतर रामकुंड झाले रिते.

नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ.

वाहतूक कोंडीमुळे भाविकांसह नाशिककरांचे हाल.

साधुग्रामसह शहरातील सखल भागात साचले पाणी.

परिस्थितीनुसारच निर्णय

दुसऱ्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून ४०० ते ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचे काम शनिवारी सकाळी सुरू झाले. मात्र, दुपारी तीन वाजता शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस पडला. पावसाचे पाणी थेट नदीपात्रात जमा होऊ लागले. धरणातील पाणी आणि पावसाचे पाणी यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी उंचावण्याची शक्यता होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्याबरोबर गंगापूर धरणातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला. परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेणार असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

''दुपारी चार वाजेपर्यंत गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे वातावरण होते. मात्र, तिथे पाऊस सुरू झालेला नव्हता. शहरातील पावसाचे प्रमाण पाहून गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला.''

- आर. एच. शिंदे, एक्झिक्युटिव्ह इं​जिनीअर, पाटबंधारे विभाग

''शनिवारी दुपारी नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला नाही. आजच्या पावसाचा पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही उपयोग झालेला नाही.''

- प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीतील पाणी वैज्ञानिकदृष्ट्या पवित्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीतील शाहीस्नान हे वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचा निष्कर्ष कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मा व्हॅली आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजमध्ये मेक इन ब्रह्मा व्हॅली उपक्रमाच्या माध्यमातून कॉलेजच्या प्राध्यापकांनी संशोधन करून काढला आहे.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शाहीस्नानापूर्वीचे व शाहीस्नानानंतरचे गोदावरीतील नमुने घेऊन त्याचे रासायनिक विश्लेषण केले होते. या विश्लेषणात त्यांना कोणतीही प्राणघातक रसायने सापडली नसल्याने हे पाणी शाहीस्नानासाठी सुरक्षित असल्याचे या निष्कर्षातून समोर आले असल्याचे सांगण्यात आले. पाणी वाहते असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मर्क्युरी कॅडमियम यासारख्या हानिकारक धातू या पाण्यात आढळले नसल्याचे उल्लेख या संशोधनात करण्यात आला आहे.

या कॉलेजचे विज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. वैभवी पाटील व केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. निलेश जाधव यांनी प्राध्यापकांचा ब्रह्मोत्सवात गौरव केला. संशोधनासाठी संस्थेचे संस्थापक राजाराम पानगव्हाणे व प्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचा हट्ट अन् पोलिसांची भंबेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन प्रमुख अनी आखाड्यांचे शाहीस्नान आटोपून खालशांचे साधू महंत स्नानासाठी येत असतानाच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यशवंतराव महाराज पटांगणावरील भाविकांना रामकुंडावर येऊ द्यावे, असा आदेश उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना दिला. चक्क पालकमंत्र्याचा आदेश आल्याने पोलिस अधिकारी चक्रावले. मात्र, एका तासाच्या अंतराने ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच पोलिसांनी भाविकांना सोडण्याचा निर्णय घेतला.

सकाळी रामकुंड परिसरात शाहीस्नान सुरू असताना भाविकांचा एक मोठा लोंढा गांधी तलावाच्या बाजूने रामकुंडाच्या दिशेने पुढे सरकला. पोलिसांनी तत्काळ त्यांना मागे सरकावरले. यशवंतराव महाराज पटांगणावर भाविकांचे स्नान सुरू असले तरी त्यांना रामकुंडावर यायचे होते. सकाळी ११ वाजता आखाड्यांचे शाही स्नान आटोपल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी य. म. पटांगणांवरील भाविकांना रामकुंडावर सोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांना याबाबत विचारणा केली. मात्र, वरिष्ठांचा आदेश नसल्याचे सांगत अंबिका यांनी त्यास नकार दिला. तरीही पालकमंत्र्यांनी आपला आग्रह कायम ठेवत पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. यानंतर, पालकमंत्री तिथून निघून गेले. या घटनेनंतर तब्बल अर्धा ते एक तासाच्या अंतराने भाविकांना रामकुंडावर प्रवेश देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् टळली जीवितहानी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामकुंडावर शाहीस्नानाचा उत्साह ओसंडून वाहत असताना गांधी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोघा मुलांचा जीव धोक्यात गेला. होमगार्डसह जीवरक्षक दलातील मुलांनी तातडीने पाण्यात उड्या मारून बुडणाऱ्या मुलास बाहेर काढले. वेळ आली पण काळ आला नव्हता अशीच काही प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.

दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील गायकवाड नगर येथे राहणारा महेश बेंडाळे (१७) आणि त्याचा एक साथिदार गांधी तलावत पोहण्यासाठी उतरले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांनी गंटागळ्या घाण्यास सुरूवात केली. हे पाहून तिथे कर्तव्यावर असलेल्या जालना जिल्ह्यातील होमगार्ड राजेंद्र मधुकर पालवे (२२) याने पाण्यात उडी मारली. मात्र, बुडण्याची भीती असलेल्या बेंडाळेसह त्याच्या साथिदाराने राजेंद्रलाच पाण्यात ओढले. यातून निर्माण झालेल्या आरडाओरड्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी बुडणाऱ्या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. राजेंद्रसह महेशच्या साथिदाराला बाहेर काढण्यात आले. मात्र, महेश पाण्याच्या प्रवाहाबरोबर गांधी तलावाच्या मोरीतून पुढे सरकला. याची कल्पना आलेल्या यशवंतराव महाराज पटांगणावरील जीवरक्षकांनी लागलीच पाण्यात उड्या मारून वाहत जाणाऱ्या महेशला पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने प्राथिमक आरोग्य केंद्रावर आणण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास यशवंत महाराज पटागंणावरील भाविकांनी रामकुंडावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची अॅम्ब्युलन्स होळकर पुलाजवळच अडकून पडली.

अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी

मुलांच्या बुडण्याच्या घटनेनंतर भाविकांसह अॅम्ब्युलन्सला रामकुंडापर्यंत वाट मोकळी करून देण्यात आली. पहिल्या पर्वणी दरम्यान देखील गांधी तलावत असाच प्रकार घडला होता. त्यामुळे गर्दी काळात गांधी तलावला बॅरकेडिंग करावेत, अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images