Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हलगर्जीपणाचा बळी

$
0
0

नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योग्य उपचार न मिळाल्याने आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने सरकारी नर्सिंग कॉलेजमधील सुप्रिया माळी (१९, रा. नंदूरबार) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी तीव्र असंतोष व्यक्त केल्यानंतर दोन्ही परिसेविकांकडील कारभार काढून घेण्यात आला आहे. आरोग्य संचालनालयाने त्रिसदस्यीय समिती नेमून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलच्या लगतच सरकारी नर्सिंग कॉलेज आहे. येथील जवळपास २० विद्यार्थीनी गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला आणि इतर कारणांपासून त्रस्त आहेत. यासंदर्भात कॉलेज आणि सिव्हिल प्रशासनाला सांगूनही मुलींकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर योग्य तपासणी न करणे, आजाराचे निदान न शोधणे आणि योग्य ती उपचार न केल्याने काही विद्यार्थिनींची प्रकृती खालावत आहे. मंगळवारी (२२ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास सुप्रिया माळी ही विद्यार्थिनी सिव्हिल हॉस्पिटलमधील कॉटवरुन अचानक कोसळली. सुप्रियाच्या मैत्रिणींनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली; पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी सुप्रियाला आयसीयूमध्ये हलविण्यात आले. तेथे काही उपचार सुरू करण्यात आले. मात्र, आणि अखेर मध्यरात्रीच्या सुमारास सुप्रियाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सुप्रियाच्या मृत्यूला सिव्हिलचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थिनींसह रिपाइं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच, दोषींवर कडक कारवाईची मागणीही केली आहे. पोलिसांनी कॉलेजमध्ये धाव घेतली. बुधवारी दिवसभरात विद्यार्थिनींचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. दरम्यान, मेंदूत रक्तस्राव झाल्याने सुप्रियाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक बी. डी. सानप यांनी सांगितले.

डॉ. माले यांना मारहाण

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून बहुतांश विद्यार्थिनींच्या कुटुंबियांची मोठी गर्दी झाली. डॉ. माले यांना जमावाने गराडा घातला आणि त्याचवेळी त्यांना काही जणांनी मारहाण केली असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिशादर्शक फलकामुळे रस्ते सौंदर्यात भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यानिमित्त शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसह स्थानिकांच्या सोयीसांठी महापालिकेने ठिकठिकाणी दिशादर्शक फलक उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत दोनशेहून अधिक दिशादर्शक फलक शहरात लावण्यात आले आहेत. निळ्या रंगाच्या या फलकांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असून ते भाविकांना मार्गदर्शक ठरत असल्याचा दावा शहर अभियंता सुनील खुने यांनी केला आहे.

कुंभमेळ्यानिमित्त शहरात लाखोच्या संख्येन भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने, त्यांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक फलक नव्याने लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वर्षभर चालणाऱ्या कुंभमेळ्यात भाविकांची रस्ते व ठिकाण शोधतांना ताराबंळ होवू नये यासाठी हे फलक लावण्यात येत आहेत. महापालिकेमार्फत सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते व चौकांचा सर्व्हे सुरू होता. महापालिकेचे १५ अभियंते तसेच संबंधित कंत्राटदारांचे १0 सुपरवायझर यांच्या मदतीने सर्व्हे केल्यानंतर शहरात तीन प्रकारचे दिशादर्शक फलक उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण होण्याचे नियोजन आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात नाशिकरोड, त्र्यंबकरोड, पंचवटी, साधुग्राम आणि तपोवनाकडे जाणाऱ्या आैरंगाबाद रोडवर दिशादर्शक फलक उभारले होते. त्यामुळे परराज्यातून आणि परगावाहून आलेल्या प्रवासी, भाविकांची गैरसोय टाळता येणे प्रशासनाला शक्य झाले.

त्रुटी टाळ्यासाठी तज्ज्ञांची मदत

आकर्षक अशा निळ्या रंगात सदर फलक उभारले जात असून त्यात इंग्रजी व मराठीत माहिती दिली जात आहे. सदर फलकांवरील मजकूर तसेच किलोमीटर यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत २00 हून अधिक फलक उभारण्यात आले असून त्यामुळे चौक व रस्त्यांचेही सौंदर्य खुलले आहे. भाविकांना हे फलक मार्गदर्शक ठरत असल्याचा दावा खुने यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक अॅपची स्मार्ट भरारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने नागरिकांच्या तक्रारी ऑनलाईन सोडविण्यासाठी सुरू केलेल्या स्मार्ट नाशिक अॅपला स्मार्ट नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकार्पण झाल्यापासून आठ दिवसात तब्बल दहा हजार नागरिकांनी अॅपला डाऊनलोड केले आहे. दररोज सरासरी एक हजाराच्या वर नागरिकांकडून स्मार्टचे सदस्यत्व स्वीकारले जात आहे. दरम्यान गेल्या आठ दिवसात स्मार्ट नाशिकवर ८३३ ऑनलाइन तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील ५० टक्के तक्रारींचा निपटारा झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

नाशिकचा समावेश केंद्राच्या स्मार्टसिटी योजनेत झाल्यानंतर महापालिकेन पेपरलेस कारभाराच्या दिशेने पाऊल टाकत स्मार्ट नाशिक अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात या अॅपचे लोकार्पण केले. स्मार्ट नाशिक मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये बायोमेट्रिक सेल्फी अटेंडन्स कार्यप्रणाली, तक्रार निवारण कार्यप्रणाली, ऑटो डीसीआर कार्यप्रणाली, घंटागाडी जीपीएस कार्यप्रणाली, ऑनलाइन करभरणा, ऑनलाइन जन्मनोंदणी प्रमाणपत्र कार्यप्रणाली, मनपा हेल्पलाइन कार्यप्रणाली, वेब जीआयएस कार्यप्रणाली, प्रस्तावित नागरी सुविधा केंद्रे, स्पॉट बिलिंग कार्यप्रणाली आहे. अशा प्रकारचा अॅप सुरू करणारी महापालिका देशातील पहिलीच असल्याचा दावा महापालिकेन केला आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय असलेल्या या स्मार्ट नाशिक अॅपचे नाशिककरांनीही जोरदार स्वागत केले आहे. आठ दहा दिवसात दहा हजाराच्या वर नागरिकांना हे मोबाइल अॅप डाऊनलोड केला आहे. सरासरी प्रत्येक दिवशी एक हजाराच्या वर नागरिक या अॅपला डाऊनलोड करत असल्याने नाशिककरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

तक्रारींचा पाऊस

स्मार्ट अॅपवर आतापर्यंत एकूण ८३३ तक्रारी आल्या आहेत. यापैकी निम्म्या तक्रारींचे निवारण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे यातील काही तक्रारी या न सोडविता येणाऱ्या आहेत. तर काही तक्रारी धोरणात्मक विषयाशी संबंधित आहेत. त्यामुळे अशा तक्रारी सोडवितांना प्रशासनाची मोठी अडचण होत आहे.

विद्युत सर्वाधिक तक्रारदार

महापालिकेच्या स्मार्ट अॅपवर आतापर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे ३५ टक्के तक्रारी विद्युत विभागाच्या आल्या आहेत. यामुळे शहरात विद्युत विभागाची बोंब असल्याचे समोर आले आहे. पथदीप बंद असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. एलईडी वाद कोर्टात गेल्याने आणि हा धोरणात्मक विषय असल्याने त्या सोडवाव्या कशा असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आखाड्यांमध्ये भेदाभेद नाहीत’

$
0
0

त्र्यंबकेश्वर : सर्व दहा आखाडे समान असून यामध्ये लहान मोठे असा कोणताही भेद नाही. तसेच सर्व आखाड्यांबाबत प्रशासनाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले, असे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मध्य प्रदेशातील उज्जैन सिंहस्थ आपल्या अध्यक्षतेखाली होणार आहे, असेही सांगितले.

नरेंद्रगिरी महाराज यांनी दहा आखाड्यांची नुकतीच बैठक घेतली. तसेच या आखाड्यांना भेट देत असून तिसरे शाहीस्नान अधिक उत्साहात व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आखाड्यांमध्ये समन्वय आहे. सरकारने वेळोवेळी केलेल्या मागण्या पूर्ण केल्या असून सुविधा चांगल्या दिल्या आहेत. म्हणूनच हा मेळा यशस्वी झाला. शुक्रवारचे (दि. २५) शाहीस्नान अखेरचे आहे. पुन्हा बारा वर्षानंतर हा योग येणार असल्याने भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कुंभशाहीस्नान तीनच असले तरी वर्षभर चालणाऱ्या भाविकांनी लाभ घेतला पाहिजे. आखाड्यांच्या धर्मध्वजा २८ तारखेपर्यंत उतरतील. मात्र, कुशावर्तावरील धर्मध्वजा ऑगस्ट २०१६ पर्यंत राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीस्नानासाठी त्र्यंबकनगरी सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

कुंभपर्वातील तिसऱ्या शेवटच्या शाहीस्नानासाठी दहा आखाडे सज्ज झाले आहेत. पहिल्या शाही पर्वणीप्रमाणेच पहिले स्नान श्री पंचदशनाम जुना आखाडा, श्री आवाहन आखाडा, श्री पंचअग्नी आखाडा यांचे असेल.

जुना पंचदशनाम आखाडा पिंपळद येथून मध्यरात्रीच्या सुमारास निघेल. अर्थात तीनही आखाडे पहाटे ३.४० वाजता खंडेरावमंदिर निलपर्वताच्या पायथ्याशी पोहचतील व तेथून कुशावर्तावर स्नानासाठी येतील. पहाटे ४.१५ वाजता पहिले शाहीस्नान होईल. त्यानंतर तपोनिधी निरंजनी आखाडा आणि तपोनिधी आनंद आखाडा यांची मिरवणूक निघेल व ते स्नानासाठी येतील. त्यानंतर अटल आखाडा आणि महानिर्वाणी आखाडा यांची मिरवणूक शाहीस्नानासाठी कुशावर्तावर येणार आहे. सकाळी ६ ते ८ पर्यंत कालावधी वैष्णव आखाड्यांसाठी राखीव आहे. सकाळी ८.१५ वाजता बडा उदासीन आखाडा, त्यानंतर नया उदासीन आखाडा आणि सकाळी दहा वाजेच्या सुमारास निर्मल पंचायत हा आखडा स्नानासाठी येत असतो.

मिरवणुकांचा हिरमोड

कुंभमेळा म्हणजे शाही मिरवणुका हे खास वैशिष्ट्य असते. पूर्वी हत्ती, घोडे, अंबाऱ्या, सनई आणि तुताऱ्या घंटानाद व बँडपथक व त्यासोबत नागा साधू अंबारीत बसलेले महामंडलेश्वर महंत असा सारा थाट पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत. हत्तींना बंदी केल्यानंतर ट्रॅक्टर, छोटा हत्ती या वाहनांवर रथ सजले आहेत. अधिकाधिक संख्येने बँडपथक लावून आखाडे मिरवणुका सजवतात. अरुंद रस्त्यांमुळे आखाड्यांच्या मिरवणुका तेली गल्ली कोपऱ्यावरून मिरवणुका थांबवण्यात येतात. तेथून रथ रिकामे करून मंदिराकडे थेट पाठविण्यात येतात. त्यांच्या सोबत बँडपथक देखील रवाना करण्यात येतात. सर्व महंत महामंडलेश्वर साधू आदी कुशावर्तावर येतात स्नान आटोपले की मेनरोडने धावत पळत मंदिरात जातात. दरम्यान मेनरोडला रात्रभर उभे असलेल्यांना भाविकांना शाही मिरवणूक पाहण्याची संधी लाभत नाही, असा पहिल्या आणि दुसऱ्या पर्वणीस अनुभव आहे. एकूणच मुख्य शाही मार्ग असा दुर्लक्षित राहिला आहे. प्रशासनाने या मार्गावर विद्युत रोषणाई सजावट आदी करण्याची गरज होती; मात्र तसे घडले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड जेलची सूत्रे आज रमेश कांबळेंकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पुणे येथील जेल ऑफिसर्स ट्रेनिंग कॉलेजचे (जेसीटी) प्राचार्य रमेश कांबळे गुरुवारी (दि. २४) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारागृहातील गुन्हेगारी आणि गैरकारभारावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान कांबळे यांच्यापुढे आहे.

नाशिकरोड कारागृहाचा अधीक्षकपदाचा तीन वर्षाचा कालावधी उलटून तीन महिने झाल्यामुळे विद्यमान अधिक्षक जयंत नाईक यांची बदली झाली आहे. त्यांच्याकडून कांबळे सूत्रे स्वीकारणार आहेत. जयंत नाईक यांची जेसीटीचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. 'मटा'शी बोलताना श्री. नाईक म्हणाले, की प्रशासनाकडून मला बदलीची ऑर्डर प्राप्त झाली आहे. कांबळे नाशिकरोड कारागृहात आल्यानंतर मला पदभार सोडता येईल. कारकिर्दीत अनेक विधायक उपक्रम जेलमध्ये राबविण्यात आल्याबद्दल मी समाधानी आहे. जेसीटीमध्ये कारागृहातील शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येते.

नक्षली कारावाईत सहभाग व बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोघांना संचित रजा नियमबाह्य पद्धतीने मंजूर केल्याची टीका झाल्यानंतर नाईक यांची बदली झाल्याची चर्चा आहे. ही टीका चुकीची असल्याचे नाईक यांनी सांगितले. कैद्यांना रजा मंजूर करावीच लागते. पोलिसांचा रिपोर्ट आल्यानंतरच रजा मंजूर केली जाते, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’ची उलटगंगा

$
0
0

स्मार्टकार्डऐवजी कॉम्प्युटराइज्ड कागदी आरसी बुकचे पुन्हा वाटप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे स्मार्ट सिटी, स्मार्ट गावांची स्वप्नं सामान्य जनतेला दाखविणारे राज्य सरकार प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) ला स्मार्ट करण्यास मात्र सोयीस्करपणे विसरले आहे. गत नोव्हेंबरपर्यंत स्मार्ट कार्ड देणाऱ्या या विभागाचा उलट्या दिशेने प्रवास सुरू असून कॉन्ट्रॅक्टचे नूतनीकरण वेळेत न केल्याने पुन्हा कागदी आरसी बुकचे वाटप केले जात आहे. गत साडे आठ महिन्यांत जिल्ह्यात एक लाखांहून अधिक वाहनधारकांना स्मार्टकार्डऐवजी कॉम्प्युटराइज्ड आरसी बुकवरच समाधान मानावे लागले आहे.

वाहनांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने २००६ मध्ये स्मार्टकार्डची आधुनिक प्रणाली स्वीकारली. मात्र, २६ नोव्हेंबर २०१४ पासून वाहनधारकांना पुन्हा कागदी आरसी बुक देण्याची नामुष्की या विभागावर आली आहे. आठ वर्षांपासून वाहननोंदणी प्रमाणपत्र अर्थात (आरसी बुक) स्मार्टकार्ड स्वरूपात दिले जात होते. पाऊस व तत्सम वातावरणातही ते सुरक्षितरित्या हाताळणे वाहनधारकांना शक्य होत असे. मात्र असे 'स्मार्टकार्ड' पुरविणाऱ्यांचे कंत्राट संपले असून राज्यभरात ते कागदी स्वरूपातच दिले जात आहेत. स्मार्टकार्ड बनविण्यासाठी परिवहन विभागाने दिलेले कंत्राट जून २०१४ मध्ये संपले.

या कंत्राटदाराला दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढही नोव्हेंबर अखेरीस संपली. तरीही त्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कंत्राटाची

प्रक्रिया वेळीच पूर्ण करण्याची कार्यतत्परता न दाखविली गेल्याने वाहनधारकांना आणि परिवहनच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. त्यामुळे एकीकडे राज्य स्मार्टपणाकडे पाऊले टाकत असताना आरसी बुकच्या बाबतीत मात्र परिवहन विभागाचा उलटा प्रवास सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

१ लाख १ हजार आरसी बुकचे वितरण

डिसेंबरपासून स्मार्टकार्डचे वितरण बंद करण्यात आले असून वाहनधारकांना कागदी आरसी दिले जात आहेत. जानेवारी ते २१ सप्टेंबर २०१५ या कालावधीत १ लाख १ हजार ३१ आरसी बुकचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात साधारणत: दर महिन्याला ११ हजारांहून अधिक वाहनधारकांना आरसी बुकचे वाटप केले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्मार्ट कार्ड कशासाठी?

सहजगत्या बाळगता यावे म्हणून पॉकेट साईज स्मार्टकार्ड आवश्यक मानले जायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनाविषयीचा सर्व डाटा या या कार्डमधील चिपमध्ये सामावलेला असायचा. त्यामुळे आरसी बुक सांभाळण्याचा त्रास वाचत असे. कागदी आरसी बुकचे आयुष्य कमी असते. ते खराब होण्याची, त्यावरील शाई पुसण्याची शक्यता अधिक असते. मात्र, स्मार्टकार्ड या सर्व बाबतीत उजवे ठरते. वाहनासंबंधीची सर्व माहिती सुरक्षित ठेवण्याचे काम हे स्मार्टकार्ड करते.



स्मार्टकार्ड कधीपासून?

कागदी आरसी बुक पेक्षा स्मार्टकार्ड हाताळणे अधिक सुलभ असल्याने नागरिकांना स्मार्ट कार्डच हवे आहे. महिनाभरात स्मार्टकार्डचे पुन्हा वाटप केले जाईल असे सांगितले जात होते. मात्र आठ ते नऊ महिने उलटूनही अद्याप ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. ही प्रक्रिया न्यायालयीन स्तरावर असल्याने स्मार्टकार्ड केव्हापासून मिळू शकतील हे सांगणे कठीण असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. त्याचा मनस्ताप त्या त्या क्षेत्रात कार्यरत आरटीओमधील अधिकारी तसेच नागरिकांना सहन करावा लागतो आहे.

कंत्राटाचे नूतनीकरण हा स्थानिक पातळीवरील विषय नाही. स्मार्टकार्ड वाटपाबाबतचा निर्णय झाला की नाशिकमध्येही त्याची तातडीने अंमलबजावणी करू. सध्या आम्ही स्मार्टकार्ड देऊ शकत नसलो तरी कॉम्प्युटराईज्ड कार्डचे वितरण करीत आहोत. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

- जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

$
0
0

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरूवारपासून (दि. २४) तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. महापालिका आणि महिंद्रा कंपनीच्या सौजन्याने तयार करण्यात आलेल्या ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कचे उदघाटन त्यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

पदाधिकाऱ्यांशी शुक्रवारी (दि. २५) चर्चा करून महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तिसऱ्या पर्वणीनिमित्त त्र्यंबकेश्वरला भेट देण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणपतीचे गेम्स हिट

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

सध्या प्रत्येक सण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यातलेच एक नवीन उदाहरण 'गणपती गेम्स'. यंदाच्या गणेशोत्सवात गणपती गेम्सने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच करमणूक केली आहे. गणपतीसोबत शर्यत, मोदक चोरण्यातली गंमत या गेम्समधून सर्वांना अनुभवायला मिळते आहे. मोबाइल अॅप्लिकेशन्स ते अॅक्सेसरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून भेटायला आलेला बाप्पा आता गेम्समधूनही भेट देतो आहे.

सध्याच्या स्मार्ट युगात मोबाइल जीवनावश्यक वस्तू होऊन बसली आहे. मनोरंजनासाठीही मोबाइल गेम्सचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण वापर करतात. कुठलीही अडचण असो वा कंटाळा आला असो प्रत्येक वेळी मोबाइलमधील विविध पर्याय उपयोगी पडतात. त्यातच सध्या प्रत्येक सणवार, उत्सव याचे सेलिब्रेशनही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील झाबुझा लॅब्जचा गणपती गेम सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

या गेममध्ये एकूण पाच प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक गेम हा वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे. गणपतीचे आवडते खाद्य, वाहन, गणपतीची विविध रुपे या सगळ्यांना कल्पकतेने उपयोग या गेममध्ये केला गेला आहे. गणपती मोदक मंच, गणपती रन, गणपती मोदक कॅचर, गणपती जिगसॉ पझल या गेम्सचा यामध्ये सहभाग आहे. तसेच या गेममध्ये अथर्वशीर्ष व गणपती आरतीही समाविष्ट आहे. गेम खेळत असताना याचा उपयोग बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून करण्यात आला आहे.

हा गेम अन्ड्रॉइड प्ले स्टोअर व अॅपल अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या गेमचे आतापर्यंत तीस हजार डाऊनलोड्स झाले आहेत. या गेमच्या माध्यमातून बाप्पाच्या करामती अनुभवण्याची संधी मिळते. हा गेम अन्ड्रॉइड व आयओएसवरही उपलब्ध आहे. गणेशोत्सवकाळात लाँच झाल्यामुळे चांगला प्रतिसाद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पाच्या मंडळांमध्ये यंदा सामसूम

$
0
0

कुंभमेळा आणि कोर्टाच्या नियमांचा परिणाम

नाशिक टाइम्स टीम

सिंहस्थ कुंभमेळा आणि गणेश मंडळांबाबत सुप्रीम कोर्टाचे नियम यामुळे यंदा शहरातील गणेश मंडळांवर अनेक बंधने आलेली दिसून येत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरातील २२ गणेश मंडळे यंदा कमी झाली आहेत. तसेच देखाव्यांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या मंडळांमध्ये यंदा सामसूम पाहायला मिळतेय. यंदा शहरभरात ७५९ मंडळे आहेत.

शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याची लगबग जुलैपासूनच सुरू झाली होती. त्यानंतर २९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदम्यान शहरामध्ये तीन पर्वण्या झाल्या. यातील शेवटची पर्वणी नेमकी गणेशोत्सव कालावधीत आल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता. त्यामुळे पंचवटी, तपोवन, जुने नाशिक या परिसरातील अनेक गणेश मंडळांनी गणपतीच बसवला नाही. याचबरोबर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार रस्त्यात खड्डे खोदणे, रस्ता बंद करणे तसेच रजिस्ट्रेशन नसलेल्या मंडळांनी वर्गणी गोळा करणे यांनी मनाई करण्यात आलेली आहे. याचा फटकाही अनेक मंडळांना यंदा बसला आहे. परिणामी मंडळांची संख्या तर कमी आहेच पण त्याचबरोबर देखाव्यांचे प्रमाणही घटल्याचे चित्र आहे. देखावे पाहायला जाणाऱ्यांची संख्याही यंदा फार नसल्याचे दिसून येत आहे.

'सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करत रस्त्याच्या साइडला मंडळानी देखावे साकारले आहेत. यामुळे ट्रॅफिकच्या समस्या उद्भवत नाहीत. पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा मज्जाव, अडवणूक होत नसून पॉइंटद्वारे गणपती बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या गर्दी तुरळक आहे, पण शेवटच्या दिवशी वाढली तरी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. - आदिनाथ मोरे, पोलिस उपनिरीक्षक, गंगापूर पोलीस स्टेशन

'कुंभमेळा हा जसा धार्मिक उत्सव होता, त्याचप्रमाणे गणेशोत्सव देखील धार्मिक उत्सव आहे. एकीकडे सिंहस्थासाठी सर्व प्रशासन लोटलेले असताना गणेशोत्सवाकडे मात्र प्रशासनाने पाठ फिरवली. अनेक निर्बंधांमुळे गणपती मंडळांनीदेखील यावेळी कमी देखावे ठेवले. अनेकांनी गणपतीही बसवले नाहीत. या सर्वाची चर्चा शहरात होत असल्याने, कमी गणपती आहेत म्हणून बघायला जायचं नाही अशी अनेकजण भूमिका घेत आहेत. - सत्यम खंडाळे, संस्थापक अध्यक्ष, मानाचा राजा नाशिक

'दरवर्षी आम्ही मैत्रिणी गणपती पहायला जात असतो. मात्र यंदाच्या वर्षी गणपती मंडळाचे देखावे फारसे चांगले नसल्याचे ऐकून आहोत. रस्त्याने येताजाता दिसणारे फारसे उत्कृष्ट नाहीत. तसेच गावातील अनेक मंडळांना यावर्षी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाची परवानगी नसल्याचेही वाचनात आले आहे. गणेशोत्सवाचा जोर कुंभमेळ्यात ओसरला की काय अशी परिस्थिती असल्याने यावेळी गणपती बघायला जायचा प्लॅनच केला नाही. - कीर्ती महाजन, गंगापूररोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांनाच ‘नो एन्ट्री’

$
0
0

उद्योग भवनातील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

एमआयडीसीच्या पाच जिल्ह्यांचे कार्यालय असलेल्या उद्योग भवनात उद्योजकांच्या वाहनांना नो एन्ट्री आहे. त्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्योग भवनाच्या आवारातच पार्किंगला पुरेशी जागा नसल्याने आपली वाहने रस्त्यांवर उभी करण्याची वेळ उद्योजकांवर येत आहे.

नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यातील उद्योजकांना एकाच छताखाली उद्योगांच्या सबंधित कार्यालये असावीत म्हणून एमाआयडीसीने उद्योग भवनाची निर्मिती सन २००२ मध्ये करण्यास सुरुवात केली. सन २००४ मध्ये इमारतीत उद्योगांना लागणारे शासकीय कार्यालये सुरू झाली. परंत, दिवसेंदिवस वाढत्या विकासात कंपन्यांची संख्याही वाढल्याने उद्योग भवनात येणाऱ्या उद्योजकांसह इतर व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. उद्योग भवनात कामानिमित्त येणाऱ्या उद्योजकांच्या गाड्यांना गेटवरच अडविले जाते. तसेच बाहेरील चारचाकी वाहनांना प्रवेश बंद' असा फलकच एमआयडीसीने गेटवर लावला आहे. त्यामुळे उद्योजकांना आपल्या महागड्या गाड्या रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात.

वाहनाची चोरी किंवा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी एमआयडीसी घेणार का, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. एमआयडीसीने योग्य तोडगा काढत पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.


उद्योजकांना उद्योग भवनात वाहने पार्किंगसाठी जागा दिली जात नाही. याबाबत उद्योजक नेहमी तक्रारी करतात. एमआयडीसीने उद्योजकांच्या वाहने व्यवस्थित पार्किंगसाठी जागा देणे गरजेचे आहे.

- संजीव नारंग, अध्यक्ष, निमा

उद्योजकांना कामानिमित्त उद्योग भवनात यावे लागते. परंतु, पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी करावी लागतात. वाहनांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण?

- विवेक पाटील, अध्यक्ष, आयमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विल्होळी तलावात विर्सजनाला बंदी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

जलसिंचन विभागाने विल्होळी गावालगत उभारलेल्या तलावात गणपती विर्सजनाला बंदी करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांसह सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलिसांकडे दिले आहे.

विल्होळीच्या तलावात सिडको, अंबड, पाथर्डी व इतर भागातील भाविक गणपती विर्सजनासाठी येतात. परंतु, उन्हाळाच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर तलावातून मुरुम व माती काढावी लागते. यामुळे विर्सजनासाठी आलेल्या भाविकांचा पाण्यात बूडून अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असेल असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच गणेश विर्सजनावरून ग्रामस्थ व भाविक यांच्यात देखील दरवर्षी वाद होतात. यासाठी जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलिसांनी विल्होळीच्या तलावावर गणपती विर्सजनावर बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांनी

केली आहे. याप्रसंगी अजय गायकवाड, कृष्णा वाघ, राजू थोरात यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चालविण्याची कसरत

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

शहरातील विविध भाग एकमेकांना जोडून दोन परिसरांमधील अंतर कमी करण्याचे काम रस्ते करतात. मात्र, हेच रस्ते बनविताना पुरेशी खबरदारी घेतली न गेल्यास ते अपघातांना निमंत्रण देतात. रस्ते तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी त्यावर सुरक्षिततेच्या उपायांसाठी काही हजार रुपये खर्च करण्याचे सौजन्य प्रशासनाकडून दाखविले जात नसल्याने वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे.

काही महिन्यांपासून वाढत्या रहदारीमुळे चर्चेत आलेला मेरी कॉर्नरलगतचा रोड अपघातांना निमंत्रण देणारा हॉट स्पॉट ठरला आहे. गुजरातहून थेट ते मुंबई आग्रा महामार्गावर जाणारी वाहने सीडीओ मेरी हायस्कूल लगतच्या रस्त्याने सोडण्यात येत आहेत. पूर्वी ही वाहने रासबिहारी हायस्कूल मार्गे जात असत. मात्र, हा रस्ता अरुंद आणि कमी अधिक वळणांचा असल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता अधिकच धोकेदायक ठरू लागला होता. याच रस्त्याला समर्थ पर्याय ठरलेला आणि थेट मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम परिसराला जोडणारा रस्ता वाहनधारकांना अधिक प्रिय वाटू लागला आहे. म्हणूनच या रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. डांबरीकरण आणि रुंदीकरणामुळे या चकचकीत रस्त्यावर दिवस रात्र वाहनांची ये जा सुरू असते. पेठ, दिंडोरी रोडने येणारी गुजरातकडील वाहने थेट शहरात घुसण्याऐवजी मेरी सिग्नल मार्गे थेट अमृतधामपर्यंत पोहोचतात. मात्र, तारवालानगर आणि तत्सम रहिवाशी वसाहतीमधून ही वाहने बेदरकारपणे दामटविली जातात. विशेष म्हणजे हा रस्ता अद्ययावत असला तरी त्यावर दुभाजक बसविण्यात आलेले नाही. परिणामी लेन कटींग ही येथे प्रामुख्याने भेडसावणारी समस्या ठरते आहे. गुजरात, दिंडोरीकडून अमृतधामकडे जाणारी आणि अमृतधाम, मुंबई आग्रा महामार्गाकडून मेरी, पेठरोडकडे ये जा करणारी वाहने सर्रास लेन कटींग करून वेगाने धावतात. त्यामुळे लहान मोठे अपघात येथे नित्याची बाब बनली आहे. या मार्गावर दुभाजकाची नितांत आवश्यकता आहे. त्याबाबत महापालिकेसह संबंधीत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही होत नसल्याची खंत तारवालानगर परिसरातील सजग नागरिक आणि निवृत्त वाहतूक अधीक्षक धर्मराज राजवाडे यांनी व्यक्त केली आहे. या रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रस्ता ओलांडायचा म्हटले तरी दहा ते पंधरा मिनिटे प्रतीक्षा करावी लागते. याच परिसरात सीडीओ मेरी हायस्कूल आहे. तारवालानगर ही रहिवाशी वसाहत आहे. या वसाहतीसमोरच रस्त्याच्या पलीकडे सेतू कार्यालय आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांचे सातत्याने येणे जाणे असते. सकाळी आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची येथे गर्दी होते. त्यातच वेगाने चालणारी वाहनांमुळे येथील गोंधळात भर पडते. सिग्नलवर काही सेकंदही थांबण्याचा कंटाळा असलेले वाहनधारक अन्य बाजूने वळसा घालून पुढे जाण्यात धन्यता मानतात. मात्र, त्यामुळे संबंधित बाजूकडून येणाऱ्या वाहनचालकाचां गोंधळ उडतो आणि त्यातूनही अपघात होतात.

या रस्त्यावर तारेचे का असेना; परंतु दुभाजक बसवावेत, शाळा, तारवालानगरजवळ झेब्रा क्रॉसिग करावे तसेच तेथे गतिरोधक बसवावे अशी राजवाडे यांच्यासह समस्त तारवालानगर रहिवाशांची मागणी आहे. त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाने त्यावर ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. त्या कराव्यात अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.

नाशिककरांनो, लिहिते व्हा!

शहरातील वाहतूक समस्येवर सडेतोड मतं व्यक्त करण्यासाठी 'ट्रॅफिक इश्यू' या सदराच्या माध्यमातून 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येथे केवळ वाहतुकीच्या समस्यांचे रडगाणे अपेक्षित नाही. समस्यांवरील अभ्यासपूर्ण विश्लेषणाचे स्वागतच आहे. तुमच्या भागातील वाहतुकीची समस्या सामूहिक प्रयत्नातून सुटावी हा आमचा प्रयत्न आहे. वाहतुकीची स्थिती, त्याची कारणे, वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठीच्या उपाययोजना आणि सूचना असतील तर उचला लेखणी आणि कळवा आम्हाला. अभ्यासपूर्ण सूचना आम्ही पोहोचवू प्रशासनापर्यंत आणि घडवून आणू सकारात्मक बदल सर्वांना हवा असणारा.

समन्वयक : प्रवीण बिडवे ९८८११२०१३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांमध्ये रस्त्यांचा शोध

$
0
0



देवळालीच्या रेस्ट कॅम्प रोडची दुरवस्था; वाहनचालक झाले हैराण

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

वाहन चालवितांना रस्त्यांवर खड्डे असणे आपल्याकडे स्वाभाविकच मानले जाते. मात्र, देवळालीमधील रेस्ट कॅम्प रोडवर तर खड्ड्यांमध्ये रस्त्याचा शोध घेत गाड्या चालविण्याचे दिव्य कर्म चालकांना पार पाडावे लागत आहे. खड्ड्यांनी व्यापलेल्या या रस्त्यावरून वाहने चालविणे म्हणजे अपघातांना आणि आजारपणाला आमंत्रण देत असल्याची व्यथा स्थानिकांनी येऊन ठेपली आहे.

देवळालीच्या रेस्ट कॅम्प रोडने जातांना येतांना वाहनचालकांचे कंबरडे मोडत असून एमइएस (मिलिटरी इंजिनियरिंग सर्विसेस) व कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन या रस्त्याच्या कामाबाबत निर्णय घेत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे.

नाशिक परिसरातील विद्यमान खासदारांसह २ आमदार, ४ नगरसेवक यासह अनेक जिल्हास्तरीय राजकीय नेते या मार्गाने दररोजच प्रवास करत असतात तरीही त्यांना या गंभीर समस्येची जाणीव होत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागझिरा नाल्यापासून भगूर बस स्थानकपर्यंत असणारा रेस्ट कॅम्प रोड हा अर्धा अधिक प्रमाणात एमइएसकडे तर अर्धा कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे जागोजागी मोठमोठाले खड्डे पडले असून वाहनधारकांना रेस्ट कॅम्प रोडवरून प्रवास करतांना या खड्ड्यांचा चांगलाच फटका बसत आहे. रस्त्याने तर वाहन चालविताच येत नाही. याउलट रस्ता चुकवून वाहन चालवावे लागत आहे.

चंद्रमणी नगरच्या बस थांब्यापासून थेट भगूर बस स्थानकापर्यंत सुमारे ३ किलोमीटरचा प्रवास वाहनचालकांना खड्ड्यांमुळे अगदी नकोस झाला आहे. दोन्ही प्रशासनापैकी कुणीतरी पुढाकार घेत रेस्ट कॅम्प रोडचा प्रश्न कायमस्वरूपी संपवावा, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे. दोन्ही प्रशासनाच्या सिमेवर असल्याचा तोटा देवळालीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

आम्ही नियमित या मार्गाने प्रवास करीत असतो. मात्र, गेल्या ५-६ वर्षात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे खड्डे टाळत आणि रस्ता शोधत वाहन चालवावी लागत आहेत.

- सतीश शिरसाठ, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खगोलशास्त्र अध्ययनाची संधी

$
0
0

ग्लोबल व्हिजन स्कूलमध्ये खगोल विज्ञान मंडळाची स्थापना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल शाळेतर्फे नाशिक जिल्ह्यातील इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोल विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या मंडळाची सुरुवात येत्या ३ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.

भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला दाखविलेले महासत्तेचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर जात, धर्म, पंथ या पलिकडे जाऊन विज्ञानाच्या दृष्टीकोनातून वाटचाल करणे आवश्यक आहे. या स्वप्नपूर्तीसाठी योगदान देण्याचा उद्देश या मंडळाच्या स्थापनेमागे आहे. नाशिकमधील सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक मिलिंद बाबर व सुजाता बाबर हे या मंडळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण या मंडळामार्फत देण्यात येणार आहे. दर महिन्याला दोन ते तीन तास याप्रमाणे हे सत्र चालविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सातवी ते दहावीच्या शेतकर्यांच्या मुलांसाठी अधिक प्राधान्य या खगोल मंडळात देण्यात येणार आहे. खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण करण्याचा विशेष प्रयत्न या मार्फत केला जाणार आहे.

या विषयांचा अभ्यास

खगोल विज्ञान मंडळात विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र मंडळात अंतरीक्ष संशोधन, निरीक्षण, ग्रह-तारे यांचा अभ्यास, ग्रहणे, धुमकेतू, अवकाशातील आश्चर्य, सूर्यमाला, विश्व, तार्यांचा जन्म आणि मृत्यू, आकाश दर्शन, उल्कावर्षाव, लघुग्रह, अशनी, ग्रहणे, दुर्बिणींचे प्रकार अशा अनेक विषयांचा अभ्यास या मंडळात शिकवला जाणार आहे. तसेच चित्र व ध्वनिफितीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा प्राचीन इतिहास सांगितला जाणार असून खगोलशास्त्रीय बाबींची उकलही या मंडळांतर्गत करण्यात येणार आहे.

खगोलशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, या उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. अंतराळात धाव घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम यानिमित्ताने केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

- विजयालक्ष्मी मणेरीकर, संचालक, ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील आणखी एक मॉल बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहर हे झपाट्याने विकसित होणारे शहर असल्याचे वारंवार निदर्शनास येत असले तरी शहरातील आणखी एक मॉल बंद होणार आहे. गडकरी चौकातील रिलायन्स मॉल हा बंद होण्याच्या अंतिम टप्प्यात असून शहराच्या मुख्य भागातील दुसरा मॉल बंद होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शहराचा वाढता विस्तार आणि विकास पाहता विविध प्रकारच्या बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचे आऊलेटस, शॉप्स आणि शो रुम्स सुरू केले आहेत. तसेच, शहरातील मॉल्सची संख्याही लक्षणीयरित्या वाढत असल्याने टायर टू शहरांमध्ये नाशिकचा वरचष्मा आहे. विविध प्रकारच्या सर्वेक्षणांमध्ये ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. मल्टिप्लेक्सची संख्याही दिवसेंदिवस नाशकात वाढत आहे. या साऱ्या बाबीची दखल घेत इतरही अनेक नामांकीत कंपन्यांनी त्यांचा मोर्चा नाशिककडे वळविला आहे. पण, योग्य प्रतिसादाअभावी शहराच्या काही भागातील मॉल बंद पडले आहेत. रिलायन्स फ्रेश प्रारंभी सुरू झाले आणि बंदही. त्यानंतर महात्मानगर येथील हाऊस पूल मॉलही कालांतराने बंद झाला. शहरातील मुख्य भागात असलेल्या त्र्यंबक नाका येथील मोअर मॉल कधी बंद होईल, असे कुणाला वाटले नाही. मात्र, हा मॉल काही महिन्यांपूर्वीच बंद झाला. या मॉलच्या जागी त्याच तुलनेचा मोठा मॉल त्या जागेत येवू शकलेला नाही. त्यातच आता गडकरी चौकातील रिलायन्स मॉल बंद होण्याच्या मार्गावर आहे.

दुसरा मॉल दाखल होणार?

रिलायन्सच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधला असता, आम्ही फूड मॉल काही दिवसांपूर्वीच बंद केला आहे. त्यानंतर रिलायन्स डिजीटलचे सेक्शनही बंद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत रिलायन्स ट्रेंड केवळ चालू आहे. तेथेही आम्ही सेल आऊट लावला आहे. येत्या काही दिवसातच रिलायन्स ट्रेंडही बंद होईल. दरम्यान, शहरातील आणखी एक मोठा मॉल बंद होत असतानाच त्याठिकाणी आणखी दुसरा मोठा मॉल कार्यरत होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याचे स्पॉट बंद करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यानंतर शहरात रोगराई पसरण्याच्या धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी महापौरांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, झाडाझडती घेतली. शहरात ठिकठिकाणी तयार झालेले उघड्यावरील कचऱ्याच्या स्पॉटमुळेच दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत असल्याने हे स्पॉट तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौरांनी दिले. सोबतच सिंहस्थ निधीतून मिळालेल्या दहा हजारावरील डस्बीन बड्या सोसायट्यांच्या बाहेर ठेवण्याच्या सूचना महापौरानी आरोग्य विभागाला केल्या आहेत.

शहरातील आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नावर महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व वैद्यकीय विभागाची बैठक झाली. यात महापौरांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत स्वच्छता निरिक्षकांसह अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. स्वच्छतेसाठी आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक जावून पाहणी करतात काय असा सवाल महापौरांनी केला.

शहरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे स्पॉट तयार झाले असून या ठिकाणी कचऱ्याचे ढीगच तयार झाले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याचा आरोप महापौरांनी केला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे व वैद्यकीय अधीक्षक बी. आर. गायकवाड यांनी आपल्या विभागाच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर केला. महापौरांनी विभागवाईज अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डेकाटे यांनी आरोग्य विभागाचे नियोजन सादर केले. कुंभमेळ्यासाठी सुमारे अकरा हजार डस्बीन मिळाल्या असून त्यांचे वाटप सर्व सहा विभागांना करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सोबतच ७०० व्हिलबरोज, २०० कलश व पाच गाड्यांचेही विभागवार वाटप करता येतील असा प्रस्ताव त्यांनी ठेवला.

महापौरांनी सर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर कचऱ्याचे सर्व ब्लॅक स्पॉट तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. या सर्व स्पॉटच्या ठिकाणी महापालिकेचा कर्मचारी उभा करून स्थानिकांचे प्रबोधन करण्याचे तसेच सिंहस्थात मिळालेल्या डस्बीन या शहरातील बड्या सोसायट्यांना देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या डस्बीनवर सोसायट्यांना कचरा बाहेर न टाकण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तर व्हिलबरोजही नियमित कामाला लावण्याचे आदेश दिले. जनजागृतीसह घंटागाडी नियमित करण्याचे त्यांनी आदेश देण्यात आले.

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी तत्परता

महापालिकेचा कारभार गोगलगायीप्रमाणे चालत असून नागरिकांच्या तक्रारी ही सुटत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांची ही ओरड सिंहस्थाच्या नावाखाली दबली गेली होती. मात्र, आता कारणच उरले नसल्याने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा असल्याने महापौरांनीही तत्परता दाखवत तातडीने आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. आता आपण आक्रमक झाल्याचा संदेशच त्यांनी जणू गुरूवारच्या बैठकीत दिला. तर कामाला लागा नाही तर खैर नाही अशा इशारा देत आक्रमकतेचा परिचय दिला.

वैद्यकीय अधीक्षकांची कानउघाडणी

आक्रमक मूडमध्ये असलेल्या महापौरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांची चांगलीच कानउघाडणी केली. वर्षाचा लेखाजोखा साजरा करणाऱ्या गायकवाड यांना महापौरांनी फटकारत आठ दिवसांचे सांगा, तम्ही कधी हॉस्पिटल्सला भेटी देतात काय? असा सवाल केला. त्यामुळे गायकवाड गांगरलेच. केवळ अधिकाऱ्यांच्या माहितीवरच कामकाज करणाऱ्या गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, कामकाज सुधारण्याचा आदेशही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात आज राजकीय मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातील शेवटची शाही पर्वणी साधण्यासाठी शुक्रवारी (दि. २५) भाविकांप्रमाणेच राजकीय पदाधिकाऱ्यांचीही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी पटेलांसह केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि असे अनेक मान्यवर दर्शन आणि स्नानासाठी नाशिकमध्ये असणार आहेत.

शहरातील तिनही पर्वण्या निर्विघ्न पार पडल्याने महापालिका प्रशासन आणि शहर पो‌लिसांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. मात्र, त्र्यंबकेश्वरमधील शेवटच्या शाही पर्वणी शुक्रवारी होणार असल्याने जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण पोलिस अजूनही तणावाखाली वावरत आहेत. त्र्यंबकमध्ये होणाऱ्या ध्वजारोहनासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हजेरी लावली होती. त्यानंतरही दुसऱ्या पर्वणीपर्यंत अनेक मान्यवर त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक झाले. पालकमंत्री गिरीश महाजन प्रत्येक पर्वणीला कुशावर्तावर तळ ठोकून होते. सिंहस्थ काळात पोलिस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण असल्याने व्हीआयपींनी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.

त्यामुळे पहिल्या दोन पर्वण्यांना फारसे कुणी व्हीआयपी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्येही फिरकले नाही. सिंहस्थातील तिसरी आणि शेवटची शाहीपर्वणी शुक्रवारी होत असल्याने या पर्वणीच्या निमित्ताने केवळ राज्य नव्हे तर केंद्र पातळीवरील मंत्रीही नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री बाराला कुशावर्तावर येणार असून जलार्पण करणार आहेत. पालकमंत्री महाजन, सहकार राज्य मंत्री दादा भुसे देखील त्यांच्या समवेत असणार आहेत. रात्री साडेबाराला मुख्यमंत्री पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी पटेल, तेथील उच्चशिक्षण राज्यमंत्री वसू त्रिवेदी शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास स्नान तसेच पूजा विधीसाठी नाशिकमध्ये येणार आहेत. शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी त्यांचा मुक्काम असणार आहे. शनिवारी सकाळी साडेनऊला त्या त्र्यंबकेश्वर येथे पूजेसाठी जाणार आहेत. रासायनिक खतेचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास नाशिकमध्ये येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लर्निंग लायसन दहा मिनिटांत हातात

$
0
0

'आरटीओ'च्या सॉफ्टवेअरमुळे कामाला गती

pravin.bidve@timesgroup.com

लर्निंग लायसन्ससाठीच्या अपॉईंटमेंट्स ऑनलाइन करून एजंटगिरीला चाप लावणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. लायसनसाठीची चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना अवघ्या १० मिनिटांत लर्निंग लायसन देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उमेदवारांचा वेळ, पैसा आणि श्रमांचीही बचत होत आहे. यापूर्वी या प्रक्रियेसाठी किमान तीन दिवस वाट पहावी लागत असे.

लर्निंग लायसन्स मिळविण्यासारखे अत्यंत प्राथमिक स्वरुपाचे काम असो किंवा वाहनाचे टॅक्स भरणे असो या प्रत्येक कामामध्ये एजंट्सची लुडबुड नागरिकांना नवीन नाही. मात्र, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याने 'आरटीओ' टीकेचा धनी ठरायचा. सरकारी धोरणांमध्ये बदल झाल्याने एजंटगिरीवर मर्यादा आल्या असून, ऑनलाइन कार्यप्रणालीकडे या विभागाची वाटचाल सुरू आहे. 'आरटीओ'ने गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये लर्निंग लायसनसाठी ऑनलाइन अपॉईंटमेंटची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. ठराविक दिवसाची अपॉईंटमेंट प्राप्त झाल्यानंतरच उमेदवाराला ऑनलाइन परीक्षाला सामोरे जाता येते. ही चाचणी दिल्यानंतर काही मिनिटांतच परीक्षेचा निकालही समजतो.

मात्र, परवाना देण्यास किमान तीन दिवस लागत असल्याने उमेदवाराचा वेळ, पैसा आणि श्रमही खर्च होत असत. उमेदवारांची हीच कैफियत लक्षात घेऊन 'आरटीओ'ने आता चाचणीनंतर लगेचच लर्निंग लायसन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकदा चाचणीसाठी आलेला उमेदवार लर्निंग लायसन घेऊनच बाहेर पडू शकणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय बुधवारपासून अमलात आणण्यास सुरूवात झाली असून, उमेदवारांकडून त्याबाबत समाधानही व्यक्त होत आहे.

लायसन तत्परतेने देण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. या अडचणी दूर करण्यात या विभागाला यश आले आहे. सॉफ्टवेअरमधील निरुपयोगी डाटा कमी केल्याने त्याची गती वाढली आहे. तसेच प्रिंटर आणि लॅमिनेशन मशिन्सची संख्या वाढविल्याने उमेदवारांना तातडीने लायसन देणे शक्य होत आहे.

उमेदवारांना कमीत कमी वेळेत लर्निंग लायसन्स मिळावे यासाठी आमची यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम केली आहे. अंधेरी येथे सर्वप्रथम हा प्रयोग यशस्वी करण्यात आला. येथेही आम्ही सातत्याने सात दिवस चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाली असून, आवश्यक यंत्रसामग्रीची संख्याही वाढविण्यात आली आहे. बुधवारपासून उमेदवारांना दहा मिनिटांत लायसन्स देण्यास सुरुवात झाली आहे.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

ऑनलाइन चाचणी देऊन बाहेर पडलो. चाचणी उत्तीर्ण झालो होतो. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी १० मिनिटे थांबण्यास सांगितले. त्यामुळे कार्यालयाच्या आवारातच थांबून होतो. त्यांनी बोलावून लॅमिनेटेडे लर्निंग लायसन हातात दिले. अवघ्या १० मिनिटांत लायसन मिळाल्याने मी थक्क झालो.

- डॉ. विपुल चोपडा

लायसन मिळायला तीन-चार दिवस किंवा आठवडाही लागेल असे मला वाटत होते. परंतु, अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांतच माझ्या हातात लर्निंग लायसन मिळाले. आरटीओची ही गतिमान कार्यपध्दती निश्चितच कौतुकास्पद आहे.

- सागर मांगडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसीबीचे तक्रारदार झाले ‘तरूण’

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करून आपल्याच पायावर धोंडा मारला जातो, ही मानसिकता आता हळुहळू लोप पावत चालली आहे. विशेषतः तरूण प‌िढी भ्रष्टाचाराचे जोखड दूर सारण्याचा प्रयत्न करीत असून, त्याचाच परिणाम अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) सापळ्यांच्या संख्येवर होतो आहे. गत वर्षात एकूण एसीबीच्या तक्रारदारांच्या संख्येत ४८ टक्क्यांपेक्षा अधिक तरूणांचा सहभाग हेच स्पष्ट करतो.

राज्यात काही वर्षापासून भ्रष्टाचाराचा विस्तार झपाट्याने झाला. महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग एवढेच नव्हे तर समाज विकासाच्या योजनाही यापासून दूर राहिल्या नाहीत. भ्रष्टाचाराचा सर्वाधिक परिणाम युवा प‌िढीवरच होतो. त्यातच एसीबीने समाजाच्या सर्वच स्थरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून तक्रारदारांच्या रूपाने युवा प‌िढी समोर येते आहे. जानेवारी १७ सप्टेंबरपर्यंत राज्यभरात दाखल झालेल्या ९०७ केसेसमध्ये ४३५ तक्रारदार हे १८ ते ३५ या वयोगटातील होते. यातील, १११ तरूण तर २५ वयोगटापेक्षा कमी होते.

नाशिक परिक्षेत्रात चालु वर्षांत आतापर्यंत १३५ सापळे रचण्यात आले. तर तीन गुन्हे अपसंपदेचे आहेत. यातील तक्रारदारांच्या वयाचा विचार करता २० ते ३५ हाच वयोगट समोर येतो, असे एसीबीच्या नाशिक परिक्षेत्राचे अधीक्षक संदीप प्रधान यांनी सांगितले. तक्रारदार म्हणून स्त्र‌ियादेखील पुढे येत असून, राज्यभरात २२ महिलांनी भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले. याबाबत अधिक माहिती देताना प्रधान यांनी स्पष्ट केली की, युवा आणि महिलांनी मोठ्या संख्येने एसीबीकडे तक्रार दाखल करण्यासाठी येणे ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. अगदी चार ते पाच वर्षापूर्वी ३५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचा कल एसीबीकडे होता.

एसीबीने काही वर्षापासून तंत्रज्ञानाचा वापर वाढवला. तक्रारदाराच्या अनुरूप खूप बदल केले याचाच परिणाम म्हणून आज शहरी, ग्रामीण इतकेच नव्हे; तर आदीवासी पाड्यावरून आमच्यापर्यंत तक्रारी येतात. तक्रारदारांच्या तक्रारींचा निपटरा व्यवस्थीत होतो. त्याची माऊथ पब्लिसीटी होत असल्याने युवा वर्ग एसीबीकडे वळला, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>