Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ग्रामविकासाकडे आमदारांचीच पाठ

0
0


प्रवीण बिडवे । नाशिक

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर खेडोपाड्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेकडे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक आमदारांनी पाठ फिरविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गाव निवडीची प्रक्र‌िया सुरू होऊन सहा महिने लोटले तरी जिल्ह्यातील १९ पैकी नऊच आमदारांनी त्यास प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे जिल्ह्याचे विकासपुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसह एकूण दहा आमदारांनी याबाबत अनास्था दाखविल्याने गावगाड्याचे रुपडे कसे पालटणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातही आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येक आमदाराने जुलै २०१९ पर्यंत मतदार संघातील तीन गावे विकसित करणे आवश्यक आहे. दत्तक गावाची लोकसंख्या किमान एक हजार असावी, आमदारांनी स्वत:चे गाव तसेच सासर वगळून अन्य गाव दत्तक घ्यावे, विधान परिषदेचे आमदार तसेच शहरी भागातील आमदार जिल्ह्यातील कोणतेही गाव दत्तक घेऊ शकतील, असे निकष आहेत.

चालू वर्षासाठी गाव निवडून त्याबाबतची माहिती ३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक होते. मात्र आतापर्यंत नऊच आमदारांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गंमत म्हणजे विधान परिषदेचे आमदार अपूर्व हिरे आणि नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे या दोघांनीही निमगाव हे एकच दत्तक घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. अन्य सात विधानसभा आमदारांनी मतदार संघातील गावाचे नाव प्रशासनाला कळविले आहे. जिल्ह्यात १५ विधानसभा आमदार तर ४ विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यापैकी एकूण नऊ आमदारांनी गावांची नावे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेला कळविल्याची माहिती पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटकपूर्व जाम‌िनासाठी सागर चौधरीचा अर्ज

0
0

नाशिक : जळगाव पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणीत गुन्हा दाखल असलेल्या तिघा संशयितापैकी सागर चौधरी या वाळू व्यावसायिकाने मंगळवारी नाशिक कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सादरे यांनी सुसाईड नोटवर पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह सागर चौधरी या वाळू तस्करावर कटकारस्थान करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने चिठ्ठीच्या आधारे पंचवटी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरबा रात्री १२ पर्यंत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीचे उरलेले दोन दिवस दांडिया खेळण्यासाठी बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असल्याने तरूणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. शहर व उपनगरांमध्ये दोन दिवस गरबा-दांडिया चांगलाच रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

नवरात्रीमध्ये गल्लीबोळातच नव्हे तर शाळा, महाविद्यालयांच्या मैदानावर, खुल्या मैदानावर तसेच कित्येक सोसायट्यांमध्ये गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. युवक-युवतींचा यात मोठा सहभाग दिसून येत असून. काही ठिकाणी तर रास-दांडियाला प्रचंड व्यावसायिक रूप आले आहे. तेथे खेळण्यासाठी आणि बघण्यासाठी तिकिटेही आकारण्यात येत आहेत. महागाईचा उत्सवाच्या उत्साहावर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. देवीच्या स्थापनेसह विविध उपक्रम, स्पर्धासाठी चांगली बक्षिसे आणि नैवेद्यांची व्यवस्था मंडळांकडून करण्यात आलेली आहे. नवरात्रोत्सवात मोठी गर्दी एकाच ठिकाणी जमते व समाजकंटक अशा ठिकाणी वातावरण दूषित करण्यासाठी सक्रिय होत असल्याने पोलिस रोजच मोठा फौजफाटा घेऊन फिरत आहेत. नवरात्रीचे सात दिवस केवळ दहा वाजेपर्यंतच दांडिया खेळण्याची संधी मिळालेल्या तरूण-तरूणींसाठी रात्री बारा वाजेपर्यंत खेळण्याची पर्वणीच जणु खुली होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'दारणा'तून पाणी देणार नाही!

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातील पाणी मराठवाड्याला सोडण्याच्या कारणावरून इगतपुरी तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. इगतपुरी तालुका मनसेनेही पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन प्रशासनाच्या निर्णयाला हरकत घेतली. तालुक्यातील सिंचन प्रकल्प अपूर्ण ठेऊन प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून शासन, प्रशासनाला पाणी पळविण्याची घाई झाली आहे. इगतपुरी तालुक्यासाठी धरणातील साठवण क्षमतेपैकी २५ टक्के पाणी आरक्षण करावे, तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याखेरीज कोणत्याही धरणातून पाणी बाहेर जाणार नाही, असा इशारा तालुका मनसेने दिला आहे.

इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका असला तरी, धरणातील पाण्याच्या पळवापळवीचे राजकारण सुरू आहे. याबाबत तालुका मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. इगतपुरी तालुक्यात पाण्याच्या व दुष्काळाच्या बाबतीत मनसेने केलेल्या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच, मनसेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उच्च न्यायालयात पाणी आरक्षणाबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचे ठरविण्यात आले.

इगतपुरी तालुक्यात धरणांची कामे अपूर्ण ठेवत भाम धरणाचे काम निधीअभावी ठप्प आहे. तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन अपूर्ण आहे. धरणग्रस्तांचे आर्थिक मोबदले मिळाले नाहीत. वैतरणा धरणातील अतिरिक्त जमिनी मूळमालकांना परत मिळाल्या नाहीत. असे असताना शासनाने याकडे दुर्लक्ष करून फक्त तालुक्यातील धरणांतील पाणी पळविण्याची घाई का? शासन प्रशासनाने मनसेने केलेल्या मागण्यांची दखल घेतल्याशिवाय धरणातील पाणी जिल्ह्याबाहेर नेण्याचा विचारही करू नये. - अॅड. रतनकुमार इचम, मनसे उपजिल्हाप्रमुख

इगतपुरी तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले. आता याच तालुक्यातील धरणातील पाण्याचे नियोजन न करता मराठवाड्याला पाणी पळविण्याचे प्रयत्न होत आहेत. ही खेदाची बाब असून, यापुढे मनसे हा अन्याय सहन करणार नाही. याविरोधात जनआंदोलन करू. - भगिरथ मराडे, मनसे तालुकाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आप्तांचाच ८६ टक्के हत्यांमध्ये हात

0
0


अरविंद जाधव । नाशिक

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा खुनाच्या घटनांचा आलेख खूपच उंचावला. मोहित बाविस्कर या १७ वर्षीय विद्यार्थ्यांच्या अपहरण आणि खुनाच्या घटनेनंतर सर्वसामान्यांच्या अंगावर शहारे आले. खुनाच्या बहुतांश घटनांमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रांचा हात असल्याचे आजवरच्या पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. जुन्या भांडणाची कुरापत, हे दुसरे कारण सुध्दा अनेकांचे जीवन संपवून गेले.

नाशिक शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत खुनाच्या ३८ घटना घडल्या. या घटनांचे विश्लेषण केले असता तब्बल ३३ गुन्ह्यांमध्ये मृतकाचे नातेवाईक आणि मित्र मंडळींचा हात असल्याचे समोर येते. पत्नीच्या चारित्र्याचा संशय, व्यसनाधिनता, हुंड्याची मागणी, जमिनीचा वाद आदी कारणांमध्ये नातेवाईकांनी संबंधित व्यक्तींची हत्या केल्याचे ११ गुन्हे शहर पोलिसांकडे दाखल आहेत. यानंतर, जुन्या भांडणाची कुरापत काढून आपल्याच मित्राची हत्या करण्याची मानसिकता युवकांमध्ये आढळून येते आहे. कॉलेज, कट्ट्यांवर किंवा सोसायटींमध्ये झालेल्या किरकोळ वादातून टोळक्यांनी हल्ला करीत एखाद्याचा जीव घेण्याच्या तब्बल १० घटना गत ९ महिन्यांत घडल्या. आर्थिक कारणातून पाच व्यक्तींना आपल्या प्राणास मुकावे लागले. अनैतिक संबंधामुळे दोन, तर महिला किंवा मुलीच्या छेडछाडीच्या रागातून ३ जणांना गुन्हेगारांनी संपविले. या व्यतिरिक्त झालेल्या ७ घटनांपैकी २ गुन्ह्यातील कारणे अद्याप अस्पष्ट असून, उर्वरित पाच घटनांतील

आरोपी आणि मयत यांचा थेट संबंध नव्हता. किटकॅट चौकात ३१ मे २०१५ रोजी ४ रेकॉर्डवरील आरोपींनी मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरूणाची सिनेस्टाईल हत्या केली होती. यात मयत आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. तर, सोबत असलेल्या महिलेची छेड काढली म्हणून सिडको परिसरातील युवकाने ठक्कर बाजार बस स्टॅण्डवरच एका अनोळखी युवकाची हत्या केली होती.

खुनाचे कारणे व कंसात टक्केवारी

नातेवाईकांकडून झालेले खून ११ (२८)

भांडणाची कुरापत १० (२६)

आर्थिक कारण ५ (१३.२५)

अनैतिक संबंध २ (५.२६)

छेडछाड ३ (७.८९)

इतर ५ (१३.१५)

समजून न आलेले २ (५.२६)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती, आघाडीची पाणीप्रश्नी बेफिकीरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सध्या पाणीप्रश्नी गांभीर्य दाखविणारेच पाण्याचे राजकारण करीत असून, राजकीय लाभ उठवण्याचा खटाटोप करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्यातील भीषण पाणीप्रश्नाकडे कोणीच गांभीर्यतेने पाहत नसून, आघाडी आणि युतीला या प्रश्नाचे गांभीर्य कळलेच नसल्याचा घरचा आहेर त्यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीला दिला.

नर्मदा प्रोजेक्टचा आदर्श घेऊन जायकवाडीचा पाणीप्रश्न सोडविता येणे शक्य असल्याचे सांगत सर्व घटकांना एक‌त्रित बसवून या प्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकतो. परंतु, आघाडीप्रमाणेच या सध्याच्या सरकारची धोरणेही चुकीच्याच दिशेने जात असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी जायकवाडीच्या पाणीप्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना भाजपवर प्रखर टीका केली. आघाडी सरकारच्या काळातही हा पाणीप्रश्न गांभीर्याने घेत सोडवता आला नाही, असे ते म्हणाले.

सध्या जे आंदोलन केले जात आहे, ते ही राजकीय लाभ उठवण्यासाठीच केले जात आहेत. मूळ विषय बाजूला ठेवून त्याचे राजकारणच अधिक केले जात आहे. जायकवाडी धरण हे गाळाने भरले आहे. त्यात २६ टीएमसी हे डेडवाटर आहे. पंरतु, केवळ राजकारण करून वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा अट्टहास केला जात आहे. गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळवडे या धरणांची पाणीक्षमता जेवढी आहे तेवढी जायकवाडीच्या डेडवॉटरची क्षमता आहे. धरण पूर्ण गाळाने भरले असून, कालव्यामध्येही गळती आहे. त्यामुळे पाणी सोडावयाचे झाल्यास ड्रीलिंग करून ते जायकवाडीपर्यंत जाऊ द्या, असे त्यांनी नमूद केले.

दुष्काळाची दाहकता वाढल्याने आता पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सर्व घटकांना एकत्रित बसवून या पाणीप्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकतो. हा प्रश्न आम्हालाही सोडविता आला असता. मात्र, तो सोडवला गेला नाही. आताचे सरकारचेही तसेच आहे. राजकारण अधिक केले जात असल्याची खंत त्यानी व्यक्त केली.

मंत्रीपद जाण्याची भीती

जलसंपत्ती नियमन कायद्यात पाण्याचा प्राधान्यक्रम हा पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योग असा करण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या सरकारने उद्योगाच्या पाण्याला हात लावण्याची हिंमत केली नसल्याची टीका केली. आपले मंत्रीपद जाण्याची भीती या खात्यातील मंत्र्यांना वाटते. त्यामुळे शेतक-यांच्या पाण्याला प्रथम हात लावला जातो. आम्हीही हेच केले. आता युती सरकारही तसेच करीत असल्याने प्राधान्यक्रम कायद्याचे गांभीर्य राहिले नसल्याची टीका त्यांनी केली.

शिवसेनेचे भांडण वाटपासाठी

राज्यात सध्या शिवसेना ही सत्तेसाठी आणि सत्तेतील वाटा मिळवण्यासाठीच भांडत असल्याची टीका पाटील यांनी केली. शिवसेनेने आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे. त्यांना पाकिस्तानचेच वावडे होते, तर शरीफ यांच्या उपस्थितीत घेतलेल्या केंद्रीय मंत्र्यानी प्रथम राजीनामे द्यायला हवेत. परंतु, सध्या नैराश्यातून ते आपले बेगडी देशप्रेम दाखवत आहेत, अशी सडकून टीका विखे पाटील यांनी केली.

सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही

राज्यात महागाईने कळस गाठला असून, साठेबाजांवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. सरकारचीच धोरणे चुकीचे आहेत. सरकारची नियंत्रण करण्याची इच्छाशक्तीही संपली आहे. सर्वसामान्य माणूस महागाईने वैतागला आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. हे सरकार आपला उर्वरीत कार्यकाळ पूर्ण करेल, असे वाटत नसल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नाशिककरांची एकजूट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही केवळ बियरच्या कारखान्यासाठी आणि ऊसाच्या शेतीसाठी नाशिकमधून पाणी सोडण्याचा अट्टहास केला जात आहे. त्यामुळे नाशिकमधून जायकवाडीसाठी एक थेंबही पाणी न देण्याचा निर्धार मंगळवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाविरोधात जनआंदोलन करण्यासह उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नाशिक शहरातील पाणीप्रश्नाचा गंभीर विषय असताना भाजपने या बैठकीकडे पाठ फिरवली.

मराठवाड्याला नाशिकच्या गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडले जाणार असून, त्याला आता तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वपक्षीय मोट बांधण्याचा निर्णय घेत मंगळवारी महापालिकेत शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमहापौर गुरुमीत बग्गा, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, शिवसेनेचे अजय बोरस्ते, राष्ट्रवादीच्या कविता कर्डक, माकपचे तानाजी जायभावे, मनसेचे सलिम शेख, आरपीआयचे प्रकाश लोंढे, जलतज्ञ राजेंद्र जाधव, लक्ष्मण जायभावे, अंबादास खैरे उपस्थित होते.

भाजपची पाठ

नाशिक शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली असताना या बैठकीकडे भाजपने पाठ फिरवली. शहराध्यक्ष व गटनेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. ज्या शहराने भाजपला तीन आमदार व नगरसेवक दिले, त्याच भाजपच्या नेत्यांनी नाशिककरांच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष आश्चर्यचकीत होते. भाजप सरकारने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला विरोध कसा करायचा अशा संभ्रमात नेते पडले होते. त्यामुळे या नेत्यांनी बैठकीपासूनच लांब राहणेच पंसत केल्याची चर्चा होती.

दारणातून पाणी सोडा

पिण्यासाठी पाणी सोडण्यास विरोध नसल्याचे सांगून माकपच्या तानाजी जायभावे यांनी गंगापूरऐवजी दारणातील शेतीचे अतिरिक्त पाणी जायकवाडीत सोडा, अशी मागणी केली. पावसाळा लांबल्यास पाणीप्रश्न बिकट होऊ शकतो. त्यामुळे गंगापूरच्या पाण्याला हात लावू नये. गंगापूरचे सोडले जाणारे पाणी दारणातून उचलल्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सेंट्रल गोदावरीचा पाणी सोडण्यास विरोध

गंगापूर गोवर्धन येथील २७ गावांच्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेच्या सभासद शेतकरी बांधवांनी देखील मराठवाड्याला पाणी देण्याबाबत विरोध केला आहे. पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी सेंट्रल गोदावरीचे अध्यक्ष व नगरसेवक दिनकर पाटील यांना बरोबर घेत निवासी उपजिल्हाधिकारी रमेश खेडकर यांना निवेदन दिले. नाशिक जिल्हातील शेतकऱ्यांना पाणी असूून देखील दुष्काळ सहन करावा लागतो. यासाठी शासनाने नाशिकचे पाणी कुणालाच देऊ नये. तसेच भविष्यातील पाण्याची गरज ओळखता नदी जोड प्रकल्प राबविण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार देविदास पिंगळे, सेंट्रल गोदावरीचे उपाध्यक्ष हिरामण बेंडकोळी, मधुकर खांडबहाले, पुंजाराम थेटे, तानाजी पिंगळे, अनिल काकड, संदीप पाटील यांसह शेतकरी उपस्थित होते.

बियरच्या कारखान्यासाठी पाणी सोडले जात आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. महापौरांच्या नेतृत्वाखाली यासाठी जनआंदोलन उभे करणार असून, न्यायालयातही जाणार आहोत. आता नाशिककर म्हणून आम्ही या निर्णयाकडे बघणार असून, प्रंसगी रस्त्यावरची तीव्र लढाई आम्ही लढणार आहोत. - अजय बोरस्ते, शिवसेना महानगरप्रमुख

पाणी सोडण्याचा आताच निर्णय घेण्याची गरज नव्हती. पिण्याच्या पाण्याला विरोध नाही. मात्र, धरणात पुरेसा साठा असूनही तेथील शेतीसाठी हे पाणी सोडले जात आहे. येथील फळबागा नष्ट केल्यास आत्महत्या वाढतील. त्यामुळे हा निर्णय राजकीय असून, तांत्रिक अभ्यास न करता घेतलेला आहे. पाण्याची गरज असेल तर रेल्वेने पाणी घेऊन जावे. - गुरुमीत बग्गा, उपमहापौर

सर्वपक्षीय बैठकीची कल्पना आपल्याला ऐनवेळी मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्याला येता आले नाही. पाण्याचा विषय गंभीर आहे. त्यामुळे या विषयावर राजकारण व्हायला नको. विचारविनियम होऊन या विषयावर चर्चा करायला हवी. - लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भाजप

गंगापूरमध्ये पिण्याचे पाण्याचे आरक्षण आहे तर दारणात शेतीचे आहे. त्यामुळे दारणातून जास्त पाणी घ्यावे, मात्र गंगापूरच्या पाण्याला हात लावू नये. हा पाण्याचा अट्टहास कोणासाठी चालला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाऊ. - शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळा पाणीपुरवठा योजनेत घोटाळा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान व सिंहस्थ कुंभमेळा पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये मिळाले. मात्र, या निधीचा योग्य विनियोग न केल्यानेच शहरात आज पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे संस्थापक देवांग जानी यांनी केला आहे. पाणीपुरवठा योजनांचे दीडशे कोटी मुरलेत कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शहरात तीव्र पाणींटचाई सुरू असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त आहेत. समितीच्या वतीने मंगळवारी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांची जनतेच्या पाणीप्रश्नांसाठी वेळ मागितली होती. परंतु, पूर्व कल्पना देऊन सुद्धा न थांबता ऑफिसमधून निघून गेले. फोनही उचलला नाही. त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सोबतच उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन सोनवणे यांनी जानी यांना दिले. या प्रसंगी देवांग जानी, दिगंबर धुमाळ, उमापती ओझा, भूषण काळे, नंदू पवार, देवांश जोशी, विजय पवार, मधुकर भोपळे आदी गोदाप्रेमी समिती सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यातला घोडाबाजार

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

हौसेला मोल नसते असे नेहमीच म्हटले जाते. देखणा अन् तगडा ऐटबाज घोडा असावा असं वाटणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. येवला येथे घोडे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सहा हजारापासून दीड लाखापर्यंत घोड्यांना किमत मिळाली. दसऱ्यापूर्वी भरलेला हा बाजार लक्षवेधी ठरला.

महाराष्ट्रात विविध ठिकाणचे घोडा बाजार आजही आपली विशेषतः जपून आहेत. सारंगखेडा येथील प्रसिध्द घोडेबाजार वर्षभरातून एकदाच भरतो तो दत्त जयंती निमित्त. शिरपूर येथील घोडे बाजार दांडी पौर्णिमेला तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा घोडे बाजार कार्तिकी एकादशीला. या सर्व ठिकाणच्या घोडा बाजाराला कालमर्यादा आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मंगळवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भरणारा घोडे बाजार हा वर्षभर अगदी अव्याहतपणे चालत असतो, ही मोठी खासियत.

यंदाच्या दसरा सणाच्या अगोदर मंगळवारी भरलेला येथील घोडाबाजार सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरला. एरवी आठवडे बाजारात जवळपास १०० च्या आसपास घोडे दाखल होत असतात. मात्र, यंदाच्या दसऱ्याच्या अगोदरच्या खास घोडा बाजारात ४५० च्या वर घोडे दाखल झाले होते. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत बाजार समितीचे आवार अगदी फुलून गेले होते. पंजाब, मारवाड, शिरपूर, काठेवाड, सिंधी, गावरान आदी जातींचे व देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलक, मुकरा अशा अनेक गुणांचे घोडे या मंगळवारच्या घोडा बाजारात दाखल झाले होते.

घोडे खरेदी-विक्री व्यवसायात आज आमची पाचवी पिढी कार्यरत आहे. आमचे पूर्वज म्हसू वाघ, पिराजी वाघ हे त्यांच्या काळात हा व्यवसाय करायचे. दर मंगळवारी भरणारा व वर्षभर चालणारा येवल्यातील घोडे बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. आजच्या मंगळवारच्या विशेष बाजारात अनेक जातींचे घोडे अगदी मोठ्या संख्येने दाखल होताना त्याची अनेकांनी खरेदी-विक्री केली. - पोपट वाघ, घोडे व्यापारी, पिंपळगाव जलाल

दीड लाखापर्यंत किमत

येवल्यातील मंगळवारच्या या घोडे बाजारात १० हजारांपासून चार लाखांच्या आसपास किमतीचे अनेक घोडे आले होते. या बाजारात झालेल्या सौदेबाजीत सर्वाधिक १ लाख ३४ हजार किमतीचा घोडा खरेदी केला गेला. एकूण ६० घोड्यांची खरेदी-विक्री झाली. येवला बाजार समितीत २ ते ३ लाख रुपये किमतीचे तगडे ऐटबाज घोड्यांची देखील आजपावेतो खरेदी विक्री झालेली आहे. प्रसिद्ध सिने अभिनेता निर्माता महेश मांजरेकर यांना देखील येथील घोडे बाजाराचा मोह आवरता आला नव्हता. वर्षांपूर्वी त्यांनी येवला घोडा बाजाराला भेट देत ऐटबाज घोडा खरेदी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कादवा'चा बॉयलर आज पेटणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आज (२२ ऑक्टोबर) सकाळी ८ ते ११ यावेळेत कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.

बॉयलर पूजनाचा कार्यक्रम ऊस उत्पादक सभासद कैलास देशमुख व माणिकराव यशवंतराव गायकवाड यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. गळीत हंगामासाठी कादवाने कार्यक्षेत्रात २५५८ हेक्टर व गेटकेन १९८३ हेक्टर असे एकूण ४५४१ हेक्टर ऊसाची नोंद केली आहे. यापासून अंदाजे तीन लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध

होईल. त्यादृष्टीने कारखान्याने शेतकी विभागामार्फत पुरेशा प्रमाणात कार्यक्षम ऊसतोडणी लेबरची भरती करीत अॅडव्हान्‍स वाटप केला आहे. ऊस वाहतुकीसाठी आवश्यक प्रमाणात ट्रक व ट्रॅक्टरचे करार केले आहेत. त्यामुळे ऊसतोडणी व वाहतुकीची कोणतीही समस्या उद्भवणार नाही. दैनंदिन गाळपात सातत्य राहावे यासाठी इंजिनीअरिंग व उत्पादन विभागातील मशिनरी देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ऊस गाळपात कोणताही खंड न पडता दररोज १७०० ते १८०० मे. टन ऊस गाळप सुलभरित्या होईल. बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमास सभासद, ऊस उत्पादकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले आहे. यंदा जिल्ह्यात सर्वप्रथम कादवा कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक, नगरला वाऱ्यावर सोडू नका’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा आणि ग्रामीण भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी पालखेड धरणातून वितरिकेद्वारे एक रोटेशन द्यावे. नाशिक जिल्ह्यातील धरणाचे पाणी मराठवाड्याला देऊ नये, दुष्काळाच्या नावाखाली नगर, नाशिकच्या लोकांना वाऱ्यावर सोडू नये, अन्यथा या जिल्ह्यात आंदोलनाचा आगडोंब शासनालाही थांबविता येणार नाही, असा इशारा येवला तालुका शेतकरी संघटना व बळीराज्य पाणी वापर सहकारी संस्थांचा संघ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

पाऊस कमी झाला की शेतीला पाणी देणे बंद हा एकमेव पर्याय राबवतांना प्रशासन शेतकऱ्यांवर कायम अन्याय करते. पाणीटंचाईच्या काळात शेतीचे पाणी बंद केल्यास शेतकरी मेटाकुटीस येईल. धनधान्याचे उत्पादन घटेल. आज डाळींचे भाव जसे गगनाला भिडले तसे धान्याचा तुटवडा होऊन धान्याचे भावही गगनाला भिडतील. गरिबांवर उपासमारीची वेळ येईल. या सर्व बाबींचा प्रशासन आणि शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. मोठ्या शहरातील जनतेला दरडोई पाणी कपात करून सांडपाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल, याचा विचार महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात करण्यात यावा, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

करंजवण २१६५ दलघफू, पालखेड ७०४ दलघफू व वाघाड ४० टक्के प्रमाणे मिळणारे पाणी ६११ दलघफू उपलब्ध आहे. म्हणजे एकूण ३४८० दलघफू पालखेड समूहामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. या निवेदनावर बळीराज्य पाणी वापर सह. संस्थाचा संघाचे चेअरमन तथा शेतकरी संघटनेचे नेते संतू. पा. झांबरे, व्हा. चेअरमन सुरेश कदम, शेतकरी संघटनेचे संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अरुण जाधव, अनिस पटेल, बाळासाहेब गायकवाड, सुरेश जेजुरकर, शिवाजी वाघ, जाफरभाई पठाण, कांतीलाल जगझाप, वसंतराव खैरनार, बाजीराव सोनवणे, मल्हारी दराडे, सुभाष गायकवाड, वसंत वाल्हेकर, भाऊसाहेब पिंगळे, भागवत खराटे, ज्ञानेश्वर मढवई आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वॉर्डात सरळ लढती

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी सुमारे ६१ उमेदवार रिंगणात आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एकूण पाच वॉर्डामध्ये सरळ लढती होत असून, यात चार वॉर्ड प्रामुख्याने महिलांचे आहेत. एक वॉर्ड पुरुषांचा असल्याने या लढतीकडे संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर हे आपल्या पत्नीसह निवडणूक रिंगणात असून, दोघांसमोर सरळ लढतींचे आव्हान आहे.

देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीतील माघारीनंतरचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. सतरा जागांसाठी सुमारे ६१ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. या निवडणुकीत पक्षविरहित निवडणुका होत असून, सर्वच उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वॉर्ड क्र. ५, ९, १३ व १४ या चार ठिकाणी महिला गटात सरळ लढत होत आहे. या गटात जिल्हा परिषद सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक केंदा आहेर यांच्या पत्नी धनश्री आहेर, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांच्या पत्नी अश्विनी आहेर, तर माजी आमदार शांताराम आहेर यांच्या सुनबाई अनुजा आहेर रिंगणात आहेत. अश्विनी आहेर या महिला व सर्वसाधारण या दोघा गटातून आपले नशिब अजमावत आहेत. वॉर्ड क्र. ११ मधून पुरूष सर्वसाधारण गटात उदय आहेर व माजी पंचायत समिती सभापती अशोक आहेर यांच्यातही सरळ सामना होत आहे.

वॉर्डनिहाय उमेदवार व कंसात त्यांची निशाणी

वॉर्ड क्र. १. सर्वधारण गट : गणेश विठ्ठल आहेर (नारळ), बापू धोंडू आहेर (कपबशी), बाळू तुळशिराम आहेर (रोडरोलर), राजेश महारू आहेर (छताचा पंखा), संजय धोंडू आहेर (गॅस सिलेंडर).

वॉर्ड क्र. २. नागरिकांचा मागास प्रवर्ग : गीता अभिमन आहेर (गॅस सिलेंडर), निर्मला अरुण आहेर (कपबशी), ललिता सुनील भामरे (नारळ).

वॉर्ड क्र. ३. सर्वसाधारण महिला : चित्रा दीपक आहेर (हात), शिला दिलीप आहेर (कपबशी), सरला भाऊसाहेब आहेर (रोडरोलर).

वॉर्ड क्र. ४. सर्वसाधारण : उमेश विजय आहेर (नारळ), जितेंद्र रमण आहेर (हात), रजत दिलीप आहेर (कपबशी).

वॉर्ड क्र. ५. सर्वसाधारण महिला : दिप्ती धनंजय आहेर (कपबशी), सिंधू कारभारी आहेर (नारळ).

वॉर्ड क्र. ६. नागरिकांचा मागास प्रवर्ग : चिंतामण दादाजी आहेर (कपबशी), प्रदीप तुकाराम आहेर (पतंग), पंकज विश्राम निकम (नारळ), तुषार कडू शिंदे (रोडरोलर).

वॉर्ड क्र. ७. अनुसुचित जमाती महिला : सरला भिला गांगुर्डे (कपबशी), संगीता वसंत गांगुर्डे (रोडरोलर), बेबी राघो नवरे (हात).

वॉर्ड क्र. ८. अनुसूचित जाती : अलिटकर रोशन हरिभाऊ (रोडरोलर), अशोक सहादू गुजरे (कपाट), भावराव दशरथ गुजरे (हात), कैलास जिभाऊ पवार (गॅस सिलेंडर), दिलीप बाबुराव पवार (नारळ), सुधाकर पांडूरंग पवार (कपबशी).

वॉर्ड क्र. ९. नागरिकांचा मागास प्रवर्ग : भारती अशोक आहेर (कपबशी), सुनंदा दिनकर आहेर (गॅस सिलेंडर).

वॉर्ड क्र. १०. अनुसुचित जाती महिला : मनीषा गुजरे (कपबशी), यशोमती शांताराम गुजरे (पतंग), अर्चना गोरख पवार (हत्ती), कलाबाई बाळू पवार (रोडरोलर), पद्मा अशोक पवार (हात), शीतल राजेंद्र वाघ (नारळ).

वॉर्ड क्र. ११. सर्वसाधारण : अशोक देवराम आहेर (कपबशी), उदयकुमार निंबाजी आहेर (गॅस सिलेंडर).

वॉर्ड क्र. १२. सर्वसाधारण : पवन अंबादास अहिरराव (कपबशी), राजेंद्र विश्वनाथ आहिरराव (नारळ), अश्विनी उदयकुमार आहेर (गॅस सिलेंडर), अतुल अशोक पवार (रोडरोलर).

वॉर्ड क्र. १३. सर्वसाधारण महिला : अनुजा योगेश आहेर (कपबशी), वत्सला परशराम आहेर (रोडरोलर).

वॉर्ड क्र. १४. सर्वसाधारण महिला : अश्विनी उदयकुमार आहेर (गॅस सिलेंडर), धनश्री केदा आहेर (कपबशी).

वॉर्ड क्र. १५. नागरिकांचा मागास प्रवर्ग : किशोर साहेबराव आहेर (रोडरोलर), गोविंद विठ्ठल आहेर (कपबशी), लक्ष्मीकांत शांताराम आहेर (नारळ), सुभाष वामन आहेर (पतंग).

वॉर्ड क्र. १६. नागरिकांचा मागास प्रवर्ग : मंगला दिलीप आहेर (रोडरोलर), मंगला भाऊसाहेब आहेर (कपबशी), वृषाली दीपक आहेर (नारळ), शोभा आहेर (हात), वनिता शिंदे (पतंग).

वॉर्ड क्र. १७. अनुसूचित जमाती : बापू जिभाऊ जाधव (हात), केदा धोंडीराम वाघ (रोडरोलर), प्रशांत पुंडलिक वाघ (कपबशी), प्रशांत पंडित वाघ (पतंग), सुभाष भास्कर वाघ (शिटी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये स्वबळामुळे चुरस

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येत्या १ नोव्हेंबर रोजी चांदवड नगरपंचायतीची निवडणूक होत असून, प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीत १७ प्रभागांसाठी ११६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी वेगळी चुल मांडत निवडणूक आखाड्यात उडी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, माकप या प्रमुख पक्षांसह अपक्षांनी ही निवडणुकीत उडी घेतली आहे. युती ना आघाडी त्यात अपक्षांची गर्दी यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

आमदार राहुल आहेर आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यातील राजकीय संघर्ष या निवडणुकीत पहायला मिळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सर्वात जास्त उमेदवार प्रभाग १२ मध्ये असून, त्यांची संख्या ही १२ आहे. उमेदवारांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. नगरपंचायत निवडणूक प्रथमच होत असल्याने मतदारांमध्येही औत्सुक्य दिसून येत आहे. कोणता पक्ष सत्ता संपादन करून दिवाळी आधीच फटाके फोडतो याचे उत्तर २ नोव्हेंबरला मिळणार आहे. दरम्यान, ४५ उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून, १७ प्रभागात ११६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील एन्ट्रीमुळे चांदवडची निवडणूक अधिकच धमाकेदार होण्याची चिन्हे आहेत. बाजार समितीवरील वर्चस्व गमावल्यानंतर माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासाठी नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासाठीही आपले वर्चस्व टिकविण्याचे आवाहन आहे. स्वबळामुळे भाजपची ताकद पणाला लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी पवार बिनविरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी भरत पवार तर, उपसभापतिपदी अॅड. यशवंत मानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धर्मराज पवार व अनिता अहिरे यांनी आवर्तन पध्दतीनुसार राजीनाम दिल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

बुधवारी (दि. २१) येथे सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेता शिवसनेचे वर्चस्व राहिले होते. या बैठकीत देखील शिवसेनेच्या भरत पवार यांची सभापतिपदी तर, अॅड. यशवंत मानकर यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली.

पंचायत समितीत मागील पंचवार्षिक निवडणुकीत राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ७, अद्वय हिरे यांच्या नेतृत्वात भाजपचे ६ तर निमागावच्या अनिता अहिरे या एकमेव अपक्ष निवडनू आल्या होत्या. त्यामुळे १४ सदस्यीय असलेल्या पंचायत समितीत लागणारे आठ हे संख्याबळ पूर्ण करण्यासाठी दोघांनाही अपक्ष अनिता यांच्याच पाठबळाची गरज होती. त्यांनी आपले बहुमोल मत सेनेच्या पारड्यात टाकल्याने गेल्या पावणेचार वर्षांपासून पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. पहिल्या अडीच वर्षात वंदना पवार सभापती तर अनिता अहिरे या उपसभापतिपदी होत्या. त्यानंतर गेले वर्षभर सेनेचे धर्मराज पवार यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. तर, अहिरे यांच्या पाठिंब्याने सेनेची सत्ता कायम राहिल्याने त्यांना पुन्हा एक वर्ष उपसभापतिपदाची संधी मिळाली होती. मात्र, नुकताच या दोघांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सभापतीपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.

सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने दावेदारांची संख्या वाढली होती. सेनेचे मानकर व पवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, राज्यमंत्री दादा भुसे यांचा निर्णय अंतिम असल्याने सभापती कोण होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभागृहात सेनेचे सात तर, अपक्ष सदस्य अनिता अहिरे असे एकूण आठ सदस्य हजर होते. सभापतिपदासाठी सेनेकडून भरत पवार यांचे तर, उपसभापतिपदासाठी अॅड. यशवंत मानकर यांचे नाव पुढे आले. त्याला उपस्थित सदस्यांनी पाठिंबा दिल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीडब्रेकरसाठी अभियंत्यास घेराव

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर दोन दिवसापूर्वी कॉलेज तरुणी व एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर येथील सर्व संघटना, आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यास घेराव घालत तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केली. गतिरोधक न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सिन्नर कॉलेजची विद्यार्थिनी दीपाली बोराडे व कामगार जोधू अहमद या दोघांचा ट्रकच्या घडकेने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सोमंवशी हे सिन्नर येथे शासकीय विश्रामगृहावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना या रस्त्यावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली. ही मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, शिवसेनेचे युवा सेना तालुकाध्यक्ष सागर वारुंगसे, शहर प्रमुख राहुल बलक यांनी घेतली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर येत्या दोन दिवसात या ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्याचे आश्वासन महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सोमंवशी यांनी दिले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी कारवाई न झाल्यास मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, मनसेचे नेते शरद शिंदे यांनी रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, पिराजी पवार, संजय कोतवाल, कृष्णा कासार, विशाल चांडोले, लोकेश धनगर, किशोर बोराडे, राष्ट्रवादीचे नामदेव कोतवाल, दत्ता गोळेसर, डॉ. संदीप लोंढे, राजेंद्र बलक, दत्ता जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पाच ठिकाणी मागणी

आमदार राजाभाऊ वाजे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी सूचनापत्र देऊन शहरातील सिन्नर कॉलेज, भिकुसा विद्यालय, बसस्थानक, मारुती मंदिर, संगमनेर नाका या ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्याच्या सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मदन पाटील यांच्या अस्थींचे विसर्जन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सांगली कुपवाड महापालिकेच्या राजकारणावर गेली तीस वर्ष पकड ठेवणारे माजी मंत्री मदन विश्वनाथ पाटील यांच्या अस्थींचे बुधवारी रामकुंडावर विसर्जन करण्यात आले. त्यांचे व्याही संजय बापू होळकर व वैशाली होळकर यांनी त्यांच्या अस्थींचे विधीवत पूजन करून विसर्जन केले.

मदन पाटील यांच्यावर कोकीळाबेन अंबानी रुग्णालयात ७ ऑक्टोबर रोजी यकृत बदलाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रकृतीत चढउतार झाली आणि १६ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर कृष्णाकाठी वसंतदादांच्या स्मारक परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई पत्नी, लिलाबाई, विवाहीत कन्या सोनिया होळकर पाटील व मोनिका असा परिवार आहे. ते वसंतदादा पाटील यांचे नातू होते. त्यांनी नगराध्यक्ष, आमदार, खासदार, आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री अशा विविध पदावर जबाबदाऱ्या पार पाडल्या. रामकुंडावर संजय बापू होळकर, वैशाली होळकर, मुकुंद होळकर, जगदीश होळकर, भंडारी सर, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, योगिता आहेर, हेमलता पाटील, सुनील आव्हाड, उध्दव पवार, गुणवंत होळकर, वंदना मनचंदा, महेश बाफना आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट यार्डचा रस्ता रुंद करा!

0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडीने वाहनचालक तसेच या भागातील नागरिक बेजार झाले आहेत. मार्केट यॉर्डचे एका बाजूचे गेट बंद करण्यात आल्याने सगळ्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. काहीही करा पण इथली कोंडी फोडा, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील वाहतूकीचा प्रश्न जटील होत असून, त्यामुळे त्रस्त नागरिकही आता सुधारणांसाठी व्यक्त होऊ लागले आहेत. वाहतूक समस्येचे निराकरण हा खरेतर स्वयंशिस्तीशी निगडीत विषय असला तरी पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावण्याचे ठरविल्यास वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. शहरातील काही भागांमध्ये भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्या आणि त्यावर आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती सजग नागरिकांनी महाराष्ट्र टाइम्सला कळविली आहे. त्यातील एका वाचकाने पंचवटीतील मार्केट यार्डातील समस्या मांडली अन् त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत.

दिंडोरी नाका ते चित्रकूट सोसायटीपर्यंत मार्केट यार्ड असल्याने दररोज सकाळपासून रात्री दहापर्यंत मार्केट यार्डाच्या बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी होते. मार्केट यार्डात जाणारे भाजीपाल्याचे ट्रक, टेम्पो, पिकअप ही वाहने दिंडोरी नाक्याकडून जातात; तो रस्ता अरुंद आहेच शिवाय रस्त्याच्या एका बाजूला यार्डात माल कडून आलेली वाहने उभी असतात. त्यातच ‌रिक्षा आणि टॅक्सी स्टॅन्डवरील वाहनांच्या गर्दीमुळे येथील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याच मार्गावर दुभाजकाला लागून चारपदरी रस्त्याच्या मधोमध चहा, नाश्ता, फळांच्या टपऱ्या आहेत. त्यामुळे वाहनांचा प्रवास उलट्या दिशेने सुरू असतो. मार्केट यार्डातून बाहेर पडणारी वाहनेही डाव्या बाजूने न जाता सरळ महालक्ष्मी थिएटरकडे जाऊन मेरी किंवा पंचवटीकडे वळतात. त्यामुळे मेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. हा रस्ता चारपदरी असतानाही प्रत्यक्षात दोन पदरी रस्त्याचाच उपयोग केला जातो. उर्वरित रस्ता अघोषित वाहनतळ म्हणून वापरला जातो. त्यातून वाहनधारकांमध्ये वादविवाद, कट मारणे, समोरून येणारे वाहन सरळ अंगावर येणे, लहान मोठे अपघात यांसारखे प्रकार नित्य घडतात. याच ठिकाणी दुभाजकाला लागून १० फुट रूंदीचा रस्ता तयार न करता तसाच खड्डा चित्रकूट सोसायटीपर्यंत अपूर्ण ठेवण्यात आला आहे. त्यात पाणी, घाण, भाजीपाला, कचरा, चिखल साचून रस्त्याला बकालपणा आला आहे. परिणामी रस्ता अधिक अरुंद आला आहे.

शहरातील वाहतूक समस्येवर सडेतोड मतं व्यक्त करण्यासाठी 'ट्रॅफिक इश्यू' या सदराच्या माध्यमातून महाराष्ट्र टाइम्सने वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येथे केवळ वाहतुकीच्या समस्यांचे रडगाणे अपेक्षित नाही. समस्यांवरील अभ्यासपूर्ण विश्लेषणाचे स्वागतच आहे. तुमच्या भागातील वाहतुकीची समस्या सामूहिक प्रयत्नातून सुटावी हा आमचा प्रयत्न आहे. वाहतुकीची स्थिती, त्याची कारणे, वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठीच्या उपाययोजना आणि सूचना असतील तर उचला लेखणी आणि कळवा आम्हाला. अभ्यासपूर्ण सूचना आम्ही पोहोचवू प्रशासनापर्यंत आणि घडवून आणू सकारात्मक बदल सर्वांना हवा असणारा.

समन्वयक : प्रवीण बिडवे ९८८११२०१३१

मार्केट गेट समोरचे पंक्चरचे अंतर कमी करून मेरीकडून येणाऱ्या वाहनांनाच मार्केटमध्ये प्रवेश देण्यात यावा. या उपाययोजना केल्या गेल्यास वाहतूक कोंडी होणार नाहीच परंतु त्याचबरोबर अपघातही कमी होऊ शकतील. - गणेश पाटील, दिंडोरी रोड, नाशिक

अशा कराव्यात उपाययोजना...

सर्वप्रथम या ठिकाणी पूर्णवेळ ट्रॅफिक पोलिसाची नेमणूक करणे नितांत आवश्यक आहे. मार्केट यार्डातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना या रस्त्यावर पार्कींग करण्यास मज्जाव करावा. मार्केट यार्डात प्रवेशाचा मार्ग व बाहेर पडण्याचा मार्ग वेगवेगळा असावा. त्यापैकी एक मार्ग दिंडोरी रोडवर तर दुसरा पेठरोडच्या दिशेने असल्यास अधिक उत्तम.

मार्केट यार्ड समोर असणारे हॉकर्स, टपरीधारक यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

मार्केट यार्डातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना सरळ महालक्ष्मी थिएटरकडे न जाऊ देता डाव्या बाजूनेच मेरीकडे चित्रकूट सोसायटीकडे जाऊन नंतर वळसा घेऊन पंचवटीकडे जाण्यास सक्ती करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अदखलपात्र गुन्हा होतो दखलपात्र

0
0

अरविंद जाधव । नाशिक

कॉलेज कॅम्पस, रहिवाशी भागातील कट्टा, छेडछाड किंवा वर्चस्ववाद या सारख्या किरकोळ कारणातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या हाणामारीच्या घटनांमध्ये अनेकदा पोलिस स्टेशनमध्ये तडजोड केली जाते. फारतर अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद होऊन दोन्ही पार्ट्यांना सोडले जाते. मात्र, हे अदखलपात्र गुन्हे हत्येच्या कारणांचे मूळ ठरत असून, त्याची पोलिसांना गंभीर नोंद घ्यावी लागणार आहे.

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्याच्या काळात झालेल्या ३८ हत्यांच्या घटनांमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून १० जणांचा बळी घेतला गेला आहे. यातील बहुतांश गुन्ह्यातील आरोपी आणि मयतांच्या पूर्वीच्या भांडणाबाबत पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होती, हे महत्त्वाचे. पूर्व वैमनस्यातून होणाऱ्या हत्येच्या घटनांमध्ये अटक केलेल्या आरोपींमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरूणांचा सर्वाधिक समावेश आहे. बळी गेलेल्यांमध्ये याच वयोगटातील मुलांचा संबंध आहे. यंदा एकूण हत्यांच्या घटनांपैकी सरासरी २६ टक्के हत्या पूर्वीच्या भांडणामुळे झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करणाऱ्या पोलिसांची जबाबदारी कैकपटीने वाढली आहे.

झोन दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, खुनाच्या घटनांमध्ये क्षणिक राग आणि नातेसंबंध यांचा सर्वाधिक संबंध असतो. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर, इंदिरानगर, सातपूर आणि अंबड या नाशिक परिमंडळ दोनमध्ये ३८ पैकी २० हत्या झाल्याची नोंद आहे. यातील, ७ खुनाचे प्रकार पती-पत्नीशी संबंधीत होते. ४ हत्यांच्या घटनांमध्ये नातेवाईकांना अटक झाली. तर सर्वाधीक म्हणजे ९ खून पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून करण्यात आले. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी यापुढे अदखलपात्र गुन्हा नोंदवताना विशेष काळजी घेतली जाईल, असेही उपायुक्त धिवरे यांनी स्पष्ट केले. हाणामारी किंवा दमदाटीसारख्या प्रकरणांमध्ये सीआरपीसी १५१ नुसार अटक करणे उचित ठरू शकते. तसेच, अदखलपात्र गुन्हा दाखल होणाऱ्या संशयितांची पार्श्वभूमी काय? त्याच्यावर यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत, याचा अभ्यास करूनच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय यापुढे घ्यावा लागेल. अल्पवयीन किंवा युवकांमध्ये असे प्रकार सर्वाधिक असून जनजागृतीच्या आधारे हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे, असे आवाहन उपायुक्त धिवरे यांनी केले.

यंदा खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी बहुतांश गुन्ह्यातील आरोपींना लागलीच अटक झाली. यात, नातेवाईक आणि मित्र परिवाराचा सर्वाधिक समावेश होता. पूर्वीच्या भांडणामुळे होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी काही प्रतिबंधक उपाययोजना राबवणे शक्य असून, त्यावर अंमलबजावणी केली जाईल. - श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतीपदी खैरे बिनविरोध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाआघाडीत सहभागी असूनही महिपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसला महिला काँग्रेस सभापतीपदाच्या रूपाने प्रथमच स्थान मिळाले आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरे, तर उपसभापती मनसेच्या शीतल भामरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या नंदिनी जाधव यांनी सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी,काँग्रेस व अपक्षांची महाआघाडी असली तरी, सत्तेत काँग्रेसला अद्याप वाटा मिळालेला नव्हता. अनेक वेळा काँग्रेसने यासाठी मनसे राष्ट्रवादीवर दबाव वाढवला होता. शिक्षण समितीवरच काँग्रेसने दावा केला होता. मात्र, अपक्षांनीच बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. महिला व बालकल्याण समितीवरही काँग्रेसने दावा सांगितला होता. अखेरीस मनसे व राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेत वाटा देण्याचे कबूल करीत, समितीचे सभापतीपद देवू केले. या समितीसाठी काँग्रेसने वत्सलाताई खैरे यांनी संधी दिली होती. तर उपसभापतीपद मनसेनेच आपल्याकडे ठेवले होते. मनसेच्या वतीने शीलत भामरे यांना संधी देण्यात आली होती.

बुधवारी समितीची निवडणूक पार पडली. सभापतीपदी वत्सलाताई खैरे, तर उपसभापती पदासाठी शीतल भामरे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या वतीने नंदिनी जाधव यांनी दोन्ही पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी बुधवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बागडे यांनी खैरे व भामरे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावर कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. समितीच्या ९ सदस्यांपैकी ८ सदस्यांनीच निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. आरपीआयच्या सुनील वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेपासून अंतर राखले होते.

केंद्र व राज्य सरकारच्या महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. महापालिकेच्या बजेटमधून अधिकचा निधी मिळवून महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला जाईल. सर्वांना सोबत घेऊन विकासाला आपले प्राधान्य असेल. - वत्सला खैरे, सभापती महिला व बालकल्याण, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० जणांचे सामूहिक तबलावादन

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कापड पेठेतील बालाजी मंदिरात गुरुवारी दीडशे तबला वादकांच्या सहवादनाने वातावरण चैतन्यमय झाले होते. यावेळी 'अनुभूती' हा तबला सहवादनाचा आविष्कार सादर करण्यात आला. नाशिकमध्ये ५ हजारांहून अधिक मुले-मुली हे तबल्याचे शिक्षण घेतात. त्यामध्ये नाशिकमधील विविध नामांकित तबला क्लासेसची तब्बल १५० लहान मुले आणि ३५ तरुण मुला-मुलींनी 'त्रिताल' आणि 'झपताल' यांचे सुंदर पद्धतीने वादन केले. यावेळी 'अनुभूती' च्या सह‍वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. ऋग्वेद तबला अकादमी, अदिताल तबला अकादमी, पवार तबला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने

'अनुभूती' कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. हा कार्यक्रम कापड पेठेतील बालाजी मंदिरात झाला. कार्यक्रमात तीनही अकादमीच्या १५० वादकांनी सहवादन केले, सुरुवातीला ९० लहान मुलांचे तबला वादन झाले यात त्यांनी त्रिताल सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात कायदा पल्ट्यांच्या वादनाने झाली 'धाती धाती धाधा धीना' हा कायदा वाजवून आपल्या वादनाचे कौशल्य उपस्थितांसमोर पेश केले. त्यानंतर 'धाधा तिरकीट धाधा तूना' हा कायदा पल्टा वाजवला. पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात रेले, तुकडे यांचे वादन झाले. हा कार्यक्रम २५ मिनिटे सुरु होता. त्यानंतर मोठ्या मुलांच्या तबला सहवादनाला सुरुवात झाली. मोठ्या मुलांनी झपताल सादर केला. झपतालातील पारंपरिक बंदीशी सादर करीत उपस्थितांना ताल धरायला लावला. यात पेशकार, कायदा, रेला, तुकडे, मिश्र जाती कायदा तुकडे मुखडे चक्रदार सादर केले. तबला सहवादनाचा हा नववा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची संकल्पना नितीन पवार व नितीन वारे यांची होती गिरीश पांडे, सुजीत काळे, गौरव तांबे, रसिक कुलकर्णी, दिगंबर सोनवणे, जयेश कुलकर्णी, अमित भालेराव, रुपक मैद, यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य काले. संध्याकाळी उशिरा पर्यंत सुरु असलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व रसिक उपस्थित होते.

बालाजी मंदिरात २०१३ मध्ये ५० मुलांच्या साथीने या प्रयोगाची सुरुवात झाली होती. त्यानंतर नाशिकमधील विविध मंदिरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या अनुभूती कार्यक्रमांचे सादरीकरण व्हायला लागले. आता या मध्ये मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. विशारद, अलंकार उत्तीर्ण झालेली आणि विशारद परीक्षा देत असलेली मुले सहभागी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images