Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दररोज तिघांचा अपघाती मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये दररोज सरासरी तीन जणांचा मृत्यू होत आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे हे जसे अपघातांचे कारण आहे तसेच हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर न करणे हे देखील अशा अपघाती मृत्यूंमागचे प्रमुख कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत सुमारे नऊ हजार अपघात झाले असून, त्यामध्ये दोन हजार ४६७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान ठरत असून, त्यामध्ये दरवर्षी काही लाख जणांना जीव गमवावा लागत आहे. सन २०१४ या वर्षात देशातील सर्वाधिक अपघात महाराष्ट्रात झाले. सन २०१३ मध्ये देशात १ लाख ३७ हजार व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांची संख्या १२ हजार ७०० होती. विशेष म्हणजे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ९१८ होती. शहरात ११२७ तर जिल्ह्यात २४५४ अपघात झाले. त्यामध्ये अनुक्रमे ११५ आणि ८०३ अशा एकूण ३ हजार ५८१ अपघातांमध्ये ९१८ जणांचा मृत्यू झाला. सन २०१४ मध्ये नाशिक शहरात एक हजार ७० तर, जिल्ह्यात २१९८ अपघात झाले. वर्षभरात ३२६८ अपघात झाले. शहरातील अपघातांमध्ये १७२ तर जिल्ह्यातील अपघातांमध्ये ७६० अशा एकूण ९३२ जणांनी प्राण गमावले. जिल्ह्यात यंदाही अपघातांचे सत्र सुरूच असून, शहरात मे महिन्यापर्यंत ५७७ अपघात झाले. त्यामध्ये १०७ जणांन जीव गमावला आहे. जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत १४७८ अपघात झाले असून, ५१६ जणांनी त्यामध्ये जीव गमावला.

जिल्ह्यात अडीच वर्षांत २४६७ बळी

नाशिक शहरापेक्षा जिल्ह्यात दुपटीहून अधिक अपघात होत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. शहरात गेल्या अडीच वर्षांत २७७४ अपघात झाले. त्यामध्ये ३९४ जणांनी जीव गमावला. जिल्ह्यात अडीच वर्षांत ६ हजार १३० अपघात झाले. त्यामध्ये २ हजार ७९ जणांचा मृत्यू झाला. शहर आणि जिल्ह्यात मिळून ८ हजार ९०४ अपघात झाले. त्यामध्ये २ हजार ४६७ जणांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवीच्या दारात तरी सन्मान मिळेल का?

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : वणीच्या सप्तश्रृंगी गडावर दरवर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तृतीयपंथीय देवीच्या पूजेसह धार्मिक विधीसाठी एकत्रीत येतात. मात्र तृतीयपंथीयांची कोणत्या ना कोणत्या कारणातून बदनामी केली जाते. समाजाकडून बहिष्कृत जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांना देवाच्या दारातही मानहानीला समोरे जावे लागते. असे होऊ नये म्हणून यंदा तृतीयपंथीयांच्या संघटनेने कंबर कसली आहे. आमचा वैर कोणाशीही नाही मात्र आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. देवीच्या दारात मान मिळाला नाही तर समाज कसा देईल, असा सवालही त्यांनी केला आहे.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी राज्यातून तृतीयपंथीय सप्तश्रृंग गडावर येतात. यावेळी तृतीयपंथीयांतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात जोगती, जोगतपण, आराधी, तृतीयपंथीयांतर्फे देवीचा छबिना काढण्याची प्रथा असून, रात्री बारा वाजता देवीची विशेष आरती केली जाते. ही परंपरा वर्षोवर्ष सुरू आहे. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत काही व्यक्तींकडून ओंगळवाणे प्रकार केले जातात. या प्रकारामुळे तृतीयपंथीयांची बदनामी होऊन समाजाचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिकच टोकाचा होतो. यावर पर्याय म्हणून नाशिकच्या काही तृतीयपंथीयांनी पुढाकार घेत मनोमिलन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे विशेष मोहीम उघडली आहे. राज्यातून गडावर येणाऱ्या तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती केली जात असून, त्यांना आचारसंह‌तिा ठरवून दिली आहे. यात कोणत्याही तृतीयपंथीयाने हिडीस चाळे करु नये, अंगविक्षेप करुन नाचू नये, कमी कपडे घालून फिरु नये, पैसे देताना भक्तांनी काही चाळे केल्यास त्यांच्याकडून पैसे घेऊ नये अशा सुचना दिल्या आहेत.

मनोमिलन संस्थेतर्फे विविध गट तयार केले असून, गडावरच्या प्रत्येक हॉटेलमध्ये उतरलेल्या तृतीयपंथीयांमध्ये जागृती करण्यात येत आहे. त्याच प्रमाण अंधश्रध्देला खतपाणी न घालता फक्त धार्मिक कार्यक्रम करावे, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी देखील या मोह‌मिेचे स्वागत केले आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर पोलिसही फिरत असून, त्यांनी देखील तृतीयपंथीयांची बदनामी होऊ नये, यासाठी मोह‌मिेला प्रतिसाद दिला आहे. त्याच प्रमाणे संस्थेच्या वतीने पत्रके वाटली आहेत. 'अवैध चाळे करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करावी, जे खरे तृतीयपंथीय आहेत त्यांच्याकडून नागरिकांना पैशासाठी अडवले जात नाही, कोणत्याही व्यक्तीची छळवणूक केली जात नाही. कोणत्या नागरिकांची पैशासाठी अडवणूक होत असल्यास अशांनीही गडावर मनोमिलन संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.' असे आवाहन करण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांच्या बदनामी विरोधात मनोमिलन संस्थेतर्फे गडावर विशेष मोहीम आखली आहे. त्याला तृतीयपंथीयांच्या सर्व शाखांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.

- राकेश मोरे, मनोमिलन संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातीगोती फॅक्टर तारणार की मारणार?

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा नगरपंचायतीच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असतांना प्रचार फेऱ्या, गाठीभेटींसह राजकीय खलबते, व कुटनीतींनी वेग घेतला आहे. पहिल्या वहिल्या नगरपंचायतीत आपल्या नावाचा इतिहास कोरला जावा यासाठी सर्वसिद्धहस्ते यंत्रणा उमेदवारांनी जुंपली आहे. राजकीय वारसदारांनी आपला कस पणास लावला असून, पतीपत्नीच्या लढतींकडे साऱ्या तालुक्याचे लक्ष लागून आहे.

देवळा विकास आघाडी व जनशक्तीमध्ये सत्तेचा सोपान ताब्यात घेण्यासाठी सरळ लढत होत आहे. जिल्हा बँकेचे संचालक व जि. प. सदस्य केदा आहेर, बाजार समितीचे माजी चेअरमन योगेश आहेर यांच्या देवळा विकास आघाडीला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर व माजी सरपंच जितेंद्र आहेर यांचे आवाहन आहे. अत्यंत तुल्यबळ लढतीमध्ये भाऊबंदकी हा फॅक्टर अत्यंत जीवघेणा ठरणार असून, कोण कुणाला पाठ देईल हे सांगणे कठीण झाले आहे. अपक्ष उमेदवारांचा भरणाही मोठ्या प्रमाणात असल्याने कोण कुणाची पतंग कापणार हे सांगणे अवघड झाले आहे.

देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ वॉर्डांपैकी वॉर्ड क्र. चार, अकरा व पंधरा या तीन ठिकाणी अत्यंत तुल्यबळ लढती होत आहेत. वॉर्ड क्र. चारमध्ये देवळ्याचे माजी आमदार जनूभाऊ आहेर यांचे नातू उमेश आहेर, रामराव आहेर यांचे नातू रजत आहेर, तर जनशक्ती पॅनलचे नेते व मावळत्या देवळा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेद्र आहेर या तिरंगी लढतीचे महत्त्व राजकीय पटलावर अनन्यसाधारण आहे.

देवळा विकास आघाडीकडून वॉर्ड क्र. ९ व ११ मध्ये भारती अशोक आहेर व अशोक देवराम आहेर हे पती पत्नी उमेदवारी करीत आहेत. तर जनशक्ती पॅनलमधून वॉर्क क्र. ११ मधून उदय आहेर, तर १२ व १४ मधून अश्विनी आहेर हे पती-पत्नी निवडणूक रिंगणात आहेत. मतदार कोणत्या दांपत्याला नगरपंचायतीची संधी देतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

वॉर्ड क्र. ५, ९, ११, १३, व १४ यात सरळ लढती होत आहेत. वॉर्ड ९ मधून माजी पंचायत समिती सदस्या भारती आहेर प्रतिष्ठेची लढत देत आहेत. वॉर्ड अकरामधील लढतीला काढा लढत असेच संबोधले जात आहे. पंचायत समितीचे माजी सभापती अशोक बापू आहेर व शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष व जनशक्ती पॅनलचे नेते उदयकुमार आहेर यांच्यात लढत होत आहे. वॉर्ड क्र. १४ मधून देवळा विकास आघाडीचे नेते केदा आहेर यांच्या पत्नी धनश्री आहेर यांची लढत जनशक्ती पॅनलचे नेते उदयकुमार आहेर यांच्या पत्नी अश्विनी आहेर यांच्याशी आहे. या ठिकाणी विजयी होणारी महिला उमेदवार एकतर्फी लढत देईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

वॉर्ड क्र. १५ मधून माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांचे सुपुत्र व देवळा विकास आघाडीचे नेते व बाजार समितीचे माजी चेअरमन योगेशे आहेर यांचे बंधू लक्ष्मीकांत आहेर हे आपल्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ करीत आहेत. वॉर्ड क्र. ६ मधून देखील मविप्र संस्थेचे संचालक डॉ. विश्राम निकम यांचे सुपुत्र डॉ. प्रशांत निकम हेही आपला राजकीय वारसा जोपासून या निवडणूक रिंगणातून कारकिर्दीचा श्रीगणेशा करीत आहेत.

जनशक्तीचे नेते उदयकुमार आहेर व माजी सरंपच जितेंद्र आहेर तर देवळा विकास आघाडीचे केदा आहेर व योगेश आहेर या तरूणतुर्कांच्या माध्यमातून देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे चौघडे वाजत आहेत. आरोप-प्रत्यारोप, भ्रष्टाचार अथवा चारित्र्यहननांचे आरोप प्रत्यारोपांना दूर सारून देवळा विकास या एकमेव मुद्यावर दोघा बाजूंनी प्रचार यंत्रणा ठेवून अत्यंत निकोप व मैत्रीपूर्ण लढती या निवडणुकीचे वैशिष्ट्ये ठरणार आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आरोग्य मंत्री डॉ. दौलतराव आहेर, माजी आमदार शांताराम आहेर या जेष्ठश्रेष्ठांना दूर ठेवून युवकांनी या निवडणुकीत वारसा जोपासला आहे. सोशल मीडिया व प्रचाराच्या आधुनिक तंत्राचा वापर करून पूर्ण निवडणूक यंत्रणा राबविण्यात येत आहे. नगरपंचायतीची निवडणूक असली तरीही लोकसभा व विधानसभेच्या प्रचार यंत्रणेला लाजविणारी ही निवडणूक दोघा नेत्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची व लक्षवेधी ठरविल्याने या निवडणुकीत कोण बाजीगर ठरणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाताला मिळेना खरेदीदार

0
0



त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतील शेतकऱ्यांची दिवाळी होणार कडवट

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक तालुक्यातील शेतकरी दिवाळसणाच्या तोंडावर दिवाळखोरीत निघाला आहे. उत्पादनापेक्षा भांडवली खर्च अधिक झालेल्या भातास बाजारात मागणीच नसल्याने आता करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्या पुढे उभा ठाकला आहे. दसरा झाला आणि दिवाळी आली तरी देखील शासनाने एकाधिकार खरेदी सुरू केलेली नाही. बाजारात व्यापारी अद्याप खरेदीस तयार नाहीत. हमी भावाने खरेदी नसल्याने भाताचे करायचे काय, असा सवाल हातावर पोट असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यास सतावतो आहे.

त्र्यंबक व इगतपुरी या दोन आदिवासी तालुक्यांत एकर दोन एकर खडीबरड जमीन असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. अवकाळी पावसाचा सामना करीत मिळेल तेवढे धान्य शिवारातून आणले. मात्र, त्यास बाजारच नसल्याने बळीराजा हबकला आहे. अलिकडील काही वर्षांत मजुरीत झालेली वाढ, तशात रोखीत घ्यावे लागलेले बियाणे आणि खत त्याच सोबत रोगराई वाढल्याने कीटकनाशकांची फवारणी अपरिहार्य झाली आहे. यंत्रांनी होणारी मशागत महागात पडत आहे. एकरी होणारा खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारे उत्पन्न यांच्यात तफावत निर्माण झाली आहे. तालुक्यात एकूण लागवडीच्या ४० टक्के क्षेत्र भातपिकाचे आहे. त्याखालोखाल नागली वरई तृणधान्य आहे. यंदा उशिरा आलेला पाऊस आणि लांबलेला हंगाम आदि कारणांनी दिवाळीच्या तोंडावर भातकापणीस प्रारंभ झाला आहे. हळी भात सोंगणी सुरू झाली असून, गरी भाते आता कापणीच्या प्रतीक्षेत आली आहे. अद्याप व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केलेली नाही. याबाबत बाजाराचा कानोसा घेतल्यास व्यापारी भात खरेदीस उत्सुक नसल्याचे जाणवते. अलीकडे काही वर्षांपासून यंत्राने कापणी केली जाते हे भात ओले असते ते वजनास अधिक भरत असल्याने भात खरेदी व्यापाऱ्यास घाटा येत असतो. पूर्वी कापणी केल्यानंतर चार दोन दिवस भात उन्हात असायचे. त्यानंतर झोडपणी होवून पुन्हा खळ्यावर चार दिवस ऊन मिळायचे व नंतर ते विक्रीसाठी तयार होत असायचे. तथापि दोन वर्षांपासून यंत्राने कापणी करून तयार झालेले भात तातडीने काट्यावर येत आहे. यामध्ये वजन अधिक भरते, असा अनुभव गाठीस असल्याने यावर्षी हंगामाच्या सुरूवातीला भात खरेदीस कोणी तयार होत नाही असे दिसून येत आहे.वास्तविक पाहता दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने उत्पन्न काही पटीने घटणार आहे. मात्र, तरी देखील भात उत्पादक शेतकऱ्यास वाढीव भाव मिळणार नाही. शासनाने तातडीने हमी भावाने खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पाच पन्नास किलो धान्य बाजाराच्या दिवशी विक्रीस आणून हातावरील शेतकरी आपली गरज भागवत असतो. मात्र यावर्षी त्यास अशा या स्वकष्टाच्या रोकड्यास पारखे व्हावे लागले आहे. शासन बि बियाण्यांपासून खते अथवा किटकनाशके असे कोणत्याही स्वरूपात भात उत्पादक शेतक-यास मदत करत नाही त्यात पुन्हा दुष्काळ अथवा अवकाळी यांनी सातत्याने हानी होत आहे.

आदिवासी शेतकरी बांधवांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून महामंडळाने धान्य खरेदी करण्यासाठी त्वरित केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच बाजारभाव देतांना तो उत्पादन खर्चाच्या प्रमाणात वाढवून द्यावा, अशी मागणी असून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

निर्मला गावित, आमदार

निसर्गाच्या कृपेवर पिकवलेले धान्य बाजारात व्रिकी करतांना त्यास भाव मिळाला पाहिजे. शासनाने त्वरित धान्य खरेदी सुरू करावी अन्यथा आंदोलन करू.

संपतराव सकाळे,

माजी जिप उपाध्यक्ष

भाताचे अर्थकारण

हमी भाव नसल्याने कष्टाचे हे सोने मातीमोल झाले आहे. शहरी बाजार मॉल संस्कृतीत तांदूळ ५० रूपयांवर पोहचला आहे. मात्र, शेतकऱ्यास भाताला पंधराशे ते दोन हजार रुपये बाजार मिळत असल्याचे दुर्दैव कायम राहिले आहे. बदलेल्या निसर्गच्रकात एकरी सरासरी १० क्विंटल उत्पन्न मिळत नाही. तशात १५ रूपये भाव मिळाला तर १५ हजार ते २० हजार रुपये मिळाल्यास त्यामध्ये खर्च वजा जाता हाती काही उरत नाही. एकरी उत्पादन खर्च २० हजारांच्या आसपास पोहचला आहे. माणसी मजुरी २५० रूपये झाली आहे. आवणी, निंदणी आणि सोंगणी अशा निन्ही हंगामासाठी १० ते १५ हजार रुपये, मजुरी आणि मशागतीसाठी ५ हजार रुपये ट्रॅक्टरला असा सर्व तीढा झाला असून, तो सुटयला कठीण झाला आहे. नागली आणि वरई यांची तर यापेक्षा अधिक कठिण समस्या निर्माण झाली आहे.

खरेदी केंद्र सुरू करा!

आदिवासी विकास महामंडळ दरवर्षी खरेदी केंद्र सुरू करत असते. यंदा ते सुरू होण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने हमी भाव देतांना उत्पादन खर्चाचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. शासनाने खरेदी केंद्र सुरू करतांनाच बाजारात स्पर्धात्मक पध्दतीने खरेदीस मुभा देण्याची आवश्यकता आहे जेणे करून शेतकऱ्यास दोन पैसे जादा मिळाल्यास त्याचा चार महिन्याचा मेहनताना वसुल होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी गळती रोखणार कोण?

0
0

नामदेव पवार, सातपूर

नाशिकसह राज्यभरात घटलेल्या पर्जन्यमानामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातून नाशिककरांना कधी नव्हे ते पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. मात्र, शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या पाणीगळतीकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.

शहरात भविष्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. पाण्याची गरज पहाता शहरवासियांनी देखील कपातीला मूकसंमती दिली. परंतु, पाणीकपात होत असतांना सर्रास होणारी पाणीगळती रोखण्याबाबत महापालिकेच्या पातळीवर कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाही. मुख्य जलवाहिनीतून गळती होत असतांना त्यावर पाणीपुरवठा विभागाकडून नियंत्रण मिळविण्याची गरज आहे, महापालिकेने माध्यमांमधून निव्वळ 'पाणी जपून वापरा' असे आवाहन करणे पुरसे नसल्याचे खोचक मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

गंगापूर धरणातून सातपूर परिसरातील शिवाजीनगर जलनगरीत पाणी शुद्ध केले जाते. यानंतर शुद्ध झालेले पाणी मुख्य जलवाहिनीतून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सोडले जाते. परंतु, मुख्य जलवाहिनीलाच अनेक ठिकाणी गळती लागली आहे. महापालिकेने शहरातून गेलेल्या कॅनॉलमधून टाकलेली जलवाहिनी ठिकठिकाणी फोडण्यात आलेली आहे अथवा त्यातून पाण्याची गळती होत आहे.

काही महिन्यांपूर्वी मुख्य जलवाहिनीवरील ठिकठिकाणचे व्हॉल्व पाणी पुरवठा विभागाकडून बदलण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी अजुनही जुनेच व्हॉल्व आहेत. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होते. नागरिकांवर पाणीकपातलादतांना किमान शहरात विविध ठिकाणी होत असलेली पाणीगळती रोखावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यांचे नुकसान

महापालिकेने शहरातील नवीन रस्त्यांची नुकतीच बांधणी केली. शिवाजीनगर रस्त्यावर पाणी पुरवठा विभागाकडून जलवाहिनी काम टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामध्ये नव्याने बनविण्यात आलेले रस्ते खोदले जात आहेत. तसेच नवीन बसविण्यात आलेले पथदीपांचेही नुकसान होत आहे. यासाठी महापालिका जलवाहिनी टाकण्यापूर्वी नियोजन का करीत नाही, असा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत.

पाणी स्टँड तोटीविना

शहरात काही भागात गरीब वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोफत स्टँड पोस्ट महापालिकेने लावले आहेत. परंतु, स्टँड पोस्ट हे तोटीविनाच असल्याने रोजच शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. या तोट्यांमधून दिवसभर पाणी वाया जात असले तरी कुणी त्या बंद करण्याचे कष्ट घेत नाहीत. याकडे देखील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने वायाजाणारे पाणी बंद करण्याची गरज आहे.

दुष्काळाचे सावट पहाता प्रत्येकाने पाणी बचत करण्याची गरज आहे. महापालिकेने पाणी कपात केली असतांना दुसरीकडे जलवाहिनीतून होणाऱ्या पाणीगळतीकडे देखील पाणी पुरवठा विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.- प्रशांत पवार, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य निर्मितीत नियतकालिकांचा मोठा वाटा

0
0

कवी वसंत आबाजी डहाके यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मराठीमधील सर्व साहित्याला नियतकाल‌िकांनी बळ दिले आहे. गत दोन दशकातील मराठी साहित्याच्या वाटचाल अभ्यासलास हे मत अधोरेखीत होते. या साहित्याची निर्मिती, जोपासना आणि विकास यामधून नियतकालिके वगळून चालणार नाही', असे मत ज्येष्ठ कवी व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित चांदवड कॉलेजमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. 'मराठी वाड्:मयातील नियतकालिकांचे साहित्य प्रवाहांना योगदान' या विषयावर ते बोलत होते.

डहाके म्हणाले, 'साहित्य ही चळवळ आहे. ती जागृत ठेवण्यासाठी समाजात वेळोवेळी वैचारिक मंथन सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे असते. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन हे मंथन अपेक्षित असते. या अपेक्षापूर्तीसाठी नियतकालिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नव्या विचारप्रवाहांना, व्यक्तींना आणि नवीन बाजाच्या साहित्य निर्मितीसाठी हा घटक नव्या काळातही स्थान टिकवून राहीला आहे', असेही ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ कवी नारायणराव काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,'लघुनियतकालिकांचे योगदान साहित्यात मोठे आहे. साहित्याची चळवळ रूजविण्यासाठी आणि जोपासण्यासाठी लघुनियतकालिकांनीच मोलाची भूमिका बजावली आहे. याच साहित्य चळवळीने समाजामनातील जाणीवांचा विकास केला. यातून नवे जीवनविषयक साक्षात्कार समाजमनासमोर प्रकट झाले. सामान्य अतिसामान्य माणसाच्या जाणीवाही प्रगल्भ करण्यासाठी या घटकाचे असणारे योगदान विसरून चालणार नाही.'

चर्चासत्रातील पहिल्या सत्रात बडोदा विद्यापीठाच्या डॉ. मृणालिनी कामत अध्यक्षस्थानी होत्या. 'कविता रती' या नियतकालिकाबद्दल जळगावचे डॉ. आशुतोष पाटील, आदिवासी साहित्याबद्दल डॉ. विनोद कुमरे, अस्मितादर्श व दलित साहित्य प्रवाहाबद्दल डॉ. ऋषीकेश कांबळे, 'सत्य कथा अभिरूची छंद' या नियतकालिकाबद्दल नांदेडचे डॉ. पृथ्वीराज तौर यांनी निबंध वाचन केले.

दुसऱ्या सत्रामध्ये 'वैचारिक आणि सम‌‌िक्षा वाड्:मयप्रकाराला नियतकालिकांचे योगदान' या विषयावर कर्नाटक येथील अनुबंध डॉ. भालचंद्र शिंदे हे अध्यक्षस्थानी लाभले. या चर्चासत्रात 'अनुष्ठूभ' व 'नवअनुष्ठूभ'बद्दल देवळा येथील डॉ. एकनाथ पगार यांनी तर 'समाज पत्रिका' बद्दल डॉ. रणधीर शिंदे, महाड येथील डॉ. धनाजी गुरव यांनी शोध निबंधाचे वाचन केले.

दुसऱ्या दिवसाच्या सत्रात 'विविध वाड्:मयीन प्रवाहात नियतकालिकांचे योगदान' या विषयावर चर्चा झाली. यात हैदराबाद येथील 'पंचधारा' या नियतकालिकाच्या विद्या देवधर या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, 'सक्षम सम‌िक्षा'चे पुणे येथील डॉ. शैलेश त्रिभुवन, 'अक्षरवाड्:मय'चे लातूरातील डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांनी शोधनिबंधांचे वाचन केले. खुले निबंधसत्र डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉ. तुषार चांदवडकर, प्रा. विद्या सुर्वे-बोरसे, डॉ. कमलाकर चव्हाण यांनी निबंध वाचन केले. यावेळी डॉ. जी. एच. जैन, संस्थेचे विश्वस्त कांतिलाल बाफणा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शीतल चंद्रछायेमध्ये कोजागरीचा उत्साह

0
0

दुधाने गाठला लिटरसाठी सत्तर रुपयांचा भाव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शहरात सोमवारी कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक मंदिरांमध्ये चंद्राला नैवेद्य दाखवून भाविकांना दुधाचे वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कोजागीरीनिमित्त दूध प्राशन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोमवारी दुधाला चांगला भाव होता. सकाळी ६५ रुपये असलेले म्हशीचे दूध सायंकाळी ७० ते ८० रुपये लीटर प्रमाणे ग्राहकांना खरेदी करावे लागले. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ आदींचा खास मसाला टाकून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडल्यानंतर ते दूध प्राशन केले जाते. काही सोसायट्यामध्ये उत्तररात्रीपर्यंत जागरण करण्यात आले. तर काही ठिकाणी मुली सायंकाळी भोंडला खेळल्या. उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन 'को जागर्ती' म्हणजे 'कोण जागत आहे' असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. तसेच या दिवशी गरबा व दांडीया खेळण्याची परंपरा आहे. त्यामुळे पंचवटीतील अनेक सोसायट्यांमध्ये गरबा खेळला गेला. अशोकस्तंभावरच्या नवीन तांबट गल्लीतील कालिका देवी मंदीरात कोजागिरीनिमित्त मंदिरात गोंधळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुग्धपान झाले. तसेच गाडगीळ गल्लीतील रेणुका देवी मंदिरात देखील नवरात्रीनिमित्त दुग्धपानाचा कार्यक्रम झाला.

बंगालींची लोख्खी पूजा

बंगाली समाजबांधवांकडूनही कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. बंगाली लोक कोजागरी पौर्णिमेच्या पुजेला 'लोख्खी पुजो' म्हणतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. शहरातील अनेक बंगाली बांधवांनी ही पूजा केली. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला ओवाळत 'आश्विनी' साजरी करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे अनेक घरामधून मुलामुलींना ओवाळण्यात आले. गंगापूररोडवरच्या बालाजी मंदिरात दीपार्चन सेहळा आयोजित करण्यात आला. त्यानंतर दुग्धपानाचे आयोजन करण्यात आले.





एक लाख भाविकांचे टाकेदला शाहीस्नान

घोटी : कोजागरी पौर्णिमेचा मुहूर्त साधत इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे वारकरी सांप्रदायाच्या वतीने आयोजित शाहीस्नानात राज्यभरातून लाखो भाविकांसह महंत साधू संतांनी सहभाग घेतला. पहाटेपासूनच गावातील महिलांनी अंगणापुढे सडा टाकून रांगोळ्या काढत भाविकांचे स्वागत केले.

सकाळी सहा वाजेपासूनच प्रत्येक गावातून ट्रॅक्टरला केळीच्या पानांनी सजवून आणले होते. मारुती मंदिरापासून निघालेल्या या प्रत्येक गावोगावच्या सजवलेल्या व बैठक केलेल्या रथामध्ये संत नामदेव महाराज, संत निवृत्ती महाराज, संत तुकाराम महाराज संत, एकनाथ महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण पादुकांची व शैव व वैष्णव तसेच मंहत साधू संत यांना बसवून गावातून टाळ, विणा, पखवाज, वाजवित मिरवणुकीत सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी कर्मचाऱ्यांना अखेर मिळणार किमान वेतन

0
0

अतिरिक्त आयुक्तांनी दिले आरोग्याधिकाऱ्यांना आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सक्तीचे असल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी काढले आहे. कामगार उपायुक्तांशी चर्चा करून सोनवणे यांनी आरोग्याधिकाऱ्यांना आदेश देत किमान वेतनाच्या कायद्याची अमंलबजावणी न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यास सांगितले. त्यामुळे घंटागाडी कामगारांचा किमान वेतनाचा विषय सुटण्याची शक्यता आहे.

घंटागाडी कर्मचाऱ्यांना राज्याच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नसल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी या कर्मचाऱ्यांनी थेट महापालिकेत प्रवेश करत प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, मनसेचे सभागृहनेते सलीम शेख, गटनेते अनिल मटाले यांनी या आंदोलनात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ठेकेदारांनी हा कायदा आम्हाला लागू करण्यास असहमती दर्शवली होती. त्यामुळे महापालिकेने कामगार आयुक्तांना पुन्हा विचारणा केली होती. अतिरिक्त आयुक्त सोनवणे यांच्या दालनाता बैठक झाली. त्यांनी किमान वेतनासंदर्भात कामगार उपायुक्तांशी फोनवर चर्चा केली. घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यामुळे आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. ठेकेदारांना पत्र देवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. ठेकेदारांनी किमान वेतन दिले नाही तर त्यांच्या ठेक्यातून रक्कम कापून कामगारांना देण्याचे फर्मान सोडले आहेत. त्यामुळे आता ठेकेदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक वर्ष सुरू होवून पाच महिने लोटले तरी आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याने औरंगाबाद विभागातील संतप्त झालेल्या दीडशे आदिवासी विद्यार्थ्यांनी सोमवारी आदिवासी आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलन केले. औरंगाबादच्या प्रकल्प अधिकारी जिजाबाई साने यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मागण्यांसदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांना आयुक्तालयात मुक्काम ठोकत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होत आहे. प्रकल्प कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी न्याय मिळत नसल्याने भारतीय आदिवासी पँथर संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर धडक दिली. विद्यार्थ्यांनी मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. अचानक सुरू झालेल्या आंदोलनाने अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. प्रकल्प अधिकारी जीजाबाई सोनवणे या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळवून देत नाहीत असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सोनवणे यांचे निलबंन करून त्यांच्यावर कारवाई करावी, प्रवेश तत्काळ करावेत, विषबाधा प्रकरणी कारवाई करा, १ नोव्हेंबर २०११ च्या शासकीय आदेशाची अमंलबजावणी करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. अतिरिक्त आयुक्त मधुकर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तरे दिले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुक्तालयातच मुक्काम ठोकत मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. त्यामुळे आंदोलनाचा तिढा वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०४ वाहनचालकांचे परवाने जप्त

0
0

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर आरटीओची कारवाई; महिलांची संख्या अ‌ध‌िक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट तसेच सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या तब्बल १०४ वाहनचालकांवर प्रादेशीक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज कारवाई केली. दिंडोरीरोड आणि मुंबई-आग्रा हायवेवर अगदी फलक लावून आरटीओच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सक्तीच्या मॅसेजेसमुळे बऱ्याचशा वाहनचालकांनी कारवाईच्या भीतीने का होईना आज हेल्मेटचा वापर करण्यास सुरूवात केली.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रस्ता सुरक्षा समितीची स्थापन झाली असून, या समितीच्या आदेशानेच आजपासून कारवाईचा श्रीगणेशा करण्यात आला. आरटीओ विभागाने कारवाईचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार आज शहरातील पेठरोड आणि मुंबई-आग्रा हायवेवरील काही ठिकाणी आरटीओ विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या दोन्ही ठिकाणावर दिवसभरात १०४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांनी सांगितले. हेल्मटचा वापर न करणे, सीटी बेल्ट न लावणे या दोनच कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. १०४ पैकी २५ टक्के महिलांनी हेल्मेटचा वापर केला नसल्याचे दिसून आले. कारवाई झालेल्या वाहनचालकांचा परवाना जप्त करून मेमो देण्यात आला. महिन्यातील कोणत्याही पहिल्या, तिसऱ्या किंवा पाचव्या शनिवारी आरटीओ कार्यालयात येऊन एका सेमीनारला उपस्थिती लावणाऱ्या वाहनचालकांनाच वाहन परवाना परत करण्यात येणार आहे. या सेमीनारला हजेरी लावणारे वाहनचालक पुन्हा हेल्मेटचा वापर टाळणार नाही, असा दावा डेप्युटी आरटीओ भरत कळसकर यांनी केला.

आरटीओकडून उद्या, मंगळवारी नाशिक-दिंडोरी हायवेवर आणि शहरातंर्गत नाशिक-त्र्यंबकेश्वर या रस्त्यावर तपासणी केली जाईल. आमचा उद्देश पैसे वसूल करणे नाही त्यामुळे आज ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली त्या ठिकाणाआगोदर आम्ही फलक लावला होता. त्यात पुढे कारवाई सुरू असल्याचा इशारा देण्यात आला. या फलकाकडे दुर्लक्ष करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई झाल्याचे कळसकर यांनी स्पष्ट केले.

अवघ्या पाच अधिकाऱ्यांकडून मोहीम

हेल्मेटचा आणि सीटबेल्टचा वापर अनिर्वाय करणे यात वाहनचालकाच्या सुरक्षेला महत्त्व आहे. यासाठी जनजागृती हा भाग महत्त्वाचा असून त्यादृष्टीने कारवाई होते आहे. आरटीओ कार्यालयात पुरेस मनुष्यबळ नसल्याने अवघ्या पाच अधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई सुरू असून, यात टारगेट ओरिएटेंड काम होत नसल्याचा दावा कळसकर यांनी केला.

पोलिसांवरही झाली कारवाई

पेठरोडसह मुंबई-आग्रा हायवेवर झालेल्या कारवाई दरम्यान एका पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आरटीओच्या कारवाईचा समाना करावा लागला. व्हॉटस अॅपसह माध्यमांकडून या कारवाईबाबत बरीच जनजागृती झाली. आज १० पैकी ४ वाहनचालकांनी हेल्मेटला प्राधन्य दिले. हे प्रमाण दिवसागणिक आणखी वाढत जाईल, अशी अपेक्षा कळसकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अर्ली’ द्राक्षांचा प्रयोग ठरतोय यशस्वी

0
0

बागलाणमधील शेतकरी घेताहेत उत्पादन

कैलास येवला, सटाणा

बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यासह परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यातच अर्ली द्राक्षांचे विक्रमी उत्पादन घेऊन नाशिक जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रात एक यशस्वी प्रयोग केला आहे. अर्ली ग्रेप्स हे इंग्रजी शब्दच सध्या बागलाणच्या शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येत असून, यातून लाखो रुपयांचे द्राक्षे निर्यात करण्यास बागलाणमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे.

एकेकाळी डाळिंब व कांद्याच्या माध्यमातून बागलाणमधील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करून आपली आर्थिक परिस्थिती सदृढ करून जीवनमान उंचावले होते. त्यांचा आदर्श घेत बागलाणसह कसमादे परिसरात सर्वत्र डाळिंब पिकांचा उदोउदो करण्यात आला. यामुळे सर्वत्र डाळिंबाने हात देऊन शेतकरी सुखी केला होता. मात्र, याच डाळिंबाला तेल्या व मर रोगाची दृष्ट लागल्याने समस्त शेतकरी बांधवांनी डाळिंब मुळासह उपटून फेकले.

बागलाणमधील प्रयोगशील शेतकऱ्यांनी हातावर हात ठेवून गप्प न बसता गारपीट व अवकाळी पावसाच्या या निसर्गचक्राच्या आपत्तीवर मात करून यंदा जून व जुलै महिन्यात अर्लीची छाटणी केली. अर्ली छाटणीचा प्रयोग सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात यशस्वी करू लागले आहेत. बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यात यापूर्वी बोटावर मोजणाऱ्या द्राक्ष उत्पादकांचीच अर्ली छाटणीसाठी मक्तेदारी होती. मात्र, याच द्राक्ष उत्पादकांच्या मार्गदर्शनाखाली आता तालुक्यातील सटाणा, लाडूद, बिजोटे, पिंगळवाडे, मुंगसे, भुयाणे, पारनेर, निताणे, या गावातून सुमारे ३५० एकर क्षेत्रातून सुमारे २५० द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्या कमी क्षेत्रातून अर्ली द्राक्षांचा यशस्वी प्रयोग करू लागले आहेत. परिणामी तालुक्यात कमी क्षेत्रातून अधिक प्रमाणावर द्राक्षांची बागे उभी राहू लागली आहेत. अर्ली छाटणीचा हा द्राक्ष भारतातच नव्हे, तर परेदशात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने तो दुंबई, बांगलादेश व आखाती देशांमधून रशियामध्येही दाखल होऊ लागला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. सोनाका, थॉमसन, शरद, क्लोन, जम्बो या नानाविध जातीची निर्यातक्षम द्राक्षे बागलाण तालुक्यातून यशस्वती पद्धतीने घेतली जात आहेत.

अर्ली द्राक्ष उत्पादकांना हा प्रयोग करीत असताना गारपीट व अवकाळी पावसासारख्या मोठ्या संकटांना तोंड देऊन महागड्या औषधांची यंत्रणा जवळ बाळगावी लागते. अगदी तळावरील हाताच्या फोडाप्रमाणे या द्राक्षबागांना जपावे लागते.

- डी. के. कापडणीस,

तालुका कृषी अधिकारी, बागलाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्थापितांसाठी अस्तित्वाची लढाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येत्या १ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या चांदवड नगरपालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीची उत्कंठता शिगेला पोहचली आहे. ही निवडणूक चांदवडमधील प्रस्थापित राजकीय धुरिणांसाठी प्रतिष्ठेची बनली असून, प्रस्थापितांचे अस्तित्व या निवडणुकीत टिकून राहते की चांदवडच्या राजकारणात उडी घेण्यासाठी आतूर झालेली तरुणाई चमत्कार घडवते हा या निवडणुकीतील औत्सुक्यचा भाग बनला आहे.

चांदवड नगरपंचायतीसाठी १७ प्रभागांसाठी ११६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवून आपले बळ जोखण्याचा प्रयत्न केला आहे. ही निवडणूक राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अंदाजापलीकडची ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

आजी- माजी

आमदारात लढाई

चांदवडचे भाजपचे विद्यमान आमदार राहुल आहेर आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारमुळे विकासकामांचे आश्वासन देत आमदार आहेर सक्षमपणे निवडणूक मोर्चा सांभाळत आहेत. तर, चांदवडच्या प्रत्येक निवडणुकीत अग्रभागी असणारे माजी आमदार शिरीष कोतवाल यांना पुन्हा आपले अस्तित्व तसेच, काँग्रेसची ताकद दाखवण्याची संधी चालून आली आहे. म्हणूनच काँग्रेस विरोधी भाजप असा चुरशीचा सामना पहायला मिळेल, असा अंदाज आहे. असे असले तरी प्रत्येक प्रभागात उमेदवारांची मोठी संख्या, अपक्षांनी उभे केलेले आव्हान आणि प्रत्येक पक्षाची दुसऱ्या पक्षाशी लढत यामुळे कोणत्याच एका पक्षाला ही निवडणूक सोपी नाही हे ही उघडच आहे.

जात, नातेवाईक फॅक्टर

या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांनी विकासाचे गाजर दाखवले असले तरी पक्ष, विकासाचा मुद्दा यापेक्षाही जात, नातेवाईक व हितसंबंध हे फॅक्टर महत्त्वाचे ठरतील, असे चित्र दिसत आहे. काही प्रभागात समाज, नातेवाईक मतदार या गोष्टी पाहूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. माजी आमदार कोतवाल यांच्या पत्नी मीना कोतवाल, राष्ट्रवादी नेते खंडेराव आहेर यांचे चिरंजीव नवनाथ आहेर, सेनेचे संदीप उगले यांच्या पत्नी कविता उगले, माजी सरपंच राष्ट्रवादी नेते सुनील कबाडे यांच्या पत्नी निर्मला, भाजपचे बाळासाहेब वाघ यांच्या पत्नी इंदुबाई वाघ, राष्ट्रवादीचे देवीदास शेलार यांच्या पत्नी आदी निवडणूक लढवित आहेत. त्यांना मतदारांचा कौल कसा मिळतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. प्रभाग तीनमध्ये नऊ उमेदवार असून, भाजप तालुकाध्यक्ष भूषण कासलीवाल यांना सर्वच पक्षांसह अपक्षांशी झुंजावे लागणार आहे. प्रभाग एक आणि सहामध्ये महिलांची तर, प्रभाग दोनमध्ये पुरुषांची तुल्यबळ चौरंगी लढत होणार आहे.

सर्वात जास्त उमेदवार प्रभाग १२ मध्ये असून, त्यांची संख्या ही १२ आहे. या प्रभागासह नऊ उमेदवार असलेल्या प्रभाग तीनमध्ये कोणता उमेदवार कोणाची किती मते खातो यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

प्रतिष्ठा पणाला

काँग्रेसचे माजी आतदार शिरीष कोतवाल यांच्या पत्नी मीना

कोतवाल तसेच अशोक व्यवहारे, शिवसेनेचे जगन्नाथ राऊत, राष्ट्रवादीचे सुनील आणि निर्मला कबाडे तसेच प्रकाश शेळके, मनसेचे रवींद्र विसपुते, परवेज पठाण, विजय कोतवाल, भाजपचे मोहन शर्मा, भूषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हायटेक प्रचार

सोशल मीडियाद्वारे हायटेक प्रचार

हा लक्षवेधी ठरतोय. अनेकांनी मतदारराजाचे मोबाइल नंबर मिळवून त्याना वॉट्स अॅप ग्रुपमध्ये घेऊन आगळा प्रचार सुरू केला आहे. फेसबुकचाही प्रचारासाठी वापर करण्याचा फंडा चर्चेचा विषय आहे.



अनेक प्रभागात बहुरंगी लढती

चांदवड नगरपंचायत निवडणुकीत बहुतेक प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळे कुठे नवरंगी तर कुठे षटकोनी, तसेच काही प्रभागात चौरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. युती, आघाडी विस्कटल्याने अपक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विविध उमेदवारांच्या भाऊगर्दीत कोण बाजी मारणार हे सांगणे अवघड झाले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाईविरोधात धरणे आंदोलन

0
0

डाळी रेशनमध्ये देण्याची काँग्रेसची मागणी
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या काही दिवसात ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. या विरोधात मंगळवारी येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली जुने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानात डाळ उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली.

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. गोरगरिबांच्या आहारातील डाळीचे दर दिवसेंदिवस वाढत असून, तूर डाळीचे भाव तर २०० रुपयांच्याही वर गेले आहेत. अशा महागाईच्या काळात गरिबांना जीवन जगणे कठीण झालेले असताना ऐन सणासुदीच्या दिवसात महागाईमुळे गरिबांनी सण साजरे तरी कसे करायचे, असा सवाल या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार रशीद शेख यांनी उपस्थित केला. तसेच, ही वाढती महागाई लक्षात घेता आता राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून सर्व प्रकारच्या शिधापत्रिका धारकांसाठी माफक दरात पुरेशी प्रमाणात डाळी उपलब्ध करून द्याव्यात, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी महापौर ताहेरा शेख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगासनांमुळे संधीवात नियंत्रण शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सर्वांनी नियमित व्यायाम, योगासने आपला समतोल आहार घेतल्यास गुडघेदुखी कमी होवू शकते. सर्वांनी आपल्या वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. सायकलिंग आणि नियमित चालले, असे प्रतिपादन डॉ. हेमंत चौधरी यांनी केले.

हॉटेल जत्रा मागील रामलीला मंगलकार्यालयात एचएएल कंपनीतून निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या गुडघेदुखी आणि सांधेदुखी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी कामगार नेते आपासाहेब देसले, कुमार औरंगाबादकर यांच्यासह पंडितराव ढिकले, हरिश्चंद्र निंबाळकर, आत्माराम वाघमारे, वसंतराव पुंड आदी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक वसंत पुंड व निंबाळकर यानी केले. यावेळी डॉ. चौधरी यांनी अनेक शस्त्रक्रियाबाबत माहित दिली. यावेळी विनोदाचा बादशहा राहुलकुमार यांचा धम्माल विनोदी कार्यक्रमही झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस ज्येष्ठ नागरिक संघाचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने नाशिकमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जुने नाशिक परिसरात स्वच्छतेअभावी ठिकठिकाणी मुख्य रसत्यांवर कचऱ्याचे ढिग साचले असून दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाडी नियमित येत नसल्याने रहिवाशी हैराण झाले आहेत. आठ-आठ दिवस घंटागाडी प्रभागात फिरकत नाही. दुसरीकडे, आरोग्य विभागाकडून नगरसेवकांच्या निवासस्थान परिसरात नियमित स्वच्छता केली जात असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३९ मध्ये संजरीनगर या नागरी वसाहतीत अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. यातून दुर्गंधी निर्माण झाली आहे. इगतपुरीवाला चाळीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा साचला आहे. गंजमाळ परिसरात अशीच परिस्थिती आहे. भिमवाडी, पंचशीलनगर, सहकारनगर या नागरी वसाहतीत ठिकठिकाणी कचरा साचल्याचे दिसून येत आहे. परिसरातच सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या बांधकामाच्या ठिकाणी खोदून ठेवलेल्या खड्डयात पाणी साचून धोकादायक डबके निर्माण झाले आहे. या डबक्यामुळेच डेंग्यूच्या डासांची निर्मिती होत आहे. परिसरातच गवत देखील वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता वेध दीपोत्सवाचे

0
0

जारपेठा गजबजण्यास सुरुवात; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर सर्वांनाच आता दिवाळीचे वेध लागले असून बाजारात गर्दीचे प्रमाणात वाढत चालल्याचे चित्र आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने हा उत्साह वाढत जाणार असून काही दिवसातच खरेदीलाही वेग येणार असल्याचे विक्रेत्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

संपूर्ण देशासाठी दिवाळी सण आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिवाळीतील फराळ, नवीन कपडे, फटाके, रंगीबेरंगी पणत्या, आकाशकंदिल, रांगोळ्या आदी प्रकारांमुळे सर्वत्र हर्षोल्हास पसरलेला दिसून येतो. त्यामुळे या सणाचे स्वागतही उत्साहात करण्यासाठी खरेदीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येते. त्यातच शनिवार-रविवारला जोडून लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज आल्याने पर्यटनासाठीही नाशिककरांची मोठी पसंती असणार आहे.

दिवाळीत लाडू, करंज्या या गोड पदार्थांबरोबरच शेव, चकली, चिवडा या चमचमीत फराळाच्या पदार्थांचे आकर्षणही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या आठ-दहा दिवसपूर्वीच फराळाची तयारी गृहिणींमध्ये दिसून येते. हल्ली महिलावर्गाचे नोकरी करण्याचे प्रमाणही मोठे असल्याने तयार फराळ पदार्थ घेण्यास पसंती दिली जात आहे. त्यादृष्टीने शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांमध्ये हे पदार्थ दाखल झाले आहेत. यंदा पाऊस लांबल्याने दुष्काळची परिस्थिती निर्माण झाली असून महागाईचा चटका जाणवणार असल्याची शक्यता विक्रेते वर्तवित आहेत. खरेदीत मोठी उलाढाल या सणाच्या निमित्ताने होत असल्याने व्यावसायिक व विक्रेत्यांनाही दिवाळीचे वेध लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांचा राडा

0
0

किमान वेतन देण्यासाठी ठिय्या आंदोलन; कर्मचाऱ्यांना पालिकेतून मिळणार वेतन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचे श्रेय राष्ट्रवादीसह मनसेला मिळाल्याने खळबळून जागे झालेल्या शिवसेनेने मंगळवारी पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न घेत, पालिकेत आंदोलन केले. पेस्ट कंट्रोल कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे व दोन महिन्याचे थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या कामगार सेनेच्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी मध्यस्ती करत, किमान वेतन देण्यासह ठेकेदाराने दोन दिवसात वेतन दिले नाही तर थेट पालिकेतून वेतन देण्याचे आदेश दिले आहेत.

पेस्ट कंट्रोलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने गेल्या दोन महिन्यापासून वेतन दिलेले नाही. सोबतच किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांनी पालिकेत ठिय्या आंदोलन केले. जिल्हा प्रमुख विजय कंरजकर, महानगर प्रमुख अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, कामगार सेनेचे प्रमुख शिवाजी सहाणे यांनी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेऊन दोन्ही प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. तर थकीत दोन महिण्याचे वेतन तात्काळ देण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना दिले. ठेकेदारांने दोन दिवसात वेतन दिले नाही तर, थेट महापालिकेच्या खात्यातून या कर्मचाऱ्यांना वेतन अदा करावेत असेही फर्मान सोडले. तेवढी रक्कम ठेकेदाराच्या बिलातून कमी करावी, असे आदेशीत केले. आरोग्याधिकाऱ्यांनी यासंदर्भात लेखी दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले.

पालिकेतील अधिकारीही ठेकेदारालाच मदत करत असल्याने कर्मचाऱ्यांना दोन महिन्यापासून वेतन नाही. त्यामुळे सणासुदीत त्यांचे हाल होत आहेत.

- शिवाजी सहाणे,

अध्यक्ष,कामगार सेना



पेस्ट कंट्रोलचे काम ठप्प

पेस्ट कंट्रोल ठेक्याचा निर्णय होत नसल्याने गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील धूर फवारणीचे काम बंद आहे. विद्यमान ठेकेदारांना अकरा महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आली आहे. तर स्थायी समितीने दिलेल्या ठेक्याचा विषय शासनाकडे प्रलंबित आहे. त्यावर अद्याप तोडगा निघत नसल्याने पेस्ट कंट्रोल वाद अधिक चिघळला आहे. आयुक्तांनी विखंडनासाठी पाठविलेल्या ठरावाचे इतिवृत्त पाठविण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे. मात्र इतिवृत्तच नसल्याने हा वाद प्रलंबित आहे. या वादात मात्र शहरातील पेस्ट कंट्रोलचे काम ठप्प झाले आहे.

सेना-भाजप आमने सामने

पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासंदर्भात शिवसेनेने आक्रमकता दाखवली आहे. संबंध‌ति ठेका हा भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याचा आहे. त्यामुळे सेनेने ठेकेदार पगार करत नसेल तर, थेट त्याचावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळला आहे. विद्यमान ठेकेदाराला मुदत वाढीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान ठेकेदाराच्या अनेक तक्रारी असतानाही, त्यांनाच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र सेनेने त्याला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सेनेला घेरणाऱ्या भाजपचा वचपा काढण्याची संधी सेनेला मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज प्रकल्पासाठी रास्तारोको

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

एकलहरेतील प्रस्तावित ६६० मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे या व अन्य मागण्यांसाठी नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प संघर्ष समितीतर्फे सिन्नर फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सहाय्यक पोलिस आयुक वाडेकर यांना समितीतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, निवृत्ती चाफळकर, नितीन जगताप, प्रकाश म्हस्के, योगेश म्हस्के, विशाल घेगडमल, विनायक हारक, शांताराम राजोळे, दिनकर म्हस्के, बाळासाहेब पवळे, राजेंद्र जाधव, नंदू मगर, मधुकर कापसे, सचिन जगताप, सुभाष जगताप, बहिर जाधव आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नवीन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्याचे काम लवकर सुरू करावे. प्रकल्प चालू होत नाही तोपर्यंत संच क्रमांक तीन, चार व पाच बंद करू नये. त्यांचे नूतनीकरण करावे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी, संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यावेळी प्रकल्पाच्या अडचणी दूर करून कामाला वेग देण्याचे ठरले होते. राज्य विद्युत निर्मितीच्या मालकीची जमीन, रेल्वे, पाणी विद्युत वितरण उपकेंद्र उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पाचा खर्च कमी होईल. एवढे असतानाही शासन प्रकल्प उभारणीसाठी टाळाटाळ करीत आहे. शासन खासगी कंपन्यांच्या दबावाखाली आहे. खासगी कंपन्यांना परवानगी न देता शासनाच्या मालकीच्या विद्युत कंपन्यांना परवानगी द्यावी. या प्रकल्पासाठी जमीन संपादीत केलेल्या मालकांचे पुनर्वसन त्वरित करावे, त्यांना रोजगार द्यावा. त्यांच्या वारसांना विनाअट शासकीय प्रमापत्र द्यावे. शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्याला सापडतो एक कट्टा

0
0

नाशकात परप्रांतीयांकडून होते विक्री; सराईत गुन्हेगारांकडून मागणी

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : गावठी कट्ट्यांची सहज उपलब्धता गुन्हेगारांच्या पथ्यावर पडली असून, किरकोळ घटनांमध्ये सुध्दा कट्ट्यांचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कारवाई होते. मात्र, हे प्रमाण कमी असून आजमितीस महिन्याकाठी सरासरी एक गावटी कट्टा शहर परिसरातून जप्त होत आहे. शहराबाहेरील व्यक्तींचा या व्यवसायात सक्रिय सहभाग असून, अवैध हत्यारांचा बाजार उद्ध्वस्त करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मध्य प्रदेश राज्यातील महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांमध्ये गावठी कट्ट्यांची सहजतेने निर्मिती होती. विशेषतः सैंधवा हे गाव यासाठी कुप्रसिध्द आहे. अवैध हत्यार निर्मितीचे केंद्र असलेल्या या गावांमध्ये अगदी दोन ते आठ हजार रुपयांमध्ये गावठी कट्टे तयार करून दिले जातात. तयार झालेला माल रस्ते किंवा रेल्वे मार्गे महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात पोहचवण्यासाठी हस्तक काम करतात. परराज्यातील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातील गुन्हेगारांसह जिल्ह्यातील तसेच शहरातील स्थानिक गुन्हेगारांना पोलिसांनी वेळोवेळी अटक केली आहे.

दोन दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचचे पीआय संजय सानप यांच्या पथकाने शिर्डी व येवला येथे राहणाऱ्या दत्तात्रय डहाळे आणि भूषण मोरे यांसह एकास​ सिन्नर फाटा येथे अटक केली. हे आरोपी दोन गावठी कट्टे विकण्याच्या बेताने शहरात दाखल झाले होते. काही वर्षांपूर्वी क्राईम ब्रँचनेच सागर ठाकूर या इंदूर येथील स्थानिकास गावटी कट्टा विकताना मुक्तीधाम येथून ताब्यात घेतले होते. पहाटेच्या सुमारास

ठाकूर टिक्कू शेख या सराईत गुन्हेगारास कट्टा विकताना पोलिसांना सापडला होता. क्राईम ब्रँचसह स्थानिक पोलिसांनी आजवर पकडलेले सर्व गावठी कट्ट्यांचे मध्यप्रदेश राज्याशी कनेक्शन असल्याचे समोर आले

आहे.

याबाबत माहिती देताना पीआय सानप यांनी सांगितले की, या गुन्ह्यात विक्री करणारा आणि विकत घेणारा दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. हा कट्टा कसा मिळाला याची तुंटपुंजी माहिती विक्री करणाऱ्या व्यक्तींकडे असते. बनावटीनुसार किंवा संशयिताने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश राज्याचे कनेक्शनसमोर येत असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले.

जीवाचे भय असलेले गुन्हेगार गावठी कट्ट्यांना प्राधन्य देतात. दोन गटातील भांडणांमुळेच सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यांच्या शोधात असतात. शहराबाहेरील विक्रेत्यांचा त्यांच्याशी संपर्क आल्यास सौदा होतो. सुदैवाने ही माहिती आमच्यापर्यंत पोहचल्यास लागलीच कारवाई होते. आजवर अटक झालेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक समावेश परराज्यातील गुन्हेगारांचा आहे.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त, क्राईम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लॉ’चे दहा विद्यार्थी अखेर ठरले पास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सद्यस्थितीत गाजत असलेल्या नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नी अखेर संघर्षानंतर कसाबसा न्याय पदरात पडला आहे. विद्यार्थ्यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर विद्यापीठाने गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांची शोधाशोध करीत अखेर पुनर्निकाल मंगळवारी जाहीर केले. या घडामोडीत एनबीटी कॉलेजच्या नापास ठरलेल्या १२ पैकी १० विद्यार्थी पास ठरले आहेत.

गत शैक्षणिक वर्षात कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या इव्हीडन्स या विषयाच्या पार पडलेल्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या १२ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे रिचेकिंगसाठी अर्ज केले होते. पण, महिना उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना विद्यापीठाने उत्तर दिले नाही. तोपर्यंत रिपीटर्स विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. रिचेकिंगच्या अर्जांचा या दरम्यान विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती विद्यार्थ्यांच्या कानी आली होती. यावर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत टर्म एंड परीक्षांवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आंदोलन सुरू केले होते. मात्र, मंगळवारी या तथाकथित गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचा मागोवा घेत विद्यापीठाने कसेबसे रिचेकिंगचे निकाल जाहीर केले. यामध्ये नापास ठरलेल्या सुमारे १२ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी पास ठरले आहेत. या सर्वांच्या गुणांमध्ये मोठा बदल घडून आला.

मोठ्या संख्येने पास विद्यार्थ्यांना नापास ठरविणारे विद्यापीठ गलथान कारभाराचीच साक्ष देते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार विद्यापीठास नाही. भविष्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाने जबाबदारीपूर्वक काम करावे.

- अजिंक्य गिते, आंदोलनकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images