Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सोने खरेदीने दीपोत्सवाचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चैतन्याचे पर्व घेऊन येणाऱ्या दीपावलीने घराघरांसह बाजारातही उत्साह निर्माण केला आहे. सोमवारच्या धनत्रयोदशीच्या निमित्ताने नाशिककरांनी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळेच सोने, होम अप्लायन्सेस, वाहने, कपडे, घरे यांच्या खरेदीने वेग घेतला आहे. तर सोन्याचे घटलेले दर आणि ग्राहकांचा प्रतिसाद यामुळे शहरात किमान १० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचे सराफ व्यासायिकांकडून सांगण्यात येत आहे.

यंदाचे दुष्काळी सावट आणि शहरातील सातपूर व अंबड एमआयडीसीतील उद्योगांमध्ये दिवाळी बोनस अल्प प्रमाणात असला तरी दिवाळीच्या उत्साहावर परिणाम झालेला नाही. सोमवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी शहरातील सराफी पेढ्या आणि सुवर्ण शोरुम्समध्ये खरेदीला पसंती दिली. सोन्याचे दरही कमी झाल्याने ग्राहकांमध्ये उत्साह होता. सराफी पेढ्यांनीही दिवाळीच्या निमित्ताने लकी ड्रॉचे आकर्षण ग्राहकांमध्ये ठेवल्याने सुवर्णालकांरांना मागणी वाढली होती.

होम अप्लायन्सेस, स्मार्ट फोन्स, लॅपटॉप या डिजीटल वस्तू आणि उपकरणांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. त्यामुळेच एमजी रोड, मेनरोड, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड येथील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती. दिवाळीनिमित्ताने देण्यात आलेल्या खास ऑफर्स आणि सोयी-सवलतींचा ग्राहकांनी लाभ घेतला. शहरातील मॉल्समध्येही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे निदर्शनास आले. डिजिटल वस्तू, उपकरणे आणि होम अप्लायन्सेस यांच्या खरेदी-विक्रीची किमान १०० कोटी रुपयांची उलाढाल शहरात झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रालाही बूस्ट मिळाली आहे. शहर परिसरात सुरु असलेल्या अनेकविध गृह प्रकल्पांना भेटी देण्यासाठी आणि सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठीही ग्राहकांनी गर्दी केली होती. काही व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी खास बसेसचीही व्यवस्था केली होती. दसऱ्याच्या तुलनेत यंदा फ्लॅट बुकिंगचा उत्साह चांगला आहे. किमान १०० फ्लॅटचे बुकिंग दिवाळीच्या प्रारंभीच झाले समजते.

सोन्याच्या मागणीत वाढ

सोन्याचे उतरत असलेले भाव व धनत्रयोदशीचा मुहूर्त असा दोन्हींचा मेळ साधत नाशिककर नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात सोनेखरेदीचा आनंद लुटला. काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. या घसरणीचा फायदा घेत सराफ बाजार व इतर ठिकाणच्या दुकांनांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते.

भाव कमी असल्याने मागणी जास्त होती त्याच प्रमाणात पुरवठा झाल्याने सोमवारी कोट्यवधीची सोने आणि चांदीची खरेदी झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोन महिन्यापासून सोन्याच्या भावात घसरण सुरू झाल्याने सोमवारच्या दिवशी अनेक ग्राहकांनी सराफ बाजारातील पेढ्यावर भाव आणखी उतरणार का, याची विचारपूस केली. मात्र, सोमवारी बाजार उघडल्यानंतर भाव २६ हजार ५०० वर स्थिरावला. नाशिकमध्ये अनेकांनी लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी केली तर अनेकांनी गुंतवणूक म्हणून खरेदी केली.

धनत्रयोदशीनिमित्त कुबेर, धन्वंतरीचे पूजन

दिवाळीचा तिसरा दिवस अर्थात अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी व धन्वंतरी पूजन साजरी करण्यात आले. रांगोळी, फुलांची तोरणे, विद्युत रोषणाई अशा प्रसन्न वातावरणात घरा-घरांमध्ये व दवाख्यानांमध्ये सण साजरा करण्यात आले. तसेच धनाची म्हणजेच लक्ष्मी व कुबेराची व तसेच हॉस्पिटलमध्ये धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात आले.

सोन्या-चांदीची नाणी, कुबेर, धन-धान्य यांची पूजेचे महत्त्व या दिवशी असल्याने सायंकाळी पूजा करण्यात आली. धने व गुळ यांचा नैवेद्य दाखवित लक्ष्मीची, कुबेराची विधीवत पूजा करून दीपदान करण्यात आले. घरात सुख नांदण्यासाठी व अपमृत्यू टाळण्यासाठी म्हणून घराबाहेर दिवा लावून त्याचे टोक दक्षिण दिशेस करून ठेवण्याची प्रथा आहे. ही प्रथा प्रामुख्याने पाळली गेल्याचे चित्र दिसून आले. तसेच यादिवशी सोन्याची खरेदी केल्यास त्यात भर पडते, असेही म्हटले जात असल्याने सोनेखरेदीलाही प्राधान्य देण्यात आले.

व्यापाऱ्यांनी सायंकाळी वर्षभर वापरात येणारी चलने, चोपडी, सोने-चांदीच्या नाण्यांचे पूजन केले. यादिवशी धन्वंतरी जयंती असल्याने दवाखान्यांमध्ये धन्वंतरी पूजन, पुण्यवाचन, गणेशपूजन यांना विशेष महत्त्व देण्यात आले. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक असल्याने तसेच दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी वैद्यांमार्फत धन्वंतरीची पूजा करण्यात आली. आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या खलाची पूजाही यावेळी करण्यात आली. पूजनानंतर साळीच्या लाह्या, बत्तासे, धने, गूळ असा प्रसाद वाटण्यात आला. अनेक ठिकाणी आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करणारे व्याख्यानेही पार पडले.

मागील २४ वर्षांपासून शास्त्रोक्त पद्धतीने धनत्रयोदशी व धन्वंतरी पूजन आम्ही साजरे करतो. यज्ञ, देवतांचे पूजन, प्रसादाचे वाटप अशा अनेक गोष्टींनी हा दिवस साजरा केला. - वैद्य विक्रांत जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

$
0
0

ति‌किटाच्या दरामध्ये प्रचंड तफावत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाने भाडेवाढ केल्यानंतर खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनीही त्यांच्याच कित्ता गिरविला आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये परगावी जाणाऱ्याची संख्या वाढत असल्याचा फायदा घेत भरमसाठ भाडेवाढ करण्यात आल्याचे चित्र आहे. आधीच दिवाळीवर महागाईचे सावट असल्याने मध्यमवर्गीयांना जादा भाडे द्यावे लागत असल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

साधारणतः २५ नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ कायम राहणार असून त्यानंतर दर कमी केले जाणार आहे. पुणे, मुंबई या शहरांकडे जाण्याचा प्रामुख्याने ओढा असल्याने येथील भाडेवाढीचा चटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नॉन एसी गाड्यांसाठी एसीचे दर आकारले जात आहेत. नाशिक-मुंबई खासगी प्रवास नॉन एसीसाठी ३५० ते ४५० रुपये प्रतिप्रवासी असलेले दर एसीच्या ६५० ते ७५० या रुपयांपर्यंत जाऊन पोचले आहे. त्यामुळे प्रवास न केलेलाच बरा अशा स्थितीत प्रवाशी सापडले आहेत. ही भाडेवाढ हंगामी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, परराज्यात किंवा दूरच्या प्रवासासाठी नाशिककरांना अनेकदा मुंबई गाठावी लागत असल्याने नाशिक-मुंबईचा खासगी प्रवास दर नवीन वर्षापर्यंत कायम राहणार असल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे सांगण्यात येत आहे.

हंगामी मात्र

भरमसाठ भाडेवाढ

भाडेवाढीबाबत नाराज असलेल्या प्रवाशांनी मात्र खासगी बसेसच्या सेवादरावर नियंत्रण नसल्याने भाडेवाढ सहन करावी लागत असल्याची तक्रार केली आहे. या काळात मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी हंगामी मात्र भरमसाठ करण्याची युक्ती काढल्याचेही प्रवाशांमध्ये चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३ हजार गावांत पाणीटंचाई

$
0
0

प्रविण बिडवे । नाशिक

पावसाने पाठ फिरविल्याने भूजल पातळी कमालीची खालावली असून, यंदा उत्तर महाराष्ट्रातील दोन हजार ९९० गावांना पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. सर्वाधिक एक हजार ६३ टंचाईग्रस्त गावे एकट्या अहमदनगर जिल्ह्यात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ५४६ गावे अशी आहेत ज्यांना ऑक्टोबरपासूनच भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता भूजल सर्वेक्षणाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

यंदा उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणेही पूर्ण भरू शकली नाहीत. याचा परिणाम जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी खालावण्यावरही झाला. उत्तर महाराष्ट्रात २ हजार ९९० गावे अशी आहेत ज्यांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी धक्कादायक माहिती भूजल सर्वेक्षण कार्यालयातील सूत्रांनी दिली.

नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ५४ तालुके आहेत. त्यामधील एकूण ५४६ गावांमध्ये पाणीटंचाईचे चित्र अत्यंत विदारक आहे. या गावांमधील भूजल पातळी तीन मीटरपेक्षाही अधिक खाली गेली आहे. एकट्या नगर जिल्ह्यातील ३८७ गावे आजच टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. त्या खालोखाल जळगावमध्ये ९० गावांना आतापासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गावे जूनपर्यंत पाणीटंचाईला कशी सामोरी जाणार हाच खरा प्रश्न आहे. पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर धुळ्यातील ३९, नाशिकमधील १८ आणि नंदुरबारमधील १२ गावे आहेत.

दोन ते तीन मीटर या दरम्यान भूजल पातळी खालावलेल्या उत्तर महाराष्ट्रातील गावांची संख्या ७६९ आहे. त्यातही नगरमध्ये ३१०, नाशकात १३२ तर जळगावमध्ये १२३ गावे आहेत. नंदुरबारमध्ये अशी ११० गावे असून, धुळ्यात अशा गावांची संख्या ९४ आहे. या गावांना जानेवारीपासून पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असून, या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक १६७५ गावे अशी आहेत ज्यांची भूजल पातळी एक ते दोन मीटरने खालावली आहे. मार्चपर्यंत त्यांना पाणीटंचाई भेडसावणार नसली तरी एप्रिलमध्ये ऐन उन्हाळ्यात तेथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये चार तर नगरमधील एका तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी पाऊस पडला असून, तेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवणार आहे. १७ तालुके असे आहेत जेथे सरासरीच्या ५० ते ७० टक्केच पाऊस पडला आहे. त्यापैकी सर्वाधिक ११ तालुके जळगाव जिल्ह्यातील आहेत. १६ तालुक्यांमध्ये ७० ते ८० टक्के पाऊस पडला तर, ११ तालुक्यांमध्ये ८० ते १०० टक्के पाऊस पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे पाणी संघर्ष आतापासूनच सुरू झाला आहे. वरील धरणांमधून पाणी पळविण्याचे सत्रही सुरू झाले असून जिल्ह्यांमध्ये संघर्ष पेटण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीच्या वैभवने मोडला युवीचा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या टी-२० मालुसरे क्रिकेट चषक स्पर्धेत दिंडोरी क्रिकेट अकादमीच्या वैभव केंदळे याने क्रिसेंट संघाविरुद्ध अवघ्या ११ चेंडूंत अर्धशतक ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली. यात त्याने एका षटकात सहा षटकारांचीही आतषबाजी केली. टी-२० स्पर्धेतील हे जगातील सर्वांत वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम युवराजसिंगच्या नावावर होता. त्याने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध डर्बनमध्ये १२ चेंडूंत सर्वांत जलद अर्धशतक ठोकले होते.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर क्रिसेंट संघाविरुद्ध दिंडोरी क्रिकेट अकादमीचा टी-२० सामना झाला. त्यात प्रथम फलंदाजी करताना दिंडोरी क्रिकेट अॅकॅडमीने केवळ २० षटकांत कर्णधार वैभव केंदळेच्या धडाकेबाज अर्धशतक व मुन्ना शेखच्या शतकाच्या जोरावर २७४ धावांचा डोंगर उभारला. वैभवने सहा षटकारांची किमया क्रिसेंट संघाच्या मुनाफ शेखच्या षटकावर साधली. मुनाफचं हे षटक तूरडाळीपेक्षा महाग ठरलं. या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावरच दिंडोरीने क्रिसेंट संघाचा ११९ धावांनी दणदणीत पराभव केला.

अष्टपैलू वैभव

गेल्या एक दशकाहून अधिक काळ विविध स्तरावर वैभव केंदळे अष्टपैलू कामगिरी करीत असून, सध्या एमएसडीसीएलमध्ये तो कर्मचारी आहे. टी-२० मालुसरे क्रिकेट चषकाबरोबरच ५० षटकांचे मान्सून लीगचेही सामने सध्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान व महात्मानगर क्रिकेट मैदानावर रंगत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागांचे भाव कमी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी परिसरात निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतींमध्ये एमआयडीसीच्या वतीने उद्योगांना देण्यात येणाऱ्या जागांचे भाव छोट्या उद्योजकांच्या आवाक्यात बाहेर आहेत. अद्याप प्लॉट अलॉटमेंटही झालेली नसताना सुरुवातीच्या काळात देण्यात आलेला सवलतीचा भावही उद्योजकांच्या आवाक्यात नाही. हा भाव कमी करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी झूम (जिल्हा उद्योग मित्र) च्या बैठकीत उद्योजकांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात 'झूम' ची बैठक पार पडली. नाशिक परिसरातील उद्योजकांसमोर बारमाही आव्हान बनलेल्या वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधांसमोर प्रश्नांची मांडणीही या बैठकीत पुन्हा झाली. दिंडोरील अक्राळे परिसरात उभारल्या जाणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील सुमारे ५०० एकर जागेमध्ये नवे उद्योग प्रस्तावित आहे. या परिसरात सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत जागेसाठी सुमारे २३०० रुपये स्क्वेअर फूट भाव जाहीर करण्यात आला आहे. ही सवलतीची मुदत डिसेंबरनंतर संपुष्टात येत आहे. या दरम्यान हा भाव सुमारे तीन हजारांपेक्षाही अधिक होणार आहे. सवलतीच्या दरातील भावच उद्योजकांच्या आवाक्यात नाही तर पुढील कालावधीत उद्योगांसाठी जागेत गुंतवणूक कशी करणार, असा सवाल उपस्थित करीत उद्योजकांनी या जागेचा भाव किमान १५०० रुपये स्क्वेअर फूट करावा, अशी मागणी केली.

दिवाळीस सुरुवात होऊनही सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये पथदीप कार्यरत नाहीत. या कालावधीत येथे वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी हे पथदीप त्वरित कार्यरत करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत महावितरणच्या वतीने आश्वासनही देण्यात आले.

याशिवाय इएसआयसी रुग्णालयाकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दर्जाहीन सेवेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. इएसआयसी रुग्णालयाने कारभार सुधारावा, अशा कानपिचक्याही या विभागाला बैठकीत देण्यात आल्या. याबरोबरच औद्योगिक परिसरातील चौकांचे वाईंडिंग, वाडीवऱ्हे परिसरातील उद्योगांसाठी रस्त्यांची दुरुस्ती, गोंदे परिसरातील उद्योगांना पायाभूत सुविधा, पळसे येथील पंपिंग स्टेशनला सुरळीत वीजपुरवठा, महावितरणचे तक्रार केंद्र पूर्वरत करण्याची मागणी आदी मुद्दे या बैठकीत उपस्थित झाले.

उद्योगाच्या पाण्यात कपात नाही

जिल्ह्यातील उद्योगांसाठी देण्यात येणाऱ्या पाण्यात कपात केली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. एन. जोशी, कार्यकारी अभियंता पी. आर. बंडोपाध्याय, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, व्हिनस वाणी, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, तसेच विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२३ कोटींचे पाणी वाया

$
0
0

जलचिंतनचा आरोप; मराठवाड्याला पाणी सोडणे पडते महागात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्याला पाणी देण्याचा सरकारचा अट्टहास असला तरी तब्बल ११.५ टीएमसी एवढे पाणी हे बाष्पीभवन आणि वहनाद्वारे (ट्रान्झिट लॉस) नष्ट होणार आहे. त्यामुळे या पाण्याचे आजचे बाजारमूल्य २२३ कोटी रुपये एवढे आहे. प्रत्यक्षात मौल्यवान पाणी मराठवाड्याच्या नावाखाली आपण वाया घालवित आहोत, असा आरोप जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भात जलचिंतनसह विविध संस्थांच्या याचिका फेटाळून लावल्या. गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय योग्यच असल्याचे प्राधिकरणाने निकालात म्हटले आहे. मात्र, प्राधिकरणानेही वस्तुस्थिती लक्षात घेतली नसल्याचे जाधव यांनी सांगितले. खरिपात गंगापूर समूहात १७.२६ दलघमी इतका पाणीवापर (६१० दलघफू) सिंचनास देय असताना ते पाणी शेतीस न देता सिंहस्थासाठी वापरण्यात आले. त्यामुळे बचत करून गंगापूर डावा तट कालव्याच्या लाभधारकांवर खरीप हंगामात अन्याय झाला.
याशिवाय रब्बीस पाणी न देण्याचे प्राधिकरणाचे आदेश आहेत. त्यामुळे नाशिक, निफाड तालुक्यातील द्राक्ष शेती उद्ध्वस्त होणार असल्याचे जाधव यांनी नमूद केले.

हायकोर्टात बाजू मांडू

जायकवाडी धरणात जे काही पाणी गंगापूर आणि दारणा धरण समूहातून दिले जात आहे. ते अव्यवहार्यच आहे. यासंदर्भातील पुराव्यासह बाबी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिल्या. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने येत्या १८ नोव्हेंबर रोजी हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडू, असे जाधव यांनी सांगितले.


जायकवाडी प्रकल्प बशीसारखा पसरट असून, त्यामुळे येथे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. वर्षभरात प्रकल्पात ६६४.८३ दलघमी (२३.५० टीएमसी) पाणी बाष्पीभवनात खर्च होते. हे बाष्पीभवन वरच्या भागातील गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, दारणा, भावली, वालदेवी, मुकणे या प्रकल्पांच्या उपयुक्त साठ्याइतके आहे. या प्रकल्पासाठी वरून धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या १२.८४ टीएमसी पाण्यामधून ४.५० टीएमसी इतके पाणी वाया जाणार आहे. सदरचा साठा ओझरखेड, पुणेगाव, पालखेड, तिसगाव या धरणांच्या साठ्याइतका आहे. प्रकल्पाचे पाण्याचे समन्यायी वाटप करताना फायदे-तोटे न बघता निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मराठवाड्याला पाणीच द्यायचे असेल तर त्यासाठी थेट जलवाहिनी करणे गरजेचे आहे. यामुळे बाष्पीभवन आणि वहन क्षय कमी होईल. त्यासाठी सरकारला २०६६ कोटी रुपये खर्च करावे लागतील. पण, त्यापोटी दरवर्षी होणारा २२३ कोटी रुपयांचा खर्चही वाचविता येईल. विशेष म्हणजे, हे केवळ बाजारमूल्य आहे. दुष्काळात तर पाण्याचे महत्त्व अधिकच आहे. ही सारी परिस्थिती सरकारने लक्षात घेतली नाही तर येत्या काळात पाण्यावरून युद्ध होण्याची भीती नाकारता येत नाही, असा इशारा जाधव यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिधापत्रिकांसाठी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या कुटुंबीयांना तत्काळ नवीन शिधापत्रिका मिळाव्यात, द्रारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकेसाठी फेरसर्वेक्षण करून निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.

भारतीय जनता पक्षाचे डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शेषराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीवर घोषणाबाजी करीत मोर्चा काढला. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांना शिधापत्रिका मिळालेल्या नाहीत. म्हणून नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणी येत आहेत. स्वस्त धान्य खरेदीबरोबरच शासकीय योजनांपासून खरे लाभार्थी वंचित आहेत. सन १९९७ पासून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण झालेले नाही. १७ ते १८ वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेनंतर अनेकांची आर्थिक परिस्थिती बदलल्याने सर्व्हेक्षणात पारदर्शकता राहिलेली नाही. खऱ्या लाभार्थ्यांऐवजी धनदांडग्यांना लाभ मिळत आहे. यामुळे शिधापत्रिका मिळण्यासाठी स्वतंत्र शिबिराचे तालुक्यात आयोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या मोर्चात डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शेषराव पाटील, शरद सावंत, रमेश अहिरे, दिलीप पवार, लक्ष्मण अहिरे, गंगाधर अहिरे, रमेश सोनवणे, राजेंद्र अहिरे, निंबा अहिरे, अशोक बोरसे, संदीप सावळा, सुरेश महाजन, किरण ठाकरे, दिलीप पवार, दीपक भामरे आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचे दर्शन होईना!

$
0
0



शहरासह ग्रामीण भागही वाऱ्यावर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असताना आणि जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न पेटला असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे महिनाभरापासून जिल्ह्यातून गायब आहेत. जागतिक इव्हेंट असलेल्या सिंहस्थाचे श्रेय घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागाकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाकडे तर पालकमंत्र्यांनी चक्क नऊ महिन्यांपासून पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

जिल्ह्यात पाण्याचा भडका उडाला असताना आणि दीड हजार कोटीची शेतीच धोक्यात आली असतानाही पालकमंत्र्यांनी साधी पाणीवाटपाचीही बैठक घेतली नसल्याने त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने उद्धवस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी कमी पावसाने संकटात आणले आहे. धरणांचा व पावसाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात पाऊस कमी पडून धरणेही अर्धवट भरली. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे ही नाशिक जिल्ह्यात असून, राज्य सरकारने दीड हजारपेक्षा जास्त गावे टंचाईग्रस्त जाहीर केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली असतानाच जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेती ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. पाणी न मिळाल्यास जवळपास दीड ते दोन हजार कोटीचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दुसरीकडे कमी पावसामुळे पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. नाशिक शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू असून, ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई आहे.

ग्रामीण भागाची स्थिती भयावह असताना जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारे राज्याचे जलसंपदा मंत्री हेच महिनाभरापासून गायब आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये मुक्काम ठोकून असलेले पालकमंत्री आठ ऑक्टोबरनंतर फिरकलेलेच नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय हा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. त्यामुळे पालकत्वाच्या आशीर्वादानेच जिल्ह्यातील जनतेला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. सिंहस्थांनतर शहरातून आजतागायत गायब आहेत. जिल्ह्यात व शहरात पाणी सोडण्याविरोधात तीव्र आंदोलन व वातावरण तयार झाले असतानाही ते नाशिकमध्ये फिरकले नाहीत. शेतकऱ्यांचे पाणी त्यांच्या डोळ्यासमोर वाहून जात असताना त्यांची समजूत काढण्यासाठी सुद्धा पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. विशेष पाणीवाटपाची बैठक ३१ ऑक्टोबरपूर्वी घेणे बंधनकारक असतानाही ही बैठक न घेताच त्यांनी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले. त्यामुळे जिल्ह्यातील पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागा संकटात आल्या आहेत. याउलट शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून पालकमंत्र्यांनी पाणीवाटपाची बैठक पुढे ढकलल्याने शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप आहे.

... तर शेतकऱ्यांसाठी का नाही!

सिंहस्थ कुंभमेळ्यात अर्धा टीएमसी पाणी सोडले जाते. मात्र, ज्या पिकांवर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो, त्या पिकांसाठी पाणी का, सोडले जात नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सिंहस्थासाठी उधळपट्टी चालते, मग शेतकऱ्यांच्या पिकासाठी का चालत नाही, असा प्रश्न विचारत मराठवाड्याप्रमाणेच आम्हीपण माणसेच आहोत, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन हे एप्रिलपासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दुःख ऐकायला सुद्धा आले नाहीत. नऊ महिन्‍यात एकदाही फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

पाणी आरक्षण, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हास्तरावरील इतर वैधानिक समित्यांच्या बैठकींना जर पालकमंत्र्यांना मुहूर्त मिळत नसेल तर, त्यांच्याकडून नाशिककरांनी वेगळी काय अपेक्षा करावी. नाशिकचे हक्काचे पाणी पळविल्याने जिल्ह्यावर पाण्याचे भीषण संकट असताना नाशिककरांकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत इतके बेफिकीर असलेले पालकमंत्री शोधून सापडणार नाहीत.

- जयंत जाधव, आमदार, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजीव गांधी भवनसमोर चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राजीव गांधी भवनशेजारील तनिष्क ज्वेलर्स शोरूमसमोर घडली. फिर्यादी महिला रस्त्याने पायी जात असताना मोटरसायकलवर आलेल्या दोघा भामट्यापैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पोबारा केला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी असताना चोरटे स्नॅचिंगची हिंमत करीत असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीनिमित्त शहरात दोनवेळा पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली पाणीकपात आठ दिवसासाठी शिथिल केली असून, शहरात आता काही भागात दोनवेळा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दिवाळीत नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महापौरांच्या आदेशानंतर हा पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

गंगापूर धरणात ७१ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवू नये, याकरिता महापालिकेने ९ ऑक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने वेळापत्रक तयार केले होते. शहराला प्रतिदिन ४१० दशलक्ष लिटर्स पाणी लागते. त्यानुसार गंगापूर धरणातून प्रतिदिनी सुमारे १४.५० दलघफू पाणी उचलले जाते.

पाणीकपात लागू केल्यानंतर महापालिकेकडून ३५० दशलक्ष लिटर्स म्हणजे १२.५० दलघफू पाणी उचलणे सुरू केले. वेळापत्रकानुसार काही भागात सकाळी, तर काही भागात दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला. त्यातून दोन दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होत होती. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांना ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे.

दिवाळी सणात तरी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. यामुळे शहरातील नागरिकांनी निःश्वास सोडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वेकडील शेतकऱ्यांचा बायपासला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचा बायपास वळण रस्ता पूर्वेकडून न होता पश्चिमेकडून करण्यात यावा, या आशयाचे निवेदन पूर्वेकडील बाधीत शेतकऱ्यांच्या वतीने बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना देण्यात आले.

सटाणा शहर वळण रस्त्यासाठी २५ ते ३० वर्षांपूर्वी पूर्व बाजूकडून नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याचे काम आजतागायत सुरू होऊ शकलेले नाही. या कालावधीत या मार्गावर रहिवाशी घरे, एनए ले आऊट झाले आहेत. तसेच बऱ्याचशा भागात शेती उपयुक्त काळ्या जमिनीचे शिवकालीन पाटस्थळ असून, ४० ते ५० विहिरींचा समावेश होतो. त्यांचे नुकसान होणार आहे. परिणामी नैसर्गिक व आर्थिक संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. याची शासनाला जाणीव करून देण्यात आल्याने दि. २३ जानेवारी १३ रोजी शासनाने पूर्वेकडील बायपासला स्थगिती दिली आहे. निवेदनावर भिका सोनवणे, बाजीराव पाटील, सोमनाथ येवला, कौतिक सोनवणे, भास्कर सोनवणे, रेवजी सोनवणे, बुधाजी खैरनार, शिवाजी खैरनार, प्रदीप सोनवणे, कैलास सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑफीस फोडून कम्प्युटर चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील महापालिकेच्या गाळ्यांमधील ११ नंबरच्या गाळ्याचे शटर उचकटून चोरट्यांनी ऑफीसमधील ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. यात कम्प्युटर आणि रोख पैशांचा समावेश आहे. ऑफीस फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी ऑफीस मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ४५ कर्मचारी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पवार इलेक्ट्रो सिस्टीम आणि सातपूर व औद्योगिक कामगार सेना यांच्यात पगारवाढीचा करार नुकताच करण्यात आला. या करारांतर्गत ४५ कर्मचाऱ्यांना कंपनीच्या सेवेत कायम करण्यात आले. कर्मचाऱ्यांना ११ हजार रुपये वेतन करण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यापासून अकुशल, अर्धकुशल, कुशल कामगारांना ३३५० रुपये, २५,४०० रुपये व ११,४०० रुपये असा पगारातील फरक देण्यात येत आहे. याशिवाय बेसिक व विविध अलाऊन्‍समध्ये सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रजा, पगारी सुट्या, पगारी सुट्या, युनिफॉर्म, अॅडव्हान्स पगाराची सुविधा, कर्ज आदी सवलतीही मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ऐन दिवाळीत कायम करण्याचा कंपनी व्यवस्थापनाने निर्णय घेतल्याने तसेच फरकही मिळाल्याने कामगारांची दिवाळी यावर्षी अधिक गोड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक


भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सचिन वामन शिंदे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. अपघाताची घटना राजराजेश्वरी चौक ते सैलानी बाबा चौक रोडवरील शिक्षक कॉलनी कॉर्नर येथे रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी सचिन शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी सचिन शिंदे आपल्या भावासमवेत (एमएच १५ सीएल ८०३१) दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या दुचाकीने (एमएच १५ एफए २४७०) त्यांना जोराची धडक दिली. यात सचिन यांच्या डोक्याला जबर मार लागला.

अपघातानंतर धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी शिंदे यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी फरार झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसेवा पॅनलचे वर्चस्व

$
0
0

सोसायटी चेअरमनपदाची निवडणूक

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत जनसेवा पॅनलने बाजी मारत विरोधी स्वाभिमानी पॅनलचा धुव्वा उडवला. संस्थेच्या सर्वच्या सर्व १२ जागांवर विजय मिळवित जनसेवाने सोसायटीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

ज्ञानेश्‍वर खोकले, विद्यमान चेअरमन दत्तू खोकले, रंगनाथ भोरकडे, सरपंच आत्माराम भोरकडे, विजय भोरकडे, गणेश खुटे, आसाराम खोकले, शाहदू वाघ यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलला निवडणुकीपूर्वीच एक जागा बिनविरोध मिळाली होती. बारा जागांवर झालेल्या निवडणुकीत विनायक भोरकडे, नारायण भोरकडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. सर्वसाधारण गटातील आठ जागांवर जनसेवा पॅनलचे साईनाथ नारायण खोकले, साईनाथ बाळकृष्ण खोकले, आप्पा गायकवाड, रंगनाथ भोरकडे, प्रकाश देशमुख, भागवत भोरकडे, अशोक भोरकडे, पुंजाहरी ढिकले हे विजयी झाले. महिला राखीव गटातील दोन जागांवर मंदाबाई भोरकडे, पार्वताबाई खोकले, इतर मागास प्रवर्ग गटातून दत्तू भोरकडे तर अनुसूचित जाती जमाती गटात जयप्रकाश वाघ हे जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

राजापूर येथे

प्रगतीला साथ

येवला : तालुक्यातील राजापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणुकीत प्रगती पॅनलला आठ जागा तर, प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले.

बारा जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. माजी सरपंच परशराम दराडे, एकनाथ वाघ, रमेश वाघ, दिनेश आव्हाड, रामदास जाधव, लक्ष्मण घुगे, एकनाथ आव्हाड यांचे प्रगती पॅनल, तर पंचायत समिती सदस्य पोपट आव्हाड, कैलास मुंडे, शिवाजी बोडखे, अशोक आव्हाड यांचे शेतकरी विकास पॅनल होते. जनजागृती पॅनलचे नेते विजय सानप, अशोक मुंडे यांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही. अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. सुरुवातीला निवडणूक बिनविरोध होण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, प्रयत्न फेल गेल्याने निवडणूक झाली. दोन्ही पॅनलमध्ये महत्त्वाचे उमेदवार पराभूत झाल्याने गावात शांतता निर्माण झाली होती.

या निवडणुकीत प्रगती पॅनलचे विजयी उमेदवार दिनेश आव्हाड (४०४), परशराम दराडे (३७१), अशोक वाघ (३५०), नवनाथ वाघ (३३८), लहानु आव्हाड (३३७), बबन वाघ (३३४), महिला राखीव गटातून पार्वताबाई अलगट (३८७), इतर मागास वर्गातून भाऊसाहेब आगवण (३७३) हे विजयी झाले. शेतकरी विकास पॅनलचे सर्वसाधारण गटातून पोपट आव्हाड (३५०), शिवराम वाघ (३६१), विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून प्रमोद बोडखे (३४५), महिला राखीव गटात कमळाबाई रामदास घुगे (३३७) हे विजयी झाले. निवडणुकीपूर्वी शिवाजी जाधव बिनविरोध झाले. राजापूर सोसायटी निवडणुकीत परशराम दराडे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले. सोसायटीवर त्यांची सत्ता आली आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.


शेमळीत परिवर्तन

सटाणा : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी विकास सहकारी सेवा सोसाटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम बधान यांच्या परिवर्तन पॅनलने दहा जागा जिंकून यश संपादन केले.

सर्वसाधारण गटातनू शांताराम पंढरीनाथ बधान, विलचंद मांगू वाघ, शिवाजी तुळशिराम जाधव, केवळ रावण जाधव, रामदास गजमल शिंदे, इतर मागास वर्ग गटातून शांताराम पंढरीनाथ बधान, अनुसूचित जाती जमाती गटातून संतोष धोंडू खैरनार, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून दत्तात्रेय भिला खांडेकर, महिला राखीव गटातून कासुबाई मधुकर वाघ, सुशीलाबाई प्रकाश वाघ यांनी विजय संपादन केला. सत्ताधारी गटाचे अरुण खंडू पाटील व लक्ष्मण आंनदा वाघ यांना दोन जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. मुसळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संसरी उपसरपंचपदी गोडसे बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

संसरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल परशराम गोडसे यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पध्दतीने संतोष गोडसे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नियमानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच निर्मला गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत सदस्य अनिल गोडसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. बैठकीस युवराज गोडसे, संजय गोडसे, कांताबाई गोडसे, अंजना गोडसे, सुनिता गाडेकर, संजना गुंबाडे, सविता गोडसे, कैलास गायकवाड, विनोद गोडसे, संध्या कटारे, एच. एस. गायकवाड उपस्थित होते. माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या हस्ते गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणी आरक्षण, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हास्तरावरील इतर वैधानिक समित्यांच्या बैठकींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. नाशिकचे हक्काचे पाणी पळविल्यामुळे जिल्ह्यावर पाण्याचे भीषण संकट असताना नाशिककरांकडे दुर्लक्ष केलेले आणि जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत इतके बेफिकीर असलेले पालकमंत्री शोधून सापडणार नाही, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आमदार जयवंत जाधव यांनी केली आहे.

आमदार जाधव यांनी पुढे म्हटले आहे की, राज्याचे जलसंपदा मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. मात्र ते पाणी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याने जिल्ह्याचे पाणी आरक्षित न करताच जायकवाडीला पाणी सोडण्याचा पराक्रम त्यांनी केला. जिल्ह्यातील पाणी आरक्षणासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑक्टोबर पूर्वी बैठक घेऊन त्याला अंतिम रूप दिले जावे, असा शासन निर्णय आहे. मात्र, नोव्हेंबर महिना संपत चालला तरी बैठकीबाबत संदिग्धता कायम आहे. गंगापूर आणि दारणा समूहातून ४.६० टीएमसी पाणी सोडण्यात आले. गंगापूरधरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होण्यापूर्वी जर आरक्षणाची बैठक घेऊन पाण्याचे आरक्षण निश्चित झाले असते तर कदाचित नाशिकचे पिण्याचे, उद्योगांचे पाणी आणि जिल्ह्यातील इतर योजनांचे पाणी यांची आकडेवारी किमान पालकमंत्र्यांना कळली असती आणि काही अंशी तरी पाणी वाचले असते.

पाणी राखण्यासाठी जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले. सिंहस्थामध्ये पाण्यात डुबकी मारणारे पालकमंत्री गेल्या महिनाभरापासून गायब आहेत. सिंहस्थात देखील नाशिककरांचा हिरमोड करण्यात आला. जागतिक दर्जाच्या या उत्सवाचे नकारात्मक ब्रँडिंग करून पर्यटकांच्या रूपाने नाशिकला पर्यायाने राज्याला मिळणारा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आला.

नाशिककर पाण्याच्या संकटात असतांना तुम्ही बोस्टनला जाता म्हणजे, 'रोम जळत असताना निरो पियानो वाजवीत होता' अशी यांची अवस्था झाली आहे. बोस्टनवरून परतल्यानंतर सुद्धा नाशिकला येण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासारख्या संवेदनशील विषयांवर पालकमंत्री गंभीर नसल्याने त्यांना नाशिककारांशी काही देणेघेणे नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे, असे आमदार जाधव यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंड ठोठावूनही नियम धाब्यावर

$
0
0

महिन्याकाठी आठ लाखांची वसुली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होते. गेल्या दहा महिन्यात बेशिस्त वाहनचालकांकडून पोलिसांनी ८१ लाख ३२ हजार ७०० रुपये वसूल केले. महिन्याकाठी सरासरी आठ लाख रुपयांची वसूल होऊन सुध्दा बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण कमी झालेले नाही हे विशेष.

प्रवेशबंद मार्गाने वाहन घुसवणे किंवा सिग्नल न जुमानने याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसते. या कलमाचा भंग करणाऱ्या १३ हजार ७०७ वाहनचालकांकडून शहर पोलिसांनी सर्वाधिक म्हणजे १३ लाख ७० हजार ७०० रुपये वसूल केले. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, अनेकदा वाहनचालक शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. उड्डाणपुलावरून खाली येण्यासाठी एक मार्ग आखून दिलेला असताना वाहनचालक दुसऱ्याच मार्गाने बाहेर पडतात. यामुळे अपघाताचा धोका कायम असल्याने अशा ठिकाणी सातत्याने कारवाई होते.

सध्या, इंदिरानगर अंडरपास बंद केल्यामुळे अनेक वाहनचालक हायवेवर उलट्या दिशेने प्रवास करताना दिसतात. दंडात्मक कारवाई झाली तर नियम तोडणाऱ्या वाहनचालकांची संख्या कमी नाही, असे संबंधित कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. कागदपत्रे जवळ बाळगत नसलेल्या वाहनचालकांची संख्या सुध्दा मोठी आहे. पोलिसांनी तब्बल १३ हजार ४९६ वाहनचालकांवर कारवाई करीत गत दहा महिन्यात ११ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. यातून फ्रंट सिट प्रवासी बसवणाऱ्या रिक्षाचालकांना पोलिसांनी रडारवर घेतले. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ७ हजार ५६१ रिक्षाचालकांना १०० रुपयाप्रमाणे ७ लाख ५६ हजार १०० रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.

परवान्याची समस्या कायम

विविध सिग्नल किंवा इतर रस्त्यावर पोलिस वाहनचालकांना थांबवून लायसन्स तपासतात. पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी लायनन्स नसलेल्या वाहनचालकांची संख्या कमी होताना दिसत नाही. चालू वर्षात ११ हजार ९१ वाहनचालकांकडे लायनन्स नसल्याची बाब समोर आली. या वाहनचालकांकडून पोलिसांनी ११ लाख ९१ हजार रुपये वसूल केले.


बेशिस्त रिक्षाचालकांवर लक्ष

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बेशिस्त रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट होऊ नये, याची काळजी पोलिसांनी घेतली. युनिफॉर्म नसणे, स्टॉप सोडून रिक्षा उभी करणे, फ्रंट सिट बसवणे या मोटारवाहन कलमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांकडून अनुक्रमे ८ लाख ७५ हजार ९००, १ लाख ७१ हजार १०० आणि ७ लाख ५६ हजार १०० इतका दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, प्रवाशांशी गैरवर्तन करणे, प्रवाशांना जादा भाडे आकरणे, बॅच न लावणे आदी कारणांसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
केसेसची संख्या

७६ हजार ६७५

दंड वसूल

८१ लाख

३२ हजार ७००



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजकीय नेत्यांना संगीतात आस्था नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजकीय नेत्यांमध्ये संगीताविषयी आस्था फारशी दिसत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी संगीताची अनुभूती घेतल्यास बिघडलेली हार्मनी पुन्हा येण्यास मदत होईल, असे उद्गार प्रख्यात बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांनी काढले.

फ्ल्यूट फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त ते नाशिकमध्ये आले असता त्यांनी संवाद साधला. पुढे ते म्हणाले की, सरकारने ज्या प्रमाणात संगीतासाठी कार्य करायला हवे, त्या प्रमाणात होत नाही. पूर्वी आकाशवाणी केंद्रांवर कलाकारांना मान होता. त्यांना पुरेसे मानधन मिळत असे. मात्र, सध्या सरकारने कलाकारांची नेमणूक करणेच बंद केले आहे. त्यामळे येणाऱ्या काळात कसे कलाकार तयार होतील, याबाबत शंका निर्माण होते, अशी त्यांनी खंत व्यक्त केली. पुरस्कार वापसी विषयी म्हणाले तो माझा प्रांत नाही आणि त्याबद्दल मी बोलणार नाही. ज्यांनी पुरस्कार परत दिले त्यांना याबाबत विचारायला हवे.

विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर संगीत हा विषय सक्तीचा करावा. यातून चांगले कलाकार नाही परंतु, चांगले श्रोते निर्माण होण्यास निश्चित मदत होईल. आज अनेक ठिकाणी वेस्टर्न कार्यक्रमांना चांगली गर्दी होते. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना फारशी गर्दी होताना दिसत नाही. त्याकरिता कॉर्पोरेट कंपन्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांनी नमूद केले. वाढत्या प्रदूषणाबद्दल ते म्हणाले की, निर्सगाचे चक्र बदलत चालले आहे. निर्सगाची हार्मनी देखील बिघडत चालली आहे. आपणच प्रयत्न केल्यास ती टीकू शकते. प्रदूषणाबाबत प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल केल्यास नक्कीच परिस्थितीत बदलू शकते. दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या सोबत त्यांचे सुपूत्र राकेश चौरसिया, तबल्यावर सत्यजीत तळवलकर होते. त्यांनी या कार्यक्रमात आपली कला पेश केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीबंद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरातील अतिमहत्त्वाची सेवा असलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या ठेकेदाराकडून आजतागायत वेळेवर सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यातच वाढीव वेतन देखील ठेकेदार देत नसल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांनी महापालीकेसमोर अनेकदा आंदोलन केले आहेत. दरम्यान, मंगळवारी १० नोव्हेंबर कर्मचाऱ्यांनी घंटागाड्याच सातपूर क्लब हाऊसवर लावत घंडागाडी बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनात शहरातील सर्वच घंटागाडी चालक व कर्मचारी सहभागी झाले होते.

कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या आश्वासनानंतर घंटागाडी बंद आंदोलन मागे घेण्यात आले. यात महापालिका व ठेकेदारावर घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर सुविधा देत नसल्याने कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही जाधव म्हणाले. घंटागाडी बंद आंदोलन झाल्याने शहरातील ठिकठिकाणी पडलेला कचरा व रहिवाशांचा कचरा उचलणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी घंटागाडी कर्मचारी संघटनेशी बोलणी करत महापालिका व ठेकेदाराकडून वेतन व बोनस मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यावर घंटागाडी बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घेत दुपारी साडेबारावाजेला कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या परिसरात फिरवल्या. कामगार उपायुक्त जाधव यांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन व बोनस महापालिका व ठेकेदार यांनी न दिल्यास गुन्हे दाखल करणार आहे. सरकारच्या नियमानुसार ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन व बोनस देण्याबाबत सांगणार असल्याचेही जाधव म्हणाले.

ठेकेदाराला महापालिकेकडून अभय

घंटागाडी संघटनेचे महादेव खुडे यांनी देखील कामगार उपायुक्तांच्या आश्वासनानंतर कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्या परिसरात पाठविण्यात आल्याचे म्हणाले. परंतु, महापालिका घंटागाडी ठेकेदाराला पाठिशी घालत असल्यानेच ठेकेदार मुजोर झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनाच महापालिका वेळेवर वेतन देण्यास असमर्थ ठरत असल्याने पुढील काळात स्वप्न पहात असलेल्या स्मार्टसिटी नक्कीच प्रत्यक्षात होईल का, असा देखील सवाल खुडे यांनी उपस्थित केला.

घंटागाडी आंदोलकांवर गुन्हे दाखल

किमान वेतनासाठी अनेक दिवसापांसून आंदोलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आपले आंदोलन तीव्र केले. पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व विभागात घंटागाड्या अडवत कचरा गोळा न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे ऐन दिवाळीत अस्वच्छतेला सामोरे जावे लागण्याच्या भितीने प्रशासनाच्या वतीने या आंदोलनाकवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. भद्रकाली, पंचवटी व नाशिकरोड पोलिसात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे ऐन दिवाळीत बोनस व वेतनसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

घंटागाडी कर्मचाऱ्यांना शासन आदेशाप्रमाणे किमान वेतन द्यावे असे आदेश काढण्यात आले आहे. मात्र, या आदेशावरून कामगार आयुक्तालय, महापालिका व ठेकेदार यांच्यात कामगारांचा फुटबॉल करण्यात आला आहे. महापालिकेन आदेश देवूनही ठेकेदार किमान वेतन देत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी कर्मचाऱ्यांनी घंटागाड्या अडवत त्या बाहेर जाण्यापासून थांबवल्यात. त्यामुळे सकाळी शहरात अनेक भागात घंटागाड्या पोहचल्या नाहीत. त्यामुळे अस्वच्छतेचे वातावरण पसरले. महापालिकेनही प्रकरण मिटवण्याऐवजी आक्रमक पवित्रा घेत, या कर्मचाऱ्यांच्या विरोधात, पंचवटी, नाशिकरोड, भद्रकाली पोलिसात तक्रारी दाखल केल्यात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अधिक असंतोष पसरला आहे. ऐन सनासुदीत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याऐवजी प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यावर पदाधिकारीच आश्चर्य व्यक्त करत आहेत. सणासुदीत त्यांना मदत करणे अपेक्षित असतांना, वाद वाढविणे योग्य नसल्याचा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images