Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

झाडांना मिळाले पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

तहानेने व्याकूळ झालेल्या जेलरोडच्या दुभाजकांमधील अनेक झाडांनी माना टाकल्यानंतर अखेर त्यांना पाणी मिळाले. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे टँकरने त्यांना पाणी देण्यात आले.

जेलरोडला बिटकोपासून दसकपर्यंतच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली आहेत. उद्यान विभागाने तसदी नको म्हणून बरीचशी झाडे स्वतःहून आली आहेत. त्यामुळे त्यात शोभेएवजी काटेरी, रानटी झुडपे जास्त आहेत. त्यांना नियमित पाणी घातले जात नाही की, कटींग केली जात नाही. भीमनगर समोरील दुभाजकांमधील झाडांनी तर केव्हाच माना टाकल्या आहेत. रखरखीत उन्हाला तोंड देऊन वाचलेल्या आणि तहानेने व्याकूळ झालेल्या झाडांना पाणी देण्यास उद्यान विभागाला अखेर सोमवारी वेळ मिळाला. पाणी मिळाल्याने किमान त्यांची दिवाळी तरी सुखात जाणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

कटिंग अभावी अपघात

जेलरोडला दुभाजकात अनेक ठिकाणी काटेरी झाडे उगवली आहेत. काही झाडे अस्ताव्यस्त फोफावली आहेत. नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाले आहे. शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीच्या वळणावरील काटेरी झाडामुळे वेगाने येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. उद्यान विभागाने फोफावलेल्या झाडांची व्यवस्थित कटिंग करुन वेळोवेळी देखभाल घ्यावी अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहितगावात राजगडची निर्मिती

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

आपला ‌इतिहास जागविण्याची त्यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर असते. दीपोत्सवात असाच इतिहास जाणून घेण्याचा, तो समजावून घेण्याचा प्रयत्न किल्ले बनविण्यातून केला जातो. विहितगावमध्ये चिमुकल्यांनी किल्ले राजगड साकाराला आहे.

दिवाळी म्हटलं की आठवतात ते मातीचे किल्ले. शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की मुलं एकत्र जमून किल्ला बनविण्यासाठी सारा खटाटोप करता​त आणि हा किल्ला बनवताना प्रत्येकाचा उत्साह आणि त्यांच्या कल्पकतेला अधिक वाव दिला ​जात असतो,​ किल्ला बांधणे म्हणजे स्वतःच्या मन आणि बुद्धी यांवर ईश्‍वराच्या शक्‍तीचे तेज निर्माण हो​ते अशी परंपरा या महाराष्ट्रात असल्याने विहितगावच्या मथुरा रोडवर राहणाऱ्या तेजस कोठुळे, ओंकार हांडोरे, शाम हांडोरे या शालेय बालकांनी मनावर घेत या दिवाळीला किल्ला बांधण्याचा निर्धार केला. शेण, माती, वीट इत्यादींचा वापर करीत महाराष्ट्राचां गौरवशाली इतिहास सांगणारा रायगड अर्थात राजगड साकारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण लहानपणापासून व्हावे यासाठी महाराष्ट्रात दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकविण्याची प्रथा सुरू झा​ली. या किल्ल्यांमधे आसनावर आरूढ झालेले शिवाजी महाराज, किल्ल्यावर रक्षण करणारे त्यांचे मावळे, तोफा, झाडे -झुडपे अशी आकर्षक मांडणी तसेच त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करण्याची कल्पना ​लहान बालक साकारली आहे.

किल्ले बनवण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली असली तरीही आज किल्ले बनविण्याच्या पद्धतींमध्ये अनेक बदल झाले आहेत. आम्ही माती आणि शेणाच्या आधारानेच हा किल्ला साकारला आहे. - तेजस कोठुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लक्ष्मी’ सुरक्षेसाठी बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडील पैशांची तसेच दागिन्यांची पूजा केली जाते. सर्वत्र तेच वातावरण असल्याने या परिस्थितीचा फायदा चोरटेही घेऊ शकतात. यापार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बंदोबस्तात वाढ केली असून नंतरच्या काळात होणाऱ्या घरफोडी सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

दोन वर्षांपूर्वी उपनगर पोलिसांनी दरोड्याची तयारी करणाऱ्या एका टोळीला अटक केली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन करोडपती व्यवसायिकांच्या घरी दरोडा टाकण्याची त्यांनी तयारी केली होती. यानंतर नुकतेच धुळे जिल्ह्यातील एका गावात १० ते १२ सशस्त्र दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटून नेले. यापार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. याबरोबर, लक्ष्मीपूजनानंतर अनेक कुंटुंब बाहेरगावी पडतात. यामुळे अनेक रहिवाशी इमारती रिकाम्या होतात. याचा फायदा घेत चोरटे दरवर्षी चार ते पाच दिवसात लाखो रुपयांचा ऐवज लंपास करतात. चालू वर्षातील सप्टेंबर महिन्यापर्यंत २९ ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. आतापर्यंत यातील अवघे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. रात्रीच्या घरफोडींची संख्या सुध्दा १८७ च्या पुढे सरकली असून अवघ्या ६३ गुन्ह्यांमधील आरोपींपर्यंत पोहचण्यास पोलिस यशस्वी ठरलेत.

नागरिकांनो, सावध रहा!

सोसायटीसाठी वॉचमॅन नसणे, सोसायटीमध्ये कमी सभासद आणि त्यातील बहुतांश बाहेरगावी जाणे, रस्त्यावर दुचाकी पार्क करून बाहेरगावी जाणे, अशा घटना गुन्हेगारांना निमंत्रण देतात. त्यामुळे घरमालकांनी आपल्या घराची तसेच वाहनाची सुरक्षा पक्की करणे फायद्याचे ठरू शकते, असे मत पोलिस सूत्रांनी व्यक्त केले. पोलिस आपल्यापरीने प्रयत्न करतील; मात्र नागरिकांनी थोडी सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली.

झटपट लोन उपलब्ध

इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंप्रमाणे गाड्यांची बुकींगही जोरात सुरू आहे. गाड्यांच्या खरेदीसाठी अनेक फायनान्स कंपन्या अर्थिक सहाय्य करण्यास तयार असल्याने गाड्यांचा बाजार तेजीत आहे. अवघे काही कागदपत्रे असल्यास ताबडतोब लोन उपलब्ध करून दिले जात आहे. जुन्या गाड्या वितरकांकडून घेतल्या जात आहेत. टू व्हिलरप्रमाणेच चारचाकी गाड्यांच्या मागणीत यंदा वाढ झाल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.

कारवाई

भद्रकालीतील फळबाजाराजवळ अवैधपध्दतीने फटाके दुकान सुरू करणाऱ्या चार व्यवासायिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कारवाईनंतर फटाक्यांचा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार व्यवसायिकांनी भद्रकाली फळबाजारावर महापालिकेची अथवा पोलिसांची कोणतीही मंजुरी न घेता दुकान सुरू केले होते. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी कारवाईस सुरुवात केली. यात काही हजाराचा माल जप्त केल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यवसायिकांविरोधात कलम २८६ नुसार गुन्हा दाखल केला. या कलमानुसार स्फोटक पदार्थ बाळगताना निष्काळजीपणा दाखवून मनुष्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे सिध्द झाल्यास तुरुंगावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

लक्ष्मीपूजन

दिवाळीच्या सणामधील महत्त्वाचा दिवस म्हणजेच अश्विन अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस. धनधान्य, समृध्दी, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णू देवांनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा सांगितली जाते. या दिवशीही सूर्योदयापूर्वी स्नान करण्याला म्हणजेच अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा करुन नवीन वस्त्रे परिधान केली जातात व फटाक्यांची आतषबाजी केली जाते. सायंकाळी लक्ष्मी, श्रीविष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची विधीवत पूजा केली जाते. यावेळी घरातील दागिने, सोने तसेच चांदीच्या वस्तू, कुंचा, सूप, पैसे यांचेही पूजन केले जाते. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, खवा, पाच फळे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते असे मानले जाते. त्यामुळे घरोघरी ही पूजा केली जाते. पहाटे तसेच रात्री दीपोत्सव केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादर-भुसावळ सुपरफास्ट ट्रेन

$
0
0

नाशिक : दिवाळी सुट्टीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधेसाठी मध्य रेल्वेतर्फे दादर ते भुसावळदरम्यान सहा सुपरस्फाट स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. अप आणि डाउन मार्गावर प्रत्येकी ३-३ गाड्या चालविण्यात येणार आहेत. दादर-भुसावळ सुपरस्फाट स्पेशल (गाडी क्र. ०१०८१) ही १३, २० आणि २७ नोव्हेंबर रोजी रा. ९.४५ वा. सुटणार असून भुसावळला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१०८२ गाडी भुसावळ-दादर सुपरस्फाट ही १४,२१, २८ नोव्हेंबर रोजी स. ८.३५ वा. सुटणार असून दादरला त्याच दिवशी दु. ४.२० वा. पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, चाळीसगाव येथे थांबा देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकार बदलते; बदल स्व‌ीकारायला हवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पुरस्कार ज्यांनी परत केले त्यांना त्याबाबत जाब विचारायला हवे, मी काही पुरस्कार परत केला नाही. 'दर पाच वर्षांनी सरकार बदलते. झालेला बदल स्वीकारायला हवा. त्यामुळे मी याबाबत जास्त काही बोलणार नाही.' असे प्रतिपादन पद्मविभूषण व प्रख्यात बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांनी केले.

फ्ल्यूट फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या 'अर्ध्य' या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते शहरात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 'मोदी सरकारच्या कार्यपध्दतीला कंटाळून अनेक साहित्य‌किांनी पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत बोलतांना पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया म्हणाले की, 'याबाबत मी काही जास्त व्यक्तव्य करु शकणार नाही. तो माझा प्रांत नाही. ज्यांनी पुरस्कार परत केले त्यांना विचारणे सोयिस्कर ठरेल.'

...तर हार्मनी पुन्हा येईल!

राजकीय नेत्यांमध्ये संगीताविषयी आस्था फारशी दिसत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी संगीताची अनुभूती घेतल्यास बिघडलेली हार्मनी पुन्हा येण्यास मदत होईल, असे चौरसिया यांनी काढले. 'सरकारने ज्या प्रमाणात संगीतासाठी कार्य करायला हवे, त्या प्रमाणात होत नाही. पूर्वी आकाशवाणी केंद्रांवर कलाकारांना मान होता. त्यांना पुरेसे मानधन मिळत असे. मात्र, सध्या सरकारने कलाकारांची नेमणूक करणेच बंद केले आहे. त्यामळे येणाऱ्या काळात कसे कलाकार तयार होतील, याबाबत शंका निर्माण होते, अशी त्यांनी खंत व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर संगीत हा विषय सक्तीचा करावा. यातून चांगले कलाकार नाही परंतु, चांगले श्रोते निर्माण होण्यास निश्चित मदत होईल. आज अनेक ठिकाणी वेस्टर्न कार्यक्रमांना चांगली गर्दी होते. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना फारशी गर्दी होताना दिसत नाही. त्याकरिता कॉर्पोरेट कंपन्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याचे साम्राज्य

$
0
0

म. टा. प्र‌त‌िन‌िधी, ना‌श‌िक साफसफाई होत नसल्याने नाशिक पुणे रोडवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. द्वारका पासून ते दत्तमंदिर भागात रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात कचरा जात आहे. तरी सफाई करावी अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपूजनाला सोने खरेदीचा उच्चांक

$
0
0

कमी भावामुळे मागणीत झाली वाढ; रेडिमेड डिझाईन्सलाही ग्राहकांची पसंती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक बाजारपेठेत सोन्याची आवक वाढल्याने सोन्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव झपाट्याने खाली आले. याच संधीचा फायदा उठवत बुधवारी लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सोने खरेदीने उच्चांक गाठला.

भावातील उतारामुळे ग्राहकांनी लक्ष्मीपूजनाला चोख सोन्यापेक्षा दागिन्यांना जास्त पसंती दिली. बाजारात २४ कॅरेट चोख सोन्याचा भाव २६ हजार ३०० इतका होता तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २६ हजार इतका होता. पूर्वी सोनाराकडे जाऊन ऑर्डर नोदविण्याकडे ग्राहकांचा कल असायचा. मात्र, सध्या सर्व प्रकारचे डिझाईन्स रेडिमेड उपलब्ध असल्याने अनेकांनी ऑर्डर न देता थेट खरेदी केली. सकाळपासूनच सराफांच्या दुकानात गर्दी झाली होती. हा गर्दीचा ओघ सायंकाळपर्यंत कायम होता. या कालावधीत मंगळसूत्र, नेकलेस यांना चागली मागणी होती. येणारा कालावधी लग्नाचा असल्याने सराफ व्यावसायिकांनी अगोदरच विविध प्रकारच्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स उपलब्ध केल्या होत्या. त्याचप्रमाणे कमी व जास्त वजनाचे नेकलेस देखील उपलब्ध करण्यात आले होते. याचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तसेच, नाशिकचा चोख चांदीचा पेशवाई सेट ( डिनर सेट) यालाही चांगली मागणी होती. अनेकांनी चांदीचे भाव कमी झाल्याने शुध्द चांदीच्या भांड्यांची खरेदी केली. अनेकांनी गुंतवणुकीसाठी चोख सोन्याची विविध आकारांची सोन्याची नाणी खरेदी केली. सोने, चांदी प्रमाणेच हिऱ्यांच्या दागिन्यांवर मजुरी कमी असल्याने त्याचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली. हिऱ्यांमध्ये टॉप्स, मंगळसूत्र, तनमणी, लेडीज अंगठी याला चांगली मागणी आहे. येणारा कालावधी लग्नसराईचा असल्याने वधूच्या दागिने खरेदीचा मुहूर्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच साधला. सराफ बाजाराप्रमाणेच उपनगरातील दुकांनामध्ये देखील सोने खरेदी जोमाने झाली. नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी या भागात देखील गर्दी होती.

खडे विक्री जोमाने

लक्ष्मी पूजन अमावस्येच्या दिवशी असते. या दिवशी धारण केलेले काही खडे लाभतात. त्यासाठी अनेक ग्राहकांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खड्यांची खरेदी केली. पुष्कराज, पाचू, गोमेध, अशा खड्यांना चांगली मागणी होती.

गेल्या वर्षापेक्षा यंदा भाव कमी असल्याने ग्राहकांनी खरेदीचा चांगला उच्चांक गाठला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- धनंजय दंडे, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेकेदारांनी झटकले हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी कर्मचाऱ्यांना २०१५ च्या आदेशाप्रमाणे किमान वेतन देण्यास ठेकेदारांनी नकार दिला आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना सध्या दिले जाणारे वेतन हे किमान वेतनाप्रमाणेच असून, कामगार उपायुक्तालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती घंटागाडी ठेकेदारांनी दिली. सध्या आंदोलन करणाऱ्या निवडक घंटागाडी कामगारांची दिशाभूल केली जात असून, अशा कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.

फेब्रुवारी २०१५ च्या किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन देण्यासाठी घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. परंतु, या कायद्याप्रमाणे वेतन देण्यास ठेकेदारांनी नकार दिला आहे. शहरातील चारही घंटागाडी ठेकेदारांनी बुधवारी पत्र काढून सध्या कामगारांना किमान वेतनप्रमाणे कमीत कमी ८०२२ रुपये प्रत्येकी वेतन दिले जात आहे. तर, घंटागाडीचे कामगार हे महापालिकेच्या आस्थापनेवर नसल्याने त्यांना किमान वेतन देणे बंधनकार नसल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवकाशात गर्दी आवाजविरहित फटाक्यांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दणदणाट करणाऱ्या फटाक्यांपेक्षा आवाजविरहित आकाश उजळवून टाकणाऱ्या फटाक्यांना यंदा चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडे असलेला कल लक्षात घेत फटाके विक्रेत्यांनीही आकाश उजळविणाऱ्या फटाके विक्रीस आणले आहेत. ध्वनीप्रदूषणास आळा घालण्याच्या दृष्टीने या प्रकारातील फटाक्यांना चांगली मागणी मिळाल्याचे चित्र बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिसून आले.

दिवाळीत फटाके उडविण्याची हौस प्रत्येकालात असते. मात्र, आपल्या हौसेपोटी कोणाला त्रास होऊ नये, अशी इच्छाही अनेकांची असते. ही इच्छा आवाजविरहित फटाक्यांमुळे पूर्णत्त्वास गेली. यंदा पर्यावरणप्रेमी, समाजसेवी संघटना, शाळा-कॉलेजेस यांनी पर्यावरणपूरक दिवाळीबाबत जोरदार जनजागृती केली होती. त्यामुळेही आवाजविरहित फटाक्यांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणाला धोका पोहोचू नये, तसेच ध्वनी प्रदूषणही होऊ नये याचा विचार या फटाक्यांच्या पसंतीमागे दिसून आला.

आवाजविरहित फटाक्यांमध्ये प्रामुख्याने शोभेच्या फटाक्यांना पसंती दिली जात आहे. झाड, भुईचक्र, फुलबाज्या या आतषबाजी करणाऱ्या तसेच आकाशातील फटाक्यांना अधिक पसंती दिली जात आहे. तसेच लाल, पिवळा, निळा, हिरवा असे रंग बाहेर टाकणाऱ्या फुलपाखरू या फटाक्यालादेखील मोठी मागणी आहे. तसेच, आकाशातील स्काय शॉट प्रकारातील रंगीबेरंगी आवाजविरहित फटाक्यांनाही सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांने सांगितले. लहानग्यांबरोबरच मोठ्यांमध्येही या फटाक्याची क्रेझ आहे.

आवाजाच्या फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, इजा यांचा विचार करताही शोभेचे फटाके पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. डोंगरे वसतिगृहावर नाशिक फटाका असोसिएशनच्या स्टॉल्सवर लक्ष्मीपूजनाला गर्दी दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - पुणे बसेसला गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लक्ष्मी पूजनानंतर खान्देशात तर भाऊबिजेनंतर पुण्याकडे जाणाऱ्या नोकरदारांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले आहे. नाशिकहून पुण्याकडे नियमित जाणाऱ्या ४८ बसेसचे बुकिंग फुल्ल झाले असून, १८ जादा बसेसमधील ७० टक्के बुकिंग फुल्ल झाल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली. त्यामुळे जादा बसेसच नियोजन करताना महामंडळाची दमछाक होत आहे.

नाशिकमध्ये जळगाव, धुळे येथील रहिवाशांची संख्या मोठी आहे. कामगार वर्गालाही शनिवारपर्यंत सुटी असल्याने अनेकांनी गावी जाण्याचे नियोजन करून ठेवले आहे. त्यामुळे मालेगाव, धुळे, जळगावकडे जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

नाशिकमधील अनेकजण पुण्यात नोकरीला आहेत. नाशिक शहरातून दररोज २४ बसेस जातात. तर, जिल्ह्यातून २४ अशा ४८ बसेस असतात. रविवारी सुटणार असलेल्या या सर्व बसेसचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या खरेदीला आनंदाचे कोंदण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खरेदीचा योग साधत नाशिककरांची शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली. यामुळे व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण होते. कपडे, मोबाइल, मिठाई, दिवाळी गिफ्ट्स आदी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या. नोकरदारवर्गाला अगदी वेळेवर बोनस मिळाल्याने लक्ष्मीपूजनाला दुपारपर्यंत खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.

ऐन दिवाळीत बाजारात महागाईचे सावट दिसून येत असले तरी सण उत्साहात साजरा व्हावा, यासाठी खरेदीत शहरवासीयांचा मोठा सहभाग होता. लक्ष्मीपूजनाला नवे कपडे घालण्याची प्रथा अनेकांकडे असल्याने या दिवसाच्या दुपारपर्यंत कापड बाजार, दहिपूल, मेनरोड आदी ठिकाणी गर्दी दिसून आली. गेल्या वर्षापेक्षा यंदा दहा टक्क्यांनी कपड्यांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आजच्या काळात डिजिटल खरेदी ही प्रतिष्ठेशी निगडीत बाब झाली आहे. आपल्याकडे चांगला मोबाइल, लॅपटॉप, टॅब असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. या इच्छेला दिवाळीचा शुभमुहूर्त त्याचबरोबर ऑफर्स व डिस्काऊंटची जोड मिळत असल्याने डिजिटल शॉपीज् फुल्ल झाल्या होत्या. 'एक रुपया भरा आणि वस्तू घेऊन जा' अशा प्रकारच्या ऑफर्सही अनेक दुकानदारांनी

दिल्या होत्या. या ओढीने

ग्राहकवर्गानी दुकानात गर्दी केल्याचे दिसून आले. या ऑफर्समुळे ग्राहकांबरोबरच विक्रेत्यांनाही चांगलाच फायदा झाला.

दिवाळीची इतर खरेदी होत असली तरी सणासुदीत गोड खाल्याशिवाय सण साजरा झाला असे वाटत नाही. तसेच, सणाच्या पार्श्वभूमीवर देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्यासाठी फराळाबरोबरच मिठाईला महत्त्व असते. मिठाईशिवाय दिवाळीच पूर्ण होऊ शकत नाही, इतके दिवाळी आणि मिठाई हे समीकरण झाले असल्याने साहजिकच मिठाईला मोठी मागणी होती. त्यामुळेच लक्ष्मीपूजनाला सुमारे हजारो किलो मिठाईची उलाढाल नाशिकमध्ये झाली. काजू कतली, ड्रायफूट बर्फी, अंजीर बर्फी, मावा पेढा या मिठायांना नाशिककरांची सर्वाधिक मागणी होती. दुधाच्या दरांमध्ये मागील वर्षापेक्षा काहीशी वाढ झाली असल्याने मिठाईच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. मात्र, या दरवाढीचा खरेदीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले नाही.

दिवाळी गिफ्ट्स देण्याचा ट्रेण्डही अलिकडे जोरात असल्याने गिफ्ट्स खरेदी केली गेली. यामध्ये फुला-पानांच्या आकाराचे कॅण्ड्ल्स, कॅण्डल स्टॅण्ड, ड्रायफ्रूट बॉक्स, चॉकलेट बॉक्स व मिठाई बॉक्सला अधिक प्राधान्य देण्यात आले. अनेक स्वीट्सच्या दुकानांमध्ये या प्रकारच्या गिफ्ट्ससाठी खास व्यवस्थाही करण्यात आली होती. दिवाळीनिमित्त शहरात बाहेरगावचे विक्रेतेही आल्याचे चित्र बाजारात दिसून येत होते. या विक्रेत्यांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली आहेत. शोरुमच्या तुलनेत कमी दरात या विक्रेत्यांकडे वस्तू मिळत असल्याने ग्राहकांनी येथेही खरेदी करण्यास पसंती दिली. शोभेच्या वस्तूंबरोबरच टाय, कुर्ते, शूज या आवश्यक वस्तू कमी किमतीत विकावयास आणल्याने महागाईशी दोन हात करण्याचे बळ मध्यमवर्गीयांना मिळाले. अनेक नोकरदारांचे बोनस उशिरा झाल्याने ऐनवेळी खरेदी केली जात असल्याचे मत यावेळी शहरातील विक्रेता वर्ग व्यक्त करीत होता.


ऑनलाइन शॉपिंग

दिवाळीनिमित्त ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर मोठी सूट देण्यात आली होती. प्रत्येक वस्तूवर ऑफर्स देण्यात आल्याने नेटीझन्सच्या या साईट्सवर खरेदी करण्यासाठी उड्या पडल्या होत्या. घड्याळे, कपडे, मोबाइल्स, दिवाळी गिफ्ट्स, कॅण्डल्स इत्यादी वस्तूंवर सूट देण्यात आली होती. बाजारापेक्षा अनेक वस्तू कमी किमतीत मिळत असल्याने अनेकांनी याचा लाभ घेतला. तसेच सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली जात असल्याचे दिसून आले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे शनिवारपासून नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवार (दि. १४) पासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. कल्याण डोंबिवलीत मनसेने सपाटून मार खाल्यानंतर नाशिकमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे दोन दिवस ते नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, त्यांच्या हस्ते दोन वाहतूक बेटांचे उद्घाटन होईल.

नाशिकच्या मॉडेलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीत मतांचा जोगवा मागितला. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारल्याने मनसेच्या नगरसेवकांची संख्या २७ वरून ९ वर आली. त्यामुळे ठाकरेंना पुन्हा नाशिकचा गड भक्कम करावा लागणार आहे. शनिवारपासून तीन दिवस ते नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटने करण्यात येणार आहेत. विशेषतः वाहतूक बेटांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आयुक्तांशी चर्चा करून रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीने मोडले महापालिकेचे कंबरडे

$
0
0

विकासकामे, स्मार्ट सिटीसाठी घरपट्टी, पाणीपट्टीत दरवाढ आवश्यक म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरात एकीकडे स्मार्ट सिटीचा जागर सुरू असतांना महापालिका कमालीच्या आर्थिक विवंचनेत आहे. सिटी स्मार्ट करण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय महापालिकेपुढे राहिला नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्यातील अन्य महापालिकांचे एलबीटीचे उत्पन्न हे ५० टक्क्याच्या खाली असतांना, नाशिक महापालिकेचे ते ८० टक्के आहे. त्यामुळे नव्या धोरणामुळे उत्पन्नात मोठी घट झाली असून थेट शहराच्या विकासालाच ब्रेक लागला आहे. महापालिकेत जकात सुरू असतांना, महापालिकेसह शहराच्या विकासाला चालना मिळाली होती. शासकीय अनुदानापेक्षा हक्काच्या जकातीतून पालिकेन विकासकामांचा सपाटा लावला असतांनाच, सन २०१२ मध्ये जकातीला ब्रेक लावून एलबीटी आली. जकातीचा आकडा ८०० कोटीवर जात असतांनाच, एलबीटीमुळे महापालिलेका ६५० कोटीवर थांबावे लागले. त्यामुळे विकासकामांना पहिला ब्रेक लागला. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शिस्त लावत जकातीची तूट भरून काढत एलबीटीत घाटा होवू दिला नाही. त्यामुळे राज्यात सर्वाधिक एलबीटीची चांगली वसूली ही महापालिकेन केली. अशातच आता एक ऑगस्टपासून राज्य सरकारने एलबीटी धोरणात बदल करत महापालिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. ५० कोटीच्या आत उलाढाल असलेल्या ३२ हजाराच्या वर व्यापाऱ्यांना एलबीटी माफ झाल्याने महापालिकेच्या आर्थिक गाडा रुतण्यास पूर्ण मदत झाली आहे. महापालिकेचे उत्पन्नच घटल्याने बजेटचेही तीनतेरा वाजले असून खर्चाचा ताळमेळ करतांना नोव्हेंबर उजाडला तरी त्याला अंतिम रुप देता आलेले नाही. महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या ८० टक्के उत्पन्न हे एलबीटीतून येते. सुमारे हजार कोटीच्या उत्पन्नात ही सरासरी आठशे कोटीत जाते. मात्र, आता त्यातही घट झाल्याने एलबीटीतून प्रत्यक्षात दरमहा ३० कोटी येणार आहे. तर उर्वरित अनुदानातून येणार आहेत. महापालिकेचे सरासरी खर्च हा दरमहा ३५ ते ४० कोटी आहे. त्यामुळे विकासकामांसाठीच निधीच मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यायी उत्पन्न वाढवण्याशिवाय पालिकेला पर्याय नाही. त्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी शिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. नाशिक महापालिकेचे घरपट्टी व पाणीपट्टीचे दर राज्यात सर्वाधिक कमी आहे. सन १९९९ पासून दर वाढलेच नाहीत. त्यामुळे इतर उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे आता विकास करायचा असेल व शहराला स्मार्ट करायचे असेल तर घरपट्टी व पाणीपट्टी वाढविण्याशिवाय महापालिकेसमोर पर्याय नाही. त्यामुळे विकास हवा असेल आणि शहर स्मार्ट व्हावे अशी नागरिकांची इच्छा असेल तर त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी दराची वाढ स्वीकारावीच लागणार आहे. स्मार्ट सिटीत घरपट्टी व पाणीपट्टी दरात वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता विकास हवा असेल दरवाढीची तयारी नाशिककरांना ठेवावी लागणीर आहे. लोकप्रतिनिधींची भूमिका दुटप्पी महापालिकेतील नगरसेवकांकडून विकासकामांसाठी निधी मागितला जात असतांना उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिकेची आर्थिक स्थिती डामाडोल झाल्याने उत्पन्नासाठी घरपट्टी व पाणीपट्टी दर वाढवावे लागणार आहेत. मात्र, त्याला लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. त्यामुळे एकीकडे उत्पन्न वाढू द्यायचे नाही अशी दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत वाढीला विरोध करायचा अशा भूमिकेमुळे महापालिकाच आर्थिक कचाट्यात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे हमालांची दिवाळी अंधारातच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

रेल्वे प्रवाशांचे ओझे उचलणाऱ्या हमालांची दिवाळी नेहमी अंधारातच साजरी होते. बारा तास राबल्यावर त्यांना कसेबसे तीनएकशे रुपये मिळतात. रेल्वतर्फे पगार नाही की, बोनस नाही. मग, दिवाळी कशी साजरी करायची असा त्यांचा प्रश्न आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकात पन्नास हमाल आहेत. दोन पाळीत ते काम करतात. त्यांची ड्युटी बारा तासाची असते. नम्र सेवा, तत्परता, कष्ट यामुळे ते सर्वांचे मन जिंकून घेतात. परंतु, त्यांना रेल्वेतर्फे कोणतीही सुविधा दिली जात नाही. पगार अथवा बोनस नाही की, निवारा नाही. मिळतो तो फक्त दोन महिन्याचा रेल्वे पास आणि किरकोळ वैद्यकीय सुविधा. प्रवाशाने साहेबाकडे खोटी तक्रार केली तर पंधरा दिवस घरी बसावे लागते. हमालांना एका बॅगेचे वीस रुपये मिळतात. दिवसाला तीनशे रुपये जमतात. त्यावरच गुजराण करावी लागते. या लोकांची सोसायटी आहे. ती अडीअडचणीला थोडे कर्ज देते.

पैसे नाही, आजार मिळाले

हमालांना रेल्वे जीन्यांवर चढ-उतार करून गुडघ्याचे आजार लागले आहेत. ओझे उचलून पाठीचे व मानेचे मणके कामातून गेले आहेत. निवृत्तीचे वय ठरलेले नाही. शरीर साथ देते तोपर्यंत काम करावे लागते. कधी कधी रेल्वेखाली ठार झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे गोळा करावे लागतात. त्यासाठी हॅण्‍डग्लोज मिळत नाही. प्लास्टिक गुंडाळून काम करावे लागते. त्यातून इनफ्केशनचा धोका असतो.कुंभमेळ्यात नव्या चौथ्या फ्लॅटफार्मवर गाड्या थांबविण्यात आल्याने प्रवासी तेथूनच बस पकडून रामकुंडावर गेले. त्यामुळे हमालांना कामच मिळाले नाही.

हमालांचा मुकादम असून, ७१ वय आहे. सात मुलींना शिकवून लग्न करून दिले. आता मला पेन्शन नाही की फंड नाही. हमालीमुळे आजार मागे लागले आहेत. दवाखान्याला पैसे नाहीत. कसे जगायचे असा प्रश्न आहे.
- पांडूरंग मानकर, हमाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाने घेतला गळफास

$
0
0

एका ६० वर्षीय वृध्दाने पंचवटीतील सम्राटनगर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दत्तू गोपाराम लहांगे असे आत्महत्या करणाऱ्या वृध्दाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (दि.१०) गळफास घेतला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंगापूर, थायलंडला पसंती

$
0
0

आठ रात्र, नऊ दिवसांचा परदेशात मुक्काम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनंतर पर्यटनाला जाण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात रूढ झाला असला तरी, आता मात्र परदेशात जाण्याचा नाशिककरांचा कल असल्याचे दिसून येत आहे. खासकरून मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या तीन देशांच्या एकत्रित टूरला चांगली पसंती मिळत आहे.

परदेशात एकदा तरी पर्यटनाला जाण्याची मनोमन असलेली इच्छा दिवाळीच्या सुटीत पूर्ण करण्याची संधी अनेक जण साधतात. राज्य आणि देशांतर्गत पर्यटनाला त्यामुळेच दिवाळीनंतर बहर येतो. पण, आता परदेश गमनानेही चांगला वेग धरल्याचा नाशिकच्या पर्यटन व्यावसायिकांचा अनुभव आहे. यंदा नाशिककर सिंगापूर, थायलंड आणि मलेशियाच्या पर्यटनाकडे आकृष्ट झाले आहेत. त्यासाठीचे बुकिंग जोरात सुरू आहे. आठ रात्र आणि नऊ दिवस अशा स्वरुपाचे प्रति व्यक्ती जवळपास एक लाख रुपयांचे पॅकेज असून, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पॅकेजमध्ये सर्व प्रकारचा प्रवास, निवास, भोजन, नाश्ता, गाईड, स्थानिक पातळीवर फिरण्यासाठीच्या सवलती आदींचा समावेश आहे.

सध्या भारतात हिवाळा आहे. अशाच प्रकारचे वातावरण सध्या परदेशात असल्याने आल्हाददायक हवामानात पर्यटनाकडे अधिक कल असतो. या तिन्ही देशातील विविध प्रकारची ठिकाणे पाहण्यासाठी नाशिककर उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दुबईच्या टूरलाही प्रतिसाद लाभत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चार रात्र आणि पाच दिवस अशा स्वरुपाच्या दुबईच्या पर्यटनाचे प्रति व्यक्ती ५० हजार रुपयांचे पॅकेज देण्यात येत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे परदेश गमनाला नाशिककरांचा प्रतिसाद लाभेल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, बोनस मिळाल्यानेही अनेकांनी परदेशवारीचा निश्चय केल्याचे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिकच्या सदस्यांनी सांगितले. सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया तीन देशांच्या पर्यटनासाठी ग्राहक इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत या पॅकेजला चांगला प्रतिसाद लाभला असून, येत्या काळात हा ट्रेंड सेट होण्याची शक्यता आहे.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकाची फसवणूक

$
0
0

भाडेतत्त्वावर वाहन घेऊन त्याचा मोबदला न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाहनचालकाने तिघा संशयितांविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली. संपत रामदास निर्मळे (३०, रा. लहवित) यांच्याकडे बोलेरो गाडी आहे. संशयित दीपक दिगंबर साळुंखे (रा. पाथर्डीफाटा), दत्ता कडवे (रा. इंदिरानगर) आणि राजेश मनोहर भोसले (रा. इगतपुरी) यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाथर्डीफाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनजवळ निर्मळे यांना भेटले. त्यांनी ओझर येथे भाडेतत्त्वावर गाडी लागत असून, ३० हजार रुपये देऊ असे त्यांना सांगितले. निर्मळे यांनी देखील विश्वासाने तिघांकडे गाडीचा ताबा दिला. मात्र संशयितांनी ठरल्यानुसार रक्कम न देताच ताबा घेतल्याची त्यांची तक्रार आहे. काही दिवसांनी त्यांनी भाडे देण्यासही टाळाटाळ केली. पोलिसांनी संशयितावर फसवणुकीची गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

$
0
0

नाशिक : गंगापूर रोडवरील श्रीगुरुजी रुग्णालयाजवळील परिसरात २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. ज्ञानेश्‍वर उत्तम खंदारे (रा. काळे नगर) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या शुभेच्छा नकोत!

$
0
0

डॉ. सुधीर देवरे, सटाणा

माझ्या दिवाळीच्या शुभेच्छेच्या एसएमएसला माझ्या एका मित्राकडून उत्तराच्या संदेशात म्हटले होते, 'मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत.'

बाप रे! उत्तर वाचून मला मुर्च्छा येण्याचेच बाकी राहिले. संदेश वाचून माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं ते हे की, मी जन्माने हिंदू आहे आणि ज्याने हे उत्तर लिहिले तो हिंदू नव्हता. दिवाळीच्या शुभेच्छांचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो हे मला आयुष्यात पहिल्यांदा लक्षात आलं.

खरं तर हा माझा नव्यानेच मित्र झालेला माणूस होता. मला जुजबी ओळखत होता. लहानपणापासून आणि विचारांनी त्याने मला ओळखले असते तर कदाचित त्याने असे उत्तर देताना शंभर वेळा विचार केला असता. माझ्या लिखाणाचे वाचन केलेला कोणीही वाचक असता तरी त्याने मला असे उत्तर दिले नसते. ते उत्तर वाचून मला राहवले नाही. मी त्याला समजावणीच्या सुरात पुन्हा एसएमएस केला 'हिंदू आणि दिवाळी असा आजतरी काही संबंध मला दिसत नाही. दिवाळी आख्या जगात साजरी केली जाते. दिवाळी हा भारताचा सांस्कृतिक सण आहे. धर्माचा नाही.' वगैरे. त्यानंतर त्याचे पुन्हा जे उत्तर आले ते तर अतिशय उध्दटपणाचे होते. या उत्तरात त्याने म्हटले होते, 'तुम्ही जरा नीट अभ्यास करा, वाचन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की, दिवाळी का साजरी करतात. असा मला सल्ला देत त्याने पुढे म्हटले होते, सोबत मी तीन घटना देत आहे. त्या वाचा म्हणजे दिवाळी का साजरी करतात ते तुम्हाला कळेल.' त्याने ज्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्या अशा : अमूक एकाचा तमूक एकाने खून केला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसऱ्या कथेतही त्याने असाच काहीतरी जोडून एक धर्म भारतातून हद्दपार झाला म्हणून दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले होते आणि तिसरी सर्वांना माहीत असलेली बळीराजाची कथा सांगितलेली होती. शेवटी तो म्हणाला, म्हणून आम्ही दिवाळी साजरी करत नाही.

अशा अतिशय उद्दाम पध्दतीने हा अनुभव मला सामोरा आला तरी या अनुभवावर मी चिंतन करू लागलो. आपण एखाद्याला दिवाळीच्या वा कुठल्याही सणाच्या शुभेच्छा कोणत्या अर्थाने पाठवतो. अशा शुभेच्‍छा पाठवताना या मित्राला अभिप्रेत असे सर्व अर्थ गृहीत धरून वाईट गोष्टींचे मी समर्थन करत होतो का? (जे सण जनमानसात आज शुभ समजले जातात त्याच सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात. काही सणांच्या शुभेच्छा दिल्या जात नाहीत. उदा. मोहरमच्या शुभेच्छा दिल्या जात नाहीत.) समजा मला एखाद्या सणाच्या दंतकथेची पार्श्वभूमी माहीत आहे (उदाहरणार्थ दिवाळी) आणि तरी सुध्दा मी एखाद्याला त्या सणाच्या सहज शुभेच्छा पाठवल्या तर मी त्या माणसाचा उपमर्द करतो का? का एखाद्या अनिष्ट परंपरेचे समर्थन करतो. एखादा सण साजरा करण्यामागे असलेली कथा, लोककथा, दंतकथा, आख्यायिका या फक्‍त सांगिवांगीतून, कल्पनेतून वा विपर्यासातून निर्माण झालेल्या असतात का तो शंभर टक्के इतिहास असतो. ख्रिसमस साजरा करण्यामागे जितका स्पष्ट इतिहास असेल त्याच्या एक शतांशही इतिहास दिवाळी साजरा करण्यामागे नाही हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल.

इतिहास असेल तर त्याला केवळ दंतकथा हा पुरावा होऊ शकत नाही. आणि तो तसा मानला तरी एकाच सणामागे तीन प्रकारच्या पार्श्वभूमी कथा कशा येऊ शकतात. मी वर ज्या मित्राचा उल्लेख केला त्याने बळीराजाच्या कथेसोबतच ज्या अजून दोन कथा सांगितल्या त्याच त्याच्या मताच्या विरूध्द जात होत्या. दिवाळी का साजरी केली जाते यावर त्याने तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या. या ‍तीन कथांपैकी नक्की कोणत्या घटनेमुळे आधी दिवाळी साजरी झाली हे त्याला सांगता यायला हवे होते. का या तिन्ही घटना एकाच दिवसभरात घडल्या आणि या‍ तिन्ही घटनांच्या विजयासाठी दिवाळी साजरी होते. म्हणजे बळी राजाला मारले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसरी कथा, अमूक एकाचा तमुक एकाने खून केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. आणि तिसरी कथा, भारतातून एक धर्म हद्दपार केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते असे हे तर्कट. कशातच कुठलाही ताळमेळ नाही. (समजा एखाद्या दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली. तर फक्त त्या वर्षापुरती आपण दिवाळी साजरी करणार नाही, का कायमस्वरूपी आयुष्यात दिवाळीच येऊ देणार नाही? आणि आपल्या घरात अमूक एका दिवाळीत अशी वाईट घटना घडली म्हण़ून लोक दिवाळी साजरी करतात, असा आपल्याला प्रचार करता येईल का?) त्याचे हे तर्कट स्वत:चे नसावे. एखाद्या संशोधनात्मक अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथामध्येही ते त्याने वाचलेले नसावे. कुठल्यातरी भडकाऊ भाषणातून वा चटपटीत मासिकातून वाचून त्याने दिवाळीबद्दल आपले मत बनवलेले दिसले.

आज आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीला सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपण ख्रिसमस साजरा करतो. सर्व धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण रमजान ईद साजरा करतो. सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. पैकी अनेकांना अशा सणांमागची पार्श्वभूमी माहीत असतेच असे नाही. पण आपण दिवसेंदिवस लोकपरंपरेच्या या सगळ्या सणांबाबतही सर्व धर्मिय ग्लोबल होत एकमेकांना या निमित्ताने शुभेच्छा देत एकमेकांच्या जवळ येऊ पहातो ही मानवतेची एक चांगली खूण आहे. माझा एक मुस्ल‌िम धर्मिय बालमित्र आहे. तो मुस्ल‌िम धर्मिय आहे असा उल्लेख आज मी पहिल्यांदा करतोय. कारण आमच्या मैत्रीत कधीही धर्म आडवा येत नाही. प्रत्येक रमजान ईदच्या दिवशी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आधी त्याचा मला एसएमएस येतो. नंतर मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या शुभेच्छा आल्या तर मी मुसलमान नसूनही हा मित्र मला का एसएमएस करतो असे मला कधी वाटले नाही. कधी वाटणारही नाही. आणि कोणालाही तसे कधी वाटू नये.

खरे तर माझ्या मते आज कोणताच सण एखाद्या धर्मापुरता धार्मिक सण राहिलेला नाही. सण साजरा करणे या आज ग्लोबल लोकपरंपरा झाल्या आहेत. निदान भारतात साजरे होणारे अनेक सण हे हिंदू धर्माचे सण आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. सण हे धार्मिक असण्यापेक्षा इथल्या अस्तित्वाच्या सांस्कृतिक खुणा आहेत, असे मला वाटते. दिवाळी ही भारताची सांस्कृतिक खूण आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. आपल्याला न्यूनगंडच पाळायचा झाला तर आपण बळीराजाच्या आठवणीसाठीही तो साजरा करू शकतोच की. दिवाळी ही एकीकडे अनेक गोष्टींचे प्रतिक होताना दिसते तर दुसरीकडे अशा अनुभवाचा ठणठणीत सांस्कृतिक दुष्काळ सामोरा येताना दिसतो.

मलेशिया हा मुस्ल‌िम धर्मिय देश असूनही तिथे कलात्मक रामायण नाट्य साजरे केले जाते. पाकिस्तान हा मुस्ल‌िम देश असूनही मकरसंक्रातीला अनेक ठिकाणी पंतग उडवले जातात.

सारांश, आजचे सण हे लोकपरंपरेच्या सांस्कृतिक खुणा ठरत आहेत. धार्मिक उत्सव नव्हेत. धर्माच्या उन्मादाला विरोध करणे वेगळे आणि सांस्कृतिकता पाळणे या दोन्ही वेगवेळ्या गोष्टी आहेत.

(लेखक साहित्यिक व संशोधक असून भाषा, कला, लोकवाड्‍मय आणि लोकजीवनाचे अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासा : युवकांसाठी नवी ‌संधी !

$
0
0

Gopal.paliwal@timesgroup.com

गेल्या काही दिवसांपासून नाशिक स्मार्ट सिटी होणार याचीच चर्चा रंगताना दिसते आहे. पण त्यासाठी लागणारे बळ आणि सिद्धता आपण कोणीच तपासून पहात नाही असेही दिसते. या सर्व स्मार्ट गोंधळात एक चांगली बातमी नाशिकसाठी घडली. ती म्हणजे नाशिकच्या जुळ्या बहिणींना 'नासा'च्या २०१८ मोहिमेचे निमंत्रण मिळाले. अपूर्वा जाखडी आणि लीना जाखडी बोकील असे या जुळ्या बहिणींचे नाव. त्यापैकी अपूर्वा जाखाडी यांच्याशी या पूर्ण मोहिमेबद्दल आणि त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल केलेली ही बातचीत.

आपल्या 'स्पेस' प्रवासाला कुठून सुरूवात झाली?

- माझे शिक्षण सर विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. त्यावेळी माझा बी.ई.ला इलेक्ट्रॉनिक आणि टेल‌िकम्युनिकेशन हा स्पेशल विषय होता. त्यामुळे सुरवातीलाच इस्रोच्या बेंगळूरू येथील इन्स्टिट्यूटला माझा प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. तेथूनच या संबंध‌िची आवड निर्माण होत गेली. तेथून या प्रवासाला सुरूवात झाली. आम्हाला दोघींनाही या विषयाची आवड निर्माण झाली. त्यासाठी वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. पुढे स्पेसच्या संबंधित असलेल्या एअरक्राफ्ट इलेक्ट्रॉनिक या विषयाचे शिक्षण घेतले. त्यात सेटलाईट कम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह रडार यांचे शिक्षण घेऊन अनुभव मिळवला.

आपल्या दोघांच्या विषय निवडीत साम्य होते का?

- हो, नक्कीच तसे होते. काही प्रमाणात नाही तर पूर्णपणे आमच्यात आवडी निवडीचे साम्य होतेच. ते शिक्षणानंतरही कायम होते. पुढे लीनाने जॉबचा पर्याय निवडला तर मी पुढे शिकण्याचा. त्याचबरोबर स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल मुलांना अवगत करविणे हा पर्याय निवडत आपले नाते स्पेसशी कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. आम्ही दोघेही सोबतच पहिल्यांदा नासाला भेट दिली होती. त्यानंतर पुढे मी वेळोवळी कामनिमित्त नासा तसेच अवकाशासंबंधित शहरांना भेट ‌देत राहिली. यामध्ये रॉकेट सिटी अल्बामा, युएस सेंटर, केनेडी स्पेस सेंटर आणि फ्लोरिडा जेथून प्रक्षेपण होते. यात मी स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित काही ट्रेनिंग्समध्ये सहभाग घेतला. त्यामुळे जवळून अवकाशातील प्रक्षेपणातील बारकावे आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. माझी दुसरीकडे स्पेस एज्युकेटर म्हणून निवड झाल्याने तो प्रवासही नाशिक आणि प्रसंगी नाशिकच्या बाहेर सुरू होता.

तुमचे प्रेरणास्थळ व घरातून पाठिंबा होता का?

- लहानपणी स्पेस विषयावरील सिनेमे पाहण्याची आवड होतीच. पण पुढे जाऊन मला लाभलेले गुरूवर्य नारळीकर सर आणि गोवारीकर सर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. नासामध्ये ट्रेनिंग घेताना भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स यांचीही मला प्रेरणा लाभली. यासोबतच घरातून पूर्णपणे पाठिंबा होताच. माहेर आणि सासरी आल्यानंतरही मला माझ्या या प्रवासाला कधीही अडचणी आल्या नाहीत.

स्पेसमधील करिअर संधीबद्दल तुम्ही काय सांगाल?

- ज्यांना कोणालाही स्पेसमध्ये आवड असेल. त्यांना यात करिअर करण्याची फार संधी आहेत. यामध्ये प्रामुख्याने अवकाश तंत्रज्ञान, स्पेस अॅडव्हाकेसी, एव्हीऑनिक्स यांचा समावेश होतो. युवकांनी या क्षेत्राकडे ग्लॅमर नाही तर उद्याची आवश्यकता म्हणून पाहायला हवे, असे मला वाटते. कलामांच्या स्वप्नातील भारत साकारायचा असेल तर नक्की या क्षेत्रात करिअर करायलाच पाहिजे. आपली बुद्धी आपण इतर देशांत देण्यापेक्षा स्वत:च्या देशाच्या विकासात लावली तरच भारत विकसनशीलपासून विकसित होईल. संधी आहेत ‌केवळ आपण त्या घेतल्या पाहिजेत आणि त्याचे सोने करायला हवे.

नासाच्या या मोहिमेची झालेली निवड का आणि कशी झाली?

- मी आणि माझी बहीण लीना आम्ही जुळ्या असल्यानेच आमची या नासा मोहिमेत निवड झाली आहे. यात 'टेलिपॅथी'ने आम्हा दोघांवर काही प्रयोग केले जातील. त्यांचा आमच्या पंचेद्रियांवर, स्नायूवर, ह्रदयावर होणारा परिणाम अभ्यासला जाणार आहे. आमच्यापैकी एक 'नासा'ने तयार केलेले व्हर्च्यूअल स्पेस सेंटरमध्ये असेल तर एक जमिनीवर. यामुळे हा अनुभव आम्हा दोघांसाठीही खूप अनोखा असणार आहे.

नाशिकमधून स्पेस एक करिअर म्हणून कसे वातावरण आहे?

- नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र या पूर्ण विभागात युवकांची ज्ञानमयी फौज आहे. त्यांना केवळ लहानपणापासून गोंजारणे आणि बळ देणे आवश्यक आहे. आम्ही एक स्पेस एज्युकेटर म्हणून त्यांना यातील बारकावे, वेगवेगळ्या कुतूहलाच्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करतो. नुकतेच त्यासाठी त्यासाठी स्पेस वीक साजरा करून लहान मुलांना अवकाशाबद्दलचे आकर्षण आम्ही सांगण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी महापालिका आणि प्रशासनाकडून चांगले सहकार्य लाभले. पुढेही मी आणि माझे सहकारी नाशिकसाठी चांगले करण्याचा प्रयत्न नक्की करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images