Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आजपासून एक्झाम फिव्हर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, आजपासून परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये आजपासून एक्झाम फिव्हर असणार आहे.

विद्यार्थ्यांचे सबमिशन, ओरल, प्रॅक्टिकल दिवाळीपूर्वीच विद्यापीठामार्फत घेण्यात आले होते. लेखी परीक्षा मात्र दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान होत असते. त्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १६) पासून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवी परीक्षांबरोबरच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या डिप्लोमा परीक्षा १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. सर्व शाखांच्या परीक्षांचा यामध्ये समावेश असणार आहे. साधारणपणे १० डिसेंबरपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. दिवाळीनंतर इंजिनीअरिंगच्या परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला. मात्र, दिवाळीच अभ्यासात जात असल्याने सणाचा आनंद लुटता आला नाही.

विद्यार्थ्यांची नाराजी

ज्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग होते, त्या विद्यार्थ्यांचे पुनर्तपासणीचे रिझल्ट वेळेत न लागल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा ते पेपर द्यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. पेपर पुन्हा देण्याच्या मनस्तापाबरोबरच पैशांचा अपव्ययही होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समाजाला गरज सशक्त विचारांची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजात केलेली सशक्त विचारांची आतषबाजी हीच समाजातील दूषित विचार दूर करेल. आज घडत असलेल्या नकारात्मक घडामोडी पाहता, समाजाला सशक्त विचार देण्याची तसेच अंधश्रद्धा मिटविण्याची गरज आहे, असे मत प्रा. शिरीष गंधे यांनी व्यक्त केले.

अमरधाम विकास समितीकडून पिंपळगावजवळ स्मशानभूमीत आयोजित केलेल्या 'स्मशानातील दिवाळी' या अनोख्या कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष होते. अमरधाम विकास समितीची माहिती यावेळी समितीचे शाम मोरे यांनी दिली. ते म्हणाले की, परिसरात तरुणवर्ग पाच वर्षांपासून ग्रामस्वच्छता अभियान राबवित आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील पहिली अमरधाम विकास समिती स्थापन केली आहे. प्रा. गंधे यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी स्मशानभूमीतील दिवाळी साजरी केली जाते. यानिमित्त येथे आकर्षक रांगोळ्या, दिवे, आकाश कंदील लावून विद्युत रोषणाई करण्यात करण्यात आली होती. परिसरातील सर्व लहान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या परिसरातील रहिवाशांनी स्मशानातील अंतेष्टी चबुत-याची पूजा केली. यावेळी डॉ. अरुण काळे, सुहास ठाकरे, गोरख वडनेरे, चांगदेव भुजबळ, सचिन विंचू, प्रकाश आंबेकर आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सबनीस यांचा नाशिकरोडला सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्यावतीने पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत नरहरी महाराज कुलथे मंगल कार्यालय येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड येथे जानेवारी २०१६ मध्ये भरणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. नाशिक शहरात त्यांचा जाहीर सत्कार व्हावा, अशी नाशिकरोड करांची इच्छा होती. हा सत्कार बुधवार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत नरहरी महाराज कुलथे मंगल कार्यालय कोठारी कन्या शाळेसमोर जेलरोड येथे आयोजित केला आहे. प्रा. डॉ. सबनीसांचा सत्कार शहराचे प्रथम नागरिक अशोक मुर्तडक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेश गायधनी भूषविणार आहेत. नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींसोबत दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक

द्वारका येथील सिध्दिविनायक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने अभिनव पध्दतीने दिवाळी साजरी करण्यात आली. संस्थेतर्फे पेठ तालुक्यातील तिळभाट येथे आदिवांसी बांधवांना नवीन कपडे वाटप करण्यात आले. सिध्दिविनायक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने प्रत्येक दिवाळीला विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. गरजुंना कपडे वाटप, वैद्यकीय तपासणी इत्यादींचा त्यात समावेश असतो. यावेळी संस्थेच्या वतीने तीळभाट गावातील नागरिकांसाठी भोजन देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मधुकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबविण्यात आले. सिध्दिविनायक संस्थेतील सदस्यांनी गावात प्रवेश करताच वेशीवर स्वागत करुन नागरिकांच्यावतीने पारंपरिक पध्दतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक गावात पोहचताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आलेल्या नेत्र विकार तज्ञ डॉक्टर मीना बापये यांनी आदिवासी बांधवांची नेत्र तपासणी करुन उपचार केले.

यावेळी तीळभाटचे पोलिस पाटील मनोज भोये, श्री राऊत सर यांनी संस्थेचे आभार मानले. संस्थेचे सदस्य नारायण निकम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीत मशिनरींची धडधड सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सिडको व सातपूर औद्योगिक वसाहतीला पाच ते सात दिवस दिवाळीची सुटी मिळाल्याने रस्ते ओस पडले होते. आज, सोमवारपासून कारखाने सुरू होत असल्याने मशिनरींची धडधड पुन्हा सुरू होणार आहे.

कंपन्यांना सुट्या असल्याने सिडको व सातपूर एमआयडीसीतील रस्ते ओस पडले होते. यात काही कंपनीमालकांनी चोरीचे प्रकार होऊ नयेत, म्हणून कंपनीच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले होते. पोलिसांनी देखील चोरीचे घटना होऊ नयेत, यासाठी पेट्रोलिंग वाढवली होती. सोमवारपासून एमआयडीसीतील मशिनरींची धडधड सुरू होणार असून, कामगारांची पावलेही गावाकडून परतत आहेत. सात दिवसांपासून बंद असलेल्या कारखान्यांमुळे एमआयडीसीतील रस्ते ओस पडले होत. आज पुन्हा रस्ते गजबजणार आहेत. काही कंपन्या कारखाने मंगळवारनंतर सुरू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशांच्या गजरात रेड्यांची मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिपावलीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडव्या निमित्त पंचवटीत पारंपरिक पद्धतीने सायंकाळी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेली मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

वीरशैव लिंगायत गवळी समाज तसेच परिसरातील दुग्ध व्यावसायिकांच्यावतीने रेड्याची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. दरवर्षी रेड्यांना सजवले जाते व शहरातील मुख्य भागातून त्यांची मिरवणूक काढली जाते. पंचवटीत पाडव्यानिमित्त रेड्यांच्या शिंगावर तसेच अंगावर रंगरंगोटी करून गळ्यात पितळी घंटा, तोडे तसेच झेंडूच्या फुलांच्या माळा, अशी आकर्षक सजावट केली होती, तर काहींनी रेड्यांच्या पाठीवर विविध देवदेवता, आकर्षक फुले, काही रेड्यांच्या पाठीवर सध्याच्या धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन 'धरण वाचवा- पाणी वाचवा' असे संदेश लिहिलेले होते. तर काही रेड्यांच्या पाठीवर 'लेक वाचवा-देश वाचवा' असे संदेश होते.

पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली रेड्यांची मिरवणूक पुढे दिंडोरीरोड, पंचवटी कारंजा तसेच गंगाघाट परिसरात असलेल्या श्री म्हसोबा महाराज मंदिराकडे नेण्यात आली. म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनानंतर मिरवणुकीतील रेडे एकमेकांच्या समोरासमोर उभे करण्यात येत होते.

या मिरवणुकीत दुग्ध व्यावसायिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. नाशिक शहरातील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे पाडव्यानिमित्त रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, अनिल कोठुळे, महेश कल्याणकर, भास्कर शिंदे, महेंद्र आव्हाड, मंगेश कोठुळे, गणेश कल्याणकर, चंद्रकांत कोठुळे आदिंसह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दरवर्षी निघणारी रेड्यांची मिरवणूक पहाण्यासाठी पंचवटी परीसरातील अनेक नागरिक गंगेवर जमा झाले होते. पारंपरिक हलगीच्या तालावर रेड्यांना फिरवण्यात येत होते. बाहेर गावाहून आलेल्य़ा पर्यटकांना वेगळी मिरवणूक पहायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्कळ पैसे मोजूनही ग्राहकांची झाली पंचाईत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत कपडे विक्रेत्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दुकानात पैसे मोजूनही ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. महागड्या साड्या फाटलेल्या निघणे, कपड्यांची शिलाई उसवणे यासारख्या समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागले. तसचे फिक्स रेट व एकदा घेतलेला माल परत घेतला जाणार नाही, यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली.

दीपावलीत जवळपास सर्वच जण नवे कपडे घेतात. सर्वाधिक उलाढाल याच क्षेत्रात होते. यामुळे कापड दुकानदारांनी दिवाळीसाठी नवा माल आणून ग्राहकांना डिस्काउंट देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणी सेलचे फलकही झळकले. मात्र, चांगल्या मालात जुना व सदोष मालही विकण्यात आला. फिक्स रेटचे बोर्ड लावून ग्राहकांची लूट करण्यात आली.

वेगवेगळ्या ब्रॅण्डचे कपडे विकणा-या तसेच कपड्यांच्या मोठ्या दुकानांपेक्षा छोट्या दुकांनामध्ये अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. मेन रोडला सर्वसामान्यांना डोळयासमारे ठेवून १००, २०० ते ५०० रुपयांपर्यंत कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

अनेक कापड दुकानदारांकडून खरेदी पावतीही दिली जात नसल्याने कपड्यात काही फॉल्ट निघाल्यास परत करणे दुरापास्त झाले होते. तसेच डिफॉल्ट कपडे परत करण्याची वेळ ठरवून देण्यात आली होती. काही दुकांनदारांनी एकदा घेतलेला माल परत घेतला जाणार नाही, असे

फलक लावल्याने कपडे डिफॉल्ट निघूनही परत करणे शक्य नसल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला. यामुळे पैसे जावूनही आनंद मिळाला नाही, अशी ग्राहकांची अवस्था झाली. यामुळे दिवाळी काहीशी कडू वाटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक
गेल्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाव पाच ते पंधरा रुपयांनी वधारले. कारले, दोडके, गिलके, कांदापात, भेंडी या भाज्यांचे दर वीस रुपयांनी वाढले आहेत. मात्र, मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक यांचे दर खाली आले आहेत.
गेल्या आठवड्यात दीपावली काळात पालेभाज्या तसेच भाज्यांची आवक मंदावली होती. यामुळे साहजिकच भाज्यांचे दर वाढले होते. मात्र, रविवारपासून भाज्यांची आवक पुन्हा वाढल्याने दर पूर्वपदावर येऊ लागले आहेत. वांग्याची मागणी वाढल्याने साठ रुपये किलोपर्यंत दर वाढले आहेत. कांदापातही पाच रुपयांनी महागली आहे. कारले, गिलके, दोडके यांचे दर चाळीस रुपयांवरून साठ रुपये झाले आहेत. मात्र, साठ रुपये किलोने मिळणाऱ्या गवारचे दर वीस रुपयांनी घसरले आहेत. बटाट्याचे दर जैसे थे आहेत. कांद्याचे दर दोन ते पाच रुपयांनी वाढले आहेत. या आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असून दरात घसरण होण्याची शक्यता आहे, असे विक्रेत्याने सांगितले.


भाजीपाल्याचे दर (किलोमध्ये) कारले ६० गिलके ६० दोडके ६० गवार ४० भेंडी ६० कांदे २५ ते ३० बटाटे १५ ते २० कोबी २० फ्लॉवर २० वांगे ६० मेथी ८ ते १२ रुपये जुडी कोथिंबीर ८ ते १५ रुपये जुडी कांदापात १५ ते २० रुपये जुडी मुळा २५ ला ८ शेपू ८ ते १२ रुपये जुडी पालक २ रुपये जुडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाळिंबाचे दर किलोला १२५ रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या आठवड्यात दीपावलीमुळे बाजारपेठेत फळांपेक्षा खाद्यपदार्थांची मागणी वाढली होती. यामुळे फळांचे दर दहा ते वीस रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच हिवाळ्याचाही फळांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. यामुळे ड‌ाळिंब व चिकू वगळता सर्वच फळांचे दर कमी झाले आहेत. चांगल्या दर्जाचे डाळिंब १०० ते १५० रुपये दराने विक्री होत आहे. सांगलीचे अर्ली द्राक्ष बाजारपेठेत दाखल झाले असून ६० रुपयांना अर्धा किलोचा बॉक्स मिळत आहे. सध्या बाजारपेठेत पपई, सीताफळ व अॅपल बोरची आवक वाढली आहे. यामुळे त्यांचे दर दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाले आहेत. मागणी नसल्याचे त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. तसेच सफरचंदचे दरही वीस रुपयांनी खाली आले आहेत. सध्या बाजारपेठेत सर्व प्रकारची फळे उपलब्ध आहेत. कॅलिफोर्नियाहून आयात केलेली द्राक्ष ४०० रुपये किलो दराने मिळत आहेत. न्यूझीलंडमध्ये पिकणारे किवी हे चिकूसारखे फळ तीस रुपयाला एक या दराने मिळत असून, त्याचे दर स्थिर आहेत. बाजारपेठेत सर्वाधिक महाग फळ म्हणून डाळिंबाला मान मिळाला आहे. नाशिकमध्ये पिकूनही डाळिंब सव्वाशे ते दीडशे रुपये किलो दराने मिळत आहे. चिकूची आवक कमी असल्याने ८० रुपये किलोने मिळत आहे. संत्रीची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेची संत्री १०० ते १२० रुपये किलोने तर महाराष्ट्रात पिकणारी संत्री ४० ते ६० रुपये किलोने मिळत आहे. आवक वाढल्यास भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. फळांचे दर (किलोमध्ये) द्राक्ष (कॅलिफोर्निया) - ४०० रुपये डाळिंब १०० ते १४० रुपये पपई ३० रुपये चिक ८० ते १०० रुपये संत्री ४० ते ६० रुपये सीताफळ ६० रुपये सफरचंद ८० ते १०० केळी ३० डझन अननस ३० ला एक अॅपल बोर ८० रुपये पेरू ३० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीयपंथीय अत्याचारप्रकरणी वणीतील चौघांना अटक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात तृतीय पंथीयावर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी तब्बल सात दिवसांनी गुन्हा नोंदविला असून, चार संशयितांना अत्याचाराचा आरोप ठेवत अटक केली आहे.

सात नोव्हेंबर रोजी एका तृतीय पंथीयावर शारीरिक अत्याचार झाला होता. सदर तृतीयपंथीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. सरकारवाडा पोलिसात या प्रकरणाची नोंद करण्यात आली. त्यानुसार वणी पोलिसांकडे हे प्रकरण तपासासाठी हस्तांतरित करण्यात आले. वणी पोलिसांनी तपास केला असता तृतीयपंथीयाच्या हातापायाला जबर मारहाण केली गेल्याची माहिती पुढे आली.

तृतीय पंथीयाच्या जाबजबाबात व तक्रारीच्या अनुषंगाने भगवान उर्फ भावड्या लक्ष्मण धुळे, वाळू महादू वसाळे, सागर गौतम लोखंडे, गौतम विनायक लोखंडे (सर्व रा. वणी) या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सात नोव्हेंबर रोजी तृतीय पंथीयाच्या सांगण्यावरून घडलेल्या प्रकाराची दखल पोलिसांनी घेत बारा नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. प्रारंभी हा प्रकार हाणामारीचा असल्याचा दावा पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांनी केला होता. त्यानंतर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रयत्न झाल्याचा जावईशोध पोलिसांनी लावला. म्हणजेच तृतीय पंथीयाच्या तक्रारीत तथ्यांश असल्याचे सुकृतदर्शनी उशिरा पोलिसांना साक्षात्कार झाला. सदर तृतीयपंथीय वणी गावातील देवीच्या दर्शनासाठी आला होता. परतीच्या प्रवासासाठी नाशिकला जाण्यासाठी वणी बसस्थानकावर आला असता सदर प्रकार घडल्याची माहिती तृतीय पंथीयाने दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत मंदिरांमध्ये चोऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरट्यांनी शहरातील मंदिरांना लक्ष्य केले असून, मंदिरांमध्येही चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंदिरांमध्ये चोरी झाल्याच्या दोन घटना घडल्या. एका संशयिताला रंगेहाथ पकडण्यात आले, तर एका चोरट्याने दानपेटीच चोरून नेली.

शनिवारी मध्यरात्री ध्रुवनगर येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्याने मंदिरातील दानपेटी चोरून नेली. त्यामध्ये ५०० रुपये होते. विनोद अशोक काळे (रा. ध्रुवनगर) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. दुसरा प्रकार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ध्रुवनगर येथील ध्रुवेश्‍वर महादेव मंदिरात घडला. तेथे चोरीचा प्रयत्न करण्यात आला. संशयित संतोष बाळासाहेब मोरे (रा. शिवाजीचौक, गंगापूर शिवार) याला ताब्यात घेतले आहे. त्याने मंदिरातील शंकराच्या पिंडीवरील तांब्याची नागाची फणी चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी उत्तम कारभारी आहेर (६०, रा. ध्रुवनगर) यांनी फिर्याद दिली.

सीपीयू चोरीस

शालिमार येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून संगणकाचा १५ हजार रुपये किमतीचा सीपीयू चोरीस गेल्याने खळबळ उडाली. त्यामुळे हॉस्टिलच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुरुवारी रात्री बारा ते शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही चोरी झाली. परिचारिका भारती भाऊसाहेब लोंढे यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

चेतनानगरमध्ये घरफोडी

दिवाळीनिमित्त नागरिक गावी गेल्याचा फायदा घेत चोरटे बंद सदनिका फोडू लागले आहेत. सिडकोतील चेतनानगरमध्ये राहणारे राजेंद्र विठ्ठल जाधव (रा. चेतना सागर रोहाऊस) यांचे घर बंद होते. ते शनिवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने, रोकड आणि लॅपटॉप असा ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले. इंदिरानगर पोलिस ठाण्यातर्फे तपास सुरू आहे.

आत्महत्याप्रकरणी गुन्हा

प्रेमास नकार दिला म्हणून एका तृतीयपंथीयाने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिकरोड पोलिसांनी तृतीयपंथीयाविरोधात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय तृतीय पंथीयाचे गोरेवाडी येथील तरुणावर प्रेम होते. मात्र, तरुणाने प्रेमास नकार दिल्याने त्याने शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास नाशिकरोड येथील नालंदा लॉजसमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

जनावरे डांबणाऱ्यांवर गुन्हा

जुन्या नाशकातील कोकणीपुरा येथे राहणाऱ्या मतीन शब्बीर कुरेशी (वय २८) याच्या विरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मतीन याने त्याच्या ताब्यात कत्तलीसाठी जनावरे आणून त्यांना उपाशीपोटी डांबून ठेवल्याचे पोलिसांना समजले होते. संशयावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताची आत्महत्या

सांडवा पुलाजवळील परिसरात एका अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अनुप झेरा जॉनी (रा. पेठरोड) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बाराच्या सुमारास एका अनोळखी भिकारी व्यक्तीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याची ओळख पटू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणाची आत्महत्या

पंचवटीतील हिरावाडी रोड परिसरातील सावतामाळीनगरमध्ये रमेश भीमराव भोर (२४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (दि.१४) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अपघातात तरूण ठार

पीकअप व्हॅनवरील ताबा सुटल्याने कारवर जाऊन आदळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. पाथर्डी फाटा येथील वडनेर गेट परिसरात शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. किरण रतिलाल भावसार (वय २२, रा. वृंदावननगर, कोणार्कनगर) हे एमएच १२ जेएफ ७२४४ क्रमाकांची पीकअप व्हॅन घेऊन पाथर्डी फाट्यावरून चालले होते. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तिने एमएच १६ सी ४४१ क्रमाकांच्या मारुती कारला धडक दिली. या धडकेत मारुतीमधील सचिन दिनकर चांदमोरे (२७, रा. आर्टीलरी सेंटर)
हा तरूण ठार झाला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी पीकअपचालक भावसार विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला.

मंगळसूत्र लुबाडले

देवीचे मंदिर कोठे आहे, अशी विचारणा करीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरट्याने पोबारा केला. आडगाव शिवारातील कोणार्कनगर परिसरात हा प्रकार घडला. आडगाव पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भारती संजय झगडे (४५, रा. कोणार्कनगर) शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घराजवळ उभ्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. लक्ष्मी मंदिर कुठे आहे, अशी विचारणा करून झगडे यांना बोलण्यात गुंतविले. मोटरसायकलवर मागे बसलेल्या संशयिताने झगडे यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची पोत ओरबाडून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोथे खूनप्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील उत्तम चोथे यांचा वणीजवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. ज‌मिनीच्या तसेच आर्थिक वादातून चोथे यांचा सुपारी देऊन खून झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

एकनाथ बाबुराव मुर्तडक (४२, रा. वाडीवऱ्हे), तानाजी काळू धात्रक (३0, रा. सर्मथनगर, पंचवटी), राहुल दादाभाऊ धात्रक (३२, रा. कांतीनगर, हनुमानवाडी), खंडू देवराम बोडके (३७, रा. वाघाडी, पंचवटी) अशी आरोपींची नावे आहेत. मुर्तडक या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून, त्यानेच सुपारी दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. नवरात्रोत्सवात वणी गड परिसरामध्ये चोथे यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तवेरा वाहनाचे मालक असलेल्या चोथे यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत सोडून आरोपी पसार झाले होते. अत्यंत सावधपणे हा खून करण्यात आल्याने आरोपींचा माग काढणे पोलिसांपुढे आव्हान ठरले होते. चोथे यांचे दैनंदिन व्यवहार, तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेऊन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, सहायक निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, उपनिरीक्षक एम. एस. रणमाळे, रवींद्र शिलावट, अमोल घुगे आदींनी या गुन्ह्याची उकल केली. याबाबत नवले म्हणाले, चोथे याची नदी किनारी साडेतीन एकर सुपीक जमीन होती. तसेच, आरोपी मुर्तडक याच्याकडून त्यांना १५ लाख रुपये येणे होते. यावरून सुरू असलेल्या वादातून मुर्तडक याने चोथे यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाकूड तस्करांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जुने वृक्ष विकासाच्या वाटचालीत तोडले जात आहेत. त्यात पुन्हा लाकूड तस्करांनी देखील धुमाकूळ घातला आहे. आडगाव शिवारातील स्वामी समर्थनगरमधील औदुंबरावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच कुऱ्हाड चालविण्यात आल्यामुळे वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला.

शहरातील जुने वड, उंबर, पिंपळ गुपचुप तोडून विकण्याचे प्रकार होत आहेत. या झाडांच्या पाल्याचा वापर जनावरांसाठी आणि लाकडाचा वापर जाळण्यासाठी करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. शहरातील वनसंपदेच्या रक्षणाविषयी महापालिका आणि वनखाते गाफील असल्यामुळे जुना वृक्षठेवा झपाट्याने कमी होत असल्याचे आर्किटेक्ट अतुल देशमाने यांनी सांगितले.

स्वामी समर्थनगरात उंबरावर कुऱ्हाड घातली जात असताना हरियाल नेचर क्लबच्या सदस्यांनी लाकूड तस्करांना विरोध केला. पोलिसांना बोलवण्याची धमकी वृक्षप्रेमींनी दिल्यानंतर तीन जणांची टोळी पळून गेली.

या घटनेबाबत महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांना कारवाईचे साकडे घालण्यात आले. वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ प्रमाणे महापालिकेने कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात आली. झाडांविषयी नागरिकांमध्ये देखील जागृती नसल्यामुळे झाडे तोडली जाताना सुशिक्षित नाशिककर दुर्लक्ष करतात. तक्रारी किंवा चौकशीचे कटकट लागेल म्हणून नागरिकांकडून डोळझाक होते आणि त्यामुळेच लाकूड तस्करांचे फावते, असे हरियाल नेचर क्लबचे सदस्य संजय जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंग बनला चोरट्यांचा ट्रेंड

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : शहरात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ६२ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. यात चोरट्यांनी १ हजार ७९८ ग्रॅम सोने हातोहात लांबवले. बाजार भावानुसार या सोन्याची किमत साडेचार कोटींच्या घरात जाते. विशेष म्हणजे हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण फारच कमी आहे. गुन्हेगारांना शिक्षा होताना दिसत नाही. यामुळे गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या तयार होत असून, रस्त्यावरून जाताना दागिने घालावे की नाही, असा प्रश्न महिलांना पडत आहे.

चालू वर्षात सक्रिय झालेल्या स्नॅचर्सने इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर तसेच सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये उच्छाद मांडला. पहिल्या आठ महिन्यातच चोरट्यांनी ६२ महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन लुटून नेले. पोलिसांकडे नोंद करताना काही ठिकाणी वजन तर काही ठिकाणी फक्त सोन्याच्या वजनाच्या रक्कमेचा उल्लेख आहे. त्यामुळे सरासरी २५ हजार तोळा इतका सोन्याचा भाव गृहीत पकडून एकूण सोन्याचे वजन काढले असता ते १ हजार ७९८ ग्रॅम इतके येते. बाजार भावानुसार या सोन्याची किमत ४ कोटी ४९ लाख ५ हजार इतकी होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सुध्दा चेन स्नॅचिंगच्या ११ घटना घडल्या असून, एकूण ७९ घटनांपैकी अवघ्या १९ घटनांचा अद्यापपर्यंत उलगडा झाला आहे. उर्वरित सोन्याचे नेमके काय झाले याचे गुढ कायम आहे. चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालणे आणि झालेल्या घटनांचा तपास लावणे, अशी दुहेरी जबाबदारी शहर पोलिसांना पार पाडावी लागणार असून, यात ते कितपत यशस्वी होतात, यावर 'स्त्री धना'ची सुरक्षितता अवलंबून आहे.

चेन स्नॅचिंग किंवा घरफोडीसारख्या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या सोन्याचा भाव ठरवण्यासाठी पोलिस दल त्या सोन्याची कधी खरेदी झाली? त्याचा वापर? घट आदी बाबींचा विचार करते. काही महिन्यापूर्वी खरेदी झालेल्या सोन्याचा भाव बाजार भावाशी मिळता जुळता असतो. तर, काही वर्षापूर्वीच्या सोन्यासाठी हा भाव खूपच कमी ठरतो. ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत नोंद झालेल्या ६८ गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेल्या सोन्याची एकूण किमत अवघी २९ लाख ८४ हजार ५०० इतकी लावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ते नव्हे, त्यांचे कार्यच बोलते!

$
0
0

गुलशनकुमार चढ्ढांनी घेतलाय समाजसेवेचा वसा fanindra.mandlik@timesgroup.com हाती घेतलेल्या कामाचा अथवा ध्येयाचा विचार प्राधान्याने करण्याची सवय लावून घेतली तर माणसाला हळूहळू निस्वार्थी होता येते आणि दुसऱ्यालाही आनंद देता येऊ शकतो अशीच ऋषीतुल्य व्यक्ती म्हणजे नाशिक अन्नसेवा समितीचे अध्यक्ष व नाशिक डायलेसीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुलशनकुमारजी चढ्ढा, वयाच्या ७८ व्या वर्षी देखील डायलेसिसच्या रुग्णासाठी त्यांचे कार्य जोमाने सुरू आहे. गुलशनकुमारजी यांचा जन्म १९३८ साली पाकिस्तानातील मलकवाल या लहानशा गावी झाला. पुढे भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेस त्यांचे कुटूंब दिल्लीजवळ मेरठ येथे स्थायिक झाले. त्यांचे शालेय़ शिक्षण पूर्ण करून त्यांनी मेटलर्जीमध्ये इंजिनीअरींगची पदवी घेतली. त्यानंतर ओझरच्या एचएएलमध्ये नोकरी लागली. तेथून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी अन्नसेवा समितीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. एकदा चढ्ढाजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णाला पहायला गेले असता, त्यांच्या लक्षात आले की, अनेक लोक अत्यंत गरीब, दुखी व पीडित आहेत. त्यांना एकावेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. पुरेसे वस्त्र नाही. औषधाला पैसे नाहीत. त्यातूनच मग २८ ऑगस्ट २००६ रोजी नाशिक अन्नसेवा समितीची स्थापना त्यांनी केली व त्याद्वारे जेवणाचे डबे वाटण्याचे काम सुरू केले. आज मितीला अन्नसेवा समितीद्वारे १६० ते १८० लोकांना रोज डबे पुरवले जातात. एकदा चढ्ढाजी मुंबईला जात असताना रेल्वे स्थानकावर काही ओळखीच्या व्यक्ती भेटल्या गप्पा केल्यानंतर असे समजले की, त्यातील एका व्यक्तीस किडनीचा विकार असून त्यांना घेऊन मुंबईला जात आहे. कारण तेथे अत्यंत माफक दरात काही संस्था डायलेसिस सेंटर चालवतात. सर्व साधारणपणे डायलेसिसचा एका वेळेचा खर्च अठराशे रुपयांपर्यंत येतो. मुंबईतील संस्था मात्र ३०० ते ३५० रुपयात डायलेसिस करतात. नाशिकमध्येही अशी सेवा देणारी संस्था असावी जेणेकरुन किडनी विकार असणाऱ्यांची सोय होईल व प्रवासाचा खर्च व दगदग कमी होईल. नाशिक अन्न सेवा समितीच्या नोव्हेबर २००१२ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नाशिक डायलेसिस सपोर्ट फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. ना नफा ना तोटा या तत्वावर १ मार्च २०१३ मध्ये स्थापन केलेल्या या फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून गुलशनकुमार चढ्ढा यांची सर्वानुमते निवड केली. नंतर या कार्याला चढ्ढाजींनी स्वतःला झोकून दिले. त्यासाठी त्यांनी स्वतःही आर्थिक योगदान दिले. त्यांनी सर्व विश्वस्तांपुढे आदर्श घालून दिला. त्यांनी समाजात फिरून समाजसेवक दानशूर व्यक्ती यांची भेट घेऊन जागृती केली. त्याचेच फळ म्हणून जानेवारी २०१३मध्ये तपोवन ब्रह्मचारी आश्रमाच्यावतीने डायलेसिस सेंटरसाठी जागा वापरण्यास दिली. सुरुवातीला चार डायलेसिस सेंटर बसवून सेंटर सुरू केले. रुग्णसेवा हिच इश्वरसेवा हेच ध्येय समोर ठेवून ४ एप्रिल २०१३ रोजी स्वामी नारायण डायलेसिस सेंटरचे उदघाटन केले. रुग्णांना नाममात्र ३५० रुपये अल्पदरात तेथे सेवा उपलब्ध करुन दिली. २०१५ मध्ये चढ्ढाजींच्या सामाजिक कार्यात समाजसेवक दानशूर व्यक्ती, डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशिअन यांचे मोलाचे सहकार्य व उत्साह मिळाल्याने डायलेसिस मशिनची संख्या ४ वरून ८ झाली आहे. डायलेसिस सेंटरचे स्वतःचे सुसज्ज असे आयसीयू सेंटर उभारण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील काही नामवंत डॉक्टरांच्या मदतीने नाममात्र दरात ओपीडी देखील सुरू करण्यात आली आहे. नाशिक डायलेसिस सपोर्ट फाऊंडेशनतर्फे नियमितपणे मूत्रपिंड विकाराच्या तज्ञ डॉक्टरांना पाचारण केले जाते. त्यांना मानसिक आधार दिला जातो. मूत्रपिंडाचे रोपण झालेल्या व्यक्ती व मूत्रपिंड दान करणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठीही चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येते. चढ्ढाजींना त्यांचा मुलगा व नातही याकामी मोलाची मदत करीत असतात.

तुमच्या माहिती असलेल्या यंग सिनियर विषयीही कळवा ज्येष्ठ नागरिक म्हटलं की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टीव्हनेस असाच बऱ्याचजणांचा समज असतो. पण अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृध्द असतात, त्यांचं मन मात्र तरुणच असतं. त्यांच्या कामातून, समाजेसेवेतून किंवा अन्य अॅक्टीव्हीटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतता. अशाच ज्येष्ठांसाठीचं हे व्यासपीठ म्हणजे आमचा 'यंग सिनियर्स' कॉलम. चला तर मग तुम्ही जर असे यंग सिनियर असाल तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असं कोणी असेल तर त्यांचा नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिध्दी दिली जाईल. आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डींग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी कॉलेज रोड, ना‌शिक

समन्वय : फणिंद्र मंडलिक ९४२३१७४४९५

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर

'यंग सीनिअर्स' उल्लेख करावा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा-कॅब चालकांचा वाद ऐरणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून खासगी कॅबचालकांना रेल्वे स्टेशन परिसरात येण्यास मज्जाव केला जात असल्याने प्रवाशांना कॅबमध्ये बसण्यासाठी स्टेशन बाहेर यावे लागत आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून कॅबचालकांना स्टेशन परिसरात वाहने आणू द्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही खासगी कॅबचालकांनी आपल्या कंपनीद्वारे सेवा सुरू केली आहे. ही सेवा रिक्षापेक्षा स्वस्त असल्याने स्थानिक रिक्षाचालकांचा या सेवेला पूर्वीपासून विरोध आहे. अनेक प्रवासी रेल्वेत असताना आपल्या मोबाइलमधील अॅपद्वारे या सेवेचे बुकिंग करीत असल्याने रिक्षा व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. रिक्षाचालक संघटित असल्याने कॅबचालकांना ते रेल्वे स्टेशन परिसरात येऊ देत नाही. त्यामुळे बाहेरून आलेला प्रवासी स्टेशनवर उतरल्यास त्याला आपले सामान घेऊन आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप परिसरात गाडी पकडावी लागते.

त्याचप्रमाणे नाशिकहून कॅबद्वारे गेल्यास बसस्टॅँड बाहेर असलेल्या पोलिस चौकीजवळ प्रवाशांना सोडतात. त्यामुळे प्रवाशांना सामानाचे ओझे घेऊन रेल्वेस्टेशन गाठावे लागते. अनेकवेळा गाडी येण्यास कमी अवधी असतो अशा वेळेस सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर जाणे जिकरीचे होते. काही वेळा पेशंटला घेऊन जावे लागते, अशा वेळी रिक्षाचालक अरेरावी करतात.

रिक्षापेक्षा कॅब स्वस्त

अनेकवेळा बाहेरगावच्या प्रवाशांना रिक्षाचालकांकडून लुटण्याचे प्रकार घडल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना कॅब सेवा सोयीची ठरली आहे. कॅबद्वारे प्रवास केल्यास त्याचे बिल ऑनलाइन देखील भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. किलोमीटर प्रमाणेच भाडे आकारण्याची सोय असल्याने जास्त आकारणी केली जात नाही. त्याउलट रिक्षाचालकांकडून मनमानी अाकारणी केली जात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे नागरिक कॅबलाच पसंती देत आहेत.

उधार उसनावर पैसे घेऊन रिक्षाचालक रिक्षा घेऊन धंदा करतात. त्यांच्या व्यवसायावर गदा आणण्याचे काम या कंपन्या करीत आहेत. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून या कॅब हद्दपार झाल्या. त्याप्रमाणे नाशिकमधूनही यांना हद्दपार केल्याशिवाय रहाणार नाही. याबाबत आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

- भगवंत पाठक, रिक्षा चालक-मालक सेनेचे पदा‌धिकारी


आतापर्यंत आमच्या कानावर काहीच आलेले नाही. कदाचित वैयक्तीक वाद असावेत, असा अंदाज आहे. तरीही कॅबचालकांनी आमच्याकडे तक्रार दाखल केल्यास त्याच्यावर आम्ही निश्चिच कारवाई करू.

- नारायण न्याहाळदे, पोलिस निरीक्षक, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला सीसीटीव्हींची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सीसीटीव्हींची मोठी मदत होत असली तरी शहर सीसीटीव्हींच्या टप्प्यात येण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो, असे संकेत पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी नाशिकमध्ये दिले.

शहरातील तसेच, जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी दीक्षित शनिवारपासून नाशिकमध्ये आले होते. रविवारी दुपारी त्यांनी पोलिस आयुक्तालयात शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ, विजय पाटील, पंकज डडाणे, डॉ. श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, डॉ. राजू भुजबळ, विजयसिंह चव्हाण यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण, तपासाची सद्दस्थिती, प्रलंबित गुन्हे आदींबाबत दीक्षित यांनी यावेळी मा‌हिती घेतली. तसेच, शहरामध्ये मुंबई नाका आणि म्हसरूळ या दोन नवीन पोलिस स्टेशन्सला मान्यता मिळूनही ते अद्याप सुरू होऊ शकली नसल्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊले उचला, नागरिकांच्या पोलिसांबद्दलच्या तक्रारी कमी होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्या, असे आदेश यावेळी देण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

बैठकीनंतर दीक्षित यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सिंहस्थ काळात सीसीटीव्हींची मोठी मदत झाली असली तरी ते तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आले होते. कायमस्वरुपी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे शहरातील पोलिस अधिकारी सांगत असले तरी ते केव्हा बसविले जाणार असा प्रश्न ‌दीक्षित यांना विचारण्यात आला. आर्थिक तरतुदीअभावी हा प्रश्न रेंगाळल्याची माहिती दीक्षित यांनी दिली. त्यामुळे शहर सीसीटीव्हींच्या कक्षेत येण्यासाठी अनिश्चित काळापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, असे संकेत दीक्षित यांनी दिले. फसव्या स्कीम्समध्ये पैसे गुंतवून अनेक लोक स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत.

अधिक पैसे ‌मिळतील या आशेने नागरिकांनी अशा स्कीम्समध्ये पैसे गुंतवू नये, असे आवाहन दीक्षित यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचाही आढावा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सादरे प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

जळगावातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत दीक्षित यांना विचारणा करण्यात आली. या प्रकरणातील संशयित वरिष्ठ पोलिस अधिकारी असून, त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून, त्यांच्याकडून अद्याप कोणताही अहवाल प्राप्त न झाल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती दीक्षित यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीच्या तरुणाची भरारी

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

देवळालीचे कलाकार पंडित मोरे रसिकांसाठी एक नव्हे तर तब्बल दोन चित्रपट घेऊन येत आहेत. 'ड्रिम्स एंटरटेनंमेंट' या त्यांच्या बॅनरखाली लवकरच डोंबारी लोकांची कथा असलेला 'बिऱ्हाड' व 'धमाल दे धमाल' हे चित्रपट ते स्वत: दिग्दर्शित करत असून यामध्ये त्यांनी अभिनयही केला आहे.

सतत नवीन काही करण्याचा छंदातून ६ वर्षापूर्वी पंडित मोरे यांनी देवळाली सोडून थेट मुंबई गाठली. पडद्यामागे काम करीत राहूनही त्यांनी चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. आज संस्कृती बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या 'प्यार की रोशनी' या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच चेन्नई येथील श्री रवी दिग्दर्शित 'समईवेल्ली' या तमिळ चित्रपटातलही त्यांना भूमिका साकरण्याची संधी मिळाली आहे.

या अनुभवाच्या शिदोरीवरच त्यांनी आपल्या बॅनर अंतर्गत या दोन चित्रपटांची निर्मिती करण्याचे धाडस केले आहे. देवळाली कॅम्पला दिलीप कुमार, अर्जुन रामपाल, भूमिका चावला अशा नामांकित अभिनेत्यांचा वारसा लाभला आहे. त्यांच्याप्रमाणेच आपल्याही कामाच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रामध्ये देवळाली कँप परिसराचे नाव उज्ज्वल व्हावे हीच इच्छा असल्याचे त्यांनी 'नाशिक टाइम्स'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटरसायकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड येथे दोन मोटरसायकलींच्या धडकेत राजेंद्र लक्ष्मण खेताळे यांचा अपघाती मृत्यू झाला. उपनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. कैलास रामनाथ डहाळे (वंजारवाडी) यांनी तक्रार दिली आहे. डहाळे व त्यांचे मेहुणे राजेंद्र लक्ष्मण खेताळे (३०, ठाणगाव, सिन्नर) रविवारी रात्री मोटरसायकलवरून (एमएच १५ डीएफ ७१४१) देवळालीगावाकडून आर्टीलरी सेंटररोडमार्गे दत्त मंदिराकडे जात होते. वेगात आलेल्या मोटरसायकलने सुराणा हॉस्पिटलसमोर (एमएच १७, ए. एक्स ६४८५) खेताळे यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली. जबर मार लागल्याने खेताळे जागीच ठार झाले. पोलिसांनी संशयित मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काडतुसांसह एकास अटक

नाशिकरोड : गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन चाललेल्या एका तरुणास गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. समाधान दगडू कोळी (रा. अरिंगळे मळा, एकलहरेरोड) असे त्याचे नाव आहे. पन्‍नास हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व काडतुसे घेऊन तो एकलहरा मार्गावरील सिन्नर फाटा भाजी मार्केट येथे येणार असल्याची माहिती युनिट तीनला मिळाली होती. पोलिस अधिकारी सुभाष गुंजाळ, संजय मोकळ, जाकीर शेख, बाळासाहेब दोंदे, रवींद्र बागूल, दीपक जठार, परमेश्वर दराडे, गंगाधर केदार, आत्माराम रेवगडे, संतोष कोरडे आदींनी सापळा रचून समाधानला मुद्देमालासह पकडले.

पोत हिसकावली

घरासमोर रांगोळी काढणाऱ्या महिलेस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी सोन्याची पोत हिसकावून नेली. उपनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुनीता पाडळकर (रा. कल्पतरूनगर, नाशिकरोड) शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरासमोर रांगोळी काढत होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या संशयिताने त्यांना पत्ता विचारला. त्या पत्ता सांगत असतानाच संशयिताने त्यांच्या गळ्यातील सुमारे चार तोळे वजनाची ५६ हजार रुपयांची पोत हिसकावून नेली.

सहाय्यकाची आत्महत्या

पंचायत समितीमध्ये वरिष्ठ सहायक म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांत एल. बैरागी (वय ५७, रा. अशोक नगर, सातपूर) यांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बैरागी यांनी सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या बदल्यात अन्यत्र जमीन शक्य

$
0
0

शहर विकास आराखडा राज्य सरकारला सादर म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड शहराला नवा चेहरा प्राप्त करून देणारा शहर विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला. महापालिका क्षेत्रात आरक्षण बाधित मिळकतधारकांना जमिनीच्या बदल्यात जमिन देण्याचा पर्याय आराखड्यात सुचविण्यात आला आहे. मात्र, एकाच ठिकाणी ही जमीन मिळणे शक्य नाही. महापालिकेकडे उपलब्ध असलेली जमीन बाधीत मिळकतधारकांना दिली जाणार आहे. याचाच अर्थ एकाऐवजी अनेक ठिकाणी ही जमीन मिळण्याची शक्यता आहे. नगररचनाकार किशोर पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. आरक्षण जागेच्या बदल्यात जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेकडे ज्या जागा प्राप्त होणार आहेत त्या आरक्षण असलेल्या जागा मालकांना देऊन आरक्षणाखालील जागा ताब्यात घेण्याची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. देवाणघेवाण होण्याच्या जागेच्या किमतीत जो फरक असेल त्यासाठी जागा कमी जास्त द्यावी लागेल. अॅमिनीटी स्पेसमधून ही जागा दिली जाईल. जमिनीचे क्षेत्र मोठे असेल तर तुकडा पद्धतीने विविध ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले. तब्बल २१४९ हरकती नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारुप विकास आराखडा २३ मे २०१५ ला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर तब्बल २१४९ हरकती व सूचना आल्या होत्या. भुक्ते यांच्यासह दोन सदस्यांच्या नियोजन समितीने सुनावणी घेतली. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण कार्यवाही पाच महिने २४ दिवस इतक्या विक्रमी वेळेत करण्यात आली आणि सरकारला आराखडा सादर करण्यात आला. जनहितांच्या तरतूदी विकास योजनेत एकूण ११७ बदल करण्यात आले असून त्यामध्ये सर्वसाधारण बदल, आरक्षण व रस्ते यांचा समावेश आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलींमध्ये कलम १२७ ची तरतूद, अस्तित्वातील वापराबाबत मोजणी, नकाशाच्या अनुषंगाने पडताळणी करण्याबाबत तरतूद, आरक्षण स्थलांतराची तरतूद तसेच अहवालाच्या क्षेत्राबाबत नमूद असलेली टीप यामुळे अनेक आक्षेपांबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही. यामध्ये सोपी व सुटसुटीत नियमावली करण्यात आली असून जनहिताच्या अनेक तरतूदींचाही समावेश करण्यात आला आहे. विकासाबरोबरच व्यवसायालाही प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलमध्ये काही नवीन तरतूदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आरक्षण क्रेडीट बॉण्डमध्ये आरक्षणाच्या जागा महापालिकेस हस्तांतरित केल्यास त्याचा भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदल्याच्या रकमेचा बॉण्ड जमीनधारकास देण्यात येईल. बांधकाम उंचीबाबत दिलासा पूर्वी शंभर मीटर बांधकामाची परवानगी देताना उंचीचे निकष ठरवून दिलेले होते. बांधकाम क्षेत्राच्या जागेसमोरील रस्ता व समोरील बांधकामाचे सामासिक अंतर अधिक रस्त्यांची रुंदी गुणीले १.५ असा फॉर्मुला दिला होता. शहरातील बहुतांश बांधकाम व्यावसायिकांनी त्याला हरकत घेतली होती. नव्या आराखड्यात सहा मीटर रस्त्याला १८ मीटर उंचीचे बांधकाम, ६ ते ९ मीटरला २४ मीटर, ९ ते १२ मीटरला ३६ मीटर, १२ ते १५ मीटरला ५० मीटर, १५ ते १८ मीटरला ७० मीटर, १८ ते २४ मीटरला १०० मीटर आणि २४ मीटरच्या पुढील रस्त्यावरील बांधकामाला शंभर मीटर उंची ठरविण्यात आली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images