Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दारूची नशा पडली महागात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दारूच्या नशेत असलेल्या मद्यपी तरुणाची मोटरसायकल, सोन्याची अंगठी तसेच मोबाइल घेऊन चोरट्याने पोबारा केला. सातपूर येथील आयटीआयच्या मैदानाजवळ रविवारी रात्री दहा ते बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सातपूर पोलिस स्टेशनमध्ये किरण गुलाब पवार (२७, पवार मळा, अश्वमेधनगर) यांनी फिर्याद दिली. पवार दारूच्या नशेत होता. त्यामुळे तो रस्ता चुकला. गुंगी आल्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला मोटरसायकल उभी केली. तो तेथेच झोपला. याचाच फायदा घेत चोरट्याने त्याची मोटरसायकल, मोबाइल आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पवार यास शुध्द आली तेव्हा या तीनही वस्तू चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याने सातपूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन चोरीची फिर्याद दिली. पर्स हिसकावून पोबारा महिलेच्या खांद्यास अडकविलेली पर्स हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. गंगापूर रोड परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. नीलम नीलेश कानमहाले (रा. गुलमोहर कॉलनी, सातपूर) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्या रस्त्यावर उभ्या असताना मोटरसायकलवरून तिघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांच्या खांद्यास अडकविलेली पर्स हिसकावून त्यांनी पोबारा केला. पर्समधील रोख रक्कम, मोबाइल फोन आणि सोन्याचे मंगळसूत्र असा २६ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे कानमहाले फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात २५० जणांवर ठेवीप्रकरणी कारवाईचा बडगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको नियमबाह्य व्यवहारांमुळे जिल्ह्यात चार सहकारी बँका आणि १७ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. या अर्थसंस्थांशी संबंधित अडीचशेहून अधिक जणांवर कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार समितीच्या बैठकीत देण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला गावडे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, नाशिक तालुका उपनिबंधक सुनील बनसोडे, सहनिबंधक मनीषा खैरनार, जिल्हा ऑडीटर पिंगळे, अशासकीय सदस्य पा. भा. करंजकर, भास्कर कोठावदे यांच्यासह संस्थांचे अवसायक, लेखापरीक्षक आदी उपस्थित होते. विषयपत्रिकेतील विषयांवर चर्चा झाल्यानंतर काही प्रलंबित प्रकरणांमध्ये होत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून, ती लवकरात लवकर निकाली निघावीत, यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. काही संस्थांमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असून, अशा संस्थांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच, कुठल्याही परिस्थितीत या मालमत्तांचा परस्पर व्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या. लवकरात लवकर संपूर्ण कर्जवसुली करता यावी, यासाठी संस्थांनी उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी करावी. प्रभावी उपाययोजनांद्वारे चिंतीत ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम संस्थांनी करावे, असे आदेश गावडे यांनी संस्थांशी संबंधित पदाधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगारांबाबत निर्भयपणे तक्रारी द्या

0
0

एसीपींचे नागरिकांना आवाहन म. टा. प्रतिनिधी, नाशिक मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या आरोपींबाबत तक्रारी असतील तर, निसंकोचपणे पोलिसांकडे म्हणणे मांडा, असे आवाहन परिमंडळ एकमधील सहायक पोलिस आयुक्त विजयुकमार चव्हाण यांनी केले आहे. अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामध्ये जयेश हिरामण दिवे, (वय २५ रा. एरंडवाडी पेठफाटा, पंचवटी), राकेश तुकाराम कोष्टी (२९ रा. दत्तचौक सिडको) कुंदन सुरेश परदेशी (२३ रा.दळवीचाळ, हनुमानवाडी पंचवटी) सुनील पंढरीनाथ धोत्रे (२५, शनिमंदिर वडारवाडी पेठरोड), लक्ष्मण पांडूरंग जाधव ऊर्फ काळू (२८, रा. ढगे चाळ, गजानन चौक, पंचवटी), गणेश भास्कर कालेकर (२१, रा. कालेकर चाळ, हनुमानवाडी पंचवटी), अक्षय कैलास इंगळे (२१, रा. हनुमानवाडी पंचवटी), राकेश रामदास शेवाळे (२३, रा. इंगळे चाळ, हनुमानवाडी पंचवटी), मयूर शिवराम कानडे (२२, रा.शारदा सरस्वती सोसायटी, मेहरधाम पंचवटी), परिक्षित बाळासाहेब सूर्यवंशी (१९, रा. तुळजाभवानी नगर, नवीन मार्कट मागे, पंचवटी) अशी आरोपींची नावे आहेत. चोऱ्या, हाणामाऱ्या, जबरी चोऱ्या, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अशा सराईत आरोपींचा समावेश होता. गेले अनेक वर्ष ते गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्यावर केवळ पंचवटी पोलिस स्टेशनमध्येच नव्हे तर शहरातील बहुतांश पोलिस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये हवे असलेले हे आरोपी पोलिसांना महिनोनहिने गुंगारा देत होते. अखेर एकेक करून त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाईचे त्यांचे प्रस्ताव पोलिसांनी तयार केले आहेत. कोर्टानेही त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे. त्यांच्याबाबत अनेकांच्या तक्रारी असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या दहशतीमुळे अनेकजण तक्रार करण्यास धजावत नसावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. म्हणूनच त्यांच्याबाबत कुणाला तक्रार असल्यास कार्यालयात समक्ष येऊन म्हणणे मांडावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.
अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये सक्रिय असलेले दहा संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांनी संबंधित आरोपींबाबत मा‌हिती असल्यास निर्भयपणे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव तसेच संबंधितांकडून देण्यात येणारी माहिती गुप्त ठेवली जाईल. - विजयकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लागता डोहाळे कुंभाचे’ ताशेरे ओढणारे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सांस्कृतिक नगरी अशी नाशिक नगरीची ओळख आहे. परंतु, त्याआधी रूद्राक्ष संस्कृतीमुळे नाशिकला ओळखले जाते. धार्मिक नगरी म्हणून जगभरात प्रसिध्द पावलेल्या नाशिक नगरीमध्ये भरणार कुंभमेळा ही या शहराची आणखी एक ओळख आहे. हीच ओळख केंद्रिभूत करून ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर लिखित व दिग्दर्शित 'लागता डोहाळे कुंभाचे' हे नाटक मंगळवारी सादर झाले. प्रासंगिकता जपणारे हे नाटक धार्मिक प्रवृत्तींवर ताशेरे ओढणारे होते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने ५५ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला मंगळवारी सुरुवात झाली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ५ डिसेंबरपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत. 'लागता डोहाळे कुंभाचे' या नाटकात कुंभमेळ्याविषयी भाष्य करण्यात आले. साधूंच्या वाढत जाणाऱ्या सांसरिक मागण्या, त्याला कंटाळलेला राजा असे दाखविण्यात आले. चंद्रनगरीचे महान संस्थानिक असलेले श्रीमंत राजे हिंमतराव यांच्या पत्नी उषाराणी नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने येतात. चंद्रनगरीला कुंभमेळा भरवावा यासाठी त्या आग्रह धरतात. त्यातून पुढे राजाची काय कसरत होते हे नाटकातून दाखविण्यात आले आहे. नाटकात प्रीतम राऊत, महेश कुंटे, कृष्णा रघुवंशी, राम बोरसे, अभिजीत काळे आदींच्या भूमिका होत्या. नेपथ्य किरण व वरूण भोईर, संगीत शशांक इरवणकर, रंगभूषा उमेश भोईर, माणिक कानडे, प्रकाशयोजना विलास चव्हाण, रवि रहाणे, ध्वनी गिरिश भोईर यांचे होते. आजचे नाटक शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, नाशिक प्रस्तुत हरिष जाधव लिखित व विक्रम गवांदे दिग्दर्शित 'सटवाई अश्व'. स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह. वेळ सायंकाळी सात वाजता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधर मतदारसंघासाठी भाजपमध्ये घमासान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढील वर्षी होणार असली तरी मतदारनोंदणीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांनी आपापले पत्ते फेकायला सुरुवात केल्याने ही निवडणूकही चांगलीच गाजणार अशी चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारी देतांना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर नाशिक मतदारसंघासाठी पुढील वर्षी डिसेंबरमध्ये निवडणूक होत आहे. गेल्या खेपेस काँग्रेसच्या डॉ. सुधीर तांबे यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळविला होता. तत्पूर्वी या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. प्रा. ना. स. फरांदे यांनी काही काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर नाशिकच्या प्रतापदादा सोनवणे यांनीही भाजपच्यावतीने हा मतदारसंघ राखला होता. सोनवणे हे धुळे-मालेगाव लोकसभा मतदार संघातून निवडून गेल्याने झालेल्या रिक्त जागेवर नंतर काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी विजय मिळविला होता. तांबे हे संगमनेर येथे प्रॅक्टीस करतात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते मेव्हणे आहेत. या मतदारसंघावर वर्षानुवर्षे भाजपचे वर्चस्व असतांना तांबे यांनी धक्कादायक यश मिळविल्याने तेव्हा खळबळ उडाली होती. भाजपचे नेते प्रा. सुहास फरांदे यांचा पराभव हा अंतर्गत लाथाळीने झाला अशी तेव्हा चर्चा होती. नाशिक जिल्ह्यातील आघाडीची शैक्षणिक संस्था मराठा विद्या प्रसारक समाजाचे पदाघिकारी असलेले नितीन ठाकरे यांच्या उमेदवारीने फरांदेंना फटका बसला. याउलट तांबेंना पक्षात साथ तर मिळालीच; शिवाय पाच जिल्ह्यातील नातेसंबंध व निकटवर्तियांमुळे त्यांचा विजय सुकर झाला.

आगामी निवडणुकीसाठी विद्यमान आमदार सुधीर तांबे यांच्याबरोबरच काँग्रेसचेच माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हे देखील उत्सुक आहेत. सर्वाधिक स्पर्धा अपेक्षेप्रमाणेच भारतीय जनता पक्षात असून, अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार आतापासूनच जंगजंग पछाडत आहेत. गतवेळचा पराभव पुसण्यासाठी फरांदे इच्छुक असले तरी त्यांच्या सौभाग्यवती देवयानी फरांदे या नाशिकमधून विधानसभेवर निवडून गेल्यामुळे एका घरात दोन पदे दिली जाणार नाहीत अशी इतर इच्छुकांची भावना आहे. याच भावनेपोटी डॉ. प्रशांत पाटील, हेमंत धात्रक, सचिन चव्हाण, नितीन ठाकरे आदींनी फिल्डींग लावली आहे. डॉ. पाटील हे धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांचे जावई आहेत. अहमदनगरमधून अभय आगरकर, तर धुळे जिल्ह्यातून संभाजी पगारे हेही इच्छुक आहेत. गेल्या खेपेस पराभूत झालेले ठाकरे यांनीही नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेला असून, त्यांना माजी खासदार व या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले प्रतापदादा सोनवणे यांचा भक्कम आशीर्वाद आहे. धात्रक हे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे पदाधिकारी असून, पंकजा मुंडेंचा त्यांना आशीर्वाद आहे. सचिन चव्हाण हे संवर्धन ही सामाजिक संस्था चालवत असून, युवकांना एमपीएससी व यूपीएससीसह स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतात. मनसेत असताना रोजगार तसेच करिअर मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क केला आहे.

विद्यमान आमदार डॉ. तांबे हे मागील पाच वर्षांत नगर वगळता इतर जिल्ह्यांत फिरकले नसल्याने त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. जो उमेदवार अधिकाधिक नवीन पदवीधर मतदारांची नोंदणी करेल, तसेच आधीच्या नोंदणी केलेल्या उमेदवारापर्यंत पोहचेल त्याचा विजयाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवकाश असल्याने बरीच गणिते बदलण्याचीही शक्यता आहे.

राष्ट्रवादी-शिवसेनेचा बाय?

राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गोटात मात्र या निवडणुकीबाबत कमालीची शांतता असून, एकप्रकारे त्यांनी आपापल्या मित्रपक्षाला अप्रत्यक्षरित्या बाय दिल्याचे सध्यातरी दिसते आहे. मतदारनोंदणीत मात्र भाजप व काँग्रेसनेच आघाडी घेतली आहे. अर्थात नेहमीप्रमाणे ऐनवेळेस इतर पक्षांकडूनही काही मंडळी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून इच्छूक असलेले उमेदवारी न मिळाल्यास इतर पक्षात उडी मारण्याची शक्यताही आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक करंजी सामाजिक प्रबोधनाची!

0
0

संवर्धन संस्था व स्वामी विवेकानंद केंद्राचा आदिवासी पाड्यांवर उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी सण व बालदिनाचे औचित्य साधत पिंपळद (ता.त्र्यंबकेश्वर) येथील स्वामी विवेकानंद केंद्र व येथील संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दुर्गम आदिवासी पाड्यांवर एक कंरजी मोलाची हा उपक्रम राबवण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे यात सुरुवातीला पथनाट्याद्वारे आदिवासींचे सामाजिक प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर आदिवासींना कपडे तसेच दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.

त्र्यंबकेश्वरपासून २५ किलोमीटर अंतरावरील हेदपाडा व मेटकावरा या दुर्गम पाड्यांवर दिवाळीचा फराळ वाटप करतानाच, हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासींना जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात एकत्र करण्यात आले. तेथे कार्यक्रमाचे औचित्य व नियोजन सांगितल्यानंतर पथनाट्याचा पुढचा टप्पा सुरू झाला. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व अंधश्रद्धा निर्मुलन ह्या विषयांवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहजसोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यानंतर देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. प्रबोधनपर विषयांची सोपी मांडणी करत पथनाट्य सादर करतानाच फराळ, मिष्टान्न, कपडे तसेच लहानग्यांना खेळण्यांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण दिवस आदिवासी बांधवांसोबत घालवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपक्रमात प्रयत्न करण्यात आले.

तरुण महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार व संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम साजरा करण्याचे संवर्धन संस्थेचे हे २५ वे वर्ष होते. हेदपाडा व मेटकावरा हे आदिवासी पाडे दत्तक घेत असल्याची घोषणा या वेळी सचिन चव्हाण यांनी केली. या पाड्यांवर लवकरच पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी काम सुरू केले जाणार आहे.

एक करंजी मोलाची हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक तसेच नाशिकरोड परिसरातून घराघरातून आदिवासींसाठी फराळ तसेच कपडे व खेळणी देण्यात आली होती. स्वामी विवेकानंद केंद्राचे संपर्कप्रमुख विश्वास लपालकर, श्री व सौ सालापुरे, आरोग्य रक्षक मुरलीधर चित्तेकर (हेदपाडा), सोमनाथ कावरे (मेटकावरा), गणेश गायकवाड, जितेंद्र वराडे (फोटोग्राफर), संतोष

खेडकर, नितीन साठे, जयश्री पवार, सचिन गायकवाड, डॉ. प्रमोद वाघ आदिंनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचे हातावर हात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन धान्य घोटाळ्यात थेट मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या घोरपडे बंधुची मालमत्ता जप्त करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयास सादरही केला आहे. मात्र आरोपींपैकी एकालाही अद्याप अटक न झाल्याने पोलिसांच्या तपास प्रक्र‌ियेवरच संशय व्यक्त होतो आहे.

रेशन धान्य घोटाळ्यामुळे नाशि‌कचे नाव राज्यभरात बदनाम झाले. सुरगाणा येथे झालेला कोट्यवधींचा रेशन धान्य घोटाळा, सिन्नर, इगतपुरी, घोटी येथे गेल्या दहा वर्षांत झालेल्या रेशन धान्य घोटाळ्यांपैकी काही घोटाळ्यांमध्ये घोरपडे बंधुंचे नाव पुढे आले. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र ते न्यायालयात हजर होत नसल्याने अखेर त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक शहरासह इगतपुरी, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यांमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यामध्ये त्रिमूर्ती चौक, म्हसरूळ परिसरातील दोन पेट्रोलपंप, ५० एकरहून अधिक जमीन, भुखंड आणि सदनिका, गाळे, तसेच आडगाव येथील टीडीआरच्या स्वरुपात असलेली मालमत्ताही महापालिकेच्या मदतीने सील करण्यात आली असून, त्याचा अहवाल कोर्टाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या मालमत्तेचा व्यवहार होण्याची शक्यता मावळल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे. संपत घोरपडेसह याच्यासह सहभागी सर्व आरोपींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी प्रवासही महागला!

0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

राज्य परिवहन महामंडळ आणि भारतीय रेल्वेने आपल्या तिकीटदरामध्ये वाढ केल्यानंतर खासगी वाहतूकदारांनीही आपल्या दरामध्ये वाढ करीत सर्वसामान्यांना महागाईचा चटका लावला आहे. दिवाळीच्या सुटीच्याच काळामध्ये करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे सुटीपेक्षा प्रवासावरच अधिक खर्चाचा भार पडला आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाने तिकीटदरावर दरवाढ केली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पाहिजे त्या ठिकाणी विनाअडथळा पोचण्यासाठी खाजगी चारचाकी वाहनांना पसंती देत आहेत. नाशिक परिसरातील एमआयडीसीमध्ये रोजगारानिमित्ताने मनमाड, येवला, मालेगाव, तसेच जळगाव धुळेसह खान्देशातील बहुतांश नागरिक सिडको, सातपूर, अंबड, जेलरोड, नाशिकरोड, देवळाली कॅम्पमध्ये वास्तव्यास आहेत. दिवाळी सुटी काळात आपल्या गावाकडे जाण्यासाठी अनेकांनी खासगी वाहनांना प्राधान्य दिले. मात्र, अनेक खासगी ट्रायव्हल्स कंपन्यांनी सुमारे दीडपट दरवाढ केली. या दरवाढीबाबत काही जागरुक प्रवाशांनी आक्षेप नोंदविला. मात्र, दरवर्षी दिवाळीच्या काळात अशी दरवाढ केली जात असल्याचे सांगत काही व्यावसायिकांनी दरवाढीचे समर्थन केले आहे. गेल्या काही दिवसात डिझेल व पेट्रोलच्या दरामध्ये झालेल्या दरवाढीचे कारण त्यांनी पुढे केले आहे.

कॅबला पसंती

वाढत्या गर्दीपासून सुटका करीत वेळ वा‌चविण्यासाठी नागरिकांची कॅब प्रकारातील हेचबेक, सेडन अशा स्वरूपाच्या ओला, कुबेर, टेक्सी फॉर शुअर, सवारी, मेरु आदी खाजगी कंपन्यांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. या शहर वाहतुकीच्या गाड्यांकडून परवडणाऱ्या दरात अलिशान व वातानुकुलित प्रवास करण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या गाड्यांची बुकिंग करण्यात प्रवाशांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र सध्या शहरातील विविध भागात दिसून येत आहे.

प्रवाशांना भुर्दंड

ट्रायव्हल्स कंपन्यांच्या नियमाप्रमाणे दिवसाला किमान ३०० किलोमीटर अॅव्हरेजप्रमाणे गाडी भाड्याने मिळते. त्यात प्रवाश्यांकडून दीडपट अधिक भाडे आकारल्यास सर्वसाधारण कमीत कमी ८ रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे गाडी भाडे असेल तर साधारणपणे पूर्वी ३०० किलोमीटरसाठी २४०० रुपये मोजावे लागत होते. आता त्याच प्रवासासाठी सुमारे ३६०० रुपये मोजावे लागणार आहे. त्यात रात्रीचा मुक्काम असेल तर ५०० ते ७०० रुपयांची जादा आकारणी होते. तरीही नागरिकांची खाजगी वाहतुकीकडे असलेला कल पाहता व सुरक्षित प्रवासासाठी ते देण्याची तयारी अनेकांची असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेगाव ते नागपूर शिक्षकांची दिंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील २२ हजार शिक्षक शेगाव ते नागपूर अशी पाय‌ी दिंडी काढणार आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे शिक्षक भूक, भीग मांगो आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधणार आहेत. विशेष म्हणजे, सत्तेत असलेल्या शिवसेनेची शिक्षक आघाडीही यात सहभागी होऊन सरकारला घरचा आहेर देणार आहे.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षक हे उपाशीपोटी काम करतानाच उपासमार होऊ नये यासाठी शेतमजुरी आणि बुट पॉलिशचाही व्यवसाय करीत आहेत. राज्य सरकारने विनाअनुदानित शाळांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शिक्षकांची परिस्थिती भयावह झाल्याचा आरोप आमदार श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सरकारकडे वारंवार यासंदर्भात पाठपुरावा करुनही काहीच झालेले नाही. त्यामुळे शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच येत्या १ डिसेंबरला शेगाव येथून विनाअनुदानित शिक्षकांची पायी दिंडी नागपूरकडे जाणार आहे. या दिंडीत शिक्षक आपली भूक ही भीक मागून भागविणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे. राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दिंडी ११ डिसेंबरला नागपूर येथे पोहचणार आहे. या दिंडीद्वारे समाज प्रबोधनपर भजन, कीर्तन व शिक्षकांच्या व्यथाही मांडल्या जाणार आहेत.

राज्यातील १५ ते १६ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या भावनांशी सरकार सातत्याने खेळ करीत असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे. विनाअनुदानित शाळांना व तुकड्यांना राज्य सरकारने तातडीने निधी द्यावा. त्यासाठी राज्य सरकारला केवळ २२७ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठीची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी. सध्याच्या राज्य आणि केंद्र सरकारवर सर्वज समाज घटक अत्यंत नाराज आहेत. सर्वसामान्यांना लागणाऱ्या तूरडाळीपासून ते सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सरकारने अच्छे दिन येतील असे सांगितले पण तसे होताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनात सरकारने निर्णय जाहिर केला नाही तर हिंसक आंदोलन केले जाईल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा पदाधिकारी संजय चव्हाण यावेळी उपस्थित होते.

आश्रमशाळांचाही प्रश्न

विनाअनुदानित शाळांबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती कनिष्ठ कॉलेज, आश्रमशाळा यांचाही प्रश्न आहे. २००८ मध्ये एका आदेशाद्वारे तब्बल १४७ आश्रमशाळा सुरु करण्यात आल्या. याच आदेशात विविध बाबी सांगण्यात आल्या आहेत. शिक्षकांचा पगार ४ वर्षांनंतर २५ टक्के, ५ वर्षांनंतर ५० टक्के, ६ वर्षांनंतर ७५ टक्के तर ७ वर्षांनंतर १०० टक्के वेतन अदा करण्यात येईल.

आता कुठे गेली तळमळ?

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठिंबा दिला. तसेच, शिक्षकांच्या व्यथा मांडणारी भाषणे त्यांनी केली. आता ते सत्तेत असूनही निर्णय घ्यायला वेळ का लागतो आहे, असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत संमेलनाच्या आठवणींना उजळा...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे मंगळवारी निधन झाल्याने २००३ मध्ये झालेल्या संत संमेलनाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी तब्बल ८ दिवस नाशिकमध्ये मुक्काम करीत देशव्यापी संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी ओळख असलेले विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे मंगळवारी नवी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनाने विहिंपच्या नाशिक शाखा आणि पदाधिकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सिंघल यांचे नाशिकमधील दौरे आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना यावेळी अनेकांनी उजाळा दिला. तर, काही जणांनी त्यांच्या विषयीचा आदरभाव तसेच त्यांच्या आठवणी सोशल मीड‌ियावरही प्रदर्शित केल्या. २००३ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात विहिंपच्यावतीने राष्ट्रीय संत संमेलन घेण्यात आले होते. 'या संमेलनासाठी सिंघल हे स्वतः नाशिकमध्ये ८ दिवस होते. विहिंपचे पदाधिकारी नाशिकरोड येथील माझ्या घरी त्यांचा निवास होता असे एकनाथ शेटे यांनी त्यांच्या आठवणी कळविल्या. स्पष्ट विचार आणि प्रभावी नेतृत्व अशी सिंघल यांची ओळख होती. तळागाळातील कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करतानाच त्यांच्या अडी-अडचणी दूर करण्याचे कसब सिंघल यांच्याकडे होते, असे शेटे यांनी सांगितले. अस्पृश्यता निवारणाचे मोठे राष्ट्रीय कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली विहिंपने राबविले. तसेच, दलित वस्तीत जावून काम करण्याचा पायंडा सिंघल यांनी पाडला आणि अमुलाग्र बदल त्यातून घडून आला. नाशिकच्या संत संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

पंतप्रधानांचा शोकसंदेश

आयुष्यभर संघाचे प्रचारक राहिलेले सिंघल अविवाहित होते. ८०च्या दशकात अयोध्येतील राम मंदिर बांधणीसाठी संघ परिवाराने हाती घेतलेल्या आंदोलनात सिंघल यांचा प्रमुख सहभाग होता. विहिंपची भूमिका महत्त्वाची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी सिंघल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'सिंघल यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मला मिळाले, हे माझे भाग्यच. अनेक पिढ्यांसाठी ते प्रेरणास्रोत होते', असे मोदी यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

महापालिका प्रभाग क्रमांक तीनमधील रासबिहारी रोडवरील साई-शिव नगरातील रहिवाशी नादुरुस्त व बंद पथदीप आणि ठि‌कठिकाणी खड्डे पडलेले रस्ते यामुळे हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडे या प्रश्नी अनेकदा तक्रार केली. मात्र, समस्या सोडविल्या जात नसल्याची नागरिकांनी तक्रार आहे.

परिसरातील सर्वात मोठी कॉलनी आहे आणि याच परिसरात समोरच के. के वाघ अॅग्रीकल्चरल कॉलेज आणि इंग्लिश मीडियमची शाळा आहे. शाळा व कॉलेजातील तरुण तरुणींना रस्त्यांवरून सायकल व गाड्या चालविणेच काय तर पायी चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यांचे अनेक वर्षांपासून फक्त खडीकरण झाले. मात्र, त्यानंतर डांबरीकरण करण्यात आलेच नाही. गेल्या पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावरील खडी वर आल्यामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. पुन्हा खडीकरण करावे आणि तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुख्य रस्त्यावर पथदीप आहेत. मात्र, दिवे बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरात कायम अंधार असतो. परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे अनेक साप व अन्य किटक फिरतांना दिसतात. त्यामुळे रात्री घराबाहेर पडतांना बॅटरी घेऊनच निघावे लागते. कॉलनीतील मुख्य रस्ता तर मद्यपींचा अड्डा बनला आहे. यामुळे महिला वर्गाची अडचण होते. घंटागाडी अनियमितपणे येते त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन प्रदर्शनात होणार प्रयोगश‌ील शेतकऱ्यांचा गौरव

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मीड‌िया एक्झिबिटर्स व ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन यांच्यातर्फे कृषीथॉन २०१५ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे १० वे प्रदर्शन असून, या प्रदर्शनात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रयोगशील युवा व महिला शेतकऱ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

मागील दोन वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या 'प्रयोगशिल युवा शेतकरी' व 'प्रयोगशील महिला शेतकरी' या पुरस्कारांचे तिसरे वर्ष कृषीथॉनमध्ये संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याबद्दल माहिती देताना आयोजक संजय न्याहारकर यांनी सांगितले की, यंदाचे कृषीथॉनचे १० वे प्रदर्शन असून 'युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग' या संकल्पनेवर आधारित असणार आहे.

कृषीथॉन २०१५ ची मांडणी युवकांनी कृषी क्षेत्राकडे केवळ शेती या दृष्टीकोनातून न पाहता नोकरी, उद्योग, व्यवसाय तसेच या क्षेत्रातील अनेक नवनवीन संधींबाबत युवकांना माहिती मिळावी हे उद्द‌िष्ट समोर ठेवून करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला अधिक समृध्द करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या युवकांचा आणि महिलांचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा आणि त्यांच्या कृषीक्षेत्रातील योगदानाची योग्य दखल घेतली जावी या हेतूने या पुरस्कारांचे आयोजन केले जात आहे.

महिला शेतकऱ्यांचा सन्मान

कृषीथॉन प्रदर्शनात महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. न्याहारकर म्हणाले की, कृषीक्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. नवनवीन प्रयोग यशस्विरीत्या राबवून आणि आधुनिक पध्दतीचा वापर करून अनेक महिला शेतकऱ्यांनी स्वबळावर शेती व्यवसायाला व्यापारिक दृष्ट्या यशस्वी करून दाखविले आहे. त्यांनी केलेले शेतीतील अभिनव प्रयोग इतर महिलांना नवी दृष्टी आणि प्रेरणा देणारे आहे. मात्र शेतीतील खडतर प्रयोग जिद्दीने यशस्वी करणाऱ्या महिला आजपर्यंत दुर्देवाने फार कमी प्रमाणात प्रकाशझोतात आल्या आहेत आणि त्यांचे प्रेरणादायी कार्यही पडद्याआड राहिले आहे. हे लक्षात घेऊन कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांना सन्मान कृषीथॉन २०१५ मध्ये केला जाणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कामगारांचे आज धरणे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. १८) विद्युत भवनासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. कामगारांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. धनवटे यांनी द्वारसभेत नुकतेच केले. द्वारसभेला उपसरचिटणीस ज्योती नटराजन, अरुण म्हस्के, जी. एच. वाघ, दीपक गांगुर्डे, पंडित कुमावत, ललित वाघ, सुरज घुगे, सुभाष निफाडे आदी उपस्थित होते. फेडरेशनने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्येची सोडवणूक व्हावी यासाठी शासनाला निवेदन दिले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. गुंड प्रवृत्तीच्या ग्राहकांकडून वीजबील वसुलीसाठी पोलिस संरक्षण मिळावे, अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करावीआदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी युवक’तर्फे नाशिकरोडला आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

प्रेक्षकांना जादा दराने तिकीट विक्री केली तसेच तिकीटांसमवेत खाद्य पदार्थांचे कूपन घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे येथील रेजिमेंटल प्लाझात आंदोलन करण्यात आले.

दुपारचा चित्रपटचा शो बंद पाडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळेची हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. संघटनेचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, वैभव देवरे, सनी ओबेराय, राहुल तुपे, खंडू दातीर, इम्रान पठाण, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकार सावंत बंधू देणार अलबेन‌ियाला धडे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अलबान‌िया देशाच्या सांस्कृतिक मंत्रालय व इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी ऑफ अलबेन‌िया या जागतिक कलासंस्थेच्या संयुक्त विद्यमाने अलबेन‌िया देशातील तिराना या राजधानीच्या शहरात वीझआर्ट इंटरनॅशनल वॉटरकलर बीनाले २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमध्ये चित्रकार सावंत बंधुंना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.

२१ ते २५ नोव्हेंबर या काळात नॅशनल हिस्टोरीकल म्युझियम प्लेस ऑफ काँग्रेस, तीराना, अलबानीया या ठिकाणी होणार आहे. या दरम्यान इंटरनॅशनल वॉटरकलर फेस्टिव्हलचे ही आयोजन करण्यात आले असून, अलबान‌ियाच्या निवड समितीने जगातील विविध देशातील सर्वोत्कृष्ठ आठ चित्रकारांची जागत‌ीक वॉटरकलर वर्कशॉपसाठी निवड करण्यात आली आहे.

या आठ तज्ज्ञ चित्रकारात सावंत बंधूसह इटली देशाचे इगोर सावा, कॅनडा देशातील अटानूर डोगन, दिल्लीतील अमित कपूर, युक्रेनचे इहोर युरचेनको, अलबानीयातील हेलीडॉन हालीती तर जर्मेनीच्या गॅबरेल कोनींग्स हे आठ दिग्गज चित्रकार आपआपल्या चित्रशैलीत जलरंग चित्राचे धडे विविध देशातून आलेल्या चित्रकारांना देणार आहेत. अलबान‌िया देशातील प्रमुख १० टी.व्ही चॅनल्स विशेष डॉक्युमेंट्री फिल्म्स् करून जगभरात प्रसा‌रित करणार आहेत.

याच ठिकाणी होणाऱ्या वीझ आर्ट इंटरनॅशनल वॉटर कलर बीनालेत ५८ देशातील निवडक २१० चित्रकारांच्या ४०० चित्रकृतींचे जागतिक चित्रप्रदर्शनही प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनात राजेश सावंत यांचे जलरंगातील कॅंपेनीयन, गोल्डन लाईन, टॉपलाईट ही रचनाचित्रे तर प्रफुल्ल सावंत यांचे जलरंगातील इव्ह‌िनींग अॅट इस्तान्बुल, फर्स्ट लाईट, लेन अॅट बनारस ही निसर्गचित्रे प्रदर्शित होणार आहेत. तसेच वीझ ऑर्ट इंटरनॅशनल

वॉटर कलर बीनालेच्या जागतिक सचित्र पुस्तिकेत चित्रकार सावंत बंधूची ही सर्व चित्रे मुद्र‌ित केली जाणार असुन, या पुस्तिकेचे जगातील अनेक देशातील विविध म्युझियम, आर्ट कॉलेजसमध्ये वितरणही केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इंड‌ियन पॅनारोमा’त नाशिकचा दिग्दर्शक

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : नाशिकच्या भूमीतून अनेक चित्रपटच बनले नाहीत तर दिग्दर्शक देखील उदयास आले आहे. नाशिकच्या सुहास भोसले या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला 'कोती' चित्रपटाला गोवा येथे होणाऱ्या ४६ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्ट‌िव्हलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी भारतातून २३० चित्रपटांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यातील २६ चित्रपटांना या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. यात गजेंद्र आहिरे यांचा 'द सायलेन्स' सुबोध भावे यांचा 'कट्यार काळजात घुसली', तर सुहास भोसले यांचा 'कोती' या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. 'कोती' हा चित्रपट तृतीय पंथीयांवर आधारीत आहे. एका कुटूंबातील लहान मुलगा तृतीय पंथी असल्याचे कळते. त्यामुळे त्याच्याबद्दल असलेली समाजाची अनास्था, कुटूंबाला होणारा सामाजिक त्रास यातून निर्माण झालेला तणाव या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अरिबाम शाम शर्मा यांच्या नेतृत्वाखाली १५ परीक्षकांनी या चित्रपटाची निवड या महोत्सवासाठी केली आहे. मराठीतून या फिल्म फेस्ट‌िव्हलसाठी निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद समजले जाते.

नाशिकमधून प्रथमच सुहास भोसले यांच्या चित्रपटाने हा मान मिळवला आहे. सुहास भोसले हे गेल्या १५ वर्षापासून चित्रपट क्षेत्रात असून, त्यांनी आतापर्यंत 'सावरखेड एक गाव', 'पक पक पकाक', 'देवकी' अशा अनेक चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्याच प्रमाणे रंगभूमीवर देखील अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यात 'तीन पैशाचा तमाशा' 'वेटींग फॉर गोदो' अशा अनेक प्रायोगिक नाटकांचा समावेश आहे. या फिल्म फेस्ट‌िव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर जागत‌िक पातळीवर ही फिल्म प्रदर्शित होण्यास मदत होणार आहे. हा चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे होणार असून, २२ तारखेला पणजी येथील आयनॉक्स चित्रपट गृहात 'कोती'चे प्रदर्शन होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहास भोसले यांचे असून, कथा पटकथा संवाद 'रझाकार' या मराठी चित्रपटाचे लेखक राजेश दुर्गे यांचे आहे. या चित्रपटात आज्ञेश मुनशिंडकर, दिवेश मेदगे या लहान जोडीने अप्रतिम अभिनय केला असून, त्यास संजय कुलकर्णी विनीता काळे, मोहिनीराज गटणे, लक्ष्मीकांत विसपुते यांची साथ मिळाली आहे.

माझ्या पहिल्याच चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. नाशिककरांनी भरभरुन प्रेम दिल्यामुळेच हे साध्य होऊ शकले. यापुढेही नवीन विषयावर चित्रपट देईन.

- सुहास भोसले, दिग्दर्शक 'कोती'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गिरणा धरणातील मालेगावकरांचे हक्काचे पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे मालेगावसह कसमादे भागातून विरोध वाढत असून, आता गिरणाच काय पण कसमादेमधील एक थेंब पाणी देखील जळगावला न देण्याचा पवित्रा मालेगाव तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतला आहे.

कसमादे पाणीप्रश्नावर राजकीय पक्षांचे नेते पुढे सरसावले असून, येत्या काळात पाणीप्रश्नावर खान्देश (जळगाव) व मालेगावचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. आमदार आसिफ शेख यांनी पाणीप्रश्नी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तसेच भाजपचे अव्दय हिरे, प्रसाद हिरे यांनी देखील पत्रक काढून गिरणा व कसमादेचे पाणी जळगावला देण्यास विरोध केला आहे.

यंदा पावसाने पाठ फिरवली. जून ते ऑक्टोबर या कालावधीत मालेगाव तालुक्यात ८६ टक्के, नांदगाव ३२ टक्के, कळवण ७६ टक्के, बागलाण ८७ टक्के, देवळा ५४ टक्के असा सरासरीच्या कमीच पाऊस झाला. मालेगाव शहरानजीक असलेल्या गिरणा धरणात देखील १८८४ दलघफू हणजे केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मालेगावसह नांदगाव, चाळीसगाव, जळगाव शहरांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त या जलसाठ्यांवर आहे. मात्र, आता यातील पाणी मालेगावला न देता जळगावला मिळावे, यासाठी प्रशासनाने बैठक घेऊन पालकमंत्री खडसे यांची देखील संमती घेतली आहे. त्यामुळे मालेगावचे हक्काचे पाणी खान्देशात पळविण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, याला आता मालेगावात जोरदार विरोध होऊ लागला आहे.

राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी शासन दरबारी मालेगावकरांची बाजू लावून धरली आहे. काँग्रेसेचे आमदार आसिफ शेख, तुषार शेवाळे, प्रसाद हिरे यांनी देखील अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप नेते अद्वय हिरे यांनी देखील पत्रक काढून कसमादेचे पाणी जळगावला देण्यास विरोध दर्शवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमजीवी संघटनेचा बिऱ्हाड मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक पोलिस ठाण्यावर श्रमजीवी संघटनेने मंगळवीरी बिऱ्हाड मोर्चा नेऊन तळपत्या उन्हात दोन तास ठियया आंदोलन केले. गत महिन्यात तालुक्यातील धुमोडी येथील शेतकरी महिलांना अमानुष मराहाण करीत उभे पीक तुडवण्याचा आदेश देणारे पोलिस आणि त्यांना सहकार्य करणारे महसूल कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्ही येथेच बिऱ्हाड करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. पोलिस प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सिंहस्थ बसस्थानकापासून या मोर्चास प्रारंभ झाला. त्र्यंबक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारी रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मांडला. आंदोलनाचा पवित्रा ओळखून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांना थांबविण्यासाठी सिंहस्थातील बॅरिकेडिंग यावेळेस उपयोगास आले. गेल्या महिन्याच्या २८ ऑक्टोबर २०१५ रोजी तालुक्यातील धुमोडी येथे जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे. त्र्यंबकच्या बडा उदासीन आखाड्याची धुमोडी येथील जमीन काही कुळं कसतात. याबाबत आखाड्याने कोर्टबाजी करून कुळांची नावे कमी केली. त्यानंतर २८ तारखेस ताबा घेण्यासाठी पोलिस फौजफाटा घेऊन बडा उदासीन आखाड्याचे साधू प्रेमानंद आणि पाच साधू तेथे गेले असता जमीन कसत असलेल्या महिलांनी तेथून जाण्यास नकार दिला. या जमिनीचा वाद महसूल लवादाकडे सुरू आहे, असे महिलांनी सांगितले. पिकात ट्रॅक्टर घालू नका, अशी विनवणी केली. श्रमजीवी संघटनेच्या म्हणण्यानुसार येथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घालण्यास सांगितले. तसेच, यास विरोध करणाऱ्या महिलांना साधूंनी माराहाण केल्याचा आरोप करीत पोलिसांनी साधूंचीच बाजू घेतली. यावेळी महसूल खात्याचे तलाठी आणि मंडलाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी महिला यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत न्याय मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

त्र्यंबकेश्वर येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक चौधरी तसेच हवालदार परदेशी आणि आणखी काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे महसूल मंडलाधिकारी सोनवणे आणि तलाठी पाटील यांच्यावर महसूल विभागाने कारवाई कारावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या जमिनी आहेत. शेतकरी शेकडो वर्षांपासून या जमिनी कसत आहेत. जमिनीला भाव आल्याने आखाडे आणि बिल्डरांनी संगनमत करून या जमिनी विकण्याचा सपाटा लावला आहे. धुमोडी येथे असाच प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांच्या विरुध्द निकाल लागला. त्यानंतर पोलिसांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घातला. जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केली. दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

- विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी संघटना

कोर्टाच्या निकालाने जमिनीचा आखाड्याने ताबा घेतला आहे. जमीन कसण्यास आमचा विरोध नव्हता मात्र, वारस महिलांनी जमिनीवर नावे लावण्याचा प्रयत्न केल्याने ती आखाड्यास परत मिळाली. कोणलाही मारहाण केलेली नाही. मात्र, कुभांड रचून साधूंना बदनाम करीत आहेत.

- महंत रघुमुनी महाराज, बडा उदासीन आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेलरच्या धडकेत दुकानांचे नुकसान

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर कॉलेजसमोर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून ट्रेलर भरधाव वेगात शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. सोमवारी हा अपघात झाला. यावेळी दुकाने बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.

नाशिक येथून लोखंडी प्लेट घेऊन मुसळगावकडे ट्रेलर (एमएच ०४, बीजी ३२२१) जात होता. चालक अब्दुल करीम हुसेन चौधरी याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील वाहनांना वाचविण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरने कॉलेजसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सकडे ट्रेलर वळविला. येथील बजाज शोरूम, शिव ऑटोमोबाइल या दुकानांपुढील पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले. शेजारी असलेल्या कॉर्पोरेशन आणि सेंट्रल बँकेच्या बोर्डाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बजाज शोरूमचे संचालक रामदास ठोक यांच्या मालकीच्या शोरूमचे पत्र्याचे शेड, सीसीटीव्ही संच, बापू पाटील यांच्या शिव ऑटोमोबाइलचे पत्र्याचे शेड आणि दोन्ही बँकांचे फलक मिळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पहाटे अपघात झाल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यावर भर

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

खरीप हंगामात जूनपासून पावसाने वेळोवेळी दिलेल्या हुलकावणीमुळे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळसदृश परिस्थिती ओढावली आहे. सरासरीच्या केवळ ८६ टक्केच पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासोबत रब्बी हंगामातील पिकाला लागणाऱ्या पाण्यासाठीसुद्धा संघर्षच करावा लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा या पिकांच्या क्षेत्रात व उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

मालेगाव तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता खरीप हंगामात सुमारे ८० हजार ८७५ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र होते. प्रत्यक्षात ७२ हजार ०७९ म्हणजे ९० टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. मात्र, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे यातील सुमारे ७० टक्के पेरणी क्षेत्रावर उत्पादनात घट झाल्याचे पहायला मिळाले. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच न लागल्याने आता रब्बी हंगामात तरी काही उत्पादन हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. रब्बी पिकांची पेरणी सुरू झाली असली तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न तालुक्यात गंभीर बनला आहे. गिरणा-मोसम खोऱ्यात यंदा हरणबारी, चणकापूर धरणाचे पूरपाणी सोडता नदीपात्र बहुतांशी कोरडेच राहिले. प्रामुख्याने बागायती क्षेत्र असलेल्या या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. तालुक्यातील गिरणा धरणात अवघा दहा टक्के साठा असून, त्यातही जळगाव-मालेगाव असा पाणीप्रश्न पेटला आहे. हरणबारी, चणकापूर धरणातून पुन्हा मालेगावला आवर्तन देण्यास विरोध वाढत आहे.

त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यास पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देण्यात येईल. खरीप हंगामात आधीच पीक वाया गेल्याने १५० हून अधिक गावातील पीक आणेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता रब्बी हंगामात उत्पादन क्षेत्रात कमालीची घट होत असून, शेतकऱ्यांसाठी रब्बीची वाट देखील बिकट होणार आहे.

यंदा खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे पाण्याची उपलब्धता लक्षात घेता रब्बी हंगामात मोठी घट पहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्यानुसार कांदा पिकास प्राधान्य द्यावे. पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यास त्याचा लाभ मिळू शकेल. - गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी

तालुक्याच्या रब्बी हंगाम २०१५-१६ च्या अहवालानुसार एकूण ८५१० हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात ६३९.४० हेक्टर क्षेत्रावरच पेरणी करण्यात आली आहे. त्यातही हरभरा, गहू, मका पिकांच्या क्षेत्रात सुमारे ३० ते ४० टक्के इतकी घट होण्याची शक्यता आहे. खरीप कांदा उत्पादनात लक्षणीय घट आल्याने कृषी विभागाकडून रब्बीत हिवाळी कांदा लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images