Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गुन्हा उघड होण्याचे प्रमाण

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण तुलनेत फारच कमी आहे. चालू आणि गत वर्षातील पहिल्या आठ महिन्यात स्नॅचिंगच्या तब्बल १४० घटना घडल्या. यातील अवघ्या ४६ गुन्ह्यांतील आरोपींपर्यंत पोलिस पोहोचू शकले. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यावर्षी पहिल्या आठ महिन्यात चोरट्यांनी उपनगर, इंदिरानगर आणि नाशिकरोड, पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत उच्छाद मांडला. विविध हायवेशी असलेली इतर रस्त्यांची संलग्नता आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे स्नॅचर्स घटनेनंतर काही मिनिटातच बेपत्ता होतात. अचानक होत असलेल्या स्नॅचर्सच्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्यांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. बहुतांश स्नॅचर्स काळ्या रंगाच्या पल्सरवर येऊन पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन ओरबडून नेतात. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सुध्दा चोरीची असते. त्यामुळे गुन्हेगारांपर्यंत पोहचताना पोलिसांच्या नाकीनव येते. त्यातच गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. या सर्व नकारात्मक परिस्थितीमुळे वयस्कर महिलांनी दागिने घालून घराबाहेर पडताना विशेष सावधगिरी बाळगणे अपे‌क्षित आहे.

याबाबत बोलताना परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, स्नॅचर्सला रोखण्यासाठी पोलिस आपल्यापरीने उपाययोजना राबवत असतात. काही महिन्यांपूर्वी स्नॅचिंगच्या घटनांचा वेग काहीसा वाढला होता. त्यामुळे आम्ही थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. आज आमचे पोलिस अधिकारी व कर्मचारी विविध कॉलनी परिसरांना भेट देऊन चेन स्नॅचिंगसह घरफोडी व इतर गुन्हे कसे रोखता येतील, याचे मार्गदर्शन देत आहेत. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून हळूहळू परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर या पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हे कमी झाले आहेत. साधारणतः स्नॅचर्स आपले सावज शोधताना होणाऱ्या प्रतिकाराचा विचार करतो. त्यामुळेच गुन्हेगार वयस्कर व्यक्तींना टार्गेट करतात. तोतया पोलिस प्रकरणात सुध्दा वयस्करांनाच लक्ष केले जाते. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात स्थानिकांसह परजिल्ह्यातील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तपासाच्या दृष्टीने हाच कळीचा मुद्दा ठरतो. झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यापेक्षा गुन्हा होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे धिवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोलवाढीला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ते गोंदे या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल, सर्विसरोड, पथदीप, भुयारी मार्गाची कामे प्रलंबित असताना पीएनजी टोल कंपनीकडून टोलवाढीच्या हालचाली सुरू आहेत. टोल कंपनीच्या या निर्णयाविरोधात विविध पक्ष, संघटनांनी आवाज उठवून टोलवाढीला विरोध केला आहे. तसेच, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टोलवाढप्रश्नी निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार संदीप आहेर, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी सुनील पुरोहित, राजन विचारे, माजी आमदार दिलीप बनकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हंसराज वडघुले व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पिंपळगाव पोलिस ठाण्यात झाली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी महामार्गावर प्रलंबित असलेल्या कामांबाबत व सातत्याने होणारे अपघात तसेच, अपघातात निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी याबाबत गंभीरपणे तक्रारी मांडल्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ नोव्हेंबर) लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, टोल कंपनीचे अधिकारी यांनी संयुक्तपणे महामार्गाची पाहणी करून त्रुटींचा अभ्यास करावा, याबाबतचा अहवाल तयार करून राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व टोल कंपनीस सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालानुसार महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलण्याचे सुचित करण्यात आले.

या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्त हंसराज वडघुले, दिलीप बनकर, बापूसाहेब पाटील, प्रकाश गोसावी, गणेश बनकर, बाळासाहेब आंबेकर, दीपक शिंदे यांनी महामार्गाची दयनीस अवस्था अधिकाऱ्यांसमोर मांडली. पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली, सर्विस रोड, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, पथदीप, स्पीडब्रेकर्स, ओझरचा उड्डाणपूल, सर्विसरोड, अंडरपास याबाबत बैठकीत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला.

बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय महामार्ग व टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, प्रांताधिकारी व तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मध्यस्थीनंतर महामार्गाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचा व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा तोडगा काढण्यात आला. या बैठकीस सोमनाथ बोराडे, देवेंद्र काजळे, गोरख खैरनार, किरण देशमुख आदींसह लोकप्रतिनिधी व वाहनधारक उपस्थित होते.

टोलवाढीबाबत संभ्रमावस्था

पिंपळगाव बसवंत येथील टोलकंपनी पीएनजीने टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. यामुळे टोलवाढीबाबत संभ्रमावस्था वाढली आहे.

प्रस्तावित दुरुस्ती

सायखेडा रस्‍ता १७ बाय ५.५९ मीटर अंडरपास

खंडेराव मंदिरसमोर ६ बाय २.५० मीटरचे दोन अंडरपास

गडाख कॉर्नर १७ बाय ४.५० मीटर अंडरपास

बाणगंगा पुलावर सर्विसरोडसाठी स्वतंत्रपूल

चिंचखेड चौफुलीवर १८ मीटरचे तीन अंडरपास.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढली बालगुन्हेगारांची संख्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‍शहरात पाकीटमारी, भुरट्या चोऱ्यांसह दरोडा आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतही बालगुन्हेगारांचा समावेश असणे ही चिंताजनक बाब बनली आहे. किशोर सुधारालयातून बाहेर पडणारी मुलेही पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेवर वेगाने पाऊले टाकत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले असून, अशा बालगुन्हेगारांचे समुपदेशन करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घेतला आहे.

शहरात दररोज पाकीटमारी, वाहनचोरीपासून ते दरोड्यापर्यंतचे मालमत्ता विषयक गुन्हे घडतात. पोलिस दफ्तरी अशा गुन्ह्यांची नोंद देखील होते. मात्र, त्यामध्ये सापडणाऱ्या संशयितांमध्ये तुलनेने अल्पवयीन आरोपींचे प्रमाण खूपच कमी आहे. हाणामाऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मात्र अल्पवयीन आरोपी सापडण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. क्षुल्लक कारणावरून राग डोक्यात घालून हे अल्पवयीन एखाद्या गुन्ह्याचे धनी होतात. आरोपी म्हणून पहिल्यांदा पोलिस स्टेशनची पायरी चढणारे अल्पवयीन आरोपी नंतर सातत्याने ही पायरी चढत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. केलेल्या कृत्याचा पश्चाताप व्हावा म्हणून त्यांना किशोर सुधारलयासारख्या ठिकाणी प्रायश्चित्त घेण्यासाठी पाठविले जाते. मात्र, तेथून बाहेर पडल्यानंतरही पुन्हा यापैकी अनेक अल्पवयीन मुले कोणत्या कोणत्या गुन्ह्यात अडकल्याचे पहावयास मिळाले आहे. गतवर्षी शहरातील अशा अल्पवयीन आरोपींची संख्या ८५ होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत ती ११० तर नोव्हेंबरमध्ये १२५ वर पोहोचली आहे. त्यामध्ये चोरी प्रकरणांमधील २३, घरफोड्यांमधील २० आणि हाणामारीच्या घटनांमधील २६ आरोपी आहेत. याखेरीज खुनाच्या गुन्ह्यात देखील काही अल्पवयीन आरोपींना पकडण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या समन्वयक दीपाली मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विभाग शालाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे. अशा विद्यार्थ्यांकडे शिक्षणाचा आग्रह धरून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याकामी एनजीओंची देखील मदत घेण्यात येत असून, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

अल्पवयीन आरोपींची अशी वाढती संख्या चिंताजनक असून, गुन्हेगारी मार्गापासून या मुलांना परावृत्त करण्यासाठी समुपदेशनाचा मार्ग अवलंबविण्याचा निर्णय पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घेतला आहे. त्यासाठी एका एनजीओशी पोलिसांनी संपर्क केला असून, त्यांनीही मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायामाच्या मदतीला अॅप्स

$
0
0

व्यायामाच्या मदतीला अॅप्स

धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्यासाठी व्यायाम करणं आवश्यक बनलं आहे. मात्र ट्रेनिंग घेऊन व्यायाम करणं किंवा दररोज त्यासाठी जिममध्ये जाणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. म्हणूनच त्यावर उपाय ठरत आहेत व्यायामाची अॅप्स.

प्रतीक गंगेले, कॉलेज क्लब रिपोर्टर
थंडी सुरू झाली की अनेकांना व्यायामाचा कंटाळा येऊ लागतो. अनेकदा वेळेअभावी जिम किंवा अन्य व्यायामाच्या क्लासेसना जाणे जमतेच असे नाही. पण मोबाइलवर उपलब्ध असणारे व्यायामाचे अॅप्स ही उणीव भरुन काढत आहेत. घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेऊन वर्कआउट करणाऱ्यांमध्ये ही अॅप्स प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

खास युवा वर्गाची आवड लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी टोटल फिटनेस, जिम वर्कआउट, होम वर्कआउट नावाने अॅप्स तयार केली आहेत. यामध्ये अॅब्ज, बायसेप्स , कार्डिओ, फोरआर्म्स यांचे किती सेट्स मारायचे, डम्बेल्स किती आणि कसे उचलायचे, प्रत्येक प्रकार किती वेळ करायचा याची परिपूर्ण माहिती फोटोसह दिलेली असते. अनेक वेळा डम्बेल्स नसले तरी थेराबेंडचा उपयोग करून आपण घरच्या घरी व्यायाम करू शकतो. महिलांमधून या अॅप्सना विशेष पसंती मिळत आहे.

अनेक जण आजकाल योगा करण्याला प्राध्यान्य देताना दिसतात. पण प्रत्येकाला योगाचे क्लासेस लावणे शक्य नसते. अशांसाठी योगासन, डेली योगा असे भारतातील सर्वच भाषांमध्ये उपलब्ध असलेले अॅप्स लोकप्रिय ठरत आहेत. प्रत्येक अॅपमध्ये वर्गवार विभागणी करण्यात आली असून प्रत्येक आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे यांची सविस्तर माहिती कृतीसह दिलेली आहे. गूगल फिट, फिटनेस ट्रेनर या अॅप्समध्ये आपला वर्कआऊट प्लॅन आपण सेव्ह करून ठेवू शकतो. हे अॅप्स अँड्रॉईड तसेच काही जावा फोन्समध्ये प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाक्रिटीकॉन परिषद उद्यापासून

$
0
0

देशभरातील ७०० डॉक्टरांचा असणार सहभाग म. टा. प्रतिनिधी, नाशिक अत्यावश्यक सेवांवर आधारित महाक्रिटीकॉन ही राष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारपासून (दि. २०) नाशकात होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशभरातील ७०० डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने अत्यावश्यक सेवा, त्यांचे व्यवस्थापन, दर्जा आणि परिणाम यावर विशेष प्रकाश टाकला जाणार आहे. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसीन यांच्या नाशिक शाखेतर्फे हॉटेल एक्स्प्रेस इन येथे येत्या २० ते २२ नोव्हेंबर रोजी महाक्रिटीकॉन ही राष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती परिषद समितीचे अध्यक्ष डॉ. यतींद्र दुबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही वर्षात अत्यावश्यक सेवांना मोठे महत्त्व आले आहे. ही सेवा अधिकाधिक रुग्णांपर्यंतच पोहचणे आवश्यक आहे. तसेच, त्याचे व्यवस्थापनासह दर्जा सुधारण्याबाबत डॉक्टरांमध्येही प्रशिक्षण आणि प्रबोधन हवे आहे. यासाठीच या परिषदेत विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मर्यादित संसाधने वापरून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा रुग्णांपर्यंत पोहचविणे हाच परिषदेचा हेतू असल्याचे डॉ. देवदत्त चाफेकर यांनी सांगितले. आर्थिक कमतरता, मर्यादीत संसाधने, परिचारिकांचा अभाव अशा विविध पातळ्यांवर अत्यावश्यक सेवांचा दर्जा अवलंबून ठरतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अत्यावश्यक सेवा रुग्णांना देणे, त्यांच्यापर्यंत पोहचविणे ही काळाची गरज आहे. यासाठीच परिषदेत डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. फरहद कपाडिया, डॉ. शिवा अय्यर, डॉ. आशिक हेगडे, डॉ. पी गोपाल यासारखे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे डॉ. विजय घाटगे यांनी सांगितले. विषबाधा उपचार, प्रतिजैवके, शल्यचिकित्सा, अत्यावश्यक सेवा, कृत्रिम श्वासोच्छवास, प्रसुतीपूर्व आणि पस्चातच्या अत्यावश्यक सेवा अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. परिषदेचे उदघाटन शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते होणार असल्याचे डॉ. दिनेश वाघ यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएस, मेळासाठी पाच कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड नाशिक येथील मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) आणि मेळा बसस्थानकसाठी एसटी महामंडळाने पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. खासदार गोडसे म्हणाले, की सीबीएसचे आधुनीकीकरण आणि मेळा बसस्थानाकाचे पुर्नबांधणी यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन बसस्थानकांच्या समस्येबाबत चर्चा केली. त्यांनी इतर बसस्थानकांच्या प्रश्नीही लक्ष घालण्याचे मान्य केले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भगूर या बसस्थानकांचे नूतनीकण करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. जिल्ह्यातील उर्वरित बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठीही निधी उपलब्ध केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळीचा म्होरक्या जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोलपंप लुटणा‍ऱ्या टोळीचा म्होरक्याला नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. विजय गणपत जाधव (गोंदवणीरोड, श्रीरामपूर) असे म्होरक्याचे नाव असून त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांची तसेच साथीदारांची उकलही होण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात वणी सापुतारा रोडवरील माळे शिवारातील ब्रह्मा पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यात आला. बोलेरो गाडीतून आलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवून पंपाच्या केबिनमधून ४५ हजार ५०० रुपये रोख व मोबाइल लंपास केला होता. याप्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गेल्या महिन्यातही नाशिक-पेठ रस्त्यावरील नाळेगाव शिवारातील राधाकृष्ण पेट्रोल पंपावर तेथील कामगारांना लाकडी दांड्याने मारहाण करुन १ लाख ८५ हजार रोख व तीन मोबाइल दरोडेखोरांनी लुटून नेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते, पोलिस निरीक्षक किशोर नवले, सहायय्क पोलिस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल धुमसे आदींचे पथक करीत आहे. याद्वारेच विजय जाधवला या म्होरक्याला अटक करण्यात पथकाला यश आले आहे. जाधवने वणी, दिंडोरी, पिंपळनेर, कुसुंबा, सूरत, साक्री आदी ठिकाणच्या पेट्रोलपंपांवर दरोडे टाकून ऐवज लंपास केला आहे. तशी कबुली त्याने दिली आहे.

गुन्हे शाखेचे यश

अत्यंत कौशल्यपूर्ण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेने नाशिक जिल्ह्यातील २ आणि धुळे जिल्ह्यातील ३ असे एकूण ५ दरोड्याचे गुन्हे कुठलाही पुरावा नसताना उघडकीस आणले आहेत. आणखीही काही गुन्ह्यांचा शाखेकडून तपास सुरु असून, येत्या काही दिवसात त्यात मोठे यश येण्याची शक्यता शाखेने वर्तविली आहे.

पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या विजय जाधवला पकडण्यात आम्हाला यश आले आहे. त्याच्याकडून त्याच्या टोळीचा आणि साथीदारांची माहिती मिळविण्याचे काम सुरु आहे.

- संजय मोह‌िते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंड झाले गलिच्छ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक उत्तर भारतीयांनी छटपूजा साजरी केल्यानंतर पूजेचे साहित्य नदीपात्रात व काठावर टाकून दिल्याने गोदावरी नदीला गटार गंगेचे स्वरुप आले आहे. रामकुंड व परिसरातील नदीपात्र दूषित झाले असून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उत्तर भारतीयांनी मंगळवारी रामकुंडावर मंगळवारी (दि. १७) मावळत्या तर बुधवारी उगवत्या सूर्याला अर्ध्य देऊन छटपूजा केली. मंगळवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर या पुजेला सुरुवात झाली व बुधवारी सकाळी सूर्योदयाच्यावेळी पूजा संपन्न झाली. पूजाविधी झाल्यानंतर पूजेसाठी वापरण्यात आलेले ऊसाच्या बांड्या, फुले, नारळ असे पूजा साहित्य त्याच ठिकाणी टाकून देण्यात आले. यामुळे नदीकाठचा परिसर घाणीने व्यापला आहे. तसेच काही लोकांनी पुजेचे सामान नदीपात्रात टाकून दिल्याने नदी पात्रही दूषित झाले आहे. सिंहस्थात ज्या प्रमाणे नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली होती. तिचा मागमूस देखील शिल्लक राहिलेला नाही. गाधी ज्योतीच्या भिंती लगत कुंडीचे स्वरुप आले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून पर्यटकांना नाकाला रुमाल लावून परिसरातून जावे लागत आहे. नदीपात्रामध्ये स्नान करण्यासाठीच काय तर हातपाय धुण्यासाठीही उतरण्यास कुणी तयार नसल्याचे दिसत आहे. फुलांसह दिवे आणि तेलही पात्रात टाकण्यात आले आहे. या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन पोलिस स्टेशन्सचे कारभारी झाले निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या म्हसरूळ आणि मुंबई नाका या दोन पोलिस स्टेशन्सचे कारभारी म्हणून अनुक्रमे नरेंद्र पिंगळे आणि बाजीराव महाजन यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे अद्याप पोलिस स्टेशन कार्यान्वित झाले नसतानाही कारभाऱ्यांची नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाढती लोकसंख्या आणि शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेऊन शहरात दोन नवीन पोलिस स्टेशन्सला निर्मिती झाली आहे. पंचवटी पोलिस स्टेशनचे विभाजन करून म्हसरूळची तर भद्रकाली, इंदिरानगर, सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या विभाजनातून मुंबई नाका पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन पोलिस स्टेशन्समध्ये वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकारी नियुक्तीकडे डोळे लावून बसले होते. मात्र, अधिकारी अनुभवी असावा असा निकष ठेवण्यात आला होता. गुन्हे शाखा, आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहिलेले बाजीराव महाजन यांच्याकडे मुंबई नाक्याची तर पंचवटीचे गुन्हे निरीक्षक राहिलेल्या पिंगळे यांच्याकडे म्हसरुळची जबाबदारी देण्यात आली आहे. लवकरच अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपआयुक्त विजय पाटील यांनी दिली आहे. डिसेंबर अखेरीस दोन्ही पोलिस स्टेशन्स कार्यान्वित होतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभावशाली नेतृत्वासाठी हवा उत्तम संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'विद्यार्थ्यांच्या अपेक्षित असलेल्या गरजा समजून त्यांचे चांगले नेतृत्व करण्यासाठी उत्तम सुसंवाद साधणे आवश्यक आहे.' असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विद्यापीठ विद्यार्थी परिषद सदस्यांसाठी नेतृत्व विकास विषयावरील कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते.

परिषदेत संलग्नित कॉलेजातील विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश आहे. या कार्यशाळेचे उदघाटन विद्यापीठाचे प्रति कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, प्र. वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या उपकुलसचिव विद्या ठाकरे आदी उपस्थित होते. डॉ. राजदेरकर यावेळी म्हणाले की, विद्यार्थी, शिक्षक व विद्यापीठामधील दुवा ही विद्यार्थी परिषद असते. विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतांना त्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखुन त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच नेतृत्व व योग्य संवादासाठी शब्दांची संपत्ती असणे महत्त्वाचे आहे. आरोग्य शिक्षणासोबत रुग्णसेवा महत्त्वाची आहे. यामुळे रुग्णसेवा देतांना रुग्णाशी अचुक संवाद साधल्यास त्याला योग्य उपचार देता येतील. चांगला डॉक्टर होण्यासाठी सर्वांगीण विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत रविंद्र देवधर यांनी प्रेरणा व नेतृत्व गुण याविषयावरील व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये चांगले व आदर्श नेतृत्व करण्यासाठी चा‌रित्र्य, प्रामाणिकपणा व नैतिकता असणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाला नेहमीच चांगल्या व आदर्श नेतृत्वाची आवश्यकता असते. समाजाचा विकास हा चांगल्या नेतृत्वामुळेच होत असतो. आपल्यामधील कर्तृत्व समाजाला दाखवायचे असेल तर नेतृत्व गुण अधिक विकसित करणे आवश्यक आहे. आपण आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्य केल्यास त्याची निश्चितच समाजाकडून दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उपकुलसचिव ठाकरे यांनी विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजना व कामकाजाची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांचे 'कम्युनिकेशन की टू सक्सेस' या विषयावरील व्याख्यान झाले. यात त्यांनी संवाद, संवाद साधण्यासाठीच्या विविध प्रक्रिया, सुसंवाद साधतांना येणाऱ्या अडचणी, संवादातील अभाव, संवादाचे विविध प्रकार, नेतृत्व विकासासाठी परिणामकारक संवादशास्त्राबाबत विस्तृत दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून सादरीकरण केले. प्रास्ताविक विद्या ठाकरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅरेथॉन चौकात गरज सिग्नलची

$
0
0

म. टा. प्र‌त‌िन‌िधी, ना‌शिक रावसाहेब थोरात सभागृह, ज्योती स्टोअर्सजवळ असलेल्या मॅरेथॉन चौकात लहान मोठे अपघात ही नित्याची बाब बनली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये दररोज हजारो विद्यार्थ्यांची त्याचबरोबर पालक, ज्येष्ठ नागरिकांची या चौकातून ये-जा असते. अशोक स्तंभ ते गंगापूर या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. ही वाहने भरधाव वेगात चालतात. त्यांची गती रोखणारी कोणतीही व्यवस्था या मॅरेथॉन चौकात नाही. त्यामुळे येथे सतत अपघात घडतात.

या चौकातून अशोक स्तंभ, जुना गंगापूर नाका, पंड‌ीत कॉलनी, महापालिका, रावसाहेब थोरात सभागृहाकडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिसरातील अनेक हॉस्पिटल्समध्ये जाता येत असल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी येथे सिग्नल बसविणे आवश्यक आहे. लगेचच सिग्नल बसविणे प्रशासनाला शक्य नसेल तर तेथे गतिरोधक बसवावेत अशी सूचना परिसरातील ज्येष्ठ नागरिक परशराम राजोळे, प्राचार्य डॉ. ए. वा. ब्राम्हणकर, के. जी. हांडगे, दामु, पाटील ढिकले, जी. एस. पगार, अॅड. उत्तम शिंदे, वसंतराव हिंगमिरे, गोपाळ देसाई, गौतम सुराणा, अजित फुलपगर, पी. एस. कोंड्रा आदींनी केल्या आहेत. या परिसरातील नगरसेवक अजय बोरस्ते, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी लक्ष घातल्यास येथे सिग्नल यंत्रणा, गतिरोधक बसणे कठीण नसल्याचा विश्वासही या ज्येष्ठ नागरिकांना आहे.

बेशिस्तपणा जैसे थे !

रौनित चौहाण या चिमुकल्याचा बळी गेल्यानंतरही जुना आडगाव नाका ते निमाणी या रस्त्यावरील परिस्थिती बदलू शकलेली नाही. रस्त्यावर झालेली अतिक्रमणे, रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकाने आणि तेथेच वाहने उभी केली जात नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक पादचाऱ्यांना पायी चालण्यासही पुरेशी जागा मिळत नाही. वाघाडी पुलाजवळील रस्ता जेथून कृष्ण नगर, टकले नगर, गणेशवाडी, पंचवटी कॉलेज, डेंटल कॉलेज, आर. पी. विद्यालय, श्री राम विद्यालय विवेकानंद हायस्कूल येण्याचा जो रस्ता आहे. तेथे नेहमी वाहतूक कोंडी झालेली असते. तेथेच एका बाजूला दुकानांबाहेर टेम्पो उभे असतात. समोरच्या बाजूस दुकाने, गॅरेजेस, हॉटेल व त्यांचे रस्त्यावरच असणारे सिलेंडर्स, दारू दुकान, पान टपऱ्या यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला हातभारच लागतो. पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पुरेसा रस्ताच मिळत नसल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागते. यावर त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे. या परिसरातील व्यावसायिकांना लोकप्रतिनिधी, गुंडांचे पाठबळ असल्याने त्यांच्या विरोधात कुणीही बोलत नाही. कोणी बोलले तर टवाळखोर दादागिरी करताता. पोलिस तसेच महापालिकेच्या पाठबळामुळेच अशा टवाळखोरांचे फावते अशी शंका त्यामुळे उपस्थित होते.

- सुज्ञ नागरिक, पंचवटी परिसरातील समस्या कळवा !

शहरातील वाहतूक समस्येवर सडेतोड मतं व्यक्त करण्यासाठी 'ट्रॅफिक इश्यू' या सदराच्या माध्यमातून महाराष्ट्र टाइम्सने वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. येथे केवळ वाहतुकीच्या समस्यांचे रडगाणे अपेक्षित नाही. समस्यांवरील अभ्यासपूर्ण विश्लेषणाचे स्वागतच आहे. तुमच्या भागातील वाहतुकीची समस्या सामूहिक प्रयत्नातून सुटावी हा आमचा प्रयत्न आहे. वाहतुकीची स्थिती, त्याची कारणे, वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठीच्या उपाययोजना आणि सूचना असतील तर उचला लेखणी आणि कळवा आम्हाला. अभ्यासपूर्ण सूचना आम्ही पोहोचवू प्रशासनापर्यंत आणि घडवून आणू सकारात्मक बदल सर्वांना हवा असणारा.

समन्वयक : प्रवीण बिडवे ९८८११२०१३१


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात हजार हेक्टरवर चाऱ्याचे उत्पादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा चारा टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. म्हणूनच राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात यंदा १३१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला असून तेथे प्राधान्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रावर चारा निर्मिती करण्यात येणार आहे.

गतवर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. तर यंदा राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला. राज्य दुष्काळी परिस्थितीतून जात असल्यामूळे सरकारने खरिपातील १३६८ आणि रब्बीची २०९ गावे दुष्काळी जाहीर केली आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत यंदा पावसाने पाठ फिरविली. येवला, नांदगाव, चांदवड, पेठ आणि देवळा या तालुक्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तेथील सात हजार हेक्टर क्षेत्रावर चारा निर्मितीसाठी गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याला ४३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रासाठी ते खर्चही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी त्या-त्या परिसरातील शेतकऱ्यांची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांना परमिट वितरीत करून महाबीजच्या माध्यमातून त्यांना बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. ४७२. ५ क्विंटल मका, ३१९.२५ क्विंटल ज्वारी आणि ५५.१२ क्विंटल न्युट्रीफीड बियाण्यांचा पुरवठा केला असून आता नव्याने सात हजार हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी पाच लाख रुपयांच्या निधीस जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. परमिट पध्दतीद्वारे महाबीजकडून २३२.५० क्विंटल मका, ३० क्विंटल न्यूट्रिफिड बियाणे आणि १०६२. ५० क्विंटल ज्वारी बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

पशुधन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा या कार्यक्रमात प्राधान्याने सहयोग घेतला जातो आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती करण्याकरीता जिल्ह्यात १६१३ युनीट निश्चित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमानुसार प्रति युनीट सहा हजार रूपये दिले जाणार आहेत. तालूका कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी संकलित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठीचा सर्व निधी त्यावरच खर्च होईल याची काळजी संबंधीत यंत्रणांनी घ्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात चार दिवसाआड पाणी

$
0
0

चार दिवसाआड पाणी

येवला : येवला शहराला आता चार दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर साठवण तलावात सध्या केवळ १५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौधरींच्या तक्रारीमुळे सादरे होते व्यथ‌ित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी बुधवारी मनसेचे जळगावमधील नगरसेवक ललित कोल्हे यांची नाशिकमधील सीआयडी कार्यालयात तब्बल साडेतीन तास चौकशी करण्यात आली. सागर चौधरी खंडणीची तक्रार देण्यासाठी गेल्याने सादरे व्यथ‌ित होते. चौधरी याला समजावून सांगा असा संवाद सादरे यांनी आपल्याशी फोनवरून साधला होता, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे.

सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे नाशिकमधील पथक करीत आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी सीआयडीने वाळू ठेकेदार रविंद्र चौधरी, राजेश मिश्रा आणि नगरसेवक ललित कोल्हे यांना वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी नाशिक‌मध्ये बोलावले होते. अधीक्षक प्रदीप देशपांडे, पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांनी त्यांची चौकशी केली. बुधवारी सकाळी कोल्हे चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात हजर झाले. साडेतीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. सागर चौधरी सादरे यांच्या विरोधात खंडणीची तक्रार देण्यासाठी गेला होता. ही बाब सादरे यांना समजली. ते व्यथ‌ित झाले. त्यांनी मला मोबाइलवर फोन केला. माझ्या विरोधात तक्रार देऊ नको असे चौधरी याला समजावून सांगा असे सादरे यांनी सांगितल्याची माहिती आज झालेल्या चौकशीतून पुढे आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय समिती आज नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्राची द्विसदस्यीय समिती आज नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे. जिल्ह्यातील सिन्नर आणि येवला तालुक्यातील काही गावांना भेट देऊन ही समिती तेथील दुष्काळी परिस्थितीचा दाहकता तपासणार आहे.

‍समितीमध्ये निती आयोगाचे अध्यक्ष मानस चौधरी, केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाचे सचिव शंतनु विश्वास यांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपूरी हे तीन तालुके वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे या तालुक्यांमधील अनेक गावे यंदा दुष्काळाच्या झळा अनुभवित आहेत. सुरगाणा तालुक्यातील १९१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आहे. राज्यात १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असून, राज्य सरकारने केंद्राकडे तातडीची चार हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे राज्यातील शेतीची बिकट अवस्था होण्याची भीती आर्थिक मदत मागतेवेळी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

या पार्श्वभुमीवर केंद्राची ही समिती राज्यभरातील दुष्काळाची पाहणी करणार आहे. त्यासाठी चार समित्यांनी नेमणूक करण्यात आली असून, त्यापैकी एक समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती, शेतीमधील पिकांची सद्दस्थितीची पाहणी या दौऱ्यात केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किराणा दुकान जळून खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील मेनरोडवरील किराणा दुकानास लागलेल्या आगीत आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. त्र्यंबक नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाने काही वेळातच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

मेनरोड वरील व्यापारी सारडा यांचे सर्वांत जुने किराणा मालाचे दुकान व त्यावर निवासस्थान आहे. या दुकानास लागूनच घरे आहेत. सारडा यांच्या दुकानाला लागलेली आग शेजारी पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. बुधवारी पहाटेच्या सुमारास सारडा यांच्या किराणा दुकानातील स्वीच बोर्ड जवळ शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून आग पसरली. तेल, तूप तसेच पेपरची रद्दी यामुळे आग आणखी भडकली. पहाटे मेनरोड गंगास्लॅबवर चहाची दुकाने लागतात. यातील एका व्यवसायिकास धूर दिसल्याने त्याने नागरिकांना सावध केले. रस्त्यावर अडथळ्यांमुळे अग्निशमन वाहन वेळेत पोहचणे शक्य झाले नाही. रस्त्यावर वाहने उभी करणे, माळा शंख, रूद्राक्ष माळा यांची पथा-या पसरून दुकाने लावणे यास नगरपालिकेने आळा घातला पाहिजे. मेनरोड वर घटनास्थळ असल्याने किमान वाहन तेथे जावू शकले. इतरत्र गल्ली गल्लीबोळात घटना घडल्यास काय करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात बायोगॅस प्रकल्प धूळखात पडून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनाचा भाग म्हणून सुमारे तीस लाख रूपये खर्चून उभारलेला महत्त्वाकांक्षी बायोगॅस प्रकल्प सद्यस्थितीत शोभेची वास्तू म्हणून ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील क वर्ग नगरपालिकामधील एकमेव सटाणा पालिकेने बायोगॅस प्रकल्प निर्मिती करून नावलौकीक मिळविला असला तरी प्रकल्प बंद अवस्थेत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

या प्रकल्पाचे काम पूर्ण होवूनही हस्तांतराच्या प्रतीक्षेत प्रकल्प धूळखात पडून आहे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा अशी अपेक्षा शहरवासीय बाळगून आहेत. राज्यातील माथेरान, डोबिंवली, कल्याण या पालिका क्षेत्रातील बायोगॅस प्रकल्पांचा अभ्यास करून सटाणा पालिकेने प्रकल्पाचे काम पूर्ण केले. भाभा अणुसंशोधन केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ना हरकत दाखला दिल्यानंतर पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून बायोगॅस प्रकल्प उभारणारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा ही पहिलीच क वर्ग पालिका आहे. १३ ऑक्टोबर २०११ ला या प्रकल्पाची उभारणी शहरातील वॉर्ड क्र. १९ मधील मटन मार्केट मागील मोकळ्या जागेवर बाराव्या वित्त आयोगांतर्गत केली. शासनाने व प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले असल्याने बायोगॅस प्रकल्पाचे काम मार्गी लागले. ठाण्याच्या अवनी एंटरप्राईजेस या कंपनीला प्रकल्पाच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. तब्बल वर्षभर कासवगतीने काम करीत प्रकल्प कसाबसा पूर्ण झाला. भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांच्या निसर्गऋण प्रकल्पाच्या अहवालानुसार काम पूर्ण झाले.

सटाणा शहरात दररोज दहा टन घनकचरा निर्माण होतो. दररोज तीन टन गॅस निर्मिती क्षमतेचा प्रकल्प असल्याने शहरातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स, उपहारगृहातील वाया जाणारा ओला कचरा, उरलेले अन्नपदार्थ, भाजीपाला, आठवडे बाजारातील व दैनंदिन बाजारातील भाजीपाला गवत व शहरातून घंटागाडीद्वारे जमा केलेला ओला व सुका कचरा, बाजार समिती आवारातील सडके कांदे, डाळिंब, द्राक्ष या प्रकल्पात कच्चा माल म्हणून वापरले जाणारे होते.संपूर्ण साचलेल्या ओल्या कचऱ्याचे बारीक तुकडे करून प्रकल्पात टाकल्यानंतर त्याचे रूपांतर स्वयंपाकाच्या गॅसमध्ये होणार होते. हे सर्व जणू काही मृगजळच ठरले आहे. टेंस्गिग पूर्ण करून प्रकल्प हस्तांतरीत करता न आल्याने तीस लाख रूपये खर्चून पालिकेला उपयोग काय, असा प्रश्न शहरवासीयांना सतावतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिटेना अंधाराचे जाळे...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

महिन्याकाठी करोडो रुपयांची टोल वसुली होतानाही टोल रोड कंपनीच्या अनास्थेमुळे मनमाड- कोपरगांव राज्य महामार्गावरील येवला शहरातील पथदिप केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजकामध्ये बसविण्यात आलेले देखणे शेकडो पथदीप गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीअभावी चक्क बंदच असल्याने महामार्गावर अंधाराचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी शहरातील नागरिकांना या मार्गावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत धरूनच पुढे सरसावे लागत असून, हे अंधाराचे जाळे कधी फिटणार असा रोखठोक सवाल सर्वच करीत आहेत.

मनमाड-नगर राज्य महामार्गावरील मनमाड-येवला-कोपरगांव या रस्त्याची काही वर्षांपूर्वी 'बीओटी' तत्वावर मालेगांव-मनमाड-कोपरगांव टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीतर्फे बांधणी केली जाताना सन २००७ मध्ये येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात कंपनीचा टोल नाका सुरू झाला होता. या टोल कंपनीने रस्त्याचे काम करताना राज्य मार्गावर येवला शहराच्या दुतर्फा रस्त्याच्या दुभाजकाच्या मधोमध काही किलोमीटर अंतरावर देखणे असे पथदीप बसविले आहेत. तब्बल १३७ च्या आसपास हे पथदीप बसविण्यात आल्यानंतर पथदीपांच्या दोन्ही बाजुला असलेल्या दिव्यांमुळे काही दिवस चांगलाच प्रकाश पडला. राज्य मार्ग चांगलाच उजळून निघत होता. मात्र नव्याचे नऊ दिवस...म्हणतात तशीच या पथदीपांच्या बाबत गत होताना गेल्या काही वर्षात हे चित्र हळूहळू बदलत गेले. दिवसेंदिवस एक एक करत पथदीप बंद पडले. एखाद्या दोन दिव्यांचा अपवाद वगळता गेल्या काही महिन्यांपासून सर्वच दिवे बंद झालेले आहेत.

मोठ्या वाहतूक व रहदारीचा राज्य मार्ग, येवला शहरवासियांचे मोठे आवागमन...प्रत्येक क्षणाला भरधाव वेगाने धावणारी वाहने बघता रात्रीच्या वेळेस बंद राहणारे हे पथदीप मोठा चिंतेचा विषय झाला आहे. त्यातही दिवसेंदिवस या मार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण बघता बंद पथदिपांबाबत शहरवासीयांची ओरड सुरु झाली आहे. एकंदरीत हे पथदूप केवळ शोभेचे बाहुले बनुन राहिले असून, राज्य मार्गावरील येवला शहर परिसरातील हे अंधाराचे साम्राज्य कधी दूर होणार? असा सवाल नागरिक करीत आहेत.

सोलरवरील दिवेही बंदच

टोल रोड कंपनीने येवला शहराचे मुख्य प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या येवला शहरातील विंचुर चौफुलीवर तसेच फत्तेबुरुज नाक्यावर उंच असे 'हायमॉक्स' दिवे काही वर्षांपूर्वी उभारले आहेत. त्यातील बरचसे दिवे गेल्या काही महिन्यांपासुन बंद असून, सेटमधील एखादा दुसराच दिवा प्रकाश देताना दिसतो. अनेकदा झटके खात कोमात जाणारे हे हायमॉक्स दिवे देखील चिंतेत टाकून जातात. टोल कंपनीने विंचुर चौफुलीवर तसेच त्यापुढे दक्षिणेला राज्य मार्गावर बसविलेले सोलर दिवे तर कायमच बंद दिसत आहेत. हे सौर ऊर्जेवरील पथदीप कधी उजळणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सोयीसुविधा कोमात, टोलवसुली जोमात!

पिंपळगाव शिवारात टोल कंपनीचा टोल नाका असून, या टोल नाक्यावर दिवसाकाठी जवळपास साडेतीन ते चार लाखांच्या आसपास टोल गोळा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दररोजचा हा टोल बघता महिन्याला टोल कंपनीच्या खात्यात करोडो रुपये जमा होतात. या बाबी लक्षात घेता टोलवसुली करणाऱ्या कंपनीकडून नियमानुसार राज्य मार्गावर दिल्या जाणाऱ्या सोई सुविधांच्या बाबतीत मोठा अभाव नजरेत पडत आहे. विशेषतः गेल्या अनेक महिन्यांपासुन टोल कंपनीने आपल्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची येवला शहरानजीकची डागडुजी अथवा दुरुस्ती न केल्याने अनेक ठिकाणी रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर पुन्हा चालला बुलडोझर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेने पुन्हा एकदा बुलडोझर चालवला आहे. बुधवारी संभाजी चौक व महात्मानगर परिसरात निर्मूलन अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली आहे. महात्मानगर येथील काही अतिक्रमणधारकांनी मोहिमेस अडथ‍ळा आणल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहराच्या अनेक भागात अतिक्रमणाने विळखा घातला असून त्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होती. नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीमे अंतर्गत पश्चिम विभागातील संभाजी चौक उंटवाडी परिसरातील पोकार रेसिडन्सी या इमारतीच्या उत्तर बाजुला श्रीमती तारादेवी रतनलाल बाफना व आर. सी. बाफना ज्वेलर्स यांनी लोखंडी अँगल व पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण केले होते. दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत हे अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. या कारवाईत लोखंडी पत्रे, अँगल, जाळी असे सामान जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महात्मानगर येथील मोना चेंबर्स या इमारतीत नरेंद्र सिंग बिंद्रा यांच्या मालकीच्या दुकान नं ३, ४,६ समोर वाढीव बांधकाम करुन पत्र्याचे शेड उभारले होते हे देखील या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणाहून तीन नग टायर मशिन, २ स्टॅँड, १ प्लास्टिक कव्हर असे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्याच परिसरातील रमेश चेणानी यांच्या दुकानासमोर देखील अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईच्यावेळी महात्मानगर येथे नरेंद्रसिंग बिंद्रा यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीमेस विरोध करुन कामकाजात अडथळा आणला. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यांच्या विरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

ही मोहीम राबवताना मोठी गुप्तता बळगण्यात आली होती. अनेकवेळा नोटीस बाजवूनही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून न घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम राबवताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची ४ पथके बांधकाम विभागाचे जेसीबी व मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही कारवाई आयुक्त प्रविण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आर एम बहिराम यांच्या अधिपत्याखाली जयश्री सोनवणे, जी.जे. गवळी, यु.डी. जाधव व कर्मचाऱ्यांनी राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’च्या पीएचडीला यूजीसीचा चाप

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : मोठ्या दिमाखात पीएचडीचा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला आता हा अभ्यासक्रम पुढील वर्षी न घेण्याचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) द्यावे लागले आहे. यूजीसीचे नियम न पाळता पीएचडीचा अट्टहास केल्यामु‍ळे विद्यापीठावर ही नामुष्की ओढावली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानंतर बाहेरुन पीएचडी करण्याचा अभ्यासक्रमबंद करण्याचा निर्णय यापूर्वीच मुक्त विद्यापीठाला घ्यावा लागला आहे. या अभ्यासक्रमाची फेररचना करुन विद्यापीठाने पीएचडी पुन्हा सुरू करण्याचे निश्चित केले. प्रवेशित विद्यार्थ्यांना आपले संशोधन कार्य विद्यापीठात संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ थांबून करावे लागणार आणि संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दरमहा विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार, असे विद्यापीठाने ठरविले. एकूण ४६ जागांसाठी घेण्यात आलेल्या पीएचडीच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले. ही प्रवेश परीक्षा घेण्यातही विद्यापीठाला अनेक अडचणी आल्या. परीक्षा लांबणीवर टाकण्यासह या परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर करण्यात आला. त्यातच पीएचडीसाठीचे शिक्षक आणि गाईड नसल्याचा मुद्दाही उजेडात आला.

परिणामी, मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी अभ्यासक्रमाची ही सारीच प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. ही सारी बाब कमी म्हणून की काय, आता थेट मुक्त विद्यापीठाला या अभ्यासक्रमातून माघार घ्यावी लागली आहे. त्यासाठीचे पत्र विद्यापीठाने यूजीसीला दिले आहे. यंदा या प्रक्रिया राबविण्यात आल्याने आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, असे आर्जव विद्यापीठाला यूजीसीकडे करावी लागली आहे. तसेच, पुढील वर्षापासून पीएचडीचा अभ्यासक्रम राबविणार नाही, असे लेखी आश्वासन विद्यापीठाला द्यावे लागले आहे. दूरदृष्टीचा अभाव आणि नियमबाह्य कामकाजाची हातोटी यामुळे विद्यापीठावर ही नामुष्की ओढावल्याचे बोलले जात आहे.

यूजीसीने बोलविलेल्या बैठकीत पीएचडीच्या अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. मात्र, त्यास मान्यता मिळू शकलेली नाही. यंदाच्या प्रक्रियेत निवड झालेल्या ३५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांना विद्यापीठात संशोधन करता येईल. मात्र, पीएचडीचा सुरळीत अभ्यासक्रम यूजीसीची नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतरच सुरू करण्यात येईल.

डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images