Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘दादा, या वाघांना आवरा जरा !’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणी आंदोलनावरून गेल्या अनेक दिवसांपासून भाजपला कोंडीत पकडणाऱ्या शिवसेनेवर वचपा काढण्याची संधी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतली. जिल्ह्यात वाघ व बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी करणाऱ्या आमदारांना उत्तर देण्याऐवजी महाजन यांनी दादा भुसे यांच्याकडे पाहत 'दादा तुमच्या वाघांना आवरा किंवा त्यांचा कायमचा बंदोबस्त करा' असा टोमना मारला. त्यांच्या उपरोधीक टोल्याने सेनेचे पदाधिकारी व नेतेही गायब झाले.

राज्यपातळीप्रमाणेच जिल्ह्यातही गेल्या अनेक दिवसांपासून सेना भाजपचे संबंध तणावाचे बनले आहेत. पाणी प्रश्नावर तर सेनेचे आमदार अनिल कदम यांनी भाजपच्या आमदारांच्या घरावर आंदोलने केली. भाजपविरोधी आंदोलनाचे नेतृत्व सेनेच्याच नेत्यांनी केले. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मनात याबद्दल सलगी होती. हा वचपा काढण्याची संधी पालकमंत्र्यांनी डीपीडीसीच्या बैठकीत साधली. 'जिल्ह्यातील वाघ व बिबटे शेतकऱ्यांना त्रास देत असल्याने त्यांचा बंदोबस्त करा' अशी मागणी आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सदस्यांनी दिली.

त्यावर महाजन यांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे बघून 'दादा या वाघांना आवरा जरा असा टोमना मारला. शक्य झाल्यास कायमचा बंदोबस्त करा' अशी विनंती त्यांनी सेनेच्या आमदारांकडे बघून भुसे यांना केली. त्यांच्या या उपहासात्मक टोल्याने सभागृहातील काही नेत्यांना गुदगुल्या झाल्या. तर सेनेच्या पदाधिकारी गडबडले.


पालकमंत्र्यांना अपशकून

तब्बल दीड महिन्यानंतर नाशिकमध्ये येणाऱ्या पालकमंत्र्यांना नाशिकमध्ये येताच शनिवारी अपशकून झाला. घोटीकडून त्र्यंबकेश्वरकडे जाताना त्यांच्या वाहन पंक्चर झाले. त्यामुळे त्यांना दुसऱ्या वाहनातून त्र्यंबकेश्वर व्हाया नाशिकमध्ये यावे लागले. नाशिकमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे राहिले होते. जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे गाडी जाऊ देऊ नका असा अपशकून त्यांना रस्त्यात झाला होता.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांचा अंदाज चुकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक जिल्हा नियोजन समिती आणि पाणी आरक्षण बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या आंदोलनकर्त्यांच्या संख्येचा अंदाज चुकल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक यांनाच आंदोलनकर्त्यांशी भिडावे लागल्याने पोलिसांची एकंदर तयारी उघडी पडली. शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. याची माहिती असलेल्या जिल्ह्यातील सुमारे तीन हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा होण्यास सुरूवात केली. याची भनकच पोलिसांना न लागल्याने ऐन वेळेस त्यांची तारंबळ उडाली. अवघ्या तीन ते चार अधिकारी व १५ ते २० पोलिसांच्या मदतीने आंदोलनकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यात, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह पोलिस उपायुक्त विजय पाटील, अविनाश बारगळ, सहायक पोलिस आयुक्त भुजबळ, पोलिस निरीक्षक शंकर काळे, शांताराम अवसरे यांचा समावेश होता. पालकमंत्र्याच्या वाहनांचा ताफा ​जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहचताच आंदोलकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला. आंदोलनकर्ते आक्रमक होत असताना पोलिस मात्र त्यांना आवरताना सपशेल अपयशी ठरले. आवश्यक तो फौजफाटच तिथे उपलब्ध नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. तब्बल २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ गोंधळ सुरू होता. अखेर राज्यमंत्री दादा भुसे यांनी वाहनाबाहेर येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाल्याने पालकमंत्र्यांना कार्यालयाच्या आवारात पोहचता आले. दरम्यान, आंदोलनकर्तेही त्यांच्या पाठापोठ आतमध्ये शिरल्याने पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कार्यालयाच्या आवारात सकाळपासून ठिय्या मांडून बसलेले शेकडो शेतकरीही आक्रमक झाल्याने प्रशासनाच्या नियोजनाचे पितळ उघडे पडल्याची चर्चा सुरू होती. हा विषय नाजूक असल्याने बळाचा वापर करायचा नाही, अशा सूचना होत्या. त्यानुसार सर्व बंदोबस्त पुरविला गेल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा एल्गार; यंत्रणा गारद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाण्याअभावी डोळ्यादेखत उध्वस्त होणारी शेती आणि डोक्यावर बँकांचे लाखोच्या कर्जाने दबलेल्या शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश आणि एल्गार शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पहायला मिळाला. आपल्या हक्काचे पाणी पळवणाऱ्या सरकारचा आणि बघ्याची भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेराव घालत घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे संतप्त शेतकऱ्यांनी काही स्टंटबाज राजकारण्यांनाही जागेवर फटकावत धडा शिकवला. त्यामुळे शेतकऱ्यांची आक्रमकता आवाक्याबाहेर गेल्याने यंत्रणाही हतबल झाली होती.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी सोडल्याने मनात दबलेल्या संतप्त भावनांना शनिवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीच्या निम‌ित्ताने मोकळी वाट मिळाली. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी व पक्षांनी एकत्रीत येऊन पाणी सोडण्याच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला युद्धभूमीचेच स्वरूप प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र्यांना खडे बोल सुनावत, पालकत्व न निभावणाऱ्याचा निषेध केला. काळे झेंडे दाखवत, त्यांच्या गाडीसमोर येऊन त्यांना पाण्याची दाहकता लक्षात आणून दिली. आक्रमक शेतकऱ्यासमोर यंत्रणा तर अक्षरशा: हतबल झाली होती. दिवसभर ठाण मांडून बसल्याने अखेरीस पालकमंत्र्यांना पाणीवाटपाच्या निर्णयाविनाच माघारी फिरवण्याची वेळ आणली.

पत्रकाराला मारहाण

आंदोलकांना आवरतांना हतबल झालेल्या पोल‌िसांनी आपला संताप पत्रकारांवर काढला. डीसीपी अविनाश बारगळ यांच्यासह पोल‌िसांनी पत्रकार महेंद्र महाजन यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. पत्रकार असल्याचे सांगूनही बारगळ यांनी शेतकऱ्यांवरील संताप त्यांच्यावर काढला. या मारहाणीची दखल पालकमंत्री महाजन यांनी घेतली असून, या घटनेच्या चौकशीचे

आदेश दिले आहेत. पत्रकारांवर मुजोरी करणाऱ्या पोल‌िसांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघाने

केली आहे.

भुजबळ कुठे आहेत?

नाशिक जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटला असतांना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे जिल्ह्यात असूनही आंदोलनापासून लांब राहिल्याची चर्चा होती. त्र्यंबकेश्वरमध्ये पालकमंत्र्यांच्या माडींला मांडी लावून बसलेले भुजबळ डीपीडीसीच्या बैठकीलाही गैरहजर राहिले. भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे आंदोलक भांबावले होते. शेतकरी आक्रमक तर प्रशासन हतबल झाल्याने दिशा देणारे कोणीच नव्हते. तर या आंदोलनाचे नेतृत्व करण्याची धमक असलेल्या भुजबळांची अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. भुजबळ कुठे आहेत, असा सवाल शेतकरी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना काटकसरीचा सल्ला

$
0
0

पाणी आरक्षणावरील बैठक निर्णयाशिवायच गुंडाळली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहुप्रतिक्षित पाणी वाटपाच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि राज्य सहकार मंत्री दादा भुसे यांनी जिल्हावासियांना काटकसरीने पाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे. बैठक पाणी आरक्षणाची असली तरी मागणी नोंदविल्यानंतर प्रत्यक्षात कोणत्या क्षेत्राला किती पाणी मिळणार हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. याउलट आमदारांचींच आपापसात खडाजंगी सुरू झाल्याने पालकमंत्र्यांनी बैठक स्थगित करण्याचा इशारा दिला. दरम्यान, या सर्व पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी दुपारी मुंबईत बैठक बोलावण्यात आली असून, तिला लोकप्रतिनिधींसह अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने पाणी वाटपाबाबतची बैठक आयोजित करेपर्यंत गंगापूर आणि दारणा धरणातून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. पिण्यासह, शेती, एमआयडीसी आणि पाणी पुरवठा योजनांना पुढील वर्षभरात किती पाण्याची आवश्यकता भासेल याचा अंदाज घेऊन त्यानुसार पाण्याचे वाटप करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये ही बैठक झाली. बैठकीला राज्य सहकार मंत्री दादा भूसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्या-त्या धरणातून पाणी आरक्षणाची नोंदविण्यात आलेल्या मागणीचा अहवाल बैठकीत ठेवण्यात आला. गंगापूरसह बहुतांश धरणांमध्ये उपलब्ध पाण्यापेक्षा मोठी मागणी नोंदविण्यात आल्याने पाणी वाटप कसे करणार अशी विचारणा लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना केली. मात्र यंदा जिल्हावासियांपुढे काटकसरीने पाणी वापरण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी पाणी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावू नका, त्यांना समजून घ्या अशी विनंती अर्जुन बोराडे या शेतकऱ्याने केली. मेडगिरी समितीने अहवालात ठरवून दिलेले निकष तपासावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील रखडलेले जलसाठ्यांचे प्रकल्प वेळप्रसंगी कर्ज काढून पूर्ण करू अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

तर मोटारी होणार जप्त

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पाणी चोरी वाढल्याची कबुली जलसंपदा मंत्री महाजन यांनी या बैठकीवेळी दिली. अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत मोटारी जप्त केल्या जातील असा इशारा पाणी वाटपाच्या बैठकीत देण्यात आला. मात्र अशा कारवाईचे पहिले पाऊल मराठवाड्यात उचला. त्यानंतर आमच्या मोटारींना हात लावा, असा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिला. तर ही बैठक

धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यापूर्वीच घ्यायला हवी होती, असे म्हणत आमदार सीमा हिरे यांनी पालकमंत्र्यांना घरचा आहेर दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी परत जाणार नाही याची काळजी घ्या

$
0
0

पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक‌ीकडे विकासकामांसाठी निधी मिळत नाही म्हणून लोकप्रतिनिधींची ओरड असताना आदिवासी योजनांच्या कामांसाठीचा ३० कोटींचा निधी परत गेला ही खेदजनक बाब असल्याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. निधी पूर्ण क्षमतेने वापरला गेलाच पाहीज, असे आदेश देतानाच अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, सुभाष भामरे यांच्यासह आमदार, जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानात प‌हिल्या टप्प्यात सर्व गावे समाविष्ट होऊ शकली नाहीत. दुसऱ्या टप्प्यात बरीचशी गावे सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी सुमारे ३५ कोटींची मशिनरी खरेदी केली जात असल्याचे ते म्हणाले. शिक्षक, डॉक्टर आदिवासी भागात रूजू होण्यास इच्छुक नसतात. मात्र असे चालणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. ठक्कर बाप्पा योजनेची अंमजबजावणी करताना आदिवासी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश भुसे यांनी दिले. तर जिल्हा योजनेंतर्गत विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि गतीने व्हावीत यासाठी त्रयस्थ संस्थेची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली.

८२९ कोटीच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

बैठकीमध्ये ८२९ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण योजनेतंर्गत २७८.४५ कोटी, अनुसूचीत जाती उपयोजनेअंतर्गत ८६.७१ कोटी तर आदिवासी विकास उपयोजने अंतर्गत ४६४.७२ कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. हा आराखडा राज्य समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. सर्वसाधारण योजनेअंतर्गत प्रारुप आराखड्यात कृषी व संलग्न सेवा या क्षेत्रातंर्गत सुक्ष्म सिंचन योजनेकरीता. १०.९९ कोटी, ग्रामपंचायतींना सहाय्यक अनुदानासाठी १२ कोटी, लघुपाटबंधारे विभागाकरिता २३.५० कोटी, रस्ते विकासाकरीता ५३ कोटी, पर्यटन आणि यात्रास्थळांच्या विकासाकरीता १८ कोटी, नळ पाणीपुरवठा योजनांकरिता (पेयजल योजना) १६.३३ कोटी, निर्मल भारत अभियान (शौचालय बांधकामे) २७.३८ कोटी, महाराष्ट्र नगरोत्थान योजनेतंर्गत नगरपालिका/महानगर पालिकांना अर्थसहाय्य योजनेकरीता १८ कोटी, अंगणवाडी बांधकामासाठी १० कोटी, नाविन्यपूर्ण योजनेसाठी १२.५३ कोटी या कामांचा समोवश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर येथे ट्रक-जीपच्या धडकेत ३ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सिन्नर

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या वावी-पांगरीजवळ ट्रक आणि पिक-अप जीपची धडक होऊन काल रात्री झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर १८ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळचे रहिवासी आहेत.

शहापूरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाल्याचे कळताच वावी येथील चार तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन या तरुणांनी पोलिसांच्या मदतीनं जखमींना तातडीनं खासगी वाहनानं सिन्नर येथील रुग्णालयात दाखल केलं. जखमींमध्ये चार महिला व पाच वर्षांपेक्षाही कमी वयाच्या ९ बालकांचा समावेश आहे. अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘करोडपती’ चोरट्यांची मांदियाळी

$
0
0

दोनच गुन्ह्यांत महिन्याकाठी सरासरी कोटीची लूट arvind.jadhav@

timesgroup.com

नाशिक : इजीमनीच्या शोधात असलेल्या चोरट्यांची कमाई आता कोटींच्या घरात पोहचली आहे. मागील आठ महिन्यात चेन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या गुन्ह्यात जवळपास आठ कोटी रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी गेला असून, सर्वसामन्यांचे डोळे पांढरे होणारी ही आकडेवारी पाहिली की, पोलिसांचे अस्तित्व शहरात उरले आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

चोरट्यांच्या कार्यपध्दतीत झालेला बदल, पोलिसांची काम करण्याची जुनाट पध्दती आणि शहरी भागात वाढलेला पैशा, यामुळे गुन्हेगारी जगतात मोठे डल्ले मारण्याची चढाओढ सुरू झाली आहे. नाशिक शहरात चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहनचोरी व इतर किरकोळ चोऱ्या यात चोरट्यांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. गुन्ह्यांची संख्या कमी झाली की वाढली यापेक्षा झालेल्या गुन्ह्यात सर्वसामन्यांना काय मनस्ताप सहन करावा लागला, हे पाहणे महत्त्वाचे असते. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत चोरट्यांनी महिन्याकाठी सरासरी एक कोटी रूपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे हा मुद्देमाल फक्त चेन स्नॅचिंग आणि घरफोडीतील गुन्ह्यांमधील आहे. वाहनचोरी व इतर चोऱ्यांचा विचार करता हा आकडा महिन्याकाठी दोन कोटी रूपयांच्या घरात पोहचतो. मागील आठ महिन्यात शहरात चेन स्नॅचिंगच्या ७९ घटना घडल्या आहेत. यात चोरट्यांनी १ हजार ७९८ ग्रॅम सोने हातोहात लांबवले. बाजार भावानुसार या सोन्याची किंमत साडेचार कोटींच्या घरात जाते. यातील फक्त १९ घटनांचा उलगडा झाला असून, उर्वरीत चोरीचे सोने गेले कुठे असा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे. याबरोबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत घरफोडीच्या २३९ घटना घडल्यात. यात चोरट्यांनी तीन कोटी ३९ लाख ६९ हजार ५२७ रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद पोलिस दरबारी आहे. यातील उघडकीस आलेल्या ५२ गुन्ह्यांमध्ये फक्त २१ लाख रूपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले.

चेन स्नॅचिंग आणि घरफोडी या दोन गुन्ह्यात चोरट्यांनी तब्बल ८ कोटी १९ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे स्पष्ट होते. एकीकडे चोरटे करोडपती होत असताना दुसरीकडे गुन्ह्यांचा कमी कालावधीत तपास करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र आहे.
आठ महिन्यात शहरात चेन स्नॅचिंगच्या ७९ घटनात १ हजार ७९८ ग्रॅम सोने लांबवले

घरफोडीच्या २३९ घटनांत ३ कोटी ३९ लाख ६९ हजार ५२७ रूपयांचा मुद्देमाल लंपास



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानके टाकणार कात

$
0
0

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचा होणार कायापालट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने नाशिकसह खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच अहमदनगर येथील बस स्थानकांची कामे हाती घेतली असून येत्या काही दिवसात यातील काही बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.

नाशिक विभागातील दिंडोरी बसस्थानकाच्या विद्युतीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून या कामासाठी २ लाख ९४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. येत्या २ महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे. तसेच जळगाव विभागातील जळगाव बस डेपोमध्ये पाण्याची समस्या होती. तेथील पंप नादुरुस्त झाल्याने तेथील पाणी पुरवठा करण्याला अडथळा येत होता. त्यासाठी १ लाख ३६ हजार ८७७ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक विभागातील मालेगाव बसस्थानकात अंधाराचे साम्राज्य पसरले होते यामुळे बसस्थानाकात अवैध धंद्यांना उत आला होता. त्यामुळे मालेगाव बसस्थानकाचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यात येणार असून १ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे धुळे विभागातील शिरपूर आगारात नव्याने बांधण्यात आलेल्या विश्रांतीगृहाचे विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी देखील ८० हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिक येथील मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) आणि मेळा बसस्थानकसाठी एसटी महामंडळाने पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. सीबीएसचे आधुनिकीकरण आणि मेळा बसस्थानाकाचे पुर्नबांधणी यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. इतर स्थानकांप्रमाणेच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भगूर या बसस्थानकांचे नूतनीकरण करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. विभागातील उर्वरित बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठीही निधी उपलब्ध केला जाणार आहे. पहिल्या टप्यात ही कामे होणार असून एकूण तीन टप्प्यात विभागातील कामे होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील कामे

जिल्हा.........मंजूर निधी

- नाशिक......५,३,९४,०००

- जळगाव.....१,३६,०००

- धुळे..........८०,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेम्पोच्या धडकेत तीन साईभक्त ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयशर पीकअप आणि टेम्पोत झालेल्या धडकेत ठाणे जिल्ह्यातील तीन साईभक्त जागीच ठार, तर १८ जण जखमी झालेत. हा भीषण अपघात शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारातील शिंदे वस्ती येथे घडला.

मृतांमध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कोशंबी परिसरातील ज्ञानेश्वर नामदेव ठाकरे (३०), नेहा ज्ञानेश्वर ठाकरे (२७) यांचा आणि शहापूर तालुक्यातील आडगाव येथील योगिता संतोष चौधरी (२५) या महिलेचा समावेश आहे. शहापूरजवळचे रहिवाशी असलेल्या महिला आणि मुलं शनिवारी रात्री पिकअपमधून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. मध्यरात्री पिकअप आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात तीन जण जागीच ठार झाले तर एक महिला अत्यवस्थ आहे. अपघातात १८ जण जखमी असून यात पाच वर्षाखालील ९ चिमुरड्यांसह ४ महिलांचा समावेश आहे. अपघातानंतर हा परिसर मुलांच्या आणि महिलांच्या किंकाळ्यांनी दणाणून गेला. शिंदे वस्तीवरील युवकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमींना तत्काळ सिन्नर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी वावी पोलिसांनी औरंगाबाद येथील टेम्पोचालक करण प्रकाश देवरे याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारधन म्हणजे मनाची संजीवनी

$
0
0

विनायकदादा पाटील यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुख-दु:खासारख्या विविध भावछटांमधून प्रवास करणाऱ्या मानवी मनाला एका टप्प्यावर आश्वासक फुंकर हवी असते. ही फुंकर मनाला नवी उभारी घेण्यासाठी, नवे आव्हान पेलण्यासाठी संजीवनी ठरते. मानवी मनाला पुनरूज्जीवीत करण्याचे सामर्थ्य असणारी संजीवनी म्हणजे विचारधन होय. पुस्तकात हे धन साठविलेले असते, असे विचार वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी मांडले.

शब्दमल्हार या प्रकाशन संस्थेच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. दिवंगत स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ त्र्यंबक जोशी यांच्या संग्रहित लेखांच्या 'फळे रसाळ गोमटी' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ जोशी यांनी संकलित केलेल्या विचारवंतांच्या वेच्यांचे प्रकाशन सदानंद या साप्ताहिकात झाले होते. या सदरातील संकलित लेखांचे पुस्तक रूपाने प्रकाशन करण्यात आले. पाटील म्हणाले, की खरे विचारधन हे निर्मळ मनातून प्रकटते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात घरादारावर तुळशीपत्र ठेवून ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी राष्ट्रहितासाठी सर्वस्व पणाला लावले, त्यांच्या कार्यात खरी निर्मळता साठवली आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या संकलन अन् मांडणीला विशेष उंची आहे. हे वैशिष्ट्य 'फळे रसाळ गोमटी' या पुस्तकाचे वाचन करताना अधोरेखित होते, असा अनुभव त्यांनी मांडला.

यावेळी कवी किशोर पाठक म्हणाले, स्वार्थ सुटून त्या पलिकडे माणसाने बघावयास शिकले पाहिजे. कारण स्वार्थापल्याड बघणाऱ्या माणसाच्या दृष्टीत ही समग्रता सामावलेली असते. भेदाभेदांच्या पैलतीरावर जाणारे विचारधन नव्या पिढीला देण्याचे कार्य या सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून होते, असेही पाठक म्हणाले. स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ जोशी यांच्या वाटचालीचा आढावा त्यांचे समकालीन आप्तेष्ठ डॉ. यशवंत बर्वे यांनी घेतला.

समाजाच्या नैतिकतेचा कणा असणारे विचारधन नव्या पिढीपर्यंत पोहचावे, या उद्देशाने 'फळे रसाळ गोमटी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत असल्याची भूमिका 'शब्दमल्हार'चे संस्थापक अध्यक्ष स्वानंद बेदरकर यांनी मांडली. विनायक जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळजाचा ठोका चुकविणारे ‘माय डियर शूबी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सायको थ्रीलर. डोके सुन्न करणारा अनुभव. ड्रामा, थ्रील, यांनी परिपूर्ण असलेले नाटक 'माय डियर शूबी' आर. एम. ग्रुपतर्फे सादर करण्यात आले.

सीआयडी ऑफिसर असलेल्या निंबाळकर यांना एक दिवस मिसेस साळगावकर यांच्या घरातून फोन येतो की त्यांच्या घरात एक डेडबॉडी आहे. दुर्गंध येत असल्याचे आणखी फोन शेजारूनही येतात. त्यामुळे याची शहानिशा करण्यासाठी हे ऑफिसर साळगावकर यांच्या घराजवळ येतात; परंतु मिसेस साळगावकर एकटी बाईमाणूस घरात आहे. म्हणून त्यांना घरात घेत नाही शेवटी मोठ्या प्रयत्नाने निंबाळकर घरात घुसतात. परंतु, साळगावकर यांच्या काहीबाही बोलण्याने ते हैराण होऊन जातात. डेडबॉडी सापडण्यासाठी ऑफिसर जंगजंग पछाडतात पण त्यांना काहीही पुरावा सापडत नाही. मोठ्या प्रयत्नाने ते किचनमध्ये एन्ट्री करतात तेव्हा तेथे त्यांना एक मांजर मारलेले आढळते. घाबरून ते ड्रॉईंग रूममध्ये येतात. परंतु मिसेस साळगावकरांना आधीच ते माहीत असते. घरात दुर्गंधी पसरलीय म्हणून निंबाळकर पडदे बाजूला सारतात तर पडद्याआडून मिसेस साळगावकरांचा हार घातलेला फोटो त्यांना दृष्टीस पडतो आणि त्यांची बोबडीच वळते. अत्यंत ताकदीचा अभिनय या नाटकातून पहायला मिळाला.

नाटकाचे लेखन निरंजन मार्कंडेयवार यांनी केले तर दिग्दर्शन प्रशांत हिरे यांनी केले. या नाटकात लक्ष्मी पिंपळे, प्रशांत हिरे आणि अस्मी राजेश यांनी भूमिका केल्या. नेपथ्य गणेश सोनवणे, रवी रहाणे, संगीत रोहित सरोदे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मानसी शुक्ल, आर्या प्रशांत, नृत्य श्रीकांत वाखारकर, रंगमंच सहाय्य किरण जायभावे, अभय सूर्यवंशी यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांची मखलाशी अन् उडाला गोंधळ

$
0
0

पालकमंत्र्यांची मखलाशी अन् उडाला गोंधळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यकर्त्याचा अर्विभाव जगज्जेताचा असेल तर त्यांची नाळ सर्वसामन्यांशी जुळण्याची शक्यता कमीच असते. पदासोबत मिळालेली प्रतिष्ठा टिकवताना उद्वेगापेक्षा सामंजस्याची भूमिका घेतल्यास, त्या नेतेपदाला शोभा मिळू शकते. शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मात्र हेच भान सोडले. थेट आंदोलनकर्त्यांशी दोन हात करण्याची त्यांची खुमखुमी नाहक इतरांच्या हाणामारीसाठी कारणीभूत ठरली.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी फळबागांवर अवलंबून आहेत. तीन ते पाच वर्षे फळझाडे जगवून त्याद्वारे उत्पन्न मिळण्याच्या काळातच पाण्याचा पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकरी कोलमोडून पडल्याशिवाय राहणार नाही. एका वर्षातील चुकीच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना पाच वर्षे मागे खेचू शकतो. शेतकऱ्यांमधील ही खदखद शनिवारी जिल्हा धिकार्यालयाच्या आवारात दिसून आली. मात्र, पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी थेट राजकीय आंदोलनकर्त्यांशी हुज्जत घालण्यात वेळ दडवला. शेतकरी सभागृहाचा दरवाजा तोडण्याच्या मानसिकतेपर्यंत आले. त्यांना अडवण्यासाठी पोलिस बंदोबस्तही अपूर्णच होता. परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्र्यांना त्याचे गांभीर्य जाणवलेच नाही.

प्रशासनाचे नियोजन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकरी आणि आवाराच्या बाहेर राजकीय पक्षाचे आंदोलनकर्ते अशी मांडणी पोलिसांनी शनिवारी (दि. २१) सकाळपासूनच केली होती. जिल्हा कोर्टाच्या शेजारील रस्त्याने पालकमंत्र्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात येणार होते. तिथे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ होते. तसेच बहुतांश शेतकरी होते. मात्र, उशिरा शहरात दाखल झालेल्या पालकमंत्र्यांनी या प्लॅनची वाट लावत थेट आंदोलनकर्त्यांना भिडण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्र्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे पोलिसांची पुरती धांदल उडाली. दरम्यान, यापेक्षा मोठी आंदोलने केलीत, आपण घाबरत नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतो, त्यामुळे मी कोणाला पाठ दाखवणार नाही, वगैरे मखलाशी पालकमंत्र्यांनी केली. कमरेला बंदूक खाचून भाषणबाजीची सवय असलेल्या पालकमंत्र्यांना कदाचित पाण्यामुळे पेटलेल्या वणव्याची जाणीव नसावी. किंबहुना, पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी जे केले त्याची पुनरावृत्ती करण्याची मौजच सध्या पालकमंत्री अनुभवत असावेत, अशी चर्चा विरोधी पक्षांसह ‌मित्रपक्ष शिवसेना आणि पालकमंत्र्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही रंगली आहे.

धटिंगपणा बाजूला ठेवा

पाणीप्रश्नांमुळे जिल्ह्यात ​कधी नव्हे ते गंभीर स्थिती निर्माण झाली असून पालकमंत्री म्हणून सर्वसामान्यांना सामोरे जाताना आपला धटिंगपणा बाजूला ठेवल्यास, अनेक कामे मार्गी लागतील, अशी चर्चा सध्या भाजपच्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा अवैध धंद्यांचीच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाण्यातील मटक्याचे अड्डे, जुगार व तत्सम अवैध धंद्यांचा विषय गतवर्षाप्रमाणेच यंदाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चेला आला. या धंद्यावर कारवाई करावी, असे साकडे थेट पालकमंत्री गिरीष महाजन यांनाच घालण्यात आले. जिल्हा नियोजनच्या बैठकीत मुख्य विषय सोडून अवांतर विषयांचीच काही लोकप्रतिनिधींनी अधिक चर्चा केली. मात्र, त्यामुळे प्रस्तावित विकासकामे आणि त्यासाठी निधी मंजुरीचा विषय मात्र बारगळला.

जिल्हा नियोजनची यापूर्वीची बैठक १६ जानेवारी २०१६ रोजी झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात ही बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागलेल्या प्रशासनाला ही बैठक आयोजित करण्यासाठी वेळच मिळाला नाही. तब्बल सात महिने ही बैठक लांबणीवर पडली. बैठकीअभावी विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी रखडून पडल्याने आमदारांमध्ये कमालीची नाराजी होती. शनिवारी पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश आमदार उपस्थित होते. मात्र, प्रलंबित विकासकामांच्या मुद्द्यांवरून ही बैठक पाण्याची आवश्यकता, अवैध धंदे, बिबट्याचा त्रास अशा मुद्द्यांवर घसरली. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीपुढे ठेवलेले विकासकामांच्या प्रस्तावावर विस्ताराने चर्चाच होऊ शकली नाही. आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये आदिवासी आणि अनुसूचित जाती उपयोजनांवरील निधीच्या तरतुदीवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता सुरगाण्यातील अवैध मटका आणि जुगाराचे अड्डे, पेठमध्ये परवानगीच्या प्रतीक्षेत असलेले देशी दारूचे दुकान अशा विषयांवर चर्चा करण्यात वेळ घालविण्यात आल्याने मूळ विषयांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही. यामुळे विकासकामे आणि निधी मंजुरीच्या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. सात महिन्यांनंतर बैठक होऊनही निर्णयाविनाच संपली.

वाहतूक प्रश्नावरही मंथन

डीपीडीसीच्या बैठकीत विकासकामांसाठी निधीची तरतूद हा विषय प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक असताना चर्चा अन्य विषयांवरच भरकटत गेली. बैठकीला नाशिक शहरातील काही नगरसेवकही उपस्थित होते. शहरात वाहनतळांअभावी होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न त्यांनी मांडला. जिल्हा परिषदेच्या मैदानावर वाहनतळाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटला असून, केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा योजनाही बंद पडल्या आहेत. पिण्यासाठी तसेच शेतीसाठीही पाणी मिळत नसल्याने जनता आक्रोश करीत आहे. आम्हाला जाब विचारला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील आमदार तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे शनिवारी केली.

जिल्हा नियोजन समितीच्या तसेच पाणी आरक्षणाच्या बैठकीसाठी ते नाशिकमध्ये आले होते. यावेळी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात भेडसावणाऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे त्यांच्याजवळ मांडले. राज्य सरकार जलयुक्त शिवारची टिमकी वाजवित असले तरी त्याचा उपयोग किमान पहिल्या टप्प्यात अधिक टंचाई असलेल्या गावांनाच होणार आहे. मात्र, अन्य गावांचे काय असा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्या व्यतिरिक्त अनेक गावांना आतापासूनच पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. जून, जुलैपर्यंत हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, त्यावर तोडगा म्हणून बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जलयुक्त शिवार योजना राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात असल्याने अन्य कामांवर अन्याय होत असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी केली. जलयुक्त शिवारसाठी निधी वळविला जात असल्याने अन्य कामांना न्याय कसा देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या योजनेसाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

शुन्य ते शंभर हेक्टर अंतर्गत छोटे छोटे बंधारे बांधावेत, या मागणीचा अनेकांनी पुनरुच्चार केला. स्थानिक स्तरावर असे बंधारे बांधता यावेत, यासाठी जिल्हा नियोजन समितीने अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार निर्मला गावित यांनी केली. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्याची सोय करा, अशी मागणी आमदार नरहरी झिरवाळ यांनी केली. जिल्ह्यातील अनेक आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था झाली आहे. तेथे अनेकदा डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना नाशिकला हलवावे लागते. हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी, शिक्षक आदिवासी भागात सेवा बजावण्यास तयार नसल्याकडेही पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. जिल्हा परिषदेत दोन कार्यकारी अभियंत्यांची तर १० उपअभियंत्यांची पदे रिक्त असून, ती तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली.

निफाड आणि चांदवड तालुक्यात ३२० ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी निधी मंजूर झाला असून, डिसेंबर अखेरपर्यंत ठेकेदाराने हे काम करणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदाराने आतापर्यंत केवळ १० टक्के काम पूर्ण केल्याचा आरोप आमदार अनिल कदम यांनी केला. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. दिरंगाई करणाऱ्या अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची आग्रही मागणी कदम यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जन्मदरातील विषमता हटविण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आज देशाची वाटचाल विकासाकडे होत असली तरी मुलींच्या जन्मदरामध्ये मात्र विकास झालेला दिसून येत नाही. मुलींच्या जन्माचा मार्ग खडतरच असल्याचे आजही दिसून येत आहे. त्यामुळे देशभरात अद्याप एक हजार मुलांमागे आजही ९२९ इतक्याच मुली असल्याचे दिसून येते. ही विषमता हटवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले.

केंद्र सरकारने देशभर बेटी बचाओ, बेटी बढाओ अभियान राबविणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या हेतूने रविवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. फडके बोलत होते. पुढे फडके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अभियानांपैकी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' एक आहे. भाजप सरकारने सर्व राज्यांमधील साडेपाचशे जिल्ह्यांमधील जन्मदराविषयक सर्वेक्षण यासाठी केले आहे. महाराष्ट्रातील नाशिक, बीड, बुलढाणा, वाशिम, जालना, औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील प्रमाणातही मोठी विषमता असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. हे मिटविण्यासाठी या अभियानात गर्भचाचणीला प्रतिबंध, मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन रुजविणे, मुलींच्या जीवनमानास सरकार म्हणून खात्री देणे, घटणारा जन्मदर वाचवणे ही उद्दिष्टे समोर ठेवून कार्य केले जाणार आहे. तसेच मेळावे, कीर्तने, पथनाट्य, शॉर्टफिल्म या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्र, राज्य, जिल्हा, तालुका अशा टप्प्यांनुसार समितीही नेमण्यात आली आहे. या अभियानाचे धागे फडके यांनी शिक्षणाशी जोडून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्याची गरजही व्यक्त केली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, उत्तर महाराष्ट्र प्रकल्प समन्वयक डॉ. विजया अहिरराव, राज्य प्रकल्पप्रमुख अस्मिता पाटील, नगरसेवक सतीश कुलकर्णी, विजय साने व भाजपाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावकडे चाललेला ७२ लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुटख्याला बंदी असतानाही मालेगाव येथे दोन आयशर ट्रकमधून विक्रीसाठी चाललेला ७२ लाखांच्या अवैध गुटख्याचा साठा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. द्वारका परिसरात सकाळी नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हैदराबाद येथून हा गुटखा आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सय्यद सिराज हुसेन इकबाल हुसेन (वय ३५) आणि जगन्नाथ माळी अल्लाप्पा कल्लूर (वय ३७, दोघेही रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोन आयशर ट्रक गुटखा घेऊन मालेगावच्या दिशेने चालल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिस मुंबई-आग्रा महामार्गावर लक्ष ठेऊन होते. द्वारका परिसरातून चाललेली ही दोन वाहने भद्रकाली पोलिसांच्या पथकाने अडविली. त्यामध्ये मागील बाजूस दर्शनी भागात सिलिंग फॅनचे बॉक्स होते. आत गुटख्याचा मोठा साठा असल्याचे तपासणीत उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा हिरा पान मसाला आणि रॉयल तंबाखूचा साठा आढळून आला. याखेरीज ३३ लाख रुपये किमतीचा बाबा गुटखा आढळून आला आहे. या मालासह २४ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिस उपआयुक्त एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके, एच. व्ही. वारे, हवालदार सातपूते आणि सोनार यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो तेजीत; वांगे, कारले, गिलके, दोडके पन्नाशीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे रविवारी पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली असली तरी नुकसानीमुळे पालेभाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे. सध्या टोमॅटोला सुगीचे दिवस आले आहेत. टोमॅटोला ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे.

गिलके, दोडके, कारले, वांगे यांचे दर पन्नाशीपल्ल्याडच आहेत. आता टोमॅटोही त्यांच्या वाट्यावर आहे. वाटाणानेही भावाचे अर्धशतक ओलांडले आहे. मात्र, पावसामुळे पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. रविवारी मेथा, कोथिंबीर, शेपू, पालक या भाज्यांचे दर दोन रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत खाली आले. पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने दोन ते तीन दिवस तरी खराब मालामुळे घसरण्याची शक्यता आहे. मात्र, आवक घटल्यास दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना खाद्यपदार्थांसह पालेभाज्याही चढ्या दराने खरेदी करण्याची वेळ येणार आहे. वांग्यांना चांगली मागणी असल्याने त्यांचेही दर साठ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. शेपूचे दर कमी झाले असून पालक दोन रुपये जुडीने मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीच्या स्वागताला पाऊस

$
0
0

मदत जानेवारीनंतरच

टीम मटा

उकाड्याने हैराण झालेले मुंबई, ठाणेकर थंडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना पाऊसही त्यासाठी दाखल झाला आहे. शनिवारनंतर रविवारीही मुंबई-ठाणे, तसेच नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि लोकांना स्वेटरऐवजी छत्र्या कपाटांतून बाहेर काढाव्या लागल्या. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारीही कायम असल्याने मुंबईतील आकाश ढगाळलेलेच होते. त्यातच थंड वाऱ्यांनी शहराची पकड घेतली. संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ अशा अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज, सोमवारीही पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपिटीची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांना धसका

विदर्भ व खानदेशचा काही भाग वगळता राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस नुकसानदायी ठरू शकतो. इगतपुरी, त्र्यंबक भागात या पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान झाले. कांदा, हरभरा व गव्हावर रोग पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त

गावांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय पथकाने दौरा केला असला, तरी पथकाचा अहवाल केंद्र सरकारकडे गेल्यावर डिसेंबरपर्यंत मदतीची घोषणा, तर जानेवारीत शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी औरंगाबादमध्ये सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची लोकसंख्या वाढीत मुंबईकरांवरही मात

$
0
0

नाशिककरांची लोकसंख्या वाढीत मुंबईकरांवरही मात २०११ च्या जनगणनेतून झाले स्पष्ट Jeevan.bhawasar@timesgroup.com नाशिक : मुंबईच्या गर्दीला, राहणीमानाला कंटाळलेले लोक नाशिककडे सरकू लागले आहेत, ही चर्चा फार पूर्वीपासून सुरू आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीवरूनही ते स्पष्ट झाले आहे. २००१ ते २०११ या दशकभरात नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या २२.३ टक्क्यांनी वाढली. त्याचवेळी मुंबई शहराच्या लोकसंख्येत साडेसात टक्क्यांची घट झाली तर मुंबई उपनगराची लोकसंख्या ८.२९ टक्क्यांनी वाढली. २०११ च्या जनगणनेची जिल्हानिहाय माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार राज्याच्या लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १६ टक्के होता. या कालावधीत ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक ३६ टक्क्यांनी वाढली. मुंबई आणि उपनगरातील घरांच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांनी या भागात स्थलांतर करण्यास प्राधान्य दिल्याने ही वाढ झाली. त्यानंतर पुणे (३०.३४), औरंगाबाद (२७.३३), नंदूरबार (२५.५) यांचा क्रमांक लागतो. मुंबई येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या वाढत असली तरी शहराची एकूण लोकसंख्या मात्र साडेसात टक्क्यांनी कमी झाली. याशिवाय सिंधूदुर्ग (४.९६) आणि रत्नागिरी (२.३) या जिल्ह्यांच्या लोकसंख्येतही घट झाली. दशकभरात झालेली वाढ राज्य वाढ/घट(%) नाशिक वाढ/घट(%) एकूण १,५४,९५,७०६ १५.९९ ११,१३,३९१ २२.३०

पुरुष ७८,४२,४६० १५.५६ ५,६६,२७४ २१.८६

महिला ७६,५३,२४६ १६.४७ ५,४७,११७ २२.७७

११ लोकसंख्येचे गाव

गावपातळीवर विचार करता पिंपळगाव बसवंत गावात सर्वाधिक ४१,५५९ नागरिकांची वस्ती तर बागलाण तालुक्यातील कोंधराबादमध्ये केवळ ११ नागरिकांचे वास्तव्य आहे. येवला तालुक्यातील ममदापूर गावाचे क्षेत्रफळ सर्वाधिक ५,९५१ हेक्टर तर कोंधराबादचे क्षेत्रफळ सर्वात कमी म्हणजे केवळ १२ हेक्टर आहे. जिल्ह्यात एकूण १९२२ गावे आणि २५ शहरे असून त्यापैकी ३ गावांमध्ये वस्ती नाही. जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता (एक किलोमीटर क्षेत्रफळात राहणारे नागरिक) ३९३ आहे. २५ टक्के अनुसूचित जमाती जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ६१ लाख ७ हजार १८७ असून त्यापैकी ३१ लाख ५७ हजार १८६ पुरुष आणि २९ लाख ५० हजार महिला आहेत. जिल्ह्यातील ३५ लाख ९ हजार लोक ग्रामीण भागात २५ लाख ९७ हजार लोक शहरी भागात राहतात. जिल्ह्यात अनुसुचित जातीच्या नागरिकांची संख्या ९ टक्के तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांची संख्या २५.६२ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-नगर वादाची ठिणगी

$
0
0

सिंचनासाठी तीन आवर्तने; पाणीकपात वाढणार म. टा. प्रतिनिधी, नाशिक पाणीप्रश्नावरून नाशिकमध्ये निर्माण झालेल्या वादाला तोंड देता देता नाकीनऊ आल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी सिंचनासाठी गंगापूर डावा कालव्यातून तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय सोमवार घेतला. मात्र, यातील एक आवर्तन कोपरगावसाठीच्या राखीव साठ्यातून दिले जाणार असल्याने सुरुवातीला मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असलेला संघर्ष आता नाशिक विरुद्ध नगर असा होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरासाठी प्रति माणशी दाोनशे दहावरून दीडशे लिटर पाणी देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याने नाशिककरांना मोठ्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. थोड्याच दिवसात शहरवासीयांना दिवसाआडच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागू शकते. जळगावलाही आवर्तन सोडण्याबाबतही आज (२४ नोव्हेंबर) विभागीय आयुक्तालयात निर्णय होण्याची शक्यता असून, त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नाशिककरांच्या पाणी प्रश्नावरील बैठकीकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची सोमवारी प्रचंड निराशा झाली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मान्य नसल्याची नाराजी व्यक्त करीत आमदार जयंत जाधव यांनी वॉक आऊट केले. त्यामुळे तापलेल्या वातावरणातच पाणी आरक्षणावर घमासान चर्चा झाली. मराठवाड्याला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडल्यामुळे नाशिककर प्रचंड संतापले आहेत. पालकंमत्री गिरीष महाजन यांना शनिवारी नाशिककरांच्या या रोषाचा सामना करावा लागला. पाणी आरक्षणाबाबत महाजन यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. सकारात्मक निर्णयाचे आश्वासन देत पालकमंत्र्यांनी सोमवारी मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल, असे सांगण्यात आल्याने अनेक लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविल्याने लोकप्रतिनिधींची निराशा झाली. सहकार राज्य मंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, जिल्ह्यातील आमदारांसह महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जलसंपदाचे सचिव शिवाजी उपासे आदी बैठकीला उपस्थित होते. येत्या काळात नाशिक डाव्या कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनाकरिता तीन आवर्तन पाणी देणे शक्य होईल, असा दावा महाजन यांनी केला. पालखेड समूहातूनही दोन नियमित आवर्तने पाणी देता येईल व दुसऱ्या नियमित आवर्तनात एक प्रासंगिक देणेही शक्य होईल, असेही ते म्हणाले. चणकापूर, केळझर, हरणबारी व पुनद या धरणातून सद्यस्थितीत पिण्याचे आरक्षण लक्षात घेता गिरणा धरणात मागील वर्षातील आरक्षित पाणी व यावर्षी उपलब्ध पाण्याची तुलना करून समान कपात करुन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यासाठी पाण्याच्या आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना महाजन यांनी दिल्या. 'मेंढेगिरी' त्रुटींवर लवकरच बैठक मेंढेगिरी समितीच्या गोदावरी अभ्यासगटाने अहवालात चुकीची आकडेवारी दिल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे. त्यामुळे आळंदी धरणाचा समावेश गंगापूर समूहात होण्याबरोबरच आकडेवारीतील तफावतही दूर होण्याची चिन्हे आहेत. गंगापूर समूहात ४७०० दशलक्ष घनफूट व दारणा समूहात ७१०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. मनपाचे ६०० दलघफू पाणी दारणा धरण समूहात आरक्षित केल्यास तेवढेच पाणी डावा कालव्यास पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. खरीपात गंगापूर डाव्या कालव्यास सिंहस्थामुळे पाणी देण्यात आलेले नाही. त्यांना पाणी देण्याचा प्राधान्यक्रमाने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली. गंगापूर धरण समूहावर अन्याय होत असल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images