Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भगूर शिक्षण मंडळाचे ज्ञानदानाचे कार्य पवित्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
ज्ञानदानाचे कार्य पवित्रपणे करीत शिक्षण मंडळ भगूर यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलातून भारतीय नीतीमूल्य व ज्ञान यांचा संगम जोपासला जाईल, असे प्रतिपादन देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी केले.

देवळालीच्या बार्न्स स्कूल रोडवर उभ्या राहत असलेल्या मातोश्री यमुनाबाई करंदीकर या शैक्षणिक संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, तानाजी करंजकर, नगरसेवक भगवान कटारिया, भाऊसाहेब धिवरे, भगूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शीतलदास बालानी, कार्यवाहक श. रा. वैद्य, मधुसूदन गायकवाड, रा. मु. आंबेकर आदींसह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. आधुनिक काळात ज्ञान हीच मूलभूत गरज आहे. शिक्षणाची भूक शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही अधिक प्रमाणात आहे. ती गरज भगूर शिक्षण मंडळाने आेळखल्याचे ठाकरे म्हणाले. आंबेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा इतिहास विषद केला. कार्याध्यक्ष एकनाथ शेते यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय होण्याच्या दृष्टीने नेहमीच कार्यरत असल्याचे सांगितले. संजय केकाणे यांनी सूत्रसंचालन केले तर जितेंद्र भावसार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामदास आठवलेंची शाब्दीक आतषबाजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कधी आपल्या खास शैलीत कविता सादर करीत, तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप-सेनेलाही हळूच कोपरखळी मारत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी नांदगावकरांना खिळ‌खिळवून हसवले. दुसरीकडे रिपाइंचे तुकडे होत आहेत. गटबाजी वाढलीय, आता तरी संघटित व्हा, असे बजावत कार्यकर्त्यांना अंतर्मुखही करून सोडले. निमित्त होते नांदगाव येथील आंबेडकर नगर येथील नव्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त झालेल्या आठवले यांच्या जाहीर सभेचे.

कवी आणि नेता अशा दोन्ही भूमिका आपल्या भाषणातून लिलया साकारणाऱ्या रामदास आठवले यांनी दिल्लीत आहे तिथेच राहू द्या. केंद्रात मंत्री पद हवे, राज्यात मी उत्सुक नाही हा स्पष्ट कबुली जबाब देखील चर्चेचा विषय ठरला. नांदगाव येथे झालेल्या सभेत खा. आठवले यांनी आपल्या चारोळी कवितेने दमदार सलामी ठोकल्यानंतर खास मिश्किल शब्दात त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांसह राज्यातील नेते मंडळींना ही कोपरखळी मारत रिपाइंची ताकद काय आहे, हे समजावून सांगितले.

पण, भुजबळ हरले!

आपला आणि आपल्या पक्षाचा करिश्मा सांगतांना खा. आठवले यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. आम्ही पाठिंबा दिला होता म्हणून तेव्हा लोकसभा निवडणूक समीर भुजबळ जिंकले. पण, आम्ही गेल्या लोकसभेला बरोबर नव्हतो म्हणून छगन भुजबळ यांचा पराभव झाला, असा दावा रामदास आठवले यांनी केला मोदी सरकार केंद्रात अपेक्षेप्रमाणे काम करतेय, असे प्रमाणपत्र देत मला केंद्रात मंत्रिपद हवे, राज्यात मी उत्सुक नाही, अशी प्रांजळ कबुली द्यायला आठवले विसरले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांनी फिरवली पाठ!

$
0
0


पांडवलेणी पायथ्यावरील २९ एकरच्या उद्यानात प्रेमीयुगलांचा मुक्त संचार


नामदेव पवार, सिडको


नाशिक शहरातील सर्वाधिक नावारुपाला आलेले दादासाहेब फाळके स्मारकाडे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. तब्बल २९ एकरच्या जागेवर उभारण्यात आलेल्या उद्यानात प्रेमियुगलांचा दिवसभर मुक्त संचार पहायला मिळतो. त्यामुळे कुटुंबीयांसह येणाऱ्या नागरिकांना ओशाळल्यासारखे होते.


नाशिक महापालिकेतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून दादासाहेब फाळके स्मारकाची ओळख होती. परंतु, महापालिकेने फाळके स्मारकालाच दुर्लक्षित केल्याने पर्यटकांच्या गर्दीला ओहोटी लागली आहे. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने नाशिक महापालिकेने नोव्हेंबर २००१ मध्ये फाळके स्मारकाची भव्य उभारणी केली. महापालिकेने पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या २९ एकरवर ११ कोटी रुपये खर्च करून मोठ्या थाटामाटात फाळके स्मारकाचे उदघाटन केले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि तत्कालीन महापौर शोभा बच्छाव यांच्या कार्यकाळात सिनेतारकांची उपस्थितीही झालेल्या या उदघाटन सोहळ्यामुळे नाशिकच्या नावलौकिकात भर पडली. नाशिक जिल्ह्यासह परराज्यातूनही पर्यटकांची फाळके स्मारकात रोज गर्दी होत असे. पर्यटकांसाठी खास लाईटींगचे कारंजे, गार्डन व चवदार पदार्थ खाण्यासाठी एक हॉटेल व नऊ स्टॉल उपलब्ध होते. दुसऱ्या टप्प्यात वॉटर पार्क महापालिकेने सुरू केले. तर तिसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर २००६ साली बुद्ध स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

खर्चच अधिक

फाळके स्मारकाचे उदघाटनापासून ते आजपर्यंत प्रवेशासाठी केवळ दहाच रुपये तिकीट आहे. स्मारकात उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे. महिन्याला जेमतेम अडीच ते तीन लाख रुपये जमा होतात तर खर्च दहा लाखांपेक्षा अधिक आहे. स्मारकाचे वीज बील तीन लाखांच्या पुढे येते. पर्यटकांनी पाठ फिरविल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे.


निधी गेला कुठे?

फाळके स्मारकात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तत्कालीन नगरसेवक संजय नवले यांनी रोपवेची मंजुरी २००८ मध्ये घेतली होती. तसेच २०१० मध्ये सिंगापूरच्या धर्तीवर लेसर शोसाठी महापालिकेने निधी मंजूर केला होता. मात्र, पुढील काळात ना रोपवे झाला; ना लेसर शो. यामुळे रोपवे व लेसर शोसाठी मंजूर असलेला निधी गेला कुठे असा प्रश्न नवले यांनी केला आहे. महापालिकेने फाळके स्मारकाची योग्य काळजी घेतली तर निश्चितच नाशिककरांना विरंगुळासाठी चांगली वास्तू राहू शकेल, असेही नवले यांनी सांगितले.


भिंतीच्या जाळ्या गायब


महापालिकेने फाळके स्मारकाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या बुद्ध स्मारकाची परवड होत आहे. महापालिकेने उभारलेल्या संरक्षक भिंतीच्या जाळ्या गायब झाल्या आहेत. यामुळे भटक्या श्वासांसह टवाळखोरांचा बुद्ध स्मारक परिसरात मुक्त संचार असतो.

निम्मे कारंजे बंद

फाळके स्मारकात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेने चार कारंजे उभारले होते. यापैकी दोन कारंजे सुरू असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु, उर्वरित दोन कारंज्यांची मोटर खराब झाली असल्याने ते बंद अवस्थेत आहेत. या कारंजामधील पाणी नियमितपणे स्वच्छ केले जात नाही. त्यामुळे ते हिरवट झाले आहे.

कर्मचाऱ्यांना नाही पगार

महापालिकेने खाजगी ठेकेदाराकडे फाळके स्मारकाची जबाबदारी दिली आहे. यात ठेकेदाराने नेमलेल्या २५ महिला व २२ पुरुष कामगारांना सात महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. तसेच स्वच्छतेसाठी वेळेवर झाडू उपलब्ध होत नसल्याने झाडांच्या पानांनी सफाईचे काम करावी लागत आहे.


फाळके दालन नावापुरते


भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य दालन महापालिकेने उभारले. मात्र, दिवसेंदिवस घटणाऱ्या पर्यटकांमुळे दादासाहेब फाळकेंच्या दालन केवळ नावापुरतेच उरले आहे. परंतु, फाळकेंच्या दालनात कर्मचाऱ्यांकडून रोज स्वच्छता ठेवली जाते. पर्यटकांनी नियमितपणे यावे, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृह नसले तरी चालेल; मोबाइल, टीव्ही हवा !

$
0
0

नाशिकमध्ये साडेचार लाख कुटुंब स्वच्छतागृहाविना

Jeevan.bhawasar@timesgroup.com

घरात स्वच्छतागृह नसले तरी चालेल पण मोबाइल, टीव्ही पाहिजे, असे म्हणणाऱ्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी आहे. किंबहुना बँकेत खाती उघडणारी कितीतरी कुटुंबे घरात शौचालय नसल्याने उघड्यावर किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करत असल्याचे २०११ च्या जनगणनेत आढळून आले आहे.

जिल्ह्यातील सुमारे ३८ टक्के म्हणजे साडेचार लाख कुटुंबे स्वच्छतागृह नसल्याने शौचासाठी उघड्यावर जातात. तर पावणेदोन लाख कुटुंबे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करतात. म्हणजेच सुमारे ६ लाख २८ हजार कुटुंबांकडे स्वतःचे स्वच्छतागृह नाही. मात्र टीव्ही असणाऱ्या कुटुंबांची संख्या (६ लाख ३० हजार) त्यापेक्षा जास्त आहे. तसेच ६ लाख ६८ हजार कुटुंबांकडे मोबाइल पण घरात स्वच्छतागृह नाही, अशा कुटुंबांची संख्या नाशिक जिल्ह्यात किमान ४० हजार आहे. नाशिक शहराचा विचार करता सुमारे ५८ हजार कुटुंबे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करतात तर साडेचौदा हजार कुटुंब उघड्यावर शौचासाठी जातात. स्मार्ट सिटी करण्यापूर्वी या सर्वांना स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले तर खऱ्या अर्थाने नाशिक स्मार्ट सिटी होऊ शकेल. मोबाइलपासून १ लाख कुटुंबे दूर शहरातील अनेक घरांमध्ये ४-५ मोबाइल आहेत. अनेकांचे स्वतःचे २-३ मोबाइल आहेत. तरीदेखील ३ लाख ३६ हजारांपैकी १ लाख ८ हजार कुटुंबाकडे मोबाइल नाही तर ५७ हजार कुटुंबांकडे टीव्ही नाही. लँडलाइन व मोबाइल असणाऱ्या कुटुंबांची संख्या ७३ हजार ८०० इतकी आहे. जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार कुटुंबांकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असून त्यापैकी ४५ हजार कुटुंब त्यावर इंटरनेट वापरतात. जिल्ह्यात जवळपास ४ लाख दुचाकीधारक कुटुंब असून, ८० हजार घरांमध्ये चारचाकी आहे. निम्म्याहून अधिक लोकांकडे एलपीजी नाही मुंबई-पुण्याच्या इतके जवळ असूनदेखील जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे साडेसहा लाख कुटुंबांपर्यंत स्वयंपाकाचा सिलिंडर किंवा पाइप गॅस पोहोचलेला नाही. त्यामुळे सुमारे ५ लाख कुटुंबांना स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर करावा लागतो. नाशिक शहरात स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर करणारी २२ हजार कुटुंबे आहेत. जिल्ह्यातील ८६ हजार कुटुंब स्वयंपाकासाठी रॉकेलचा वापर करतात. त्यापैकी ३४ हजार शहरात राहतात. शहरातील सुमारे अडीच हजार कुटुंब स्वयंपाकासाठी गोवऱ्या किंवा चारा वापरत असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील केवळ ७५० कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी वीजेवर चालणारी शेगडी किंवा इंडक्शन स्टोव्हचा वापर होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेट्रोफिटींगवर गटनेत्यांशी चर्चा

$
0
0



स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेला येत्या ३ डिसेंबरपर्यंत स्मार्ट सिटी अभियानासंबंधीचा प्रस्ताव केंद्राला सादर करावयाचा आहे. त्यात पॅनसिटीसह रेट्रोफिटींग अंतर्गत शहरातील गावठाणाचा विकासाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींचेही म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेते व पदाधिकारी यांची बैठक गुरुवारी बोलावली आहे. महापालिकेने रेट्रोफिटिंग या पर्यायात जुने नाशिक व पंचवटी परिसरातील गावठाण भाग विकसित करण्याचे ठरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएसआर: वाहतूक बेटांना बळ

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : शहरातील प्रवेशद्वार, रस्ते व चौकांवरून शहराचे सौंदर्य व समृद्धी लक्षात येते. त्यामुळे नाशिक महापालिकेने शहरातील प्रवेशद्वारांसह, वाहतूक बेटे, चौक व रस्ते दुभाजकाचे सुशोभ‌िकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महापालिका खर्च करते मात्र यंदापासून या सुशोभ‌िकरणासाठी शहरातील उद्योजक व शैक्षणिक संस्थांच्या सीएसआर उपक्रमातून ही कामे केली जात आहेत. शहरातील जवळपास ३० आयलॅन्ड व १५ ठिकाणी रस्ते दुभाजकांचे सुशोभ‌िकरण होत आहे. यातील निम्मी वाहतूक बेटे व रस्ते पूर्ण झाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. सीएसआरचा आधार मिळाल्याने पालिकेचे तब्बल ३५ ते ४० कोटींची बचत करता आली आहे.

सिंहस्थ निधीतून शहरातील अंतर्गत व बाह्य रस्ते चकचकीत झाले असले तरी, प्रवेशद्वार आणि चौकांची स्थिती खराब होती. महापालिकेत मनसेची सत्ता असल्याने राज ठाकरेंनी दूरदृष्टी ठेवून रस्त्यांसोबतच प्रवेशद्वार, चौक व दुभाजकांचे रुपडे पालटण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शहरातील उद्योजक व शैक्षणिक संस्थाना सीएसआर उपक्रमातून शहरातील वाहतूक बेट, प्रवेशद्वार व दुभाजक दत्तक घेऊन विकस‌ित करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे आणि महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एकत्र‌ितपणे उद्योजकांची बैठक घेऊन शहरातील बेटांच्या दत्तक योजना सांगितली. त्याला शहरातील उद्योजक व शैक्षणिक संस्थानी चांगला प्रतिसाद दिला आहे.

सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शहरातल्या संद‌ीप फाऊंडेशन, मराठा विद्याप्रसारक समाज, अशोक बिल्डकॉन, महिंद्रा कंपनी, एबीबी, एल अँड टी, खाबीया ग्रुप, मायलॉन, मैत्रेय ग्रुप, सीएट, साईबाबा हार्ट इन्स्टिट्युट, राका फार्म नर्सरी, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी चांगला प्रतिसाद देत जवळपास ३० वाहतूक बेटे व १५ रस्ते सुशोभ‌िकरणासाठी दत्तक घेतले आहेत. यासंदर्भातील अधिकृत करार महापालिकेने केले असून, यातील निम्मे वाहतूक बेटांचे काम पूर्ण झाले आहे. या कंपन्यांनी आपल्या खर्चातून आकर्षक डिझाईन तयार करत, या वाहतूक बेटांना व दुभाजकांना आकर्षक बनवले आहे. याच कंपन्यानी तयार केलेले एबीबी सर्कल, महिंद्रा सर्कल, मुंबई नाका सर्कल, शाल‌िमार सर्कल, रविवार कांरजा, सायकल‌िस्ट सर्कल शहराची शान वाढवत आहेत. तर महापालिकेचीही आर्थिक बचत झाली आहे.

संदीप फाऊंडेशन आघाडीवर

सीएसआर उपक्रमातून शहरातील सर्वाधिक चौक, रस्ते दुभाजकांच्या सुशोभ‌िकरणाची सर्वाधिक कामे संदीप फाऊंडेशनने हाती घेतली आहेत. त्र्यंबक रस्ता, रविवार कांरजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नाशिकरोड ओव्हरब्रीज, होळकर ब्रिज, मुंबई नाका रस्ता दुभाजकाचे काम हाती घेतले आहे.

पालिकेचे ४० कोटी वाचले

वाहतूक बेट व रस्ते दुभाजकांच्या सुशोभ‌िकरणासाठी महापालिकेला जवळपास २५ ते ३० कोटीचा खर्च येणार होता. मात्र आयुक्त व महापौरांनी शहरातील कंपन्याना सीएसआर उपक्रमाची गळ घालत त्यांच्याकडून हे काम करून घेतले. त्यामुळे पालिकेचा जवळपास २५ ते ३० कोटीची बचत झाली आहे. विशेष म्हणजे या वाहतूक बेट व रस्ते दुभाजक विकस‌ित करण्यासोबतच त्यांचे मेंटनन्स देखील याच कंपन्याकडून केले जात आहे. त्यामुळे पालिकेचा दरवर्षी मेंटनन्सवर होणारा ५ ते १० कोटींचा खर्चही कमी झाला आहे. त्यामुळे पालिकेचा जवळपास ४० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

उद्योजक व संस्थानी सामाजिक दायित्व म्हणून वाहतूक बेटांच्या सुशोभ‌िकरणाला हातभार लावला आहे. महापालिकेच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, निम्म्यावर बेटांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामेही प्रगतीपथावर असून, ती लवकरच पूर्ण होतील. - अशोक मुर्तडक, महापौर, नाशिक

सामाजिक दायित्व म्हणून शहराच्या विकासाला हातभार लावणे आवश्यक आहे. म्हणूनच फाऊंडेशनतर्फे जास्तीत जास्त बेटे व दुभाजक विकस‌ित करण्यासाठी दत्तक घेतली आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आमचे सदैव प्रयत्न राहतील. - डॉ. संदीप झा, चेअरमन, संदीप फाऊंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाइम्स ग्रुपतर्फे रविवारी ‘वेडिंग टाइम्स स्वयंवर’

$
0
0



कार्पोरेट कल्चरच्या जमान्यात विवाह जमवण्याचे सोपस्कार विरळ होत आहेत. त्यात मॅट्रोनियल एजन्सीतर्फे खास उपवर वधू-वरांची मनं जुळवली जातात. त्याच अनुशंगाने शहरातील मीयुज ज्युपीटर बिझनेस अॅण्ड लक्झरी हॉटेलमध्ये रविवारी दुपारी ४ वाजेपासून सुरू होणार आहे. मागील वधू-वर मेळाव्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे ‌अनेक विवाह जमले आहेत. मेळाव्यानंतर सुध्दा लग्न जमण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या मेळाव्यात वधू-वर मोफत यादी दिली जाणार आहे. मेळाव्यात 'अनुपम शादी डॉट कॉम'च्या माध्यमातून नोंदणी झालेल्या सदस्यांना सहभागी होता येईल. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील सदस्यांना नोंदणी करून सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात मुंबई, पुणे आणि नाशिकचे वधू-वर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रूपवर वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करता येणार आहे.

ब्राह्मण समाजाच्या रुपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. यात ग्रॅज्युएट, डॉक्टर, इंजिनीअर, डिप्लोमा, डिग्री, डॉक्टरेट, आयटी सेक्टर अशा विविध क्षेत्रातील उच्चशिक्षीत उमेदवार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर मिरजकर सराफ, हॉस्पिटॅलिटी पार्टनर मीयुज ज्युपीटर बिझनेस अॅण्ड लक्झरी हॉटेल, मॅट्रिमोनिअल पार्टनर अनुपम शादी डॉट कॉम, को-स्पॉन्सर आरती डिस्ट्रीब्युटर्स, लेडी क्यूट ब्यूटी पार्लर, लक्षिका मंगल कार्यालय आणि गोविंद हेल्थ केअर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनवास संपता संपेना!

$
0
0

महापालिकेची स्थापना सन १९९२ साली झाली. त्यानंतर महापालिकेने सिडको प्रशासनाकडून ९९ वर्षांच्या करारावर पेलिकन पार्कची जागा हस्तांतर घेतली. सन १९९३ साली तीन लाख रुपये महापालिकेने खर्च करून पेलिकन पार्कची जागा ताब्यात घेण्यात आली. यात पुण्यातील एका खाजगी कंपनीला तीन टप्प्यात विकासासाठी पार्कची जागा देण्यात आली. पहिल्या टप्प्यात खाजगी कंपनीने पेलिकन पार्क उद्यान उभारत त्यामध्ये विविध खेळणी बसविली. अत्याधुनिक आणि मुंबई पुण्यामध्ये दिसणारी खेळणी नाशिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. या खेळण्यांमध्ये बसून मौजमजा करण्यासाठी केवळ नाशिकच नव्हे तर अन्य जिल्ह्यांमधूनही नागरिक येत होते. मात्र, सन १९९५ मध्ये पेलिकन पार्कमध्ये एक दुर्घटना घडली आणि त्यानंतर पार्कला घरघरच लागली. ती अद्याप संपू शकलेली नाही. यात एकेकाळी नाशिकची शान असलेले हे उद्यान बघता बघता संपल्यागत झाले आहे.

सर्व पक्षीय आंदोलन

पेलिकन पार्कच्या सतरा एकर जागेवरून सर्वच पक्षांनी जोरदार आंदोलने केली आहेत. यात माकपने कोर्टात सर्वप्रथम याचिका दाखल केली. यानंतर काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी यात उडी घेतली. तत्कालीन मनसे आमदार नितिन भोसले यांनी पेलिकन पार्कप्रश्नी विधानसभेत आवाज उठवला. भोसले यांच्या आंदोलनामुळे पेलिकन पार्कच्या जागेबाबत चालना मिळाली. मात्र, अद्याप हा मुद्दा पूर्णपणे निकाली निघू शकलेला नाही.

भामट्यांचे आश्रयस्थान सध्या पेलिकन पार्कची जागा मद्यपी, व्यसनी आणि चोर-भामट्यांचे आश्रयस्थान झाले आहे. पार्कच्या भूखंडांवर पाय ठेवणेच काय तर सामान्य नागरिक बघण्याचेही टाळतात. तेथे मोठमोठी झाडे वाढली असून सापांचा वावर वाढला आहे. पेलिकन पार्कचा निकाल कोर्टाच्या फेऱ्यात फसलेला आहे. महापालिका प्रशासनाने प्रयत्नपूर्वक सुरू असलेल्या या उद्यानाच्या मुद्याकडे नंतर सगळ्यांनीच दुर्लक्ष केले की काय असा प्रश्न नवीन नाशिकमधील नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोकाट जनावरांचा देवळालीला त्रास

$
0
0

आनंद रोड, रेस्ट कॅम्परोड, लामरोड, हौसन रोड सह अशा वाहतुकीच्या रस्त्यांवर ही मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसतात. नेमके वाहने येण्याच्या वेळीच अचानक उठून उभे राहतात. त्यामुळे या रस्त्यांवर जनावरांना वाहने धडकण्याचे प्रमाण वाढले आहे. देवळालीतील रेंज परिसरात मोठ्या प्रमाणावर चारा उपलब्ध होतो. तो खाण्यासाठी जनावरांची गर्दी वाढत असून त्यांची गर्दी रस्त्यांवर वाढत आहे. अशा जनावरांना प्रशासनाने ताब्यात घेत गुरुद्वारा रोडवर कोंडवाड्यात डांबणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी मांडले आहे.

बाजाराच्या दिवशी त्रास देवळालीत रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे शेतमाल विक्रीसाठी बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. विक्रीसाठी आणलेल्या शेतमाल खाण्यासाठी धावतात. त्यामुळे बाजारात अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रशासन उदासीन मोकाट फिरणारी जनावरे देवळालीवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ती वेळोवेळी कोंडवाड्यात डांबणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अशी कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने याबाबत निश्चित धोरण आखणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता कर्मचारी भरतीसाठी दबाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत आऊटसोर्सिंगद्वारे स्वच्छता कर्मचारी भरती करण्याचा प्रस्ताव महासभेने फेटाळल्यानंतर रोजंदारी कर्मचारी भरतीसाठी शहरातील संघटनांनी महापालिकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मेहतर वाल्मिकी, दलित समाज युवा समितीच्या वतीने नव्या भरतीत समावून घेण्यासाठी शुक्रवारी उपमहापौर गुरूमीत बग्गा यांना निवेदन दिले आहे.

महापालिकेत आता ७०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याच्या संघटनानी या भरतीत सिंहस्थ कुंभमेळ्यात काम केलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना समावून घेण्यासाठी दबाव वाढवला आहे. सिंहस्थात काम केल्याने या जागांवर या संघटनांनी दावा ठोकण्यास सुरूवात केल्याने लोकप्रतिनिधींमार्फत दबाव वाढवला आहे. त्यामुळे महापालिकेसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. मेहतर वाल्मिकी, दलित समाज युवा समितीच्या वतीने नव्या भरतीत समावून घेण्यासाठी उपमहापौरांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. जवळपास २०० पुरूष व महिलांनी महापालिकेत येवून भरतीत समावून घेण्याची मागणी केली आहे.

पाच ई-टॉयलेटची खरेदी

शहरातील महिलांसाठी महापालिका केरळ पॅटर्नच्या धर्तीवर प्रायोगिक तत्वार पाच ई-टॉयलेटची खरेदी करणार आहे. प्रायोगिक तत्वावर त्याची चाचपणी केली जाणार असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास अधिक ई-टॉयलेट खरेदी केली जाणार आहेत. शहरात महिलांसाठी सरासरी टॉयलेटची संख्या कमी आहे. याबाबत महापालिकेने यापूर्वीच सर्वेक्षण केले होते. गर्दीच्या ठिकाणी टॉयलेट कमी असतात. महिलाची अशा ठिकाणी तर टॉयलेट नसल्याने कोंडी होते. ती टाळण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी ई-टॉयलेटची खरेदी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वागदर्डी धरण आटले; मनमाडकरांना हवे आवर्तन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात तसेच पाटोदा साठवणूक तलावात शहराला अवघे १५ ते २० दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे असून, मनमाड शहराला पालखेड डाव्या कालव्यातून त्वरित आवर्तन सोडावे, अशा मागणीचे निवेदन मनमाड शहर बचाव कृती समितीतर्फे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर यांना देण्यात आले आहे.

समिती पदाधिकारी अशोक परदेशी, राजकमल पांडे, भीमराज लोखंडे, नंदू माळी यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी शिष्टमंडळाने डॉ. मेनकर यांची भेट घेवून शहरासाठी त्वरित आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी १२ विभागीय कार्यालये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आगामी काळात मालेगाव जिल्हानिर्मितीच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागांची १२ जिल्हास्तरीय व विभागीय कार्यालये मालेगावला कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे कार्यरत असलेल्या महावितरण कंपनीचे नाशिक ग्रामीण हे मंडल कार्यालय मालेगाव येथे स्थलांतरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सटाणा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयही मालेगाव येथे स्थलांतरीत करून कार्यान्वित करण्यात आले आहे. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारपरिषेदत याबाबत माहिती दिली.

भुसे म्हणाले, की सदर कार्यालय मालेगाव येथे स्थलांतरीत व्हावे यासाठी २००६ पासून पाठपुरावा सुरू होता. यासंदर्भात ३० जुलै २०१५ रोजी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण अधिकार्‍यांसमवेत बैठक घेवून हे कार्यालय मालेगाव येथे स्थलांतरित करण्यात मंजुरी देण्यात आली होती. त्यासंबंधीचे आदेश महावितरणच्या मुख्य महाव्यवस्थापक पुष्पा चव्हाण यांनी १९ नोव्हेंबर २०१५ रोजी दिले आहेत. त्यानुसार नाशिक ग्रामीण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आणून सध्याचे नाशिक ग्रामीण मंडळाचे कार्यालय मालेगाव येथे स्थलांतरीत करण्यात येते आहे.

मालेगाव मंडळाचे मुख्यालय मालेगाव येथे राहिल, त्याअंतर्गत मनमाड, मालेगाव, सटाणा व कळवण विभाग अशी एकूण ४ विभाग कार्यालय राहतील. महापारेषण कंपनीचे अतिउच्च्चदाबाचे उपकेंद्र देखील मालेगाव येथे मंजूर करण्यासाठी पाठपुरावा चालू असून, लवकरच त्याची निर्मिती होणार आहे. महावितरण कार्यालयासोबतच सटाणा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय देखील मालेगाव येथे स्थलांतरित करण्यात आले असून ते कार्यान्वित देखील झाले आहे. तालुक्यातील मालमाथा व मोसम काटवण भागातील् ७० ते ८० गावाच्या नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या ‘नजरा’ जुगारींवर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

शहर पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशीही जुगार अड्ड्यांवर कारवाई करीत १७ जुगाऱ्यांना अटक केली. यामुळे अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिसांनी आज, गुरूवारी दुपारी सातपूर आणि नाशिकरोड परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे मारीत १७ जणांना अटक केली. पाऊणेदोन लाख रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

भद्रकालीतील व्हिडीओ गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळ चौक व शेलारवाडा परिसरात पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रँचच्या कर्मचाऱ्यांनी छापा मारीत १०० किलो भांग, दहा किलो गांजा व इतर असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त केला. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे २१ नोव्हेंबर रोजी तक्रार आल्यानंतर त्यांनी स्वतः कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कुणाल शेलार व मंगेश शेलार हे फरार झाले असून, भद्रकाली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

भगूर येथील लहवीत गावातील जुगार अड्डा उध्वस्त केल्यानंतर झोन दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी बिटको हॉस्पिटलजवळील जुन्या एमएसईबी इमारतीत बबलू मोगाल या जुगाऱ्याकडून सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा मारला. या अड्ड्याबाबत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर लागलीच कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त धिवरे यांनी सांगितले. १७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील २८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचेही धिवरे यांनी स्पष्ट केले. ही कारवाई सुरू असताना सातपूरमधून जुगार अड्ड्याबाबत​ माहिती देणारा फोनकॉल धिवरे यांना आला. त्यांनी लागलीच एसीपी अतुल झेंडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार झेंडे यांच्या पथकाने हॉटेल जय महाराष्ट्राच्या बाजूस सुरू असलेल्या अड्ड्यावर रेड मारली. येथून पोलिसांनी दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एसीपी झेंडे यांनी दिली. याप्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध व्यवसायाबाबत कारवाईला आणखी धार देण्यात येईल, असे एस. जगन्नाथन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यांवर नव्या तिजोऱ्यांचा उतारा

$
0
0

अध्यक्षांसह संचालकांची शक्कल; शेतकऱ्यांना ढकलले आर्थिक संकटात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेतील वाढते दरोडे व चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अध्यक्ष व संचालक मंडळाने अनोखी शक्कल लढवित थेट नव्या तिजोऱ्या खरेदी करण्याचा घाट घातला आहे. गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोदरेज कंपनीकडून तब्बल १५० नव्या

तिजोऱ्या टप्प्याटप्प्याने खेरदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी संचालक मंडळाने पीक कर्ज वसुलीची मर्यादा दोन महिन्यांनी घटवून शेतकऱ्यांवर नवे संकट टाकले आहे. तर ८०० सोसायटी सचिवांच्या सेवा जिल्हा बँकेकडे वर्ग करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

जिल्हा बँकेचा कारभार हा सध्या शेतकऱ्यांच्या भल्याऐवजी दरोडे व चोरीच्या घटनांनीच अधिक गाजत आहे. त्यात नव्या संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा असतांना अध्यक्ष व संचालक मंडळ शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. जिल्हा बँकेतील दरोडे व चोऱ्या रोखण्यासाठी योग्य उपाय करणे अपेक्षित असतांना नोकरभरती, सवलतींचा सपाटा सुरू केला आहे. अध्यक्ष नरेंद्र दराडेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा बँकेच्या गुरूवारच्या सभेतही अशाच निर्णयांचा सपाटा लावला आहे.

शाखांमध्ये दरोडे पडत असल्याने

आता संचालक मंडळाने साडेसात कोटी रुपयांच्या १६२ नव्या तिजोऱ्या टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मार्चपर्यंत ५० तिजोऱ्यां शाखांच्या मागणीनुसार खरेदी केल्या जाणार आहे. दरोड्यांच्या घटनांवर हा खरेदीचा उतारा संचालकांकडून केला जात आहे.

यासोबतच सातारा पॅटर्ननुसार जिल्हा बँकेच्या ८०० सोसायटी सचिवांच्या सेवा या जिल्हा बँकेकडे वर्ग करण्याच्या प्रस्तावाला ही हिरवा कंदील दिला आहे. मात्र हा निर्णय सचिवांच्या मंजुरीनंतर शक्य होणार असल्याने त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे.

नुकसानीला हातभार

जिल्हा बँकेचा एनपीए सध्या २४ टक्के आहे. तो २५ टक्क्यांपर्यत गेल्या संचालक मंडळ पुन्हा बरखास्त शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती माहित असतांनाही संचालक मंडळाने अनिष्ठ तफावत असलेल्या ११२ कोटीच्या कर्जासाठी समोपचार परतफेड योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. २५० शाखांना कर्ज परतफेडसाठी सवलत दिल्यास एनपीए हा २५ टक्के होणार आहे. त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान होत असतांनाही संचालक मंडळाकडून असे निर्णय घेतले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बळीराजावर सुलतानी संकट

जिल्हा बँकेवर प्रशासक असतांना बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज भरण्यासाठी ३१ मेपर्यंतची सवलत दिली होती. मात्र, सध्याच्या संचालक मंडळाने दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी झटका दिला आहे. खरीप पिककर्ज वसूली मुदत ३१ मे वरून ३१ मार्चपर्यंत आणल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढावले आहे. आधीच दुष्काळाने खरीप नष्ट झाले आहे. त्यात त्यांना कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याऐवजी ती कमी करण्याचा सुलतानी निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे या निर्णयापासून काही संचालकांनी स्वतःहून लांब ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी बोलीभाषेचे गुरूजीही गिरवणार धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांच्या ओठांवर त्यांच्याच बोलीभाषेतून शिक्षणाची मात्रा रुजविण्याअगोदर त्यांच्या गुरूजींना या बोलीभाषेचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने बनविण्यात येणारे शैक्षणिक साहित्य आकाराला येत आहे. सद्यस्थितीत आदिवासी बोलीतील १० पु‌स्तिका तयार करण्यात आल्या आहेत.

राज्यामध्ये सुमारे १६ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण प्रभावी पध्दतीने मिळावे यासाठी परिषदेच्या माध्यमातून या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी आदिवासी बोलीभाषा अवगत असणाऱ्या जाणकारांच्या मदतीने या शैक्षणिक साहित्याच्या निर्मितीलाही सुरुवात झाली होती. या प्रयत्नांच्या परीणामी पहिल्या टप्प्यात 'खेळच खेळ' आणि 'ओढ्याकाठी' या दोन पुस्तिका आकाराला आल्या. यानंतर याच धर्तीवर १० पुस्तिका तयार झाल्या आहेत. संबंधित जिल्ह्यातील आदिवासी बोलीभाषेतील मुख्य वाक्य आणि त्यासमोर देवनागरीतील

त्याचे भाषांतर, अशा पध्दतीची या पुस्तकांची मांडणी आहे. शिवाय मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिकविताना अडचण जाणवू नये यासाठी आदिवासी बोलीभाषेतील शब्दकोश निर्मितीचेही काम सुरू आहे.

गळती रोखण्याचा उद्देश

आदिवासी भागांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांच्या पटसंख्या गळतीचे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत जास्त आहे. विविधांगाने या मुलांच्या शिक्षणावर भर देताना भाषिक दरी मिटवून अधिक सुलभ संवाद साधण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची शालेय गळती रोखावी या उद्देशासाठी हा प्रयोग साकारला जातो आहे. १६ आदिवासी जिल्हे अन् १० बोलीभाषा

राज्यातील सुमारे ३६ पैकी १६ जिल्हे आदिवासी आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह चार जिल्ह्यांचा समावेश आहे. यात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. आदिवासी बोलीभाषांमध्ये वावरी, पावरी, भिलोरी, कोरकू, परधान, मावची, गोंडी, नहाली आणि कातकरी या भाषांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अरंगेत्रममध्ये प्रेक्षक झाले तल्लीन

$
0
0

रंगेत्रम' म्हणजे 'रंगप्रवेश' ही परंपरा भरतनाट्यम नृत्यशैलीचे वैशिष्टे आहे. एखाद्या धार्मिक विधीप्रमाणे ती सांभाळली जात असते. जाहीर कार्यक्रम करण्याइतकी किमान पात्रता म्हणजे पायाभूत अभ्यासक्रम झाला आहे, अशी गुरुची खात्री झाल्यानंतरच त्या शिष्याला गुरुकडून 'रंगप्रवेश' करण्याची अनुमती मिळते आणि त्यानंतरच शिष्य त्याचे कार्यक्रम सुरू करू शकतो. नाशिकच्या सुप्रसिध्द नृत्यांगणा मीरा गणपत्ये धानू यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीया व श्रृतीने ही पात्रता संपादन केली आहे. कालिदास कलामंदिरात नृत्यशारदातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवाला पुष्पार्पण करुन व आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रार्थना करीत पुष्पांजलीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तिस्रा तालातील 'अलारिप्पु', गणपतीची आराधना करणारे 'मुशिका' वाहना सादर करण्यात आले. कल्याणी रागातील व रुपकम तालाच्या संगतीने 'जातिस्वरम्' या नृत्यप्रकाराचे सादरीकरण या द्वयींनी केले. याशिवाय 'माझे माहेर पंढरी' या मराठी अभंगावर तसेच 'वारनम्', 'नटराज पदम'चे सादरीकरण करण्यात आले. श्रृती हिने 'ठुमका चलता रामा चंद्रा' या तुलसीदासांच्या भजनावर अरंगेत्रम सादर केले. मंगलम या नृत्यावर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला शंकर नारायण (मृदंग), शक्तिधरण (मुरसिंग), मंगला वैद्यनाथन (व्हायोलिन) यांची संगीतसाथ लाभली. श्रीया व श्रृतीच्या गुरू मीरा गणपत्ये-धानू, संदीप फाटक, कविता फाटक आदी उपस्थित होते. श्रीया-श्रृतीची अदाकारी पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर सेलमधील ‘कॉर्डिनेशन’ वाढणार

$
0
0

म टा. प्रतिनिधी, ना​शिक

सायबर क्राइमचे गुन्हे हळूहळू डोके वर काढत आहे. राज्यात वर्षभरात दोन हजारापेक्षा जास्त गुन्हे घडत असून, नाशिकही त्याला अपवाद राहिलेले नाही. यापार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी काम करणाऱ्या टेक्निकल अॅनॅलिसीस विंग (टीएडब्लू) आणि सायबर सेलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासह त्यांच्या समन्यवयाचे काम एकाच अधिकाऱ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंटरनेटचा सर्वत्र झालेला प्रसार, सोशल नेटवर्किंगचे वाढते प्रस्थ, यामुळे सायबर गुन्हेही वाढत आहेत. त्यातच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न गुन्हेगार करतात. कोणाचे बनावट प्रोफाइल तयार करणे, अश्‍लील छायाचित्रे प्रकाशित करणे, बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणे अशा अनेक गुन्ह्यांचा सायबर क्राइममध्ये समावेश होतो. याशिवाय, इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे गुन्हेही वारंवार घडत असतात. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना संबंधित वेबसाइटकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहावे लागते.

बहुतांश सोशल नेटवर्किंग साइउटचे सर्व्हर देशाबाहेर आहेत. सायबर क्राइममध्ये गुन्हे करणाऱ्यांना मोकळीक आणि तपास यंत्रणेला अनेक मर्यादा अशी स्थिती, यामुळे निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर पारंपरिक पध्दतीने तपास करणाऱ्या पोलिसांच्या हातात काही पडत नाही. सायबर गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणाही गतिमान होणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारांना शोधण्यासाठी काही वर्षापूर्वी स्थापन झालेल्या सायबर सेलने काही प्रमाणात हातभार लावला असला तरी त्यास अनेक मर्यादा आहेत. कुशल मनुष्य बळाची कमतरता, अत्याधुनिक साहित्यांचा तुटवडा आणि त्याचा वापर करण्याची मर्यादा, अशा बाबींमुळे सायबर सेलचे काम मोबईल कॉल ट्रेकींग किंवा मोबाईल चोरांना शोधण्यापुरते रा​हिले आहे. यापार्श्वभूमीवर सायबर सेल व टीएडब्लूमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे व त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय शहर पोलिस प्रशासनाने घेतला आहे. या विभागासाठी इच्छूक असलेल्या कर्मचाऱ्यांना नुकतेच सायबर तज्ज्ञ विकास नाईक यांनी प्रशिक्षण दिले. या दोन्ही विभागावर नियंत्रण ठेवण्याचे काम पीआय राजेंद्र कुटे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यामुळे गुन्ह्यांचा तपास जलद होण्यास मदत मिळू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीतल्या तरुणांकडून प्रबळ, कलावंतीणची चढाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा घोटी
नाशिक, औरंगाबाद याबरोबरच कोकणातही निसर्गाची वेगळी खाण आहे. या जिल्ह्यांमध्ये गड व किल्ले यांचा खजिना आहे. या भागात निसर्गाची विपुल अशी संपत्ती आहे. त्यात ऐतहासिक व खडतर किल्ल्यांचाही समावेश आहे. घोटीतील ट्रेकिंगवीरांनी दिवाळीच्या कालावधीत आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोकणातील प्रबळ व कलावंती या दोन ऐतिहासिक किल्ल्यावर ट्रेकिंगची मोहीम राबविली. या खडतर मोहिमेमुळे या ट्रेकिंगवीरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

प्रबळ व कलावंतीण हे दोन्ही किल्ले तसे खडतर. शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला व त्यांनी जिंकलेल्या किल्य्यांपैकी ते एक. अशा या ऐतिहासिक किल्ल्यावर घोटीच्या ट्रेकिंगवीराच्या साहसी चमूने या किल्याला भेट देऊन इतिहास जाणून घेतला. इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील या ट्रेकिंगवीरांनी यापूर्वी रायगड, कळसुबाई शिखर, अलंग, मदन, हर्ष, त्रिंगलवाडी, विश्रामगड़ देवगिरी आदी जवळपास डझनभर किल्ल्याची तसेच गडांची सफर यशस्वी केली आहे. या मोहिमेत भगीरथ मराडे यांच्यासह गणेश सूर्यवंशी, नीलेश पवार , प्रशांत येवलेकर, अशोक हेमके, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, प्रशांत जाधव, महेंद्र आडोळे, गजानन चव्हाण, विनायक कडु ,सुरेश डावखर मोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन हा वैभवशाली उपक्रम

$
0
0

महापौर अशोक मुर्तडक यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषीथॉन - २०१५ प्रदर्शनात त्यांच्या शेतीतील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करणारे पाठबळ मिळणार आहे. तसेच शेतीत जिल्ह्याला प्रयोगशील म्हणून नव्याने गती देण्यासाठी कृषीथॉन प्रदर्शन हे वैभवशाली उपक्रम ठरणार आहे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले.

त्र्यंबकरोड येथील ठक्कर्स डोम येथे ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन - २०१५ या कृषी प्रदर्शनाप्रसंगी महापौर मुर्तडक बोलत होते. यावेळी प्रास्तविकात करतांना आयोजक संजय न्याहारकर यांनी सांगितले, की अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे यंदाच्या कृषी प्रदर्शनात नैसर्गिक अडचणींनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यावर उपाययोजना आणि त्यांचे प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शनाचे चर्चासत्र ही संकल्पना राबविली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्य आणि देशातील शेतकऱ्यांना कृषीथॉनमधून उभारी मिळणार आहे. राज्यातील ३५० तालुक्यातील प्रयोगशील युवा व महिला शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या विचारांपासून दूर करण्यासाठी प्रबोधन केले जाणार आहे. सध्या नाशिकला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा म्हणून महापालिकेतर्फे जोरदार कॅम्पेन सुरू आहे. परंतु, जिल्ह्यातील कृषी क्षेत्र प्रयोगशील आणि प्रगत आहे की कृषी क्षेत्राच्या अनुशंगाने 'स्मार्ट अॅग्रो सिटी' म्हणून या प्रदर्शनातून जोरदार प्रचार करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांनी कृषीथॉन - २०१५ प्रदर्शनाची पाहणी केली.

कृषीथॉन प्रदर्शनात कृषी औजारे, कृषी बी-बियाणे, किटकनाशके, खत, नर्सरी, अशा विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रयोगशील युवा आणि महिला शेतकऱ्यांचा शुक्रवारी (दि. २७) सत्कार तसेच पाच जिल्ह्यातील अॅग्रो डिलर्ससाठी मार्गदर्शन शिबिर शनिवारी (दि. २८) होणार आहे. उदघाटन सोहळाप्रसंगी उपमहापौर गुरूमित बग्गा, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, नाशिक बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, कृषी सहसंचालक कैलास मोते, आत्मा प्रकल्पचे संचालक सुभाष नागरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिखलीकर दांपत्याविरोधात अखेर चार्जशीट दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

लाचखोरीच्या प्रकरणात अवघ्या महाराष्ट्राच्या चर्चेत आलेल्या सतीश चिखलीकर व जगदीश वाघ यांच्यापैकी चिखलीकर दांम्पत्याविरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) आज, गुरूवारी चार्टशीट दाखल केले. वाघ दांम्पत्याविरोधात पुढील चार ते पाच दिवसात चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेल्या रायते ते काकडवळण या रस्त्याच्या केलेल्या कामाचा ३ लाख ६९ हजार रूपयांचा मोबादला देण्यासाठी मंजुर बिलाच्या ६ टक्क्याप्रमाणे २२ हजार रुपये लाचेची मागणी करून ती इंजिनीअर जगदीश मगन वाघ याच्यामार्फत स्विकारणाऱ्या ​चिखलीकरला ३० एप्रिल २०१३ रोजी सांयाकाळी ४ वाजता पकडण्यात आले. एसीबीने ही कारवाई नाशिक कार्यालयातच केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीने चिखलीकरच्या शासकीय निवासस्थानाची तसेच त्याची पत्नी स्वाती यांच्या लॉकरची झडती घेतली. यात चिखलीकर दांम्पत्याकडे १४ कोटी ६६ लाख १७ हजार ६४६ रूपये इतकी मालमत्ता असल्याचे उघड झाले. दिनांक १ सप्टेंबर १९८९ ते ३० एप्रिल २०१३ या कालावधीत चिखलीकरने स्वतःच्या व कुटुंबियाच्या नावे उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा १३ कोटी ९१ हजार २१ हजार ५८९ रूपयांची म्हणजे ३८३ टक्के अपसंपदा गैरमार्गाने संपादीत केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चिखलीकरवर एसीबीने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये २८ जून २०१३ रोजी गुन्हा दाखल केला होता. चार्टशीट दाखल करण्यासाठी सक्षम मंजुरी मिळाल्यानंतर आज, नाशिक येथील विशेष कोर्टात दोन हजार पानी चार्टशीट दाखल करण्यात आले. या प्रकरणात जगदीश वाघ याचा समावेश होता आणि त्याच्या कुंटुंबियाकडे अपसंपदा आढळून आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images