Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भुसावळ लोकलचा वाघोबा आला रे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

खान्देशवासीयांसह नाशिककरांना प्रतिक्षा असलेली नाशिक-भुसावळ लोकलचा केवळ फार्सच ठरणार असल्याचे दिसत आहे. लोकल आज सुरु होणार, उद्या सुरु होणार अशा केवळ वावड्याच उठवल्या जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नाशिक-भुसावळ दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये नाशिक आणि खान्देश पट्ट्यातील नागरिकांचा समावेश लक्षणीय आहे. नाशिकमध्ये सातपूर, नाशिकरोड, सिडको भागात खान्देशचे बांधव मोठ्या संख्येने स्थायिक झालेले आहेत. काम आणि नातेसंबंधानिमित्ताने त्यांचे जळगाव-धुळे जिल्ह्यात नियिमित जाणे-येणे असते.

लोकलची तीव्र गरज

भुसावळला जाण्यासाठी सध्या पहाटे पाच वाजता पॅसेंजेर आहे. काशी एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आहेत. परंतु, त्यांना नेहमी गर्दी असते. काही गाड्या फक्त भुसावळला थांबतात. जळगाव, चाळीसगाव, पाचोरासह अन्य स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची पंचाईत होते. भुसावळ पॅसेंजेर तर नाशिकरोड स्टेशनवरच फुल्ल होते. पुणे-लोणावळ लोकल सेवेच्या धर्तीवर नाशिक-भुसावळ लोकल सुरू केल्यास तिला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

जन्माआधीच हत्या

भुसावळ लोकल सुरू होणार, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले होते. लोकलचे टाईमटेबलही अनेकांच्या व्हॉटसअॅपवर आले. काही वृत्तपत्रांमधून लोकल सुरू होणार असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले. परंतु, तीन महिने झाले तरी अद्याप काहीच हालचाल दिसत नाही. रेल्वेचे नाशिकरोडचे अधिकारी, कर्मचारी छाती ठोकपणे सांगायला तयार नाही. आता तर ही लोकल रद्द झाल्याचेच वृत्त येत आहे.

पाचोरा, चाळीसगाव, जळगावसह महत्त्वाच्या सर्व स्टेशनवर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. तेव्हा प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक-भुसावळ लोकल त्वरित सुरू करावी. नोकरदारांसह विद्यार्थ्यांनाही या लोकलचाही फायदा होऊ शकेल.

- आबासाहेब धामणे

निश्चित सांगता येत नाही हो!
नाशिकरोड रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एम. बी. सक्सेना यांच्याशी 'मटा'ने संपर्क साधला असता त्यांनी अशी गाडी सुरू होणार असल्याचा सध्यातरी प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, व्हॉटसअॅपवरील टाईमटेबल विश्वासहार्य नसते. ही गाडी कधी सुरू होईल ते सांगता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपंगांची थांबेना दमछाक!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक:

सरकारी कार्यालयांमध्ये कामे घेऊन येणाऱ्या अपंग बांधवांच्या सोयीसाठी लिफ्ट किंवा रॅम्पची व्यवस्था असायलाच हवी, असा हायकोर्टाचा आदेश असला तरी त्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे. अनेक कार्यालयांमध्ये रॅम्प (सरकत्या जिन्यांची) व्यवस्थाच नसल्याने अपंगांना अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचताना प्रत्येक पायरीवर अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते आहे.

सरकारी योजनांची जेथून अंमलबजावणी होते, त्या सरकारी कार्यालयांमध्येच अपंग बांधवांप्रतीची अनास्था प्रकर्षाने पहावयास मिळते. सरकारी योजनांचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी इतरांप्रमाणेच अपंग बांधवांनाही सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. सुदृढ व्यक्तीपेक्षा त्यांची परिस्थिती वेगळी असली तरी त्याकडे डोळेझाक करून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची खंत अपंग बांधव व्यक्त करतात. अपंग बांधवांसाठी लिफ्ट किंवा रॅम्पची सोय असायलाच हवी असा सरकारचा १९९५ चा आदेश असला तरी त्याची आजतागायत पायमल्ली सुरू आहे. अपंग बांधवांच्या संघटनांनी पाठपुरावा करून काही कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा करवून घेतली. मात्र अजूनही जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्टिल, जीवन बिमा निगम, टेलिफोन कार्यालय यांसह दोनहून अधिक मजले असणाऱ्या कार्यालयांमध्ये लिफ्ट अथवा रॅम्पची व्यवस्था केलेली नाही. विविध प्रकारचे दाखले मिळविणे, परवाने मिळविणे, सरकारी योजनांची माहिती तसेच लाभ घेता यावा यासाठी अपंग बांधवांना सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागतात.

जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय यांसारख्या ठिकाणी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तेथे सरकारी बाबूविषयीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांमध्ये अपंग बांधवही असतात. मात्र, जिने चढताना त्यांची दमछाक होते. अशा एक ना अनेक कारणांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या अपंग बांधवांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे.

अपंगांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये सरकते ‌जिने असावेत असा हायकोर्टाचा आदेश आहे. मात्र तो पाळला गेलेला नाही. आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. काही ठिकाणी तळमजल्यावर रॅम्प केले गेले. मात्र अजूनही अनेक ठिकाणी ते नाहीत. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. यापुढेही करीत राहू

- रामदास बोडके, राज्य उपाध्यक्ष, अपंग कर्मचारी संघटना

जनगणनेच्या निकषावर अपंग मतदारसंघ करून आमचा अपंग प्रतिनिधी राज्य सरकारमध्ये पाठविता यावा यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. याखेरीज सरकारी नोकऱ्यांमध्ये तीन ऐवजी पाच टक्के राखीव जागा असाव्यात, रिक्त जागांचा अनुशेष भरला जावा अशी आमची मागणी आहे. आमच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात.

- ललित सोनवणे, सदस्य, अपंग कल्याण समन्वय समिती

सरकारी कार्यालये, दोन किंवा त्याहून अधिक मजले असणाऱ्या शाळांमध्येही लिफ्ट किंवा रॅम्प असायला हवा. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. सरकारी इमारतींची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समितीही होती. मी त्यामध्ये समितीमध्ये काम करून अपंगांच्या अनेक गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे कामही मंदावले. सरकार दफ्तरी उदासीनता आहे.

- नरेंद्र कलंकार, सचिव, इक्वल राईट्स

खासगी कार्यालयेही उदासीन

सरकारी कार्यालयांमधील अपंग नोकरदारांनाही अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. एकीकडे सरकारी स्तरावर असे चित्र असताना खासगी कार्यालयांमध्ये यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे. तेथे अपंग बांधवांची फारशी दखल घेतली जात नाही. त्यांच्यासाठी ठरवून किंवा जाणीवपूर्वक काही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही त्या पुरविल्या जात नाहीत. अपंग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही रॅम्प, किंवा लिफ्ट अभावी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. एसटी बसमध्ये अपंगासाठी सीट राखीव असतात. मात्र, तेथेही अन्य प्रवाशांकडून जागा बळकावली जाते. आम्ही या समाजाचा एक मोठा घटक आहोत. दुर्दैवाने समाज अजूनही ते मान्य करायला तयार नाही. त्यामुळे आमच्या पदरी सदैव उपेक्षा वाट्याला येते, अशी खंत काही अपंग बांधवांनी व्यक्त केली आहे. तर समाजात आमच्यासाठी स्वतःची सीट देणारेही लोक आहेत, असेही काहींनी आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिद्दीपुढे अपंगत्वही झाले ठेंगणे

$
0
0



तुषार देसले, मालेगाव

अपंग, अंध व्यक्ती म्हटले की, आजही समाजाचा अशा व्यक्तींविषयीचा दृष्टिकोन फार सकारात्मक नसतो. या व्यक्ती म्हणजे कोणावर ओझे, जबाबदारी अशा भावनेतून सतत त्यांना हिणवले जाते. मात्र, याच अपंगत्वाचा बावू न करता अनंत आमुची ध्येयासक्ती अन् अनंत आशा या उक्तीप्रमाणे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि योग्य प्रशिक्षणाच्या बळावर कोणावर ओझे न होता स्वयंरोजगाराद्वारे सक्षम आणि स्वावलंबी आयुष्य जगता येते हे सिद्ध केले आहे, मालेगाव येथील आधार गतिमंद शाळेत प्रशिक्षित झालेल्या यादव विनायक गिरी याने.

सन २००८ साली गिरी यांना मूकबधिर स्वरूपाचे अपंगत्व असल्याचे लक्षात आले. अशावेळी त्याचे आई-वडील यांनी खचून न जाता गिरी यांना येथील आधार संस्थेत दाखल केले. स्वतःला काय म्हणयाचे, सांगायचे आहे हे सांगणे देखील ज्याला कठीण होते आज तोच गिरी जयपूर रग फाऊंडेशनसाठी अत्यंत देखणे आणि अनेक पंचतारांकित हॉटेल्स, कार्पोरेट कंपन्या यांची शोभा वाढवणारे गालीचे तयार करू लागला आहे. त्याच्या या कलाकुसरीला आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मागणी वाढली आहे.

अपंग कल्याण आयुक्त, जयपूर रग फाऊंडेशन आणि मालेगाव येथील आधार मतिमंद मुलांच्या संस्थेतर्फे गालीचे बनविण्याचे राज्यस्तरीय प्रशिक्षण देण्यात आले होते. यात तीस अपंगांना तज्ञ प्रशिक्षण देण्यात आले. त्यात त्याची देखील निवड झाली होती. अपगांचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक योजना व निधी खर्च होत असला तरी त्यांना कौशल्यावर आधारित स्वयंरोजगार उपलब्ध झाल्यास ते देखील स्वतःचा उदरनिर्वाह भागवू शकतात, नव्हे कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यात मदत करू शकतात हे गिरी यांनी दाखवून दिले. इतकेच नव्हे तर आधार संस्थेत गिरी गालीचा तयार करण्याचे प्रशिक्षण विविध अपंगत्व असलेल्या १२ व्यक्तींना देत आहे. आज गलीच्या तयार करण्याच्या माध्यमातून तो स्वतः महिन्याला सहा हजार रुपये सहज कमवित असून, तीन महिन्यात अत्यंत बारीक कलाकुसरीचे १० ते १५ गालीचे सहज बनवतो. बाजारात त्यांना २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत किमत मिळते. मतिमंदत्व असले तरी साईन लँग्वेजद्वारे त्याने प्रशिक्षण घेतले असून, आता अनेकांना तो प्रशिक्षित करीत आहे. कुटुंबीयांसाठी देखील गिरी मोठा आधार बनला आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य प्रशिक्षण मिळाले तर स्वावलंबी आयुष्य जगता येते हे त्याने सिद्ध केले आहे. समाजातील अनेक अपंग बांधवांना त्यांच्या कर्तृत्वाने प्रेरणा दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल शाळेचे साकारणार स्वप्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

सोशल मीडियाचा उपयोग अधिक चांगल्या कामासाठी होऊ शकतो, असा संदेश बागलाण तालुक्यातील आम्ही अंबासनकर या व्हॉट्स अॅप ग्रुपने दिला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गावातील मुलांना देखील डिजिटल क्लासेसद्वारे ई-लर्निंगचा अनुभव देण्यासाठी या ग्रुपने दोन लाख रुपयांची मदत ‌केली आहे. यामुळे ही डिजिटल शाळेच स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

व्हॉट्स अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसाभागाची जोड मिळाली तर जिल्हा परिषदेच्या शाळांचा देखील कायापालट होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखवले आहे, बागलाण तालुक्यातील अंबासन गावाच्या गावकऱ्यांनी. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी डिजिटल शाळा हा महत्त्वाचा घटक आहे. हेच लक्षात घेवून आम्ही अंबासनकर या व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून अंबासन गावातील जि.प. शाळा डिजिटल व्हावी यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची मदत केली आहे.

या ग्रुपमध्ये बाहेरगावी असलेल्या शिक्षणप्रेमी नोकरदारांनी व स्थानिक तरुणांच्या लोकसहभागातून ई-लर्निंग व डिजिटल शाळेचे स्वप्न साकार होणार आहे. दिवाळीच्या सुटीत घरी आलेल्या या तरुणांनी शाळा डिजिटल करण्यासाठी सकारात्मक मनोवृत्तीबरोबर आर्थिक पाठबळ गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या इच्छाशक्तीने मदतीचा हात पुढे केला. यात गावातील तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. यामुळे अंबासन जिल्हा परिषद शाळेचा चेहरा निश्चितच बदलणार आहे.

एका महिन्यातच डिजिटल व ई-लर्निंग शाळा सुरू करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व बाहेरगावी असलेल्या नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या शिक्षणप्रेमींनी केला आहे. लोकसहभागातून शालेय रंगकाम व बोलक्या भिंतीचे काम प्रगतीपथावर आहे. विकास मंचद्वारे शाळेत वृक्षारोपण देखील झाले आहे. येथील विद्यार्थी थेट चार बाय आठच्या मोठ्या स्क्रीनवर प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. ग्रुपमधील शिक्षक मित्रांनी शिक्षकांसाठी डिजिटल शाळा व तंत्र विषयक कार्यशाळा नुकतीच शाळेत घेण्यात आली. सुरुवातीलाच दोन वर्गखोलीत डिजिटल व ई-लर्निंगचे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सी. नेट कंपनीच्या आदिती मोराणकर व योगेश सैंदाणे यांनी उपस्थितांसमोर डिजिटल कार्यशाळेची कार्यप्रणाली समजावून सांगितली. भविष्यात अध्यापनास लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता ग्रुपतर्फे करण्यात येईल, असे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. सद्या डिजिटल व ई-लर्निंगचे जाळे मोठ्या प्रमाणात शहरी भागापेक्षाही खेड्या-पाड्यात झपाट्याने वाढत आहे. गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. मात्र व्हॉट्स अॅप या सोशल मीडियाचा विधायक वापर करून गावातील शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील ई-लर्निगचे धडे मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच वेगळा आहे.

आदिवासी बांधवांचेही मोलाचे योगदान

येथील आदिवासी बांधव रोजंदारी व ऊसतोडणी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, आपण शिक्षणाला मुकलो आहोत, तशी आपली मुले शिक्षणात कुठेही कमी पडू नये म्हणून आदिवासी बांधवही मदतीसाठी पुढे सरसावले. अंबासन येथील बरेचसे शिक्षक बाहेरगावी आपले ज्ञानदानाचे काम करीत आहेत. यातील काही शिक्षकांनी गावावरच्या शाळेत कार्यरत व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीत ठराव करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचआयव्हीग्रस्तांना मिळाली जगण्याची उमेद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

एचआयव्ही बा‌धितांसाठी काही तरी करावे या भावनेतून अनेक सामाजिक संघटना मदत करीत आहेत. मात्र फक्त मदत न करता काही आगळेवेगळे करता यावे, असा संकल्प घेत सिन्नर तालुक्यातील मुसळगाव पोलिस ठाण्याने एड्स बाधितांचे विवाह लावून देण्याबरोबरच अनेक जोडप्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत त्यांना जगण्याची उमेद दाखवली. जागतिक एड्सदिनी आयोजित हा सोहळा आगळावेगळा ठरला.

जागतिक एड‌्सदिनाच्या पार्श्वभूमीवर मुसळगाव पोलिस ठाण्याच्या वतीने एचआयव्ही बाधित जोडप्यांच्या विवाह व त्यांच्या विवाह दिनाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील हॉटेल साई वेज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. संतोष चव्हाण यांच्या आई सेवा फाऊंडेशन व पुणे येथील एनएमपी प्लस या संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

सन २००९ पासून जागतिक एड्स दिनाचा प्रत्येक कार्यक्रम अशा विवाह सोहळ्याने आणि त्यापूर्वी विवाह झालेल्यांच्या लग्नाचा वाढदिवसही याच दिवशी साजरा करण्याचा पुढाकार मुसळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी घेतला. यापूर्वी विदर्भात नियुक्तीवर असताना एड‌्स संदर्भात कार्य करणारे विजय भेंडे यांच्या मदतीने एचआयव्ही बाधित जोडप्यांचे विवाह जुळविण्याचे काम सपकाळे यांनी हाती घेतले होते. या पार्श्वभूमीवर मुसळगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलिस निरीक्षक सपकाळे आणि विजय भेंडे यांच्या प्रयत्नाने एड‌्स दिनी काही जोडपी या लग्नसमारंभास आवर्जून उपस्थित होती. त्यांच्या विवाहाचा वाढदिवसही यावेळी केक कापून साजरा करण्यात आला.

एचआयव्ही लागण झालेल्यांना केवळ सहानुभूती न दाखविता अशा विवाहेच्छुक जोडप्याची लग्नगाठ बांधण्यात आली. याप्रसंगी विजय भेंडे यांनी एड्स विषयी प्रबोधन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांचा 'माणुसकी पुरस्कार' देऊन कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे सल्लागार कृष्णमूर्ती, पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण चव्हाणके, तज्ञ संचालक नामकर्ण आवारे, मुसळगाव कुंदेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांनाही प्रवेश द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील महिलांनी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश मिळावा म्हणून देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांना अर्ज सादर केला आहे. शनीशिंगणापूर येथे महिलेने दर्शन घेतले म्हणून उलटसुलट चर्चा होत असताना त्र्यंबकेश्वर येथे गाभाऱ्यात शिवपिंडीजवळ दर्शनासाठी महिलांना प्रवेश नाही हा विषय पुढे आला आहे.

त्र्यंबकेश्वर येथील सुजाता अशोक पाटील आणि पूनम स्वप्नील पाटील या दोन महिलांनी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांच्या नावे अर्ज दिला आहे. या अर्जात दर्शनासाठी महिला भगिनींना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ द्यावे, अशी विनंती केली आहे. यात त्यांनी येथे महिला गाभाऱ्यात जाण्याची परंपरा नाही असे सांगण्यात येते. यामागे नेमके काय कारण आहे तसेच ही परंपरा केव्हा आणि

कोणी सुरू केली याची माहिती मिळत नसल्याचे म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गाभाऱ्यात पिंडीच्या पाठीमागे साक्षात माता पार्वतीची मूर्ती आहे. तथापि, माता पार्वतीच्या लेकींना प्रवेश नसावा हे विसंगत आहे. त्र्यंबकेश्वर येथे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा न्यायाधीश फलके-जोशी या आहेत. महिला अध्यक्षा असल्याने त्या महिलांना प्रवेशाचा न्याय देतील, अशी अपेक्षा या अर्जात व्यक्त झाली आहे. तसेच, यापूर्वीच याबाबत निणर्याची अपेक्षा होती. तसे झाले नाही मात्र, आता ती वेळ आली आहे तेव्हा आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती या महिलांनी ट्रस्टच्या अध्यक्षांना केली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभाऱ्यात महिलांना प्रवेशबंदी असल्याचे पूर्वापार चालत आले आहे. पुरुषांना गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी ठराविक वेळेतच जावे लागते. तसेच, रेशमी वस्त्र म्हणजेच सोवळे लावणे आवश्यक असते. मंदिरात दर्शनाबाबत नेहमीच वाद होत आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्यांना अनुदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) हे राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मालेगाव मनपाकडून वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्यांना अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली.

या अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी मनपाने कार्यवाही सुरू केली असून, ऑक्टोबर २०१६ पर्यंत शहर १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट मनपाने ठेवले आहे. यासाठी केलेल्या प्रत्यक्ष सर्व्हेनुसार शहरातील एकूण १० हजार ६४१ लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. यात पहिल्या टप्प्यात एकूण १ हजार १३३ लाभार्थ्यांना या अनुदानाचे मंजुरीपत्र व कार्यादेश वाटप करण्यात आले.

लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी केंद्र शासनाकडून चार हजार रुपये, तर राज्य शासनाकडून आठ हजार रुपये व मनपाकडून १४ व्या वित्त आयोगातून चार हजार रुपये असे एकूण १६ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी शौचालय

बांधकाम तत्काळ सुरू करून २१ दिवसांच्या आत त्याचा वापर सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन आपल्या शहराचे आरोग्य व पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतील रस्ते ‘उपेक्ष‌ित’!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सिडको नाशिक महापालिकेच्या नवीन नाशिक सिडकोचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाला आहे. परंतु नवीन नाशिक सिडकोतील नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील चेंबरच्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरतच करावी लागते. तर काही रस्त्यांवर चेंबरची तोंडे घातक झाल्याने अनेक अपघात होत आहेत. महापालिकेने धोकादायक चेंबरची पहाणी करून रस्त्याला समांतर करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही सिडकोतील रस्त्यांना महापालिकेने उपेक्षित ठेवले आहे.
नवीन नाशिक सिडकोत बहुतांश चाकरमान्यांची वस्ती आहे. यात नाशिकरोडनंतर सर्वात मोठा प्रभाग म्हणून नवीन नशिक सिडकोची ओळख आहे. परंतू सिडकोतील रस्त्यांची अवस्था मात्र दयनिय झाल्याचे दिसते. यामध्ये रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ता असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. सिडकोतील कॉलनी रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी टाकण्यात आलेले चेंबर रस्त्यांच्या खाली किंवा वर असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. महापालिकेचा बांधकाम विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्यावर ते आमचे काम नसुन ड्रेनेज विभागाचे आहे असे सांगितले जाते. परंतू यात वाहनचालकांना नाहक चेंबरच्या खड्यांचा त्रास सहन करावा लागत असतो. यासाठी महापालिकेने सिडकोतील रस्त्यांकडे लक्ष घालत वाहनचालकांची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
झेब्राक्रॉसिंगचे पट्टे मारा महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यात नवीन नाशिक सिडकोतील अनेक रस्ते गेले आहेत. परंतु यामध्ये त्रिमुर्ती चौक ते शुभम पार्क कडे येणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने झेब्रा पट्टेच मारलेले नाहीत. महापालिका या रोडवर झेब्रापट्टे मारण्यास विसरली काय ? असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
स्पीडब्रेकरचा त्रास रस्त्यावर जागोजागी स्पीडब्रेकर केल्याने नागरिकांना पाठीचे दुखणे लागल्याची तक्रार व्यक्त होऊ लागली आहे. स्पीडब्रेकरची योग्य ठिकाणी गरज असून याबाबत महापालिकेने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. स्पीडब्रेकरचा आकार व उंची किती असावी याबाबत महापालिकेने स्पीड ब्रेकरची पाहणी करून अवैध स्पीड ब्रेकर काढावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अगदी ५० फूटांवर दोन स्पीड ब्रेकर कामडवाडे अंबड परिसरात असल्याची तक्रारी नागरिकांनी केली आहे. वाहनांचा वेग कमी होण्याऐवजी अवैद्य व चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या स्पीडब्रेकरमुळे अपघात होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुपरहिट गीतकार आर्थिक कुचंबनेत !

$
0
0



'सप्तशृंगी पाहतो मी डोळे भरून','नवसाला पावला मल्हारी','मी देतो निळी सलामी','बघा-बघा आज हे जयभीमवाले','लगीन सोहळा गाजतोय','सबका मलिक एक','सर्वतीर्थ टाकेद','गोविंद माझा भक्ताचा राजा','पोरी बाजूला कर गं टांगा' असे सुपरह‌िट ऑड‌िओ व्हिडीओ अल्बममध्ये गीतरचनेसह अभिनयही केलेला गीतकार चंद्रकांत साळवे विपन्न अवस्थेत असून, उपजीविकेसाठी छायाचित्रकारिता करावी लागत असून, कलेला जोपासण्याची धडपड करावी लागत आहे.
देवळाली कॅम्पपासून जवळच असलेल्या शिंगवे बहुला या गावातील हरहुन्नरी कलाकार म्हणून चंद्रकांत साळवे यांची ओळख आहे. कलेच्या छंद जोपासत पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या कार्यक्रमात हा गीतकार छायाचित्रणाचे काम करताना दिसतो. अनेक गाजलेल्या अल्बमचे गीतकार व अभिनयाने खिळवून ठेवणारे चंद्रकांत साळवे हा कलाकार आर्थिक कुचंबणेतून बाहेर पडण्यासाठी जीवनाचा गाडा ओढताना दिसतो आहे. तळागाळातील कलावंत हा नेहमी उपेक्षित का राहतो हे आजतागायत कोणाला उलगडलेले नाही. चंद्रकांत साळवे नावाचा हा कलाकार अगदी लहानपणापासून संगीताची आवड जोपासत एकापेक्षा एक श्रवणीय चालींवर आधारित गीत कागदावर उतरवतो व गातोही. भक्तीगीत, लोकगीत, लावणी, भीमगीते अशा शेकडोहून काव्यरचना आतापर्यंत चंद्रकांत साळवे यांनी ‌केल्या आहेत. आतापर्यंत असंख्य कार्यक्रमांमध्ये त्याने शाहिरी देखील सादर केली आहे.

महाराष्ट्रातील नामांकित व्हिनस, फाऊंटन, सुमित, शुभांगी, नाकोडा अशा अनेक नामांकित कंपन्यांनी त्यांच्या गीतांना लोकांपर्यंत नेले व ही गाणी सुपरह‌िट ठरली. बॉलिवूडच्या 'लहरे और तुफान' चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'जावई झालाय भगतबुवा' हा त्याचा स्वनिर्मित व
दिग्दर्शितअसलेला चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून, त्यातील सर्व गाणेही त्याने स्वतः लिहिली आहेत. मात्र ही लढाई पोटाची ओढाताण करून सुरू आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांना चंद्रकांत साळवे आपल्या गुरुस्थानी मानतात. त्यांच्या अनेक मैफिलींमध्ये त्याने गीते सादर केली असून, त्याचा काही वर्षापूर्वी भ‌ीमागीतांचा 'मी देतो निळी सलामी' हा अल्बम लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या हस्ते प्रकाशित झाला अन् सुपरहिटही ठरला. 'लुंगी डान्स' या गाण्याच्या चालीवर त्याने शाहीर रंगराज ढेंगळे यांचे संगीतकार पुत्र जय-अमर यांच्या संगीत संयोजनात 'चड्डी डान्स' या गीताची रचना केली व ती युट्युबवर हिट ठरली आहे. एका नामांकित कॅसेट कंपनीने या गाण्यावर करार करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र सध्या आयुष्याचा आर्थिक गाडा ओढणे अवघड झाले असल्याचे चंद्रकांत साळवे सांगतात. त्यातच एका शुटिंगदरम्यान पायाला दुखापत झाल्याने आर्थिक परिस्थितीशी झुंज द्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्य डॉ. शिंदे यांचा ऑक्सफर्डमध्ये शोधनिबंध

$
0
0



पिंपळगाव बसवंत : येथील क. का. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात शोधनिबंध सादर केला. १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन बिझनेस, मार्केटिंग अॅन्ड मॅनेजमेंट या परिषदेत त्यांनी फॉरेन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट इन इंडिया हा शोधनिबंध सादर केला. अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, मलेशिया, दक्षिण आफ्रिका आदी ७५ देशातील संशोधक सहभागी झाले होते. नाशिकमधून डॉ. शिंदे एकमेव होते. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक दिलीप मोरे, श्रीराम शेटे, शिरीष कोतवाल, विश्वासराव मोरे, प्रतापदादा मोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपसाठी एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बी. एस. नर्सिंग या अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाकारण्याविरोधात छावा क्रांतीवीर सेनेने एल्गार पुकारला आहे. इतर अभ्यासक्रमांप्रमाणे नर्सिंगसारख्या सेवा क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करणाऱ्या अभ्यासक्रमास शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या वतीने स्कॉलरशिप देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे. सन् २०१५-१६ या वर्षासाठी अनेक विद्यार्थ्यांनी बी. एस. नर्सिंग या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप संदर्भात कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. चौकशीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनाही नकारात्मक उत्तरे देऊन संभ्रमात ठेवल्याचे अनुभव बुधवारी छावाच्या वतीने समाजकल्याण आयुक्तांच्या कार्यालयात मांडले गेले. नर्सिंग अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. स्कॉलरशिप देताना अनेकदा केवळ कॅप राऊंडच्या माध्यमातून प्रवेशित विद्यार्थ्यांनाच याचा लाभ दिला जातो. मात्र या प्रक्रीयेतून प्रवेश न मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपपासून डावलले जाते. या विद्यार्थ्यांना डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चने (डीएमईआर) अधिक जागा का उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, असाही सवाल नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. कॅप राऊंडमध्ये प्रेफरन्स फॉर्मसाठी अॅप्लिकेबल असूनही बहुतांश विद्यार्थी त्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. कॅप राऊंड पद्धती स्वीकारण्याची मानसिकता असूनही त्यांना प्रवेश मिळू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांवर या धोरणांमुळे अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. नर्सिंगच्या प्रत्येक कॉलेजमध्ये एकूण विद्यार्थी संख्येच्या अवघे पाच टक्के विद्यार्थी प्रवेशित आहेत. येथे शिक्षण घेणाऱ्या उर्वरीत ९५ टक्के विद्यार्थी स्कॉलरशिपपासून वंचित राहात असल्याने त्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होतो आहे. या बाबींचा विचार करून उर्वरीत विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप देण्यात यावी, अशी मागणीही छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याच्या दरात तीनशे रुपयांची घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस वाढ होत असून, बाजारभाव घसरत आहेत. बुधवारी लाल कांद्याच्या दरात सरासरी २९० रुपयांची घसरण होऊन सरासरी बाजारभाव १ हजार ६५० रुपयांपर्यंत घसरले. या भाव घसरणीमुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लासलगाव व परिसरात सध्या लाल कांद्याच्या काढणीला वेग आला असून, परिणामी कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी दिसून येत आहे. येथील बाजार समितीत दररोज सुमारे बारा ते पंधरा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. गेल्या २ नोव्हेंबर रोजी लाल कांदा सरासरी ३ हजार ५०० रुपयांपर्यंत विकला गेला होता. मात्र, जसजशी लाल कांद्याची आवक वाढत गेली तशी बाजारभावात घसरण पहावयास मिळाली आहे. लाल कांदा उन्हाळ कांद्याप्रमाणे साठवता येत नसल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना तो विकावा लागतो. अवघ्या महिनाभरातच कांद्याच्या सरासरी दरात सुमारे १ हजार ८०० रुपयांची घसरण झाली आहे. येत्या काळात मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यास कांद्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, कांद्याची भाव घसरण रोखण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या किमान निर्यातमूल्यात कपात करावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. लाल कांद्याला सध्या बांगलादेश, दुबई, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमध्ये मागणी आहे. भारतातून ७०० डॉलर प्रती मेट्रिक टन या दरात कांद्याची निर्यात करणे निर्यातदारांना परवडत नसल्याने त्यांनी खरेदीमध्ये निरुत्साह दाखविला आहे. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणीपेक्षा पुरवठा अधिक होऊन बाजारभाव आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे साडेबारा हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान १ हजार ४००, कमाल २ हजार ३३० तर सरासरी बाजारभाव १ हजार ६५० रुपये प्रती क्विंटल राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलला ज्ञानाचा मळा!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर शिक्षण घेण्याच्या मुलभूत हक्कात सुद्धा गरीब-श्रीमंत, उच्च-नीच यांसारखे अनेक निकष लावले जातात. हे सर्व निकष झुगारून सर्वांसाठी शिक्षण या विचारानुसार कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक पालक योजनेअंतर्गत ५ दिवसीय अभ्यासक्रम शिबिर उत्साहात पार पडले. २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गंगापूररोड येथील रचना ट्रस्टमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना संबधित विषयातील तज्ज्ञांकडून अनेक मुख्य विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. संजय जोशी, विवेक चित्ते, एस.के.चंद्रात्रे, शोभा बलदोटा यांसोबत इतर शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेल्या पंधरा वर्षांपासून आश्रमशाळेतील तसेच आदिवासी पाड्यावरील अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत ज्ञानदानाचे काम करण्यात येत आहेे. यावर्षी देखील शिबिरात आंबेगण, उंबरठाणे, वारे, शिंदे-दीघे, सुळे, धंद्रीपाडा, हर्षेद यांसारख्या आदिवासी गावांमधून एकूण ५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती यावेळी मिळाली. दिवसभरात अभ्यासक्रमातील विषयांचे मार्गदर्शन केल्यानंतर या विद्यार्थ्यांना 'पिस्तुल्या' हा चित्रपट दाखवण्यात आला. तसेच यावेळी दहावीत प्रथम येणारा मुलगा आणि मुलगी यांना रवी कळमकर यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयाचे पारितोषिक तर प्रत्येक विषयात प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी १०० रुपयांचे पारितोषिक विवेक चित्ते यांच्याकडून घोषित करण्यात आले. या शिबिराची संपूर्ण जबाबदारी प्रभाकर पाटील, पुष्पा जोशी आणि अरुण जोशी यांनी पार पाडली. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलताताई बिडकर यांनी भूषवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीत होतंय करिअरचं प्लॅनिंग...

$
0
0

पूनम अहिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर नुकत्याच इंजिनीअरिंगच्या परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र सुट्यांमध्ये मजा-मस्ती करण्याबरोबरच अनेकांनी करिअर प्लॅनिंग सुरू केले आहे. इंजिनीअरिंगचे बरेच विद्यार्थी सुटीचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग तसेच इंटर्नशिप करण्यासाठी करणार असल्याचे चित्र आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग तसेच इंटर्नशिप करण्याचे नियोजन केले आहे. करिअरच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांकडे कमी वेळ असल्याने यंदाच्या सुट्या करिअरसाठी खर्च करण्याचा संकल्प पुष्कळ विद्यार्थ्यांनी केला आहे. या सुट्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट आणि कॅम्पस प्लेसमेंटसाठी सामोरे जावे लागणार असल्याने त्यांनीही ही सुटी या तयारीसाठीच उपयोगी आणण्याचे ठरविले आहे. या सर्व वेळापत्रकामधून थोडाफार वेळ मिळाल्यास मित्र किंवा कुटुंबियांसोबत ट्रिपला जाण्याचे नियोजन या विद्यार्थ्यांचे आहे. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी दिव्यानी चव्हाण आपल्या सुटीच्या नियोजनाविषयी सांगताना म्हणते, 'परीक्षा संपल्याने आता बराच वेळ हातात असणार आहेत. पण यंदाच्या सुट्यांच्या उपयोग करिअरच्या दृष्टीकोनातून करण्याचा माझा विचार आहे. पुढील वर्षी कॅम्पस प्लेसमेंटच्या तयारीसाठी मी इंटर्नशिप करणार आहे. त्यामुळे नॉलेजमध्ये भर पडेल व महत्त्वाचा अनुभव हाताशी येईल.' असेच नियोजन इंजिनीअरिंगच्या शेवटच्या सौरभ वैद्यने केले आहे. तो याविषयी म्हणतो, 'शेवटचे वर्ष असल्याने इंजिनीअरिंगच्या परीक्षेची सवय झाली आहे. परंतु प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आमच्या बुध्दीमत्तेचा कस लागतोय. या सुटीचा ऊपयोग कॅम्पस प्लेसमेंटची जोरात तयारी व इंटर्नशिप करण्यासाठी करणार आहे. तसेच इंजिनीअरिंगचे शेवटचे वर्ष असल्याने मित्रांसमवेत सुटीचा आनंद घेणार आहे.' 'मागील दोन महिने सबमिशन, प्रॅक्टिकल यामुळे खूप वेळ व्यस्त होता. त्यामुळे आम्ही सर्व मित्रमैत्रिणी कॉलेज प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करून दक्षिण भारतात फिरण्यासाठी जाणार आहोत. त्यामुळे प्रोजेक्ट आणि धमाल यात ही सुटी संपणार आहे.' असे मत स्नेहा बोधेने व्यक्त केले आहे. तसेच बरेच लोक सुट्यांचा उपयोग आपल्या आवडत्या गोष्टींसाठी करणार आहेत. हॉबी क्लासेस, सॉफ्टवेअर, अॅनिमेशन व इतर कोर्सेसकडेही अनेकांचा कल दिसत आहे. काहींनी हा वेळ राखून ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनी ताब्यात घेण्याचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक - सिन्नर रस्ता चौपदरीकरणासाठी जिल्हा प्रशासन सरकारी जमिनी वगळून जाणीवपूर्वक खासगी जमिनी संपादीत करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी रस्त्यांबाबतच्या कागदपत्रांची तपासणी करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करा, असे आदेश भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाचा प्रश्न रेंगाळला असून, तो मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांसह जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

नाशिक ते सिन्नर या मार्गाचे रुंदीकरण सध्या रखडले आहे. शिंदेगाव येथे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यासमोरील बाजूस सरकारी जमीन असतानाही ग्रामस्थांची अडवणूक केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यासंदर्भात अलीकडेच मुंबई येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांना अंधारात ठेवून भूसंपादन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने बैठक बोलावून निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.

दळणवळणाची साधने वाढायला हवीत याबाबत शेतकऱ्यांनी सहमती द‌ाखवली. मात्र, नाशिक-सिन्नर मार्गावरील केवळ रस्त्याच्या एकाच बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी का संपादित केल्या जात आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनेही जमीन संपादित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात जमिनीचा मोबदला वेगवेगळ्या दराने मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर, आपली घरे या प्रकल्पात बाधित होत असल्याने रस्त्याच्या आराखड्यात बदल करावा, अशी मागणी शिंदे पळसे येथील ग्रामस्थांनी केली. सरकारी जागा असताना खासगी जमीन संपादित केली जात असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तातडीने कागदपत्रे तपासावीत आणि दोन दिवसांनी पुन्हा याच विषयावर बैठक घ्यावी, असे ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्ली ते मुंबई सायकल रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत प्रत्यक्षात यावा, यासाठी नाशिकच्या सहा सायकलपटूंनी दिल्ली ते मुंबई अशा सायकल प्रवासाला सुरुवात केली. या रॅलीचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सडक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून यात्रेला प्रारंभ झाला.

स्वच्छ भारत स्वस्थ भारत या अभियानाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. या वर्षात काही प्रमाणात का होईना भारत स्वच्छ झाला. हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्याचा प्रसार, प्रचार व्हावा यासाठी ही सायकल यात्रा आयोजित केली आहे. या अभियानाला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, १३ डिसेंबर रोजी हे अभियान पूर्ण होणार आहे. दिल्ली ते मुंबई असे १६५० किलो मीटरचे अंतर सहा सायकलपटू पंधरा दिवसांत पूर्ण करणार आहेत.

या रॅलीत अॅड. दिलीप राठी, डॉ. राजेश पाटील, अॅड. वैभव शेटे, तुकाराम नवले, राजेंद्र फड, विलास वाळके हे सहा सायकलपटू सहभागी झाले आहेत. प्रीतम पगार, रुचित सणांसे, मितेश सोमवंशी हे क्रु मेबर म्हणून काम पहात आहेत. ही यात्रा दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या चार जिल्ह्यांतून मार्गस्थ होणार आहे. या रॅलीच्या अगोदर या चमुने मागील वर्षी १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक ते पणजी सायकल यात्रा पूर्ण केली होती.

विविध सामाजिक संदेश घेऊन हा चमू भारताच्या विविध कानाकोपऱ्यात नेहमी फिरत असतो. सायकलवर फक्त न फिरता ज्या गावांना भेटी देणार आहेत, तेथे सामाजिक उपक्रम देखील यांच्यावतीने राबविले जातात.

दिल्ली येथून सुरुवात झाल्यानंतर राजस्थान येथील निमराना येथे ११६ किलोमीटर वर पहिला थांबा झाला. त्यानंतर जयपूर, नसिराबाद, भिलवारा, निमुच, मंडसूर, शिरपूर, मालेगाव, नाशिक, ठाणे, मुंबई असा या संघाचा प्रवास असणार आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या संघाचा गेल्या महिन्यापासून सराव सुरू असून रोज १५० ते २०० किलोमीटर सायकल प्रवास हा चमू करीत असतो. या रॅलीसाठी महाजन बंधू, कॅ. नीलेश गायकवाड, वैभव महाले, अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याच्या कडेवर थाटला संसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोजगाराच्या उद्देशाने स्थंलातरीत झालेल्या लोकांना भाड्याने घर घेणे शक्य नाही. यामुळे अनेक जण रस्त्याच्या कडेलाच संसार थाटत आहेत. मखममलाबाद, आडगाव, गंगापूर रोड, पाथर्डी फाटा या भागात स्थलांतरी लोकांचे प्रमाण वाढले आहे.

ऐन थंडीत त्यांना अशा प्रकारे कठीण परिस्थितीत जीवन व्यथित करावे लागत आहे. दुष्काळग्रस्त भागातील स्थंलातरीतांना डोंगरेवसतिगृह मैदान व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे स्थंलातरीतांचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे शहरात रोजगारानिमित्त स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून हमरी-तुमरी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एक दिवसाच्या पाणीकपातीवरून बुधवारच्या महासभेत भाजप सदस्यांनी आक्रमकता दाखवल्याने सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पाणीकपात रद्द करण्याच्या सूचना देणाऱ्या पालकमंत्र्यांचे पोस्टर्स झळकवण्यावरून महापौर व आमदार सीमा हिरे यांच्यात जुंपली. हा वाद विकोपाला जाऊन थेट मनसे व भाजपचे सदस्य वेलमध्ये एकमेकांसमोर येऊन घोषणाबाजी करत हमरीतुमरीवर आले. त्यामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तर उपमहापौरावर भाजपच्या सदस्यांनी शेरेबाजी केल्याने गुरूमित बग्गा आक्रमक होऊन भाजप सदस्यांवर धाऊन गेले. सभागृहातील जेष्ठ सदस्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर सभा सुरू झाली.

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यासाठी बुधवारी विशेष महासभा घेण्यात आली. यावेळी सभा सुरू होताच भाजप सदस्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाणी कपात रद्द करण्याच्या सूचनांची अमलबजावणी करण्याची मागणी केली. मात्र स्मार्ट सिटीचा विषय असल्याने नंतर बोला असे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगीतले. मात्र भाजप सदस्यांनी व आमदार सीमा हिरेंनी सभागृहात पाणीप्रश्नावरून गिरीश महाजन यांचे अभिनंदनाचे फलक झळकवण्याचा प्रयत्न केला. त्यावर फलक जप्त करण्याचे आदेश देत, महापौरांनी फोटो काढून झाल्याने खाली बसा अशी विनंती केली. मात्र यावर सीमा हिरेंनी आक्षेप घेत 'आम्ही प्रसिद्धीसाठी आंदोलन करतो काय?' असा सवाल
केला. त्यावर भाजप सदस्य आक्रमक झाले व वेलमध्ये येऊन गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

महापौर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी करत सभागृहात गोंधळ घातला. तर तुम्हीच दादागिरी करत असल्याचे सांगत, महापौर मुर्तडक यांनी आमदार आवाज दाबत असल्याचा आरोप केला. सीमा हिरे आणि महापौरांमध्ये बराच वेळ शाब्द‌िक युद्ध रंगले. महापौरांच्या बचावासाठी मनसेचेही नगरसेवक वेलमध्ये आल्याने गदारोळ वाढला. महासभेत पाणीवादाला थेट मनसे व भाजपा असा संघर्ष सुरू होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. सदस्यांमध्ये वेलमध्येच बाचाबाचीचा प्रसंग उद्भवला. त्यात भाजप सदस्यांनी उमहापौर गुरूमीत बग्गांवर शेरेबाजी केल्याने वाद आणखीनच चिघळला. त्यामुळे बग्गा यांनी खाली उतरून भाजप सदस्यांवर धावून गेल्याने तणाव आणखी वाढला. सभागृहात गोंधळ आणि गदारोळ सुरू झाला. उपमहापौर व मनसे सदस्यांच्या आक्रमकतेमुळे भाजप सदस्यांनी नमते घेतले. तर वरिष्ठ सदस्यांनी मध्यस्ती केल्याने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतरच सभेला सुरूवात झाली.

निषेधापेक्षा उपाय सुचवा

भाजपतर्फे बुधवारी सीमा हिरे यांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. करवाढीपेक्षा गळती रोखण्याला प्राधान्य दिल्यास उत्पन्न वाढेल, असा टोमना मारला. सोबतच पाणी प्रश्नाचे राजकारण न करता आणि काळे झेंडे दाखवण्यापेक्षा उपाययोजना सुचवा असा टोला त्यांनी महापौरांना लगावला. पाणीप्रश्नाला राजकीय रंग देणे चुकीचे आहे. रस्ते, लाईट, पाण्याची अवस्था खराब असताना, केवळ पाणी प्रश्नावरच राजकारण केले जात असल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला. निषेधाऐवजी उपायावर भर देण्याचा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

अन् उपमहापौर संतापले...

पाणीप्रश्नावर सभागृहात सुरू झालेला गोंधळ उपमहापौर गुरूमीत बग्गा शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भाजपच्या सदस्यांनी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत, शेरेबाजी केली. त्यामुळे बग्गा सतंप्त होत थेट पिठासनावरून खाली उतरून भाजप सदस्यांवर धावून गेले. 'आता मी खाली आलो आहे काय बोलायचे ते बोला' असे सांगत भाजपच्या सदस्यांना आव्हान दिले. त्यामुळे सभागृहातील तणाव अधिकच वाढला. अखेरीस वरिष्ठ सदस्यांनी मध्यस्तता करत बग्गांना आवरले. त्यानंतर तणाव निवळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीवर तोडगा निघावा

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : पर्यावणाचा ऱ्हास आणि त्यामुळे बदललले निर्सगाचे चक्र याचे दुष्परिणाम सध्या सर्वचजण भोगत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता दुष्काळ ही पर्यावरणाच्या हानीचीच फळे आहेत. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे माणूस मेटाकुटीला आला असताना आता हायकोर्टानेच वृक्षतोडीला मज्जाव केला आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह असली तरी शहरात रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या झाडांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, अनेकांना जीव गमवावा लागतो आहे, तर कित्येकजण जायबंदी देखील झाले आहेत.

अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या झाडांबद्दल वेगवेगळी विचारसरणी असणारे दोन मतप्रवाह समोर आले आहेत. ही झाडे तोडली जाऊ नयेत, यासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे कार्यकर्ते आग्रही आहेत. तर, ही झाडे जीवघेणी ठरू लागल्याने ती हटवावीत, असा आग्रह काही लोकांकडून धरला जात आहे. झाडे तोडावीत की तोडू नयेत, यावरून सध्या दोन वैचारीक प्रवाहांमध्ये खल सुरू असला तरी त्यातून साध्य काही होत नाही याचे दु:ख अधिक आहे. काहींनी वृक्षतोडीला न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. तर, दुसरीकडे अपघातवाढ रोखण्यासाठी शहरात रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे तोडावीत यासाठी आतापर्यंत मानवी साखळी, स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवून झाली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून, त्यातून काय निष्कर्ष निघणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गंगापूर रोड, अशोका मार्ग, सीटी सेंटर मॉल ते गोविंदनगर रोड, द्वारका ते नाशिकरोड महामार्ग, के. के. वाघ कॉलेज ते विदर्भ कॉलनी, अमृतधाम चौफुली ते तारवालानगर, लामखेडे मळा ते वज्रेश्वरी झोपडपट्टी, पेठरोडवर आरटीओ कॉर्नर ते जकातनाका, म्हसरूळ गाव ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पपया नर्सरी ते पिंपळगाव बहुला याखेरीज दिंडोरी रोड आणि अन्य अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे अपघातांना कारणीभूत ठरू लागली आहेत. अर्थात अपघातांना केवळ ही झाडेच कारणीभूत नाहीत. मानवी चुका हे देखील अशा अपघातांमागील प्रमुख कारण असल्याचे नाकारून चालणार नाही. अनोळखी मार्गावर रात्रीच्यावेळी बेदरकारपणे वाहन चालविणे, नेहमीच्या मार्गावरही अति आत्मविश्वासाने वेगात वाहन चालविणे, मार्गावर पथदीप बंद असणे अशी कारणेही अशा अपघातांना तेवढीच कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे तोडावीत, अशी मागणी होत असली तरी वाहनचालकांचे प्रबोधनही तेवढेच आवश्यक आहे.

एक झाड तोडले तर किमान १० झाडे लावावीत, असा निकष आहे. परंतु, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. कोणती झाडे तोडावीत आणि त्याबदल्यात कोणती झाडे लावायला हवीत याचेही निकष ठरले आहेत. मात्र, हे निकष दुर्लक्षिले जातात. पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर ठरू शकणाऱ्या झाडाऐवजी अन्यच झाडे लावली जात असल्याचेही यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्यावरणाच्या संवधर्नाप्रती कोर्ट अधिकच आग्रही झाले आहे. वृक्षतोडीला मज्जाव हा त्याचाच भाग आहे. गेल्या काही दिवसांत शहरात अशा झाडांना धडकून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींनी जीवही गमावला आहे. ही झाडे तोडणे शक्य नसेल तर त्यावर पर्याय सुचविले जाणे अपेक्षित आहे. या सर्व विषयासंदर्भात स्थानिक पातळीवर एखादे पथक नेमून लवकरात लवकर तोडगा काढता येईल का हे देखील पाहणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवी दिल्लीच्या संघ लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेसाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी येत्या १४ फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम मुदत ४ डिसेंबर आहे. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परिक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कम‌िशनसाठी निवड करण्यात येते. जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परिक्षेचा फॉर्म ऑनलाइन भरुन पाठवतील आणि रोजगार समाचार मध्ये दिलेल्या शैक्षणिक, शारी‌रिक, वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत अशाच उमेदवांराची निवड परिक्षापूर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी होणार आहे. नाशिकरोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सीडीएस परिक्षेचा ऑनलाईन फॉर्म http://www.upsconline.nic.in या वेबसाईटवर भरावा.

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवकांसाठी प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत असतात. निवास व प्रशिक्षणाची सोय सरकारतर्फेच मोफत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पदवीपर्यंतच्या सर्व मूळ प्रमाणपत्र व गुणपत्रिकेसह आणि ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन मुलाखतीस यावे. मुलाखतीच्यावेळी वस्तुनिष्ठ पद्धतीची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडून घेण्यात येईल. २४५१०३१ किंवा ३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images