Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सव्वा कोटी किमतीचा गांजा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
आंध्र प्रदेशातून मुंबईकडे टेम्पोतून नेण्यात येणारा १३ क्विंटल गांजा (अंदाजे किंमत एक कोटी ३५ लाख) पकडण्यात आला. पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने चांदवडजवळ मंगरूळ फाटा येथे कारवाई करून २ संशयितांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईतून राज्य स्तरावरील गांजाच्या भुरट्या व्यापाराची पोलखोल होण्याची शक्यता अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी वर्तवली. गांजाच्या भुरट्या व्यापाराची पाळेमुळे खणून काढण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर टेम्पोतून चांदवडमार्गे गांजाची पोती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगरूळ फाटा येथे टोल नाक्यासमोर सापळा रचला. या वेळी मुंबईकडे गांजा घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक (एमएच १५ डीके ९५५४)पोलिसांनी शिताफीने पकडला. टेम्पोची कसून तपासणी केली असता, टेम्पोत खास करण्यात आलेल्या कप्यामध्ये एक कोटी ३५ लाखाचा गांजा असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी चालक चक्रधर मोहनराव आणि त्याचा साथीदार शेख शाहवली शेख यास मुद्देमालासह अटक केली.

टमाटे कॅरेटचा बनाव

टेम्पोमध्ये टमाटे-डाळिंबचे कॅरेट ठेवून तसा बनाव करीत टेम्पोतील विशिष्ट कप्प्यातून गांजाची वाहतूक होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये रंगणार प्राणी-पक्ष्यांचा मेळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पेट टुगेदर' या सोहळ्यातून विविध प्रजातीतील प्राणी-पक्षी यांना एकत्रित बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार असून, त्यांची निगा राखण्याविषयीही येथे मार्गदर्शन केले जाणार आहे. द नाशिक कॅनाईन क्लब, महाराष्ट्र कॅट फेडरेशन व पेट प्रॅक्टिशनर असोसिशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या 'पेट टुगेदर'चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती द नाशिक कॅनाईन क्लबचे अध्यक्ष निखिल पंडित यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

वेगवेगळ्या प्रजातीतील प्राणी-पक्षी एकत्रित येतील, अशी वेळ फार दुर्मिळ असते. पण जर ते एकत्र आलेच तर हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरते. अशीच पर्वणी नाशिककरांना या सोहळ्यातून अनुभवण्यास मिळणार आहे. सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर्स डोम येथे या सोहळ्याचे रविवारी (दि. १३) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. कुत्रे, मांजर, घोडे, मासे, पक्षी यांच्या विविध जाती येथे बघण्यास मिळणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी अद्यापपर्यंत २६० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. प्राण्यांसदर्भात समाजात जागरुकता निर्माण करणे, त्यांच्याप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करुन देणे, औषधे, खाद्यपदार्थ यांची माहिती उपलब्ध करुन देणे, त्यांची वैद्यकीयदृष्ट्या काळजी घेणे आदींविषयी येथे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लहान मुलांमध्ये प्राण्यांविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी शहरातील बारा प्राथमिक शाळांना या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून एव्हीयन सोसायटी ऑफ इंडिया व पेट लव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. श्रीरंग दर्प, नितीन टेंबे, केतन जोशी हे या सोहळ्याचे परीक्षण करणार आहेत. विजेत्याला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ नाशिकचे डॉ. बी. आर. ठाकूर, नाशिक कॅनाईन क्लब शो कमिटीचे साकीब पठाण, अजिंक्य चोपडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाईलसाठीही द्या पैसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील विविध प्रकारच्या हॉस्पिटल्समधून मेडिक्लेमधारक पेशंटची आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. आवश्यक कागदपत्रे आणि फाईल देण्यासाठीही वेगळे पैसे घेतले जात असल्याचा प्रकार सध्या शहरात घडत असल्याने मेडिक्लेमधारक चिंचेत पडले आहेत. दरम्यान, या साऱ्या प्रकारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने वैद्यकीय व्यवसायात मनमानी कारभार सुरु आहे.

सध्याचा काळ हा अधिक धकाधकीचा असल्याने विविध प्रकारच्या आरोग्य समस्या भेडसावत आहेत. त्यामुळेच मेडिक्लेम सारखा पर्याय अत्यावश्यक बनला आहे. विविध कंपन्यांचा मेडिक्लेम घेऊन आरोग्य सुरक्षेचे कवच लाभल्याचा ग्राहकांचा आनंद प्रत्यक्षात कौटुंबिक सदस्य एखाद्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर नष्ट होत आहे. खासकरुन रिअम्बर्समेंट (दावा दाखल करणे) या पर्यायाचा अवलंब करणाऱ्या मेडिक्लेम धारकांना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. त्याच आर्थिक पिळवणुकीचा अधिक समावेश आहे.

हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करते वेळीच मेडिक्लेम धारकांकडून प्रोसेसिंग, रजिस्ट्रेशन आणि अॅडमिशन अशा नावाने किमान २०० ते ५०० रुपये उकळले जात आहेत. त्यानंतर डिस्चार्ज देतेवेळी बिलातच मेडिक्लेम चार्ज या नावाने १०० ते २०० रुपये आकारले जात आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता मेडिक्लेमसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी हे पैसे असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, संबंधित हॉस्पिटलच्या नावाची फाईलच मेडिक्लेमसाठी देणे आवश्यक आहे. मात्र, तुम्हीच फाईल घेऊन या, हॉस्पिटलचीच फाईल हवी असेल तर तुम्हाला त्याचे चार्जेस द्यावे लागतील, असे संबंधित हॉस्पिटलकडून सांगितले जात आहे. मात्र, साध्या फाईलद्वारे मेडिक्लेम नाकारला जाण्याच्या भीतीने मेडिक्लेमधारक हॉस्पिटल्सच्या फाईलसाठी अधिक पैसे अदा करीत आहेत. या साऱ्याच प्रकारांमुळे मेडिक्लेमधारक वेठीस धरले जात आहेत. मेडिक्लेमधारकांना विम्याचे संरक्षण असल्याचे समाधान तर दूरच पण, आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. (क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकाळी परिसरातील प्रकार; एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खडकाळी परिसरातील एका दर्ग्याजवळ बेकायदा विक्रीसाठी आलेली दोन लाखांची विदेशी सिगारेट भद्रकाली पोलिसांनी जप्त केली. दर्ग्याजवळील एका दुकानात विदेशी सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे पोहोचून गोदामाची पाहणी केली. तेथे विदेशी बनावटीच्या स्टेट एक्स्प्रेस, वेन्सन कंपनी, ब्लॅक, रुली व्हिलर, गुडम गरम आदी विदेशी बनावटीच्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सिगारेट आढळून आल्या. गोदामात असलेल्या मोहसीन खान पिरखान (वय २५, रा. नंदन अपार्टमेंट, विनयनगर) याला ताब्यात घेतले आहे. सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ जाहिरात प्रतिबंधक अधिनियमाच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत स्टेट एक्स्प्रेस ५५५ चे २२ हजार रूपये किमतीचे ११ बॉक्स, बेन्सन कंपनीचे आठ हजार रुपये किमतीचे ४ बॉक्स, ब्लॅक कंपनीचे १४ हजार रूपये किमतीचे ७ बॉक्स, उनहिल कंपनीचा एक हजार रुपये किमतीचा १ बॉक्स आणि गुडन गरमच एक लाख १० हजार रूपये किमतीचे ४४ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

खाणावळ उशिरापर्यंत चालवितो म्हणून कायदेशीर कारवाईची भिती घालून कारवाई टाळण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे ही कारवाई करण्यात आली.

पंढरीनाथ लक्ष्मण तुंगार असे त्या पोलिसाचे नाव आहे. सुरगाणा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील उंबरठाणे दूरक्षेत्र येथे तो नेमणुकीस आहे. तक्रारदाराची उंबरठाण येथे खाणावळ आहे. शनिवारी आठवडे बाजार असल्याने ते उशिरापर्यंत खाणावळ सुरू ठेवतात. या कारणावरून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल अशी भिती तुंगार याने तक्रारदाराला घातली.

कारवाई होऊ द्यायची नसेल तर दोन हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने एवढे पैसे देण्यात असमर्थता दर्शविली. अखेर तडजोडीअंती दीड हजार रुपये देण्याचे ठरले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास हे पैसे स्वीकारताना नाईक यास पकडण्यात आले. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपला लागले सत्तेचे डोहाळे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाण्याच्या आंदोलनात एकमेकांविरोधात उभे ठाकलेले शिवसेना व भाजप रस्ते आणि घंटागाडीच्या विषयांवरून परत एकत्र आले आहेत. घंटागाडीचा ठेका दहा वर्षाला देण्यास तीव्र विरोध करत नव्या सत्ताधाऱ्यांना घंटागाडीचा निर्णय घेवू द्या, असे आर्जव केले. पुढच्या निवडणूकीत जणू आपलीच सत्ता येईल अशा अविर्भावात शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. तर तुमचीच सत्ता येईल कशावरून असा टोला महापौरानी युतीला देत, मागणीची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

शहरातील रस्ते व घंटागाडी ठेक्यावरून महापालिकेत मनसे विरुद्ध शिवसेना-भाजप असा संघर्ष पहायला मिळाला. नाशिकचे पाणी पळविल्यावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडत, मनसेशी गट्टी जमवली होती. मात्र, रस्त्यांचे डांबरीकरण व घंटागाडीच्या विषयांवरून पुन्हा शिवसेनेने मनसेला कोंडीत पकडत भाजपशी गट्टी जमवली. पुढच्या निवडणुकीत महापालिकेत आपलीच सत्ता येईल, अशा आशयाची भाषणे युतीच्या सदस्यांनी केली.

घंटागाडीचा ठेका एकाच वर्षासाठी द्यावे असे आवाहन युतीच्या नेत्यांनी करत, पुढच्या सत्ताधाऱ्यांना निर्णय घेवू द्या, असे सांगितले. त्यामुळे सभागृहात हशा पिकला. पुढे तुमचीच सत्ता येईल कशावरून असा सवाल महापौरांनी करत, युतीच्या नेत्यांना गप्प केले. युतीच्या नेत्यांच्या भाषणात पुढील काळात जणू आपलीच सत्ता येणार असल्याचा अविर्भाव दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात भरणार टपाल तिक‌िटांचा महाकुंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक कागदपत्रांचे राजदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टपाल तिक‌‌िटांचा प्रवास उलगडून दाखविणारा महाकुंभमेळा नाशिकमध्ये भरविण्यात येणार आहे. टपाल विभागातर्फे १६ ते १८ जानेवारी या कालावधीत महापेक्स २०१६ फिलैटली या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, हे प्रदर्शन प्रत्येकाने अनुभवावे, असे आवाहन महाराष्ट्र सर्कलचे मुख्य चीफ पोस्ट मास्टर जनरल ए. के. दास यांनी केले आहे.

तब्बल १७ वर्षांनी अशा प्रकारचे संमेलन आयोजित करण्याचा मान नाशिकला मिळाला आहे. टपाल तिक‌िटे आणि त्या संबंध‌ित वस्तू संकल‌ित करण्याचा छंद अनेकजण जोपासतात. जगात टपाल तिक‌िटे संग्रही ठेवणारे १० करोड लोक आहेत. त्यापैकी ५० लाख लोक भारतात आहेत. देशाच्या भविष्याला दिशा देणाऱ्या महान व्यक्तींना टपाल तिक‌िटांवर चित्रित केले जाते. आपल्या पाल्यांची जिज्ञासा तीव्र करण्यासाठी, त्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी आणि त्यांचे मानसिक क्षितीज विस्तृत करण्यासाठी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन दास यांनी केले.

प्रदर्शनामध्ये तिकीट संग्राहकांवर (फिलैटेलीवर) आधारीत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याखेरीज प्रश्नोत्तरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापेक्स २०१६ स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. तिकीट संग्राहकांसाठी संग्रह करण्यायोग्य वस्तू आणि विषय त्यामध्ये असणार आहेत. हे प्रदर्शन युवावर्गालाही तिकीट संग्रहासाठी प्रोत्साहीत करेल असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. तिकीटांचे संग्राहक या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन आपल्या छंदांची माहिती नागरिकांपर्यंत विनामूल्य पोहोचवू शकणार आहेत.

दीडशेहून अधिक संग्राहक या प्रदर्शनामध्ये सहभागी होतील, असा विश्वास दास यांना व्यक्त केला. करन्सी नोट प्रेसलाही प्रदर्शनात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणे येथील पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर म्हणाले, हे केवळ प्रदर्शन नाही तर स्पर्धा आहे. संग्राहक आपल्या जवळील तिक‌िटे एका थीमनुसार मांडून नागरिकांचे लक्ष वेधू शकणार आहेत. एका छोट्याशा तिक‌िटावर अनेक प्रकारची माहिती असते. तिकीट बारकाईने पाहून त्याचा अर्थ कसा लावावा हे देखील या प्रदर्शनामध्ये समजून घेता येणार आहे. उपनगरमधील पोस्टल स्टोअरेज डेपो येथे हे प्रदर्शन होणार असून, सकाळी

दहा ते रात्री नऊ या वेळेत ते खुले राहणार आहे. सर्वांना मोफत प्रवेश असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात

आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिटी गार्डन’ची अवस्था दयनीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रमोद महाजन उद्यानाला पर्याय म्हणून बनविलेले शहरातील सर्वात मोठे उद्यान म्हणजे 'सिटी गार्डन' होय. मात्र, पालिकेच्या उदासीनतेमुळे 'सिटी गार्डन'ची अवस्था दयनीय झाली आहे.

उद्यानामध्ये गवत वाढले आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे ढीग देखील जमले आहेत. शहराच्या मोठ्या भागांमधून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सिटी गार्डनमध्ये येत असतात. सुरुवातीला उद्यानात बसविण्यात आलेली खेळणी पुरेशी होती. मात्र, कालांतराने उद्यानात येणाऱ्या मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली. सद्यस्थितीत मुलांच्या संख्येपेक्षा खेळण्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे उद्यानात नवीन खेळणी बसवावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी असलेली खेळणी मोठी माणसे खेळतांना दिसून येते. उद्यान मोफत असूनही त्यामधील काही खेळण्यांसाठी तिकीट आकारले जाते. उद्यानाच्या मोठ्या परिसरात एकच शौचालय असून, तेही बंद असते. उद्यानाच्या बाहेर असलेले शौचालय अतिशय अस्वच्छ आहे. त्यामुळे उद्यानात आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यानाच्या बाजूला असणाऱ्या नाल्याची

दुर्गंधी परिसरात पसरत असते. त्यामुळे खेळायला आलेल्या बालकांचे आणि आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

खेळण्यांची संख्या खूप कमी आहे. खेळण्यासाठी खूप वेळ वाट पहावी लागते.

- चिन्मय पाटील

स्वच्छतागृह नसल्याने आम्हा ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. बाहेरील शौचालय अस्वच्छ असते.

-रमेश कुलकर्णी

प्रेमीयुगुलांच्या चाळ्यांमुळे उद्यानात येण्यास संकोच वाटतो. पोलिसांनी आणि महापालिकेने याकडे लक्ष द्यायला हवे.

-महिला नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ परीक्षार्थींचा जीव टांगणीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक तलाठी, लिप‌ीक पदाची परीक्षा होऊन सव्वा महिना लोटला; मात्र अजूनही अंत‌िम निवड यादी प्रसिध्द होऊ शकलेली नाही. ही यादी केव्हा प्रसिध्द होणार याची उत्सुकता ताणली जात असून, त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

सिंहस्थामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रमुख पर्वणी संपताच ४ ऑक्टोबरला जिल्ह्यात ४० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. तलाठी, लिपीक आणि स्टाफ सिलेक्शन या तिन्ही परीक्षांसाठी एकूण २८ हजार ८९० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी २२ हजार ६३१ परीक्षेला सामोरे गेले तर ६ हजार २५९ उमेदवार गैरहजर होते. तलाठी पदासाठी सर्वाधिक १५ हजार ३६८ अर्ज आले होते. त्यापैकी ११ हजार ८२७ उमेदार परीक्षेला बसले तर ३ हजार ५४१ उमेदवार गैरहजर होते. लिपीक पदासाठीही ५ हजार ३१४ उमेदवारांपैकी केवळ २ हजार ७४५ उमेदवार परीक्षेला सामोरे गेले.

एक प्रश्न चुकीचा पडल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने त्याबाबतचा निर्णय घेण्यात प्रशासनाचा वेळ गेला. हा प्रश्न सोडविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला गुण देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर गुणांची यादी प्रदर्शित करण्यात आली. मात्र त्यातून अधिक गुण असलेले परीक्षार्थी निवडून त्यांची यादी प्रसिध्द करणे आवश्यक असताना अद्याप ती न झाल्याने परीक्षार्थींचा जीव टांगणीला लागला आहे. जिल्हा निवड समितीकडे परीक्षार्थी पाठपुरावा करीत असून, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड होतो आहे. लवकरच निकाल लागेल असे

सांगून बोळवण केली जात असल्याचा आरोप परीक्षार्थींकडून केला जाऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदामाई ही अमृतवाहिनी नदी

$
0
0

प्रा. डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

'गो' म्हणजे इंद्रिय आणि 'द' म्हणजे दमन अर्थात इंद्रियांवर संयम ठेवण्याची शिकवण गोदामाई आपल्याला देते. म्हणून गोदामाई ही ज्ञान आणि अमृतवाहिनी आहे, असे मत युवा संत प्रा. डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे महाराज यांनी व्यक्त केले.

पंचवटीतील अमृतधाम परिसरातील साईनगर रोडवरील वरद विनायक मंदिरासमोर संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी दिन स्मृती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. जीवनात मन हे महत्त्वाची भूमिका बजावत असून सर्व अध्यात्मक सिद्धी या मनावर अवलंबून आहे. संत संगतीमुळेच मनावर नियंत्रण मिळत असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्र एक प्रेरणादायी असून त्यात जीवनातील सर्वच गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. मन स्थिर होते तेव्हाच योगी आणि संतपद प्राप्त होते, असेही डॉ. गुट्टे यांनी सांगितले. साधू-संत हे नेहमीच समाजविकास आणि समाजाला अध्यात्मिक मार्गावर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शरीर, मन, हे देवाला अर्पण केल्यामुळे संतांची शक्ती मोठी आहे. भक्तांना परमेश्वरापर्यंत पोहोचविण्याचे हे संत करतात. परमेश्वरा मनुष्याचा भाव, श्रद्धा आणि विश्व हे गुण अधिक प्रिय असतात. त्यामुळे प्रत्येकाने देवाची मनापासून आराधना करावी. देवाची आराधना केल्याने आंतरिक समाधान प्राप्त होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदी येथील समाधी स्थानात मोठे चैतन्य असल्याचे डॉ. गुट्टे यांनी विविध दाखले देत विशद केले.

यावेळी पंचवटी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस शोभा सुरवसे, नगरसेवक रुची कुंभारकर, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, फौजी महाराज सूर्यवंशी यांच्यासह सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते. संजीव अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. श्याम पिंपरकर यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमससाठी सजली बाजारपेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळसण संपल्यानंतर व्यापारी आता सज्ज झालेले आहेत ते ख्रिसमससाठी. नागरिकांनी देखील ख्रिसमस खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे. हळूहळू लोकांचे पाय दुकानांकडे वळायला लागलेले आहेत. त्यामुळे दुकानदारांनी देखील जोरात तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी ख्रिसमस आला की आपल्याला बाजारात ख्रिसमसशी संबंधित नवनवीन आणि आकर्षक वस्तू बघायला मिळतात. त्यात डेकोरेशनचे साहित्य, बेल्स, ख्रिसमस ट्री या गोष्टी तर असतात. पण यावर्षी त्यात अजून भर पडलेली आहे. ज्यामुळे नागरिकही दुकानांत गर्दी करत आहेत.

ख्रिसमसचे मुख्य आकर्षण म्हणजे सॅँटाक्लोस. बाजारामध्ये सॅँटाक्लोसची विविध रूपं बघायला मिळत आहेत. त्यात झोक्यामध्ये मस्तपैकी लेटून सॅक्सोफोन वाजविणार आणि बटन दाबताच झोका घेणारा सॅँटाक्लोस आलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला एलईडी लाईट्स लावलेली आहेत आणि त्यामधून जिंगल बेलची धून देखील तो वाजवितो. याकडे बालगोपालांचे लक्ष वेधले जात आहे. त्यानंतर एका भल्या मोठ्या बेलवर बसून स्वच्छंदपणे गिटार वाजविणारा सॅँटाक्लोस सोनेरी रंगाचे कपडे परिधान केलेला आहे. ख्रिसमस ट्रीवर लटकविण्यात येणाऱ्या आकर्षक बेल्स सजविण्यात आलेल्या आहेत. बेलवर विविध नक्षी आणि वेगवेगळ्या रंगांचे मणी लावण्यात आलेले आहेत.

ख्रिसमससाठी बाजारात विविध आकाराच्या आणि रंगाच्या येशू ख्रिस्ताच्या मूर्ती आलेल्या आहेत. ज्यांची किमत २५० ते ७०० रुपयांदरम्यान आहे. हळूहळू या मूर्तींची मागणी वाढत असल्याचे दुकानदारांकडून समजले आहे. सोबतच भिंतीवर लटकविण्यासाठी येशूच्या फ्रेम आलेल्या आहेत. त्यानंतर ३ डी चित्रही आलेली आहेत. ज्यांची किंमत ४० ते १०० रुपयांदरम्यान आहे. ज्यामध्ये एका बाजूने बघितले असता येशू ख्रिस्ताचा आणि दुसरीकडून येशूचा लहानपणीचा फोटो दिसतो. तसेच क्रॉस आणि येशू, आई वडिलांसोबत असलेला बाल येशू, अशी बरीच चित्र बाजारात बघायला मिळत आहेत. त्यानंतर छोट्या छोट्या आकाराच्या क्रॉस बघायला मिळत आहेत.

यंदा आकर्षण नाविन्याचे

विविध तोरणे बाजारात आलेली आहेत. ज्यामध्ये सॅँटाच्या पायातील बुटांचा संच असलेली तोरणे, गिफ्ट्सचे बॉक्स गुंफून तयार केलेली तोरणे आहेत. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस पार्टीमध्ये डोक्यात घालण्यासाठी सॅँटाच्या डोक्यातील लाल टोप्या बाजारात आलेल्या आहेत. ज्या साऱ्यांचेच विशेष आकर्षण ठरत आहेत. दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ख्रिसमसपर्यंत या सर्व वस्तूंच्या मागण्यांमध्ये वाढ होणाची शक्यता आहे. याच कारणाने यंदा ख्रिसमसला बऱ्याच नवीन गोष्टी बघायला मिळणार असल्याचे देखील दुकानदारांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाला कांदा ‘रस्त्यावर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव
लासलगावसह पिंपळगाव बसंवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी लाल कांद्याच्या दरात जोरदार घसरण झाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याचे प्रमुख आगार असलेल्या लासलगाव-पिंपळगाव येथे उद्रेक दिसून आला. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लासलगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी विंचूर-प्रकाशा महामार्ग रोखून धरला. तर पिंपळगाव येथे कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी एक तास लिलाव प्रक्रिया बंद पाडली. लासलगाव येथे अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व तहसील विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव येथे धाव घेतली. निफाडचे विभागीय पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे, लासलगावचे एपीआय आर. बी. सानप, मंडल अधिकारी नगरकर आदींसह प्रशासकीय अधिकारी तातडीने लासलगाव येथे दाखल झाले. अखेर शेतकऱ्यांच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहचवू, असे आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे दीड तासानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात करण्यात आली. सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात होताच शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात सुमारे सहाशे रुपयांची घसरण होऊन बाजारभाव एक हजार रुपयांपर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघणार नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आंदोलन करत रास्तारोको पुकारले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयदत्त होळकर, शिवसनेचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील, विभागप्रमुख शिवा सुरासे, गोकुळ पाटील, संतोष पानगव्हाणे, वाल्मिक वानखेडे आदींनी कांदा भाव घसरण रोखण्यासंदर्भात प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला कायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

विद्यार्थ्यांच्या मनात असलेली पोलिसांची भीती दूर सारत त्यांना कायद्याची प्राथमिक माहिती आणि महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. कायदा कसा पाळावा व तो पाळत असतांना कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, पोलिसांना कशा प्रकारे सहाय्य करता येईल, यामध्ये पोलिसांना याविषयी मार्गदर्शन करतांना पोलिस उपनिरीक्षक जयश्री अनवणे यांनी येथील नूतन विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पोलिस परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने विद्यार्थ्यांना कायद्याची तोंडओळख व्हावी या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. नूतन विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख करून देत असतांना चोरी, दरोडा, एफआयआर, तपास, गस्त, जामिनावर सुटणे, महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी अशा घटनांबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना दिवसभर पोलिस ठाण्यात चालणाऱ्या व कायद्याचे पालन करतांना कराव्या लागणाऱ्या गोष्टींची माहिती देण्यात आली.

यावेळी त्यांच्या समवेत पोलिस नाईक नीलिमा निकम, मुख्याध्यापिका ल. चं. जोशी आदी उपस्थित होते. कृष्णा लोखंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर अ. तु. ढोकणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. एस. सांगळे आदींसह ‌शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी‌ विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातभट्टीवर कारवाईचा घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ९ लाख ४३ हजार रूपयांची सुमारे २७ हजार २६४ लिटर दारू व रसायने जप्त केली आहेत. हातभट्टी निर्मूलन मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत हातभट्टी निर्मूलन पंधरवडाचे आयोजन करण्यात आले होते. उत्पादन शुक्ल विभागाच्या आयुक्तांच्या आदेशान्वये हा उपक्रम राबविण्यात आला.

विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यांतर्गत विविध प्रकारचे २०१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये १०४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. याखेरीज कारवाई दरम्यान २ वाहने देखील जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भिवंडी येथे सहा महिन्यांपूर्वी विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव झाले होते. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर हातभट्टी निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये या मोहीमेंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये हातभट्टी दारूसह दारू बनविण्यासाठीचे रसायन, देशी दारू, विदेशी दारू, आणि ताडी व्यवसायावंरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सर्वाधिक कारवाया कळवण विभागातील सुरगाणा, पेठ या भागात करण्यात आल्या, तर सर्वांत कमी कारवाया मालेगाव विभागात झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. जी. आवळे, उपअधीक्षक कदम यांसह सर्व विभागातील निरीक्षकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.

या मोहिमेंतर्गत अधिकाधिक कारवाया करण्याचा प्रयत्न आमच्या विभागाने केला. त्यामध्ये १०० हून अधिक जणांना अटकही करण्यात आली. पंधरवडा संपला असला तरी यापुढेही कारवाया सुरूच राहणार आहे. नागरिकांना अशा बेकायदा दारू अड्डयांबाबत माहिती असल्यास त्यांनी निसंकोचपणे आमच्या विभागाला माहिती द्यावी. अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

आर. जी आवळे

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग


दारूचा प्रकार जप्त दारू (लिटरमध्ये)

गावठी दारू ११६२

रसायन २५१४१

देशी दारू ८१८

विदेशी दारू ४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाईच्या नावानं ‘चांगभलं’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत सुरत पॅटर्नच्या दोन पाऊल पुढे जात शिवसेना-भाजपचा विरोध डावलून गोंधळातच घंटागाडीचा ठेका तब्बल दहा वर्षासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. महासभेने दहा वर्षांसाठी तीनशे कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देत नाशिककरांवर स्वच्छता कराचा बोजा लादला आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून नाशिककरांना रहिवाशी मालमत्ता करात ६००, व्यावसायिक मालमत्तेसाठी ७०० तर औद्योगिक मालमत्तेसाठी १५०० रुपये प्रतीवर्ष मोजावे लागणार आहेत.

विशेष म्हणजे एकाच ठेकेदाराला आता हे काम दिले जाणार असून, स्वच्छतेचे युजर्स चार्जेस सरसकट वसूल होणार असल्याने नाशिकरांच्या खिशाची 'सफाई' होणार आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात सरकारकडे आणि न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

शहरातील घंटागाडी ठेका दहा वर्षासाठी देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या महासभेत ठेवण्यात आला होता. दहा वर्षासाठी ठेकेदाराला २९९ कोटी रुपये दिले जाणार असून, त्यात घंटागाडीचे कलेक्शन हे हायटेक पद्धतीने केले जाणार आहे.या प्रस्तावाला शिवसेना, भाजपाने विरोध करत, पूर्वीच्या ठेक्याचे काय झाले? असा सवाल केला. २ डिसेंबरच्या विषयात पूरक माहिती घुसळण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला. हा ठेका दहा नव्हे; तर एक वर्षासाठीच द्यावा, अशी मागणी सेना भाजपच्या सदस्यांनी केली. मात्र मनसेसह राष्ट्रवादीनेही या प्रस्तावाला समर्थन केले. उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनीही घंटागाडी वॉर्डवाईज एक वर्षासाठी द्यावा, अशी मागणी केली. बहुसंख्य सदस्यांनी ठेका विभागवाईज किंवा वॉर्डवाईज द्यावा, अशी मागणी केली. मात्र मनसेने हा प्रस्ताव मंजूर करण्याचा चंग बांधल्याने अखेरीस शिवसेना भाजपने मतदान घेण्याची मागणी पुढे केली. मात्र महापौरांनी गोंधळ सुरू होताच विषयाला मंजुरी दिली.

सुरत पॅटर्नच्या धर्तीवर हा प्रस्ताव देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे नाशिककरांना आता स्वच्छताकरासाठी युजर्स चार्ज द्यावे लागणार आहेत. त्यात रहिवाशी मालमत्तेसाठी ६००, व्यावसायिक मालमत्तेसाठी ७०० व औद्योगिक मालमत्तेसाठी १५०० रुपये प्रतिवर्ष आकारले जाणार आहेत. त्यामुळे आता नाशिकरांवर नव्या कराचा बोझा पडणार आहे. हा निर्णय सरसकट सगळ्यांनाच लागू होणार असल्याने या निर्णयाला आता तीव्र विरोध होणार असे दिसते.



'स्मार्ट'मधली वाढ परवडली असती !

महासभेने स्वच्छतेचे युजर्स चार्जेसला मंजुरी दिल्याने आता घरपट्टीत तब्बल प्रतिवर्ष ६००, ७०० रुपयांची वाढ होणार आहे. प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रस्तावात सुचविलेल्या करवाढीपेक्षा ही वाढ जास्त राहणार आहे. त्यामुळे स्मार्टमधील करवाढीला विरोध करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या कराला मात्र मूक संमती दिली आहे. स्मार्ट सिटीतल्या प्रस्तावात १३ टक्के वाढ मालमत्ता करात सुचवली होती. त्यामुळे सरासरी २०० ते २५० रुपयांच्या आत मालमत्ता कर वाढला असता, मात्र युजर्स चार्जेसमध्ये घसघशीत वाढ होणार आहे.

निर्णयाला होणार विरोध

दरम्यान, या निर्णयाला पक्षासह सर्वसामान्य नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. स्वच्छतेचे युजर्स चार्जेस हे इतर करांपेक्षा जास्त असून, तो कसा लागू होणार याबाबत अनिश्चितता आहे. झोपडपट्टीलाही तेवढाच कर आणि उच्चभ्रू नागरिकांनाच्या घरांनाही तेवढाच कर लागू झाल्यास त्याचे पडसाद तीव्र उमटणार असून, मनसेला त्याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. एका विश‌िष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून, सेनेने न्यायालयातच जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालक आरटीओच्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग मोहीम हाती घेणार आहे. अशा बेशिस्त रिक्षाचालकांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा इशाराही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ नुसार विविध परिवहन प्राधिकरणांनी उशिरा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सहमत शुल्काची कमाल मर्यादा १५ हजार रुपये केली आहे. ऑटोरिक्षा परवाना नूतनीकरणासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली. मात्र, तरीही रिक्षाचालकांकडून परवाने नूतनीकरणास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा कालमर्यादेमध्ये वाढ करण्याची नामुष्की प्रादेशिक परिवहन कार्यालयावर ओढावली आहे. १५ डिसेंबरपर्यंत परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जे परवानाधारक परवान्यांचे नुतनीकरण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी दिला आहे. आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या परवानाधारकांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाणार आहे. ज्या परवानाधारकांचे परवाने मुदतबाह्य झाले आहेत, अशा परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लकी ड्रॉमध्ये अपात्र ठरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंबेडकर, फुलेंचा वारसा पुढे नेण्याची गरज

$
0
0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिक महानगर माळी समाजाच्या वतीने अभिवादन सभेत कार्याचा गौरव करत आदरांजली वाहण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त द्वारका येथील माळी मंगल कार्यालयात अभिवादन सभा झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थोरात बोलत होते. डॉ. आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरवात झाली. अध्यक्षस्थानी श्रावण तांबे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील खोडे, बाजीराव तिडके, विजय राऊत, उत्तम बडदे, रावज माळी, श्रीराम माळी, संदीप शिंदे उपस्थित होते. मोहन माळी यांनी प्रस्ताविक करताना सांगितले, की डॉ. आंबेडकरांनी देशाला राज्यघटनेद्वारे समता, बंधूभाव, न्याय देत लोकशाही बळकट करण्याचे महान कार्य केले. 'विविधता मे एकता' ही देशाची ओळख आहे. ती टिकविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. 'शिका, संघटित व्हा' ही रडॉ. आंबेडकर यांची बाबासाहेबांची शिकवण आचरण्यात आणुन पुढे गेले पाहिजे. नितीन पाटील यांनी आभार मानले. अभिवादन सभेस अनिल नळे, गिरीश बच्छाव, अंबादास शेळके, दीपक मौले, अनिल माधव यांच्यासह माळी समाज संघर्ष समिती, माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस, तरी पैशांची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅशलेस सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यावरही मेडिक्लेमधारकांकडे पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. त्यामुळे मेडिक्लेमधारक हैराण झाले आहेत. यासंदर्भात तक्रार कुणाकडे असा प्रश्नही त्यांना पडला आहे.

मेडिक्लेम घेतल्यानंतर दोन प्रकारच्या सुविधा मिळतात. कॅशलेस आणि रिअम्बर्समेंट. पहिल्या प्रकारच्या सुविधेत कुठल्याही प्रकारचे पैसे अदा करावे लागत नाहीत. मेडिक्लेम कंपनीकडून संबंधित हॉस्पिटलला थेट पैसे दिले जातात. तर, रिअम्बर्समेंटमध्ये अॅडमिट केल्याचे कळविणे आवश्यक असते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर विश्चित वेळेत संबंधित रकमेचा दावा कंपनीकडे करावा लागतो. यातील पहिल्या प्रकारच्या सुविधेबाबतही मेडिक्लेमधारकांना अनेक कटू अनुभव येत आहेत. कॅशलेस सुविधा असतानाही पेशंट वा त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार घडत आहे. हाडाचे फ्रॅक्चर झाल्यामुळे अॅडमिट झालेल्या एका पेशंटकडून अशा प्रकारेच पैसे घेण्याचा प्रकार घडला. एकूण ८ हजार रुपये बिल झाले असून, मेडिक्लेम कंपनीने ५ हजार रुपयेच अदा केले आहेत. त्यामुळे ३ हजार रुपये तुम्हास द्यावे लागतील, असे हॉस्पिटलने बजावले. मात्र, कॅशलेस सुविधा घेत आहोत आणि अतिरिक्त सेवांची मागणी केली नसल्याने पैसे कसे द्यायचे, असा सवाल संबंधित मेडिक्लेमधारकाने केला. अखेर हॉस्पिटलने पैसे घेतलेच. त्यानंतर याप्रकरणी ग्राहक मंचात जाण्याचा इशारा आणि सेल्फ नोटिशीचा पर्याय मेडिक्लेमधारकाने स्वीकारला. परिणामी, संबंधित मेडिक्लेम कंपनी आणि हॉस्पिटल या दोघांकडूनही मेडिक्लेमधारकाकडे आर्जव सुरु झाली. अखेर संबंधित हॉस्पिटलला मेडिक्लेमधारकाला बिनशर्त पैसे परत द्यावे लागले आहेत.
पाच टक्के डिपॉझिट

काही बड्या हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधेचा लाभ घेणाऱ्यांना बिलाच्या पाच टक्के रक्कम आगाऊ भरण्यास सांगितले जाते. काही हॉस्पिटल्समध्ये तर दहा टक्क्यांपर्यंतही रक्कम आगाऊ घेतली जाते. पॉलिसी कंपनीकडून संबंधित हॉस्पिटलला बिलाची रक्कम मिळाल्यानंतर डिपॉझिट रक्कम परत करू, असे रुग्णाला सांगितले जाते. मात्र, हे पैसे मिळवताना नाकीनऊ येत असल्याचे अनुभव अनेकांनी कथन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातसाठी २१ टीएमसी पाणी

$
0
0

नार-पार लिंकद्वारे हालचाली; राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील पाण्याचा एक थेंबही अन्य राज्यांना न देण्याचे मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्री सांगत असले तरी प्रत्यक्षात तब्बल २१ टीएमसी पाणी गुजरातला जाणार आहे. तसा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी आला असून यावर तातडीने निर्णय घेण्याचेही केंद्र सरकारने बजावले आहे. त्यामुळे पाण्याचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा लिंक प्रस्तावांचा सामंजस्य करार गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये झाला आहे. दमणगंगा आणि नार-पार खोऱ्यात तब्बल ५० टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे चितळे समितीनेच स्पष्ट केले आहे. तरीही या खोऱ्यात केवळ २९ टीएमसी पाणी असल्याचे सरकारने निश्चित केले आहे. या करारानुसारच ११ टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळावे आणि १८ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात राष्ट्रीय जलविकास अभिकरणने (NWDA) पार-तापी-नर्मदा लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठविला आहे. हा अहवाल आता नाशिक येथे सीडीओ मेरीकडे तपासणीसाठी आला आहे. त्यात नार-पार खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी गुजरातकडे कच्छ-सौराष्ट्राला देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे २९ पैकी केवळ ८ टीएमसीच पाणी महाराष्ट्राला मिळणार असून याद्वारे राज्यावर अन्याय होणार आहे. तसेच, गिरणा खोऱ्यातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. त्यात डीपी लिंक व पीटीएन लिंक यांना त्वरित मान्यता देण्याबाबत चर्चा झाली आहे. या दोन्ही प्रकल्पांना महाराष्ट्र सरकारमार्फत संमती दिल्यास राज्याचा पाण्यावरील हक्क कायमस्वरूपी जाणार आहे. त्यामुळे गिरणा-गोदावरी खोऱ्यात पाणी वळवता येणार नाही. जायकवाडीच्या पाण्यावरून सध्या नाशिक-नगर-मराठवाड्याचा प्रादेशिक वाद सुरू आहे.

तर गिरणा गोदावरीचे भवितव्य अंधारात

गिरणा धरणाच्या पाण्यावरून कसमा व जळगाव जिल्ह्यात वाद चालू आहे. त्यासाठी दमणगंगा-नार-पारचे पाणी आणणे आवश्यक आहे. मात्र या पाण्यवरचा महाराष्ट्राचा हक्क गेल्यास गिरणा-गोदावरीचे भवितव्य अंधारात जाईल, असा इशारा राजेंद्र जाधव यांनी दिला आहे. या कराराकडे गांभिर्याने पाहून आपल्या राज्यातले पाणी गुजरातला न देण्याचा निर्णय घेण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता चार्जेसवरून मनसेचा यू-टर्न?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील घंटागाडी ठेका १० वर्षांसाठी देण्यासोबत शहरवासियांवर युजर्स चार्जेस लावण्यावरून टीकेचे धनी बनलेल्या सत्ताधारी मनसेने मंगळवारी विरोधकांसह सत्ताधारी पक्षांच्या रेट्यापुढे नमते घेतले आहे. प्रस्तावातील युजर्स चार्जेस संदर्भात सदस्यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव केला जाईल असे सांगत, स्मार्ट सिटीत करवाढ होवू दिली नाही तर यात कशी करू अशी स्पष्टोक्ती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली आहे.

सोमवारच्या महासभेत शहरातील घंटागाडीचा ठेका १० वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोबतच सूरतच्या धर्तीवर रहिवाशी मालमत्तेसाठी ६००, व्यावसायिक मालमत्तेसाठी ७०० तर औद्योगिक मालमत्तेसाठी १५०० रुपयांचे युजर्स चार्जेस लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सभागृहातील सदस्यांनी या युजर्स चार्जेसला तीव्र विरोध केला. या निर्णयाचे मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष गटानेही या निर्णयाला विरोध केला आहे. शिवसेना भाजपने या युजर्स चार्जेसला तीव्र विरोध करत न्यायालयात जाण्याची तयारी केली होती. सर्वसामान्यांनीही या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे अखेरीस सत्ताधाऱ्यांनी दुपारनंतर हे युजर्स चार्जेस मागे घेण्यावर मंथन सुरू केले.

पत्रकारांशी बोलतांना महापौर मुर्तडक यांनी या ठरावा संदर्भात सभागृहात सदस्यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव केला जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रस्तावात आम्ही करवाढ केली नाही. मग घंटागाडी प्रस्तावात कशी करणार?असे स्पष्टीकरण दिले आहे. पंरतु, उद्या तुम्हाला ठराव मिळेल असू सांगत त्यांनी संभ्रमावस्था मात्र कायम ठेवली आहे. ठरावानंतरच युजर्स चार्जेस संदर्भातील संदिग्धता दूर होणार आहे. विरोध वाढल्याने मनसेन मंथन करत आता हे चार्जेस रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे.

मनसेचा खरा चेहरा उघड

मनसेने सत्तेवर येताच ठेकेदारीला विरोध केला होता. मात्र, सत्तेवर येताच ठेकेदाराची श्रृखंलाच सुरू केली आहे. कालचा प्रकार हा कळस असून मनसेचा खरा चेहरा समोर आल्याची टीका शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. सर्व नगरसेवकांनी १० वर्षाला विरोध केला होता. तरीही ठेका देण्यात आला होता. सूरतचा दौरा हा ठेका डोळ्यासमोर ठेवूनच आखला होता हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सूरतमध्ये पाच वर्षाचा ठेका आहे. कालचा ठराव हा बेकायदेशीर असून आम्ही त्याविरोधात न्यायालयात जाणार आहे. आम्ही या ठरावावरील ध्वनीफित मागवली असून सत्य जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाबी थंडीचे नाशकात आगमन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये मागील दोन दिवसांपासून या हंगामातील गुलाबी थंडीची प्रचिती येत आहे. राज्यात मंगळवारी १०. ६ अंश इतके सर्वाधिक निचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. राज्यातील सरासरी तपमान १२ अंश सेल्सियस होते.

शहर व परिसरात सकाळी व सायंकाळी बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वाढत्या थंडीबरोबरच नागरिक ऊबदार कपडेही कपाटातून बाहेर काढू लागले आहे. स्वेटर, मफलरसह ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारातही गर्दी होत आहे. थंडीचा हंगाम आरोग्यासाठी चांगला असल्याने सर्वच जॉगिंग ट्रॅकवरही गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या वेळी रस्त्यांवरही अनेक जण फेरफटका मारताना दिसत आहेत.

दक्षिण भारतात होत असलेल्या पावसामुळेही वातावरणात बदल होत आहेत. येत्या काही दिवसांत नाशिकमध्येही तुरळक पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ९ डिसेंबरला हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून, १० तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ११ तारखेला अंशतः वातावरण ढगाळ राहील. ११ तारखेला थंडीचे प्रमाण आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images