Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निर्यातमूल्य कमी करा; नाहीतर हमीभाव द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लाल कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. येत्या काळातही कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे कांदा उत्पादक संतप्त झाले असून, जिल्हाभरात आंदोलने केली जात आहेत. कांद्याचे भाव स्थिर करण्यासाठी निर्यातमूल्य कमी करावे नाहीतर हमीभाव द्यावा. कांद्याचे दर असेच कमी होत रा‌हिले तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असे मत नाफेडचे संचालक व लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दोन ते तीन महिन्यापूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जाणारा कांदा आज हजार-बाराशे रुपयांनी विकला जात आहे. कांद्यावर लावलेली ७०० डॉलरची एमईपी कमी करून निर्यातीला चालना दिल्यास कांद्याचे भाव स्थिर होऊ शकतात. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होत असल्याने त्याचा भावावर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत लवचिक धोरण ठेवावे. पाकिस्तानचे कांद्यावर शुन्य डॉलर निर्यातमूल्य आहे, तर चीन सरकारने २०० डॉलर निर्यातमूल्य आकारल आहे. त्यांच्या तुलनेत भारताचे निर्यातमूल्य सर्वाधिक आहे. यामुळे जवळपास निर्यात बंद झाली असून, त्याचा दरावर परिणाम होत आहे, असे नानासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात कांद्याला २६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. आता आवक वाढल्याने सरासरी बाराशे रुपयांपर्यंत दर खाली आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघत नाही. आवक प्रचंड असल्याने दर आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. लाल कांदा टिकावू नसल्याने विकणे अपरिहार्य आहे. दरात अशीच घसरण सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

जानेवारी २०१५ मध्ये देशात सुमारे १७ लाख मेट्रीक टन कांदा आवक झाली. भारताला १० लाख ७५ हजार ३७६ मेट्रीक टन कांदा लागतो. या आकडेवारीनुसार सहा लाख मेट्रीक टन कांद्याचे उत्पादक जास्त झाले. याचा परिणाम भाववाढीवर होता. यामुळे सरकारने निर्यात धोरण लवचिक ठेवणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूत टाकूनही कांद्याचे एमएसपी निश्चित करण्यात आलेली नाही, असे नानासाहेब पाटील यांनी नमूद केले. उन्हाळ कांद्याचे दर सहा हजारापर्यंत गेल्यावर सरकारने आॅगस्ट महिन्यात कांद्याचे निर्यातमूल्या सातशे डॉलरपर्यंत केले. यामुळे जवळपास निर्यात बंदच झाली आहे. याचा कांदा दरावर परिणाम होत आहे. सरकारने ग्राहकहीत जरून जपावे, मात्र कांदा उत्पादकांनाही न्याय दिला पाहिजे, असे मत नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

दोन ते चार पाण्यांवर हे पीक शेतकरी घेतात. पाण्याच्या कमतरेतेमुळे तसेच नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना कांद्याशिवाय पर्याय नाही. यामुळे सरकारने कांदा उत्पादकांची व्यथा समजून घेणे गरजेचे आहे.

अवकाळीची भीती

अवकाळी पावसाची भीती असल्याने उन्हाळ कांद्याचे पीक हाती येणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. गेल्या वर्षी चौदा हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. यामुळे भाववाढ झाली होती. यंदाही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची भीती वाटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जुलूस-ए-आला’मध्ये दहशतवाद्यांचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

इस्लाम धर्म हा समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी असून इस्लाम मानवतेचा धर्म असून शांततेने जगा व जगू द्या अशी शिकवण इस्लाम देतो. इस्लाममध्ये भेदभावाला वाव नसून जिहादचा चुकीचा अर्थ लावून दहशतवादी निरपराधांची हत्या घडवित दहशतवाद पसरवित असल्याने हे अमानवीय कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. सुफी संतांची विचारसरणी व मसलके आला हजरतवर आचरण दहशतवाद्दांचा नायनाट करू शकेल, असे प्रतिपादन सुन्नी मुस्लिम धर्मगुरूंनी केले.

सुन्नी मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असलेले आला हजरत इमाम अहेमद रझा खान साहब यांच्या उरुस निमित्ताने मंगळवारी जुलूस-ए-आला हजरतचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुस्लिम धर्मगुरू दहशवाद्यांचा निषेध नोंदविताना बोलत होते. दरम्यान, मंगळवारी अजमत-ए-मुस्तफा सय्यदी आला हजरत पे लाखों सलाम, मसलके आला हजरत झिंदाबाद, इसिस दहशतवाद मुर्दाबादच्या घोषणा सकाळी साडे दहा वाजता हा जुलूस निघाला. नाशिकचे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुने नाशिक येथील जहाँगीर मशिद चौकातून जुलूस-ए-आला हजरतला प्रारंभ झाला. हजारो मुस्लिम बांधव इस्लामी टोपी डोक्यावर घालत व हातात इसिस दहशतवादाचा निषेध फलक घेत जुलूसमध्ये सहभागी झाले होते. जुने नाशिकमधील पारंपरिक मार्गाने जुलूस फिरल्यानंतर बडी दरगाह शरीफ येथे विसर्जित झाला. येथे मुफ्ती सय्यद रिझवान साहब व मुफ्ती मुश्ताक आलम अमजदी यांचे धार्मिक प्रवचन झाले. आला हजरत इमाम अहेमद रझा यांच्या धार्मिक कार्याविषयी माहिती विशद करत मसलके आला हजरत मार्गावर आचरण करण्याचे आवाहन करीत निषेध नोंदविला.

उर्स-ए-आला हजरतनिमित्त जुने नाशिक येथील शाही मशिदीत दुपारी 'कुल शरीफ'चा विर्द आणि फातेहाख्वानीचे धार्मिक कार्यक्रम झाले. लंगर शरीफ व अन्नदान कार्यक्रमानंतर पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांच्यावर दरूद व सलाम अर्पण करून धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक देवस्थानने नेमली अभ्यास समिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्‍वर

त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश बंदी आहे. यामुळे महिलांनाही गाभाऱ्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी काही महिलांनी अर्जाव्दारे देवसथान संस्थानच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्यांच्या मागणीनुसार मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी महिलांना प्रवेश द्यावा की, नाही याबाबत देवस्थान संस्थान ट्रस्टने चार सदस्यांची अभ्यास समिती नेमली आहे. ही समिती सर्व अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे. यानंतर विश्वस्त मंडळ निर्णय घेणार आहे.

काही दिवसांपूर्वी येथील महिला भाविक सुजाता पाटील आणि पूनम पाटील यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शिवगाभाऱ्यात शिवलिंगाच्या पाठीमागे आदिमाया पार्वतीची मूर्ती आहे. मग, येथे महिलांना प्रवेश का नाही? तसेच अशी परंपरा निर्माण होण्याचे नेमके कारण काय व असे नियोजन कधीपासून असे प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत देवस्थान संस्थानच्या अध्यक्षा न्या. जोशी-फलके यांना अर्ज करण्यात आला होता.

महिलांनी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थान यांनी पत्र प्रसिध्दीस दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेल्या या पत्रानुसार देवस्थान चेअरमन यांनी चार सदस्यांची अभ्यास समिती नियुक्त केली आहे. या समितीने प्राचीन रूढी, परंपरा, पुराण, शास्त्रातील उल्लेख व त्याचबरोबर वैज्ञानिक कारण अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून अहवाल सादर करावयाचा आहे. हा अहवाल विश्वस्त मंडळासमोर सादर झाल्यानंतर त्यावर विश्वस्त मंडळ अंतिम ध्येय धोरण निश्चित करून हा प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या जमीन वाटपास सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील जॉईंट फार्मिंग सोसायटीने सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जमीन वाटप व ताबा देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ताबा मिळालेल्या शेतकऱ्यांनी पूजन करून जमिनीची मशागत करण्यास सुरुवातही केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून पडित असलेल्या सातश एकर जमिनीवर लवकरच हिरवेगार नंदनवर फुललेले दिसणार आहे.

जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या जमिनीच्या ताबा मिळालेल्या क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा प्रत्येक सभासदाच्या नावाने तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. जमिनीचा ताबा देण्यास सुरुवात झाल्याने विश्वासराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. जॉईंट फार्मिंग सोसायटीकडे आठशे एकर शेत जमीन होती. अनेक वर्षांपासून ही जमीन पडित पडलेली होती. यातील शंभर एकर जमीन बाजार समितीला विकण्यात आली. मात्र, गत दहा वर्षांपासून जमिनीचे वाटप व्हावे, या मागणीसाठी विश्वासराव मोरे यांनी शेतकऱ्यांसह संघर्ष सुरू केला होता. संस्थेचे अध्यक्ष सुरेश खोडे यांनी सहकार विभागाकउे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. प्रारंभी जमीन मागणीचे अर्ज असलेल्या ५८ सभासदांना जमिनीचा ताबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे संस्थेने जमीन वाटप करताना नऊ मीटर व सहा मीटरचे रस्ते ठेवून जमिनीचे वाटप केल्यामुळे सर्व सभासदांना मोठा रस्ता मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोविरोधात उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी तालुक्यातील आवळखेड येथे कचरा डेपो उभारण्याचा घाट घातला जात असून, त्या विरोधात ग्रामस्थांनी आता लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले आहे. इगतपुरी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर गुरुवारी (दि. १० डिसेंबर) रोजी हे उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

आवळखेड हे दीड हजार लोकसंख्या असलेले आदिवासी गाव आहे. लगतच जामवाडी, जांभुळवाडी, काराची वाडी, रेरेवाडी, वाऱ्याची वाडी, फणसवाडी, चांदवाडी, बांगरवाडी, गवळदेववाडी असे पाडे आहेत. या गावाच्या परिसरात कचरा डेपो उभारण्याचा घाट घातला जात असून, गेली पाच वर्ष येथील ग्रामस्थ त्या विरोधात संघर्ष करीत आहेत. जेथे हा डेपो उभारण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहे, तेथे गावकऱ्यांना पाणी पुरविणाऱ्या दोन सामुदायिक विहिरी आहेत. विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या जागेतून दारणा नदीची झोयटी ही उपनदी वाहते. झोयटीचे हे पाणी वैतरणा धरणापर्यंत आणि तेथून पुढे मुंबईपर्यंत जाते.

नगरपालिके चा हा कचरा डेपो येथे उभारला गेल्यास जिवंतपणीच नरकयातना सोसाव्या लागण्याची भीती आवळखेड आणि परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त होऊ लागली आहे. या प्रकल्पामुळे नदीचा उगमस्थानीच गळा घोटला जाणार असल्याचा दावाही ग्रामस्थांकडून केला जातो आहे. गेल्या पाच वर्षांत स्थानिक प्रशासनापासून मुख्यमंत्री, राज्यपालांपर्यंत सर्वांना निवेदने देण्यात आली. जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. १० डिसेंबर) रोजी इगतपुरी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळाले नाही तर लाक्षणिक उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात करण्यात येईल, असा इशारा सरपंच मांगीबाई शिंदे, भागूबाई पवार यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा, अधिकाऱ्यांवर कारवाई!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील हरणबारी व केळझर प्रकल्प चारी क्रमांक आठ, हरणबारी डावा कालवा तसेच तळवाडे भामेर पोहच कालवा या प्रलंबित कामांसंदर्भात भूसंपादन होऊन यंत्रणेला ताबा मिळवूनही उर्ध्व गोदावरी लघु पाटबंधारे सर्वेक्षण उपविभाग कामास प्रारंभ करीत नाही. यामुळे यंत्रणेला जबाबदार धरून येत्या आठ दिवसाच्या आत या कामांना पोलिस संरक्षणात प्रारंभ करावा,अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिला आहे.

तालुक्यातील हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा, केळझर चारीचे काम प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत नाशिक येथे बैठक घेतली. या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत गर्भित

इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहाय्यक भूसंपादन अधिकारी रमेश काळे, उपविभागीय अधिकारी संजय बागडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शेषराव पाटील आदी उपस्थित होते.

तळवाडे भामेर पोहच कालवा कि.मी. ६ ते १० मध्ये ताहाराबाद- दरेगाव शिवारात भूसपांदनानंतरही काही शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला घेऊनही कामास विरोध करीत आहेत. सन २००९ मध्ये ८५ लाख रुपयांचे वाटपही करण्यात आले आहे. तर, १६ ते २० कि. मी. दरम्यान नांदीन शिवारातील शेतकऱ्यांना २०१० मध्ये ३६ लाख रुपये मोबदला िला. तर, २१ ते २७ कि. मी. चे मोबदला वाटप सुरू आहे. केळझर चारी क्रमांक आठच्या कामास डोंगरेज शिवारात ४८ लाख रुपयांचे वाटप करूनही काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

यंत्रणेने कालवा मार्गात बदल करून नवीन गट अंतभूर्त केल्याने जिल्हाधिकारी नाशिक यांनी तीव्रशब्दात नापसंती व्यक्त केली. निवाडा झाल्यानंतर संयुक्त मोजणीमध्ये दर्शविलेल्या गटाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामात इतर गटाचा अंर्तभाव प्रकल्पात करता येत नाही. यामुळे सदर कामामध्ये कोणतीही प्रगती नसल्याचे जिल्हाधिकारी कुशवाह यांनी निर्देशनास आणले.

उपरोक्त कामांचे भूसंपादन होऊनही कामास गती नाही, यास सर्वस्वी उर्ध्व गोदावरी यंत्रणेचा नकारात्मक दृष्टीकोन असून, ठेकेदारांना पाठिशी घालण्यात येत असल्याची नाराजीचा सूर खासदार डॉ. भामरे यांनी आळवला. यामुळे याकामास येत्या आठ दिवसाच्या आत पोलिस संरक्षणात प्रारंभ करून सहा महिन्याच्या आत कामे मार्गी लावण्याची अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. हा प्रश्न लवकर मार्गी लागल्यास पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार आहे. यामुळे या कामाकडे सर्व तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णबधिरांसाठी उद्या तारांगणाचा खास शो

$
0
0

नाशिक : शहरातील माई लेले शाळेच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. १०) यशवंतराव चव्हाण तारांगणाच खास शोचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या इन्फोव्हीजन टेक्नटॉलॉजिसचे अभिजीत शेटे यांनी या शोचे आयोजन केले आहे. यात कर्णबधीरासाठी विशेष गाईड असणार आहे. कर्णबधीरासांठी अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील कर्णबधीर विद्यार्थी व नागरिकांसाठीही विशेष शो होणार आहे.

आज रंगणार सृजनोत्सव

नाशिक : नाशिक येथील ख्यातनाम भरतनाट्यम क्षेत्रातील सहा वर्ष कार्यरत असलेले सृजन नृत्य विद्यालय तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सृजनोत्सव २०१५ हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा बुधवारी (दि. ९) कार्यक्रम होणार आहे. कालिदास कलामंदिरात सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम होणार आहे. नृत्य विद्यालयाच्या ५० विद्यार्थिनी या दक्षिणात्य नृत्य शैलीमध्ये आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. तसेच भरतनाट्यम क्षेत्रातील पुण्यातील प्रसिध्द नृत्यांगना केतकी शेणोलिकर, सायली रार्इ तसेच नाशिकच्या सुप्रसिध्द शिल्पा देशमुख यांचा 'कृष्णानुबंध' हा नृत्याविष्कार नाशिककरांना पर्वणीच असेल. या कार्यक्रमाला सुप्रसिध्द नृत्यांगना संजिवनी कुलकर्णी व निर्मल अष्टपुत्रे यांची उपस्थिती असेल. कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी परिषदेतर्फे धरणे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी संघर्ष परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आदिवासी आयुक्तालयावर धरणे आंदोलन मंगळवारी करण्यात आले. आदिवासी विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे आदिवासींचे नुकसान झाले आहे. नाशिकच्या अप्पर आयुक्तालयात भ्रष्टाचार बोकाळला असून दोषींवर कारवाईची करण्याची मागणी संघटनेच्या वतीने धरणे धरण्यात आली.

आदिवासी आयुक्तालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या त्वरित बदल्या करा, वसतीगृहासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, आश्रमशाळांमधील गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करा, आश्रमशाळांमध्ये होणाऱ्या निकृष्ठ आहार पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

नाशिकचे अप्पर अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देत असून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कैद्यांच्या उपोषण हत्याराने प्रशासन घायाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी निकृष्ट जेवण, संचित रजा आदी प्रश्नी उपोषणाचे हत्यार उपसल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे हजार कैद्यांनी उपोषण सुरू केल्याचे समजते. कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही.

कारागृहात सजा झालेले आणि सजा न झालेले कैदी आहेत. सजा भोगत असलेल्या हजार पेक्षा अधिक कैद्यांनी मंगळवारी अचानक उपोषण सुरू केले. रोजच्या जेवणाचा व नाश्त्याचा दर्जा खालावल्याची कैद्यांची जुनी तक्रार आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याने कैद्यांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले. कैद्यांना संचित रजेवर बाहेर जाण्याचा हक्क आहे. मात्र, त्यातही प्रशासनाकडून अडथळे आणले जातात असा त्यांचा आरोप आहे. तसेच काही ठराविक कैद्यांना राजरोसपणे हव्या त्या वस्तू आत पुरविल्या जातात. आम्हाला मात्र, ज्या गरजेच्या आणि नियमात बसणाऱ्या वस्तू आहेत त्या देखील मिळू दिल्या जात नाही. कॅन्टीनच्या वस्तूंचा दर्जाही निकृष्ट आहे, असाही कैद्यांचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी एका कैद्याने पॅरोलवर बाहेर आल्यावर कारागृहात वैद्यकीय सुविधांही व्यवस्थित मिळत नसल्याची जाहीर वाच्यता केली. अनेक कैद्यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. या सर्व जाचाला कंटाळूनच कैद्यांनी उपोषण सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातवासाठी आजोबांचे प्लॉटवर अतिक्रमण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

जावई आणि सासऱ्याच्या वादातून रिकाम्या प्लॉटवरील अतिक्रमण, महापालिकेकडे तक्रार, सासऱ्यांकडून स्वत:हून अतिक्रमण हटविणे आणि नातवाच्या भविष्यासाठी पुन्हा अतिक्रमण करण्याचा इशारा, अशा नाट्यमय घडामोडी सातपूर परिसरात मंगळवारी घडल्या. अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या पथकाने लवाजम्यासह घटनास्थळी जाणे आणि रिकाम्या हाती परतणे अशीही गम्मत यावेळी घडली.

महापालिकेच्या सातपूर विभागाने गणेशनगर भागात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. यात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नोटीस बजावल्यानंतर संबंधित व्यक्तीने अतिक्रमण काढून घेतले. मात्र, यात नातवासाठी आजोबांनी मुलीच्या प्लॉटवर अतिक्रमण केले. रामदास शेवाळे असे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते निवृत्त प्राध्यापक आहेत. मात्र, जावयाने संबंधित सात गुंठे प्लॉट विकू नये. त्या प्लॉटचा भविष्यात नातवाला लाभ व्हावा या उद्देशाने आपण अतिक्रमण केल्याचे प्रा. शेवाळे यांनी 'मटा'ला सांगितले.

सातपूर, गणेशनगर भागात प्लॉटवर प्रा. शेवाळे यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार त्यांचेच जावयाने महापालिका प्रशासनाकडे केली होती. यानंतर महापालिकेने शेवाळे यांना तत्काळ नोटीस बजावत अतिक्रमण हटविण्यास सांगितले. प्रा. शेवाळे यांनी देखील महापालिकेच्या नोटिशीचा आदर राखत स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. दरम्यान, मंगळवारी महापालिकेचा ताफा फौजफाट्यासह गणेशनगर भागात दाखल झाले. मात्र, 'नेमके अतिक्रमण आहे तरी कुठे?', असा प्रश्न महापालिका कर्मचाऱ्यांना पडला. परंतु, अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिलेल्या नोटिसीनंतर आपण शेडचे अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्याचे प्रा. शेवाळे यांनी सांगितले. प्रा. शेवाळे याच्या कन्येचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. या मुलीच्या मुलासाठी म्हणजेच नातवासाठी संबंधित प्लॉटवर पुन्हा अतिक्रमण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमण मोहीम कागदावरच का?

महापालिकेने सातपूर विभागात अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. मात्र, ती फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी अशोकनगर भागात एका पार्किंग शेडचे अतिक्रमण काढतांना वादही झाला होता. परंतु, रस्त्यावर सरसरकटपणे दिसणाऱ्या अतिक्रमण महापालिका अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा प्रश्न सातपूरकरांनी उपस्थित केला आहे. त्यात अतिक्रमण मोहीम येणार म्हणून रस्त्यावर बाजार मांडणाऱ्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच व्यवसाय बंद ठेवण्याबाबत सांगितल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक देवाणघेवाण असल्याने अतिक्रमणाला वाव मिळत असल्याची खंत प्रामाणिकपणे कर भरणारे व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

मुलीच्या मुलासाठी मी स्वतःहून गणेशनगरच्या प्लॉटवर अतिक्रमण केले होते. महापालिकेची नोटीस मिळाल्यानंतर मी स्वतःहून अतिक्रमण काढले. परंतु, त्याच नातवाच्या भविष्यासाठी मी पुन्हा प्लॉटवर शेड उभारणार आहे.

- प्रा. रामदास शेवाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील अन्य महापालिकांनी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) ला समर्थन केले असून, केवळ नाशिकनेच एसपीव्हीला थेट विरोध केला आहे. एसपीव्ही ही स्मार्ट सिटी प्रस्तावातील मुख्य अट असून, तीच फेटाळल्याने नाशिकचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राला जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी संदर्भातील नाशिककरांचे स्वप्न हे भंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकमध्येच एसपीव्हीला विरोध का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

स्मार्ट सिटी प्रस्तावाला महासभेने हिरवा कंदील दाखवला असला तरी, त्यातील एसपीव्हीला मात्र विरोध केला आहे. स्मार्ट सिटी प्रस्तावात एसपीव्ही स्थापन्याची अट बंधनकारक आहे. केंद्र सरकारने स्मार्टचे नियंत्रण व अंमलबजावणीसाठी एसपीव्हीची निर्मीती केली आहे. मात्र, हा स्वायत्तेवर घाला असल्याचे सांगून पालिकेने त्याला विरोध केला. सोलापूर, औंरगाबाद, अमरावती,कोल्हापूर या महापालिकांनी तर एसपीव्ही संदर्भातील अधिकार आयुक्तांना दिला आहे. तसेच, पुण्याचाही प्रस्ताव मंजूर होणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, केवळ नाशिकमध्येच त्याला विरोध करण्यात आला आहे. यावरून शहरातील तक्ष व विकासकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचे गु-हाळ सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीसाठी चौधरी सीआयडी कार्यालयात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव येथील पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर चौधरी याची मंगळवापासून नाशिक येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) कार्यालयात हजेरी सुरू झाली. तपास अधिकारी बोलावतील तेव्हा त्याला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

हायकोर्टाने काही अटी-शर्तींवर चौधरी याला २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अलीकडेच जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार जळगाव तालुक्यातून बाहेर पडण्यास आणि आठवड्यातून एक दिवस तपास अधिकाऱ्यांकडे हजेरी लावण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी एक यावेळेत तो सीआयडी कार्यालयात हजर हजर होता.

तपास अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा त्याला तत्काळ हजर व्हावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विभागाच्या वसतिगृहात सुरगाण्यातील आदिवासी मुलीने आत्महत्त्या केली होती. या प्रकरणातील संशयित शिक्षकावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलिस आयुक्त करणार आहेत.

सुनंदा चिंटू भोये (१९, रा. रघतविहीर, ता. सुरगाणा) या आदिवासी तरुणीने २७ नोव्हेंबर रोजी पेठरोडवरील मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. ही घटना प्रेमसंबंधातून घडल्याची बाब तपासात पुढे आली होती. या प्रकरणात मंगेश काशिनाथ बत्तासे (रा. सुरगाणा) या संशयित शिक्षकांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तो त्र्यंबकेश्वरमधील आश्रमशाळेत शिक्षक म्हणून नोकरीस होता. सुनंदा हिला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिल्याची बाब तपासात पुढे आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामानाशी सुसंगत शहरे

$
0
0



डॉ. प्राजक्ता बस्ते
शहरामध्ये आपण जिथे राहतो, चालतो, काम करतो, प्रवास करतो मग तो सायकलवर असो, दुचाकी वाहनावर असो अथवा चारचाकी मोटारींमधून असो हवामान आरामदायी असणे महत्त्वाचे असते.
शहरातील हवामान चांगले असणे हे बरेच घटकांवर अवलंबून असते. सर्वात पहिले हवामानाचा आणि शहराचा तीन पातळ्यांवर विचार करावा लागतो. पहिल्यांदा भौगोलिक प्रदेशाचा, मग शहराचा आणि मग शहरातील विशिष्ट स्थानाचा. प्रादेशिक हवामानाचा (Macro Climate) विचार करताना शहराचे वास्तव्य कुठल्या प्रकारच्या भौगोलिक रचनेवर आहे. याचा मोठा प्रभाव त्या शहरातील हवामानावर पडतो. जसे की डोंगर उतारावर असलेले शहर, समुद्रकिनारी असलेले शहर, सपाट जमिनीवर उष्ण प्रदेशांमध्ये असलेले शहर इ. या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांवर असलेली जंगले, वृक्षराजी, स्थानिक चढ उतार, पाण्याचे सान्निध्य, इमारतींनी व्यापलेला परिसर या सर्व घटकांचा शहरातील हवामानावर परिणाम होतो व त्याचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील लहान-लहान जागांचा आणि त्या ठिकाणी असलेल्या हवामानाचा देखील विचार
करावा लागतो. तशा जागांमधील हवामानास Micro Climate अथवा सूक्ष्म हवामान म्हणतात. सूक्ष्म हवामानाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जुन्या गावठाणातील गल्ली. या गल्ल्यांचे सूक्ष्म हवामान म्हणजे ऊन, सावली, प्रकाश व वारा यांचा विचार केल्यास चौक किंवा मोकळ्या जागांपेक्षा वेगळे असते.
जुन्या वसाहतीमध्ये, ऐतिहासिक शहरांमध्ये जगभर वास्तूची रचना हवामानाशी सुसंगत बांधण्याची परंपरा होती. त्या रचनेमध्ये मग खिडक्या, दरवाजे, भिंती, घरातील चौक, छप्पराचा आकार, वास्तुची उंची या सर्वांचा हवामानाचा आदर करुन, वास्तूत राहणे सुखद करावयाचा प्रयत्न होत असे. वास्तूच्या या वेगवेगळ्या घटकांचा विचार त्या प्रदेशातील नैसर्गिक घटक जसे, कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणे, वाऱ्याच्या दिशेला आणि वेगाला परिवर्तित करणे, मुसळधार पडणाऱ्या पावसापासून संरक्षण करणे अशा अनेक कारणांसाठी होत असे. एका वास्तुच्या रचेनपासून सुरुवात होवून शहरातील रस्ते, चौक, मोकळ्या जागा, मैदाने, छोटे छोटे नैसर्गिक घटक हे सर्व एकत्रित जोडले जात असत. उदा. उष्ण प्रदेशामध्ये, तीव्र सूर्यकिरणांपासून
बचाव करण्यासाठी सावली असणारे कमी रुंदीचे रस्ते आणि इमारतींच्या जाड भिंती या घटकांचा एकत्रितपणे वापर करुन तेथील सूक्ष्म हवामान सुसह्य केले गेले आहे आणि पायी चालणाऱ्यांसाठी सुखद झाले.
नाशिक शहर त्याच्या हवामानासाठी प्रसिद्ध आहे. तीन ऋतुंना चांगल्या स्वरुपात अनुभवणारा हा भौगोलिक प्रदेश आहे. उन्हाळ्यातील तापमान गेल्या दहा वर्षात सरासरी १ ते १.५ अंश अंशाने वाढलेले आपल्याला जाणवते. पावसाचे चक्र बदलल्यासारखे जाणवते आणि हिवाळ्यातही तापमान कमी अधिक होत असते. हे बदल काही प्रमाणात जागतिक हवामान बदलाशी जोडलेले आहेत. तरी आज प्रादेशिक संरचनेमुळे नाशिकचे हवामान मर्यादेपलीकडे जाऊन बदलेले नाही. म्हणजेच आपल्या शहराचे सुखद हवामानास येथील प्रादेशिक हवामान-मायक्रो क्लायमेट व सूक्ष्म हवामान-माइक्रो क्लायमेट दोन्ही जबाबदार आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे रुंद रस्ते करणे गरजेचे आहे. सूक्ष्म हवामानाचा विचार केल्यास हे प्रशस्त डांबरी रस्ते, वाहनतळ यांच्यामुळे शहरातील तापमान प्रचंड वाढून तेथील पदपथ हे चालण्यासाठी दु:सह होतात आणि शिवाय मोटारींमधून प्रवास करणाऱ्यांना पण त्रास होतो. त्यामुळे असे मोठे रुंद रस्ते वृक्षाच्छादित करुन शहरातील सूक्ष्म हवामानातील तापमान कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच इमारतींची उंची, त्यांच्यामधील अंतर, इमारतींचे बाह्य भागाचे स्वरुप (Facade- फसाड) या सर्वांकडे विशेष कक्ष द्यावे लागते. प्रत्येक इमारत/वास्तू बांधताना हवामानपूरक असणारी रचना करणे आवश्यक आहे. इमारतीचे बांधकाम त्यांची रचना आणि हवामानाशी संबंध याबद्दल जगात वेगवेगळ्या देशामध्ये लोकसहभाग, संवेदनाशील दृष्टीकोन आहे आणि त्यावर संशोधन चांगल्या प्रमाणात होत आहे. सॅन फ्रॅन्सिस्को शहराचे उत्तम उदाहरण अलीकडच्या काळातले आहे. १९८० मध्ये नवीन आराखड्याप्रमाणे उंच इमारतींना प्राधान्य मिळणार होते. परंतु तेथील बले विद्यापीठातील संशोधकांनी उंच इमारतींचा सूर्यप्रकाश, सावली व वाऱ्याच वेग या तीन घटकांवर संशोधन करुन होणाऱ्या परिणामाबद्दल निष्कर्ष काढले की जे तेथील जगण्यासाठी पूरक नव्हते. उंच इमारतींमुळे कमी ऊन आणि जास्त वारा असे सूक्ष्म हवामान लोक अनुभवणार होते जे सॅन फ्रॅन्सिस्कोचे मूळ हवामान नाही. लोकांनी या आराखड्यास विरोध केल्यामुळे १९८५ नंतर सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये गगनचुंबी इमारती झाल्या नाहीत. त्यामुळे नगर नियोजन अथवा नगर रचना करताना प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील हवामानाचा विचार अतिशय बारकाईने करणे आवश्यक आहे. शहरातील लोकांसाठी त्यांच्या जीवनक्रम चांगला आणि सुखद करण्यासाठी हा विचार मोलाचा व फायद्याचा आहे.
(लेखिका आर्किटेक्ट कॉलेजच्या प्राचार्या आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन धान्य घोटाळ्यात अरुण घोरपडे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यात सहा महिन्यांपासून पसार असलेला मुख्य संशयित अरुण नामदेव घोरपडे सोमवारी रात्री पोलिसांना शरण आला. कोर्टाने त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी घोरपडे याला मंगळवारी कोर्टात हजर केले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, संशयित घोरपडे बंधूंनी सरकारी धान्याचा काळाबाजार करून अमाप संपत्ती कमावली आहे. असे व्यवहार लपविण्यासाठी त्यांनी काही बोगस कंपन्याही स्थापन केल्या. अरुण घोरपडे याची चौकशी होणे बाकी आहे. त्यातून पोलिसांना या घोटाळ्यातील अन्य आरोपींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी मिळायला हवी अशी मागणी करण्यात आली. अ‍ॅड. दीपक पाटोदकर यांनी संशयिताच्या वतीने युक्तीवाद केला. रेशन धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यांचा तपास अहवालही लवकरच कोर्टात सादर होणार आहे. अन्य संशयित आरोपी १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत असल्याने पोलिसांना तपासात माहिती मिळत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या कोर्टाने संशयित अरुण घोरपडे यास १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पुरवठा’चे शुक्लकाष्ठ संपेना

$
0
0

डीएसओपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या निफाडकरांची नियुक्ती रद्द

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा पुरवठा अधिकारी ( डीएसओ) पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या आर. एम निफाडकर यांची नियुक्ती राज्य सरकारने तडकाफडकी रद्द केली आहे. आधीच विविध धान्य घोटाळ्यांमुळे चर्चेत आलेल्या जिल्हा पुरवठा विभागामागील शुक्लकाष्ठ संपणार तरी केव्हा असा सवाल त्यामुळे उपस्थित झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यामध्ये तत्कालीन पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांना निलंबित करण्यात आले होते. याखेरीज जिल्ह्यातील नऊ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई झाल्याने संबंध यंत्रणाच ढवळून निघाली होती. त्यामुळे तब्बल दहा महिन्यांपासून या पदाला पूर्णवेळ कारभारी मिळत नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील धान्य पुरवठा यंत्रणेची घडीही विस्कटली. अशा परिस्थितीतच नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा महासोहळा पार पाडण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली.

अखेर यवतमाळचे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या आर. एम निफाडकर यांनी नाशिकचे पुरवठा अधिकारी म्हणून पदभार स्वीकारावा, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने २४ नोव्हेंबर रोजी काढले होते. नाशिकमध्ये दाखल झालेल्या निफाडकरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यानंतर प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवातही केली होती. मात्र, मंगळवारी (दि. ८ डिसेंबर) रोजी त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारचे अवर सचिव प्र.गि. चव्हाण यांनी काढले आहेत. त्यामुळे आता पुन्हा रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनाच प्रभारी पुरवठा अधिकारी म्हणून काम पहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालनाट्य’साठी आलेल्या चिमुरड्यांचे हाल

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेळ : दुपारच्या टळटळीत उन्हाची. स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृहाची पार्किंग.

मजेशीर बैठक घालून सर्व चिमुरडे धुळीत बसलेले. जेवणाचे डबे उघडण्यात येतात आणि तेथेच जेवणाची पंगत जमते. हास्यकल्लोळात भाज्यांची, लोणच्याची देवाणघेवाण होते. एक घास तुला, एक घास मला करीत जेवण उरकले जाते. तेथेच कोपऱ्यात हातही धुतले जातात. काहीही गैर झाले नाही अशा आविर्भावात पुन्हा सर्व चिमुरडे नाटकातील अभिनयासाठी सज्ज होतात. बाहेरील गावाहून आलेल्या चिमुरड्यांना व त्यांच्या शिक्षकांना रोजच पार्किंगमध्ये असे जेवण उरकावे लागते व ती जागा दुसऱ्या टिमला जेवणासाठी रिकामी करून दयावी लागते. घटना साधी आहे परंतु, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. बालनाट्यसाठी येणाऱ्या चिमुरड्यांना जेवणासाठी शासन साधी जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही यापेक्षा अधिक वाईट ते काय असावे?

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिकमध्ये सध्या सुरू आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धेच्या नियोजनामध्ये मात्र त्रुटी जाणवतात. सर्वात मोठी समस्या आहे ती जेवणाची आणि स्वच्छतागृहाची. 'बालनाट्य' मध्ये काम चिमुरडेच करणार हे गृहीत आहे मग अशावेळी त्यांच्यासाठी जे गरजेचे आहे त्याची पूर्तता शासनाने करणे आवश्यकच आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या रिनोव्हेशनचे काम सध्या सुरू असल्याने या आधी येथे झालेल्या राज्यनाट्य स्पर्धेच्या वेळीही स्वच्छतागृहाची समस्या काही प्रमाणात भेडसावत होतीच परंतु, त्यावेळी किमान सोशिक, समजदार लोक प्रेक्षक होते परंतु बालनाट्यचे तसे नाही. 'बालनाट्य'मध्ये काम करण्यासाठीही चिमुरडेच येणार व प्रेक्षकही चिमुरडे व त्यांचे पालकच असणार याची जाणीव शासनाला हवी. परंतु, सध्या 'पसा'मध्ये सुरू असलेल्या 'बालनाट्य'मध्ये मात्र नवीनच नाट्य उदयाला येत असून, जेवणाच्या बाबतीत लहान मुलांचे हाल होताना दिसत आहे.

पर्यायी विचार व्हावा

परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या रिनोव्हेशनचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे आतमध्ये कोठेही जेवणासाठी बसायला जागा नाही ही गोष्ट मान्य असली तरीही 'पसा'मागील माधवराव लिमये सभागृह किंवा शेजारील सारडा कन्या विद्यालय, रमाबाई आंबेडकर कन्या छात्रालय अशा जागांचा जेवणासाठी पर्यायी विचार करायला हवा होता असे पालकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसपीव्ही’ची गुंतागुंत!

$
0
0

स्मार्ट सिटी प्रस्तावातील एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेईकल) अटीवर काही महापालिकांनी शंका उपस्थित केल्या असून, हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्कांवर गदा आणणारा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. परंतु, काही विकासक व तज्ज्ञांच्या मते प्रभावी योजनांच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्ही आवश्यक असून, त्यासंदर्भात गैरसमज निर्माण केले जात आहेत. स्मार्ट सिटी योजनेत समावेशासाठी एसपीव्हीची अट बंधनकारक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. एसपीव्ही संदर्भातील तज्ज्ञांनी आपली मते मांडून हा विषय सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे.

पारदर्शकता येईल
- विवेक जायखेडकर, आर्किटेक्ट एसपीव्हीचा सध्या चुकीचा अर्थ काढला जात आहे. एसपीव्हीने काय करायचे हे स्थानिक स्वराज्य संस्थाच ठरवणार आहे. लोकप्रतिनिधींचे धोरण व लोकभावनेचा समावेश केल्यानंतर एसपीव्ही हे अंमलात येणार आहे. एसपीव्ही म्हणजे विशेष उद्देश ठेऊन एखादे काम हाती घेतलेली संस्था. या संस्थेचे आयुष्य हे ज्या विशिष्ट उद्देशासाठी तयार केले आहे ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंतच असते. एसपीव्ही ही एका मदतनीसासारखी कार्य करणारी संस्था आहे. ही एक पूर्णपणे वेगळी संस्था, जी ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच असणार आहे. एसपीव्हीचाचा मुख्य उद्देश आर्थिक धोका टाळण्यासह पारदर्शकता आणणे हा असतो. ज्यामध्ये मुख्य संस्थेला धोका पोहचू नये, म्हणून एसपीव्ही तयार करण्यात येते. एसपीव्हीमधील प्रत्येक उद्दिष्ट हे अगोदरच निश्चित केलेले असल्यामुळे त्या उद्दिष्टांना अनुसरूनच निर्णय घेण्याची क्षमता त्या एसपीव्हीच्या व्यवस्थापनाची असते.

स्मार्ट सिटीमधील एसपीव्हीचे उद्देश सुद्धा शासनाने ठरवून दिलेले आहेत. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे नियोजन, महत्व ओळखून किमत ठरवणे, मंजुरी देणे, पैसे अदा करणे, अंमलात आणणे, व्यवस्थापन करणे, चालू ठेवणे, जबाबदारी स्वीकारून अहवाल देणे व मूल्यमापन करणे ही एसपीव्हीची उद्दिष्टे आहेत. एसपीव्हीचा एक पूर्ण वेळ सीईओ असणार आहे. ज्याचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असणार आहे. एसपीव्हीसमिती मध्ये केंद्र, राज्य व स्थानिक शासनाचे अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असणार आहेत. राज्य व स्थानिक शासनाची जबाबदारी आहे की, या एसपीव्हीला भरीव निधी देऊन शाश्वत ठेवणे. अथवा बाजारातून योग्यरित्या निधी उपलब्ध करून देणे. शासनाची जबाबदारी फक्त नागरिकांसाठी पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील, हे बघणे असेल. या पायाभूत सुविधा जॉईंट व्हेंचर, पीपीपी, सबसिडीरीजवर पण होऊ शकतात.

एसपीव्ही ही एक लिमिटेड कंपनी असणार आहे. ज्यात केंद्र सरकार व राज्य अधिक स्थानिक सरकार यांचा ५०:५० टक्के हिस्सा असणार आहे. केंद्र शासनाकडून मिळणारा निधी हा फक्त ज्या गोष्टीसाठी देण्यात आला असेल, त्यासाठी वापरणे बंधनकारक असणार आहे. एसपीव्हीमध्ये सुरुवातीला स्थानिक शासनाचे कमीत कमी १०० कोटी व राज्य शासनाचे १०० कोटी असे २०० कोटींचे भांडवल असणे बंधनकारक असणार आहे. राज्य व स्थानिक खासगी अथवा आर्थिक संस्थांकडून सुद्धा भांडवल उभे करू शकतात. फक्त त्यात राज्य व स्थानिक शासनाचा हिस्सा समान असणे बंधनकारक आहे. एसपीव्हीच्या मंडळाचा अध्यक्ष महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यापैकी कोणीही एक असू शकतात. याचा अधिकार हा राज्य शासनाकडेच असणार आहे.

स्मार्ट सिटीतल्या एसपीव्हीत कोणावरही अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न नाही. महापालिकेवर इतरही कामांचा ताण असतो. मात्र, एसपीव्हीत एकच काम निश्चित केले जाते व ते वेगाने पूर्ण केले जाते. कोकण रेल्वे ही एसपीव्हीमुळेच वेळेत पूर्ण होऊ शकली. मात्र, या उलट दिल्ली मेट्रोची स्थिती होती. दिल्ली मेट्रो ही अनेक वर्षे रखडली. त्याची कारणे अंमलबजावणी ही लोकल बॉडीकडे होती. एसपीव्हीमुळे काम निश्चित वेळेत पारदर्शक होते. मात्र, आपल्याकडे आर्थिक गोष्टी जिथे आल्यात तिथले अधिकार लोकप्रतिनिधींनाच हवे असतात. जेएनयूआरएम मधल्या घरकुलांची काय अवस्था झाली याचाही विचार व्हावा. त्यामुळे एसपीव्ही म्हणजे अधिकारावर अतिक्रमण असे म्हणणे चुकीचे आहे.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्कावर घाला - गुरूमीत बग्गा, उपमहापौर

आपण पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आहे. पंचायत राज व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकल बॉडीला धोरण ठरवण्याचे, तर प्रशासनाला त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतात. राज्यघटनेत हीच व्यवस्था मान्य आहे. परंतु, एसपीव्ही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अधिकारांवर थेट अतिक्रमणच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या हक्कावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. हे ७४ व्या घटनादुरुस्तीचे थेट उल्लंघन आहे. एसपीव्हीत पारदर्शक काम होते, याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तसे होत नाही असा धरायचा? जर स्थानिक स्वराज्य संस्था पारदर्शक नसतील तर मग त्या बरखास्त केल्या पाहिजे. त्या ठेवायच्याच कशाला? योजनाकारांचा यामागचा हेतू स्पष्ट होत नाही. एसपीव्ही म्हणजे एक मठ उद्ध्वस्त करायचा आणि त्या जागी दुसरा मठ स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. सिंहस्थात नाशिक महापालिकेने एक हजार कोटींच्या वर कामे केली. ती ही अत्यंत पारदर्शीपणे. राज्य सरकारनेच या कामांबद्दल पाठ थोपटली. मग, आता स्मार्ट सिटी संदर्भात वेगळी व्यवस्था का? हे करण्याचे प्रयोजन स्पष्ट झाले पाहिजे. जेएनयूआरएमसाठी वेगळी व्यवस्था नव्हती. तरीही ती योजना राबविली गेलीच ना!

एसपीव्हीसंदर्भात अजून स्पष्टता नाही. एसपीव्हीत अजून काय आहे, हे स्पष्ट नाही. रचना कशी असेल, अध्यक्ष कोण असेल, कार्यकक्षा काय असेल, एसपीव्हीच्या सीईओचे चुकले तर त्यावर कारवाई कोण करेल याबाबत संभ्रम आहे. योजना राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचारी कोणाचे असणार, त्यांचे वेतन कोण देणार, यंत्रणा कशी चालवणार आहेत, या सर्व बाबी अजूनही अंधारात आहेत. केंद्र सरकार केवळ ५०० कोटींचे अनुदान देणार आहे. परंतु, जादा दराने निविदा आल्या तर अतिरिक्त पैसे कोण देणार याची स्पष्टता नाही. पॅन सिटी अंतर्गत एसपीव्ही संपूर्ण शहरावर नियंत्रण ठेवू शकते. मग, एवढ्या यंत्रणा आपल्याला का हव्यात. महासभेला ठरवू द्या काय करायचे ते. सर्वकाही स्पष्ट नसताना आंधळेपणाने त्याला मंजुरी देणे घातकच आहे. केवळ साडेसातशे कोटीसाठी आम्ही आमची स्वायत्तता गमवायची का असा प्रश्न आहे. एसपीव्हीच्या माध्यमातून हा संपूर्ण शहराला कंट्रोल करण्याचा केंद्राचा डाव आहे.

एसपीव्ही ही इस्ट इंडिया कंपनीची आवृत्ती आहे. एसपीव्ही सोडून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. लोकप्रतिनिधींवर अविश्वास दाखवून पंचायतराजला धोका पोहचवणे आम्हाला मान्य नाही. चुका असतील तर त्या दुरुस्त करा. मात्र, स्वतंत्र संस्थाने निर्माण करण्याला आमचा विरोध आहे. महासभा हीच सर्वश्रेष्ठ असली पाहिजे.

एसपीव्ही अट बंधनकारक - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा

स्मार्ट सिटी योजनेत स्पेशल पर्पज व्हेईकलची अट ही बंधनकारक आहे. महापालिकेने एसपीव्ही करण्यास नकार दिला तर आपल्या महापालिकेची स्मार्ट सिटीसाठी निवड होणे शक्य नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रस्तावासाठी एसपीव्ही ही आवश्यक आहे. एसपीव्हीवर महापालिकेचा प्रतिनिधी असणार असून, हा प्रतिनिधी महासभेलाच निवडावा लागणार आहे. महापालिका आयुक्त या एसपीव्हीचे चेअरमन असणार आहेत. एसपीव्हीत इतर विभागाचेही प्रतिनिधी असणार आहेत. विद्युत मंडळ, पोलिस, एमटीडीसी, एसटी महामंडळ असे सर्वच विभागाचे आवश्यकतेनुसार प्रतिनिधी या एसपीव्हीत असणार आहेत. सोबतच राज्याचे व केंद्र सरकारचे प्रतिनिधी यात असतील. सर्वच विभागाचे प्रतिनिधी एकत्र आणण्यामागचा उद्देश हा एकाच छत्राखाली सर्व कामे ही सुटसुटीत व्हायला हवीत असा आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रस्तावात एसपीव्हीटी अट मान्य करण्याशिवाय पर्याय नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात कांदाप्रश्नी रास्तारोको

$
0
0

टीम मटा

आवक वाढल्याने लाल कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. सरासरी बाराशे रुपयांपर्यंत दर खाली आल्याने कळवण, उमराणा व नामपूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कांद्यावरील निर्यातमूल्य कमी करावे, हमीभाव द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

निर्यातमूल्य वाढविल्याने कांदा दरात घसरण झाल्याच्या निषेधार्थे तालुक्यातील कळवण व नामपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या आंदोलनामुळे तांराबळ उडाल्याने पोलिसांनी संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने वातावरण अधिकच चिघळले. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी कांदा लिलावाचे भाव घसरल्याने कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीबाहेर येऊन अचानक रस्त्यावर आंदोलनास प्रारंभ केला. स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, शशिकांत कोर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यातमूल्य शुन्य करावे, या आशयाच्या मागण्या करून पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर यांना निवेदन सादर केले. आंदोलनात क पंढरीनाथ अहिरे, मेघराज भामरे, शरद कोर, विनोद कापडणीस, प्रवीण सावंत, हेमंत ठाकरे, जयवंत ठाकरे, उमेश कोर आदींसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

उमराणेत वाहतूक ठप्प

कांद्याचे दर घसरल्याने उमराणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात मोठी घसरण झाली. यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे वाहतूक काही ठप्प झाली होती.

तीव्र आंदोलनाचा इशाारा

कांद्यावरील निर्यातमूल्य कमी करावे, या मागणीसाठी कळवण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले. तहसीलदार अनिल पुरे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निर्यातमूल्य कमी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कांदा व्यापारी व बाजार समिती संचालक सुनील महाजन व हेमंत बोरसे यांनी आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दर्शविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी राज्य शासनावर कठोर टीका करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यजमान महाराष्ट्राच्या सुदीप्ताला दुहेरी मुकुट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योनेक्स सनराइज एनडीटीए राष्ट्रीय मानांकन सुपर सीरिज लॉन टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात यजमान महाराष्ट्राच्या सुदीप्ता कुमारने एकेरी व दुहेरीच्या विजेतेपदासह दुहेरी मुकुट पटकावला. मुलांच्या गटात आंध्र प्रदेशच्या आदर्श टिप्पभाटने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत नाशिकच्या रेहान सय्यदने घरच्या मैदानावर खेळताना ब्राँझ मेडल मिळवत नाशिककरांना दिलासा दिला.

लॉन टेनिस असोसिएशनच्या नाशिकमध्ये चार क्ले कोर्टवर ही स्पर्धा झाली. सात दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत विविध राज्यांतील ८१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अंतिम फेरीत मुलींच्या गटात चौथी मानांकित सुदीप्ता कुमार हिला पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्याच स्वरदा परब हिने तब्बल दीड तास झुंजवले. अखेर स्वरदाचा ७-५, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव झाला. एकेरीबरोबरच सुदीप्ताने गुजरातच्या रिचा चौगुले हिच्या साथीने दुहेरीतही विजेतेपद मिळविले. मात्र, त्यासाठी त्यांना कडव्या लढतीला सामोरे जावे लागले. अंतिम फेरीत सुपर टायब्रेकमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्यात प्रेरणा विचारे व स्वरदा परब या जोडीचे आव्हान ६-२, १-६, १०-६ असे मोडीत काढले. मुलांच्या गटात द्वितीय मानांकित आंध्र प्रदेशच्या आदर्श टिप्पभाटला याने तृतीय मानांकित गुजरातच्या संस्कार जेसवानी याचा एक तास वीस मिनिटांच्या झुंजीत ६-२, ६-२ असा सहज पराभव केला.

राज्य संघटनेचे सचिव राजीव देशपांडे, निवेक क्लबच्या लॉन टेनिस विभागाचे चेअरमन अर्जुन ललवाणी, जिल्हा संघटनेचे केतन रणदिवे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. आदित्य राव, डॉ. विजय थेटे, आशय शेकटकर आदींनी सहकार्य केले.

स्पर्धेचा निकाल

१४ वर्षांखालील वयोगट ः

मुले (एकेरी) ः सुवर्णपदक- आदर्श टिप्पभाटला (आंध्र प्रदेश), रौप्य- संस्कार जेसवानी (गुजरात), ब्राँझ- रेहान सय्यद, सर्वेश बिरमाणी (महाराष्ट्र).

दुहेरी ः सुवर्ण- डेनिम यादव (मध्य प्रदेश) व हसीद सृजन (आंध्र प्रदेश), रौप्य- अमन तेजाबवाला (महाराष्ट्र) व संस्कार जेसवानी (गुजरात).

मुली (एकेरी) ः सुवर्ण- सुदीप्ता कुमार (महाराष्ट्र), रौप्य- प्रेरणा विचारे (महाराष्ट्र), ब्राँझ- रिचा चौगुले (महाराष्ट्र), संजना सिरीमला (तेलंगणा).

दुहेरी ः सुवर्ण- सुदीप्ता कुमार व रिचा चौगुले (महाराष्ट्र), रौप्य- प्रेरणा विचारे व स्वरदा परब (महाराष्ट्र).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images