Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ढोल-ताशाच्या गजरात स्पर्धा

$
0
0

१९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ या दरम्यान आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ या दरम्यान ही स्पर्धा होणार असून, ढोल-ताशा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

ही ढोल-ताशा स्पर्धा विभागीय (प्राथमिक) व राज्यस्तरीय (अंतिम) अशा दोन टप्प्यात होणार असून, नाशिक विभागाची फेरी २६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. यात औरंगाबाद १९ डिसेंबर, पुणे २५ डिसेंबर, कोकण व पनवेल विभाग २७ डिसेंबर, नागपूर २ जानेवारी व अमरावती ३ जानेवारी असे नियोजन ठरविण्यात आलेले आहे. अंतिम फेरी १२ जानेवारी रोजी रायगड महोत्सवाच्या सांगता समारोहाच्यावेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे. यापूर्वी ज्या संघांनी या स्पर्धेसाठी आपली नावे नोंदवली आहेत तेदेखील या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांसाठी काही नियम व अटी आहेत, त्या पुढीलप्रमाणे. प्रत्यक्ष वादनाची वेळ १५ मिनिटांची राहिल. वादक संख्या कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त ५० असावी. यामध्ये कमीत कमी १५ ढोल वादक व ५ ताशेवादक असावेत. संघांना पारंपरिक वेशभुषेत वादन करावे लागेल. ध्वजधारी व इतर मदत करणारे यांची संख्या वादकांमध्ये धरली जाणार नाही. वादनासाठी ढोल ताशांबरोबरच झांजा, टाळ, हलगी, लेझिम, शंख, तुतारी या तालवाद्यांचा उपयोग करता येईल. वादनाच्या वेळेपूर्वी स्पर्धास्थानी एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. वादकांना प्राथमिक फेरीला स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे तर अंतिम फेरीसाठी प्रत्येक संघाला १० हजार रूपये देण्यात येतील. वादनासाठी शहरी, गावाकडची पथके व नाशिक बाजा पध्दतीचे किंवा अन्य प्रकारचे वादन असे तीन विभाग असतील. वादनासाठीची गुणपध्दती स्पर्धेपूर्वी सांगण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. एक वादक एकाच संघासाठी वादन करू शकेल. संघाच्या वादनाचा क्रम लॉटस् टाकून निश्चित करण्यात येईल. प्राथमिक फेरीत प्रत्येक महसूली विभागातून दोन संघांची (प्रथम व द्वितीय) अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते संघ घोषित करण्यात येतील. या संघांना शासनाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय संघांना अनुक्रम २५ हजार, १५ हजार रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. अंतिम फेरीत‌ील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांना दीड लाख, एक लाख व ७५ हजार रूपये मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.

ढोल-ताशा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी राहुल बाणावली यांच्याशी ९००४७६५००० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लघु उद्योग भारतीच्या अध्यक्षपदी संजय महाजन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत लघु उद्योग भारतीच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी अंबडच्या पूजा इंडस्ट्रीजचे संचालक संजय महाजन यांची निवड करण्यात आली. तर मुख्य सचिवपदी सातपूरच्या केम इक्वीपचे मिल‌िंद कुलकर्णी यांनी फेर नियुक्ती करण्यात आली.

शाखेच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा गंगापूर रोडवरील हॉटेल करी लिव्हज येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, लघु उद्योग भारतीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश कनानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष संजय महाजन आणि मावळते अध्यक्ष मारूती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कुलकर्णी यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तर महाजन यांनी आगामी योजनांबाबतचा मनोदय व्यक्त केला. यावेळी प्रमुख पाहूणे डॉ. विनायक गोवलकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत 'संघटना आणि संघटन कौशल्य' या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी निमाचे अध्यक्ष संजीव नारग, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, जनरल सेक्रेटरी राजीव आहिरे, भाजपा महाउद्योग आघाडी महाप्रदेश संघटक प्रदीप पेशकार, भाजपा नाशिक युवा मोर्चाचे अध्यक्ष व्हीनस वाणी, लघु उद्योग भारतीचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश कुलकर्णी, डी. जी. जोशी, नलिनी कुलकर्णी, एस. के. नायर, आशिष नहार, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते. संस्थेचे नवनियुक्त सहसचिव मि‌लिंद देशपांडे यांनी आभार मानले.

लघु उद्योग भारतीच्या नाशिक शाखेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष : संजय महाजन, उपाध्यक्ष : संजय कपाडीया, अंजली निमसे, शुभदा देसाई, मुख्य सचिव : मि‌लिंद कुलकर्णी, सहकार्यवाह : मिलींद देशपांडे, विनोद पाटील तर कार्यकारिणी सदस्य म्हणून योगेश बहाळकर, श्रेयस कुलकर्णी, प्रकाश भिडे, प्रदीप देशपांडे, राजेंद्र बोरसे, निखील पारीख, राजेंद्र कुलकर्णी, मेघराज पवार, सिध्दार्थ पाटील, संतोष खालाणे, अश्विनी पेशकार यांची नियुक्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ ठराव विखंडनाच्या तयारीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्मार्ट सिटी योजनेमुळे भाजपला विकासकामांचे श्रेय जाईल म्हणून एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल)ला विरोध करून योजनाच हाणून पाडणाऱ्या मनसे विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. महासभेत एक नगरसेवक वगळता सर्वांचा स्मार्ट सिटीला पाठिंबा असतानाही, महापौरांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. एसपीव्ही वगळून केलेला महापौरांचा ठरावाविरोधात भाजप आमदार सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, हा ठरावच विखंड‌ित करणार असल्याचा दावा फरांदे यांनी केला. सोबतच महापालिकेत घटनाबाह्य कामकाज केले जात असल्याचा आरोप करत, त्यांनी थेट राज ठाकरेंवरही निशाना साधला आहे. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महापौरांनी प्रशासनाला दिल्याने नाशिकच्या स्मार्ट सिटीत समावेशाच्या आशा मावळल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरूंग लागल्याने भाजपने शनिवारी पत्रकार परिषद घेवून महापौर, उपमहापौरांसह, मनसे प्रमुखांवर हल्ला चढवला. महासभेत उपमहापौर गुरूमीत बग्गा वगळता कोणीच एसपीव्हीला विरोध केला नव्हता तर करवाढ टाळून ठरावाला पाठिंबा दिला होता. तरीही महापौरांनी बहुमत डावलून निर्णय दिला आहे. महासभा सार्वभौम आहे. मनसेकडून महापालिकेत घटनाबाह्य काम केले जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला. एसपीव्ही घटनाबाह्य नसून विरोधकांनी त्याचा अभ्यास करावा असा सल्ला देत, त्यांनी महासभेचे इतिवृत्त आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असून बेकायदेशीर ठराव विखंड‌ित करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंवर भाजपचा हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेला विरोध करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर भाजपने हल्ला चढवला असून, सत्तेच्या बाहेर राहून राज ठाकरे लोकशाहीचा खून करीत असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

राज ठाकरे बाहेरून थेट महापालिकेचे कामकाज चालवत असून, स्मार्ट सिटी व घंटागाडी ठेक्यासंदर्भात मनसेने वेळोवेळी भूमिका बदलून नाशिककरांची चेष्टा चालवली असल्याची टीका भाजपने केली आहे. भाजपला क्रेडिट जाईल म्हणून स्मार्ट सिटीला विरोध करणाऱ्या ठाकरेंना नाशिककर माफ करणार नाहीत, असा टोलाही भाजपने ठाकरे यांना लगावला.

स्मार्ट सिटी योजनेमुळे भाजपला विकासकामांचे श्रेय जाईल म्हणून 'एसपीव्ही'ला (स्पेशल पर्पज व्हेइकल) विरोध करून योजनाच हाणून पाडणाऱ्या मनसेविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. महासभेत एक नगरसेवक वगळता सर्वांचा स्मार्ट सिटीला पाठिंबा असतानाही, महापौरांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

'एसपीव्ही' वगळून केलेला महापौरांच्या ठरावाविरोधात भाजप आमदार सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, हा ठरावच विखंडित करणार असल्याचा दावा फरांदे यांनी केला. सोबतच महापालिकेत घटनाबाह्य कामकाज केले जात असल्याचा आरोप करत, त्यांनी थेट राज ठाकरेंवरही निशाना साधला आहे. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महापौरांनी प्रशासनाला दिल्याने नाशिकच्या स्मार्ट सिटीत समावेशाच्या आशा मावळल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरूंग लागल्याने भाजपने शनिवारी पत्रकार परिषद घेवून महापौर, उपमहापौरांसह, मनसे प्रमुखांवर हल्ला चढवला. महासभेत उपमहापौर गुरूमीत बग्गा वगळता कोणीच एसपीव्हीला विरोध केला नव्हता तर करवाढ टाळून ठरावाला पाठिंबा दिला होता. तरीही महापौरांनी बहुमत डावलून निर्णय दिला आहे. महासभा सार्वभौम आहे. मनसेकडून महापालिकेत घटनाबाह्य काम केले जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला.

दरम्यान, या वादावर शेवटचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांकडून गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेल्पिंग हॅण्ड’ने वाचविले चेन्नईकरांचे प्राण

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

नाशिक : चेन्नईत नुकत्याच येऊन गेलेल्या भीषण पुरामध्ये जेथे शेकडो नागरिकांनी प्राण गमाविले, तेथेच अमळनेरच्या युवकाने विकसित केलेल्या अॅपच्या सहाय्याने तब्बल २० हजार चेन्नईकरांनी स्वत:चा जीव वाचविण्यात यश मिळविले आहे.

मुळच्या अमळनेरमधील पण सध्या नाशिक येथील के. के. वाघ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या कौशल योगेश बाग या विद्यार्थ्याने खास नाश‌िक कुंभमेळ्यासाठी विकसित केलेले 'हेल्पिंग हॅण्ड' अॅप आपत्तीग्रस्त चेन्नईकरांसाठी वरदान ठरले आहे. बाग याने त्याचे सहकारी राहूल अहिरे आणि पार्थ यांच्या मदतीने 'हेल्पिंग हॅण्ड' नामक अॅप्ल‌िकेशन विकसित केले होते. अॅपचे युजर्स संख्या सुमारे दोन कोटींच्या घरात पोहचली.

दरम्यान, चेन्नईतील पूरात अडकलेल्यांनी हेल्पिंग हॅण्ड अॅप डाऊनलोड केला व मदतीची मागणी केली. त्यानंतर एनजीओच्या माध्यमातून युजर्सचे लोकेशन शोधून काढले व त्यांचे प्राण वाचविले. यामुळे हेल्पिंग हॅण्डची टीम सावध झाली अन् हजारो चेन्नईकरांच्या मदतीची गरज असल्याची जाणीव झाली. त्यानंतर आमचा सर्व्हर मदतीसाठी सज्ज झाला. अॅपच्या मदतीने २० हजार नागरिकांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आल्याचे बाग यांनी सांगितले.

www.forceclose.org/helpinghands या लिंकहून डाऊनलोड करण्यात आलेले अॅप युजर्सने फ‌िडिंग केलेल्या त्याच्या परिवारातील सहा मोबाइल नंबरवर मेसेज पाठविते. रेडिओ कनेक्ट‌िव्हीटीव्दारे इंटरनेटच्या वापराशिवायही हे अॅप कार्यरत राहतो. ही माहिती सर्व्हर व युजर्सच्या हितचिंतकांना पोहचल्यानंतर सामाजिक संस्थांशी साधलेल्या संवादाच्या ताकदीवर युजर्सचे जीपीएस लोकेशन शोधले जाते. या संस्था युजर्सना मदत पोहचविण्यास अशावेळी सक्षम ठरतात, अशी माहिती अॅप डेव्हलपर कौशल बाग याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफर पक्षी अभयारण्याची

$
0
0

किशोर वडनेरे , लासलगाव

डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात परदेशी पाहुण्यांचा किलबिलाट घुमू लागला आहे. दूरदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करीत शेकडो जातीचे स्थलांतरित पाणपक्षी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात डेरे दाखल झाले आहेत.

पक्ष्यांच्या जलक्रीडा, त्यांना भक्षग्रहण करताना पाहणं, त्यांनी एकमेकांना साद घालण्यासाठी दिलेला मंजुळ आवाज ऐकण्याचा विलक्षण अनुभव घेण्यासाठी नांदूरमध्यमेश्वरच्या कुशीत शिरत इथल्या अनोख्या पक्षीविश्वाची सफर करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले आपोआपच या अभयारण्याकडे वळू लागली आहेत. युरोप खंडासह श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान, हिमालय, काश्मीर या भागातून अनेक जातींचे प्रवासी पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करीत इथल्या दलदली जालाशायांवर दाखल झाले आहेत.

आतापर्यंत इथे सर्वसाधारणपणे ग्रासलँड आणि वेटलँड मिळून २४० ते २५० वेगवेगळ्या जातीच्या पक्षांची नोंद करण्यात वनखाते व पक्षी निरीक्षकांना यश आले आहे.या पक्षांचे इथं नोव्हेंबरमध्ये आगमन होते आणि ते जवळपास फेब्रुवारीपर्यंत वास्तव्याला असतात. गेल्या काही वर्षात वनखात्यानं इथं काही सुधारणा केल्या आहेत. त्यात प्रामुख्यानं पक्षी निरीक्षणासाठी काही लोखंडी व आरसीसी मनोरे उभे करण्यात आले आहेत. पक्षी निरीक्षकांसाठी मुक्कामाची तात्पुरती सुविधाही वनखातं पुरविते. आजमितीला कोट्यवधी रुपये खर्चून नव्यानच इथं पक्षी माहिती केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. नांदूरमधमेश्वर धरणाच्या भिंतीसामोरील बाजूस मोठ्या दिमाखात उभं असलेल्या या माहिती केंद्रात पक्षांच्या प्लास्टर ऑफ पँरिसच्या सुबक आकृत्या साकारण्यात आल्या आहेत.

वनखात्याच्या वतीने इथे जलाशयाच्या कडेला असणाऱ्या मनोऱ्यापर्यंत जाण्यासाठी पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळात येथील स्थानिक तरुणांनी येथे येणाऱ्या पक्षांची माहिती गोळा केली असून, पर्यटकांना ती उपयुक्त ठरत आहे. खरतरं नांदूरमध्यमेश्वर हे अभयारण्य पक्षांसाठी एक उपयुक्त ठिकाण आहे. मात्र, पक्षांना पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे सुविधा अपूर्ण असल्याने पक्षाचं जवळून निरीक्षण करणं त्यांचा अभ्यास करणं येथे कठीण होऊन बसले आहे. भरतपूरच्या वनखात्यानं अतिशय नियोजित पद्धतीनं तिथल्या जलाशयांच्या मधोमद पायवाटा तयार केल्या आहेत. तिथल्या स्थानिक तरुणांना पक्षांची माहिती देऊन प्रशिक्षित करण्यात आले आहे. हे गाईड येणाऱ्या पर्यटकांकडून ताशी सत्तर ते शंभर रुपये दर आकारून सायकल रिक्षातून अभयारण्याची सफारी घडवून आणतात. पक्षी निरीक्षण अगदी जवळून होत असल्यामुळे देशविदेशातील पर्यटक भरतपूर गाठतात. नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य हे भरतपूरच्या तोडीचं किंबहुना त्याहूनही सरस ठराव इतक्या ताकदीच असतांना या ठिकाणी येणाऱ्यांना जवळून पक्षी दर्शन व्हावं याची कोणतीच सुविधा नसल्याने स्थानिकांसह विदेशी पर्यटक इकडे फिरकतच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेती अन् पाणीप्रश्नी पालकमंत्र्यांना अनास्था

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नाशिक जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी सोडले गेलेले पाणी, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला न मिळणारा बाजारभाव आदीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी जोरदार टीकास्र सोडले. नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यातील कारखानदारांसाठी सोडले गेले. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत. पाण्यासाठी, शेतमालासाठी आंदोलन होताहेत मात्र शेतकरी, शेती आणि पाणीप्रश्‍नी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांना तसेच राज्य शासनालाही अजिबात आस्था नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केली.

येवला दौऱ्यावर आलेल्या अॅड. पगार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छगन भुजबळ पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या वेळोवेळी बैठका होत असतं. त्यात नेहमीच जनहिताचे निर्णय घेतले जात. आता मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. वर्ष संपत आले तरी बैठक नाही आणि निर्णयही नाही. परिणामी जिल्ह्याच्या विकासाचा उपलब्ध असणारा निधीही परत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगून त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या, जनतेच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलने करीत आहे. शासनाला जनभावना कळाव्यात, सर्वसामांन्याचे प्रश्‍न सुटावेत ही यामागची भावना आहे. जिल्ह्यातील काही सत्ताधारी आमदारांना जनतेच्या प्रश्नापेक्षा वरिष्ठांची मर्जी सांभळणे जास्त महत्वाचे वाटत असल्याची टीकाही अॅड. पगार यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, विष्णुपंत कऱ्हेकर, राजू पवार, भूषण लाघवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्म मनुष्याच्या जीवनाला विघातक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

धर्माची आवश्यकता मनुष्याला नाही. धर्म हा मनुष्याच्या जीवनाला विघातक असून, धर्म नव्हे तर सौंदर्य हेच मानवी जीवनाचे रक्षण करणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दूरदृष्टीकोन असल्याने त्यांनी धर्माला विरोध केला. धर्मात शोषणाची तरतूद असून, ते एक हत्यार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व विचारवंत, प्रबोधन साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

येथील राधाई मंगल कार्यालयात समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आयोजित तिसऱ्या प्रबोधन साहित्य परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. यशवंत मनोहर बोलत होते. बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या हस्ते दीप व मशाल प्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रबोधन साहित्य परिषदेच्या वतीने 'प्रबोधन मित्र पुरस्कार २०१५' ख्यातनाम विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

डॉ. मनोहर म्हणाले की, शासनाला धर्म नसतो. ते निधर्मी, धर्मनिरपेक्ष असतात. त्या अर्थाने लेखक निधर्मी असतो. लेखकाला जात, धर्म, नसतो. साहित्यिकाला जात-धर्म असेल तर तो मुलतत्वादी होऊन मानवी जीवनाचा प्रवक्ता ठरणार नाही, तर तो एका विशिष्ट जाती व धर्माचा प्रवक्ता ठरेल. यासाठी साहित्य निर्मिती करताना मानवी जीवनाची समिक्षा करणारे अद्ययावत शब्द निर्माण करणारे व भगवान बुद्ध, फुले आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे असावेत. दुर्देवाने साहित्यात जातीयवादाचा व धर्माचा पुरस्कार करणारे ठेकेदार उदयास येत असल्याने समाज नव्या शक्तींच्या उदयाची वाट बघतो आहे. यासाठी वाचन, मनन व चिंतनाची आवश्यकता आहे.

पुरस्कारार्थी डॉ. रावसाहेब कसबे यांनी म्हणाले की, जगातील प्रचंड द्रारिद्र्य, अज्ञान व उपेक्षा असल्याची खंत व्यक्त करून गरिबासह श्रीमंताचे स्वास्थ हरविले असल्याचे नमूद केले. धर्माच्या नावाने आज विष कालवून असहिष्णुतेचा जयघोष केला जात आहे. मात्र, भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सहिष्णुता तरी होती कोठे हे स्पष्ट करीत ‌‌स्त्रीयांना अनादीकालापासून सतीजाणे, विधवा व्यभिचार करणे हा जुलूम होतांच ना. मग सहिष्णुता तरी होती कुठे असा सवाल उपस्थित केला. या प्रसंगी सटाणा नगरपरिषदेच्या वतीने प्रबोधन साहित्य परिषदेला अकरा हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तर, रमाई या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. कसबे व डॉ. मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेस माजी आमदार संजय चव्हाण, ज. ल. पाटील, माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ, सीमा सोनवणे, डॉ. सिद्धार्थ जगताप, दादा खरे, राकेश वानखेडे, डॉ. एकनाथ पगार, प्रल्हाद पाटील, शं. कं. कापडणीस, बी. डी. बोरसे, पी. टी. पाटील आदींसह मान्यवर लेखक, कवी व साहित्यिक उपस्थित होते. डॉ. सिध्दार्थ जगताप यांनी प्रास्ताविक केले. शैलेंद्र गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठेकेदारांच्या मक्तेदारीमुळे रखडतात रस्त्यांची कामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निधीच्या अभावामुळे नव्हे तर ठेकेदारांच्या मक्तेदारीमुळे व अपर्याप्त तरलतेमुळे देशातील रस्ते बांधणीची कामे गेली तीन वर्ष खोळंबल्याचा दावा रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने केला आहे. तशी माहितीच मंत्रालयाने तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. आजमितीस देशात दररोज ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांची बांधणी होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ १६ किलोमीटर लांबीच्या म्हणजेच निम्म्या प्रमाणातच रस्त्यांची कामे होत असल्याचे वास्तवही या उत्तरामुळे पुढे आले आहे.

दिल्ली येथील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी रस्त्यांची कामे खोळंबत असल्याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चव्हाण यांना स्पष्टीकरण देताना मंत्रालयाने त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी कथन केल्या आहेत. रस्ते बांधणीसाठी केंद्राने आर्थिक पाठबळ देण्यास कधीच टाळाटाळ केलेली नाही. त्यासाठी निधीची चणचण असल्याचे कारणही दिले जात नाही. परंतु, ठेकेदारांची मक्तेदारी आणि अपर्याप्त तरलतेमुळे (लिक्विडीटी) देशभरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे काम खोळंबत असल्याचा दावा या मंत्रालयाने केला आहे.चव्हाण यांना देण्यात आलेल्या लेखी उत्तरानुसार देशात सद्यस्थितीत दररोज १६ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते बांधले जात आहेत.

नाशिक-पुणे महामार्गाचे कामही रखडले

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, त्यासाठी निधीही आला आहे. मात्र, अजूनही हे काम अपूर्ण आहे. जमिनी अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून नाशिक ते सिन्नर दरम्यानच्या महामार्गाचे काम खोळंबले आहे. शिंदे पळसे येथे रस्त्याच्या कोणत्या बाजूची जमीन अधिग्रहीत करावयाची यावरून पेच निर्माण झाला आहे. या मार्गावर सरकारी जमिनी असतानाही प्रशासन हेतूपुरस्सर शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या विकासकामातील गैरव्यवहाराविरोधात उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. शासनाकडून झालेल्या लेखापरीक्षणात देखील तशी नोंद घेण्यात आली आहे. तेव्हा अशा गैरव्यवहाराची आणि त्यात अडकलेल्या अधिकारी-पदाधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी जनता दल पक्षातर्फे मनपा इमारतीसोमोर आजपासून (१४ डिसेंबर) बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. ही माहिती नगरसेवक बुलंद एकबाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या उपोषणाचे नेतृत्व जदचे शहर सचिव मो मुस्तकीन मो. मुस्तफा करणार आहेत. शहरातील विकासकामात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. यात प्रामुख्याने जकात नाका जागा विक्री प्रकरण, घनकचरा संकलन करण्यासाठी वॉटरग्रेस कंपनीला दिलेला ठेका, शहर स्वच्छतेचा दिग्विजय कंपनीला दिलेला ठेका, जुन्या महामार्गावरील बसविण्यात आलेल्या जाळ्या, रिलायन्स जिवो कंपनीसोबत झालेला व्यवहार अशा अनेक बाबतीत गैरव्यवहार झाल्याचे सन २०११-१२ च्या लेखा परीक्षण अहवालात नमूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाक-चीनचे आव्हान मोठे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्तान कुटीर खेळी करीत सातत्याने दहशतवादाचा आश्रय घेऊन भारतामध्ये अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. भारताने अनेकदा संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी अद्यापही पाक पाठिंबा देण्यास तयार नाही. ही परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली असून चीनही तिबेटमध्ये आपले अस्तित्त्व रुजवू पाहत आहे. त्यामुळे भारतासमोर पाकिस्तान व चीनचे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन परम विशिष्ट सेवा पुरस्कारप्राप्त निवृत्त लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांनी केले.

सेंट्रल हिंदू सैनिकी शिक्षणसंस्थेतर्फे कुसुमाग्रज स्मारकामध्ये झालेल्या डॉ. बा. शि. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना ते 'जम्मू काश्मिर : व्यूहात्मक दृष्टीकोन' या विषयावर बोलत होते. पाकव्याप्त गीलगीट व चीनव्याप्त सियाचिन या ठिकाणांहून काराकोरम प्रकल्पामार्गे काश्मिरमध्ये येत छुप्या कारवाया ही राष्ट्रे करू पाहत आहे. पाकच्या दहशतवादी कारवायांमुळे अमेरिकेने आता पाकला आर्थिक पाठिंबा देणे बंद केले आहे. त्यामुळे पाक सध्या मोठ्या दिवाळखोरीला सामोरा जात आहे. काराकोरम प्रकल्पाचा चीनला ८० टक्के तर पाकलाही २० टक्के आर्थिक लाभ होणार असल्याने काश्मिर प्रश्नाबाबत पाकने चीनशी हातमिळवणी केली आहे. काश्मीरचा ४५ टक्के भाग आता भारताकडे राहिला आहे. उर्वरित ३५ टक्के पाककडे तर २० टक्के चीनने काबिज केला आहे. त्यामुळे या कारवायांना आळा घालणे भारताच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे झाले आहे, असेही पारनाईक यांनी सांगितले. डॉ. विजया पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सुचेता कोचरगावकर आदी उपस्थित होते.

आजचे व्याख्यान

ऑर्गनायझर मॅगझिनचे संपादक प्रफुल्ल केतकर यांचे 'भारत चीन धोरण संबंधातील नीतीविषयक गतिशीलता' या विषयावर सोमवारी (दि. १४) सायंकाळी साडे पाच वाजता व्याख्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या संशोधकाची उत्तुंग भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रसायन शास्त्रातील कुठल्याही पदवीशिवाय मूलभूत संकल्पनेला धक्का देत नाशिकच्या सरकारी अधिकाऱ्याने मांडलेल्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. नाशिकचे सेल्स टॅक्स विभागातील असिस्टंट कमिशनर डॉ. चेतनसिंग राजपूत यांनी मांडलेला 'रेसिप्रोकल पोटेन्शिअल ऑक्सिटेशन' हा केमेस्ट्रीच्या नियमावलीची चौकट मोडणारा शोधनिबंध कॅनडीयन जर्नल 'इंटरनॅशल जर्नल ऑफ' केमेस्ट्रीने नुकताच प्रसिध्द केला आहे.

आम्लयुक्त माध्यमात कॉपर ऑक्साईड हा रसायनातील घटक तयार होऊ शकत नाही, असा सिध्दांत आजवरची विश्वाने स्वीकारलेली इलेक्ट्रो केमेस्ट्री मांडते. मात्र, या सिध्दांताला छेद देत आम्लयुक्त माध्यमात कॉपर ऑक्साईड या घटकाची निर्मिती शक्य आहे, असा नवसिध्दांत आंतरराष्ट्रीय सायन्स मॅग्झीनमध्ये मांडत डॉ. राजपूत यांनी जगातील विद्युत रसायन तज्ज्ञांचे लक्ष वेधले आहे. डॉ. राजपूत हे मूळ जळगाव जिल्ह्यातील उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवे सृजनशील शिक्षण!

$
0
0

विनोदिनी काळगी


एरवी रंगहीन वाटणारा प्रकाशकिरण लोलकातून बघितला तर त्यात दडलेले सप्तरंग बघायला मिळतात. तीच गोष्ट मुलांची. शिक्षक आणि पालकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लोलकातून मुलांकडे बघण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मुलांमधील सृजनाचे इंद्रधनु समोर येईल. मुलांच्या व्यक्त होण्याची सुरुवात अगदी लहानपणी त्यांच्या चित्र काढण्यापासून होते. त्यांनी कागदावर मारलेल्या रेघोट्यांबाबत त्यांच्याशी बोललो तर लक्षात येते की त्यात त्यांचे घर असते, आई असते, प्राणी-पक्षी असतात. आपण ते समजून घ्यायला कमी पडतो. मोठी मुलेही चित्रातून, रंगातून आपला मूड, भावना व्यक्त करत असतात. वेगवेगळ्या रंगछटा वापरून कधी आपला आनंद दाखवतात तर कधी रागाचा, द्वेषाचा निचरा करतात. तज्ज्ञमंडळींना तर त्यांच्या रंगकामावरुन त्यांच्या स्वभावाचा अंदाज करता येतो. पण आपण मात्र त्यांची चित्रे बाद ठरवून त्यांना कुणाच्यातरी चित्रांची हुबेहुब नक्कल करायला भाग पाडतो. दुसरीकडे आपल्याला हेही माहित असते की ओरिजनल चित्र काढणारेच चित्रकार प्रसिद्ध होतात. तरी आपण मुलांना ते स्वातंत्र्य देत नाही, असे का याचा एकदा विचार करुया की.

भावनांचे सुयोग्य प्रकटीकरण करता येणे हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे फलित आहे. चित्रकला, हस्तकला, नृत्य, नाट्य, संगीत आणि भाषा ही या अभिव्यक्तीची प्रभावी माध्यमे आहेत. हस्तकला-कार्यानुभव म्हणजे मन-हात-बुद्धी यांचा एकत्रित आविष्कार! पण हल्ली अनेक शाळांमध्ये या विषयाला फाटा देऊन संगणक विषय दिला जातो. यातून मुलांचे फार नुकसान होते आहे. श्रमप्रतिष्ठा नसलेल्या आपल्या देशात बुद्धी फक्त पाठांतरासाठी व हात केवळ घडी घालून ठेवण्यासाठी आहेत, असे मानले गेल्याने मुलांमधला सर्व जीवनरसच आटून गेला आहे. स्वत: काही निर्मिती करण्याची मुलांची क्षमताच कमी होत चालली आहे. अशा वेळी कार्यानुभवाचे तास आपण खूप कौशल्याने व विचारपूर्वक वापरले पाहिजेत. तरच या सृजनाच्या तिजोऱ्या भरतील. मुले जेव्हा स्वत: काही बनवतात तेव्हा त्यांना स्वयंनिर्मितीचा आनंद आणि समाधान तर मिळतेच. शिवाय आत्मविश्वास वाढतो, सृजनशीलता वाढते, कल्पनाशक्तीला चालना मिळते, स्नायुंच्या हालचालींमध्ये लवचिकता तसेच नियंत्रणही येते, शोधकवृत्तीला प्रोत्साहन मिळते, स्वत:चा विचार कृतीतून मांडण्याची संधी मिळते, एकाग्रता वाढते, मनावरचा ताण हलका होतो. मुले श्रमाचे महत्त्व आणि सहकार्य शिकतात. स्त्री-पुरूष, उच्च-नीच असा भेदभाव विसरुन कामाशी एकतानता, समरसता साधतात. स्वयंपाक किंवा पदार्थ बनवणे ही सुध्दा एक महत्त्वाची कला आणि अभिव्यक्तीच आहे. शिवाय ती मुलगे आणि मुली दोघांना येणे गरजेचे आहे.

भाषा ही तर जीवनात क्षणोक्षणी रंग भरणारी केवढी उपयुक्त क्षमता. तिचा विकास केवळ धड्याखालची उत्तरे लिहून होत नाही. ती भरपूर वाचल्याने, बोलण्याने आणि स्वत:च्या शब्दात लिहिण्याने फुलत जाते. नाट्य सर्वांना हवेसे वाटते. भाषा, इतिहास यासारखे विषय शिकवताना स्वत: संवाद लिहून पाठांचे नाट्यीकरण करायला मुले उत्सुक असतात आणि त्यामुळे विषय समजणेही सोपे होते. सभोवताली घडणाऱ्या घटनांवरील नाट्यीकरण मुलांना स्वत:चे विचार मांडायला आणि इतरांचे ऐकायला उपयुक्त ठरते. मुलांना एखादा विषय देऊन त्याच्या मांडणीचे स्वातंत्र्य दिले की त्यांच्या कल्पनाशक्तीला बहर येतो. मग संवाद, कथा, कविता, पत्र अशी अनेक माध्यमे मुले हाताळतात.

चमत्कृतीपूर्ण कल्पना आणि अनोखे शब्द यांनी या रचना सजतात. हे काही केवळ कलाविष्काराचे फॅड नाही, तर उत्स्फुर्तता आणि स्वातंत्र्य याची ज्ञानरचनेसाठीही तितकीच आवश्यकता आहे.

(लेखिका आनंद निकेतन शाळेच्या संचालिका आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश जांगीड ‘रंगोत्सव’त प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निर्सगचित्रकार शिवाजी तुपे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त आयोजित 'रंगोत्सव' प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धेत नाशिकचे चित्रकार सुरेश जांगीड यांच्या चित्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांना रोख रुपये ७ हजार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

चित्रकार स्वर्गिय शिवाजी तुपे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित स्पर्धेत नाशिकच्या सुरेश जांगिड यांच्या चित्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रुपये ७ हजार), औरंगाबादच्या कैलास घुले यांच्या चित्राला द्वितीय पारितोषिक (रुपये ५ हजार), नाशिकच्या रुद्र मजेठिया यांच्या चित्राला तृतीय पारितोषिक (रुपये ३ हजार) देण्यात आले. तर नाशिकच्याच वैभव खर्जूल व पुण्याच्या प्रथमेश गोलिपकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक (रुपये १ हजार) देण्यात आले. स्पर्धेत राज्यभरातून ८५ चित्रकारांनी सहभाग घेतला. शनिवारी रात्री सर्व स्पर्धक सोमवार पेठेतील सोनारवाड्यात जमा झाले. रविवारी सकाळी ८ वाजता निर्सगचित्रणाला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी कोणत्याही माध्यमात चित्र रंगवण्याची मुभा देण्यात आली. गोदाघाटावर जागोजागी चित्रकार चित्र काढत असल्याने नाशिककरांच्या आकर्षणाचा विषय ठरला होता. ज्येष्ठ चित्रकार गणपत भडके यांनी चित्रांचे परिक्षण केले. बक्षीस समारंभात प्रास्ताविक करतांना धनंजय गोवर्धने म्हणाले, की निर्सगचित्रण हा तुपे सरांचा आवडता विषय होता. नाशिक कला निकेतनच्या वास्तूमधून त्यांनी गोदाघाटाचा कोपरानकोपरा चित्रबध्द केला आहे. यावेळी गणपत भडके म्हणाले, की प्रत्येक चित्रकाराचा पेन्टींग व्ह्यू वेगळा असतो. त्या चित्रातून तो व्यक्त होत असतो. चित्रकार मुक्ता बालिगा म्हणाल्या, की तुपे यांच्या स्मृतीदिनानिमित्त घेतली जाणारी स्पर्धा महाराष्ट्रात लोकप्रिय होत असून दिवसेंदिवस सहभागी होणाऱ्या चित्रकारांच्या संख्येत वाढत आहे. यावेळी आर्किटेक्ट संजय पाटील, दिलीप साळवेकर, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनवणी, आनंद सोनार, गणपत भडके यांच्या हस्ते विजेत्या चित्रकारांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगोळीतून जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचआयव्हीची लागण झाल्यामुळे त्यांचे आयुष्यच जणू बेरंग झाले. नीरस जीवनात पुन्हा उत्साहाचे आणि आशेचे रंग भरून कित्येक एचआयव्ही बाधित बांधवांनी आयुष्याला परत नव्याने सुरुवात केली आहे. विविधरंगी रांगोळ्या रेखाटून एचआयव्हीबाबत प्रबोधनाचा संदेश देण्याचा उपक्रम नुकतेच राबविण्यात आला.

महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा आणि यश फाऊंडेशनतर्फे सीबीएस परिसरातील शासकीय कन्या विद्यालयात एचआयव्ही विषयाशी संबंधित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच महिलांनीही या स्पर्धेत सहभाग घेऊन एचआयव्ही बाबत जनजागृती करणारे विविध विषय रेखाटले. एचआयव्हीला रोखण्यासाठी काय करता येऊ शकते हे रांगोळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास १३० स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी महिन्द्रा अॅण्ड महिन्द्राचे नामदेव येलमामे, मुक्ता बालिगा, अनघा पाठक, मुख्याध्यापिका ज्योती चौधरी, छाया साबळे, यश फाऊंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.

रांगोळीची मांडणी, रंगसंगती आणि एचआयव्हीशी संबंधित संदेश या निकषांवर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला.

विजयश्री शेकोकर यांनी प्रथम क्रमांकाचे एक हजार एक रुपयांचे पारितोषिक पटकावले. द्वितीय ७०१ रुपयांचे पारितोषिक प्राजक्ता शिंदे यांनी तर तृतीय ५०१ रुपयांचे पारितोषिक हर्षदा शिंदे यांनी पटकावले. श्रेयस जाधव, रिध्दी पाण्डेय यांना ३०१ रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धान्याचा द्वारपोच पंचनामा

$
0
0


रेशन व्यवस्थेतील अपहार रोखण्यासाठी उचलले पाऊल म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा रेशन धान्य घोटाळ्यामुळे जिल्हा प्रशासनाची राज्यभर बेअब्रू झाली. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांवर भर दिला जात आहे. व्दारपोच धान्य वितरणाचा पंचनामा करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात आदिवासीबहूल तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून दारिद्र्य रेषेखालील बांधवांना अल्प किमतीत धान्य दिले जाते. मात्र, जिल्ह्यात अशा तब्बल पाच कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाला. अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पुरवठा अधिकारी तसेच नऊ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली. राज्यात प्रथमच एवढी मोठी कारवाई झाल्याने जिल्ह्यातील महसूल विभागाची बेअब्रू झाली. सुरगाण्या पाठोपाठ वाडीवऱ्हे येथेही धान्याच्या अपहाराबाबत गुन्हा दाखल झाला. अशा सर्व प्रकरणांची दखल घेऊन बायोमेट्रीक प्रणाली राबविण्याची घोषणा झाली असताना आता धान्य वितरणाचा पंचनामा करण्याचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला आहे.

या मोहिमेत गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. गोदामातील धान्य रेशन दुकानदारापर्यंत पोहचले की नाही याची पंचासमक्ष खातरजमा करण्यात येणार असून, तसे प्रमाणपत्र संबंधितांना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या मोहिमेंतर्गत गोदामातून बाहेर पडणाऱ्या धान्याचे ट्रॅकिंग होईल. एखाद्या तालुक्यात गोदामातून बाहेर पडणारे धान्य रेशन दुकानात पोहोचते की नाही, दिला गेलेला धान्यसाठा कमी-अधिक तर नाही ना याबाबतची माहिती एका फॉर्मद्वारे भरून घेतली जाणार आहे. अशा रेशन धान्याची ग्रामस्थांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

छापील फॉर्मवर सरपंच, उपसरपंच, दक्षता समिती सदस्य, पोलिस पाटील यांची स्वाक्षरी आवश्यक राहणार आहे. यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येईल, असा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी व्यक्त केला आहे.

असा होईल पंचनामा

सरकारी अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या यंत्रणेचे नाव, तालुक्याचे नाव, ज्या सरकारी गोदामातून धान्याची उचल केली त्याचे नाव, वाहनचालकाचे नाव व स्वाक्षरी, वाहन क्रमांक, ज्या रेशन दुकानासाठी उचल करण्यात आली त्या परवानाधारकाचे नाव व गावाचा पत्ता, अन्नधान्याचा तपशील, गोदामपालाची स्वाक्षरी, तसेच स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी पंचासमक्ष धान्य ताब्यात घेण्यात आल्याचे पंचांचे प्रमाणपत्र असा आशयाचा हा फॉर्म भरून घेतला जाणार आहे. हा फॉर्म नंतर विभागाकडे सुपूर्द केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नल तोडणाऱ्या कारची पोलिसांच्या दुचाकीला धडक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

रेड सिग्नल असताना भरधाव वेगात आलेल्या एका कारचालकाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरून जाणारे वाहतूक शाखेचे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर येथील ट्रॅफिक सिग्नलवर घडली.

अपघातात पोलिस नाईक हिरामण गणपत सोनावणे आणि कॉन्स्टेबल पोपट सोनू कारवल हे दोघे जखमी झाले. वाहतूक विभागात नियुक्त असलेले कर्मचारी सोनावणे आणि कारवल हे दोघे शरणपूररोडवरील वाहतूक विभागाच्या कार्यालयातून सकाळी पाऊणे नऊ वाजेच्या सुमारास बाहेर पडले. कॉलेजरोड परिसरात जाण्यासाठी हे दोघे दुचाकीने कॅनडा कॉर्नर येथील सिग्नलवर पोहचले. तिथे ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांनी दुचाकी पुढे घेतली असता डाव्या बाजूने भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिली. कारच्या धडकेने दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले. संबंधित कार चालकाने सिग्नल तोडला होता. ही कार नवीन असून, तिचे रजिस्ट्रेशन देखील झालेले नसल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी दिली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी कारचालक देवेंद्र विद्यालकर (वय ३०) विरोधात धोकादायक पध्दतीने वाहन चालवून दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, सिग्नल तोडून जाणाऱ्या वाहनामुळे अपघात होण्याची चालू आठवड्यातील ही दुसरी घटना ठरली आहे. १० डिसेंबररोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिग्नल तोडून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने आयशर ट्रकला धडक दिली होती. तारवाला चौफुली येथे झालेल्या या अपघातात चार प्रवाशी जखमी झाले होते, तर तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वाहतूक नियम पाळले तर किमान ट्रॅफिक सिग्नलवर होणारे अपघात टाळणे शक्य असल्याचे मत पीआय बागवान यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मकरंद उगले ठरला सायकलचा राजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट आणि नाशिक वृत्तपत्र वितरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पेपर वितरकांचा सायकल राजा २०१५' या स्पर्धेत नाशिकच्या मकरंद उगले याने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत मकरंद उगले (प्रथम), किरण मराठे (द्वितीय), नीलेश ठाकरे (तृतीय) क्रमांकाने विजयी झाले. या विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये देऊन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रविवारी सकाळी आसाराम बापू पूल येथून करण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक, नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जसपाल सिंघ बिरदी, राज लुथरा यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला. शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. दहा किमी अंतरासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.

सर्वप्रथम स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रथम १०० स्पर्धकांना टी शर्ट आणि हेल्मेट वाटप करण्यात आले. बोट क्लब ब्रिज, चांदशी रोड, कॅनॉल, मुंगसरा रोड, मातोरी, भाग्योदय कॉलनीमार्गे पुन्हा बोट क्लब ब्रिज असा या स्पर्धेचा मार्ग होता. पारितोषिक वितरणावेळी महापौर अशोक मुर्तडक म्हणाले, सातत्याने वैभवशाली असे आणि समाजाची बांधिलकी जपणारे उपक्रम नाशिक सायकलिस्टतर्फे राबवण्यात यावेत.

नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपाल सिंघ बिरदी म्हणाले की, पेपर वितरकांसाठी अशा स्पर्धेचे आयोजन करायची खूप इच्छा होती, आपण रोज पेपर वाचतो पण कधी हा विचार करत नाही की हा पेपर घरी योग्य वेळेत येतो कसा? सायकलचा दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थाने वापर करणाऱ्या लोकांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा नाशिक सायकलिस्टतर्फे यापुढेही नेहमीच आयोजित करण्यात येतील.

यावेळी सायकल असोसिएशनचे डॉ. महाजन बंधू, मनीषा रौंदळ, सुनील खालकर, दत्तू आंधळे आणि रत्नाकर आहेर, नाशिक वृत्तपत्र वितरक संघटनचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सरचिटणीस विनोद पाटील, रमेश महाले, जयवंत माळी, राजेश नडगे, नाना पुंड, राहुल दुसिंग, भास्कर निंबाळकर, पंकज भदाणे, उमेश जोशी, नितीन पाटील आदी पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय खेळाडूंचा प्रशिक्षक

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक ही खेळाडूंची भूमी आहे हे अधोरेखित झाले आहे. याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना तयार करण्याचे काम ७३ वर्षीय बाला गोविंद करीत आहेत. आजही त्यांचा उत्साह तरुण प्रशिक्षकाला लाजवेल असाच आहे.

बाला गोविंद हे मुळेचे केरळ येथील त्रिवेंद्रमचे. लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने ते फुटबॉल खेळाकडे आकर्षित झाले. पुढे बी.एस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण करुन वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला, मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. एक दिवस वर्तमानपत्रात बी.पी.एडच्या प्रवेशाची जाहिरात आल्याने त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करुन तेथे प्रवेश घेतला. त्यांनी इंजिनीअर व्हावे ही घरच्यांची इच्छा होती, मात्र फिजिकल एज्युकेशनला प्रवेश घेतल्याने घरच्यांची त्यांना नाराजी पत्करावी लागली.

बी.पीएडला प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी हेच करिअर निवडायचे असे ठरवले. त्यानंतर एम.पी.एडदेखील पूर्ण केले. या कालावधीत त्यांनी फुटबॉलचे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने गाजवले. त्यांचा एक मित्र मुंबई येथे शिक्षक म्हणून नोकरी करीत होता. त्याच शाळेतील दुसरे शिक्षक काही कालावधीसाठी सुटीवर जाणार असल्याने त्यांच्या जागी बाला गोविंद यांनी तात्पुरते काम करावे असा सल्ला त्याने दिला. त्याच्या आग्रहाखातर ते केरळहून मुंबईला आले व तेथे गणित शिकवू लागले. गणित शिकवित असताना त्यांचा कल मात्र खेळाकडे होता. या कालावधीत त्यांनी गणिताबरोबरच मुलांना खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पुढे दुसरे शिक्षक कामावर रुजू झाल्यानंतर याच कॉलेजमध्ये त्यांनी खेळाचे प्रशिक्षक म्हणून नोकरी करावी अशी व्यवस्थापनाने विनंती केली. त्यांच्या आग्रहाखातर ते खेळाचे प्रशिक्षक म्हणून तेथेच रुजू झाले.

खऱ्या अर्थाने येथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनतर त्यांनी मुंबई येथील सेंट मेरी हायस्कूल, बुरहानी कॉलेज, मुंबई वायएमसीए, गोएंका अॅन्ड असोसिएट एज्युकेशन ट्रस्ट, बोरीवली मांडपेश्वर स्पोर्टस् क्लब, अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे अॅथलेटिक्स प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. याच कालावधीत त्यांनी अदिले सुमारीवाला, भक्तावार खंबाटा, डॉमनिक अल्फान्सो, मधु शिवदत्त, जी. श्रीनिवासन, राजीव बाल क्रिश्नन, प्रवीण जॉली असे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार केले. त्यानंतर त्यांची नाशिक डिस्ट्रिक्ट अॅथलेटिक्स असोसिएशनचे हेमंत पांडे यांची भेट झाली. त्यांनी गोविंदसरांना नाशिकला येऊन खेळाडू तयार करण्याची विनंती केली. त्यानुसार खेळाडू तयार करण्यास सुरुवात केली. मुलीचे लग्न असताना त्यांना खेळाडूंचा संघ घेऊन बाहेरगावी घेऊन जाण्याची वेळ आली. त्यांनी मुलीच्या लग्नाला न थांबता संघ घेऊन ते रवाना झाले.

आजही वयाच्या ७३ व्या वर्षी ते पहाटे दोन वाजता उठतात. सकाळी मेडिटेशन योगा करुन पहाटे पाच वाजता एचपीटी कॉलेजच्या मैदानावर हजर राहातात. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी २५ ते ३० खेळाडू नियमित अॅथलेटिक्सचा सराव करुन घेतात. आजपर्यंत त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी १०० ते १५० खेळाडू तयार केले आहेत.

खेळाच्या माध्यमातून त्यांचे विद्यार्थी विविध ठिकाणी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या शिष्यांना राज्य व केंद्र सरकारने विविध पारितोषिके देऊन सन्मानित केले आहे. त्यात छत्रपती पुरस्काराचा देखील समावेश आहे. माझ्या शिष्यांना छत्रपती अॅवॉर्ड मिळाला म्हणजे मला अॅवॉर्ड मिळाला असे त्यांचे म्हणणे आहे. सामाजिक संघटनांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत खेळाडू प्रशिक्षित करीत
रहाणार असे ते म्हणतात. ज्या दिवशी नाशिकचा खेळाडू ऑलिम्पिक खेळेल तो दिवस माझ्यासाठी संस्मरणीय ठरेल असे ते म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यपदार्थांच्या किमतीत चढ-उतार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लागोपाठ आलेल्या सणांमुळे खाद्यपदार्थांच्या किमती अवास्तव वाढल्या होत्या. यामुळे महागाईचा भडका उडाला होता. तूरडाळ, तांदूळ, साखर, गूळ या पदार्थांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या होत्या. किमती कमी झाल्या असल्या तरी आजही या वस्तूंचे भाव सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने जास्तच आहेत. पाच ते दहा रुपयांनी फक्त किमती कमी-जास्त झाल्या आहेत.

तूरडाळ गेल्या महिन्यात दोनश रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. मात्र साठेबाजांवर कारवाई केल्यानंतर भााव दीडशे रुपयांपर्यंत खाली आले. महिनाभरापासून हे दर टिकून आहेत. उडीद डाळीचे दरही महिनाभरापासून जैसे थे आहेत. शेंगदाणा, साखर, गूळ यांचे दर दोन ते पाच रुपयांनी कमी-जास्त झाले आहेत. तांदळाची किमत थोडी कमी झाली असली तरी यंदा अवकाळी पावसामुळे तांदळाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे किमती पुन्हा वधारण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images