Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भारतनगरमधून सहा जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतनगर झोपडपट्टी येथे जागेच्या वादातून झालेल्या दंगलीच्या घटनेनंतर पोलिसांनी सोमवारी रात्री राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सहा संशयितांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त केली.

अलीम करीम शेख, मोसीन अलियार पठाण, शेख बशीर पिरजाद यांना धारदार शस्त्रासह पोलिसांनी अटक केली. अलीम शेख व त्याचे दोन साथिदार हातात लोखंडी कोयता घेऊन दमबाजी करीत होता. याचवेळी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर, पोलिसांनी सर्फराज हसीन शेख, मुझ्झफर कादीर शेख, अर्शद मुक्तार मंसुरी यांनाही शस्त्रासह अटक केली. भारतनगरमध्ये अजूनही शांतता प्रस्थापित झाली नसल्‍याचे या घटनेवरून स्पष्ट होते. दरम्यान, जागेच्या वादातून दाखल झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी नगरसेवक संजय साबळेसह इतरांची शोध मोहीम हाती घेतली असून, साबळे यांच्या संपर्क कार्यालयाची झडती घेण्यात आली. हे काम इतर ठिकाणी सुरू असून, लवकरच संशयितांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कोम्बिंगमध्ये ६६ गुन्हेगारांवर कारवाई

नाशिक : शहर पोलिसांनी सोमवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवत ६६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस उपायुक्त एन. अंबिका आणि श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रात्री साडेनऊ ते ११ वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. ठिकठिकाणी नाकाबंदी करीत पोलिसांनी सर्व झोपडपट्टींची पाहणी केली. याशिवाय हॉटेल तसेच लॉजची पाहणी करीत संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. यावेळी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यात एकूण १३५ पैकी ६६ गुन्हेगार पोलिसांना सापडले. प्रबुद्ध नगर झोपडपट्टी, संतोषी माता नगर झोपडपट्टी, श्रमिक नगर, विश्वास नगर या झोपडपट्ट्यांमध्ये ३० गुन्हेगार तपासून १३ जणांवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली. तर, दोन जणांना जामीनपात्र आणि एकाविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. लेखानगर, शांतीनगर, रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरातून पाच जणांना ताब्यात घेतले होते.

वडाळा गाव, भगसिंग नगरमधून सात गुन्हेगारांना ताब्यात घेत पोलिसांनी तीन वाहनचालकांवर कारवाई केली. समता नगर, पंचशीलनगर, आम्रपाली झोपडपट्टी, फर्नांडिसवाडी, रोकडोबावाडी इत्यादी ठिकाणाहून चौघांना ताब्यात घेण्यात आले. तर, १७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नाकाबंदी करून ३५३ वाहने तपासण्यात आली. त्यातील ४१ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोघांचा मृत्यू

पंचवटीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा रोडवरील उड्डाणपुलावर दुचाकी स्लीप झाल्याने महेश दयाराम तिवारी (वय ४४) यांचा मृत्यू झाला. ओझरमिग येथील तांबटलेन परिसरातील गोकुळ कॉम्प्लेक्स तिवारी व्यंकटराव हिरे कॉलेजसमोरील उड्डाणपुलावरून दुचाकीने जात असताना त्यांची दुचाकी स्लीप झाली. अन्य एका घटनेत वाहनाच्या चाकात हवा भरताना वाहनसमोर उभे असलेल्या भगाभाई गणपतभाई चक्काभाई परमार यांच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुजराथ राज्यातील खेडा जिल्ह्यातील कळवण येथे राहणारे परमार रासबिहारी चौकात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जीजे 0७ व्हीडब्ल्यू २९७९ क्रमांकाच्या वाहनात हवा भरत असताना वाहन पुढे सरकले. परमार नेमके चाकाखाली सापडल्याने मृत्युमुखी पडले. या दोन्ही घटनांबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योगा हॉलला दुरवस्थेचे ग्रहण

$
0
0

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५८ मध्ये पाटील गॅरेजच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या भूखंडावर नगरसेवक निधीतून महिलांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी योगा हॉलची निर्मिती करण्यात आली; मात्र त्या नवनिर्मित हॉलच्या खिडक्यांच्या काचा, परिसरात लावण्यात आलेल्या जाळ्या, पिण्याच्या पाण्यासाठी असलेला नळ, पाणीपुरवठा करणारे पाईप देखील उखडून नेण्यात आले आहे. उदघाटनापूर्वीच योगा हॉलची अशी दयनीय अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिस गस्तीची मागणी सांयकाळी अनेकदा मद्यपी आणि गुंड व्यक्तींचा त्रास वाढत आहे. पोलिसांनी नियमितपणे गस्त घालावी जेणेकरून अशा लोकांकडून होत असलेला उपद्व्याप कमी होईल तसेच स्थानिक महिला देखील या हॉलचा वापर करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय हॉलच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास हॉलेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना पकडणे सोयीचे होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

महिलांना प्रतीक्षा हॉल वापराची प्रभाग क्रमांक ५८ च्या महिला नगरसेविका वैशाली दाणी यांनी आपल्या निधीतील सुमारे १८ लाख रुपये खर्च करून योगा हॉलची ५ महिन्यापूर्वी निर्मिती केली; मात्र केवळ उदघाटनाअभावी महिलांना याचा वापर करता येत नसून हॉल वापराविना पडून आहे. स्थानिक महिलांनी येथे कलशपूजन करून विविध सामाजिक उपक्रम हॉलमध्ये सुरू केले. मात्र, काही समाजकंटकांच्या गोंधळामुळे महिला धास्तावलेल्या आहेत. त्या या हॉलमध्ये जाण्यास उत्सुक नसल्याचे समजते.

स्थानिक नागरिकांनी महापालिकेची संपत्ती ही आपली संपत्ती समजून त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पोलिस व प्रशासन प्रत्येक क्षणाला घटनास्थळी पोचणे शक्य नसते. जागरुक नागरिकांनी अशा नुकसान करणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे गरजेचे आहे. - वैशाली दाणी, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्युझियम ऑन व्हिल्स’ मधून इतिहासाचे दर्शन

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : मुघलकालीन कलाकुसर, शस्त्रे, पोषाख, दागिने, बुद्धकालीन कलाकुसर अशा विविध ऐतिहासिक वस्तू आजच्या काळात विद्यार्थ्यांना बघण्यास मिळणे, दुर्मीळ झाल्याचे दिसून येते. त्यांचे विद्यार्थ्यांना दर्शन घडावे, यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची 'म्युझियम ऑन व्हिल्स' ही बस नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील आश्रमशाळेला भेट देणार आहे.

इगतपुरीतील महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत गुरुवारी (दि.७) सकाळी ११ वाजता ही बस जाणार आहे. मुघलकालीन कलाकुसरीबरोबरच विविध कालखंडातील नाणी, फोटोग्राफ्स, राजांच्या राजवटीतील शस्त्रे, चित्रकला यांची माहिती या बसमधून मिळणार आहे. याशिवाय मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ऑडियो-व्हिडिओ व्हिज्युअल्स ऐकण्याची व बघण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

प्रत्येकालाच मुंबईत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे वैभवशाली दालन बघणे शक्य होतेच असे नाही. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर अशी भेट देणं म्हणजे दुर्मीळ बाब. पण या वस्तूंचे महत्त्व तर त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ते पोहोचावे, यासाठी या बसची विशेष रचना करण्यात आली आहे. त्यामुळे हे म्युझियमच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटीला आता येणार आहे. भारतीय पुरातन संस्कृतीचे दर्शन तसेच इतिहासाची ओळख या बसद्वारे विद्यार्थ्यांना होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या 'आधुनिकीकरण' या प्रकल्पांतर्गत मागील दोन ते अडीच वर्षांपासून या बसच्या रचनेवर काम सुरू होते. हे काम आता प्रत्यक्षात उतरले आहे.

ही बस वातानुकूलित असून, त्यात आसनव्यवस्था नाही. केवळ ऐतिहासिक वस्तूच त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या असतील. त्याबरोबरच यातील प्रत्येक वस्तूची माहिती देणारी माहितीपुस्तिका, दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेललिपीमधील माहिती पुस्तिका, बसमध्ये व्हिलचेअर घेऊन जाण्यासाठी रॅम्प, वस्तूंची माहिती देण्यासाठी वस्तूसंग्रहालयातील मार्गदर्शक असणार आहे.

विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख होण्यासाठी 'म्युझियम ऑन व्हिल्स' ही बस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी तर उपक्रम अविस्मरणीय असणार आहे.

- जितेंद्र गोस्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक, त्र्यंबकला शासकीय वसतिगृह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात मागासवर्गीय मुलींसाठी नवीन ५० शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे नवीन वसतिगृह होणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे मुलींचे शासकीय वसतिगृह मंजूर व्हावे, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. यात सात वसतिगृह हे २५० क्षमतेची विभागस्तरावरील व ४३ वसतिगृह १०० क्षमतेची तालुकास्तरावरील आहेत. नाशिक विभागात नाशिक येथे २५० क्षमतेचे विभागस्तरीय वसतिगृह, त्र्यंबकेश्वर येथे १०० क्षमतेचे, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर व लोणी येथे मुलींच्या १०० क्षमतेच्या नवीन वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे.

मुलींसाठीची सर्व शासकीय वसतिगृहे हे सुसज्ज अशा शासकीय इमारतीमध्ये कार्यरत करण्याचा शासनाचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मदिनी मिळणार गोदामाईच्या आरतीची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी आपल्या आप्तेष्टांना नाशिकच्या गोदामाईची आरती करण्याच्या बहुमानाचे अनोखे गिफ्ट द्या, अशी अभिनव संकल्पना ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन आणि पुरोहित संघाने मांडली आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या सायंकाळसाठी गोदेच्या आरतीचे बुकिंगही मोफत होणार आहे.

भारतात हरिव्दार, काशी, अलाहाबाद यासारख्या तीर्थक्षेत्रीही गंगेची महाआरती रोज सायंकाळी करण्यात येते. नाशिकमध्येही गोदा आरतीचा उपक्रम अलिकडे सुरू झाला असला तरीही त्यात सर्वसमावेशकता येण्यासाठी पुरोहित संघाचे प्रयत्न सुरू होते. याला 'तान, नाशिक' यांनी साद देत ही अभिनव संकल्पना नाशिककरांसमोर मांडली आहे. देशातील इतर तीर्थक्षेत्री गंगेची आरती स्थानिक पुजाऱ्यांव्दारे केली जाते. त्यामुळे बाहेरून जाणारे भाविक व पर्यटक केवळ या आरतीचे साक्षीदार बनू शकतात. मात्र, नाशिकमध्ये हीच गोदा आरती सर्वांसाठी खुली करून देण्यात येत आहे. यंदा मकर संक्रांतीच्या मुहूर्तापासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी महापालिका, पर्यटन विकास महामंडळ यांसह शहरातील व्यापारी परिवार, हॉटेल्स आणि सामान्य नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी (०२५३) २३१८४१८ आणि ९८२३१८७८०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांच्या खाऊगिरीला शंभरकरांचा चाप

$
0
0

जिल्हा परिषदेचे सीईओ शंभरकर यांना रुजू होवून महिनाच झाले आहे. त्यांना काम करण्याची संधी देण्यापूर्वीच ते काही पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात सलू लागले आहेत. फाईलीची खातरजमा केल्याशिवाय ते फाईलींवर सह्या करत नाहीत, कामातील त्यांच्या या काटेकोरपणामुळे अर्धे ठेकेदार असलेल्या पदाधिकाऱ्यांची मात्र अडचण झाली असून, त्यांनी थेट शंभरकर हटाव मोहीम सुरू केली आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या या अविश्वास प्रस्तावावर १३ सदस्यांनी सह्या केल्या असल्या अपेक्षित ४८ सदस्यांचे संख्याबळ जमविण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यातच सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याची पालकमंत्र्यानीच कान उपटल्याने आता, ही मोहीम थंडावण्याची शक्यता आहे. तरीही या पदाधिकाऱ्यांनी १३ तारखेला पुन्हा बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या सर्व प्रक्रियेला जिल्हा परिषदेतील माजी सीईओ हे खतपाणी घालत असल्याची चर्चा असून, या मोहिमेला त्यांचेच बळ असल्याचे बोलले जात आहे. परंतु शंभरकर हे पालकमंत्र्यांच्या गोटातील असल्याने त्यांच्यावरील अविश्वास बारगळण्याचीच शक्यता अधिक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक व्टिटने ‌दिली अपंगांच्या वाहनांना जागा

$
0
0

नाशिकरोड येथे अपंगांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असूनही त्यांना पार्किंगची जागा उपलब्ध होत नसल्याने अपंगांजे हाल होत होते. त्यांच्यासाठी पुरेशी सुविधा तातडीने उपलब्ध करावी, अशी मागणी व्टिटरव्दारे करण्यात आली. हा मेसेज दिल्लीत दक्ष रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंपासून मुंबईपर्यंतच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पाठविण्यात आला. दिल्लीहून आदेश आल्यानंतर त्याची दखल रेल्वेला घ्यावी लागली. वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली केल्या आणि स्थानकाच्या आवारातीलच अपंगांसाठीची आरक्षित जागा त्यांच्यासाठीच राखीव राहील यासाठी कारवाई करण्यात आली. अपंगांसाठी पार्किंग असे लिहूनही त्यावर अन्य व्यक्तींनी वाहने उभी केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

आरपीएफची कारवाई रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वेस्थानकात मंगळवारी अनाधिकृत पार्किंग केलेल्या चार वाहनांवर कारवाई केली. रेल्वे कायद्यातील विविध कलमांखाली या वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पार्किंग करायचे कुठे ? नाशिकरोड रेल्वेस्थानकात पे अँड पार्क तत्त्वावर देवी चौकात रेल्वे पार्किंग सुविधा आहे. मुंबईला प्रवास करणारे नोकरदार व अन्य प्रवासी या वाहनतळाचा वापर करतात. मात्र, तेथून स्थानकावर जाऊन रेल्वेगाडी पकडताना वेळ जातो व प्रचंड ओढाताण होते. त्यामुळे काही प्रवासी तिकीट बु‌‌किंग कार्यालय, पार्सल कार्यालय तसेच आरपीएफ कार्यालयामागील मोकळ्या जागेत गाड्या उभ्या करतात. स्थानक आवारात दुचाकी गाड्या अस्ताव्यस्त उभ्या केल्याने चार चाकी वाहनांना स्थानकात प्रवेश करता येत नाही. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिकरोडला पाहणी दौऱ्यावर आल्यावर या वाहनांवर रेल्वे सुरक्षा दलातर्फे कारवाई केली जाते. मात्र, अधिकारी गेल्यावर पुन्हा वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. यामुळे अपंग वाहन चालकांना दुचाकी उभी करुन रेल्वेगाडी पकडणे अशक्य होते.

रेल्वेस्थानकात अपंगांना दुचाकी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना वरिष्ठांकडून आम्हाला प्राप्त झाली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही करत स्थानक आवारात अपंगांसाठी जागा ठेवण्यात आली आहे. - बी. डी. इप्पर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल

अपंगांच्या दुचाकीसाठी पूर्वीपासूनच जागा आरक्षित होती. रेल्वेस्थानक आवारात तसा सूचना फलकही लावण्यात आला होता. मात्र, अन्य वाहनचालक दादागिरी करुन तेथे गाड्या पार्क करत होते. आता अपंगांची ही जागा बॅरिकेट लाऊन आरक्षित करण्यात आली आहे. - एम. बी. सक्सेना, नाशिकरोड स्थानकप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार हेच देशाचे भविष्य

$
0
0

गेल्या २०-२५ वर्षांत कामगार चळवळीने देशात मोठा वेग घेतला आहे. सुमारे १५ वेळा तर भारतबंद आंदोलन झाले. जगाबरोबर देशही नव्या कालखंडातून प्रवास करीत आहे. जागतिकीकरण, उदारीकरणाच्या काळात देशात विकास-विकासाचा दर हे शब्द रोज कानावर पडताहेत. ५० वर्षापूर्वी विमा-बँकासारख्या संस्थांच्या राष्ट्रीयीकरणावर देशात मोठा भर होता. त्यामधून देशाच्या सर्वंकष विकासाचे विचार तत्त्वज्ञान मांडण्यात आले. आज नेमके त्याच्याविरूद्ध विचार मांडले जात आहेत. तेव्हा स्वाभाविकच २५ वर्षांत कष्टकरी जनतेची प्रत्यक्षात परिस्थिती सुधारली की बिघडली, या गोष्टी कोणीही अगदी सामान्य कामगार किंवा शेतकरी देखील पाहणार. तो प्रत्यक्ष अनुभवणार! यावर देशभर चर्चा होणार, अर्थातच ती उलटसुलट. हीच गोष्ट सध्या देशात जोमाने चालू आहे.

- श्रीधर देशपांडे

काही मूलगामी गोष्टी समजावून घेणे आवश्यक आहे. पोटाला चिमटा घेऊन आर्थिक नुकसान कामगार सहजासहजी सहन करावयास तयार नसतो. गळ्याशी आल्याशिवाय तो संपात उतरत नसतो. अपवाद सोडल्यास नेते किंवा संघटनांच्या नेतृत्व कौशल्याने केवळ कामगार लढाईत उतरत नाही. सत्याच्या आधाराशिवाय संप वा चळवळ होऊ शकत नाही. 'यांना काम करायला नको. फक्त पगारवाढ पाहिजे. यांचे कायम मोर्चे आणि संप चालू असतात. मोर्चाने जनतेचे किती हाल होतात इत्यादी इत्यादी'. 'याची युनियनवाल्यांना जाणीव असते का?' असे टोमणे ऐकायला मिळतात. मालकांना उद्योग चालवतांना किती अडचणींना तोंड द्यावे लागते? प्रसंगी देशप्रेम, देशभक्तीच्या गोष्टी शिकवल्या जातात.

अशा प्रकारच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही असे नाही. पण विचार तुलनात्मक व्हावयास हवा. जरा प्रत्यक्ष परिस्थितीचा धावता आढावा घेऊ. बँक-विमा क्षेत्रात गेल्या २० वर्षात नोकरभरती जवळजवळ नाही. राज्य कर्मचाऱ्यांच्या तीन लाख रिक्त जागा राज्य सरकार भरावयास तयार नाही. ही नोकर भरती करण्याऐवजी उलट राज्यात २ लाख चतुर्थश्रेणी कामगारांच्या जागा भविष्यात भरणार नाही, अशी घोषणा करण्यात आली. तेव्हा युवकांना नोकऱ्या कशा मिळणार? कंत्राटी-कामगारांकडून काम करून घेणे जिकडे तिकडे चालू आहे. खाजगी क्षेत्रात ७० टक्के तर सार्वजनिक क्षेत्रात ५० टक्के हे कंत्राटी कामगार आहेत. त्यांना काही कालावधीनंतर का कायम करावयाचे नाही याचे देशात कोणी उत्तर देऊ शकेल का? त्यांना किमान वेतन, पेन्शन, पीएफ आदी का देण्यात येत नाहीत याचे सरकार वा टीकाकार उत्तर देईल का? याला उत्तर जर देता येत नसेल तर मार्ग दाखवावा लागेल.

आजच्या चळवळीच्या सर्व मागण्या या फक्त जगण्याइतकेच वेतन द्या, एवढ्या पुरत्याच खरं म्हणजे मर्यादित आहेत. किंबहुना याच मागणीला सर्वात जास्त महत्त्व व मागणीला भर आहे. या मागणीचे नाव आहे किमान वेतन. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की किमान वेतन ज्याला देता येत नाही त्याने कारखाना काढू नये वा चालवू नये. आणखी एक महत्त्वाची आकडेवारी - ग्रामीण भागातील ८० टक्के लोक दरडोई दररोज ५० रुपयांपेक्षा कमी खर्च करतात. तर १ टक्का घरांमध्ये ४९ टक्के संपत्ती आहे. (स्त्रोत : क्रेडिट सुइझे जागतिक अहवाल) आकडेवारी देणे प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. मुद्याला येण्यापुरतीच ती दिली आहे.

ही परिस्थिती देशासाठी किती गंभीर आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनानिर्मितीवेळी ताकीद दिली होती की, 'समता-स्वातंत्र्य-बंधुत्व शासन निर्माण करू शकले नाही तर लोक घटनेला ठिकाणावर ठेवणार नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात तर त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना (१९३६ मध्ये) केली. त्यावेळी सुद्धा कामगारांना योग्य पगार, नोकरीची शाश्वती, बोनस, पेन्शन, सामाजिक सुरक्षा, बेकारी निवारण, भूमिहीनांना कामाचा पुरवठा अशा अनेक गोष्टी सदर पक्ष करेन असा कार्यक्रम जाहीर केला. त्यांनी राज्य घटनेमध्ये देखील अशीच मार्गदर्शक तत्त्वे लिखित केली असून देशात संपत्तीचे थोड्या हातांमध्ये केंद्रीकरण होता कामा नये असे कलमच टाकले आहे (कलम २ सी). या अशा विचारांना पायाभूत धरून डॉ. बाबासाहेबांनी घटनेची निर्मिती केली. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, राधाकृष्णन, राजेंद्र प्रसाद अशा सर्व देशप्रेमी स्वातंत्र्यसेनानींचा सहभाग आणि पाठिंबा होता. कामगार संघटना बांधणे हा घटनेने कामगारांना मूलभूत अधिकार (कलम १९ (३)) म्हणून दिला आहे, तो या विचारांपोटीच.

तेव्हा कामगार चळवळीकडे कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीकोणाबरोबरच देशाचे भविष्य या दृष्टीकोनातूनसुद्धा बघितले गेले पाहिजे. म्हणून समाजामधून संघटनांमध्ये येणाऱ्या अपप्रवृत्तींना नेतृत्वाने-सांघिकरित्या आळा घातला पहिजे. राजकीय स्वार्थापोटी कामगारांच्या लढाया पुकारणे वा लढाईतून माघार घेणे हे कोणाच्याच हिताचे नाही. कामगार कायद्यांना धरून तसेच चळवळीमध्ये त्यागाची भूमिका हवी. आजची चळवळ ही जागतिकीकरणाच्या काळात पर्यायाने जगातील साम्राज्यवादी शक्तींच्या विरोधात देखील उभी असते. तेव्हा कार्य कठीण आहे हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे. तरीही कार्य श्रेष्ठ म्हणून पुढे नेले पाहिजे.

(लेखक कामगार चळवळीतील ज्येष्ठे नेते आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत धार्मिकस्थळांचे आजपासून सर्व्हेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेनेही शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळांचे नव्याने गुरूवारपासून सर्व्हेक्षण सुरू केले आहे. सन २००९ पूर्वीची ३८४ आणि नंतरची १७५ धार्मिक स्थळांची नव्याने तपासणी केली जाणार आहे. पोलिस संरक्षणात आठवडाभर ही मोहीम चालणार असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, सरकारी पातळीवर या धार्मिक स्थळांच्या सर्व्हेक्षणाचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार पालिकेने गुरूवारपासून शहरातील धार्मिक स्थळांचे नव्याने सर्व्हेक्षण व तपासणी सुरू केली आहे. शहरात सद्यस्थितीत २००९ पूर्वीची ३७४ अनधिकृत स्थळे आहेत. तर २००९ नंतरची १६९ अनधिकृत धार्मिकस्थळे यापूर्वीच्या सर्व्हेक्षणात समोर आली आहेत. या स्थळांचा नव्याने सर्व्हेक्षण करून कोणती स्थळे नियमित करता येतील, किती स्थलांतरीत करता येतील आणि किती धार्मिकस्थळे पाडावी लागतील याची चाचपणी केली जाणार आहे. काही धार्मिक स्थळांकडून या सर्व्हेक्षणाला विरोध होण्याची शक्यता आहे. मोहिमेसाठी पालिकेने पोलिस आयुक्तांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. ती पूर्ण झाल्याने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगमंत्री देसाई उद्या नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांनी उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण करावे, महिला उद्योजक उत्पादीत करीत असलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने ८ ते १० जानेवारी दरम्यान प्रेरणा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.

चोपडा लॉन्स, गंगापूर रोड येथे हे प्रदर्शन होणार आहे. उद्‍घाटन सत्राला मंत्री दादा भुसे, धावपटू कविता राऊत, चेंबरचे अध्यक्ष शंतनुराव भडकमकर यांची उपस्थिती असणार आहेत. प्रेरणा या प्रदर्शन श्रृखलेतील चौथे प्रदर्शन आहे. २०१२ व २०१५ मध्ये नाशिक येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. २०१३ मध्ये मुंबई येथे झालेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाशिकच्या महिलांनी केलेल्या मागणीमुळे प्रदर्शन नाशिक येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात महिला उद्योजकांचे ८० स्टॉल्स मांडण्यात येणार आहे. यावेळी महिला बचतगटांनाही यात सहभागी करुन घेतले जाणार आहे. या प्रदर्शनात वस्त्र प्रणाली, सौंदर्य प्रसाधने, गृहपयोगी वस्तू, दागिने आणि अलंकार, इतर सेवा व तज्ज्ञ सल्ला प्रबोधन सेवा बँकींग, विमा, आरोग्य, वाहन, उद्योग आदींचे स्टॉल असणार आहे. 'ना नफा ना तोटा' या तत्वावर असलेल्या या प्रदर्शनासाठी आतापर्यंत ८० टक्के स्टॉल बुकींग झाले आहे. मिलींद गुणाजी हेही उपस्थिती रहाणार आहेत. उद्योजकांच्या वस्तू ग्राहकांना सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. सकाळी दहाला सुभाष देसाई चोपडा लॉन्स येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर महिला विभागातर्फे आयेाजित 'प्रेरणा प्रदर्शन' कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी एकला ते मुंबईकडे प्रयाण करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या विशालला रॉयल सोसायटीचा पुरस्कार

$
0
0

Jeevan.bhawasar@timesgroup.com

केमिस्ट्रीच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीने नाशिकच्या विशाल बिरारचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. विद्यापीठातील पीएचडीचा सर्वोत्कृष्ट संशोधक म्हणून हा गौरव करण्यात आला आहे. लंडनमधील ब्रायटन विद्यापीठातून विशाल सध्या पीएचडी करतो आहे.

सातपूरच्या शिवाजी विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतलेल्या विशालने पदवीपर्यंतचे शिक्षण आरवायके कॉलेजमधून पूर्ण केले आहे. पंचवटी कॉलेजमधून ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये एम. एसस्सी पूर्ण केल्यावर त्याने मुंबईतील एका कंपनीत संशोधन सहाय्यक म्हणून साडेतीन वर्षे काम केले. संशोधन क्षेत्रातील अधिक ज्ञान मिळविण्यासाठी त्याने पीएचडी करण्याचा निर्णय घेतला व संशोधन अहवाल लिहून ब्रायटन विद्यापीठाला पाठवून दिला. संशोधन अहवाल, व्हिडीओ कॉलिंगद्वारे मुलाखत आणि इतर गोष्टींवरून विद्यापीठाने त्याची चाचपणी केली. यावरून प्रभावित झालेल्या विद्यापीठाने त्याला स्कॉलरशिपसह पीएचडीसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून विशाल लंडनमध्ये या विद्यापीठात पीएचडीचे संशोधन करतो आहे. वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठीचे प्रयत्न यावर तो संशोधन करतो आहे. आता त्याचे संशोधन शेवटच्या टप्प्यात असून दोन-तीन महिन्यात पीएचडी मिळण्याची प्रक्रीया पूर्ण होईल.

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा डाऊनलँड विभाग परिसरातील विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा पुरस्काराने गौरव करते. यासाठी विद्यापीठाने विशालसह इतर विद्यार्थ्यांचे नामांकन केले होते. या सर्व नामांकनामधून रॉयल सोसायटीने ब्रायटन विद्यापीठातील पीएचडीचा सर्वाधिक आश्वासक विद्यार्थी हा पुरस्कार देऊन विशालचा गौरव केला. यासोबतच त्याला रॉयल सोसायटीचे मानद सदस्यत्वही मिळाले आहे.

मला असा काही पुरस्कार मिळेल याची मी अपेक्षाही केली नव्हती. हा पुरस्कार माझ्यासाठी सुखद धक्का आहे.

- विशाल बिरार, संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिनकर पाटलांचे आयुक्तांवर शरसंधान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी महापालिकेत कामे होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत, आयुक्तांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयुक्तांनी प्रशासन आपल्यापुरतेच मर्यादीत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाटील यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आयुक्त आल्यापासून शहरातील उद्याने खाक झाली आहेत. घंटागाडी, पेस्ट कंट्रोल योजनाही वादात अडकली आहे. शहरात समाविष्ट झालेल्या २१ खेड्यांचा विकासही थांबला आहे. प्रशासन केवळ किरकोळ आरक्षणे काढण्यातच व्यस्त असून, मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करीत आहे. मनपाच्या शाळांकडे दुर्लक्ष केले आहे. प्रभाग क्रमांक १७ ची कामे रखडली आहेत. महापालिकेत अधिकारीच नागरिक व लोकप्रतिनिधींना भेटत नसल्याने कारभारावर नियंत्रण नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विकासकामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा सल्ला त्यांनी आयुक्तांना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी मातंग समाज ‘रस्त्यावर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करीत अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने काहीवेळ वाहतूकीची कोंडी झाली.

बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली. अग्रभागी अंगावर चाबुक मारणारे पोतराज होते. बी. डी. भालेकर मैदान, शालिमार चौक, नेहरू उद्यान, महात्मा गांधी मार्ग, मेहेर सिग्नल मार्गे आलेल्या या हा मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आदोलकांनी रास्ता रोको केला. मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण द्यावे. सर्व क्षेत्रातील अनुशेष भरून काढावा. नागपुरात मातंग समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करावी. आंदोलकांवर दाखल खोटे गुन्हे रद्द करावेत, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सुरू करून थेट कर्ज वाटप करावे, जातीचा दाखला तहसrलदारामार्फत देण्यात यावा, बँड कलावंतांना पोलीस भरतीत प्राधान्य द्यावे. शालिमार चौकात लहुजी साळवे पुर्णाकृती पुतळा बसवावा, अण्णा भाऊ साठे आणि लहुजी साळवे यांच्या जयंतीसाठी १० लाखांची तरतूद केली जावी, गायरान जमिनींचे भूमिहिनांच्या नावे वाटप करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिजिटल’मध्ये मास्टर डिग्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डिजिटल सोसायटी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (एमकेसीएल) आणि मुक्त विद्यापीठ यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या मोहिमेचा टप्पा म्हणून लवकरच 'पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इ-एज्युकेशन इन डिजिटल सोसायटी' हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

'शून्य सीमांत किंमत शिक्षण' या तत्त्वावर आधारित नवीन शिक्षणप्रणालींचे एक प्रतिमान विकसित करण्यात आले आहे. डिजिटल समाज निर्मितीच्या उद्दिष्ट्यासाठी पूरक ठरणारे सक्षम शिक्षक घडविण्यासाठी हा उपक्रम पूरक ठरेल, असा विश्वास मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केला. या अभ्यासक्रमात माहिती व ज्ञान पुरविण्याच्या प्रक्रियेमध्ये अध्यापक, विद्यार्थी, समाज विकसनशील कार्यकारी घटक, औद्योगिक-तांत्रिक प्रशिक्षक अशा विविध घटकांचा समावेश असणार आहे.

या सर्व तज्ज्ञ घटकांचा मिळून एक 'ज्ञानाधिष्ठित समाज गट' असेल आणि त्याद्वारे नवीन ज्ञानाच्या देवाण-घेवाणीसाठी एका 'ज्ञान प्रेषक-ग्राहक समूहाची निर्मिती करण्यात येईल. विविध प्रकारच्या ज्ञान-माहितीची उपलब्धता करून देण्यासाठी एक सक्षम आधारगट उपलब्ध होणार आहे. त्यानुसार 'पीजी-डीड्स' या मुक्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेस प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी अध्ययन व विकसनासाठी एका कार्यस्थळाची निवड करेल. अशा कार्यस्थळांमध्ये शाळा, कॉलेज, तांत्रिक शिक्षणसंस्था, समाज विकास केंद्र अशा संस्थांचा समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर स्वच्छतेची पाहणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने देशातील दहा लाख लोकसंख्येपुढील शहरांचे स्वच्छतेचे रँकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेच्या पहाणीसाठी केंद्र सरकारचे एक पथक शुक्रवारपासून चार दिवस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे. पथकामार्फत शहराच्या स्वच्छतेची पहाणी केली जाणार असून, या पथकाच्या अहवालावर नाशिकचे रँकिंग अवलंबून राहणार आहे.

केंद्र सरकारतर्फे सध्या स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेतंर्गत शहरे व ग्रामीण भागाच्या स्वच्छतेवर काम केले जात आहे. त्यात आता केंद्राने देशातील शहरांचे स्वच्छतेच्या बाबतीत रँकिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील १० लाख लोकसंख्येपुढील ७५ शहरांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या शहरामध्ये स्वच्छतेसंदर्भात सुरू असलेल्या योजनांची तपासणी केली जाणार असून, शहराला रँकिंग दिले जाणार आहे. या रँकिंगवर शहराला स्वच्छतेबाबत अधिकचा निधीही मिळणार आहे.

अश्विनीकुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्राचे हे पथक शुक्रवारपासून नाशिक दौऱ्यावर येणार आहे. ८ ते ११ जानेवारीदरम्यान हे पथक शहरातील स्वच्छतेची पहाणी करणार आहे. कचऱ्याचे संकलन, कचऱ्याची वाहतूक, प्रक्रिया, विघटन आदिंची माहिती हे पथक घेणार आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालयांसोबत सार्वजनिक ठिकाणांचीही पहाणी पथकामार्फत केली जाणार आहे. महापालिकेच्या माहितीची तपासणी करण्यासह पथक स्वतंत्ररित्या नागरिकांच्या मदतीने गुप्तपणे काही भागांची पाहणी करणार आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने शहराच्या साफसफाईला जोर दिला जात आहे. चार दिवसांच्या पाहणीनंतर हे पथक नाशिकचे रँकिंगही ठरवणार आहे.

सोशल ऑडिटला लागेना मुहूर्त

महापालिकेने शहरात गेल्या शनिवारी केलेल्या पाणीपुरवठ्याचे सोशल ऑडिटचा अहवाल अद्यापही समोर आलेला नाही. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या सोशल ऑडिटवर टीका केल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाण्याचे हे ऑडिट जाहीर करण्याचा मुहूर्त टाळला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

शनिवारी महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे सोशल ऑडिट केले. ऑडिटमध्ये समोर आलेल्या काही मुद्द्यांवरच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरात पाण्याची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केला होता. तर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या ऑडिटवर शंका उपस्थित करीत त्याला विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे. हा सर्व प्रयत्न भाजपसाठी असल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे प्रशासनाने या ऑडिटसंदर्भात आस्ते कदम भूमिका घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर वाद नको म्हणून या प्रक्रियेपासून लांब राहणेच पसंद केले आहे. तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत.

घंटागाडी योजनेचा फायदा

महापालिकेच्या वतीने घंटागाडी योजना राबविली जात असल्याने कचरा संकलनात महापालिकेची कामगिरी चांगली आहे. अन्य महापालिकांमध्ये मात्र कचरा संकलनाची बोंबाबोंब आहे. त्यामुळे घंटागाडी योजनेचा नाशिकचे रँकिंग सुधारण्यास फायदा होणार आहे. सोबतच सध्या स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे नाशिकचे रँकिंग सुधारण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


होर्डिंगमुक्तीची आजपासून मोहीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंग २६ जानेवारीपर्यंत काढून टाकण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर महापालिकेने या आदेशावरील कारवाईला सुरूवात केली आहे. शहर होर्डिंग मुक्त करण्यासाठी महापालिकेने गुरूवारपासून सहा विभागात मोहीम सुरू केली. शहरातील सर्व अनधिकृ होर्डिंग व बॅनर्स या मोहिमेत काढले जाणार असल्याने या मोहिमेमुळे शहरातील रस्ते व चौक मोकळे श्वास घेणार आहेत. पालिकेने निश्चित केलेल्या १०८ जागांपैकी अन्यत्र होर्डिंग आढळल्यास थेट कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली आहे.

हायकोर्टाचे शहरातील होर्डिंग काढण्यासंदर्भात महापालिकांना २६ जानेवारीचा अल्ट‌मिेटम दिला आहे. त्यामुळे पालिकेने २६ जानेवारीपर्यंत शहर होर्डिंगमुक्त करण्याची तयारी केली असून, राजकीय पक्षांना पत्र पाठविण्यासह विभागीय आयुक्तांना तातडीने कारवाई करण्यासाठी आदेशीत केले आहे. बुधवारी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुरूवारपासून होर्डिंगमुक्त नाशिकची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सहा विभागात सहा पथके तयार करण्यात आली असून, कारवाईचे रेकॉर्डच तयार केले जाणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांविरोधात रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

देवगांव (ता. निफाड) येथील अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या मनिषा संजय चोपडे या १७ वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांनी बुधवारी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर भरवास फाटा येथे रास्ता रोको केला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. मनिषाच्या मारेकऱ्यांना पकडण्याची मागणीही करण्यात

आली.

मनिषा चोपडे हिचा अर्धवट जळालेला मृतदेह ३० डिसेंबरला आढळला होता. ही आत्महत्या नसून खून आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. या दृष्टीने तपास न करता पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या कृतीचा घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेनेचे संभाजी पवार, जयदत्त होळकर, विनोद जोशी, राजाभाऊ दरेकर, अमृता पवार आदिंनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मनिषाचा बलात्कार करुन खून झालेला असतांनाही पोलिस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. निफाड येथील पोलिस अधीक्षक दीपक गिरे यांच्या भूमिकेबद्दलही संशय व्यक्त करण्यात आला. मनिषाने आत्महत्या केली आहे, असे विधान गिरे यांनी केल्याने देवगवचे ग्रामस्थ संतप्त झाले आहे. आंदोलकांना नायब तहसीलदार सोनवणे सामोरे गेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपींना लवकर अटक होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर सोनवणे यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

एक आठवडा उलटल्यानंतरही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. मनिषाचा मृत्यू ही आत्महत्या दर्शवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस अधिकारी दीपक गिरे यांच्या कार्यपद्धतीचा आम्ही निषेध करीत आहोत. एका तरुण मुलीचा जीव जाऊनही पोलिस संवेदनाहीन आहेत.

- कल्याणराव पाटील,
माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिक्षा थांब्यावरील संघटनेचा फलक काढल्याच्या आणि हप्ता न दिल्याच्या कारणावरून तिघा चौघांनी बुधवारी एका रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला केला. सातपूर परिसरातील पपया नर्सरीजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

समाधान सीताराम पाटील (२७, रा. अशोकनगर, मूळ रा. विखरण, जि. नंदुरबार) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. स्थानिक रिक्षाचालकांनी संशयितांबाबत यापूर्वी वेळोवेळी शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारींची गंभीर दखल न घेता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली गेली. त्यामुळे जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत संशयितांची मजल गेल्याचा आरोप होतो आहे.

पाटील सायंकाळी पपया नर्सरीलगतच्या पेट्रोल पंपाजवळून जात असताना अज्ञात तीन ते चार जणांनी त्यांना गाठले. थांब्यावरील संघटनेचा फलक का काढला आणि हप्ता का देत नाहीस अशी विचारणा केली. त्यानंतर धारदार हत्यारांनी त्यांच्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेतील पाटील यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वर्मी घाव बसल्याने आणि अतिरक्तस्त्रावामूळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

घटनेची माहिती समजताच पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलिस निरीक्षक मनोज करंजे आदींनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन रिक्षाचालकाची चौकशी केली. या घटनेमुळे रिक्षा संघटनांमध्ये धुमसणारा वाद पुढे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमंद शिल्पा स्वगृही सुरक्षित!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मानसिकदृष्ट्या दुर्बल आणि घरातून बेपत्ता झालेल्या बदलापूर येथील एका तरुणीला सामाजिक जाणिवेतून तिच्या वयोवृद्ध पालकांपर्यंत पोचविण्याचे काम मनमाडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. आधार शोधत सैरावैरा फिरणाऱ्या या तरुणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जणू देवदूत ठरले.

बदलापूर जवळील वांगणी गावातील शिल्पा या तरुणीला तिच्या पालकांपर्यंत सुखरुप पोचविण्याचे काम विलास कटारे या सामाजिक कार्यकर्त्याने केले. याबद्दल कटारे व त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. आपली गतिमंद मुलगी सुरक्षितपणे घरी आली. ही आयुष्याच्या संध्याछायेत असलेल्या देवधर दांपत्यासाठी मोठी भेट ठरावी.

वीस वर्षीय तरुणी विमनस्क अवस्थेत मनमाडजवळील निमोण रस्त्यावर फिरत असल्याचे काही रिक्षावाल्यांनी विलास कटारे यांना सांगितले. त्या तरुणीच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने कटारे यांनी तिची विचारपूस केली आणि तिला पोलिस ठाण्यात तत्काळ आणले. गतिमंद असलेल्या या मुलीने तिचे नाव शिल्पा देवधर आणि वांगणी बदलापूर असे अडखळत सांगत होती.

पोलिस व कटारे यांनी बदलापूर पोलिस ठाण्यात फोन केला; मात्र वांगणी त्यांच्या हद्दीत नसल्याचे समजले. पालकांचा शोध लागेपर्यंत त्या तरुणीला करुणा रुग्णालयाच्या वसतिगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कटारे यांनी दोन दिवस काळजी घेवून या तरुणीला मनमाडमध्ये सुरक्षित ठिकाणी आश्रय मिळवून दिला. सोशल मीडियावर माहिती देत तिच्या पालकांचा शोध घेण्याचे आवाहन केले. बदलापूर ठाणे परिसरात अनेक ठिकाणी व्हॉटसअॅपवर हा मेसेज देण्यात आला. ठाणे येथील मंगला चांदवडकर यांनी याबाबत वांगणीच्या लोकांशी संपर्क केला.

शिल्पाचे पालक वांगणीमध्ये असल्याचे आणि त्यांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बदलापूर ग्रामीण पोलिसात दिल्याचे स्पष्ट झाले.

दिले जगण्याचे बळं!

आपली मुलगी मनमाडमध्ये सुखरूप आहे या भावनेने निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या देवधर दाम्पत्याला जगण्याचे नवे बळ मिळाले. वयोमानानुसार त्यांची शारीरिक अवस्था बिकट असल्याने ते मुलीला घेण्यासाठी मनमाडमध्ये येण्यास असमर्थ होते. याची माहिती मिळाल्यावर विलास कटारे यांनी त्या तरुणीला थेट तिच्या पालकांपर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत रंगतोय नगरपंचायत प्रचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी
दिंडोरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराने वेग घेतला आहे. खासदार, आमदार, माजी आमदार प्रचाराच्या रणात उतरले आहेत. आपापल्या पक्षांच्या उमेदवाराला निवडून द्यावे यासाठी मतदारांच्या दारोदारी मताचा जोगवा मागत फिरत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. अनेक अपक्षांनी प्रचारात आघाडी घेत पक्षीय उमेदवारांच्या उरात धडकी भरवत निवडणुकीची रंगत वाढवली आहे.

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी सतरा प्रभागांसाठी तब्बल ९१ उमेदवार रिंगणात असून, त्यात ४० अपक्षांचाही समावेश आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे. काँग्रेस १०, तर राष्ट्रवादी सहा जागांवर लढत आहे. शिवसेना-भाजप स्वबळावर लढत असून, अनुक्रमे सोळा व चौदा जागांवर त्यांनी उमेदवार दिले आहेत. एका प्रभागात शिवसेनेने अपक्षाला पुरस्कृत केले आहे. मनसे तीन, तर माकप दोन जागांवर लढत आहे. राष्ट्रवादी आघाडीने प्रचाराचे नारळ फोडण्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करीत वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांसाठी माजी आमदार धनराज महाले यांनी सर्व प्रभागांत, तर खासदार हेमंत गोडसे यांनी काही प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेत सेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसाठी आमदार नरहरी झिरवाळ व माजी आमदार रामदास चारोस्कर हेही मतदारांच्या गाठीभेटी घेत आपली प्रतिष्ठा पणाला लावत मतदारांना सत्ता देण्याचे आवाहन करीत आहेत. भाजपनेही जोरदार व्यूहरचना आखली असून, खासदार हरिश्चंद चव्हाण हे मतदारांच्या संपर्कात आहे. देशात व राज्यात सत्ता असल्याने दिंडोरीची सत्ता भाजपला देण्याचे आवाहन ते करीत आहे. विविध प्रभागात रॅली काढत मतदारांना आपली भूमिका विषद केली जात आहे. तर पक्षीय उमेदवारांचे प्रचाराबरोबरच अपक्षांनीही चांगलीच कंबर कसल्याने सर्वच ठिकाणच्या लढतींमध्ये रंगत वाढली आहे. सारे शहर विविध उमेदवारांच्या होर्डिंग झेंडे आदींनी नटले आहे. दिवसभर विविध लोकप्रिय गाण्यांच्या तालावर गल्लीबोळात प्रचाराचा धडाका सुरू आहे. मात्र, आवाजाच्या गोंगाटाने मतदार पुरते हैराण झाले असून, कधी एकदाचा प्रचार संपतो, असे मतदारांना वाटत आहे. विविध हायटेक प्रचाराचे फंडेही वापरले जात आहे. विविध पक्ष उमेदवारांनी आपले विकास जाहीरनामे, वचननामे बनवले असून, त्याचा प्रभाव मतदारांवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सारे हॉटेलमधेही गर्दी वाढू लागली असून, गुप्त बैठका पार्ट्या सुरु झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images