Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

`त्या` दोघांचा लोंढेच्या कार्यालयात खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक तडीपार गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड आणि सराईत गुन्हेगार निखिल विलास गवळी यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने प्रकाश लोंढे ग्रुपच्या (पीएल ग्रुप) चौघा सदस्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. यातील दोघा जणांना पोलिसांनी अटक केली असून, हत्येची घटना सातपूर परिसरातील जगतापवाडी येथील पीएल ग्रुपच्या कार्यालयातच झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सातपूर परिसरातील अर्जुन आव्हाड आणि अमृतधाम, पंचवटी येथील निखिल गवळी या दोघांचे मृतदेह जव्हार रोडलगत तोरंगण घाटात सापडले होते. ३१ डिसेंबर रोजी त्यांची हत्याची झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करीत पीएल ग्रुपच्या प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार, सनी उर्फ ललीत अशोक विठ्ठलकर आणि निखिल

मधुकर निकुंभ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सावतानगर परिसरात राहणाऱ्या विठ्ठलकर आणि खुटवडनगर येथे राहणाऱ्या निकुंभला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर दोघे अद्याप फरार आहेत. या गुन्ह्यात वापरलेली एमएच १४ बीएफ १२१२ क्रमांकाची एन्डीव्हर फोर्ड ही कार जप्त करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत झोपलेल्या अर्जुन व निखिलवर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ही सिनेस्टाईल घटना जगतापवाडीतील पीएल ग्रुपच्या कार्यालयात झाली. यानंतर आरोपींनी दोन्ही मृतदेह वाहनात टाकून जव्हाररोडलगत फेकून दिले. नगरसेवक लोंढे यांच्या कार्यालयात झालेल्या डबल मर्डर प्रकरणी शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांविरोधात शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवा, अरे बोल ना रे बाबा...!

0
0

संदीप देशपांडे, मनमाड

हॅलो, कोण बोलतंय ?

माझा देव का?

देवा, अरे बोल ना रे बाबा...

असा रागवू नको...

ऐक ना माझं दुःख... !

मनमाड किंवा नाशिक रेल्वे स्टेशनवर कॉईन बॉक्स शेजारी उभ्या असणाऱ्या प्रवाशांना नेहमी ऐकू येणारा हा आवाज अस्वस्थ करतो पण, या भाबड्या आवाजात देवाला हाक देणारी ही महिला गेल्या अनेक महिन्यापासून दररोज हेच करताना दिसते. स्टेशन परिसरात विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या या महिलेला देवाशी काय अन् का बोलायचे असेल बरे, असा प्रश्न हा संवाद ऐकणाऱ्यांना पडतो.

वय चाळीशीच्या आसपास... फाटलेली साडी... विस्कटलेले पांढरे होऊ लागलेले केस अन् दोन्ही पायात वेगवेगळ्या रंगांच्या चपला... हा अवतार पाहिल्यावर मनमाड रेल्वे स्टेशनवरील कोणताही प्रवासी झटकन बाजूला होतो अन् या वेड्या म्हणवल्या गेलेल्या मह‌िलेला जायला जागा करून देतो. ती महिला स्थानकाच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या कॉईन बॉक्सच्या दिशेने जाते... एक कॉईन त्या बॉक्समध्ये टाकते. झटझट कोणतातरी नंबर फिरवते अन् हॅलो हॅलो म्हणू लागते. दरम्यान, नंबर न लागल्याने तो कॉईन पुन्हा बाहेर येतो. पण, संवाद सुरूच असतो... हॅलो, देवा तुच आहेस ना? तु का रे माझा फोन घेत नाही. अजून क‌िती वेळा तुला फोन लावू... माझं तु ऐकून घेणार आहेस की नाही? कुणाला सांगू माझं दु:ख, कोण सोडवेल मला यातून... की तु फक्त ऐकत राहणार आहेस?

हा संवाद आजूबाजूचे प्रवाशी अन् दुकानदाराला आवाक करतात. काहीकाळ त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचा पिंगा रंगतो... हा तिचा संवाद अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. याला कोणी भोळेभाबडेपणा म्हणतो तर कोणी शुद्ध वेडेपणा! पण, कधी ना कधी देव फोन घेईल या आशेवर ही फोनवाली बाईची चिकाटींने दररोज देवाला फोन करायला येते. त‌िच्या या वेडेपणाला वैतागून कॉईनबॉक्सवाला तिला हकलूनही देतो मग ती दुसरीकडे जाते पण देवाला फोन करणे ती सोडत नाही.

देवाचा धावा करणारी ती कोठून आली, तिचे कुटुंबिय कोठे आहेत याची तिलाही माहिती नाही. ‌तिच्याशी कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून जाते. भिकाऱ्यासारखं आयुष्य जगत असलेल्या या महिलेल्या आयुष्यात काही घडलयं का? म्हणून त‌िचा व्यवस्थेवर विश्वास उडालेल्या या महिलेला थेट देवाकडे तक्रार करायची आहे हेही समजायला काही मार्ग नाही. त्यामुळे तिची या संवादामागील करूण कहाणी मात्र अर्धवट राहते.

मनमाड व नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात अशा पद्धतीने विक्षिप्त पद्धतीने जगणारे अनेक स्त्री-पुरूष पहायला मिळतात. त्यांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी कोणी प्रयत्नही करताना दिसत नाही. हीच तर तक्रार देवाशी संवाद साधून तिला करायची नसेल ना?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज, १० जानेवारी रोजी राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोदाघाटावरील यशवंतराव देवलमामलेदार पटांगणावर ही स्पर्धा रंगणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याने २६ डिसेंबर रोजी या स्पर्धा पुन्हा जाहीर करण्यात आल्या. मात्र, कमी सहभागामुळे त्या दिवशीही स्पर्धा होऊ शकल्या नाही. त्यामुळे पुन्हा एकदा १० जानेवारी रोजी ही स्पर्धा होणार असल्याचे संचलनालयातर्फे जाहीर करण्यात आले. आज ही स्पर्धा होणार असून माऊली, साक्षी, ‌शिवमुद्रा यासह एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघातून अंतिमसाठी दोन संघ निवडले जाणार आहेत. अंतिमसाठी एकूण सात विभागातून चौदा संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धा विभागीय (प्राथमिक) व राज्यस्तरीय (अंतिम) अशा दोन टप्प्यात होणार असून अंतिम फेरी २१ जानेवारी रोजी रायगड महोत्सवाच्या सांगता समारोहाच्यावेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे. यापूर्वी ज्या संघांनी या स्पर्धेसाठी आपली नावे नोंदवली आहेत, तेदेखील या स्पर्धेत भाग घेऊ शकणार

आहे.

प्राथमिक फेरीत प्रत्येक महसूली विभागातून दोन संघांची (प्रथम व द्वितीय) अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते संघ घोषित करण्यात येतील. या संघांना शासनाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय संघांना अनुक्रम २५ हजार, १५ हजार रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. अंतिम फेरीत‌ील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांना दीड लाख, एक लाख व ७५ हजार रूपये मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातमाग प्रदर्शन नाशिककरांसाठी पर्वणीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक देशातील हातमाग कारागिरांनी तयार केलेल्या उच्च दर्जाच्या वस्तू वाजवी किमतीत नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एक प्रकारे कुंभनगरीत नाशिककरांना वस्त्रपर्वणीच केंद्र व राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने उपलब्ध करून दिले आहे, असे प्रतिपादन हातमाग प्रदर्शनाचे अधिकारी विजय निमजे यांनी केले.

शहरातील गोल्फ क्लब मैदानावर हातमाग प्रदर्शनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निमजे पुढे म्हणाले, या प्रदर्शनात देशाच्या ११ राज्यांमधून ४८ विविध संस्थांच्या विणकरांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे. मुख्य आकर्षण म्हणजे या प्रदर्शनात स्वत: हातमाग कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे डिलर्स किंवा सबडिलर्स हा प्रकार ठेवण्यात आला नाही. त्यामुळे ग्राहकांना उत्तम दर्जेदार कपडे वाजवी किंमतीत एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत.

या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, पाँडेचेरी, जम्मू-काश्मिर, वेस्ट बंगाल, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील हातमाग कारागिरांनी सहभाग घेतला आहे. देशातील भारतीय संस्कृतीतील विविध उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आणि हातमाग कारागिरांना त्यांच्या कलेला वाव मिळून देणे तसेच ग्राहकांना या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करुन देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. हे प्रदर्शन २४ जानेवारीपर्यंत सुरू राहिल. दुपारी १२ ते रात्री ९ अशी त्याची वेळ असेल. या प्रदर्शनामध्ये टसर कॉटन, टसर सिल्क, मलंबरी सिल्क साडी, ब्लॉक प्रिंट, पैठणी साडी, करबत काठी साडी, टसर ड्रेस मटेरिअल, बनारसी साडी, ड्रेस मटेरियल, तनच्युई सिल्क साडी, सितापूर दरी, आदि उत्पादने उपलब्ध आहेत. या प्रदर्शना‌स नाशिककरांचा चांगला

प्रतिसाद देत असल्याचे निमजे यांनी सांगितले. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले. यावेळी एक्स्पोचे इन्चार्ज दिलीप कुंभार, प्रतिनिधी जी. ओ. पात्रे आदि मान्यवर

उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपारांची ‘लपवाछपवी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तडीपार असलेला अर्जुन ऊर्फ वाट्या रमेश आव्हाड (वय २३) याच्यासह निखील विलास गवळी (वय २२) या दोघांची निर्घूण हत्या करण्यात आल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. तडीपार असलेल्या व्यक्तींचा शहरात होणारा मुक्त वावर आणि त्यातून दोन गटातील वर्चस्ववादाची किनार लाभलेल्या सर्वच गुन्हेगारांची ही लपवाछपवी यथावकाश जीवावर बेतते, हे खुनाच्या घटनेतून स्पष्ट झाले.

सातपूर पोलिसांनी अर्जुनला ६ मार्च २०१४ मध्ये शहरातून तडीपार केले होते. अर्जुनवर काही गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. परिमंडळ दोनमधून मागील दोन वर्षात तब्बल ३३ जणांना तडीपार करण्यात आले. त्यात अर्जुनाचाही समावेश होता. साधारणतः मालमत्ता तसेच शरीराविरोधात सातत्याने गुन्हे दाखल होत असलेल्या संशयित आरोपींना काही वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. हे संशयित गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर किंवा ठाणे जिल्ह्यातील जव्हार आदी ठिकाणी वास्तव्याला असतात. वास्तविक शहराच्या अगदी जवळ असलेली ही ठिकाणी तडीपारांसाठी नंदनवनच ठरतात. अर्धा ते एक तासात शहरात यायचे व पुन्हा परत जायचे, असा दिनक्रम या तडीपार व्यक्तींकडून वापरला जातो. अनेक जण तर शहरातच मुक्कामी थांबातात. यातील काही चुकून शहरात असताना पोलिसांच्या तावडीत सापडतात. आव्हाड मात्र तेवढा सुदैवी ठरला नाही. तडीपार असताना शहरात राहणे त्याला चांगलेच महागत पडले असून, २० ते २२ वयोगटातील या तडीपारांना शहरापासून दूर रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. यामुळे पोलिसांचे काम आणखीनच वाढणार आहे.

पोलिस स्टेशन निहाय तडीपार (कंसात हद्दपारीचा दिनांक)

नाशिकरोड - राही राजू लव्हेरी (२७ फेब्रुवारी २०१४), संतोष रमेश कुशारे (१२ ऑगस्ट २०१४), नवाज ऊर्फ बाबा बब्बू शेख (२२ सप्टेंबर २०१५).उपनगर - देवीदास सुंदरलाल परदेशी (२७ फेब्रुवारी २०१४), इलियास गुलाब शेख (१५ मार्च २०१४), कॅप्टन उर्फ अनिल कपूर सिंग (१९ एप्रिल २०१४), बबलू रामधर यादव (२८ सप्टेंबर २०१५).सातपूर - चेतन अंबादास सावकार (६ मार्च २०१४), जितेंद्र ऊर्फ बंटी राजेंद्र कुलथे (६ मार्च २०१४), अर्जुन ऊर्फ वाट्या रमेश आव्हाड (६ मार्च २०१४).इंदिरानगर - अंकुश पांडूरंग जाधव (१८ मार्च २०१४), फारूख सुभान शहा (२८ मार्च २०१४), इंद्या ऊर्फ विशाल वसंत बंदरे (७ मार्च २०१५), शौकत गुलामनबी शेख (२४ एप्रिल २०१५), बाळू ऊर्फ अक्षय ऊर्फ सुभाष सोपानराव काळे (२३ सप्टेंबर २०१५), जिलानी ऊर्फ जिल्या सत्तार शेख (२७ नोव्हेंबर २०१५), ​बिटवा ऊर्फ किरण रमेश मल्हार (२० नोव्हेंबर २०१५).अंबड - सुनील कोंडाजी उर्फ कोंडीराम काळे (१८ मार्च २०१४), विकास वसंत घोडे (२० मार्च २०१४), नीलेश विनायक कोळेकर (२२ सप्टेंबर २०१४), अनिल कोंडीरम काळे ऊर्फ अनाकोंडा (२३ सप्टेंबर २०१४), जया ऊर्फ जयदेव ऊर्फ महादेव सदावर्ते (२४ सप्टेंबर २०१४), किशोर बबन आव्हाड (७ मार्च २०१५), ​अनिल दशरथ पिठेकर (३१ मार्च २०१५), तात्या बाबू दांडेकर (७ एप्रिल २०१५), दिलीप पांडूरंग सकट (८ जुलै २०१५), हरिष व्यंकट पटेल (३ ऑक्टोबर २०१५), गणेश शेषराव घुसळे (९ ऑक्टोबर २०१५), त्र्यंबक पांडूरंग भास्कर (९ ऑक्टोबर २०१५).देवळाली कॅम्प - जॉन चलन पडेची (१६ सप्टेंबर २०१४), अनिल ऊर्फ अन्नुदास लखन (२४ ऑगस्ट २०१५).

परिमंडळ दोन मध्ये तडीपारांवर झालेली कारवाई

सातपूर ०३

अंबड १३

इंदिरानगर ०८

नाशिकरोड ०३

उपनगर ०४

दे. कॅम्प ०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण होणार जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुलै ते डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २९७ ग्रामपंचायतींच्या नवीन प्रभाग रचना तसेच आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्याबाबतचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने ग्रामपंचायत स्तरावरही आता ग्रामस्थांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.

गेल्या पाच वर्षात खेडोपाड्यांलगत वस्त्या आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ग्रामपंचायतींची नव्याने रचना आणि त्यानुसारच आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप प्रभाग रचना १४ जानेवारीला तयार केली जाणार असून, १९ जानेवारीस संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यास मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर २७ जानेवारीला सोडत पध्दतीने प्रभागाचे आरक्षण ठरविले जाईल. तर, २८ जानेवारीपासून सूचना व हरकती मागविण्यात येतील. स्थानिकांना सहा फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत त्यावर संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याला निर्णय देणे बंधनकारक आहे. २६ फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण असा सर्वच तपशील प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर, आणि मालेगावात एकाही ग्रामपंचायतीची प्रभाग रचना अथवा आरक्षणाचा कार्यक्रम नाही.

तालुकानिहाय ग्रामपंचायत

पेठ ७१

सुरगाणा ६१

त्र्यंबकेश्वर ५७

दिंडोरी ४१

कळवण २२

नाशिक १४

देवळा १३

बागलाण १२

इगतपुरी ५

निफाड १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएल ग्रुपच केंद्रस्थानी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तडीपार गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड आणि सराईत गुन्हेगार निखील विलास गवळी यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने प्रकाश लोंढे ग्रुपच्या (पीएल ग्रुप) चौघा सदस्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून, हत्येची घटना सातपूर परिसरातील जगतापवाडी येथील पीएल ग्रुपच्या कार्यालयातच झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पीएल ग्रुपचा सदस्य प्रिन्स चित्रसेन सिंग याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वैतरणा डॅम परिसरातील पिकनिक पॉइंट हॉटेलवर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ग्रुपचे ३० ते ३५ सदस्य सहभागी झाले होते. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत आव्हाडचा मोबाइल सुरू होता. त्याने त्याच्या वडिलांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. यानंतर त्याचा मोबाइल बंद झाला. दरम्यान, आव्हाडचे घरच्यांशी बोलणे झाल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत आव्हाड आणि गवळी यांचे नाचण्याच्या कारणावरून संशयित आरोपी सिंग, वतन पवार, सनी विठ्ठलकर आणि निखील निकुंभशी बाचाबाची झाली. आव्हाड आणि गवळीने उद्याचा सूर्य पाहू देणार नाही, अशी दमबाजी केल्याने पार्टी अर्धवट सोडून सर्वजण माघारी फिरले.

चौघे संशयित आणि मृत हे पीएल ग्रुपच्या कार्यालत पोहचले. तिथे आव्हाड आणि गवळी झोपलेले असताना संशयितांनी आपल्याकडील बंदुकीने अगदी जवळून त्यांच्या डोक्यावर बंदूक चालवली. यात दोघेही जागेवर मृत्यमुखी पडले. यानंतर संशयितांनी एमएच १४ बीएफ १२१२ या एन्डीव्हर फोर्ड कारमधून दोघांचे मृतदेह तोरंगण गावाच्या शिवारात फेकून दिले. ही एन्डीव्हर कार नेमकी कोणाची हे पोलिसांनी अद्याप सांगितले नसले तरी त्याचाही संबंध लोंढे यांच्याशी असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंभीर दुखापतीचा शोध घेऊ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डोक्यात झालेला गंभीर वार आणि शरीराचा असा कोणताही भाग नाही की त्यावर हल्ला झालेला नाही. थेट जीवे मारण्याचा उद्देश यातून स्पष्ट होत असताना तसेच, डॉक्टारांनी गंभीर दुखापतीचा अहवाल दिलेला असताना सिन्नर एमआयडीसी पोलिसांना मात्र यात गंभीर काहीच आढळून आले नाही. फिर्यादीची बोळवण करण्याचे काम पोलिसांनी केले असून, अर्थकारणामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादी संदीप सोमनाथ चांदगुडे (वय ४२) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सिन्नर तालुक्यातील उज्जनी येथे शेतजमीन आहे. संदीप चांदगुडे २९ डिसेंबर रोजी सकाळी शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असताना त्यांना शेतातील झाडाची नासधूस केलेली दिसून आली. शेजारीच राहणाऱ्या भाऊबंधाने पोकलेन मशिन वापरले असून, त्यातून हा प्रकार झाल्याचे समजल्यानंतर ते जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी पाच ते सहा जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आला. उपचारासाठी त्यांना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व जखमा गंभीर असल्याचा अहवाल दिला. या अहवालानुसार सोमनाथ चांदगुडे यांनी सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी भारतीय दंड विधान ३२६ नुसार गुन्हा दाखल केला. यास चांदगुडे यांनी हरकत घेतली. मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असून, भारतीय दंड विधान ३०७ नुसार गुन्हा दाखल व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यांनीही संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कलम ३०७ वापरण्याचे आदेश दिले. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. याबाबत बोलताना चांदगुडे म्हणाले की, अर्थकारणामुळे हा प्रकार घडला असून, पोलिस संशयितांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहेत. गंभीर दुखापत किती याचा अहवाल दुसरीकडून घेऊ असे पोलिसांनी सांगितले. यातून पोलिसांची कारवाई स्पष्ट होत असून, दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावरकर साहित्य संमेलन २६ फेब्रुवारीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठाणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व औरंगाबाद येथील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन भगूर येथे होणार आहे.

संमेलनाध्यक्षपदी देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांची निवड करण्यात आली. एकनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे निमंत्रक भाऊ सुरडकर असून, कार्यवाह मिलिंद रथकंठीवार असतील. २०१६ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मसर्मपणाचे वर्ष आहे. त्यानिमित्ताने सावरकर यांच्या विचारांचे जागरण आणि प्रसार कशा प्रकारे करावा याची सखोल चर्चा करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी भगूर येथे मेळाव्याचेही आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये ३५० हून अधिक विचारवंत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. संमेलनाचे स्वरूप उत्साही न ठेवता महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक येथील कार्यकर्ते अनेक वर्षे चळवळीत सातत्य राखून राबत आहेत त्यांना संमेलनाचे व्यासपीठ देण्यात येणार आहे.

सावरकरांनी राष्ट्रीय विषयासंदर्भात जी भविष्ये वर्तवली होती, ती सर्व प्रत्यक्षात उतरलेली आहेत. देशाच्या सीमा बंदिस्त करण्याबाबतच्या सावरकरांच्या सूचना त्याचवेळी अमलात आल्या असत्या तर आजची डोकेदुखी झाली नसती हे सांगतानाच सावरकरांनी दिलेला शस्त्रसज्जतेचा इशारा आज ध्यानात घेण्याची गरज असल्याचे यावेळी संमेलनाध्यक्ष चंद्रकांत शहासने यांनी सांगितले.

सावरकरांचा जन्म भगूर येथे झाला असून, त्यांचे घर म्हणजे राष्ट्रभक्तीचा जिवंत स्त्रोत आहे. त्यामुळे क्रांतिकारकांचे हे तीर्थक्षेत्र आहे. सावरकरांच्या ५० व्या आत्मसमर्पण दिनानिमित्ताने त्यांना मानवंदना देणे हे परम कर्तव्य व राष्ट्रधर्म आहे, असे समजून सर्व कार्यकर्त्यांनी हा मेळावा ठेवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. २५ व २६ फेब्रुवारी रोजी संमेलन व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास येणाऱ्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. संमेलनासाठी कोणतेही शूल्क आकारले जाणार नसल्याचेही शहासने यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथ शेटे म्हणाले की, या महान विभूतीचे स्मरण म्हणूनच भगूरला संमेलन ठेवले आहे. पत्रकार परिषदेत चंद्रकांत शहासने, एकनाथ शेटे, भाऊ सुरडकर, अनिरूध्द जोशी यांची उपस्थिती होती.

संमेलनात होणारे कार्यक्रम

संमेलनात २५ रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा, २६ रोजी सकाळी साहित्यदिंडी व एकाचवेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे वंदे मातरम, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकापाशी १०८ याज्ञिकांकडून वेदघोषात क्रांतिकारकांचे पुण्यस्मरण, विज्ञान, संरक्षण, काव्य, महिला सबलीकरण, विद्यार्थी विश्व या विषयांवर विविध परिसंवाद होणार आहेत. संध्याकाळी सहा वाजेपासून रात्रभर शाहिरांची मानवंदना, सावरकरांच्या आत्मसमर्पणानंतर प्रकाशित झालेल्या मृत्युलेखांवर आधारित संग्रही स्मरणिका, पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस. झेड. देशमुख यांच्या वक्तृत्वातून अभिनव भारत व जॅक्सनच्या वधाची कहाणी, शेकडो क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती अधिकार ऑनलाइन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाइन भरून ऑनलाइनच माहिती मिळू लागली तर. किती बरे होईल ना! मंत्रालय स्तरावर ऑनलाइन माहिती अधिकाराचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यात हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतून या ऑनलाइन प्रणालीचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

माहिती अधिकार हे सामान्य माणसाला प्राप्त झालेले मोठे शस्त्र आहे. माहिती मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार असून, सरकारी कामकाजासंबंधीची माहिती मागविण्यासाठी या अधिकाराचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला आहे. यापूर्वी कागदी अर्जावर हव्या असलेल्या माहितीचा तपशील टाकून तो अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे संबंधित कार्यालयात पोहोच करावा लागत असे. मात्र त्याचा दुरूपयोग होण्याचे प्रकार वाढू लागले. माहिती देण्यास विलंब होण्यासह नियमित कार्यालयीन

कामकाजावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. माहिती घेण्यासाठी व्यक्ती प्रत्यक्ष समोर उपस्थित होत असल्याने एकमेकांवर वादाचे आणि आरोप प्रत्यारोपांचे प्रसंग घडू लागले. आरटीआय कार्यकर्ते ब्लॅकमेल करीत असल्याच्या तक्रारीही होऊ लागल्या. या सर्वच पार्श्वभूमीवर माहिती अधिकाराची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन होते. मंत्रालय स्तरावर ऑनलाइन प्रणालीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यात तो अंमलात आणण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केल्याची माहिती अपर मुख्य सचिव पी. एस. मिना यांनी नाशिकमध्ये दिली. हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. माहिती अधिकार ऑनलाइन कसा वापरला जाऊ शकतो याची माहिती आणि प्रशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले. नाशिकमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर त्याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

या प्रक्रियेत तक्रारदाराला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी त्याला लॉगिन आयडी, पासवर्ड आणि युनिक आयडीही मिळेल. त्यावरुन तो आपला अर्ज सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, ऑनलाइन माहिती केव्हापर्यंत उपलब्ध होईल याचा अंदाज त्याला येऊ शकेल. प्राप्त माहिती अपूर्ण, दिशाभूल करणारी, संदिग्ध असेल तर तो ऑनलाइन अपिलही करू शकणार आहे. माहिती प्राप्त करण्यासाठी तो प्रचलित नियमानुसार ऑनलाइन शुल्कही भरू शकणार आहे. सरकारी माहिती जनतेसाठी सहज आणि विनाविलंब उपलब्ध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. सरकारी यंत्रणेचाही माहिती देताना वेळ जाऊ नये यासाठी ती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सरकारी यंत्रणा त्याला किती दाद देईल हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सुरुवातीला मोजकीच कार्यालये

हा प्रकल्प पथदर्शी असून, सुरूवातीला पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक पंचायत समिती आणि नाशिक तहसिल कार्यालयातील माहिती मिळविता येऊ शकणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच सरकारी कार्यालयांत आणि राज्यभर हा प्रयोग राबविण्याचा सरकारचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक रन’मधून दिला सामाजिक संदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'भारत हमारी जान है, नाशिक उसकी शान है' यासारख्या आवेषपूर्ण घोषणा देतानाच काटकसरीने पाणी वापरण्याचा अन् तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा सामाजिक संदेश प्रसारीत करीत नाशिककर धावले. सकाळच्या प्रसन्न प्रहरी लाल टी शर्ट परिधान करून हजारो अबालवृध्द रस्त्यावर धावू लागले. त्यांच्यातील ओतप्रोत भरलेला उत्साह ओसांडला अन् नाशिक रनचा हा उपक्रम सलग चौदाव्या वर्षीही मनावर कोंदण करून गेला.

नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टने हा उपक्रम आयोजित केला होता. सकाळी साडेसहापासूनच लाल रंगाचा टी शर्ट परिधान केलेले नागरिक मैदान आणि आसपासच्या रस्त्यांवर दृष्टीस पडू लागले. या उपक्रमाकरिता प्रायोजकाची भूमिका बजावणाऱ्या शहरातील विविध कंपन्या आणि संस्थांचे प्रतिनिधी नाशिककरांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते. उपस्थितांमध्ये जोश निर्माण करणाऱ्या देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण भारावले होते.

देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकाविणारे रॅम स्पर्धक विजेते महाजन बंधू यांच्या हस्ते मैदानात क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आली. त्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते ध्वजारोहन करून आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले. राष्ट्रगीतानंतर खऱ्या अर्थाने नाशिक रनला सुरुवात झाली. विविध शाळेतील विद्यार्थी, पालक, कंपनी प्रतिनिधींनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सर्वपथम लहान मुले, त्यानंतर किशोरवयीन मुले आणि शेवटी अन्य नागरिकांना नाशिक रनसाठी रस्ता खुला करण्यात आला. ही स्पर्धा नसून केवळ धम्माल आहे, त्यामुळे स्पर्धा म्हणून धावू नका, असे आवाहन आयोजक करीत होते. महात्मानगर येथून नाशिककरांनी धावण्यास सुरुवात केली. जेहान सर्कलला वळसा घालून पुन्हा ते महात्मानगर येथील मैदानावर परतले.

रुग्णवाहिकेचीही सुविधा

नाशिक रन हा उपक्रम निर्विघ्न पार पडावा, कुणाला शारीरिक इजा झालीच तर वेळीच उपचार मिळावेत, यासाठी ठिकठिकाणी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती.

मान्यवरांचा सहभाग

महापौर अशोक मुर्तडक, उपायुक्त विजय पाटील, एन. अंबिका, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, छाया ठाकरे, शशिकांत जाधव, नाशिक रन ट्रस्टचे अध्यक्ष बॅनर्जी, विश्वस्त सलिल राजे, व्यंकट रमण, राजाराम कासार, अनिल चिंचावाड, सुधीर येवलेकर, उत्तम राठोड, महिंद्र आणि महिंद्रचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, अनिल पैठणकर, मोहन पाटील, अद्वैत खेर, उत्तरा खेर, माजी विश्वस्त सौमित्र भट्टाचार्य, एन. बालकृष्णन, मंदार पाराशेरे, तेजपाल बोरा, जॉय अलूर, अभिजीत चंद्रा, सुमित बजाज, नितीन इनामदार, विजय देवरे, नरेंद्र गोलिया, डॉ. आर. वेंकटेशन आदी उपस्थित होते.

अवघे धावले चार हजार!

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टने बनविलेले खास टी शर्टस परिधान करणे आवश्यक होते. आठरा हजारहून अधिक टी शर्टसची विक्री झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. मात्र, तेवढ्या संख्येने प्रत्यक्षात रनमध्ये सहभागी झाले नसल्याचा दिसून आले. नाशिक रनमध्ये फारतर पाच ते सात हजार नागरिक सहभागी झाले असतील असा अंदाज या उपक्रमाला उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या उपक्रमातून जमा झालेला निधी एनजीओजच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यासाठी दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. उपेक्षितांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने २००३ साली सुरू करण्यात आलेल्या 'नाशिक रन' या उपक्रमात यंदा २० हजाराहून अधिक नाशिककरांनी हजेरी लावल्याचा तर १० हजार लोक धावल्याचा दावा आयोजकांनी केला. या उपक्रमासाठी विविध कंपन्या निधी जमा करतात. टी-शर्ट विक्रीतून जमा झालेला निधी गरजूंसाठी वापरण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्व उत्साहाची ‘पेलोटॉन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहाटेचे सहा... गुलाबी थंडीचा कडाका... धुक्याची चादर... मोठ्या मोहिमेवर जाण्यासाठीची सज्जता.... स्वार झालेले सायकलवीर.... मुंबई-आग्रा हायवेकडे केलेले कूच.... असा सारा काही नजारा होता नाशिक सायकलिस्टतर्फे आयोजित पेलोटॉन विंटर चॅलेंज २०१६ या स्पर्धेचा. जवळपास सहाशे जण या स्पर्धेत सहभागी झाले.

राष्ट्रीय पातळीवरील पेलोटॉन विंटर चॅलेंज २०१६ या स्पर्धेला शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येत आहे. दीडशे किलोमीटरची ही स्पर्धा सिटी सेंटर मॉल येथून सुरू झाली. रॅम स्पर्धा विजेते डॉ. महाजन बंधूंनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविला. नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जसपालसिंह बिरदी, शैलेश राजहंस, श्रीकांत जोशी, विशाल उगले, सुनील खालकर, मनीषा रौंदळ, पोलिस अकादमीचे उपसंचालक हरिष बैजल आदी उपस्थित होते. देशभरातील १८ ते ४० वयोगटातील महिला आणि पुरूष सायकलवीरांनी त्यात सहभाग घेतला होता. कसारा-घोटी-कावनई-सातुर्ली फाटा-शेवडे डांग- पहिने-पेगलवाडी-सुला वाइन्स या मार्गावर ही स्पर्धा झाली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील दिलीप माने हा सायकलपटू 'कसारा घाटाचा राजा' ठरला.

आज पारितोषिक वितरण

पंधरा किलोमीटर अंतराची १८ वर्षांखालील आणि जॉय राईड या दोन्ही स्पर्धा रविवारी होणार आहेत. नाशिक ते त्र्यंबक या दरम्यान या दोन्ही स्पर्धा होतील. यंदा १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत. रविवारी (१० जानेवारी) संध्याकाळी एबीबी सर्कल जवळील ठक्कर डोम येथे होणाऱ्या बक्षिस वितरणास अभिनेते सुनील शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. दीडशे किलोमीटर अंतराच्या विजेत्या संघातील प्रत्येकाला एक सायकल दिली जाणार आहे. तसेच, पहिल्या क्रमांकासाठी ३१ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी २१ हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी ११ हजार रोख पारितोषिक दिले जाणार आहे. पन्नास किलोमीटर अंतराच्या स्पर्धेतील विजेत्या संघातील प्रत्येकाला सायकल, प्रथम विजेत्यास ७५०० आणि द्वितीय विजेत्यास २५०० रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नावरून मनसेचे पालकमंत्र्यांवर शरसंधान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल वॉटर ऑडिटच्या निमिताने प्रशासनाने दिलेल्या माहितीत १३५ लिटर प्रतिमाणसी याप्रमाणे पाणीपुरवठा केला तरी ४९ दिवसांचे पाणी कमी पडणार आहे. मे महिन्यापर्यंतच गंगापूरचे पाणी पुरणार असल्याने उर्वरित काळासाठी पालकमंत्री पाणी आणणार कोठून, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. पाणी कमी पडू देणार नसल्याचा दावा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी आता नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळविले असल्याचा आरोप मनसेचे संपर्क नेते अविनाश अंभ्यकर यांनी केला आहे.

नोव्हेंबर महिन्यात मराठवाड्याला गंगापूर धरण समुहातून सव्वा टीएमसी पाणी सोडण्यात आले तेव्हा पालकमंत्र्यांनी नाशिककरांना कोणताही फटका न बसता मुबलक पाणी मिळेल, असा दावा केला होता. परंतु, आता नाशिककर जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणीकपातीच्या निर्णयालाही विरोध करतांनाही भाजपने मुबलक पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला होता. परंतु, आता नाशिककर पाणी उधळतात म्हणुन पाणीकपात करा असा आदेश काढला. त्यामुळे पुरेशा माहितीअभावी बोलणाऱ्या पालकमंत्र्यांनी ऑडिटच्या निष्कर्षानंतर मारलेल्या कोलांटउड्या तर एखाद्या कसरतपटूलाही लाजवतील, अशी टीका अभ्यंकर यांनी केली. कहर म्हणजे महानगरपालिकेला वेठीस धरून पाण्याचे सोशल ऑडिटचा घाट घालण्यात आला. नाशिककर जनतेच्या पाणीवापर बेशिस्तीचा पाढा वाचणारे पालकमंत्री आणि त्यांचे दावे फोल ठरले आहेत, असेही ते म्हणाले.

जागतिक मापदंडाप्रमाणे १३५ लिटर प्रतिमाणशी पाणी वापर आवश्यक असताना याच सोशल ऑडिटमध्ये नाशिककरांना १३५ लिटरपेक्षा कमी पाणी मिळत आहे असे सिद्ध झाले आहे. शहरात विषम पाणी वितरण होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री आणि भाजप आमदारांनी आधी केलेल्या चुकांमुळे आधीच जनतेला पाणी तुटवड्यास सामोरे जावे लागले आहे. अभ्यासशून्य पालकमंत्री व भाजपा आमदारांचा बेदरकारपणा नाशिककर जनता आणि मनसे खपवून घेणार नाही असा इशारा अभ्यंकर यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी नगरपंचायतीसाठी आज मतदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज (१० जानेवारी) मतदान होत आहे. पक्षीय उमेदवारांबरोबरच अपक्षांमुळे सर्वच लढती चुरशीच्या बनल्या आहेत. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दिंडोरी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात असून, त्यात ५१ पक्षीय तर ४० अपक्षांचा समावेश आहे. त्यात अनेक मावळत्या ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींचा समावेश आहे. नवखे उमेदवारही रिंगणात आहेत. अनेक लढती या भाऊबंदकीत होत असल्याने रंगत वाढली आहे. शिवसेना सर्वाधिक १६ जागांवर लढत असून, एका प्रभागात अपक्षाला पुरस्कृत केले आहे. भाजप १४ जागा लढत आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अनुक्रमे दहा व सहा जागांवर लढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप शहराध्यपदाची निवड १६ जानेवारीला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक भाजपच्या शहराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष, तर १६ जानेवारीला शहराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. शहराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये प्रचंड चुरस आहे. संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांच्या निवडणुका शनिवारपासून सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रवींद्र भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील बढे व जिल्हा निवडणूक समन्वय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. ग्रामीण निवडणूक निर्णय अधिकारी बढे, तर शहर निवडणूक अधिकारी म्हणून संभाजी पगार यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारपासून सहा मंडल अधिकाऱ्यांची निवड होणार आहे. त्यानंतर १६ तारखेला शहराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. तर ग्रामिणसाठी शनिवारपासूनच तालुकाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शहराध्यक्षपदासाठी लक्ष्मण सावजी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सुरेश पाटील, सुनील केदार, विजय साने आणि सुनील आडके यांच्यात स्पर्धा आहे. तर जिल्हाध्यक्षपदासाठी देशमुखांना पर्याय नसला तरी हिरे कुटुबीयांकडून जिल्हाध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे २० जानेवारीपूर्वी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशोधन केंद्रांनाच ग्रहण

0
0

प्रा. अशोक सोनवणे
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा मेहनती खरा. प्रतिकूल परिस्थितीवर त्याने मोठ्या परिश्रमाने मात केली आहे. आधुनिक शेतीची तंत्रे त्याने स्वकष्टाने आत्मसात केली. पारंपरिक शेतीमध्ये सुधारणा करून आधुनिक तंत्राने शेती करण्याच्या त्यांचा अविरत प्रयत्न चालूच आहे. स्वतः प्रयोग करून शेतीमध्ये सुधारणा करण्याची मानसिकता त्याने स्वीकारलेली आहे. अनेकवेळा हा मेहनती शेतकरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांंच्याही पुढे असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. आव्हानांना सामोरे जाण्याची त्याची मानसिकता आहे. मात्र सरकारी मदत त्याला मिळत नाही. संशोधन केंद्रे नावालाच आहेत. त्यांची मदत मिळाली तर जगाच्या पोशिंद्याला उभारी मिळू शकेल.

बदलते हवामान, सरकारी धोरणे, बाजारपेठेचे चढउतार आदी बाबींच्या संदर्भात सतत जागृत राहावे लगते. अनिश्चित हवामानाचा फटका शेतीला बसतो. त्यामुळे नगदी पिकांचे नुकसान होते. अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या आपत्तींमुळे तर शेती उत्पन्नाला सतत फटका बसतो. त्यावर मात करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी अत्यंत महागडी अशी हवामान केंद्रे आपल्या शेतातच उभारली आहेत. कृषिमालावर प्रक्रिया केल्याशिवाय शेतमालाची मूल्यवृद्धी होणार नाही. याची जाणिवही त्याला झालेली आहे. तेंव्हा तोही यशस्वी प्रयत्न त्याने केलेला आहे. अगदी आदिवासी भागातील शेतकरी ही स्ट्रॉबेरीची शेती करताना दिसतो. नाशिक, निफाड, दिंडोरीमधील शेतकरी आपल्या द्राक्षांना परदेशी बाजारपेठ मिळवताना दिसतात. खरं म्हणजे सरकारी यंत्रणा अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला हवी. पण, काहीवेळा शेतकऱ्याला स्वतःच संघर्ष करावा लागत आहे. तीन वर्षापूर्वी निर्यात करण्यात आलेली द्राक्षे काही तांत्रिकी चुकीमुळे माघारी पाठविण्यात आली. त्याचा सुमारे तीनशे कोटी रुपयांचा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला. आपेडा आणि केंद्र सरकारने त्यावेळी योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना करायला हवे होते. अनेकवेळा चुकीची औषधे फवारल्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. काल-परवाही चुकीची औषधे पिकांवर फवारल्यामुळे द्राक्षांचे निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा प्रश्न कृषीखाते, महसूल खाते आणि पर्यावरण खात्याशी संबंधित आहे. अशा प्रसंगी सरकारी यंत्रणा स्वतःच्या पध्दतीने काम करते; त्यामुळे वेळेचा मोठाच अपव्यय होतो. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळत नाही. पिंपळगाव परिसरात काही वर्षापूर्वी चुकीची औषधे फवारल्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग जळून गेली. त्या औषधांमध्ये टॉक्सीकचे प्रमाण जास्त होते. औषधाच्या कंपन्या स्वतःच्या फायद्याकरिता शेतकऱ्यांना फसवितात, असेही दिसते. बनावट कंपन्यांचाही सुळसुळाट झालेला आहे. कृषीखाते त्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेऊ शकत नाही.

देवळा, सटाणा, मालेगाव हे तसे दुष्काळी तालुके. गेल्या काही वर्षात या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन डाळिंबाची अत्यंत यशस्वी शेती केली. अक्षरश: टँकरने पाणीपुरवठा करून डाळिंबाचे अतिशय चांगले उत्पादन घेतले. स्वकष्टाने वेगवेगळे प्रयोग केले. डाळिंबाची शेती यशस्वी असताना आणि शेतकऱ्यांच्या अंगणात समृद्धीची पाऊले येत असतानाच तेल्या आणि मर रोगाने डाळिंबाच्या देखण्या बागांना दृष्ट लागली. उभ्या बागा जळून जाताना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या भाळी आले. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागा वाळून गेल्या. समृद्धीची पाऊले अचानक लुप्त झाली.

विकसित देशांमध्ये संशोधनावर खूपच भर दिला जातो. आपल्याकडे त्याची मोठीच वाणवा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते पण नाशिकच्या डाळिंबाची सर कोणालाच नाही. सरकारने महाराष्ट्रात दोन डाळिंब संशोधनकेंद्रे स्थापन केली आहेत. केंद्र सरकारने एक केंद्र सोलापूर येथे स्थापन केले तर राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथे स्थापन केले. लखमापूरच्या केंद्राची प्रथमपासूनच परवड झाली. जागेचे संपादन, अपुरा निधी आदी कारणांमुळे हे केंद्र कार्यान्वित होण्यात बराच कालापव्यय झाला. खरं म्हणजे कृषी विद्यापीठ व या डाळिंब संशोधन केंद्राने डाळिंबाच्या पिकावरील तेल्या किंवा मर रोगावर संशोधन प्रभावी उपाययोजना सुचविणे अपेक्षित आहे. तसे झाले तरच त्यांच्या स्थापनेचा उद्देश सफल होऊ शकेल. या संशोधन केंद्रांनी नेमके काय संशोधन केले याचेच संशोधन करावे लागेल.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने या फळबागा उभ्या केल्या. त्यासाठी मोठी गुंतवणूक केली. कर्ज घेऊन हा सगळा खटाटोप केला. तेल्या रोगाने बागा भुईसपाट झाल्या. अनेक शेतकऱ्यांवर त्यासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची हा त्यांच्या समोरील यक्ष प्रश्न आहे. पीक विमा फळपीक विमा किंवा हवामानाधारित पीक विमा योजना या योजना सरकारने सुरू केल्या असल्या तरी त्या शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा देऊ शकत नाही. पारंपरिक शेतीत तोटा होतो. उत्पादनखर्चही भरून निघू शकत नाही. म्हणून शेतकरी डाळिंबासारख्या नगदी पिकांकडे वळाला तर तेथे तेल्या रोगाने त्याची पुरती वाट लावली.

दुष्काळ नापिकी व त्यामुळे येणाऱ्या कर्जबाजारीपणाला त्रासलेला शेतकरी नगदी पिकाकडे वळला. तरी त्याही बाबतीत अनिश्चितता त्याची पाठ सोडायला तयार नाही. आज बागलाण पट्ट्यातील डाळिंबाच्या बागा उद्धवस्त झालेल्या आहेत. खरं म्हणजे कृषी विद्यापीठे आणि डाळिंब संशोधन केंद्रात संशोधन व्हावे व तेल्या आणि मर रोगांवर योग्य तो उपाय शोधावा, हे अपेक्षित आहे. संशोधनातून योग्य उपाय शोधला जाईलही पण, त्यास फार उशीर झालेला असेल. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले वैभव पुन्हा उभे राहील का हा खरा प्रश्न आहे. मोडून पडलेल्या बागा पुन्हा उभ्या करणे अवघड आहे. तेल्या रोगाने उद्धवस्त झालेल्या बगांच्या जमिनीत तेल्याचे विषाणू असतात, त्यामुळे तेथे पुन्हा बागा उभ्या करणे शक्य नाही. तेल्याचे विष्णू समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. तसे संशोधन होणे आवश्यक आहे.

राज्यातील आणि जिल्ह्यातील डाळिंब बागांना पाणीटंचाईने ग्रासलेले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शेकडो मेट्रीक टन डाळिंबाची निर्यात जिल्ह्यातून होत होती. त्यातून मोठ्या परकीय चलनाचा फटका बसलेला आहे. डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठाच धीर आणि आधार दिलेला होता. अशा प्रकारच्या नुकसानीच्या पार्श्ववभूमीवर विकसित देशांनी संशोधनावर मोठा भर दिला असता. भारतात मात्र संशोधनाकडे फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही. संकटाची चाहूल लागताच सरकारी तडकाफडकी त्यावर उपाय योजते. भारतात मात्र तसे होत नाही. तेंव्हा भारतातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संशोधनावर भर द्यायला हवा व या संशोधनाचे थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला हवेत.

(लेखक कृषी क्षेेत्रातील अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलच्या कारभारावर नाराजी

0
0

नाशिक : ओझर विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या पॅसेंजर टर्मिनलचे हस्तांतरण करून वर्ष उलटले तरी नाशिकहून विमानसेवा सुरु न झाल्याबद्दल राज्याचे अप्पर मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) यासंदर्भात आडमुठे धोरण सोडावे आणि काही प्रमाणात सवलती द्याव्यात, असेही मीना यांनी म्हटले आहे.

पॅसेंजर टर्मिनल एचएएलच्या हवाली करुन वर्ष उलटले तरी ओझरहून विमानसेवा सेवा सुरू झालेली नाही. लँडिंगचे चार्जेस माफ करणे, पार्किंगसाठी सवलत देणे यांसह विविध प्रकारचे निर्णय एचएएलने घेणे आवश्यक आहे. त्याजोरावरच कंपन्या सेवेसाठी पुढे येणार आहेत. एचएएलच्या पुढाकारावरच नाशिकमधील विमानसेवा अवलंबून आहे. सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार असून, एचएएलनेही एक पाऊल टाकायला हवे, असेही मीना यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणातून पाणी सोडण्यास विरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून दीड महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाने स्थानिकांचा विरोध असतानाही तीन टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडले होते. आता पुन्हा नगर जिल्ह्यातील फळबागा व शेती वाचविण्याच्या नावाखाली दारणा धरणातून सुमारे दोन टीएमसी पाणी सोडण्याचे पाटबंधारे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. हे पाणी सोडण्यास इगतपुरी तालुक्यातून जोरदार विरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत.

चालू वर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दारणा धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. तरीही दिवाळीपूर्वीच निम्मे धरण खाली करण्यात आले. ७१४९ दलघफु पाणी क्षमता असणाऱ्या धरणात आज फक्त ३५०० दलघफू पाणी उपलब्ध आहे. त्यातूनच नगर जिल्ह्यातील फळबागा वाचविण्यासाठी दोन टीएमसी पाणी सोडण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केल्याने त्याचे तीव्र पडसाद इगतपुरी तालुक्यात उमटले आहेत. इतके पाणी सोडल्यास धरणात अवघे १३०० दलघफू पाणी शिल्लक राहणार असल्याने उन्हाळ्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती

आहे. धरण परिसरातील सतरा गावांची शेती ऐन उन्हाळ्यात उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाच्या या निर्णयाविरोधात इगतपुरी तालुक्यातून सर्वक्षीय विरोध होणार आहे. शेतकरी व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत असल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोच्या योजनेचे हस्तांतरण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सिडकोची सहावी गृहनिर्माण योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि सिडको प्रशासन अधिकारी कांचन बोधले यांच्यात अंतिम निर्णय झाला आहे. सहाव्या योजनेतील ५१६ घरकुले आता महापालिकेकडे हस्तांतरित झाली आहेत. सिडको बोर्डाच्या ठरावानंतर हे हस्तांतरण पूर्ण होणार असल्याने या योजनेतील पाच हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सिडकोने सहा गृहनिर्माण योजना बांधल्या असून, त्यापैकी पाच यापूर्वीच पालिकेकडे हस्तांतरित झाल्या आहेत. मात्र, सहाव्या गृहनिर्माण योजनेच्या हस्तांतरणाचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे. या योजनेतील ५१६ सदनिका सिडकोच्याच ताब्यात असल्यामुळे महापालिकेला सुविधा देताना अडचण निर्माण होत होती. येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. ही योजना हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महासभेवर आल्यानंतर सोयी-सुविधांच्या प्रश्नावर तो फेटाळला गेला होता. सुरुवातीला ही मागणी मोठी होती; पण नंतर नऊ कोटी रुपये प्रशासनाने महापालिकेला द्यावेत, असे ठरले. मात्र, त्यावरही प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी या योजनेच्या बदल्यात प्रशासनाने येथील चार भूखंड महापालिकेला द्यावेत, असे ठरले व आता अखेरच्या झालेल्या बैठकीत लेखानगर येथील नर्सरीचाही भूखंड देण्याचे ठरले आहे. त्यामुळे ही योजना हस्तांतरणावर दोन्ही बाजूंकडून अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. महासभेनेही या योजनेच्या हस्तांतरणाला मंजुरी दिली आहे.

महापालिका आयुक्त आणि सिडकोच्या प्रशासन अधिकारी यांच्यात हस्तांतरणासंदर्भात चर्चा पूर्ण झाली असून, निर्णयाला अंतिम रुप देण्यात आले आहे. योजनेतील सदनिकांसाठी सोयी-सुविधा देण्याच्या बदल्यात सिडको पालिकेला आर्थिक रक्कमेसह काही भूखंडही देणार आहे. या संदर्भातील ठरावावर आयुक्त व प्रशासन अधिकारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा ठराव व्यवस्थापकीय संचालक यांच्या मंजुरीने सिडकोच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येईल. यानंतर, प्रशासन मंजुरीसह पुढील कार्यवाही पार पडेल. सिडको संचालक मंडळाच्या अंतिम मान्यतेनंतर ही योजना रितसर पालिकेकडे सुपूर्द होणार आहे.

पाच हजार नागरिकांना दिलासा तीन हेक्टर जमिनीवर उभारलेल्या सहाव्या योजनेत २५२ घरकुले मध्यम उत्पन्न गटासाठी, तर २६४ घरे उच्च उत्पन्न गटासाठी बांधली आहेत. सन १९९७ या कालावधीत बांधून झालेली सहावी योजना २००९ मध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जवळपास ५१६ सदनिकांमध्ये पाच हजाराच्या वर नागरिक राहतात. सिडको सोयीसुविधा देत नसल्याने इथल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता महापालिकेने हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण केल्याने पाच हजार नागरिकांना दिलासा मिळाला असून, सोयीसुविधाही मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्राथमिक सुविधा पुरविल्या जात नसून विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. कपडे, शौचालय सुविधा, अंघोळीस पाणी या प्राथमिक सुविधांपासूनही हे विद्यार्थी वंचित आहेत. त्यांना मिळणारे जेवणही अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी या विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकला होता.

सडलेली केळी, पाणीदार वरण, शिळ्या चपात्या असे निकृष्ट दर्जाचे जेवण या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी याविरोधात तक्रार करुनही त्यावर तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी यावर बहिष्कार टाकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन

चक्रावले. प्रकल्प अधिकारी के. मंजु लक्ष्मी यांनी शाळेत धाव घेऊन जेवणाचा दर्जा सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. मात्र १७ जानेवारीपर्यंत जेवणाचा दर्जा सुधारला नाही, तर आदिवासी विकास भवनावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे देण्यात आला आहे. तसेच, शाळेतच जेवण तयार करुन विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी या परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

एकलव्य इंग्लिश मीडियम शाळेशेजारीच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. मात्र विद्यार्थ्यांना शौचालय सुविधा, अंघोळीसाठी पाणी या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासही येथे अडथळे निर्माण होत आहेत. मागील दोन वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना कपडे, स्वेटर, चपला, कपाट यांपैकी काहीही पुरविण्यात येत नाही. सरकारच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची टीकाही या संघटनेने केली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. कोणत्याही सुविधा त्यांना पुरविल्या जात नाही. येत्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळाले नाही, तर आंदोलन करणार आहोत.

- लकी जाधव, अध्यक्ष,

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images