Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेलतगव्हाण परिसरातील पांगिरेमळा येथे राहणाऱ्या प्राची जयराम पांगिरे (वय १५) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्राचीने शनिवारी संध्याकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास गळफास घेतला. ही माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनी तिला उपचारासाठी सिव्हिल हॉ​स्पिटलमध्ये आणले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जखमी मुलीचा मृत्यू

स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीर भाजलेल्या पूजा दिलीप पागे (वय १६) या मुलीचा मृत्यू झाला. पेठरोडवरील शंकरनगर येथे राहणारी पूजा शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजली होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महिला डॉक्टरचा विनयभंग

कॉलेजरोडवरून पायी जाणाऱ्या महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आला. शनिवारी ही घटना घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. द्वारका येथील महिला डॉक्टर कॉलेजरोडवरील अहिरराव फोटो स्टुडिओजवळून पायी जात असताना इनोव्हा कारमधील (एमएच १५ बीटी ४४) चार संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. चौघांनीही महिलेकडे पाहत अश्‍लिल भाषा वापरली. तसेच, तिचा हात पकडून विनयभंग केला. घटनेनंतर चौघेही संशयित फरार झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सरकारवाडा पोलिसांनी गोरेवाडी येथील किरण आर. गाडे (वय २७) आणि नेहरूनगर परिसरातील लक्ष्मण भीमा पारिया (वय १९) यांना अटक केली.

पत्नीला मारण्याचा प्रयत्न

घरगुती भांडणाच्या वादात पतीने पत्नीच्या अंगावर डिजेल टाकून पेटवून दिले. गंभीररित्या जखमी झालेल्या रमा राष्ट्रपाल धाबो यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पांडवलेणी परिसरात राहणाऱ्या रमाचे पती राष्ट्रपालसोबत गुरुवारी रात्रीच्या सुमारास भांडण झाले. यानंतर राष्ट्रपालने रमाच्या अंगावर डिजेल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी वसंता गोविंद बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी संशयित राष्ट्रपालविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित राष्ट्रपालला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रप्रदर्शनाने घातली कलाप्रेमींनी भुरळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सलग तीस तासाहून अधिक काळ मेहनत घेऊन काढलेले रांगोळीतील व्यक्तिचित्र असो किंवा कॅमेऱ्याच्या एका क्लिक सरशी टिपलेले आणि पाहणाऱ्याला थक्क करणारी छायाचित्र... कुंचल्यातून कागदावर रेखाटलेली निसर्गचित्र एकाच ठिकाणी पहायला मिळणे तसे दुर्मीळच. पण, रेझिंग डेच्या निमित्ताने मालेगावात आयोजित चित्रप्रदर्शनात या तीन वेगवेगळ्या प्रकारातील कलाकृतींचा आनंद मालेगावकरांना घेता आला.

शहरातील तरूण कलाकारांच्या कला आविष्काराला पाहताना मालेगावतील कलाप्रेमी मंत्रमुग्ध झाले. मालेगाव पोलिस प्रशासनाच्या वतीने रेझिंग डेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक सुनील

कडासने यांच्या संकल्पनेतून चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले. शहरातील सागर पवार, पाटनकर, वाईद सर, प्रमोद बेडेकर यांच्या या कुंचल्यातून साकारलेली निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, वस्तुचित्र, अमूर्त चित्रांनी बघणाऱ्यांना खेळवून ठेवले. मालेगाव शहरातील भुईकोट किल्ला, मोसम पूल, गाळाने किल्ला या चित्रांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. छायाचित्रकार मुकुंद थोरात यांनी आपल्याच आजूबाजूच्या सामाजिक वास्तव्यावर प्रकाशझोत टाकणारी, निसर्गाचे अनोखे आविष्कार टिपणारी आणि सामाजिक भाष्य करणाऱ्या छायाचित्रांना कवी कमलाकर देसले यांच्या कवितांची मिळालेली जोड देखील या प्रदर्शनात रसिकांची दाद मिळवून गेली.

प्रमोद आर्वी यांचे रांगोळी रेखाटन विशेष आकर्षण ठरले. शहारच्या संस्कृतिक जडण घडणीत अप्पर पोलिस अधीक्षक कडासने यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कारकीर्दीचा आढावा घेणारे रांगोळी रेखाटन त्यांनी केले. तीस तासापेक्षा अधिक काळ या रांगोळी रेखाटणासाठी त्यांनी मेहनत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत्री, पपईची आवक टिकून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिवाळी फळांची आवक प्रचंड होत असल्याने नाशिककरांनी गोडगोड फ‌ळांवर कमी दरात ताव मारायला मिळत आहे. लालेलाल पपई, संत्री, बोर या फळांची आवक ‌‌टिकून आहे. यामुळे दरही पंधरा ते तीस रुपये किलोदरम्याने ‌‌स्थिर झाले आहेत. द्राक्षेही बाजारात दिसू लागली आहेत. बारमाही दिसणारे सफरचंदचे दरही शंभर रुपये किलोपर्यंत असल्याने चांगली मागणी होत आहे.

गेल्या म‌हिनाभरापासून पपई व संत्र्यांची प्रचंड आवक होत आहे. यामुळे दर घसरले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून आवक थोडी घटली आहे. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने फळे लवकर परिपक्व होत आहेत. यामुळे आवक वाढली आहे. सध्या संत्र्यांचे दर पंधरा ते वीस रुपये ‌किलो तर दर्जेदार संत्री तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. पपईचे दरही तीस रुपये किलोवर स्थिर झाली आहे. केळी, सफरचंद, किवी, पेरू, द्राक्षे, चिकू, सीताफळ यांच्यात दरात चढउतार सुरू आहे. सण, उपवास यानुसार या फळांचे दर कमी जास्त होत आहेत. आगामी काही दिवस तरी या फळांच्या दरात फारशी वाढ होण्याची चिन्हे नाहीत. अॅपल बोर तसेच कडाखा व उमराण या बोरांची बाजारात आवक वाढली असली तरी दर तीस रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. द्राक्षांची पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता आहे.


कोथिंबीरचे दर कडाडले

गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक कमी झाली असल्याने दर चाळीस ते पन्‍नास रुपये किलोदरम्यान ‌स्थिर झाले आहेत. कोथिंबीरचे दर तीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी व कळवण या प्रमुख तालुक्यांमधून आवक काही प्रमाणात घटल्याने भाज्यांचे दर कमी होण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत.

हिवाळ्यात मेथी, वांगे, कोबी, फ्लॉवर, गवार या भाज्यांची मागणी वाढते. मात्र, यंदा पावसाअभावी सर्वच भाज्यांची आवक रोडावली आहे. कोबी व फ्लॉवर यांचे दर सुध्दा पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. गिलके, दोडके, कारले यांचे दर आजही पन्नाशीपल्याड आहेत. आवडीचे काकडी व टोमॅटोच दरही ३०ते ४० रपुये किलोदरम्यान आहेत. सर्वांच्या जिव्हाळ्याच्या कांद्याचे दर पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. शेपू व पालकचे दर मात्र घसरले आहेत. शेपू दहा ते बारा रुपये जुडी तर पालकाची जुडी पाच रुपयांना मिळत आहे.

नाशिकमधून मुंबई व गुजरात येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी जातो. यामुळे मागणीही वाढली आहे. पाणीटंचाईमुळे आगामी काळात भाजीपाल्याची आवक घटणार असल्याने दर आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत. कोथिंबीरचे दर तीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाईची ‘संक्रांत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकरसंक्रांत. सर्वांचाच आनंद द्विगुणित करणारा हा सण. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने तिळगूळ घ्या, गोड बोला असे म्हणत स्नेहभाव वाढवला जातो. मात्र, या सणाला यंदा महागाईची झळ बसली आहे. गूळ ४० ते ४५ रुपये किलो तर तीळ १२० ते १४० रुपये ‌किलो दराने मिळत आहे. यामुळे यंदा तीळगुळाचा गोडवा थोडा कमीच लागणार आहे.

थंडी कमी करण्यासाठी उष्ण पदार्थ उपयोग ठरतात. अशा परिस्थितीत तिळगूळ, साजूक तूप गुळाची पोळी हे पदार्थ पथ्यकारक ठरतात. तिळाप्रमाणेच गुळही गुणकारी आहे. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. तीळगुळाचे लाडू तर आपल्या सर्वांचेच आवडीचे. बाजारात रेडिमेड तिळगुळाचे लाडूही आता मिळू लागले आहेत. मात्र, घरी लाडू बनविण्यास अधिक पसंती दिली जाते. सध्या जळगाव, धुळे या भागातून तीळ विक्रेते दारोदारी फिरत आहेत. पांढरीशुभ्र तीळ १२० ते १४० रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. रेडिमेड तीळगुळाचे लाडूही डझनने मिळत आहेत. तिळाच्या लाडूंचे पाकीट आकारानुसार उपलब्‍ध झाले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारालयातून १२ मुलांचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दहीहंडीत करतात तसा मनोरा करीत १२ अल्पवय‌ीन गुन्हेगारांनी किशोर सुधारालयाच्या (ब्रोस्टल स्कूल) १६ फूट उंच भिंतीचा अडथळा पार करीत पलायन केले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. यामुळे संबंध राज्यात खळबळ उडाली असून, फरार गुन्हेगारांचा पुणे, मुंबई आणि सातारा जिल्ह्यात शोध घेतला जात आहे.

त्र्यंबकरोडवरील सिव्ह‌िल हॉस्पिटललगत असलेल्या किशोर सुधारालयामध्ये २६ अल्पवयीन गुन्हेगारांना ठेवण्यात आले होते. त्यातील १२ आरोपींनी सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दंडीहंडीसाठी फोडण्यासाठी केला जाणारा मानवी मनोऱ्या तयार केला. यानंतर, पांघरण्यासाठी दिलेल्या चादरी एकमेकांना जोडून सर्वांत वर पोहचलेल्या आरोपीने इतरांना १६ फूट भिंतीवर ओढले. किशोर सुधारालय आणि सिव्ह‌िल हॉस्पिटलच्या भिंतीमध्ये पाच ते सहा फुटाचे अंतर असून तिथे तारेचे कंपाऊंड लावण्यात आले आहे. अंधाराचा फायदा घेत सर्व आरोपी या मोकळ्या जागेत उतरले. त्यानंतर त्यांनी ठक्कर बाजार परिसरातील मोकळ्या रस्त्यावरून धूम ठोकली. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना १२ आरोपी फरार झाल्याची वार्ता समजली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, शहर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

फरार आरोपींपैकी दोघांजणांना निगडी (पुणे) पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी, चौकशी सुरू असून नाईट ड्युटीवरील हवालदार राजेंद्र झाल्टे आणि शिपाई भास्कर भगत यांना निलंब‌ित केले असल्याची माहिती राज्याचे अपर पोलिस महानिरीक्षक तसेच तुरूंग महानिरीक्षक भुषणकुमार उपाध्याय यांनी दिली. किशोरवयीन १२ गुन्हेगारांनी पलायन केल्याची माहिती समजल्यानंतर उपाध्याय यांनी किशोर सुधारालयाला भेट दिली. यावेळी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त एन. अंबिका, श्रीकांत धिवरे आदी अधिकारी उपस्थित होते.

घटनेची कानोकान खबर नाही

साधारणतः सव्वातीन एकर क्षेत्रफळ असलेल्या ब्रोस्टल स्कूलमध्ये १०५ अल्पवयीन गुन्हेगार राहू शकतात. आजमितीस वेगवेगळ्या जिल्ह्यातील बाल न्यायालयाने शिक्षा दिलेले २६ जणांना येथे ठेवले जाते. ब्रोस्टल स्कूलमध्ये ३०, २१ आणि ११ फूटांचे आठ बॅरेक असून, प्रत्येक बॅरेकसमोर ६ वेगळे विभाग आहेत. मुलींचा वेगळा विभाग असून, मुख्यद्वारात तीन कार्यालये आहेत. आजमितीस अल्पवयीन कैद्यांची संख्या खूपच कमी आहे. तसेच कैद्यांनी पलायनापूर्वी दोन बॅरेकचे गज कापले. बॅरेकमधून बाहेर पडलेल्या आणि भंडारगृहात काम करणाऱ्या एका कैद्याने चादरी जमा केल्या. यानंतर, कैद्यांनी भिंती लगत मानवी मनोरा तयार केला. एवढ्या मोठ्या हालचाली होईपर्यंत ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना कानोकान खबर न लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टीव्ही आहे पण, सीसीटीव्ही नाही

नाशिकच्या ब्रोस्टल स्कूलमध्ये दाखल होणाऱ्या मुलांना सुधारण्याची संधी मिळावी म्हणून अनेक सुविधा पुरविल्या जातात. कैद्यांसाठी कलर टेल‌िव्हीजन पुरवणाऱ्या कारागृह प्रशासनाला सीसीटीव्ही बसवण्याचा मात्र विसर पडला. गेटवर तसेच भिंतीवर सीसीटीव्ही नसल्याचा फायदा किशोरवयीन कैद्यांना मिळाला. दरम्यान, ठक्कर बाजार परिसरात सुध्दा सीसीटीव्हीचा वाणवा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

गंभीर गुन्ह्यांची यादी

या घटनेत पुणे जिल्ह्यातील नऊ, सातारा जिल्ह्यातील दोन तर मुंबईतील एक कैदी फरार झाला. या कैद्यांवर चोऱ्या, खून, हत्येचा प्रयत्न, लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका अल्पवयीन गुन्हेगाराचा बनावट चलनाच्या गुन्ह्यात सहभाग उघड झाला असून, या सर्वांना बाल न्यायमंडळाकडून एक ते तीन वर्षापर्यंतची शिक्षा देण्यात आली आहे.

पलायनानंतर चोरी

निगडी येथे पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींकडून पोलिसांनी एमएच १२ पासिंग असलेली एक दुचाकी जप्त केली. पलायनानंतर सदर दुचाकी नाशिकमध्ये सापडल्याचे त्यांनी निगडी पोलिसांना सांगितले. मात्र, पेट्रोल टँक फुल असलेली ही दुचाकी शहरातून चोरी गेली असण्याची शक्यता अधिक आहे.

या दुचाकीवर चौघा कैद्यांनी पुण्यापर्यंतचा प्रवास केला. यातील दोन आरोपी साताऱ्याच्या दिशेने पळून गेले असून, उर्वरीत दोघांना निगडी पोलिसांनी जेरबंद केले.

या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल. आजमितीस दोघा सुरक्षा रक्षकांना निलंब‌ित करण्यात आले असून, आणखी कोणी दोषी आढळले तर कठोर शासन केले जाईल. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल.

भूषणकुमार,

उपाध्याय, तुरूंग महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लगीनघाई आता क्लीपमध्ये !

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर
'बँड बाजा; वरात घोडा...' म्हणत लगीनघाईचा सिझन सध्या जोरात आहे. आयुष्याच्या साथीदारासोबत अग्नीच्या साक्षीने सप्तपदी घेत साजरा होणारा हा अविस्मरणीय सोहळा कॅमेराबद्ध करत जपून ठेवला जातो. खुप सारे फोटोज आणि ड‌ीव्हीडी तयार करण्याची पद्धत जरा कालबाह्य होताना दिसते. या तुलनेत सध्या मात्र ऑडिओ आणि व्हिडिओ शॉट्स एकत्रित करून तयार केलेली क्लिप एव्हीआय (AVI) ह‌िट होते आहे.

लग्नाचा फोटोअल्बम अनोखा असायला हवा, असं प्रत्येक जोडीला वाटतं असतं. त्याच त्याच कॉमन पोज देऊन केलेलं लग्नाचं फोटोशूट आत्ताच्या जोडीला नकोय, त्यांना हव्यात त्या खास अन् हटके पोज. लग्न ठरल्यापासून ते बिदाई किंवा सत्यनारायण पूजेपर्यंत फोटोशूट केलं जातयं. फोटोशूटचा प्रकारही बदलतांना दिसयोय, खास प्रोफेशनल फोटोग्राफरकडून भन्नाट नव्या पोज तसेच वेगवेगळे अँगल्स घेत फोटोशूट करून घेण्याकडे कल जास्त दिसत आहे. यासाठी खर्च करायला तयारीही दाखविली जाते.

फोटोशूट सोबतच तयार होणारी डीव्हीडी देखील कात टाकू लागलीय. सोशल अन् बिझी आयुष्यात दोन ते तीन तासांची डीव्हीडी तयार करण्यापेक्षा एव्हीआय तयार केली जातेय. एव्हीआय म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ शॉट्स एकत्रित करून तयार केलेली क्लिप. साधारण १० ते १५ मिनिटांची ही छोटी व्हिडिओ तयार केली जातेे. यात लग्न ठरल्यापासून तर सत्यनारायण पूजेपर्यंत सर्व फोटोंचे कलेक्शन वापरले जातात. सोबतच लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत जर कुठे डेटिंग आउटिंगला कपल गेलचं तर त्याही फोटोशूटचा समावेश यात केला जातो. अर्थात कपलची जशी मागणी असेल तशी ती एव्हीआय तयार होते. फोटोंच्या स्लाइड शो सोबत रोमँटीक साँग्स बॅक साउंड देत असतात. या व्हिडिओमध्ये सर्व क्षण एका सिक्वेंसने परफेक्ट बसवले जातात. मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिकातही या एव्हीआय स्टाइलला कपल्सची पसंती वाढत आहे.

ही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केली जाते. व्हॉट्स ऍप, हाइक वर देखील शेअरिंग केली जात लग्न समांरभास सोशल टच मिळतांना दिसतोय. विवाहबद्द कपल्सच्या फ्रेंड्स सर्कल आणि नातेवाईक जर लग्नास आले नसतील तरी एव्हीआय सहजगत्या शेअर करता येत असल्याने प्रत्येकजण याचा आनंद घेऊ शकतो, म्हणून डीव्हीडीपेक्षाही अधिक एव्हीआय स्टाइल व्हिडिओला या लगीनघाईत पसंती मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राला चारही विभागात विजेतेपद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य ,पुणे यांच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्हा क्रीडा परिषद आणि चंद्रपूर जिल्हा टेनिस हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या शालेय राष्ट्रीय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्ष मुले आणि मुली तसेच १९ वर्ष मुले आणि मुली या चारही गटात महाराष्ट्राच्या चारीही संघांनी विजेतेपद पटकावून या स्पर्धवर आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राबरोबर केरळ, हरयाणा, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, आंध्र, विद्याभारती, सी. बी. एस. सी. अशा एकूण ३४ संघांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत १७ वर्ष मुलींच्या गटामध्ये अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी दिल्लीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयात महाराष्ट्राकडून प्रज्ञा वाघमोडे, प्रांजल उगले, निकिता साळुंके, आरती चिकणे यांचा मोलाचा वाटा होता. १९ वर्ष मुलींच्या झालेल्या महाराष्ट्र हरियाना यांच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पहिल्या एकेरी सामन्यात हरयाणाच्या दीपिका कुमारीने महाराष्ट्राच्या माधुरी साळुंकेविरुद्ध पहिला सेट जिकून खळबळ माजवून दिली. मात्र त्यानंतर माधुरीने सलग दोन सेट जिकून एकेरी लढत जिंकली. तर दुहेरीत केतकी शिंदे आणी विद्या पाटील या जोडीने दुहेरीची लढत जिकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यांना अक्षदा वाईकर, तस्नीम मुर्सल, नेहा बांडेबुचे यांनीही चांगली साथ दिली.

मुलांच्या १७ वर्ष गटात महाराष्ट्राने दिल्लीला पराभूत करून विजेतेपद पटकावले तर मुलांच्या १९ वर्ष गटात महाराष्ट्राने गुजराथचा सरळ २-० असा पराभव करून विजेतपद पटकावले. यामध्ये महाराष्ट्रातर्फे हिरो शेख, सिद्धांत लिपने, राहुक धोत्रे, चिन्मय भागवत, असिफ मुलानी यांनी चांगला खेळ केला. सर्व गटातील पहिल्या तीन क्रमांक पटकावणाऱ्या संघातील खेळाडूंना चषक, मेडल आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, रवींद्रजी भागवत, पप्पू देशमुख, या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, महाराष्ट्राचे सचिव आनंद खरे, के. के. सिंग, मनोज पोहनकर, सुरेश पाचपोर आदी मान्यवर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सपकाळ कॉलेजला क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संदीप फाऊंडेशन आयोजित इंजिनियर्स कप २०१६ अंतर्गत खेळल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एआयएसएसएम, पुणे या संघाचा पराभव करून सपकाळ नॉलेज हबच्या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले.

संदीप फाऊंडेशन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदविला होता. त्याआधी झालेल्या उपांत्य पूर्व सामन्यात सपकाळ नॉलेज हबच्या आभियांत्रिकी महाविद्यालयाने संदीप फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश करून एआयएसएसएम, पुणे या संघाचा ४५ धावांनी पराभव करून अंतिम विजेतेपद पटकाविले.

या रोमहर्षक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयाने १३३ धावांचे लक्ष्य ठेऊन उत्तरादाखल प्रतिस्पर्धी एआयएसएसएम संघ केवळ ९२ धावाच करू शकला. या सामन्यात सपकाळ अभियांत्रिकी संघाचा कर्णधार मयूर गायकर याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याने ३२ धावा आणि ४ बळी नोंदविले. तसेच संपूर्ण मालिकेत सपकाळ अभियांत्रिकीचा सुरज गांगुर्डे याला उत्कृष्ट फलंदाज तर वैभव सातपुते यास उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. पुरस्कार स्वरूपात चषक आणि पुरस्कार, ३१ हजार रोख संघाने पटकाविले.

या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन व अध्यक्ष रवींद्र सपकाळ, उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ, कॅम्पस डायरेक्टर प्रा. आरिफ मन्सुरी, प्राचार्य डॉ. विठ्ठल गोंड, आणि सर्व विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले आहे. या संघाच्या यशात शारीरिक शिक्षण संचालक प्रा. राजेश कासार यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी, ‘कपाट’वरून वादंग?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीकपात आणि कपाटींच्या विषयांवरून मंगळवारची (दि. १२) महासभा पुन्हा वादळी होण्याची शक्यता आहे. पाणीकपातीसंदर्भात महासभेच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या पालकमंत्र्यांनीच पाणीकपातीच्या सूचना केल्या. त्यामुळे सरकार आणि महापालिका यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. सरकारच्या या बदलेल्या भूमिकेवरून महासभेत पुन्हा गदारोळ होण्याचे संकेत आहे. यासोबत शिवसेनेकडून कपाटाच्या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरले जाणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे. या सभेत विकासकामांचेच विषय असले तरी ऐनवेळी पाणीकपातीच्या विषयाला पुन्हा चालना दिली जाणार आहे. गंगापूर धरणात पाणीसाठा कमी असल्याने उर्वरित दिवसात पाणीपुरवठा करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सध्या १५ टक्के कपात सुरू आहे. त्यात वाढ करण्यास पालकमंत्र्यांनी विरोध दर्शवत अंमलबजावणी न करण्याचे आदेश दिले. मात्र, आता ४९ दिवसांचे पाण्याचे शॉर्टेज असल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे पाणीकपात आवश्यक झाली असून कपातीच्याच सूचना आता पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यावरून महासभेत पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. अपक्ष नगरसेवकांकडून या विषयावर पुन्हा लक्षवेधी आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पाण्यावरून पुन्हा महासभेत राळ उठणार असून भाजपला घेरण्याची पुन्हा तयारी सुरू आहे.

पाण्यासोबतच कपाटांच्या विषयावर शिवसेना आक्रमक होणार आहे. कपाट धोरणामुळे शहरातील अडीच हजार इमारतींच्या पूर्णत्वाचे दाखले रखडले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी या विषयांवरून नुकतेच आयुक्तांशी पंगा घेतला. मात्र, आयुक्त कपाटाच्या विषयावर ठाम असल्याने शिवसेनेकडून हा विषय सभागृहात चर्चेसाठी आणला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासन विरुद्ध शिवसेना असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी विकासासाठी साडे अठरा कोटींचा निधी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथे भगवान श्री ऋषभदेवांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्तची कामे नियोजित वेळेत पूर्ण करता यावीत यासाठी ग्रामविकास विभागाने साडे अठरा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कामे मुदतीत पूर्ण व्हावीत तसेच ती दर्जात्मक असावीत, याकडे कटाक्षाने लक्ष द्या असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्य सरकारचे सहसचिव नंदकुमार शिंदे यांनी सोमवारी याबाबत आदेश काढले. मांगीतुंगी येथील विकासकामांसाठी बनविलेल्या आराखड्यानुसार २२ प्रकारच्या कामांसाठी ग्रामविकास विभागाने १८ कोटी ५८ लाख ३५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. श्री मांगी शिखराजवळ भगवान ऋषभदेवांची जगातील सर्वात उंच १०८ फूट उंचीची भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी ११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत १५ ते २० लाख लोक बागलाण तालुक्यात उपस्थित राहणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर आता हा धार्मिक सोहळा यशस्वी करून दाखविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी विकासकामांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रशासनाने ‍आराखडा तयार केला आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने साडे अठरा कोटींचा तर पर्यटन विभागाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. एकूण ४० कोटींचा निधी दिला जाणार असला तरी अजूनही ग्रामविकासकडून दोन कोटींचा तर पर्यटन विभागाकडून १० कोटींचा निधी प्राप्त होणे बाकी आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीने प्राधान्याने करावयाच्या विकासकामांना आणि त्यासाठीच्या खर्चाला मान्यता दिल्याने ही कामे झपाट्याने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. तातडीच्या २२ कामांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीज पुरवठा, अंतर्गत रस्ते, विद्युत विभागाची कामे, पर्यटकांसाठी लिफ्ट, रस्ता रुंदीकरण, पोलिस चौक्या तयार करणे, वैद्यकीय सुविधा पुरविणे, आपत्कालीन व्यवस्थापन, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. या कामांचा दर्जा राखला जाईल याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेच्या नावाखाली ‘हातसफाई’

$
0
0

स्वच्छतेसाठी एक कोटीचे कंत्राट; हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाईचा दावा म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी अगोदरच ९९ लाख रुपयांचे कंत्राट दिले असतांना, महापालिका प्रशासनाने गोदावरीच्या साफसफाईसाठी नव्याने एक कोटींचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार हे कंत्राट दिल्याचा प्रशासनाने दावा केला आहे. मात्र, एक कंत्राट अगोदरच दिले असतांना दुसरे कंत्राट देण्याची घाई का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महासभेत मंगळवारी (दि. १२) होणाऱ्या आनंदवल्ली ते नांदूरनाकापर्यंत गोदावरीच्या स्वच्छतेचे काम एक कोटी दोन लाख रुपयात देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. चार बोटींच्या सहाय्याने वर्षभर हे काम केले जाणार आहे. मात्र, महापालिकेने नोव्हेंबर २०१५ मध्ये स्थायी समितीत ९९ लाखांच्या गोदावरीच्या साफसफाईचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. मशीनच्या सहाय्याने पानवेलीसह गोदावरीची स्वच्छता केली जाणार होती. हे कंत्राट दिले असतांनाच पुन्हा नव्याने एक कोटींचे कंत्राट देण्यामागचे गौडबंगाल न उलगडण्यासारखे आहे.

प्रशासनाच्या वतीने मात्र हायकोर्टाने गोदावरीच्या स्वच्छतेसाठी दिलेल्या आदेशानुसार हे काम देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. एकीकडे नगरसेवकांच्या किरकोळ कामांसाठी निधी नसतांना गोदावरीच्या स्वच्छतेसाठी होणारी उधळपट्टी नगरसेवकांमध्येच चर्चेचा विषय बनली आहे. या विषयावरून प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेनेच घंटागाडी चालवावी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ठेकेदारामार्फत घंटागाडी चालविण्याचा करार संपल्याने महापालिकेने आता स्वतःच घंटागाडी चालवून कामगारांना नियमित करावे, अशी मागणी घंटागाडी कामगार संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेने कामगार आयुक्तालयाच्या सन २०११ च्या आदेशाचा दाखला दिला आहे. महापालिकेने घंटागाडी चालविल्यास आर्थिक फायदा होईल, असा दावा कामगार संघटनेने केला आहे.

शहरातील घंटागाडीचा वाद चांगलाच चिघळला असून सरकारतर्फे महापालिकेच्या ठेक्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थायी समितीने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने ७ जानेवारीपासून ठेकेदारांची मुदत संपली आहे. परंतु, महापालिकेने ठेकेदारांना विनंती केल्याने शहरातील केरकचरा संकलनाचे काम सुरू आहे. ठेकेदारांनी ठरवल्यास कधीही घंटागाडी बंद पडू शकते. ठेकेदारांच्या घंटागाडीवरील कर्मचारी तसेच गाड्याही महापालिकेच्या आहेत. त्यामुळे ही घंटागाडी महापालिकेनेच चालवावी, अशी मागणी नाशिक महापालिका श्रमिक संघातर्फे महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी केली आहे.

घंटागाड्या महापालिकेच्या असून कर्मचारीही महापालिकेच्या कंत्राटी आस्थापनेवर आहेत. त्यामुळे ठेकेदारापेक्षा महापालिकेचा आर्थिक फायदा होईल असा दावा संघटनेने केला आहे. कामगार आयुक्त कार्यालयाने सन २०११ मध्ये या घंटागाडी कामगारांना सेवेत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओट्यांच्या दरात तब्बल सातपट वाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गाळ्यांची भाडेवाढीसोबत महापालिकेने व्यावसायिक संकुलाबाहेर असलेल्या ओट्यांचेही दर तब्बल सात पट वाढविले आहेत. ओट्यांचे भाडेवाढ ४ रुपये वरून २८ रुपये प्रति चौरस फूट करण्यात आली आहे. त्यामुळे ओटेधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दर कमी करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेने व्यापारी संकुलामंध्ये किरकोळ विक्रेत्यांसाठी असलेल्या ओट्यांच्या दरात अचानक वाढ केली आहे. यापूर्वी महापालिकेने शहरातील सर्व गाळ्यांना रेडीरेकनरनुसार भाडेवाढ केली होती. त्यावरून गाळेधारक विरुद्ध महापालिका असा संघर्ष सुरू असून महापौरांनी यात हस्तक्षेप करून या विषयाला स्थगिती दिली होती. आता अचानक महापालिकेने ओट्यांच्या दरात नव्याने वाढ केली आहे. ओट्यांचे भाडेवाढ चार रुपयांवरून २८ रुपये चौरस फूट केली आहे. या अचानक वाढलेल्या भाड्यामुळे विक्रेत्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे विक्रेत्यांची अडचण झाली असून छोट्याशा उत्पन्नात घर कसे चालवायचे असा सवाल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा तर ‘त्या’ मंत्र्यांचा खोटारडेपणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागाने अॅन्टी करप्शन ब्युरोला दिलेल्या पत्रानुसार मला जवळपास क्लीन चिट मिळाली आहे. खासदार किरीट सोमय्या यांना कितीही टॅव टॅव करू द्या; मी निर्दोषच आहे, असा दावा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी केला. 'एसीबी'ची फाईल आमच्यापर्यंत आली नाही, असे कुणी म्हणत असेल तर तो त्या मंत्र्याचा खोटारडेपणा आहे हे देखील स्पष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला.

येवला मतदारसंघातील प्रश्न निकाली काढण्यासाठी भुजबळ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, की सोमय्या यांनी माझ्यावर खोटे आरोप करीत जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार कोर्टाने 'एसीबी'ला चौकशीचे आदेश दिले. 'एसीबी'ने प्रश्नावली तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचीही चौकशी केली. या प्रकरणात काही अनियमितता आहे का हे तपासण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सदन किंवा अंधेरीतील आरटीओ कार्यालय असू द्या, यामध्ये एकाही फाईलवर माझी स्वाक्षरी नाही. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाले. त्यावर संबंधित खात्यांच्या सचिवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मी एकही रुपयाचा अपहार केला नसल्याचे पहिल्यापासून सांगत आहे. मात्र, कोर्टात जनहित याचिका दाखल असल्याने न्यायाची प्रतीक्षा करीत होतो. 'एसीबी'ने सार्वजनिक बांधकाम विभागाला काही प्रश्न विचारले होते. त्यानुसार त्यांना उत्तरे देण्यात आली. ती फाईल मंत्रालयात गेली. तेथे उपसचिव, अपर मुख्य सचिवांची त्यावर स्वाक्षरी झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही स्वाक्षरी केली. संबंधित सचिवांनी त्याचे शासकीय पत्र काढून ते एसीबीला सादर केले. हे पत्र म्हणजेच क्लीन चिट असल्याचे भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र सदन दर्जेदारच

महाराष्ट्र भवनच्या दर्जाला तोड नाही. राष्ट्रपती भवनानंतर सर्वात प्रशस्त आणि उत्तम सुविधा येथे असल्याची प्रशंसा राष्ट्रपतींनी केली आहे. सप्ततारांकित हॉटेलाप्रमाणे त्याची रचना असून नळानांही बिसलरीचे पाणी येते, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्र सदनचा दर्जा चांगला नसल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदादरात घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिलह्यातील सर्वच बाजार समितीत नवीन लाल कांद्याची प्रचंड व अनपेक्षित आवक होत आहे. निर्यात खुली असतानाही गत आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा भावातील घसरण चिंताजनक मानली जात आहे.

अत्यल्प पाऊस, पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर कांद्याच्या उत्पादनात यंदा मोठी घट होण्याचे संकेत मिळत होते. यामुळे चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतक-यांनी उपलब्‍ध पाण्यात मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची लागवड केली. त्यातच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने लागवड झालेल्या सर्वच कांदा पिकास जीवदान दिले. तसेच, पावसानंतर नवीन लागवडी सुध्दा मोठ्या प्रमाणावर झाल्या. याचाच परिणाम बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊन कांदा भावात घसरण सुरू झाली आहे. आज नाशिक जिल्ह्यातून दररोज श्रीलंका, मलेशिया, दुबई, सिंगापूर आदी देशात किमान पाच हजार टन कांदा निर्यात होत असतानाही कांदा भावातील घसरण अनपेक्षित मानली जात आहे. कोलकाता, बिहार, सिलिगुडी आदी ठिकाणी बाजारपेठेत सुध्दा नाशिक जिल्ह्यातून दररोज सरासरी वीस हजार टन कांदा रवाना होत आहे. मात्र, प्रत्येक बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा अतिरिक्त झाल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. मागणीत वाढ आणि उत्पादनात घट झाली तरच कांद्याचे भाव सुधारतील. नाशिक बरोबरच गुजरात, दिल्ली ग्रामीण परिसर, कर्नाटक, दक्षिण भारत आदी भागातील कांदाही बाजारात आला असून त्यातच पुणे, चाकण परिसरातून गावठी (उन्हाळी) कांदा बाजारात येण्यास प्रारंभ झाल्यामुळे कांद्याचे भवितव्य चांगले दिसत नाही.

सध्या कांद्याचे दर सरासरी हजार ते बाराशे रुपये क्विंटलदरम्यान स्थिरावले आहेत. यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या दीड म‌हिन्यापासून कांद्याची प्रचंड आवक होत आहे. यामुळे केंद्र सरकारने निर्यातमूल्ही शुन्य केले. तरीही कांदादरात फारशी सुधारणा झाली नाही. लाल कांद्याबरोबरच लवकरच उन्हाळ कांद्याची आवक सुरू होईल. यामुळे दरवाढीची शक्यता धूसर दिसू लागली आहे.

-

कोट

सर्वच बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा वाढल्यामुळे कांदाभावात घसरण होत आहे. दररोज पाच हजार टन कांदा निर्यात होत असतानाही केवळ अतिरिक्त उत्पादनामुळे कांदाभाव कोसळले आहेत. नाशिकसह देशातील इतर भागातही कांदा बाजारात आला आहे.

- अतुल शाह, कांदा व्यापारी व निर्यातदार

--

गत आठवड्यातील कांदा आवक

‌दिनांक आवक क्विंटल किमान दर कमाल दर सरासरी दर

२ जानेवारी ११७०४ ८०० १६४० १२५१

४ जानेवारी २६०३२ ९०० १५९० ११४५

५ जानेवारी १४४९२ ९५१ १६०३ ११७५

६ जानेवारी २५०८४ ९५१ १५६६ ११७५

७ जानेवारी १५८०० ९०० १४८० ११५०

८ जानेवारी १६३६० ८०० १४५२ १०५१

११ जानेवारी १८६२४ ७०० १३८८ १०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्पर्धा परीक्षेचा मार्ग झाला सोपा

$
0
0

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मार्गदर्शन वर्ग सुरू; पुढील वर्ग पाच फेब्रुवारीला
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केला आहे. प्रत्येक महिन्यात असे मार्गदर्शन वर्ग होतील. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे, याची माहिती अधिकारीच देणार असल्याने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाच ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेचा मार्ग सोपा होण्यास मदत होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाला उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. बसायला जागा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जागा मिळेल तेथे ठाण मांडले होते. जिल्हा‌धिकारी कार्यालयातर्फे राबविण्यात येणारा हा पहिलाच असा उपक्रम आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंजू लक्ष्मी आणि उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी कुशवाह म्हणाले की, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत यश संपादन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षा बाळगून त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. अभ्यासाचे नियोजन करतानाच आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी लक्ष्मी म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. यशाने हुरळून जाऊ नका तर अपयशाने डगमगू नका. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी भाषेचा अडसर येत नाही. विद्यार्थ्यांनी त्याबाबत मनात शंका बाळगू नये. आपल्या भाषेत चांगल्या प्रकारे व्यक्त होण्याचे कौशल्य मात्र विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवे. काही संकल्पना इंग्रजी भाषेतून समजावून घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य परीक्षेसाठी वेळ व्यवस्थापन आणि जास्त वाचण्यापेक्षा मुद्देसुद वाचन महत्त्वाचे ठरते. केवळ वाचन न करता त्यातून जाणीवपूर्वक दृष्टिकोनही विकसित करावा. समाजाप्रतीची आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी, समाजाशी खऱ्या अर्थाने जोडून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षेतील यशाचा ध्यास धरा, असे आवाहन त्यांनी केले. वृत्तपत्रांच्या संपादकीय पानाचे वाचन करताना टिपणे काढायची सवय लावून घ्यावी, असेही त्यांनी सुचविले.

कचरे यांनीही मार्गदर्शन केले. अभ्यास करताना क्रमबद्धता महत्त्वाची आहे, एकमेकांशी संबंध असणाऱ्या विषयांचा अभ्यास क्रमाने केल्यास उपयुक्त ठरतो. त्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन करावयास शिका, असा सल्ला त्यांनी दिला. वेळ आणि तणावाचे व्यवस्थापन अनुभवाच्या आधारे आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. आपले लक्ष उद्दिष्टाशी केंद्रित राहील याची काळजी घेतल्यास हमखास यशस्वी होता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाच फेब्रुवारी रोजी पुन्हा मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.


विद्यार्थ्यांसाठी सुविधा

प्रत्येक महिन्यात असे मार्गदर्शन वर्ग होतील. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. उपस्थित विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातील यशस्वी १०० विद्यार्थ्यांना ग्रंथालय, इंटरनेट, पुस्तके आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही कुशवाह यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनैश्वर पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात उत्पन्न व सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या घोटी येथील शनैश्वर पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक अशा बारा संचालकांनी चेअरमन व व्यवस्थापक यांच्यावर अविश्वास व्यक्त करून इगतपुरीच्या सहाय्यक निबंधकांकडे सामूहिक राजीनामे दिले. त्यांचे राजीनामे मंजूर झाल्याने अखेर या पतसंस्थेवर प्रशासक म्हणून आर. आर. मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील व्यापारी केंद्र असलेल्या व कोट्यवधींची आर्थिक उलाढाल असलेल्या घोटी शहरातील शनैश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या कारभारात गेल्या दोन महिन्यापासून विस्कळीतपणा आला होता. आर्थिक व्यवहारात संशय निर्माण झाल्याने काही मोठ्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी तत्काळ काढून घेतल्याने दोन महिन्यापासून संस्थेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. गेल्या आठवड्यात धडक कर्ज वसुली मोहीम राबवूनही त्याचा फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान, संस्थेच्या बारा संचालकांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी सामूहिक राजीनामे दिले होते. त्यात सात जानेवारी २०१६ रोजी सुनावणी होऊन त्यात संचालक मंडळाचे राजीनामे मंजूर करून पुढील कामकाजाकरिता पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी संचालकांनी केली होती. त्यानुसार व्यवहार सुरळीत चालू होण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७/अ नुसार या पतसंस्थेवर आर. आर. मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे आदेश सहाय्यक निबंधक ए. व्ही. देशपांडे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वादोन लाखाचा मुद्देमाल लंपास

$
0
0

नाशिक : गंगापूररोड पोलिस स्टेशन हद्दीतील बळवंतनगर येथील हरिओम कॉलनीतील गुरुदेव बंगल्याचा बंद दरवाजा फोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी १ लाख १८ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी दोन ते रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. वरील ठिकाणी राहणारे मनोज शामराव मानकर बाहेर गेले असता चोरट्यांनी हॉलच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. मानकरांना घरफोडीची कल्पना येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले.

रॉयल एन्फिल्ड चोरीला

इमारतीजवळ उभी केलेली नवीकोरी रॉयल एन्फिल्ड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमेश्वर येथील श्री गणेश ब्लॉसम अपार्टमेंट येथे शनिवारी संध्याकाळी घडली. या ठिकाणी राहणारा विवेक संजय टेकाळे यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी चोरी केलेल्या एन्फिल्डचा नंबरही पासिंग झालेला नव्हता. पासिंगपूर्वी मिळालेल्या क्रमांकाच्या आधारे (एमएच १५ टीसी १५५०) गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

युवतीची आत्महत्या

पेठरोडवरील राऊ हॉटेलच्या पुढे असलेल्या गणेश रो हाऊसमध्ये राहणाऱ्या दीपाली गोवर्धन गवळी (वय २०) या युवतीने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. दीपालीने पंख्यास दोरी बांधून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी प्रमोद पुंडलिक आवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद केली.

ट्रकची चोरी

पळसे येथील हॉटेल मातोश्री येथे उभी असलेली १२ लाख रुपये किमतीची ट्रक (एमएच १५ डीके ३५३६) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना ७ ते ८ जानेवारी दरम्यान घडली. या प्रकरणी पळसे येथे राहणाऱ्या विजय मधुकर नरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पाच तोळे सोन्याची चोरी

नाशिकरोड : नाशिकरोड ते ठाणे या प्रवासादरम्यान एका महिलेचे पाच तोळे सोन्याचे ७२ हजार रुपये किमतीचे गंठण चोरीस गेले. लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रंजना दिलीप जगताप (वय ४०, गणेश नगर, ठाणे) या नाशिकरोड रेल्वेस्थानकातून ठाण्याला गोरखपूर ट्रेनने रवाना झाल्या. गाडीत चढत असताना त्यांनी पर्समध्ये ठेवलेले पाच तोळ्याचे सोन्याचे गंठन चोरीस गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबर देणाराच निघाला खुनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

अंबड एमआयडीसीत देबा नामक तरुणाचा धारधार शत्राने वार करून खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेची एका तरुणाने पोलिसांना माहिती दिली होती. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता खबर देणारा कवलसिंग पावराच देबाच्या खुनाचा आरोपी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशाप्रकारे या घटनेचे कथानक घडले. या प्रकारणात खून करून पुन्हा पोलिसांना खबर देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डीकर यांना खबर देणाऱ्या कवलसिंग पावरा याचीच पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर उपायुक्त धिवरे यांना खून झालेल्या देबा यांच्या मृतदेहाजवळ खूप गर्दी असल्याचेही कवलसिंग

याने सांगितले.

धिवरेंनी तत्काळ कवलसिंगला रिमांडमध्ये घेण्याबाबत सूचना केली. पोलिस खाक्या दाखविताच आपणच खून केल्याची कबुली कवलसिंगने दिल्याचे उपायुक्त धिवरे यांनी सांगितले.

संबंधित संशयित कवलसिंग व देबा हे नातेवाईक होते. यात कवलसिंग कामावर गेल्यावर गंवडी काम करणारा देबा कवलसिंगच्या पत्नीची छेड काढत होता. कवलसिंगच्या पत्नीने देबाच्या या वागणुकीबाबत आपल्या पतीकडे तक्रारही केली होती. यानंतर संतप्त कवलसिंगने देबाला संपविण्यासाठी दारू पाजली.

अंबड वेअर हाऊच्या बाजूला असलेल्या स्वरूप स्टील या बंद कंपनीच्या मोकळ्या जागेवर नेत लोखंडी पाइपाने कवलसिंगने देबाला मारहाण केली. नंतर चाकूने वार करीत तेथून पळ काढला. यात देबा जागीच मृत झाला. यानंतर कवलसिंगच पोलिसांकडे येत एका तरुणाचा मृतदेह पडलेला पाहिला असल्याचे सांगितले. मात्र, चौकशीदरम्यान विसंगती आढळल्याने पोलिसांनी कवलसिंगला अटक केली. त्याने खुनाची कबुलीही दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत आघाडीला बहुमत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवा‌र्षिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेना, भाजपला जोरदार धक्का देत दहा जागा पटकावित निर्विवाद वर्चस्व मिळवले. सेनेला दोन तर भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. तीन अपक्षांनी तर एका जागेवर मनसेने खाते उघडले. या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवारांना मतदारांनी धक्का दिला. सतरा जागांमध्ये दहा महिलांना नगरसेवकाची संधी मिळाली आहे.

दिंडोरी नगरपंचायतीची पहिली निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. याचा त्यांना फायदा झाला. काँग्रेसने दहापैकी सात तर राष्ट्रवादी काँग्रसेने सहापैकी दोन जागांवर विजय मिळवला. भाजप व सेनेने स्वबळ आजमावले. भाजपचे चौदापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला. शिवसेनेने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र दोनच जागा त्यांना जिंकता आल्या. यामुळे दिंडोरी नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मनसेने तीन जागांवर उमेदवार दिले होत. पैकी एका जागेवर विजय मिळाला. सुमारे ४० अपक्षांपैकी तीन अपक्ष उमेदवार निवडून आले.

निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी निवणूक निरीक्षक अप्पर जिल्हाधिकारी कानुराज बगाटे यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करून विजयी उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मातब्बरांना धक्का

शहारातील जनता दलाचे बाळासाहेब जाधव यांच्या सुष्ना मनीषा जाधव, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष सतीष देशमुख यांच्या पत्नी राजश्री देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत राजे, काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष प्रीतम देशमुख यांच्या पत्नी अर्चना देशमुख, भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सदस्य खान फारूख मोहमद, माजी सरपंच छबाबाई वाघ, विजय देशमुख, माजी सदस्य किशोर रेहरे, जयवंता धामोडे या मातब्‍बरांना पराभवाचा धक्का बसला.नगराध्‍यक्षपदाकडे लक्ष नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images