Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विठूनामाच्या भक्ती रिंगणात रंगले वारकरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

टाळमृदंगाचा गजर, विठूनामचा जयघोष अन् अश्वाने केलेली घोडदौड, अशा भक्तीमय, जल्लोषपूर्ण वातावरणात ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संस्थेच्या आवारात श्री निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पार पडलं. भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. या पालखी सोहळ्यात प्रथमच गोल रिंगण पार पडल्याने औत्सुक्याचा विषय ठरले.

रिंगण म्हटल्यावर प्रमुख्याने आळंदी संस्थानच्या माउली ज्ञानोबारायांच्या दिंडीची आठवण येते. मात्र, श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी आलेल्या श्री कृष्णाजी माऊली दिंडीतील हजारो वारकऱ्यांनी गोल रिंगण करून आपली सेवा रूजू केली. त्र्यंबकेश्वर येथे साधरणतः पाचशे दिंड्या येतात. यामध्ये पंधरा फड आहेत. खेडलेझुंगे येथील तुकाराम महाराज दिंडी आणि जायखेडा येथील कृष्णाजी माऊली दिंडी या दोन मोठया दिंड्या आहेत. अत्यंत शिस्तबध्द असलेली कृष्णा माऊली दिंडीस जवळपास शतकाचा इतिहास आहे. या दिंडीतील वारकऱ्यांनी यावर्षी ब्रह्माव्हॅली शिक्षण संस्थेच्या संकुलात गोल रिंगण करून वारकरी परंपरेतील अत्यंत विलोभनीय असे दर्शन घडविले. संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी पालखीचे स्वागत केले. ह. भ. प. यशोदा अक्का यांनी नारळ वाढवून रिंगणास प्रारंभ केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एनडीएसटीच्या अध्यक्षांची खुर्ची धोक्यात

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स सोसायटी (एनडीएसटी)चे विद्यमान संचालक हेमंत देशमुख यांनी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत याची दखल घेऊन निकम यांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांचे अध्यक्षपद धोक्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच एनडीएसटीची निवडणूक होऊन राजेंद्र निकम यांनी अध्यक्षपदाचा भार स्वीकारला होता. मात्र या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल झाल्या. नुकतेच विद्यमान संचालक हेमंत देशमुख यांनीही निकम यांच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीनुसार, मालेगाव तालुक्यातील गुगुळवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे खरीप कर्ज आणि वैयक्तिक कर्ज थकले आहे. मालेगाव तालुक्यातील गुगुळवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून निकम यांनी २८ एप्रिल २०१२ रोजी ६७ हजार रुपयांचे खरीप कर्ज घेतले होते. ३१ मार्च २०१३ पासून हे कर्ज थकीत आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३मध्ये समितीची आणि तिच्या सदस्यांची निरर्हता नमूद केलेली आहे. मुदतीत कर्ज देणाऱ्या संस्थेच्या बाबतीत दिलेला कोणताही हप्ता देण्यास नमूद तरतूदीनुसार अध्यक्ष म्हणून अपात्र असल्याचे निदर्शनास आल्याचेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. अध्यक्ष निकम यांनाही ही नोटीस बजावण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत आपली बाजी मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष आपली खुर्ची सोडणार का, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी रंगणार त्रैमासिक संगीत सभा

0
0

कार्यक्रमात नाशिकची युवा सतारवादक पूनम गारे हिचे सतारवादन होणार आहे. तिला अर्थव वारे तबला संगत करणार आहे. उत्तरार्धात पुणे येथील वीणा सहस्त्रबुध्दे यांच्या शिष्या चिन्मयी आठले यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर आशिष कुलकर्णी तर तबल्यावर सुजीत काळे साथसंगत करणार आहे. सर्वांना खुला प्रवेश असलेल्या या मैफिलीस नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारवालानगरजवळ पुन्हा अपघात

0
0

दिंडोरी रोडवर सुरतहून तामिळनाडूकडे जाणाऱ्या कापड माल वाहतूक ट्रकला (टी. एन. २८ ए. वाय. ३७८२) वापीहून पेठरोडकडून हैदराबादला मशिनरी घेवून जाणाऱ्या (एच. आर. ५५ एम. ०७५२) या ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे सुरतकडून येणारा ट्रक जागीच पलटी झाला.

ट्रकमधील सर्व माल रस्त्यावर सर्वत्र पसरला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तारवाला नगर चौकात सिग्नल कार्यान्वित असला तरी अपघात होत असल्याने वाहनचालक आणि रहिवाशी धास्तावले आहेत. मुख्य चौकात चारही बाजुंनी रस्त्यावर गतिरोधक टाकल्यास वाहनांचा वेग कमी होऊन अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नपत्रिका .. ती ही नागरुपात

0
0

सुशांत हा काही वर्षापासून ओझर येथील नागरी परिसरात आलेले सर्प पकडून त्यांना निसर्ग सान्निध्यात सोडतो. सापांची त्याची ही सेवा अविरतपणे सुरू आहे. यात त्याच्या हाताला नागाने चावा घेतला आहे. त्याचा शनिवारी, ६ फेब्रुवारी रोजी वडनेरभैरव येथील विद्या या मुलीशी विवाह होणार आहे.

सुशांतने लग्नपत्रिकेचा प्रथमदर्शनी भाग हा नागाच्या फण्याच्या आकाराचा आहे. फण्याच्या आतील भाग उघडल्यावर मानवी वस्तीच्या अतिक्रमणामुळे पर्यावरणात आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी झगडत असलेले बिबट्या, घुबड, चिमणी, घोरपड, गिधाड या प्राणी पक्षांची चित्रे आहेत. स्वागतोत्सुक म्हणून निसर्गमित्र, पर्यावरणमित्र, प्राणीमित्र, पक्षीमित्र असे लिहिले आहे.

वन्यजीव आहे अनमोल, समजून घ्या सहजीवनाचे मोल असा सुविचार लिहिला आहे. त्याखाली राज्य घटनेच्या कलम ५१ अ (ग) नुसार भारतीय नागरिकांची पर्यावरण वाचविण्यासाठीची कर्तव्ये दिली आहेत. लग्नपत्रिकेच्या मागील बाजूस 'साप वाचवा माणूस वाचवा' यावर तुकाराम गाथेतील सुंदर अभंग लिहिला आहे.

प‌त्रिका ठरली कौतुकाचा विषय लग्नपत्रिका पाहिल्यावर लहान मुलांना प्रथम भीती वाटते. मात्र, त्यांच्यासह पालकांना सर्पाचे पर्यावरण साखळीतील महत्त्व विषद केल्यावर मुले ही पत्रिका कौतुकाने इतरांना दाखवतात, असा अनुभव सुशांतने 'मटा'शी शेअर केला.



माणसाच्या विकासाच्या खोट्या कल्पनेमुळे साप, बिबट्या, घोरपड, गिधाड, चिमणी हे प्राणी नामशेष होत आहेत. त्यांना आणि माणसाला वाचविण्याची सुबुद्धी सर्वाना मिळावी म्हणून ही अनोखी आकारातीली पत्रिका छापली आहे. - सुशांत रणशूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्सला हव्यात गर्दीच्याच जागा!

0
0

शहरातील साडेनऊ हजार हॉकर्सधारकांना हक्काची जागा मिळावी यासाठी महापालिकेने हॉकर्स धोरण तयार केले असून त्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. या हॉकर्सधोरणाला अंतिम रुप देण्यासाठी महापालिकेत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शहर फेरीवाला धोरण समितीची बैठक होत आहे. परंतु, या बैठकीपूर्वी नाशिक जिल्हा हॉकर्सधारक व टपरीधारक युनियनच्या वतीने महापालिकेसमोर या प्रस्तावित हॉकर्स धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित हॉकर्स झोन व नो हॉकर्सझोन आम्हाला मान्य नाही. यामुळे हॉकर्सचा रोजगार बुडणार आहे, असा दावा संघटनेने आंदोलनप्रसंगी केला आहे.

संघटनांचे स्वतंत्र आंदोलन बुधवारी महापालिकेच्या बाहेर विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. 'गर्दीच्या जागा आम्हाला द्या' अशी मागणी त्यांनी केली. महापालिका प्रवेशद्वारावर नाशिक जिल्हा हॉकर्स टपरीधारक युनियनच्या आंदोलनासोबतच जय महाराष्ट्र हॉकर्स सेनेने स्वतंत्र आंदोलन केले. त्यामुळे हॉकर्सझोन वरून संघटनामंध्ये फूट पडल्याचे चित्र होते. सध्याच्या ठिकाणीच व्यवसाय करत असलेली जागा हॉकर्सधारकांना द्यावी अशी मागणी हॉकर्स सेनेने केली आहे.

सुरळीत वाहतुकीवर प्रशासनाचा भर हॉकर्सधारकांनी शहरातील मध्यवर्ती व गर्दीच्या ठिकाणांची मागणी केली आहे. परंतु, या जागांवर हॉकर्सधारकांना परवानगी देता येणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अशोकस्तंभ, सीबीएस, रविवार कारंजा, एमजी रोड, शालीमार या ठिकाणी वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. वाहनांसह माणसांना चालण्यासाठी जागा नसते. त्यामुळे या ठिकाणी 'हॉकर्स झोन' कसा होवू शकतो असा सवाल प्रशासनाने केला आहे. या ठिकाणी हॉकर्सधारकांना परवानगी दिल्यास वाहतुकीचा बोजवारा होणार आहे. वाहतुक सुरळीत होण्यासाठी व हॉकर्सधारकांना त्यांना हक्काची जागा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. संघटनांनी हॉकर्सधारकांची दिशाभूल करू नये असा दावाही त्यांनी केला आहे.

येथे 'नो हॉकर्स झोन' नव्या हॉकर्स धोरणात सीबीएस, शिवाजी गार्डन, शिवाजी रोड, शालीमार चौक, नेहरू गार्डन, भद्रकाली परिसर, गाडगे महाराज चौक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसर, दिंडोरी नाका, गंगापूर रोड, द्वारका परिसर हे 'नो हॉकर्स झोन' असणार आहेत. या ठिकाणी वाहनांची व नागरिकांची मोठी गर्दी असते.

येथे 'हॉकर्स झोन' प्रशासनाने गंगावाडी, घास बाजार, घारपुरे घाट, आनंदवल्ली, टाकळीरोड, अशोका मार्ग जॉगिंग ट्रॅक अशा ठिकाणी हॉकर्स झोन करण्यात आले आहेत. पंरतु या जागा गर्दीच्या नसल्याने आपल्याला नको असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. महापालिकेने 'नो हॉकर्स झोन'मध्ये समाविष्ट केलेल्या जागांवरच आता संघटनेने दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणामुळे वाढली वर्दळ

0
0

रस्ता रुंदीकरणामुळे वाढली वर्दळ म. टा. प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील हिरावाडी आणि गुंजाळबाबा चौफुलीवर रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच परिसरात बालवाडी, अंगणवाडी आणि महापलिकेच्या अनेक शाळा असल्याने त्यांना या भागातील अनेक मुले शाळेत पायीच ये-जा करीत असतात. त्यांना भरधाव वेगाने धावणाऱ्या अनेक वाहनांचा रोजच सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच एका मोटरसायकलवाल्यास रिक्षाचालकाने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वारामागे बसलेल्या ८० वर्षाच्या आजीस मोठी दुखापत झाल्याची घटना घडली आहे. तसेच सायकलीने शाळेला जाणाऱ्या मुलीस मोटरसायकलचा धक्का लागल्याने तीही जागीच पडली. अनेकांना रस्ता ओलांडताना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे. याच ठिकाणी जेम्स शाळा आहे आणि समोरच मंगल कार्यालय आहे. त्यामुळे याठिकाणी हजारो वाहने येतात आणि वाहतूक कोंडी होते. याकडे लक्ष देण्याबाबत संबंधितांना निवेदन देण्यात आले आहे. पण कोणीही हालचाल करीत नसल्याचे नागरिकांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. तसेच चौफुलीवर समोरील वाहन दिसत नाही त्यासाठी दोन्ही बाजूना रोड रुंद करावा लागणार आहे. याच रोडवर सकाळी आणि सायंकाळी फिरणारायला जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला साईड पट्ट्या भरण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृतधाम चौफुलीवर वाहतूक कोंडी

0
0

अमृतधाम चौफुलीवर वाहतूक कोंडी

भाजी बाजार तसेच स्पीड ब्रेकरचाही वाहतुकीला मोठा अडथळा

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील आडगांव नाका ते आडगावदरम्यानच्या सर्वात मोठ्या अमृतधाम येथील चौफुलीवर नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत आहे. दररोज सायंकाळी चार वाजेपासून रात्री उशीरापर्यंत वाहनांच्या प्रचंड गार्दीमुळे वाहतूक कोंडीची होऊन अर्धा-अर्धा तास वाहने खोळंबून राहत आहे.

या ठिकाणी मालेगावकडून नाशिककडे आणि पुणे, औरंगाबादकडून मेरी, दिंडोरी व पेठ रोडकडे अवजड वाहनांची सातत्याने वाहतूक सुरू असते. या वाहनांची लांबलचक रांग लागली की जणू रास्ता रोकोच होते. अशावेळी दुचाकी, चारचाकी आणि पादचारी नागरिक व प्रवाश्यांचे खूपच हाल होतात. याठिकाणी दर शनिवारी भाजीबाजार भरतो. तो तर आता अक्षरशः औदुंबर नगरपर्यतच्या सर्व्हिस रोडला भिडला असल्याने परिसरातील रहिवाशांना वाहन घेऊन घरापर्यंत पोहोचणेही आवघड होत आहे. या परिसरात शाळा व कॉलेजचे हजारो विद्यार्थी ये-जा करीत असतात. वाहतूक आणि गर्दीमुळे प्रत्येकालाच आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शिवाय याच परिसरात अनेक शाळा आणि कार्यालये आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचेही खूप हाल होतात.

तसेच येथील महामार्गावर दोन्ही बाजूनी टाकलेले उंचच उंच गतिरोधकसुद्धा डोकेदुखी ठरत आहेत. अनेक वाहने गतीरोधकाच्या उंचीमुळे जागीच बंद पडत असून मागील वाहने पुढच्या वाहनावर आदळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. ................ नागरिकांची मागणी १गतीरोधाकाची उंची त्वरित कमी करावी २सिग्नलची व्यवस्था करावी, कायम शहर वाहतूक पोलीस कर्मचारी असावेत. ३या ठिकाणचा भाजी बाजार रोडवर बसू देऊ नये. अतिक्रमण विभागाने लक्ष घालावे ४दोन्ही बाजूना प्रवासी वर्गासाठी नेमक्या जागेवर थांबा करावा. तसे नामफलक लावावेत. .............

'महामार्गावरील गतीरोधाकांची उंची कमी करावी. भुयारी मार्ग करावा, अन्यथा पुलाची व्यवस्था करावी. भाजीबाजार सर्व्हिस रोडवर भरवू नये. वाहतुकीच्या मार्गापासून लांब असावा.' शामराव पिंपरकर ............

'प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा शेड उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांची ओढाताण थांबेल. या भागात वाहतुकीच्या समस्यांमुळे खूप खोळंबा होत आहे. त्यावर त्वरीत उपाय योजावा.' मोहन सहाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा युनियन शाखेची स्थापना होणार

0
0

रिक्षा युनियन शाखेची स्थापना होणार देवळाली कॅम्प : येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नूतन मध्यवर्ती रिक्षा युनियन शाखेची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती येथील रिक्षाचालक मालक संघटनेचे सुनील पगारे यांनी संघटनेच्या बैठकीत दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व स्तरातील सर्व जातीधार्मियांना सामावून घेत जुने बस स्थानक येथे रिपाई रिक्षाचालक मालक शाखेच्या नवीन कार्यकारणी निवडीसह मध्यवर्ती शाखेची स्थापना करण्यात येणार आहे. बैठकीस लाला साळवे,सुनील गांगुर्डे,जितु खरालीया,अमजद शेख,बाळा केदारे,देवा पगारे आदी रिक्षाचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात पायऱ्यांचा वाडा

0
0

धनंजय गोवर्धने

शाळेत असताना माझा मित्र अनिल जोशी रविवार कारंजावर राहात असे. आम्ही मित्र त्याच्या घरी जमायचो. त्याचे आईवडील परगावी गेले की, रात्रभर गाणी, गप्पा धमाल असायची. अर्ध्या चड्डीतून बेलबॉटममध्ये आल्यानंतरही कॉलेजमध्ये असताना त्या वाड्यात जमत असू. सात पायऱ्यांचा वाडा म्हणून तो प्रसिध्द होता. पूर्वेला दगडी चिरेबंदी सात पायऱ्या त्याच्या दोन्ही बाजूला घडीव दगडाचे दोन कट्टे. या कट्ट्यांवर बसत आम्ही सहलींचे नियोजन केले, कोणत्या सिनेमाला जायचे अन् मिसळ कुठे खायची याची चर्चाही केली.

सात पायऱ्या दगडी चढून वर आलं की, एक मोठ्ठा जाडजूड कोरीव काम केलेला दरवाजा. त्याला एक मोठ्ठी जुन्या पध्दतीची कडी, उंबरा ओलांडून आत आलं की दरवाजा बंद करताना लावायचा एक मोठ्ठा अडसर, अडसर म्हणजे दरवाजा दोन्ही बाजूंना भिंतीत असलेल्या गोलाकार जागेत आत सरकवलेलं जाडजूड गोलाकार लाकूड ते दरवाजा बंद करताना लावावं लागे. रात्री बाहेर सिनेमाला जायचं असेल तर दरवाजाच्या आत असलेल्या लोखंडी कडीला कुलूप लावून जायचे म्हणजे अन्य कोणीही अडसर लावीत नसे. रात्री कोणीतरी उशिरा येणार आहे हे त्यांना त्यावरुन समजायचे उंबरा ओलांडून आत आलं की, एक मोठी २० बाय २० ची मोकळी अंधारी जागा. मधोमध एक लाकडी जाड खांब दगडी जोत्यावर भक्कम उभा, वरती चौरस धिरे, त्यावर नक्षीकाम गोट मारलेले, आडव्या सरया आणि गोल काळे वासे, पुढे दगडी चौक आत दोन दगडी पायऱ्या आणि पाण्याचा हौद. चौकातल्या खांबांना आडवी गोलसर खोळ, दोन लाकडं खोळात गुंतवलेली, वरच्या लाकडावर बसून खालच्यावर पाय टेकवत गप्पा मारायच्या, चौकातल्या चारही बाजूंच्या खांबांना वरती लोखंडी गोलाकार कडी, कधीतरी कार्यक्रमासाठी छताची गरज भासल्यास त्या कड्यांना ते बांधता यायचं, सूर्याचं उन परावर्तीत होऊन चौकात प्रकाश पाझरे पण त्या मोकळ्या जागेतल्या खांब गूढ वाटे. त्या खांबाभोवती पाय न टेकवता सायकलने गोल चक्कर मारायची स्पर्धा लागे. अशा चकरा मारणे मोठ्यांना आवडत नसे. पुढे एक बोळ होती त्यातून येणाऱ्या उजेडात माणूस ओळखू येत नसे. त्याची काळी आकृती फक्त दिसे. एकदा दुपारच्या शांत वेळी या बोळीत दोन मांजरांचं भांडण बघून अंगावर काटाच आला. पुढे पाऊल टाकण्याची माझी हिम्मतच झाली नाही.

बोळीच्या बाजूला उखळ जमिनीत पुरलेलं होतं. उजव्या बाजूला अनिल राहत असे. वरती सुरेश. पुढच्या मोठ्ठ्या अंगणात मधोमध एक छान तुळशी वृंदावन. त्याच्या जवळच एक पारिजातकाचं मोठ्ठं झाड अनेक वर्ष श्रावणात लाल फुलांचा अभिषेक कुणीही न सांगता करत असे. उजव्या कोपऱ्यात पिठाची गिरणी त्याच्याजवळ अनिलच्या जुन्या गाडीचं गॅरेज, डावीकडे रामचंद्र हलवाई. उजव्या बाजूच्या कंपाऊंडच्या बाजूच्या भिंतीत दोन्ही वाड्यात सामाईक आड होता अनेक वर्ष गुण्यागोविंदाने भरुन राहिलेला. त्या वाड्याविषयी मला इतकं आकर्षण का वाटत होतं? माहीत नाही, मी अनेक वर्ष त्या वाड्यात जातयेत होतो. त्यावर लिहावे म्हणून शोध घेतला तर असंख्य गोष्टी कळाल्या.

शंभर दिडशे वर्षांपूर्वी नारायण गणेश लेले हे इंदोरहून नाशिकला आले. खरं तर लेले हे मुळचे कोकणातल्या मालगुंडचे ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी. कोंडो केशव लेले हे ज्ञात असलेले सातव्या पिढीतले. मुळपुरुष लेलेकडे इंदोरच्या होळकरांची इरासदारी होती. चातुर्मासात तीर्थस्थळी राहावे म्हणून त्यांनी हा वाडा बांधला. काशीच्या लेले शास्त्रींच्या शिष्यांच्या ज्ञानाबाबत शंका घेऊन त्याला अपमानीत केले गेल्याने व्यथित होऊन काशिनाथ शास्त्री लेले नाशिकला आले. ते या लेले वाड्यात वेद पाठशाळा चालवीत इथे दररोज वेद अध्ययन होत असे. पुढे पुढे विद्यार्थी मिळेनासे झाले वेदशाळा बंद पडू लागली. अनेक वर्ष इतक्या मोठ्या वाड्यात कोणीच राहात नव्हते. कधीतरी लेले नाशिकला येत. पण वास्तुची देखभाल व्हावी, साफसफाई करुन रोज दिवाबत्ती करावी एवढ्याच मोबदल्यावर माणसांना राहण्याची विनंती केली. तेव्हा तो वाडा माणसांच्या हालचालींनी जिवंत राहिला. वाड्याला वाडपाच्या प्रचंड जाडजुड भिंती, दुमजी बांधकाम आणि वरचा लवण मजला म्हणजे माळा, ज्याचं छत एका बाजूला खाली उतरतं असल्याने लवून जावं लागे म्हणून लवण मजला. छपरावरती थापीची चपटी कवले. नळीची अर्धगोलाकार लांबट कवले. गरिबांची, मध्यमवर्गाची थापीची चपटी पुस्तकाच्या आकाराची आणि श्रीमंतांची मंगलोरी असत.

श्री वामन शास्त्री लेले हे काशिनाथ शास्त्री लेलेंकडे वेदविद्या शास्त्र शिकलेले. वैदिक अभ्यासात ते पारंगत होते. त्यांच्या विद्वतेचा यथोचित सन्मान शासनाने केलेला होता. त्यांच्याकडे अनेक जुन्या पोथ्या, हस्तलिखित होती. युध्दकलेचे शास्त्र, वेदपुराण अशी दोन बैल गाड्या भरुन असलेली ग्रंथसंपदा त्यांनी त्यांचे स्नेही अभ्यासक सखाराम शास्त्री खेडकर यांना दिली. त्यांच्या वाड्याच्या भिंती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा मातीच्या उदरात लुप्त झाली. नारायण गणेश लेले यांनी अध्यानाने संप्रुत जीवन जगलेले त्यामुळे माणसाने जीवनात चारही आश्रमाचा अनुभवावा म्हणून अतूर संन्यास घेतला. अतूर संन्यास म्हणजे सर्व सामान्यांसारखे हे ऐच्छीक जीवन सोडून नदी किनारी जाऊन स्वतःचे उत्तरकार्य करायचे, स्वतःचे पिंडदान तर्पण करायचे, नदीत उभे राहून सर्व संगाचा वस्त्रांचा त्याग करायचा. मग संन्यासी त्याला भगवी वस्त्रं देतो ती वस्त्रं परिधान करुन संन्यासी म्हणून उर्वरित जीवन जगायचे लेलेंनी असं संन्यासी आयुष्य व्यतीत केलं. एके दिवशी ध्यानधारणा करीत असताना त्या अंधाऱ्या जागेतल्या मधोमध असलेल्या खांबाला पाठ टेकवलेल्या स्थितीत त्यांनी देह सोडला. ते योगी होते. सर्व सामान्यांप्रमाणे कोणत्या पंचेंद्रियाद्वारे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले हे कळू शकले नाही. डोळे मिटलेले, तोंडही मिटलेले. चेहरा शांत प्रसन्न, ना दुर्गंधी ना अन्य काही सुचक खुण, जाणत्यांच्या मते ध्यानधारणेमुळे त्यांनी त्यांचे प्राण कुंडलिनी जागृत करुन मोक्षाप्रती आणलेले असावेत आणि त्यांचे प्राण ब्रह्मरंध्रापाशी अडले असावेत म्हणून जाणत्या माणसाने शंखाने त्यांचे ब्रह्मरंध्र फोडून प्राण मोक्षाप्रती मुक्त केले. त्यांची समाधी मोदकेश्वर मंदिराच्या समोरच्या जागेत होती. लेलेंचे पूर्वज कोजागिरी पौर्णिमेला विधीवत त्यांची पूजा करत असत. नगरपालिकेने रस्त्याच्या बांधकामाचे वेळी त्याबाबत नोटीस पण जाहीर केली होती. त्यानुसार मग विधीवत पूजा करुन समाधी विसर्जन करण्यात आलं.

लेले वाड्याच्या निमित्ताने नगरपालिकेचे तत्कालीन कामकाजाच्या भाषेची माहिती मिळते. लेले वाड्याचा घर नं ६३३ होता. तो बदलून ६७१ करण्यात आल्याची नोंद आहे. नाशिक म्युनिसिपालटी जाहीर खबर घरपट्टी व सफाई पट्टीची दिनांक ३१ मे १८९३ रोजीची घरपट्टी व सफाईपट्टीची सन १ एप्रिल १८९३ ते ३१ मे १८९४ सालाची आकारणी रजिष्टर तयार झाली असून ती ज्यास पहावयाची असतील त्यांनी म्युनिसिपालटीचे कचेरीत वेळात येऊन पहावीत. अशा नोंदी बघायला मिळाल्या. दिनांक १-७-१९१२ रोजीच्या नोटीशी नुसार नाशिक शहरातील मोठमोठ्या रस्त्यांमधून पाण्याचे नळ नेण्याचे काम बहुतेक पूर्ण झाले आहे. परंतु लोकांच्या सोयीसाठी गल्ल्यात नळ घालणे आवश्यक वाटल्यावरुन नळ जोडणीची तरतुद व अर्धा इंची तोटी घेणाऱ्यास सालाना १२ ते १५ व एक इंची तोटी घेणाऱ्यास रुपये २५ पेक्षा जास्त खर्च येणार नाही.

पूर्वीचा आग्रारोड लेले वाड्यावरुन जात होता. रविवार कारंजाजवळ यशवंत मंडई आहे. त्या परिसरात तुरुंग होता आणि बाहेरच्या बाजूला दुकान होती. नवीन तांबट गल्ली ही त्यानंतरची वस्ती. जुना ६७१ लेले वाडा त्याच्यासमोर वैद्यांचा वाडा, दगडु तेली यांचे जुने दुकान, वीज मंडळाचं कार्यालय, लेले वाड्यातलं रेशनचं दुकान, तो दगडी सात पायऱ्यांचा वाडा त्यावर बसून केलेली चर्चा श्रीकांत कुलकर्णी, अनिल जोशी, सुरेश खरे, मंगळवारी दुकानाला सुट्टी असल्यावर येणारा चंदु सुगंधी, विनायक कोल्हटकर कॉलेजच्या दिवसातल्या नाटक चर्चा सारं आठवतं पण सात पायऱ्यांचा तो लेलेंचा वाडा आता नाहीये तिथं आहे एक भव्य व्यापारी संकुल. नव्या काळाची नवीन फसाल्ड काचेची वस्त्रे लेवून जुन्या आठवणींच्या जखमांवर साकाळून आलेल्या खपल्यासारखी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ भरारीसाठी वाहतुकीचे नियमन गरजेचे

0
0

मिलींद अंधृटकर, पंचवटी

स्मार्ट बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या नाशिक शहराची वाहतूक व्यवस्था आणि वाहनतळांची कमतरता हा गंभीर समस्या बनली आहे. विकासाची स्मार्ट भरारी मारण्यापूर्वी या समस्यांचा नीट अभ्यास करून त्यावर महत्त्वाच्या उपाययोजना आखून अंमलात आणणे गरजेचे आहे. शहराची वाहतूक व्यवस्था ज्या विभागाकडे आहे त्या विभागाने या व्यवस्थेकडे पूर्णपणे पाठ फिरविल्याचे दिसते आहे.

वाहनचालकांना धाक नसल्याने लोक बेदरकारपणे वाहने चालवून अपघातांना आमंत्रणे देतात. सिग्नलला बरेचसे मोटार सायकलस्वार, रिक्षाचालक जुमानतच नाहीत. ५० टक्क्यांहून अधिक लोक मोबाइलवर बोलता बोलता वाहने चालविताना दिसतात. पादचारी सिग्नल सुटला असतानाही रस्ता ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न करतात. परिणामी वाहनाचा वेग मंदावतो आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. नेमके गर्दीच्या वेळी वाहतुकीचे नियमन करण्यास कोणीही वाहतूक पोलिस उपस्थित राहात नसल्याने वाहतुक कोंडीच्या समस्येमध्ये भरच पडते. या सर्व दुर्व्यवस्थेला वाहतूक पोलिस विभाग जबाबदार असून ते यात ठोस कार्यवाही का करीत नाहीत याचे अधिक आश्चर्य वाटते.

रस्त्यांची रूंदी फारशी वाढली मात्र रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या मात्र दिवसागणिक वाढतेच आहे. त्या प्रमाणात वाहतूक पोलिसांची संख्या वाढणेही आवश्यक आहे. तरच वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला हात घालता येईल, असे वाटते. प्रत्येक सिग्नलवर सी.सी.टी.व्ही. बसविणे गरजेचे आहे. सिग्नल सुटल्याशिवाय वाहने निघू नयेत यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडण्याची सवय वाहतूक पोलिस कठोरपणे वागले तरच लागू शकेल. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नियमांची कठोर आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केवळ पोलिसच करू शकतात. त्यांनी ते करावे, अशी अपेक्षा आहे.

संपूर्ण वाहतुकीचे नियंत्रण सीसीटीव्हीद्वारे करता येणे शक्य आहे. ते काहीसे खर्चिक काम असले तरी त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास निश्चित मदत होईल. विशेष म्हणजे सीसीटीव्ही बसविले की अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय मिळू शकेल. रिक्षावाल्यांचा बेशिस्तपणाही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी खूप मोठी समस्या आहे. शहरातील प्रत्येक मार्गावर बेशिस्त रिक्षाचालकांमूळे अन्य वाहनधारकांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागेल. रिक्षावाल्यांनी कोठेही वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. त्यांना तीन वेळा ताकीद देऊन नंतर त्यांच्यावर परवाना निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात यावी. अशा कठोर कारवायांची अंमलबजावणी केल्याशिवाय रिक्षा चालकांना शिस्त लागणे कठीण आहे.

वाहतूक व्यवस्थेप्रमाणेच पार्किंग ही देखील जटील समस्या बनली आहे. रस्त्यावर उतरणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असताना पार्किंगच्या जागा मात्र वाढलेल्या नाहीत. ही वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. ती वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. या समस्यांवर काही उपाय सुचवावेसे वाटतात.

१. प्रत्येक नवीन इमारतींना जादा एफएसआय अथवा टीडीआर देऊन जादा पार्किंगची व्यवस्था करणे बांधकाम व्यावसायिकला बंधनकारक करावे. इमारतीतील रहिवाशांव्यतिरिक्त व्हिजीटर्स पार्किंगच्या व्यवस्थेचे बंधन त्यांच्यावर घालण्यात यावे.

२. महापालिकेने स्वत:ची बहुमजली इमारत तयार करून ती भाडेतत्वावर पार्किंगसाठी चालविण्यास द्यावी.

३. ज्या कारमालकांकडे कारसाठी अधिकृत पार्किंग नाही त्यांनी रस्त्यावर वाहने उभी करण्याऐवजी सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करण्याची सक्ती करावी.

४. रस्त्यात वाहने पार्क केल्यास त्यांना मोठा दंड आकारावा.

५. पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशीपमध्ये पार्किंगचे प्रकल्प राबविण्यात यावेत.

६. शहराच्या मध्यवर्ती भागात जेथे पार्किंगसाठी जागा नाही तेथे भूमिगत पार्किंग करण्यात यावे.

७. शहरातील सर्व मोटार सायकल्स आणि अन्य वाहनांना पार्किंग कर लावावा.

८. मोटरसायकल्ससाठी देखील वाहने पार्किंगमध्ये लावण्याची सक्ती करावी.

९. वाहनांची पासिंग करताना प्रादेशिक वाहन विभागाने संबंधितांकडे पार्किंगची वैयक्तिक व्यवस्था असल्याची खात्री करूनच वाहनाचे पासिंग करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर प्रकरणांना दिलासा

0
0

२९ जानेवारीपूर्वीच्या प्रस्तावांचा होणार विचार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने मंजूर केलेल्या टीडीआर धोरणामुळे बाधित झालेल्या छोट्या प्लॉटधारकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टीडीआरसाठी २९ जानेवारीपूर्वी प्रस्ताव दाखल करणारे आणि कार्यालयीन प्रत प्राप्त करणाऱ्यांना सवलत देवून त्यांची प्रकरणे मंजूर करण्यासंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल हरित लवादाकडे सादर केला जाणार आहे, असे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

राज्य सरकारने नवे टीडीआर धोरण जाहीर केले असून त्यात नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील प्लॉटधारकांना टीडीआर देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे बिल्डरांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून घरांच्या किंमती वाढणार आहे. टीडीआरसाठी २९ जानेवारीपूर्वी नगररचना विभागात अर्ज दाखल झाले. परंतु, त्यांना अद्याप टीडीआर मंजूर झालेला नाही. अशांसाठी आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २९ जानेवारीपूर्वी टीडीआर व बांधकाम परवानग्यासाठी अर्ज केलेल्या प्लॉटधारकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. अध्यादेशापूर्वी सर्व प्रकरणांना मंजुरी द्यावी अशी दाद महापालिकेकडून राष्ट्रीय हरित लवादाकडे मागितली जाणार आहे. या सर्व प्रकरणांना मंजुरी देण्याची मागणी आपण हरित लवादाकडे करणार असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिली आहे. हरित लवादासोबत राज्यसरकाकडेही या संदर्भात मार्गदर्शन मागितले जाणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.



छोट्या प्लॉटधारकांना फायदा

राज्य सरकारच्या या अध्यादेशामुळे छोट्या प्लॉटधारकांसह छोट्या बांधकाम व्यावसायिकांनाही फटका बसणार आहे. असे प्लॉटधारक व व्यावसायिकांची संख्या मोठी असून त्यामुळे थेट घरांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने २९ जानेवारीपूर्वीची नगररचना कार्यालयात दाखल असलेल्या टीडीआर प्रकरणांना सूट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हरित लवाद व राज्य सरकारने पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास व्यावसायिकांना व प्लॉटधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी कपातीबाबत तारीख पे तारीख

0
0

प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये टोलवाटोलवी; नाशिककर अनभिज्ञ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या पाणीकपातीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरवारी होणारी बैठक पुन्हा लांबली. आता ही बैठक मंगळवारी (दि. ९) होणार आहे. एकलहरेचे अतिरिक्त पाणी नाशिक महापालिकेला मिळणार असल्याने कपातीची गरज नसल्याचा दावा आमदार बाळासाहेब सानप यांनी केला. पालकमंत्री मंगळवारच्या बैठकीत वाढीव पाणीकपातीवर अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी गुरूवारी सांगितले.

शहरासाठी उपलब्ध साठा व पाणीपुरवठ्याचे गणित जुळत नसल्याने वाढीव पाणीकपात अटळ असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी म्हटले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी एकलहराचे वाढीव पाणी उपलब्ध करून दिले असले तरी शहरवासियांना कपात सोसावीच लागणार आहे. एकलहरेचे वाढीव पाणी मिळूनही २७ दिवसांचा तुटवडा आहे. त्यामुळे पाण्याचा तिढा सुटत नाही. उपलब्ध पाणीसाठा व शिल्लक दिवसांचे गणित जमत नसल्याने कपातीची घोषणा करण्यांचे धैर्य दाखविले जात नाही. पालकमंत्री या संदर्भातील निर्णय घेतील, अशी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. तर भाजपकडून वाढीव पाणीकपात होणार नसल्याचा दावा केला जात आहे. परंतु, या संदर्भातील आकडेवारी सत्ताधाऱ्यांकडून जाहीर केली जात असतांना भाजप मात्र आकड्यांच्या खेळापासून लांब आहे. केवळ पाणी पुरेल असा दावा भाजपकडून केला जात आहे. कपातीच्या प्रश्नावर पालकमंत्री बैठक घेतील, असा दावा केला जात आहे. मात्र, महिना लोटला तरी ही बैठक होतच नसून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे नाशिककर वेठीस धरले जात आहे.

आता मंगळवारी फैसला

पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनाच या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. परंतु, अधिकारी या वादात पडायला आता तयार नाहीत. तर महापालिकेकडून वाढीव कपात आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. परंतु, त्यात निर्णय झाला नाही. तर भाजपचा कपातीला विरोध आहे. त्या संदर्भात आमदार सानप यांनी गुरूवारी पालकमंत्र्यांशी चर्चा केली. महाजन यांनी पुढील मंगळवारी बैठक घेवून पाण्याचा अंतिम तोडगा काढणार असल्याचे सानप यांनी पत्रकारांशी सांगितले.
वाढीव पाणीकपात नाहीच पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनाच या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. परंतु, अधिकारी या वादात पडायला तयार नाहीत. तर महापालिकेकडून वाढीव कपात आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. परंतु, त्यात निर्णय झाला नाही. तर भाजपचा कपातीला विरोध आहे. त्या संदर्भात आमदार बाळासाहेब सानप यांनी नाशिककरांना वाढीव पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार नाही. त्यांना अन्य मार्गांनी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.
नाशिकच्या ओंजळीत मिळणार वाढीव पाणी?

शहराला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून एकलहऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या साठ्यातून महापालिकेला ३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध करून देता येईल का याचा विचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गुरूवारी सांगितले.

सध्या नाशिक शहरात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नाशिक महापालिकेने एकलहरा प्रकल्पासाठी ७०० द. ल. घ. फु. पाणीसाठा राखीव ठेवला होता. यातील २०० दलघफू पाणीसाठी एकलहरा पॉवर स्टेशनने वापरला आहे. त्यामुळे सध्यस्थितीला त्यांच्याकडे ५०० दलघफुट पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ३०० दशलक्ष पाणीसाठा नाशिक महापालिकेला देता येईल का याबाबत चाचणी सुरू आहे. हे पाणी नाशिक महापालिकेला पुन्हा मिळाल्यास थोड्या प्रमाणात का होईना पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत लवकरच तज्ज्ञांची मते मागवली जाणार असल्याचे कुशवाह यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सहा वर्षांची सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहा वर्षीय मुलीवर दोन दिवस लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी आरोपीला सहा वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कळवण येथे ११ डिसेंबर २०१४ रोजी हा गुन्हा घडला होता. सहा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात भावासह होती. मुलांचे आई-वडील बाहेर गेले असताना कळवण येथीलच आरोपी सुरेश सोमा जाधव (५०) याने बाजारातून नवीन कपडे घेण्याचे आमिष दाखवून मुलीला बरोबर नेले. त्यानंतर तो तिला घेऊन दोन दिवस विविध ठिकाणी फिरला. यादरम्यान त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. दोन दिवसांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. कळवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी जाधव विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल झाले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. अल्पवयीन मुलीची साक्ष या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली होती. जाधव विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश उर्मिला फलके-जोशी यांनी लैगिंक अत्याचारप्रकरणी सहा वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड आरोपीला ठोठावला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. श्रीमती सुनिता साळवे यांनी कामकाज पाहिले.

घरातून मोबाईल लंपास

दिपालीनगर परिसरातील धनश्री अपार्टमेंटमधील घराच्या खिडकीतून हात घालून चोरट्याने घरातील मोबाईल आणि एक टॅब चोरून नेला. प्रसाद विश्वभंर विठ्ठल यांच्या घरी २९ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. या चोरीत १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमीन विक्री करण्याचा प्रयत्न

खोट्या नावाचे पॅनकार्ड तयार करून सात संशयितांनी जमीन विकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सातपूर परिसरातील गणेशनगर येथील दिपा अशोक बच्छानी (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित निलेश दामोदर सपकाळ व इतर सहा संशयितांनी संगनमत करून बच्छानी यांच्या नावाने खोटे पॅनकार्ड तयार केले. त्यानंतर बच्छानी यांच्या मालकीचा सर्वे क्रमांक ६५/२ अ मधील प्लॉटची जुन २०१४ पासून उपनिंबधक कार्यालयात परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला.

प्रवाशाची रोकड लंपास

शहर बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशांकडील रोकड चोरून नेली. पांढुर्ली येथील सावतानगर परिसरातील सिताराम भिका बोडके (४५) हे बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिकरोड बसस्टॉपवर उतरत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्याकडील २२ हजार रुपये चोरून नेले. बोडके यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रीय’ कारभाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मैत्रीय ग्रुपच्या दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तक्रारदारांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. याविषयी माहिती देण्याबाबत देताना पोलिसांनी मात्र चुप्पी साधली आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गुंतवणुकदारांची मोठी संख्या असलेल्या मैत्रीय ग्रुपच्या रीअल्टर अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि मैत्री सुवर्णसिध्दी प्रा. लि. या कंपन्यांवर सेबीने काही महिन्यांपूर्वी आर्थिक निर्बंध लादले. यानंतर, गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणे कठीण झाले. कंपनीकडून मिळालेले चेक वटतच नसल्याचे अनुभव गुंतवणुकदारांना मिळाले. यातूनच गत मंगळवारी संतप्त झालेल्या शेकडो गुंतवणुकदारांनी होलाराम कॉलनीतील मैत्रीय ग्रुपच्या कार्यालयावर

हल्लाबोल केला. यानंतर काही गुंतवणुकदारांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेतली. आपल्याकडील गुंतवणुकीचे पुरावे सादर करीत त्यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुंतवणुकदारांचे जाबजबाब नोंदवण्यात आले. गुंतवणुकदारांच्या शिष्टमंडळापैकी चौघा गुंतवणूकदारांच्या तक्रारींची नोंद पोलिसांनी घेतली आहे. घटनेचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत. मात्र, याबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जाते आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून याविषयी काहीही बोलण्यास मज्जाव करण्यात आला असून, या गुप्ततेचा नेमका अर्थ काय असू शकतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत व्यवसायांवर कधी पडणार छापे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

पोलिस आयुक्तालयाकडून सिडको व सातपूर भागात टवाळखोर, जुगार अड्डे व गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे. परंतु यामध्ये जुगार अड्ड्यांवर छापे टाकत असताना अनधिकृत व्यवसायांवर पोलिस कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी श्रमिकनगरला जुगार अड्ड्यावर धाड टाकत ७ जणांना ताब्यात घेतले आहे.

सिडको, सातपूर भागातील टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती व जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये इंदिरानगर पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते. तसेच नाशिकरोड, देवळाली, सिडको व सातपूरच्या अनेक भागांत जुगार अड्डयांवर छापे टाकत काही जणांना ताब्यातही घेतले होते. मंगळवारी सातपूरच्या श्रमिकनगर भागात एका घरात पोलिसांनी छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मुद्देमालासह दुचाकी व चारचाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. यात जुगार अड्डा चालविणारे मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले असल्याने जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकीकडे जुगार अड्ड्यांवर पोलिस कारवाई करत असताना दुसरीकडे मात्र, अनधिकृत व्यवसाय मात्र जोमात आहेत. पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापे टाकताना अनधिकृत व्यवसायदेखील बंद करण्याची मागणी सिडको व सातपूरवासियांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली त्र्यंबकनगरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
थंडीच्या कहर आणि दुष्काळाच्या झळा यावर मात करीत लाखो वारकरी, भाविक त्र्यंबकनगरीत दाखल झाले आहेत. हरीनामाचा जागर करीत अन् भजनात तल्लीन होत हजारो वारकरी संत निवृत्तीनाथांच्या चरणी नतमस्तक झाले. पहाटेपासून गारठ्यातच कुशावर्ताच्या गोदामाईत स्नानासाठी गर्दी झाली होती. तेथूनच संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीवर डोके ठेवण्यासाठी आतूरतेने धाव घेत, दर्शन रांगेचे ब्रम्हगिरीच्या पायथ्याला गेलेले शेवटचे टोक गाठत तब्बल तीन ते चार तासांची प्रतीक्षा करीत, नाथांच्या समाधीवर डोके ठेवताच कृतार्थ झालेले भाव घेऊन भाविक जत्रेत फिरण्यासाठी दाखल होत होते. दिंड्यांनी आलेले वारकरी नगरप्रदक्षिणा करीत आपल्या ठेप्यावर रवाना झाले. सुमारे तीन लाख भाविक निवृत्तीनाथांच्या चरणी लीन झाले.

त्र्यंबक शहर व पंचक्रोशीत दिंड्यांच्या राहुट्या विखुरल्या आहेत. जागोजाग नामवंत कीर्तनकारांकडून भजन, कीर्तन, प्रवचने होत आहेत. यात्रा कालावधीत चित्रण करण्यासाठी तुळशीमाळेची भावभक्ती अनुभवण्यासाठी फॉरेनरही दाखल झालेले दिसून येत आहेत. गुरुवारी दर्शनबारी थेट ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी पोहचली होती. तीन तासांपेक्षा अधिक वेळ दर्शनासाठी लागत असल्याने हवेतील गारवा सोसत भाविक हरीनामाचा आधार घेत तिष्ठत राहिले, तर रात्री बारा वाजेच्या सुमारास महापूजेदरम्यान दर्शन रांग थांबवण्यात आली. त्यानंतर पहाटे चार वाजता शासकीय महापूजेदरम्यान दर्शन रांगेत बराच वेळ थांबावे लागल्याने वारकरी बांधवांनी नाराजी व्यक्त करतांना दिसून आले. थंडीचा कडाका असतांना सायंकाळी सातच्यादरम्यान रांगेत उभे राहिलेले वारकरी पहाटे तीनपर्यंत रखडले. काहींनी बसल्या जागेवर झोपून घेतले होते, तर काही ठिकाणी शेकोट्या पेटवलेल्या दिसून येत होत्या.

भाव भक्तीच्या या यात्रेत हौशी लोकांचा भरणाही अधिक आहे. वर्षानुवर्षांच्या पूर्वपरंपरेने येथे सगेसोयरे, सासुरवाशीणीची मायलेक भेट आदि होत असते. यात्रेच्या निमित्ताने लेकीबाळीला भेटण्यासाठी असुलेले मायबाप आणि सासुरवाशीण यांच्या गाठीभेटी दिंड्यांचे ठेपे आदि ठिकाणी दिसून येत होते. गावोगावच्या समाजाची भिशी वगर्णी नव्याने धर्मशाळा बांधणे याचे प्रस्ताव पारीत होत असतात. येथे काही नव्याने सोयरिक जमवली जात होती, तर कोठे फारकतीवर आलेला मामला मध्यस्थांच्या मदतीने सोडवला जात होता. एकूणच दळवणाच्या साधनांमध्ये क्रांतीकारक बदल झाले. मात्र, समाज जीवनातील यात्रेतील या घडामोडी कायम राहिल्या आहेत. नव्याने लग्न झालेले अथवा ठरलेली तरूणाई पाळण्यात बसण्यासाठी आतुरलेली होती एक झोका चुके काळजाचा ठोका असे म्हणत तरूणाईच्या सोबतीने लहान मुले आणि वयोवृध्द देखील यात्रेचे खास आकर्षण असलेल्या पाळण्यात बसण्यासाठी रांग लावून उभे होते. रेल्वेत व बोटीच्या पाळण्यात बसण्याची गंमत न्यारीच आहे. मौतका कुवा हा मोटारसायकालचा खेळ अधिक गर्दी खेचत होता. कीर्तनात रात्र उजळली असतांना गावाबोहर तमाशाच्या फडात टाळांचा खळखळाट आणि ढोलकीचा कडकडाट रंग भरत होता. वर्षाकाठी तमाशाबारीची मजा लुटणारे होते, तर मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचा वसा घेतलेल्या कलाकारांना दाद देणारे देखील येथे तल्लीन झाले होते. उत्तर रात्री तमाशा संपला तसे आंघोळ करून दर्शनबारीत दाखल होणारे रसीकजन या यात्रेचे खास वैशिष्ट्ये आहे. यात्रेत बसण्यास जागाच नसल्याने व वारंवार अतिक्रमण पथकाने हुसकावल्याने व्यावसायिकांना फटका बसलाच आहे. त्याचबरोबर दुरवरून आलेल्या यात्रेकरूंना निराश व्हावे लागले आहे. थंडीचा भर असल्याने स्वेटर व्रिकेते तेजीत असतात. मात्र, जागेअभावी त्यांनाही नुकसान सोसावे लागले आहे. दिवाळीचा खरीप हंगाम संपल्या नंतर येणारी ही यात्रा व्यावसायिकांना सुगीचे दिवस दाखविणारी असते. तथापि यंदा याबाबत काहीशी मंदी जाणवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी पश्चिम भागातही कारवाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील मालेगाव महानगर पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत गुरुवारी शहराच्या पश्चिम भागातील अतिक्रमणांवर बुलडोजर चालवण्यात आला. गेल्या दोन आठवड्यापासून शहरातील पूर्व भागात मनपा पथकाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असून पश्चिम भागात देखील अशी मोहीम राबवली जाणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते.

शहरातील प्रभाग १ मधील रावळगाव नाका परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे, प्रभाग अधिकारी पंकज सोनावणे, बीट मुकादम संजय जगताप, अजय चांगरे, विष्णू जेधे, मनोहर धिवरे, दिलीप निकम, संजय वालाखेडे, हर्षद गाडरी, गौरव पवार आदींसह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिस निरीक्षक राजमाने यांच्यासह २५ पोलीस कमर्चारीही बंदोबस्तासाठी हजर होते. सकाळी ११ पासून कारवाईला सुरुवात झाली. रावळगाव नाका, भायगाव रोड, कॅम्प रोड या रस्त्यालगत असलेलेल्या अतिक्रमित टपऱ्या , दुकानांचे शेड्स तसेच पक्के स्वरूपातील बांधकामही बुलडोजरच्या सहाय्याने काढण्यात आले. अतिक्रमण हटाव पथकाने सर्व सामानाची जप्ती करून सुमारे ४० अतिक्रमणे या रस्त्यावरून हटवली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकाची जप्ती तात्पुरती स्थगित

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निसाका चालवायला घेणाऱ्या बॉम्बे एस मोटर्स कंपनी, मुंबईचे संचालक सतपालसिंग ओबेरॉय यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश जिल्हा बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक सुभाष देसले यांच्याकडे सुपूर्द केल्याने कारखान्यावरील जप्तीची कारवाई २८ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

निसाका जप्तीची अंतिम नोटीस बजावल्यानंतर जिल्हा बँकेचे प्र. का. संचालक सुभाष देसले, जप्ती कारवाई अधिकारी अ. रा. शिरसाठ, भादानी, गिरी व तालुक्यातील सर्व विभागीय अधिकारी, बँक सल्लागार अॅड एन. एस. पाटील व अधिकाऱ्यांच्या ताफा निसाका कार्यस्थळी आल्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक भागवत भंडारे यांच्यासह कामगार नेते, काही लोकप्रतिनिधी, यांची भेट घेऊन जप्तीबाबत भूमिका स्पष्ट करुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

जप्तीच्या कारवाईमुळे निसाकावर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो, ते कामगार त्यांच्या कुटुंबातील महिला मुलांसह गुरुवारपासून सकाळपासून निसाकावर ठिय्या मांडून होते. कामगारांच्या आक्रमकतेमुळे तणावपूर्ण परिस्थिती होती. दुपारपर्यंत कोणतीही कारवाई होत नव्हती. दुपारी दोनच्यादरम्यान कारखाना सहयोगी तत्वावर घेऊ इच्छिणारे सत्पाल सिंग ओबेरॉय व माजी चेअरमन भागवतबाबा बोरस्ते हे कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर त्यांनी बँकेच्या अधिका-यांसोबत केन्द्र कार्यालयात बैठक घेतली. ओबेराय यांनी हा कारखाना सहयोगी तत्वावर घेण्याची प्रशासकीय प्रक्रिया(मान्यता) अंतिम टप्पात असल्याने एक कोटींचा धनादेश अनामत म्हणून तुमच्याकडे ठेवतो जप्तीची ही कारवाई स्थगित करावी अशी विनंती केली. त्यानंतर कारवाईला स्थगिती देण्यात आली.

आता स्थगित झालेल्या कारवाईनंतर येत्या २८ तारखेपर्यंत सहयोगी तत्वावरील प्रशासकीय मान्यतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास जप्तीची कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता तरी ही सहयोगी तत्वाची प्रक्रिया मान्यतेसाठी सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र यावे व वसाका सारखा निसाका चालू करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सायकलिस्टतर्फे अक्टिव्हिटी कॅलेंडर

0
0

वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी, वेळेचे नियोजन करता यावे यासाठी हे कॅलेंडर प्रकाशित केले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जसपाल विरदी यांनी सांगितले. टेबल कॅलेंडर स्वरुपात असलेल्या या कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्यात आयोजित केलेल्या हिरिटेज राईडची माहिती देण्यात आली आहे. तसेच १४ फेब्रुवारी 'व्हॅलेंन्टाईन डे'च्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मोहिमेची माहिती देण्यात आली आहे. भारतातील प्रख्यात सायकलिस्ट व मार्गदर्शक मितेन ठक्कर यांची मार्च महिन्यात ४ दिवसांची कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत सायकलच्या निवडीपासून ते चालवण्याचे तंत्र याची इत्यंभूत माहिती यात देण्यात येणार आहेत. तसेच २३ व २४ एप्रिल रोजी १८ वर्षांखालील मुलांसाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याविषयी देखील माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे. मे महिन्यात 'पेपर विक्रेत्यांचा राजा' ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. जून महिन्यात 'चॅलेंज ऑफ हिल्स' ही स्पर्धा ११ व १२ जून रोजी होणार आहे. जुलै महिन्यात सायकलवरून पंढरपूरवारी होणार असून त्यासाठी आतापासून लोकांची विचारणा होत आहे. ऑगस्ट महिन्यात इंटरनॅशनल सायकल टूर आयोजित करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात नाशिक सायकलिस्टतर्फे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या नवरात्रात चांदवड, वणी, कोटमगाव अशी सायकल टूर आयोजित करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात १२ तारखेला 'गोल्डन राईड'आणि १४ तारखेला बालकांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

डिसेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे 'पॅलेटॉन स्पर्धा' घेतली जाणार आहे. अॅक्टिव्हिटी कॅलेंडर सभासदांप्रमाणे नाशिकमधील सायकलप्रेमींना मोफत दिले जाणार आहे. अॅक्टिव्हिटी कॅलेंडर हवे असेल इच्छुकांनी ८८०५७०११४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक सायकलिस्टने केले आहे.

अधिकाधिक नागरिकांना सायकल परिवारात सहभागी करून घेण्यासाठी नाशिक सायकलिस्ट तर्फे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. प्रत्येकाने अॅक्टिव्हिटी कॅलेंडर घ्यावे व सायकल मोहिमांमध्ये सहभागी व्हावे. - जसपाल विरदी, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images