Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उमेदवारांना प्रतीक्षा नियुक्तीची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विकास महामंडळातर्फे विविध पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेत निवड झालेल्या निम्म्या उमेदवारांना वर्ष झाले तरी नियुक्त्या देण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. निवड होऊनही नियुक्ती पत्र मिळाले नसल्याने उमेदवारांमध्ये चलबिचल झाली आहे. दुसरीकडे याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

आदिवासी विभागातर्फे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लेखापाल, वरिष्ठ सहाय्यक असे एकूण ५८४ पदांसाठी २८ डिसेंबर २०१४ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी २०१५ ला कागदपत्र पडताळणीही करण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांनाच मार्च, एप्रिल, मे २०१५ मध्ये नियुक्तीचे आदेश देण्यात आले. मात्र उर्वरित उमेदवारांना अद्याप नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. लेखापाल पदासाठी ११ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. मात्र यापैकी केवळ सहा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. उरलेल्या पाच उमेदवारांना अद्याप कुठल्याही प्रकारचे नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाही. उमेदवारांनी शबरी आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथील कार्यालयात वेळोवेळी विचारणा केली असता, लवकरच नियुक्तीचे पत्र मिळतील असे तोंडी आश्वासन देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाचा घोळ पुन्हा उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एनबीटी लॉ कॉलेजच्या बीएसएल या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा फॉर्ममध्येच चुका आढळून आल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

एनबीटी लॉ कॉलेजमध्ये बीएसएलच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षास शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या एप्रिलमध्ये परीक्षा आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र फॉर्ममधील एक्झामिनेशन डिटेल यामध्ये एनबीटी लॉ कॉलेजऐवजी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येत असून, याच कॉलेजचा कोड आपोआप दाखल होत आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून ही अडचण विद्यार्थ्यांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांचेकडे धाव घेतली. मात्र त्या कॉलेजमध्ये नसल्याने कॉलेज प्रशासनातील व विद्यापीठाच्या नाशिक विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने ही तक्रार दूर करण्याचे काम सुरू आहे.

प्राचार्यच अनभिज्ञ

एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांचेशी याबाबत संपर्क साधला असता त्यांना याबाबत काहीही माहित नसल्याचे समोर आले. प्राचार्य वैद्य विद्यार्थ्यांशी थेट संवाद न साधता त्यांना इतर कर्मचाऱ्यांकडून अडचणी सोडवण्यास सांगतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांमधून कचऱ्याचा उपसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेकडून स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. शनिवारी या मोहिमेअंतर्गत शहरातील नद्यांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. गोदावरी,

वाघाडी व नंदिनी या तीन नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था दोन हजार जण सहभागी झाले होते. दिवसभरात या तीन नद्यांमधून जवळपास २६ टन केरकचरा काढण्यात आल्याने नद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील नद्या, खेळांची मैदाने, सांस्कृतिक ठिकाणांची स्वच्छता केली जात आहे. महापालिकेने या मोहिमेला जनसहभागाचे स्वरुप दिले. शहरातील नागरिक मंडळे, संस्था, विविध संघटनांची मदत घेतली आहे. गेल्या शनिवारी शहरातील शाळांचे मैदाने व उद्यानांची स्वच्छता करण्यात आली होती. आज शहरातील गोदावरी, वाघाडी व नंदिनी या नद्यांची स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत पंचवटीतून या मोहिमेचा शुभारंभ झाला. शहरातील नाशिकरोड, नाशिक पूर्व, सिडको, पंचवटी, नाशिक पश्चिम, सातपूर या सहा विभागात ही मोहीम राबविण्यात आली. नऊ जेसीबी, २१ घंटागाड्या, ३ पोकलॅन्ड, १४ ट्रॅक्टर, ३ डंपर, २ रोबोट मशीनचा वापर करण्यात आला. नद्यांवरील प्रमुख घाटांची साफसफाई या मोहिमेत करण्यात आली. शहरातील काही स्वयंसेवी संस्थाही या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. नासर्डी नदीवर नगरसेविका अर्चना थोरात यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. दिवसभर सुरू असलेल्या या मोहिमेत दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून, तब्बल २६ टन कचरा उचलण्यात आला. जेसीबी व पोकलँडद्वारे नद्यांमधील खराब गाळही काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख घाट, नद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

विभागवार काढलेला कचरा

नाशिकरोड - ३

नाशिक पूर्व - ३

सिडको - ५

सातपूर - ९

नाशिक पश्चिम- ३

पंचवटी - ३

(आकडेवारी टनांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयासमोर आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील आरटीओ कार्यालयासमोरील एका झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. साहेबराव मारूती पचारे (३३) असे युवकाचे नाव आहे.

त्याच्या खिशात एक ब्लेड पोलिसांना सापडले असून, त्याने आत्महत्या का केली याचा अधिक तपास पंचवटी पोलिस करीत आहे. मयत पचारेच्या ​खिशात एक ​चिट्टी सापडली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटली नसून पंचवटी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे.

बॅटरी चोरी

डिसुझा कॉलनी परिसरातील सोसायटीतून ४० हजार रुपये किंमतीच्या इन्व्हर्टरसाठी उपयोगी पडणाऱ्या बॅटऱ्या चोरीस गेल्या. या परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, वरिष्ठ मात्र या घटनांची गंभीरतेने दखल घेत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी चोरी गेलेल्या शेकडो बॅटऱ्यांचा कोणताही तपास लागलेला नाही. ऋषिराज प्रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या राजेश विजय धारस्कर (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातील लोखंडी गजाच्या पिंजऱ्यातील इन्व्हर्टरच्या सहा बॅटऱ्या चोरून नेल्या.

वाहनांची चोरी

शहर परिसरातून तव्हेरा आणि इनोव्हा ही वाहने चोरट्यांनी हातोहात लंपास केली. पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्रिमूर्ती चौक येथील सुरेश सखाराम सोनवणे (४२) यांची इनोव्हा कार (एमएच ४१ सी ७७७०) गेल्या गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर परिसरातील वसंत मार्केट येथील गोल्ड जीम येथून चोरीला गेली. सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अन्य एका घटनेत नाशिकरोड परिसरातील नेहरूनगर येथील ग्रीनी शिडी सोसायटीतील शरद जगन्नाथ गिते यांची ९ लाख रुपये किंमतीची तवेरा (एमएच १५ इएक्‍स ८७२४) दुपारी साडेबाराच्या सुमारास पंचवटीतील बि-बियाण्यांच्या दुकानासोमरून चोरीला गेली. या प्रकरणी गिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

रिक्षातून रकमेची चोरी

गडकरी सिग्नल येथून पाथर्डी फाट्याकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील ८९ हजार रूपये चोरट्याने काढून घेतले. पाथर्डी शिवारातील शिवधारा रो हाऊस येथे राहणारे नंदकिशोर दिलीप पाटील यांनी याबाबत मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पाटील आपल्या बहिणीसमवेत गडकरी सिग्नल येथून पाथर्डी फाट्याकडे जाण्यासाठी रिक्षात बसले असता, त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या पर्समधून एका सहप्रवासी चोरट्याने ८९ हजार रुपये काढून घेतले.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुत्रे आडवे गेल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात रामदास विठ्ठल कोरे (४५) यांचा मृत्यू झाला. सदरची घटना गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सीएट कंपनीसमोर घडली होती. सातपूर परिसरातील कार्बन नाका येथील ओम साईकृपा सोसायटीत राहणारे कोरे दुचाकीवरून (एमएच १५ एवाय ६१९७) जात असताना कुत्रे आडवे गेले. यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्षम‌ीकरणातूनच महिलांचा विकास

$
0
0

सक्षम‌ीकरणातूनच महिलांचा विकास

प्रेरणा बलकवडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प 'बचत गटात सहभागी होत महिलांनी सक्षम बनावे. या सक्षमीकरणातूनच महिलांचा विकास होईल', असे आवाहन नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी केले. भगूर येथील महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभ त्या बोलत होत्या. या समारंभात महिलांना बचत गट व महिलांना त्या अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांचे नवीन बचत गट स्थापन करण्यात येऊन महिलांना यात सहभागी करून घेत बचत व कर्ज असे दोन्ही फायदे देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमानिमित्त महिला एकत्रित येऊन स्नेह मेळावाही साजरा करतात. यावेळी भगूरच्या माजी नगराध्यक्षा भारती साळवे, कोमल साळवे, पूनम बर्वे, रेखा इंगळे तसेच जवळपास पाचशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या मोबाइल वापराचा मेंदूवर परिणाम

$
0
0

वाढत्या मोबाइल वापराचा मेंदूवर परिणाम लेखक उन्मेष जोशी यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प 'मोबाइल व तत्सम गॅझेट्सचा अतिरेकी वापर मनुष्याच्या मेंदूवर थेट परिणाम करत आहे. यामुळे पुढील काही वर्षात मेंदूचे अनेक भाग कार्य करणे बंद करतील', असा धोक्याचा इशारा 'रिस्पॉन्सिबल नेटीजम'चे संचालक उन्मेष जोशी यांनी दिला. येथील तेजुकाया कॉलेजमध्ये आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. वाढत्या मोबाइलच्या वापरामुळे मनुष्य परावलंबी होत असून आपसातील प्रत्यक्ष संवाद हरवत जाऊन, मनुष्य मोबाइल नावाच्या व्यसनात हरवत चालला आहे, असे ते म्हणाले. संगणकाद्वारे वापरल्या इंटरनेटचा प्राथमिक वापर ज्ञान हा असून आजकाल त्याचाही अधिक व गैरवापर होत असल्याने कमनुष्य मानसिकदृष्ट्या आजारी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुनीता अडके, डॉ. उर्मिला गीते, डॉ.मंगला निकुंभ, प्रा. एस. एल. भोज उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एन. बी. पगार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यशाळेत प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव नाक्यावरील सिग्नल बंदच

$
0
0

आडगाव नाक्यावरील सिग्नल बंदच म. टा. प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील जुन्या आडगाव नाक्यावरील काट्या मारुती पोलीस चौकीजवळ सिग्नल अजून बंद असल्याने या परिसरात सारखी वाहतूक कोंडी होत आहे. या भागात कुंभमेळ्याआधीच सिग्नल उभा करण्यात आला आहे. परंतु अजूनही तो कार्यान्वीत करण्यात आलेला नाही. नागरिकांच्या सोयीसाठी उभा करण्यात आलेला हा सिग्नल अद्यापही बंद असल्याने दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी निमाणीकडून हिरावाडी, आडगाव नाका आणि पंचवटी कॉलेजकडे जाणाऱ्या व ओझर आणि औरंगाबादकडून येणाऱ्या वाहनांची सारखी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या परिसरात विविध शाळा, कॉलेजेस व मंदिरे असल्याने नागरिक व शाळकरी मुले यांचीही खूप गर्दी असते. पादचारी व दुचाकी वाहन चालक आणि नागरिक यांची या वाहतुक कोंडीमुळे तारांबळ होत आहे. सिग्नल सुरू केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणार असून परिणामी अपघात होण्याची शक्यताही कमी होईल असे नागरिकांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारातला समतोल

$
0
0

वृन्दा भार्गवे
पंचवीस वर्षाचे माझे वय. घरात अगदी खापर पणजीपासून आईपर्यंत सगळेजण आहेत. आमच्या नात्यात ताणतणाव नाही. जे प्रश्न तुम्ही उभे करता ते देखील नाहीत. पण आजूबाजूला माझ्या मैत्रिणींच्या घरात तसे काही प्रश्न आहेत. जगण्याची शैली थोड्या फार फरकाने सारखी असली तरी हा तणाव का?

ही मुलगी ट्रॅव्हल एजन्सीत काम करणारी. एकत्र कुटुंब असून देखील तिला हवे तसे कपडे बाहेर घालता येत होते. तिला आवडतो म्हणून तिने खांद्यावर टॅटू काढून घेतला होता. केसांची स्टाइल सहजपणे ती बदलत होती. पंचवीस वर्षे वय झाले तरी अजून लग्न का करत नाही म्हणून वडिलधारे तिला धारेवर धरत नव्हते. या घरात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले तिचे आजोबा आणि सरकारी नोकर असलेले वडील, शिक्षिका असलेली आई होती. काका व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरत होता. बाहेरच्या जगातले क्षणोक्षणी बदलणारे वातावरण घरातल्यांसह तो शेअर करत होता. केबल ते डिश आणि डेस्कटॉप ते स्मार्ट फोनपर्यंतचा प्रवास या घरात सर्वांनी अनुभवला होता. युद्ध सत्याग्रह आणि एका भूभागासाठी प्राणाची आहुती अशा स्वतंत्र भारताच्या लढ्याबद्दल बोलणारी एक पिढी तिरंग्याच्या नितांत अभिमानात बुडालेली असायची. भाऊ डिजिटल स्वातंत्र्यापर्यंत आपण कसे पोहोचलो याचे श्रेय व्हिजन असणाऱ्या अगोदरच्या पिढीला मोकळेपणाने देऊन टाकायचा. देशापासून स्वत:च्या स्पेसपर्यंत झालेला प्रत्येक टप्पा त्याला अद्भुत वाटायचा. लोकशाहीचा पुरस्कर्ता असा हा देश, आणीबाणीने अस्वस्थ झाला त्या काळाचे साक्षीदार असणारे वडिलांचे मित्र गप्पा मारण्यासाठी अधेमध्ये यायचे. १९९० नंतरची आर्थिक क्रांती आणि जागतिकीकरणाच्या लाटेचा तडाखा घरादारात शिरताना याच घराने पाहिला होता.

ही तरुणी या वातावरणात वावरत होती तर तिचीच एखाद दुसरी मैत्रीण पाळणाघरात खेळत मोठी झालेली. भोवती वेगळीच खेळणी. बार्बी आणि टेडी बेअर तिच्या उशाशी. वडील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरीला आणि नंतर काही वर्षांसाठी तिथे जाऊन आल्याने नकळत्या वयात मैत्रिणीच्या पासपोर्टवर अनेकदा शिक्के उमटलेले. त्यानंतर इथेच स्थायिक झालेले ते कुटुंब. टाईमपास म्हणून अनेक गोष्टी त्या घरात घडणाऱ्या. गरज असो वा नसो, बाहेर देशी, बाहेर शहरी गेले की खरेदी. जास्तीत जास्त पैसा कपड्यांवर आणि फिरण्यावर.

तिच्या काही मैत्रिणींची कुटुंबे आपली मूळ घरे सोडून दुसरीकडे राहायला गेलेली. गेल्या दहा बारा वर्षात घरे वाडे चाळी जमीनदोस्त करून त्याजागी बांधलेल्या टोलेजंग इमारतींमध्ये त्यांचे झालेले वास्तव्य. चाळीवजा घरे सोडल्यामुळे त्यांनी आपणहून केलेले काही बदल. इंटेरीअर बदलले पण मुला मुलींना विचारण्यात येणारे प्रश्न मात्र तेच, जुने आणि टिपिकल तसेच. घरी मुलांचे उशिरा येणे. रात्री दहा-अकरापर्यंत ही तरुण मुले नेमकी काय करत असतात हा कुतूहलापेक्षा संतापाचा प्रश्न विचारत राहणारे हे पालक काय करतात दिवसभर, यातला संशय. दिवसभर वेळ घालवण्यातील मुलांचा अव्यवहारीपणा किंवा त्यांनी घराचे केलेले हॉस्टेल, त्यांचा उडाणटप्पूपणा.

या घरांनी मुलींना काय दिले तर निव्वळ सल्ले. जगण्याला दिशा द्या, वेळ घालवू नका, शिक्षणावर लक्ष केंद्रित करा किंवा बाकी काही नाही तर लग्न करून टाका. दिशा म्हणजे काय तर उत्तम पगार असलेली नोकरी. ती मिळवायची म्हणजे डिग्री हवी, डिग्रीसाठी मान तोडून अभ्यास हवा. त्यासाठी बैठक हवी. पाठ उत्तरे, तीन तास लिहून काढलेला पेपर. त्याकरता खोलीत बंद करून घेणे. कोणत्याही आमिषाला बळी न पडणे. एवढे केले की मुलगी घरादारासाठी प्रामाणिक. क्षमता असणारी, अभ्यासू, कार्यमग्न. हे सर्व ठरवणारी पिढी १९६० पूर्वी जन्माला आलेली. प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या त्यांच्या व्याख्या निराळ्या. आपले घर कोणाचे हे तू कशी विसरतेस? या तऱ्हेची वाक्य बोलणारे बहुतांशी पालक. काही तर कायम जातीशी घट्ट नाते जोडणारे.

त्यानंतरची पिढी थोडे समजावून घेणारी, बऱ्याच घटनांचा वेग अनुभवलेली. लवचिक. सोशल व्हायला हवे याचे भान असलेली. अगोदरच्यांकडून मूल्य आदर्श यांचे पाठ गिरवलेली १९८५ नंतर जन्माला आलेल्या, जागतिकीकरणाच्या लाटेवर सवार झालेल्या बदलासाठी कायम उत्सुक असलेल्या पिढीशी जुळवून घेणारी. एकीकडे भूतकाळाची उदाहरणे आणि मूल्यांचा आग्रह धरणारी वडिलमंडळी दुसरीकडे वर्तमानाला बाजूला सारत भविष्याला कवेत घेण्याचे स्वप्न बाळगणारी मुले या दोन प्रवाहात सापडलेले अनेक मुलींचे पालक.

प्रश्न विचारणारी तरुणी ही या सहस्त्रकाची साक्षीदारच होती. प्रतिगामी आणि पुरोगामी विचारांची माणसे तिच्या घरात असूनही तिचे उशिरापर्यंत येणे कोणाला खटकत नव्हते, तिला विवाहासंदर्भात सतत छेडले जात नव्हते. याची कारणे तशी म्हटली तर खूप साधी होती. काळाचे ओझे तिच्यावर न टाकणारी ही माणसे होती. लहानपणापासून माणसांच्या बरोबरीने ती तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार न्याहाळत होती. तिचे २४ तास आणि ७ दिवस बाहेरच्या लोकांशी प्रत्यक्ष वा आभासी पद्धतीने जोडले जाणार याचा स्वीकार आपल्याला केला पाहिजे हे समजून घेणारे घर तिला मिळाले. जो कोर्स तिने केला त्याची गरज लोकांशी संपर्क आहे हे घरातल्यांनी चटकन समजावून घेतले. बाकीच्या ठिकाणी राहणीमानाचा बाऊ केला जात असताना या घराने पेहराव, दिसणे, वावर या गोष्टी गौण मानल्या.

आजवर घरातल्या कोणीही न हाताळलेले क्षेत्र, विषय, निर्णय ती घेत होती. तिचे अंदाज, तिचा अभ्यास, तिचा वकूब सगळ्याची रोज परीक्षा होत होती. अशावेळेस तिच्यावर अत्यंत विश्वास ठेवणे त्यांनी आपले कर्तव्य मानले. ती घरी लवकर येत होती किंवा अहोरात्र घरात एका खोलीत स्वत:ला बंद करत होती म्हणून नव्हे तर ती त्यांच्याशी खरे बोलत होती. आपल्याला काय करावयाचे आहे, आपल्या मर्यादा कोणत्या आहेत, लग्नाविषयी अजून दोन वर्षे विचार करायला वेळ हवा आहे. हे समजावून देण्यात तिची शक्ती वाया जात नव्हती. तिच्या निर्णयात बाधा आणून तिला संभ्रमित करून टाकायचे किंवा तिच्या कार्यक्षमतेला दुय्यम समजायचे असे वातावरण या घराने न जोपासल्याने तिचे जगणे सोपे झाले. ते घर तिच्यासोबत नांदत होते आणि ती त्यांच्यासोबत. नांदणे हा शब्द कृतीत आणायला विसरल्याने या तरुणीच्या मैत्रिणींच्या घरात तणाव होता. हे त्या प्रश्नाचे उत्तर.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांना मिळाला दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेतर्फे शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेचा फटका शहरातील फेरीवाल्यांना देखील बसला आहे. याबाबत मालेगाव मनपा प्रशासनाकडून फेरीवाला धोरण राबविण्यात यावे, अशी मागणी देखील येथील साई एकता हॉकर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेण्यात आली. त्यानुसार फेरीवाला धोरण लागू होईपर्यंत फेरीवाले रस्त्याच्या कडेला रहदारीस अडथळा न आणता व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.

साई एकता हॉकर्सचे दिनेश ठाकरे, देवा पाटील, सुधाकर जोशी आदींसह पदाधिकारी आणि आयुक्त किशोर बोर्डे यांची नुकतीच मनपात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मालेगाव शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार चारही प्रभाग मिळून एकूण १४५६ फेरीवाले आहेत. शहरातील अतिक्रमण हटवण्याचा मोहीम मनपाने हाती घेतली असली तरी त्यामुळे रस्त्यांवर असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसाय बुडत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला फेरीवाला धोरण राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे तत्काळ फेरीवाला धोरण राबवावे, अशी मागणी या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत आयुक्त किशोर बोर्डे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची फेरीवाला धोरण लागू करण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच, दि १७ फेब्रुवारीपर्यंत फेरीवाले रस्त्यालगत रहदारीस अडथळा निर्माण न करता व्यवसाय करू शकतात, असे सांगितले. यामुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, येत्या १७ फेब्रुवारीला तरी याबाबत योग्य तो निर्णय होऊन शहरात फेरीवाला धोरण राबवण्याबाबत काय कारवाई होते याकडे फेरीवाला समितीचे लक्ष लागून आहे. या बैठकीस युनियनचे रामा देवरे, आसिफ तांबोळी, राजेंद्र पाटील, शाम करपे, अशोक सूर्यवंशी, मनोज बोरवाल, योगेश जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. फेरीवाला संख्या

सर्व्हेनुसार फेरीवाले प्रभाग फेरीवाला संख्या

प्रभाग १ - ६७६ प्रभाग २ - ३४१ प्रभाग ३ - २६४ प्रभाग ४ - १७५ एकूण - १४५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याला काय उत्सव म्हणावे?

$
0
0

आपण एखाद्या गोष्टीला 'सरकारी काम' अशी उपमा देतो ना, तेव्हा रडतराव घोड्यावर बसवले व बळजबरीने लग्नाला उभे केले अर्थातच चालढकल करून कसेतरी केले बुवा! असा सारा आशय सरकारी काम या एका उक्तीमागे दडलेला असतो. या सरकारी कामाचा फटका अनेक कार्यक्रमांना बसतो. कोणताही कार्यक्रम उभा करणे म्हणजे मोठे मुश्किल काम. त्यासाठी जीव ओतूनच काम करावे लागते मात्र जेव्हा एखादा सरकारी कार्यक्रम उभा राहतो तेव्हा तो तकलादू असणार हे गृहितच. ग्रंथोत्सवाचेही तेच झाले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचलनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अशा दिग्गज संस्थांच्या माध्यमातून नाशिकला ग्रंथोत्सव पार पडला. (पार पडला हे शब्दश:) राज्यातील या चार मोठ्या संस्था; मनात आणले तर काहीही करू शकणाऱ्या परंतु त्यांना ग्रंथोत्सव मात्र अजिबात व्यवस्थित साजरा करता आला नाही तर काही व्याख्याने व एक काव्यसंमेलन घेऊन तो केवळ 'साजरा' झाला हेच खरे.

ग्रंथोत्सवाच्या उदघाटनासाठी बोलावले होते पालकमंत्र्यांना; तेथूनच खरी माशी शिंकली. पालकमंत्री आलेच नाहीत. उदघाटनाची वेळ सकाळी १० ची होती. आता जळगावहून यायचे म्हणजे तीन साडे तीन तास तरी लागतातच ना! सातला निघावे लागणार या धाकानेच की काय... पालकमंत्री काही पोहोचले नाही. बरं ते नाही तर नाही राज्यसहकार मंत्रीही आले नाहीत. बरं त्यांचंही जाऊ द्या, त्यांनाही खूप कामे असतात. निमंत्रण पत्रिकेत असलेल्या १८ जणांपैकी फक्त ३ जणांनी या ग्रंथोत्सव उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. एकही खासदार नाही की एकही आमदार नाही. (याला म्हणतात सरकारी काम) तसं पाहिलं तर कार्यक्रम काय आहे यावर राजकीय मंडळींची हजेरी ठरते म्हणा! इथेच एखादा राजकीय कार्यक्रम असता तर वेळेच्या आधी एक तास जागा पकडून सारे बसले असते. परंतु हा पडला साहित्यिक कार्यक्रम. येथे येऊन कुणाला काही फायदा नाही त्यामुळे गेले काय अन् नाही गेले काय... आहे कोण आपल्याला विचारणारे? असो. कार्यक्रमाचे उदघाटन अशा रितीने पार पडले. त्याआधी ग्रंथदिंडीही कशीबशी पार पडली होती. एखाद्या-दोन शाळेची गरीब बापडी मुले सहभागी झाली होती. वाचनाविषयी फलक हातात घेऊन या मुलांनी जगजागृतीही केली. ही जागृती राजकीय लोकांमध्ये असती तर किती बरे झाले असते असे क्षण दोन क्षण आयोजकांना वाटून गेले असेल. ...तर ग्रंथोत्सवाच्या उदघाटनानंतर दुपारी ज्येष्ठ साहित्यिकांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्याला जरा बरी गर्दी होती. दुसऱ्या दिवशीची व्याख्याने म्हणावी अशी रंगली नाहीत. तिसऱ्या दिवशी झालेले कविसंमेलन जरा जोरात झाले. त्यानंतरचा समारोपाचा कार्यक्रमही यथातथाच झाला. राजकारण्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कार्यक्रम साजरा करण्यासाठी का होईना पण खरी धुरा पेलली ती जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी. ग्रंथदिंडी ते समारोप यात जेथेही शक्य असेल तेथे त्यांची हजेरी होती. राजकर्त्याची ही एक चांगली बाजू म्हणावी लागेल.

...तर आता विषय असा आहे की हा इतका सारा आटापिटा करून राज्य सरकारने हा ग्रंथोत्सवाचा घाट घातला कशासाठी? महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत ग्रंथोत्सव उपक्रम राज्यभरात आयोजित करण्यात येतो. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचलनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या चार संस्था एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. परंतु नाशिकला झाला त्याला काय उत्सव म्हणावे? प्रशासनाच्या अखत्यारित येणाऱ्या एखाद्या मोठ्या सभागृहात अथवा मैदानावर हा उत्सव भरवावा, काही लाख पुस्तकांची व तितक्याच पैशांची उलाढाल व्हावी, केवळ नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून येथे प्रकाशक यावेत व त्यांनी आपापल्या पुस्तकांची विक्री करावी असा व्यापक हेतू सरकार कधी ठेवणार आहे का? अहो, या सरकारच्या ग्रंथोत्सवापेक्षा आमच्या न‌ाशिकचे ज्योती स्टोअर्सवाले मोठे प्रदर्शन भरवितात, ते ही डोंगरे वसतीगृह मैदानावर. आयोजकांनी घेऊन घेतले तर काय सावानाचे लिमये सभागृह. तेथेही १४ पैकी ७ स्टॉल लागलेले. त्यातही सरकारचा एकच स्टॉल त्यातही फक्त १० ते १२ व्हरायटीची पुस्तके. अरे कसे इतके दुर्देवी सरकार अन् कसा कारभार?
- अशांत किरकिरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिढी घडवणारे आजोबा

$
0
0

fanindra.mandlik@ timesgroup.com

रात्री झोपताना मुलं आपल्या आजोबांना सारखी म्हणत असतात. आजोबा गोष्ट सांगा ना, पण मुलांना रोज कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे सुचत नसल्याने आजोबांची मोठी पंचाईत होते. अशावेळी आवश्यकता असते ती गोष्टी जाणून घेण्याची. आजोबांना गोष्टी माहित व्हाव्यात यासाठी सुरेश दाजी जोशी हे इंदिरानगर परिसरात मोफत वाचनालय चालवत आहे. या वाचनालयात गोष्टींची पुस्तके घेण्यासाठी रोज आजोबांची रिघ लागते.

सुरेश जोशी हे मुळचे जळगाव जिल्ह्यातले. एलआयसीमधून निवृत्त झाल्यानंतर २००१ पासून ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. तेव्हापासून ते मोफत वाचनालय चालवीत आहेत. आपल्या धडपड्या वृत्तीने त्यांनी आजवर अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. पाटणादेवी येथे सायकल ट्रीप, नाशिक ते आग्रा १००० किमी सायकल सफर, ब्रम्हगिरीची ४० मैल पायी फेरी, नारेश्वर ते गरुडेश्वर ८० किमी दत्तमंदिर सहकार्यासह पायी प्रवास, २०० दिवस नर्मदा परिक्रमा यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

आजच्या शिक्षण पद्धतीत मुलांना शाळेत देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा संस्कार यापैकी काही मिळते का हा मोठा प्रश्न आहे. मागच्या पिढीतील शिक्षकांनी भारतीय संस्कृतीचा खजिना आपल्या गोड वाणीने व पाठांतर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. परंतु सध्या ते होत नाही. नातवांनी स्पर्धेच्या युगात स्वच्छंदी जगावे असे प्रत्येकाला वाटत असले तरी ते सध्याच्या युगात शक्य होत नाही. रात्री झोपतांना नातू आजोबांजवळ येऊन आग्रह करतो, आजोबा गोष्ट सांगा ना! तेव्हा मात्र आजोबांना प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

या प्रश्नाला उत्तर म्हणून जोशी काकांनी ५ हजार वर्षांपासून असलेली आपली जुनी संस्कृती, तपस्वी, ऋषी मुनी, समाजसुधारक, धर्मप्रवर्तक, धर्म प्रचारक, देशाकरिता प्राण बलिदान देणारे वीर, वीरमाता अशी संस्कृतीच्या प्रवाह बरोबर नेणारी पुस्तके जमा केली आहेत.

आजोबांनी आधी ती चरित्रे वाचावित आणि नंतर ती नातवांना सांगावी ही कल्पना नागपूर येथे असताना सुचली. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवातीला १२७ चरित्रे असलेले संच विकत घेतले व पहिल्यांदा मुले, पुतणे, भाचे, भाच्या यांना ही पुस्तके वाचण्यास दिली. त्यानंतर आपोआप पुस्तके वाढू लागली. याचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी इंदिरानगरमधील आजी आजोबांना भेटून त्यांना एक एक पुस्तक वाचायला दिले. दररोज १ ते २ आजी आजोबांची भेट घेऊन पुस्तकांची देवाणघेवाण सुरू केली. त्यांचे मित्र बिपिन पुराणिक यांना हा विषय आवडला तेही या उपक्रमासाठी संध्याकाळचा वेळ देऊ लगले. त्यानंतर संकष्टी चतुर्थी संघाचे सर्व सभासद आनंदाने यात सहभागी झाले. आज या वाचनालयाची व्याप्ती वाढून शेकडो सभासद झाले आहे.

जोशी काकांच्या घरी येणारे आजी आजोबा पुस्तकांवर चर्चा करतात व नवीन पुस्तक बदलून घेतात या योजनेसाठी विद्याधर पाध्ये यांनी देखील जोशी काकांना मदत केली आहे. सभासदांची नोंदणी करतांना नाव पत्ता फोन नंबर घेऊन संपर्क ठेवला जातो. यातील विशेष बाब म्हणजे प्रवेश फी अथवा वर्गणी काही नाही, आपल्या नातवांवरील प्रेम हीच फी आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान हिच प्रवेश फी. सुरुवातीला आवड म्हणून केलेल्या उपक्रमाने मोठी व्याप्ती वाढली आहे. इंदिरानगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे संघ जोशी काकांकडे पुस्तके घेण्यासाठी येत असतात. त्याची नोंद ठेवून प्रत्येकाला पुस्तक दिले जाते. या उपक्रमासाठी कुणाकडूनही पैसे घेतले जात नाही. जोशी काकांना मिळणाऱ्या पेन्शनमधून या वाचनालयाचा खर्च भागवला जातो. या वाचनालयाचा विस्तार वाढतो आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व येणारी पिढी सुसंस्कृत करावी असे आवाहन जोशी काका करीत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषाख अन् रत्नजडीत मुकुटाने सजले ऋषभदेव

$
0
0

कैलास येवला, सटाणा

गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीला राजकुमाराचा पोषाख व रत्नजडीत मुकूट परिधान करून सजविण्यात आले. सुमारे दहा लाख रुपये किमतीचा हा पोषाख व मुकूट मूर्तीवर रात्रभर ठेवण्यात येणार असून, सोमवारी सकाळी भगवान ऋषभदेव यांना दीक्षा देण्यात आल्यानंतर जैन धार्मिक विधीनंतर त्यांचे कायमस्वरूपी रूप दर्शनासाठी खुले होणार आहे.

भगवान ऋृषभदेव यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर त्यांना राजकुमाराप्रमाणे सजविण्यात येणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लोखंडी रॅकच्या आतमध्ये असलेल्या या पाषणातील मूर्तीवर सर्वत्र लोखंडी बॅरिकेड्स काढण्यात येऊन त्यांना सजविण्यात येणार आहे. यानंतर रात्रभर हा पोषाख व मुकूट ठेवून त्यांना सकाळी दीक्षा देण्यात येणार आहे.

असा आहे पोषाख भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवरील पोषाखाची रचना सुरत येथील दिवाण ब्रदर्स टेक्सस्टाईल कंपनीचे संजय दिवाण यांनी केली आहे. या पोषाखासाठी आवश्यक कापड जपानमधील सुप्रसिद्ध यान बेंबरक या निर्मिती झालेल्या कापडाने पोषाख तयार केला आहे. या पोषाखात कुर्ता व धोती असा समावेश आहे. कृर्ताकरिता ४५० मीटर यान बेंबरक हा गुलाबी रंगाचा कापडाचा वापर करण्यात आला आहे. धोतीकरिता २०० मीटर उंच असलेला जरी गोल्डन रंगाचा कापड वापरण्यात आला आहे. यासाठी आवश्यक लेस जरी गोल्डन, ब्ल्यू बेल्ट १०० मीटरचा आहे. अत्यंत चकमकीत असलेला हा पोषाख तयार करण्यासाठी राजस्थानी कारागिरांची मदत घेण्यात आली. पोषाखासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती संजय दिवाण यांनी दिली.

असा आहे मुकूट सुमारे १२० किलो वजनाचा, ८ फूट उंची असलेला व २६ फूट रूंद असलेला रत्नजडीत हा मुकूट दिल्ली येथील संजय कुमावत यांनी ग्लास स्टोनमध्ये तयार केलेला आहे. त्यात नगिना दभंता हे रत्नजडीत खडे वापरलेले आहेत. मुकूट वेलवेटने सजविण्यात आलेला आहे. सुमारे पाच लाख रुपये खर्च करून तयार सुमारे ३५ कारागिरांनी गत दोन महिने कठोर परिश्रम घेतले आहेत. मुकूट या ठिकाणी जोडण्यात आला असून, भगवान ऋषभदेव यांच्या मस्तकावर तो रत्नजडीत टोप ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक कचरा डेपोप्रश्नी उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरातील कचरा डेपोचा प्रश्न अंधातरी लटकला असून, येथील संत निवृत्तीनाथ देवस्थान विश्वस्त जिजाबाई मधुकर लांडे यांनी याबाबत उपोषणाचा इशारा दिला आहे.

त्र्यंबक नगरीत दररोज टनभर कचरा निर्माण होतो. तो संकलीत करून नवीन तहसील कार्यालयाच्या बाजूस टाकण्यात येत आहे. याचा परिणाम येथील रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. दुर्गंधीने येथे जगणे असह्य झाले आहे. कचरा डेपो हटवा अन्यथा बेमुदत उपोषण केले जाईल, असे पत्र माजी जिल्हा परिषद सदस्या व निवृत्तीनाथ मंदिराच्या विश्वस्त जिजाबाई लांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्याचसोबत प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांनाही प्रत पाठवली आहे. त्र्यंबकचा कचरा नाशिक येथे जात होता. तो बंद होऊन सुमारे चार ते पाच महिने झाले आहेत. हजारो टन कचरा दररोज येथे टाकला जातो. ओला कचरा विघटन करण्यासाठी बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आला होता. तथापि, स्फोट होऊन त्याची भिंत पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुरड्याचे दैव बलवत्तर!

$
0
0

अपहरणानंतर पोलिसांनी केला कसोशीने तपास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वय वर्षे अवघे सहा. ओळखीच्याच एका 'काकांनी' बाहेर फिरून येऊन असे सांगत त्याला बरोबर घेतले. विश्वासाने त्या नराधमाचा हात हातात घेणाऱ्या त्या निरागस मुलाला पुढे काय होणार याची कल्पना नव्हती. गुरुवारी दुपारी घराबाहेर पडलेला हा मुलगा भद्रकाली पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सापडला. दैव बलवत्तर म्हणून तो आज आईच्या कुशीत आहे. भद्रकाली पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केली नसती, तर या मायलेकांची पुन्हा कधी भेट झाली असती, का हा प्रश्न मनात घर करून राहतो. या सुदैवी ठरलेल्या मुलाचे नाव निरास जोग बोहरा असे आहे.

मूळ नेपाळ देशातून आलेले जोग बोहरा आपल्या पत्नी व दोन मुलांसह द्वारका परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतात. याच हॉटेलमध्ये संशयित आरोपी संदीप प्रकाश सोनवणे हा देखील काम करीत होता. घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास निरास आपल्या लहान बहिणीसोबत हॉटेलच्या परिसरात खेळत असताना सोनवणेने निरासला सोबत घेत आपण फिरून येऊ असे सांगितले. पाच मिनिटांसाठी बाहेर पडलेले हे दोघे गुरुवारी रात्री परतलेच नाही. निरासच्या आई-वडिलांच्या मनात पाल चुकचुकल्याने शुक्रवारी सकाळी त्यांनी भद्रकाली पोलिस स्टेशन गाठले. घटनेचे गां​भीय ओळखून सिनीअर पीआय मधुकर कड यांनी लागलीच तपास सुरू केला. एपीआय मृदुला नाईक, पीएसआय हनुमंत वारे व भद्रकाली पोलिस स्टेशनमधली कर्मचाऱ्यांच्या पाच पथकाने निरासचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान हॉटेलमध्ये काम करणारी एक महिला कामावर हजर नसल्याचे पोलिसांना समजले. ही महिला शिंदे गावात राहत असल्याने पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. एका रिक्षाचालकाने सदर मुलाला नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार एपीआय नाईक यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा शोध घेतला असता एका कोपऱ्यात घाबरलेल्या स्थितीत बसलेला निरास सापडून आला. संशयित आरोपी फरार आहे.

हे कुटुंब खूपच गरीब आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर काय करावे, याचीही त्यांना पुरेशी माहिती नव्हती. शुक्रवारी दुपारी तक्रार झाल्यानंतर संध्याकाळी त्याला शोधण्यात आले. आमच्या अधिकारी व कर्मचारी अथक परिश्रम घेतल्याने तो सापडू शकला.

- मधुकर कड, सीनीअर इन्सपेक्टर, भद्रकाली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोभायात्रेने गजबजले मांगीतुंगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जैन धर्मियांच्या दक्षिण भारतातील प्रमुख समेध शिखर म्हणून ओळख असलेल्या श्री मांगीतुंगी येथील १०८ फुटी भगवान ऋषभदेव मूर्ती पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या मुख्य धार्मिक विधीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

भगवान ऋषभदेव यांच्या जन्मकल्याणक, ऐरावत हाथी शोभायात्रा, जन्माभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याने मूर्तीच्या जलाभिषेक सोहळ्याचा मार्ग सुकर होत असून, दि. १८ रोजी महामस्ताभिषेक सोहळा होत आहे.

रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सर्वतोभद्र महल येथे गणिनिप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, प्रज्ञाश्रमणी श्री चंदनामती माताजी, कर्मयोगी पीठाधीश स्वतिश्री रवींद्रकिर्ती स्वामिजी, जैन धर्माचे ९ आचार्य अनेकांत सागरजी, देवनंदीजी, गुप्तीनंदजी, देवसेनजी, पद्यनंदजी, धर्मसेनजी, धर्मनंदजी, तीर्थनंदनजी, बालाचार्य देवसेनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान ऋषभदेव यांच्या जन्मजन्मकल्याणक विधी झाला. यामुळे विशाल पाषाणात साकार केलेल्या मूर्तीमध्ये दैवत्व प्राप्त होण्याचा हा धार्मिक विधी खऱ्या अर्थाने मांगीतुंगी क्षेत्रात प्रारंभ झाला.

अत्यंत मंगलमय वातावरणात व मंत्रोच्चाराच्या गजरात विधी पार झाल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास ऐरावतावर विशाल अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेच्या प्रारंभी मंगल कलश घेतलेल्या जैन भगिनी, त्यांच्या मागे मुनीश्री व आचार्य, त्यांच्या पाठोपाठ ऐरावतावर ब्रह्म ब्रम्ह्मोत्तर बसविण्यात आले होते. यानंतर इंद्र-इंद्राणी यांचा जलसा सामील झाला होता. राजस्थान येथील वाद्य पथकाने या मिरवणुकीचे संचलन केले. प्रचंड वाजत गाजत तुताऱ्यांच्या निनादाने व नाचण्याने परिसर दणाणून गेला होता. हा महत्त्वपूर्ण सोहळा रविवार आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक व महिला या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या.

आज दीक्षा कल्याणक ऐरावतावरील शोभायात्रेनंतर जन्माभिषेक शोभायात्रा होऊन मूर्ती अनुषंगाने आज दि. १५ रोजी दीक्षा कल्याणक, देश विदेशातील राजे महाराजे यांचे उपस्थिती भगवान वृषभदेव यांच्यासमोर भव्य दिव्य भेट सादर करणे व अप्सरा नृत्य सादरीकरण होणार असल्याने या तीन दिवसांच्या सोहळ्यासाठी संपूर्ण भारत वर्षातून जैन भाविक व भक्तपरिवारांचा तांडा मांगीतुंगीत दाखल होऊ लागला आहे. दि. १८ रोजी जलाभिषेक असल्याने मोठ्या प्रमाणात जैन भाविक, साधू, महंत, या ठिकाणी दाखल होऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सार्वजनिक वाचनालयाकडून वाचकांची गैरसोय

$
0
0



'सावाना' हे शहरातील प्रमुख वाचनालय आहे. या वाचनालयाला १७४ वर्षांची दीर्घ परंपरा आहे. सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके असलेली ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ आहे असे मानले जाते. वाचनालय नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने सर्वांना सोयीस्कर आहे. वाचकांना वाचनाचा मुक्तपणे आणि मोफत आनंद घेता यावा. यासाठी 'सावाना' वाचनालयात मुक्तद्वार विभागही आहे. मुख्य ग्रंथालयात सुमारे तीन हजारहून अधिक वाचक दररोज मुक्तद्वार विभागांचा विनामूल्य लाभ घेताना दिसतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून वाचनालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने अनेक विभागांची उचलआपट होत आहे. यात प्रामुख्याने मुक्तद्वार विभाग ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहातून बाहेर काढण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपर्यंत नूतनीकरणाचे कारण देत तो बंदच होता. आता हा विभाग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. परंतु, त्याला औरंगाबादकर सभागृहाच्या ओसरीत तात्पुरती जागा देण्यात आली आहे. याठिकाणी काही खुर्च्या, टेबल व बाकेही ठेवण्यात आली आहे. येथेच वाचक मोफत वृत्तपत्रे वाचण्यासाठी येतात. परंतु, वाचकांशी बोलले असता त्यांनी अशी माहिती दिली, की ज्यावेळी औरंगाबादकर सभागृहात एखादा कार्यक्रम असतो तेव्हा हा विभाग बंद ठेवण्यात येतो. सरकारचा ग्रंथोत्सव या सभागृहात ९ ते ११ फेब्रुवारी या काळात आयो‌िजत करण्यात आला होता. तेव्हा देखील मुक्तद्वार बंद ठेवण्यात आले असल्याची तक्रारही काही वाचकांनी केली आहे.

वाचकांकडे दुर्लक्ष डागडूजी न झालेले सभागृह अगदी कार्पोरेट बनविणे, भाडेतत्त्वावर देऊन त्यातून नफा मिळवणे ही संस्थेच्या दृष्टीने चांगली बाब आहे. त्यातून संस्थेचा विकासच होणार असतो; मात्र मुक्तद्वार विभाग ओसरीत काढून वाचकांना वाटेला लावणे ही बाब 'सावाना'साठी नक्कीच शोभनीय नाही. नफा कमाविण्याच्या नादात वाचकांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी वाचकांची प्रतिक्रिया आहे.

'सावाना'ला अनुदान 'मुक्तद्वार'साठीच मुळात कोणत्याही वाचनालयाला अनुदान मिळते ते मुक्तद्वार विभागासाठीच. या विभागात गरीबापासून श्रीमंतापर्यंत कोणताही वाचक येऊन मोफत वाचनाचा आनंद घेऊ शकतो. परंतु, ज्यासाठी अनुदान मिळते तोच विभाग सभागृहाच्या बाहेर आणून स्वच्छतागृहाशेजारी आणण्याचा 'सावाना'चा विचार वाचकांवर अन्याय करणारा आहे. याबाबत 'सावाना'ने पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत जाणकार वाचकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन संस्कृतीचे घडतेय दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मानवता के करते नाश...मछली अण्डा मंदिरा मास, वेद पुराण और गीता सार... शाकाहार है शुद्ध आहार या सारख्या असंख्य सुसंदेश व विविध आकर्षक पेंटींग व कला दालनाच्या विविध स्टॉल्सने मांगीतुंगी येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण पटांगणावर लक्ष्य वेधले आहे.

श्री मांगीतुंगी येथील १०८ फुटी श्री भगवान ऋृषभदेव यांच्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवा निमित्ताने येणाऱ्या भाविक, यात्रेकरू व सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधणाऱ्या या आकर्षक स्टॉल्सला दररोज हजारो भाविक भेट देत आहेत. पुना हॉस्टिपलमधील एम. डी. मेडिसिन व कन्सल्टंट फिजिशियन डॉ. कल्याण गंगवाल यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या सर्वेताभद्र महलासमोरील विस्तीर्ण पटागंणावर तीन भोजनालयाच्या लगोलग उभारलेल्या या शाकाहार सुंसदेशाच्या खुल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत.

या प्रदर्शनाच्या दालनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविक व व्यक्तीला मानवी सभ्यता की सुबह शाकाहार, अमृत शाकाहार है, विष है मासांहार या तीन पानी पुस्तिका हातात ठेवण्यात येते. या पुस्तिकेत प्रत्येक पानावर शाकाहार क्यों, मांसाहार क्यों नही, वैज्ञानिक एवं महापुरूषो के संदेश, क्या कहते है धर्म-ग्रंथ, शाकाहार सुसंदेश ही पत्रिका देवून शाकाहार सर्वोत्तम आहार हे पटवून देण्यासाठी विविध चित्रांतून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर भारतभूमी व जगभरातील मान्यवर व ख्यातकीर्त नामवंत व्यक्ती देखील शाकाहार पसंत करीत असल्याचे अनेक चित्र व पुरावे या प्रदर्शनातून मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाला खेटूनच ज्ञाममती कॉस्मिक एनर्जी पेटिंग्ज हे प्रा. अरुणकुमार जाधव, पवन काला व सुमित लोहाडे मालेगाव यांचे कलादालन भाविक व भक्तपरिवाराचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये अध्यात्म व विज्ञानाच्या माध्यमातून कॅनव्हॉस, अ‍ॅक्रेलिकचा वापर करून चार बाय चार आकाराच्या अत्यंत देखण्या व सुदंर ३० फ्रेम्स लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रातून संपूर्ण जैन अध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जागरूक नाशिककरांचे’ आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी विविध संघटना आंदोलने करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत. पोलिस आपल्या बळाचा वापर करून सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जागरूक नाशिककर या संघटनेने केला असून याविरोधात सोमवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दीड वर्षापासून शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगार आर्थिक पाठबळावर मोकाट फिरत असून, पोलिस मात्र सर्वसामान्यांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सर्वसामान्यांच्या तक्रारीची दखल पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन घेत नाहीत. त्यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांची भीड चेपली असून, ते सर्वसामान्यांना वेठीस धरत आहेत. पोलिस आयुक्त प्रत्येक प्रकरणात चौकशीचा फार्स करतात. चौकशी दरम्यान पोलिस अधिकारी आपल्या हिताचे कागदे रंगवून घेतात. शाकीब पठाण या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीनंतर काही जाब जबाबाच्या आधारे या मुलालाच दोषी ठरवण्याची योजना सुरू असल्याचे जागरूक नाशिककर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. समाधान कांबळे या नागरिकाला‌‌ही सिनेमाला शोभेल, अशी मारहाण करण्यात आली. यातील दोषी अधिकाऱ्याच्या रूटीन बदलीनंतर कारवाई केल्याचे दाखवत कांबळे यांच्याकडून आपण या कारवाईमुळे संतुष्ट असल्याचे लेखी मागण्यात आले. पोलिसांच्या या दडपशाहीची पुराव्यासह माहिती मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेवेळी संघटनेचे पदाधिकारी व आयटकचे राजू देसले, हंसराज वडघुले अॅड. राजपाल शिंदे, कृष्णा शिलावट आदी उपस्थित होते.


तक्रारींसाठी साधा संपर्क

नागरिकांनी आपल्या तक्रारी सीबीएससमोरील आयटक कामगार केंद्र, २५ अ, मेघदूत शॉपिंग सेंटर येथे प्रत्यक्षात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​नागरिक ९८९०२६७११२ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू शकतील.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

एस. टी. महामंडळातील बसचालकांचा बेजबाबदारपणा अनेकवेळा अनुभवास येतो. अशाच एका बसचालकाचा बेजबाबदारपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून अपघात टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा नि.श्वास टाकला.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अमळनेर-नाशिक (एमएच २०, बीएल २५१८) ही बस अमळनेरहून नाशिककडे जात असताना पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त चिंचखेड चौफुलीजवळ आली. या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम न झाल्यामुळे साधारण एक किमीचे अंतर अत्यंत धोकादायक झाले आहे. रस्त्यालगर दोन्ही बाजूने सर्विस रोड आहे. मात्र, मुख्य रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे या परिसरात जाताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होते. महामार्गावरील वाहने सर्विस रोडने जात असल्यामुळे पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळते. असे असताना अमळनेर-नाशिक या बसच्या चालकाने शक्य नसतानाही सर्विसरोडवरून अवघड भागातून महामार्गावर घेण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच अंगलट आला. बसची पुढची चके काहीशी वर जात आणि मागील चाके सुध्दा जमिनीत अडकली. यावेळी बस उलटी होण्याची शक्यता होती. प्रवाशांनी घाई करीत बाहेर पडत सुरक्षित स्थळ गाठले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोठ्याची जागा खाली करून घेण्यासाठी १३ ते १४ जणांनी मिळून गोठामालक व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी बिल्डरसह इतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पेठरोडवरील दत्तनगर परिसरातील विश्वस्वरूप बंगला येथे राहणाऱ्या रत्नाकर विश्वनाथ कोठुळे (वय ५५) यांनी फिर्याद दिली. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, कोठुळे यांचा उन्नत्ती शाळेच्या पाठीमागे म्हशीचा गोठा आहे. ही जागा कल्पना पांडे यांच्या मालकीची असून, सुमारे ७० वर्षांपासून कोठुळे या जागेचा भाडेकरू म्हणून उपयोग करतात. सन २०११ च्या दरम्यान सदर जागा विक्री करीत असून तुम्ही जागा खाली करा, असा निरोप कल्पना पांडे यांनी कोठुळे यांनी दिला. तसेच, जागेचे भाडेही घेण्यास नकार दिला. पंरतु, कोठुळे आजतागायत मनीऑर्डरच्या मदतीने जागेचे भाडे पांडे यांना पाठवत आहेत. दरम्यान, तीन वर्षापूर्वी बिल्डर गुलाब त्रिपाठी कोठुळे यांच्याकडे गेले. तुम्हाला २२ लाख रुपये देतो, ही जागा खाली करा, असे त्रिपाठी यांनी त्यांना सांगितले. मी घरच्यांशी बोलून तुम्हाला सांगतो, असे कोठुळे यांनी सांगितले. मात्र, यानतंर त्रिपाठी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे कोठुळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

हा वाद सुरू असताना रविवारी दुपारच्या सुमारास १४ ते १५ जण कोठुळे यांच्या गोठ्यात पोहचले. त्यांनी जागा खाली करण्यासाठी धमकी देत थेट धक्काबुक्की केली. आई व मला जीवे मारण्याची धमकी देत काही संशयित आरोपींनी दहा ते १२ म्हशी सोडून दिल्या. हा प्रकार सुरू असताना कोठुळेंनी पंचवटी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार अवघ्या काही मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लागलीच कारवाई करीत किरण दत्तात्रय शेळके, विनायक दीपक लाटे, अक्षय रमेश धार्डे, विकी संतोष परदेशी, नीलेश राजू जाधव, किरण मधुकर सोनवणे, राहुल बाबाजी पाटील, रमेश बाळू साळवे, विकी रमेश रोशन बोधक, केतन विलास हिरवे, विजय राजेंद्र पाटील, आकाश चंद्रकात भाग्यवंत तसेच गंगाधर लक्ष्मण दिघोळे इत्यादी संशयितांना अटक केली. यातील काही सराईत आरोपी असून, पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.


महिला विक्रेत्याकडील ४० हजार रुपयांची चोरी

बाळ येशू यात्रेनिमित्त नेहरूनगरमधील सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके विक्री करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ४० हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

मुंबईतील बांद्रा वेस्ट परिसरातील रहिवाशी सिस्टर मिशेल मथायस (वय ३८) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके व सीडी विक्रीचे दुकान थाटले. दोन संशयित पुस्तक खरेदीच्या बहाण्याने आले. त्यापैकी एकास सिस्टर मिशेल त्यास ग्रंथ दाखवित होत्या. तर दुसऱ्या दुसऱ्या संशयिताने सिस्टर रुबा यांना तुमच्या पायाजवळ दहा रुपयांच्या नोटा पडल्याचे सांगितले. त्या पैसे उचलण्याकरिता खाली वाकल्या असता या संशयिताने सुमारे ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली..

मंगळसूत्राची चोरी

शहर बसने प्रवास करणाऱ्या सातपूर कॉलनीतील महिलेच्या पर्समधील तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरी केले. गजानन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लता भागवत उदावंत (वय ३२) बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या पर्सच्या उघड्या चेनमधून चोरट्यांनी तीन तोळे वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.


देवदर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्सची चोरी


उत्तराखंडहून देवदर्शनासाठी पंचवटीत आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. दीपा अमित सागुडी (वय ४०) असे फिर्यादी महिलेचे नाव असून उत्तराखंड राज्यातील नैनीताल जिल्ह्यातील हल्दवाणी येथील जेलरोड, सागुडी गार्डन येथे राहणाऱ्या सागुडी आपल्या नातेवाइकांसह देशदर्शनासाठी नाशिकला आल्या होत्या. पर्समध्ये १४ हजार रुपये रोख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड, मोबाइल फोन असा १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल होता. बाहेरून आलेल्या पर्यटकांना लुटण्याचे प्रकार वाढतच चालल्याने पर्यटकांमध्ये भीती पसरली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images