Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ग्लॅमरस सनई-चौघडे

$
0
0

मटा फोकस

--

संकलन ः अश्विनी कावळे

--------------

ग्लॅमरस सनई-चौघडे

----

सध्या लग्नाचा धूमधडाका सुरू असून, यंदा मुहूर्त कमी असल्याने एकाच दिवशी अनेक ठिकाणी विवाहांचा बार उडत असल्याचे चित्र आहे. विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ग्लॅमरस इव्हेंट म्हणून पाहिले जात आहे. हा इव्हेंट खास व्हावा यासाठी वर, वधूबरोबर त्यांचे कुटुंबीयदेखील प्रयत्नशील असतात. लग्नमंडपाच्या सजावटीपासून फोटोशूट, लग्नात खमंग पदार्थ वऱ्हाडींच्या दिमतीला ठेवण्यापर्यंत सर्व व्यवस्था अगदी चोख करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते. लग्नाची शॉपिंग, मेंदी, हळद, सीमंती पूजन यानुसार कपड्यांची थीम, त्याचबरोबर लग्नस्थळी रोषणाई, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत आदींद्वारे हा सोहळा दिमाखदार बनविण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

----

लॉन्सकडे वाढता कल

हल्ली थीम वेडिंग हा प्रकार प्रत्येकालाच हवाहवासा वाटत आहे. थीमनुसार डेकोरेशन, तसे कपडे, दागिने घालण्याला पसंती दिली जाते. लॉन्सवर थीम वेडिंग करण्यास ऐसपैस जागा गरजेची असते. हवे तसे डेकोरेशन करता येत असल्याने कार्यालयांपेक्षा लॉन्सवर लग्न करण्याचा हा ट्रेंड हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. थीम्सवर आधारित आकर्षक देखावे, रंगीत कारंजे, फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या साहित्याची सजावट करून लग्नमंडप सजविण्यात येतात. बहुतांश कार्यालयांमध्ये त्यांचा ठरवलेलाच सेट घ्यावा लागत असल्याने लॉन्सला पसंती मिळत असल्याचे लॉन्सचालक सांगतात. यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही चांगले दिवस आले आहेत. आपल्या बजेटनुसार या कंपन्या थीम्स, डेकोरेशनविषयी कल्पना सुचवतात.

--

लॉन्स, कार्यालयातच पॅकेजेस

लग्नाचा हॉल, होमकुंड, सुपाऱ्या, भटजी, पाट, चौरंग, अगदी समईच्या वाती, आतषबाजीसाठीचे फॅन्सीफटाके या व अशा अनेक वस्तूंसाठी ऐन लग्नाच्या गडबडीत मोठी पळापळ होते. लग्नाच्या आनंदावरही त्यामुळे विरजण पडू शकते. हे टाळण्यासाठी आता लॉन्स, कार्यालयांनीच पुढाकार घेतला आहे. हॉलबरोबरच या सर्व वस्तू त्यांच्याकडून पॅकेजनुसार पुरविल्या जात आहेत. शहरातील अनेक कार्यालये, लॉन्सचालकांनी दोन लाखांपासून पुढे असे पॅकेजेस उपलब्ध करून दिले आहेत. इतकेच नव्हे, तर नवरीसाठी डोली, नवरदेवासाठी घोडी, बँड, बग्गी यांचीही मागणी केली, तरी काही वेळात तेही उपलब्ध करून दिल्याची उदाहरणे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.

---

ड्रेस, ज्वेलरी कन्सल्टंट

लग्नाच्या महत्त्वाच्या दिवशी आपला लूक फसू नये म्हणून वर-वधू यांच्याकडून पूर्वतयारी करण्यास मोठे महत्त्व दिले जाते. त्यासाठी खास वेडिंग ड्रेस कन्सल्टंटची मदत घेतली जात आहे. वधू आणि वराची शारीरिक बांधणी, रंग, लग्नाचे ठिकाण यावरून ड्रेसची निवड केली जाते. सध्या कोणती फॅशन सुरू आहे, कोणत्या फॅशनचे कपडे चांगले दिसतील, कोणत्या रंगाची सध्या चलती आहे, निवडलेल्या ड्रेसवर कोणत्या प्रकारची ज्वेलरी चांगली दिसेल, अशी माहिती यांच्याकडून मिळते. शिवाय अनेक कन्सल्टंट फॅशनल डिझायनर, बुटिक यांच्याशी संलग्न असल्याने हवे तसे ड्रेस डिझाइन करून घेण्याविषयीही त्यांच्याकडून सुचविले जाते. याशिवाय मोठमोठ्या ज्वेलर्स, शोरुम्स, मॉल्समध्येही ही सुविधा पुरविली जाते. नाशिकमध्ये अद्याप हा ट्रेंड तितका रुजला नसला, तरी मोठ्या शहरांमध्ये अशा कन्सल्टंट्सला चांगली मागणी आहे.

--

वेडिंग प्लॅनरलाही पसंती

लग्न थाटामाटात करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्या लग्नाच्या तयारीसाठी तितका वेळ काढणेही अनेकांना शक्य नसते. काही वर्षांपूर्वी ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वेडिंग प्लॅनर ही थीम यातून सर्वसामान्यांना स्पष्ट झाली होती. अशा वेडिंग प्लॅनरची आजच्या धावपळीत चांगली मदत होत आहे. त्यामुळेच त्यांची मागणीदेखील वाढली आहे. मध्यमवर्गीय माणसांच्या मनात अद्याप वेडिंग प्लॅनरची मदत घ्यावी की नाही, याबाबत संभ्रम दिसून येतो. परंतु, लग्न कोणत्याही चिंतेविना योग्य रीतीने व्हावे यादृष्टीने त्यांच्याकडूनही वेडिंग प्लॅनरचा पर्याय निवडला जात आहे. लग्न नेमकं कसं असावं, किती लोकं लग्नाला बोलवायचे आहेत, लग्नात कोणकोणते कार्यक्रम असावेत, परफॉर्मन्सेस, वर-वधू यांची मंडपात एन्ट्री कशा पद्धतीने होणार आहे, लग्नात मेन्यू काय असावा, डेकोरेशन कसे असावे, डेकोरेशनला साजेसे कपडे, पारंपरिक विधी, खर्चाची आखणी कुठे व कशी करावी, या सर्वांची जबाबदारी वर-वधूच्या कुटुंबीयांशी चर्चा करून वेडिंग प्लॅनर पार पाडतो. आपल्या बजेटमध्ये लग्न व्हावे, यासाठी वेडिंग प्लॅनरची मदत घेण्यात मध्यमवर्गीय कुटुंबीयदेखील सरसावले आहेत.

--

स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत...

लग्न चांगले झाले, ही प्रतिक्रिया लग्नातील मंडळी देतात ते तेथील नियोजनामुळे आणि स्वादिष्ट जेवणामुळेच. लग्नातील जेवण चांगले, तर ही मंडळी खूश असे चित्र लग्नांमध्ये हमखास दिसते. जेवण बेचव असेल, तर लग्नातही मजा नाही, अशी समीकरणं करणारी मंडळीही असतात. त्यामुळे लग्नातील सजावटीबरोबर मुख्य काळजी घेतली जाते ती जेवणाची. स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंतचे पॅकेजेस केटरर्सकडून देण्यात येतात. महाराष्ट्रीयन पंचपक्वाने, वेलकम ड्रिंक्स, रंगीबेरंगी मॉकटेल्स, पंजाबी, राजस्थानी, चायनीज, इटालियन, चाट, केळीच्या पानाच्या पंगतीपासून, बुफेपर्यंत आणि त्यानंतर रुचकर पानापर्यंत असे सर्व काही केटरर्सकडून पुरविले जातात. किमान पावणेदोनशे रुपये थाळीपासून पुढे जितक्या पदार्थांचा समावेश होईल, त्यानुसार केटरिंगचे पॅकेज ठरत असते.

--

सर्वसमावेशक फोटोग्राफीचा ट्रेंड

पूर्वी केवळ लग्न आणि त्यापूर्वीच्या हळद, सीमंती अशा विधींपासून ते पाठवणीपर्यंत व्हिडीओ शूटिंग, फोटोग्राफीचे पॅकेज असायचे. यामध्ये एक मुख्य फोटोग्राफर व त्याच्या सहाय्यासाठी एक-दोन जण इतकाच त्यांचा ग्रुप असायचा. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ही पद्धत मात्र कालबाह्य ठरली आहे. केवळ लग्नापुरताच फोटोग्राफर आता राहिला नसून, लग्नाच्या इव्हेंटमधला तो एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. फोटोग्राफर्सची आठ-दहा लोकांची टीम लग्नासाठी कार्यरत असते. लग्नाचे विधी, पाहुणे मंडळींचे स्वागत, वर-वधूंच्या विधींचे फोटो, मेंदी, संगीत व इतर काही पारंपरिक विधी, त्यांचे ‘कॅन्डीड’ क्षण, व्हिडीओ शूटिंग असे सर्व फोटोज व्यवस्थित मिळावेत यासाठी ही टीम केवळ लग्नाच्या दिवशीच नव्हे, तर त्यापूर्वीच्या प्रत्येक इव्हेंटला वर-वधूसोबत असते. हे तर झाले लग्नाचे. परंतु, लग्न ठरल्यानंतर आता कपल्सची पहिली पसंती असते ती प्री-वेडिंग फोटोशूटला. ड्रोनसारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फोटोशूट करीत अनेक जण आठवणींचा हा खजिना सांभाळून ठेवत आहेत. प्री-वेडिंग, कॉफी टेबल बुक, लग्नाचा अल्बम, करिझ्मा अल्बम, शॉर्टफिल्म, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींच्या त्या कपलविषयी असणाऱ्या भावना मुलाखतीद्वारे आणण्यासाठी फोटोग्राफर्सचा शोध ही लग्नकार्यावेळी महत्त्वाची बाब बनली आहे.

--

डिजिटल अन् पारंपरिक निमंत्रण

एकीकडे डिजिटलच्या युगात कमी खर्चात ऑनलाइन पत्रिका देण्याचा ट्रेंड वाढत आहे, तर दुसरीकडे महागड्या पत्रिका छापून घेण्याकडेही कल दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर खुबीने करता येत असल्याने कमी खर्चात प्रभावी निमंत्रण पत्रिका स्नेहीजणांना पाठविणे सुलभ झाले आहे. संबंधित सोहळ्याबाबतची क्लिप तयार करून ई-मेल्स, व्हॉट्सअॅप आदींद्वारे पाठविले जाणारे निमंत्रण चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे कपल्सचे फोटो टाकून लग्नातील विधींची माहिती देणाऱ्या निमंत्रण पत्रिकांचा ट्रेंडही जोरात आहे. केवळ पत्रिका न देता त्याबरोबर सुकामेवा, चॉकलेट्स, मिठाई यांचा समावेश करीत निमंत्रण आकर्षक केले जात आहे.

--

जुन्या-नव्याची कल्पक सांगड

आजच्या पिढीला केवळ नवीन ट्रेंड भुरळ घालतात असे नसून, जुन्या काळातील, पारंपरिक गोष्टींचीही तितकीच भुरळ पडताना दिसून येते. लग्नात डीजे असावा की नाही या विचाराबरोबरच लग्नात विधी सुरू असताना शहनाईचाच आवाज असावा, बग्गीत बसून वरातीचा आनंद लुटावा, अशी मागणी काही जणांकडून केली जाते. केवळ नवीन ट्रेंडच नाही, तर नाही पारंपरिक आणि आधुनिक अशी सांगड घालत त्यांना लग्नसोहळा पार पाडायचा असतो. त्यासाठी जुन्या-नव्याची कल्पक सांगड घालण्याकडेही वाढता कल दिसून येत आहे.

---

लग्नातील प्रत्येक गोष्टीबाबत हल्ली लोक खूप चिकित्सक झाले आहेत. त्यांच्या डीमांडनुसार आम्ही त्यांना पॅकेजेस देत असतो. पेशवाई या थीमपासून ते एकदम मॉडर्न थीममध्ये लग्न करण्याची मागणी पुढे येत असते. यामध्ये वाढपींनीही त्याच वेशभूषेत येऊन वाढावे, असा आग्रहही अनेकांचा असतो. या मागण्या त्यांना हव्या तशा पद्धतीने पुरविण्यात येतात. त्याची वेगवेगळी पॅकेजेस असतात.

-प्रकाश मते, अध्यक्ष, लॉन्स संघटना

--

पूर्वी केवळ पारंपरिक थीमवर फोटोज काढले जात होते. ज्या कपलचे लग्न आहे ते थेट लग्नाच्या दिवशीच फोटोग्राफरला बघायला मिळत. त्यामुळे फोटोग्राफर आणि कपलमध्ये व्यवस्थित बाँडिंग नसल्याने त्याचा परिणाम फोटोंवर व्हायचा. सध्याचा ट्रेंड बदलला आहे. कंटेम्पररी स्टाइल, सिनेमॅटिक व्हिडीओ करण्याला कपल्सची पसंती असते. लग्नापूर्वी, फोटोशूटपूर्वी आम्ही कपल्ससोबत मीटिंग्ज घेतो. त्यांच्या स्टोरीनुसार फोटोशूट करतो. इंटरनेटमुळे अनेक नवनवीन ट्रेंड सर्वसामान्यांनाही माहिती असल्याने त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या मागण्या पुढे येत असतात.

-सागर कोल्हे, फोटोग्राफर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांच्या पाठिशी शिवसेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आवरण्यात महापौरांना अपयश आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या जाचाविरोधात शिवसेनाप्रणित कामगार सेना अधिकाऱ्यांच्या पाठ‌िशी उभी राहिली आहे. म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना ही कायम महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे. अधिकाऱ्यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत असून, याबाबत आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेत आधीच अनेक पदे रिक्त आहेत. त्यात दरमहा सेवानिवृत्ती होत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ते अतिरिक्त कामाचा बोजा घेऊन काम करत असतात. मात्र, पालिकेत सध्या अधिकाऱ्यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत आहे. पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नसताना विषय समित्या, त्यांचे सभापती, पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक अशा विविध पातळीवर प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अधिकारी आणि कामगार वर्गाला कसे शक्य होणार? संपूर्ण नाशिक महानगरपालिकाच आउटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारांच्या ताब्यात देण्यासाठीच अधिकाऱ्यांवर स्वेच्छा निवृत्तीचा दबाव वाढविण्यात येत आहे. दोन वर्षांत तब्बल ११ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना ही कायम नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठ‌िशी आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये. महापालिकाच ठेकेदारांच्या घश्यात घालण्यापेक्षा राज्यातही सत्ता असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेत नोकरभरतीसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून द्यावी. त्यातून अनेकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊन अनेक बेरोजगारांचे आशीर्वाद लाभतील. कोणाला नोकरी सोडण्यास लावण्यापेक्षा रोजगार देता येतो का, याचा विचार व्हावा, अशी अपेक्षाही तिदमे यांनी व्यक्त केली आहे.

कामगार सेनेशी संपर्क साधा

मनपातील उच्च अधिकारी असो की कर्मचारी, कोणी दबाव टाकत असेल त्यांनी त्वरित म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी याप्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटचा फुगा फुटणार; तब्बल दीडशे कोटींची तूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या लेखा विभागाने सुधारित बजेटचे काम हाती घेतले असून, गेल्या आठ महिन्यातील जमा-खर्चाचा ताळमेळ करताना लेखा विभागाची दमछाक होत आहे. उत्पन्नाचे स्‍त्रोत मर्यादीत होत असताना खर्चाची बाजू मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जमा-खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. मार्चअखेर उत्पन्न आणि खर्चात जवळपास दीडशे कोटींची तूट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच स्पीलओव्हर पुन्हा सातशे कोटींच्या आसपास पोहचला आहे. त्यामुळे लेखा विभागाने सर्व विभागांना पत्र पाठवून आता नवीन कामे थांबवा, अशा स्पष्ट सूचना दिल्याने पालिकेच्या कामाचा गाडा चार महिने आधीच थांबला आहे. दुसरीकडे स्थायी समिती आणि महासभेने तब्बल २१०० कोटींवर नेलेल्या बजेटचाही फुगा फुटला आहे.

महापालिकेच्या लेखा विभागाकडून सध्या सुधारित बजेटचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांतील उत्पन्नाची बाजू आणि खर्चाचा आढावा घेतला जात आहे. उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज घेऊन महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला १४१० कोटींचे बजेट सादर केले होते. त्यात स्थायी समितीने पावणेचारशे कोटींची वाढ करत हे बजेट अठराशे कोटींपर्यंत नेले होते. या बजेटमध्ये पुन्हा महासभेने वाढ करून ते २१०० कोटींच्या पार नेले होते. जकातीपाठोपाठ आलेल्या एलबीटीने अगोदरच उत्पन्नाची बाजू कमकुवत केली होती. एलबीटीनंतर आलेल्या जीएसटीने तर उत्पन्नावरच मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे पालिकेडे सध्या जीएसटी आणि मालमत्ता व पाणीपट्टी करावर डोलारा चालवावा लागणार आहे. नोव्हेंबरपर्यंत पालिकेच्या अनुदान व विविध योजनांच्या उत्पन्नातून तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. खर्च ८२८ कोटींपर्यंत गेला आहे. येत्या चार महिन्यांत जीएसटी अनुदान व विविध उत्पन्नांतून २५० कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. त्यामुळे जमा व खर्चाच्या बेरजेत दीडशे कोटी रुपयांपर्यतची तूट जाणवणार आहे.

वाढता वाढता वाढे...

महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला १४१० कोटींचे बजेट सादर केले होते. स्थायी समितीने ते १८०० कोटींपर्यंत फुगवले होते. महासभेने या बजेटमध्ये सव्वातीनशे कोटींची वाढ करत चालू वर्षाचे बजेट २१०० कोटींच्या पुढे नेले होते. परंतु, एकीकडे बजेटचा फुगवटा होत असताना दुसरीकडे उत्पन्नाच्या साधनांवर काम झाले नाही. त्यामुळे आयुक्तांच्या बजेटमध्ये अपेक्षित उत्पन्नाच्या आकड्यापर्यंत पोहचणेही आता मुश्किल झाले आहे. त्यामुळे स्थायी आणि महासभेच्या बजेटचा फुगाही फुटला आहे.

दत्तक नाशिकला ठेंगा

स्थायी समितीने बजेट फुगवताना राज्यसरकाकडून नाशिकला मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल अशी अपेक्षा ठेवली होती. त्यासंदर्भात महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे हजार कोटींचा आराखडाही सादर केला होता. परंतु, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना ठेंगा दाखवला आहे. औरंगाबाद महापालिकेला रस्त्यांसाठी निधी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या बाबतीत मात्र हात आखडता घेतला आहे. सरकारकडून महापालिकेला आर्थिक मदतच मिळाली नसल्याने पदाधिकाऱ्यांचाही अपेक्षाभंग झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संगीत देवबाभळी’ व्यावसायिक रंगभूमीवर

$
0
0

नाशिक ः हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीमध्ये नेहमीच अव्वल ठरलेली नाशिकची रंगभूमी आता व्यावसायिकतेसाठीही कात टाकत असून, नाशिकचे रंगकर्मी प्राजक्त देशमुखलिखित, दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. प्रसाद मच्छिंद्र कांबळी यांचे भद्रकाली प्रॉडक्शन हे नाटक रंगभूमीवर आणणार आहे. अनेक वर्षांपासून व्यावसायिक रंगभूमीवर जाणारी ही पहिलीच स्वतंत्र नाट्यकृती आहे.

नाशिकला व्यावसायिक नाटकांचे अनेक वर्षांपासून वावडेच आहे. कारण आतापर्यंत व्यावसायिकपर्यंत कुणी झेपच घेऊ शकलेले नाही. नाट्यलेखक दत्ता पाटील यांचे ‘रिमझिम रिमझिम’ नाटक ‘स्ट्रॉबेरी’ नावाने रंगभूमीवर आले; परंतु ते कुसुमाग्रज यांच्या कथेवर बेतलेले होते. त्याचे प्रयोगही फारच कमी झाल्याने ओळख होण्याआधीच ते पुसले गेले आणि नाशिकला व्यावसायिक नाटक मिळण्याचे स्वप्न आणखी धूसर होत गेले. मात्र, प्राजक्तच्या ‘संगीत देवबाभळी’मुळे पुन्हा एकदा रंगकर्मींच्या आशा पल्लवित झाल्या असून, नाशिकचे नाटक व्यावसायिकला गेल्याने रंगकर्मींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संगीत देवबाभळी नाटकाचे कथानकही उत्तम आहे. यात तुकोबांना शोधत त्यांची पत्नी आवली भटकत असते, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते. तेव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरतो अशी एक वदंता आहे. त्या काट्याच्याच नावाचे हे नाटक विठ्ठलाने आवलीच्या पायातला काटा काढल्यानंतर काय घडले असेल याचा वेध घेते. विठ्ठल काटा काढून थांबत नाही. या जखमेचे निमित्त करून विठ्ठल रखमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवतो. दोन बायका एकत्र आल्या की गोंधळ उडतो; मात्र येथे या दोघी एकमेकींचा आणि पर्यायाने तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा, आस्तिक्याचा वेध घेतात. असे हे नाटक आहे.

भद्रकाली प्रॉडक्शनचे ५५ वे नाटक म्हणून संगीत देवबाभळीला सन्मान मिळत आहे. या नाटकाला व्यावसायिक रंगभूमीसाठी सादर करताना हवे ते बदल करण्याचे, तसेच हवे ते रंगकर्मी निवडण्याचे स्वातंत्र्य नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांना मिळाल्याने नाशिकचे हे नाटक बाजी मारणार, यात शंका नाही.

एक संगीत एकांकिका तुम्हाला व्यावसायिक रंगभूमीवर घेऊन जाते, या सत्याला मी सामोरा जातोय. लिहिताना उत्तम सादरीकरण डोक्यात असते. त्यामुळे संगीत देवबाभळी ओघवते झालेय. या नाटकाचे दिग्दर्शन मीच करावे असे कांबळींनी सांगितले. नाटकाबाबत सर्व मोकळीक दिली. आणखी काय हवे?

- प्राजक्त देशमुख, लेखक व दिग्दर्शक

व्यावसायिक रंगभूमीसाठी काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. देवबाभळीच्या रूपाने हे स्वप्न पूर्ण होतेय, याचा खूप आनंद आहे. संगीत दिग्दर्शन करताना कस लागणार, यात शंका नाही.

- आनंद ओक, संगीत दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नो हॉर्न डे’आता राज्यात राबविणार

$
0
0

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे शहरात पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ सुरू केला होता. या उपक्रमाची राज्य सरकारने दखल घेतली असून, संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्या आहेत.

अचानक वाजवलेल्या हॉर्नमुळे रस्त्यावर गंभीर अपघात घडत असतात. त्यामुळे या सर्व अनपेक्षित घटना टाळण्यासाठी ‘नो हॉर्न डे’नाशिक शहरात हा उपक्रम पहिल्यांदा सुरू करण्यात आला होता. या अभिनव उपक्रमात शहरातील विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाची दखल घेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी कौतुक केले होते. त्यानुसार मुंबईतदेखील हा ‘नो हॉर्न डे’ उपक्रम राबविण्यात आला. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी हा उपक्रम मुंबईत राबवला. त्यानंतर आता हा अभिनव उपक्रम पूर्ण राज्यात राबविण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्या आहेत.


वाहनचालकांकडून जनजागृती

या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्वतः मंत्रालयासमोर रस्त्यावर उतरून डॉ. पाटील यांनी वाहनचालकांना हॉर्न बंदीचे पत्रके दिली. ध्वनी प्रदूषणमुक्त राज्य म्हणून महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. गरज नसतानाही मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. मुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाची जोरात अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वतः अधिकारी वाहनचालकांना हॉर्न बंदीचे पत्रके देऊन यासंबंधी जाणीवजागृती करत आहेत. वाहनचालकही या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करताना अनेक ठिकाणी दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळा जागतिक सांस्कृतिक वारसा

$
0
0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली / नाशिकरोड

जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारताच्या कुंभमेळ्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचा घटक असलेल्या ‘युनेस्को’ने कुंभमेळा हा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचे जाहीर केले आहे. याआधी गेल्या दोन वर्षांमध्ये योग आणि नवरोझ (पारशी नववर्ष) यांचा समावेश सांस्कृतिक वारशांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. भारतात नाशिकसह अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो.

‘युनेस्को’च्या आंतरशासकीय समितीच्या दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुंभमेळा हा धार्मिक यात्रेकरूंचा जगातील सर्वांत मोठा आणि शांततेत पार पडणारा मेळा असल्याचे ‘युनेस्को’ने म्हटले आहे. भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केली.

अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वारप्रमाणेच नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला महत्त्व आहे. मात्र, या उत्सवाला आजपर्यंत जागतिक पातळीवर दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला नव्हता. त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीने केंद्रीय मंत्र्यांकडे अहवाल सादर केला. समितीच्या पुराव्याच्या आधारे पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात केंद्राने प्रस्ताव पाठवला. त्याचा विचार करून युनेस्कोने कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे.

असा होईल फायदा

नाशिकचा कुंभमेळा युनेस्कोच्या यादीत गेल्याने नाशिकला सांस्कृतिक क्षेत्रात यापुढे जागतिक स्तरावर नावलौकिक मिळणार आहे. या कुंभमेळ्याची दखल युनेस्को संस्था घेणार असून, कुंभमेळ्यासाठी आवश्यक उपाययोजना व संवर्धन युनेस्को करणार आहे. नाशिकचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान वाढणार आहे.

वारसायादीतील अन्य उत्सव

युनेस्कोने जागतिक वारसा यादीत भारतातील पुढील उत्सवांचा समावेश केला आहे. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा, कुट्टीयत्तम, सांस्कृतिक थिएटर, वैदिक मंत्रोच्चार परंपरा, रामलीला रामायण पारंपरिक कामगिरी, नवरोझ, रम्मन धार्मिक सण आणि गढवाल हिमालयातील विधी थिएटर, छाऊ नृत्य, कालबेलिया लोकगीते, राजस्थानातील नृत्य, मुडियेट्टू विधी थिएटर, केरळ नृत्य नाटक, लडाख, जम्मू आणि काश्मीर बौद्ध पठण, संकीर्तन विधी गायन ड्रमिंग आणि मणिपूरचे नृत्य आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार

$
0
0

धुळे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रेतील चेतक फेस्टिव्हलला कोट्यवधींचा निधी सरकारने दिला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सिंचन योजनांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप जिल्हा स्वाभिमानी संघटनेने केला. जिल्ह्यातील तापी नदीचे पाणी शेतापर्यंत पोहचवण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले असून, सारंगखेडा यात्रेच्यावेळी मुख्यमंत्री आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा नंदुरबार जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेत आज (दि. ८) मुख्यमंत्री चेतक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी येत आहेत. त्यासोबतच ते अश्व म्युझियमचे भूमिपूजनही करणार आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. जिल्ह्यातील २२ बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने ४० कोटींचा निधीही मंजूर केला. माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अनेकदा या योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. गेल्या महिन्यात सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १५ दिवसांत उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता निविदांचे कारण सांगून प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील समस्यांचे काय?

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. कापसाला भाव नाही तसेच बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तापीचे पाणी सरळ गुजरातमध्ये वाहून जाते. उकाई धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी मंत्री दरवर्षी या भागात सहल काढतात. प्रकाशा-सारंगखेडा बॅरेजमध्ये पाणी साचले असून, प्रकाशा बॅरेजला गळती लागल्यामुळे पाणी वाहून जात आहे, यासारख्या विविध समस्या कायम आहेत. त्यामुळे याबाबत लक्ष केव्हा देणार असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी बॅरेजेस बांधण्यात आले; परंतु बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी कुठल्याही मंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर नंदुरबार जिल्ह्यात आले तर त्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा गैरवापरावर वस्तुनिष्ठ अहवाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ३३ समावेशक आरक्षणाच्या जागेचा गैरवापर करण्याच्या प्रकारासंदर्भात गुरुवारी (दि. ७) शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

आयुक्तांनी यावेळी तातडीने नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून समावेशक आरक्षणासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच समावेशक आरक्षणासंदर्भात कुणी गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संबंधितांची बांधकाम परवानगी रद्द करण्यात येतील, असे आश्वासनही दिले. शहरातील ३३ समावेशक आरक्षण जागेच्या गैर वापरासंदर्भातील घोटाळा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी उघडकीस आणला होता. पहिल्या विकास आराखड्यामध्ये सुमारे ३३ समावेशक आरक्षणे पार्किंगसाठी विकसित करण्याचा निर्णय घेतला. संबंधित जागा मालकांपैकी मोजक्याच जागा मालकांनी पार्किंगची उभारणी केली. तर काही जागा मालकांनी त्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या केल्या. ज्यांनी पार्किंग उभारली त्यांनीही महापालिकेकडे जागा हस्तांतरित केल्या नाहीत. त्यामुळे संबंधितावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. ७) आयुक्त कृष्णा यांची भेट घेतली.

या जागांच्या गैर वापराचे पुरावे त्यांनी यावेळी आयुक्तांकडे सादर केले. त्यावर आयुक्त कृष्णा यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून वस्तुस्थिती जाणून घेतली. या वेळी श्याम साबळे, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, दिलीप दातीर, प्रशांत दिवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिझेलची पाइपलाइन फोडली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

भारत पेट्रोल‌िअमची मुंबई ते मनमाड डिझेल वाहून नेणारी पाइपलाइन बुधवारी रात्री तारुखेडले (ता. निफाड) शिवारात अज्ञातांनी फोडली. यामुळे लाखो लिटर डिझेल आजूबाजूच्या शेतात आणि जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात मिसळले आहे. घटनास्थळी पेट्रोल‌िअमच्या कर्मचाऱ्यांकडून पाइपलाइन पूर्ववत करण्याचे काम सुरू असून, या ठिकाणी पोल‌सि बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारत पेट्रोल‌िअमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पाइपलाइन फोडण्यात आली त्या ठिकाणी पुढील उपाययोजना सुरू आहेत.

ड्रील मशिनने पाडले छिद्र

गुरुवारी सकाळी ९ वाजता भारत पेट्रोल‌िअमच्या कर्मचाऱ्यांनी डिझेल लिकेजचा स्पॉट शोधायला सुरुवात केली. सापडलेल्या खड्ड्यात दहा फुटापर्यंत लिकेज शोधण्याचा प्रयत्न झाला. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पाइपलाइनला ड्रील मशिनने दीड ते दोन इंचाचे छिद्र केलेले सापडले.

येथून जाते डिझेल पाइपलाइन

मुंबई येथून मनमाड येथील पानेवाडी शिवारातील भारत पेट्रोल‌िअमच्या डिझेल डेपोत पाइपलाइनने डिझेल आणले जाते. ही पाइपलाइन जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला तालुक्यातील काही गावांच्या शिवारातून जाते. निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर, तारुखेडले, खानगाव थडी या गावातील शेतशिवारातून ही पाइपलाइन गेली आहे.

व्हॉल्व्हच्या प्रेशरमुळे

घटना उघडकीस

खाणगाव थडी शिवारातील गट नं. २५४ मध्ये बुधवारी रात्री भारत पेट्रोलिअमची पाइपलाइन फोडण्यात आली. धारणगाव आणि म्हाळसाकोरे येथील वॉल्व्ह प्रेशर देत नसल्याचे लक्षात आल्यावर भारत पेट्रोल‌िअमच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला, तेव्हा खाणगाव थडीच्या गायरान जमिनीत डिझेल मोठ्या प्रमाणात झिरपल्याचे लक्षात आले.

सहा फुट खड्ड्यात डिझेल

घटना स्थळावर एक मोठा खड्डा केलेला आहे. त्या खड्ड्याजवळ पाच ते सहा मातीच्या गोण्या आहेत. शोध घेताना एक मजूर खड्ड्यात उतरला तेव्हा ६ ते ७ फुटांपर्यंत डिझेल भरलेले दिसले. ही पाइपलाइन किमान १० फूट खोल आहे. ही पाइपलाइन ड्रिल मश‌निच्या फोडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम माहितगार असणाऱ्याचेच असल्याची शक्यता वर्तव‌लिी जात आहे.

टँकरमध्ये भरले डिझेल

या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात डिझेलचा उग्र वास येत होता. सकाळी अधिकारी आल्यानंतर सर्वप्रथम जमिनीत पाच ठिकाणी चर खोदले. या जमिनीत इतके डिझेल जिरले होते की काही क्षणात ते चर भरले. तोपर्यंत मनमाड येथून टँकर आल्यानंतर पाइप लावून ते डिझेल टँकरमध्ये भरून मनमाडला पाठवण्यात आले.

जिल्ह्यातील तिसरी घटना

ही पाइपलाइन फुटली नसून, ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीने फोडली असल्याचा निष्कर्ष घटनास्थळावसरील सर्व प्रकारावरून काढण्यात येत आहे. यामध्ये असणारी डिझेल माफियांची साखळी शोधण्याचे आव्हान भारत पेट्रोल‌िअमचे अधिकारी आणि पोल‌सि यंत्रणेसमोर आहे. यापूर्वीही अंकाई (ता येवला) व सिन्नर तालुक्यात या पाइपलाइनमधून डिझेलची गळती झाली आहे. ही तिसरी घटना आहे.

पानेवाडीतून पुरवठा बंद

या गळतीमुळे मनमाडजवळील पानेवाडी येथून टॅकरद्वारे भरून दिला जाणारा इंधनपुरवठा रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज ७०० टँकरने राज्यातील विविध भागात इंधनपुरवठा केला जात होता. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागातील इंधनपुरवठा पाइपलाइन दुरुस्ती होईपर्यंत विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी पेट्रोलिअम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी माध्यमांशी बोलणे टाळले. या डिझेल गळतीमुळे परिसरातील विहिरींबरोबर नदीचे पाणीही प्रदूषित झाले आहे. शासनाने यात लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पारदर्शक कारभारा’चे ढोल वाजवून वाभाडे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपालिकेतील शिवसेना प्रशासनाच्या विरोधात शहर भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला. मनमाड पालिकेचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोप करीत गुरुवारी भाजपतर्फे विविध मागण्यांसाठी शहरातून मोर्चा काढण्यात आला. तसेच ढोलबजाओ आंदोलन करण्यात आले.

मनमाड पालिकेतील शिवसेना प्रशासनाविरोधात आवाज उठवत पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी सकाळी महात्मा फुले चौक येथून मनमाड पालिकेवर धडक मोर्चा काढून ढोलबजाओ आंदोलन करण्यात आले.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, पदाधिकारी उमाकांत रॉय, नारायण पवार, पंकज खताळ, सचिन कांबळे, एकनाथ बोडके, सतीश परदेशी, महेंद्र गायकवाड, मनोज ससाणे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

पालिकेच्या विकासकामांची गुणवत्ता तपासावी, ऑडिट करण्यात यावे, रस्त्यांचे नूतनीकरण करावे, कचराकुंड्या साफ कराव्यात अशा मागण्या करीत पालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी आस्थापना अधिकारी आदींना मागण्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजचे सांडपाणी गोदापात्रात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिका हद्दीतील सांडपाण्याच्या पाइपलाइन फोडण्याचे प्रकार सातत्याने होताना दिसतात. सातपूर विभागातील गंगापूररोड परिसरातील ध्रुवनगर भागात गेल्या महिन्यापासून असे प्रकार होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, ड्रेनेजचे हे सांडपाणी पुढे थेट गोदावरीत मिसळत असून, याकडे महापालिका व स्थानिक नगरसेवकांचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेकडून ठिकठिकाणच्या ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम अनेकदा केले जाते. मात्र, ड्रेनेज लाइन फोडणाऱ्यांवर कारवाईच होत नसल्याने असे प्रकार वारंवर घडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ड्रेनेजची पाइपलाइन फोडल्यानंतर रस्त्यांसह उघड्या नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गंगापूर धरणाच्या उजव्या कॅनॉलवर महापालिकेने उभारलेली सांडपाण्याची ड्रेनेज लाइन यापूर्वीही अनेकदा फोडण्यात आलेली आहे. महापालिकेच्या भूमिगत गटार विभागाकडून संबंधित ड्रेनेजची दुरुस्ती अनेकदा करण्यात येते. परंतु, असे असतानाही याप्रश्नी महापालिकेची यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यापासून सांडपाणी उघड्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह हॉटेल व्यावसायिकांनादेखील नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. महापालिकेच्या भूमिगत गटार विभागाने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

--

यंत्रणांचा कानाडोळा

ध्रुवनगर भागाला लागून असलेल्या गंगापूर धरणाच्या उजव्या कॅनॉलला लागून महापालिकेची थेट सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. परंतु, संबंधित सांडपाण्याची ड्रेनेजची पाइपलाइन वारंवार फोडण्यात येत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. फोडलेल्या ड्रेनेजमधील सांडपाणी पुढे नैसर्गिक नाल्यांतून वाहत जाऊन थेट गोदावरीत मिसळत असल्याने गोदा प्रदूषणात भर पडत आहे. मात्र, महापालिका व स्थानिक नगरसेवकांचेदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

--

ध्रुवनगर भागात महापालिकेने टाकलेली ड्रेनेजची पाइपलाइन नेहमीच फोडण्यात येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ड्रेनेजचे सांडपाणी पुढे गोदापात्रात मिसळत असल्याने महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-बाजीराव शिंदे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस वर्षांनी पुन्हा अनुभवली शाळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवीस वर्षांनंतर पाहिलेला आपला वर्ग, भेटलेले अनेक सवंगडी अन् गुरुजन यामुळे सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये जमलेले ‘ते’ सर्व विद्यार्थी भारावून गेले होते... निमित्त होते या हायस्कूलमध्ये झालेल्या १९९२ मधील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. नुकत्याच झालेल्या या मेळाव्याद्वारे या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा शाळा अनुभवली.

या अनोख्या मेळाव्यात ‘ती सध्या काय करते?’ किंवा ‘तो सध्या काय करतो?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून जाणून घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक जण आपापल्या वर्गात जाऊन त्या काळातील आपल्या बेंचवर बसत सेल्फी काढण्यात गुंग झाले होते. त्या काळातील शिक्षकही मेळाव्यात सहभागी झाले होते. पराग गुजराथी, राजेश राजवाडे, योगेश जाधव, प्रशांत बर्वे, संदीप मोराडे, उमाकांत सावदेकर, मनोज कर्पे यांनी या मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रेखा जोशींच्या स्वागतगीताने पंचवीस वर्षांपूर्वीचा भूतकाळ ताजातवाना झाला. राजेश राजवाडे यांनी सूत्रसंचालनातून कार्यक्रम फुलवत नेला.

या मेळाव्यात सचिन टिळे, तुषार भट, उमाकांत सावदेकर, संदीप मोराडे, दिनेश दोंदे, गणेश सदगीर, समीर पारगावकर, हेमंत शिंदे, संदीप मुळाणे, विजय लिंबकर, घनःश्याम कोळी, सुमित भगत, डॉ. प्रसाद वाघ, रेखा जोशी, योगिता पंडित, अंजली मेखे, रेखी पुरी, पद्मा माने, देवयानी साळवे, लक्ष्मण गावडे, सुहास चौधरी, प्रशांत लोखंडे, अमित गोखले, सिद्धांत पडोळ, मंदार कुलकर्णी, स्वरूप भद्रे, योगेश कांबळे, मनीष पलुस्कर यांच्यासह असंख्या माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

--

देश-विदेशांतून सहभाग

सीडीओ मेरी शाळेत झालेल्या या मेळाव्यात नाशिकसह बेंगळूरू, मुंबई, भरौच, सिल्व्हासा, चंद्रपूर, पुणे, जालना, कराड, औरंगाबाद अशा विविध शहरांतून सुमारे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. परदेशांतील विद्यार्थी या मेळाव्यात ऑनलाइन सहभागी झाले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘प्रॉक्टोलॉजी’ची फेलोशिप मिळणार

$
0
0

देशात पहिल्यांदाच विकसित; आरोग्य विद्यापीठाने दिली संलग्नता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य सेवांमध्ये उच्च दर्जाचे उपचार रुग्णांना मिळावेत यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या वतीने फेलोशिप उपक्रम नव्याने राबविले जात आहेत. विविध विषयांसाठी नव्याने आरोग्य क्षेत्रातील घटक पुढे येत आहेत. यानुसार नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयुएचएस) पुण्यातील हिलिंग हँड्स क्लिनिकला ‘फेलोशिप इन प्रॉक्टोलॉजी’ संलग्न केली आहे.

विद्यापीठाशी संलग्न होऊन अशाप्रकारचा ‘प्रॉक्टोलॉजी’ विषयाचा अभ्यासक्रम देशात पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. या फेलोशिपअंतर्गत दरवर्षी एमयुएचएसमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाच विद्यार्थ्यांना प्रॉक्टोलॉजी विषयाच्या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत माहिती कोलोरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, ‘पाइल्स, प्रोलॅप्स, बद्धकोष्ठता, इन्कॅन्टिन्स आणि फिस्तुला या विषयांचा समावेश असलेल्या प्रॉक्टोलॉजी क्षेत्रासाठी पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम भारतामध्ये विकसित केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसा स्थळांबाबत वाढविणार संवेदनशीलता

$
0
0


महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या नाशिक कार्यालयाचे सहायक संचालक म्हणून विलास वाहने नुकतेच रुजू झाले. त्यांच्याकडे नाशिकसह पुणे पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकपदाचा कार्यभारही राहणार आहे. नागरिकांचा पुरातत्त्व विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याबरोबरच विभागाने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती पोहोचविण्याबरोबरच वारसा स्थळांबाबत संवेदनशीलता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘मटा टॉकटाइम’मध्ये त्यांनी साधलेला संवाद...


वारसा स्थळांकडे नागरिकांनी कसे पाहायला हवे?

आतापर्यंत पुरातत्त्व‌ विभागाने वारसा स्थळांकडे कसे पाहायला हवे, असे विचारले जायचे. मात्र, आता वारसा स्थळांबाबत आपुलकी वाढली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न बदलला आहे. यावरून वारसा स्थळे आपल्या जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे लक्षात येते. पुरातत्त्व विभागाचे मुख्य काम आहे वारसास्थळांचे संरक्षण व संवर्धन करणे. पण, आता संवर्धनाबरोबरच संबंधित स्थळ जेथे आहे तेथे नागरिकांना बरोबर घेऊन वारसा स्थळाच्या संरक्षण व संवर्धनाची भूमिका पार पाडणे गरजेचे झाले आहे. नागरिकांची वारसा स्थळांबाबत संवेदनशीलता वाढल्यास त्या स्थळांचे संरक्षण व संवर्धन योग्य पद्धतीने होऊ शकेल, असे वाटते. याच पद्धतीने नाशिक विभागात काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी रुजू होताच वारसा स्थळांची पाहणी व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणे सुरू केले आहे.


सरकारवाडा कधीपर्यंत खुला होईल?

नाशिकसाठी सरकारवाडा ही महत्त्वाची वास्तू आहे. त्यावर पुरातत्त्व विभागाने मोठा खर्च ही केला आहे. सरकारवाडा लवकरात लवकर खुला व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. येथील कार्यालय इतरत्र हलवून कामाला वेग देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारवाड्याचे बरेचसे काम अजूनही बाकी आहे. वाड्याच्या संवर्धनासाठी पावसाळ्यापूर्वी काही कामे होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ- वाड्याचे छप्पर पावसाळ्यापूर्वी बंदिस्त करायला हवे. त्यासाठी ६० लाखांच्या निधीची गरज असून, त्याबाबतचा प्रस्ताव संचालकांना पाठविणार आहे. सरकारवाड्यात प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय, कायमचे प्रदर्शन हॉल तयार करण्याचा मानस आहे.


सुंदरनारायण मंदिराचे काम केव्हा पूर्ण होईल?

सरकारवाड्याप्रमाणे सुंदरनारायण मंदिर हे नाशिकचे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराच्या कामासाठी चार कोटी निधी मंजूर असून, दोन वर्षे कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे. हे मंदिर पूजेत असल्याने त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी बैठकी सुरू आहेत. कामातील अडचणी व त्या सोडविण्यासाठी समन्वय, नियोजन यावर भर दिला जात आहे. सध्या दगड घडविण्याचे काम सुरू आहे. मंदिर उतरविण्याचे काम लवकरच सुरू होईल. सुंदरनारायणाप्रमाणेच नाशिकमधील अनेक मंदिराच्या संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. ही कामेही हाती घेण्यात येतील.


चांदवडचा रंगमहाल केव्हा खुला होईल?

अहिल्यादेवी होळकर यांच्या चांदवडच्या रंगमहालाचे बरेचसे काम झाले आहे. त्यामुळे त्या वारसा स्थळाला झळाळी आली आहे. रंगमहाल ज्या नावाने ओळखला जातो त्या चित्रांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न होण्याची गरज आहे. येथील चित्रांच्या संवर्धनाचे काम बाकी आहे. लोकांची अपेक्षा व त्यातील अडचणी यावर विचार करून रंगमहालाला लोकांसमोर ठेवणार आहोत.


नाशिक परिसरातील अनेक किल्ले संरक्षित नाहीत?

नाही, असे नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे ओळखून त्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. गड संवर्धन कमिटीने केलेल्या सूचनांनुसार अधिकाधिक किल्ले पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत आणण्याचे काम सुरू आहेत. पुणे, नाशिक, रत्नागिरी या विभागातील एकूण १५ जिल्ह्यांतील ८८ किल्ले संरक्षित होणार असून, त्यातील ३२ किल्ले नाशिक जिल्ह्यातील आहेत. किल्ले संरक्षित केल्यानंतर त्यांच्या संर‌क्षण व ‌संवर्धनासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. याशिवाय संरक्षित नसलेले किल्लेही पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली कसे राहतील, याकडे लक्ष दिले जाणार आहे.


किल्ल्यांच्या संवर्धनावरून वाद का होतात?

संवर्धन चांगले व्हावे, या उद्देशातून हे वाद निर्माण होतात. वादाचे रुपांतर संवादात व्हावे, असा पुरातत्त्व विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी संस्था, संघटनांच्या मदतीने व किल्ले संवर्धनासाठी त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त गडकिल्ले संवर्धनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या संस्थांनी पुरातत्त्व विभागाशी संवाद साधून एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे चांगले काम होऊ शकेल. अनेकदा परवानगीशिवाय काम झाल्याने पुरातत्त्वीय अंगाने काम न झाल्याने काय होते हे पाहायला मिळते. असे होऊ नये म्हणून आम्ही संस्था-संघटनांसह वन विभागाशी संवाद साधत आहोत. पुरातत्त्वच्या संकेतांनुसार गड-किल्ल्यांवर कामे व्हावीत, हे वन विभागानेही मान्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या कामामुळे मोठा बदल झालेला पाहायला मिळेल.


वारसा स्थळांचा माहितीचे संकलन कसे करणार?

नाशिक परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर संरक्षित करता येईल का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. यासाठी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत व तेथील संस्था संघटनांची मदत लागणार आहे. आपला वारसा जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. एवढे जरी नागरिकांमध्ये बिंबवता आले, तरी पुरातत्त्व विभाग मोठे काम पुढे घेऊन जाण्यात यशस्वी होईल. वारसा म्हणजे काय, तो कसा जपावा यासाठी लघुपटाची निर्मिती करून त्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेकदा वास्तू पाडल्या जातात. दगडाच्या वास्तू पुन्हा आहे तशा बांधल्या जाऊ शकतात, हे माहिती नसल्यामुळेही हे घडते. त्यासाठी पुरातत्त्व विभागाची ओळख कामातून निर्माण करण्याचा प्रयत्न असेल.

(संकलन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पांझरा नदीवर साकारणार झुलता पूल

$
0
0

सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आठ महिन्यांत कामास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीवर झुलता पूल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सरकारने गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. त्या पुलासंबंधीचे आदेश सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना केले आहेत. त्यामुळे पांझरा नदीवर एक सुंदर पर्यटनस्थळ लवकरच साकारले जाणार आहे, अशी माहिती शहराचे आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.

धुळे शहरातील पांझरा नदीच्या पुलावर गेल्या आठ वर्षांपासून झुलता पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आता सरकारने निर्णय घेत झुलत्या पुलासंदर्भातील आदेश धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहेत. याविषयी आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता धुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून, पर्यटनस्थळाला चालना मिळणार आहे.

याठिकाणी उभारण्यात आलेल्या या मूर्तीच्या जटेतून सायंकाळच्या वेळी गंगा रुपाने पाणी बाहेर पडणार आहे, खाली पृष्ठभागावर सुंदर कमळ असे विलोभनीय दृश्य असलेले प्रेक्षणीय स्थळ उभारण्यात येणार आहे. हे स्थळ येत्या सहा ते आठ महिन्यांत तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत पत्रदेखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी झुलता पूल व इतर स्थळे तयार होऊन शहराची नवी ओळख निर्माण होईल, असेही आमदार गोटे यांनी पत्रकातून म्हटले आहे.

अशी राहणार पुलाची रचना...

पांझराकिनारी गणपती मंदिराजवळ झुलता पूल उभा केला जाणार

पुलाच्या मध्यभागी ७५ x ७५ मीटरचा प्लॅटफॉर्म एका खांबावर उभा असेल

एकाचवेळी ४ हजार नागरिक याठिकाणी बसू शकणार

मध्यभागी भगवान शंकराची ३३ फूट उंचीची मूर्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्यांच्या’साठी मनमाड ठरले माणूसकीचे स्टेशन!

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

पुण्याहून अकोल्याला आझाद हिंद एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अंध बासरीवादकाच्या गरोदर अंध पत्नीला रेल्वेतच प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर मनमाड शहरातील माणुसकीचे शिलेदार त्यांच्या मदतीला धावले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या अंध महिलेने गोंडस व डोळस बाळाला जन्म दिला. या महिलेला माहेरची साडी देत आणि या अंध दाम्पत्याचा सर्व खर्च करत दोन-तीन दिवस त्यांच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या मनमाडकरांची आपुलकी पाहून हे अंध दाम्पत्य भारावून गेले आहे. एका गरीब अंध बासरी वादकाच्या अंधकारमय जीवनात डोळस सूर उमटल्याची ही घटना मानवतेचा गहिवर दर्शविणारी ठरली आहे. मनमाडमधील हे मदतीचे हात व माणुसकीचे शिलेदार डोळ्यांना दिसत नाही म्हणून खंत बाळगणाऱ्या या अंध दाम्पत्याने आम्हाला देवदूत भेटल्याची भावना व्यक्त केली.

अकोला येथील किशोर व उमा वाघ हे अंध दाम्पत्य पुणे येथून सोमवारी रात्री आझाद हिंद एक्सप्रेसने अकोला येथे जाण्यास निघाले. गरोदर असलेल्या उषा यांना रेल्वे मनमाड स्थानकादरम्यान आली असता प्रसूती कळा सुरू झाल्या व हे अंध दाम्पत्य बावरून गेले. किशोर वाघ यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली. रेल्वे मनमाडला थांबली असल्याने या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे कैलास खैरे, अल्ताफ खान, प्रवीण पगारे, संजय कांबळे, प्रहार संघटनेचे पुंडे हे सर्व त्या दाम्पत्याच्या मदतीला धावले. त्यांनी तातडीने मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालयात उषा वाघ यांना दाखल केले. वैद्यकीय अधिकारीही हजर झाले. पहाटे उषा यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

डोळस बाळाचा जन्म

आपले बाळ डोळस असल्याचे समजताच या अंध दाम्पत्याच्या डोळ्यांत आसवे जमा झाली. बँडमध्ये काम करणाऱ्या अंध किशोर वाघ यांनी आपली आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याचे सांगत पैसे नसल्याने घरी जाण्याचा हट्ट धरला. पण, थंडी, पावसाळी हवामान बाळाला बाधेल म्हणून मनमाडकरांनी त्यांना दोन-चार दिवस थांबण्याचा आग्रह केला. त्यांचा खाण्या-पिण्याचा खर्चही उचलला.

माहेरसारखा पाहुणचार

उषा यांना या कार्यकर्त्यांनी माहेरची साडी घेतली. किशोर व त्यांच्या बाळाला कपडे केले आहेत. चांगला सकस व पौष्टिक आहार उषा यांना मिळावा याकडेही त्यांचा कटाक्ष आहे. त्यांचे हे डोळस काम व माणुसकी अनुभवताना या दाम्पत्याचे डोळे पुन्हा-पुन्हा पाझरत आहेत. दिसत नसताना, कोणती ओळख व कसलेही नाते नसताना मनमाडमध्ये आधार मिळाला. मनमाड हे माणुसकीचे स्टेशन आम्हाला भेटले, हे सांगताना हे जोडपे हरखून गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहार प्रकरणी पोतनीस बंधूंना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुनंद कन्स्ट्रक्शन आणि इस्टेट कंपनीत ठेव ठेवल्यास जादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखवून ४४ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कंपनीचे मालक वंदन अरविंद पोतनीस, सुहास अरविंद पोतनीस व आनंद अरविंद पोतनीस यांच्यावर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील सुहास आणि आंनद यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. १०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी सुभाष राजाराम आंबेगावकर (७२, रा. फ्लॅट नंबर ६ सुनंद सहनिवास डी विंग, काठेगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षापासून फिर्यादी सुभाष आंबेगावकर व तीनही आरोपी यांची ओळख आहे. या ओळखीचा फायदा घेत पोतनीस यांनी आपल्या मालकीच्या असलेल्या सुनंद कंस्ट्रक्शन कंपनीत ठेव ठेवल्यास बाजारभावापेक्षा जास्त दराने म्हणजेच दर साल दर शेकडा १५ टक्के दराने व्याज देऊ असे कबूल केले. रक्कम आमच्या ताब्यात आहे तोपर्यंत व्याज मिळेल असे फिर्यादी आंबेगावकर यांना पोतनीसांकडून सांगण्यात आले. आंबेगावकर यांनी पोतनीसांवर विश्वास ठेवून २००६ ते २०१५ या काळात वेळोवेळी ४४ लाख रुपये गुंतवले. गुंतवणूकदाराला खात्री पटावी यासाठी पोतनीस यांनी २०१४ पर्यंत नियमित व्याज दिले. आंबेगावकर यांनी पैशाची मागणी केल्यानंतर तीनही आरोपींनी मुद्दल व व्याजाचे पैसे देण्यास नकार दिला. याबाबत आंगेबावकर यांनी अनेकदा पैशाचा तगादा लावला परंतु पोतनीस यांनी पैसे देण्याबाबत टाळाटाळ केली. त्यावरून आंबेगावकर यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी वंदन, सुहास, आनंद या पोतनीस बंधूंविरूद्ध सराकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील सुहास आणि आनंद यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी अधिक तपास करीत आहे.

वंदन पोतनीस फरार

पोलिसांनी बुधवारी (दि. ६) मध्यरात्री पोतनीसांच्या घरावर छापा टाकून सुहास आणि आनंद या दोघांना अटक केली. मात्र, वंदन पोतनीस फरार होण्यास यशस्वी ठरले. पोलिस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्वतेच्या उत्सवाला स्वरसुरांचा साज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुजरातमधील बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘श्रीनिवास खळे रजनी’ हा बहारदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबईतील गायकांसोबत बडोद्यातील गायक आपली कला सादर करणार आहेत.

मराठी साहित्य संमेलन म्हणजे साक्षात सरस्वती देवीचा उत्सव मानला जातो. देवी शारदेला प्रसन्न करण्यासाठी शब्दांसोबत सुरांचीही आराधना केली जाते. अशीच आराधना ‘श्रीनिवास खळे रजनी’ या बहारादार संगीत मैफलीतून केली जाणार आहे. मराठी संगतीसृष्टीमध्ये एकापेक्षा एक बहारदार गाण्यांची रचना करणारे श्रीनिवास खळे हे मूळचे बडोदा येथील होते. ऐकण्यास अतिशय मधूर मात्र गायनास तितकीच आव्हानात्मक अशी खळे यांनी निर्माण केलेल्या गाण्यांची ओळख आहे. मराठी रसिकांच्या मनावर वर्षोनुर्षे राज्य करणारी अशी सदाबहार गाणी बडोद्यातील साहित्य संमेलनात सादर केली जाणार आहेत. यात खळे यांचे शिष्य राहिलेल्या व मुंबईतील प्रसिद्ध संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायनासाठी इच्छूक असलेल्या कलावतांची निवड चाचणी बडोदा येथील म्युझिक कॉलेजमध्ये नुकतीच घेण्यात आली. भडकमकर यांनी प्रत्यक्ष गायन करणाऱ्या कलावंतांची निवड केली. या कलावंतांनी शास्त्रीय व सुगम मराठी गीते सादर केली. या उपक्रमात मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह आशिष जोशी, दीपक भोंडे, प्रकाश गर्गे आणि मिलिंद बोडस यांचे योगदान होते. निवड झालेले कलावंत खळे यांच्या अभंग, नाट्यगीत, भावगीते अशा विविध रचना सादर करणार आहेत.

संमेलनाची माहिती ट्विटरवर
मराठी साहित्य संमेलनाच्या विविध घडामोडी आणि अन्य माहितीसाठी ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आले आहे. यावरून मराठी साहित्यरसिकांना बडोद्याच्या संमेलनाचे अपडेट मिळणार आहे. ९१ अखिल भारतीय साहित्य संमेलन, बडोदे या नावाने @sanjaybachav91 ट्विटर अकाउंट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचएएल’तर्फे उद्या स्वदेशी संमेलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वदेशी बनावटीचे भारतीय लढाऊ विमान साकारण्याचा हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) प्रयत्न यशस्वी झाला आहे. म्हणूनच एचएएलच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील स्वदेशी संमेलनाचे आयोजन शनिवारी (दि. ९) करण्यात आले आहे.

रशियन सरकारबरोबर करार करून भारताने लढाऊ विमानांची निर्मिती सुरू केली. मात्र, स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान साकारण्याचे धोरण भारत सरकारने २००३ च्या सुमारास स्वीकारले. या अंतर्गत सूक्ष्म, लहान आणि मोठ्या भारतीय उद्योगांकडून विमानांच्या निर्मितीसाठी लागणारे विविध पार्ट खरेदी करण्यास एचएएलने प्राधान्य दिले. खासगी सहकारी भागीदारी (पीपीपी) तत्वावर हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरला आहे. म्हणूनच सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानासाठी तब्बल ९० खासगी उद्योगांकडून विविध प्रकारचे सुटे भाग पुरविले जातात. खासगी उद्योगांना सहभागी करून घेण्याचा सतत प्रयत्न ‘एचएएल’कडून होत आहे.

स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमान निर्मितीत ‘पीपीपी’चा हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरला आहे. म्हणूनच ‘एचएएल’च्या वतीने पीपीपी संमेलन २०१७ चे आयोजन ओझर येथे करण्यात आले आहे. या समारंभास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, एचएएलचे चेअरमन टी सुवर्ण राजू हे उपस्थित राहणार आहेत. एचएएल टाउनशीपमध्ये दुपारी ४ वाजता होणाऱ्या समारंभास भारतभरातील ९१८हून अधिक व्हेंडर्स उपस्थित राहणार आहेत. तसेच बंगळुरूच्या डायनामॅटिक टेक्नॉलॉजिज या कंपनीच्या वतीने सुखोईसाठी लागणाऱ्या एका सुट्या पार्टचा स्वीकार या प्रसंगी केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण मंडळांसाठी १५१ अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी नाशिक मुख्यालयात १५१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने ‌दिली आहे.

विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ जसे अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येते. यासाठी सदस्य निवडीसाठी विद्यापीठातर्फे निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, की विद्यापीठाच्या नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद या चार शहरांमधील विभागीय केंद्रावरही अर्ज जमा करण्याची सोय करण्यात आली होती. तेथील अर्ज एकत्रित केल्यानंतर एकूण उमेदवारांच्या अर्जांची संख्या हाती येईल. पण नाशिक मुख्यालयात नामनिर्देशन सादर करण्याच्या मुदतीअखेर १५१ अर्ज सादर आहेत.

प्राप्त अर्जाची विद्यापीठ मुख्यालयात ११ डिसेंबर रोजी छाननी केली जाणार आहे. छानणी अखेर उमेदवारांच्या वैध अर्जाची यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २० डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांची अंतीम यादी २१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यापीठाची विविध प्राधिकरण निवडणूक २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत राज्यभरातील विविध मतदान केंद्रावर रावविण्यात येईल. या मतदानाची मतमोजणी ३० डिसेंबर रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

बिनविरोध निवडीची शक्यता
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी पार पडणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. या निवडणुकीसाठी राज्यभरातून सुमारे १४ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. निवडणुकीतील बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीची यापूर्वीही बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे. दरम्यान, २० डिसेंबर रोजी अर्ज माघारीची मुदत आहे. यापूर्वी, सोमवारी (दि. ११) आलेल्या सर्व अर्जांची छानणी होणार आहे. तसेच २१ डिसेंबर रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. डॉक्टर घडविणाऱ्या या विद्यापीठातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images