मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. प्रतिनिधी, सिडको उत्तमनगरच्या बुद्धविहाराच्या समोर असलेले व्यापारी अनिल शिरोडे यांच्यावर अज्ञात इसमाने घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिरोडे यांच्या पत्नीही जखमी झाल्या. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडल्या प्रकाराने सिडकोत खळबळ उडाली आहे. शिरोडे यांचे उत्तमनगर येथे श्री स्वामी समर्थ किराणा नावाचे दुकान आहे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ते कुटुंबासह बाहेरगावी जात असतांना एका व्यक्तिने त्यांच्यावर हल्ला केला. शिरोडे यांच्या पत्नीने हल्लेखोराला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याही जखमी झाल्या. हल्लेखोराने त्यांच्याजवळील काही ऐवजही लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अबंड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्यातील आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्ल्यात जखमी झालेले शिरोडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.