म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील पाणीबाणीच्या स्थितीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिका आक्रमक झाली असून, नागरिकांच्या पाणी उपसा करणाऱ्या मोटारी जप्त करण्यासह दंडात्मक कारवाईला वेग दिला आहे. महापालिकेने सहा विभागात आतापर्यंत १७८ मोटारी जप्त केआल्या असून, २९४ नागरिकांकडून एक लाख ५० हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सिडको विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने पाणीपट्टी वसुलीवरही भर दिला असून, थकबाकीदारांना ४८ तासांच्या नोटिसा दिल्या आहेत.
शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, काही जणांकडून मोटारी लावून पाण्याचा अपव्यय केला जात आहे. तसेच, पाण्याची नासाडीही केली जात आहे. त्यामुळे अशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या महिनाभरात विभागीय अधिकाऱ्यांनी जवळपास १७८ मोटारी जप्त केल्या आहेत. तर, २९४ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या नागरिकांकडून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला असून, सिडकोत सर्वाधिक ६३ मोटारी जप्त करण्यासह ८५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नाशिक पश्चिम विभाग कारवाईत सर्वात मागे आहे.
पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा
घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टी वसुलीवरही पालिकेने जोर दिला असून, पाणीपट्टी थकबाकीदारांना आता ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. थकबाकीदारांना ४८ तासांच्या आत पैसे भरा अशा नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. पैसे भरले नाहीत, तर पाणीकनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षी पालिकेने ४१ कोटींची पाणीपट्टी वसूल केली होती. चालूवर्षी केवळ ३७ कोटींची वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत हे वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेने धावपळ सुरू केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट