Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अजूनही जिवंत अाहे शब्दांची भूक

$
0
0

चाळीसगावच्या ना.बं.वाचनालयात वाचकांची दिवाळी

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

दिवाळीत मराठी माणसाला जितके फराळाचे वेध असतात तितके दिवाळी अंकाचीही उत्कंठा असते. मराठी माणूस आणि दिवाळी अंकाचे एक अनोखे नाते आहे. दिवाळी अंकांना शतकी परंपरा आहे. याच परंपरेनुसार शहरातील ना. बं. वाचनालयात वाचकांसाठी विविध क्षेत्रातील नामांकित दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याला वाचकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

सुसंस्कृत मराठी माणसाच्या दिवाळीत दिवाळी अंकाना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच वर्षसरतीला येणाऱ्या दिवाळीत वाचकांना दिवाळी अंकाची प्रतीक्षा असते. फटाके, गोड, फराळ यासारखेच दिवाळी अंकाचा खजिना वाचकांना शब्दांची भूक भागविण्यास मदत करत असतो. त्यांच्यासाठी ही वैचारिक फराळाची मेजवानीच असते. वाचनप्रेमींकडूनही दिवाळीच्या सुट्यांमध्ये या खजिन्याची मनमुराद लूट होत असते.

चाळीसगावच्या ना.बं. वाचनालयास शतकीय परंपरा आहे. वाचनालयात साठ हजार विविध ग्रंथ आहेत. याच गौरवशाली पंरपरेनुसार गेल्या तीस वर्षांपासून वाचनालयाकडून दिवाळीत विविध क्षेत्रातील दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात. या वर्षीही साहित्य, ऐतिहासिक, अध्यात्मिक, आरोग्यविषयक, पाककृती, विनोदी व बालकांसाठी असे ७० दिवाळी अंक आले आहेत. वाचनसंस्कृतीस बळ मिळावे व वाचकांना याचा लाभ घेता यावा म्हणून नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत दिवाळी अंक योजनाही सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात आदिवासींचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एकलव्य आदिवासी युवा संघटना, आदिवासी एकता परिषद व आदिवासी विकास मंचतर्फे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी, मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिंदखेडा ते धुळे या मार्गे मोटरसायकलने काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी ९ वाजता शिंदखेडाहून निघालेला हा मोर्चा दुपारी १२ वाजेच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. शिंदखेडा ते धुळे मार्गातील ठिकठिकाणच्या गावातील आदिवासी बांधव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

२१ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासींना संरक्षण दिले असून त्यास विरोध आहे. एकीकडे आदिवासी भुकबळी व कुपोषित असून दुसरीकडे बोगस आदिवासींना योजनेचा लाभ दिला जात आहे. बिगर आदिवासींमार्फत शासकीय जागा लाटण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक गावात आदिवासी समाजासाठी दफनभूमी असायला हवी अशी मागणीही करण्यात आली आहे. शंभर रूपये रोजंदारीने मजुरी करणाऱ्या आदिवासींना वीज बिल भरावयास सांगण्यात येते. त्याला आळा बसला पाहिजे, असे या निवेदनात म्हटले आहे. धुळे शहरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची ४० एकर जागा आहे तरीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी १० एकर जागा मिळत नाही. यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोपही यात केला गेला आहे.

मागण्या

बोगस आदिवासींना योजनेचा लाभ नको

आदिवासी विद्यार्थी वसतिगृहास जागा

प्रत्येक गावात समाजाची दफनभूमी व्हावी

शबरी महामंडळाचा लाभ मिळावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देश बिल्डर्सच्या निविदा बेकायदेशीरच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव घरकूल घोटाळाप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सलग दोन दिवस कामकाज झाले. यावेळी या गुन्ह्यातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार डॉ. प्रवीण गेडाम यांची साक्ष नोंदविण्यात आली की, घरकूल बांधकामाच्या नऊ ठिकाणांच्या निविदांमध्ये खान्देश बिल्डर्सने १५ प्रकारचे बदल केले होते. मात्र शासनाच्या नियमानुसार व अर्टी शर्तींनुसार निविदा प्रक्रियेमध्ये बदल करता येत नाही. तसेच या निविदा व टिप्पणीमध्ये नगरपालिकेचे अधिकारी, अभियंता व अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या होत्या आणि त्या डॉ. गेडाम यांनी ओळखल्या आहेत.

तसेच या घरकूल बांधकामांचा विशिष्ट तपशील तयार करण्यात आला होता. त्यात घरकूलाचा खर्च, काम व अन्य बाबींचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये सात अटी शर्ती ठेवण्यात आल्या होत्या. परंतु अभियंता खडके यांनी या टिप्पणीला नकारात्मक उत्तर देऊन स्वीकारली नाही. अंतर्गत लेखापरीक्षक ओझा यांनी टिप्पणीवर नवीन निविदा मागविण्याचे सूचित केले. यामुळे खान्देश बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक जगन्नाथ वाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे ते बेकायदेशीर असल्याची साक्ष नोंदविण्यात आली. तर या खटल्याचे कामकाज आता २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या प्रकारावर आरोपींच्या वकीलांनी हरकत घेत सांगितले की, ज्यावेळी निविदा प्रक्रिया व टिपणी तयार करण्यात आली, तेव्हा या गुन्ह्यातील फिर्यादी डॉ. गेडाम हे नगरपालिकेत कार्यरत नव्हते. मग त्यांनी स्वाक्षऱ्या नेमक्या ओळखल्याच कशा? ही हरकत नोंदविण्यात आली. तसेच मंगळवारी या खटल्याचे कामकाज सुरू असताना कोर्टात एकही आरोपी उपस्थित न राहता ते कोर्टाच्या आवारात फिरत असल्याची तक्रार सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्याजवळ केली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी साडेअकरा ते साडेपाचपर्यंत कामकाज सुरू असताना आरोपी कोर्टातच बसले. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत जेवणाच्या सुटीच्या वेळी कोर्टाच्या परिसरात त्यांना राहता आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यासाठी ‘संजीवनी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलासाठी 'पेयजल पाणीपुरवठा संजीवनी' योजना कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

धुळे शहरातील वीज वितरण संदर्भातील विविध कामांची आढावा बैठक ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. धुळ्याच्या महापौर जयश्री आहेरराव, आमदार अनिल गोटे, महावितरणचे कार्यकारी संचालक ताकसांडे, संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे, अधीक्षक अभियंता पडाळकर, वाणिज्य अभियंता खंडाईत आदी उपस्थित होते.

धुळे शहरातील महावितरणच्या विविध कामांचा आढावा घेऊन बावनकुळे म्हणाले की, पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या थकीत वीज बिलातील ५० टक्के वीज बिल टप्प्याटप्याने भरण्याची सवलत देण्यात येईल. मूळ थकबाकी रकमेच्या उर्वरित ५० टक्के रक्कम आणि व्याज व दंडाच्या ५० टक्के रक्कम महावितरणला शासनाकडून अनुदान स्वरुपात दिली जाईल. महावितरण कंपनीकडून ५० टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेने पाठविल्यास त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. धुळे शहरात अधीक्षक अभियंता कार्यालयाची स्वतंत्र इमारत स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसेच वीज चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी लघु व उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार असून, रस्त्यात अडथळा आणणारे वीजखांब, विद्युत वाहिन्याही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात थंडीचा जोर वाढला

$
0
0

म टा वृत्तसेवा, धुळे

गेल्या काही दिवासांपासून धुळे शहर व परिसरात थंडीच्या प्रमाणात वाढ होवू लागली आहे. मध्यरात्रीच्या वेळी तापमानाचा पारा खाली येऊन पहाटे थंडीची हुडहूडी जाणवत आहे. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा किमान १९ अंशांपर्यत खाली येत आहे. यामुळे थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनाही उन्हाळ्याच्या झळांपासून यामुळे दिलासा मिळाला आहे.

अशा वातावरणात धुळेकर पहाटे व सायंकाळी जिल्हा क्रिडा संकूलाच्या मैदानावर पायी फिरायला यायला सुरवात झाली आहे. तर तरूणमंडळी नेहमीप्रमाणे व्यायाम व खेळाच्या सरावासाठी येताना दिसत आहेत. शहरात थंडीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी दैनंदिन कामाला सुरवात करण्यापूर्वी थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर, कानपट्टी यांचा वापर सुरू केला आहे.

सध्याच्या परिस्थितीत रात्री थंडी असली तरी दिवसा मात्र सकाळी 9 वाजेनंतर वातावरणात तीव्र उन्हाचे चटके जाणवत आहेत. दिवसाचे तापमान साधारण ३५ अंशांपर्यंत असते. हेच तापमान रात्री १९ अंशांपर्यंत खाली येते. यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असा अनूभव धुळ्याचे नागरिक घेत आहेत. दिवाळीनंतर हळूहळू थंडी वाढत असते. याची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. यामुळे रात्री घराबाहेर पडतांना थंडीपासून बचावाच्या उपाययोजना करतांना नागरिक दिसत आहेत. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दररोज सकाळी उठून व्यायाम करावा आणि पायी फिरल्यास शरीर सदृढ राहते. यासोबत स्विमिंग केल्यास संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. प्रत्येकाने सकाळी व रात्री जेवणानंतर पायी फिरावे आरोग्यास चांगले असते. - किरण कांबळे, नागरिक

पायी फिरण्यासाठी हिवाळ्यातच यावे असे नाही तर दररोज सकाळी पायी फिरायला आल्यास शरीराचा व्यायाम होतो. आपल्याला सकाळी शुद्ध हवा श्वसनासाठी मिळते. यावेळी व्यायाम अथवा योगादेखील करावा ज्याने चांगले आरोग्य राहते. - मोहन पवार, वृंदावन कॉलनी, वलवाडी परिसर

मला लहानपणापासून निरनिराळ्या खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची सवय आहे. त्यामुळे व्यायामाची सवय आहेच. या थंडीच्या दिवसांमध्ये रोज सकाळी फिरायला हवे. यामुळे उत्तम आरोग्य लाभते. आणि आपले शरीर सदृढ राहते. - हेमंत माळी, खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीच्या चाहुलीने अंड्याचे वाढले दर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात गेल्या आठ दिवसापूर्वी थंडीचा तडाखा सुरू झाला आहे. हळुहळु वातावरणात बदल होत आहे. सकाळी उन्हाचे चटके व रात्री थंडी असा अनुभव धुळे शहरवासियांना येत आहे. मात्र यंदाही हिवाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी अंडे खाण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या दररोज किमान सहा हजार अंडे विक्री होत असल्याचे अंडे विक्रेत्यांनी 'मटा' शी बोलताना दिली आहे.

या वाढलेल्या थंडीमुळे शहरात अंडे प्रतिडझन ५० रूपये झाले आहेत. हे दर गेल्या दहा दिवसांपूर्वी ४५ रूपये प्रतिडझन एवढे होते. तर अचानक या वाढलेल्या थंडीमुळे अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. कारण थंडीच्या दिवसात अंडी खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होवून शरीराला पोषक आहार मिळतो. थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीच्या भाजीसह अंडींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. प्रत्येकजण दररोज आहारात हे पदार्थ आवर्जुन घेतात. सध्या मेथीची भाजी पाच ते दहा रूपयाला एक जुडी मिळत आहे. तर शहरातील होलसेल अंडी विक्रेते दररोज २ ते ४ हजारांपर्यंत अंडी विक्री करत आहेत. तरी गेल्या वर्षापेक्षा यंदा व्यवसाय तेजीत नाही, असे अंडी विक्रेत्याचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तीनशे रुपये शेकडा व ४५ रूपये प्रतिडझन दराने विक्री होणारे अंडी सध्याच्या स्थितीत चारशे रुपये प्रतिशेकडा व ५० रुपये प्रतिडझनने विक्री होत आहेत. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने अंडी व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून येत आहे, असेही अंडी विक्रेत्यांनी माहिती देतांना सांगितले.

जिल्ह्याबाहेरही विक्री

धुळे शहरात तालुक्यातील देवभाने, मेहेरगाव, मुकटी व नवापूर येथील पोल्टीफार्म मधून अंडी विक्रीसाठी येतात. विशेष म्हणजे धुळे तालुक्यातून नाशिक व जळगाव जिल्ह्यातही अंडी विक्रीसाठी जात आहेत. कारण त्याठिकाणी पोल्टीफार्म कमी आहेत. यामुळे शेकडो अंडी दररोज जिल्ह्याबाहेर विक्रीसाठी जात आहेत. मात्र धुळे शहरातील हॉटेल व किराणा व्यावसायिक तालुक्यातून ४ ते ६ हजार अंडी विक्रीसाठी नेत असल्याची माहिती अंडी होलसेल विक्रेते वराडे यांनी दिली.

धुळे तालुका व नवापूर शहरातून दररोज एकूण दोन लाखांच्या जवळपास अंडी विक्रीसाठी येत आहेत. तर त्यातून काही अंडी ही जळगाव व नाशिक जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. यामुळे अंडी व्यवसाय तेजीत आहे असे नाही. यंदा संथ गतीने व्यवसाय सुरू असून ग्राहकांचा प्रतिसाद बरा आहे. - अशोक वराडे, अंडीविक्रेता, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचआयव्हीतून सावरतोय धुळे जिल्हा

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

देशात एचआयव्ही एड्स संसर्गित लोक साधारणपणे २५ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यात सर्वात जास्त प्रमाण स्त्रियांचे आहे. देशात दर शंभर एचआयव्ही संसर्गित लोकांमध्ये ६१ पुरूष आणि ३९ महिला असतात. या आकड्यानुसार पुरूषांमध्ये संसर्गाची संख्या जास्त आहे. याच अनुषंगाने धुळे जिल्हा एचआयव्हीच्या जंजाळातून सावरतोय असे गेल्या दहा वर्षांच्या एचआयव्ही रूग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एचआयव्हीच्या रूग्णसंख्येत आशादायक घट झाली आहे. धुळे जिल्ह्यात सन २००२ ते ऑक्टोंबर २०१५ अखेर एचआयव्हीची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत घट होत आहे, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक अधिकारी शीतल पाटील यांनी 'मटा'शी बोलतांना दिली.

सध्या जिल्हा नियंत्रण कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात ११ एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र आहेत. या केंद्रामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०१५ अखेर ४७ हजार ८२५ गरोदर स्त्रियांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली आहे. त्यात १८ महिलांना याची लागण झाली आहे. तर सर्वसाधारण रूग्णांमध्ये ४२ हजार ४१२ रूग्णांच्या तपासणीत ४४१ जण एचआयव्ही बाधित झाल्याचे वैद्यकिय अहवालानुसार माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात सर्वोपचार रूग्णालयातंर्गत ठिकठिकाणी अकरा एचआयव्ही नियंत्रण तपासणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यात १५ समुपदेशक एचआयव्ही तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांना याबाबत सविस्तर माहिती देतात. त्याचबरोबर याविषयी कोणत्या उपाय व दक्षता घ्याव्यात याचेही मार्गदर्शन करतात. यामुळेच गेल्या दहावर्षांपूर्वीपेक्षा आता लोकांमध्ये एचआयव्हीविषयी जागरूकता झाल्याने रूग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे. ही केंद्रे जिल्ह्यासह मालेगाव, जळगाव, नंदुरबार, नाशिक व इतर ठिकाणाहून रूग्ण उपचारासाठी दाखल होतात.

या केंद्रात आता ६१५ बाधित रूग्णांवर औषधोपचार नियमित सुरू आहेत. तर जिल्हा एड्स नियंत्रक केंद्र कार्यालयामार्फत जिल्हाभरातील ११ केंद्रावर ४४१ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रक कार्यालयाने दिली आहे. एचआयव्ही बाधिताला अगोदर दूर ठेवले जाई मात्र आता यावर औषधे येऊ लागल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारनेही एचआयव्हीवर आता प्राथमिक उपाय म्हणून औषधे बाजारात आणली आहेत. मात्र या रोगावरील औषधींनी रूग्ण कायमस्वरूपी बरा होत नाही तर त्याचे आयुष्य वाढते. यासोबतच यासाठी शासनाने जनजागृती व पथनाट्याद्वारे या आजाराची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यत पोहोचविली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

> रूग्णाने नियमित वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार व खबरदारी घ्यावी > प्रत्येकाने एकाच साथीदाराशी एकनिष्ठ राहावे > सुरक्षिततेसाठी कंडोमचा नियमित वापर करावा > गदोदर स्त्रियांनी एड्सची तपासणी करावी > एकदाच वापरात येणाऱ्या सुईचा वापर करावा > सरकारी रक्तपेढीतीलच रक्त वापरावे

एचआयव्ही म्हणजे काय?

हा आजार म्हणजे एचआयव्ही हा एक विषाणू आहे. जेव्हा हा मानवी शरीरात आढळतो तेव्हा त्यावेळी एचआयव्ही रोगाची बाधा झाल्याचे स्पष्ट होते. हा विषाणू आपल्या शरीरातील सीडी-४ पेशींना दुर्बल बनवितो. त्याचे प्रमाण कमी करतो. तेव्हा शरीराची आजाराविरूध्द लढण्याची क्षमता कमी होत जाते व त्यामुळे शरीर कमकूवत बनते. त्यालाच एड्स असे म्हणतात.

एड्सविषयी गेल्या काही वर्षांपूर्वी माहिती नव्हती. मात्र आता ठिकठिकाणी एचआयव्ही नियंत्रक केंद्र झाल्याने रूग्णांना एड्सविषयी माहिती देऊन त्यांच्या मनातून भीती काढता येते. - बाबाजी पाटील, एचआयव्ही, समुपदेशक, धुळे

एड्स रूग्णांसाठी जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी नियंत्रक केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर औषधी, तसेच अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यात येतात. यामुळेच रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आता नागरिक सुज्ञ झाल्यानेच ही घट होत आहे. - शितल पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, धुळे

जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या ठिकाणाहून एड्स रूग्ण उपचारासाठी येतात. त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन व उपचार केले जातात. गेल्या काही वर्षांपेक्षा आता बाधितांची संख्याही कमी होत आहे. - अभिषेक पाटील, एचआयव्ही वैद्यकीय अधिकारी, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवीण गेडामांचा अर्ज बाद करा

$
0
0

घरकुल प्रकरणी आरोपींच्या वकीलांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर जळगाव मनपाचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांची सरतपासणी संपली आहे. मात्र त्यांची उलटतपासणी व अन्य सर्व साक्षीदारांचे जवाब झाल्यानंतर नोंदविण्याची मागणी करणारा आरोपी पक्षाचा अर्ज धुळे विशेष न्यायालयाने फेटाळला़ होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

गेडाम यांच्या नुकसान भरपाईच्या अर्जावरही बुधवारी कामकाज झाले. त्यात आरोपींच्या वकीलांनी गेडाम यांचा अर्ज बाद करा अशी मागणी केली आहे. याबद्दल सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून १७ मार्चला निर्णय होणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. या प्रकरणात धुळ्याच्या न्यायालयात दहा लाखांची नुकसान भरपाई मागणारा अर्ज प्रवीण गेडाम यांनी केला होता. यावर बुधवारी आरोपी पक्षाच्यावतीने अॅड. जितेंद्र निळे, अॅड. संजिव वाणी, अॅड. प्रकाश पाटील, अॅड. पंकज पाटील यांच्यासह अन्य वकीलांनी आपला खुलासा सादर केला.

यात अॅड. निळे यांनी गेडाम हे विशेष न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला़. नाशिक महानगरपालिकेत गेडाम यांच्यासमवेत अनेक अधिकारी आहेत. असे असताना केवळ धुळ्यास आल्याने नाशिकच्या जनतेचे मोठे नुकसान झाले, असे म्हणून नुकसान भरपाई मागणे योग्य नाही़. त्यांनी चुकीच्या पद्धतीने दहा लाखांची मागणी करणे कायद्याला धरून नाही़. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी वकीलांनी केली आहे. आता यावर सरकार पक्षाचे म्हणणे १७ मार्चला ऐकल्यानंतर निर्णय घेणार आहे.

सहा याचिकांवर ११ मार्चला निर्णय

दरम्यान उच्च न्यायालयात गेडाम यांची उलटतपासणी ही खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षीनंतर घेण्याची मागणी करणारा अर्ज दाखल झाला आहे. यात सरकार पक्षाचे वकील प्रवीण चव्हाण यांनी ११ मार्चपर्यंत बाजू मांडण्याची मुदत मागितली़ आहे. यावर आरोपी पक्षाच्या वकीलांनी धुळ्याच्या न्यायालयात सरकार पक्ष उलटतपासणी घेण्यासाठी हरकत घेत आहे. अशा स्थितीत सरकार पक्षच उच्च न्यायालयात मुदत मागत आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर न्यायालयाने सरकार पक्षाला मुदतीची माहिती द्यावी. तसेच उलटतपासणी घेण्यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहुनच काम करण्याचे सांगितले आहे. ११ मार्च यादिवशी उलटतपासणीस आव्हान देणाऱ्या सहा याचिकांवर अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. दरम्यान आरोपी पक्षाच्या वकीलांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाची माहिती बुधवारी धुळे न्यायालयात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपाकडून दूषित पाणीपुरवठा

$
0
0

शिवसेनेची धुळे महापालिकेकडे तक्रार; आंदोलन छेडण्याचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात गेल्या आठवड्याभरापासून दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार शिवसेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष हिलाल माळी यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीला शहराच्या साठ टक्के भागात पाणीपुरवठा हा तापी नदीतून केला जातो. त्यासाठी बाभळे जलशुद्धीकरण केंद्रातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
या प्रकाराबाबत शिवसेनेकडे नागरिकांनी तक्रार केली होती. तरी मनपाने हा दूषित पाणीपुरवठा बंद करत चांगले पाणी द्यावे अन्यथा शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. शहराला तापी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या आठवड्याभरापासून शहराला दूषित व पिवळसर पुरवठा करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पोटदुखी, मळमळणे, जुलाब आदीचा त्रास जाणवत होता. तसेच पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची तक्रार नागरिकांनी शिवसेनेकडे केली आहे. यावर सेनेचे जिल्हाप्रमुख माळी व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त भोसले यांना निवेदनाद्वारे तो थांबविण्याचे सांगण्यात आले. यासोबतच शहरात ठिकठिकाणी पाणी गळती थांबवावी. तर काही ठिकाणी जास्त दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.


नकाणे तलावाच्या पाणीपातळीत घट

शहरातील चाळीस टक्के भागात शहरालगत असलेल्या नकाणे तलावातून केला जातो. या तलावाच्या पाण्याची पातळी सध्या खाली गेली असून सद्यस्थितीत या तलावात १३० एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा मे अखेरपर्यंत पुरेल, असा दावा मनपा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. धुळे शहरात तापी योजना, नकाणे तलाव व हरणमाळ तलावातून पाणीपुरवठा होतो. त्यात नकाणे तलावात कमी जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतून शहरासाठी पाणी उचलण्यात येत आहे. तर नकाणे तलावाच्या पाण्याच्या वापर बंद करण्यात केला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नकाण्यातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या हरणमाळ तलावाची क्षमता ४५० एमसीएफटी आहे. परंतु या तलावात सध्या केवळ मृतपाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाची महापौरांकडून झाडाझडती

$
0
0

डोअर टू डोअर करणार सर्व्हे; ब्लॅकस्पॉट बंद करण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूसह साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी गुरूवारी वैद्यकीय व आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांना रामायण बंगल्यावर बोलावित तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शहरात धूर फवारणी वाढविण्यासह साथीच्या आजारांची व्याप्ती जाणून घेण्यासाठी डोअर टू डोअर सर्व्हे करण्याचेही आदेश दिले आहे.

अनेक दिवसापासून शहरातील डासांची संख्या झपाट्याने वाढल्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. स्वाईन फ्ल्यूचे तीन रुग्ण शहरात नव्याने आढळून आहे. धूर फवारणी शहरात कुठेही होत नसल्याने डासांची संख्या नियंत्रित राहत नाही. त्यामुळे साथीचे आजार वाढले असू मलेरिया, फ्ल्यू, तापाचे रुग्ण घरोघरी आढळून येत आहेत. तर दुसरीकडे वैद्यकीय व आरोग्य विभागात डास नियंत्रित करण्याबाबत अनास्था असून दोन्ही विभाग झोपल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे महापौर मुर्तडक यांनी गुरूवारी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, वैद्यकीय अधीक्षक बी.आर. गायकवाड यांच्यासह विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात महापौरांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश दिले. शहरात धूर फरावरणी वाढवण्यासाठी पेस्ट कंट्रोलचा विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले. ठेकेदाराला सहा महिने मुदतवाढ देवून ठेकेदाराचे काम दिसत नसल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्यबाबत नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे वाढल्या आहेत. शहरात सुमारे दीडशे ब्लॅक स्पॉट आहेत. तेथे डासांची संख्या वाढत आहे. हे ब्लॅक स्पॉट बंद करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

आजारांबाबत जनजागृती

नागरिकांच्या आरोग्यासह साथीच्या आजारांबाबत डोअर टू डोअर भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेण्याचे आदेश महापौरांनी वैद्यकीय विभागाला दिले. त्यामुळे वैद्यकीय विभाग आता घरोघरी जावून साथीच्या रुग्णांची संख्या जाणून घेण्यासह प्रतिबंधात्मक औषधींचे वितरण आणि आजारांबाबत जनजागृती करणार आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना दररोज विभागाच्या वतीने केलेल्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या आहेत.

पेस्ट कंट्रोल कागदावरच

शहरातील डासांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने भाजपच्या एका बड्या नेत्याला पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर राजकीय अभय असल्याने ठेकेदारामार्फत पेस्ट कंट्रोल कागदावरच केले जात असल्याचे अधिकारीच खासगीत सांगत आहेत. संबंधित ठेकेदाराला आतापर्यंत १५ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी आहेत. परंतु, त्यांनाच मुदतवाढ दिली जात आहे. संबंधित ठेकेदार कामाच्या बदल्यात अन्यत्र काम करून मनसेला अडचणीत आणत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम सुरू आहे.

महाआरोग्य अभियान

महापालिकेच्या वतीने १५ मार्चपासून शहरात महाआरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे.या आरोग्य अभियानात गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी केली जाणार आहे. अभियान १५ दिवस चालणार आहे. सोबतच या १५ दिवसात महापालिकेच्या वतीने आरोग्याबाबत जनजागृती मोहिमेही राबविली जाणार आहे. डासांच्या उत्पत्ती स्थळांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिडासंस्कृतीला मिळणार चालना

$
0
0

जेलरोडमध्ये उभारले जाणार सहा कोटींचे संकुल

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील प्रभाग ३२ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सहा कोटीचा निधी मंजूर केला असून महापालिका ७५ लाखांची तरतूद करणार आहे. क्रिडासंकुलाचे भूमिपूजन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. ११) सकाळी अकराला होणार आहे.

क्रिडासंकुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने केंद्र सरकारी योजनाचा थेट लाभ मिळणार आहे. केंद्राच्या शहरी क्रिडासंकुल योजनेतून अशा प्रकारचा निधी मिळण्याचे देशातील हे पहिलेच पहिलेच उदाहरण असावे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेतर्फे राज्य व केंद्र सरकारकडे क्रिडासंकुलासाठी प्रस्ताव पाठवला होता. खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक शैलेश ढगे यांनी संकुलासाठी प्रयत्न केले होते. बांधकाम उपअभियंता निलेश साळी, जिल्हा क्रिडाधिकारी संजय सबनीस यांनीही प्रकल्पासाठी मदत केली. सहा कोटी निधी मंजूरीचे पत्र गोडसे यांना केंद्राकडून मिळाले आहे.

असे असेल क्रिडासंकुल

सायखेडा रोडवरील आढावनगर भागातील सर्वे क्रमांक ४९, ६२ व ६८ मध्ये क्रिडासंकुल उभारले जाणार आहे. त्यात लहान मुलांसाठी स्वतंत्र मैदान असेल. संकुलाचा आकार ४० बाय ४० मीटरचा असेल. त्यात व्हॉलिबॉल व टेबल टेनिसचे प्रत्येकी दोन कोर्ट, कॅरम, बुद्धीबळसाठी स्वतंत्र रुम, पुरुष व महिलांसाठी व्यायामशाळा, पाचशे मीटरचा जॉगिंग तर २०० मीटरचा काँक्रिटचा ट्रॅक असेल. ३४ मीटर बाय ३ मीटर लांबीचे सिंथेटीक कोर्ट असेल. संकुलात प्रशिक्षक व कर्मचारी नियुक्त केले जातील.

मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेलेल्या युवापिढीला क्रिडासंकुलामुळे नवी दिशा मिळेल, क्रिडासंस्कृती वाढेल. जेलरोडच नव्हे तर नाशिकरोड परिसरातील क्रिडाप्रेमींना संकुलाचा लाभ होईल.

- शैलेश ढगे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायदंडाधिकारी परीक्षेत जिल्ह्यातील सहा उत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा जणांना यश मिळाले आहे. शहरातील अॅड. सुरेखा अशोक कदम-मोरे यांचाही त्यात समावेश आहे. राज्यभरातील २२७ जणांची निवड झाली असून आज, गुरुवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीपदाच्या २२७ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात आली होती. या पदासाठी राज्यातून सुमारे २५ हजार वकिलांनी परिक्षा दिली होती. त्यातील २ हजार ३८० वकिल मुख्य परीक्षेस पात्र ठरले होते. ५४७ वकिलांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर आज जाहिर झालेल्या निकालात २२७ वकिलांची न्यायदंडाधिकारीपदासाठी निवड झाली. २५० पैकी १६७ गुण मिळवत अॅड. वर्षा झेंडे या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नाशिकच्या अॅड. सुरेखा कदम-मोरे यांनी १५६ गुण मिळवत अठरावा क्रमांक पटकावला. मनमाडचे अॅड. विशाल देशमुख, सिन्नरचे अॅड. वासिम शेख यांच्यासह अॅड. पंडित देवरे, अॅड. बाळासाहेब पवार आणि अॅड. दिप्ती सरनाईक यांची देखील न्यायदंडाधिकारीपदी निवड झाली आहे. या यशाबाबत नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, अॅड. अविनाश भिडे, सरकारी वकिल अॅड. राजेंद्र घुमरे यांच्यासह इतर वकिलांनी निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारावलेल्या शब्दांत भिजला ‘गोदावरी गौरव’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रोत्यांच्या प्रचंड कडाडणाऱ्या टाळ्या... प्रत्येक पुरस्कारागणिक होणारा हर्षोल्हास...भारावलेले शब्द अन् ओथंबलेल्या भावना असा माहोल गोदावरी गौरव पुरस्कार सोहळ्यात तयार झाला होता. लोकसेवा, विज्ञान, वास्तुशिल्प, नृत्य, चित्रपट या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना 'कृतज्ञतेचा नमस्कार' करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन होते.

यावेळी व्यासपीठावर पुरस्कारमूर्ती चेतना सिन्हा, डॉ. शशिकुमार चित्रे, आर्किटेक्ट बाळकृष्ण दोशी, डॉ. कनक रेळे, नाना पाटेकर, डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन यांच्यासह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह मकरंद हिंगणे व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कर्णिक यांच्या हस्ते गोदागौरव पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मधु मंगेश कर्णिक म्हणाले की, जीवनाला उन्नत करणाऱ्या क्षेत्रात कृतज्ञतेचा नमस्कार करण्यासाठी हे पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे दिले जातात. महाराष्ट्राचे केवढे भाग्य की तात्यासाहेब त्याच्या वाट्याला आले. चेतना सिन्हा म्हणाल्या की, हा पुरस्कार मी माणदेशी स्त्रीयांना अर्पण करतेय. त्या महिलांच्या टॅलेंटमुळेच आज मी उभी आहे. कनक रेळे यावेळी म्हणाल्या की, नृत्यात शिष्यवृत्ती देण्याचा प्रतिष्ठानचा विचार असेल तर नालंदा विद्यापीठातर्फे लागणारी सर्व मदत मी करेल. डॉ. शशिकुमार चित्रे यांनी तात्यासाहेब महाराष्ट्राचे कालिदास होते. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले ते एक रत्न होते, असा उल्लेख केला. बाळकृष्ण दोशी यांनी, काही वेळेला चमत्कार होतात जसा आज झाला आहे असा पुरस्काराचा उल्लेख केला. महाजन बंधूंनी या पुरस्काराची २१ हजार रूपये रक्कम नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनसाठी अर्पण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांचा सत्कार प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. प्रारंभी मकरंद हिंगणे यांनी संगीतबध्द केलेले 'प्रकाशदाता जीवनदाता हे सविता उदयाचली ये' हे गीत सादर करण्यात आले. या गीताचा ट्रॅक स्वरांजय धुमाळ व आनंद अत्रे यांनी बनवला होता.

संगीत क्षेत्रासाठी १ लाखाची शिष्यवृत्ती

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ग्रंथांच्या अभ्यासासाठी १ लाख रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. याच पार्श्वभूमीवर संग‌ीत विषयाचा अभ्यास करण्यासाठी १ लाखाची शिष्यवृत्ती लवकरच देण्यात येणार असल्याचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी जाहीर केले. या शिष्यवृत्तीसाठी एक समितीही गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही हिंगणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ वादातून टोळक्याची हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ वादातून शिवाजीनगर परिसरातील इंदिरा गांधी उद्यानासमोर दोन गटात मंगळवारी रात्री हाणामारी झाली. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पिंटू हिरा सिंग (२१) हा त्याच्या घरासमोर दुचाकी लावत असतांना संशयित मयुर गजानन वांद्रकर, सागर संजय पाटील आणि एका संशयिताकडे पिटुंने पाहिले. आमच्याकडे का पाहतो, असे म्हणून पिटूंसह त्याचा भाऊ ब्रिजभुषण व धर्मेद्र यांना बेदम मारहाण केली. त्यात दगड, विटा आणि लाकडी फळीने मारहाण केल्याने तिघांना गंभीर दुखापत झाली. पिंटू सिंग याने वांद्रकर, पाटील आणि अल्पवयीन मुलाविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल केली आहे. तर अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पिंटू सिंग, ब्रिजभूषण सिंग आणि धर्मेंद्र सिंग यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट खात्याद्वारे फसवणूक

दुसऱ्या व्यक्तीची कागदपत्रे देत बँकेत खाते तयार करून त्यावर आर्थिक व्यवहार करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील एका बँकेत घडला. याप्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्याने संशयिताविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पेठरोडवरील दत्तात्रय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नितीन गणेश शेळके याने १३ जुलै २०१५ रोजी पंचवटीतील अभ्युदय को. ऑप बँकेत मोहन रामा अडाळे या नावाने खाते उघडले होते. खाते उघडण्यासाठी संशयित शेळकेने अडाळे याच्या नावे बनावट कागदपत्रे दिले होते. ही बाब बँकेचे शाखाधिकारी चंद्रभूषण कपिलदेव त्रिपाठी यांच्या लक्षात आली. त्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना राहुरी रोडवरील पालवे वस्तीसमोर घडली. सुरेश रामचंद्र आव्हाड (५५) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुरी गावत राहणारे आव्हाड दुचाकीने (एमएच १५ एएफ १५२) जात असतांना ती स्लीप झाली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चासत्रातही ‘मुक्त’ सत्काराचा घाट

$
0
0

नियोजित कामात आपला कार्यभाग साधून घेणे अशी वृत्ती आजकाल फोफावताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय मुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमात येत आहे. मुक्त विद्यापीठातर्फे १२ मार्चपासून एक राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे विद्याशाखा यांच्यावतीने असलेल्या या चर्चासत्रात विशाखा व रुक्मिणी पुरस्काराचे वितरणही करून घेण्यात येणार आहे. मुळात चर्चासत्रे ही त्या विषयाच्या प्रचार प्रसारासाठी असताना मध्येच पुरस्कार वितरण कशासाठी असा सवाल उपस्थित होतो.

चर्चासत्राच्या प्रथम सत्रातच हे कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत. हे कमी झाले की काय चर्चासत्राच्या प्रथम सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कारही करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी होणाऱ्या चर्चासत्रापासून व्याख्याने ठेवण्यात आली आहेत. मुक्त विद्यापीठाची ही कशी पध्दती आहे, यावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

पुढाऱ्यांची हुजरेगिरी कशासाठी? मुक्त विद्यापीठाच्या कार्यपध्दतीवर अनेक आक्षेप आहेत. अशा परिस्थितीत सध्या राष्ट्रीय चर्चासत्रात ठेवण्यात आलेल्या सत्काराचा मुद्दा गाजतोय. मुक्त शिक्षणपध्दती व अभ्यासक्रम देणाऱ्या एका विद्यापीठाने अशाप्रकारे पुढाऱ्यांचे उतराई होण्याचा पहिलाच प्रसंग असून कुलगुरूंनी तरी या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


`आप`ने वळवली अंडरपासची वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वादातीत इंदिरानगर अंडरपास येथील गोविंदनगरच्या दिशेने येणारी वाहतूक हायवेकडे वळवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या चौघा कार्यकर्त्यांना मुंबई नाका पोलिसांनी संध्याकाळी ताब्यात घेतले. तुमचा हेतू चांगला असला तरी वाहतूक नियोजनाचे पोलिसांचे काम पोलिसांनाच करू द्या, असा सज्जड इशारा देऊन त्यांना अर्धा तासाने सोडून देण्यात आले.

सततची वाहतूक कोंडी आणि अपघात यामुळे वादाच्या व राजकारणाच्या भोवऱ्यात सापडलेला इंदिरानगर अंडरपास शहर पोलिसांनी १२ जुलै २०१५ रोजी बंद केला. अंडरपास बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी काही प्रमाणात विरोध केला. मात्र, येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूरच झाली. दुचाकीवरून थोड दूरून जाणाऱ्या वाहनचालकांना हे सोयीचे होते. मात्र, इंदिरानगर अंडरपास बंद करण्याच्या पोलिसांच्या निर्णयावरून काही महिन्यांपासून राजकारण सुरू झाले. नागरिकांची मागणी या नावाखाली पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी पोहचल्या. शेवटी, हा अंडरपास ८ मार्च रोजी रात्री सुरू करण्यात आला. आता, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी गत झाली आहे. हा अंडरपास एकेरी केला तर वाहतूक कोंडी होणार नाही, असा दावा करीत आम आदमी पक्षाचे जसबीर सिंग व त्यांचा चौघा साथिदारांनी आज, गुरूवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास अंडरपास गाठले. तिथे फ्लेक्स बोर्ड हातात घेऊन त्यांनी गोविंदनगरकडून येणारी वाहतूक प्रकाश पेट्रोल पंपाच्या दिशेने वळवली. याबाबतची माहिती समजताच मुंबई नाका पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हा अंडरपास सुरू झाल्याने अपघाताच्या घटना घडू शकतात. वाहतूक कोंडीची समस्या सुरू झाली असून, वाहतूक पोलिस मात्र इंदिरानगर अंडरपासला टाळू लागल्याचे ​दिसते. राजकीय निर्णयाचे पडसाद पोलिस वर्तुळात पडत असून, त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना काय फटका बसू शकतो, अशी चर्चा झडते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यंदा कर्तव्य’साठी दोन महिने वेटिंग

$
0
0

लग्नासारखा मोठा सोहळा मुहूर्तावरच पार पडावा, यासाठी बहुतांश लोकं आग्रही असतात. हा सोहळा कोणत्याही विघ्नांशिवाय पार पडावा यासाठी मुहूर्त शोधला जातो. जोडप्याच्या वैवाहिक जोडप्याच्या सुखी भविष्यासाठी शुक्र या ग्रहाचे पाठबळ लग्नात महत्त्वाचे मानले जाते. वंशवृद्धीच्या दृष्टीनेही हे स्थान मोठे असते. याच अनुषंगाने शुक्राच्या अस्ताचा काळ लग्नासाठी योग्य मानला जात नाही. मे, जून या काळात शुक्राचा अस्त होणार नसल्याने या काळात लग्नतिथीमध्ये खंड पडला आहे. हा काळ ६ जुलैपर्यंत असाच राहणार असून त्यानंतर शुक्राचे पाठबळ जोडप्यांना लाभणार आहे. लग्नाबरोबरच मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश या शुभकार्येही या काळात केली जाणार नाहीत. या काळात मुहूर्त नसल्यामुळे एप्रिलमधील लग्नतिथींमध्ये लग्न पार पाडण्यास प्राधान्य असणार आहे.

लग्नासाठी इच्छुक वर आणि वधूसाठी शुक्राचे पाठबळ अतिशय महत्त्वाचे असते. विवाह समारंभाचा मुहूर्त काढताना याचा विचार प्रामुख्याने केला जातो. मे, जूनमध्ये शुक्राचा अस्त असल्याने थेट जुलैमध्ये पूरक लग्नतिथी उपलब्ध होणार आहेत. सुमारे दोन महिने लग्नतिथी नसतील. - रत्नाकर संत, पुरोहित

एप्रिलमध्ये मंगल कार्यालये फुल्ल मे, जूनमधील शुक्राच्या अस्तामुळे मुहूर्त नसल्याने एप्रिलमध्ये लग्न पार पाडण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. एप्रिलमध्ये १२ ते १३ मुहूर्त आहेत. या सर्व तारखांना शेकडो लग्न पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी या महिन्यात सर्वच मंगल कार्यालये, लॉन्स बुक झाल्याचे सांगितले जात आहे. पुढचे सव्वा दोन महिने थांबण्याऐवजी याच काळात लग्न उरकण्याकडे अनेकांचा कल असल्याचे यावरून दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, शहर तापतंय!

$
0
0

जिल्ह्यातही पारा चढाच; मालेगाव तालुक्यात सर्वाधिक तापमान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पारा ३४ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद मालेगाव तालुक्यात झाली असून, त्याची तीव्रता ३९ अंश सेल्सिअस इतकी आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. सकाळच्या हवेत गारवा, तर दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अनुभवायला मिळत आहे. थंडी कमी झाल्याने सकाळी बाहेर फिरणाऱ्यांची गर्दी वाढली असून सकाळच्या गारव्याचा आनंद घेतांना लोक दिसत आहे. त्याचप्रमाणे रात्री देखील वातावरणात गारवा पसरत असून लोक फिरताना दिसत आहेत.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. १५ मार्च पर्यंत राज्यात हवामान कोरडे रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता घरातही जाणवत असून, तहानेने घसा कोरडा पडतो आहे. जिवाची लाही होत असताना कितीही पाणी प्यायले तरी तहान काही केल्या भागत नाही. बदलत्या वातावरणाचा परिणाम होत असून, आजारांमध्ये वाढ होऊ नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

थंड पेयांच्या विक्रीत वाढ

उन्हाळ्याची चाहुल लागताच थंडपेयांच्या विक्रीत वाढ झाली आहे. नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत असल्याने नागरिक पाण्याच्या बाटल्या घरातून घेऊन निघतांना दिसत आहेत.

मुलांना, ज्येष्ठांना सांभाळा!

शहराचा पारा वाढतच असून, नाशिककरांना उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागणार आहे. लहान मुले आणि वृद्धांसाठी हा ऋतू विशेष देखभालीचा आहे. दोघांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. पाणी जास्त प्यावे आणि साधे जेवण करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कमाल तापमान किमान तापमान

५ मार्च ३४.८ १६.३

६ मार्च ३२.९ १४.५

७ मार्च ३३.५ १४.८

८ मार्च ३४.४ १५.४

९ मार्च ३४.९ १६.०

१० मार्च ३४.९ १४.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन्व्हेस्टिगेशन फंडा’ने तपासाला बूस्ट?

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करताना पोलिस यंत्रणेला काही आवश्यक खर्च करावा लागतो. त्यासाठी गृह विभाग महिन्याकाठी पैशांची तरतूद करते. मात्र, प्रत्यक्ष तपासाधिकाऱ्यांपर्यंत हे पैसे वेळेवर पोहचत नाहीत. खर्चासाठी पैसे नसलेले तपासाधिकारी तपासात चालढकल करतात. सुदैवाने जानेवारी महिन्यापासून हा निधी सर्वच पोलिस स्टेशन, क्राईम ब्रँच तसेच सहायक पोलिस आयुक्त कार्यालयांना देण्यात आला आहे. यामुळे तपासाचा दर्जा सुधारणार काय, अशी चर्चा पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे.

एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची पोलिस स्टेशनमध्ये नोंद होऊन तपास होणे महत्वाचे असते. गुन्ह्याचा तपास सखोल झाला असेल तर सहाजिकच गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण वाढू शकते. गुन्ह्याचा तपास करताना तपासधिकाऱ्याला कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. बाहेरगावी तपासासाठी जाणे, अत्यावश्यक प्रसंगी वाहने भाडेतत्वावर घेणे, तपासासाठी आरोपी किंवा साक्षीदाराला घटनास्थळी नेणे, त्यांच्या जेवणाची किंवा मुक्कामाची व्यवस्था करणे इत्यादी कामांसाठी पैसा खर्च होतो. यापार्श्वभूमीवर इन्व्हेस्टिगेशन फंड म्हणून गृह विभाग या पैशांची तरतूद करतो. पोलिस स्टेशन, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपायुक्त, क्राईम ब्रँच, एटीएस तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हा निधी देण्यात येतो. याबाबत सूत्रांनी सांगितले, की जानेवारीपासून इन्व्हेस्टिगेशन फंड नियमित सुरू झाला आहे. शहरातील सर्वच पोलिस स्टेशन, क्राईम ब्रँच व एसीपी कार्यालयांना फंड मिळाला आहे. इन्व्हेस्टिगेशनसाठी तपासाधिकाऱ्यांकडे पुरेसा पैसे नसेल तर तो हा भार फिर्यादीच्या गळ्यात मारतो. अगदी झेरॉक्स काढण्यासाठीही फिर्यादींनाच सांगण्यात येते. तपासाधिकाऱ्याकडे अनेक गुन्ह्यांच्या तपासाचे काम सोपवलेले असते. तपास करणारे अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने स्व-खर्चाने काम करणे कदापी शक्य नाही. त्यामुळे हा निधी नक्कीच फायदा देणारा ठरेल, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

अशी होते विभागणी

शहराचा विचार करता ११ हजार २५० रुपयांप्रमाणे १३ पोलिस स्टेशनला हा निधी देण्यात येतो आहे. चार सहायक पोलिस आयुक्त कार्यालयांना प्रत्येकी साडेसात हजार, चार पोलिस उपायुक्त कार्यालयांना प्रत्येकी ११ हजार २५०, क्राईम ब्रँचच्या तीन युनिटसाठी प्रत्येकी ११ हजार २५० रूपये इतका फंड देण्यात येतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमितीच्या पेपरला १० कॉपीबहाद्दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा मंडळाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गुरुवारी भूमिती विषयाचा पेपर पार पडला. नाशिक विभागात १० कॉपीबहाद्दर पकडण्यात आले. त्यापैकी ७ जळगावमध्ये, तर धुळे जिल्ह्यात ३ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. बीजगणिताच्या पेपरमधील प्रश्नांमुळे काहीसा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये झाला होता. त्यामुळे भूमितीच्या पेपरकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष होते.

बीजगणिताच्या ४० मार्कांच्या पेपरला प्रश्नपत्रिकेतील चौथ्या व पाचव्या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ झाला होता. हे दोन्ही प्रश्न १० मार्कांसाठी विचारण्यात आले होते. मात्र हे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. पालकांमध्येही याबाबत मंडळाने लक्ष घालून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या गोंधळाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आली नसल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे. तर गणिताच्या काही शिक्षकांच्या मते, अभ्यासक्रमावर आधारितच हे प्रश्न होते. केवळ पुस्तकात दिल्याप्रमाणे हे प्रश्न नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविता आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

--

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आले अशी कोणतीही तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही. असा काही घोळ झाला आहे, असे कानावरही आलेले नसल्याने त्यात तथ्य वाटत नाही.

राजेंद्र मारवाडी

बोर्डाचे विभागीय सचिव

--

बीजगणिताचे पेपरची शहानिशा करण्यासाठी गणिताच्या शिक्षकांना आम्ही सांगितले आहे. त्यांचा रिपोर्ट लवकरच आम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार खरेच पेपरमध्ये त्रुटी आढळल्यास बोर्डाला आम्ही निवेदन देऊ. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. - नरेंद्र ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images