Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुर्गरक्षकांकडून किल्ले तोरणागड संवर्धन मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तोरण असलेला प्रचंडगड म्हणजे तोरणागडावर गडसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्यातून संपूर्ण गडाची स्वच्छता करून तेथे माहितीफलकदेखील लावण्यात आले. या मोहिमेत महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून दुर्गरक्षक सहभागी झाले होते. या मोहिमेत गडावर असलेला कचरा दुर्गरक्षकांनी जमा केला आणि त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या, त्या सर्व जमा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली, तसेच गड-किल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी आवाहन करणारे फलकदेखील लावले. तसेच, ढासळेल्या अवस्थेत असलेल्या बुरुजाची दुर्गरक्षकांकडून डागडुजी करून योग्य त्या ठिकाणी नामफलकदेखील लावण्यात आले.

या वेळी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व युवकांना या किल्याविषयी माहिती देऊन गडकिल्ल्यांचे पवित्र राखण्यासाठी अशा मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदराव जाधव यांनी दिली. या मोहिमेत ठाणे जिल्हाप्रमुख कुलदीपराव जाधव, अमोल पवार, प्रणय चोणकर, विकी चव्हाण, नरेश चव्हाण, ओमकार पवार, पुणे जिल्हाप्रमुख ओंकार मुळे, संतोष तापकीर, नवनाथ पायगुडे, राहुल गोरे, नाशिक जिल्हा संघटक ज्ञानेश रसाळ, तुषार धात्रक, धाराशिव जिल्हाप्रमुख प्राणजित गवंडी, तसेच पुणे, नाशिक, सातारा, नवी मुंबई, ठाणे, रोहा, अहमदनगर येथून उत्साही दुर्गरक्षक मोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लॉ ‘सीईटी’साठी आज अंतिम मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लॉ तथा कायदा विद्याशाखेच्या तीन व पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) अर्ज करण्याची वाढविण्यात आलेली मुदत आज, शुक्रवारी (दि. 3) संपणार आहे. या शाखेत प्रवेशेच्छुक मात्र अद्याप परीक्षेसाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

बारावी व पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. राज्य शासनाने विधी शाखेच्या तीन व पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा प्रथमच राज्यात लॉ कॉलेजेसमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची शेवटची तारीख दि. २५ मे होती. परंतु, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्ज करण्याची तारीख ३ जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतर मात्र अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही सामायिक परीक्षा कक्षाने म्हटले आहे.

अर्ज भरल्यानंतर परीक्षेचे ऑनलाइन प्रवेशपत्र ९ जून २०१६ पासून संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज www.dhepune.gov.in अथवा http://www.mahacet.org या संकेतस्थळावर भरावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गुन्ह्यांनंतर आता मोक्क्का

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिकः शहरातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याचा (मोक्का) प्रभावी वापर करण्याची रणनिती आखली आहे. यापुढे एखाद्या टोळीने दुसरा गुन्हा केल्याचे समोर येताच त्यांच्याविरोधात मोक्का कलमाचा वापर केला जाणार आहे. यापूर्वीच्या दाखल गुन्ह्यांमधून जामीन घेऊन बाहेर पडलेल्या संशयितांवर लक्ष देण्यासाठी यंत्रणा विकसीत केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेले गुन्हेगार उजळ माथ्याने शहरात वास्तव्य करतात. गंभीर समजल्या जाणाऱ्या गुन्ह्यांतसुध्दा जामीन मिळतो, अशी धारणा जनमाणसात रूजू पाहत आहे. यामुळे नव्या गुन्हेगारांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळते. मोक्कासारख्या गुन्ह्यात जामीन मिळवून उच्छाद मांडणाऱ्या अशाच एका टोळीने सुनील वाघ नावाच्या २५ वर्षीय युवकाचा भर रस्त्यात खून केला. या खुनाच्या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था कोणत्या स्तरावर गेली, याची प्रचिती आली. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे झालेल्या बैठकीत गुन्हेगार, त्याची कार्यपध्दत, गुन्हेगारी टोळ्या, त्यांचे सध्याचे अस्तित्व यावर काही दिवसांपूर्वी चर्चा झाली. एवढेच नव्हे तर संघटीतपणे एखाद्या टोळीने दोन गुन्हे केल्याचे समोर आले तर लागलीच त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी, असे निर्देश पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिलेत. त्यातच अंबड परिसरातील कुख्यात ट‌िप्पर गँगच्या काही सदस्यांनी फळ विक्रेत्यांकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी तपास करून गणेश कावळेसह अन्य चौघा जणांना ताब्यात घेतले. वसीम व शह‌िद्या अशी नावे असलेल्या अन्य दोघांना काल, गुरूवारी अटक झाली. या टोळीतील सदस्यांवर यापूर्वीच मोक्का लावण्यात आला होता. मात्र, जाम‌िनावर बाहेर पडलेल्या संशयितांचे उद्योग सुरूच होते. आता, या संशयितांचा पहिल्या गुन्ह्यातील जामीन रद्द करायचा आणि मोक्का कलमानुसार दुसरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टोळ्यांचे ऑपरेटरही रडारवर

शहरातील अनेक सराईत गुन्हेगारांच्या मागे राजकारणी किंवा पांढरपेशी समाजाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे आजवर समोर आले आहे. मात्र, या व्यक्तींविरोधात सबळ पुरावे समोर येत नसल्याने त्यांचे फावते. यापुढे, अशा सराईत गुन्हेगारांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पांढरपेशी व्यक्तींना रडारवर घेण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर टिप्पर गँगला मदत करणाऱ्या काही राजकीय व्यक्तींची माहिती पोलिस संकलीत करीत आहेत.

अनेक गँगवर कारवाई शक्य

मोक्का लावण्यासाठी त्या टोळीने दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे केल्याची नोंद पोलिस स्टेशनमध्ये झालेली पाहिजे. तसेच त्या गुन्ह्यात संशयितांना किमान तीन वर्ष शिक्षा होणे आवश्यक आहे. मोक्का कलमाचा वापर करण्यासाठी हा नियम अनिवार्य असून शहरातील अनेक गँगवर या कलमानुसार कारवाई करणे शक्य आहे. मोक्क्का कलमाचा वापर झाल्यास संशयिताची रवानगी दीर्घकाळापर्यंत जेलमध्ये होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांतांनीच ‘गुण’ उधळले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नुकत्याच झालेल्या पोलिसपाटील भरतीत काही प्रांतांनी काही उमेदवारांवर गुण उधळल्याची बाब समोर आली आहे. या भरतीप्रक्रियेच्या चौकशीचा अहवाल अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून, संबंधितांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी या भरतीप्रक्रियेत नियम डावलण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

निफाड व सिन्नर तालुक्यात पोलिसपाटील परीक्षेत तीन उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने गुण दिल्याची माहिती समोर आल्यामुळे महसूल विभागात खळबळ निर्माण झाली आहे. या दोन तालुक्यांत या भरतीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे या गुणांची उधळण कशासाठी केली, याचा शोध आता घेतला जाणार आहे. दरम्यान, काही उमेदवारांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे, तर जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी या प्रकरणात काही गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसपाटील भरतीप्रकरणी २० उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांना दिले होते.

या चौकशीचा अहवाल गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असून, त्याची माहिती आता समोर आली आहे. अहवालात २० पैकी तीन तक्रारींत गुण देण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचेही आढळले आहे, तर १७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. या भरतीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सिन्नर व निफाड तालुक्यात पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या व्हिडीओ क्लीपही व्हॉट्सअॅपवर अपलोड करण्यात आल्यामुळे हे भरती प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीत वय जास्त असणे, स्थानिक रहिवासी नसणे, एमएस- सीआटी परीक्षा दिलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत प्रकल्पात ६० कोटींचा ‘कचरा’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या ६० कोटींच्या खत प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा ठपका अखेरीस निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खत प्रकल्पाचे नियोजन योग्य न केल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसल्याने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पवार यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. पवार यांनी प्रकल्पाच्या अपयशासंदर्भात समाधानकारक खुलासा न केल्याने आयुक्तांनी थेट चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साठ कोटींच्या मशीनरी खरेदीचे गौडबंगाल नाशिककरांसमोर येण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सन २००७ पाथर्डी येथे खत प्रकल्प उभारण्यात आला होता. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत ६० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा केला जाणार होता; परंतु आर. के. पवार यांनी या प्रकल्पाचा डीपीआर वेळेत सादर केला नाही. तसेच महासभेची मंजुरीही घेतली नाही. मनुष्यबळ नसतानाही पवार यांनी तब्बल ६० कोटींची यंत्रसामग्री खरेदी केली. प्रकल्प २०१० मध्ये पूर्ण होऊनही तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. कंपोस्टनिर्मिती व विद्युतनिर्मीतीही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही. प्रकल्पाचे व्यवस्थापन पवार यांनी चोख न केल्याने हा तो पूर्णक्षमतेने सुरू होऊ शकला नाही, तसेच महासभेची मान्यता नसल्याने केंद्र सरकारने प्रकल्पाचा खर्च दिला नाही. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले. मशीनरी खरेदी करून सहा वर्षे लोटली तरी, ती सुरू करण्यात त्यांना अपयश आले.

खत प्रकल्पाच्या संपूर्ण मशीनरी खरेदीत भ्रष्टाचार झाला असून, पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. त्यामुळे आयुक्तांनी पवार यांच्या निवृत्तीच्या एक दिवस अगोदर ३० जानेवारीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला पवार यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे आयुक्तांनी त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महासभेवर चौकशीचा प्रस्तावही ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर पवार यांच्या अडचणी वाढल्या असून, निवृत्तीनंतरच्या सर्व सुविधा थांबविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरचे उद्योग बंदच्या मार्गावर

$
0
0

Tushar.Pawar@timesgroup.com

नाशिक ः पाण्याच्या टंचाईमुळे सिन्नर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या वसाहतीतील पाण्याचा पुरवठा १४ दशलक्ष लिटरवरून थेट १ दशलक्ष लिटरवर आला आहे. त्यामुळे जिंदालसह अन्य कंपन्यांनी त्यांचे उत्पादन रविवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कंपन्यांना थेट टँकरने पाणी पुरवण्याची वेळ औद्योगिक विकास महामंडळावर आली आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील साठा लक्षणीयरीत्या कमी असल्याने औद्योगिक पाण्याच्या पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली. मान्सून तोंडावर येऊन ठेपला असताना पाण्याचा तुटवडा भीषण झाला असून, सिन्नर औद्योगिक वसाहतीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. या वसाहतीला दारणा धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणात सध्या ३९ दशलक्ष घनफूट म्हणजे अवघा एक टक्का जलसाठा आहे. परिणामी, उद्योगांना होणारा पुरवठा बाधित झाला आहे. १४ दशलक्ष लिटरवरील औद्योगिक पाणीपुरवठा आता थेट एक दशलक्ष लिटर करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. त्याची दखल घेत जिंदाल सॉ लिमिटेडसह अन्य कंपन्यांनी त्यांचे औद्योगिक उत्पादन रविवारपासून थांबविण्याचे जाहीर केले आहे. त्याचा मोठा फटका सिन्नर तालुक्यातील औद्योगिक कामगारांना बसणार आहे. एकट्या जिंदालमध्ये एक हजार कामगार असून, उत्पादन बंदमुळे कंपनीला रोज तीन कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. याशिवाय फार्मा, कूलिंग, प्रोसेसिंग, केमिकल्स आणि अन्य स्वरूपाच्या कंपन्या सिन्नरमध्ये आहेत.

मायलॅन या फार्मा कंपनीनेही त्यांचे उत्पादन थेट निम्मे करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, या संदर्भात औद्योगिक संघटनांकडून पाठपुरावा केला जात असला तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. पाणीपुरवठ्याअभावी ६० ते ७० टक्के उद्योगांचे उत्पादन बाधित झाल्याचे लघु उद्योगभारतीचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे, तर उद्योगांना थेट टँकरने पाणी पुरवण्याची वेळ महामंडळावर आली असून, गेल्या तीन दिवसांत २५० टँकरने पाणीपुरवठा केल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षलागवडीला २० जूनचा मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात २१ हजार वृक्ष लागवडीचा ठेका घेवूनही पालिकेच्या नाकीनऊ आणणाऱ्या ठेकेदारांनी अखेर लागवडीची तयारी दर्शवली आहे. शहरात आता २० जूनपासून २१ हजार वृक्षांची टप्प्याटप्प्याने लागवड केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली. शहरात पाच कोटी रुपये खर्चून आवश्यक त्या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. दरम्यान, सोशल नेटवर्किंग फोरमनेही पाच हजार वृक्षांची लागवड करण्याची परवानगी व त्यासाठी महापालिकेकडे जागा माग‌ितली आहे. रस्त्यांच्या सुशोभिकरणासह पर्यावरणाच्या रक्षणासाठी १५ फुटांपर्यंतच वृक्षलागवड केली जाणार आहे. यासाठी सात ठेकेदार निश्चित करण्यात आले होते. परंतु, उन्हाळ्यात पाण्याचे कारण देत या ठेकेदारांनी वृक्षलागवड करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पालिकेने त्यांना नोट‌िसाही बजावल्या होत्या. आता ठेकेदारांनी नमते घेत वृक्षलागवड करण्याची तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक महामंडळाचे अवघ्या ८३९ लाभार्थ्यांना सहाय्य

$
0
0

gautam.sancheti@timesgroup.com



नाशिकः तब्बल २५० हून अधिक मागास जातींचा समावेश असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाने ३० वर्षांत फक्त ८३९ लाभार्थींना अर्थसहाय्य केले आहे. या महामंडळातही एकूण १३ योजनांपैकी फक्त एकच योजना चालू आहे. त्यात राज्य शासनाच्या तीनपैकी एक, तर केंद्र सरकारच्या दहा योजना निधीअभावी बंद आहेत.

महामंडळातर्फे सुरू असलेल्या एकमेव बीज भांडवल योजनेतही बँकेचा अडसर आहे. त्यात ७५ टक्के बँक कर्ज देते, तर २५ टक्के महामंडळाकडून देण्यात येते. सदर योजनेत बँक लाभार्थी पैसे भरण्यास सक्षम असल्यासच कर्ज देते. त्याचे प्रमाणही खूप कमी आहे. या योजनेसाठी तारण हाही कळीचा मुद्दा असतो. विशेष म्हणजे या सर्व महामंडळाची जिल्हाधिकारी दर तीन महिन्यांनी बैठक घेतात. त्यावेळेस सर्व बँकांचे अधिकारी उपस्थितीत असतात. पण अर्ज केलेले सर्व कर्ज प्रकरणे मंजूर होतातच असे नाही. राष्ट्रीयीकृत बँका तरी थोडा प्रतिसाद देतात. पण खासगी बँका मात्र कोणतेही सहकार्य करत नाहीत. सरकारने सर्वच बँकांना उद्दिष्ट दिलेले असले, तरी ते पूर्ण होत नाही.

नाशिक जिल्ह्यात दो हजारांच्या आसपास गावे आहेत. या प्रत्येक गावात या महांडळाअंतर्गत असलेल्या जातीजमातींचे लोक आहेत. ३० वर्षांत यातील एकालाही हे अर्थसहाय्य दिले असते, तरी त्यांची संख्या दोन हजार झाली असती. पण या महामंडळाने आतापर्यंत केवळ ८३९ लाभार्थींना १ कोटी ८१ लाख ४७ हजार कर्ज वाटले आहे.

नाशिक येथे या महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय असून त्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे ही कार्यालये नेमकी काय काम करतात, हाही प्रश्न आहे. वर्षभरात जर केवळ २५ लाभार्थ्यांना सहाय्य करायचे असेल, तर ही महामंडळे कशासाठी, हाही प्रश्न पडतो. इतर महामंडळांप्रमाणेच या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आलेल्या लोकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळाच्या दहा योजना असल्या, तरी गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडून महामंडळाला निधीच आला नाही.

-

तेरा योजनांपैकी एकच योजना सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळाचा निधी नाही. योजना पत्रकात असल्या तरी निधीमुळे आम्ही पुढे काहीच करू शकत नाही. त्यामुळे अनेकांचा रोष ओढवून घ्यावा लागतो.

आर. जी. गवत, जिल्हा व्यवस्थापक





पाच वर्षांतील लाभार्थी

वर्ष लाभार्थी

२०११ -१२- ०४

२०१२-१३ - १९

२०१३-१४ - २६

२०१४-१५ - १५

२०१५-१६ - १३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवडेबाजार नव्हे, डोकेदुखीच!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, आडगाव

जत्रा हॉटेलसमोरील मते मळा, कॅन्सर हॉस्पिटलजवळील रस्त्यावर व जत्रा हॉटेलसमोरील सर्व्हिसरोडपर्यंत दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडेबाजारामुळे या परिसरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. इतर दिवशीही एेन रस्त्यावरच भरणाऱ्या येथील भाजीबाजारात आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असल्याने येथील वाहतुकीचा खेळखंडोबा होणे ही नित्याची बाब झाली आहे.

येथील भाजीबाजारात खरेदीसाठी येणारे असंख्य नागरिक पार्किंगच्या सुविधेअभावी आपली वाहने मुंबई-आग्रा हायवेवरील सर्व्हिसरोडवर अनधिकृतपणे उभी करीत असल्याने या परिसरातील कोंडीत भरच पडत आहे. याच परिसरात असलेल्या धोकादायक जत्रा चौफुलीवरसुद्धा या वाहतूक कोंडीचा परिणाम होत अाहे. किरकोळ अपघात नित्याचे झाले असून, मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे परिसरातील रहिवाशांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत आहे.

या चौफुलीपासून काही अंतरावरच आडगाव पोलिस स्टेशन असूनदेखील वाहतूक पोलिस कधीही या चौफुलीवर दिसत नसल्याच्या तक्रारी स्थानिक स्थानिक रहिवाशांकडून केल्या जात आहेत. पूर्वी येथे भरणाऱ्या भाजीबाजारातील विक्रेत्यांची संख्या कमी असल्याने नागरिकांचा प्रतिसादही कमी मिळत असे. त्यामुळे वाहतुकीवर फारस परिणाम होत नव्हता. मात्र, अलीकडच्या काळात आठवडेबाजारासह दररोज भरणाऱ्या भाजीबाजातील विक्रेत्यांची, तसेच ग्राहकांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने येथे होणाऱ्या गर्दीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. शिवाय बाजार आटोपल्यानंतर या रस्त्यावर नियमित साफसफाई होत नसल्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्नदेखील एेरणीवर आला आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाने या भाजीबाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकीलवाडी, एम. जी.रोड येथील अतिक्रमणांचे काय?

$
0
0

मटा वाचक, नाशिक

मा. आयुक्तसाहेब, आपण नाशिक शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे हटविल्याबद्दल आपले तमाम नाशिककारांतर्फे हार्दिक अभिनंदन! पण, नाशिक शहराचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वकीलवाडी, एम. जी.रोड भागातील अतिक्रमणांचे काय?

वकीलवाडी भागातील कृष्णाई संकुल, स्वागत कॉम्प्लेक्स, सारडा संकुल, मनोरमा आर्केड, निधी पार्क, बळवंत प्लाझा, श्रीराम संकुल अशा अनेक (जवळपास सर्वच) इमारतींना वाहनतळाची व्यवस्थाच नाही. अनधिकृत बांधकामे करून अशा वाहनतळांवर कब्जा करण्यात आलेला आहे. अनेक वाहनतळांवर पक्की बांधकामे करून विक्रीसुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे पार्किंगअभावी येथील वाहने रस्त्याच्या कोणत्याही भागात पार्क केली जातात. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी जणू अनिवार्यच झालेली दिसते.

या भागातील अनेक इमारतींमध्ये रहिवासी दाखला घेऊन व्यावसायिक बांधकामे करून विक्री करण्यात आली आहे. माजी आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी या बांधकामांवर नोटिसादेखील काढल्या होत्या. पण, पुढे काहीच झाले नाही. आपल्या कामाचा धडाका बघता आपण सदर इमारतींवर कारवाई कराल व हा भाग मोकळा श्वास घेईल, असे वाटते. तरी आपण तातडीने सदर बांधकामांवर कारवाई करावी, ही नम्र विनंती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरचे अत्याधुनिक बसस्थानक कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

राज्य परिवहन महामंडाळने माजी आमदार नितीन भोसले यांच्या निधीतून सातपूरच्या बसस्थानकाचे काही काळापूर्वी मोठ्या थाटात भूमिपूजन केले होते. परंतु, आजही येथील अत्याधुनिक बसस्थानक कागदावरच असल्याने व येथे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवाशांना नाक दाबून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या बस स्थानकाचे काम रखडले असल्याने या बसस्थानकाला अच्छे दिन नेमके कधी येणार, तसेच पपया नर्सरीला लागून असलेला महामंडळाचा आरक्षित भूखंडदेखील अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेला असून, तो केव्हा वापरात येणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

सातपूर एमआयडीसीला लागूनच असलेल्या बसस्थानकाला अवकळा आली असून, काही वर्षांपूर्वी येथील कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी पाठपुरावा करीत पुन्हा कामही सुरू केले होते. मात्र, त्याचा पुन्हा खोळंबा झाला असून, येथे परिसरातील काही रहिवासी प्रातर्विधी उरकत असल्याने, तसेच येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर बसस्थानकावर सुविधांची वानवा दिसून येत आहे. येथे बसची प्रतीक्षा करताना प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, महामंडळाने याप्रश्नी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

-दिनेश काळे, प्रवासी

सातपूर येथील बसस्थानकाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. स्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने, तसेच येथे निवाराशेडही नसल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करीत उन्हात उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. महामंडळ याकडे कधी लक्ष देणार, असा आमचा सवाल आहे.

-तुषार ढेपले, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरशिंगोटेत अपघात; दोन बालकांसह महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक- पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास इंडिगो कार व मालट्रकच्या अपघातात कारमधील दोन बालकांसह महिलेचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. मृत व जखमी व्यक्ती संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष उमरभाई बेग यांच्या कुटुंबातील आहेत.

कसारा येथील लग्नसोहळा आटोपून बेग कुटुंबीय संगमनेरकडे परतत असताना नांदूरशिंगोटे शिवारात हॉटेल संतोषसमोर हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकचा (एमएच १२/एफसी ७३१७) अंदाज न आल्याने इंडिगो कार (एमएच १६/एआर ४१३७) ट्रकवर धडकली. अपघातात संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष उमरभाई बेग यांची सून सना इसाक बेग (वय २५), नातवंडे आलिया इसाक बेग (वय २ वर्षे), माविया इसाक बेग (वय ७) यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा इसाक उमर बेग (वय ३०) गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत कारमधून प्रवास करणाऱ्या शाईस्ता रिजवान शेख (वय २९), आरीफ रिजवान शेख (१०), अमिना रिजवान शेख (९) गंभीर जखमी झाले. जखमींना संगमनेर येथील डॉ. तांबे व डॉ. पानसरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाचा कबड्डीदिन ओझरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, रौद्रशंभू फाऊंडेशनतर्फे यंदाचा कबड्डीदिन ओझर येथे ९ जून रोजी होणार असून, या निमित्त आडगावचे शिवशक्ती मंडळ, सिडकोचे साई क्रीडा मंडळ, सय्यद पिंप्रीच्या उत्कर्ष मंडळासह विविध खेळाडू, संघटकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. ओझर येथील एचएएल टाऊनशिपमधील किनो थिएटरमध्ये ९ जून रोजी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती कबड्डी संघटनेतर्फे देण्यात आली.

नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेचा हा चौथा कबड्डीदिन असून, या वेळी खेळाडू, संस्था, संघटनांना भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार व अर्जुन पुरस्कारप्राप्त शांताराम जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ओझर ग्रामपंचायतीचे सदस्य यतीन कदम अध्यक्षस्थानी असतील. आमदार डॉ. सुधीर तांबे, अनिल कदम, एचएएलचे जनरल मॅनेजर अनिल घरड, एचएएल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष रत्नाकर गोरे, एचएएलच्या क्रीडा विभागाचे साकेत चतुर्वेदी आदी प्रमुख पाहुणे असतील. संदीप कदम, ज्ञानेश्वर चौधरी, शिवाजी मते, बाळासाहेब जाधव, योगेश मंडलिक, सोमनाथ जाधव सहकार्य करीत आहेत.



असे आहेत पुरस्कारप्राप्त खेळाडू

ज्येष्ठ कार्यरत संस्था : शिवशक्ती क्रीडा मंडळ, आडगाव

उत्कृष्ट कार्यरत संस्था : श्री साई क्रीडा मंडळ, सिडको

उत्कृष्ट स्पर्धा आयोजक : उत्कर्ष क्रीडा मंडळ, सय्यद पिंप्री

ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार : नंदन भट, रमा पैठणकर (नाशिक), प्रभाकर बागूल, शरद बहोत, अरुण वाघ (मनमाड), शिवाजी शिंदे (आडगाव), पंढरीनाथ ढोकणे (पांढुर्ली), रमा पैठणकर (नाशिक).

राष्ट्रीय खेळाडू : सनी मते (आडगाव), मानसी वांझट, विशाल कोमटे (नाशिक).

ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू : कैलास भांगरे (शिंदे), किरण थोरात (मनमाड), भावना शुक्ला, तनुजा कुलकर्णी (नाशिक).

उत्कृष्ट संघटक : गोरखनाथ बलकवडे (भगूर), शांताराम जाधव (शिंदे), आबा घाडगे (नाशिक), कलीम शेख (पांढुर्ली), गोविंद राऊत (आडगाव), राजेंद्र कराड (मनमाड).

कृतज्ञता पुरस्कार : सुधीर तांबे, दीपक पाटील (नाशिक), नाना पगारे, राजेंद्र आहिरे, सचिन दराडे (मनमाड), क्रीडा शिक्षक संघटना (मालेगाव)

उत्कृष्ट पुरुष खेळाडू : सौरभ पाटील व क्रीडा प्रबोधिनी (नाशिक)

आजीव सभासद योगदान : सागर माळोदे (ब्रह्मा स्पोर्ट क्लब, आडगाव), संदीप कदम (एचएएल ओझर).

उत्कृष्ट पंच : दत्ता शिंपी, सुशील गायकवाड (मनमाड)

उत्कृष्ट महिला खेळाडू : पूनम पाटील, रचना क्लब, नाशिक

शालेय राष्ट्रीय खेळाडू : श्रुती जाडर, वैष्णवी देशमुख (नाशिक), तुषार माळोदे (आडगाव).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची जबाबदारी जितेंद्र आव्हांडाकडे

$
0
0

माजी मंत्री छगन भुजबळ गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे जेलमध्ये गेल्यामुळे कोमात असलेल्या राष्ट्रावादी काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने नाशिकचे पालकत्व शरद पवारनिष्ठ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक नेत्याची 'राष्ट्रवादी'ला गरज आहे. आव्हाड यांनी शनिवारी (दि. ४) शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेणार आहे. आव्हाडांच्या नियुक्तीमुळे आतापर्यंत नाशिकच्या राष्ट्रवादीवर भुजबळांचे असलेले वर्चस्व कमी होणार असल्याचे मानले जात आहे.

नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भुजबळ विरोधी गट अडगळीत पडला होता. मध्यंतरी या गटाच्या नेत्याने शिवसेनेत जाण्याचीही तयारी सुरू केली होती. परंतु, गैरव्यवहारांच्या आरोपांच्या फेऱ्यात अडकल्याने भुजबळांची जेलवारी झाली. तेव्हापासून 'राष्ट्रवादी'ची आक्रमकता संपल्याचे चित्र निर्माण झाले. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुजबळ विरोधक गटाने थेट 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत कैफियत मांडली. पवारांनीही नाशिकची जबाबदारी आक्रमक नेत्याकडे देण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली. त्यानुसार तटकरे यांनी मूळचे नाशिकचेच असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. भुजबळांप्रमाणेच आक्रमक असलेले आव्हाड महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 'राष्ट्रवादी'ला संजीवनी देतील, अशी पक्षाला आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदिनी’च्या पुनरुज्जीवनाचा संकल्प!

$
0
0

घनकचरा आणि सांडपाण्यामुळे मृतवत बनत चाललेल्या नंदिनी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार शुक्रवारी याच नदीकाठी एका सभेत करण्यात आला. महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पुढाकाराने घेण्यात येत असलेल्या या उपक्रमाला महापालिका प्रशासनासह नगरसेवक, सामाजिक संस्थांनी पुरेपूर पाठबळ देण्याचा संकल्प सोडला. नंदिनीची रुपडं खुलविणारी ही मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

नाशिकमधील सुजाण आणि चिकित्सक वाचकांचा भरघोस प्रतिसाद महाराष्ट्र टाइम्सचे शक्तिस्थान राहिले आहे. सामाजिक बांधिलकीचे भान जपणाऱ्या आणि विधायक उपक्रमांना बळ देणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सने नासर्डी नाला बनलेल्या नंदिनी नदीला तिचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प सोडला आहे. याच उपक्रमाला पुढे घेऊन जाण्यासाठी शुक्रवारी (दि. ३ जून) एका तिडके कॉलनीतील ऋग्वेद मंगल कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, सभागृह नेत्या सुरेखा भोसले, भाजपचे गटनेते सतीश कुलकर्णी, सातपूर प्रभाग समितीच्या सभापती सविता काळे, नाशिक पश्चिमचे सभापती शिवाजी गांगुर्डे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह अनेक नगरसेवक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अस्वच्छतेमुळे नंदिनीला प्राप्त झालेल्या बकाल रुपाकडे उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधण्यात आले. बेळगाव ढगा ते टाकळी असा नंदिनीचा उगम ते संगमापर्यंतच्या प्रवास असून प्रत्येक टप्प्यावर नदीला प्रवाहीत करून तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प 'मटा' चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी व्यक्त केला. नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा आणि शहराच्या सौंदर्यात, भर घालणारा उपक्रम 'मटा' ने हाती घेतल्याबद्दल उपस्थित सर्वांनीच मनस्वी आनंद व्यक्त केला. या उपक्रमाचे शिवधनुष्य मटा आणि टाइम्स ऑफ इंडिया ही दैनिकच पेलू शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. पर्यावरणप्रेमी राजेश पंडित आणि सुनील मेंढेकर यांनी दक्षिण कोरियाच्या सेऊल शहरातील चेआँग्येचेऑन नदीचे स्वच्छता मोहीमेद्वारे पालटलेले रुप प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. त्यानंतर बेळगाव ढगा ते टाकळी या दरम्यान ‍नंदिनीच्या झालेल्या वाताहतीची माहिती देण्यात आली.

यांची होती उपस्थिती या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी नगरसेवक गुलजार कोकणी, राहुल दिवे, यशवंत निकुळे, राजेंद्र महाले, याखेरीज रंजन ठाकरे, कैलास मोरे, मायको कामगार संघटनेचे प्रवीण पाटील, ऑर्ट ऑफ लिव्हींगचे विजय हाके, सीताराम ठोंबरे, प्रकाश चव्हाण, अॅड. मुग्धा सापटनीकर, नितीन हिंगमिरे, अॅड. शिरीष दणदणे, संकेत मेंढेकर, ओमप्रकाश मलानी, आदी उपस्थित होते.

अशा आल्या सूचना... रेड आणि ब्ल्यू लाइन ही पूररेषा निश्चित करा घंटागाडी नियमित यायला हवी नाले जिवंत करावे करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करा पूल, दोंदे पूल अशा ठिकाणांवर जाळ्या बसवा स्वच्छतेबाबत फलक लावा रहिवाशी परिसरात सायंकाळी देखील घंटागाडी पाठवा कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा स्वच्छता करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या प्रत्येकाला जबाबदारी निश्चित करून द्या महापालिका, राज्य व केंद्र सरकारची मदत घ्या मोहिमेचा मायक्रो प्लॅन तयार करा स्लम एरियात नगरसेवकांनी अधिक प्रबोधन करावे

आम्ही नंदिनीचे सफाईसेवक आहोत. नंदिनी पूर्णपणे प्रवाहित करून ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. नदीच्या स्वच्छतेसाठी आसपासच्या नगरसेवकांनी जास्त लक्ष दिले पाहिजे. 'मटा'चा उपक्रम स्तुत्य असून त्याचा पाठपुरावा कायम हवा. दर महिन्याला याच्या बैठका घेवून महापालिका व लोकसहभागातून नंदिनीला पुनर्वैभव प्राप्त करून देवू. - अशोक मर्तडक, महापौर

'मटा'च्या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागेल. त्यासाठी महापालिकेबरोबर राज्य व केंद्र सरकारचेही सहकार्य घ्यावे. या उपक्रमासाठी काँक्रिट प्लॅन तयार करावा. - गुरमित बग्गा, उपमहापौर

'मटा'च्या उपक्रमाचा मायक्रो प्लॅन तयार करून तो तडीस नेण्यासाठी ठराविक टप्पे करावे लागतील. सांडपाणी पात्रात जाणार नाही याची काळजी घेतल्यानंतर नदीच्या सुशोभीकरणाचा विचार करावा लागेल. - जीवन सोनवणे, अतिरिक्त आयुक्त

'नॉट मी बट यू' हा मूलमंत्र लक्षात ठेऊन कामाला सुरुवात करावी लागेल. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. - प्रकाश चव्हाण

आम्ही नव्हे मी करणार असा संकल्प करा. प्रत्येकाने संकल्प करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली तर मोहीम यशस्वी होईल. आम्ही या उपक्रमासाठी मशिनरी पुरविण्यासह सर्वतोपरी मदत करू. - विजय हाके, पदाधिकारी, आर्ट ऑफ लिव्हींग

नंदिनी नदीत कोणीही घाण टाकू नये यासाठी सर्वप्रथम संरक्षक भिंत उभारली पाहिजे. काही ठिकाणी संरक्षण भिंतीला महापालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र, ही भिंत नदीच्या कडेलाच झाली पाहिजे. - गुलजार कोकणी, नगरसेवक

घंटागाडी नियमित सर्वत्र फिरत नसल्याने आणि जनप्रबोधनाअभावी नंदिनी लगत कचरा टाकला जातो. महापालिकेने स्वच्छतेबाबत कठोर नियम केले पाहिजे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन होणे आवश्यक आहे. - सतीश कुलकर्णी, भाजपा गटनेते

नदीपात्रात सोडले जाणारे ड्रेनेजचे पाणी सर्वप्रथम बंद करावे लागेल. यासाठी लोकांचे सहकार्य असून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. लोकसहभागातून लोकचळवळ उभी केल्यास नासर्डीची नंदिनी होईल. - सुरेखा भोसले, सभागृह नेत्या

निश्चयाच्या बळातूनच ही मोहीम यशस्वी होईल. दक्षिण कोरिया, राजस्थान येथे नदी स्वच्छता आणि ती प्रवाहित करण्याची मोहीम यशस्वी होऊ शकते तर नाशिककरही ती यशस्वी करू शकतात. - सुनील मेंढेकर

नैसर्गिक नाले व विहिरी बंद झाल्यामुळे तसेच अशुद्ध पाणी सोडले जात असल्याने नंदिनी दूषित झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व नागरिकांकडून कचरा टाकला जाणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. - यशवंत निकुळे, नगरसेवक

सातपूर एमआयडीसीतील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात नंदिनीत सोडले जाते; ते प्रथम थांबविले पाहिजे. नंदिनीवरील प्रत्येक पुलाला जाळी बसविली पाहिजे त्यामुळे नागरिक कचरा टाकू शकणार नाही. - राजेंद्र महाले, नगरसेवक

नंदिनीची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका व स्थानिक रहिवाशांचा लोकसहभाग हवा. नदीचे पावित्र जपण्यासाठी महापालीकेने प्रबोधन करणे गरजेचे आहे. - सविता काळे, सभापती, सातपूर प्रभाग

विविध मंडळांना बरोबर घेऊन नंदिनीची स्वच्छता करण्याबाबत प्रबोधन करण्यावर भर देणार आहोत. तसेच शक्य त्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना महापालिका यंत्रणेने रोखणे गरजेचे आहे. - शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक

महापालिकेकडून स्वच्छतेबाबत नेहमीच आवाहन केले जाते. मात्र, अनेक मोकळ्या जागांवर नागरिकांकडून कचरा टाकला जातो. डेब्रिज व कचऱ्याच्या ढिकाऱ्यांमुळे नंदिनीचे पात्र कमी झाले आहे. - प्रवीण पाटील, सदस्य, बॉश (मायको) कामगार संघटना

'पाणी अडवा पाणी जिरवा' या धर्तीवर काम करण्याची गरज आहे. शहरी भागातून वाहणाऱ्या नंदिनीच्या स्वच्छतेसाठी सर्वच सामाजिक व राजकीय संघटनांनी पुढे आले पाहिजे. - सिताराम ठोंबरे, सिटू कामगार संघटना

नंदिनीच्या स्वच्छतेसाठी कामगार विकास मंचच्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन स्वच्छतेचे आवाहन केले जाणार आहे. नदीत कचरा टाकला जातो अशा ठिकाणी प्रबोधनपर फलक लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. - कैलास मोरे, संस्थापक, कामगार विकास मंच

महापालिका व नगरसेवकांनी लोकसहभागातून वर्षभर स्वच्छता मोहीम राबविल्यास नंदिनी नदी नक्कीच कचरामुक्त होऊ शकेल. स्थानिक रहिवाशांना नंदिनी स्वच्छतेबाबत आम्ही आवाहन करणार आहोत. - रंजन ठाकरे, पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस

नंदिनीच्या स्वच्छतेसाठी आम्ही अगोदरच पुढाकार घेतला आहे. परंतु, परत कचरा टाकत जात असल्याने नदीकाठावरील नागरिकांचे प्रबोधन सातत्याने करणे गरजेचे आहे. - अॅड. मुग्धा सापटनीकर, नंदिनी पुनर्भरण समिती

लोकसहभागातून सेऊल नदी स्वच्छ होवू शकते. सेऊलसारखीच रचना ही नंदिनीची आहे. लोकसहभागातून राजस्थानात बारा नद्या प्रवाहित करण्यात आल्या. नासर्डीची पुन्हा नंदिनी करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत. - राजेश पंडित, पर्यावरण प्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चुकीची व्याज आकारणी; फायनान्स कंपनीला महागात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

चुकीची व बेकायदेशीर व्याज आकारणी करणाऱ्या फायनान्स कंपनीला ग्राहक तक्रार न्याय मंचाने दणका दिला आहे. कर्जदाराला चुकीच्या पध्दतीने लावलेले व्याज व लेट पेमेंट चार्जेस एक लाख ५७ हजार ८१८ रुपये बेकायदा ठरवले आहेत. हे पैसे कर्जदाराच्या रक्कमेतून वजा करून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेशही आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च तीन हजार असा आठ हजार रुपयाचा दंडही ठोठावला. फायनान्स कंपनीच्या या मनमानी कारभाराला चाप बसवणाऱ्या या निर्णयाचे त्रस्त ग्राहकांनी स्वागत केले आहे.

पाथर्डी फाटा येथील लोकशे खेतमल दहिया यांनी १२ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज ए. यू. फायनान्शियल कपंनीकडून घेतले होते. त्यांनी या कर्जाची परतफेड केली. मात्र त्यांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) कंपनीने दिले नाही. त्यामुळे लोकेश दहिया यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे तक्रार केली. त्यात बेकादेशीररित्या व्याजावर व्याज, चेक बाऊन्सिंग चार्जेस, स्टेटमेंट चार्जेस आकारून त्यावर व्याजाची आकारणी केली. सिक्युरिटीसाठी दिलेल्या चेकचा दुरुपयोग केला. त्याचप्रमाणे ओव्हरड्यू इंटरेस्टच्या मुद्दल रकमेवर आकारणी न करता संपूर्ण रक्कमेवर आकारणी केली. मासिक हफ्त्याचे तीन चेक एकत्रितरित्या वटवले असे नमूद केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निर्णय देण्यात आला. ग्राहक न्याय मंचाचा हा निकाल अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे -कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला. विशेष म्हणजे तक्ररदार दहिया यांनी स्वतःच युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वार करत रहा, आम्ही झेलत राहू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भुजबळ कुटुंबियांशी राज्य सरकार सूडबुध्दीने वागत आहे. भुजबळ कुटुंबियांवर वारंवार आघात होत आहेत. पण आम्ही हिमतीने लढू. लोक आमच्या पाठीशी आहेत आणि न्यायदेवतेकडे न्याय असल्याचा आमचा विश्वास आहे, असे प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी शुक्रवारी मनमाड येथे पत्रकारांशी बोलताना केले. मनमाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आमदार पंकज भुजबळ मनमाड येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत कैफियत मांडली.

छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या मागोमाग आमदार पंकज भुजबळ यांना अटक होणार असल्याच्या चर्चा व जाम‌िनासाठी सुरू असलेली कायदेशीर लढाई याकडे लक्ष वेधले असता, 'वार करत रहा, आम्ही झेलत राहू' या शब्दांत राज्य सरकारला त्यांनी लक्ष्य केले. हे दबावतंत्र आहे. राजकीय खेळी आहे. सगळे पक्षपाती राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला. पण लोकांना हे सर्व कळतेय, असा दावा करीत राष्ट्रवादी पक्ष, आमचे नेतृत्व आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, मनमाड शहराध्यक्ष राजाभाऊ पगारे आदी उपस्थित होते.

छगन भुजबळांची पत्राद्वारे भेट

भुजबळ साहेबांची प्रत्यक्ष समोर भेट होत नाही. पण ते आम्हाला पत्रव्यवहारातून भेटत असल्याचे सांगताना आमदार पंकज यांना गहिवरून आले. भुजबळ परिवारावरील कारवाईचा पालिका निवडणुकीवर विपरीत परिणाम होईल का, यावर बोलताना पंकज भुजबळ यांनी लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याचे सांगत आम्ही सर्व लढाया लढू, आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त केला. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर पक्ष श्रेष्ठी बोलतील असे सांगत आमदार पंकज भुजबळ बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राचे २६ मंत्री येणार राज्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रसरकारच्या दोन वर्षांच्या विकासकामांचा ढोल वाजवण्यासाठी केंद्रातील २६ मंत्री राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यात जावून केंद्रसरकारने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या योजना व विकासकामांची माहिती देणार आहेत. केंद्रसरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती येणार असल्याची माहिती खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.

केंद्रसरकारला दोन वर्ष पूर्ण झाले असून, केंद्राच्या विकास योजना, घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. याबरोबरच भाजपच्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात दोन वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी भाजपच्या वसंतस्मृती या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मतदारसंघातील विकासकामांची माहिती सादर केली. दिंडोरी मतदारसंघात रस्त्यांचे जाळे उभे केल्याचे सांगत, मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग मंजुरीसाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या त्वरीत मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी केली. ओझर विमानतळ सुरू करण्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एचएएलकडे हस्तांतरणासाठी प्रयत्न केले. ओझर-वडाळी भोई-उमराणा अंडरपास मंजूर केला. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग मंजूर करून आणण्यासाठीही प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय नाशिक-सुरत रेल्वेमार्ग मंजूर केल्याचे सांगत, केंद्रीय बजेटच्या अधिवेशानापर्यंत ३४४ तारांक‌ित आणि अतारांकित प्रश्न विचारले असल्याचे त्यांनी सांग‌ितले.

दरम्यान, केंद्रातर्फे विकासकामांची माहिती देण्यासाठी पुढील आठवड्यापासून केंद्रीय मंत्री राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी २६ मंत्र्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविल्याचा दावा त्यांनी केला असून, नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री उमा भारती व सिद्धेश्वर रॉय येणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जावून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

नाशिक भाजप खडसेंसोबत

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संकटात असलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठ‌िशी नाशिकची भाजप असल्याचा दावा शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी केला. खडसेंवर होत असलेले आरोप तथ्यहीन असून, चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून त्यांच्यासोबत आम्ही ठाम उभे असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावर शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शेतजमिनीच्या वादातून व वारंवार होणाऱ्या शिवीगाळ, दमदाटीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या वासूळ येथील शेतकऱ्याने सप्तशृंग गडावरील नारळे जंगल परिसरात झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. संजय रामचंद्र आहिरे असे या शेतकऱ्याचे नाव आहेत. ते मूळचे वाखारीचे असून, सध्या वासूळ येथे राहत होते. आहिरे यांच्या पत्नी ताराबाई आहिरे (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कळवण पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

आत्महत्येपूर्वी संजय आहिरे यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली असून, या चिठ्ठीचा आधार आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामचंद्र आंबू आहिरे, चंद्रकांत रामचंद्र आहिरे, निर्मला एकनाथ निकम, कल्पना अरुण पगार, अरुण राजाराम पगार, माधव तुळशीराम निकम, आबा महादू निकम यांना अटक केली आहे, तर राजेंद्र अरुण पगार, सुमन बाबाजी सोनवणे, विलास बाबाजी सोनवणे, संगीता चंद्रकांत आहेर, एकनाथ देवबा निकम, गणेश एकनाथ निकम यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर उद्यानांचा संपणार वनवास

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शंभर उद्यानांची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सेवाभावी संस्था किंवा खासगी मंडळाच्या नावावर ही उद्याने देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेना १९ जून रोजी वर्धापन दिनी मंडळे व संस्थाच्या नावे उद्याने दत्तक घेणार आहे. त्यामुळे काही उद्यानांचा वनवास संपणार आहे.

शहरातील उद्यानांची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मनसेला शह देण्यासाठी शंभर उद्याने दत्तक घेण्याची तयारी शिवसेनेने आयुक्तांकडे दर्शवली होती. परंतु, राजकीय पक्षांना अशा प्रकारचे उद्याने ही देखभाल दुरूस्तीला देता येत नाही. त्यामुळे शिवसेनेला ही उद्याने मिळणार नाहीत, असा दावा केला जात होता. परंतु, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शिवसेनेसमोर स्वयंसेवी संस्था व सामाजिक मंडळाचा प्रस्ताव ठेवला आहे. मंडळे व संस्थामार्फत ही उद्याने देखभाल व दुरूस्तीला देता येतील असे पत्र शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना दिले आहे. त्यामुळे शिवसेना ही उद्याने संस्था व मंडळाच्या नावाने दत्तक घेणार आहे. शिवसेनेचा येत्या १९ जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनाच्या निम‌त्तिाने काही उद्याने शिवसेना दत्तक घेणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images