Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वैभवच्या निकालाने गहिवरले गाव!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दहावीची परीक्षा दिल्यानंतर चांगले गुण मिळविण्याचे व कॉलेजला जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द या छोट्याशा गावातील वैभव सांगळे निकालाची डोळ्यात प्राण आणून वाट पहात होता. पण, काही दिवसांपूर्वी शेतात कांदे झाकत असताना अंगावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालात त्याला ७७.८० टक्के गुण मिळाले. वैभवचा हा निकाल पाहताना गावकरी व मित्रांना त्याच्या आठवणींनी उचंबळून आले, तर त्याचे अवघे घर आपले गुणी लेकरू या जगात नाही आता या गुणांचे काय करायचे? या भावनेने आसवात बुडाले.

जळगाव खुर्द येथून रोज नांदगावच्या व्ही. जे. हायस्कूलमध्ये शिक्षणाच्या ओढीने येणारा व शिकून खूप मोठं होण्याची आस बाळगून असणारा वैभव सांगळे ७७.८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. हे पाहून त्याच्या शाळेतील शिक्षकांनाही गहिवरून आले. वैभवचे आईवडील, कुटुंबीय, मित्र आणि शाळेतील शिक्षक यांना वैभवच्या या यशाचा अभिमान वाटत आहे. पण, आपला हा निकाल पाहायला तो स्वतःच या जगात नाही, हे वास्तव त्यांचे काळीज कुरतडून टाकत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यात अचानक आलेल्या वादळाने शेतात कांदे झाकण्यासाठी वैभव गेला आणि काही फुटांवर उभ्या असलेल्या आईवडिलांच्या डोळ्यांदेखत अंगावर वीज कोसळून क्षणार्धात वैभवचा मृत्यू झाला.

शेतीकाम करून शिक्षण घेणाऱ्या वैभवने दहावीचे पेपर दिले होते. निकालाची त्याला आस होती, पण आपला निकाल पाहणे त्याच्या नशिबात नव्हते. हुशार वैभव दहावी पास झालाय पण आनंदाश्रूपेक्षा दुःखाश्रूने पालकांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या आहेत. आता या हुशार पण आपल्यात नसलेल्या गुणी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका पंधरा जून रोजी मिळाल्यानंतर त्याच्या घरी जाण्याचा मनोदय व्ही. जे. हायस्कूलचे पर्यवेक्षक डी. डी. आहिरे, गिलाणकर यांनी व्यक्त केला आहे.

वैभवच्या आठवणींनी आज सारे भावविवश झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीने गुणी, हुशार मुलाच्या आयुष्याची दोरी कापली गेली. निकालाची प्रतीक्षा करीत महाविद्यालयात जाण्याचे इमले बांधणाऱ्या वैभवच्या स्वप्नांवरच जणू कोसळली आहे. या हुशार मुलाची सतत आठवण येत राहील. - डी. डी. आहिरे, नांदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात खून अन् जाळपोळीचे थांबेना सत्र

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एका युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात फेकून दिल्याचे सोमवारी (दि.६) उजेडात आले. वैभव परदेशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो अशोक स्तंभ परिसरातील रहिवाशी आहे. एकीकडे ग्रामीण पोलिस गुन्ह्याची नोंद करीत असताना दुसरीकडे बोधलेनगर परिसरातील भगवती दर्शन अपार्टमेंटमधील दोन दुचाकींची जाळपोळ करण्यात आल्याचे समोर आले. या दोन घटनांचा थेट संबंध नसला तरी गुन्हेगारांनी शहर पोलिसांना जेरीस आणले असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले. हे सत्र केव्हा थांबणार असा सवाल नाशिककर करीत आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परदेशीवर २००२ मध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. २००६ चा दंगलीचा खून वगळला तर तो २००१ ते २००२ या वेळेतच परदेशी सक्रिय होता, असे पोलिस रेकॉर्डवरून स्पष्ट होते. गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या परदेशीचा खून कोणी व कोठे केला हे तपासात समोर येईल. मात्र, यामुळे तोरंगण घाटात मृतदेह फेकून देण्याच्या यापूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. सातपूर भागात खून करून दोघा युवकांचे मृतदेह येथेच फेकून देण्यात आले होते. ही घटना वर्षाप्रांरभीच घडली होती. यातील काही आरोपी अजूनही फरारच आहे. रात्री अपरात्री मृतदेह फेकून देणाऱ्या गुन्हेगारांची कोणतीही माहिती शहर तसेच ग्रामीण पोलिसांना मिळालेली नसून, शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय असल्याचे परदेशीच्या हत्येनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडीधारकांसह शाळेला दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम / सिडको पंचवटी परिसरातील औरंगाबाद नाक्यावरील तपोवनातील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून आपले बस्तान बसविणाऱ्या लोकांना सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने हटविले. तसेच सिडको प्रशासनाने देखील सद्‌भावना चौकातील शाळेसह अन्य दोन ठिकाणचे अतिक्रमण काढले.

नाशिक महापालिकेच्या ताब्यातील तपोवनातील ५४ एकरच्या मोकळ्या भूखंडावर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तसेच परराज्यातील काही नागरिक कुटुंबीयांसह शहरात विविध प्रकारच्या व्यवसायानिमित्त आलेले आहेत. त्यांनी मोकळ्या भूखंडावर झोपड्या उभारून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून अतिक्रमण न करण्याच्या अनेकदा सूचना केल्या. परंतु, त्यांनी जागा खाली करून न दिल्याने सोमवारी महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागातील अधिकारी व पोलिस यंत्रणा आणि आडगांव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित लोकांना जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित झोपडीधारकांनी प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी भूखंडवरून आपले साहित्य हटविले.

संबंधित भूखंडावरील सर्व झोपड्या यापूर्वी सिंहस्थ काळात हटविण्यात आल्या होत्या. तसेच त्या पुन्हा वसणार नाही याची काळजी देखील प्रशासनाने घेतली होती. मात्र, सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण झाले. प्रशासनाकडून अनेक वेळा ताकीद देण्यात आल्यानंतरही झोपडीधारक हटण्यास तयार होत नसल्याचे विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांनी सांगतले. त्यामुळे धडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन झाले.

सिडकोत शाळेचे अतिक्रमण हटविले सिडको : नाशिक महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर सिडको प्रशासनानेही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. सिडकोतील सद्‌भावना चौकात सोमवारी एका शाळेसह अन्य दोन ठिकाणचे अतिक्रमण सिडको प्रशासनाने हटविण्यात आले.

सिडकोतील सद्‌भावना चौकातील श्रीमती इंदिरा गांधी एज्युकेशन सोसायटीची आदर्श विद्यालय शाळा आहे. सन १९८४ पासून ही शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरते. ही शाळा सिडकोच्या जागेवर अतिक्रमित उघडकीस आले. त्यानंतर सिडको प्रशासनाने संबंधित संस्थेला पत्र देवून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्याने सिडकोने पोलिस बंदोबस्तात थेट कारवाई केली. शाळा बंद असली तरी त्याठिकाणी असलेल्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईस सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिडको प्रशासन अतिक्रमण काढण्याबाबत ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. जेसीबीच्या सहाय्याने शाळेचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.

श्रीमती इंदिरा गांधी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अनेक वर्षांपासून ही शाळा सुरू आहे. संबंधित भूखंड सिडकोने द्यावा यासाठी पत्रव्यवहारही केला आहे. आता येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. - सुभाष कोठावदे, अध्यक्ष, इंदिरा गांधी एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहिवाशांनीच टाकले गतिरोधक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर अशोकनगर भागात अलीकडच्या काळात वाढलेल्या रस्ते अपघातांमुळे धोकादायक ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी त्रस्त नागरिक, नगरसेवकांकडून वेळोवेळी केली जात आहे. परंतु, त्याकडे महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवाशांनीच गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेतले आहे. सावरकरनगर भागातील वाढते अपघात लक्षात घेता रहिवाशांनीच येथे स्वखर्चाने गतिरोधक टाकले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

परिसरातून अनेकदा सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका व पोलिस प्रशासन यांनी किमान गरज असेल अशा ठिकाणी गतिरोधक व दुभाजक टाकावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह सातपूरकरांनी वेळोवेळी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता प्रत्यक्ष नागरिकांनीच गतिरोधक टाकले आहेत. आता तरी प्रशासन उर्वरित ठिकाणी गतिरोधक टाकणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

सातपूर भागातील रस्त्यांवर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक टाकावेत, अशी मागणी स्थायी समिती सभापती सलीम शेख व नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली होती. मात्र, त्याकडे महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या अपघातांचा त्रास लक्षात घेता सावरकरनगर भागातील रहिवाशांनी रस्त्यावर स्वखर्चाने गतिरोधक टाकले असून, अन्य धोकादायक ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे. बेफामपणे वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील येथील रहिवाशांनी पोलिसांकडे केली आहे. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.



सावरकरनगर भागात वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तक्रारींनंतरही कार्यवाही न झाल्याने रहिवाशांनीच येथील रस्त्यांवर स्वखर्चातून गतिरोधक बसविले आहेत. - नरेंद्र पाटील, स्थानिक रहिवासी



सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी सावरकरनगरच्या रस्त्यावरून जात असताना अचानक जोरात आलेल्या वाहनाची धडक बसून मला इजा झालेली आहे. अनेकांना असा त्रास होऊनही उपाययोजना न झाल्याने आम्ही स्वखर्चाने गतिरोधक रस्त्यावर टाकले आहेत. - सविता ढगे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी भरल्यानंतरही विद्यार्थ्यांना डावलले

$
0
0

पहिल्याच दिवशी शाळेकडून अडवणूक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेने केलेल्या फी वाढीविरोधात एल्गार पुकारणाऱ्या पालकांची अडवणूक करण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी काही पाल्यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. गतवर्षीच पाच हजार रुपये भरून बस फी भरल्यानंतरही शाळेकडून आलेला हा अनुभव मनमानी असल्याचे शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने म्हटले आहे.

संस्थेच्या चांदसी येथील शाळेमतील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी न भरल्यास या विद्यार्थ्यांना उद्यापासून शाळेत नेले जाणार नाही, अशा धमकीचे फोन शाळेतून पालकांना आल्याच्या तक्रारी आहेत. शाळेने यंदा केलेली फी वाढ ही ९३ टक्के असून, ती नियमबाह्य असल्याचा पालकांचा आक्षेप आहे. तर, फी वाढविणे हा शाळेचा अधिकार असून, पालकांनी निमूटपणे वर्षभराची वाढीव फी भरावी अशी शालेय व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. या विरोधात पालकांनी सोमवारी शाळेत भूमिका मांडली. पालक वादग्रस्त वाढीव फी पैकी पहिल्या महिन्याची फी भरण्यास तयार असताना शाळा मात्र बाराही महिन्याची फी भरण्याच्या मुद्द्यावर अडून आहे. ही फी न भरल्यास विद्यार्थ्यांना बसप्रमाणेच जेवणापासून अन् शिक्षणापासूनही वंचित ठेवले जाईल, अशी धास्ती पालकांनी व्यक्त केली आहे.

शाळेच्या या मनमानीविरोधात पालकही पाल्यांची समांतर वाहतूक व जेवणाची व्यवस्था करत आहेत. पुस्तक खरेदी प्रकरणीही शाळेकडून अशीच अडवणूक होत असल्याची तक्रार केली आहे. शाळेने मनमानी सोडण्याचे आवाहन मंचने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकंटकांनी पेटवल्या बोधलेनगरला दुचाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड बोधलेनगर येथे समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी सोमवारी पहाटे दोन दुचाकी पेटवून दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे मार्गावर बोधलेनगर आहे. येथील भगवती दर्शन अपार्टमेंटमध्ये जीवन रमेश पगारे (३०) राहतात. रविवारी रात्री त्यांनी आपली सीबीझेड (एमएच १५ सी डब्लू ५४३९) आणि अॅक्टिव्हा (एमएच १५ सीएम ६८१८) या दुचाकी पार्किंगमध्ये लावल्या. पहाटे समाजकंटकांनी त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच पगारे यांनी उपनगर पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, उपनिरीक्षक पवार आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. दहशत निर्माण करण्यासाठी या गाड्या जाळल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यापूर्वीही उपनगरमधील लोखंडे मळा आणि उपनगर बाजारात वाहने जाळण्यात आली होती. सिन्नरफाटा येथेही वाहने जाळण्याच्या घटना घडल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनी रॅगिंगची तक्रार

$
0
0

शहरातील विस्डम इंटरनॅशनल आणि केंब्रिज या दोन शाळांविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनी तक्रार करण्यात आली. विस्डमविरोधात रॅगिंग, मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल तर क्रेबिजविरोधात शाळा सोडल्याचा दाखला देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील विविध विभागांशी संबंधित ४७ तक्रारी आल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपायुक्त विजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर उपस्थित होते. विस्डम हायस्कूलविरोधात वेदांत अभिजित गोराणे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने तक्रार केली आहे. त्यात त्याने शाळेत असलेल्या गुंडांपासून संरक्षण मिळावे, शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्या शाळेतील गुन्हेगारी स्वरुपाच्या हरकतीवर नियंत्रण करावे, असे म्हटले आहे. या तक्रारीत त्याने संस्थाचालक व त्यांचा नातेवाईक असलेला सातवीत शिकणारा मुलगा दादागिरी करतो, असाही उल्लेख केला आहे. केंब्रिज स्कूल विरोधात शिवानी कैलास पाटील या दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीने शाळा सोडल्याचा दाखला मिळत नसल्याची तक्रार केली आहे. पूर्ण शुल्क भरल्यानंतरही फी बाकी असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. या दोन्ही शाळांच्या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत विस्डमची तक्रार पोलिसांकडे तर केब्रिज हायस्कूलची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अन्य तक्रारींमध्ये भूमी अभिलेख, महसूल, पोलिस, महावितरण, शिक्षण आदी विभागांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सृ‌ष्टिसौंदर्याने बहरले ‘जर्नी’ प्रदर्शन

$
0
0

प्रदर्शनात मांडल्या निवडक ३५ कलाकृती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदीमानवापासून आपल्या मनातील भावना चित्र स्वरुपात गुहेच्या पृष्ठभागावर रेखाटण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी त्याने निर्मिलेली कलाकृतीचा उद्देश भिन्न असला तरी भावनांचा प्रकटीकरण करणे हा एकमेव उद्देश होता. याच भावनांना चित्र स्वरुपात आणण्याचे काम नाशिकमधील प्रख्यात चित्रकार अतुल भालेराव यांनी 'जर्नी' या चित्रप्रदर्शनाद्वारे केले आहे.

अमेरिकेतील प्रसिध्द चित्रकार मॅथॉड्रिस्ट सुनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विलास टोणपे यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्मारकात प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात सृष्टी सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न चित्रकार अतुल भालेराव यांनी केला आहे. या प्रदर्शनात निवडक ३५ कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणची तसेच महाबळेश्वर, पाचगणी, मुंबई वेरुळ येथील सौंदर्यस्थळे त्यांनी जलरंगात रंगवली आहेत. नाशिकमधील चित्रकारांच्या निर्सगचित्रणाची परंपरा संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. त्याला अनुसरूनच त्यांनी स्वतःची चित्रशैली विक‌सित केली आहे. कधी चित्र सौंदर्य पारदर्शक रंगात, तर कधी अपारदर्शक रंगात त्यांनी रंगवले आहेत. यासाठी वॉटर कलर व अॅक्रेलीक रंगांचा प्रभावीपणे वापर केला आहे. यातील काही चित्रे मिश्र माध्यमातही रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. जलरंगाचा प्रवाहीपणा, माध्यम हाताळण्याची हातोटी त्यांच्या चित्रात वैशिष्ट्याने जाणवते. माध्यमावर असणारी पकड त्यातून जाणवते. पावसाळ्यातील हिरवीगार वनराई, निर्सगात दडलेली हिरव्या रंगांची विविधता, वृक्ष, वेली, गवत, शेतातील पिकं ही चित्र रेखाटताना नदीकाठ, जलाशय, पर्वतांमधील विविधता, ग्रामीण भागात आढळणारे सृष्टी सौंदर्य, तेथील पुरातन वाडे-घरे यांची रचना जशीच्या तशी दिसते. नाशिकमधील मेनरोड येथील महापालिकेची इमारत, मेनरोड, कुंभमेळ्यातील गर्दी, पाण्यातील प्रतिबिंब, टेरेस व्ह्यू, जेजुरी गडावरील दृश्य, सोमेश्वर, व्हिक्टोरीया पूल यातील चित्र प्रेक्षकांना आकर्षित करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नंदिनी’ला हवी लोकसहभागाची साथ !

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'चा इनिशेएटिव्ह प्रोग्रॅम 'चला, नासर्डीला नंदिनी करू या'मध्ये रोजच शेकडोंच्या संख्येने लोक सहभागी होत असून, नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्था आणि अनेक स्वयंसेवकांनी स्वत:हून या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची तयारी दाखवल्यामुळे ही चळवळ आता लोकव्यापक बनू पहात आहे. 'मटा'च्या वर्धापनदिनी, ८ जून रोजी सकाळी ८ वाजता गोरक्षनाथ पूल, दादासाहेब गायकवाड नगर, सातपूर येथे नदीच्या स्वच्छतेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, नंदिनी नदीशी संबंधित नगरसेवक, प्रशासन यांचा सहभाग राहणार आहे.

वाढत्या शहराच्या गरजा भागवता-भागवता नाशिककरांनी सरस्वती, कपिला, नासर्डी, अरूणा, वरूणा या गोदावरीच्या उपनद्या गमावल्यातच जमा आहेत. हा वारसा पुन्हा एकदा मिळवून त्याला समृध्द करण्याच्या हेतूने 'महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे नासर्डी उर्फ नंदिनी नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत बेळगाव ढगा येथे संतुषा डोंगराच्या पायथ्याशी असलेला नंदिनीचा उगम ते आगर टाकळी येथे असलेल्या गोदावरी संगमापर्यंतचा नदी टप्पा स्वच्छता व सुशोभिकरण हे प्राथमिक लक्ष्य आहे.

नंदिनी ही गोदावरीची उपनदी आहे. परंतु या नदीचे वाढत्या नागरिकरणाच्या रेट्यात नासर्डी नाला असे नामकरण झाले. अतिशय संपन्न वारसा लाभलेल्या या नदीला तिचे पूर्वीचे बारमाही स्वरूप पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे प्राथमिक पाऊल उचलण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात तज्ज्ञ समितीने महिरावणी डॅम ते आगरटाकळी संगम या टप्प्यातील सात ठिकाणांची पाहणी केली. दुसऱ्या टप्प्यात नाशिकमधील डिसिजन मेकर अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात एक बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यात नदी पुनरूज्जीवनासंदर्भात अनेक सुचना आल्या. त्या नोंदवून त्यावर काम सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी 'मटा'कडे अतिशय तज्ज्ञ मंडळीदेखील सहभागी झाली आहे.

नंदिनी नदीबाबत नाशिककरांना आवाहन केल्यानंतर या चळवळीमध्ये अनेक नाशिककर सहभागी झाले. कुणी सुशोभिकरण करून देण्यासाठी तर कुणी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासंदर्भात फोनवरून कळवले तर अनेकांनी 'मटा'च्या ऑफिसला भेट देत या कामात झोकून देण्याची तयारी दाखवली. नाशिकची नदी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी वाटेल ते श्रम करण्याची त्यांची तयारी हेच या प्रोजेक्टचे यश आहे.

श्रमदानासाठी संस्थांना आवाहन

नासर्डी नदीचे नंदिनीत रूपांतर करण्याकामी नाशिकमधील सामाजिक 'महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे आवाहन करण्यात येत आहे. नदीची स्वच्छता करण्यापासून सुशोभिकरणापर्यंत अनेक छोट्या-मोठ्या कामांसाठी आणखी मनुष्यबळ लाभणार आहे. हे काम सुरूच राहणार असल्याने प्रत्येकाचा या कामात सहभाग आवश्यक आहे. 'नासर्डीला नंदिनी करू या' या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संस्थांनी, प्रशांत : ९५०३६७७७४० यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलमध्ये सापडले आठ मोबाइल

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात भिंतीलगत आठ मोबाइल आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभरातील अशी दुसरी घटना आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात कारागृहाचे हवालदार भाऊसाहेब खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहाच्या भिंतीलगत गस्त घालत असतांना खरात यांना कृषी गोदामाच्या भागात भिंतीजवळ आठ मोबाइल, हेडफोन व चार्जरही सापडले. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली. सहाय्यक निरीक्षक वाळेकर तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी होमगार्डच्या बूटामध्ये सीमकार्ड व मोबाइल सापडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुळे भाऊ गुणांतही ‘सेम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता दहावी, बारावीचा एखादा विद्यार्थी घरात असला, तर त्या घरचे दूरचित्रवाणी संच, अन्य सर्व गोष्टी बंद करून अभ्यास एके अभ्यास असे सामान्य चित्र पाहायला मिळते. परंतु, यास अपवाद ठरवत दुबे कुटुंबीयांच्या घरात इयत्ता दहावीत कार्तिकेय व विनायक या दोन्ही जुळ्या भावांनी हसत-खेळत यश संपादित करून दाखविले. सीबीएसईच्या निकालात कार्तिकेयने ९५.२ टक्के, तर विनायकने ९४.२ टक्के गुण मिळविले आहेत. कार्तिकेय व विनायक या जुळ्या भावांचे वडील कंपनीत नोकरी करतात. इयत्ता दहावीची परीक्षा देत असल्याची मनात काळजी होती. त्यातही सीबीएसईची परीक्षा अवघड समजली जाते. परंतु, वर्षभराच्या नियोजनबद्ध अभ्यासातून त्यांनी यश संपादित केले. दोघा भावांध्ये वेळोवेळी स्पर्धाही लागायची. जास्त गुण मिळण्याच्या धडपडीव्यतिरिक्त या स्पर्धेचा अन्य काहीही उद्देश नव्हता. दोघांचा आवडीचा विषय गणित असल्याने दोघेही पुढील शिक्षण अभियांत्रिकी शाखेतून घेण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यादृष्टीने अभ्यास केला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) किंवा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतून शिक्षण घेण्याची इच्छाही कार्तिकेय याने व्यक्त केली.

आमच्या घरात दोन मुले बोर्डाची परीक्षा देणार असले, तरी त्याबद्दलचा तणाव कधी जाणवला नाही. वर्षभर नियमित अभ्यासावर भर देत त्यांनी परीक्षेत यश संपादित केले. सोबतच खेळालाही तितकेच महत्त्व दिले. रोज साधारणत: एक तास खेळायचे. या व्यायामाचाही फायदा त्यांना झाला.

-पारुल दुबे, कार्तिकेय व विनायकची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन्यथा मंत्रालयावर ‘कांदाफेक’: विखे-पाटील

$
0
0

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा; पिंपळगाव बसवंतला शेतकऱ्यांचा रास्तारोको

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

दुष्काळ, पाणीटंचाई, कर्ज आदी समस्यांनी शेतकरी हैराण झाला असून त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे सरकारने जर शेतकऱ्यांना संपूर्ण कांदामाफी दिली नाही तर मंत्रालयावर कांदाफेक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, कांद्याला प्रती क्विंटल दोन हजार रुपये हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा करावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना आदींच्यावतीने सोमवारी सकाळी दहा वाजता पिंपळगाव बसवंत येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्तवाखाली झालेल्या आंदोलनात शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई-आग्रा महामार्गावर सुमारे दीड तास आंदोलन करण्यात आल्यानंतर निफाडचे विभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात आमदार डॉ. सुधीर तांबे, नरहरी झिरवाळ, निर्मला गावीत, जयंत जाधव, दिलीपराव बनकर, शिरीष कोतवाल, श्रीरात शेटे, देविदास पिंगळे, माणिकराव बोरस्ते, भास्करराव बनकर, प्रसाद हिरे, अॅड. रवींद्र पगार, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेद आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या आंदोलनाबाबत पोलिसांना पूर्वसूचना मिळाल्याने वेगळ्या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडले. कोणत्याही प्रकारे वाहतूक ठप्प झाली नाही.

विखे पाटील म्हणाले, भाजप-सेना सत्तेत आल्यापासून शेतकरी उद‌्ध्वस्त होत आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार अजून किती शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहत आहे. दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी होरपळत असताना सेना-भाजपचे मंत्री कुणी डाळ खात आहे तर कुणी चिक्की खात आहे. काही मंत्री जमिनी बळकावत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला निष्क्रिय असलेल्या सरकारला वेळ नाही. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आजचे आंदोलन केवळ शासनाला इशारा आहे. मात्र, आमच्या मागण्या मान्य न केल्यास मंत्रालयावर कांदाफेक करून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, भाजपचे सरकार बेशुद्ध पडले असून त्यांना कांदा सुंगविल्याशिवाय ते शुद्धीवर येणार नाही. भाजप हा शेठजींचा पक्ष असून त्यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस येऊ शकते. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शैक्षणिक फी माफ करावी अशा मागण्या त्यांनी केल्या. दिलीप बनकर म्हणाले, भाजप सरकार शेतमालाची बाजारव्यवस्था उद‌्ध्वस्त करू पाहत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शिरीष कोतवाल, अर्जुन बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले.

..तर मोदी लगेच येतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशात जाण्यासाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना वेळ नाही. दुष्काळ, पाणीटंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यास भेटही ते देऊ शकले नाहीत. मात्र, मराठवाड्याला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले, तर मोदी लगेच भेट द्यायला येतील, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावताच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपा आयुक्तांविरोधात मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मनपा आयुक्तांच्या कारभाराविरोधात तसेच मनपाने केलेल्या वाढीव मालमत्ता कर आणि नवीन वाढीव बांधकामांकडून सहापट घरपट्टी वसुलीच्या निर्णयाविरोधात मंगळवार, (दि. ७ जून) रोजी महानगरपालिकेवर दे धक्का मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी महापौर भगवान करणकाळ यांनी शहराचे विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्यावर जोरदार टीका केली. जनतेला आणि नगरसेवकांना वेठीस धरू नये. आमदार गोटे यांनाही शहराच्या विकासाबाबत जाब द्यावा लागणार आहे, असेही भगवान करणकाळ यांनी सांगितले.

'आयुक्त भोसले तुम्हाला जर थोडीसी सद्विवेक बुद्धी शिल्लक असेल तर त्वरित धुळे सोडून जा' असेही करणकाळ सांगितले. या मोर्चाचा समारोप सभेद्वारे करण्यात आला. मोर्च्यात शहरातील निरनिराळ्या भागातून शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांना निवेदन देण्यात आले.

धुळे शहरातील नागरिकांनी मनपामध्ये ७० नगरसेवकांना निवडून दिले आहे. आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला असतानादेखील आयुक्त मान्य करायला तयार नाहीत. याचबरोबर मनपा आयुक्त भोसले हे एका आमदाराच्या म्हणण्यानुसार नगरसेवकांना वेठीस धरत आहेत, त्यामुळे आता यांना धुळ्यातून बाहेर काढाच, असे मतही करणकाळ यांनी सभेद्वारे व्यक्त केले. माजी महापौर भगवान करणकाळ यांच्यासह हिरामण पाटील, सुनील चौधरी, युवराज चौधरी, गोंविद सांखला, मुन्ना पठाण, निंबा नागरे, हरीष अग्रवाल, महादू चौधरी, दिनेश वर्मा, श्रीकांत गिंदोडिया, शिवाजी सोनवणे, अनिल राऊत यांनी जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांना आयुक्तांविरोधात निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बांधकामाचे आकडेदेखील मी लिह‌ित होतो’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल योजनेसंदर्भातील मोजणी पुस्तकामध्ये केलेल्या नोंदी मी कार्यालयीन टिपणीमध्ये ठेवत होतो आणि त्यात बांधकामाचे मोजमाप व रक्कमेचे आकडेदेखील लिह‌ित होतो, अशी माहिती नगरपालिका अभियंता डी. एस. खडके यांनी दिली. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात खडके यांची उलटतपासणी सुरू आहे.

या उलटतपासणीत खडके यांनी, घरकुल योजनेच्या बांधकामाची मुदतवाढ देण्याची तरतूद योजनेच्या निविदा फार्ममध्ये आहे, अशीही उलटतपासणीत माहिती दिली. मंगळवारी (दि. ७ जून) रोजी आरोपीपक्षातर्फे अॅड. प्रमोद पाटील यांनी पुढील उलटतपासणीला सुरुवात केली. यानंतर अॅड. सुशिल अत्रे यांनी उलटतपासणीला सुरुवात केली. अत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना खडके म्हणाले, घरकुल योजनेचे कार्यालयीन कामकाज करताना माझ्यासोबत सहायक अभियंता म्हणून सुरेश भोळे हेदेखील काम करीत होते. मी व भोळे यांनी सादर केलेल्या टिपणी सादर करण्याव्यतिरिक्त आमच्यावर योजनेच्या कामावर देखरेख करण्याचे काम होते. घरकुल योजनेच्या सर्व टिपण्या या मी लिहिल्या होत्या की, माझे सहकारी भोळे यांनी हे आता सांगता येणार नाही. सहायक अभियंता म्हणून काम करताना कोणतीही तक्रार आली तर ती वरिष्ठाकडे करण्याची वेळ आली नव्हती, अशी माहितीही खडके यांनी उलटतपासणीवेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगराध्यक्षांच्या आदेशाचे पालन केले’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल योजनेबाबत सुनील सोनी समितीकडून आपल्यावर करण्यात आलेले आरोप आपण नाकारले होते. याप्रकरणी आपली अजूनही खाते अंतर्गत चौकशी सुरू आहे. मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडून देण्यात येणाऱ्या आदेशाचे पालन करणे हे आपले कर्तव्यच होते आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडली असल्याची माहिती जळगाव नगरपालिका सहायक अभियंता डी. एस. खडके यांनी धुळे जिल्हा विशेष न्यायालयात उलटतपासणीच्या वेळी दिली.

विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर जळगाव घरकुल प्रकरणाचे कामकाज सुरू आहे. त्यात सरकार पक्षाचे साक्षीदार सहायक अभियंता डी. एस. खडके यांची साक्ष नोंदवून उलटतपाणीचे कामकाज आरोपींच्या वकिलांकडून सुरू आहे. बुधवारी आरोपी जगन्नाथ वाणी यांचे वकील एस. के. शिरूडे यांनी उलटतपासणी घेतली. अॅड. शिरूडे यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खडके यांनी सांगितले की, खान्देश बिल्डर्सकडून नगरपालिकेला २ मार्च २००१ रोजी, अग्रीमबाबतचे पत्र देण्यात आले होते. या पत्रानुसार आणि ठराव क्रमांक ३६५ नुसार २६ नोव्हेंबर २००१ रोजी ठेकेदाराला साहित्य अग्रीम म्हणून दहा कोटींची रक्कम देण्यात आली होती.

सन २००१ पासून के. डी. पाटील हे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र, ते नेमके कोणत्या तारखेपासून व कोणत्या महिन्यात नगराध्यक्ष झाले हे आता सांगता येणार नाही. सोनी समितीने माझयाविरूध्द दोषारोप केले होते. त्यावर मी खुलासा सादर केला होता. सोनी समितीने केलेले दोषारोप व आरोप मी नाकारले होते. तसेच माझी घरकुलाबाबत खाते अंतर्गत चौकशी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे महापालिकेवर बरखास्तीची तलवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

धुळे महानगरपालिकेतील नगसेवकांचे भोगवटा प्रमाणपत्र, अतिक्रमण, काही वर्षांपूर्वी झालेल्या बोगस कामांच्या रेकॉर्डची तपासणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांचे दप्तर घेवून आयुक्त डॉ. नामदेव भोसले मुंबईला रवाना झाले आहेत. ते तपासणीचा अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करणार असून, या सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर मनपा बरखास्त होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्यावर अविश्वासचा ठराव आणला आहे. हा ठराव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतरही आयुक्तांनी मागे न हटता स्फूर्तीने काम सुरू केले आणि नगरसेवकांना अडचणीत आणण्यासाठी जुन्या प्रलंबित प्रकरणी चौकशी करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपायुक्त, सहायक आयुक्त, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी गेल्या काही वर्षांतील बोगस कामांच्या कागदपत्रांची तपासणी केली. नगरसेवकांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रात दिलेला पत्ता, त्यांच्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र आहे किंवा नाही तसेच मनपाच्या नोटिसांवर केलेले खुलासे, बोगस कामांची पूर्वी निघालेली बिले, क्षेत्रसभा व अन्य वादग्रस्त प्रकरणांची माहिती संकलित करण्यात आली.

या कागदपत्रांचे दप्तर घेऊन आयुक्त डॉ. भोसले नुकतेच मुंबईला रवाना झाले आहेत. ते नगरविकास विभागाकडे कागदपत्रे तपासणीचा अहवाल सादर करणार असून, मनपा बरखास्त करण्याची शिफारस केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश क्षमता ६० वरून १२० वर

$
0
0

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची प्रवेशप्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्यातील दिघी हिल्स येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेला कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ६० वरून १२० इतकी वाढविण्यास मान्यता दिली आहे. नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने ही मान्यता दिली असून, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून मान्यता लागू होणार आहे.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेला कॉम्प्युटर इंजिनीअरिंगला दिलेली मान्यता ही कायम विनाअनुदान तत्त्वावर राहणार आहे. याशिवाय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने विहित केलेल्या अटींची पूर्तता करणे संस्थेस बंधनकारक राहणार आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेला कॉम्प्युटर इंजिनीअरिंगला शासनाने विहित केलेल्या, तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा करारनामा संस्थेस करावा लागणार असून, संबंधित कागदपत्रांची पूर्तता तंत्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात येईल.

या संस्थेला अभ्यासक्रमाच्या संलग्नीकरणासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील तरतुदीनूसार संबंधित विद्यापीठाची मान्यता/ संलग्नीकरण घेणे आवश्यक राहील. या संस्थेला तंत्रशिक्षण संचालक यांच्याकडे आवश्यक ती संचित ठेव संयुक्त खात्यात भरून कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक राहील. शुल्क नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क संबंधित संस्थेने आकारल्यास अशा संस्थेवर महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूटशन (प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) अॅक्ट, १९८७ नुसार कारवाई करण्यात येईल. संस्थेने अभ्यासक्रम चालविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक व इतर तांत्रिक कर्मचारी यांची नियुक्ती, त्यांना नियमानुसार वेतन व भत्ते द्यावी लागतील. संस्थेला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मानकाप्रमाणे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना आयुक्तांचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या गाळ्यांमध्ये पोटभाडेकरू ठेऊन वरकमाई करणाऱ्या गाळेधारकांना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोमवारी अनपेक्षित धक्का दिला. डॉ. गेडाम यांनी एकाच दिवशी एक हजार कर्मचाऱ्यांची जमवाजमव करत गनिमी काव्याने पालिकेच्या ५८ व्यापारी संकुलातील दोन हजार गाळ्यांचे सर्वेक्षण केले. ऐनवेळी गाळ्यांच्या सर्वेक्षणाची कल्पना दिल्याने या तपासणी माेहिमेतून धक्कादायक माहिती समोर येणार आहे. सद्यस्थितीत या माहितीची पडताळणी व विश्लेषण केले जात असून दहा दिवसात वस्तुस्थिती जाहीर करणार असल्याची माहिती डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

प्रत्येक गाळ्याची चित्र‌ीकरणासह फुलप्रुफ तपासणी करून पालिकेच्या पथकांनी ५० हजार पांनाची माहिती जमवली आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी अतिशय गुप्तपणे स्मार्ट सिटीच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना जमवत, त्यांना ऐनवेळी गाळ्यांच्या सर्वेक्षणाची कल्पना दिल्याने धक्कादायक माहिती समोर येणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या फेरलिलावावरून सध्या वाद सुरू आहे. प्रशासनाने रेडीरेकनरने दरवाढ केल्याने गाळेधारक आक्रमक झाले होते. त्यामुळे फेरलिलाव, रेडीरेकनरने भाडेवाढ करण्याचा विषय हा महासभेत गेला होता. महापौरांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गटनेत्याची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी ही दरवाढ चुकीची असल्याचे सांगून नवीन प्रस्ताव ठेवण्याचे आदेश‌ित केले होते. त्यामुळे येत्या महासभेत हा विषय चर्चेला येणार असतांनाच आयुक्त डॉ. गेडाम यांनी गाळ्यांसदर्भातील वस्तुस्थिती महासभेवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आयुक्तांनी गुप्त मोहीम आखत सोमवारी गनिमी काव्याने गाळे तपासणीची मोहीम हाती घेतली.

अनेक गाळे हे नगरसेवकांच्या नातेवाईकांकडे आहेत. तर काहींमध्ये पोटभाडेकरू मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे आयुक्तांनी गुप्तपणे ही मोहीम राबवली. ५८ व्यापारी संकुलातील १९७३ गाळ्यांच्या तपासणीसाठी ९५९ कर्मचारी व ६८ टीमलिडरची टीम तयार करण्यात आली. सकाळी नऊ ते ११ दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. कर्मचाऱ्यांकडे सतरा प्रश्नांची प्रश्नावली देत, ती गाळेधारकाकडून भरून घेण्यात आली. पोटभाडकरू संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. तर शॉपअॅक्ट वीज कनेक्शनची माहिती घेण्यात आली. ही सर्व माहिती जमविण्यात आली असून तिचे निष्कर्ष सुरू असून दहा दिवसात जाहीर करणार असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना शेवटपर्यंत भनक लागू दिली नाही. स्मार्ट सिटीच्या प्रशिक्षणासाठी ९५९ कर्मचाऱ्यांना महाकवी कालीदास कला मंद‌िरात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कर्मचारी व अधिकारीही इमानेइतबारे उपस्थित राहिलेत. या ठिकाणी जवळपास ६८ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करण्यात आल्यात.

पोटभाडेकरूंनी काढला पळ

महापालिकेचे पथक अचानक गाळ्यांवर धडकल्यानंतर इतर पोटभाडेकरूंना या सर्व मोहिमेची माहिती समजली. त्यामुळे आपली पोल उघड होऊ नये म्हणून काही गाळेधारकांनी गाळे बंद करून धूम ठोकली. पथकाचा सामना करण्यासाठी पुरेसे कागदपत्रे नसल्याने काही जण गाळे बंद करून पसार झाले. सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने सोमवारीच तपासणी करावी अशी रणनीती आयुक्तांनी ठरविली होती. त्यानुसार मोहिमेचे कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी चित्र‌िकरण सुरू केले. त्यामुळे अनेक गाळेधारक घाबरले. त्यांनी थेट पोबारा करणेच पसंद केले.

रेड‌िरकनरला आयुक्तांचे उत्तर

प्रशासनाने रेड‌िरेकनरनुसार गाळ्यांची दरवाढ केल्यानंतर महापौरांनी गाळेधारका संदर्भात निर्णय घेण्यासाठी गटनेत्यांची समिती नियुक्त केली होती. या संदर्भात महापौरांच्या उपस्थिती बैठक झाली होती. यात पालिकेच्या गाळ्यांना रेड‌िरेकनर लावताच येत नसल्याचा दावा उपमहापौर गुरूमीत बग्गासह लोकप्रतिनिधींनी केला होता. त्यामुळे प्रशासन बॅकफूटवर आले होते तर आयुक्तही अनपेक्षित हल्ल्याने दुखावले गेले होते. लोकप्रतिनिधी व गाळेधारकांना उघडे पाडण्याचा चंगच प्रशासनाने बांधला होता. स्थायी व महासभेत पोटभाडेकरूवरून अगोदरच वांदग झाले होते. त्याचा धागा पकडत आयुक्तांना ही मोहीम फत्ते केली.













मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी जुलैअखेरपर्यंत पुरणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे दारणा धरणातील आरक्षित १३० दशलक्ष घनफूट पाणी मिळणे शक्य नसले, तरी गंगापूर धरणातून ३१ जुलैपर्यंत शहराला पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याचा दावा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गरज पडल्यास आणखी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदाला विनंती केली जाईल, अशी माहितीही गेडाम यांनी दिली. आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास त्याबाबतही नियोजन झाल्याचे त्यांनी सांग‌ितले.

महापालिकेचे दारणा व गंगापूर धरणात पाणी आरक्षण आहे. दारणा धरण सध्या तळाला गेले असून पालिकेचे अजूनही १३० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. परंतु, हे पाणी पालिकेला मिळणे आता मुश्कील आहे. त्यामुळे हे पाणी गंगापूर धरणातून मिळण्याचे प्रयत्न पालिकेचे सुरू आहे. ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठा होईल, असे नियोजन पालिकेने केले आहे. पाणी उचलण्याची यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. जॅकवेलपर्यंत पाणी पोहचविण्याच्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. गंगापूर मध्ये ४०५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या दररोज १० दशलक्ष घनफूट पाणी पालिका उचलत आहे. कपातीचे सात दिवस धरले तर हा साठा अजून ४८ दिवस पुरणार आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत चार ते पाच दिवसांचा गॅप राहणार असला तरी, तो भरून निघेल असा दावा आयुक्तांनी केला आहे. दारणाचे पाणी मिळाले नाही तरी ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. पाण्यासंदर्भात दररोज आढावा घेतला जात असून महापालिका पाणीपुरवठ्याबाबत रिलॅक्स असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिककरांना ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचाही दावा पालिकेकडून केला जात आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही आक्रमकतेचे धोरण स्वीकारले आहे. निवडणुकांसाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने सेनेच्या पठडीत तयार झालेले माजी आमदार वसंत गीते व सुनील बागुल यांना मैदानात उतरविले आहे. तसेच भाजपने विभागवार प्रचारसभा सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी स्थापना दिवस मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जंगी करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून भाजपलाच आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वीच सेना भाजपमधील शीतयुद्ध पेटले असून युतीची शक्यता आता धूसर झाली आहे.

महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये होत असून या निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या दोन्ही पक्षांनी सत्ताधारी मनसेचा पराभव गृहीत धरला असून महापालिका निवडणुका आपणच जिंकणार, अशा अविर्भावात त्यांनी राजकारण सुरू केले आहे. भाजपने प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेतल्यानंतर शिवसेनेने त्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा घेऊन जोरदार उत्तर दिले होते. सोबतच दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचेही प्रकार घडले होते. या घटनांमुळे भाजप व शिवसेनेतील वितुष्ट अधिक वाढले आहे.

येत्या निवडणुक‌ांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सेनेला शह देण्यासाठी नवी रणनीती आखली आहे. शिवसेनेच्या तालमीत तयार झालेले वसंत गीते आणि सुनील बागुल यांनाच शिवसेने विरोधात निवडणुकांच्या मैदानात उतरविले आहे.

वसंत गीते यांच्यावर महापालिकेची तर सुनील बागुल यांच्यावर जिल्हा परिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गीते यांनी भाजपला अपेक्षित कामही सुरू केले असून निवडणुकांच्या पाश्वभूमीवर पक्षाचे विभागवार मेळावे घेण्यासही प्रारंभ केला आहे. शिवसेनेला कसं घेरायचं आणि पक्षाचा प्रचार कसा करायचा याबातची सर्व रणनीती त्यांनी आखली आहे. मंडलवार मेळावे घेवून निवडणुकांची तयारी व सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे. गीते व शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी पक्षविस्तारासह स्वतंत्र निवडणुका लढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर, शिवसेनाही जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहे.

पालिकेवर भाजपचीच सत्ता येणार!

केंद्रात व महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून भाजपचा ध्वज फडकवावा यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागायला हवे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब यांनी केले. सानप यांच्यासह गीते, आमदार सीमा हिरे, सुनील बागूल, लक्ष्मण सावजी यांच्यासह मान्यवरांनी भाजप स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याचे भाकित करत, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेशच दिले आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images