Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आदिवासी विभागात आता नाइट ड्रेस घोटाळा

$
0
0

vinod.patil@timesgroup.com
tweet : vinodpatilMT

नाशिक ः कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर आदिवासी विभागाने बहुचर्चित स्वेटरचा ठेका नुकताच रद्द करण्यात आला असतानाच, आता या विभागात आणखी एक घोटाळा उघडकीस येतो आहे. या वेळी सरकारला अंधारात ठेवून २२ कोटींचे नाइट ड्रेस (टॉप व पायजमा) परस्पर खरेदी करण्यात आले आहेत. सरकारकडून वित्तीय खर्चाची मान्यता न घेताच पुण्यातील एका फर्मला खरेदी आदेश देऊन बिलही अदा करण्यात आले. तत्कालीन आदिवासी आयुक्तांच्या आदेशानेच हा सारा मामला घडल्याचे समोर येत आहे.

आदिवासी विभाग आणि घोटाळे असे समीकरण मागील काही वर्षांत पक्के झाले आहे. सरकार काँग्रेस आघाडीचे असले वा भाजपचे, आदिवासी विभागात गैरव्यवहारांची परंपरा मात्र सदैव कायम राहिली आहे. मग ती शालेय साहित्य असो वा स्वेटर खरेदी. ठेकेदार आणि अधिकारी संगनमताने आदिवासींऐवजी स्वतःचाच विकास करून घेतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सरकारने केवळ ई-निविदा काढण्यास परवानगी दिली असताना तत्कालीन आयुक्त बाजीराव जाधव, तसेच सोनाली पोंक्षे यांनी सरकारकडून खर्चाची वित्तीय मान्यता न घेता पुण्यातील श्री महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरिंग फर्मला नाइट ड्रेस खरेदीचे आदेश दिले. सोबतच ठेकेदारांची बिलेही अदा करण्यात आली. वास्तविक आदिवासी आयुक्तांना फक्त ५० लाखांच्या खरेदीचे अधिकार आहेत.

स्वेटर खरेदीपूर्वी उरकण्यात आलेली पावणेदोन लाख आदिवासी मुला-मुलींसाठीचे नाइट ड्रेस खरेदी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे. २२ कोटींची ही खरेदी तत्कालीन आयुक्त बाजीराव जाधव यांनी आपल्या अधिकारात केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आलेल्या तत्कालीन आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी या रकमेसाठी शासकीय मान्यता घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनीही शासकीय मंजुरी न घेताच परस्पर आपल्या अधिकारात ठेकेदारास बिलही अदा केल्याचे समोर आले आहे.

आदिवासी मंत्रालयाची अळीमिळी

सरकार पातळीवरून कोणतेही खर्चाचे आदेश न घेता ही खरेदी उरकण्यात आली. या साऱ्या प्रकारात काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची चर्चा दबक्या आवाजात विभागात होते आहे. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी मंत्रालयानेही अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही सर्व प्रक्रिया वादग्रस्त असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे.

प्रभारींचे प्रताप!

आदिवासी विभागाने २०१४ मध्ये आदिवासी मुला-मुलींना नाइट ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची निविदाप्रक्रिया एप्रिलमध्येच काढण्यात आली. या ड्रेस खरेदीसाठी २२ कोटी १६ लाख रुपये खर्च गृहीत धरून निविदा काढण्यास सरकारने मंजुरी दिली. मात्र, आर्थिक वर्ष संपण्याच्या दोन दिवस अगोदर प्रभारी पदावर असलेल्या बाजीराव जाधव यांनी घाईगडबडीत पुण्याच्या श्री महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरिंग फर्म या कंपनीला २७ मार्च २०१५ रोजी आपल्याच अधिकारात खरेदीचे आदेश दिले. प्रभारी पदावर असताना एवढ्या मोठ्या रकमेच्या खरेदीसाठी त्यांनी सरकारची परवानगी घेण्याची तसदी घेतली नाही. महत्त्वाचे म्हणजे स्वेटर खरेदीतही याच जाधवांभोवती संशयाची सुई फिरत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ते’ पैसे अखेर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली ५७ लाख रुपयांची रक्कम एनडीसीसी बँकेच्या शाखेत जमा करण्यात आली आहे. लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही रक्कम अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने ऑक्टोबर महिन्यात जप्त केली होती.

एसीबीने कोर्टाच्या आदेशाने ही रक्कम एनडीसीसीच्या पेठरोड शाखेत भरणा केली. २५ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी विजय सीताराम निकम, दिगंबर हिरामण चिखले व अरविंद हुकूमचंद जैन यांना रोकडसह पकडले होते. चौकशीअंती हे पैसे बाजार समिती कर्मचाऱ्यांचे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बळजबरीने स्वाक्षऱ्या घेऊन तसेच बँकिंग नियम पायदळी तुडवून पैसे काढण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशीत समोर आले. एवढेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक करण्यात आल्याने संशय दाटला. आजमितीस एसीबीची चौकशी सुरूच असून, कोर्टाच्या आदेशाने सदर रक्कम एनडीसीसी बँकेत जमा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कॉलेजातही मिळणार जेनेरिक औषधे

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com
Tweeter : @jitendratartemt

नाशिक : रामायणकालीन आपत्कालीन प्रसंगात अचाट बलाने दिव्य संजीवनी आणण्याचा भीमपराक्रम करणाऱ्या महाबली हनुमंताचे जन्मस्थान अंजनेरी पर्वताच्या कुशीतील जनतेला आता फार्मसी कॉलेजमधून स्वस्तातील जेनेरिक औषधे मिळणार आहेत. बाजारपेठेतील इतर औषधांच्या तुलनेत या औषधांच्या किमती सुमारे ७० टक्क्यांनी कमी असतील, असा दावाही करण्यात येत आहे. शिवाय फार्मसी कॉलेजमध्ये जेनेरिक औषध वितरणाचे केंद्र सुरू करण्याचा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्यांदाच राबविला आहे.

नाशिकनजीक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी डोंगराच्या कुशीत त्र्यंबकेश्वरसह आदिवासी परिसर मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी औषधोपचारांसाठी ग्रामस्थांना शहर गाठण्याशिवाय पर्याय राहत नाही. शेती व मजुरी करणाऱ्या या ग्रामस्थांसाठी अनेकदा जीवनदायी महागडी औषधे विकत घेणेही आवाक्याबाहेर असते. परिसरातील ही परिस्थिती लक्षात घेत सपकाळ नॉलेज हबच्या फार्मसी कॉलेजने प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासंदर्भातील प्रस्तावास सरकारच्या विविध संबंधित विभाग आणि मंत्रालयाच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत. यामुळे आता लवकरच अंजनेरीसारख्या दुर्गम भागात कार्यरत फार्मसी कॉलेजमधून नागरिकांना अल्प दरातील जेनेरिक औषधे उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रवींद्रनाथ सौदागर यांनी दिली.

या केंद्रासाठी ‘बीपीपीआय’, ‘डीपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स’, ‘मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स आणि फर्टिलायझर्स’, ‘भारत सरकार’, ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली’ यांच्या निर्देशानुसार व ‘अन्न व औषध प्रशासन विभाग’, महाराष्ट्र राज्य या संस्थांच्या परवानग्या या केंद्रस्थापनेसाठी मिळाल्याचे डॉ. सौदागर यांनी सांगितले.

७० टक्क्यांपर्यंत किमतीत फरक

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेंतर्गत बाजारपेठेतील औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधे तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी दराने मिळू शकतील, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे. जेनेरिक औषध केंद्रांची उपलब्धता प्रामुख्याने शहरी वस्तीत जास्त प्रमाणात आहे. दुर्गम भागात व त्यातही फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून अशी केंद्रे अपवादानेच आढळतात. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.

काय आहेत जेनेरिक औषधे?

औषधांचे मूळ नाव धारण करून बाजारपेठेत दाखल होणारी औषधे प्रामुख्याने या गटात मोडतात. ब्रँडेड व जेनेरिक औषधांचे गुणधर्म एकच असले तरीही केवळ मार्केटिंग, अॅडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंगसारख्या विक्रीवर्धक साखळीत जेनेरिक उत्पादने अडकत नसल्याने ही औषधे अन्य औषधांपेक्षा सुमारे ३० ते ७० टक्क्यांनी स्वस्त मिळतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्ती मोहीम सोमवारपासून

$
0
0

शहरातील घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर धडक कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासंदर्भात दिलेल्या मुदतीत करांचा भरणा न करणाऱ्या शहरातील १७ हजारांपेक्षा अधिकच्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा भरण्याची संधी असतांनाही थकबाकीदारांनी बाकी भरलेली नसल्याने अशा कर चुकव्यांविरोधात सोमवार (दि. १९) पासून जप्तीची मोहीम सुरू करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या सहा विभागात सहा जप्ती पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जप्ती कारवाईचा पहिला बडगा हा बड्या थकबाकीदारांवर उगारला जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त रोज या जप्ती मोहिमेचा आढावा घेणार असून पालिकेच्या खडखळाट झालेल्या तिजोरीला या जप्ती मोहिमेतून दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी, या नोटा विविध कर भरण्यासाठी वापरता येतील, असे आदेश दिले होते. त्याचा चांगला फायदाही पालिकेला झाला होता. जवळपास घरपट्टी व पाणीपट्टीतून जवळपास २० कोटींच्या वर रक्कम जमा झाली होती. पाचशेच्या नोटा भरण्याची १५ डिसेंबर शेवटची मुदत होती. त्यामुळे पालिकेने थकबाकीदारांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. परंतू, या योजनेचा फायदा जास्त थकबाकीदारांनी घेतलेला दिसत नाही. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांसह चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टीसह एमटीएसचा भरणा करण्याचे आवाहन केले होते. त्याचा लाभ चालू वर्षाच्या मालमत्ताधारकांनी घेतला असला तरी, थकबाकीदारांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची यादीच पालिकेने तयार केली असून, त्यांची संख्या सोळा हजारांच्यावर आहे. या सर्वांकडे पालिकेला जवळपास ६० कोटी रुपयांची रक्कम थकित असून, यात बड्या थकबाकीदारांसह शहरातील बड्या आसामींचाही समावेश आहे.

महापालिकेने या थकबाकादांसाठी सोमवारपासून विशेष जप्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व अशा विभागात सहा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामार्फत दररोज जप्ती मोहीम राबविली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या निगरानीखाली ही कारवाई सुरू करण्यात येणार असून पथकाला रोज आपला अहवाल मुख्यालयाला द्यावा लागणार आहे. या कारवाईमुळे खाली असलेल्या तिजोरीला हातभार लागणार आहे.


बडे थकबाकीदार रडारवर

सोमवारपासून सुरू होणाऱ्या मालमत्ताकर वसूलीच्या कारवाईत सुरुवातीस व्यावसायिक मालमत्तांवर कारवाई केली जाणार आहे. जास्त थकबाकी असलेल्या व्यावसायिक मालमत्ताधारकांची प्राधान्यक्रमाने यादी तयार करण्यात येत असून प्रथम त्यांच्यावरच जप्तीची कारवाई केली जाणार आहे. या थकबाकीदारांमध्ये व्यावसायिक, व्यापारी, उद्योगपती तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पालिकेने प्रथम बडे थकबाकीदार रडारवर घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाताळसाठी पालटतेय चर्चचे रुपडे...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात नाताळच्या तयारीला वेग आला असून, शहरातील सर्व चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यासह सजावटीचे नियोजन पूर्णत्वास आले आहे. सर्वच चर्चमध्ये प्रभू येशूचे दर्शन व प्रार्थनेसाठी गर्दी होणार असल्याने त्याचेही नियोजन सुरू असून, बाजारपेठांमध्येही खरेदीची धामधूम दिसून येत आहे.

नाताळ सण शहराच्या विविध भागात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. नेहरूनगर येथील बाल येशू मंदिर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असल्याने देशभरातील भाविक आतापासूनच येथे दर्शनासाठी येत आहेत. दि. २४ व ३१ रोजी येथे दहा वाजता मिस्सा प्रभूची प्रार्थना होणार आहे. ख्रिस्त जन्मोत्सवाचा गव्हाणीचा देखावा येथे सादर करण्यात आला असून, मदर मेरी व देवदूतांच्या मूर्ती बच्चेकंपनीचे आकर्षण ठरत आहेत. सेंट आंद्रिया चर्च, शालिमार येथील सेंट थॉमस चर्च, जेलरोडचे अण्णा चर्च इत्यादी ठिकाणी बैठका होऊन कोणत्या दिवशी कोणत्या कार्यक्रमाची आखणी करायची याची तयारी झाली आहे. या सर्व ठिकाणी २४ डिसेंबरच्या मध्यरात्री मिस्सा विधी होणार आहे. चर्चप्रमाणेच घरोघरी फराळाची तयारी सुरू झाली असून, सणाच्या वातावरणामुळे परिसर चैतन्यदायी बनला आहे. अनेक चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा सादर केला जाणार असून, घराबाहेर ताऱ्याचा आकाशकंदील लावण्यात येणार आहे. आप्तस्वकीयांना फराळासाठी निमंत्रण देण्यास घराेघरी प्रारंभ झाला आहे.

आंतरधर्मीय प्रार्थना

नाताळनिमित्त नेहरूनगर येथील बाल येशू प्रार्थना मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मिस्सा, ख्रिसमस कॅरॉल साँग्स, प्रभू येशूची प्रार्थना आदी कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे आंतरधर्मीय प्रार्थनादेखील आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील विविध मान्यवरदेखील उपस्थित राहणार आहेत.


मातृत्व, स्त्री गौरव दिन

भारतीय एकात्मता समितीतर्फेदेखील नाताळ साजरा करण्यात येणार असून, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा समारंभ संत आंद्रिया चर्च येथे होणार आहे. मातृत्व दिन व स्त्री गौरव दिनदेखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ‘मैं औरत हूँ’ या एकपात्री प्रयोगाचेही आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी छेडले धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी मुलांच्या वसतिगृह बांधकामाची चौकशी व्हावी, काम बंद झाल्याची कारणे तपासून संबंधितांवर कठोर कारवाही करावी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत, स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी अँटी करप्शन अण्ड क्राईम कंट्रोल समितीचे पदाधिकारी आणि काही विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीबाहेर धरणे आंदोलन केले. कळ्वणचे प्रकल्पाधिकारी तथा प्रांत डी. गंगाथरण, सहाय्यक प्रकल्पाधिकारी एस. टी. बागुल यांना निवेदन देण्यात आले.

एक दिवसीय धरणे आंदोलनाला कळवण, सुरगाणा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला असून, प्रकल्पाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भेटीत याबाबत संबंधितांना नोटिसा पाठवण्याचे व माहिती जाणून घेत कारवाई करण्याचे संकेत दिले.

सुरगाणा शहर व करंजुल (क), उंबरठाण येथील बंद पडलेल्या वसतीगृह बांधकाम बाबत चौकशी करावी व हे बांधकाम त्वरित चालू करावे याबाबत बांधकाम खात्याच्या अभियंता, उपअभियंता यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याबाबत संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्पाधिकारी यांनी दिले. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. मात्र पंधरा दिवसात आश्वासन पूर्ण न झाल्यास नाही आदिवासी आयुक्तालयाबाहेर पुढील आंदोलन छेडले जाईल, असे आंदोलकांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष नरेंद्र देशमुख, सेक्रेटरी राहुल आहेर, दौलत भोये, तुळशीराम खोटरे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थांनी तारले खातेदारांना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नोटाबंदीमुळे नागरी व राष्ट्रीय बँकांपुढील रांगा अद्याप हटायला तयार नाहीत. मात्र कळवण, देवळा शहरातील बहुतांश पतसंस्थांनी कोणत्याही बँकेची आर्थिक मदत ने घेता दैनंदिन अल्पबचतीच्या पैशांच्या बळावर खातेदार, सभासदांना पैसे उपलब्ध करून दिल्याने अनेक खातेदार, सभासदांना त्याचा फायदा होत आहे.

रिझर्व बँकेने जिल्हा सहकारी बँका, पतसंस्थांवर मर्यादा घालून दिल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी यांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन आपले आर्थिक व्यवहार करावे लागत आहेत. शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र, युनियन, बँक ऑफ इंडिया, देवळा येथील देना बँकमध्ये खातेधारकांची गर्दी होत असून यात सर्वाधिक संख्या शेतकऱ्यांचीच असते. सध्या इतर सहकारी बँका व पतसंस्था यांचे आर्थिक व्यवहार मर्यादित झाल्याने सर्वांचीच धाव राष्ट्रीयकृत बँकांकडे आहे. या बँकांमध्ये गर्दीचा उच्चांक वाढत असताना कळवण, देवळा शहरातील पतसंस्थांनी आपल्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांची कुचंबणा होऊ नये म्हणून दैनंदिन अल्पबचतीच्या गोळा झालेल्या पैशांच्या माध्यमातून गरजेपरता रक्कम देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
पतसंस्थांच्या बँकर्समार्फत हक्काचेच मूबलक चलन मिळत नसले तरी जिल्हा बँका, पतसंस्थांवरील नोटाबंदीनंतर लादलेले निर्बंध उठतील तेव्हा उठतील. मात्र सहकारक्षेत्र टिकवून ठेवण्याचे, खातेदारांना पैसे उपलब्ध करून देण्याचे काम कळवण व देवळा शहरातील पतसंस्था करीत असून त्यांच्या कामकाजाचे निश्चित कौतुक केले पाहिजे.
- अशोक जाधव, संचालक, जिल्हा पतसंस्था फेडरेशन

पतसंस्थांचे अनेक सहकारी, खासगी, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कोट्यवधी रुपये ठेवीच्या, चालू खात्याच्या माध्यमातून जमा आहेत. नोटाबंदीमुळे हा पैसा अडकून पडला आहे. देवळा शहरातील पतसंस्थांकडून दैनंदिन अल्पबचतीच्या गोळा झालेल्या पैशांतून सभासद, खातेदार, ठेवीदारांच्या आर्थिक गरज भागविल्या जात आहेत. लवकरात लवकर पतसंस्थांवरील आर्थिक निर्बंध उठविण्याची गरज आहे.
- भारत कोठावदे, संस्थापक अध्यक्ष, अमृतकार पतसंस्था, देवळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रन फॉर पीस’ मॅरेथॉनची वेबसाइट सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहर पोलिसांकडून आयोज‌ित होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचे पडघम वाजले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी पोलिस दलाने एक वेबसाइट सुरू केली असून, महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते तिचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे महापौरांसह आणखी काही स्पर्धकांनी लगेच नावनोंदणी देखील केली.
शहर पोलिस दलातर्फे मागील वर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यंत्र व मंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्ये खेळ संस्कृती बहरत असून, त्याचा संदेश जगभरात देण्यासाठी या मॅरेथॉनची सुरुवात तत्काल‌िन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केली. नाशिक शहराची एक चांगली छबी जनमाणसात रुजावी, असा जगन्नाथन यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा मानस होता. जगन्नाथन यांच्या बदलीनंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनीही हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला. १२ फेब्रुवारी रोजी गोल्फ क्लब मैदान येथे आयोज‌ित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी http://nashikpolice21k.in/ ही वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटचे उद्‌घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद शंभरकर, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, के. के. वाघ कॉलेजचे अजिंक्य वाघ, पोलिस आयुक्त सिंघल, पोलिस उपायुक्त दत्तात्रय कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नाशिक शहर खेळाडूंची खाण असून, पोलिस आपली जबाबदारी सांभाळत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याने हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे महापौर मुर्तडक यांनी म्हटले. मागील वर्षी घाईगर्दीत आयोजन झाले होते. तरीही १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पोलिस आणि नागरिकांमध्ये यानिमित्ताने सुरू झालेला संवाद आता पुढे सरकत असून, सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. गेल्या वर्षी ऑलिम्प‌िक तयारीमुळे मला मॅरेथॉनमध्ये सहभागी होता आले नाही. यंदा मात्र मी स्वतः स्पर्धेत सहभागी होणार असून, इतरांना यासाठी प्रेरीत करणार असल्याचे कविता राऊतने स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस आयुक्त सिंघल यांनी स्पर्धेच्या आयोजनात जीव तोडून मेहनत घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. चांगला उपक्रम असून, तो पुढे न्यायच ा हे मी खूप दिवसांपूर्वी ठरवले होते. स्पर्धेच्या आयोजनात व्यावसायिकता आणण्यासाठी प्रयत्नशील असून, नाशिकची खेळ संस्कृती यानिमित्ताने जगभरात पोहचवण्याचे काम याद्वारे होणार असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. पोलिस दलातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्पर्धेची तयारी सुरू करून सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिमुकल्या शास्त्रज्ञांनी जिंकली मने

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ४२ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड, मालेगाव, घोटीला ४२ व्या विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांनी आपली शास्त्रीय जिज्ञासा जागवत विविध उपकरणे तयार करत सादर केली. चिमुकल्यांनी तंत्रज्ञानाची सांगड घालत आपली उपकरणे यात मांडली. उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना प्रोत्साहित केले.



जिल्ह्यात ठिकठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

‘संशोधक वृत्ती रूजविण्यासाठी प्रदर्शन’

मालेगाव ः छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठे संशोधन जन्म घेते, अनेक संशोधकांनी आपल्या बालवयात विज्ञानाची आवड जोपासली म्हणून जगाला विज्ञानाचे चमत्कार पाहायला मिळाले. अशीच संशोधक वृत्ती विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती भरत पवार यांनी केले.

तालुक्यातील जळगाव निंबायती येथील पाटील विद्यालयात आयोजित ४२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद््घाटनाप्रसंगी बोलत होते. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे व मोठे यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विज्ञान प्रदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमवेत शेतकऱ्यांनादेखील त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने येथील खैरनार बंधूनी मृदा परिक्षण फिरती प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. ‘राष्ट्र निर्माणासाठी विज्ञान तंत्रज्ञान व गणित’ ही यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाची मुख्य संकल्पना होती. दिवंगत रोधू आण्णा पाटील विज्ञान नगरीत उद््घाटनाप्रसंगी अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कासुताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी डी. एस. गायकवाड , विस्तार अधिकारी टी. व्ही. पवार, सरपंच रोहू आहिरे ,प्राचार्य आर. आर. बागल, पर्यवेक्षक जी एस फसाले उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. डी. काळे यांनी केले तर आभार प्राचार्य एम. एम. पवार यांनी मानले.

‘विज्ञान आणि भारत हे एक समीकरण’

घोटी ः जगभरात नावाजलेल्या शास्रज्ञामध्ये आज भारतीयांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळेच विज्ञान आणि भारत हे समीकरण झाले आहे. विज्ञानात भारतीयांचे योगदान मोलाचे आहे. भारतीय वैज्ञानिकांचे विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे. विज्ञान आणि संशोधनात विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अलका जाधव यांनी केले.

इगतपुरी पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घोटी येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ४२ व्या इगतपुरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचा उद््घाटन सोहळा झाला. प्रदर्शनाचे उद््घाटन मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, भाऊसाहेब खातळे, पांडुरंग वारुंगसे, प्राचार्या लता देवरे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी अहिरे, प्राचार्य हरिभाऊ अहिरे उपस्थित होते.


बाल वैज्ञानिकांची भरली जत्रा

मनमाड ः मनमाड शहरातील सेंट झेवियर्स विद्यालयात बाल वैज्ञानिकांच्या भरलेल्या जत्रेत चिमुकल्या शास्त्रज्ञांनी आपल्या विविध विज्ञान प्रतिकृतींनी सर्वांची मने जिंकली. प्रदर्शनात पाण्यापासून शेतीच्या अवजारापर्यंत आणि लोकसंख्येपासून ते बेटी बचाव पर्यंत विविध प्रतिकृती सादर करण्यात आल्या. प्रदर्शनाचे उद््घाटन सेंट झेवियर्सचे पदाधिकारी फादर जॉन मिस्किटा यांच्या हस्ते झाले, अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती सुरक्षा केसकर होत्या. व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी विजयालक्ष्मी आहिरे, एस. बी. कोठावदे, शैला पेगाड़ो, मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया, उपस्थित होते. दिलीप देवरे यांनी प्रास्ताविक तर अनिल निकाळे यांनी परिचय करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार खून प्रकरणी महिलेस पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर कॉलनी भागात राहणाऱ्या सुशांत बच्छाव या कामगाराचा खुनाच्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अर्चना जाधव या महिलेस कोर्टाने १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सातपूर कॉलनीत नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या जाधव कुटुंबीयांतील अनेकांना चौकशीसाठी सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, कामगार बच्छावच्या खुनात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींचा अद्याप पोलिसांना सुगावा लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपचाराच्या वेळी मयत झालेला कामगार सुशांत याला जबर मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. सुशांत ज्या घरात भाड्याने राहत होता त्या ठिकाणी स्टेट बँकेचे एटीएम आहे. यात पोलिसांनी अधिक माहितीसाठी एटीएमला लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज घेतल्यास त्याचा निश्चित तपासाला फायदा होणार आहे. त्यातच पोलिसांनी संजय जाधव यास चौकशीसाठी बोलवले असल्याचे सांगितले जात असले तरी तो अद्याप पोलिसांच्या समोर आला नसल्याने खुनाचे गूढ आणखी वाढले आहे. खुनाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जगन्नाथ गायकवाड करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस जुगाराला चाप!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhav

नाशिक : नोटाबंदीनंतर कॅशलेस सोसायटीचे वारे जोमात वाहत आहे. कुठे ऑनलाइन पेमेंट, तर कुठे मोबाइल बँकिंगचा जोर. क्रेडिट किंवा डेबिट कार्डाचा वापर सर्रास होताना दिसतो. नोटाबंदीमुळे जुगार खेळणारे, बेटिंग करणाऱ्यांना चाप बसला. यावर पर्याय म्हणून या महाभागांनी क्रेडिट कार्डाचा वापर सुरू केला. ही बाब लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांना क्रेडिट कार्डाचा वापर करता येणार नाही, असा आदेश दिला आहे. एवढेच नव्हे, तर असे निदर्शनास आल्यास संबंधित कार्ड लागलीच बंद करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयाने काय फरक पडला, यावर सध्या बराच खल सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्ती आपआपल्या परीने आर्थिक किल्ला लढवताना दिसतात. यात, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारे दोन नंबरचे धंदेही सापडलेत. कॅसिनो, लॉटरी, अनधिकृत कॉल बॅक सिस्टिम तसेच बंदी असलेली मासिके खरेदी यांच्या व्यवहारात मंदी आली. शेवटी या व्यावसायिकांनी ऑनलाइन प्रणालीचा पर्याय निवडला. विशेषतः क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून रोज कोट्यवधींचे व्यवहार पार पडत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निर्दशनास आले आहे. अनधिकृत व्यवहारांना याद्वारे प्रोत्साहन मिळत असून, ही बाब घातक असल्याने अशा व्यवहारांना पायबंद घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. याबाबत बँक व्यवस्थापनांना रिझर्व्ह बँकेने आदेश दिले आहेत.

यापुढे क्रेडिट कार्डवर लॉटरी तिकिटे खरेदी करता येणार नाहीत, तसेच कॉल बॅक सर्व्हिस, बेटिंग किंवा जुगाराबाबत इतर व्यवहारही करता येणार नाहीत. एवढेच नव्हे, तर देशात बंदी असलेल्या मासिकांची खरेदीसुद्धा क्रेडिट कार्डाद्वारे करता येणार नाही. देशातील अनेक मोठ्या कसिनो, हॉटेल्समध्ये हे उद्योग चालतात. वेबसाइटच्या मदतीने खरेदीप्रक्रिया पार पाडली जाते.

...तर कार्ड कायमस्वरूपी ब्लॉक

फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट १९९९ (फेमा)मधील तरतुदीनुसार क्रेडिट कार्डधारकास प्रतिबंधित व्यवहार करण्यास मनाई असल्याने रिझर्व्ह बँकेने हे आदेश दिले असल्याचे राष्ट्रीयीकृत बँकेतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित कार्ड लागलीच बंद करण्यात येईल, तसेच वापरकर्त्याला पुन्हा क्रेडिट कार्ड दिले जाणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हे टाळावेच लागेल!

- क्रेडिट कार्डावर लॉटरी तिकीट खरेदी
- बंदी असलेली मासिकांची खरेदी
- कसिनोत क्रेडिट कार्डचा वापर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९२ कोटींचे रस्ते तपासणीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शहरातील १९२ कोटींच्या रस्त्यांच्या कामासंदर्भात तक्रारी आल्याने महापालिका आयुक्तांनी या कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहस्थाच्या धर्तीवर खासगी संस्थेमार्फत या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. स्थायी समितीतही या कामासंदर्भात काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. खासगी संस्थेकडूनच या रस्त्यांची गुणवत्ता तपासली जाणार असल्याने बांधकाम विभागाला धडकी भरली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने महासभेत शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण,अस्तरीकरण व खडीकरणसाठी तब्बल १९२ कोटींच्या विशेष खर्चाला मंजुरी दिली होती. त्या बजेटमध्ये तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर झपाट्याने सध्या ही कामे सुरू आहेत. यातील शंभर कोटींच्यावर कामे ही डांबरीकरणाची आहेत. परंतू, मनसेच्या या ड्रीम प्रोजेक्टसंदर्भात काही नागरिकांसह भाजपच्या सदस्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत, या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सिंहस्थातील चारशे कोटींच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणीही त्रयस्थ खासगी संस्थेमार्फत करण्यात आली होती. त्याच धर्तीवर के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज, शासकीय आयटीआय संस्था व मेरीसारख्या संस्थांकडून ही चौकशी करण्यात येणार असून त्यांसदर्भातील कारवाईही सुरू केली आहे. या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासला जाणार असून नियमाप्रमाणे काम केले की नाही, याचा अहवाल बांधकाम विभाग घेणार आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेली गडबड समोर येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडाच्या रकमेत एक कोटीने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक पोलिसांनी यंदा दंड वसुलीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, गत वर्षाच्या तुलनेत दंडाच्या रक्कमेत तब्बल एक कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. १४ डिसेंबरपर्यंत दंड वसुलीचा आकडा दोन कोटी २३ लाख २० हजार ९०० रुपये इतका झाला असून, आगामी १५ दिवसांत हा आकडा अडीच कोटींपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

शहरात वाहनांची संख्या प्रचंड गतीने वाढत असून, यामुळे वाहतूक नियमांची सर्रास पालमल्ली होताना दिसते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गत काही वर्षांपासून दंडात्मक कारवाईवर जोर दिला आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारने मोटार वाहन नियमातील तरतुदींमध्ये बदल केला असून, यामुळे दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ झाली आहे. जानेवारी ते १४ डिसेंबर या कालावधीत तब्बल एक लाख ९६ हजार ९२६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई झाली. तेच गत वर्षात हे प्रमाण अवघे एक लाख १५ हजार ८३९ इतके होते. या वर्षात वाहतूक विभागाने एक कोटी २२ लाख २० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा हा आकडा एक कोटी रुपयांनी वाढला आहे. वाहनांच्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, वाहनचालकांची मानसिकता, वाहनांची वाढती संख्या अशा कारणांमुळे हा आकडा वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेल्मेटचा दणका

शहर वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून हेल्मेट सक्तीबाबत जोर लावला आहे. बुधवारी दिवसभरात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १९४ दुचाकी चालकांकडून तब्बल ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाई सुरू झाल्यापासून एक हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर कारवाई झाली असून, नियमांचे पालन करण्यावर भर दिला तर दंडात्मक कारवाईचे कटू प्रसंग टाळता येतील, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.

चार दिवसात ई चलन कार्यान्वित

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर स्वाइप मशिन उपलब्ध करून देणाऱ्या शहर पोलिस दलातर्फे पुढील चार दिवसांतच ई-चलन सुरू करण्यात येणार आहे. गेट वे पेमेंटच्या काही तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागल्यामुळे हे काम रखडले होते. आता सर्व बाबी अंत‌िम टप्प्यात असून, चार दिवसांत पहिले ई-चलन फाडले जाईल, असे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिसांनी आपला मोर्चा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवला आहे. ‘ई-चलन’ हा त्याचाच भाग असून, यामुळे वाहतूक पोलिसांसह वाहनचालकांनाही सोयीस्कर ठरणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ई-चलन पध्दतीचा वापर मर्यादीत होणार असून, विशेषतः पार्किंग नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे ई-चलन फाडले जाणार आहे. बेशिस्त पध्दतीने वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस जागेवर दंडात्मक कारवाई करतात किंवा ही वाहने उचलून शरणपूर रोडवरील वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा केली जातात. यामुळे वाहनांचे नुकसान होणे तसेच आर्थिक गैरकारभार होणे याविषयी तक्रारी येतात. विशेषतः चारचाकी वाहनमालकांकडून ही ओरड नेहमीच होते. या पार्श्वभूमीवर ई-चलन ही पध्दत फायदेशीर ठरू शकते. ई-चलन फाडलेल्या वाहनचालकास थेट घरीच नोटीस मिळणार असून, त्यात दंडाची रक्कम व कारवाईची इतर माहिती नमूद असेल. नोटीस मिळाल्यानंतर ठराविक दिवसांत दंडाची रक्कम भरली गेली नाही, तर वाहनचालकास थेट कोर्टात पाठवण्यात येईल.

ई-चलन पुढील दोन-चार दिवसांत सुरू होईल. वाहतुकीला शिस्त लागावी व हे करताना वाहतूक पोलिसांसाठी सोयीस्कर पध्दत असावी, या दृष्टीने उपाययोजना राबवल्या जात आहेत. दंडाचा आकडा प्रचंड वाढलेला दिसत असला तरी यामुळे वाहनचालकांचा बेशिस्तपणा अधोरेख‌ित होतो. पुढील वर्षी हा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो. वाहनचालकांनी शिस्त पाळली तरच दंडाचा आकडा कमी होईल.

-विजय पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्मविश्वासाने गड सर करा

$
0
0

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

अल्पसंख्याक म्हणून स्वत:ला संबोधून सरकारी मदतीवर विसंबून न राहता ध्येय मनाशी बाळगून फक्त मीच विजेता हे तंत्र जोपासत स्वत:मधील ताकद ओळखल्यास यश संपादन करणे निश्चित असते, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

नॅशनल सिनिअर कॉलेजचे स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे उद््घाटन राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १५) सकाळी झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल श्रीनिवास पाटील बोलत होते.

राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी, स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास महत्त्वाचा घटक आहे. मुलाखातकाराची आवडनिवड ओळखून सकारात्मक दृष्टीकोनातील उत्तरे देण्याचे कलागुण स्वत:जवळ असल्यास मग कोणीही स्पर्धक उमेदवाराला नाकारू शकणार नाही. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्याचे संपूर्ण ज्ञान बरोबरच आवडही तितकीच महत्त्वाची असते. मुस्लिम समाजातील मुलींची उच्च शिक्षणाचे वाढते प्रमाण निश्चितच भूषणावह असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजात होत असलेली शैक्षणिक क्रांती समाजाला उच्च शिखरावर नेईल, असा विश्वास असल्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शेवटी सांगितले.

संस्थेचे सचिव प्रा. जाहिद शेख यांनी प्रास्ताविक केले. तर संस्थाध्यक्ष हाजी बबलू पठाण यांनी अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकारी मदत मिळाली तर निश्तिच प्रगतीचा पल्ला गाठू, असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी नात-ए-पाक, व कुरआन श्लोक विद्यार्थ्यांनी सादर केले. सूत्रसंचालन सज्जाद हैदर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. जवाद एस. खान यांनी मानले.

खतिब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतिब, अलिम शेख, अॅड. एजाज सय्यद, हबीब खान, सलिम सय्यद, एजाज काझी, रऊफ पटेल, उपप्राचार्य डॉ नुर-ए-इलाही, मुख्याध्यापक सादीक शेख, मुख्याध्यापिका शाहीन खान यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षबागांवर घोंगावतेय संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आधीच नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. परिसरातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या बदलाचा द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. सतत ढगाळ हवामान तयार होत असल्याने बहरात असलेल्या द्राक्ष पिकावर त्याचा विपरित पर‌िणाम होण्याची भीती आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून किनारपट्टीवर वादळ धडकल्याने त्याचे परिणाम राज्यातील हवामान बदलावर झाले आहेत. द्राक्ष उत्पादकांचे माहेरघर म्हणून ख्याती असलेल्या नाशिक जिल्ह्यात या हवामान बदलाने बागायतदारांना चिंतेत टाकले आहे. अंतिम टप्यात असलेला द्राक्ष हंगाम यामुळे कचाट्यात सापडला आहे. द्राक्षबागांवर लाल कोळी, तुडतुडे, भुरीसह चिकट्याचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी रोगप्रतिकारक औषधांच्या फवारणीसाठी धावाधाव करीत आहेत.

जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, नाशिक, मालेगाव, सटाणासह येवला, सिन्नर तालुक्याच्या काही भागात द्राक्ष बागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्षबागांची डिपिंग, थिनिंग तसेच परिपक्वता येण्यासाठी पोषक घटकांची मात्रा देणे अशी कामे सुरू आहेत. एकिकडे चलनाच्या तांत्रिक तुटवड्याने वैतागलेले शेतकरी आता निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडले आहेत.

दोन दिवस धोक्याचे
दरम्यान ढगाळ हवामान अजून एक दोन दिवस राहणार असल्याचे खासगी हवामान संकेतस्थळावरील माहितीद्वारे स्पष्ट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. त्यानंतर हवामानात बदल होवू शकतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नामको’चे रेडिएशन सेंटर लवकरच

$
0
0

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते होणार उद््घाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कॅन्सर हॉस्पिटलमधील अत्याधुनिक क्रिष्णा डायग्नोस्टिक सेंटर आणि लिनियॅक रेडिएशन विभागाचे उद््घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख यांनी दिली.

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पेठरोडवरील कॅन्सर हॉस्पिटलचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आले असून, त्याअंतर्गत कॅन्सर उपचार पद्धतीत अत्याधुनिक समजले जाणारे कोट्यवधी रुपये किमतीचे लिनियॅक मशिन नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. डिसेंबरअखेरीस डायग्नोस्टिक सेंटर व लिनियॅक विभागाचे काम पूर्ण होणार असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही विभागाचे उद््घाटन केले जाणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख यांनी भाजपचे नेते सुरेश बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व आयएएस अधिकारी विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण दिले.

या वेळी चर्चेप्रसंगी आरोग्यमंत्री नड्डा यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगत रुग्णालयाला राजीव गांधी योजनेंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचेही आश्वासन दिले.

धुळ्यातही रुग्णालय

नामको ट्रस्ट संचालित कॅन्सर रुग्णालयाची एक शाखा धुळ्यातदेखील सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असा मानस संरक्षण राज्यमंत्री भामरे यांनी बोलून दाखविला. त्यासाठी मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले. दर्जेदार व विनामूल्य सेवा देणे हे खरोखरच कठीण आहे, असे सांगताना मी गेल्या काही वर्षांत अनेक रुग्णांना या रुग्णालयात जाण्यास सूचविले असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसने घ्य‍ायला गेला आणि चोवीस लाखांना मुकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघे सव्वा लाख रुपये उसने घेण्यासाठी मित्राकडे गेलेल्या व्यावसायिकाकडील २३ लाख ८५ हजार रुपयांची रोकड घेऊन संबंध‌ित मित्राने धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, संशयितांच्या शोधासाठी मध्यप्रदेशात पथक पाठवले आहे.

मुकेश चंदुलाल जैन (परिमल सोसायटी, होलाराम कॉलनी) असे पैसे घेऊन पळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी परदेस दीपक देवनानी (२५, रा. सुरूची अपार्टमेंट, आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूररोड) या फूटवेअर व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. नामांक‌ित कंपनीची एजन्सी चालवणाऱ्या देवनानी यास कंपनीला २५ लाख रुपयांचा भरणा करायचा होता. नोटांच्या चणचणीमुळे देवनानीने ओळखीच्या लोकांकडून पैसे उभारण्यास सुरुवात केली. जवळपास २३ लाख ८५ हजार रुपयांची रोकड देवनानीने संकल‌ित केली. मात्र, तरीही भरण्यासाठी एक लाख १५ हजार रुपयांची आवश्यकता होती. ही रक्कम घेण्यासाठी देवनानीने संशयित आरोपी मुकेश जैन यास कॉल केला. उसने पैसे देण्यासाठी जैनने तत्काळ होकार दर्शवला. त्यानुसार, पैसे घेण्यासाठी देवनानी मुकेश जैनच्या फ्लॅटवर पोहचला. यावेळी पैशांनी भरलेली बॅग देवनानीजवळ होती. मित्रत्वाचे संबंध असल्याने देवनानीने विश्वासाने पैसे जवळ ठेवले होते. जैनकडून मिळालेले पैसे घेऊन पुढे बँकेत भरणा करू असा विचार देवनानी केला. मात्र, जैनच्या घरात पोहचल्यानंतर चहापाणी झाला. गप्पा सुरू असतानाच जैनने पैशांची बॅग उचलली आणि तो आत गेला. बऱ्याच वेळानंतर जैन परत येत नसल्याने देवनानीने आत जाऊन पाहिले तर फ्लॅटला दोन दरवाजे असल्याचे लक्षात आले. मागील दरवाजाने पैशांची बॅग घेऊन संशयित आरोपीने पलायन केल्याची बाब देवनानीच्या लक्षात आली. त्याने तत्काळ सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी मूळचा मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथे राहतो. काहीतरी व्यवसायानिमित्त तो फ्लॅट घेऊन शहरात राहत होता. त्यानुसार, संशयित आरोपीच्या शोधासाठी काही पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच संशयिताला ताब्यात घेण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचना स्थगिती हायकोर्टातही ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवरील स्थगिती जिल्हा न्यायालयाने १९ डिसेंबरपर्यंत कायम ठेवल्याने धास्तावलेल्या पालिकेने गुरुवारी (दि. १५) हायकोर्टात धाव घेतली. परंतु, हायकोर्टानेही पालिकेला दिलासा देण्यास नकार दिला असून दिवाणी न्यायालयाने दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे.

दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील २१ डिसेंबरला हायकोर्टाने सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे पालिकेची प्रभागरचना आता चांगलीच अडचणी आली असून हायकोर्टातही दिलासा न मिळाल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. प्रभागरचनेवर हरकतदार हर्षल जाधव यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यात त्यांनी चुकीच्या पद्धतीने गुगल मॅपवर प्रगणक गटाची रचना केल्याचा आरोप केला आहे. न्या. ए. एच काशीकर यांनी हा अर्ज दाखल करून घेत प्रभाग रचनेला स्थगिती दिली आहे. महापालिकेने दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रालाच आव्हान दिल्याने पालिकेची अडचण झाली आहे. कोर्टाने पालिकेचे अपील दाखल करून घेत, दिवाणी न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच दिवाणी न्यायालयात १९ तारखेला सुनावणी झाल्यानंतर २१ डिसेंबरला पुढील सुनावणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षातील दोघांकडून लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मालेगाव येथील तरुणाचे रिक्षातून अपहरण करून दोघांनी लुटल्याची घटना गंगापूररोड परिसरात घडली. युवकास बेदम मारहाण करण्यात आली असून, डोक्यात बिअरची बाटली फोडल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अपहरण व लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेमंत सुरेश सूर्यवंशी (३७, रा. श्रीरामनगर, मालेगाव) या युवकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सोमेश्वरकडून नवशा गणपतीकडे हेमंत पायी जात असताना हा प्रकार घडला. गंगापूरकडून आलेल्या रिक्षाचालकाने (एमएच १५, ईएच २७५९) त्याच्याजवळ थांबवून त्यास बळजबरीने रिक्षात बसविले. काही अंतरावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकासह पाठीमागे बसलेल्या अन्य प्रवाशाने हेमंतला दमदाटी करून मोबाइल आणि पैशांची मागणी केली. हेमंतने विरोध करताच संशय‌ितांनी त्यास वाहनाखाली उतरवून देत डोक्यात बिअरची बाटली मारली. यामुळे हेमंत रक्तबंबाळ झाला. याचा फायदा घेत संशय‌ितांनी त्याचा मोबाइल व खिशातील रोख रक्कम असा सुमारे तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून धूम ठोकली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाडवी करीत आहेत.
पंचवटीत घरफोडी
दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सुमारे २९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. अनिता दीपक दुगजे (रा. उमा रेसिडेन्सी, राजमाता मंगल कार्यालय) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बुधवारी दुगजे कुटूंबिय काही कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून लाकडी कपाटातील ड्रॉवरमधून रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने, असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षकर होडे करीत आहेत.
दागिन्यांवर डल्ला
वृध्द महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत घरात घुसलेल्या चोरट्यांनी कपाटातील रोख रकमेसह सोन्याचांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना भगूर येथे घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवळाली व उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत अशा पध्दतीने सातत्याने चोऱ्या होत असून, पाळत ठेऊन गुन्हेगार हात साफ करीत आहेत.
हेमंत मनोहर टिळे (रा. टिळकपथ, तेली गल्ली, भगूर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या आईस दिसायला कमी असल्याने चोरट्यांनी ही संधी साधली. मंगळवारी दुपारी उघड्या दारातून घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि अलंकार असा ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास जमादार ढगे करीत आहेत. मागील महिन्यात देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत असे दोन गुन्हे घडले होते. वृध्द व्यक्तीस नातेवाईक असल्याचे सांगत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
युवकाची आत्महत्या
गोसावीवाडीतील जमादार चाळीत राहणाऱ्या १७ वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अझर अमीज शेख (रा.जमादार चाळ, गोसावीवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेच्या जागेवर घुसखोरी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या नव्या पार्किंगचे थेट स्टेशनवरच अतिक्रमण होताना दिसत असून, त्याचा जाच मात्र प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे देवी चौकात जुने पार्किंग आहे. तेथे सुमारे दीड हजार दुचाकी पार्क करता येतात. मात्र, येथे वाहनांची एवढी गर्दी होते, की प्रवाशांना वाहन शोधावे लागते. ते बाहेर काढणेही अवघड होते. गाड्यांवर प्रचंड धूळ साचलेली असते. या पार्किंगपासून रेल्वे स्टेशन दीडशे ते दोनशे मीटर दूर आहे. रोज अप-डाऊन करणारे येथे गाड्या लावतात. सकाळी गाडी पकडण्यासाठी व तिकीट काढण्यासाठी त्यांची प्रचंड ओढाताण होते. या पार्श्वभूमीवर दिवाळीत तिकीट विक्री केंद्राशेजारीच दुसरे पार्किंग सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासह गैरसोय टळत आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनला पूर्वीपासून अतिक्रमणांचा विळखा असल्याने पार्किंगची समस्या गंभीर आहे. सिन्नर फाटा सोडल्यास सर्व बाजूंनी रेल्वे स्टेशनमध्ये वाहने उभी केलेली असतात. रेल्वे स्टेशनमध्ये मित्र-आप्तेष्टांना सोडण्यास आलेल्यांना वाहने उभी करण्यास जागाच राहत नव्हती. त्यामुळे नवीन पार्किंगचे स्वागत करण्यात आले होते.

क्षमतेपेक्षा जास्त वाहने

रेल्वे पोलिस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत काँक्रिटीकरण करून नवीन पार्किंग सुरू झाले आहे. हा ठेका १४ एप्रिल २०२० पर्यंत असून, अडीचशे वाहन क्षमतेच्या या पार्किंगसाठी ५ लाख ४७ हजार ५०० रुपये लायसन्स फी आणि २६ लाख ४९ हजार ९०० रुपयांची सुरक्षा ठेव घेण्यात आल्याचे परवानगीपत्रात नमूद केले आहे. तथापि, पार्किंग करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने अडीचशेपेक्षा जास्त वाहने येथे उभी केली जात आहेत. ठेकेदाराला जेवढी जागा दिली त्यापेक्षा जास्त जागा त्याने व्यापल्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्यांनीच केली आहे. परिणामी या पार्किंगचे जणू रेल्वे स्टेशनवरच अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चारचाकींचेही पैसे

नवीन पार्किंग फक्त दुचाकींसाठीच आहे. चारचाकीकडून पैसे घेण्यास परवानगी नाही. मात्र, चारचाकी वाहने येथे प्रवाशांना घेण्यासाठी थांबल्यास त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, अशी तक्रार आहे. नवीन वाहनचालक पार्किंगचा बोर्ड बघून मुकाट्याने पैसे देतात. पार्किंगचे दर फक्त दुचाकींना परवडणारे आहेत. सहा तासांसाठी दहा रुपये, सहा ते बारा तास पंधरा रुपये, बारा ते चोवीस तासांसाठी वीस रुपये पार्किंग दर आहेत.

भ्रष्टाचाराचा संशय

रेल्वे कर्मचाऱ्यांना पार्किंगसाठी पार्सल ऑफिस आणि रेल्वे पोलिस स्टेशनमागे जागा होती. तथापि, नवीन पार्किंग झाल्याने आमच्याकडूनही पैसे घेतले जातात, प्लॅटफॉर्मवर पार्किंग केले, तर रेल्वेकडून कारवाई होते. आम्हाला कोणी वालीच राहिलेला नाही, अशी तक्रार एका रेल्वे कर्मचाऱ्याने केली. यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा संशय त्याने व्यक्त केला आहे.

नवीन पार्किंगचा जाच होणार नाही याची काळजी ठेकेदाराने घ्यावी. फक्त दुचाकी चालकांकडूनच पैसे घ्यावेत. चारचाकी वाहनचालकांकडून पैसे घेऊ नयेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना पार्किंगमध्ये जागा द्यावी. भ्रष्टाचार होत असल्यास रेल्वेने कारवाई करावी.

-राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images